Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तीन घरांच्या धोकादायक भिंती उतरवल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने सोमवारी शहरातील तीन घरांच्या धोकादायक भिंती पाडून टाकल्या. बुधवारी पोलिस बंदोबस्तात विरोध डावलून वांगी बोळ येथील वाड्याची भिंत उतरवल्यानंतर इतर ठिकाणी कारवाईला होणारा विरोध मावळला आहे. दोन दिवसांत बिंदू चौक, महाद्वार रोडवरील धोकादायक इमारतींचा भाग पाडून टाकण्यात येणार आहे.

महापालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक इमारती उतरवण्याची मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवस पोलिस बंदोबस्तात धोकादायक इमारतींचा भाग पाडून टाकण्यात आला. अशीच कारवाई वांगी बोळमध्ये सुरू असताना विरोध झाला. पण महापालिका अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात विरोध मोडीत काढला. त्यामुळे सोमवारच्या कारवाईला विरोध झाला नाही. डांगे गल्ली (बुधवार पेठ) येथे एका घराची भिंत पाडण्यात आली. त्यानंतर तोरस्कर चौकातील पोर्लेकर तर शिवाजी पेठेतील सरनाईक वाड्यातील सरनाईक यांच्या घराची भिंत महापालिका कर्मचाऱ्यांनी पाडली. कारवाई सुरू ठेवण्यासाठी बिंदू चौक व महाद्वार रोड परिसरातील घर मोकळे करण्यात आले आहे. दोन दिवसांत दोन्ही घरांचा धोकादायक भाग पाडण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुनर्वसन नको, हक्काचे घर हवे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कामगार चाळीतील कुटुंबांचे हक्काचे घर हिरावून घेऊ नका. इमारतीच्या दुरुस्तीसाठी त्यांचे पुनर्वसन करू देणार नाही, असा इशारा देत सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने महापालिकेवर मोर्चा काढला. मोर्चानंतर अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना निवेदन देताना पुनर्वसनाच्या नावाखील जागा बळकावण्याचा डाव असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी केला.

शिवाजी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चेकरी महापालिकेत आल्यानंतर त्यांनी अतिरिक्त आयुक्त पाटणकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, 'कामगारांना निवारा देण्यासाठी १९७२ मध्ये संभाजीनगर येथे कामगार चाळ बांधण्यात आली. पाच मजल्यांच्या पाच इमारतीमध्ये सुमारे २०० पेक्षा अधिक कुटुंबे राहत आहेत. या इमारतींची मोठी दुरवस्था झाली असून दुरुस्ती करण्याची गरज आहे. मात्र काहीजण इमारत दुरुस्तीसाठी कामगारांची घरे खाली करून जागा बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुनर्वसनाच्या नावाखाली काही जणांचा उद्योग सुरू आहे. सफाई कर्मचाऱ्यांची घरे खाली न करता त्याची दुरुस्ती करावी,' अशी मागणी केली.

मोर्चात राजू बागवान, बबन चावरे, रितेश पटवणे, नर्मदा पटवणे, पूजा पटवणे, मेघा पटवणे, गंगा थनवाल, गीता रानवे, अरुणा वाडिया, माधुरी पंडत, कमल कांबळे, सीमा चव्हाण, लक्ष्मी लखन, कलावती शेरगिल, उषा बगाडे, किरण बेडेकर, अण्णा तिळवे, अमोल पाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवक संघांचा १५ जुलैपासून बेमुदत संपाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने १५ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सेवक संघांचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी सोमवारी विद्यापीठात झालेल्या द्वारसभेत हा निर्णय घोषित केला. कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला शिवाजी विद्यापीठ अधिकारी फोरमने पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे विद्यापीठाचे कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यात तीन जूनपासून आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारकडून मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कसलाही प्रतिसाद मिळत नाही. सरकारचे कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाने राज्यातील सर्व विद्यापीठात पंधरा जुलैपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात शिवाजी विद्यापीठ सेवक संघही सहभाग होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग मिळावा, आश्वासित प्रगत योजना पुन्हा लागू करावी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरावात, कर्मचारी कपातीचे धोरण थांबवावे या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे. याप्रसंगी कर्मचारी महासंघाचे महासचिव मिलिंद भोसले यांनी एक जून रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीतील मााहिती दिली. शिवाजी विद्यापीठ अधिकारी फोरमचे संजय कुबल यांनी अधिकारी फोरमची भूमिका मांडली. सेवक संघाचे सरचिटणीस राम तुपे यांनी प्रास्ताविक केले. द्वारसभेला सेवक संघाचे पदाधिकारी सुरेश पाटील, संभाजी कांबळे, अजय आयरेकर, अनिल साळोखे, अतुल ऐतवडेकर, अमोल घुणके आदीसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान विद्यापीठात सध्या ४५० कर्मचारी कार्यरत आहेत. १०० हून अधिक जागा रिक्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जात पडताळणीची माहिती मागवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक मागासवर्ग प्रवर्गातून लढवलेल्या व विजयी झालेल्या नगरसेवकांच्या जात पडताळणीची माहिती राज्य निवडणूक आयोगाने मागवली आहे. याबाबतचे पत्र सहाय्यक कक्ष अधिकारी प्रदीप परब यांनी महापालिका प्रशासनाला पाठवले आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मागासवर्ग प्रवर्गातून निवडणूक लढवलेल्या आणि मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवकांची माहिती सुरेश शामराव पोवार यांनी माहिती अधिकारात राज्य निवडणूक आयोगाकडे मागवली होती. महापालिकेने याबाबत नगरसेवकांवर केलेल्या कारवाईचा अहवाल पाठवावा, असे पत्र कक्ष अधिकाऱ्यांनी प्रशासनास पाठवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठासाठी ३१ जुलैपर्यंत अल्टिमेटम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी खंडपीठ कृती समितीने सरकार आणि न्याययंत्रणेस ३१ जुलैचा अल्टिमेटम दिला आहे. जिल्हा न्याय संकुल येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या सहा जिल्ह्यातील वकिलांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास येणाऱ्या काळात सरकारी खटल्यांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही वकिलांनी दिला आहे.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खंडपीठ आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी खंडपीठ कृती समितीची बैठक कसबा बावडा येथील न्यायसंकुलात आयोजित केली होती. या बैठकीस सहा जिल्ह्यातील वकील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खंडपीठ कृती समितीने मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांना कोल्हापूर भेटीचे निमंत्रण दिले आहे. जुलैच्या अखेरीस कोल्हापुरात येण्याचे आश्वासन न्यायमूर्तींनी दिले आहे. या भेटीदरम्यान खंडपीठाच्या प्रश्नावर चर्चा होऊ शकते. न्यायमूर्तींना कोल्हापूर भेटीसाठी वेळ न मिळ‌ाल्यास मुंबईत जाऊन त्यांची भेट घेण्याचे वकिलांनी निश्चित केले आहे. खंडपीठाबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास येणाऱ्या काळात सरकारी खटल्यांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही वकिलांनी बैठकीत दिला. ३१ जुलैपर्यंत मुख्य न्यूयमूर्तींची भेट न झाल्यास ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापुरात सहा जिल्ह्यातील वकिलांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होईल, अशी माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आर. बी. गावडे यांनी दिली.

