Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘स्पॉट बिलिंग’ला स्थायीचा खोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाण्याचा अपव्यय टाळावा, अतिरिक्त पाणी वापरणाऱ्यांवर जादा शुल्क आकारणी करावी आणि बोगस नळकनेक्शनधारकांना चाप बसण्यासाठी स्पॉट बिलिंगचा अवलंब करण्यात आला. मात्र स्पॉट​ बिलिंगमुळे काही जणांची दुकानदारी मोडीत निघाल्याने त्रुटींचा बागुलबुवा करत ही योजनेला खोडा घालण्याचा खटाटोप सुरू होता. नागरिकांची गैरसोय होत असल्याची हाकाटी त्यांच्याकडून सुरू होती. नगरसेवकांनी ही नागरिकांची गैरसोय आणि उशिरा बिले मिळत असल्याच्या कारणावरून स्पॉट बिलींगला विरोध करत जोपर्यंत यामध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत जुन्या पद्धतीने बिले द्यावीत या निर्णयावर स्थायी समितीच्या सभेत शिक्कामोर्तब झाले.

आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्पॉट बिलिंगची संकल्पना मांडली. स्पॉटबिलिंगमुळे पाण्याचा वापर आणि त्यावर पाणी पट्टी आकारणी होऊ लागली. मात्र महापालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाविषयी अनास्था आहे. शिवाय स्पॉट बिलिंगमुळे अनेकांची दुकानदारी मोडीत निघू लागली. मिळकतधारक व मीटर रीडर यांच्या संगनमतातून पाणी पट्टी कमी लावणे, वाणिज्य वापरासाठी घरगुती दराने बिलाची आकारणी करणे अशा प्रकारांना चाप बसू लागला. शिवाय अतिरिक्त पाणी वापरावर जादा पाणीपट्टी आकारणी होऊ लागली. परिणामी स्पॉट बिलिंगमधील त्रुटींचा बागुलबुवा करण्यास सुरूवात झाली.

स्थायी समितीच्या २६ मे रोजी झालेल्या सभेतही आयुक्तांनी पाणीपट्टी बिलाच्या वाटपास विलंब झाला तर त्यावर दंड आकारणी केली जाणार नाही असे स्पष्ट केले होते. शिवाय स्पॉट बिलिंगमधील त्रुटी दूर करण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची ग्वाही दिली होती. गेल्या आठवडाभरात स्पॉट बिलिंगच्या तक्रारी वाढल्या. स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी स्थायी समितीची बैठक झाली. सदस्या रिना कांबळे, अजित ठाणेकरसह इतर सदस्यांनीही स्पॉट बिलिंग पद्धतीनुसार दिल्या जाणाऱ्या बिलावरील सर्व मजकूर पुसला जातो. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. ही पद्धत त्वरित सुधारण्यात यावी. व तोपर्यंत जुन्या पद्धतीने बीले द्यावीत असे सांगितले. सदस्यांच्या सुचनेनुसार, स्पॉट बिलिंग पद्धतीत सुधारणा होईपर्यंत जुन्या पद्धतीने बिले देण्यात येतील असे प्रशासनाने स्पष्ट केले.

स्पॉट बिलिंगला नगरसेवकांचा विरोध नाही. महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकणारी ही योजना आहे. यंत्रणेतील त्रुटीमुळे नागरिकांना भुर्दंड बसू नये, त्यामध्ये सुधारणा करावी अशा सूचना केल्या आहेत. या योजनेत सुधारणा आवश्यक आहे. तोपर्यंत जुन्या पद्धतीने बिले द्यावीत, अशी सूचना सगळ्या सदस्यांची होती. सुधारणा होईपर्यंत जुन्या पद्धतीने बिले देण्याचा निर्णय झाला.

मुरलीधर जाधव, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्हिडीओने ६७ लाखांचा ढपला उघडकीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खबऱ्यांच्या व्हिडीओमुळे मैनुद्दीन मुल्ला याने लंपास केलेल्या ६७ लाखांचा ढपला उघडकीस आला. तीन कोटी पळविण्याच्या प्रकरणातील मैनुद्दीनचा साथीदार विनायक महादेव जाधव (वय ३६, रा. भामटे, ता. करवीर) याला अटक करण्यात पोलिसांना यश आले, तरीही मैनुद्दीन मोठी रक्कम घेऊन फरार झाला. त्याला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

वारणा शिक्षण मंडळाच्या संकुलातील चोरीप्रकरणी मैनुद्दीनकडून पोलिसांनी ३ कोटी ८ लाख ९२ हजार ५०० रुपये, दोन बुलेट, मोबाइल हॅन्डसेट जप्त केला. संकुलातून उर्वरीत १ कोटी ३१ हजार २९ हजार रुपये जप्त केले. अटकेनंतर पोलिसांनी मैनुद्दीनला खाक्या दाखवला. मात्र त्याची तब्येत बिघडल्याने त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. मैनुद्दीनला एकच किडनी असल्याने पोलिसांनी नंतर खाक्या न दाखवता तपास केला. याचा फायदा घेत त्याने विनायकला ६८ लाख रुपये दिल्याचे सांगितले नाही. मुंबई पोलिसांनी मैनुद्दीनला चोरीच्या तपासासाठी ताब्यात घेतले. त्याने जामिनासाठी अर्ज केल्यावर वैद्यकीय कारणासाठी कोर्टाने त्याला जामिन मंजूर केला. १८ मे रोजी मैनुद्दीनवर कोडोली पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी नोटीस बजावली. मात्र तो हजर राहिला नाही.

दरम्यान, मैनुद्दीनने पैसे नेण्यासाठी विनायक महादेव जाधव (रा. भामटे, ता. करवीर) याची मोटार वापरल्याची माहिती १६ मे रोजी शाहूवाडी पोलिस उपाधीक्षकांना मिळाली. यावेळी मैनुद्दीन याने विनायकला मोठी रक्कम दिल्याचे कळाले. विनायकला पोलिसांनी २७ मे रोजी अटक केली. मैनुद्दीनने विनायक याला त्याच्या हिश्श्याचे ६९ लाख ५० हजार रुपये दिले होते. ही रक्कम मैनुद्दीनने परत मागितली. सात मे रोजी कोल्हापुरातील सायबर चौकात त्याने विनायक याच्याकडून एका पोत्यात भरलेले ६८ लाख रुपये परत घेतले. पैशाचे पोते मैनुद्दीनच्या पत्नीने घरातील लोखंडी बिछान्याखाली ठेवल्याचे विनायकने पोलिसांना सांगितले.

मैनुद्दीनने ज्यावेळी विनायककडून पैसे घेतले, चेव्हा त्याच्यासोबत दोघेजण होते. पैसे परत घेताना एकाने मोबाइलवर व्हिडिओ शूट केला. तो व्हिडिओ पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी विनायक व मैनुद्दीनची पत्नी निलोफरला अटक केली. दोघांकडे पोलिसांनी चौकशी केली, पण मैनुद्दीन फरारी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिस अधीक्षकांनी मागवली माहिती

मैनुद्दीन याने पाडलेला ६७ लाखांचा ढपला, त्याची पत्नी निलोफर, साथीदार विनायक यांना केलेल्या अटकेची कारवाई याची माहिती पोलिस उपाधिक्षक सूरज गुरव यांनी मागवली आहे. या गुन्ह्यांचा तपास गांभीर्याने, काळजीपूर्वक करावा, अशी सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दिनकर मोहिते यांना पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा हॉस्पिटल्सचे दुखणे संपणार कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर ​ सर्वसामान्य रुग्णांचा आधारवड अशी येथील पंचगंगा हॉस्पिटलची ओळख आहे. कोल्हापूरसह आसपासच्या खेडेगावातील गरीब रुग्ण, गर्भवतींवर येथे उपचार होतात. केवळ ५०० रुपयांत प्रसुती होत असल्याने गरीब घटकांची पावले पंचगंगा हॉस्पिटलकडे वळतात. मात्र पंचगंगा हॉस्पिटटलमध्ये डॉक्टरांची कमतरता, उपकरणांचा अभाव आणि रुग्णवाहिका गायब असे चित्र आहे. नवजात बालकासाठी इनक्युबेटरची गरज आहे. रात्रीच्या सत्रात भूलतज्ज्ञ उपलब्ध होत नसल्याने येथील रुग्ण सीपीआरकडे पाठविले जातात. येथे आयसीयू सेंटर अद्ययावत केले तर रुग्णांसाठी ते हितकारक ठरणार आहे.

शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, सोमवार पेठ, सिद्धार्थनगर, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहतसह आंबेवाडी, केर्ली, पन्हाळा, बांबवडे, मलकापूर, कळे, भामटे या गावातील रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात. प्रसुतीसाठी ४० बेडची सुविधा आहे. महिन्याकाठी येथे ५० हून अधिक शस्त्रक्रिया होतात. येथे आयसीयू सेंटर नाही. लॅप्रोस्कोपीची सुविधा नाही. किचकट प्रक्रिया निर्माण झाली तर प्रत्येकवेळी सावित्रीबाई फुले हॉस्पिटलकडे धाव घ्यावी लागते. ठोक मानधनावर डॉक्टरांच्या नियुक्या करण्यात आल्या आहेत. त्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. ड्रेसर, वॉर्डबॉयची संख्या कमी आहे. कर्मचारी रजेवर असल्यास रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यास कर्मचारी नसतात. वास्तविक पाच रुग्णांसाठी एक नर्स असे समीकरण असताना येथे १५ रुग्णांसाठी एकच नर्स धावपळ करत असते. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा अभाव असल्याने रात्रीच्या वेळेला शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत. या संदर्भात प्रभारी आरोग्य अधिकारी अरूण वाडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.

डिस्पेन्सरी बंद

पंचगंगा हॉस्पिटलमध्ये मुळातच डॉक्टर, कंपाउंड, ड्रेसरची संख्या अपुरी आहे. एखादा कर्मचारी गैरहजर राहिला तर संपूर्ण कामावर परिणाम होतो. शुकवारी येथील डॉक्टर रजेवर गेल्याने डिस्पेन्सरी विभाग बंद राहिला. परिणामी सर्दी, खोकला, ताप, किरकोळ जखमी असल्यास त्यावर प्राथमिक उपचाराचे काम ठप्प झाले. पंचगंगा हॉस्पिटल येथे मधुमेह, क्षयरोग संदर्भात तपासण्या केल्या जातात. या विभागातही मुनष्यबळ कमी आहे. नेत्र तपासणीची सोय आहे. महापालिकेने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध कराव्यात.

विनायक चव्हाण, नागरिक

पंचगंगा हॉस्पिटलमध्ये प्रसुतीला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उपनगर आणि आसपासच्या गावातील गर्भवती येथे प्रसुतीसाठी दाखल होतात. याठिकाणी जादा स्त्रीरोगतज्ज्ञ नेमले पाहिजेत. तसेच लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करून शिशुगृह सुरू करणे आवश्यक आहे. दिवसभर भूलतज्ज्ञ उपलब्ध असतात. पण, संध्याकाळी भूलतज्ज्ञ नसतात. यामुळे शस्त्रक्रिया होत नाहीत. प्रशासनाने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून अधिकाधिक सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत.

रंजना सावंत, कार्यकर्त्या

रुग्णवाहिका गायब

पंचगंगा हॉस्पिटलसाठी रुग्णवाहिका देण्यात आली होती. यामुळे रुग्णांची चांगली सोय झाली होती. मात्र सध्या ही रुग्णवाहिका दिसत नाही. रुग्णवाहिका नादुरूस्त झाल्याचे सांगून बंद ठेवली होती. आता रुग्णवाहिका कुठेच दिसत नाही. रुग्णवाहिकाच गायब झाल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळींचा बफर स्टॉकची राज्य सरकारांना मुभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशामध्ये यंदा २४६ लाख टन डाळींची मागणी आहे. त्यासाठी केवळ १७० लाख टनाचा पुरवठा झाला असून ७६ लाख टन इतकी मोठी तूट आहे. खासगी यंत्रणेने आयात केलेल्या ५८ लाख टन डाळीमुळे हे प्रमाण कमी झाले असले तरी १८ लाख टन डाळींचा तुटवडा आहे. यासाठी साठा करुन दर वाढवणाऱ्या साठेबाजांवर कडक कारवाई करण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत. बफर स्टॉक करण्याचेही आदेश दिले आहेत', असे केंद्रीय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पासवान यांनी महागाईबाबत पत्रकारांशी बोलताना डाळीबाबत सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मंत्री पासवान म्हणाले, 'डाळींच्या महागाईबाबत साठा मर्यादा घालून दिली आहे. त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारना दिले आहेत. केंद्र सरकारनेही अनेक साठेबाजांवर कारवाई केली असून राज्यांमध्ये अशा प्रकारच्या कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या डाळींच्या बफर स्टॉकचे दिड लाख टनाचे उद्दिष्ट आहे. सव्वा लाख टन डाळींचा बफर स्टॉक केला आहे. त्यातील ५० हजार टन खरीपातून तर ४० हजार टन रब्बीमधून खरेदी केली आहे. तर २६ लाख टन खासगी यंत्रणेकडून आयात केल्या आहेत. केंद्र सरकारकडून ६६ रुपये दराने तूरडाळ दिली जात आहे. ही डाळ राज्यामध्ये १२० रुपयांच्यावर जाऊ नये याची दक्षता घेण्याची सूचना राज्यांना दिल्या आहेत. त्यासाठी हवा तर राज्य सरकार बफर स्टॉक करु शकतात. साखरेबाबतही ४० रुपयांवर जाऊ लागल्याने नियंत्रणाचे पाऊल उचलावे लागले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अखेर त्याला मृत्यूने गाठलेच

$
0
0

पंढरपूर । सुनील दिवाण

त्याला वादळ आणि विजांची दहशतच बसली होती. गेल्यावर्षी अशाच वादळात त्याच्या घराचे पत्रे त्याच्यासहित उडून गेले आणि त्याचा पाय मोडला होता. काल पुन्हा असेच जोराचे वादळ सुरू झाले, घरासमोरील पत्र्याचे शेड उडून गेले आणि भीतीने त्याने वृद्ध आई वडील, बहिणीची ३ लहान मुले यांना घेवून घराजवळील मंदिरात आसरा घेतला. मंदिराच्या छोट्याशा गाभाऱ्यात आई, वडील आणि चिमुरड्यांना बसवून तो गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर देवीच्या मूर्तीकडे तोंड करून बसला होता... पण त्याच्या आयुष्याची दोरी बळकट नव्हती, आकाशातून विजेचा गोळा आला आणि काही कळायच्या आत त्याला घेवून गेला...

ही दुर्दैवी कहाणी आहे सांगोला तालुक्यातील कोळा गावच्या शरद सरगरची. सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील कोळा हे गाव आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे घर शरद सरगर याचे. डोंगरांच्या कुशीत वसलेले १५ हजार लोकवस्तीचे कोळा हे गाव कष्टकरी शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. कामानिमित्त येथील शेकडो तरुण मुंबईमध्ये असतात. गेल्या २ ते ३ दिवसापासून मान्सूनच्या आगमनाचा संदेश देत या भागात रोहिण्या बरसत होत्या. सोबत वादळ आणि विजांचा तांडवही सुरूच होता. गावापासून थोडेसे दूर शरद सरगरचे घर आहे. घरात वृद्ध आई-वडिलांसोबत शाळेला सुट्टी असल्याने मुलांना घेऊन आलेली बहिण होती. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास वादळाला सुरुवात झाली आणि घरासमोरचे शेड वादळाने उचकटून नेले. गेल्यावर्षी अशाच वादळात शरद पत्र्यासह उडून दूर पडला होता यात त्याचा पाय जायबंदी झाला होता. त्या थरारक आठवणी ताज्या असल्याने शरदने धोका न पत्करता घरातील मंडळीना घेवून आसरा घेण्यासाठी जवळचं रेडामाईचं मंदिर गाठलं. छोटासा गाभारा आणि समोर पत्र्याचे शेड असे हे मंदिर आहे. साडेआठ वाजता वादळाचा जोर वाढल्यावर सगळेजण गाभाऱ्यात जागा मिळेल तिथे बसू लागले पण गाभारा लहान असल्याने शरद उंबरठ्यावरच बसला. मात्र शरदला काळाने गाठलेच. अचानक वीज कडाडली आणि आकाशातून आलेला विजेचा गोळा मंदिराचा कळस भेदत थेट शरदच्या मानेवर कोसळला. मोठा आवाज झाला आणि आगीच्या ठिणग्या इतरांच्याही अंगावर पडल्या.

