Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रामानंदनगर येथे पाण्यासाठी रास्तारोको

$
0
0

कोल्हापूर: गेल्या चार दिवसांपासून रामानंद नगर व परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी सायंकाळी नागरिकांनी तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. नगरसेवक सुनील पाटील व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रामानंद नगरसह खंडोबा मंदिर, दत्त कॉलनी, रामानंद नगर तालीम मंडळ परिसरात गेल्या चार दिवसांपासून अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दुरुस्तीमुळे पाणी कमी दाबाने येत असल्याचे नागरिकांना सांगितले जात होते. दुरुस्तीनंतर रविवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला असताना रामानंद परिसरात मात्र आजही अपुऱ्या दाबाने पाणी आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रामानंद नगर पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्याबाबतची माहिती मिळताच प्रभागाचे नगरसेवक सुनील पाटील दाखल झाले. पाटील यांना आंदोलकाच्या संतापाला सामोरे जावे लागले. पूरस्थिती दरम्यान कोठे होता? असा प्रश्न करत त्यांना निरुत्तर केले. काहीवेळाने पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी दाखल झाले. तांत्रिक कारणाने पाणी येत नसल्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पण आक्रमक आंदोलकांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी केली. दोन तासांच्या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. चर्चेनंतर मंगळवारपासून नियमित पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात तुषार पाटील, विश्वजित कोरडे, संजय इंदूलकर, सतीश भालकर, संदीप इंदूलकर यांच्या महिला सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाचगावातील आरोग्य केंद्रासाठी साडे तीन कोटी मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाचगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जिल्हा परिषदेने साडेतीन कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. यापैकी एक कोटी ५० लाख रुपयांची तत्काळ तरतूदही केली. यामुळे पाचगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. जि. प. सदस्या मनीषा टोणपे यांचा या केंद्रासाठी प्रयत्न सुरू होते.

या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, जैताळ व हणबरवाडी या गावातील नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा मिळणार आहेत. गेली अनेक वर्षे प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय चर्चेत होता. पाचगाव ग्रामपंचायतीनेही यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीची उपलब्ध जागा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेने या केंद्रासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. महिनाभरात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे मतदारसंघातील विविध गावांना आरोग्य विषयक सुविधांचा लाभ होणार असल्याचे सदस्या टोणपे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात पावसाने दाणादाण

$
0
0

सोलापूर : सोलापूर शहरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस पडला. दोन तासांत सुमारे ११८ मिलीमीटर पाऊस पडल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले होते. घरांत पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. मंगळवार पेठ, मोदी, भैय्या चौक, कुमार चौक, अवंती नगरी या भागामध्ये पाणी साचले होते. पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग पूर्णतः बंद झाल्याने शहरवासियाची तारांबळ उडाली. दोन तासांत ११८ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. हा पाऊस शहर परिसरातच पडला. पावसाने काहीवेळ शहर जलमय झाले होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी रात्रीच्या सुमारास शहरात फिरून परिस्थितीची पाहणी केली. दिवसभर पावसाचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. उन्हाचा कडाका आणि उखाडा जाणवत होता. मात्र, सायंकाळी आभाळ भरून आले आणि रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास विजेच्या प्रचंड गडगडाटासह आडवा तिडवा बेफाम पाऊस सुरू झाला. पावसाचे रुद्ररूप पाहून अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. जवळपास दीड ते दोन तासांत पावसाने हाहाकार माजवला. निराळे वस्ती, लष्कर भागातील नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने पाणी थेट आजूबाजूच्या घरात शिरले. वैदू वस्तीत मोठे झाड घरावर पडले. पूर्व भागात एक दुचाकी नाल्यात वाहून गेली. रात्रीच्या पावसाने अद्यापही शहरातील प्रमुख चौक पाण्यातच आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिता भंगाचा गुन्हा प्रणिती शिंदेंवर दाखल करण्याचे आदेश

$
0
0

आचारसंहिता भंगाचा गुन्हा

प्रणिती शिंदेंवर दाखल करण्याचे आदेश

सोलापूर :

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी मेकअप बॉक्सचे वाटप केल्याप्रकरणी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

या बाबत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी तक्रार दाखल केली होती़ २१ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्याच वेळी आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाल्याचे जाहीर केले होते़ त्या नंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विडी घरकूल परिसरात मेकअप बॉक्सचे वाटप केल्याची पुराव्यानिशी तक्रार एका महिलेने माजी आमदार आडम मास्तर यांच्याकडे केली होती़ त्या नुसार आडम मास्तर यांनी मेकअप बॉक्ससह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. आमदार प्रणिती शिंदे यांनी गणेशोत्सवात मेकअप बॉक्स वाटप केल्याचे स्पष्टीकरण दिले होते. पण, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तक्रार आल्याने या प्रकरणाची शहानिशा होण्यासाठी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. या बाबत पोलिस तपास करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रियकराच्या मदतीने सासूचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

प्रेमसंबंध उघड होऊ नयेत, म्हणून प्रियकराच्या मदतीने सासू बसव्वा मल्लाप्पा पाटील (वय ६० ) हिचा खून करणाऱ्या सून आणि तिच्या प्रियकराला गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली. हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मालाश्री संतोष पाटील (वय २४) व तिचा प्रियकर रुपेश लब्यागोळ (वय २४, रा. हलकर्णी) यांना अटक करण्यात आली .