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगीची तीव्रता वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा येथे डेंगीची साथ वाढल्याने आरोग्य विभागाने घरोघरी धूर फवारणी सुरू केली आहे. विभागातर्फे सुरू असलेल्या सर्व्हेक्षणात गुरुवारी टिपुगडे गल्ली व निकम गल्लीमध्ये पाच घरामध्ये डेंगीच्या अळ्या सापडल्या. आरोग्य विभागाकडून धूर फवारणी, गटारी वाहती करणे, डेंगीच्या अळ्या असलेले पाणीसाठे नष्ट करण्यात येत आहेत. दरम्यान, पंधरा जूनपासून कळंबा येथे पंधराजणांना डेंगीची लागण झाल्याची आकडेवारी आहे. ग्रामीण भागातही डेंगीची तीव्रता वाढत आहे. एक जानेवारी २०१९ पासून आजअखेर जिल्ह्यामध्ये डेंगीचे १४९ रुग्ण आढळले आहेत.

डेंगीची साथ पसरू नये म्हणून गावोगावी धूरफवारणी, पाणी साचलेल्या ठिकाणी जळके ऑइलचा वापर व गटारी वाहती करावीत. विविध ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. गप्पी मासे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. दरम्यान, कळंबा येथे डेंगीची लागण होवून महिलेच्या मृत्यूच्या घटनेनंतर आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने कळंबा येथे उपाययोजना वाढविल्या आहेत. शाहू गल्लीत सर्व्हेक्षण व तपासणी मोहिम राबवली असून सात ठिकाणी गप्पी मासे सोडले आहेत. ग्रामपंचायतीमार्फत व्हेंट पाइपवर जाळया बसविल्या जात आहेत. यासाठी १५०० जाळया मागविल्या आहेत. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, तालुका आरोग्य अधिकारी गुणाजी नलवडे यांनी कळंबा येथे भेट देऊन उपाययोजनांचा आढावा घेतला. आरोग्य विभागामार्फत सोळा पथके कार्यरत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी सर्व ग्रामपंचायतींना गावात धूर फवारणी, पोस्टरच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकेवर अत्याचारप्रकरणीआरोपीस दहा वर्षांची शिक्षा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षीय बालिकेस खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस कोर्टाने दहा वर्षे तुरुंगवास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पांडुरंग मारुती पाटील (वय ४२, रा. कणेरीवाडी) असे आरोपीचे नाव आहे. दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी हा निर्णय दिला.

सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कणेरीवाडी येथील पांडुरंग पाटील याने २०१३ मध्ये गावातीलच एका घरासमोर अंगणात खेळणाऱ्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवून स्वत:च्या घरी नेले. लैंगिक अत्याचार केल्यानंतर पीडित बालिकेने हा प्रकार घरात आईला सांगितला. त्यानंतर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक डी. जी. पिसाळ यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी वकील ॲड. अमिता कुलकर्णी यांनी सात साक्षीदार तपासले. पीडित मुलगी, डॉक्टर, पीडितेचे पालक यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. उपलब्ध पुरावे आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य माणून न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी कलम ३७५, ३५४ व बाललैंगिक अत्याचार कलमानुसार आरोपी पांडुरंग पाटील यास दहा वर्ष कैद व २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. पोलिस कॉन्स्टेबल वर्षा पाटील, वनिता चव्हाण यांनी खटल्याचे कामकाज सुरू असताना महत्त्वपूर्ण मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वंचित’तर्फे जिल्ह्यातीलसर्व जागा लढवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढवण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी कोअर समितीशी संपर्क साधावा', असे आवाहन आघाडीचे नेते प्रा. डॉ. सुरेश शेळके यांनी सोमवारी केले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांना चांगली मते पडली आहेत. 'वंचित'च्या उमेदवारांमुळे कोणास फायदा झाला, याचा अर्थ प्रत्येकजण वेगळ्या पध्दतीने काढत आहे. मात्र 'वंचित'ला चांगला प्रतिसाद मिळत हे नाकारून चालणार नाही. विधानसभेला जिल्ह्यातील सर्व जागा लढवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. इच्छुकांनी अनिल म्हमाने, अॅड. इंद्रजीत कांबळे, अस्लम सय्यद, डॉ. अरूणा माळी, प्रेमकुमार माने यांच्या कोअर समितीशी संपर्क साधावा. उमेदवारीचा अंतिम निर्णय अॅड. प्रकाश आंबेडकर घेतील. वंचित आघाडीने काँग्रेसला राज्यात ४० जागा देण्याचे मान्य केले आहे. यावर काँग्रेसचे समाधान न झाल्यास तिसरी आघाडी म्हणून सर्व जागा 'वंचित'लढवणार आहे.'

.......

लक्ष्मण मानेंची

नाराजी वैयक्तिक

'वंचित बहुजन आघाडी भाजपला मदत करत आहे, त्यामुळे अॅड. आंबेडकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लक्ष्मण माने यांनी नुकतीच केली होती. यावर डॉ. शेळके म्हणाले, 'दबाव टाकून माने यांना काही तरी साध्य करून घ्यायचे असेल. त्यांची वैयक्तिक नाराजी आहे. ते अजूनही 'वंचित'मध्येच आहेत. त्यांची नाराजी अॅड. आंबेडकर दूर करतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खराब रस्त्यांची तातडीने दुरूस्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'खराब रस्त्यांमुळे शहरवासियांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे रस्ते वाहतूक योग्य बनवण्यासाठी तातडीने काम सुरू करण्यात येणार आहे', असे नूतन महापौर माधवी गवंडी यांनी सांगितले. याशिवाय महापौरपदाच्या मिळणाऱ्या कालावधीत शाहू समाधीस्थळाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम घेण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

महापौरपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर गवंडी यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी उपलब्ध कालावधीत जास्तीतजास्त विकासकामांच्या मंजुरीबरोबरच त्यांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले. महापौर गवंडी म्हणाल्या, 'शहरात अमृत योजनेतून पाइलपाइन व ड्रेनेज लाइनच्या कामासाठी रस्ते खोदण्यात आले. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात सरकारकडून कोणत्याही प्रकारचा निधी दिलेला नाही. परिणामी अनेक रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. त्यातच ड्रेनेजसाठीही प्रशासनाने खोदून ठेवले आहे. या सर्वांचा नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याने पहिल्या टप्प्यात रस्त्यांची दुरवस्था कमी करायची आहे. सध्या किमान मुरुम टाकून ते वाहतूकयोग्य बनवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शाहू समाधीस्थळाचा विषयही अग्रक्रमावर ठेवण्यात येणार आहे. माझ्या महापौरपदाच्या कालावधीत समाधीस्थळाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम करण्याचा मानस आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार, मुख्यमंत्री, मायावती यांच्यासह मोठ्या नेत्यांना निमंत्रण देण्याचे नियोजन केले जाणार आहे.'

त्या पुढे म्हणाल्या, 'थेट पाइपलाइन योजनेच्या कामाला चालना देण्यात येणार आहे. सोळांकूरसह तीन गावांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच तीर्थक्षेत्र आराखड्याच्या कामालाही गती देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन शहरवासियांच्या सुविधांसाठी सरकारने निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होणार आहे. त्यापूर्वी शहरासाठी आवश्यक कामांच्या मंजुरी घेण्याबरोबरच त्यांच्या कामांना सुरुवात करण्यासाठीही पाठपुरावा केला जाईल.' यावेळी परिवहन सभापती अभिजित चव्हाण,नगरसेवक सचिन पाटील, अनुराधा खेडकर, उमा बनछोडे, माजी नगरसेवक आदिल फरास, प्रकाश गवंडी, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा

$
0
0

लिंगमळा धबधबा वाहू लागला

सातारा :

धुवाँधार पावसाने महाबळेश्‍वरमधील वेण्णा लेक पाठोपाठ लिंगमळा धबधबाही ओसंडून वाहू लागला आहे. येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी महाबळेश्‍वरमध्ये वीकएंडला चांगलीच गर्दी झाली होती. संततधार पावसाने वेण्णालेकच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शनिवार व रविवार या वीकएंडला असंख्य हौशी पर्यटक मुसळधार पावसात महाबळेश्‍वरमध्ये पर्यटनास आले होते. पर्यटनास आलेले पर्यटक वेण्णालेक परिसरात धुके, धुवाँधार पावसात भिजण्याचा आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत.

..........

गोंदवलेकर महाराजांच्या दिंडीचे प्रस्थान

सातारा :

श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पायी दिंडीचे सोमवारी सकाळी आषाढी वारीसाठी पंढरपुरकडे प्रस्थान झाले. महाराज आषाढी वारी करीत होते. श्रींच्या पश्चात आजही हा पायी दिंडी सोहळा अविरतपणे सुरू आहे. समाधी मंदिर समिती व समस्त वारकरी मंडळाच्या वतीने दर वर्षी या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. सकाळी नऊच्या सुमारास श्रींच्या समाधी मंदिरात आरतीनंतर श्रींच्या पादुका व प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. दिंडीचा म्हसवड, पिलीव, भाळवणी व वाखरी येथे मुक्काम करून वारी दशमीला इसबावी येथील श्री गोंदवलेकर महाराज मठात जाईल. द्वादशीला दिंडी परतीचा प्रवास करेल.

