Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

साताऱ्याचा निकाल ९३.५२ टक्केकोल्हापूर विभागात सातारा जिल्ह्याची आघाडी

$
0
0

साताऱ्याचा निकाल ९३.५२ टक्के

कोल्हापूर विभागात सातारा जिल्ह्याची आघाडी

म. टा. वृत्तसेवा, सातारा

मार्च २०१६मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा सातारा जिल्ह्याचा निकाल ९३.५२ टक्के इतका लागला आहे. गत वर्षांच्या तुलनेत यंदा १.२३ टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २.४१ टक्के जास्त आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी सातारा जिल्ह्यात ४३ हजार ७५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ४३ हजार ४९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ४० हजार ६७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.१९ टक्के तर मुलींमध्ये ९५.११ टक्के एवढे आहे. परीक्षेच्या काळात भरारी पथकाने कारवाई करून २० विद्यार्थ्यांना रस्टिकेट केले होते. दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाइन पहाण्यासाठी मुलांनी सायबर कॅफे तसेच मोबाइलवर गर्दी केली होती. शाळेमध्ये मूळ गुणपत्रकांची प्रत १५ जून रोजी देण्यात येणार आहे. तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ उत्तर पत्रिका ५ ते २७ जूनपर्यंत संकेतस्थळावर माहिती अर्ज भरून तसेच प्रत्येक पेपरसाठी ७०० रुपये फी भरुन मिळणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी देविदास कुलाळ यांनी दिली.

कोल्हापूर विभागामध्ये सातारा ९३.५२ टक्के, सांगली ९२.९६, कोल्हापूर ८४.८४ टक्के तसेच विभागाचा निकाल ९३.८९ टक्के लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोयनेतील १३२० मेगावॅट वीजनिर्मिती बंदवीजनिर्मितीचे दोन टप्पे बंद; दोन टप्प्यातून कमी क्षमतेने निर्मिती

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणाच्या वीजनिर्मितीचा तिसरा व चौथा टप्पा सोमवारी रात्री बारा नंतर बंद करण्यात आला आहे. परिणामी या दोन्ही टप्प्यातील तब्बल १३२० मेगावॅट वीजनिर्मिती बंद पडली आहे. टप्पा क्रमांक एक व दोनमधून धिम्या गतीने वीजनिर्मिती सुरू असल्याचे महाजनकोकडून सांगण्यात आले. दरम्यान, कोयना परिसरात गेल्या तीन दिवसांच्या हजेरीनंतर मंगळवारी पावसाने पुन्हा एकदा दडी मारली आहे.

दुष्काळजन्य परिस्थिती आणि पूर्वेकडील दुष्काळावर फुंकर मारण्यासाठी कोयना धरणातून सोडण्यात आलेले पाणी, शिवाय राज्यातील विजेची निर्मिती या सर्वांचा परिणाम म्हणून धरणातील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. त्यातच पावसाने ओढ दिल्याने पुरेशा पाण्याअभावी अखेर कोयनेच्या वीजनिर्मितीचा तिसरा व चौथा टप्पा बंद करण्याची वेळ महाजनकोवर आली आहे. दुष्काळामुळे होरपळणाऱ्या पूर्वेकडील भागासाठी कोयना धरणातून अखंडित पाणी सोडून दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यात आला. धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.३५ टीएमसी असतानाही गतवर्षी कमी पावसामुळे धरणात केवळ ७५ टीएमसी पाण्याची आवक झाली. आवक झालेले ७५ टीएमसी पाणी आणि गतवर्षीच्या ३१ मेअखेरचे 33 टीएमसी एवढ्या पाण्यावर संपूर्ण वर्षभर धरणाने अखंडित वीजनिर्मितीबरोबर यावर्षी पूर्वेकडे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवर यशस्वीपणे मात केली. मात्र, नव्या तांत्रिक वर्षाच्या सुरुवातीलाच धरणात केवळ १३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला. परिणामी पुरेशा पाण्याअभावी कोयनेची वीजनिर्मिती कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता निर्मण झाली होती. महाजनकोच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्या होत्या. महाजनकोनेही तत्काळ निर्णय घेत कोयनेच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यांतून होणारी वीजनिर्मिती पुरेशा पाण्याअभावी बंद करण्याचे ठरवले. यामध्ये चौथ्या टप्प्याची एक हजार मेगावॅट आणि तिसऱ्या टप्प्याची ३२० मेगावॅट, अशी एकूण १३२० मेगावॅट वीजनिर्मितीचा समावेश आहे. आजपर्यंत चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती ज्यावेळी धरणातील पाणीपातळी ६१८ मीटरपेक्षा खाली जाईल, त्याचवेळी बंद करावी लागत असे. मात्र. यंदा पुरेशा पाण्याअभावी ही वीजनिर्मिती बंद करावी लागत आहे. जून महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्यास राज्यावर भारनियमनाचे फार मोठे संकट येण्याची शक्यता आहे.

८५ मिलिमीटर पाऊस

गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून कोसळणाऱ्या मान्सूनपूर्व सरींमुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दिलासाजनक वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या दोन दिवसांत कोयनानगर येथील पर्जन्यमापन केंद्रावर तब्बल ८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण एप्रिल व मे या ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात हुलकावणी दिलेल्या पावसाने जून महिन्याच्या सुरुवातीलाच कोयना परिसरात खाते उघडले. २ व ३ जून रोजी कोयनानगर व कोयना धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजी पालिकेची चौकशी करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

इचलकरंजी नगरपरिषदेच्या गैरकारभाराची कायद्यानुसार चौकशी करावी, असा आदेश हायकोर्टाच्या न्यायमूर्ती हिमांशू केमकर व न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने संचालक नगरपालिका संचलनालयास दिले आहेत. या संदर्भात राजेंद्र पाटील यांनी अॅड. धैर्यशील सुतार यांचे मार्फत याचिका दाखल केली असून त्यावर आज सुनावणी झाली.

इचलकरंजी नगरपरिषद आपली विहित कर्तव्ये पार पाडू शकत नाही. पंचगंगा प्रदूषण रोखणे, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापनाचा शहरात बोजवारा उडाला आहे. कोणतेही कायदेशीर कर्तव्य नगरपरिषद पार पाडू शकत नाही. तसेच नगरपरिषदेचा खर्च हा अवाढव्य झाला आहे. त्यामुळे दैनंदिन कार्ये पार पडण्यासाठी ती असमर्थ ठरली आहे. भुयारी गटर योजना, झोपडपट्टी पुनर्वसन योजना आदी कामे भ्रष्टाचारामुळे पूर्ण होत नाहीत. भ्रष्टाचाराने नगरपरिषदेमध्ये बजबजपुरी माजली आहे. टक्केवारी दिल्याशिवाय काम होत नाही, त्याशिवाय कोणतेही टेंडर मंजूर होत नाही. त्यामुळे कंत्राटदार कामे व्यवथित पार पडत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्याप्रमाणे निवेदनही राज्य सरकार तसेच नगरपरिषद संचलनालय, वरळी यांना दिले. परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही.

याचिकाकर्त्यातर्फे अॅड. सुतार यांनी, इचलकरंजी नगरपरिषद प्रशासन हे नगपरिषद कायद्याप्रमाणे चालत नसून एकूणच प्रशासकीय व्यवस्था मोडकळीस आल्याचे निदर्शनास आणून दिले. नगरपरिषदेच्या एकंदरीत प्रशासनाची चौकशीसाठी व बरखास्तीसाठी संबंधित प्राधिकरणाकडे निवेदन देऊनसुद्धा काहीच कारवाई केली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश दिला आहे.

इचलकरंजी नगरपरिषदेच्या कारभारातील अनियमितता

* नगराध्यक्षांनी आमसभेला डावलून परस्पर हुकमाने निर्णय घेण्याची प्रथा.

* शहरात पिण्याचे पाणी पुरवू शकत नाही.

* पंचगंगा प्रदूषण रोखण्यास आलेले अपयश.

* महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश डावलणे.

* ९७ कोटी रुपयाच्या भुयारी गटार योजनेचा बोजवारा उडाला .

* न. प. चे आयजीएम हॉस्पिटल चालवू न शकणे, त्यामुळे आरोग्यसेवा न देणे.

* घनकचरा व्यवस्थापन शहरात नसणे व कचरा शहरभर साचलेला आहे.

* सांडपाणी व्यवस्थापन नाही त्यामुळे रोगराई पसरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील पंचगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाला. तर बुडणाऱ्या अन्य तिघांना सुरेश चंद्रकांत मराठे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे वाचविण्यात यश आले. निंगाप्पा महादेव हरिजन (वय ११ रा. हत्ती चौक) असे मृताचे नाव आहे. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.

