Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘सत्य परमात्म्याची ओळख झाल्याने जीवन उज्ज्वल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सत्य परमात्म्याची ओळख करून जेव्हा आपण निराकार प्रभूशी आपले नाते जोडतो तेव्हा सर्वत्र चैतन्य दिसू लागते. हीच आमची ओळख बनून जाते आणि अवघे जग विश्वबंधुत्वाच्या भावनेने ओतप्रोत दिसू लागते. सत्य परमात्म्याची ओळख व ज्ञानामुळे जीवनात उज्ज्वलता येते आणि जगाशी सद्व्यवहार करू लागतो,' असे मत सद्गुरू सुदिक्षा महाराज यांनी व्यक्त केले.

संत निरंकारी मंडळतर्फे हरियाणा येथील समालखा येथे ७२ व्या वार्षिक निरंकारी संत समागमचे आयोजन केले होते. तीन दिवसीय संत समागममध्ये देश, विदेशातून लाखो भाविकांनी सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून सुमारे एक लाख भाविकांचा सहभाग होता. याप्रसंगी बोलताना सुदिक्षा महाराज म्हणाल्या, 'सुखदुखाच्या पलीकडे जाऊन सहज अवस्थेमध्ये आनंदमय जीवन जगण्याचे नाव भक्ती होय. सत्याचा बोध झाल्यानंतर ईश्वराची जाणीव ठेवून आपले प्रत्येक काम करू लागतो. मनामध्ये ईश्वराच्या प्रति कृतज्ञतेचा भाव बाळगतो.'

संत निरंकारी मिशनच्या ९० वर्षांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकताना सद्गुरू सुदिक्षा यांनी 'मिशनच्या प्रारंभी संदेशवाहकांनी भौतिक साधनांचा अभाव आणि विपरित परिस्थितीचा सामना करत मानवकल्याणासाठी संकल्प राहून आपले जीवन समर्पित केले.'असे नमूद केले. संत समागमच्या कार्यक्रमात शोभायात्रा काढण्यात आली. तसेच मुख्य निरंकारी प्रदर्शन, बाल प्रदर्शन, स्वास्थ प्रदर्शन लोकांच्या आकर्षणाचे ठरले. नागरिकांसाठी आरोग्य शिबिर भरविले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यातील १९ कारखान्यांचा हंगाम सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेनंतर जिल्ह्यातील १९ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला. वारणा, आजरा या कारखान्यांची एफआरपी थकीत असल्याने त्यांना गाळप परवाना दिला नसल्याने हे कारखाने सुरू झाले नाहीत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी साखर आयुक्तांशी चर्चा करून शुक्रवारी (ता. २३) रोजी साखर कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली होती. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात कागल तालुक्यातील सेनापती संताजी घोरपडे आणि गगनबावडा तालुक्यातील डॉ. डी. वाय. पाटील कारखाना सुरू होता. पण दोन्ही कारखान्यांनी दर जाहीर न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी उस वाहतूक रोखली होती. शनिवारी (ता. २३) जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद झाली. परिषदेत एकरकमी एफआरपीसह अधिक २०० रुपये ऊस दराची मागणी केली होती. पण कारखानदारांनी दर जाहीर न करताना सोमवारी कारखाने सुरू केले. जिल्ह्यातील १९ कारखाने सुरू झाल्याची माहिती साखर सह संचालक कार्यालयाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडोबा मंदिरात आजपासून चंपाषष्टी उत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जमिनीखाली २५ फूट खोल आणि मंदिरावर मुस्लिम स्थापत्य शैलीतील डेरेदार घुमट अशी रचना असलेल्या प्राचीन खोलखंडोबा मंदिरात बुधवारी (ता.२७) चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ होत आहे. रविवारी (ता.१) खंडोबाचा जागर तर सोमवारी (ता.२) उत्सवाचा मुख्य दिवस असून रात्री पालखी सोहळा होणार आहे.

ब्रह्मपुरीनंतर उत्तरेश्वर आणि खोल खंडोबा ही शहरातील प्राचीन वस्ती समजली जाते. शहरात अनेक मंदिरे असले तरी जमिनीखाली २५ फूट जमिनीखाली खोल मंदिर असल्याने खोल खंडोबा नावाने मंदिर ओळखले जाते. भल्यामोठ्या शिळांनी मूळ मंदिर बांधले असून मंदिरात चौथरा आहे. मंदिरात दगडी शिवलिंग असून हे खंडोबाचे मूळ स्थान समजले जाते. गाभाऱ्यात खंडोबाच्या पत्नी बाणाईची छोटी मूर्ती आहे.

मंदिरात जाण्यासाठी १७ पायऱ्या आहेत. तसेच जमिनीपासून सात फूट उंचीच्या दगडी भिंती आहेत. मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले आहे.

बुधवारी (ता.२७) सकाळी मार्गशीर्ष प्रतिपदेच्या महुर्तावर चंपाषष्ठी उत्सवास सुरूवात होणार आहे. मंदिराचे प्रमुख विश्वस्त खंडेराव जगताप, घनश्याम जगताप यांच्या उपस्थितीत अभिषेक होणार आहे. उत्सवकाळात वाघ्या मुरळीचे कार्यक्रम होणार असून रविवारी (ता.१) जागरानिमित्त भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (ता.२) चंपाषष्ठी उत्सवाच्या दिवशी रात्री साडेसात वाजता पालखी सोहळा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मास्क वापरण्याचा ‘प्रदूषण’चा अजब सल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा येथील घनकचरा प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाबाबत महापालिका प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रदूषित घटकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल येण्यास विलंब लागणार असल्याने आवश्यकता भासल्यास प्रकल्प क्षेत्रातील नागरिकांनी मास्क वापरण्याचा सल्ला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाने बुधवारी दिला आहे.

