Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विद्यार्थ्यांनो, तणावमुक्त राहा!

$
0
0

गेल्या दोन वर्षांत ५७ मुला-मुलींची आत्महत्या; सोशल मीडियाच्या वापराचा अतिरेक

जान्हवी सराटे, कोल्हापूर

टी.व्ही., इंटरनेट, मोबाइल अशा सोशल मीडियाच्या साधनांचा मुलांवर अतिरेकी प्रभाव झाल्यामुळे पालक व विद्यार्थी यांच्यातील संवाद कमी होत चालला आहे. परिणामी मुलांमधील ताणतणावाच्या कारणामुळे आत्महत्या वाढत आहेत. जिल्ह्यात अल्पवयीन मुला-मुलींनी केलेल्या आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय आहे. याबाबत आभास फाउंडेशनने केलेल्या अभ्यासात गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील ५७ मुला-मुलींनी वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्येचा मार्ग निवडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे रोखण्यासाठी आभास संस्थेच्यावतीने 'संवाद' उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मुलांच्या गरजांचा विचार न करता पुरवल्या जाणाऱ्या सुविधा, पैशाला दिले जात असलेले अतिमहत्त्व, चंगळवाद यासह क्षमता लक्षात न घेता मुलांबाबत पालकांकडून ठेवल्या जात असलेल्या अवास्तव अपेक्षा यामुळेही मुले तणावग्रस्त बनत आहेत. अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या हा विषय समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे, तसेच समाजानेही यासंदर्भात आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अशी मुले बालवयात आत्महत्येसारखा पर्याय निवडतात हे गंभीर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रौढ व्यक्तींनी केलेल्या आत्महत्यांची संख्या ७६४ असून, अल्पवयीन मुला-मुलींच्या आत्महत्यांची संख्या ५७ आहे. २०१३ आणि २०१४ या दोन वर्षांत एकूण ८२१ व्यक्तींच्या आत्महत्या नोंदवलेल्या आहेत. या एकूण प्रकरणात अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण सात टक्के आहे.

आभास फाउंडेशनने केलेल्या सर्व्हेमध्ये औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुलांसोबत संवाद वाढविण्यासाठी पालकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी संस्थेच्यावतीने शालेय आणि महाविद्यालयातील तणावग्रस्त मुला-मुलींसाठी ‌अभिव्यक्तीचे व्यासपीठ 'संवाद' या उपक्रमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये अभिव्यक्तीचा स्वीकार, समुपदेशन, समन्वय आणि मार्गदर्शन या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात रविवारपासून करण्यात आलेली आहे.

करवीरमध्ये जास्त प्रमाण

अल्पवयीन मुलांच्या सर्वाधिक आत्महत्येच्या घटना करवीर तालुक्यात घडल्या असून, त्यांची संख्या २८ आहे. त्यापाठोपाठ गडहिंग्लज ८, शाहूवाडी ६, इचलकरंजी परिसरात ५, राधानगरी २, पन्हाळा ३, भुदरगड ३ अल्पवयीन मुला-मुलींनी आपले जीवन संपवले आहे. गगनबावडा तालुक्यात अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण शून्य नोंदलेले आहे.

मुलांच्या मनात अनेक प्रश्न घोंघावत असतात. त्यांना व्यक्त होऊ द्यायला हवे. अन्यथा ते मनाला मान्य होईल असा मार्ग निवडतात. यामध्ये आत्महत्येसारखा पर्यायही निवडला जाऊ शकतो. म्हणून मुलांशी संवाद वाढविण्यासाठी पालकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

- प्राजक्ता देसाई, सचिव, आभास फाउंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्वयम्’मध्ये साकारल्या आठ हजार राख्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गतिमंद अर्थात विशेष मुलांच्या पालकांना आपल्या मुलांनीही सर्वसाधारण मुलांसारखे जगावे अशी अपेक्षा असते. कसबा बावडा येथील स्वयम् मतिमंद मुलांची शाळा अशा विशेष मुलांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करत असते. याचाच एक भाग म्हणून या शाळेतील विद्यार्थ्यांनी यंदा आठ हजार राख्या तयार केल्या आहेत.

इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित स्वयम मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये स्वयम उद्योग केंद्रामध्ये गेल्या वर्षापासून रक्षाबंधनासाठी राख्या तयार केल्या जात आहेत. या मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना राख्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. गेल्या वर्षी या शाळेतील पंधरा विद्यार्थ्यांनी सहा प्रकारच्या सहाशे डझन अशा जवळपास साडेसात हजार राख्या तयार केल्या होत्या. त्यातून कच्च्या मालाचा खर्च वगळता वीस हजार रूपयांचा नफा या व्यवसायातून झाला होता.

यंदाही राख्या बनविण्याचे काम संपले असून राख्यांची विक्री सुरू झाली आहे. सुमारे सहा प्रकारच्या आठ हजार राख्या या विद्यार्थ्यांनी तयार केल्या असून १० ते ४० रूपयांपर्यंत या राख्यांच्या किंमती आहेत. काही शाळांच्या माध्यमातून या राख्या विक्री केल्या होत्या. यंदा सर्व सरकारी कार्यालयामध्येही या राख्या विकल्या जात असून या राख्यांचा स्टॉल दाभोळकर कॉर्नर येथील तेज कुरिअरमध्ये लावण्यात आला आहे.

इतर मुलांपेक्षा या विशेष मुलांचे काम कमी वेगाने होत असल्यामुळे या राख्या बनविण्यासाठी या मुलांना अधिक कालावधी लागतो. म्हणून हे काम जानेवारीपासूनच सुरू केले आहे. मुलांच्या कलागुणांना वाव मिळतोच शिवाय रोजगाराचे साधनही उपलब्ध होत आहे.

प्रमोद भिसे, मुख्याध्यापक, स्वयम मतिमंद मुलांची शाळा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागा हस्तांतराच्या किमतीवरून रंगणार वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या वन विभागाच्या जागेच्या प्रस्तावाबाबत पाच महिने घालवल्यानंतर आता हस्तांतरीत करायच्या जागेची किंमत देण्यावरून प्रक्रिया रखडली आहे. वन विभागाच्या जागेचा प्रस्ताव भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने (एएआय) द्यायचा की राज्य सरकारने या वादात दोन वर्षांपासून भूसंपादन रखडले आहे. आता प्रस्ताव केल्यानंतर त्या जागेची किंमत कोण भागवणार यावरून एएआयच्या दिल्लीतील मुख्यालयापर्यंत हे प्रकरण गेले आहे.