निंगाप्पा हरिजन, अडवय्या चंदू स्वामी (वय ११ रा. कुडचे मळा), योगेश सुतार (वय ११ रा. रोटरी क्लबजवळ) व अन्य एक (नाव समजू शकले नाही) असे चौघेजण मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीत आंघोळीसाठी गेले होते. चौघांनाही पोहायला येत नव्हते. सर्वजण आंघोळीसाठी नदीत उतरले असताना त्यापैकी योगेश हा पाण्यात बुडू लागला. त्यावेळी त्याचे तिघे मित्रही योगेश याला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना बुडू लागले. त्यावेळी पोहायला आलेल्या सुरेश मराठे यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तातडीने पाण्यात उडी घेत बुडणाऱ्या अडवय्या, योगेश व अन्य एकाला पाण्यातून बाहेर काढले. त्यावेळी भेदरलेल्या अवस्थेतील नाव न समजलेल्या मुलाने घटनास्थळावरुन पळ काढत थेट घर गाठले. मात्र तोपर्यंत निंगाप्पा मिळून आला नाही. मराठे यांनी बाहेर काढलेल्या योगेश व अडव्या यांना धीर देत त्यांचे पत्ते विचारून घेतले. त्यानंतर या प्रकाराची माहिती संबंधितांच्या नातेवाईकांना दिली. मराठे यांनी प्रसंगावधान राखून दाखविलेल्या धाडसामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या प्रकाराची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी व्हाइट आर्मीच्या जवानांना पाचारण करुन निंगाप्पाचा शोध घेऊ लागले. पण नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने शोध घेताना अडचणी येत होत्या. अखेर तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर निंगाप्पा याचा मृतदेह मिळून आला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप शहराध्यक्षांच्या घरासमोर खोकीधारकांची निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

शहरातील जयसिंग महाराज उद्यानाशेजारी असणाऱ्या दुकानगाळ्यांसदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याच्या निषेधार्थ शहरातील खोकीधारक व हातगाडी संघटनेच्यावतीने भाजपचे शहराध्यक्ष मिलिंद भिडे यांच्या घरासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. सुमारे चारशे जणांचा जमाव भिडे यांच्या निवासस्थानासमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. निदर्शकांत महिलांची संख्या लक्षणीय होती.

शहरातील जयसिंग उद्यानालगत विक्रेत्यांनी दुकानगाळे बांधले आहेत. याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यासंदर्भात सुनावणीकरिता मंत्रालयातील कक्ष अधिकारी सु. अ. सुर्वे यांनी सहा नगरसेवकांना मुंबईत पाचारण केले होते.

दरम्यान या पार्श्वभूमीवर निषेध नोंदवून जयसिंगपुरातील सर्वच हातगाडी व खोकीधारकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले. भाजपचे शहराध्यक्ष मिलिंद भिडे यांच्या घरावर मोर्चा काढून निदर्शने केली. सकाळी दहा वाजता जयसिंग उद्यानापासून मोर्चास सुरुवात झाली. क्रांती चौक, शिवाजी चौक, रेणुका चौक मार्गावरून मोर्चा प्रकाश हाऊसिंग सोसायटीतील मिलिंद भिडे यांच्या घरासमोर आला. या ठिकाणी आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या. निषेधाचे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते.

यावेळी बोलताना खोकीधारक संघटनेचे अध्यक्ष सुनील ताडे म्हणाले, 'या तक्रारींमुळे गाळे बंद झाले, तर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या गाळेधारकांवर कोणतीही कारवाई केली जाऊ नये. भाजपने केलेली तक्रार केवळ आकसाने केली आहे.'

मोर्चाला सामोरे गेलेल्या मिलिंद भिडे यांनी आपण खोकीधारकांसोबतच असल्याचे सांगितले. भाजपच्या तक्रारीमुळे खोकीधारकांवर कोणताही अन्याय होणार नाही. तसेच खोकीधारकांना कोणत्याही प्रकारच्या नोटिसा न आल्याने त्यांनी घाबरून जाऊ नये,' यानंतर संतप्त आंदोलकांनी आपला मोर्चा भाजपचे पदाधिकारी राजेंद्र दाईंगडे यांच्या घराकडे वळविला. याठिकाणीही निदर्शने करण्यात आली.

आंदोलनात खोकीधारक संघटनेचे उपाध्यक्ष जगन्नाथ पवार, बाळासो मगदूम, किरण शिकलगार, लिंगव्वा पिडाई, सुनीता मोरे, मायाव्वा बेटगिरे, बाबू बागवान, दिलावर बागवान, बजरंग खामकर, रमेश रजपूत, विजय धंगेकर, विशाल माळी यांमयासह खोकीधारक आपल्या कुटुंबासहित सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात घरफोड्यांचा उच्छाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुटीसाठी बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची बंद घरे लक्ष्य करून चोरटे हातोहात हातसफाई करीत आहेत. चोरीची वर्दी मिळताच पोलिस पंचनामा करून डायरीत घटनेची नोंद करतात. डॉग स्कॉड येते, ठसेतज्ज्ञांकडून पाहणी होते. पण चोरटे काही सापडत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. चोऱ्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्याचे पोलिस दावा करीत असले तरी चोरटे मात्र सुसाट आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. चोऱ्यांचे हे सत्र काही केल्या थांबत नसल्याने चोरट्यांपुढे पोलिस हतबल असल्याची स्थिती आहे.

गेल्या महिन्याभरात शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांनी अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. शिवाजी पेठेत भरदिवसा चोरट्यांनी घरात घुसून चार तोळ्यांचे दागिने लांबवले. त्यापाठोपाठ टाकाळा परिसरात चोरट्यांनी पाच फ्लॅट फोडले. कारंडे मळा आणि कदमवाडी परिसरात घरातील लोक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेल्याचे पाहून चोरट्यांनी संधी साधली. नागाळा पार्कात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या चौरंगी आपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी भरदिवसा तेरा तोळे दागिन्यांसह रोकड लंपास केली. कसबा बावड्यात बंगला फोडून चार लाखांच्या रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लांबवून चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले. चोऱ्या रोखण्यासाठी रात्रीसह दिवसाचीही गस्त वाढवून, परिसरातील रेकॉर्डवरील चोरट्यांवरही लक्ष ठेवल्याचे पोलिस सांगत आहेत. मात्र, चोरटे त्यांनाही जुमानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली असून, घर बंद ठेवून बाहेर पडणे मुश्कील बनले आहे.

उन्हाळ्याच्या सुटीमुळे अनेकांनी पर्यटनाचे नियोजन केले, तर अनेकजण आपल्या गावी जाऊन आले. अजूनही सुटीचा मूड सुरूच आहे. सुटी संपवून परत घरी येणाऱ्या अनेकांच्या घरात चोरीच्या घटना घडल्याने सुटीच्या आनंदावर विरजण पडले आहे. सलग तीन-चार दिवस बंद असलेली घरे चोरट्यांनी हेरून फोडली आहेत. बऱ्याचदा दिवसा टेहळणी करून मध्यरात्रीनंतर चोरटे येतात. कटावणीने कुलूप तोडून घरातील किमती ऐवज लंपास करतात. उपनगरांमध्ये अशी अनेक एकटी-दुकटी घरे आहेत. तर नागाळा पार्क, ताराबाई पार्कासह राजारामपुरी परिसरातील उच्चभ्रू वस्तींमध्ये प्रशस्त जागेतील स्वतंत्र बंगल्यांवर चोरट्यांची नजर आहे. कमी वावर असलेल्या ठिकाणांमुळे या चोऱ्यांचा थांगपत्ताही लागत नाही. संबंधित कुटुंब सुटी संपवून परतल्यानंतरच अशा चोऱ्यांचा उलगडा होत आहे. पोलिसांत तक्रार दाखल होईपर्यंत चोरटे चोरीच्या मालाची विल्हेवाट लावत आहेत. चोरटेही हायटेक झाल्याने हाताचे ठसे, पुरावे मागे ठेवले जात नाहीत. त्यामुळे चोरट्यांना शोधण्याचे पोलिसांसमोरही आव्हान आहे.

गस्त, भरारी पथके सुस्त

सुटीच्या काळात वाढलेल्या चोऱ्या आणि घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांच्यावतीनेही गस्त आणि भरारी पथकांची संख्या वाढविण्याची गरज आहे. भुरट्या चोरांना आळा घालण्यासाठी यापूर्वीच्या रेकॉर्डवरील चोरट्यांना ताब्यात घेणे आवश्क आहे. तरच अशा चोऱ्या रोखता येतील. ज्या ठिकाणांवर अलीकडे चोऱ्या झाल्या आहेत, त्यांच्या तपासासाठीही प्रयत्न वाढवायला हवेत. पोलिस आणि नागरिकांनी संयुक्तपणे उपाययोजना केल्यास चोऱ्यांना आळा बसेल.