........

पावसाचा जोर वाढला;

जनजीवन विस्कळित

सातारा :

जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्‍वर, वाई, जावली, सातारा या तालुक्यात धुवाँधार पाऊस कोसळत आहे. दरड कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, घरांची पडझड, पूल खचणे असे प्रकार घडत आहेत. जनजीवन कोलमडून पडले आहे. साताऱ्यात शाहुपुरीमध्ये शिवसमर्थ कॉलनीमधील अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे.

भांबवली रस्त्यावर दरड कोसळली असून, सातारा व साबळेवाडीत घरांच्या भिंती पडल्या. या पावसाने डोंगरदऱ्यातील नागरिकांना बेहाल केले असून, अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्‍वर, वाई, जावली, सातारा या तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून, जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. साताऱ्यात जोरदार सरी कोसळत असून, माची पेठेतील एका घराचा पाया ढासळला आहे. सदर बझारमधील कूपर कॉलनीनजीकही पूल धोकादायक बनल्याने वाहतूक वळवण्यात आली आहे.

कास, बामणोली खोऱ्यात पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. भांबवली-तांबी रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी पुणे येथील पर्यटकांचा ग्रुप अडकून पडला. या परिसरात रस्ते खचण्याचे प्रकारही घडले. त्यामुळे तांबी, भांबवली, धावली, जुंगटी, जळकेवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे. कास परिसरातील पूल पाण्याखाली गेला असून, पुलाच्या पलिकडील अंधारी, मुनावळे, उंबरी, म्हावशी, तेटली, बामणोली, शेंबडी, कारगाव या गावांकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली आहे. जावलीत कुसुंबी-कोळघर मार्गावरही दरड कोसळली. तालुक्यातील पावसाचा जोर वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग विकासासाठीभीक द्या, आंदोलन

$
0
0

प्रभाग विकासासाठी

भीक द्या, आंदोलन

सोलापूर :

भीख द्या.., भीख द्या.., प्रभाग विकासासाठी भीख द्या, अशी मागणी करीत नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मंगळवारी महापालिकेच्या

अंदाजपत्रकीय सभेत गांधीगिरी करीत लक्ष वेधून घेतले. फाटकी साडी आणि हातात टोपली, अशा अवतारात त्यांनी सभागृहात प्रवेश करीत थेट महापौरांसमोर जाऊन भीख मागण्यास सुरुवात केली. अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला. निधी न मिळाल्याच्या कारणावरून गेल्या महिन्यात झालेल्या सभेवेळी फुलारे यांनी महापालिकेच्या सभागृहाला कुलुप ठोकले होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद झाला असून, कॉँग्रेसने त्यांना नोटीसही बजावली होती. मात्र नोटीसीला उत्तर देण्याएवजी त्यांनी कांग्रेसचा राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववधूचा अपघातात मृत्यू

$
0
0

नववधूचा अपघातात मृत्यू

सातारा

मोरावळे (ता. मेढा) येथील विवाहितेचा ट्रक खाली सापडून करून अंत झाला. ही हदयद्रावक घटना मेढा-जवळवाडी गावाच्या हद्दीत मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजता घडली. रिटकवली गावचे माजी उपसरपंच व भाजपचे कार्यकर्ते सर्जेराव दादू मर्ढेकर (रा. रिटकवली) नवविवाहित मुलगी भाग्यश्री गणेश जाधव (रा. मोरावळे) हिला हिरो होंडा स्प्लेंडर (क्र. एम. एच ११ बीसी-२५२८) वरून मेढा येथून आठवडा बाजार घेवून रिटकवलीकडे येत होते. दरम्यान, मेढा-जवळवाडी येथील विजय सरडे यांच्या घरासमोर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (क्र. एम. एच. ४२ बी ८५०८) ने दुचाकीला धडक दिल्याने भाग्यश्री रस्त्यावरच पडली. वेगात असणाऱ्या ट्रकखाली सापडून तिचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक कासम उस्मान मुलाणी (रा. बुध, ता. खटाव) याला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोरणा-चिटेघर धरण भरले

$
0
0

मुसळधार पावसामुळे मोरणा विभागाला वरदान ठरलेल्या पाटण तालुक्यातील मोरणा-गुरेघर धरणात सध्या ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या सांडव्यावरून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग मोरणा नदीत सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मोरणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मोरणा गुरेघर धरण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून मोरणा नदीकाठी असणाऱ्या धावडे, वाडीकोतावडे, मोरगिरी, बेलवडे आदी गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाटण तालुक्यातील आणि मोरणा खोऱ्यातील मोरणा नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. ओढ्यांना पाणी आले आहे. नदीकाठांवरील शेतांमध्ये पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, मणदुरे विभागात सुरू असलेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे साखरी-चिटेघर लघुपाटबंधारे प्रकल्प मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे केरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

......