कॉमन मॅन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेवून कसबा बावडा घनकचरा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाबाबत कोणत्या उपायोजना केल्या तसेच कचरा प्रकल्पाला भेट देण्याची मागणी केली. त्यानंतर उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत पाहणी केली. पाहणीनंतर सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजनडाय ऑक्साईड, पार्टिक्युलेट मॅटर, लीड, कार्बन मोनॉक्साईड व अमोनिया वायू उत्सर्जित होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यासाठी कार्यालयाच्यावतीने मास्क वापरण्याचा सल्लाही दिला आहे. प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यापेक्षा हा अजब सल्ला दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते दुरुस्तीसाठी साडेचार कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनंतर औद्योगिक विकास निधीतून महापालिकेला साडेचार कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीतून प्रामुख्याने अंबाबाई मंदिर परिसर व उद्यमनगर औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. निधीमुळे गेल्या काही महिन्यांपासून खराब रस्त्यांमुळे हैराण झालेल्या शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टी आणि त्यानंतरच्या महापुरामुळे शहरातील मुख्य आणि अंतर्गत असे २९९ किलोमीटरच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच तीन वर्षांपूर्वी केलेले नवीन रस्तेही मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत. शहरातील बुहतांशी रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. महापालिका प्रशासन व नगरसेवकांविरोधात शहरवासीय आंदोलन करत आहेत. कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्यासमवेत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती, प्रा. संजय मंडलिक व आमदार सतेज पाटील यांनी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे ७५ लाखाचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हा निधी मंजूर झाला असून कामाला बुध‌वारपासून सुरुवात होणार आहे.

सोमवारी (ता.२५) पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने रस्त्यासाठी पाच कोटी निधी देण्याचे जाहीर केल्यानंतर औद्योगिक विकास निधीतून साडेचार कोटींचा निधी मिळाला आहे. दोन्ही निधीतून रस्त्यांची कामे करण्याचा आराखडा शहर अभियंता कार्यालयाकडून तयार करण्यात आला आहे. निधीतून अंबाबाई पालखी मार्गावरील व उद्यम नगरातील रस्ते व गटर्स कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. देवस्थान समिती व औद्योगिक विकास निधीतून रस्ते दुरुस्ती कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून जीवघेणा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे.

\B

पॅचवर्क १५ दिवसांत पूर्ण होणार\B

अतिवृष्टी व महापुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांचे पॅचवर्क करण्यास गेल्या दोन आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. इतर १६ रस्त्यांचे पॅचवर्कसाठी एक कोटी १६ लाखांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या निधीतून चारही विभागीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या एका खराब रस्त्याच्या पॅचवर्कच्या कामाला आजपासून सुरुवात होणार आहे. कामाचा आढावा दररोज शहर अभियंता कार्यालयाला सादर करण्यात येणार आहे. 'रस्त्यांची दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींनी दिलेल्या निधी मंजूर झाला आहे. या निधीचा वापर दुरुस्तीसाठी वापरला जाणार असून १५ दिवसांत पॅचवर्कची कामे पूर्ण होतील.' असे प्रभागी शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितले.

देवस्थानच्या निधीतून होणारे रस्ते

गुजरी ते जोतिबा रोड

मिरजकर तिकटी ते बिनखांबी

बिनखांबी ते उभा मारुती चौक

मिरजक तिकटी, बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक

करवीर वाचन मंदीर ते बिंदू चौक

औद्योगिक विकास निधीतून होणारे रस्ते

उद्यमनगर जावेद मोटार ते साई सर्व्हिसेस

सुदीन मोटर्स ते फडतरे मिसळ

कवडे इंजिनिअर ते अस्लम ग्लास

मदनलाल धिंग्रा मंडळ ते कोल्हापूर कागद केंद्र

विशेष सभा बोलविण्याची मागणी

खराब रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा वाहनधारक महासंघाच्यावतीने कृती कार्यक्रम जाहीर करत आंदोलन हाती घेतले आहे. खडी व डांबराचे लग्न, रास्ता रोको असे आंदोलन केल्यानंतर महासभेदरम्यान मध्यरात्रीपासून महापालिकेला घेराओ घालण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विनंती केल्यानंतर घेराओ मागे घेण्यात आला. मंगळवारी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा भेट घेतली. तसेच महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्याकडे विशेष सभा घेण्याची मागणी केली. सभेपूर्वी किंवा सभेनंतर रस्ते दुरुस्तीला सुरुवात न झाल्यास महापालिकेला घेराओ घालण्याचा इशारा महासंघाच्या शिष्टमंडळाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकांच्या वेतन आयोगासाठी धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑफलाइन पद्धतीने वेतन घेणाऱ्या तसेच ज्या कॉलेजनी नॅक मूल्याकंन केले नाही, त्या कॉलेजमधील प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळावे, या मागणीसाठी प्रा. रघुनाथ ढमकले यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दुपारी एक ते सायंकाळी पाच या वेळेत आंदोलन झाले.