गुन्ह्यांची उकल होईना

घरफोड्यांची संख्या वाढत असताना यातील चोरटे पकडल्याच्या घटना मात्र अपवादात्मकच आहेत. चोऱ्यांचा उलगडा गतीने होत नसल्याने त्याच चोरट्यांकडून पुन्हा चोऱ्या सुरू असल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण गुन्ह्याची पद्धत सारखीच दिसून येत आहे. पोलिसांकडून चोऱ्यांचा उलगडा झाला तर चोरीच्या गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण कमी होणे शक्य आहे.

हवी सावधगिरी

सलग तीन-चार दिवस घराबाहेर पडायचे असेल तर, शेजाऱ्यांना कल्पना द्यावी. घरातील सर्वांनी एकदम बाहेर पडण्याऐवजी शक्य असेल तर काहींनी घरात थांबावे. घराच्या दारांना लोखंडी दरवाजे बसवावेत. घराबाहेर जाताना घरातील किमती ऐवज बँकेतील लॉकरमध्ये ठेवावा, अशा काही महत्त्वाच्या बाबींची दक्षता घेतली तरी चोऱ्यांमधून होणारे नुकसान टाळता येईल, असे आवाहन पोलिसांच्यावतीने केले आहे.

सुट्यांमुळे बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. चोरट्यांचा छडा लावण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. गस्ती पथकांची संख्याही वाढवली आहे.

चोऱ्या रोखण्यासाठी शहराबाहेर जाणाऱ्या नागरिकांना संबंधित परिसरातील पोलिस ठाण्यांना पूर्वसूचना द्यावी, असे आवाहन केले आहे.

भारतकुमार राणे, पोलिस उपअधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाभाडेवाढीचे त्रांगडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑटो रिक्षाच्या भाडेवाढीला ऑटो रिक्षाचालक संघटना आणि चालक-मालकांचा विरोध होत आहे. सुरुवातीलच्या एक किलोमीटरसाठी १७ ऐवजी २० रुपये आणि त्यापुढील प्रतिकिलोमीटरला १० रुपये आकारावेत, असा विचार रिक्षाचालक-मालकांत सुरु झाला आहे. शहरातील रिक्षा संघटनांच्या येत्या दोन दिवसांत होणाऱ्या बैठकीत त्याबाबतचा ठोस निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक असलेल्या रिक्षांच्या भाडेवाढीवरुन त्रांगडे निर्माण झाले आहे.

सरकारने नेमलेली हकीम समिती किंवा इ-मीटरप्रमाणे भाडे आकारणीची सक्ती असली तरी प्रवासांचे अंतर आणि किमान आकारले जाणारे भाडे याची तडजोडीवर शहरातील बहुतांशी रिक्षाचालकांचा व्यवसाय सुरु आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने सोमवारपासून रिक्षा भाडेवाढीला मंजुरी दिली. त्यामुळे पहिल्या एका किलोमीटरच्या प्रवासाला १४ रुपयांऐवजी १७ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यापुढे प्रतिकिलोमीटरला १४ रुपये प्रमाणे भाडे आकारली जाणार आहे. भवानी मंडप ते सीबीएसपर्यंतचे सुमारे दोन किलोमीटर अंतरासाठी तीन प्रवाशांना एकूण ४५ रुपये मोजावे लागणार आहेत. शेअर ए रिक्षाप्रमाणे हा दर ३० रुपये आकारला जातो. येत्या २० जुलैपर्यंत रिक्षाचालकांना इ-मीटरमध्ये कॅलिब्रेशन करुन घ्यावे लागणार आहे. त्यासाठी ज्या कंपनीचे इ-मीटर बसविले आहे. त्या कंपनीच्या सॉफ्टवेअरमधून यंत्रणेत बदल करावा लागणार आहे. त्यासाठी शुल्क मोजावे लागणार असल्याने रिक्षाचालकांच्यात नाराजीचा सूर आहे.

राज्य सरकारने नियुक्त केलेली हकीम समिती, २०१३ मध्ये शहरातील ऑटो रिक्षांना बसविलेली इ-मीटर, अवैध प्रवासी वाहतुकीमुळे रिक्षा व्यवसाय तोट्यात असल्याची ऑटो रिक्षा संघटनांची भ‌ूमिका आहे. दोन वेळा भाडेवाढीला विरोध करुनही भाडेवाढ केल्याने प्रवासी आणि रिक्षाचालकांच्यात भाड्यावरुन वाद होत आहे.

हकीम समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसारच भाडेवाढ लागू केली आहे. पेट्रोलचे दर, रिक्षाची किंमत, महागाईचा निर्देशांक, टॅक्सनुसार भाडेवाढ लागू केली आहे. भाडेवाढीचा निर्णय रिक्षाचालकांच्या फायद्याचा आहे.

लक्ष्मण दराडे, आरटीओ

शेअर-ए-रिक्षा

ठरलेल्या मार्गांवर आरटीओ कार्यालय एका सीटसाठीचे दर जाहीर करते. प्रवाशांना या दराप्रमाणेच संबंधित रिक्षाचालकाला पैसे द्यावे लागतात. इ-मीटरच्या दरापेक्षा शेअर ए रिक्षा परवडते. पहिल्या एका किलोमीटरसाठी २० आणि त्यापुढे १० रुपये प्रतिकिलोमीटरची वाढ करावी.

चंद्रकांत भोसले, जिल्हाप्रमुख, महाराष्ट्र रिक्षाचालक सेना

इ-मीटरमुळे रिक्षा व्यवसाय यापूर्वीच धोक्यात आला आहे. रिक्षा भाडेवाढीची कोणतीही मागणी केलेली नव्हती. भाडेवाढीमुळे प्रवासी रिक्षा व्यवसायापासून दूर जाण्याची शक्यता आहे.

दीपक जौंदाळ, लाड चौक, रिक्षास्टॉप
मीटर पाहून कोणीही प्रवासी रिक्षातून प्रवास करीत नाही. पहिल्या एका किलोमीटरसाठी १७ रुपये केल्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे सामोपचाराने निर्णय घ्यावा लागेल.

दिलीप सूर्यंवंशी, सीबीएस

रेल्वे स्टेशन स्टॉपपासून प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र आरटीओने केलेली दरवाढ, विविध प्रकारचे कर, रिक्षांच्या वाढत्या किमतीमुळे रिक्षाचालक हैराण झाला आहे.

दीपक पोवार, रेल्वे स्टेशन स्टॉप

सर्व रिक्षा संघटना आणि रिक्षाचालक-मालकांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज आहे. सरकारला रिक्षाचालकांचे हित पाहिजे असते तर रिक्षाचालकांना आर्थिक डबघाईत नेण्याचे धाडस केले नसते.

दत्तात्रय साळोखे, रंकाळा स्टॅण्ड रिक्षा स्टॉप

अशी झाली भाडेवाढ

२०११- १० रुपये पहिला टप्पा

२०१२- १२ रुपये

२०१३- १२ रुपये

२०१४- १४ रुपये

२०१६- १७ रुपये

शहरातील ऑटो रिक्षांची संख्या ६५०० हजार

शेअर-ए- रिक्षांचे स्टॉप- २२

मान्यताप्राप्त स्टॉप १९०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांनी आपल्या आमदारकीची काळजी करावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शहराचा आमदार आमचा, भुदरगडचा आमदार आमचाच होणार, असे भाजपचे असलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील सर्वत्र सांगत सुटले आहेत. त्याचा शिवसेनेवर काही फरक पडणार नाही. आमचे सध्याचे सहाही आमदार निवडून येतीलच. पण, कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी मतदार संघात शिवसेनेची ताकद दाखवू आणि पदवीधर मतदार संघातही शिवसेनेचाच आमदार असेल. शिवसेनेच्या मदतीमुळे पालकमंत्री दोनदा आमदार झाले आहेत. त्यामुळे इतर मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आणण्याची स्वप्ने पाहणाऱ्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या आमदारकीची काळजी करावी,' असा इशारा शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे. दोन वर्षे होत आली तरी कोल्हापूरचे प्रश्न जैसे थे आहेत, पालकमंत्र्यांनी काय केले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राज्यात भाजपबरोबर सत्तेत असलेल्या शिवसेनेबरोबरच भाजप व पालकमंत्री पाटील यांचे संबंध कायमच ताणले आहेत. भाजपच्या केंद्र सरकारने दोन वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या कामकाजाबाबत आमदार क्षीरसागर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भाजपने जिल्ह्यात विविध माध्यमातून पाय रोवण्यास सुरुवात केल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, 'भाजपकडे सत्ता आहे म्हणून नेते, कार्यकर्ते येत आहेत. त्यांचा जिल्ह्यात मुळातच पाया नाही. त्यामुळे सत्ता व पैशाच्या जोरावर भाजपची जिल्ह्यात वाटचाल सुरू आहे. महापालिकेच्या निवडणुकीतही हेच घटक प्रमुख कारणीभूत होते. ही निवडणूक पैशाच्या जोरावर खेळली गेली. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक निवडून येण्याचे प्रमाण कमी झाले. पण, जनमत कायम शिवसेनेबरोबरच आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून कोल्हापुरात शिवसेना रुजली आहे. सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी सतत रस्त्यावर येण्याचे काम करत आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत काही पक्षांनी पैशाच्या जोरावर जरी निवडणूक जिंकली असली तरी शिवसेनेसोबतचे जनमत कायम राहिले आहे हे मतांच्या टक्केवारीवरुन दिसून येत आहे.'

