Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मित्रपक्षांत धुसफूस, विरोधक आक्रमक

$
0
0

जिल्हा परिषदेचा लोगो वापरावा....

निधी वाटपाच्या अधिकाराचा मुद्दा ऐरणीवर, भाजपमधील सदस्यही निर्णयावर नाखूश

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर :

समाजकल्याण विभागाच्या निधी वाटपात भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षांना सामावून घेण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशावरुन जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजपच्या मित्रपक्षांत धुसफूस वाढली. शिवसेना, जनसुराज्य, आवाडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, चंदगड युवक आघाडीच्या सदस्यांनाही हा निर्णय रुचला नाही. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांनी आक्रमकपणे विरोधाचा निर्णय घेतला आहे. समाजकल्याणच्या निधी वाटप प्रक्रियेत जिल्हा परिषद बाहेरील व्यक्तीचा शिरकाव होणार असल्यामुळे सदस्यही अस्वस्थ आहेत. भाजपचे सदस्यही या निर्णयावर नाखूश आहेत. त्याला विरोध करण्यासाठी पक्षभेद विसरुन सदस्य एकवटत आहेत.

भाजप तालुकाध्यक्षांच्या समावेशाने समाजकल्याण समितीमधील सदस्य आणि सभापतींच्या हक्कावर गदा येणार असेल तर हा प्रकार सहन करायचा नाही, असा पवित्रा समिती सदस्यांनी घेतला. मुळात १४ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषदेला मिळणारा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा होत आहे. आता समाजकल्याणच्या निधीतही हस्तक्षेप होऊ लागला तर जिल्हा परिषद सदस्यांनी विकासकामांसाठी निधी कुठून आणायचा, असा सवाल उपस्थित होत आहे. भाजप नेत्यांनी चुकीचे पायंडे पाडू नयेत, अशी भावना सदस्यांनी व्यक्त केल्या.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील राज्यातील वजनदार मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना व्यक्तिगत पातळीवर निधी पुरवठा करावा, त्याबद्दल कुणाचे दुमत असणार नाही. पण स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांच्या निधीत कपात करायची, समितीच्या कामकाजात हस्तक्षेप करायचा आणि नियमबाह्यरित्या भाजप पदाधिकाऱ्यांना समितीचा निधी उपलब्ध करुन द्यायचा, हा प्रकार योग्य नाही, अशा प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्यांच्या आहेत. नाव न छापण्याच्या अटीवर अनेक सदस्यांनी विशेषत सत्तारुढ गटातील सदस्यांनी या प्रकारावरुन नाराजी व्यक्त केली. दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत मागासवर्गीय लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांना निधी पुरवठा होतो. या निधीच्या माध्यमातून दलित वस्ती सुधारणा, रस्त्यांची बांधणी, हायमॅक्स दिवे बसविणे, नळ पाणी पुरवठा योजना, समाज मंदिर उभारणी, दुरुस्ती कामे प्रस्तावित असतात.

..........

समाजकल्याणच्या निधीचे सर्वाधिकार समितीला

समाजकल्याण विभागासाठी उपलब्ध निधीवाटपाचे सर्वाधिकार समाजकल्याण समितीला आहेत. समाजकल्याण समितीत ११ सदस्यांचा समावेश आहे. समितीचे सभापतिपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे विशांत महापुरे आहेत. समितीत जनसुराज्यचे दोन, काँग्रेसचे तीन, शिवसेनेचे तीन, भाजपचे दोन तर राष्ट्रवादीचा एक सदस्य आहे. समितीत भाजपचे संख्याबळ कमी आहे. सर्किट हाउस येथे झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी, जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. हा सारा प्रकार जनसुराज्यच्या सदस्यांना रुचला नाही.

..... .. .....

शिवसेनेचे आमदार लांबच

जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजप आणि मित्र पक्ष आघाडीचे प्रमुख म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्किट हाउस येथे बैठक घेतली. मतदारसंघनिहाय अडचणी जाणून घेतल्या, हे योग्य आहे. या बैठकीला भाजपचे जिल्ह्यातील दोन्ही आमदार उपस्थित होते. पण शिवसेनेचा एकही आमदार उपस्थित नव्हता. जिल्हा परिषदेत शिवसेनाही सत्तेत आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार आहेत. याकडेही शिवसेनेचे सदस्य लक्ष वेधत आहेत.

.... .. .... ... ......

समाजकल्याण निधीवाटपात भाजप तालुकाध्यक्षांना सामावून घेण्याचा प्रकार हा जिल्हा परिषद सदस्यांच्या हक्कांवर गदा आणणारा आहे. चौदाव्या वित्त आयोगामुळे जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीवर मर्यादा आल्या आहेत. जि. प. सदस्य जवळपास ३५ ते चाळीस हजार लोकांचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या कामकाजात व निधीमध्ये हस्तक्षेप होऊ नये.

पांडुरंग भांदिगरे, सदस्य, काँग्रेस

..... ... ..... ...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोऱ्या वाढल्या; तपास रखडला

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या सहा महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रोज चोरीच्या घटना घडत असून, चोरट्यांना पकडण्यात मात्र पोलिसांना यश येत नाही. सहा महिन्यात घडलेल्या ३६९ गुन्ह्यांपैकी केवळ १६३ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

'घर बंद करून एखादा दिवस बाहेरगावी जाण्याचीही वेळ राहिली नाही. माघारी येईपर्यंत आपल्या घरातील किमती वस्तू सुरक्षित राहतील की नाही याची सतत काळजी असते. एवढ्या चोऱ्या होऊन पोलिसांना चोर सापडतच नाहीत,' ही उद्विग्न प्रतिक्रिया एका महिलेची आहे. गेली सहा महिने चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करून लाखो रुपयांची रोकड आणि किमती मुद्देमाल लंपास केला. या घटनांमुळे सुट्टीच्या काळात पर्यटनासाठी बाहेर गेलेले किंवा गावाकडे गेलेल्या नागरिकांच्या आनंदावर विरजन पडले. अनेकांची आयुष्यभराची कमाई काही क्षणात लंपास झाली. चोरटे सापडतील आणि चोरीस गेलेला ऐवज मिळेल या आशेपोटी नागरिक पोलिस ठाण्यात धाव घेतात, मात्र नागरिकांना विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते. दिवसामागून दिवस उलटतात तशी पोलिसांची भाषाही बदलत जाते. शोध सुरू आहे. कुणावर संशय आहे का? आठवड्याभरात चोरटा सापडेल. आम्हाला तेवढेच काम आहे काय? नंतर या बघू, अशी उत्तरे ऐकावी लागतात. यामुळे चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळेल याची शाश्वतीच उरलेली नाही.

गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंगच्या ३६९ घटनांची नोंद झाली. जवळपास रोज दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय नोंद न झालेल्या आणि दुचाकी चोरीच्या घटना वेगळ्याच आहेत. मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वाढत असूनही पोलिसांना चोरटे सापडत नाहीत ही चिंतेची बाब आहे. सहा महिन्यात जिल्ह्यात १६ ठिकाणी दरोडे पडले. जबरी चोरीचे ७९ गुन्हे घडले. १८९ घरफोड्या झाल्या, तर चेन स्नॅचिंगच्या ८५ घटनांची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये झाली आहे. एकूण ३६९ गुन्ह्यांपैकी केवळ १६३ गुन्ह्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. यावरून पोलिसांचे अपयश स्पष्ट होते. दरोड्याचे गुन्हे वगळता उर्वरित सर्व गुन्ह्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.

घरफोड्यांचे सत्र सरूच

नेहमीच सुट्ट्यांमध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढते. मात्र, यंदा जुलै महिना आला तरी घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या आठवड्यात दोन ठिकाणी चोरट्यांनी धाडसी घरफोड्या करून पोलिसांना आव्हान दिले आहे. घरफोड्यांसह आता कारच्या काचा फोडून कारमधील किमती वस्तू लांबवण्याचे प्रकारही वाढले आहेत. यामुळे पोलिसांची गस्त आणि तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चोरीचे गुन्हे रोखणे आणि घडलेल्या गुन्ह्यांचा तपास गतीने करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रेकॉर्डवरील चोरट्यांवर लक्ष ठेवले जात आहे. लवकरच जास्तीतजास्त गुन्ह्यांची उकल होईल.

- डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक

सहा महिन्यांतील चोऱ्या

चोरीचा प्रकार दाखल उघड

घरफोडी १८९ ५१

चेन स्नॅचिंग ८५ ३४

जबरी चोरी ७९ ६२

दरोडा १६ १६

एकूण ३६९ १६३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते बनले डर्क ट्रॅक

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्ती आणि नालेसफाई करणे आवश्यक असते. त्याप्रमाणे महापालिका प्रशासन नियोजन करते. रस्त्याची कामे तर पावसाळ्यानंतर त्वरीत सुरू केली जातात. मे महिन्यात दोन्ही कामे वेग घेतात. मात्र वर्षभरात रस्त्याचे पॅचवर्क करण्यात न आल्याने शहरातील अनेक रस्ते डर्क ट्रॅकसारखे बनले आहेत. खड्डे पडलेल्या रस्त्यांतून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. छोट्या-छोट्या अपघातांचे प्रसंग वारंवार उद्भवतात. त्यामुळे शहरवासियांची डोकेदुखी वाढली आहे. नालेसफाईनंतर आता रस्त्यांच्या पॅचवर्कची पोलखोल उघड झाली.

रस्त्याचे पॅचवर्क करण्यास दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्यात सुरू होते. मात्र यावर्षी अपवाद वगळता रस्त्यांच्या डागडुजीची कामे हाती घेण्यात आली नाही. रस्त्यावरील छोटे खड्ड्यांतून वाहनधारक मार्ग काढत होते. महापालिकेतील स्थायी समिती आणि दर महिन्याच्या महासभेत याबाबत चर्चा झाली. पण, त्यावर प्रत्यक्ष कारवाई झाली नाही. त्यामुळे पावसाला सुरुवात होताच छोट्या खड्ड्यामध्ये अधिकच भर पडली. सद्यस्थितीत शहरातील बहूतांश रस्त्यांवर खड्डे दिसत आहेत. एकही रस्ता सुस्थितीत दिसत नाही.

संभाजीनगर ते शाहू बँक पर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला खड्डे पडले आहेत. शिंगोशी मार्केटजवळ तर वर्षानुवर्षे खड्डा आपले अस्तित्व दाखवत आहे. अशीच स्थिती बिंदू चौक परिसरात दिसते. येथे मोठ्या पावसात गटारीतील पाणी रस्त्यावरुन वाहते. वाहनधारकांना पाण्यात खड्डे दिसत नसल्याने वारंवार अपघात घडतात. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्ते विकास प्रकल्पांतर्गत बांधलेला रस्ता सुस्थितीत असला तरी बसंत-बहार थिएटर ते महावीर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. पर्ल हॉटेलकडून बेकर गल्लीमार्गे ताराराणी गार्डनकडे येणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यातून मार्ग काढताना वाहनधारक स्वत:वरच राग व्यक्त करत मार्ग काढतात. अशीच स्थिती परिख पूल ते आप्पाज कॉप्लेक्स, भास्करराव जाधव पुतळा ते बागल चौक रस्त्यावर दिसून येथे. पापाची तिकटी ते गंगावेशपर्यंतचा रस्ता आणि गंगावेश ते पंचगंगा पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर डांबर टाकलेल्या जागेचा शोध घ्यावा लागत आहे.

सर्व प्रवेशद्वारांवरील रस्ते सुस्थितीत असले तरी बाहेरील वाहनधारकांना प्रत्यक्ष शहरात एखाद्या ग्रामीण भागातील रस्त्यावरुन जात असल्याचा भास होतो. खड्ड्यांमुळे आरोग्याचे प्रश्नही निर्माण झाला आहे. सातत्याने खड्डेमय रस्त्यांतून वाहन चालविल्याने अनेकांना मान, कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला आहे.

उपनगरात भयानक अवस्था

शहरात एकीकडे रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना उपनगरात रस्त्यांची अवस्था भयानक दिसून येते. अमृत योजनेंतर्गत उपनगरांमध्ये ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकली जात आहे. त्यासाठी नव्याने केलेल्या रस्त्यांचीही खोदाई करण्यात आली. पाइपलाइन टाकल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती त्वरीत करण्याची गरज होती. तसे करारात नमूदही होते. पण पाइपलाइन टाकल्यानंतर अपवाद वगळता कोठेही रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही. परिणामी खोदाईनंतर निर्माण झालेल्या चिखलातूनच शहरवासियांना मार्ग काढावा लागत आहे.

मे महिन्यापूर्वी अनेक रस्त्यांचे पॅकवर्क करण्यात आले. सद्यस्थितीत पावसामुळे रस्त्यांवर तयार झालेले खड्डे मुरुम टाकून मुजविण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवापूर्वी डांबरी पॅचवर्क केले जाईल.

- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

दृष्टिक्षेपात शहरातील रस्ते

७१.५४ किमी

सिमेंट काँक्रिट रस्ते

७१७. ४४ किमी

डांबरी रस्ते

७९.२५ किमी

खडीचे रस्ते

२६.६९ किमी

इतर रस्ते

८९४.९२ किमी

एकूण रस्त्यांची लांबी

लोगो : मटा भूमिका

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी

रस्त्यांची डागडुजी हवी

शहरात एकूण ८९४.९२ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यामध्ये राष्ट्रीय, राज्य, जिल्हा व शहरांतर्गत भागाचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रीय व राज्य मार्गांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची असली तरी शहरातंर्गत येणाऱ्या रस्त्यांची बांधणी अथवा दुरुस्ती करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असते. पण, गेल्या वर्षाभरात नगरोत्थान किंवा अमृत योजनेंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही. परिणामी पावसाळ्याला सुरुवात होताच रस्त्यांची प्रचंड दुरवस्था समोर आली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्ड्यांचे एवढे साम्राज्य निर्माण झाले आहे की चांगला रस्ता वाहनधारकांना शोधवा लागतो. नवीन रस्त्यासाठी निधीचा अभाव असताना पॅचवर्क करण्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी वाहनधारकांना डर्क ट्रॅकसारख्या प्रकाराचा अनुभव येत आहे. खड्डेमय रस्त्यांतून मार्ग काढताना त्यांची हाडे खिळखिळी होत आहेत. पावसाच्या दणक्याने नालेसफाईची पोलखोल झाली आहे. आता यात रस्त्यांचीही भर पडली आहे. 'नेमिची येतो पावसाळा' याप्रमाणे वाहनधारकांना हा अनुभव येत आहे. वस्तूत: महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आवश्यक निधीसाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुचेता पाटील यांना पीएचडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पलूस तालुक्यातील नागठाणे येथील सुचेता संग्राम पाटील-कोरे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी मिळाली. त्यांनी, 'अ स्टडी ऑफ रेस रिलेशन्स अँड नेग्रीट्युड इन द सिलेक्ट नॉवेल्स ऑफ अॅन्द्रे ब्रिंक' या विषयावरील प्रबंध सादर केला होता. त्यांना शिवाजी विद्यापीठातील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. ए. एम. सरवदे, डॉ. प्रज्ञा घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभा निवडणुकीत प्रशासकीय निधीची उधळपट्टी

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

लोकसभा निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रशासकीय खर्चापोटी सरकारने दिलेल्या २० कोटींच्या निधीची उधळपट्टी तहसील प्रशासनातर्फे करण्यात आल्याचे आरोप होत आहेत. सहा तालुक्यातून जिल्हा निवडणूक प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या खर्चाच्या तपशीलात मंडप डेकोरेशन, साऊंड सिस्टीम आदींवर तब्बल २ कोटी ५० लाख ७ हजार ३२१ रूपये खर्च दाखवल्याचे 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे माहिती अधिकारातून घेतलेल्या माहितीतून उघड झाले आहे. यामुळे उमेदवारांच्या प्रत्येक बारीकसारीक खर्चाची पडताळणी करणाऱ्या निवडणूक प्रशासनाच्या खर्चाची पडताळणी कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रशासकीय खर्चासाठी सरकारने जिल्हा निवडणूक प्रशासनाकडे २० कोटींचा निधी दिला. हा निधी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांकडे वर्ग करण्यात आला होता. एकूण निधीपैकी चंदगड, राधानगरी तहसील कार्यालयास १ कोटी, कागलसाठी ६८ लाख, करवीरसाठी २ कोटी २० लाख, शाहूवाडीसाठी ५० लाख, हातकणंगले आणि शिरोळसाठी प्रत्येकी ७५ लाख, आजरा आणि गगनबावड्यासाठी ६ लाख, गडहिंग्लज व भुदरगडसाठी प्रत्येकी ६५ लाख, इचलकरंजी प्रांत कार्यालयास ७५ लाख वितरित करण्यात आले होते. या निधीतून आवश्यकतेनुसार पारदर्शकपणे पैसे खर्च करणे आवश्यक होते. परंतु, आतापर्यंत सहा तहसील प्रशासनाकडून आलेल्या खर्चाची आकडेवारी पाहता खर्च पारदर्शकपणे केला आहे का, त्याची काटेकोरपणे पडताळणी तालुका पातळीवरील जबाबदार अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे का, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. अजूनही दहा कार्यालयांकडून खर्चाचा हिशोब आलेला नाही. खर्च न दिलेल्या कार्यालयाने किती उधळपट्टी केली आहे हे अद्याप उघड झालेले नाही. सर्व कार्यालयांकडून हिशोब आल्यानंतर उधळपट्टीचा खर्च कोटींच्या खर्चात जाण्याची शक्यता आहे.

...

शंकास्पद खर्चाची आकडेवारी अशी

सहा तहसील प्रशासनांकडून आलेल्या खर्चात मंडप, डेकोरेशन, साऊंड सिस्टीमचा खर्च : २ कोटी ५० लाख ७३२१ रूपये

करवीर तहसील प्रशासनाचा स्टिकर बॅनर, सीसीटीव्हीवरील खर्च : २ लाख ७६ हजार

कागल तहसीलने कर्मचारी प्रशिक्षण, इव्हीएम व्यवस्थापनावर केलेला खर्च : ७ लाख ५७ हजार २५६

गडहिंग्लज तहसीलने इव्हीएम यंत्र ठेवण्याकरीता केलेल्या रॅकचा खर्च : १ लाख, पत्र्याचे बॅरिकेटींग : १ लाख २४ हजार ५००

हातकणंगले तहसीलने केलेला कार्यालयीन खर्च : ४ लाख २१ हजार ६८५, मंडप, स्टेशनरी - १ लाख ९ हजार ७६०

...

साडेबारा कोटी

उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे

सर्वाधिक १२ कोटी ५० लाखांचा निधी निवडणूक विभाग उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे. त्यांनी आपण केलेल्या खर्चाचा हिशोब ठेवणे आणि तहसील प्रशासनाकडून सादर केलेल्या खर्चाची पडताळणी करणे आवश्यक आहे. मात्र निवडणूक प्रशासनाच्या विस्कळीत कामकाजामुळे खर्चाची पडताळणी केली जाते की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे. निकाल लागून दोन महिने झाले तरी अजून सहाच तहसील कार्यालयांकडून खर्चाची माहिती आली आहे. उर्वरितांनी दुर्लक्ष केले आहे. निवडणूक उपजिल्हाधिकारी कार्यालयानेही खर्चाचा हिशोब सादर केलेला नाही, ही गंभीर बाबही उघड झाली आहे.

........

कोट

'लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी कोट्यवधीने करण्यात आलेला खर्च शंकास्पद आहे. निवडणुकीसंबंधी काही कामांची निविदा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी काढताना पारदर्शकता ठेवलेली नाही, अशाही तक्रारी आहेत. यामुळे निवडणुकीच्या खर्चाचे लेखापरीक्षण होणे आवश्यक आहे.