भीतीने सगळ्यांनीच आरडओरड सुरु केली. आरडओरड ऐकून गावकरी जमा झाले. त्यांनी निपचित पडलेल्या शरदसह सर्वांनाच दवाखान्यात नेले पण शरदचा त्याआधीच मृत्यू झाला होता. विजेच्या धक्क्याने मंदिराचा कळसही तुटून पडला इतकी भंयकर वेगाने ही वीज कोसळली होती. नियतीचा खेळ असा कि जे घर वादळाने उडून जाईल या भीतीने शरदने मंदिरात आसरा घेतला तिथे नियतीने त्याला दगा दिला आणि संपूर्ण वादळात घराची मात्र जराही पडझड झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन वर्षांत चौफेर विकास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांत देशाचा चौफेर विकास होत आहे. केवळ उच्च जातीच्या किंवा उच्चशिक्षित माणसालाच नव्हे, तर तळागाळातील आणि वंचितांनाही विकासाची संधी मिळत आहे, असा दावा लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख व केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी येथे केला. त्याचवेळी देशातील आरक्षण आणि रेशन व्यवस्था कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे पासवान यांनी स्पष्ट केले.

मोदी सरकारच्या दोन वर्षांतील कामगिरीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित 'विकास पर्व' मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय उद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्रसिंह यादव, आमदार अमल महाडिक प्रमुख उपस्थित होते. मेळाव्यास भाजप व पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

पासवान म्हणाले, 'देशात शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढत आहे. अमेरिका भारताला सन्मानाची वागणूक देत आहे. गुरगुरणारा पाकिस्तान गप्प आहे. कोणतेही राज्य सरकार आमच्यावर अन्याय झाला, असा आरोप करू शकत नाही. मुळात कोणतेही सरकार सत्तेवर आल्यानंतर एक वर्षानंतर त्याची लोकप्रियता कमी होते. मात्र, दोन वर्षांनंतरही देशात मोदी सरकारची लोकप्रियता वाढत आहे. आम्ही खूप काम करतो. मात्र, ते लोकांपर्यंत पोहोचतच नाही. तुम्ही कार्यकर्ते आमची ताकद आहात. तुम्ही सरकारचे काम तळागळात पोहोचवा.'

गिरिराज सिंह म्हणाले, 'यूपीए सरकारमुळे देशाची प्रतिमा डागाळली. आज मोदींमुळे देशाकडे बोट दाखविण्याची हिंमत कोणाची होणार नाही. काँग्रेस आरोप करत असली, तरी सरकारची कामगिरी पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांचे आहे.'

भूपेंद्रसिंह यादव म्हणाले, 'शंभर वर्षांपूर्वीचे शाहूंचे प्रशासकीय मॉडेलच नरेंद्र मोदींचे मॉडेल आहे. काँग्रेसने मोठ्या योजना दिल्या. मात्र, पैसा सामान्यांपर्यंत पोहोचलाच नाही. गॅस सबसिडीतील बनावट खाती बंद केल्याने देशाचे जवळपास १४ हजार कोटी रुपये वाचले. यातून पाच कोटी गरीब महिलांना नवी गॅस कनेक्शन्स दिली आहेत. काँग्रेसने ६७ वर्षांच्या काळात केवळ देशातील ४६ टक्के जमीन ओलिताखाली आणली. त्यातही नैसर्गिक वरदान असलेल्या जमिनीचा समावेश आहे. त्यांनी अपूर्ण ठेवलेल्या ८९ मोठ्या योजना मोदी सरकारने पाच वर्षांत पूर्णत्वास आणल्या आणि देशातील शेतकऱ्यांचे चित्र पालटले. जीएसटीच्या मुद्द्यावर काँग्रेस विरोधाचे राजकारण करत आहे.'

यावेळी महेश मोरे, दीपक काटकर, युवराज खंडागळे व संतोष गुरव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी स्वागत केले. व्यासपीठावर भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, ज्येष्ठ नेते बाबा देसाई, महेश जाधव, लोक जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शमीम हवा, पश्चिम महाराष्ट्रप्रमुख प्रमोद कुदळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष रवी गरुड, काका खंबाळकर व शेतकरी संघटनेचे भगवान काटे प्रमुख उपस्थित होते. अशोक देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्यान’चे उद्या विद्यापीठात उद‍्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय पुरस्कृत ग्लोब इनिशिएटीव्ह ऑफ अॅकॅडेमिक नेटवर्क्स (ग्यान) उपक्रमाचे शिवाजी विद्यापीठात सोमवारी (ता. ६) सकाळी दहा वाजता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अमेरिकेतील पर्डयू विद्यापीठाचे डॉ. व्यंकटेश मेरवाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते म्युझियम कॉम्प्लेक्स इमारतीचे भूमिपूजन होणार आहे.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, 'जागतिकीकरणाच्या अनुषंगाने उच्च शिक्षणात आमूलाग्र बदल होत आहेत. उच्च शिक्षणामध्ये जागतिक पातळीवर देशातील विद्यार्थी सर्वसमावेशक असावेत, यासाठी भारताच्या केंद्रीय विकास मंत्रालयाने 'ग्यान' उपक्रमाला सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत जगातील वैज्ञानिक, शिक्षक, उद्योजक आणि विद्यार्थ्यांना भारतीय उच्चशिक्षण व्यवस्थेत अल्पकालीन प्रशिक्षणासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. यासाठी 'नॅक' मूल्यांकनामध्ये विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश केला आहे. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाची निवड झाली असून, राज्यातील पहिला 'ग्यान' उपक्रम सुरू होणार आहे.'

'उपक्रमांतर्गत सहा ते ११ जूनअखेर मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. पहिल्या सत्रात अमेरिका येथील पर्डयू विद्यापीठाचे डॉ. व्यंकटेश मेरवाडे 'भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस)', 'जलस्रोतांचे व्यवस्थापन' या विषयावर व्याख्यान देणार आहे. याबरोबरच विद्यापीठातील प्रौढ व निरंतर शिक्षण विभागासमोरील जागेत म्युझियम कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. या कॉम्प्लेक्स व तंत्रज्ञान अधिविभागातील आधुनिक वर्कशॉपचेही उदघाटन मंत्री तावडे यांच्या हस्ते होणार असल्याचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.

पत्रकार बैठकीस बीसीयूडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, 'ग्यान'चे समन्वयक डॉ. आर. के. कामत, संयोजक डॉ. पी. डी. राऊत, अभ्यासक्रम समन्वयक डॉ. एस. एस. पन्हाळकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंब्याजवळ भीषण अपघात पाचजण ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंबा गावाजवळ झालेल्या भीषण कार अपघातात पाचजण ठार झाले. सर्व मृत पुण्यातील आहेत. विशाळगड दर्ग्याच्या दर्शनासाठी जात असताना त्यांची कार तळवडे येथे झाडावर आदळली. ही धडक एवढी भीषण होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास अपघात झाला.