पालकमंत्री पाटील जिल्ह्यात भाजपचे आमदार वाढणार असल्याचे सांगत आहेत. त्याबाबत क्षीरसागर म्हणाले, 'पालकमंत्री शहरात कुठे कार्यक्रम असेल तर शहरचा भावी आमदार भाजपचा असेल असे सांगत आहेत. भुदरगडमध्ये गेले की तिथे सांगत आहेत येथील भावी आमदार भाजपचा असेल. मुळात त्यांची मतदारसंघातील ताकद पाहिली की त्यांचा काही फरक पडणार नाही. कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. येथे शिवसेनेचा आमदार विजयी करुन ही ताकद दाखवून देऊ. तसेच पदवीधर मतदारसंघात पालकमंत्री पाटील यांच्या दोन निवडणुकांत विजयासाठी शिवसेनेची झालेली मदतही महत्त्वाची होती. त्या जोरावर आमदार झालेल्या पालकमंत्र्यांना त्याचा विसर पडू नये. त्या मतदारसंघातही शिवसेनेचाच आमदार असेल. इतर मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघाची काळजी करावी.'

मित्रपक्ष असलेल्या भाजपने जिल्ह्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पाया भक्कम करायला सुरुवात केल्याबाबत ते म्हणाले, 'जिल्ह्यात भाजपचे काही ​​अस्तित्वच नसल्याने त्यांना काही खटाटोप करावा लागत आहे. ​अनेक लोकांना घेतल्याशिवाय त्यांची वाटचाल होत नसल्याची परि​स्थिती आहे. काही नेत्यांनाही सत्तेची गरज असते. १९९५ सालच्या युतीच्या सत्तेवेळी महादेवराव महाडिक युतीसोबत होते. सत्ता गेल्यानंतर ते परत गेले. आता पुन्हा आले असले तरी ते कायम थोडेच राहणार आहेत? जिल्ह्यात पालकमंत्र्यांची ताकद कमी पडत असल्याने त्यांना राज्यस्तरावरील, देशस्तरावरील मदत घ्यावी लागत आहे. मात्र शिवसेनेची पाळेमुळे ३० वर्षांपासून रुजली आहेत. जनमत शिवसेनेच्या बाजूने आहे. त्यामुळे शिवसेनेला अशी धडपड करण्याची गरज नाही. शिवसेना सक्षम आहे.'

सत्ताधारी असूनही आंदोलन करत असल्याबाबत आमदार क्षीरसागर म्हणाले, 'लोकांनी सत्ता दिली असली तरी त्याचा वापर लोकांच्या हितासाठीच झाला पाहिजे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम सांगितले आहे. त्यामुळे सत्तेत असलो तरी जिथे लोकांच्या विरोधाचे, चुकीचे काम असेल तिथे आंदोलन करत राहणार. सत्तेत असलेल्या राज्यकर्त्यांनी काहीही करावे असे कुठे आहे? त्यांना जरब बसवण्यासाठी ही आंदोलने असतात. यापूर्वी कारखान्यांच्या निवडणुकीमधून शिवसेनेची ताकद दाखवून दिली आहे. आगामी निवडणुकीतही शिवसेना ताकदीने असेल.'

भाजपला सत्तेची मस्ती

ज्या व्यापाऱ्यांच्या जिवावर भाजपने सत्ता मिळवली. त्या व्यापाऱ्यांना वाऱ्यावर सोडले. त्यांच्या प्रश्नांचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देण्यास गेलेल्या शिष्टमंडळाकडून निवेदनही स्वीकारलेले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्नही तसेच आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे तेही नाखूष आहेत. भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. ज्येष्ठ मंत्री खडसे यांनी राजीनामा दिला आहे. भाजप सरकारला आलेली ही मस्तीच आहे. या प्रकारामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर जर मध्यावधी निवडणूक लागल्या तर शिवसेना एकहाती सत्ता मिळवेल, असेही त्यांनी सांगितले.

एक प्रश्नही शिल्लक ठेवला नसता...

भाजपने राज्यातील सत्ता मिळवल्यानंतर कोल्हापूरच्या विकासाच्या स्थितीबाबत विचारल्यानंतर कुठे आहे विकास? असा प्रतिप्रश्न करुन क्षीरसागर म्हणाले, 'शहराला जोडणाऱ्या पन्हाळा, हुपरी, गगनबावडा, रत्नागिरी, राधानगरी यासारख्या प्रमुख रस्त्यांची स्थिती काय आहे? सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद भूषवणाऱ्या पालकमंत्री पाटील यांनी या रस्त्यांसाठी काय केले? रंकाळा तलाव, पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न जैसे थे आहे. तीर्थक्षेत्र विकासाबाबत काहीही हालचाल नाही. कोटीतीर्थ तलावाच्या शुद्धीकरणाचा तर विषयच चर्चेत नाही. विकासासाठी महत्त्वाचे असलेले विमानतळ पालकमंत्र्यांना अजून सुरू करता आलेले नाही. मी पालकमंत्री असतो तर जिल्ह्यातील एकही प्रश्न शिल्लक ठेवला नसता.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरसेवकांनीच केला रास्तारोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जुना वाशी नाका ते क्रशर चौकपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता दुरूस्तीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कामास विलंब होत आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी क्रशर चौकातच आंदोलन करत वाहतूक रोखली. काँग्रेसचे गटनेते आणि नगरसेवक शारंगधर देशमुख हेच आंदोलनात सहभागी झाले. चौकातील रस्ता अडविल्याने चारही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाली. अखेर, मंगळवारपासून रस्ता दुरूस्तीचे काम सुरू केले जाईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

काँग्रेसचे गटनेतेचे आंदोलनात सक्रिय झाल्याने प्रशासनाने धावपळ केली. शहर अ​भियंता, उपशहर अभियंता घटनास्थळी धावले. नगरसेवक देशमुख यांनी रस्ता दुरूस्तीच्या कामास विलंब होत असल्याबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रंकाळा टॉवर ते क्रशर चौकपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. दोन कोटी ९८ लाख रुपयांची यासाठी तरतूद करण्यात आली आहे. रंकाळा टॉवरकडून संध्यामठपर्यंत सध्या काम सुरू आहे.

जुना वाशी नाका ते क्रशर चौकपर्यंतचा रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. पावसाळा तोंडावर आला असल्याने रस्ता दुरूस्ती तत्काळ करावी याकरिता नगरसेवकांसह नागरिक मंगळवारी रस्त्यावर उतरले. आंदोलनात खंडेराव जाधव, भिकाजी गावकर, माधुरी लोखंडे, सायली सावंत, संग्राम यादव आदींचा समावेश होता.

दरम्यान, नागरिकांनी रस्ता दुरूस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन केल्याचे समजताच महापौर अश्विनी रामाणे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी अधिकाऱ्यांना रस्ता दुरूस्तीच्या सक्त सूचना केल्या.

यावेळी नागरिकांनी क्रशर चौक ते अंबाई टँकपर्यंत सायलेंट झोन असल्याने मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी तसेच क्रशर चौक ते आपटेनगर मार्गावर स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालय पाडल्याने महिला भाविकांची प्रचंड अडचण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरातील महालक्ष्मी उद्यानातील सुलभ शौचालय पाडण्यासाठी झालेल्या शिवसेनेच्या आंदोलनानंतर मंगळवारी हे स्वच्छतागृह बंद ठेवण्यात आले. महालक्ष्मी उद्यानाचे लोखंडी गेट बंद करून 'बंद आहे' असा फलक लटकवण्यात आला आहे. महापालिकेने कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची विशेषतः महिलांची प्रचंड अडचण झाली.