दिलीप देसाई, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊसही प्रेमवेडा

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet@anuradhakadamMT

धुक्याची चादर लपेटून येणाऱ्या थंडीतला रंकाळा असो, लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्या झळांनी चमकणारा रंकाळा असो किंवा ओलाचिंब करणाऱ्या झिम्माड पावसाच्या सरी झेलणारा रंकाळा असो... रंकाळ्याच्या काठावर ऋतू फक्त बदलतो... त्या ऋतूसोबत येणारी भावना मात्र दगडी काठांवर धडकणाऱ्या बेभान पाण्यासारखीच. आता या घडीलाही आभाळाच्या ओंजळीतून बसरणाऱ्या धारा झेलत उधाणलेला रंकाळा डोळ्यांच्या डोहात मावता मावत नाहीय... रंकाळ्याभोवतीचा कोणताही निवांत कोपरा शोधून प्रेमाच्या सागरात बुडालेल्या प्रेमवेड्यांसारखा रंकाळ्यावरचा पाऊसही रोमँटीक झाला आहे.

कोल्हापूरच्या वर्णनाचे कितीही मनोरे रचले तरी रंकाळ्याची जोड दिल्याशिवाय तो कळस पूर्ण होत नाही. कोणत्याही वयाचा कोल्हापूरकर रंकाळ्याच्या काठाशी, हेलकावे खाणाऱ्या पाण्याच्या लाटांशी, इथल्या टॉवरच्या दगडी कमानीशी... इतकेच नव्हे तर राजघाटाच्या पायऱ्यांपासून परताळ्यातील गर्द झाडीशी अगदी एकरूप झाला आहे. वळीवाची सर येण्याआधी भरून आलेलं आभाळ जितकं रंकाळ्याच्या काठावरून सुंदर दिसत असेल, तितके ते क्वचितच आणखी कुठूनतरी दिसेल. वळवानंतर येणाऱ्या मान्सूनची पहिली रंकाळ्याच्या दगडी काठावर बैठक मारून अंगावर झेलण्यात असलेली मजा तर काही औरच. जुलैचा पाऊस म्हणजे कधी सडकून सर यावी आणि चिंब करून जावी असा तर कधी तासदीडतास सलग रिमझिम बरसणारा तर कधी वेड्यासारखा कोसळणारा. पावसाने कोणतंही रूप घ्यावं आणि त्याच क्षणी आपण रंकाळ्यावर असावं हा क्षण पावसाळ्यातील अत्त्युच्य सुखाचा. अर्थात छत्री, रेनकोट यांच्याशी कट्टी करून रंकाळ्यावर पावसात फिरणार असाल तर ते भिजलेपण कधी तुम्हाला आतपर्यंत चिंब करेल हे कळायलाही उसंत मिळणार नाही.

ताराबाई रोड संपला आणि राजघाटाच्या पायऱ्या नजरेच्या टप्प्यात आल्या की अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. भर पावसात तांबट कमानीपासून रंकाळ्याची वाट पायी चालायची ठरवलं तर वरून पावसाच्या धारा आणि ओली पायवाट संपूच नये असे न वाटणारा विरळाच. आता शाहू उद्यानापासून रंकाळ्याचा प्रवाह कापत जाणाऱ्या पुलावरून उसळी मारणारे रंकाळ्याचे पाणी, समोर काळेभोर ढग उतरून खाली आल्याचे दृश्य, आकाशात लोलकासारख्या आकार बदलणाऱ्या ढगांचे नक्षीकाम, नजरेच्या एकशेऐंशी कोनात काठोकाठ उमललेला रंकाळा पाहिला तरी पाऊस हवाहवासा वाटतो. खणीपासून रस्त्याला लागलेल्या रंकाळ्याच्या दगडी काठाशी सलगी करत पावसाच्या संगतीने चालताना मनातील प्रेमाचे धुमारे फुलायला क्षणाचाही विलंब लागत नाही. रंकाळ्यावर पावसात यावं तर भिजण्यासाठीच. पावसाच्या थेंबांसोबत इथला अंगाशी मस्ती करणारा वारा प्रेमात पडायला लावणारा. पाणीदार रंकाळा, भोवतीची हिरवाई कधी गुलाबी दिसायला लागते याचे भान हरपणाऱ्या रंकाळ्यावर फेरफटका मारताना पावसाच्यासाथीने प्रेमाच्या झऱ्यालाही उमाळे फुटतात.

पावसात आत अन् बाहेर चिंब होणे या प्रश्नाचं उत्तर सापडत नसेल तर येत्या पावसात रंकाळ्याकडे वळणारं पाऊल नक्कीच याचं उत्तर देईल. राजघाटावर आल्यानंतर डावीकडे रंकाळ्याचा अथांग डोलारा आणि उजवीकडे देखणा टॉवर झिम्माड पाऊस आणि हवीहवीशी वाटणारी सोबत असेल तर जगात यालाच सुख म्हणत असणार हे नक्की. शालिनी पॅलेसपासून परताळ्यापर्यंतच्या हिरव्या झाडातला रंकाळ्यावरचा पाऊस प्रेमात वेडा करून सोडणारा. ओलावलेले हात एकमेकांच्या हातात गुंफून परताळ्यातील निमूळत्या पायवाटेने चालणाऱ्यांना प्रेमात भिजवणारा पाऊस फक्त रंकाळ्यावरच बरसतो. शालिनीच्या कोरीव वास्तूकडे पाठ करून दगडी बाकावर बसून भर पावसात समोरचा उधाणलेला रंकाळा न्याहाळत प्रेमाच्या गुजगोष्टी करणाऱ्यांसाठी तर रंकाळ्यावरचा पाऊस आयुष्यभर आठवणीचा चिंब ठेवाच. हे क्षण कुणी कॅमेऱ्यात टिपतं, कोणी मोबाइलच्या पाच इंचाच्या फ्रेम बंद करतं तर कुणी पापण्यांच्या राज्यात कोरतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तालुकाध्यक्षांना निधीचे अधिकार निर्णय दुर्दैवी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

समाजकल्याण निधी वाटपात भाजप तालुकाध्यक्षांना अधिकार देण्याचा निर्णय दुर्दैवी आहे, अशी टीका करत आमदार सतेज पाटील यांनी समाजकल्याण समिती सभापतींचे अधिकार काढून भाजप तालुकाध्यक्षांना द्यावेत, अशी मागणी करत पालकमंत्र्यांच्या निर्णयावर टीका केली. याप्रश्नी गुरुवारी (ता. ११) आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची भेट भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण निधी वाटपाच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी भाजप तालुकाध्यक्षांनी सुचविलेल्या कामांना निधी द्यावा, असे आदेश दिले होते. पालकमंत्र्यांच्या आदेशाविरोधात जिल्हा परिषद सदस्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. याबाबत आमदार पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, 'जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आले आहेत. त्यांचे हक्क काढून भाजप तालुकाध्यक्षांना निधी वाटपाचे अधिकार देण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हा परिषद सदस्यांना घटनेने अधिकार दिले आहेत. या सदस्यांचे अधिकार अबाधित राहिले पाहिजेत. सदस्यांच्या हक्कावर गदा आणू नका, असे आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन सांगणार आहोत. तरीही त्यांनी निर्णय घेतलाच तर आम्ही हायकोर्टात दाद मागू. तालुकाध्यक्षांना अधिकार द्यावेत, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. ते कोर्टात सादर करू.'

