Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

डॉ. सुषमा कुलकर्णीं यांना डंकन फ्रेजर पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी यांना डंकन फ्रेझर या पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंजिनीअरिंग एज्युकेशन सोसायटी यांच्या 'वर्ल्ड इंजिनीअरिंग एज्युकेशन फोरम २०१९'अंतर्गत चेन्नई येथे हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात हा पुरस्कार अत्यंत मानाचा समजला जातो.

या पुरस्कारासाठी जगभरातील ४० अभियांत्रिकी शिक्षणतज्ज्ञांत स्पर्धा होती. त्यामधून १२ जणांची निवड झाली. अभियांत्रिकी शिक्षणात ज्यांनी नाविन्य व गुणवत्तापूर्वक योगदान दिले आहे अशा व्यक्तींचा या पुरस्कारांसाठी विचार होतो. डॉ. कुलकर्णी यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी व डॉक्टरेट मिळवली आहे. ३२ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रामध्ये आतापर्यंत मोठे योगदान दिले आहे. त्यांनी आतापर्यंत चीन, ऑस्ट्रेलिया, नायगारा फॉल्स, दुबई, सिंगापूर, मलेशिया अशा अनेक देशांमध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्याची दखल विविध संस्थांनी घेतली आहे.

'रायझिंग टू द टॉप ग्लोबल वूमन इंजिनीअरिंग लीडर्स' या पुस्तकात त्यांना स्थान मिळाले आहे. या पुस्तकात जगभरातील ३२ महिला संस्थाप्रमुखांचा समावेश आहे. दरम्यान पुरस्कार स्वीकारताना कुलकर्णी यांनी पालकांचे, पतीचे व आयएफइइएसचे अध्यक्ष रामीरो जॉर्डन, सचिव हान्स हॉयर यांचे आभार मानले. तसेच राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे चेअरमन भगतिसंह पाटील, कार्यकारिणी सदस्य व मंत्री जयंत पाटील, आर. डी. सावंत यांचे मार्गदर्शन लाभल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ह्येच्या आईचा वग’ प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचलनालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या ५९ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून फिनिक्स क्रिएशन्सच्या 'ह्येच्या आईचा वग' या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवला. इचलकरंजीच्या रंगयात्रा संस्थेच्या 'हूज अफ्रेड ऑफ द व्हर्जिनिया वूल्फ' या नाटकाने द्वितीय क्रमांक पटकावला. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. रुद्रांश अॅकॅडमीच्या 'मोठ्यांचा शेक्सपिअर' या नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला. सोमवारी राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

१५ नोव्हेंबरपासून संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात राज्य नाट्यस्पर्धा सुरू होती. १३ डिसेंबरपर्यंत सुरू राहिलेल्या या स्पर्धेत एकूण २८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते. यंदा कोल्हापूरसह इचलकरंजी, जयसिंगपूर, कोकण, बेळगाव येथील शहरी नाट्यसंस्थांसह ग्रामीण भागातील नाट्यसंस्थांचा सहभाग हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य होते. प्रा. मधू जाधव, मुकुंद हिंगणे, गौरी लोंढे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

दिग्दर्शन, नेपथ्यातही फिनिक्स व रंगयात्राने बाजी मारली. तर रंभभूषासाठी उत्कृष्ट नाटक शिवाजी विद्यापीठाचे 'तुघलक' व निष्पाप कलानिकेतनचे 'युद्ध नको मज बुद्ध हवा' हे ठरले. प्रकाश योजनेसाठी 'मोठ्यांचा शेक्सपियर' या नाटकाने बक्षीस घेतले.

स्पर्धेचा अनुक्रमे निकाल असा

दिग्दर्शन

संजय मोहिते (ह्येच्या आईचा वग)

अनिरुध्द दांडेकर (हूज अफ्रेड ऑफ द व्हर्जिनिया वूल्फ)

प्रकाश योजना

विनायक रानभरे (हूज अफ्रेड ऑफ द व्हर्जिनिया वूल्फ)

तेजस कोळी (मोठ्यांचा शेक्‍सपियर)

नेपथ्य

अमोल नाईक (ह्येच्या आईचा वग)

प्रवीण लायकर (हूज अफ्रेड ऑफ द व्हर्जिनिया वूल्फ)

रंगभूषा

ओंकार पाटील (तुघलक, शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग)

सुनीता वर्मा (युद्ध नको मज बुद्ध हवा, निष्पाप कलानिकेतन, इचलकरंजी)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदके

सचिन वाडकर (ह्येच्या आईचा वग)

कादंबरी माळी (हूज अफ्रेड ऑफ द व्हर्जिनिया वूल्फ)

अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रे

तेजस्विनी सोनसाळे (वृंदावन, वरेरकर नाट्यसंस्था, बेळगाव), प्रतीक्षा गवस (पुरूष, सुगुण नाट्य संस्था, कोल्हापूर), वैदेही सावंत (नटरंग, वसुंधरा संस्था, कोल्हापूर), पूर्वा कोडोलीकर (ऐश्‍वर्या ब्युटी पार्लर, भारतवीर मंडळ, कोल्हापूर), उज्वला खांडेकर-शहा (ऊन-पाऊस, गानकोकिळा कान्होपात्रा किणीकर स्मृती संस्था, कोल्हापूर), परसु गावडे (विच्छा माझी पुरी करा, साई नाट्यधारा मंडळ, हलकर्णी), युवराज केळुस्कर (तुघलक), निहाल रूकडीकर (मोठ्यांचा शेक्‍सपियर), रोहित पोतनीस (अंदाधुंद, परिवर्तन फाऊंडेशन, कोल्हापूर), सतीश तांदळे (देव हरवला, देवल क्‍लब, कोल्हापूर).

लोकनाट्याने एक काळ रंगभूमीवर सुवर्णकाळ गाजवला आहे. या नाट्यप्रकाराच्या सादरीकरणासाठी लागणारी ऊर्जा आणि त्याची मांडणी राज्यनाट्यच्या मंचावर सादर करण्याच्या निर्णयाचे व त्यासाठी प्रत्येकाने घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले. राज्य नाट्यच्या अंतिम फेरीसाठी निवड झाल्याने नवी प्रेरणा मिळाली आहे.

संजय मोहिते, दिग्दर्शक, ह्येच्या आईचा वग

इंग्रजी नाटकाचे मराठी रुपांतरण असल्याने हे नाटक सादर करताना वेगळे दडपण होते. क्लिष्ट विषय, इंग्रजी जीवनशैलीची पार्श्वभूमी यामुळे नाटकाचा विषय रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान होते. मात्र हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद रंगभूमीच्या ध्यासानेच दिली. अंतिम फेरीसाठी निवड झाल्याचा आनंद आहे. अंतिम फेरीसाठी जोमाने तयारी करणार आहोत.