रस्त्यांसाठी साडेसात कोटी

कराड :

कराड उत्तरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन २०१९-२० मधून ७ कोटी ५१ लाख रक्कम रुपये मंजूर झाले आहेत. या मंजूर निधीतून मतदारसंघातील विविध गावांतील रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. या सर्व कामांची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू समाधीस्थळ स्मारकाचे लोकार्पण दहा ऑगस्टनंतर

$
0
0

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

' सिद्धार्थनगर, नर्सरी बाग येथील राजर्षी शाहू समाधीस्थळ स्मारकाचा लोकार्पण सोहळा दहा ऑगस्टनंतर करण्यात येणार आहे. समाधीस्थळ स्मारकांमधील उर्वरीत कामे त्वरीत करावीत,' अशा सूचना महापौर माधवी गवंडी यांनी मंगळवारी विकास समितीच्या बैठकीत अधिकारी, ठेकेदार व आर्किटेक्ट यांना केल्या. स्थायी समिती सभागृहात ही बैठक झाली.

शाहू समाधीस्थळ स्मारकाचा आढावा घेताना शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत म्हणाले, 'स्मारकाचे आतापर्यंत ९२ लाखांचे काम पूर्ण झाले असून ७० लाखांच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. राफ्ट, पॅसेज काँक्रिट व पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम सुरू आहे.' ठेकेदार अमोल साळोखे म्हणाले, 'लँडस्केपिंग, पेव्हिंग व स्टोनचे काम प्रगतीपथावर आहे. लॉनसह फरशीचे काम ३१ जुलैपर्यंत काम पूर्ण होईल.' अभिजित जाधव यांनी आर्किटेक्ट कामाचा आढावा घेतला. 'पदाधिकारी व गटनेत्यांची बैठक घेऊन लोकार्पण सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येणाऱ्या पाहुण्यांचे नियोजन करावे,' अशी सूचना समिती सदस्य आदिल फरास यांनी केली.

महापौर गवंडी म्हणाल्या, 'सोमवारी (ता. १५) समाधीस्थळ स्मारकाची पाहणी करण्यात येईल. पाहणीदरम्यान लोकार्पण सोहळ्याची तारीख जाहीर केली जाईल. तत्पूर्वी संपूर्ण कामाचा निपटारा करावा.'

बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, नगरसेविका हसिना फरास, सरिता मोरे, मेहजबीन सुभेदार, नगरसेवक जय पटकारे, समिती सदस्य वसंतराव मुळीक, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, पुराअभिलेख विभागाचे गणेश खोडके, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, नंदुकमार मोरे, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट पाइपलाइनची प्रतीक्षा वाढली

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसांमुळे काळम्मावाडी थेट पाइपलाइनचे काम बंद झाले आहे. जॅकवेल व चार इंटकवेलचे काम करण्यास अडथळे निर्माण होत असल्याने शहरवासियांना योजनेद्वारे पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आणखी वर्षभराची प्रतीक्षा करावी लागेल. धरणातील पाणीपातळी कमी होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईपर्यंत योजनेच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे अधिकच्या आर्थिक खर्चासाठी महापालिकेला पुन्हा निधीची उभारणी करावी लागणार आहे.

कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पाच वर्षांपासून कामाला सुरुवात झाली. पण योजनेतील अडथळे अद्याप कमी होताना दिसत नाही. अडथळे दूर करण्यास प्रशासनाला बऱ्यापैकी यश आले असले, तरी अद्याप पूर्णत: यश आलेले नाही. एकीकडे सोळांकूर ग्रामस्थांचा पाइपलाइन टाकण्यास विरोध कायम असतानाच वन विभागाने केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्तावाला अद्याप ग्रीन सिग्लन मिळालेला नाही. सोळांकूर ग्रामस्थांचा विरोध चर्चेतून दूर होईल, मात्र नैसर्गिक अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची आवश्यकता होती. योजनेला डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर योजनेच्या कामाने गती घेतली.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर दर रविवारी योजनेची प्रत्यक्ष पाहणी करण्यास सुरुवात केली. योजनेतील सर्वात महत्त्वाच्या जॅकवेल, इंटकवेल व इन्फेक्शन वेळसाठी प्रयत्न सुरू केले. दोन वर्षांपूर्वी यासाठी केलेल्या खोदाईमध्ये मोठ्याप्रमाणात गाळ साचला होता. युद्धपातळीवर प्रयत्न करुन गाळ काढून कामाला सुरुवात झाली. जॅकवेलच्या राफ्ट टाकून त्याच्या उभारणीसाठी प्रयत्न केले. मान्सून पावसाने ओढ दिल्यानंतर कामासाठी १५ ते २० दिवसांचा अधिक कालावधी मिळाला, तरीही राफ्टचे केवळ ८५ टक्के काम पूर्ण झाले. तर १२ मीटर उंचीच्या दोन इंटकवेलचे कमाही पूर्ण होऊ शकले नाही. दहा मीटर उंचीच्या इन्फेक्शन वेलचे काम अंतिम टप्प्यात असले, तरी तेही पूर्ण होऊ शकले नाही. धरणात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली असून कामाच्या ठिकाणीही पाणी साचले आहे. परिणामी गेल्या आठ दिवसांपासून कामच बंद झाले आहे. योजनेच्या कालावधी वाढत असल्याने एकूण ४८८ कोटीच्या रकमेत आणखी वाढ होणार आहे.