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीची निवड यादी आज जाहीर

$
0
0

कोल्हापूर

अकरावी प्रवेश प्रक्रियेतंर्गत अंतिम निवड यादी बुधवारी (ता. १०) दुपारी तीन वाजता जाहीर होणार आहे. निवड यादीच्या आधारे गुरूवार (ता. ११) पासून प्रत्यक्ष प्रवेश निश्चिती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया केंद्रीय समितीच्यावतीने शहरातील ३३ कनिष्ट महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यामुळे एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस संवर्गातील टक्केवारीमध्ये बदल केला. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना संवर्ग बदलासाठी अर्ज करण्यासाठी तीन दिवसांची मुदत केंद्रीय समितीने दिली. ही मुदत संपल्यानंतरही एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार निवड यादी बुधवारी शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या सूचना फलकावर दुपारी तीन वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती या समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तेलनाडेंची मालमत्ता जप्तकरण्याच्या हालचाली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेले व सध्या फरारी असलेले नगरसेवक संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे यांच्यासह अन्य संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. तीन महिने फरारी असल्यास संशयितांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद मोक्का कायद्यात असल्याने त्यादृष्टीने पोलिसांनी हालचाली सुरू केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, तेलनाडे बंधूना शहरातूनच आर्थिक रसद पुरवली जात आहे. गुन्हेगारी जगताशी संबध असलेले काही पोलिस या टोळीच्या संर्पकात असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

शहरातील नगरसेवक संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे यांच्यासह त्यांच्या एसटी सरकार गँगवर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. मात्र अद्यापही तेलनाडे बंधूंसह अन्य संशयित फरारी आहेत. विविध मार्गांनी त्यांचा शोध घेऊनही ते सापडले नाहीत. या संशयितांचा विविध पथकांद्वारे शोध घेतला जात आहे. संशयितांच्या मालमत्तांची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. यापूर्वी तेलनाडे याच्या निवासस्थानी साहित्य, कागदपत्रे, दागिने यासह किंमती वस्तूंची माहिती घेऊन पोलिसांनी पंचनामा केला आहे. मोक्कांतर्गत गुन्हा दाखल झाल्यापासून तीन महिने अथवा त्यापेक्षा जास्त काळ फरारी असलेल्या संशयिताची मालमत्ता न्यायालयाच्या परवानगीने जप्त करण्याची तरतूद आहे. या दृष्टीने संशयितांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’चे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) नवीन विस्तारित दूध प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रण अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. आपटे यांनी सोमवारी सकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सरकारकडे प्रलंबित गोकुळच्या प्रस्तावांवर चर्चा केली. सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आपटे यांनी सांगितले.

गोकुळने उभारलेल्या नवीन विस्तारित दूध प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी येण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे आपटे यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर कार्यक्रमाची वेळ ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी वाशी शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत गाय दूध आणि दूध पावडर अनुदानाचे प्रस्ताव लवकर मंजूर करावेत, अशी विनंती आपटे यांनी केली. तसेच लोणी व तुपावरील जीएसटी कमी करावा, पशुखाद्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोलॅसिसवरील २५ टक्के जीएसटी कमी करावा, सहकारी संस्थांचे वीज दर कमी करावेत, शासकीय गोदामातील निकृष्ट दर्जाचे धान्य प्राधान्याने सहकारातील पशुखाद्य बनवणाऱ्या संघांना द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.

मल्टिस्टेटवर चर्चा नाही

मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या भेटीत मल्टिस्टेट प्रश्नांवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अध्यक्ष आपटे यांनी सांगितले. गोकुळचे नेते महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्या सूचनेनुसार चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मल्टिस्टेटचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले आहे. मल्टिस्टेटचा प्रस्ताव दूध उत्पादकांना समजावून सांगण्यास कमी पडलो आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. माझी त्यांची भेट झाली नसल्याने यावर अधिक चर्चा झाली नसल्याचे आपटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी बससाठी जागा देण्याची तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मध्यवर्ती बसस्थानक व ताराराणी चौक या परिसरात उभ्या रहात असलेल्या खासगी आराम बसमुळे होणारी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी शिरोली नाका (तावडे हॉटेल) व निर्माण चौक (मैलखड्डा) येथील जागा भाड्याने देण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे. शहरातील वाहतूक समस्येबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी स्टँड व रेल्वे स्टेशनवर सुविधा केंद्र उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस इंडियन रोड सेफ्टी रिसर्च विमलेश्वर फेडरेशन संस्थेचे विनायक रेवणकर, केएसबीपीचे सुजय पित्रे, महापालिकेचे अधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये सुचवण्यात आलेल्या उपाययोजनांवर

सकारात्मक चर्चा झाली.

खासगी आराम बसचे होत असलेले अतिक्रमण व त्यातून होणारी वाहतुकीची कोंडी थांबवण्यासाठी या बसच्या पार्किंगसाठी स्वतंत्र जागा आवश्यक असल्याचे मत मांडण्यात आले. त्याकरिता शिरोली नाका व मैलखड्डा येथे उपलब्ध असलेली जागा भाडेतत्वावर देण्याची तयारी महापालिकेने दाखवली. त्याबरोबर शहरात येणारी अवजड वाहने हद्दीवरच थांबवण्यासाठी तावडे हॉटेल येथील जागेवर ट्रक टर्मिनस उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडे निधी मागणीचा प्रस्ताव सादर करावा. जिल्हा नियोजन मंडळाकडेही प्रस्ताव द्यावा, असे ठरवण्यात आले. शहरात येणाऱ्या पर्यटकांना माहिती घेता यावी यासाठी शिये, तावडे हॉटेल, शाहू नाका या ठिकाणी सुविधा केंद्राचा फलक उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. त्यानुसार पोलिस व महापालिकेच्या सहकार्याने पुढील कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली. रेल्वे स्टेशनवर रेल्वे येण्याच्यावेळी केएमटी बस थांबवण्याची व्यवस्था करण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यावरही चर्चा झाली. तसेच शहराच्या हद्दीवर भक्त निवास व वाहनतळ उभा करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे ठरवण्यात आले.