अनिरुद्ध दांडेकर, दिग्दर्शक, हूज अफ्रेड ऑफ द व्हर्जिनिया वूल्फ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृसिंहवाडी येथे नदीत बुडून बालिकेचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीपात्रात बुडाल्याने बालिकेचा मृत्यू झाला. जयश्री पापा पोवार (वय ६) असे तिचे नाव आहे. दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, दुपारी जयश्री तसेच तिच्या नातेवाईक असलेल्या अन्य चार मुली श्री दत्त मंदिराच्या दक्षिण घाटावर आंघोळीसाठी आल्या होत्या. दोन मुली कृष्णा नदीपात्रात पोहत होत्या. यावेळी जयश्री पाण्यात खेळत होती. पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली. तिच्यासोबत असलेल्या मुलींनी जयश्रीला काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी ठरला. यावेळी मुलींनी आरडाओरड केली. शिवा सोनार यांनी पाण्यात बुडलेल्या जयश्रीला बाहेर काढले. यानंतर तिला शिरोळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

जयश्रीचे आई वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवितात. एकुलत्या जयश्रीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनी आक्रोश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावकारांचे जाबजबाब सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन दिवसाच्या सुट्टीनंतर सहकार विभागाने छापे टाकलेल्या सावकारांचे जाबजबाब घेतले जात असून कारवाई संथ सुरू असल्याचे चित्र पुढे येत आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फौजदारी कारवाईचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले असले तरी कारवाईची तारीख जाहीर न केल्याने कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या विभागाने १२ सावकारांच्या घरावर छापे टाकले आहेत.

गुरुवारी (ता. १२) सहकार विभागाने पोलिस बंदोबस्तात नारायण गणपतराव जाधव, त्याचा मुलगा तुळशीदास,नातू अभिजीत, किशोर सुर्वे आणि त्याचा मुलगा रुपेश, राहुल अवधूत, आनंदा चिबडे, बबलू घुंगरे पाटील, दगडू शेणवी, संजीवकुमार सूर्यवंशी, अरविंद एकल, विजय पाटील, तानाजी पाटील, अमित चव्हाण, मारुती जाधव या सावकारांच्या घरावर छापे टाकले. नारायण जाधव याच्या घरी रोख २७ लाख रुपये आणि सोन्याचांदीचे दागिने मिळाले. रोख रक्कमेबाबत सहकार विभागाने प्राप्तीकर खात्याला कळवले आहे. पण सोमवारीही प्राप्तीकर खात्याकडून रक्कमेबाबत सहकार खात्याला निर्णय दिला नसल्याने गूढ वाढू लागले आहे.

यापूर्वी टेंबे रोडवरील रुपेश सुर्वे, राहुल अवधूत, संजीवकुमार सूर्यवंशी, कृष्णात पाटील, अरविंद एकल, तानाजी पाटील यांचे जबाब घेण्यात आले आहेत. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस सुट्टी असल्याने कारवाई थंडावली होती. सोमवारी तुळशीदास जाधव, अभिजीत जाधव यांचे पाच तास जबाब घेण्यात आले. संशयित चिबडे याच्या घरी कोरे जुने स्टँप सापडले असून त्याचाही अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सावकारांवरील कारवाई संथ सुरू असल्याने कारवाईकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ बंदिस्त पार्किंगचा शोध

$
0
0

फाइल फोटो

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

महापालिकेच्या नगररचना विभागाच्यावतीने (टीपी) शहरातील अनेक व्यावसायिक व अन्य मिळकतदारांनी केलेल्या बंदिस्त पार्किंगचा शोध घेतला आहे. अत्यंत रहदारीच्या रस्त्यावरील २५ मिळकतदारांनी पार्किंगच्या जागा अन्य व्यवसायांसाठी वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना पार्किंग खुले करण्यासाठी नोटिसा पाठवल्या असून त्याबाबतचा अहवाल महासभेपूर्वी प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे. शहर वाहतूक शाखेने ८२ बंदिस्त पार्किंग असल्याची यादी दिली असताना प्रत्यक्षात २५ जणांची यादी प्राप्त झाल्याने तपासणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

अरुंद रस्ते, व्यावसायिक मिळकतदारांनी बंदिस्त केलेले पार्किंग, अनेकांनी पार्किंगसाठी न सोडलेली जागा, वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे शहरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. महापालिकेचे नसलेले वाहनतळही वाहतूक कोंडीमध्ये अधिक भर घालत आहेत. या समस्येमुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावे लागते. मात्र यावर उपाययोजना करण्यास महापालिका आणि शहर वाहतूक शाखेला अद्याप यश आलेले नाही. दोन्ही सरकारी विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने वाहतूक समस्या दिवसेंदिवस अधिकच जटील बनत आहे. मात्र या समस्येतून शहरवासियांची सुटका करण्यासाठी दोन्ही विभाग हातात हात घालून काम करण्यास तयार झाले आहेत.

शहर वाहतूक शाखेने महापालिकेकडे शहरातील ८२ व्यावसायिक मिळकतदारांनी पार्किंग बंदिस्त केल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यानंतर तीन डिसेंबर रोजी झालेल्या शहर वाहतूक आराखड्यांबाबत बोलवलेल्या विशेष सभेत महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी बंदिस्त पार्किंगचा तपासणी करुन १९ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार टीपीच्या अधिकाऱ्यांनी शहरातील अनेक व्यावसायिक इमारतींचा सर्व्हे केला. त्यामध्ये २५ मिळकतदारांनी पार्किंग बंदिस्त केल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व मिळकतदारांनी पार्किंग जागेचा वापर अन्य व्यवसायासाठी केला आहे. अशा सर्व मिळकतदारांना टीपीच्यावतीने नोटिसा पाठवून पार्किंग खुले करण्याची सूचना केली आहे. त्याबाबतचा अहवाल महासभेपूर्वी सादर करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर अनेक व्यावसायिक मिळकतदारांनी पार्किंगसाठी जागा सोडलेल्या आहेत. पण त्याचा वापर मात्र वाहनधारक किंवा स्वत: मालकही करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. एकीकडे पार्किंग नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत असताना कोंडी टाळण्यासाठी वाहनधारकांनीही रस्त्यावर वाहने लावण्याची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. अन्यथा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना कागदावरच राहण्याची शक्यता आहे.

......

चौकट

वाहतूक कोंडीची समस्या

शहर वाहतूक शाखेने ८२ ठिकाणी बंदिस्त पार्किंग केल्याचा अहवाल महापालिका प्रशासनाला सादर केला होता. वाहनधारकांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने रस्त्यावर लावलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने त्या सर्व खुल्या करण्याची मागणी केली होती. त्यानुसार अशा जागांचा शोध घेण्यात आला. ८२ पैकी ५० टक्के जागा जुन्या इमारतीमध्ये असल्याचे स्पष्टीकरण महापालिका अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. त्यामुळे पूर्वी नियमानुसार पण सद्य:स्थितीत या इमारतींमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या कशी निर्गत करणार असा प्रश्न शहर वाहतूक व महापालिकेसमोर उभा राहण्याची शक्यता आहे.

....