याबाबत अधिक माहिती अशी, हलकर्णी येथे संतोष मल्लाप्पा पाटील हा मालवाहतुकीचा व्यवसाय करतो. त्याचे स्वतःचे चारचाकी वाहन आहे. रविवारी संतोष तंगेहोळ (ता. अथणी, कर्नाटक) येथे भाडे घेऊन गेला होता. त्याच दिवशी रात्री संतोषची पत्नी मालाश्री हिने प्रियकर रुपेश याला घरी बोलावले होते. या दोघांना सासूने रंगेहात पकडले होते. या प्रकाराची वाच्यता होवू नये म्हणून दोघांनी सासू बसव्वा ही झोपली असता तिच्या डोक्यात लाकडी दंडुका मारून तिचा खून केला. दरम्यान, हलकर्णी येथे एका महिलेचा खून झाल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने फोन करून गडहिंग्लज पोलिसांना दिली. तपासासाठी पोलिस संतोष याच्या घरी गेल्यानंतर मालाश्रीने बनाव रचत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ‘मध्यरात्रीनंतर मास्क घालून आलेले दोन तरुण घरात घुसले. त्यांनी माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मी विरोध केल्यामुळेच सासूवर हल्ला करून त्यांनी तिचा खून केला,’ असा जबाब मालाश्रीने पोलिसांना दिला. दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान झाली. आजरा, चंदगड येथूनही पोलिस बोलावण्यात आले. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी अंगद जाधवर हे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. हलकर्णी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आल्यानंतर गावात रात्रीच्या वेळी कोणी आल्याचे आढळले नाही. त्यामुळे मालाश्रीविषयी पोलिसांच्या मनात संशय बळावला. तिला पोलिसी खाक्या दाखवताच प्रियकराच्या साथीने सासूचा खून केल्याची कबुली तिने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदयनराजेंना दिलासा; सातारा पोटनिवडणूक विधानसभेसोबतच

$
0
0

सातारा: सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबरच घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात डेरेदाखल झालेले उदयनराजे भोसले यांना दिलासा मिळाला आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर करताना सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नाही, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. मात्र आज (२४ सप्टेंबर) अधिसूचना जाहीर करत आयोगाने पोटनिवडणूक विधासभेसोबत घेण्याचे जाहीर केले.

राज्यातील स्थानिक सण, महोत्सव, मतदारसंघातील याद्यांचे काम आणि हवामानाची स्थिती पाहता आयोगाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शुक्रवार, २७ नोव्हेंबर या दिवशी राजपत्रित अधिसूचना निघणार असून, ४ ऑक्टोबर या दिवशी नामांकन पत्र भरण्याचा दिवस आहे. तर शनिवारी, ५ ऑक्टोबर या दिवशी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारिख आहे ७ ऑक्टोबर. विधानसभा निवडणुकीसोबतच २१ ऑक्टोबरला सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात येणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी आणि २७ ऑक्टोबरला निकाल घोषित करण्यात येणार आहे.

उदयनराजे भोसलेंना दिलासा

आता सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबतच होणार असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही हे स्पष्ट आहे. याच कारणामुळे साताऱ्याची निवडणूक रंगतदार होईल का याबाबत शंका निर्माण होत आहे. ही निवडणूक नंतर घोषित होण्याची घोषणा या पूर्वी झाल्याने राजीनामा दिलेले उदयनराजे एकटे पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. ही निवडणूक विधानसभेसोबतच घ्यावी असा स्वत: उदयनराजे भोसले यांचा आग्रह होता. शेवटी तसेच झाल्याने आता विधानसभा निवडणुकीचा सर्वच फायदे उदयनराजेंना पोटनिवडणुकीत मिळणार आहे.

मिळेल ते घ्यायचं की लढून मिळवायचं?; उद्धव बुचकळ्यात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीत हवालाच्या पैशांवर नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीत बेहिशेबी पैशांचा वापर करून मतदारांवर प्रभाव टाकू नये, यासाठी पोलिसांकडून हवालाच्या पैशांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे. विशेषत: कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात हवालाच्या मोठ्या रकमांची देवाण-घेवाण होते. यामुळे सीमाभागात संशयित वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे.

मोठ्या रकमांचे व्यवहार ऑनलाइन करणे केंद्र सरकारने बंधनकारक केले असले तरी, प्रत्यक्षात मात्र हवालामार्गे कोट्यवधींची देवाण-घेवाण सुरूच आहे. खासगी ट्रॅव्हल्स, खासगी प्रवासी वाहनांमधून मोठ्या रकमांची अवैध वाहतूक केली जाते. निवडणूक काळात अशा रकमांचा वापर राजकीय पक्षांसह उमेदवारांकडून मतदारांना आमिष दाखवण्यासाठी होऊ शकतो. शिवाय हवालाच्या पैशांमुळे निवडणूक काळात अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळू शकते. हा धोका ओळखून पोलिसांनी हवालाच्या रकमांवर विशेष नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर, सांगलीसह गोवा आणि कर्नाटकातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बॉर्डर कॉन्फरन्समध्ये हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी कोल्हापुरात पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक झाली. संशयित वाहनांच्या तपासणीसाठी सीमाभागात १४ ठिकाणी तपासणी नाके सुरू केले आहेत. या सर्व नाक्यांवर दोन्ही राज्यातील पथके समन्वयाने वाहनांची तपासणी करणार आहेत.

यापूर्वी निवडणुकांमध्ये अनेकदा हवालाच्या रकमा पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतही पोलिसांनी राज्यात बेहिशेबी रकमा जप्त केल्या होत्या. यातील कोट्यवधींच्या रकमांचा हिशेब अद्याप लागलेला नाही. यामुळे निवडणूककाळात बेहिशेबी रकमांची अवैध वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक बँका, पतसंस्था यांच्या रकमाही पोलिसांनी जप्त केल्या होत्या. बँकांनी त्यांच्या रकमांची वाहतूक करताना संबंधित पैशांचे पुरावे सोबत बाळगावेत. योग्य पुरावे सादर केल्याशिवाय जप्त केलेली रक्कम परत मिळणार नाही. यामुळे रोकड वाहतूक करणाऱ्या बँका, पतसंस्था, कंपन्यांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी दिल्या आहेत. बॉर्डर कॉन्फरन्ससाठी बेळगावचे आयजी राघवेंद्र सुहास, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, गोवा येथील पोलिस अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवार उभे राहिले तर निवडणूक लढणार नाही: उदयनराजे

$
0
0

सातारा: 'शरद पवार यांच्याबद्दल मला नितांत आदर होता, आहे आणि राहील. साताऱ्यातून ते लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले तर मी निवडणूक लढणार नाही,' असं साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केलं आहे.