इम्रान शरीफ शेख (वय ३८), त्यांची पत्नी शिफा (३२), शरीफभाई करीम शेख (५८), सलीनाबी शरीफ शेख (५०) लिबा समीर शेख (५, सर्व रा. अल‍्सफा बिल्डींग, मोमीनपुरा, घोरपडी पेठ, पुणे ) अशी मृतांची नावे आहेत. इम्रान, शिफा, शरीफभाई यांचा जागेवरच मृत्यू झाला तर लिबा शेख या आठवर्षीय मुलीचा मृत्यु कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये झाला.

शेख कुटुंबीय पुण्यातील व्यापारी आहेत. मोमीनपुरा मार्केटसह अन्य ठिकाणी ते वेगवेगळ्या व्यवसायात आहेत. शेख व त्यांचे नातलग पुण्याहून सकाळी साडेआठ वाजता विशाळगड दर्शनासाठी निघाले. विशाळगडावर ते धार्मिक विधी करणार होते. विशाळगडला जाताना त्यांना मिरज, हातकणंगले येथील नातेवाईक मिळाले. कोल्हापुरातून विशाळगडकडे सर्वजण दुपारी ​निघाले होते. मलकापूरपासून आंबा गावाजवळ आले असताना एका तीव्र वळणावर इम्रान शेख चालवत असलेली कार (एमएच १२, एचझेड ९८६२) झाडावर जोरात आदळली. यावेळी प्रचंड मोठा आवाज झाला. त्यात इम्रान, त्यांची पत्नी शिखा, वडील शरीफ जागीच ठार झाले. तर आई सलीनाबी यांचा साखरपा आरोग्य केंद्रात उपचारावेळी मृत्यू झाला. लिबा गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला कोल्हापूकरडे आणत असताना शेख कुटुंबीय चुकीच्या मार्गाने आले. त्यामुळे सीपीआर हॉस्पिटलमध्ये पोहोचायला त्यांना पाऊण तास उशीर झाला. अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास लिबाला उपचारास दाखल केले. पण, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती समजताच शेख यांच्या मिरज व कोल्हापुरातील नातेवाईकांनी सीपीआर हॉस्पिटल परिसरात गर्दी केली होती. अपघाताची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे. डीवायएसपी सूरज गुरव, व पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

दोन मुली वाचल्या

अपघातात शेख कुटुंबीयांतील पाच जणांचा मृत्यू झाला. यातील मृत इम्रानची लिबा ही मुलगीही ठार झाली. इम्रानच्या दोन मुली सानिया (१२) व अलिना (१०) दुसऱ्या नातेवाईकांच्या कारमध्ये होत्या. त्यामुळे त्या बचावल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरटीओ साथ देईना, वडाप हटेना

$
0
0

Appasaheb.mali

@timesgroup.com

कोल्हापूर ः केएमटी बसमधून रोज एक लाखाच्या आसपास प्रवासी वाहतूक होते. शहर आ​णि परिसरात ११० हून अधिक बसेस धावतात. सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी केएमटीचा प्रवास किफायतशीर असताना त्याच्या मार्गात खासगी आणि वडाप व्यावसायिकांची घुसखोरी वाढली आहे. शिवाय शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी केएमटीचीच अशा संकुचित वृत्तीने आरटीओ विभाग आ​णि पोलिस प्रशासन त्याकडे पाहते. परिणामी बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. दर महिन्याला केएमटीने आरटीओला वडापवर कारवाई करण्यासंदर्भात पत्र द्यायचे आणि आरटीओने त्याला केराची टोपली दाखवायची असा जणू पायंडाच पडला आहे.

शहर आणि परिसरात मिळून ५०० बसथांबे आहेत. हे थांबे केएमटीचे, पण तेथे वर्चस्व वडापवाल्यांचे अशी स्थिती आहे. महापालिका आणि केएमटीच्या नाकावर टिच्चून सहा आणि तीनचाकी रिक्षा व्यावसायिक शहरात बेकायदेशीरपणे वाहतूक करत आहेत. महापालिकेच्या समोरील माळकर तिकटी चौकातच बेकायदेशीर रिक्षा व्यावसायिकांचा बिनदिक्कतपणे व्यवसाय सुरू आहे. लुगडी ओळ, महाराणा प्रताप चौक, स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर चौक, कावळा नाका चौक, गांधीनगर, गंगावेश, मंगळवार पेठ, कळंबा, पाचगाव, रामानंदनगर, संभाजीनगर, सानेगुरुजी वसाहत, फुलेवाडी, कसबा बावडा या गर्दीच्या मार्गावर वडापवाल्यांची दादागिरी आहे. केएमटीच्या थांब्यावरून अवैधरीत्या वडाप वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी याकरिता केएमटी प्रशासन आ​णि नगरसेवकांनी वारंवार आरटीओ अ​धिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. निवेदने दिली. पण आरटीओकडून कसल्याही प्रकारची कारवाई आणि महापालिकेला सहकार्य न मिळाल्याने वडाप हटली नाही.

मतभेद संघटनेचे, फटका केएमटीला

केएमटीमध्ये कर्मचाऱ्यांच्या दोन संघटना आहेत. म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियन व इंटकप्रणीत कर्मचारी संघटना केएमटीत कार्यरत आहेत. दोन्ही संघटनांची तोंडे दोन दिशांना आहेत. कर्मचारी सोसायटीच्या राजकारणावरून दोन्ही संघटनांतील मतभेदाची दरी आणखी रुंदावली आहे. या दोन संघटनांतील वादाचा फटका प्रशासकीय कामकाजाला बसतो. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, ड्यूटी लावणे, सुट्या, रोटेशनप्रमाणे काम अशा सर्वच टप्प्यांवर दोन्ही संघटना ठराविक कर्मचाऱ्यांवर मेहेरनजर दाखवितात असा आक्षेपा घेतला जातो. आता रोटेशनप्रमाणे कामाच्या कार्यवाहीत सुधारणा झाली. पण प्रशासनाने केएमटीसंदर्भात एखादा निर्णय घेतला की, दोन्ही संघटनांतील मंडळी त्या निर्णयाचा आपल्या संघटनेला कसा फायदा होईल याचेच आडाखे बांधतात. प्रशासनातील महत्त्वाच्या पदावर संघटनेची माणसे असल्याने सोयीनुसार अंमलबजावणी होत असल्याची टीका कर्मचाऱ्यांकडून होते. वास्तविक दोन्ही संघटना, कर्मचाऱ्यांसाठी स्थापल्या आहेत; पण कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ते एकत्रपणे लढताना दिसत नाहीत.

गरज कर्मचाऱ्यांच्या मानसिकता बदलाची

केएमटीमध्ये जवळपास एक हजार कर्मचारी काम करतात. वाहक-चालक, कार्यालय आणि वर्कशॉप अशा तीन विभागांत कर्मचाऱ्यांची विभागणी आहे. केएमटी फायद्यात आणण्यासाठी या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणारे आहे. मध्यंतरी जवळपास सत्तरहून अधिक वाहक, चालकांनी स्वत:हून एकत्र येत प्रवासी उठाव अभियान, प्रवासांना वेळेवर सुविधा देण्यासाठी पुढे सरसावले. ऑफिस ड्यूटीव्यतिरिक्त जादा वेळ ते बस थांब्यांवर थांबून प्रवाशांना केएमटीतून प्रवास करण्याविषयी आवाहन करत होते. प्रशासनाने आता वाहक, चालकांसाठी प्रोत्साहन भत्ता, प्रवाशांसाठी सुवर्ण बक्षीस योजना राबविल्या आहेत. काही कर्मचारी केएमटीसाठी योगदान देत असताना काहीजण मात्र कामचुकार, वारंवार गैरहजर राहणे, रूटच्या थांब्यावरील प्रवाशांना न घेताच बसेस वेगाने हाकत असतात. काही कर्मचाऱ्यांच्या गैरप्रकारामुळे नुकसान मात्र संस्थेचे आहे.