एमआयडीसीकडून एएआयकडे विमानतळ हस्तांतरीत केल्यानंतर त्याच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. छोट्या शहरांमधील विमानतळाच्या विकासासाठी राबवण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या योजनेतही कोल्हापूरचा समावेश आहे. विमानतळाच्या अन्य विस्तारीकरणाबरोबरच ​ कंपन्यांना तसेच प्रवाशांनाही फायदेशीर विमानसेवा देण्याच्यादृष्टीने धावपट्टी विस्तारीकरणाची आवश्यकता आहे. त्यासाठी जागेची आवश्यकता असल्याने विमानतळाजवळील दहा हेक्टर जागा हवी आहे. ही जागा वनविभागाची असल्याने त्यासाठी एएआयने पुढाकार घ्यायचा की राज्य सरकारने यात बराच काळ लोटला होता. त्यात एप्रिलपासून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालून वाद मिटवण्यात पुढाकार घेतला. त्यानुसार एएआयने प्रस्ताव करण्याच्या सूचनाही दिल्या, पण आता तो प्रस्ताव वनविभागाकडे देण्यासाठी जागेची किंमत कोण भागवणार याबाबतची स्पष्टता करणाऱ्या जागेच्या सध्याच्या किंमतीबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक असते.

ही जागा महसूल विभागामार्फत एएआयला देण्यात येणार आहे. त्यामुळे एएआयकडून या जागेच्या किमतीबाबत स्पष्टता होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी येथील एएआयच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यांच्याकडून स्पष्टीकरण झाल्यानंतर प्रस्तावाच्या प्रक्रियेला गती येण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारकडून पैसे भागवण्याचा आदेश झाला तर महसूल विभागाला त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. कोल्हापूरची विमानसेवा चार वर्षांपासून बंद आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक भू संपादनाचा प्रस्ताव रखडला आहे.

दहा हेक्टरसाठी

जागेअभावी धावपट्टीचे विस्तारीकरण नाही. परिणामी, मोठ्या विमान कंपन्या येथे सेवा सुरू करत नाहीत अशा चक्रात विमानसेवा अडकली आहे. दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू असतानाही किरकोळ बाबींमध्ये प्रकल्प अडकला आहे. राज्य व केंद्रातही भाजपचे सरकार असताना दहा हेक्टरच्या हस्तांतराचा प्रश्न लांबल्याने प्रत्यक्षात जागा संपादनास किती कालावधी लागेल याबाबत काहीही खात्री देता येत नाही. त्यामुळे आपोआपच विमानतळाचे विस्तारीकरणही रखडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात महाराष्ट्राची उद्योग भरारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मेक इन महाराष्ट्र धोरणानुसार औद्योगिक विकासप्रक्रियेतील सुलभतेमुळे महाराष्ट्राने पुन्हा औद्योगिक विकासात अव्वल स्थान मिळवले आहे. कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, राज्याची औद्योगिक धोरणे आणि नेतृत्वामुळे महाराष्ट्र पुन्हा मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे,' अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली.

औद्योगिक विकासासाठी जागतिक पातळीवर महाराष्ट्राच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न करणारे गगराणी सोमवारी येथे आले होते. ते म्हणाले, 'काही वर्षांपूर्वी राज्याचा औद्योगिकरणातील क्रमांक घसरल्याची चर्चा होती. अनेक उद्योग अन्य राज्यांकडे वळत होते, पण नव्या सरकारच्या धोरणानुसार औद्योगिक विकासासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यानुसार राज्यात ​७२ विविध प्रकारच्या परवानग्यांऐवजी केवळ २५ परवानग्या आवश्यक केल्या. एमआयडीसीनेही परवानग्यांची संख्या १४ ऐवजी पाचवर आणली आहे. त्यामुळे ऑटोमोबाइल क्षेत्रातील मोठे उद्योग राज्यात येत आहेत. गुजरातसारख्या राज्यात असलेली जनरल मोटर्स राज्यात आली आहे. जर्मन, चीन, स्वीडनच्या कंपनीही येत आहेत. यातून परदेशी तसेच देशातील उद्योगांचाही राज्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे दिसून येते.'

येथील भूसंपादनाबाबत गगराणी म्हणाले, 'पूर्वी कोल्हापूर, सांगली व नाशिक जिल्ह्यांत औद्योगिकरणासाठी जागाच मिळत नव्हती. नाशिक जिल्ह्यात भूसंपादन सुरू झाले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत मागणी असूनही जागा उपलब्ध होत नाही. या परिसरात ३०० ते ४०० हेक्टर जागेची गरज आहे. दोन गुंठ्याचा प्लॉट व त्यात पाचशे ते हजार चौरस फुटापर्यंतचे शेड असा जागेचा वापर आता करता येणार नाही. हाँगकाँग, सिंगापूरमध्ये छोट्या उद्योजकांसाठी बहुमजली इमारती उभारल्या जातात. राज्यातही तसेच धोरण अवलंबले असून, जास्तीत जास्त उद्योजकांना सामावण्याचा प्रयत्न आहे. बंद पडलेल्या उद्योगांनी आपल्या जागेवर अशी इमारत उभी करावी. हे शक्य नसल्यास त्यांच्या असोसिएशनच्या माध्यमातून इमारती उभी करावी. दोघांनाही शक्य नसल्यास एमआयडीसी या इमारती बांधून देण्यास तयार आहे.'