पॉइंटर

हॉस्पिटलमध्ये कँटिन

कपड्याच्या शोरुममध्ये सायकल दुकान

लिफ्टसाठी पार्किंगचा वापर

बँकेच्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहिरीसह घुमले सावरकरांचे कार्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नमन वीरतेला..., नमन शूरतेला..., नमन मृत्युंजयवीराला..., अशा खणखणीत आवाजात पोवाडे सादर करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट सोमवारी राम गणेश गडकरी सभागृहात उलगडला. वि. दा. सावरकर यांचे बंधू नारायणराव यांच्या नात विनता जोशी यांनी सावरकर यांचे व्यक्तिमत्व पोवाड्याच्या माध्यमातून रसिकांसमोर उभे केले. त्यांचे शस्त्रसज्जताबाबतचे विचार, अंदमानातील त्यांचे आयुष्य, त्यांची पत्रलेखनाची आवड, त्यांची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी अशा अनेक प्रसंगांना जोशी यांनी पोवाड्यात गुंफले. स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

शाहीर विनता जोशी यांनी सावरकरांचे अद्भुत जीवनकार्य पोवाड्यातून उभे केले. वाहुनी आयुष्य मातृभूमीला...शीर कमल सुमना, पराक्रमाचे अजरामर हे, जाहले समरांगणा या ओळी सैनिकांसाठी अर्पण केल्या. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित असून त्यांच्याविषयीची कृतज्ञता कधीच ढळू नये, असे सांगत त्यांनी सावरकर यांचे देशभक्तीपर विचार पोवाड्यातून मांडले. सावरकर यांनी त्यांच्या येसूवहिनीला पाठवलेले पत्र त्यांनी क्रांतीकार्याचे घेतलेले व्रत, 'जयदेव, जयदेव, जय श्री शिवराया' ही सावरकरांनी शिवाजी महाराजांची केलेली आरती, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे क्रांतिकार्य व त्यातील सावरकरांचे योगदान, गोविंदस्वामी आफळे यांनी रचलेला 'वीर सावरकरांवरील पोवाडा', अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठीचे सावरकरांचे प्रयत्न व 'मला देवाचे दर्शन घेऊ द्या की र' ही गीतबद्ध झालेली अस्पृश्यांची भावना, १८५७ च्या स्वातंत्र्य समराचा इतिहास, या सर्व विषयांना पोवाड्यांच्या कडव्यांतून जोशी यांनी सादर केले. त्यांना शोभा ठाकूर, हेमलता रेणके व दीपा पुरोहित यांनी पोवाडे गायनात सहभाग दिला. संदेश खेडेकर यांनी तबला साथ केली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष नितीन वाडीकर यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध केला. मंडळाच्या कार्यवाह शालन शेटे यांनी संस्थेचा परिचय दिला. यावेळी प्रभाकर हेरवाडे, एस. के. कुलकर्णी, शाहीर राजू राऊत, आझाद नायकवडी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ निवडणूक प्रक्रिया सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदार नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली. दुग्ध सहनिबंधक कार्यालयाकडून ३६५९ दूध संस्थांना ठरावाचा नमुना स्पीडपोस्टद्वारे पाठवण्यात आला. चार दिवसांत ठराव नमुन्याची पत्रे दूध संस्थांना पोहोच होणार असून ठरावासाठी लगबग सुरू होणार आहे.

'गोकुळ'ची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणार आहे. निवडणुकीसाठी प्रारुप यादी तयार करण्याच्या कामाला सोमवारी सुरुवात झाली. संघाचे ३६५९ क्रियाशील सदस्य असून त्यांना मतदानाचा हक्क मिळणार आहे. दूध संस्थांनी क्रियाशील सदस्यांच्या नावे ठराव पाठवायचा असून ठरावाचा नमुना सहनिबंधक कार्यालयाकडून स्पीड पोस्टने पाठवण्यात आला .

स्पीड पोस्टने नमुना पोचल्यावर संचालक मंडळाने बैठक घेऊन ठरावदारांचे नाव निश्चित करायचे आहे. ठरावावर दूध संस्थेचा अध्यक्ष आणि सचिवांची सही आवश्यक आहे. २३ डिसेंबर ते २२ जानेवारी या एक महिन्याच्या कालावधीत दूध संस्थांनी ठराव सहनिबंधक कार्यालयाकडे देण्यास मुदत दिली आहे. ठराव प्राप्त झाल्यानंतर इंग्रजी वर्णाक्षरानुसार प्रारुप मतदार यादी तयार केली जाणार आहे. त्यावर हरकती घेण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली जाणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्राधिकरणाकडून निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केंद्र सरकारने दडपशाही करु नये’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नागरीत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाबाबत केंद्र सरकारने दडपशाही करू नये, अशी मागणी विविध युवक संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना एका निवेदनाद्वारे केली.

निवेदनात असे म्हटले आहे की, भारताचे संविधान सर्वोच्च आहे. या संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. देशात बहुमताच्या जोरावर भाजप सरकारने नागरिकत्व कायदा मंजूर करून घेतला. या कायद्याच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी आंदोलने चालू आहेत. ही आंदोलने दडपण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. नवी दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पण पोलिस बळाचा वापर करीत विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला झाला. पोलिसांच्या कृतीचा आम्ही निषेध करतो आहेत. मंत्र्यांच्या आदेशाने आंदोलने दडपण्याचा प्रयत्न होत आहे. आसामसह ईशान्य भारतातील वातावरण दंगलग्रस्त बनले आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शिष्टमंडळात नगरसेवक तौफिक मुल्लाणी, नियाज खान, माजी नगरसेवक आदिल फरास, दीपक थोरात, रोहीत पाटील, मुस्ताक मलबारी, सनी नरके, महेंद्र चव्हाण यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पूररेषेतील बांधकामांवरील स्थगिती उठवा

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जलसंपदा विभागाकडून पूररेषा निश्चित होत नाही, तोपर्यंत बांधकामांना महापालिकेने स्थगिती दिली होती. गेल्या आठवड्यात पूररेषा निश्चित झाली असून बांधकामावरील स्थगिती उठवा,' अशी मागणी करत क्रिडाईच्या शिष्टमंडळाने महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या समोर समस्या मांडल्या. त्यानंतर महापौरांनी ब्लू लाइन स्केलवर सोमवारपर्यंत (ता.२३) पूररेषा अंतिम करण्याचे आदेश दिले.

बांधकामांना दिलेल्या स्थगितीमुळे बांधकाम व्यावसायिकांसमोर निर्माण झालेल्या समस्यांची माहिती देण्यासाठी सोमवारी क्रिडाईच्या शिष्टमंडळाने महापालिका पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. छत्रपती ताराराणी सभागृहात झालेल्या बैठकीदरम्यान आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी बांधकाम प्रकल्पाबाबत उलटतपासणी घेतली. क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर म्हणाले, 'पूररेषा निश्चित झाल्याशिवाय या क्षेत्रातील बांधकामांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे जाहीर केले होते. जलसंपदा विभागाने पूररेषा निश्चित केली आहे, मात्र अद्यापही स्थगिती उठवलेली नाही. तसेच बांधकामे करण्याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत. प्रकल्प थांबल्यामुळे बँकेकडून अर्थपुरवठा बंद झाला असून त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्या ठिकाणचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत, त्यांना फक्त भोगवटा प्रमाणपत्रे देणे बाकी आहे. रेरा कायद्यानुसार पजेशन दिले नसल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. टीडीआरचा निर्णय प्रलंबित असून पेडअप एफएसआयच्या फाइल सुटसुटीतपणे निर्गत करावी,' अशी मागणी केली.