राजेंना दिलासा; साताऱ्याची पोटनिवडणूक जाहीर

काही दिवसांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असलेले उदयन यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळं रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात विधानसभेसोबत २१ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं आजच ही घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसनं इथं जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. उदयनराजे यांच्याविरोधात खुद्द शरद पवार निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.

उदयनराजेंच्या विरोधात कोण? राष्ट्रवादीकडून पर्यायांची चाचपणी

त्या पार्श्वभूमीवर उदयन यांनी आज वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला. 'शरद पवारांबद्दल कालही आदर होता. आजही आहे आणि उद्याही राहील. आज महाळ आहे. पूर्वजांची आठवण काढण्याचा दिवस आहे, असं सांगताना ते भावूक झाले. त्यांच्यानंतर पवार साहेबच माझ्यासाठी आहेत. ते निवडणुकीला उभे राहणार असतील तर मी लढणार नाही. अर्ज भरणार नाही. पण दिल्लीतील बंगला आणि गाडीसाठी मला मुभा द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मी बेशिस्त नव्हतोच; उदयनराजेंचं सेनेला प्रत्युत्तर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेरीवाल्यांना दिवाळीपर्यंत मुभा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पूरस्थितीमुळे सर्वसामान्य फेरीवाल्यांचे आर्थिक नकुसान झाले असून दिवाळीपर्यंत त्यांना ताराबाई रोडवर बसण्याची परवानगी मंगळवारी देण्यात आली. महाद्वार चौक मोकळा ठेवण्याचा निर्णय घेताना येथे पट्टे आखून त्याजागेत स्टॉल माडणी करण्यात ठरले. त्यानंतर ताराबाई रोडवरील शेतकरी संघाच्या दुकानापासून पुढील रस्त्यावर पट्टे आखण्यास सुरुवात झाली. फेरीवाल्यांनी केलेल्या विनंतीनुसार महापालिका प्रशासनाने स्टॉल्सला मुभा दिली. मात्र दिवाळीनंतर पर्यायी जागेवरच व्यवसाय करावा लागणार असल्याचे प्रशासनाने बजावले आहे.

अंबाबाई मंदिराच्या पश्चिम दरवाजाजवळील फेरीवाल्यांना हटवताना ताराबाई रोडवरील मित्रप्रेम मंडळापर्यंतच्या रस्त्यावरील सर्व फेरीवाल्यांना हटवण्यात आले होते. कारवाईदरम्यान फेरीवाल्यांनी यास विरोध केला. पण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाईचा धडाका कायम ठेवला. नंतर फेरीवाल्यांनी नरमाईची भूमिका घेत प्रशासनाबरोबर चर्चा करण्यास सुरुवात केली. नवरात्रोत्सव जवळ आला असताना आणि नंतर दिवाळीदरम्यान रस्त्यावर व्यवसाय सुरू ठेवण्याची मागणी केली. पूरस्थितीमुळे प्रचंड नुकसान झाल्याने त्याचाही सहानुभूतीने विचार करण्याची मागणी केली.

त्यानुसार शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अतिक्रमण विभागप्रमुख पंडित पोवार हे ताराबाई रोडवर पाहणीसाठी आले. महेश उरसाल, नजीन देसाई, अविनाश उरसाल, राजेंद्र महाडिक, राजेंद्र सूर्यवंशी, हर्षल पाटील आदी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार महाद्वार रोडवरील डी. डी. शिर्के दुकान ते बिनखांबी गणेश मंदिर, वणकुद्रे दुकान ते मेहता कंपनी आणि शेतकरी संघ दुकानापासून पुढे फेरीवाल्यांनी स्टॉल मांडताना महाद्वार चौक मोकळा सोडवा असे ठरले. त्याला फेरीवाल्यांनी मान्यता दिली. चर्चेची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना देण्यात आली. पूरस्थितीचा विचार करून सणानिमित्त व्यवसाय करू दिला जाईल. पण नंतर निश्चित केलेल्या जागांवरच फेरीवाल्यांना बसता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. या निर्णयाला सर्व फेरीवाल्यांनी मान्यता दिली.

पट्टे आखण्यास सुरुवात

महाद्वार चौक मोकळा ठेवण्याचे निर्देश दिल्यानंतर तातडीने निश्चित केलेल्या जागेपासून पट्टे आखण्यास सुरुवात केली. प्रत्येक फेरीवाल्याला चार बाय चार जागा देण्याचे निश्चित झाले. पट्ट्याबाहेर एखादा स्टॉल आल्यास तातडीने कारवाई करण्याचा इशाराही दिला. त्यासाठी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रिक्षांमुळे कोंडी कायम

फेरीवाल्यांबाबतचा सर्वमान्य तोडगा निघाला. मात्र, रिक्षा स्टॉपबाबतचा विषय चर्चेला आला नाही. शहर वाहतूक शाखा याबाबतचा निर्णय घेणार असल्याने आजही रिक्षाची रांग दिसत होती. महाद्वार चौक फेरीवाल्यांपासून मुक्त झाला तरी रिक्षा व्यवसायिकांचा प्रश्न कायम राहिला.

पूरस्थिती व आचारसंहितेचा विचार करून फेरीवाल्यांना तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. दिवाळीनंतर मात्र फेरीवाल्यांचे कपिलतार्थ मार्केटमध्ये पुनर्वसन केले जाईल. त्यावेळी कोणतीही सबब प्रशासन ऐकून घेणार नाही.

- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंडखोरीच्या भीतीने लांबली यादी

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

Tweet@gurubalmaliMT

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असताना कोणत्याच पक्षाच्या उमेदवारांची यादी घोषित होत नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढत आहे. यादी तयार असूनही केवळ बंडखोरी होऊ नये म्हणून प्रत्येक पक्षाची यादी मुंबई आणि दिल्लीत चर्चेच्या पातळीवर अडकवण्यात आली आहे. पहले आप... पहिले आप... अशीच भूमिका युती आणि आघाडीसह इतर सर्वच पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे पंधरा दिवसांत मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे? असा प्रश्न भावी उमेदवारांना पडला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कोल्हापूर दक्षिण आणि शाहूवाडी या तीन मतदारसंघात दुरंगी लढत निश्चित आहे. येथील उमेदवारही ठरलेले आहेत. काही राजकारण बदलले तरी करवीरमध्ये काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार पी. एन. पाटील विरुद्ध शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे आमदार अमल महाडिक विरुद्ध काँग्रसचे उमेदवार ऋतुराज पाटील आणि शाहूवाडीत आमदार सत्यजित पाटील विरुद्ध माजी आमदार विनय कोरे यांच्यातच लढत होईल. त्यामुळे तिकीट कधी का जाहीर होईना, असे म्हणत हे सहा उमेदवार प्रचाराला लागले आहेत. या तीन मतदारसंघात बंडखोरी करण्यास फारसा वाव नाही. तिसऱ्या पक्षाकडे प्रबळ उमेदवारदेखील नाही. त्यामुळे आघाडी आणि युती झाली आहे असे समजून येथे प्रचाराने वेग घेतला आहे.

जिल्ह्यातील उर्वरीत सात मतदारसंघांत अजून मोठी संभ्रमावस्था आहे. युती होणार का? आघाडी झाली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यामध्ये असेल का? याचा फैसला झालेला नाही. त्यामुळेच उमेदवारांची नावेदेखील जाहीर झालेली नाहीत. यातील सर्वच मतदारसंघात इच्छूकांची संख्या अधिक आहे.

कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात नेमके घाटगे कोण? याचा निर्णय झाला नाही. एका घाटगेंना युतीने उमेदवारी दिली तर दुसरे घाटगे बंडखोरी करणार हे नक्की आहे. त्यामुळे येथे अप्रत्यक्ष तयारीचे संकेत दिले असले तरी अधिकृत घोषणा मात्र केली नाही. हीच अवस्था राधानगरीत आहे. के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्या वादात बंडखोरी टाळण्यासाठी दोघांनाही प्रतिक्षा करा असा आदेश देण्यात आला आहे.

चंदगडमध्ये लढण्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत. त्यामध्ये सेना व भाजपचे उमेदवार जास्त आहेत. यातील कुणालाही उमेदवारी दिली तर उर्वरीत उमेदवार बंडखोरी करणार असे चित्र आहे. भरमू सुबराव पाटील, गोपाळराव पाटील, संग्राम कुपेकर, रमेश रेडेकर अशा अनेकांची नावे आतापासूनच बंडखोरीच्या यादीत चर्चेत आहेत. सर्वच पक्षांची समान ताकद असणाऱ्या शिरोळचा तिढा सुटत नाही. येथेदेखील बंडखोरी होणार हे अधोरिखित आहे. आघाडी झाल्यास ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाईल. अशावेळी राजेंद्र पाटील यड्रावकर, गणपतराव पाटील हे कोणता झेंडा घेऊन मैदानात उतरतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. युती झाल्यास सेनेला जागा जाईल आणि अनिल यादव, माधवराव घाटगे बंडखोरी करतील अशी शक्यता आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप या चारही प्रमुख पक्षांना जिल्ह्यात बंडखोरीची भीती वाटत आहे. पक्षीय पातळीवर जागा वाटप आणि उमेदवार निश्चित असले तरी त्याची घोषणा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. युतीला जागा टिकवण्याचे तर आघाडीला जागा वाढविण्याचे आव्हान आहे. त्यामुळे बंडखोरीचा फटका बसू नये यासाठीच काळजी घेतली जात आहे. तीन दिवसांनंतर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. तोपर्यंत सर्वच मतदारसंघांतील यादी जाहीर होणे कठीण आहे.

येथे बंडखोरी शक्य

कागल : समरजित घाटगे, संजय घाटगे

चंदगड : संग्राम कुपेकर, गोपाळराव पाटील, रमेश रेडकर

राधानगरी : ए. वाय. पाटील, सत्यजित जाधव, जीवन पाटील

कोल्हापूर उत्तर : दौलत देसाई, सत्यजित कदम, वसंत मुळीक, चंद्रकांत जाधव

इचलकरंजी : अमृत भोसले, मदन कारंडे

शिरोळ : अनिल यादव, राजेंद्र पाटील, राजवर्धन निंबाळकर

हातकणंगले : अशोकराव माने, राजीव आवळे.

येथे होणार थेट लढत

दक्षिण : अमल महाडिक वि. ऋतुराज पाटील

करवीर : चंद्रदीप नरके वि. पी. एन. पाटील

शाहूवाडी : सत्यजित पाटील वि. विनय कोरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांच्या विकासकामाचा ‘हायमास्ट’ उजेड

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:@satishgMT

कोल्हापूर : जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या नजरेत 'विकास' भरण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील चौक हायमास्ट दिव्यांनी उजळून टाकले जाणार आहेत. निवडणूकीच्या पूर्वसंध्येला लोकप्रतिनिधींनी ३३ ठिकाणी हायमास्ट दिवे उभारणीसाठी ७७ लाख रुपयांचा निधी खर्ची घातला आहे. तर गेल्या दोन वर्षात खासदार, आमदारांनी सव्वादोन कोटी रुपयांचा निधी हायमास्ट दिव्यांवर खर्च केला आहे.

आमदारांना दरवर्षी तीन कोटी रुपयांचा निधी मिळतो. या निधीतून विविध विकासकामे केली जातात. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना, जिल्हा नियोजन मंडळातूनही विकासकामे होतात. रस्ते, उद्याने, दिवे, समाजमंदिर बांधकाम, शाळा उभारणीसाठी निधी मिळवला जातो. गेल्या पाच वर्षांत लोकप्रतिनिधींनी नाविन्यपूर्ण योजनेतून ओपन जीम उभारल्या आहेत. मंडळे, तालीम मंडळांना आकर्षित करण्यासाठी व्यायामशाळांतील साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे.