सीईटीपीसाठी ३५० कोटी

राज्यामध्ये ९५ टक्के प्रदूषण घनकचऱ्याद्वारे होते. औद्योगिक सांडपाण्यातून पाच ते सहा टक्केच प्रदूषण होते. सोपे असल्याने उद्योगांना रोखले जाते. मोठ्या महापालिकांबाबत काही पावले उचलली जात नाहीत. तरीही औद्योगिक वसाहतींमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी दोन वर्षांत एमआयडीसीने ३५० कोटींची गुंतवणूक केली आहे, असे गगराणी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मगरीचा हल्ला

$
0
0

कुपवाड : मिरज तालुक्यातील कसबेडिग्रजनजीकच्या कृष्णा नदीपत्रात मगरीने रविवारी सकाळी उमराव जयसिंग घाडगे (वय४५) यांच्यावर हल्ला केला. घाडगे यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी घट्ट पकडून ठेवून मगरीला हुसकावून लावल्याने घाडगे यांचे प्राण वाचले. या घटनेनंतर वन विभागाने तेथे धाव घेऊन माहिती घेतली. घाडगेंना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आष्टा रस्त्यावरील बन्सी पेपरमीलमध्ये काम करणारे उमराव घाडगे (कसबेडिग्रज) नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी मित्रांबरोबर कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेले होते. पोहणे झाल्यानंतर घाडगे गुडघाभर पाण्यात उभे होते तर त्यांचे मित्र पाण्याबाहेर आले होते. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या मगरीने घाडगे यांच्या पायाच्या पोटरीला पकडून पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान ओळखून अभिजीत लवटे याने पाण्यात उडी घेत घाडगे यांना मिठी मारुन घट्ट पकडले. या दोघांना अन्य मित्रांनी पाण्याबाहेर ओढले, त्याच दुसऱ्या मित्रांनी दगडांनी मगरीना हुसकावले. त्यामुळे पायाची पोटरी सोडून मगर खोल पाण्यात निघून गेली. घाडगे यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महापालिका शाळा सेमी इंग्रजी करू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भविष्यकाळात पक्षीय राजकारणात जर संधी मिळाली तर नक्कीच कोल्हापुरातील महापालिकेच्या सर्व शाळा सेमी इंग्रजी करू. खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर महापालिका शाळांना ऊर्जितावस्था आणून त्या टिकविणे ही आपली जबाबदारी आहे,' असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले. राजारामपुरीमधील व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे संजय मोहिते प्रेमी, साइक्स एस्टेंन्शन ग्रुप व रोटरी सनराईज सोशल सेंटरच्यावतीने महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना बूट व सॉक्स वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर वैशाली डकरे होत्या.

पाटील म्हणाले, 'महापालिका हे कुरुक्षेत्र असून, तेथे कुरघोडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात होते. या राजकारणात संजय मोहिते यांनी ‌शिक्षण विभागात चांगले काम करून ‌दाखविले आहे. राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न असतानाही कोल्हापूर महापालिका शाळांमध्ये हा प्रश्न नाही. दिवसेंदिवस खासगी शाळा वाढत आहेत. या स्पर्धेच्या युगात ‌महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळा टिकविणे मोठे आव्हान आहे. सध्या खासगी शाळा अनेक शालेय साहित्यांची ऑफर देत आहेत. त्यासाठी महापालिका शाळांचे अस्तित्व टिकविण्याची आपली जबाबदारी आहे.' कार्यक्रमादरम्यान महापालिकेच्या शाळांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी पाटील यांनी एक लाखाच्या निधीची घोषणा केली.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर म्हणाले, 'आघाडी सरकारने पाच वर्षांत अनेक विकासकामे करत लोकांना सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या राजकारण केवळ पाडापाडीचे असून, ईर्ष्येला पेटलेले आहे. पाडण्यापेक्षा लोकांना जिंकणे जास्त महत्त्वाचे आहे. मी राष्ट्रवादीचा नेता म्हणून 'नो बॉल' टाकणार नाही. संजय मोहिते यांनी चांगले काम केले असून, ते निवडून आले पाहिजेत.'

कार्यक्रमास माजी सभापती संजय मोहिते, सभापती महेश जाधव, केदार कुंभोजकर, घनशाम पटेल, उपसभापती भरत रसाळे, आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महापालिका शाळांतील दहा हजारपैकी अडीच हजार विद्यार्थ्यांना बूट व सॉक्सचे वाटप करण्यात आले. रोटरीचे प्रेसिडेंट केदार कुंभोजकर यांनी प्रास्ताविक केले. चेअरमन रवी संघवी यांनी स्वागत केले. प्रशासनाधिकारी प्रतिभा सुर्वे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरास यांचा जातीचा दाखला अवैध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माजी स्थायी समिती सभापती आणि नगरसेवक आदिल फरास यांचा बावर्ची जातीचा बोगस दाखला जात विभागीय पडताळणी समितीने रद्द केला आहे. २०१० मधील महापालिका निवडणुकीत फरास यांनी बावर्ची जातीचा बोगस दाखला जोडून शाहू मैदान (क्रमांक ६२) प्रभागातून ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. त्यांच्या जातीच्या दाखल्यास नगरसेवक आर. डी. पाटील व रत्नदीप कुंडले यांनी आक्षेप घेतला होता. जातीचा दाखला रद्द केल्यामुळे फरास यांना सहा वर्षासाठी निवडणूक लढविता येणार नाही.

जात पडताळणी समितीचे सदस्य बी. टी. मुळे यांनी समितीच्या सदस्य सचिव श्रीमती व्ही. एस. शिंदे व अध्यक्ष व्ही. व्ही. माने यांच्या सहमतीने हा निकाल दिला आहे. फरास यांनी बावर्ची जातीचा दावा केला असून बावर्ची याचा अर्थ स्वयंपाकी, जेवण करणारा असा तर फरास याचा अर्थ बिछाईत घालणारा, दिवाबत्ती करणारा असा होता.

राजकीय दबावापोटी दाखला रद्द

यासंदर्भात नगरसेवक आदिल फरास म्हणाले,'बावर्ची जातीचा दाखला हा २००४ चा आहे. २०१० च्या निवडणुकीत दाखला वैधतेसाठी पाठविला होता. त्यावेळी समितीचे अध्यक्ष व्ही. व्ही. मानेच होते. त्यावेळी सुनावणी होऊन समितीने दाखला वैध ठरविला होता. जिल्ह्यातील मंत्र्यांच्या दबावापोटी माझा जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. ​समितीने जो निर्णय दिला आहे, त्याविरोधात वरिष्ठ कोर्टात दाद मागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा टोलवाटोलवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते विकास प्रकल्पाची रक्कम निश्चित करण्याबाबत मंत्रालयात झालेली सोमवारची बैठक अनिर्णित राहिली. प्रकल्पाच्या किमतीसंबंधीचा अहवाल गुरुवारपर्यंत देण्याच्या सूचना महापालिका, टोलविरोधी कृती समिती आणि आयडियल रोड बिल्डर्सला (आयआरबी) बांधकाम विभागाचे सहसचिव एस. बी. तामसेकर यांनी यावेळी दिल्या.