विविध ठिकाणी रस्त्यावरील अतिक्रमणामुळे होत असलेली कोंडी संपवण्यासाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयामार्फत सर्वेक्षण करुन पार्किंग नसलेल्या व्यावसायिकांवर दंडाची कारवाई व परवाना नुतनीकरण स्थगितीची कारवाई इस्टेट व अतिक्रमण विभागाकडून करण्यात यावी अशी सूचना करण्यात आली. अनेक ठिकाणी झालेल्या रिक्षा स्टॉपवर कारवाईसाठी पोलिस, केएमटी, आरटीओ, अभ्यास करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींची समितीकडून सर्वे करण्यात यावा. त्यानंतर अधिकृत स्टॉप जाहीर करण्यात यावेत.

...

शहर अभियंता नोडल ऑफिसर

शहरातील वाहतूक नियोजनासाठी नोडल ऑफिसर म्हणून शहर अभियंता यांची नेमणूक व्हावी व समन्वय समिती कार्यान्वित व्हावी, असे मत बैठकीत मांडण्यात आले. त्यावेळी आयुक्तांनी शहर अभियंता हे नोडल ऑफिसर म्हणून काम करतील. तसेच उपअभियंता, सर्व्हेअर, इस्टेट अधिकारी, पोलिस निरीक्षक, नगररचना सहाय्यक संचालक, वाहतूक सल्लागार हे समितीतील सदस्य असतील. ते दर महिन्याला कामकाजाचा आढावा घेऊन प्रस्ताव सादर करतील, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेत पावसाचा जोर ओसरला

$
0
0

कोयनेत पावसाचा जोर ओसरला

कराड :

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पावसाचा जोर कमी झाला. शिवाजीसागर जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली आहे. धरणात सध्या ४५३९१ क्युसेकने पाण्याची आवक होत असून, ३२.१३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी पडलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यात पडझडीचे सत्र सुरूच आहे. साखरी येथील अंकुश पांडूरंग सावंत यांच्या राहत्या घराची भिंत पडून नुकसान झाले आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोलमजुरी करणाऱ्या शेतमजुराचे हजारोंचे नुकसान झाले आहे. घटनेचा तलाठी एन. एस. माने यांनी पंचनामा केला आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजता संपलेल्या गेल्या चोवीस तासांत कोयनानगर येथे ११५, नवजा १०२, व महाबळेश्वर येथे १५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्कॉन घाटाचे लोकार्पण अडचणीत

$
0
0

इस्कॉन घाटाचे लोकार्पण अडचणीत

पंढरपूर

इस्कॉन संस्थेने चंद्रभागेच्या पैलतीरावर भाविकांच्या स्नानासाठी १५ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या घाटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणारे लोकार्पण अडचणीत आले आहे. इस्कॉनकडून या घाटाची उभारणी करताना योग्य परवानग्या घेतल्या नसल्याचा आक्षेप जिल्हा प्रशासनाने घेतल्याने आता लोकार्पण होणार का? हा प्रश्न उभा निर्माण झाला आहे. महाराष्ट्र सरकारने या संस्थेला २०० मीटरची जागा घाट बांधण्यासाठी दिली होती. या जागेवर इस्कॉनकडून जगभरातील देणगीदारांची मदतीने १५ कोटी रुपये खर्चून येथे १५० मीटर लांबीचा घाट चंद्रभागेच्या पैलतीरावर उभारला आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणाहून उद्धव ठाकरे यांनी चंद्रभागेच्या महाआरती केली होती. जिल्हा प्रशासनाने या घाट बांधणीत कायदेशीर पूर्तता झाली नसल्याने या लोकार्पण सोहळ्याबाबत सर्व वास्तव अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवला आहे. दरम्यान, आषाढी दशमी अर्थात ११ जुलै रोजी हा लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी झाली असताना प्रशासनाच्या भूमिकेमुळे इस्कॉनच्या अडचणीत वाढ झाली आहे. आम्ही अहवाल सरकारला दिला असून, आता पुढचा निर्णय सरकारला घ्यायचा आहे, अशी भूमिका जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंधू भेटीचा सोहळा रंगला माउली भंडीशेगाव, तर तुकोबाराय पुराची कुरोली मुक्कामी

$
0
0

बंधू भेटीचा सोहळा रंगला

माउली भंडीशेगाव, तर तुकोबाराय पुराची कुरोली मुक्कामी

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील भाविकांनी मंगळवारी आनंददायी परंपरा अनुभवली. ज्ञानेश्वर माउली आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू संत सोपानकाका यांच्या बंधू भेटीचा अनुपम सोहळा टप्पा येथे पार पडला.

संत ज्ञानदेव व सोपानदेव यांच्या बंधू भेटीच्या सोहळ्यानंतर मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात लाखो वैष्णवांसह संतांच्या पालखी सोहळ्यानी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. पंढरपूर तालुका प्रवेशानंतर संत ज्ञानदेवांचा व सोपानदेवांचा पालखी सोहळा भंडीशेगाव मुक्कामी तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिराची कुरोली मुक्कामी पोहोचला. बुधवारी सर्व पालखी सोहळे शेवटच्या वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ होतील.

मंगळवारी दुपारी बारा वाजता पालखी सोहळा बोंडले येथे आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने तोफांची सलामी देऊन स्वागत करण्यात आले. माउलींची पालखी रथातून उतरवून खांद्यावर घेण्यात आली. ती तोंडले गावाच्या दिशेने नेण्यात आली. या वेळी माउलींना तुषार सिंचनाद्वारे सुगंधी पाण्याचा जलाभिषेक घालण्यात आला. या ठिकाणी दुपारचा नैवेद्य व विश्रांतीसाठी सोहळा विसावला.

नंदाच्या ओढ्यावर आपल्या गोपालांसमवेत श्रीकृष्णाने गोपाळकाला केल्याची आख्यायिका येथे सांगितली जाते. हीच परंपरा पुढे चालू ठेवीत गेल्या शेकडो वर्षांपासून श्री ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा तोंडले-बोंडले येथे दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी थांबतो. येथे दिंड्यांना थालीपीठ, दही, विविध प्रकारच्या चटण्या, उसळा, माडग, भाकरी, भात, लोणचे, अशा प्रकारची शिदोरी तोंडले-बोंडले परिसरासह तांदुळवाडी, शेंडेचिंच, माळखांबी, दसूर, खळवे आदी भागातील गावकरी घेवून येतात आणि वारकरी या शिदोरीचा आस्वाद घेतात.