राज्याचे शिक्षण संचालक धनराज माने यांच्याकडे न्याय मागूनही प्रश्नांची सोडवणूक झाली नाही. यामुळे त्यांच्या विरोधात आंदोलन केल्याचे ढमकले यांनी पत्रकात म्हटले आहे. कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसहसंचालक कार्यालयाकडे या प्रश्नासाठी दाद मागितली होती. सहसंचालक कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केल्यानंतर राज्याचे शिक्षण संचालक धनराज माने यांचेही याकडे लक्ष वेधले होते. परंतु संचालक कार्यालयानेही प्राध्यापकांच्या मागण्यासंदर्भात असंवेदनशील वृत्तीचे दर्शन घडविले. संचालक कार्यालयाने दखल घेऊन प्राध्यापकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, अन्यथा वरिष्ठ पातळीवर तक्रार केली जाईल, असे ढमकले यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण उद्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने गुरुवारी (ता.२८) महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिननिमित्त जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण होणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे दुपारी एक वाजता कार्यक्रम होणार आहे. संघटनेच्यावतीने संजय आनंदा शिंदे (मुदाळ, ता. भुदरगड), कविता नाईक (पेरणोली, ता. आजरा), रमेश जाधव (सिद्धगिरीमठ, ता. करवीर), रानबा नाईक (लमानवाडा, ता. गडहिंग्लज), दत्तात्रय सावंत (बनाचीवाडी, ता. राधानगरी), अनंत कांबळे (जयसिंगपूर), बसगोंडा कांबळे (टाकवडे, ता. शिरोळ) यांना आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुक्रवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालिंगा पंपिंग स्टेशन ते चंबुखडी संतुलन टाकीकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर वॉशआउट व्हॉल्व्ह बसवण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे शुक्रवारी (ता. २९) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीनंतर शनिवारी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात कळंबा रिंगरोड व साळोखेनगर येथील क्रॉस कनेक्शनसाठी तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर पुन्हा शुक्रवारी दुरुस्तीसाठी दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. बालिंगा पंपिंग स्टेशन ते चुंबखडीपर्यंतच्या मुख्य जलवाहिनीवर वॉशआउट व्हॉल्व्ह बसवण्यात येणार आहे. कामासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून पाणी उपसा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

दुरुस्तीमुळे चंबुखडी टाकीवर अवलंबून असणाऱ्या ए, बी, ई वॉर्ड आणि सी व डी वॉर्डातील संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागातील संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ए, बी, वॉर्डातील लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद, शिवाजी पेठ, मंगळवार पेठेतील काही भागांचा समावेश आहे. तसेच सी, डी वॉर्डातील दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ तालीम, लक्ष्मीपुरी, सोमवार पेठ, बिंदू चौक, अंबाबाई मंदीर, मिरजकर तिकटी परिसरात पाणी येणार नाही. त्याचबरोबर 'ई' वॉर्ड शाहूपुरी ५ व ६ वी गल्ली, कुंभार गल्ली, पार्वती टॉकीज, खानविलकर पेट्रोल पंप, उद्यमनगर परिसरातही पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्ती कालावधीत सर्व भागांना महापालिकेच्या टँकरद्वारे पाणी वितरण करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवतीची सोशल मीडियावर बदनामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फेसबुकवर युवतीचे फोटो क्रॉप करून अश्लील आवाज वापरून व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी अनोळखीवर गुन्हा दाखल करण्यात आला. संबधित तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो क्रॉप करून व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ युवतीच्या गावातील युवकांना पाठवून बदनामी केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओएलएक्सवरून खरेदीतूनतरुणास अडीच लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ओएलएक्स अॅपवरून वाहन खरेदी करणाऱ्या तरुणाला दोन लाख ३१ हजार ८८० रुपयांचा गंडा घातला. राहुल हिंदुराव काटकर (वय ३५, रा. माळवाडी, टोप, ता. हातकणंगले) असे त्यांचे नाव आहे. पैसे देऊनही चारचाकी वाहन न मिळाल्याने त्यांनी कोल्हापूर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

काटकर शेती करतात. त्यांना ओएलएक्स अॅपवर ह्युदाई कंपनीची पांढऱ्या रंगाची क्रेटा मोटार विक्रीची जाहिरात पाहायला मिळाली. कार आवडल्याने त्यांनी अॅपवरील विशालशी संपर्क साधला. आपण आर्मीमध्ये असल्याने कारवर टॅक्स बसणार नसल्याचे सांगून त्याने मोटार पाच लाख २० हजार रुपयांना विकणार असल्याचे सांगितले. फिर्यादी काटकर यांनी विशाल, आर्मी ड्रायव्हर देवेंद्र सिंग, कुरिअर बॉय राकेश, संजना पीएस यांच्याशी मोबाइलवर चर्चा करून पेटीएमद्वारे दोन लाख ३१ हजार रुपये विशालला दिले. पण पैसे दिल्यानंतर मोटार न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर काटकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या समीकरणाने उलथापालथ

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्यामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व काँग्रेसच्या स्थापन होत असलेल्या नव्या सरकारमुळे जिल्ह्यातील आगामी राजकारणाची दिशाच बदलणार आहे. जिल्ह्यातील प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष निवडीच्यानिमित्ताने नव्या सत्ताकारणाचा सारीपाट मांडला जात असून भाजप व मित्रपक्षांच्या सत्तेला काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे कडवे आव्हान निर्माण असेल. त्याबरोबरच आगामी काळात होणाऱ्या गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये जर भाजप व मित्रपक्षांना दूर ठेवण्याचे ठरवले तर जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडू शकते. महापालिकेच्या राजकारणात सद्यपरिस्थितीत काँग्रेस आघाडीला उघड मदत देण्याचा शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला असून पुढील वर्षात होणाऱ्या निवडणुकीला ही आघाडी एकत्रित सामोरे गेली तर भाजप आघाडीला नक्कीच फटका बसेल.