मुदतवाढीशिवाय पर्याय नाही

थेट पाइपलाइन योजनेला डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली. मात्र या मुदतवाढीचा फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ द्यावी लागणार आहे. धरणातील पाणीसाठी कमी होण्यासाठी मार्च २०२० पर्यंत प्रतीक्षा कारावी लागेल. धरणातील पाणीसाठा कमी होऊन पुन्हा काम करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी मिळेल. या कालावधीत काम पूर्ण न केल्यास योजनेचे भवितव्य अधातंरीच राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनपा लवादाकडे जाणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भविष्य निर्वाह निधी कायद्यानुसार महापालिकेला कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम जमा करावी लागेल. पण केंद्र सरकारचा कायदा आणि राज्य सरकारने त्याची केलेली अंमलबजावणी याचा तांत्रिक मुद्दा पुढे करून महानगरपालिका केंद्रीय औद्योगिक लवादाकडे दाद मागण्याचे ठरविले आहे. आठ वर्षानंतरही हक्काच्या रकमेपासून वंचित असलेल्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या या चालढकल वृत्तीचा आणखी फटका बसणार आहे. पीएफ कार्यालयाने मात्र रक्कम जमा न केल्यास प्रसंगी मालमत्तेवर बोजा नोंद करण्याचा इशारा दिला आहे.

महानगरपालिका, नगरपालिका अस्थापनांना १९५२ चा भविष्य निर्वाह निधी कायदा केंद्र सरकारने २०११ मध्ये लागू केला. कायदा लागू झाल्यापासून कर्मचाऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम कपात केलेली रक्कम पीएफ कार्यालयाकडे जमा करणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारने कायद्याची घोषणा केल्यानंतर त्याचा राज्य सरकारने २०१३ मध्ये स्वीकार केला. परिणामी २०११-१२ मध्ये कर्मचाऱ्यांची पीएफची रक्कम जमा केली नाही. याबाबत पीएफ कार्यालयाच्यावतीने वारंवार नोटीस देऊन महापालिका प्रशासनाला कळविले होते. पण या नोटिसीची फारशी गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यानंतर पीएफ कार्यालयाचे विभागीय आयुक्तांसमोर वेळोवेळी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान योग्यरित्या बाजू मांडण्यात आली नाही. प्रसंगी कर्मचाऱ्याची चार कोटी ९३ लाख रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्र सरकारची कायद्याची घोषणा आणि राज्य सरकारने कायद्याची अंमलबजावणी करण्यास केलेला विलंब या तांत्रिक मुद्याचा आधार घेत महापालिकेने रक्कम जमा करण्यास असमर्थता दर्शवली आहे. पीएफ कार्यालयाने दिलेल्या आदेशानंतर प्रशासनाने सेंट्रल गर्व्हमेंट इंडिस्ट्रियल ट्रिब्युनलकडे धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. ट्रिब्युनलचा निकाल कर्मचाऱ्यांचा बाजूने लागल्यास दिलासा मिळेल. पण स्थगिती मिळाल्यास मात्र त्यांना हक्काच्या रकमेपासून वंचित राहावे लागेल. 'पीएफ रक्कम जमा करण्याचे आदेश देऊनही रक्कम जमा न केल्यास प्रथम बँक खाती गोठवली जातील. तरीही रक्कम जमा न केल्यास प्रसंगी मालमत्तेवर बोजा नोंद करण्याची प्रक्रिया केली जाईल.' असे पीएफ कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पीएफ कार्यालयाने २०११-१२ मधील रक्कम जमा करण्यास नोटिसींचा ससेमिरा लावल्यानंतर महापालिकेने रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. दर महिन्याला सुमारे ६५० कर्मचाऱ्यांची १७ लाखांची रक्कम पीएफ कार्यालयाकडे जमा केली जात आहे. त्यामध्ये नियमितताही दिसून येते. पण एकाच वर्षाची रक्कम जमा करण्यास प्रशासन का विलंब लावत आहे? असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जावू लागला आहे.

कर्मचाऱ्यांची जेवढी वेतन कपात झाली, तेवढी रक्कम त्यांना मिळाली पाहिजे. त्यामध्ये कोणीही आडमुठी भूमिका घेऊ नये. कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कर्मचारी संघ त्यांच्या नेहमी पाठीशी राहील.

विजय वणकुद्रे, कार्याध्यक्ष, कर्मचारी संघ

भविष्य निर्वाह कायद्याप्रमाणे महापालिकेला कर्मचाऱ्यांची पीएफची रक्कम जमा करावी लागेल. रक्कम जमा न केल्यास बँक खाती गोठवण्यात येतील. तसेच प्रसंगी मालमत्तेवरही बोजाची नोंद केली जाईल.

गोपाल जोशी, अंमलबजावणी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसथांबा स्थलांतर

$
0
0

कोल्हापूर

सायबर चौकात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी चौकात असलेला केएमटीचा बसथांबा स्थलांतर केला आहे. हा बसथांबा शिवाजी विद्यापीठाच्या उत्तरेकडील बाजूला सायबर कॉलेजजवळ उभा करण्यात आला आहे. राजारामपुरी, राष्ट्रीय महामार्ग आणि आयसोलेशन हॉस्पिटलकडून येणाऱ्या वाहनांमुळे सायबर चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. येथे सिग्नल असला, तरी वाहतूककोंडीची समस्या नित्याचीच बनली आहे. यातून मार्ग काढत केएमटी प्रशासनाने चौकात असलेला बसथांबा थोड्या अंतरावर स्थलांतर केला. कागल व कणेरीमठ मार्गावरुन येणाऱ्या केएमटी बसेस शिवाजी विद्यापीठाच्या उत्तरेकडील बाजूस थांबतील. तर कागल, कणेरीमठाकडे जाणाऱ्या बस सायबर कॉलेजसमोर थांबतील. त्यासाठी नवीन बसथांबा उभा केला आहे. शिवाजी विद्यापीठाकडून शाहू मैदानाकडे जाणाऱ्या बसेस गार्डन हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभा राहतील. बसथांब्यातील बदलाची प्रवाशांनी नोंद घेवून केएमटी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदासीन धोरणामुळे शेती,वस्त्रोद्योगाची वाताहत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