नोबेल कंपनीने प्रकल्पाची किंमत २३९ कोटी निश्चित केली आहे. १८२ कोटी रुपये प्रत्यक्ष कामावर खर्च झाल्याचे म्हटले आहे. २०११ च्या जिल्हा दर सूचीनुसार (डीएसआर) मूल्यांकन निश्चित केले होते. त्याला आयआरबीच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. डीएसआरऐवजी प्रकल्पाची किंमत निश्चित करण्यापेक्षा रस्ते विकास प्रकल्पात प्रत्येक रस्त्याचा खर्च धरला आहे. त्यानुसार प्रकल्पाची किंमत देण्याचा मुद्दा कंपनीने लावून धरला. टोलविरोधी कृती समितीचे पदाधिकारी व आमदार राजेश क्षीरसागर यांनी कंपनीची ही मागणी खोडून काढली.

फेरमूल्यांकन उपसमितीचे सदस्य राजेंद्र सावंत, आर्किटेक्ट असोसिएशनचे सदस्य प्रसाद मुजुमदार, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनीही संबंधित दरसूची ही चौरस मीटरवर आधारित आहे. त्यावर देय रक्कम काढावयाची झाल्यास त्या क्षेत्रफळात कमी जाडीचे थर, कामाचा दर्जा यावर आधारित रक्कम वजा होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी खराब झालेल्या, निकृष्ट व अर्धवट राहिलेल्या आणि कराराप्रमाणे न झालेल्या कामांचे मूल्यांकन वजा झाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी डीएसआरवरील धरलेले वाढीव दर व इतर बाबींची पडताळणी करून नोबेलच्या सर्वेक्षणानुसार आधारित अंतिम रक्कम काढली जाईल. ती रक्कम टोलविरोधी कृती समिती व महापालिकेच्या संमतीने समिती अध्यक्ष तामसेकर यांच्याकडे सादर करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

'त्या' रकमेचा सरकारशी संबंध नाही

करार करताना किंवा प्रकल्प मिळवताना आयआरबीने महापालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांना पैसे दिले असतील किंवा इतर खर्च केला असल्यास त्या रकमेशी सरकारचा संबंध नाही. अपूर्ण कामे, कामांचा निकृष्ट दर्जा, आतापर्यंतची टोल वसुलीची रक्कम या बाबी वजा कराव्यात. प्रकल्पाची योग्य रक्कम निश्चित करून दोन दिवसांत मंत्र्यांकडे अहवाल सादर करावा, अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदेशानुसार नागपंचमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्यात आज (बुधवार) नागपंचमी उत्सव होत आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही कोर्टाच्या आदेशाचे पालन करीत सर्वच नागमंडळांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे जाहीर केले आहे. ऐतिहासिक परंपरा असलेली नागपंचमी कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे जिवंत नागांच्या मिरवणुकांऐवजी प्रतीकात्मक नागाच्या मिरवणुका गेली सहा वर्षे निघत आहेत.

दरम्यान, पुढील वर्षांपासून केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कायद्यात दुरुस्ती करून पारंपारिक पद्धतीने शिराळकरांना नागपंचमी साजरी करण्यास परवानगी मिळण्याचे आश्वासन दिले आहे. या वर्षी मात्र कायद्याच्या नियमांचे पालन करूनच करूनच नागपंचमी साजरी करावी लागणार आहे.

उत्सवाला स्पर्धेचे स्वरुप

जीवंत नाग पकडून त्याची नागपंचमी दिवशी पूजा करण्याची परंपरा जोपासत असतानाच. स्पर्धेतून उत्सवाचे स्वरूपही बदलू लागले. नागांच्या स्पर्धा, मिरवणुकीत नाच्यांची हजेरी या गोष्टींमुळे उत्सवाला वेगळे स्वरूप येऊ लागले. दरम्यानच्या कालावधीत पर्यावरण प्रेमींनी उत्सवाचे चित्रिकरण करून कोर्टात याचिका दाखल केली. त्यामुळे नागांच्या खुल्या प्रदर्शनावर बंदी आली. मिरवणुकीत नाच्या नाचवण्यावरही बंदी आली. नागांच्या जाहीर प्रदर्शनावर बंदी असल्यामुळे शहरातील ६० च्यावर नागमंडळे सध्या प्रतीकात्माक नागांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढत आहेत. परंपरेनुसार महाजन यांच्या घरी जिवंत नागाची पूजा कोतवाला करवी करून मगच मिरवणुकीस प्रारंभ होतो. नागपंचमी न्यायालयीन प्रक्रियेत अडकली असली तरी, कायदा आणि परंपरेची सांगड घालून गेल्या पाच वर्षांपासून उत्सव साजरा केला जात आहे. नाग पंचमीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग दक्षता म्हणून सर्पदंशावरील लसींची उपलब्ध करते. पोलिस बंदोबस्तही तैनात असतो.