सध्या जिल्ह्यामध्ये स्ट्रीट लाइटऐवजी हायमास्ट दिव्याची क्रेझ आहे. तालमी, मंडळांकडून मागणी केल्यानंतर आमदारांकडून हायमास्ट दिवे उभारले जात आहेत. सुंमारे चाळीस फूट उंच खांबावर पाच ते सहा एलईडी बल्ब चौक उजळून टाकतात. त्यामुळे परिसरातील मंडळे व तालमी खूष होत असल्याने लोकप्रतिनिधीकडून हायमास्ट दिव्यांवर निधी खर्च करण्यासाठी स्पर्धा लागली आहे.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ३३ ठिकाणी हायमोस्ट उभारण्यासाठी ७० लाख ८८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये शिरोळ मतदारसंघात सर्वाधिक १४ ठिकाणी दिवे उभारण्यात येणार आहेत. दिव्यांच्या वॅटच्या संख्येवर बजेट ठरवले गेले आहेत. शिरोळमध्ये १४ ठिकाणी प्रत्येकी एक हायमास्टवर एक लाख ४० हजार रुपये खर्च होतील. यासाठी अंदाजे २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. शाहूवाडी आणि आजरा तालुक्यात प्रत्येकी एका ठिकाणी हायमास्टसाठी निधीची तरतूद केली आहे. आजरा नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये आठ लाख ५४ हजार रुपयांचा निधी हायमास्टवर खर्च होणार आहे. इचलकरंजी, कोल्हापूर दक्षिण, उत्तर मतदारसंघात प्रत्येकी पाच ठिकाणी विद्युत व्यवस्थेवर निधी खर्च पडणार आहे.

टर्फ ग्राऊंडवर विद्युत व्यवस्था

कोल्हापूर उत्तर मतदार संघातील शिपुगडे तालीम, दुधाळी, फिरंगाई, राजारामपुरीसह मंगळवार पेठेतील विविध खेळांच्या मैदानावर विद्युत व्यवस्था उभारली जाणार आहे. त्यासाठी १२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

कोल्हापूर शहरात १८ ठिकाणी हायमास्टसाठी पोल उभारण्यात आले आहेत. त्यासाठी एलइडी बल्बचा वापर होत असल्याने वीज बिल कमी येते. निधी उपलब्ध होईल तशी याची संख्या वाढत जाईल.

- नेत्रदीप सरनाईक, शहर अभियंता, महानगरपालिका

मतदारसंघाचे नाव पोलची संख्या निधी रक्कम

शाहूवाडी १ १ लाख ३९ हजार

इचलकरंजी ५ १६ लाख ९५ हजार

शिरोळ १४ २० लाख ८६ हजार

करवीर २ ४ लाख ५६ हजार

कोल्हापूर दक्षिण ५ ७ लाख २० हजार

कोल्हापूर उत्तर ५ ११ लाख १४ हजार

आजरा १ ८ लाख ८४ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन, उद्योगाला चालना द्या

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'कोल्हापूरला ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभला आहे. गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि निसर्गाची मुक्त हस्ते उधळण यामुळे पर्यटनाला मोठा वाव आहे. सरकारने, कोल्हापूर हे पर्यटन शहर म्हणून विकसित करावे, इंडस्ट्रीज क्षेत्राला सवलती द्याव्यात. यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल' असा सूर नागरिकांतून 'मटा कट्टा'येथे उमटला.

ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या चौपाटीवर आयोजित 'मटा कट्टा'मध्ये नागरिकांनी शहरांशी निगडीत प्रश्नांना वाचा फोडली. शहरवासियांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा, सुरळीत वाहतूक व पार्किंगची व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण यासाठी सरकारने कृती कार्यक्रम आखला पाहिजे. शहराची वाढ होत असताना रस्ते मात्र अरुंद आहेत. प्रमुख मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूल गरजेचे आहेत. याकडेही नागरिकांनी लक्ष वेधले.

केमटीतील निवृत्त कर्मचारी सुभाष सावंत म्हणाले, 'शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणून केएमटीकडे पाहिले जाते. सरकारने केएमटीला बळकटी देण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा. सरकारमार्फत जादा बस उपलब्ध कराव्यात. केएमटीचा कार्यभार पूर्ण वेळ सांभाळण्यासाठी आयएएस दर्जाचा अधिकारी नेमावा.'

खरी कॉर्नर परिसरातील रामहरी इंगवले यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत पेन्शनचा प्रश्न सरकारने अग्रक्रमाने सोडवावा अशी मागणी केली. ते म्हणाले, 'एपीएस ९५ ही जुनी पेन्शन योजना लागू नाही. कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम, पेन्शन मिळाली नाही. राज्य सरकारने निवृत्तांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी.'

अंबाई टँक येथील जे. व्ही. कुलकर्णी यांनी शहरवासियांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा झाला पाहिजे. थेट पाइपलाइन योजनेचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी आवश्यक निधी व इतर बाबींची पूर्तता करावी. ठराविक कालावधीत योजना पूर्ण करण्याविषयी महापालिकेवर सक्ती करावी' अशी मागणी केली.

शिवाजी पेठेतील पांडूरंग दरेकर यांनी बेरोजगारीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. दरेकर म्हणाले, 'तरुणांच्या हातांना काम मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला दाम हवा. शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी जाहीर करण्यात आली, मात्र सरसकट शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. इंडस्ट्रीजला वाव, नोकर भरती सुरू केल्यावर अनेकांना रोजगाराच्या संधी मिळतील.'

अंबाई टँक परिसरातील रामचंद्र देवार्डे-देसाई म्हणाले, 'समाजातील गरीब, श्रीमंतातील दरी मिटवण्यासाठी गरीबी हटावसारख्या योजना झाल्या. पण समाजातील चित्र काही बदलले नाही. समाजातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखले पाहिजेत. बेरोजगारीचा प्रश्न सोडविला पाहिजे. कोल्हापूर शहर खड्डेमुक्त करण्यासाठी सरकारने निधीचा पुरवठा करावा.'

याप्रसंगीच्या चर्चेत लक्ष्मण कांबळे, पवनकुमार रावळ, सोपान कुमठेकर आदींनी सहभाग घेतला.