रोजगार उपलब्ध करून देण्याची जबर क्षमता असणाऱ्या शेती आणि वस्त्रोद्योगाची वाताहत केंद्र आणि राज्य सरकारच्या उदासीन धोरणांमुळे सुरू आहे. सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील दीड लाख तर देशातील साडेआठ लाख उद्योग एकीकडे बंद पडले असताना देशात शेतीचा वेगही २.७ वर येऊन ठेपला आहे. साहजिकच आर्थिक बिकटावस्थेबरोबरच बेरोजगारीचा लोंढा तयार होऊन देशासमोर भविष्यात मोठे संकट उभे राहणार आहे,' अशी भीती माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना व्यक्त केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिंतन व अभ्यास शिबिरासाठी शाहूवाडीत आले असता त्यांनी हा संवाद साधला.

शेट्टी म्हणाले, 'असुरी सत्तेच्या मोहात सत्ताधारी मंडळी देशासमोरच्या ज्वलंत प्रश्नांना सामोरे न जाता वांशिक आणि धार्मिक तेढ निर्माण करीत जनतेचे लक्ष्य इतरत्र वळवून आपली पोळी भाजून घेत आहेत. दुर्दैवाने सामान्य जनताही या कपटनीतीला बळी पडत आहे. कुशल ड्रायव्हर १७ हजार रुपये पगार घेत असताना व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या युवकांना मात्र सात हजार रुपये पगारात काम करावे लागते. अशावेळी अर्थवादी विचारमांडणी करून सामान्य जनतेत जागृती करण्याचे बुद्धिवंतांसमोर आव्हान असले तरी वाट चुकलेला तरुण वर्ग ठेचा खाऊन भविष्यात योग्य मार्गावर परतेल.'

लोकसभा निवडणुकीतील अपयशाने निराशा येणे हे एका विशिष्ट टप्प्यापर्यंत ठीक आहे. परंतु अख्खा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना एका पराभवाचे दुःख कवटाळून बसलो तर आभाळाकडे आशाळभूत नजरा लागलेल्या समस्त कष्टकरी, शेतकरी वर्गाच्या हतबलतेचे काय होईल? हा प्रश्नच माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्याला अस्वस्थ करतो. म्हणूनच लोकसभेतील पराभव पाठीमागे सारून सुमारे दोन हजार किलोमीटर दुष्काळी महाराष्ट्राचा दौरा केला. शेतीचे अर्थशास्त्र अवगत नसल्यामुळे शेतीसमोरील उद्भवणाऱ्या दैनंदिन समस्यांतून शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यात राज्यकर्त्यांना अपयश आहे आहे, असेही ते म्हणाले.

एफआरपीची लढाई जिंकू

'ऊसदराची एफआरपी दोन टप्प्यात विभागून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने सहमती करार करून घेण्याची कारखानदार आणि सरकार यांनी आखलेली रणनीती स्वाभिमानी शेतकरी संघटना हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. एकरकमी एफआरपीसाठी प्रसंगी न्यायालयीन व रस्त्यावरील आरपराची लढाईही जिंकू,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

झलक दाखवू

दूषित प्रवाह शुद्ध करण्याच्या अभिलाशेने भाजपशी संगत केली आणि प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा स्थायीभाव थोडा बाजूला पडला. परंतु हा स्थायीभाव अद्याप विसरलो नाही, याची प्रत्यक्ष झलक नजीकच्या काळात सरकारला दाखवून देऊ,असा गर्भित इशाराही त्यांनी राज्यकर्त्यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा परीक्षार्थींसाठी सेनेची आयएएस अॅकॅडमी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'सध्याच्या स्पर्धेच्या युगात केवळ पदवी आणि त्यानंतर नोकरी या सीमित मानसिकतेतून बाहेर पडत मराठी मुलांना स्पर्धा परीक्षेच्या प्रोत्साहनासाठी शिवसेनेच्या आयएएस अॅकॅडमीमार्फत चळवळ उभी करावी' असे आवाहन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकॅडमीचे प्रमुख विजय कदम यांनी केले. शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी कदम मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यानिमित्ताने शासकीय विश्रामधाम येथे मार्गदर्शन मेळाव्यात कदम बोलत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुजित चव्हाण, दुर्गेश लिंग्रस यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