'गोकुळ'मधील राजकारणाला वेग

माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता असलेल्या गोकुळमध्ये राज्यातील नव्या समीकरणाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोकुळमध्ये पक्षीय राजकारणावर निवडणूक लढवली जात नसली तरी त्या त्या पक्षाच्या नेत्यांच्या नेतृत्वामुळे आपोआपच पक्षीय लेबल चिटकवले जात आहे. नुकतेच महाडिक यांनी 'मी व पी. एन. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत' असे विधान करुन महाडिक व पी. एन. यांची मैत्री अजूनही कायम असल्याचा दाखला दिला. दुसरीकडे महाडिक थेट भाजपमध्ये गेले नसले तरी त्यांचा मुलगा व पुतण्याकडून केल्या जात असलेल्या राजकारणाने त्यांची साथ भाजपला आहे हे वेळोवेळी दिसून आले आहे. अशा परिस्थितीत विरोधक आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, चंद्रदिप नरके यांच्या पक्षांच्या आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होत असल्याने भाजपसोबत असणाऱ्या महाडिक गटाला गोकुळमधून हटवण्यासाठी या विरोधकांना आता बळ येणार आहे. महाडिक गटाला एकटे पाडण्यासाठी पी. एन. पाटील यांच्यावर विरोधकांकडून सोबत येण्यासाठी दबाव आणला जाऊ शकतो. त्यासाठी पक्षीय पातळीवरही हालचाली झाल्यास नवल वाटणार नाही. याबाबत पी. एन. पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सत्ताधारी गटाला मल्टिस्टेट ठराव रद्द करण्यास भाग पाडल्यानंतर विरोधकांची ताकद वाढली आहे. या वातावरणात होणाऱ्या निवडणुकीत पक्षीय निष्ठा महत्वाच्या ठरणार की गटतटाचे राजकारणच पुन्हा रंगणार यावर गोकुळमधील सत्ताधारी ठरणार आहेत.

सहकार क्षेत्रातही बदलाचे संकेत

आगामी वर्षात जिल्ह्यातील राजकारणाचे प्रमुख सत्ता केंद्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबरोबरच बाजार समितीची निवडणूक होत आहे. त्याशिवाय मोठ्या साखर कारखान्यांच्याही निवडणूक होणार आहेत. जिल्हा बँकेमध्ये सर्व पक्षांचे संचालक आहेत. विविध गटांमध्ये निवडणूक होत असल्याने आतापर्यंत ती बिगरपक्षीय होत आली आहे. नव्या समीकरणामुळे संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचे ठरवल्यास भाजपला पाठींबा दिलेले व महाडिक यांना मानणाऱ्या संचालकांना विरोधी पॅनेल करावे लागेल, असे दिसते. सध्या जिल्हा बँकेत भाजपचे अशोक चराटी हे एकमेव संचालक असले तरी भाजपला पाठींबा दिलेले आमदार प्रकाश आवाडे व त्यांचे समर्थक विलास गाताडे तसेच जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे व सर्जेराव पाटील त्यांच्यासोबत जाऊ शकतात. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा आतापर्यंत भाजपच्या बाजूने कल होता. पण ते यापुढे कोणती भूमिका घेतात यावर पुढील राजकारण अवलंबून राहणार आहे. येथे भाजपसाठी महाडिक व कोरे एकत्र येतील याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे आगामी कालावधीत या साऱ्यांच्या भूमिका महत्वाच्या ठरणार आहेत. त्याबरोबर बाजार समितीची निवडणूकही सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. येथेही सर्व पक्षांनी मिळून सत्ता मिळवली असून आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे आणि शेतकरी कामगार पक्ष सत्तेत आहेत. त्यामुळे हेच समीकरण कायम राहणार की नव्या समीकरणातून बदलाचे वारे वाहणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत शिवसेना उजळमाथ्याने ‘सत्तारुढां’सोबत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीमुळे महापालिकेच्या सत्तारुढ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला शिवसेनेच्या नगरसेवकांचा उघड पाठिंबा मिळणार आहे. परिणामी प्रत्येक निवडीत संख्याबळासाठी कराव्या लागणाऱ्या धावपळीपासून त्यांची सुटका होईल. सत्तेचे समीकरण अबाधीत राहिल्यास पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीवर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

राज्यात सर्वत्र भाजपची सत्ता असताना महापालिकेवर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने विजयाचा झेंडा फडकावला. काठावरील बहुमत असल्याने शिवसेनेच्या चार नगरसेवकांना सत्तेत सहभागी करून घेतले. त्यासाठी त्यांना परिवहन समितीचे सभापतिपद देण्यात आले. मात्र नंतरही प्रत्येक महापौर निवडीत किंवा अन्य विषय समित्यांच्या सभापती निवडीवेळी त्यांना आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी नेहमीच चुचकारावे लागले. महापौर निवडीवेळी कधी तटस्थ तर कधी गैरहजर राहून त्यांनी सत्तारुढ गटाला पोषक भूमिका घेतली. पण या पाठिंब्यासाठी सत्तारुढ आघाडीला नेहमीच त्यांच्या नाकदुऱ्या काढव्या लागल्या.

आता राज्यात सत्ताबदल घडल्यामुळे सेनेचे सर्व नगरसेवक उघडपणे भूमिका घेतील. त्यामुळे बहुमतासाठी करावी लागणारी धावपळ पूर्णपणे थांबेल. याचा परिणाम पुढील वर्षी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. निवडणूक पॅनेलनुसार होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भाजप-ताराराणी आघाडीला रोखण्यासाठी महाविकास आघाडी येथेही आकाराला येईल. त्यातून सत्तेची समिकरणेच बदलण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेत बदलाचे वारे !

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महाराष्ट्र विकास आघाडीची पुनरावृत्ती जिल्हा परिषदेत होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यास येथे सत्ताबदल होऊ शकतो. आगामी अध्यक्षपद व इतर समित्यांच्या सभापती निवडीत सत्तारुढ भाजप आघाडीची कसोटी लागेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना येथे पुन्हा सत्तेची जुळवाजुळव करताना कसरत करावी लागणार आहे.