अंबाबाई मंदिरात सोमवारी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनकर्णिका कुंडावरील सार्वजनिक स्वच्छतागृहाची मोडतोड केली. यात स्वच्छतागृहातील कर्मचारी बसण्याची केबिन उध्वस्त करण्यात आली आहे. साधारणतः एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

मंगळवारी मंदिरात आलेल्या बाहेरगावच्या भाविकांची मोठी कुचंबणा झाली. त्यातही महिला भाविकांना स्वच्छतागृह बंद असल्याने मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले. सुलभ इंटरनॅशनल संस्थेच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या या स्वच्छतागृहात पुरुषांसाठी शौचालयासाठी पाच आणि अंघोळीसाठी दहा रुपये आकारले जातात. मंदिरात येणाऱ्या भाविकांसह परिसरातील फेरीवाले, हॉटेल, लॉजिंग, महाद्वार रोड, जोतिबा रोडवरील दुकानदार यांच्याकडून या स्वच्छतागृहाचा वापर होतो. 'आम्ही नेहमीच कोल्हापुरात येतो. देवीचे दर्शन घेऊन माघारी जातो. आज येथे आल्यावर स्वच्छतागृह बंद असल्याचे दिसले. आता भक्त किंवा यात्री निवास, हॉटेल शोधण्याशिवाय पर्याय नाही' अशी प्रतिक्रीया सोलापूरच्या रमेश सावंत यांनी दिली.


सशस्त्र आंदोलक घुसलेच कसे ?

मंदिरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना लोखंडी पहार, हातोडा, कुदळ अशी औजारे घेऊन आंदोलक घुसलेच कसे ? त्यावेळी बंदोबस्तावर पोलिस उपस्थित नव्हते का ? या पोलिसांनी आंदोलकांना अटकाव का केला नाही ? जिल्हा पोलिस अधीक्षकांनी संबंधितांवर काय कारवाई केली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मनकर्णिका कुंड

अंबाबाई मंदिर परिसरातील महालक्ष्मी उद्यानात महापालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे. याखाली अंबाबाई मूर्तीच्या स्नानाचे पाणी जाते ते मनकर्णिका कुंड आहे. ही जागा देवस्थान समिती अस्तित्वात येण्यापूर्वी म्हणजे १९५२ साली महापालिकेकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर तेथे महापालिकेने उद्यान विकसित केले. भाविकांची गरज लक्षात घेऊन तेथे मंदिरातील दैनंदिन पूजेचे पाणी वाहून नेणाऱ्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आले. त्याला श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती, सनातन संस्था, श्रीराम सेना आदींसह हिंदुत्त्ववादी संघटनांनी विरोध केला होता.
कोणाच्या फायद्यासाठी ?

आंदोलनामुळे 'सुलभ'च्या वतीने मंगळवारी शौचालय बंद करण्यात आले आहे. मात्र, या परिसरात भाविकांची गैरसोय होऊ लागली आहे. आता भाविकांना भक्त निवास व हॉटेल्समध्ये ५० ते दीडशे रुपये मोजावे लागणार आहेत. आमदार क्षीरसागर यांनी महापालिकेकडून या परिसारत फिरते शौचालय पुरविले जाईल अशी घोषणा केली असली तरी महिलांकडून त्याचा वापर केला जाईल का ? अशी शंका उपस्थित होत आहे. भक्त निवास, यात्री निवास, हॉटेल्सवाल्यांकडून आंघोळ आणि शौचालयाच्या वापरासाठी जादा पैसे उकळले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आमदारांविना कार्यकर्त्यांना अटक

जुना राजवाडा पोलिसांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह ४२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या क्रमांकाचे आरोपी म्हणून क्षीरसागर यांचे नाव आहे, मात्र पोलिसांनी आमदारांना सोडून कार्यकर्त्यांनाच लक्ष्य केले. मंगळवारी (ता. ७) पोलिसांनी तुकाराम साळोखे(वय ३५, रा. संध्यामठ), जयवंत हारुगले(वय ४९, रा. कोळेकर तिकटी), रणजित जाधव(वय ३४, रा. साकोली), अजित गोंधळी(वय २३, रा. बालिंगा ता. करवीर), नीलेश नं पाटील(वय २१, रा. जाधववाडी), निखिल चिंचवाडकर(वय २९, रा. हुजूर गल्ली), अनिल माने(वय ४०, रा. शुक्रवार पेठ) आणि स्वप्नील कांबळे(वय २६, रा. पाचगाव) या दहाजणांना अटक करून कोर्टात हजर केले असता सर्वांना जामीन मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्त शिवारात ‘मुरतंय’ पाणी!

$
0
0

satish.ghatage@timegroup.com

कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात ६९ गावांत अंदाजे २३ कोटी ५२ लाख रूपये खर्च झाले आहेत. त्यातून ११८७ कामे करण्यात आली. यंदा आणखी २० गावे निवडली असून ६२२ कामांचा समावेश आहे. या कामांसाठी अंदाजे ३० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ही कामे अपेक्षितरित्या पूर्ण झाली तर १२०२ कोटी लिटर पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार असल्याचा दावा केला जात आहे. तथापि, योजनेसाठी ज्या पद्धतीने कामे होत आहेत आणि कामे केल्यापोटी मशिनरींची जी अवाढव्य बिले आकारली जात आहेत, त्यावरुन जलयुक्त शिवार योजनेत पाणी मुरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभाग, लघुसिंचन, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा, सामाजिक वनीकरण, जलसंपदा, भूजल सर्वेक्षण आणि वन विभागातर्फे कामे सुरू आहेत. त्यात तळ्यातील गाळ काढणे, पाणलोट क्षेत्रातील कामे, साखळी सिमेंट बंधारे, तलाव दुरूस्ती, वनराई बंधारे, वृक्षलागवड, चर खोदाई, पाझर तलावातील गाळ काढणे, वनतळे, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण अशी कामे केली जात आहेत. सरकारी विभाग व लोकसहभागातून कामे केली होत तआहेत.

गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात या योजनेतून गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य दिले आहे. कोरडे पडलेले तलाव, पाझर तलाव, वनतळ्यातील गाळ काढून पात्रांची लांबी व रूंदी वाढवण्याचे काम सुरू आहे. कळंबा (ता. करवीर) येथील तलावातील गाळ काढण्याचे काम मार्चपासून युद्धपातळीवर सुरू आहे. जलसंपदा विभागाची नवीन अवजड एक्साव्हेटर मशिन उपलब्ध करून दिले आहे. शंभर वर्षात प्रथमच कळंबा तलावातील मोठ्या प्रमाणात गाळ काढला आहे. गतवर्षी जिल्ह्यातील तलावातून सरकारी पातळीवर एक लाख ६० हजार ६४७ घनमीटर तर लोकसहभागातून सहा घनमीटर गाळ काढला होता. एप्रिल ते मे दरम्यान सरकारी पातळीवर एक लाख ३५ हजार घनमीटर तर लोकसहभागातून एक लाख ४२ हजार ५०० घनमीटर गाळ काढला आहे.

गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाने एक्साव्हेटर आणि जेसीबी मशिन उपलब्ध करून दिली आहेत. पण कृषी विभागाकडून भाड्याने जेसीबी व डंपर घेतले आहेत. भाड्याने घेतलेल्या यंत्रांची बिले अव्वाच्या सव्वा आकारली जात असल्याचा कुजबुज सुरू आहे. मातीचे बंधारे, गाळ काढण्याच्या कामात ढपला मारल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. योजनेतून कंत्राटदारांचेच उखळ पांढरे होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेतून किती पाणी मुरले हे पाऊस संपल्यानंतरच कळणार आहे.

जलयुक्त शिवार अभियान (२०१५/१६ मधील कामे)

निवडलेली गावे ६९

एकूण कामे ११८७

एकूण निधी ३६ कोटी १५ लाख २१ हजार

खर्च निधी २३ कोटी ५२ लाख ६४ हजार

एकूण पूर्ण कामे १००३

प्रगतीपथावरील कामे ५०

२०१६/१७ मधील कामे

निवडलेली गावे २०

एकूण कामे ६२२

एकूण निधी ३० कोटी २३ लाख

एकूण पूर्ण कामे ३७

प्रगतीपथावरील कामे ४४

कामे सुरू असलेली गावे १५

उपलब्ध निधी १७ कोटी ५६ लाख रूपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आषाढीची तयारीची५ जुलैपर्यंत पूर्ण कराजिल्हाधिकारी रणजित कुमार यांचे आदेश

$
0
0


पंढरपूर

आगामी आषाढी यात्रेसतील सर्व कामे पावसाच्या पार्श्वभूमीवर पाच जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश बुधवारी सोलापूरचे जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी यात्रा तयारी बैठकीत दिले. या वर्षी पावसाचे आगमन वेळेवर येण्याचे संकेत असून, मान्सूनपूर्व पाऊस देखील सगळीकडे हजेरी लावत असल्याने विभागणी आषाढी यात्रेच्या तयारीची कामे लवकर सुरू करून वेळेत संपविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या वेळी जिल्ह्यातील सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. गेल्या यात्रा काळात राहिलेल्या तृती आणि चुका या वर्षी दुरुस्त करताना नवीन चुका होऊ नयेत असेही रणजित कुमार यांनी सांगितले. आषाढी यात्रा सोहळा १५ जुलै रोजी असून, विविध ठिकाणाहून निघणारे पालखी सोहळ्यांना पालखीमार्गावर त्रास होऊ नये, असे सांगताना यात्रेतील सर्वच कामे पाच जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संदीप पाटील साताऱ्याचेनवे पोलिस अधीक्षक

$
0
0

संदीप पाटील साताऱ्याचे

नवे पोलिस अधीक्षक

सातारा

सातारा जिल्हा पोलिस दलात अभिनव उपक्रम राबवून आपल्या कारकिर्दीमध्ये कामाचा वेगळा ठसा उमटविलेले जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांची बुधवारी गडचिरोलीच्या पोलिस अधीक्षकपदी बदली झाली. त्यांच्या जागेवर गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील रुजू होणार आहेत.