अशी आहे आख्यायिका

बत्तीस शिरळा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण नागपंचमी सणामुळे विशेषतः जीवंत नागांच्या पूजेमुळे प्रसिद्धीस आले. बाराव्या शतकात नागपंचमीच्या सणादिवशी नाथ संप्रदायातील गुरू गोरक्षनाथ जनजागृती करीत श्रावण शुद्ध पंचमी दिवशी भिक्षा मागण्यासाठी गावातील महाजन यांच्या घरी गेले, त्या घरातील गृहिणी मातीच्या प्रतीकात्मक नागाची पूजा करीत असल्यामुळे तिला भिक्षा वाढण्यासाठी वेळ झाला. भिक्षा वाढण्यास वेळ लागल्याचे कारण विचारल्या नंतर गोरक्षनाथांनी जीवंत नागाची पूजा करू शकाल का? असा प्रश्न केला. त्या गृहिणीने तत्काळ होकार दिला. त्यापासून जीवंत नागांच्या पूजेस शिराळ्यात सुरुवात झाली, अशी आख्यायिका आहे. त्यावेळी जवळपासच्या बत्तीस खेड्यातील लोक गोरक्षनाथांचे शिष्य बनले. त्यामुळे गावालाही बत्तीस शिराळा, असे नाव पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोमांस विक्रीप्रकरणी चंदगडमध्ये तिघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा चंदगड

चन्नेटी (ता. चंदगड) येथे गोमांस विक्री केल्या प्रकरणी मल्लीक दस्तगीर बेपारी (वय ५०), गौस इब्राहिम बेपारी (वय ५५, दोघेही रा. तळगुळी), व बसवाणी लगमा गणेशगोळ (रा. चन्नेटी, सर्व रा. ता. चंदगड) यांना चंदगड पोलिसांनी अटक केली आहे. तर टेम्पोंचालक बसवराज भेंडीगिरी (रा. राजगोळी खुर्द) हा पळून गेला.

आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली. संतोष अनंदराव साबळे पोलिस नाईक कोवाड यांनी याबाबतची फिर्याद चंदगड पोलिसात दिली. चन्नेटी गावापासून एक किलोमीटर अंतरावर बसवाणी लगमा गणेशगोळ यांच्या माळशेत नावाच्या शेतातील घरात मांस विक्री केली जात होती. मल्लीक बेपारी व गौस बेपारी हे दोघेजण बसवराज भेंडिगिरी यांच्या टेम्पोमधून हे मांस विक्रीसाठी घेऊन जात होते. यावेळी पोलिसांनी छापा टाकून वरील तिघांना वाहनासह रंगेहाथ पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटीलवाडीत शाळेला ठोकले टाळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

शाहूवाडी तालुक्यातील गावडीपैकी पाटीलवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेतील रतन अशोक तळेखेडकर या मद्यपी शिक्षकाची बदली व्हावी, या मागणीसाठी पालक व ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले.

तळेखेडकर हे शाळेत कायम मद्यपान करून असतात. मद्यपान करून टू व्हीलरवरून फिरत असतात. त्यांनी मद्यावस्थेत शाळेतील शौचालय व झाडांची नासधूस केली आहे. ते शाळेत कधीही वेळेवर येत नाहीत. अध्यापनाकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. अशा तक्रारी पालक व ग्रामस्थांनी मांडून त्यांची इथून बदली करण्याची मागणी अधिकारी व लोकप्रतिनिधीकडे केली होती परंतु याकडे कोणीही लक्ष न दिल्याने अखेर पालक व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. तळेखेडकर यांच्या वागणुकीबाबत ग्रामस्थ व पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

ही शाळा तालुक्याच्या दक्षिणेकडील शेवटच्या टोकाला व कोकणातील राजापूर तालुक्याच्या टोकाला लागून पूर्ण दुर्गम व डोंगराळ भागात आहे. या शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. अध्यापनासाठी केवळ चारच शिक्षक आहेत. त्यापैकी मुख्याध्यापक मिटिंगसह अन्य सरकारी कामात व्यस्त असतात. तळेखोडकर मद्यपान करत असल्याने ते शाळेत कधीच नसल्याने दोन शिक्षकावर आठ वर्गांचा भार पडतो पर्यायाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आपल्याविरुद्ध तक्रार केल्यास शाळेतच आपण बरेवाईट करून घेऊ, अशी धमकी तळेखोडकर सतत होत असल्याने ग्रामस्थही कंटाळले आहेत. जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत कुलूप काढणार नसल्याचा निर्णय पालक व ग्रामस्थांनी घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कबनूर ग्रामसभेत गोंधळ, दगडफेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवड आणि सह्या करण्यावरुन उडालेल्या गोंधळातच हजेरी बुकच फाडण्याचा प्रकार सोमवारी कबनूरच्या ग्रामसभेत घडला. तर गोंधळामुळे सभा तहकूब केल्याचे सांगत धूम ठोकणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान, संतप्त जमावाने ग्रामपंचायतीला लक्ष्य करीत जोरदार दगडफेक केल्याने खिडक्यांच्या काचा फुटल्या. या गोंधळामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेरीस ज्येष्ठ नेते सुधाकर मणेरे यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे ग्रामस्थ शांत झाले. तर सरपंच खालिदा फकीर यांनी २५ ऑगस्ट रोजी शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्याचे जाहीर केले.

१५ ऑगस्ट रोजी कबनूर गावची ग्रामसभा होणार होती. पण ती १७ ऑगस्ट रोजी बोलविण्यात आल्याने आधीच ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. त्यातच तंटामुक्ती समिती अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे आजची ग्रामसभा गाजणार अशी शक्यता वर्तविली जात होती. सोमवारी सकाळी येथील मामा लिगाडे सांस्कृतिक भवनात ग्रामसभा बोलविण्यात आली होती. ग्रामस्थही मोठ्या संख्येने जमले होते. हजेरी बुकावर सह्या करण्यासाठी मोठी रांगच लागली होती. दरम्यान, दोनशेच्या आसपास सह्या झाल्या असताना ग्रामविकास अधिकारी यांनी सभा सुरु करण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र त्याला ग्रामस्थांनी आक्षेप घेत सह्या पूर्ण झाल्याशिवाय सभा घ्यायची नाही असा पवित्रा घेतला. सह्या करण्यासाठी झुंबड उडाल्याने तेथूनच गोंधळाला सुरुवात झाली. त्यातच हजेरी बुकातील पाने फाडल्याने गोंधळात भरच पडली. तर गोंधळ वाढत चालल्याचे पाहून ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सभा तहकूब केल्याचे सांगत तेथून पलायन केले. तर संतप्त ग्रामस्थांना शांत करण्याऐवजी सभाध्यक्षा व सर्व सदस्यही तेथून निघून गेल्याने जमाव संतप्त झाला.