शिवसेनेचे दहा आणि आबिटकर गटाचे दोन असे एकूण १२ सदस्य आहेत. मात्र हे सदस्य सहा नेत्यांमध्ये विभागले आहेत. ते एकवटल्यास शिवसेना किंगमेकर ठरू शकते. सध्यस्थितीमध्ये शिवसेनेचे बारापैकी सात सदस्य भाजप आघाडीसोबत तर पाच सदस्य काँग्रेस आघाडीसोबत आहेत. गेल्या अडीच वर्षांत काही जणांना पद मिळाले नाही. त्यामुळे छोटे घटक भाजपवर नाराज आहेत. जिल्हा परिषदेत एकूण ६७ सदस्य असून बहुमतासाठी ३४ सदस्यांची आवश्यकता आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला चांगले यश मिळाले. जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचे सूत जुळले आहे. त्यांच्याकडून जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली आहेत. मात्र प्रत्येक तालुक्यातील स्थानिक राजकारणामुळे सेना एकवटणार का? हा प्रश्न आहे. दुसरीकडे आमदार प्रकाश आवाडेंनी भाजपाला पाठिंबा दिला. त्यांच्या गटाचे दोन सदस्य भाजप आघाडीसोबत आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाचे सहा सदस्य आहेत. तो भाजपचा सहयोगी पक्ष आहे. बदलत्या घडामोडीत जनसुराज्यचे आमदार विनय कोरे काय करणार याची उत्सुकता आहे. ते भाजपसोबत जाणार की पूर्वीप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादीचा दोस्ताना निभावणार यावरही सत्तेचे गणित बदलेल.

विकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता

अडीच वर्षांपूर्वी सत्ता स्थापनेवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि युवक क्रांती दलाचे प्रत्येकी दोन, माजी आमदार सरुडकर गट दोन आणि अपक्ष सदस्य रसिका पाटील, मिणचेकर गटाच्या एका सदस्याने भाजपाला पाठिंबा दिला. आता हे सदस्य दोन्ही काँग्रेससोबत जाण्याची शक्यता आहे. सध्या भाजपकडे ३७ तर काँग्रेसकडे २८ सदस्य आहेत. गेल्यावेळी काँग्रेस आघाडीचे तीन सदस्य अध्यक्ष निवडणुकीपासून दूर राहिले. आता काँग्रेस आघाडी त्यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीकडून जुळवाजुळव

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आठ दिवसांपूर्वी विविध गटप्रमुखांशी चर्चा केल्याचे समजते. बहुमतासाठी आवश्यक ३४ संख्याबळाची जुळवाजुळव सुरू आहे. राज्याचे मंत्रीमंडळ अस्तित्वात आल्यानंतर जिल्ह्यात या घडामोडी वेगावतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नशीब आजमविण्यासाठी गाठले पुणे

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दहावीचा अभ्यास करण्याची तयारी नव्हती. भविष्यात शिक्षणाची आवड नसल्याने आपली प्रगती होणार नाही, अशी खूणगाठ त्या दोघांनीही मनाशी बांधली. घरातून आणि मित्रांकडून काही पैसे घेतले आणि नशीब आजमविण्यासाठी पुणे गाठले. तेथे रेल्वे स्टेशनसमोरील एका हॉटेलमध्ये वेटरचे बारा-बारा तास काम केले. मात्र, नऊ दिवसानंतर घरच्यांची आठवण झाल्याने फोन केला आणि पोलिसांना त्यांचे मोबाइल लोकेशन सापडले. पोलिसांनी समुपदेशन करून दोन्ही मुलांना बालसुधारगृहात दाखल केले. अखेर मंगळवारी रात्री ही मुले घरी परतली आणि दोन्ही कुटुंबांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. सांगरुळ (ता. करवीर) येथील ऋषिकेश कृष्णात नाळे (वय १६) आणि श्रेयस विजय पोवार (१५) या दोन शाळकरी मुलांची ही कथा.

ऋषिकेश आणि श्रेयस १४ नोव्हेंबरपासून बेपत्ता झाले. ऋषिकेश सांगरुळ हायस्कूलमध्ये दहावीत शिकतो. श्रेयसचे दहावीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. दोघेही जीवलग मित्र. ऋषिकेश शाळेला जातो, असे सांगून १४ नोव्हेंबरला घराबाहेर पडला. सोबत त्याचा मित्र श्रेयस पोवारही होता. दोघे गायब असल्याचे लक्षात आल्यावर पालकांनी करवीर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला होता.

दोघेही सांगरुळमधून दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागून कोल्हापुरात आले. रंकाळा स्टँडवरून चालत रेल्वे स्टेशनकडे आले. तेथून दुपारी साडेतीनच्या रेल्वेने पुण्याला पोहोचले. पुण्यात कोणीच ओळखीचे नसल्याने त्यांनी पहिलीच रात्र स्टेशनवरच उपाशीपोटी झोपून काढली. त्याच रात्री ऋषिकेशजवळील मोबाइल चोरीला गेला. दुसऱ्या दिवशी, १५ नोव्हेंबर सकाळी भूक लागली. त्यावेळी केवळ रेल्वेच्या तिकीटापुरते पैसे उरले होते. त्यांनी रेल्वे स्टेशनसमोरील हॉटेल गाठले. मालकाला 'आम्ही दोघे अनाथ आहोत. आम्हाला कामाची खूप गरज आहे. कोल्हापूरहून आलोय', असे सांगितले. दोघांची अवस्था पाहून हॉटेल मालकाने त्यांना वेटर म्हणून काम करावे लागेल, असे सांगितले. दुपारी बारा ते रात्री बारा अशी कामाची वेळ असून दोन्ही वेळचे जेवण, राहण्याची व्यवस्था आणि महिन्याला सात हजार रुपये द्यायचे ठरले. दोघांनीही ते मान्य केले.