१८ फेब्रुवारी २०१४रोजी अभिनव देशमुख यांनी तत्कालिन पोलिस अधीक्षक के. एम. प्रसन्ना यांच्याकडून पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गाठीशी कोणताही पूर्वनुभव नसताना डॉ. देशमुख यांनी पोलिस दलात अभिनव संकल्पना राबवून पोलिस दलासह जिल्हावासियांची मने जिंकली. पीसीआर, नागरीक सुविधा, अन्नपूर्णा व्हॅन, पोलिस गॅजेट, अशा विविध नवनवीन संकल्पना राबवून आदर्श घालून दिला. काळानुसार पोलिस दलही बदलले पाहिजे, यासाठी त्यांनी 'दक्ष' हे मोबाइल अॅप बनवून उपयोगात आणले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वरमध्ये जोरदार वृष्टी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

महाबळेश्वरमध्ये बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह सुमारे तासभर जोरदार पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात सुखद गारवा आला आहे.

दुपारी एक वाजल्यापासूनच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. पाऊस पडतो की नाही या विवंचनेत नागरिक असतानाच जोरदार पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे स्थानिकांसह पर्यटकांची चांगलीच पळापळी झाली. सात जूनला येथे मान्सून पावसाचे आगमन होणे आपेक्षित असताना अद्यापपर्यंत केवळ धुके व थंडी अशीच संध्याकाळ यावरच आता पर्यंत नागरिकांना समाधान मानावे लागले. मात्र, आज दुपारी सुमारे तासभर पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे समाधानाचे वातावरण आहे. सर्व साधारण मान्सून पाऊस हा पश्चिमेकडून बरसात असतो. मात्र, आजचा पाऊस पूर्व दिशेकडून बरसात होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने कोल्हापूरची दैना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी तासभर झोडपून काढलेल्या पावसाने शहराची पार दैना उडवून टाकली. गटारी, ओढे, नाले ओसंडून वाहिल्याने रस्त्यांवर साठलेल्या गुडघ्याइतक्या पाण्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक कोलमडली. रस्त्यावरील अनेक दुचाकी पाण्यात बुडाल्या तर अनेक ठिकाणी बेसमेंटमध्ये शिरलेल्या पाण्याने चारचाकी वाहनेही पाण्यामध्ये बुडाली. परीख पुलाखाली प्रचंड पाणी आल्याने वाहतूकच बंद झाली. अनेक घरे आणि अपार्टमेंटमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची धावाधाव झाली. झोडपून काढणाऱ्या पावसाबरोबरच असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून पडल्याने अनेक भागात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठाही खंडीत होता.

दुपारी शहराच्या दक्षिणेकडील उपनगरांमध्ये जोराचा पाऊस झाला. पण, सायंकाळी पाचनंतर संपूर्ण शहरालाच पावसाने अक्षरशः झोडपून काढण्यास सुरुवात केली. वळवासारख्या कोसळणाऱ्या पावसाने काही क्षणातच सर्वत्र पाणीच पाणी केले. पाण्याचे प्रमाण इतके प्रचंड होते की ​छोट्या गटारीच नव्हे तर जयंती नाल्याला जोडणाऱ्या मोठ्या गटारी व ओढे तुडुंब भरुन वाहू लागले. पाण्याबरोबर येत असलेल्या प्लास्टिक बाटल्या व कचऱ्याने पात्रे पाण्याने तुंबली. तुंबलेले पाणी रस्त्यांवर, अनेकांच्या इमारतींच्या बेसमेंटमध्ये शिरले. ओढ्यांलगतच्या परिसरात हे प्रमाण मोठे असल्याने तेथील रस्त्यांवर गुडघ्याइतके पाणी वाहत होते. बोंद्रेनगर, शाहू स्टेडियम, लक्ष्मीपुरी, शास्त्रीनगर फायर स्टेशन, केव्हीज पार्क परिसर, राजहंस प्रिटींग प्रेस परिसरातील घरांमध्ये पाणी घुसले.

बसंत बहारनजीक असलेल्या स्क्वेअर नाईन इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले. त्यामुळे चारचाकी वाहने अर्ध्यापेक्षा जास्त पाण्यात बुडाली. शिवाय रस्त्यावरील अनेक दुचाकी वाहनेही अर्धी पाण्यात बुडाली होती. तिथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, जिल्हाधिकारी कार्यालयापासून महावीर कॉलेजच्या रस्त्यावर तसेच जिल्हा परिषदेकडे जाणारा रस्ताही पाण्याखाली होता. परीख पुलाखाली प्रचंड पाणी साठले. दुचाकी वाहने पूर्णपणे बुडत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली. राजारामपुरी चौकातील जगदाळे हॉलच्या पिछाडीचे उद्यान तर तळेच बनले होते. राजहंस प्रिंटींग प्रेसजवळील नालाही तुडुंब भरल्याने पाणी रस्त्यावर पसरले. लक्ष्मीपुरीतील कोंबडी बाजारच्या रस्त्यावरही गुडघाभर पाणी साठले. लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नरच्या चौकात अनेक दुचाकी वाहने पाण्यात बुडाली. असल्याने तेथील वाहतूक काही काळ बंद राहिली. कनाननगर येथील ओढ्याचे पाणीही परिसरात सर्वत्र पसरल्याने रस्ता कुठे हेच समजत नव्हते. त्यामुळे येथील वाहतूकही अन्य मार्गाने वळवण्यात आली. पाऊस संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे अनेक चौकांत वाहतूक कोंडी झाली.

येथे घुसले पाणी

बोंद्रेनगरमधील राणे मेडिकलसमोरील घरांमध्ये

बजाप माजगावकर तालमीशेजारील घरात

राणे हॉस्पिटलसमोर शाहू स्टेडियममधील गाळ्यांमध्ये

आदर्श वस्त्रालय लक्ष्मीपुरी

केव्हीझ पार्कशेजारील पाटलाचा वाडा हॉटेलसमोर

राजहंस प्रिटींग प्रेस परिसरात

पार्वती टॉकीज परिसर

कनाननगर परिसर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुळाचा गोडवा गुजरातला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील पोषक जमीन, त्यामुळे उसाला व गुळाला येणाऱ्या गोडव्यामुळे गुजरात, राजस्थान असो वा आखाती देश, अमेरिका, लंडन असो. या साऱ्या ठिकाणी गूळ पाठवण्यासाठी कोल्हापूरच्याच गुळाची मागणी कायम असून यंदा आखाती देशांबरोबर अमेरिका, लंडन, फ्रान्ससाठी ८०५ टन गुळाची निर्यात झाली आहे. या निर्यातीमध्ये अर्धा किलो, एक किलोच्या गुळाची मागणी जास्त दिसून येत आहे. यंदाच्या विक्री झालेल्या ६६,९८१ टनापैकी ९५ टक्के गूळ केवळ गुजरातसाठी पाठवला गेल्याने गुळाचा गोडवा गुजरातने चाखल्याचे आणि गुजरात ही मोठी बाजारपेठ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शाहू महाराजांच्या काळापासून सुरू असलेला गूळ व्यवसाय सध्या कमी होत असला तरी येथील गुळाची देशामध्ये अन्य ठिकाणाबरोबर परदेशामध्येही मागणी कायम आहे. अनेक ठिकाणी गूळ उत्पादन होते. पण कोल्हापूरच्या गुळाला नैसर्गिक गोडवा असल्याने देशभरातील गूळ व्यापाऱ्यांकडूनही मोठ्या प्रमाणावर मागणी होत असल्याचा अनुभव येथील गूळ व्यापाऱ्यांना कायम येत असतो. यंदा बाजार समितीमध्ये ६६ हजार ९८१ टन गुळाची विक्री झाली. या विक्री झालेल्या गुळाची देशभरात जशी मागणी असते, त्याप्रमाणे रवानगी केली जाते. बाजार समितीमध्ये गुळाचे ६० अडते असून त्यांच्याकडून गूळ खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या ८८ पर्यंत जाते. या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून देशभरातील व्यापाऱ्यांना गुळाची विक्री केली जाते. त्यामध्येही गुजरातमधील १५० हून अधिक व्यापाऱ्यांची संख्याच जास्त आहे.