२७०० किलोमीटरची वाहतूक बिनफायद्याची

व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव आणि योग्य व्यवस्थापन होत नसल्याने केएमटीची गाडी आर्थिकदृष्ट्या रुळावर येण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. शहरालगतच्या वीस किलोमीटर अंतरावरील गावांना केएमटीची सुविधा पुरविली जाते. मात्र, ११ मार्गांवरील वाहतूक बिनफायद्याची आहे. रोज २७०० किलोमीटर प्रवासी वाहतुकीतून उत्पन्न मिळण्याऐवजी तोटा सहन करावा लागतो. एका दिवसाला ३० हजार रुपये याप्रमाणे महिन्याला नऊ लाख रुपये नुकसान सोसावे लागत आहे. उशिरा का होईना ११ मार्गांवरील वाहतूक बंदचा करण्याचा निर्णय झाला. त्याची अंमलबजावणी करून गर्दीच्या मार्गावर जादा बसेस सोडले तर ते केएमटी फायद्याची ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कनवा’साठी आज मतदान, मतमोजणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर नगर वाचन मंदिराची पंचवार्षिक निवडणूक रविवारी (ता.५) होत आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत करवीर नगर वाचन मंदिर येथे मतदान होणार असून, सायंकाळी सहा वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. गेल्या २५ वर्षांत प्रथमच या ऐतिहासिक संस्थेची निवडणूक जाहीरपणे होत असून, सत्ताधारी शाहू पॅनेलसह प्रिन्स शिवाजी पॅनेल आणि करवीर काशी स्वाभिमानी आघाडी अशी एकूण तीन पॅनेल रिंगणात उतरली आहेत.

गेल्या काही वर्षांतील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला आक्षेप, छत्रपती शिवाजी सभागृह पाडण्याची घटना यामुळे निवडणूक चर्चेत आहे. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या पुढाकारातून विरोधी पॅनेल उभारण्यात आले आहे. तसेच सुनीलकुमार सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली करवीर काशी स्वाभिमानी आघाडी पॅनेलही रिंगणात आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष राजाभाऊ जोशी व सहकाऱ्यांच्या सत्ताधारी पॅनेलमध्ये यंदा नवीन चेहरेही असणार आहेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

'आजरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील ११ प्रकल्पांचे १०० टक्के पुनर्वसन वर्ष-दोन वर्षात प्राधान्याने करणार असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी आजरा येथे केले. चित्री प्रकल्पग्रस्तांना शंभर टक्के पर्यायी जमीन व भूखंड दिल्यानिमित्त गंगामाई वाचनालय सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धरणग्रस्त संघटनेचे नेते डॉ. भारत पाटणकर यावेळी प्रमुख उपस्थित होते.

चोक्कलिंगम म्हणाले, 'प्रकल्पामुळे अनेकांचे कल्याण साधले जाते. पण त्यासाठी ज्यांचे सर्वस्व हिरावून घेतले जाते, त्या प्रकल्पग्रस्तांची परवड होते. अशा स्थितीत धनदांडग्यांना जमिनी मिळतात, पण सर्वसामान्य गोरगरीब धरणग्रस्त भरडले जातात. सहकार, रोजगार हमीप्रमाणे पुनर्सनाचा कायदाही महाराष्ट्रानेच देशाला दिला आहे. त्यामुळे सर्व प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन झाल्याचे जाहीर प्रकटन येथील राजपत्रातून प्राधान्याने व्हायला हवे. त्यासाठी प्रशासनानेही आता कंबर कसली आहे. याची सुरवात कोल्हापूर जिल्ह्यातूनच होणार असून, आता चित्री प्रकल्पग्रस्तांच्या सात-बारा व गावठाणाच्या स्वतंत्र नकाशासह वसाहतींना महसुली गाव-दर्जा देण्याची कार्यवाही करीत जिल्ह्यातील इतर प्रकल्पांच्या पुनर्वसन कार्यवाहीलाही तातडीने सुरवात होईल.'

डॉ. पाटणकर म्हणाले, 'प्रकल्पग्रस्त संघटनांनी धरणांना कधीही विरोध केला नाही. त्याशिवाय आर्थिक सुबत्ता येत नाही, या कल्याणकारी धोरणाला संघटनांनी मान्य केले आहे. पण त्यासाठी काहीजणांना भरडून, पाण्याशिवाय लाभक्षेत्रात जमिनी देऊन, वसाहतींमध्ये नुसत्याच सुविधा देऊन प्रकल्पग्रस्तांना पुन्हा उभे करणे अशक्य आहे. पण 'चित्री'च्या सशक्त लढ्याच्या माध्यमातून शंभर टक्के जमीन व भूखंड मिळविले. या संघर्षात्मक पक्क्या पायावर आता उर्वरीत प्रश्न सोडवून राज्यासमोर आदर्श निर्माण केला जाईल.' चित्रीमधील राहिलेले प्रश्नही दिवाळीपर्यंत सोडविण्याचे प्रशासनाच्या बैठकीत ठरले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हाधिकारी अमित सैनी, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार, शैलेश सुर्यवंशी, किर्ती नलवडे, शिल्पा ठोकडे आदींसह अधिकारी व प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येडगे यांचा सन्मान

चित्री प्रकल्पामधील बाधितांचे किमान पर्यायी जमिनी व घरांसाठीचे भूखंड मिळाल्यानंतरच घळभरणीचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी ही घळभरणी प्रकल्पग्रस्त बाबू येडगे यांच्या हस्ते करण्यात आली. आजच्या समारंभाच्या निमित्ताने श्री. येडगे यांना विभागीय आयुक्त श्री. चोकलिंगम यांच्या हस्ते रोप देऊन सन्मानित करण्यात आल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईसाठी तृप्ती देसाईंचे ठिय्या आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरात प्रवेश करण्यास विरोध करत मारहाण करणाऱ्यांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शनिवारी राजवाडा पोलिस ठाण्यासमोर सकाळपासून ठिय्या आंदोलन केले. जमावबंदीचा आदेश असतानाही आंदोलन केल्यामुळे देसाईंसह १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यास कोल्हापुरात विरोध झाला होता. हा विरोध मोडून देसाई यांनी १३ एप्रिलला मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्यांना विरोध करत काहींनी मारहाण केली. मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांसह राजकीय पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली; पण मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करावी, आरोपींना अटक करण्यात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या पोलिस निरीक्षकांना निलंबित करावे यासाठी देसाई यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता राजवाडा पोलिस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले. मात्र, जमाबंदी असताना आंदोलन केल्यामुळे त्यांच्यासह १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

यावेळी त्यांनी १५ दिवसांत जर पोलिसांनी कारवाई न केल्यास पोलिस आयुक्तालयामध्ये कारवाई होईपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनात मनीषा टिळेकर, शहनाज शेख, कांतिलाल गवारे, बिस्मिला कागदे, आनंदी पाटील, आदी सहभागी झाल्या होत्या.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून जिल्ह्यात ३७/१ या कलमानुसार जमाबंदीचे आदेश लागू केला आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येऊन आंदोलन करता येत नाही. जमाबंदीचा आदेश मोडून तृप्ती देसाई यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. देसाई यांच्या मागणीनुसार चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.'

अनिल देशमुख, पोलिस निरीक्षक, राजवाडा पोलिस ठाणे

३१ मे रोजी जिल्हा पोलिसप्रमुखांना आंदोलनाबाबत फॅक्सद्वारे कल्पना दिली होती. त्याबाबत फोनही आला मात्र जमावबंदी आदेश असल्याची कोणतीच माहिती दिली नाही. पोलिस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यास कोल्हापुरात विरोध झाला होता. हा विरोध मोडून १३ एप्रिलला मंदिरात प्रवेश केला. यावेळी ६०-७० जणांनी मारहाण करत विरोध केला, मग इतर सहभागींवर कारवाई का केली जात नाही? १५ दिवसांत कारवाई न झाल्यास पोलिस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन करू.'