सहायक संचालक नगररचना प्रसाद गायकवाड म्हणाले, 'जलसंपदा विभागाकडून प्राप्त झालेल्या नकाशाच्या आधारे स्केलवर निश्चिती करणाचे काम टीपी विभागाकडून सुरू आहे. स्केलचे काम गडबडीत करता येणार नाही. सर्व काम नियमाच्या चौकटीत बसवून केले जाईल.' स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख म्हणाले, ' प्रशासनाने नकाशावर स्केलचे ड्रॉईंग काळजीपूर्वक करावे. जलसंपदा विभागाचा अहवाल व महापालिकेचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्यात यावा. पूर आल्यानंतर त्या ठिकाणचा डी.पी. रस्ता रद्द होतो का? होत असल्यास टीडीआरचा निर्णय प्रलंबित का? बांधकाम व्यावसायिक रेन वॉटर हार्वेस्टिंग व एसटीपी प्रकल्प फक्त बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेताना कार्यन्वित करतात. त्याचीही दक्षता घ्यावी.'

यावेळी उपमहापौर संजय मोहिते, उपशहर रचनाकार नारायण भोसले, एन. एस. पाटील, क्रिडाईचे राज्याध्यक्ष राजू परीख, सेक्रेटरी रवी माने, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, श्रीनिवास गायकवाड, प्रमोद साळोखे, प्रदीप भारमल, डी. व्ही. रेडेकर, इंदजित नागेशकर, चेतन चव्हाण आदी बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.

.........................

चौकट

आयुक्तांनीच घेतली उलटतपासणी

पूररेषेबाबत जलसंपदा विभागाचे नकाशे प्राप्त झाले आहेत. क्रिडाईने मांडलेल्या प्रश्नांवर प्रशासनास तातडीने निर्णय घेता येणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. टीपी विभागाकडून रितसर ऑफिस प्रस्ताव आल्यानंतर त्याची पडताळणी करुन निर्णय घेण्यात येईल. अद्याप काही भागात पूररेषा निश्चित झालेली नाही ती त्वरीत करण्याची सूचना केली आहे. अनेक बांधकाम व्यावसायिक एसटीपी प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, झिरो वेस्ट कचरा आदी उपाययोजना करत नाहीत. त्याचा परिणाम महापालिकेवर होत आहे. नाल्यात मैलामिश्रीत पाणी मिसळत असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे. त्याबाबत सूचना व नोटिसा दिल्या. अद्यापही त्यांच्याकडून नियोजन होत नाही. पूर बाधीत क्षेत्रातील बांधाकाम व्यावसायिकांना लाईफ जॅकेट व किती बोटी घेतल्या, अशी विचारणा करत त्यांची उलट तपासणी घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपक्ष सदस्या रसिका पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या राजकारणात गेली अडीच वर्षे सत्ताधारी भाजप व मित्रपक्ष आघाडीसोबत असलेल्या अपक्ष सदस्या रसिका अमर पाटील यांनी आगामी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप आघाडीपासून दूर गेली आहे. आता अपक्ष सदस्यांच्या या भूमिकेमुळे भाजप आघाडीला गळती लागल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे.

सदस्या रसिका पाटील यांचे पती अमर यांनी सोमवारी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, 'काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व आमदार पी. एन. पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली यापुढील राजकारण, समाजकारण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेत आपण दोन्ही काँग्रेसच्या आघाडीसोबत असणार आहोत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार व आपले चुलते व्ही. बी. पाटील यांच्यामध्ये स्नेहाचे संबंध आहेत. त्या नातेसंबंधांचा विचार करुन दोन्ही काँग्रेससोबत जाण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याला चुलत्यांची सहमती आहे.'

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन सदस्य आहेत. स्वाभिमानीने लोकसभेच्या निवडणुकीपासून भाजपच्या विरोधात लढाई सुरू केली आहे. जि.प.च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपला पाठिंबा असणार नाही ,असे संघटनेचे नेते शेट्टी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरस्कार माणसाला बळकट करतोबाळासाहेब पाटील यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार प्रदानजीवन गौरव यशवंत पुरस्कार बाळासाहेब पाटलांना प्रदान

$
0
0

जीवन गौरव यशवंत पुरस्कार

विजय दिवस समारोहात जीवन गौरव यशवंत पुरस्कार वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी, इस्लामपूरचे मानद सचिव अँड. बाळासाहेब पाटील यांना प्रदान करण्यात आला. वेणूताई चव्हाण सभागृहात रविवारी जीवन गौरव यशवंत पुरस्कारासह वीरमाता सन्मानाने कोळे (ता. कराड) येथील सिध्दवा काशिनाथ मुडगे, आदर्शमाता पुरस्काराने हणमंतवडीये (ता. कडेगाव) येथील क्रांतीविरांगना हौसाताई भगवानराव पाटील यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार ऐश्‍वर्या पाटणकर, आदर्श विद्यार्थी चारुदत्त करपे यांना देण्यात आला. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, अप्पर जिल्हाधिकारी आर. टी. शिंदे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, निवृत्त कर्नल संभाजी पाटील आदी उपस्थित होते.

.........

पीडितेला ठार मारण्याचा प्रयत्न;

आरोपीच्या वडिलाला अटक

बेळगाव

कडोलीतील अत्याचार झालेल्या मुलीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी सोमवारी नराधमाच्या बापाला अटक केली आहे. वडील बाळू भैरू बाळनाईक याला पोलिसांनी अटक केली आहे. एपीएमसी सीपीआय जावेद मुशापुरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जाळे विणून बाळूला अटक केली आहे.

आपल्या मुलाच्या कृत्यावर पांघरून घालण्यासाठी म्हणून पीडित मुलीला ठार मारण्याचा प्रयत्न बाळूने केला होता. अत्याचारग्रस्त मुलीला मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी या पूर्वीच आरोपीच्या आईला अटक केली आहे. या प्रकरणी आरोपी आणि त्याचे आई-वडील अशा तिघांना अटक झाली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मुलीचे अपहरण करून तिला काकती येथील सर्व्हिस रोडवर तिचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न करून बाळू फरारी झाला होता. त्यामुळे पोलिस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी कडोली प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास चालवला आहे. अनेक सामाजिक संघटनांनी मोर्चे काढून पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी देखील मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला असून, पोलिस न्याय मिळवून देतील, असा विश्वासही दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर अभियंत्यावर गुन्हा दाखल करा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'खराब रस्त्यांतून निर्माण होणाऱ्या धुळीकणांमुळे शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यांच्या दुर्दशेला शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा वाहनधारक महासंघाने महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्याकडे केली. त्यांनी महापालिकेच्यावतीने रस्ते करण्यास सुरुवात झाली असल्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या महासंघाच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत आपली जबाबदारी पार पडा, अन्यथा रस्त्यावर ठिय्या मारु,' असा इशारा दिला. कार्यकर्त्यांनी त्यांना घेवून पापाची तिकटी येथील खराब रस्त्यामुळे उडणारी धूळ प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिली.

बिंदू चौक, बागल चौक, पापाची तिकटी, महावीर कॉलेज परिसरासह अन्य रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून धुळीमुळे नागरिकांना प्रदूषणाचा त्रास वाढत आहे. याची दखल घेण्यासाठी प्रदूषण मंडळाने शहर अभियंत्यांना दोन नोव्हेंबर रोजी नोटीस पाठवली होती. त्याचा संदर्भ घेत महासंघाच्यावतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मास्क घालून आलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयात प्रवेश केला. गायकवाड यांना कार्यालयाबाहेर येवून निवेदन स्वीकारण्यास भाग पाडले. दीड महिन्यापूर्वी दिलेल्या नोटिशीनंतर कोणती कार्यवाही केली, अशी विचारणा कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले यांनी केली. गायकवाड यांनी पुरामुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. पुरादरम्यान महापालिका प्रशासनाने कोणतीही रोगराई पसरु दिली नाही. तसेच रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट केले.