यंदा बाजार समितीमधून विक्री झालेल्या ६६ हजार टन गुळापैकी ९५ टक्के गूळ केवळ गुजरातसाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर राजस्थानमध्येही काही प्रमाणात हा गूळ पाठवला आहे. १५० व्यापाऱ्यांकडून या गुळाची खरेदी झाली आहे. त्यामुळे ३२५ कोटी रुपयांच्या एकूण उलाढालीतील २७५ कोटी रुपये केवळ गुजरातमधील गूळ विक्रीतून मिळाले आहेत. या विक्रीच्या प्रमाणात निर्यातीचे प्रमाण पाहिल्यास ते अगदीच कमी आहे. ८०५ टन म्हणजे जवळपास दोन टक्के इतकाच गूळ विविध देशांना निर्यात करण्यात आला आहे. त्यासाठी येथील पाच प्रमुख कंपनींच्या माध्यमातून गूळ विक्री करण्यात आली आहे. अमेरिका, लंडन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया तसेच दुबई, मस्कत, बहरीनसारख्या आखाती देशामध्ये हा गूळ पाठवण्यात आला आहे. ज्या देशांमध्ये आशियाई लोकांचा व प्रामुख्याने गुजराथी नागरिकांची संख्या जास्त आहे, तिथेच या गुळाची मागणी कायम असते.


निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून येथील गूळ व्यापाऱ्यांकडे आलेल्या मागणीनुसार पँकिंग करुन गूळ पाठवला जातो. परदेशातील तसेच देशातील विक्रीसाठीही अर्धा किलो, एक, दोन किलो गुळाची मागणी आहे. तसेच इतर ठिकाणाहूनही गूळ येत असला तरी कोल्हापुरातील गुळाचा चार ते पाच रुपये जादा दर असूनही येथे मागणी जास्त असते. येथील गूळ विक्रीच्या प्रमाणात निर्यातीचे प्रमाण खूप कमी आहे.

न‌िमेश वेद, कनकसिंह गोकुलदास ठाकर कंपनी.


निर्यात झालेला गूळ

भेली बॉक्स (टनमध्ये)

ई. एच. काथावाला ७१ ३८

न्यू विश्वास ट्रेडिंग कं. २१० ५२

कनकसिंह ठाकर १०५ ११०

चुनीभाई पटेल ००० १४४

रमेशचंद्र भिखालाल कं. ३५ ४०

एकूण ४२१ ३८४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती व्यवस्थापनचे तीनतेरा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील बहुतांश नाल्यांची साफसफाई झालेली नाही. नालापात्रात खरमाती, प्लास्टिक पिशव्या, कचऱ्याचे ढीग आहेत. ड्रेनेज लाइनची स्वच्छता झालेली नाही. गटारतील कचरा काढला नाही. रस्ते प्रकल्पात झालेली गटारे टाकावू साहित्यांनी, बांधकाम वस्तूंनी तुडुंब भरल्याने पाण्याचा निचरा होत नाही. महालक्ष्मीनगर परिसरातील ड्रेनजलाइन आणि चेंबर तुंबल्याने मान्सूनपूर्व झालेल्या एकाच पावसाने प्रशासनाला झटका दिला. संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी महापालिकेने आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सज्ज केल्याचा दावा केला असला तरी विविध भागातील नाले सफाई, ड्रेनेज लाइन आणि गटारीकडे केलेले दुर्लक्ष यामुळे हे व्यवस्थापन कागदावरच राहिल, असे दिसते.

रेडझोनमधील वाढत्या बांधकामामुळे पावसाळ्यात पुन्हा एकदा ज्या त्या भागातील घरात पाणी शिरण्याची भीती आहे. गेल्या काही वर्षांत रेडझोन परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. रमणमळा, खानविलकर पेट्रोलपंप परिसर, कसबा बावडा, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, दुधाळी, कदमववाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, कारंडे मळा या भागाला यापूर्वी पुराच्या पाण्याने वेढले जात होते. आता या भागातील नदीपात्र, नालापात्रात भर टाकून अनेकांनी बांधकामे केली आहेत. शिवाय शाहूपुरी कुंभार गल्ली, दसरा चौक सुतार मळा, रमणमळा, शंकराचार्य मठ, मस्कुती तलाव अशी ठिकाणे पूरबाधित झाली आहेत. पुराचे पाणी लोकवस्तीत शिरल्याने नुकसान झाले होते. या पावसाळ्यामध्ये अशा भागातील स्थिती काय होणार? हे पावसाला सुरुवात झाल्यानंतरच समजणार आहे.

३५ ठिकाणे संभाव्य पूरबाधीत

शहर आणि परिसरात ३५ ठिकाणी संभाव्य पूरबाधित म्हणून निश्चित केली आहेत. रामानंदनगर पूल परिसर, ओढ्याकाठची घरे, गायकवाड वाडा, जामदार क्लब, जगद‍्गुरू मठ परिसर, पंचगंगा तालीम, मस्कुती तलाव, गुणे बोळ, सिद्धार्थनगर, सीता कॉलनी, राजाराम कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, दुधाळी परिसर, गवत मंडई, शाहूपुरी कुंभार गल्ली या ठिकाणी पूर कालावधीत आपत्कालिन स्थिती उद्भभवू शकते. यादवनगर, डोंबारवाडा, गोमती पूल (जयंती नाल्याजवळ), दलाल मार्केट परिसर कामगार चाळ, रमणमळा न्यू पॅलेस परिसर, नाईक मळा, पुगांवकर मळा, माळी मळा, दीप्ती पार्क, चित्रदुर्ग मठ, दसरा चौक परिसर, महावीर गार्डन परिसर, महावीर कॉलेज पिछाडीचा परिसर, बापट कॅम्प, जाधववाडी परिसर, कत्तलखाना परिसर, जुनी जाधववाडी, युनायटेड एजन्सी परिसर, राजीव गांधी झोपडपट्टी परिसर, शिरोली जकात नाका परिसर, कदमवाडी परिसर, साळोखे मळा, भोसले पार्क, महालक्ष्मीनगरमधील काही परिसर पुराने बाधित होण्याची शक्यता आहे.

................

आपत्कालीन स्थितीत येथे होणार स्थलांतरित

लक्ष्मीबाई जरग विद्यालय जरगनगर, ग.गो.जाधव शाळा, गुणे बोळ, शाहू विद्यालय तोरस्कर चौक, जगद‍्गुरु मठ शुक्रवार पेठ, आंबेडकर हॉल आणि आंबेडकर विद्यालय शनिवार पेठ, अण्णासाहेब शिंदे विद्यालय, लक्षतीर्थ, रानडे विद्यालय, उत्तरेश्वर पेठ, शाहूपुरी विद्यालय, व्यापार पेठ, यादवनगर सांस्कृतिक हॉल (अभ्यासिका), हरिहर विद्यालय, लक्ष्मीपुरी, न्यू पॅलेस परिसर महापालिका शाळा, महसूल भवन हॉल व धान्य गोदाम, दत्त मंदिर आणि रमणमळा सांस्कृतिक हॉल, चित्रदुर्ग मठ, मुस्लिम बोर्डिंग, प्रिन्स शिवाजी शाळा जाधववाडी, व्यायामशाळा जाधववाडी, शाहू मार्केट सांस्कृतिक हॉल, माझी शाळा, समता हायस्कूल, तुळजा भवानी हॉल, कदमवाडी या ठिकाणी आपत्कालिन स्थितीत पूरबाधित नागरिकांच्या स्थलांतराची सोय केल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली.

............

१८ अधिकाऱ्यांवर जबाबदारी

अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, शहर अभियंता, उपशहर अभियंता, मुख्य लेखापालासह विविध विभागातील १८ अधिकाऱ्यांवर आपत्कालीन व्यवस्थापनची जबाबदारी सोपवली आहे. सरकारशी पत्रव्यववहार, वैद्यकीय सुविधा, नागरिकांसाठी छावण्या निश्चिती, जीवनावश्यक वस्तू पुरवठा, होड्यांचे नियोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तात्पुरते निवारे उभारणे, आपत्कालीन स्थितीत शाळा, सार्वजनिक इमारती, मदत स्वीकृती केंद्र, सर्व प्रकारचे अनुदान प्राप्त करून घेणे अशा २७ कामांची यादी तयार केली आहे.

.................

आरोग्य विभागाचा स्वतंत्र कक्ष

आरोग्य विभागाच्या उपाययोजना सांगताना प्रभारी आरोग्य अधिकारी अरूण वाडेकर म्हणाले, 'पंचगंगा, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आणि आयसोलेशन हॉस्पिटल या तीनही रुग्णालयात आपत्कालीन स्थितीत स्वतंत्र कक्ष असेल. तेथे जादा पाच-पाच बेडस्‍ची सोय असेल. सध्या एक रुग्णवाहिका आहे, आणखी एक रुग्णवाहिका दुरूस्त करून वापरण्याचे प्रस्तावित आहे.'