तृप्ती देसाई, अध्यक्ष, भूमाता ब्रिगेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संच मान्यतेच्या बळावर लाखोंची उड्डाणे

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

कोल्हापूरः शाळेतील पटसंख्या जेवढी असेल तितक्या पटावर शिक्षक मंजूर केले जातात. संच मान्यता करताना संस्थाचालक आणि शिक्षण विभाग प्रशासनातील काही शुक्राचार्य लाखो रुपये उकळतात. शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांचे संच मान्यतेचे जेवढे कॅम्प अधिक त्या पटीत रक्कम मिळविली जाते. या खात्यातील अनेक अधिकाऱ्यांनी संच मान्यतेतून उखळ पांढरे करुन घेतले आहे. काही अधिकाऱ्यांचे अलिशान बंगले आर्थिक कमाई केल्याची बोलकी उदाहरणे आहेत.

प्राथमिक शिक्षकांची नोकरी मिळवेपर्यंत उमेदवारांना अनेक दिव्यातून जावे लागते. शिक्षणसंस्थाचालकांना देणगी दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही. प्राथमिक शिक्षकांसाठी सुमारे सात ते आठ लाखांचा दर आहे. ऑनलाइन संच मान्यता असली तरी पटसंख्येच्या तुलनेत शिक्षक मंजूर केले जातात. यामध्ये वाढीव पदे मंजूर करण्यासाठी लाखो रुपये घेतले जातात. शाळांना पदे मंजूर करुन देण्यासाठी शिक्षण उपसंचालक आणि प्राथमिक शिक्षण विभागाची महत्त्वाची जबाबदारी असते. पदे मंजूर करुन दिल्याबद्दल काही शैक्षणिक संस्था शिक्षकांचा महिन्याचा पगार कापून घेतात.

काही संस्था पगाराच्या दहा टक्के रक्कम कपात करुन घेतात. शिक्षक मान्यतेशिवाय संस्थांची पुढील गणितांची आकडेमोड होत नसल्याने संच मान्यतेसाठी शिक्षणक्षेत्रात आर्थिक व्यवहार पूर्ण करावेच लागतात. शाळांनी केलेल्या भरपाईची परतफेड म्हणून शिक्षकांकडून लाखांची रक्कम वसूल केली जाते. ही संच मान्यता पूर्ण झाली असली तरी नोकरीत शंभर टक्के कायम झाल्याची खात्री होण्यासाठी वैयक्तिक मान्यताही तितकीच महत्त्वाची मानली आहे.

त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागात पन्नास हजारापासून दोन लाखांपर्यंत दर आहे. काही शिक्षणाधिकारी वैयक्तिक मान्यतेचा कॅम्प लावण्यासाठी आग्रही असतात. त्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातून निवृत्त झालेल्या आणि पंटर म्हणून काम केलेल्या लिपिकांना बोलावले जाते. २ मे, २०१२ नंतर शिक्षक भरती बंद झाली. मात्र शिक्षण खात्यातील 'बुद्धिमान' अधिकाऱ्यांनी त्यापूर्वी भरती झाल्याचे दाखवून पूर्वीची नियुक्तीपत्रे दिली. त्यातून मिळणारा चार वर्षांचा फरक काम केलेल्या अधिकाऱ्यांनी घेतला.

काही अधिकारी 'माहीर'

शाळा तपासणीसाठी गेलेल्या काही महिला अधिकारी शिक्षणक्षेत्रात प्रसिद्ध आहेत. पाकिट दिल्याशिवाय शाळा तपासणी पूर्ण होत नाही. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातही काही लिपिकांचे लागेबांधे आहेत. ऑनलाइन संच मान्यतेसाठी जिल्हा परिषदेच्या सदस्यांचाही हस्तक्षेप असतो. महापालिकेच्या शिक्षण मंडळात संच मान्यतेसाठी विशिष्ट टेबलची माणसे आहे. काही संघटनांच्या नेत्यांनी नियुक्त केलेली माणसे आहेत. १५० खासगी शाळांतील आर्थिक कारभार ही यंत्रणा सांभाळते. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील प्राथमिक शिक्षण विभागातील काही मंडळीही पुढे आहेत. थेट हस्तक्षेप नको म्हणून काहींनी खास खासगी एजंटांच्या नेमणुका केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केवळ डाळ महाग, बाकी अच्छे दिन...पासवान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशात केवळ डाळी महाग आहेत. इतर धान्य स्वस्त आहे. त्यामुळे देशाच निश्चितच अच्छे दिन आहेत,' असा दावा केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी पत्रकार परिषदेत केला. गरिबांसाठी डाळी १२० रुपये किलोपेक्षा कमी दराने विकण्याचे आदेश राज्य सरकारांना दिल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या दोन वर्षांतील कामगिरीचा आढावा घेणाऱ्या विकास पर्व मेळाव्याच्या निमित्ताने ते कोल्हापुरात आले होते. मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पासवान म्हणाले, 'देशात डाळींचे भाव चढे आहेत. आपल्याकडे साधारण १७० लाख टन डाळींचे उत्पादन होते. देशाची एकूण मागणी २४० लाख टन आहे. ही तफावत दूर करण्यासाठी डाळ आायत केली असून, बफर स्टॉक मोठ्या प्रमाणावर आहे. राज्य सरकारांना डाळ उपलब्ध करून दिली असून, गरिबांसाठी डाळी १२० रुपये किलोपेक्षा कमी दराने उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.'

खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू केले पाहिजे, अशी पासवान यांची भूमिका होती. त्यावर पासवान म्हणाले, 'खासगी क्षेत्राने याला नकार दिला आहे. आम्ही हातात काठी घेऊन असे आरक्षण लागू करू शकत नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बँकांना दलित आणि महिलांना उद्यमशील करण्याचे लक्ष्य दिले आहे. त्यातून मागासवर्गीयांचा निश्चित विकास होईल.' महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त पाच लाख टन गहू आणि तांदूळ उपलब्ध करून दिल्याचे पासवान यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना पाठिंबा, पण...

जेएनयूमधील विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याला पासवान यांनी बिहारचा तरुण आहे म्हणून पाठिंबा दिला होता. त्यावर पासवान म्हणाले, 'देशातील विद्यार्थी चळवळीतील प्रत्येक विद्यार्थ्याला माझा पाठिंबा आहे. मात्र, संविधानाचे उल्लंघन होत असेल, राष्ट्रहिताला बाधा पोहचत असेल, तर पाठिंबा असणार नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'त्या' भाषेमुळेचं माझं लय वाटोळं झालंय!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

मी कुणाला काही म्हणत नाही. ते म्हणूनच लय वाटोळं झालंय माझं. दुधानं तोंड पोळल्यामुळे मी ताकही फुंकून प्यायला लागलोय. म्हणूनच माझा सल्ला आहे, तुम्हीही तसंच वागा. बोलताना जिभेवर नियंत्रण ठेवा. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची खबरदारी घ्या... हे वक्तव्य दुसऱ्या तिसऱ्या कुणाचेही नाहीत तर सत्तेत असताना स्वत:ला 'टग्या' म्हणवणारे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हे विचार मांडले आहेत.

रोखठोक भाषणशैलीमुळे अजित पवार नेहमीच चर्चेत असतात. त्यात मंत्रिपदावर असताना तर त्यांना याच सडेतोडपणामुळे अनेकदा विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. आता राज्यातील सत्ता हातून गेल्यानंतर मात्र अजितदादांनी आपल्या भाषेचा सूरही मवाळ केला आहे. सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्याचा प्रत्यय आला. एरव्ही आक्रमकपणे बोलणाऱ्या अजितदादांनी कार्यकर्त्यांना चक्क राजकारणात असताना जिभेवर नियंत्रण ठेवणं कसं गरजेचं आहे, त्याबद्दल मार्गदर्शन केलं.

तुम्ही बोलताना एखाद्या धर्माला ते लागणार नाही. कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत या गोष्टींची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. राजकारणात आपण आहोत तर आपल्या जिभेवर नियंत्रण राखणंही तेवढंच महत्त्वाचं आहे, असे अजितदादा म्हणाले. एकनाथ खडसे यांनी वीजपंपांच्या कर्जाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कसं वादळ उठलं त्याचं उदाहरणही यावेळी अजितदादांनी दिलं. शेतकऱ्यांकडे मोबाइलची बिलं भरायला पैसे आहेत मात्र वीजपंपाची बिले भरायला पैसे नाहीत, असे उपरोधिकपणे ते बोलले होते. ही बोलण्याची पद्धत झाली काय? मोबाइलचं बिल आणि पंपाचं वीजबिल यांची तुलना होऊ शकते का?, असा सवालच अजितदादांनी त्यावर केला.