गैरप्रकारांना चाप हवा

सुब्रम्हण्य बालिगा म्हणाले, 'कोल्हापूर शहर विस्तारत आहे. नागरिकीकरण वाढत आहे. या बाबींचा विचार करुन सरकारने सुनियोजित शहर विकासाचा अजेंडा राबवायला हवा. कोल्हापुरात पर्यटक व भाविकांचा बारा महिने ओघ असतो. पर्यटन क्षेत्राला वाव देण्यासाठी सगळया प्रकारच्या सुविधा निर्माण कराव्यात. अंबाबाई मंदिर परिसरातील रस्ते अरुंद आहेत. खरे तर, शहरातील रस्ते प्रशस्त हवेत. परिसर अतिक्रमणमुक्त असायला पाहिजे. भाविकांच्या सोयीसाठी उत्तम वाहनतळ, स्वच्छतागृहांची उपलब्धता, चांगल्या दर्जाची निवासी व्यवस्था करायला हवी.' तर वासंती बालिगा म्हणाल्या 'स्वच्छ व पारदर्शी कारभार असायला हवा. प्रशासनातील गैरप्रकारांना चाप लागला पाहिजे. तरच विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे.'

नागरिक काय म्हणतात

- सरकारने रोजगार निर्मिती करावी

- शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी वाहनतळाची उभारणी

- प्रमुख मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डानपूल

- कोल्हापूरच्या इंडस्ट्रीजसाठी सुविधा पुरवाव्यात

- केएमटीला बळकटी देण्यासाठी निधीचा डोस आवश्यक

- अंबाबाई मंदिर परिसर विकासाला चालना

- शहरवासियांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोळा वर्षांवरील रिक्षांना दिलासा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सोळा वर्षांवरील रिक्षा स्क्रॅफ करण्याच्या निर्णयाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. ३१ मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने जिल्ह्यातील सुमारे चार हजार रिक्षाचालकांना दिलासा मिळाला. दरम्यान, डिझेल आणि पेट्रोल इंजिन रिक्षांना गॅसकिट बसवल्यास आणखी एक वर्षाची मुदतवाढ मिळणार आहे.

डिझेल आणि पेट्रोल इंजिनवरील रिक्षा पर्यावरणाला हानीकारक असल्याने गॅसवर चालणाऱ्या रिक्षांनाच रस्त्यांवरून धावण्याचा परवाना मिळणार आहे. या निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजार रिक्षा स्क्रॅप ठरणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी एप्रिल २०१९ पासून सुरू होणार होती. मात्र, रिक्षाचालकांनी विरोध केल्याने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने याला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. दिलेली मुदतवाढ ३० सप्टेंबरला संपणार होती. मात्र, महापुरामुळे नुकसान झाल्याने गॅसकिट बसवण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी रिक्षाचालक संघटनांनी आरटीओ अधिकाऱ्यांकडे केली होती. यानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरणने सोळा वर्षांवरील रिक्षांना पुन्हा सहा महिन्यांची मुदत वाढ दिली. प्राधिकरणमध्ये पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि आरटीओ अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस यांचा समावेश आहे.

मुदतवाढीच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे चार हजार रिक्षाचालकांना दिलासा मिळाला. सहा महिन्यात डिझेल आणि पेट्रोल इंजिनचे गॅसकिटमध्ये रुपांतर केल्यास या रिक्षांना आणखी एक वर्षाची मुदतवाढ मिळणार आहे. त्यानंतर मात्र १८ वर्षांवरील रिक्षा स्क्रॅप केल्या जाणार आहेत. वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा रस्त्यावर आढळल्यास संबंधित रिक्षाचालकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यामुळे १६ वर्षांवरील रिक्षांचे गॅसकिटमध्ये रुपांतर करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अल्वारिस यांनी केले आहे.

पर्यावरण रक्षणासाठी होणार मदत

वयोमर्यादा संपत आलेल्या डिझेल आणि पेट्रोल इंजिन रिक्षा मोठ्या प्रमाणात धूर सोडतात. धूर तपासणी केंद्रांकडून काटेकोर तपासणी होत नसल्याने बोगस तपासणी प्रमाणपत्र घेऊन अशा रिक्षा रस्त्यांवर धावतात. यामुळे हवा प्रदूषणात वाढ होते. वयोमर्यादा संपलेल्या रिक्षा स्क्रॅप केल्यानंतर प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

महापुराने बसलेला फटका आणि रिक्षाचालकांच्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने सोळा वर्षांवरील रिक्षांना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ३१ मार्च २०२० पर्यंत या रिक्षा रस्त्यांवर धावतील. त्यानंतर मात्र अशा रिक्षा स्क्रॅप केल्या जातील.

- डॉ. एस. टी. अल्वारिस, प्रादेशिक परिवहन अधिकारी

४०००

सोळा वर्षांवरील रिक्षा

३००

डिझेल इंजिन रिक्षा

३७००

पेट्रोल इंजिन रिक्षा

(धूर सोडणाऱ्या रिक्षाचा एखादा फाइल फोटो वापरावा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांच्या गर्दीनेउमेदवारीसाठी स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेनेसह प्रमुख पक्षांत इच्छुकांत गर्दी झाल्याने उमेदवारीसाठी स्पर्धा वाढली आहे. यामुळे उमेदवारीसंबंधी संभ्रम वाढत जात आहे. भाजप, शिवसेनेकडून उमेदवार म्हणून नवे चेहरे समोर येत आहेत. यामुळे पाच वर्षांपासून तयारी करीत असलेल्या निष्ठावंत इच्छुकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर आणि त्यांच्या कन्या नंदिनी बाभूळकर यांनी ऐनवेळी निवडणूक मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे या मतदारसंघात भाजपमधून इच्छुक असलेले उमेदवारीसाठी जोरदार तयारी करीत आहेत. सध्या काँग्रेसमधून राजेश पाटील, शिवसेनेकडून संग्रामसिंह कुपेकर प्रा. सुनील शिंत्रे, विजय देवणे, भाजपकडून रमेश रेडेकर, गोपाळ पाटील, भरमू पाटील, शिवाजी पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजेंद्र गड्यान्नावर रिंगणात येण्यासाठी तयारी केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मूळचे आजरा तालुक्यातील आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्याचे स्वीय सहायक प्रकाश बेलवाडे यांची नावेही चर्चेत आली आहेत. इच्छुकांच्या भाऊगर्दीने उमेदवारी कोणास मिळणार, यासंबंधी उत्सुकता निर्माण झाली आहे.