नशीब आजमावायला गेलेल्या दोघांनी बारा-बारा तास वेटरचे काम केले. नऊ दिवसांनी ऋषिकेशला आई-वडिलांची आठवण झाली. दरम्यान मूळचा उत्तरप्रदेशचा असलेला त्याच हॉटेलमधील वेटरची ओळख झाली होती. त्याच्या मोबाइलवरुन ऋषिकेशने आई-वडिलांना फोन केला आणि खूप आठवण येत असल्याचे सांगितले. पाच मिनिटे तो आईसोबत बोलला. नंतर त्याने मोबाइल बंद केला. आई-वडिलांनी ही माहिती पोलिसांना दिली. सांगरुळ येथील रहिवासी पोलिस कॉन्स्टेबल तौफिक मुल्ला हे महामार्ग पोलिस म्हणून कार्यरत आहेत. यांनी मोबाइल लोकेशन शोधले. पुणे रेल्वेस्थानक हे शेवटचे लोकेशन दिसले. मुल्ला लोणावळा येथे ड्युटीवर होते. त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. मुल्ला यांनी सहकाऱ्यांसोबत पुणे रेल्वेस्थानक गाठले. परिसरात शोध घेतल्यावर ऋषिकेश आणि श्रेयस हे वेटरचे काम करताना दिसले. त्यांनी दोघांना समुपदेशन करून लोणावळा येथे आणले. तेथे जेवण दिले. मुल्ला यांच्या सहकाऱ्यांनी त्या दोघांशीही संवाद साधला. दोघांच्याही आई-वडिलांना किती त्रास झाला? तुमचे वागणे कसे चुकले हे सांगत भविष्यात अशी चूक करू नका, अशी समजूत काढली. २३ नोव्हेंबर रोजी 'त्या' दोघांना पोलिसांनी बालसुधारगृहात दाखल केले. सुधारगृहातील समितीने दोघांचे पुन्हा समुपदेशन केले. अखेर मंग‌ळवारी, २६ नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही घरी परतले आणि घरच्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

एक महिन्याची ओळख

श्रेयस मूळचा इस्लामपूरचा आहे. तो सांगरुळमध्ये मामा ज्ञानदेव नाळे यांच्याकडे राहतो. तो दहावी नापास झाला असून त्याने परीक्षेसाठी पुन्हा अर्ज भरला. मात्र अभ्यास होत नव्हता. त्याची ऋषिकेशची ओळख झाली. ऋषिकेशचे वडील कृष्णात बापू नाळे हे शेती करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाविकास आघाडीचा जल्लोष

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने बुध‌वारी शहरात जल्लोषाला उधाण आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने छत्रपती शिवाजी चौकात फटाक्यांची आतषबाजी करत जिलेबी, साखर वाटप करुन आनंदोत्सव साजरा केला. महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते यांच्या हस्ते नागरिकांना जिलेबी वाटप करण्यात आली. हलगी, घुमक्यांच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी चांगलाच ताल धरला.

प्रचंड नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचे सरकार गुरुवारी (ता. २८) स्थापन होणार आहे. सर्व तर्कविर्तकानंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्याची खात्री पटल्यानंतर तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा केला. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते आपल्या पक्षाचे ध्वज घेऊन दाखल झाले. महापौर अॅड. लाटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. शहरवासियांना जिलेबी वाटप केल्यानंतर जल्लोषाला उधाण आले.

'महाविकास आघाडीचा विजय असो' अशा घोषणा देत ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला. हलगी, घुमक्याच्या ठेक्यावर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ताल धरला. शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, राजू लाटकर, आदिल फरास, जयकुमार शिंदे यांनी ताल धरल्यानंतर कार्यकर्त्यांनी नाचून आनंद साजरा केला.

आनंदोत्सवात काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, नगरसेविका जयश्री चव्हाण, प्रतिज्ञा उत्तुरे, अनुराधा खेडकर, शोभा कवाळे, सेनेचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, माजी आमदार सुरेश साळोखे, नगरसेवक जय पटकारे, विक्रम जरग, इंद्रजित बोंद्रे, विशाल देवकुळे, सुहास साळोखे यांच्यासह महाविकास आघाडीचे नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी पालकमंत्र्यांनी कोल्हापूरला मागे नेले

'पाच वर्षांपूर्वी आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी मंत्रिपदाच्या माध्यमातून शहरासाठी भरघोस निधी दिला. त्या माध्यमातून अनेक योजना मार्गी लागल्या. राज्याचे दोन नंबर पद व शहराचे पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटील यांनी भाजप सरकारच्या माध्यमातून महापालिकेला विकासकामांसाठी निधी दिला नाही. विकासात्मक वृत्ती नसल्यामुळे त्यांनी शहराला दहा वर्षे मागे नेले. केवळ संघटन करून विकासाला तिलांजली दिली' असा आरोप स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

सेनेच्यावतीने अंबाबाईला साडी-चोळी अर्पण

आनंदोत्सवानंतर जिल्हा शिवसेनेच्यावतीने करवीर निवासिनी अंबाबाई देवीला साडी-चोळी अर्पण करण्यात आली. यावेळी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संजय पवार, सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे, विराज पाटील, शशिकांत बिडकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारतीय जैन संघटनेतर्फे मोफत प्लास्टिक सर्जरी