दुपारी अडीच वाजता ज्ञानराजांचा पालखी सोहळा टप्प्याकडे मार्गस्थ झाला. पालखी सोहळा पुढे काढण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडत होती. अखेर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. सायंकाळी साडेपाच वाजता माउलींचा पालखी सोहळा टप्प्याजवळ पोहोचला. त्या नंतर काही मिनिटांत ज्येष्ठ बंधू सोपानदेवांचा पालखी सोहळा टप्पा येथे पोहोचला. येथे सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर, सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी सोपानदेवांचे सोहळा प्रमुख श्रीकांत महाराज गोसावी यांना श्रीफळ भेट दिले."पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, असा जयघोष झाला आणि टाळ, मृदुंगाच्या गजरात बंधू भेटीचा सोहळा येथे रंगला. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

संतांच्या पालख्यांचे पंढरपूर तालुक्यात प्रवेश

पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत चौरंगीनाथ, चांगा वटेश्‍वर, गुलाबबाबा, संतनाथ महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी (तुकाराम महाराजांचे टाळकरी), संत गोरोबा काका, जगनाडे महाराज आदी संतांच्या पालख्यांचे टप्पा येथे आगमन झाले. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिराची कुरोली येथे सांयकाळी सहा वाजता मुक्कामासाठी पोहोचला. रात्री आठ वाजता संत सोपानदेव तर रात्री नऊ वाजता संत ज्ञानदेवांचा पालखी सोहळा भंडीशेगांव मुक्कामी पोहोचला. बुधवारी संतांचे पालखी सोहळे शेवटच्या वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ होतील. बाजीराव विहीर येथे दुपारी संत ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यातील उभे व गोल रिंगण तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण होईल.

फोटो ओ‌ळी

टप्पा (ता. पंढरपूर) येथे संत ज्ञानदेव व संत सोपानदेव यांच्या बंधू भेटीचा सोहळा रंगला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरमध्ये क्रूझर-डंपरच्या धडकेत ४ ठार

$
0
0

कोल्हापूर

क्रूझर व डंपरमध्ये झालेल्या धडकेत चार जण ठार तर १३ जण जखमी झाले आहेत. कोल्हापूर ते राधानगरी मार्गावर भोगावतीजवळ हा अपघात झाला. सर्व जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

70153908

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बस अपघातात पाच जण जखमी

$
0
0

बस अपघातात पाच जण जखमी

नांदेड : नागपूरहून-नांदेडकडे येणाऱ्या शिवशाही बसवरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर धडकल्याने झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास पिंपळगांव जवळ हा अपघात घडला.

एसटी महामंडळाच्या वतीने शिवशाही बस सेवा सुरू करण्यात आली, परंतु चालक वेगावर नियंत्रण ठेवत नसल्याने अनेक ठिकाणी शिवशाहीला अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवशाही बस (क्रमांक एम. एच. ०६ बी. डब्ल्यू. ०८१३) नागपुरहून नांदेडला येत होती. पहाटे सहाच्या सुमारास अर्धापूर ते नांदेड मार्गावर असलेल्या पिंपळगाव फाट्याजवळ असताना बस चालकाचा ताबा सुटल्याने सदर बस विभाजकावर आदळली. या अपघातात राम कृष्णराव ढोरे (वय ४९), श्याम कृष्णराव ढोरे (वय ५३), नामदेव कावळे (वय २९, रा. नागपूर) कैलास शेळके (रा. चिंचोली दिग्रस) व इतर एक प्रवाशी जखमी झाले. सदर अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांना जखमींना शासकिय रुग्णालयात दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेरणी अभावी शेतकरी अडचणीत

$
0
0

सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत

म. टा. प्रतिनिधी, लातूर

पेरणीचा कालावधी संपत आला तरी पावसाअभावी जिल्ह्याच्या बहुतांश भागात पेरण्या झाल्या नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत आला असून सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत म्हणून द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लातूर व उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे यांनी केली आहे.

जुलै महिना अर्धा झाला तरी अद्याप लातूर जिल्ह्याच्या बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. अत्यल्प पावसावर जिल्ह्यातील ५ टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पावसाअभावी पेरलेले बियाणे उगवण्याची खात्री नाही. जिल्ह्यातील बहुतांश जनता शेतीवरच अवलंबून आहे. पेरणीसाठी उधार-उसनवारी करत शेतकऱ्यांनी तयारी केली होती. पण पाऊस न पडल्याने खरिपाचा हंगाम हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यासोबतच पेरणीसाठी घेतलेले कर्ज डोक्यावर राहणार आहे. आता पाऊस झाला आणि पेरणी केली तरी पिकाला उतार येणार नाही.

गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात कायम दुष्काळी स्थिती असून अशा स्थितीत शेतकरी पूर्णपणे कंगाल झाला आहेत. जवळची पुंजी संपल्याने आणि खरीप हंगामात काहीही हाती लागणार नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी राजेंद्र मोरे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये ७५ टक्के पेरणी

$
0
0

सर्वाधिक कापसाची पेरणी, मूग, उडीदाकडेही शेतकऱ्यांचा कल

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यात यावर्षी खरीपात उशिरा आणि पेरणीपुरता पाऊस पडला असला तरी ७५ टक्केच्या जवळपास पेरणी उरकली आहे. मात्र, येत्या काळात पिकाच्या वाढीसाठी चांगल्या पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे बळीराजा मोठ्या पावसाची वाट पाहत आहे.

बीड जिल्ह्याच्या पावसाची वार्षिक सरासरी ६६६ मिलिमिटर आहे. त्या तुलनेत आतापर्यंत ८४ मिलिमीटर म्हणजेच केवळ बारा टक्के पाऊस पडला आहे. गतवर्षी दहा जुलैपर्यंत यावर्षीच्या दुप्पट १६३ मिलिमीटर पाऊस पडला होता. मात्र, या ही स्थितीत पडलेल्या पावसावर बळीराजाने तिफनीवर मुठ धरत खरीप पेरणीस वेग घेतला आहे. आतापर्यंतच्या उपलब्ध पेरणीच्या आकडेवारीवरुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल कापूस आणि सोयाबीन पिकाकडे आहे.