कुपेकर किंवा बाभूळकर यांचा निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम राहिल्यास राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीची उमेदवारी राजेश पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे. भाजप, शिवसेना आघाडी झाल्यास ही जागा कुणाकडे जाणार यावर उमेदवार ठरणार आहे. मात्र भाजपला जागा गेल्यास स्वपक्षात आणि शिवसेनेतील इच्छुकांतील बंडखोरी अटळ आहे. कोणत्याही परिस्थिती रिंगणात उतरायचेच असा निर्धार करून तयारी केलेले रिंगणात राहिल्यास पक्षाच्या अधीकृत उमेदवाराची डोकेदुखी वाढणार आहे. म्हणून जिल्ह्यात या मतदारसंघाच्या उमेदवारांकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज जनजागृती रॅली

$
0
0

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्यावतीने बुधवारी (ता. २५) शहरातून प्लास्टिकमुक्त जनजागृती रॅली आयोजित केली आहे. वरुणतीर्थवेस गांधी मैदान येथून सकाळी दहा वाजता रॅलीस सुरुवात होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली काढण्यात येणार असून बिंदू चौकात रॅली समाप्त होणार आहे. महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत नुकतीच रॅलीच्या नियोजनासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. रॅलीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटगे गटांतील तिढा कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरणाच्या कालावधी जवळ आलेला असताना शिवसेनेचे संभाव्य उमेदवार संजय घाटगे व भाजपचे संभाव्य उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्यात उमेदवार कोण याबाबतचा तिढा अद्यापही कायम आहे. युतीचा निर्णय होत नसल्याने उमेदवारीबाबतचा संभ्रम कायम असला, तरी दोन्ही घाटगे गटांनी मेळाव्याच्या माध्यमातून गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तर उमेदवारी पक्की असल्याने राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनाही प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. युतीच्या निर्णयाकडे कागल मतदारसंघाचे डोळे लागले आहेत.

कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार मुश्रीफ एकमेव दावेदार असल्याने त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब मेळाव्याच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. मात्र त्यांच्या विरोधात एक की दोन उमेदवार असणार याबाबतचा सस्पेन्स या मतदारसंघात कायम आहे. पुर्वीच्या फॉर्म्युलानुसार हा मतदारसंघ शिवसेनेकडे असला, तरी गेल्या चार वर्षांपासून भाजपकडून शाहू कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे तयारी करत आहेत. कारखाना, बँकेच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी जोरदार संपर्क वाढवला आहे. त्याचवेळी गेल्या निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभव झालेले संजय घाटगे यांनीही मतदारसंघ सेनेकडे असल्याने त्यांनीही गाठीभेटी वाढवल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण मंडळाचे सभापती अंबरिश घाटगे यांनाही निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

राज्यस्तरावर भाजप-युतीचे त्रांगडे अद्याप सुटू न शकल्याने कागलमध्ये दुरंगी की तिरंगी लढत होणार याबाबतची कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. युती जाहीर झाल्यानंतर आमदार मुश्रीफ विरोधातील उमेदवार निश्चित होणार आहे. त्याचवेळी बंडखोरीचा प्रश्नही निकालात निघणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षांरंभी ‘विभाव’ आता नव्या रुपात

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विभाव... तऱ्हा पुस्तकांच्या या अभिवाचन उपक्रमांतर्गत शनिवारी (ता. २८) प्रख्यात नाटककार सतीश आळेकर यांचे अभिवाचन ऐकण्याची पर्वणी कोल्हापूरच्या रसिकांना मिळणार आहे. शिवाजी उद्यमनगरातील इंजिनीअरिंग असोसिएशनच्या माधवराव बुधले सभागृहात सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

गेल्या वर्षभरापासून उत्तमोत्तम साहित्यकृतींचे अभिवाचन विभाव या मंचावरून केले जात आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आयोजित करण्यात येणारा हा कार्यक्रम आता चौथ्या शनिवारी होणार आहे. प्रख्यात लेखक, सतीश आळेकर यांच्या अभिवाचनासह हा कार्यक्रम सादर होणार आहे. यापूर्वी आलेल्या पूरस्थितीमुळे हा प्रयोग रद्द करण्यात आला होता. आता आळेकर सरांच्या अभिवाचनाने 'विभाव'चे नवे वर्ष आरंभ होत आहे. साधारण एक तासाच्या या कार्यक्रमासाठी प्रवेशिकेचे स्वागत मूल्य ५० रुपये आहे. 'विभाव'च्या प्रवेशिका नागाळा पार्कातील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात उपलब्ध आहेत. त्याशिवाय गुगल पेवरूनही पैसे पाठवून ऑनलाइन प्रवेशिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रवेशिकांसाठी सर्जनशाळा ९४०४२३०८०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाईच्या दागिन्यांना झळाळी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शारदीय नवरात्रोत्सवासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नित्य व उत्सवकाळातील सोने व चांदीचे जडावी दागिन्यांची स्वच्छता मंगळवारी करण्यात आली. देवीसाठी बनवण्यात आलेली सोन्याची पालखीही स्वच्छतेनंतर झळाळली. मंगळवारी दिवसभर गरूड मंडप येथे दागिन्यांची स्वच्छता सुरू राहिल्याने सुरक्षायंत्रणा कडक करण्यात आली होती.

दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराची स्वच्छता तसेच देवीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात येते. रविवारी घटस्थापनेपासून नवरात्र उत्सवाला सुरूवात होत आहे. साडेतीन पीठापैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात नऊ दिवस देवीची विविध रूपात जडावी सालंकृत पूजा बांधण्यात येते. तसेच देवीसाठी नित्यालंकारासह नवरात्र काळात उत्सवासाठी महत्त्वाचे पारंपरिक दागिने देवीला परिधान केले जातात. यामध्ये पुतळ्याची माळ, साज, लफ्फा, कमरपट्टा, मुकूट, पाऊल, चंद्रहार, पोहेहार, बोरमाळ, ठुशी, नथ, गदा यासह चांदीचे अलंकार व आभूषणे यांचा समावेश आहे. या सर्व सोने व चांदीच्या दागिन्यांची मंदिरातील परंपरागत कारागीरांनी स्वच्छता केली. स्वच्छतेनंतर सर्व दागिने मंदिराच्या खजिनागृहात ठेवण्यात आले. सहा ते सात तास ही स्वच्छता मोहिम सुरू होती.

नवरात्रकाळात दररोज रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची पालखी मिरवणूक काढण्यात येते. तसेच ललितापंचमीदिवशी अंबाबाई त्र्यंबोली भेटीसाठी टेंबलाई टेकडीवरील मंदिरात पालखीतून जाते. अष्टमीदिवशी देवीची पालखी नगरप्रदक्षिणा काढण्यात येते. यासाठी अंबाबाईसाठी सोन्याची पालखी घडवण्यात आली आहे. अत्यंत बारीक कलाकुसर असलेल्या या पालखीचीही स्वच्छता व पॉलिश करण्याचे काम मंगळवारी करण्यात आले. पालखीवेळी भालदार, चोपदार यांना देण्यात येणाऱ्या पारंपरिक वस्तू, गदा, पंखा यांच्या स्वच्छतेचेही काम पूर्ण झाले.

दरम्यान, नवरात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगेत मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मंदिराच्या आवारात व शिखरांवर करण्यात येणाऱ्या रोषणाईचे काम सुरू झाले आहे. सटवाई व कात्यायनी मंदिर परिसरातील स्वच्छता मंगळवारी झाली, तसेच मंदिर आवारातील दीपमाळाही लख्ख झाल्या आहेत.

गाभाऱ्याची स्वच्छता

नवरात्रीसाठी अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता बुधवारी करण्यात येणार आहे. मुंबई येथील संजय मेंटेनन्सच्या कर्मचाऱ्यांतर्फे दिवसभर मंदिराच्या आतील भाग अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने स्वच्छ करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी (ता. २५) अंबाबाई मंदिरात भाविकांना दर्शनासाठी प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रकला ग्रेड परीक्षा लांबणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य कलासंचालनालयाच्यावतीने घेण्यात येणारी चित्रकला ग्रेड परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २६ सप्टेंबर ते २९ सप्टेंबरअखेर होणार होती. मात्र ती काही तांत्रिक कारणामुळे लांबणीवर टाकण्यात येत असल्याचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

शासकीय रेखाकला स्पर्धा एलिमेंटरी आणि एंटरमीजिएट परीक्षा दरवर्षी घेतली जाते. महाराष्ट्रासह गोवा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांत ही परीक्षा होते. महाराष्ट्रातून जवळपास साडेसात लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्कही दिले जातात. यंदाच्या परीक्षेची तयारी संबंधित विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली होती. शिवाय कलासंचालनालयाच्या परीक्षा विभागानेही तयारी केली होती. काही केंद्रांमध्ये प्रश्नपत्रिकांची पाकिटेही रवाना करण्यात आली होती. परीक्षा अवघ्या दोन दिवसांवर आलेली असताना परीक्षा लांबणीवर टाकण्यात येत असल्याचे परिपत्रक आल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक www.doa.org.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे यासंबंधीच्या पत्रकात म्हटले आहे.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरराज्य समितीसाठी शिफारस करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑगस्ट महिन्यात आलेल्या जिल्ह्यातील महापुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने मंगळवारी बाधीत भागात अभ्यास दौरा केला. त्यानंतर सर्किट हाउस येथे झालेल्या बैठक झाली. भविष्यात महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टीमधील विसर्गावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकातील अधिकाऱ्यांची सक्षम समिती नियुक्त करण्याची शिफारस सरकारकडे करण्यासंबंधी बैठकीत चर्चा झाली.

समितीचे अध्यक्ष आणि जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव नंदकुमार वडनेरे, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्यासह विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई बैठकीला उपस्थित होते.

सकाळी ११ च्या सुमारास दाखल झालेल्या समितीने शिरोळ तालुक्यातील किटवाड, तेरवाड, राजापूर, नृसिंहवाडी आणि कुरूंदवाड येथे नदीघाटाची पाहणी केली. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाहणी केली.

त्यानंतर झालेल्या बैठकीत ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाची माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख धरणे दहा टक्के रिकामी ठेवण्याचे सूचित केल्याचे सांगितले. यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याने उन्हाळ्यातील पाण्याच्या मागणीसाठी धरण भरून घेणे आवश्यक होते, असे स्पष्ट केले. शंभर वर्षांत सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस पडला. धरण आणि खुल्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढली. धरणातील पाण्याच्या विसर्गाची अद्याप सुरू असलेली पारंपरिक पद्धत, अलमट्टी धरणातील पाण्याचा फुगवटा अशी प्राथमिक कारणे महापूर गंभीर होण्यास कारण ठरल्याचे समितीच्या निदर्शनास आणून दिले.

-------

महापुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी दिवसभर बाधीत भागात अभ्यास दौरा केला. कमी कालावधीत सर्वाधिक पडलेल्या पावसामुळे महापुरात भर पडल्याचे निदर्शनास आले. समिती सदस्यांनी यासंबंधी नोंदवलेल्या मुद्यांची चर्चा होईल. त्यानंतर समिती नोंदवलेल्या उपाययोजनांवर एकमत झाल्यानंतर पुराची कारणे आणि उपाययोजनासंबंधीच्या शिफारसीचा अहवाल सरकारला दिला जाईल. जवळपास तीन महिन्यांत अहवाल पाठवण्यात येईल.

नंदकुमार वडनेरे, अध्यक्ष, अभ्यास समिती

-------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images