महापालिकेची बाजू घेत असल्याची समजूत करुन कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. नागरिकांना श्वसन, डोळे व घशाचा त्रास अधिक जाणवत असताना महापालिकेची बाजू का घेता?, प्रदूषण मंडळाचा कारभार कसा चालतो माहीत आहे. जनता शहराची मालक आहे. आयुक्त मालक नाहीत. त्यांचे ते कर्तव्यच आहे. महापालिकेच्या कामाचा पाढा वाचण्याऐवजी नागरिकांचा विचार करुन शहर अभियंत्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. तसेच रस्त्यावरच ठिय्या मारु, असा इशारा दिला. त्यावर गायकवाड यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

आंदोलनात महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे, विजय गायकवाड, दिलीप सूर्यवंशी, अशोक जाधव, पुष्पक पाटील, पोपट रेडेकर, अतुल माळकर, तानाजी पाटील, उदय गायकवाड, नीलेश हंकारे, आनंदा चिले आदी सहभागी झाले होते.

.......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यापासून एलबीटीचा विशेष कँप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या स्थानिक संस्थाकर विभागाच्यावतीने (एलबीटी) असेसमेंट करुन करनिर्धारण करण्यासाठी बुधवार (ता. १८) ते ३१ डिसेंबरअखेर विशेष कँपचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयात कँप होणार आहे. मुदतीत कागदपत्रे सादर करुन करनिर्धारण न केल्यास स्थानिक संस्थाकर अधिनियमातील तरतुदीनूसार व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

एलबीटी असेसमेंट पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांना यापूर्वी अनेकदा नोटिसा पाठवल्या आहेत. मात्र नोटिसांना देवूनही करनिर्धारण न केलेल्या व्यापारी व फर्मवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारकडून करनिर्धारण न करण्याबाबत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांना करनिर्धारण करावेच लागणार आहे. यापूर्वी असेसमेंट करण्याकरिता विभागाच्यावतीने वेळोवेळी कँपचे आयोजन केले आहे. त्याला समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने आणि डिमांड लागू झालेल्या व तथापी रक्कम भरणा न केलेल्या ६८ व्यापाऱ्यांची बँक खाती सील का करु नयेत, या आशयाच्या नोटिसी पाठवल्या आहेत. तर ३८ व्यापाऱ्यांची बँक खाती सील केली आहेत. अशा प्रकारची कारवाई पुन्हा करावी लागू नये, यासाठी १८ ते ३१ डिसेंबरदरम्यान छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयात कँपचे आयोजन केले आहे. कँपमध्ये जे व्यापारी सहभागी होवून कागदपत्रे देवून करनिर्धारण पूर्ण करून घेणार नाहीत, त्यांच्यावर स्थानिक संस्थाकर अधिनियम २०१० चे कलम ४२ व ४३ च्या तरतुदीनूसार कारवाई करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे स्मारक त्वरित पूर्ण करा

$
0
0

कोल्हापूर: 'कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे स्मारक गेल्या चार वर्षांपासून पूर्ण झालेले नाही. स्मारकाच्या माध्यमातून पुरोगामी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्वरित पूर्ण करा,' अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्याकडे केली. त्यांनी आर्किटेक्ट व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्वरित काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 'पानसरे दाम्पत्यांवर गोळीबार झाल्यानंतर गोविंद पानसरे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महापालिकेत झालेल्या शोकसभेत त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. महासभेत त्याला मंजुरी देऊन स्थायी समितीने २५ लाखांचा निधी दिली. पण २०१५ पासून सुरू असलेले काम अद्याप पूर्णत्वाकडे गेलेले नाही. स्मारकाचे काम त्वरित पूर्ण करून लोकार्पण सोहळा करावा.' शिष्टमंडळात नामदेव गावडे, सतीश कांबळे, रमेश वडणगेकर, स्नेहल कांबळे, शुभांगी पाटील, इर्शाद फरास, प्रशांत आंबी, मुकुंद कदम आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियोजन बिनचूक असेल, तर यश निश्चित

$
0
0

rahul.jadhav@timesgroup.com

Tweet : @rahuljadhavMT

कोल्हापूर : 'स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर मनाचा निग्रह करून काही गोष्टी टाळायला हव्यात. अभ्यासासाठी दोन ते तीन वर्षे द्या. तुमचा प्लॅन परफेक्ट असेल तर, एक वर्षही यशासाठी पुरेसे आहे,' असा सल्ला इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिसमध्ये निवड झालेल्या रोहन पाटील यांनी स्पर्धा परीक्षार्थींना दिला. रोहन यांचे आई-वडील शिक्षक असून, त्यांच्यासाठी चांगले काही करण्याची प्रेरणाच यशासाठी कारणीभूत ठरल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

रोहन यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगावशेजारील मौजे तासगाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण वडगावच्या शारदा विद्यामंदिरमध्ये झाले. तर माध्यमिक शिक्षण वडगाव हायस्कूलमध्ये झाले. विवेकानंद कॉलेजमधून १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील थडोमल शाहनी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनच्या पदवीसाठी प्रवेश घेतला. रोहन हे रहायला वसईला तर कॉलेज वांद्र्याला होते. त्यामुळे ट्रेनमधील वेळ त्यांनी अभ्यासासाठी कारणी लावला. तर रुमवर लिखाणाचे काम केले. शिकत असतानाच कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्यांची दोन कंपन्यांत निवड झाली. त्यामुळे पदवी मिळविल्यानंतर लगेचच ते खासगी कंपनीत रुजू झाले. परंतु आपल्यातील गुणवत्ता ही केवळ कंपनी आणि आपण स्वत: अशी दोघांनाच उपयोगी ठरू शकली असती. त्यामुळे ही गुणवत्ता अधिक व्यापक स्वरूपात अर्थात देशासाठी उपयोगी ठरायची असेल तर युपीएससी हा एकमेव पर्याय होता. त्यामुळे रोहन यांनी पुढे शिक्षण घेऊन एमटेक करायचे, बाहेरच्या देशात जाऊन एमएस करायचे की, युपीएससीमार्फत इंजिनीअरिंग सर्व्हिसेसची परीक्षा द्यायची याबाबत आईवडीलांशी चर्चा केली. दोन्हीतील फायदे तोटे, वेळ किती जाईल या सर्वांचा विचार करून यूपीएससी करण्याचा निर्णय पक्का केला. यासाठी आठ महिन्यांपासून सुरू असलेला जॉब सोडला. किमान दोन ते तीन वर्षे या परीक्षेसाठी द्यायची मानसिकता केली आणि अभ्याासासाठी थेट दिल्ली गाठली.