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी नुकतंच बार्शी येथे एका सभेत आपल्या पक्षातील नेत्यांवर तोंडसुख घेतलं होतं. सोपल यांच्या या मॅरेथॉन भाषणाची चर्चा राज्यभर झाली. तोच धागा पकडत अजितदादांनी सोपल यांचा समाचार घेतला. 'सोपल यांचं बार्शीचं भाषण शिराळ्यात खूप गाजलं. महाराष्ट्रभर या भाषणाची चर्चा झाली. खरं तर कधी कधी लोक हसायलं लागल्यानंतर आपण बोलत सुटतो. लोक हसताहेत तर त्यांना आणखी हसवावं असं आपल्याला वाटतं पण एका टप्प्यावर थांबायला हवं. नाहीतर लोकांना हसवता हसवता आपल्यावर रडण्याची वेळ येऊ शकते', असा टोला अजितदादांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'त्या' भाषेमुळेच माझं वाटोळं झालंय!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

मी कुणाला काही म्हणत नाही. कारण काहीतरी म्हणूनच लय वाटोळं झालंय माझं. दुधानं तोंड पोळल्यामुळे मी ताकही फुंकून प्यायला लागलोय. म्हणूनच माझा सल्ला आहे, तुम्हीही तसचं वागा. बोलताना जिभेवर नियंत्रण ठेवा. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची खबरदारी घ्या.., हे वक्तव्य दुसऱ्या तिसऱ्या कुणाचेही नाहीत तर सत्तेत असताना स्वत:ला 'टग्या' म्हणवणारे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी पवार सोलापुरात आले होते.

रोखठोक भाषणशैलीमुळे अजित पवार नेहमीच चर्चेत असतात. त्यात मंत्रिपदावर असताना तर त्यांना याच सडेतोडपणामुळे अनेकदा विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. आता राज्यातील सत्ता हातून गेल्यानंतर मात्र अजितदादांनी आपल्या भाषेचा सूरही मवाळ केला आहे. सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्याचा प्रत्यय आला. एरव्ही आक्रमकपणे बोलणाऱ्या अजितदादांनी कार्यकर्त्यांना चक्क राजकारणात असताना जिभेवर नियंत्रण ठेवणे कसे गरजेचे आहे, त्याबद्दल मार्गदर्शन केले.

तुम्ही बोलताना एखाद्या धर्माला ते लागणार नाही. कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, या गोष्टींची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. राजकारणात आपण आहोत तर आपल्या जिभेवर नियंत्रण राखणेही तेवढेच महत्त्वाचे आहे, असे अजितदादा म्हणाले. एकनाथ खडसे यांनी वीजपंपांच्या कर्जाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कसे वादळ उठले त्याचे उदाहरणही या वेळी अजितदादांनी दिले. शेतकऱ्यांकडे मोबाइलची बिले भरायला पैसे आहेत. मात्र, वीजपंपाची बिले भरायला पैसे नाहीत, असे उपरोधिकपणे ते बोलले होते. ही बोलण्याची पद्धत झाली काय? मोबाइलचे बिल आणि पंपाचं वीजबिल यांची तुलना होऊ शकते का?, असा सवालच अजितदादांनी त्यावर केला.

सोपल यांचे कान टोचले

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी नुकतंच बार्शी येथे एका सभेत आपल्या पक्षातील नेत्यांवर तोंडसुख घेतले होते. सोपल यांच्या या भाषणाची चर्चा राज्यभर झाली. तोच धागा पकडत अजितदादांनी सोपल यांचा समाचार घेतला. 'सोपल यांचे बार्शीचे भाषण शिराळ्यात खूप गाजले. महाराष्ट्रभर या भाषणाची चर्चा झाली. खरे तर कधी कधी लोक हसायले लागल्यानंतर आपण बोलत सुटतो. लोक हसताहेत तर त्यांना आणखी हसवावे असे आपल्याला वाटते पण एका टप्प्यावर थांबायला हवे. नाहीतर लोकांना हसवता हसवता आपल्यावर रडण्याची वेळ येऊ शकते', असा टोलाही अजितदादांनी लगावला.

...........

दुष्काळी महाराष्ट्राकडे नरेंद्र मोदींची पाठ

'केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार रामभरोसे सुरू आहे. महाराष्ट्राची जनता दुष्काळाने होरपळत असताना नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील एकाही जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले नाहीत. या उलट त्यांनी विधानसभेवेळी महाराष्ट्रात ४४ सभा घेतल्या. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार शेतकरी आणि मजूर तसेच कामगारांचे राहिले नाही,' असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला.

चुकीला शिक्षा झालीच पाहिजे

एकनाथ खडसे यांच्याबाबत बोलताना पवार म्हणाले, जो चुकतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आता खडसे यांनी चौकशीला सामोरे गेले पाहिजे. आम्ही सत्तेत असताना विरोधक म्हणून आम्हाला भ्रष्टाचारी म्हणणारे आज स्वत:च भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन घरी बसले आहेत, असा टोलाही पवार यांनी लगावला.

.........

वाघ-सिंहाचे भांडण राज्याचा प्रश्न आहे काय?

भाजप सरकार आपल्याच पक्षाची वाढ कशी होईल, याचा विचार करीत आहे. शिवसेना मात्र चांगले केले की, आम्ही आणि वाईट झाले की भाजपने असा प्रचार करुन एकमेकांत भांडत बसले आहेत. वाघ-सिंहांचे भांडण हा काय महाराष्ट्रातला प्रश्न आहे. मूठभर लोकांनी वेगळा विदर्भ मागितला हा मुद्दा होतोय का? मराठवाड्यातील एकानेही स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केली नाही. केवळ हे सरकार दुष्काळाला दुर्लक्ष करण्यासाठी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत असल्याचा आरोपही पवारांनी केला.

मेटे, जानकर, खोत भाजपचेच उमेदवार

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसंग्रामचे विनायक मेटे, रासपचे महादेव जानकर आणि शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत हे बिनविरोध निवडूण आले असले तरी भाजपच्या व्हिपपुढे त्यांनी सुद्धा गुडघे टेकले. या तिघांनीही भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.

....

दीपक साळुंखेंचा पराभव जिव्हारी

सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्वाधिक संख्याबळ असतानाही आमदार दीपक साळुंखे यांचा झालेला पराभव जिव्हारी लागला असल्याचे पवारांच्या बोलण्यातून दिसून आले. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांनी गडबड केल्यामुळे साळुंखे पराभूत झाले. मित्रपक्षांची मते मिळाली नाहीत. राष्ट्रवादीची मोठी चूक झाली असल्याची कबुलीही त्यांनी दिली. पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरचा निकाल ९१.६८ टक्केजिल्ह्यात मोहोळ केंद्राची बाजी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मोहोळ केंद्राने बाजी मारली आहे. सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९१.६८ टक्के लागला असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी ०.४६ ने घटली आहे. यंदाही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. मोहोळ केंद्राचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९५.२३ टक्के तर सर्वाधिक कमी निकाल पंढरपूर केंद्राचा (८९.६९) टक्के इतका लागला आहे.

सोलापूर जिल्ह्यात सुमारे ६४ हजार ६९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेला बसलेल्या ६३ हजार ७८४ विद्यार्थ्यांपैकी ५८ हजार ४७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ९१.६८ टक्के इतके उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण आहे. जिल्ह्यातील ३५ हजार ९४१ विद्यार्थ्यांपैकी ३२ हजार ४५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९०.२९ इतकी आहे. तसेच २७ हजार ८४३ विद्यार्थीनींपैकी २६ हजार २६ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या असून, त्यांचे टक्केवारीचे प्रमाण ९३.४७ इतके आहे.