जिल्ह्याचे खरीपचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख २७ हजार ५२७ हेक्टर आहे. या तुलनेत पाच लाख ३१ हजार ५२० हेक्टरवर म्हणजेच ७३ टक्के पेरणी उरकली आहे. जिल्ह्यत खरीपात सर्वाधिक कापसाची लागवड होते. ३ लाख ४३ हेक्टर कापसाचे सरासरी क्षेत्र आहे. या तुलनेत आतापर्यंत दोन लाख ५८ हजार ९२६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक कापूस घेतला जात असल्याने त्यासाठी आवश्यक १४ लाख ४७ हजार पाकिटाची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यापाठोपाठ जिल्ह्यात सोयबिनचे सरासरी क्षेत्र एक लाख १९ हजार ५१४ हेक्टर आहे. हे क्षेत्र यंदा दोन लाख २५ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी होईल असा अंदाज आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सोयाबीनची एक लाख ७५ हजार ७८४ हेक्टर म्हणजे सरासरीच्या एकशे सत्तेचाळीस टक्के पेरणी झाली आहे.

तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ६५ हजार हेक्टर असताना ३० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. उदीडचे क्षेत्र एक लाख ६५ हजार हेक्टर आहे. या तुलनेत ७८ हजार ३१७ हेक्टरवर उडीद पेरणी उरकली आहे. मूग ४० हजार हेक्टरवर, उडीद ६० हजार हेक्टर, बाजरी ३५ हजार ९३९ हेक्टर, खरीप ज्वारी चार हजार हेक्टरवर पेरण्यात आली आहे. तर मुगाची पेरणी दीडशे टक्के उरकली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असली तरी हा पेरणी झालेली पीक वाढण्यासाठी पुरेशा पावसाची गरज आहे. पीक वाढीसाठी मोठे पाऊस आवश्यक आहेत. बीड जिल्ह्यात गतवर्षी दुष्काळीस्थिती होती. त्यामुळे यंदा तरी चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. मात्र, जून महिना कोरडा गेला त्यानंतर जुलै महिन्यात अजुन ही म्हणावा असा पाऊस झाला नाही. जिल्ह्यातील नदी-नाले अजून ही खळखळला नाही. त्यामुळे आता आषाढी एकादशीकडे डोळे लागले आहेत. जुन्याजानत्या मंडळीत आषाढी माघारी परतली की बखाडी जाते अशी आख्यायिका आहे. त्यामुळे आता आषाढीनंतर तरी बखाडी दूर व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

बीडमध्ये रेकॉर्डब्रेक पेरणीची शक्यता

बीड जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख ३० हजार हेक्टरहून अधिक पेरणी झाली आहे. मात्र, अजुन ही यंदा रेकॉर्डब्रेक पेरणी होईल. यात कापसाचे क्षेत्र अधिक वाढेल व साडे सात लाख हेक्टरवर पेरणी होईल असा प्रशासनाचा अंदाज आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पद्मभूषण डॉ. कुकडेंना पुरस्कार

$
0
0

लातूर : पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांना बँक ऑफ बडोदाच्या वतीने देण्यात येणारा बडोदा सन अचिव्हमेंट अवॉर्ड जाहीर करण्यात आला. बँकेच्या ११२ व्या स्थापना दिनानिमित्त २० जुलै रोजी मुंबईत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. डॉ. कुकडे यांनी विज्ञान व वैद्यकशास्त्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लातूर शाखेचे मुख्य प्रबंधक एस. एस. तोमर यांनी बुधवारी निवडीचे पत्र दिले. दहा लाख रुपये रोख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्या संस्थेच्या माध्यमातून मी आजपर्यंत काम केले त्या विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटरलाच मी सर्व पुरस्कार समर्पित केले आहेत. या पुरस्काराचीही रक्कम संस्थेला देण्याचे डॉ. कुकडेंनी सुचवले आहे.

....................

अभाविपच्या महानगर अध्यक्षपदी प्रा. डॉ. जगदाळे

लातूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे लातूर महानगरात युवा संमेलन झाले. या संमेलनाचे उद्घाटन प्रदेश कार्यकारणी सदस्य विलास बोरसे, प्रा.डॉ. संदीपान जगदाळे व स्वप्नाली जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. स्वप्नाली जाधव यांनी मंत्रीप्रतीवेदन यावेळी केले. विलास बोरसे यांनी महाविद्यालयीन खुल्या निवडणुका यांवर मार्गदर्शन केले व चर्चा केली. यावेळी महानगर कार्यकारणीची घोषणा प्रा. डॉ. संदीपान जगदाळे यांनी केली. महानगर उपाध्यक्ष म्हणून प्रा. रुपेश जैन, प्रा. डॉ. साईनाथ उमाटे व प्रा.विशाल जमाले, महानगर सहमंत्री प्राजक्ता भोसले, अमित शिंदे व पवन बेलकोणे, टीएसव्हीके प्रमुख व कार्यालय प्रमुख प्रसाद मुदगले, टीएसव्हीके सहप्रमुख वैष्णवी जाधव, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख रितेश वलके, विद्यार्थिनी प्रमुख राधिका जाधव, सहप्रमुख आश्विनी कदम अशी घोषणा करण्यात आली. या संमेलनाचे सूत्रसंचलन प्रसाद मुदगले यांनी केले. यावेळी गंगाधर खेडकर, योगेश शेळके, योगेश शार्दुल, स्वप्नाली जाधव पदाधिकारी उपस्थित होते.

..........................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आषाढी एकादशीसाठी औशातून मोफत बससेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

औसा तालुक्यातील भाविकांना पांडूरंगाचे दर्शन घेता यावे, यासाठी औसा बसस्थानकातून गुरुवारी (११ जुलै) मोफत बस सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. औसा येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठान व संतोषप्पा मुक्ता मित्रमंडळाच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनी गुरुवारी सकाळी ९ वाजता औसा बसस्थानक येथे उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समितीचे संजय सगरे, संजय उजळंबे, काशिनाथ सगरे, सिद्धन भेटेकर, मुकेश देशमाने, मुक्तेश्वर पडसलगे, रमेश दुरुगकर, विजयकुमार बोरफळे, राम कांबळे, विनायक मोरे, रमेश शिंदे, अजय सगरे, दयानंद बनाळे, शिवकुमार मुरगे, गिरीधर जंगाले, शमशुल काझी, किशोर जाधव, विलास तपासे, विजय बिराजदार, चांगदेव माळी, महेश उस्तूरे, वामन अंकुश, रोहीत हंचाटे, अनंत भोजने व संतोषप्पा मुक्ता मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

औसा येथून जाणाऱ्या भाविकांसाठी एस. टी. महामंडळाने खास दोन बसची व्यवस्था केली आहे. गेल्या पाच वर्षांत औसा येथून ४५० पेक्षा अधिक भाविकांसाठी संयोजकांनी ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. अधिक माहितीसाठी काशिनाथ सगरे व विनायक मोरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजन समितीचे संजय सगरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>