$
0
0

कोल्हापूर : भारतीय जैन संघटना कोल्हापूर शाखा, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, जैन डॉक्टर फेडरेशन आणि डॉ. शितल पाटील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३० नोव्हेंबर व एक डिसेंबर या कालावधीत मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर होणार आहे. संयोजक डॉ. शितल पाटील व जैन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश मुगळी यांनी ही माहिती दिली. अमेरिकेतील डॉ. राजलाला व त्यांचे सहकारी हे रुग्णांची तपासणी व सर्जरी करणार आहेत. शिबिराचे यंदाचे ११ वे वर्ष आहे. या शिबिरासाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे नावनोंदणी करणे आवश्यक आहे. यावेळी मंदा शहा, दिपक देसाई, राजू शहा आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इतिहास परिषदेचे उद्यापासून अधिवेशन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या २८ व्या अधिवेशनाचे आयोजन यावर्षी येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये होणार आहे. २९ व ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या परिषदेचे उदघाटन ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे असतील. याप्रसंगी श्रीमंत शाहू छत्रपती प्रमुख उपस्थित राहणार आहेत अशी माहिती ज्येष्ठ इतिहास संशोधक व परिषदेचे अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. पवार म्हणाले, 'गेल्या २७ वर्षापासून महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रात ही परिषत कार्यरत आहे. या परिषदेत मांडले जाणारे संशोधन प्रबंध संशोधन पत्रिकेच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचतात. तसेच संशोधन क्षेत्रात तसेच प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी परिषदेच्या अधिवेशनात इतिहासभूषण सु. ग. जोशी यांना सेतू माधवराव पगडी पुरस्कार देण्यात येणार आहे. महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीतर्फे देण्यात येणारा वाय. सी. बेंद्रे पुरस्कार मुंबई येथील पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. ज. प्र. जामखेडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. इतिहास संशोधक दिवंगत आप्पासाहेब पवार पुरस्कारासाठी प्रशासन अधिकारी डॉ. विवेक सावंत यांची निवड केली आहे.'

डॉ. पवार म्हणाले, 'अधिवेशनात प्राचीन काळ, मध्ययुगीन व आधुनिक काळ या तीन टप्प्यातील इतिहास संशोधनावर चर्चा व प्रबंध वाचन होणार आहे. प्राचीन विभागासाठी डॉ. श्रीकांत गणवीर, मध्ययुगीन विभागासाठी डॉ. अब्दुलगणी इमारतवाले, आधुनिक विभागासाठी डॉ. विजय कुलकर्णी सत्राध्यक्षपद भूषविणार आहेत. परिषदेमध्ये दीडशे विषयावर इतिहासातील संशोधन प्रबंध सादर केले जाणार आहेत. महाराष्ट्रातून ४०० संशोधक या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.'

पत्रकार परिषदेला डॉ. टी. एस. पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे, डॉ. रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधानगरी तहसीलदारांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राधानगरी तालुक्यातील मांजगाव, कासारवाडा, धामणवाडी येथील अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईकडे दुर्लक्ष करून कर्तव्यात कसुरी केल्याबद्दल तहसीलदार मीना निंबाळकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी ही कारवाई केली. या प्रकरणात सरवडे आणि कसबा वाळवे सजाचे सर्कल, मौजे माजगाव, कासारवाडा, धामणवाडीच्या तीन तलाठ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.

राधानगरी तालुक्यात विविध ठिकाणी बेकायदा गौण उत्खनन, क्रशर सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. याप्रकरणी सविस्तर चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांना दिले होते. मात्र त्यांनी मोघम स्वरूपाचा अहवाल दिला. उत्खनन करणाऱ्यांवर तातडीने दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र तसे केले नाही. परवानाधारकांनी केलेल्या उत्खननाची मोजमापे घेऊन अहवालही पाठवला नाही. अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांविरोधात कारवाई न केल्याने सरकारी महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस निंबाळकर यांना पाठवली आहे. त्यावर मुदतीत आलेला खुलासा समाधानकारक न वाटल्यास नियमानुसार पुढील कारवाई होईल, असेही म्हटले आहे. याच प्रकरणात उत्खनन सुरू असलेल्या गावातील तीन तलाठी, दोन सर्कलांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश तहसीलदार निंबाळकरांना दिले आहेत.

--------

तिपटीपेक्षा जास्त उत्खनन

धामणीवाडीतील दत्तात्रय ढेरे, दत्तात्रय तुकाराम पाटील यांच्या शेतातील ४०० ब्रास खनिज उत्खनानाला क्रशर मालक दत्तात्रय बळवंत पाटील (सरवडे) यांनी परवानगी घेतली होती. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त उत्खनन केले. कासारवाडीतील प्रकाश पाटील, अरूण पाटील यांच्या जमिनीतील १००० ब्रासची रॉयल्टी भरून क्रशर मालक विनायक राऊत यांनी परवाना घेतला होता. मात्र तेथे ३ हजार २४० ब्रासचे उत्खनन केले. माजगावातील मारूती पाटील यांच्या शेतातील ५०० ब्रास खनिज उत्खननाची परवानगी क्रशरमालक जगनाथ एकशिंगे यांनी घेतली होती. प्रत्यक्षात ३ हजार ६०४ ब्रासचे उत्खनन तेथे केल्याचे स्पष्ट झाले.