पुणे विभागात उत्तीर्ण विद्यार्थीनींची निकालाची टक्केवारी ९४.६० टक्के तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचे प्रमाण ९२.२३ इतके आहे.

जिल्ह्यातील ६३ हजार ७८४ विद्यार्थी आणि विद्यार्थीनींपैकी १५ हजार ७३६ जणांनी विशेष गुणवत्ता श्रेणी प्राप्त केली आहे. तसेच २२ हजार २४० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, १७ हजार ४९ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी आणि ३ हजार ४५२ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी पटकावली आहे. रिपीटर बसलेल्या ३ हजार १०९ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ५६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ५०.४० इतकी आहे. सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९१.६८ तर सोलापूर शहराचा निकाल ९०.९६ टक्के इतका लागला आहे.

निकालात घसरण

मागील वर्षीपेक्षा यंदा दहावीच्या निकालाची टक्केवारी घसरली आहे. गेल्या वर्षी दहावीचा जिल्ह्याचा निकाल ९२.१४ टक्के इतका होता. यंदा ०.४६ टक्क्यांनी घट झाली असून, निकाल ९१.६८ टक्के लागला आहे. मागील वर्षी मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९०.८८ टक्के इतकी होती. यंदा त्यामध्ये ०.६९ टक्क्यांनी घट झाली आहे. तर मागील वर्षी मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.७८ इतकी होती, यंदा ०.३१ टक्क्यांची घट झाली आहे.

दहावीच्या परीक्षेच्या निकालात सोलापूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. पुणे ९४.४० टक्के, अहमदनगर ९२.८३ तर सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९१.६८ टक्के लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑडिशन देताना तरुणाचा मृत्यूकरमाळ्यातील घटनेनी कलाविश्व सुन्न

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

नागराज मंजुळेच्या 'सैराट'ने करमाळा मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी हॉट लोकेशन बनले आहे. या भागात चित्रपट निर्मात्यांच्या रांगा लागल्या आहेत. सैराटमुळे सर्व सामान्य तरुणांनाही चित्रपटात चमकण्याचे वेड लागले आहे. अशाच एका 'सैराट' तरुणाचा करमाळ्यात ऑडिशन देतानाच जीव गेला आहे.

करमाळा तालुक्यातील प्रा. महादेव झोळ यांनी 'गाजर' या नवीन मराठी चित्रपटासाठी कलावंत निवडण्यास करमाळा येथे दोन दिवसांपासून सुरुवात केली होती. शनिवारी या ऑडिशनला कन्या प्रशालेत सुरुवात करण्यात आली. यास २००पेक्षा जास्त तरुण-तरुणींनी ऑडिशन दिले. दुसऱ्या दिवशी रविवारी देखील ऑडिशनसाठी एसटी कॉलनीची निवड करण्यात आली. सकाळपासून येथे ऑडिशनसाठी ५० पेक्षा जास्त तरुण तरुणी जमा झाले होते. यासाठी बीड जिल्ह्यातून प्रफुल्ल भास्कर बोखारे (वय २८) हा तरुण आला होता. पशूवैद्यकीयचे शिक्षण पूर्ण केलेल्या प्रफुल्लला लहान पणापासून चित्रपटाचे आकर्षण होते. ऑडिशनमध्ये प्रत्येकाला संवाद देवून त्याचे शुटिंग करण्यात येत होते. प्रफुल्ल यास आई विषयीचा संवाद बोलण्यास दिला होता. कमेरा...अक्शन म्हणताच त्याने आई...तू मला का सोडून गेलीस, असे म्हणत अतिशय भावना विवश होत. त्या भूमिकेत इतका एकरूप झाला कि बोलत बोलत तो पाठीमागील भिंतीवर कोसळला. कट म्हणून देखील प्रफुल्ल का उठत नाही, हे न समजल्याने त्याला उठवायचा प्रयत्न केल्यावर मात्र, तो बेशुद्ध झाल्याचे दिसताच त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, तोवर त्याची प्राणज्योत मालवली होती. प्रत्येकाला तो अभिनय वाटत होता. मात्र, ऑडिशन प्रफुल्ल यास मागची भिंत जोरात डोक्याला लागली. वरून कोणतीही जखम दिसत नव्हती. प्रफुल्लचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळविण्यात आल्यावर रात्री त्याचा मृतदेह त्याच्या गावी नेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी कारखानदारांचीईडीकडून चौकशी करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'परदेशातील काळा पैसा आणायचाय तेव्हा आणा. पण, आधी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडे टाकून खासगी साखर कारखानदारी केलेल्यांची चौकशी अमलबजावणी संचालनालयाकडून करा,' अशी मागणी मंगळवारी खासदार राजू शेट्टी यांनी केली. या बाबत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.

पक्षाचे नूतन आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह राजू शेट्टी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. या वेळी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने खोत यांचा सत्कार करण्यात आला. सहकारी कारखाने विकत घेणाऱ्यांकडे एवढे पैसे कोठून आले, याची चौकशी केल्यास भ्रष्टाचाराचा पैसा बाहेर येईल, असा आरोपही शेट्टी यांनी केला. राज्यातील एफआरपी न दिलेल्या कारखानदारांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. त्यांची अंमलबजावणी केली जाणार असून, आपण या कमिटीचा सदस्य असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वतः राजीनामा दिला असून, बहुजनांवर अन्याय ही ओरड चुकीची आहे. व्यक्तिगत गोष्टीसाठी जात-धर्म काढू नये, असा टोलाही त्यांनी खडसे समर्थकांना लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद संतोष महाडिक यांच्या वीरपत्नीही लष्करात

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना पतीला वीरमरण आल्यानंतर, आपलं आयुष्य देशसेवेसाठी समर्पित करण्याचा निर्धार करणाऱ्या वीरपत्नीनं आपला शब्द जिद्दीनं खरा करून दाखवला आहे. शहीद संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी स्वाती आता भारतीय लष्करात रुजू होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

साताऱ्यातील पोगरवाडीचे सुपुत्र असलेले कर्नल संतोष महाडिक १७ नोव्हेंबर २०१५ रोजी कुपवाडा जिल्ह्यातील चकमकीत शहीद झाले होते. सह्याद्रीच्या या वीरपुत्राचं हौतात्म्य सगळ्यांनाच चटका लावून गेलं होतं. त्यांच्या कुटुंबीयांवर तर दुःखाचा डोंगरच कोसळला होता. परंतु, वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी आपल्या पतीच्या पार्थिवासमोरच देशसेवाचा निर्धार केला होता. मी स्वतः आणि आमची मुलं लष्करातच जातील, संतोष यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू, असं तिनं धीरानं सांगितलं होतं. आपला ही प्रतिज्ञा तिनं पूर्ण केली आहे.

स्वाती यांनी लष्करात येण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्करप्रमुख दलबीर सिंह यांनी त्यांना वयाची अट शिथील करून दिली. परंतु, सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची खडतर, अवघड परीक्षा पास करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे होतं. अत्यंत मेहनतीनं, चिकाटीनं त्यांनी ते पेललं आणि आता त्या ट्रेनिंगसाठी चेन्नईला गेल्या आहेत. या प्रशिक्षणानंतर त्या '२१ पॅरा स्पेशल फोर्स'मध्ये रुजू होतील. या वीरपत्नीच्या जिद्दीला, धाडसाला सलाम!

12 years of blesful (blissful) togetherness. Thank you dear for being with me... हे शहीद संतोष महाडिक यांचं शेवटचं व्हॉट्स अॅप स्टेटस होतं. त्यातून त्यांचं पत्नीवरचं प्रेम सहज जाणवतं. परंतु आता आपलंही आपल्या पतीवर जिवापाड प्रेम होतं आणि त्याच्यासाठी आपण काहीही करू शकतो, हेच वीरपत्नी स्वाती यांनी दाखवून दिलं आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images