विजय कदम म्हणाले, 'स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय सेवेत करिअर करण्यासाठी महाराष्ट्रातील मुलांची मानसिकता घडवण्याची गरज आहे. राज्यातून जी मुलं या परीक्षेत उत्तीर्ण होतात ती पुढे मुलाखतस्तरावरही यशस्वी व्हावीत यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळाले पाहिजे. गेल्या काही वर्षात स्पर्धा परीक्षेकडे ओढा वाढला आहे. वर्षाला ही संख्या एक हजारांच्या घरात गेली आहे. यामध्ये महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या ८० ते ९०च्या आसपास आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी दिल्ली, चेन्नई यांसारख्या शहरात राहण्याचा खर्च मराठी मुलांना परवडणारा नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी अभ्यास, शैक्षणिक साहित्य, पुस्तके, मार्गदर्शनपर व्याख्याने या संधी महाराष्ट्रातील जिल्हास्तरावर मिळाव्यात यासाठी शिवसेना आयएएस अॅकॅडमीने पुढाकार घेतला आहे. पदवी असूनही नोकरी मिळत नाही तेव्हा तरूणांची मानसिकता बिघडते. हे वास्तव बदलायचे असेल तर स्पर्धा परीक्षेसाठी मुलांना शालेय व महाविद्यालयीन स्तरावरूनच तयारी करण्याचे धडे दिले पाहिजेत. यामध्ये कौटुंबिक व सामाजिक सहभाग मोलाचा आहे. नोकरीच्या रांगेत मराठी मुलं आजही मागे आहेत. अभियांत्रिकीच्या पाऊणलाख जागा दरवर्षी रिकाम्या राहतात. मेडिकलचा खर्च न परवडणारा आहे. नव्या संधींचा विचार करत असताना पालकांनीही प्रशासकीय सेवेतील करिअरसाठी मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मल्टिस्टेट’ प्रश्नी पालकमंत्र्यानी शब्द पाळावा

$
0
0

आमदार सतेज पाटील यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गोकुळ'च्या मल्टिस्टेटच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळावी यासाठी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र लोकसभा निवडणूक प्रचारसभेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मल्टिस्टेटच्या प्रस्तावाला राज्य सरकारची एनओसी मिळणार नाही, अशी घोषणा केली होती. आता पालकमंत्र्यांनी लाखो दूध उत्पादकांना दिलेल्या शब्दाला जागले पाहिजे,' असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

आमदार पाटील म्हणाले, 'मल्टिस्टेटवरुन संचालकांत धूसफूस सुरू आहे. तर दुसरीकडे हा ठराव मंजूर व्हावा, यासाठी नेते मंडळींकडून प्रयत्न सुरू आहेत. हा प्रस्ताव मंत्रालयात अंतिम टप्प्यात आहे. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मल्टिस्टेटला परवानगी देता येत नाही, असे केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. कर्नाटक सरकारनेही विरोध केला आहे. पालकमंत्र्यांनीही राज्य सरकारची एनओसी मिळणार नाही, अशी घोषणा केली आहे. लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी या संदर्भात केंद्र सरकारही निर्णय घेऊ शकते, असा सुतोवाचही पालकमंत्र्यांनी केले होते. पण केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे मल्टिस्टेटप्रश्नी सरकारीदरबारी पालकमंत्र्यांच्या की महाडिकांच्या वजनाला किंमत येणार हे लाखो दूध उत्पादक उघड्या डोळ्याने पाहणार आहेत. मल्टिस्टेटला ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी केलेल्या विरोधाचे आम्ही स्वागत करतो. तरीही नेतेमंडळी जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मल्टिस्टेट आणि दूध संघातील भ्रष्टाचाराविरोधात आमची लढाई कायम सुरू राहील. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही अनेक पुरावे दिले आहेत. त्याच्या चौकशीसाठी सरकारने संचालक मंडळ बरखास्त करावे.'

...

ठेकेदार महाडिकांचे टँकर बंद करा

' महाडिक हे गोकुळचे ठेकेदार आहेत. तर संचालक हे निवडून आले आहेत. महाडिक यांनी जर मल्टिस्टेटचा आग्रह धरला तर तुमचे टँकर बंद करू, असे संचालक मंडळाने सांगावे. आम्ही निवडून आलो असल्याने आम्ही संघाचे हित बघू असे सांगावे. एका व्यक्तीच्या हट्टापोटी लाखो दूध उत्पादकांना वेठीस का धरता अशी भूमिका घेतली पाहिजे', असे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले.

...

मल्टिस्टेटसाठी माजी खासदार भाजपमध्ये जातील

मल्टिस्टेटचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी माजी खासदार धनंजय महाडिक भाजपमध्ये जातील, अशी शक्यता पाटील यांनी व्यक्त केली. मंत्रालयात मल्टिस्टेटची फाइल फिरायला लागली आहे. आमदार हळवणकर, महाडिक आणि माजी खासदार महाडिक यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

...

उद्या संचालकांची बैठक

गोकुळच्या संचालकांची गुरूवारी (ता.११) बैठक होत असून या बैठकीमध्ये संचालकांनी मल्टिस्टेटचा ठराव मागे घ्यावा, अशी मागणी करावी, अशी आमदार पाटील यांनी संचालकांना विनंती केली आहे. लोकशाही मार्गाने संचालक निवडून आले आहेत. त्यांनी दूध उत्पादकांचा विश्वासघात करु नये. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसू नये. सत्ता ठेकेदाराच्या हातात जाऊ नये. पशुखाद्य दराची वाढ कमी करावी, दूध दरात वाढ करावी या मागणीचा विचार होत नाही, पण आपल्या हातात सत्ता रहावी यासाठी मल्टिस्टेटचा आग्रह होत आहे. प्रत्येक संचालकांकडे २०० ते ३५० ठराव आहेत म्हणून त्यांना पॅनेलमध्ये स्थान मिळते. मल्टिस्टेटचा प्रस्ताव मंजूर झाला तर संचालकांचे महत्व कमी होणार आहे, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images