दगडफेकीमुळे नुकसान

जमावातील काहींनी ग्रामपंचायतीवर दगडफेक केल्याने खिडक्यांच्या काचा फुटल्या. ग्रामस्थांच्या प्रश्नांना ग्रामविकास अधिकाऱ्यास समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. अखेरीस सुधाकर मणेरे यांनी ग्रामपंचायतीत येऊन समजूत काढून जमावाला शांत केले. सरपंच फकिर यांनी येत्या २५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा जाहीर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव वीजबिले न भरण्याचा निर्धार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आपला तोटा भरुन काढण्यासाठी शेती आणि शेतकऱ्यांवर महावितरण वाढीव वीज बिलाचा बोजा टाकत आहेत. ज्या गावातील लोक टँकरने पाणी पितात त्याठिकाणीही विजेचे बील कमी होत नाही. आता झालेली ४४ पैशांची दरवाढ याचाच एक भाग आहे. ते पहाता वाढीव वीज बिले कुठल्याही परिस्थितीत भरायची नाहीत आणि वीज कनेक्शन तोडूनही द्यायचे नाही, असा निर्धार आज झालेल्या इरिगेशन फेडरेशनच्या मेळाव्यात जेष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी जाहीर केला. यासाठी गाववार कमिटी नेमा, एकजूट दाखवा, निर्णय कृतीत उतरण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा, असा आदेशही त्यांनी दिला.

पाटील म्हणाले, जोपर्यंत सरकारकडे विद्युत मंडळ होते. तोपर्यंत सरकारला वाढीव रक्कम देण्यास आपण आंदोलनाने भाग पाडले आहे. परंतु आता परिस्थिती बदलली असून तीन कंपन्यांकडे महावितरणचा कार्यभार आहे. तरीदेखील 'रेग्युलेटरी कमिशन'कडे म्हणणे मांडून वीज दरवाढ करण्याची अट असताना एकतर्फी अन्यायी दरवाढ केली आहे. महावितरणला एकीकडे वीज गळती, चोऱ्या थांबवता येत नाहीत. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांचे भत्ते, पगार वाढत जाणारे आहेत. त्याचा बोजा आपल्यावरच पडतो. कमी खर्चात देतो असे सांगत सरकार उलट जाहिराती छापून शेतकऱ्यांचीच बदनामी करते.

माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, एकीकडे निसर्गाचा कोप,दयनीय अवस्था आणि शेतमालाचे व उसाचे घसरलेले दर पहाता या वीजदरवाढीत शेतकरी टिकू शकणार नाही. माजी आमदार संपतराव पवार म्हणाले, तुम्ही आम्ही संघटित झाल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. याठिकाणी कुठलाही पक्ष,जात यापेक्षा शेतकरी या मुद्द्यावर एकत्र येवून ही लढाई लढावी लागेल. तर भगवान काटे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वीज दरवाढी विरोधात आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडहिंग्लजला स्वाईन फ्लू कक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

तमनाकवाडा (ता. कागल) येथे स्वाईन फ्ल्यू सदृश तापाचे चार रुग्ण आढळ्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. सोमवारी दुपारी जिल्ह्यापरिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाच्या सभापती सौ. सीमा पाटील व जिल्हा परिषद सदस्य परशराम तावरे यांनी येथे भेट दिली. धोका लक्षात घेवून व खबरदारी म्हणून आणि कोल्हापूर येथील रुग्णालयाचे येथून असलेले अंतर विचारात घेवून परिसरातील रुग्णांमयासाठी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्ल्यू रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग सुरु करण्याचे आदेश दिले.

या आजाराचे एकाच कुटुंबातील चार रुग्ण असल्याने त्यांच्या सोईसाठी सर्वांनाच सीपीआरमध्ये हलविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी अजित गवळी यांनी गडहिंग्लज येथे असलेल्या मधुकर तिप्पे व धनश्री तिप्पे यांना कोल्हापूर येथे हलविण्यासाठी यंत्रणा सुरु केली. दरम्यान, दुपारी कापशी आरोग्य केंद्राचे डॉ. बी. पी. सातपुते यांच्यासह दहा कर्मचाऱ्यांचे पथक बोलवून गावातील रुग्णांची तपासणी सुरु केली. तिप्पे यांच्या कुटुंबियांच्या घरी गेलेल्या व संशयित रुग्णांवर टॅमी फ्ल्यूचे उपचार सुरु करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनवडेत केवळ बैठकच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे गाव तसे दुर्गम. याचसाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दत्तक घेतले. गाव परिपूर्ण करण्यासाठी त्यांनी आराखडा तयार केला खरा मात्र, अजून राऊत यांचे पाय काही या गावाला लागले नाही. तालमीसाठी दिलेला दहा लाख रूपयांचा निधी वगळता अन्य कोणत्याही कामासाठी निधी आलेला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बैठका वगळता संसद ग्राम योजनेचा फारसा फायदा या गावाला झालेला नाही. शाहूवाडी तालुक्याच्या पूर्वेकडील या गावाचे व मुंबई विद्यापीठाचे लाइफ मेंबर प्राचार्य दिलीप पाटील यांच्या माध्यमातून खासदार राऊत यांनी हे गाव दत्तक म्हणून घेतले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर राऊत यांनी सोनवडे हे मुंबईपासून दूर असलेले गाव दत्तक घेतले. या गावात सोयी सुविधांचा अभाव असल्याने सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

गाव दत्तक घेतल्यापासून खासदार राऊत यांनी गावाला वर्षभरात एकही भेट दिलेली नाही. गावात अधिकाऱ्यांच्या सुमारे पंचवीस ते तीस बैठका झाल्या आहेत. खासदार राऊत यांचे स्वीय सहायक मात्र गावात दोन वेळा आले होते. त्यनंतर गावाला जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईओ घुले यांनी गावाला सातत्याने भेटी देऊन नियोजन केले आहे.

ग्रामपातळीवर पाणी, गल्लोगल्लीचे अंतर्गत रस्ते, गटर्स, सांडपाणी व्यवस्थापन, विजेचे खांब, सार्वजनिक व वैयक्तिक शौचालये, प्राथमिक शाळेची नवीन इमारत, ग्रंथालय हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सुमारे नऊ कोटी २७ लाख रुपयांच्या विकासकामांचा आराखडा तयार केला आहे. त्यास मंजुरीही मिळाली आहे. सध्या जलयुक्त शिवार योजनेतील मंजूर सात कामे सुरु आहेत. किरकोळ छोटी कामे वगळता मुलभूत प्रश्नासंदर्भातली मोठी कामे गतीने न झाल्यामुळे गेल्या वर्षभरापूर्वीची स्थिती होती ती वर्षभरानंतर तशीच आहे. गाव दत्तक घेण्यापूर्वी मात्र खासदार राऊत यांनी गावच्या तालमीसाठी दहा लाख रुपये दिले आहेत. सध्या त्याचे काम सुरु आहे.