-----

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झूम’वरील वायू उत्सर्जनाची तपासणी

$
0
0

कोल्हापूर : कसबा बावडा येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कुजलेल्या कचऱ्यातून व आगीमुळे होणाऱ्या वायू उत्सर्जनाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी बुध‌वारी प्रकल्पस्थळी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाकडून मशिन बसविण्यात आली. दैनंदिन वायू उत्सर्जनाचा अहवाल तयार करून त्याची माहिती घेण्यात येणार आहे. मंगळवारी कॉमन मॅन संघटनेने कचरा प्रकल्पामधून निर्माण होणाऱ्या वायू उत्सर्जनाची पडताळणी केली आहे का? अशी विचारणा केली होती. त्याची दखल घेत प्रदूषण मंडळाने शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्र विभागाकडून मशिन उपलब्ध करून घेतली आहे. दुपारी मशिन प्रकल्पस्थळी कार्यान्वित करण्यात आली. चार दिवस प्रकल्पातील वायूची पडताळणी मशिनद्वारे करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल पर्यावरणशास्त्र विभागाकडून प्रदूषण मंडळाला प्राप्त होईल. दरम्यान गुरुवारी प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, महापालिकेचे पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, कॉमन मॅन संघटनेचे अॅड. बाबा इंदूलकर घनकचरा प्रकल्पाची पाहणी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टर्मिनल बिल्डिंगचे काम गतिमान

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर विमानतळावरील नवीन टर्मिनल बिल्डिंग आणि एटीसी टॉवरच्या कामाला गती आली आहे. हर्ष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून काम सुरू असून, दीड वर्षात ते पूर्ण होणार आहे. नवीन इमारतीमुळे कोल्हापूर विमानतळाचा चेहरामोहरा बदलणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात कोल्हापूर विमानतळावरून एक लाखाहून अधिक प्रवाशांनी विमान सुविधेचा लाभ घेतल्याने विमानतळाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

छत्रपती राजाराम महाराजांनी उजळाईवाडी येथे विमानतळाची उभारणी केल्यानंतर १९३९ मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. दक्षिण महाराष्ट्रातील पहिले विमानतळ म्हणून याची ख्याती होती. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र या विमानतळाकडे दुर्लक्ष झाले. काही काळ मुंबईसाठी प्रवासी विमानसेवा सुरू राहिली. मात्र, यात सातत्याचा अभाव होता. कोल्हापूरकरांसह लोकप्रतिनिधींच्या आग्रहामुळे अखेर केंद्र सरकारने उडान योजनेंतर्गत कोल्हापुरातून प्रवासी विमानसेवा सुरू करण्यास परवानगी दिली. नोव्हेंबर २०१८ पासून नियमित विमानसेवा सुरू असून, सध्या हैदराबाद, बेंगलोर, तिरुपती या शहरांसाठी रोज विमानसेवा सुरू आहे. याशिवाय मुंबईसाठी आठवड्यातील पाच दिवस विमानसेवा सुरू आहे. अलाएन्स एअर, इंडिगो आणि ट्रू जेट कंपन्यांकडून सुरू असलेली विमानसेवा आणखी विस्तारण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातून अहमदाबाद, शिर्डी आणि गोव्यासाठी विमानसेवा सुरू व्हावी अशी आग्रही मागणी प्रवाशांकडून सुरू आहे.

प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणकडून कोल्हापूर विमानतळाच्या विकासाचे काम सुरू आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने २७२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यातून नवीन टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टॉवर, धावपट्टीचा विस्तार आणि संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. यापैकी संरक्षक भिंत आणि धावपट्टीचे काम अंतिम टप्प्यात आहे. हर्ष कन्स्ट्रक्शन कंपनीने टर्मिनल बिल्डिंगचे काम गतिमान केले आहे. विमानतळावर सध्या असलेल्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुला प्रशस्त जागेत ही इमारत आकाराला येत आहे. या दोन्ही इमारतींसाठी ७४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ३९०० चौरस मीटर जागेत ही इमारत होणार असून, दहा चेन-इन काउंटर असतील. ३०० प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध असतील. आठ ठिकाणी सुरक्षा तपासणी बुथ, एक व्हीआयपी लाउंज, ११० कारसाठी पार्किंग होणार आहे. दीड वर्षात हे काम पूर्ण होणार आहे.

नवीन इमारतीसाठी पर्यावरणपूरक बांधकाम सामग्री वापरली जात आहे. कोल्हापूरचा ऐतिहासिक लूक दिसावा, असा इमारतीचा आराखडा तयार केला आहे. नवीन इमारत कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारी ठरेल, असा विश्वास विमानतळ प्राधिकरणचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी व्यक्त केला. नवीन इमारत तयार झाल्यानंतर जुनी इमारत मालवाहतूक विमानसेवेसाठी वापरली जाणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात कोल्हापूर विमानतळावरील वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याचा कोल्हापूरच्या विकासासाठी हातभार लागणार आहे.

एक लाख प्रवाशांचे उड्डाण

कोल्हापूर विमानतळावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांनी नुकताच लाखाचा टप्पा पार केला. गेल्या वर्षभरात एक लाख दोन हजार प्रवाशांनी विमानातून प्रवास करून कोल्हापुरातील विमानसेवेची गरज अधोरेखित केली. विशेष म्हणजे नवीन विमानतळांच्या यादीत कमी कालावधीत सर्वात जास्त प्रवासी संखेत कोल्हापूर हे शिर्डीनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. शिर्डी, अहमदाबाद सेवा सुरू झाल्यानंतर प्रवासी संखेत मोठी वाढ होऊ शकते.

ऑप्स्टॅकल लाइटही बसवणार

विमानाच्या उड्डाण क्षेत्रात असलेल्या अडथळ्यांवर ऑप्स्टॅकल लाइट लावल्या जाणार आहेत. या कामाचे पैसे जिल्हा प्रशासनाकडून महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागास पोहोचले आहेत. यामुळे लवकरच या कामांची सुरुवात होणार असल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.

टर्मिनल बिल्डिंग आणि एटीसी टॉवर तयार झाल्यानंतर विमानतळावर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळ‌तील. वेळेत आणि दर्जेदार काम व्हावे यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. नवीन इमारतीमुळे विमानसेवा विस्तारण्यासही मदत होणार आहे.

- कमलकुमार कटारिया, संचालक, विमानतळ प्राधिकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>