इंजिनीअरिंग पदवीच्या अभ्यासक्रमातच इंजिनीअरिंग सर्व्हिसेसचा ७० ते ८० टक्के अभ्यास झाला होता. पूर्व परीक्षा पास झाले की, निम्मी लढाई जिंकल्यात जमा असते, हे ओळखून रोहन यांनी पूर्ण लक्ष पूर्वपरीक्षेच्या अभ्यासावर केंद्रीत केले. पूर्व परीक्षेसाठी त्यांनी याआधी झालेल्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप समजावून घेतले. चालू घडामोडींचा सखोल अभ्यास करून त्यांचे विश्लेषण केले. सकाळी ६ ते १० आणि त्यानंतर दिवसभरात पाच तास असा दररोज ८ ते ९ तास अभ्यास केला. पाठांतर तसेच उजळणीवर भर दिला. सुमारे ३५० ते ४०० टेस्ट दिल्या. या सर्वांचा परिणाम अर्थातच पूर्व परीक्षा पास होण्यात झाला. युपीएससी इंजिनीअरिंगच्या मुख्य परीक्षेसाठी ३०० मार्कांचे दोन पेपर असतात. शिवाय पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये सहा महिन्यांचे अंतर असते. यामुळे रोहन यांनी स्वत: नोट्स काढल्या. मुख्य परीक्षेत प्रश्नाखाली उत्तर लिहायचे असल्याने चुकायला संधी नव्हती. प्रश्नाचे विश्लेषण करून आधीच कोणते मुद्दे लिहायचे हे ठरवावे लागते. जागा पुरवून वापरावी लागते. या सर्वांचा विचार करून आठवड्याला दोन पेपर सोडविण्याचा सराव केला. त्यामुळे उत्तरात दिवसेंदिवस प्रगती होत गेली.

मुलाखतीबाबत सांगताना रोहन म्हणाले, 'पूर्व आणि मुख्य परीक्षेचे पेपर चांगले गेल्यामुळे मुलाखतीबाबत निश्चिंत होतो. ९ पानांचा बायोडाटा फॉर्म अत्यंत काळजीपूर्वक भरला. मुलाखतीसाठी मला चारजणांचे पॅनेल होते. मॉक इंटरव्ह्यू दिल्यामुळे आत्मविश्वासाने मुलाखतीला साामोरा गेलो.'

ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड क्षमता

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींना रोहन सांगतात, ' सरकारी नोकरीत एमपीएससी, युपीएससी एवढेच नाही तर अन्य अनेक पर्याय आहेत. आपल्याला आवड कशात आहे, हे पाहून जे ठरवू त्यात १०० टक्के योगदान द्या. दोन ते तीन वर्षे पूर्णपणे अभ्यासासाठी द्या. व्यवस्थित नियोजनानुसार अभ्यास केला तर, एक वर्षही पुरते. ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. आवडीच्या क्षेत्रामध्ये जे करायचे ते अत्त्युत्तम करायचे, हा ध्यास असेल तर काहीच अशक्य नाही.'

लोगो : सक्सेस स्टोरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्षेत्र विकास प्राधिकरण नकोच

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दोन वर्षे झाली तरी अजून पदे भरलेली नाहीत. सरकारकडून एक पैशाचाही निधी आलेला नाही. बांधकाम परवानगी दिल्या जात नाहीत व विविध कार्यालयांचे ना हरकत दाखले घेण्यासाठी हजारो रुपये द्यावे लागतात. त्यातून हजारोंच्या संख्येने बेकायदेशीर बांधकामे केली जात आहेत. या साऱ्या त्रासदायक प्रकारांमुळे प्राधिकरणच रद्द करा व पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत, तहसिलदार, प्रांताधिकारी यांना बांधकाम परवानगीचे अधिकार द्या, अशी जोरदार मागणी प्राधिकरणातील ४२ गावांमधील सरपंच व ग्रामस्थांनी केली. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. दरम्यान, ग्रामस्थांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन प्रलंबित बांधकाम परवानगींसाठी प्राधिकरण व नगररचना विभागाने तातडीने संयुक्त कॅम्प घ्या तसेच दोन्ही कार्यालयात समन्वय ठेवावा, प्राधिकरणातील कामांना गती देण्यासाठी कार्यकारी समिती नेमावी, निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

प्राधिकरणाबाबतच्या तक्रारी निवेदनाद्वारे मांडल्यानंतर जिल्हाधिकारी देसाई यांनी प्राधिकरणचे अधिकारी, नगररचनाचे अधिकारी तसेच गावातील पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. त्यावेळी शिवराज पाटील यांनी प्राधिकरणाची दोन वर्षाची वाटचाल मांडली. त्याला संजय पोवार वाईकर यांनी, 'आतापर्यंत कामच झालेले नाही,' असा आक्षेप घेतला. निधी आलेला नाही. 'पदे भरलेली नाहीत. त्यासाठी सरकारकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडेही पाठपुरावा केलेला नाही. निधी नसल्याने मंजूर केलेली विकास कामे कशी करणार? प्राधिकरणाकडून नेहमी चुकीची माहिती दिली जाते. आताही चुकीची माहिती देऊ नका. नेमके प्राधिकरण काय आहे हे तुम्ही प्रथम समजावून सांगा' अशी मागणीही केली.

डॉ. के. एन. पाटील म्हणाले, 'बांधकाम परवानगीला फाइल दिल्यानंतर प्रथम नगररचनाचे चार अधिकारी तपासतात. त्यानंतर प्राधिकरणचे चार अधिकारी तपासणी करतात. आमच्या जमिनी म्हणजे काय ३७० कलम वगळलेल्या भागातील आहेत की का?'

पाचगावचे सरपंच संग्राम पाटील म्हणाले, 'पाचगावसह चार गावांसाठी नवीन पाणीयोजना मंजूर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे त्या योजनेतील तरतुदी बदला असे मंत्रालयातून सांगितले जात आहे. नेमकी काय स्थिती आहे?, योजना होणार की नाही हे आम्ही कुणाला विचारायचे? विमानतळाच्या फनेल झोनमध्ये गटनंबर येत नसतानाही विमानतळाकडून ना-हरकत पत्र घ्यावे लागत आहे. हे बंद झाले पाहिजे.' गिरगावच्या सरपंच संध्या पाटील यांनी तर 'ग्रामपंचायतींना गृहित धरुन काम सुरू आहे. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. बांधकाम परवानगी मिळण्यात अडचणी आहेत. प्राधिकरण आम्हाला समजलेलेच नाही,' असे सांगितले.

वडणगेचे सरपंच सचिन चौगले म्हणाले, 'प्राधिकरणातील अनेक गावच्या गावठाणात महापुराचे पाणी आले. त्यामुळे तिथे नेमका काय विकास करणार? ही गावे प्राधिकरणातून वगळली जावीत.'

कळंब्याचे सरपंच सागर भोगम यांनीही पूर्ववत बांधकाम परवानगी देण्यात याव्यात, अशी मागणी केली.