गेल्या वर्षभरात गावपातळीवर गतीने कामे झालेली नाहीत. ९ कोटी २७ लाख रुपयांच्या विकास आराखड्यात संपूर्ण गावासाठी एक कोटी दहा लाख रुपयांची पाणीयोजना, २० लाखांची बहुउद्देशीय इमारत, रेस्ट हाउस, प्राथमिक शाळेची नवीन इमारत, सांडपाणी व्यवस्थापन आदी कामे निश्चित केली आहेत. सध्या जलयुक्त शिवार योजनेतील मंजूर सात कामे सुरु आहेत.

वैभवशाली गाव बनवायचे असेल तर प्रत्येक घटकाचे योगदान हवे. प्रत्येक खातेप्रमुखाने याकामी पुरेसा वेळ देण्याची गरज आहे. प्रत्येक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कामात झोकून देण्याची आवश्यकता आहे. आराखड्यातील कामांना अग्रक्रमाने प्राधान्य द्यावे.

- संगीता पाटील, सरपंच सोनवडे

खासदार राऊत यांनी घेतलेल्या दत्तक ग्रामच्या माध्यमातून गावाचे रुप बदललेलं पहावयास मिळेल परंतु यासाठी यंत्रणा सक्षम बनावयास हवी. विकासकामे गतीने राबविण्यासाठी विविध खात्यांच्या प्रमुखांनी विशेष लक्ष पुरविण्याची नितांत गरज आहे.

- अनिल पाटील, ग्रा. पं.सदस्य, सोनवडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोदे येथे शेतमजुराचा खून

$
0
0

कोल्हापूर : कोदे (ता. करवीर) येथील शेतातील झोपडीत घुसून दोन अज्ञात व्यक्तींनी वसंत कृष्णा निकम (वय ४५) या अदिवासी शेतमजुराचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. माजी सरपंच सहदेव कृष्णा कांबळे (वय ४५, रा. कोदे) यांनी फिर्याद दिली आहे. माजी सरपंच कांबळे यांचे कोदे येथील उगवाच्या मळी येथे पाच एकर ऊसाची शेती आहे. निकम हे शेताची राखण करत होते. शेतात गेली पाच वर्षे वसंत निकम, त्याची पत्नी व मुले राहतात. सोमवारी रात्री साडेतीनच्यासुमारास तोंडाला काळे फडके बांधून दोन व्यक्ती झोपडीत घुसल्या. त्यांनी वसंत निकम यांचा धारदार शस्त्राने गळा कापला. निकम यांच्या पत्नीने कांबळेंना माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅडमिंटन कोर्टसाठी खेळाडूंची धावाधाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कपिलतीर्थ मार्केट येथील संपूर्ण बॅडमिंटन कोर्ट महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टला देण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे समजताच, कोर्टवर सराव करणाऱ्या खेळाडूंसह पालकांनी कोर्ट वाचवण्यासाठी मंगळवारी धावाधाव केली.

सासने ग्राऊंड येथील समारंभात त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली. विशेष म्हणजे एकीकडे पालकमंत्री व्यायामशाळेचे उद्‍घाटन करत असताना, दुसऱ्या क्रीडा प्रकारातील मैदान वाचवण्यासाठी चाललेली खेळाडूंची धडपड आज चर्चेची ठरली. महापालिकेचा एकमेव वुडन कोर्टवर सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात सुमारे १५० खेळाडू सराव करतात. ट्रस्टच्या मागणीचा ठराव गुरुवारी सर्वसाधारण सभेपुढे आणला जाणार आहे.

अन्नछत्राला मिळालेल्या जागेची नियमित भाडे दिले जात आहे. मात्र भाविकांची संख्या वाढत असल्याने जागा अपुरी पडत आहे. महापालिकेने खेळाडू आणि ट्रस्टचे हित जपण्यासाठी सुवर्णमध्य काढून निर्णय घ्यावा.

- राजू मेवेकरी, अध्यक्ष, महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा हजार सापांना जीवदान

$
0
0

दिग्विजय कुंभार, शाहूवाडी

साप हा शत्रू नसून तो शेतकऱ्याचा मित्र आहे. तो कधीही डूख धरत नाही. भीतीपोटी आपण त्याला मारणे चुकीचे आहे ही‌ माहिती वारंवार कानावर पडत असल्याने ती काहीशी दुर्लक्षित केली जाते. मात्र, तरीही ही जनजागृती नेटाने करण्याचे काम आंबा इथल्या मोहन रामचंद्र घाटगे याने करून गेल्या दहा वर्षात सहा हजाराहून अधिक सापांना जीवदान दिले आहे. तसेच आंबा मार्गावर होणारे रोडकिल रोखण्यासाठी घाटगे यांनी जागृती सुरू केली आहे.

घाटगे हे सर्पमित्र म्हणून ओळखले जात असतानाच ते निसर्गप्रेमीही आहेत. त्यांचे मूळ गाव शिंगणापूर असले तरी मोनेरा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांची कर्मभूमी आंबा राहिली आहे. गेल्या दहा वर्षापासून बॉक्साईटच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत त्यांनी निसर्गप्रेम जोपासले आहे. साप बचाव मोहिमेच्या माध्यमातून त्यांनी आंबा, मलकापूर, कोल्हापूर, शिंगणापूर या परिसरातील खापरखवल्या सापांपासून अतिविषारी असलेल्या नाग, घोणस, मन्यार यासारख्या विषारी-बिनविषारी सापांना पकडून त्यांनी दूरवर जंगलात सोडून जीवदान दिले आहेत. घरात, दुकानात किंवा आजूबाजूला साप आला आहे अशी हाक देताच ते मदतीला धावतात. एका महिन्यात ते ७० ते ७५ सापांना जीवदान देत असतात. निसर्गाचे संवर्धन करण्यातही त्यांचा मोठा वाट राहिला आहे.