९० टक्के काम पूर्ण

शहरातील नाले आणि चॅनेल सफाईचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. गेल्या अडीच महिन्यापासून ६५ कर्मचारी नाले सफाई आणि चॅनेलची कामे करत आहेत. काही ठिकाणी जेसीबीचा वापर केला. उर्वरित मार्केट यार्ड प्रभागातील नाला सफाई, चॅनेलची कामे सुरू आहेत.

राजेंद्र पाटील, कीटकनाशक अधिकारी, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासासाठी हद्दवाढ अनिवार्य, आरक्षणाची भीती अनाठायी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या विकासासाठी हद्दवाढ अनिवार्य आहे. त्यासाठी महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले. महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सगळ्याच नगरसेवकांनी हद्दवाढीला पाठिंबा दिला. हद्दवाढ केवळ शहराच्या विस्तारासाठी नाही तर ग्रामीण भागाचा नियोजनबद्ध विकास घडताना मुबलक पाणी, आरोग्य, वाहतूक, शिक्षण अशा पायाभूत सुविधा उपलब्ध होऊन जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक आहे. सरकारने तत्काळ हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करावी, अशी भूमिका सभागृहाने बुधवारी मांडली. हद्दवाढीनंतर शेतकऱ्यांच्या जमीनीवर आरक्षणे टाकली जाणार नाहीत. त्यामुळे अनाठायी भीती बाळगू नये, असा दिलासाही सभागृहाने दिला.

महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी मतभेद बाजूला ठेवून हद्दवाढीसाठी एकजूट दाखविली. हद्दवाढीच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या नगर विकास विभागाची समिती गुरूवारपासून दौऱ्यावर येणार होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने विशेष सभा घेऊन हद्दवाढीला पाठिंबा दिला. हद्दवाढीत गांधीनगरसह गोकुळ शिरगाव व शिरोली एमआयडीसीचा समावेश करावा अशा सूचना सदस्यांनी केल्या. हद्दवाढीला विरोध करणाऱ्यांना चिमटेही काढले. राजकीय स्वार्थासाठी हद्दवाढीला विरोध करू नका. लोकांची दिशाभूल थांबवावी असे आवाहनही केले.

तर महापालिकेची ग्रामपंचायत करा

१९७२ मध्ये कोल्हापूर नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले. पण, गेल्या ४०-४५ वर्षांत शहराची एका इंचानेही हद्दवाढ झाली नाही. १९९० पासून कोल्हापूरची जनता हद्दवाढीसाठी संघर्ष करत आहे. एकतर हद्दवाढ करा, अन्यथा महापालिकेचे नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीत रुपांतर करा, अशा शब्दांत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.

हद्दवाढीमुळे काय फायदा होणार

ग्रामीण भागाचा सुनियोजित विकास, निधीची उपलब्धता

शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षणे नाहीत

संबंधित गावात पहिली दोन वर्षे घरफाळा वाढ नाही

तिसऱ्या वर्षांपासून टप्प्याटप्याने घरफाळ्यात वाढ

हद्दवाढीमुळे केंद्र व राज्य सरकारच्या योजनांना शहर पात्र

विकासाठी २००० कोटी रुपयांपर्यंत निधी

केंद्र व राज्यातील मंजूर निधीतून ८० टक्के निधी संबंधित गावावर खर्च

सरकारी मालकीच्या जागेवर प्राधान्याने आरक्षणे

लोकसंख्येच्या निकषावर शाळा, मैदान, बगीचा, हॉस्पिटलसाठी आरक्षणे

====

शहरीकरण होत असलेल्या एक किलोमीटर अंतरावरील गावांचा हद्दवाढ प्रस्तावात समावेश आहे. हद्दवाढीत नव्याने समाविष्ट गावांसाठी महापालिकेचा महसूल, सरकारी अनुदान, आणि विविध योजनेतील निधीतील एक तृतीय्यांश रक्कम विकास कामासाठी खर्च केली जाणार आहे. स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठीच आरक्षणे टाकली जातात. लोकसंख्येचा निकष विचारात घेतला जातो. शाळा, मैदान, बगीचे, रस्ते यासाठीच आरक्षणे असतात.

आयुक्त पी. शिवशंकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्तात्रय शिंदे सांगलीचेनवे पोलिस अधीक्षक

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील फुलारी यांची सिंधूदुर्ग येथे तर सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची सांगलीचे पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. दोन्हीही अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात सर्वसाधारण वर्षभराचा कालावधी पूर्ण केला असल्याने बुधवारी राज्य सरकारने जाहीर केलेल्या बदल्यांच्या यादीनुसार त्यांची बदली झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बदलीनंतर फुलारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वर्षभरात आपण आपले काम केलेले काम सांगलीकरांना ज्ञात आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यापासून ते कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवल्याने जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करता आली. एकही गंभीर स्वरुपाची अनुचित घडलेली नाही. गुन्ह्यांच्या तपासात प्रगती करता आली. पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीनेही अनेक उपक्रम राबविले. सांगलीकरांनी उत्तम सहकार्य दिले आहे.

नूतन पोलिस अधीक्षक म्हणून रुजू होणारे दतात्रय तुळशीराम शिंदे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चिंचोली गावचे असून, सध्या ते सिंधूदुर्गचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. १९९६मध्ये पोलिस उपाधीक्षक म्हणून पोलिस सेवेत रुजू झालेल्या शिंदेनी आतापर्यंत गडचिरोली, गोंदीया, सोलापूर, नवी मुंबई, मुंबई, दहशतवादी कारवायांच्या विरोधात थेट कारवाई करणारे फोर्स वन पोलिस दल आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. १ जानेवारी २०१६ रोजी त्यांना भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) पदोन्नती मिळाली आहे. नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा बजावल्याबद्दल त्यांना राज्य सरकारने विशेष सेवा पदक, आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत केंद्र सरकारने सुरक्षा पदक, पोलिस महासंचालकांच्या बोधचिन्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेषतः महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध (मोका) आणि झोपडपट्टी दादा विरुद्धच्या कायद्यांतर्गत त्यांनी उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीककर्ज धोरणात बदलाचा नाबार्डला अधिकार नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

केंद्र सरकारच्या मूळ कर्जमाफी धोरणात पीककर्ज धोरणाप्रमाणे दिलेल्या मर्यादेइतकेच कर्ज माफ केले जाईल, असा कोणताही उल्लेख नाही. त्यात बदलाचा कोणताही अधिकार नाबार्डला नसल्याचे निरीक्षण नोंदवत केंद्र सरकारला यासंबंधी मूळ धोरणात पीककर्ज मर्यादेइतकेच कर्जमाफ करता येईल किंवा कसे यासंबंधी स्पष्टीकरण देणारे प्रतिज्ञापत्र दोन आठवड्यात दाखल करण्याचे आदेश बुधवारी हायकोर्टाने दिले. न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.

शिरोळ व कागल तालुक्यातील शेतकरी तसेच विविध कार्यकारी संस्थांतर्फे अॅड. धैर्यशील सुतार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी बुधवारी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. प्रसाद ढाके फाळकर व अॅड. सुतार यांनी, केंद्र सरकारने देशात एकच धोरण राबवून अल्पभूधारक शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी केली. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. परंतु २०१२ मध्ये राजकीय वैमनस्यातून लोकप्रतिनिधींनी या योजनेत खास करून कागल तालुक्यात गैरलाभ झाल्याची तक्रार केली. त्यावर नाबार्डच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने सर्वच खात्यांचे लेखापरीक्षण केले असता मूळ धोरणात नसलेल्या पीककर्ज मर्यादेचा निकष लावला असून हा निकष पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद केला. तर अॅड. राम आपटे यांनी हा निकष केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच का लावला, असा सवाल करत कर्जमर्यादेचा निकष बेकायदेशीर व अधिकारबाह्य असल्याने रद्द करावा, अशी मागणी केली.

त्यावर खंडपीठाने, मूळ धोरण हे केंद्र सरकारचे असून नाबार्ड कोणत्या अधिकारात बदल करू शकते? पीककर्ज मर्यादेचा निकष कोठून आला, तो तुम्ही कसा काय ठरवू शकता, असे सवाल नाबार्डच्या वकिलांना विचारले. त्यावर नाबार्डतर्फे समर्थन करण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्यावर खंडपीठाचे समाधान झाले नाही.

जिल्हा बँकेतर्फे अॅड. तेजपाल इंगळे यांनी, जिल्हा बँकेने नाबार्डच्या आदेशावर कारवाई केली आहे. परंतु नाबार्डच्या अर्थाशी जिल्हा बँक सहमत नसल्याचे सांगितले. त्यावर खंडपीठाने केंद्र सरकारच्या मूळ धोरणात नाबार्डला कोणताही बदल करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images