यानंतर जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'प्राधिकरण रद्द करण्याबाबत सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत येथील ग्रामस्थांच्या समस्यांवर मार्ग काढायला हवा. त्याकरिता प्राधिकरण व नगररचना विभागाने संयुक्त कॅम्प घेऊन बांधकाम परवानगींचा निपटारा करावा. पालकमंत्री नियुक्त झाल्यानंतर प्राधिकरणाची बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये पुढील काही कामे बैठकीविना अडू नयेत यासाठी कार्यकारी समिती निर्माण केली जाईल. प्राधिकरणामध्ये कामे लवकर होण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांची नेमणूक करा. त्यांच्या परवानगीची जबाबदारी मी घेतो. प्राधिकरणाचा वार्षिक अहवाल सर्व ग्रामपंचायतींना पाठवला जाईल. तसेच गावठाणातील बांधकाम परवानगीचा अधिकार ग्रामपंचायतींना आहे, नगररचना विभागाची केवळ ना हरकत लागते अशी माहिती ग्रामपंचायतींना लेखी स्वरुपात पाठवली जाईल. प्राधिकरणची नियमित बैठक होईल, त्यात गुंठेवारीवरील बांधकाम परवानगीच्या विषयावर निर्णय घेतला जाईल. येथूनपुढे दर महिन्याला प्राधिकरणाच्या वाटचालीबाबत बैठक घेतली जाईल.'

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राजू माने, अजय कोराणे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रसाद गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार शीतल मुळे आदी उपस्थित होते.

ना हरकतसाठी १५०००?

'फनेल झोनबाहेर येणाऱ्या गटनंबरसाठीही विमानतळाकडून ना हरकत घ्यावी लागते. ती देण्यासाठी एक खासगी संस्था नेमली आहे. त्यांच्याकडून एका ना हरकतसाठी पंधरा हजार रुपयांपर्यंत घेतले जातात. त्याची पावतीही दिली जात नाही' अशी तक्रार पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी केली. 'याबाबत जर प्रतिज्ञापत्र दिले तर मी पाहून घेतो. नियमानुसार काम करायचे असेल तर घेतलेल्या पैशांची पावती द्यावी लागेल. कायदेशीर काम असेल पण केवळ भीती दाखवली जात असेल तर घाबरण्याचे काहीच काम नाही. कुणालाही पावती व्यतिरिक्त पैसे घेण्याचा अधिकार नाही,' असे जिल्हाधिकारी देसाई यांनी स्पष्ट केले.

बांधकाम प्रस्तावांची सद्यस्थिती

१४९

बांधकाम प्रस्ताव मंजूर

२४३

बांधकाम फायलींत त्रुटी

१५३

प्राधिकरणाकडे प्रलंबित

११८

नगररचना विभागाकडे प्रलंबित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅटरिंग’कडून सर्रास प्लास्टिकचा वापर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

खाद्यपदार्थ विक्रेते, कॅटरिंग कंपन्या, हॉटेल आणि उपहारगृहात बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंचा सर्रास वापर सुरू आहे. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदांसह सर्व सरकारी कार्यालयांकडून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यास टाळटाळ होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कचऱ्याचे ढीग पहायला मिळत आहेत.

भाजीमंडई आणि बाजारात कमी मायक्रॉनच्या पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. या पिशव्यातून मटण, चिकन, अंडी, दही, खाद्यतेल, फळांची विक्री केली जाते. कमी मायक्रॉनच्या पिशव्यांचा खुलेआमवापर होत असल्याने सुक्या कचऱ्यात या पिशव्यांचा ढीग लागल्याचे चित्र पहायला मिळतात. हॉटेल, उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यावर कमी मायक्रॉनच्या पिशव्यांच्या वापर सुरू आहे. नामवंत खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर सुरू केला असला तरी त्यांचे प्रमाण कमी आहे. हॉटेलमध्ये पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारी भांडी, वाट्या, स्ट्रॉ, नॉन वोव्हन पॉलिप्रॉपलिन बॅग्ज, प्लास्टिक पाऊचला बंदी असताना त्यांचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येते.

कॅटरिंग व्यावसायिकांकडूनही पर्याय असताना बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंचा वापर केला जात आहे. श्रीखंड, गुलामजाम, रबडी, खीर हे पदार्थ खाण्यासाठी बंदी असलेल्या प्लास्टिक चमच्यांचा वापर केला जात आहे. स्टील ग्लासऐवजी प्लास्टिक ग्लासचा वापर केला जात आहे. त्यामुळे मंगल कार्यालय, हॉलमधून रोज प्लास्टिक कचरा जमा होत आहे. प्लास्टिक कोटेड पत्र्यावळ्या, द्रोण, ग्लास यांचाही सर्रास वापर होत आहे. महानगरपालिकेजवळील बाजारगेट, पानलाइन या परिसरातील दुकानांतून या वस्तू सहज उपलब्ध होतात. महाप्रसाद, जेवणावळी, वाढदिवसाला याचा मोठा वापर होत असल्याने प्लास्टिक कचरा वाढत आहे. मैदाने, पॅव्हेलियन, बागांमध्ये रात्री होणाऱ्या जेवणावळीत या वस्तूंचा वापर होत असल्याने रोज सकाळी कचऱ्याचे ढीग पहायला मिळतात.

चोरट्या विक्रीवर कारवाई हवी

सध्या महानगरपालिकेकडून अनेक प्रभागांत घंटागाडीद्वारे ओला आाणि सुका कचरा वेगवेगळा स्वीकारला जातो. पण, बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर असल्याने सुक्या कचऱ्यात त्याचे प्रमाण जास्त दिसून येते. कचऱ्याच्या समस्येचे निवारण करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे. जर चोरट्या प्लास्टिक विक्रीवर महानगरपालिकेने टाच आणली तरी याचे प्रमाण कमी होऊ शकते.

प्लास्टिक बंदीची ठिकाणे

सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुल, क्लब्ज, चित्रपट आणि नाट्यगृहे, औद्योगिक घटक, समारंभाचे हॉल, वाणिज्य संस्था, कार्यालये, धार्मिक स्थळे, हॉटेल, धाबे, दुकानदार, मॉल्स, विक्रेते, कॅटरर्स, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, व्यापारी, फेरीवाले, वितरक, वाहतूकदार, सेल्समन, मंडई, उत्पादक, स्टॉल्स, पर्यटन स्थळे, वने, सरंक्षित वने, इको सेन्सिटिव्ह झोन, सागरी किनारे, सार्वजनिक ठिकाणे रेल्वे आणि बस स्थानके.

अन्य कार्यालयांचे दुर्लक्ष

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याचे अधिकार सर्व सरकारी कार्यालयांना असताना जिल्ह्यात फक्त महानगरपालिका, नगरपालिककांकडून कारवाई होत असते. त्यांच्याकडूनही नियमित कारवाई होत नाही. सर्व सरकारी कार्यालयाने आपल्या क्षेत्रात प्लास्टिक बंदीची कारवाई केली तर प्लास्टिक कचरा आटोक्यात येऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापरीक्षा पोर्टल रद्दसाठी विद्यार्थी रस्त्यावर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्य सरकारच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी वापरल्या जाणाऱ्या महापरीक्षा पोर्टलमध्ये त्रुटी असल्याने हे पोर्टल रद्द करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा स्पर्धा परीक्षा कृती समितीच्यावतीने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जोरदार घोषणाबाजी करून सरकारच्या महापरीक्षा पोर्टलच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध केला. या मागणीसाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठाण मांडले. मोर्चानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.