घाटगे यांनी सलग सात वर्षे जंगलात फिरून रानगव्यांचे निरीक्षण केले आहे. महिन्यातून दोन ते तीन वेळा जंगलात फिरून त्यांनी वेगवेगळ्या सापांचे निरीक्षण व अभ्यास केला आहे. जंगलातला सापांचा अभ्यास करताना मोर किंवा तापमानात वाढ झाल्याने प्रावण कोरकवड्या नावाचा साप या वर्षात आढळला नसल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. सापांविषयीच्या गैरसमजुती, विषारी- बिनविषारी साप, विषाचे उपयोग याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना व्याख्याने दिली आहेत. निसर्गात बिनविषारी सापांची संख्या जास्त असल्यामुळे निव्वळ विषारी सापांच्या नावाखाली लोक सापांना मारतात हा गैरसमज काढण्याचे काम त्यांनी प्रबोधनातून केले आहे. आंबा-विशाळगड मार्गावरून रात्रीच्या वेळी होणाऱ्या वाहतुकीमुळे अनेक साप मृत्युमुखी पडत असल्यामुळे त्यांनी याबाबत वाहनधारक व पर्यटकामधूनही जागृती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेहबूबची ‘मुहब्बत’ सर्प

$
0
0

दीपक मांगले, गडहिंग्लज

साप दिसला की हातात काठी घेऊन मारायला अनेकांचे हात शिवशिवतात. अशा वेळी गडहिंग्लज तालुक्यातील निलजीचा मेहबूब सनदी सरसावतो आणि कितीही मोठा नाग असो अथवा बिन‌विशारी साप असो, त्याला जीवदान देतो. मेहबूब गडहिंग्लजमध्ये मेस्त्री असल्याने कुठल्याही गावात साप दिसला की मेहबूब मेस्त्रीचा मोबाइल खणखणतो. मेहबूबची ही सेवा अखंड सुरूच आहे. शिवाय त्याने सर्पमित्रांची एक टीमच तयार केली आहे.

व्यवसायाने मोटरसायकल मेकॅनिक असलेले मेहबूब सनदी संपूर्ण तालुक्यात निसर्ग व सर्पमित्र म्हणून अधिक लोकप्रिय आहेत. गेली अनेक वर्ष व्रत समजून सर्पसंवर्धनासाठी सनदी काम करीत असून याकामी त्यांच्या मदतीसाठी संपूर्ण कुटुंब सरसावले आहे. त्यांची कन्या सलमा अगदी चार वर्षाची असल्यापासून साप हाताळण्यात माहीर आहे. छायाचित्र प्रदर्शन, व्याख्यान या माध्यमातून सनदी सर्पाविषयी जनसामान्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.

एखाद्याच्या घरात साप आल्याची माहिती मिळताच हातातील सगळी कामे टाकून सनदी त्याठिकाणी धाव घेतात. सापाला विना दुखापत दूर जंगलात सुखरूप सोडून येतात. यासाठी ते कोणत्याही मानधनाची अपेक्षा करीत नाहीत. प्राण्यांविषयी असलेली आत्मीयता यामुळे सनदी अखंडितपणे हे काम करीत असून आज अखेर त्यांनी सुमारे पाच हजार साप पकडले आहेत. तसेच अनेक जखमी सापांवर यशस्वी उपचार करून त्यांना त्याच्या घरी म्हणजेच जंगलात सुखरूप सोडून दिले आहे.

अनेकदा एखाद्या सापाला अथवा जखमी प्राण्याला पकडण्यासाठी वनविभागामार्फत सनदी यांनाच बोलावले जाते. त्यावेळीही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता ते जातात. सापाला पकडून वनविभागाच्या स्वाधीन करतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून निसर्ग समतोलासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सनदी यांच्यावर मात्र वनविभागाच्या अंतर्गत गटबाजीमुळे कारवाईचा बडगा उगारला गेला. मात्र तरीही सापांविषयी असलेली सदभावना त्यांना स्वस्थ बसू देत नाही. काहीही झाले तरी 'साप वाचला पाहिजे' या भावनेतून त्यांनी आपला 'वसा' अखंड सुरु ठेवला आहे. नुसताच साप नव्हे संपूर्ण प्राणीजातीवर त्यांची विलक्षण प्रेम असून काही महिन्यांपूर्वी हिटणी येथील सुमारे पस्तीस वानरांनासुद्धा त्यांनी वनविभागाच्या विनंतीवरून पकडून सुखरूप जंगलात सोडले आहे.

साप हा शत्रू नसून मित्र आहे.

सापांविषयी लोकांमध्ये अनेक गैरसमज असून सर्वप्रथम ते दूर करण्याचा प्रयत्न झाले पाहिजेत. तसेच साप विषारी असो अथवा बिनविषारी त्याला मारू नका.

- मेहबूब सनदी, सर्पमित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांकडून भाविकाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मंत्र्याबद्दल गैरउद्गार काढल्याबद्दल आमदार व त्यांच्या समर्थकांनी मधुकर हनुमंत नलवडे (रा. फलटण) यांनी बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या नलवडे यांच्यावर पोलिसांनी कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री कोल्हापुरात आले होते. ते सपत्नीक अंबाबाईच्या दर्शनासाठी स्थानिक आमदार, त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांसमवेत मंदिरात आत जात असताना दर्शन रांगेत असलेल्या मधुकर नलवडे यांनी आक्षेप घेतला. भाविक ताटकळत आहेत आणि हे मंत्री जात आहे अशी ओरडून तक्रार केल्यावर आमदार चिडले. त्यांनी दर्शन रांगत जाऊन नलवडे याला मारहाण केली. त्यानंतर आमदारांच्या समर्थकांनी नलवडे यांना दर्शन रांगेतून बाहेर ओढून बेदम मारहाण केली.

दरम्यान, पोलिसांनी नलवडे यांना ताब्यात घेऊन सार्वजनिक ठिकाणी दंगा केल्याबद्दल प्रतिबंधात्मक कारवाई केली. नलवडे यांच्याशी संपर्क साधला असता देवीच्या दर्शनासाठी आलो असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्याला मारहाण करणे अपेक्षित नव्हते, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>