सकाळी साडेदहा वाजता दसरा चौक येथून मोर्चाला सुरूवात झाली. 'आमच्या नोकऱ्या हक्काच्या... नाही कुणाच्या बापाच्या,' 'गैरहजर असलेल्या परीक्षार्थींची नावे निकालपत्रात जाहीर करणाऱ्या पोर्टलचा भ्रष्ट कारभार रोखा' अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, उषा टॉकीज रोड, असेम्ब्ली रोडमार्गे मोर्चा दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. याठिकाणी उपमहापौर संजय मोहिते, शारंगधर देशमुख, दीपा पाटील उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोर्चाला सभेचे स्वरुप आले. यावेळी समितीचे कार्यकर्ते संघर्ष कांबळे म्हणाले, 'सरकारच्या रिक्त पदांची भरती करण्यासाठी महापरीक्षा पोर्टल वापरण्यात येते. मात्र पोर्टलच्या कामात प्रचंड त्रुटी आहेत. वनविभागाच्या परीक्षेसाठी अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची रँकच्या यादीत नावे जाहीर झाली. याविरोधात माहिती अधिकाराखाली माहिती मागविल्यानंतर संबंधित विभागाने ती देण्यासाठी नकार दिला. तलाठी पदासाठी घेतलेल्या परीक्षेवेळीही हजर नसलेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. त्यामुळे अनेक प्रामाणिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पोर्टल बंद करण्याच्या मागणीसाठी आजपर्यंत अनेकदा आंदोलन करूनही त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही.'

जावेद तांबोळी म्हणाले, 'नव्या महाविकास आघाडीच्या सरकारने महापरीक्षा पोर्टलला स्थगिती दिली आहे. मात्र त्रुटी दूर करून हे पोर्टल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीत अजूनही त्रुटी आहेत. कारभार भ्रष्ट आहे. त्यामुळे हे पोर्टल पूर्णपणे बंद करावे.'

आंदोलनात विशाल पाटील, डॉ. गिरीश फोंडे, मंगेश हजारे, कौस्तुभ पाटील, शंतनू घोटणे, विनू लोखंडे, संदीप कांबळे यांच्यासह स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीचे सर्व सदस्य, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

तर आयुष्यभर खाली बसावे लागेल

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आल्यानंतर काही आंदोलक विद्यार्थी उभे होते. मोर्चाचा उद्देश व भविष्यातील आंदोलनाची दिशा याविषयी माहिती देण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उभे असलेल्या विद्यार्थ्यांना खाली बसून घेण्याचे आवाहन केले. 'आपण भावी अधिकारी आहोत. त्यामुळे आंदोलन करतानाही रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना, वाहनचालकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आता शांतपणे खाली बसून मोर्चातील संयम ठेवला नाही तर आयुष्यभर खाली बसण्याची वेळ येईल' असे आवाहन मोर्चाच्या नेतृत्वाने केल्यानंतर विद्यार्थी रस्त्यावर बसले.

स्पर्धा परीक्षार्थींनी केलेल्या प्रमुख मागण्या

- महापरीक्षा पोर्टल बंद करावे

- रिक्त पदा भरतीप्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवा

- रिक्त पदांची भरती तातडीने सुरू करावी

- पूर्वपरीक्षा पद्धती रद्द करून विभक्त पूर्व परीक्षा पद्धती घ्यावी

- पोलिस शिपाई पदासाठी आधी शारीरिक चाचणी, नंतर लेखी परीक्षा नंतर घ्यावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायोगॅसद्वारे विद्यापीठ होणार स्वयंपूर्ण

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet@anuradhakadamMT

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात बायोगॅस प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी स्वयंपाकाच्या गॅसवर होणाऱ्या पाच लाख रुपयांच्या खर्चात बचत होणार आहे. सध्या कमवा व शिका योजना विभागातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी दररोज दोन एलपीजी सिलिंडरच्या वजनाचा गॅस तयार करणारा बायोगॅस प्रकल्प अंतिम टप्प्यात असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बायोगॅसचा प्रत्यक्ष वापर सुरू होणार आहे.

जलसाठ्यांद्वारे पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आल्यानंतर आता बायोगॅस प्रकल्पामुळे झिरो गार्बेज ठरणाऱ्या विद्यापीठांच्या यादीत शिवाजी विद्यापीठाचा समावेश झाला आहे. कमवा व शिका विभागातील शंभर विद्यार्थ्यांचा स्वयंपाक बायोगॅसद्वारे केला जाणार आहे. विद्यापीठातील सात वसतिगृहे, पाच कँटिन, एक अतिथीगृह तसेच आवारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने येथील ओला कचरा बायोगॅस प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. यापासून रोज २८ ते ३० किलो गॅस बनेल इतक्या कचऱ्याचे विघटन केले जाणार आहे. कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीसाठी विद्यापीठ आवारातील आरोग्यकेंद्र व 'कमवा आणि शिका' इमारतीच्यामध्ये असलेल्या रिकाम्या जागेत तीन टाक्या बांधल्या आहेत. २४ घनमीटर क्षमतेच्या या टाक्यांमध्ये रोज साठणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून गॅसनिर्मिती करण्यात येणार आहे.

टाक्यांच्या बांधणीसाठी सिमेंटचा वापर केल्याने त्या लीक होणार नाहीत याची काळजी घेतली आहे. बायोगॅस प्रकल्पाशेजारीच उभारण्यात आलेल्या शेडमध्ये सुका कचरा साठवून त्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार असून त्याचेही काम सुरू झाले आहे. खतापासून विद्यापीठातील सर्व फुलझाडे, विभागांसमोरील बागेतील झाडांच्या संगोपनाचा प्रश्न सुटणार आहे. दररोज ८० किलो खत निर्मितीही या बायोगॅसप्रकल्पातून होणार आहे.

कचरा संकलनासाठी निविदा

विद्यापीठात मुलींचे दोन व मुलांचे पाच असे सात वसतिगृहे आहेत. येथून मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा बायोगॅससाठी मिळू शकणार आहे. तसेच विद्यापीठाच्या आवारातील पाच कँटीन, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने व अतिथीगृहातून कचरा उपलब्ध होणार आहे. हा सर्व कचरा दररोज संकलित करून बायोगॅस प्रकल्पास्थळी देण्याचा ठेका निविदाप्रक्रियेद्वारे देण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात याबाबत निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे.

बायोगॅस प्रकल्पाच्या उभारणीसाठी ८ लाख रुपयांचा खर्च आला आहे. संजय रानमाळे यांच्या देखरेखीखाली काम सुरू असून येत्या दहा दिवसांत बायोगॅस प्रकल्प पूर्ण होणार आहे. विद्यापीठातील ओला कचरा उपयोगात आणून त्यापासून विद्यापीठाच्या खर्चात होणारी बचत आणि पर्यावरणाचे रक्षण हा प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. दर महिन्याला ४० हजार रुपयांचा देखभाल खर्च असून त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

- जी. एस. कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक, बायोगॅस प्रकल्प

पॉइंटर

८ लाख

बायोगॅस प्रकल्पाचा खर्च

४० हजार

प्रकल्पाचा दरमहा देखभाल खर्च

९०० किलो

प्रकल्पाद्वारे दरमहा तयार होणार गॅस

५ लाख

गॅसखरेदी खर्चातील वार्षिक बचत

८० किलो

सुक्या कचऱ्यापासून रोजची खतनिर्मिती

लोगो : पृथ्वी रक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे स्मारक त्वरित पूर्ण करा

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>