Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ब्रेन डेड तरुणाने दिले तिघांना जीवनदान

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर तालुक्यातील सुनील प्रकाश बेलेकर (वय ३७) या ब्रेन डेड झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे 'कॅडेव्हरीक' मुत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेद्वारे तिघांना जीवनदान देण्यात आले. येथील अॅपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये अवयवदान शस्त्रक्रिया पार पडली.

एसटी कंडक्टर असलेल्या बेलेकर यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचा ब्रेन डेड झाल्याने डॉक्टरांनी बेले कुटुंबियांना अवयवदान करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कमिटीच्या निर्णयानुसार यकृत व दोन मूत्रपिंड दान करण्यात आले. एका मूत्रपिंडाचे अॅपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले तर एक यकृत व दुसरे मूत्रपिंड बाहेर पाठवण्यात आले.

या मोहिमेत डॉ. अशोक भुपाळी, डॉ. प्रकाश शारबिद्रे, डॉ. राजीव कोरे, डॉ. राहुल दिवाण, डॉ. अमृत नेर्लीकर, डॉ. सुनील शेणवी, डॉ. गिरीश हिरेगौडर, डॉ. श्रेया हनमशेट्टी, डॉ. सागर कुरुणकर, डॉ. शीतल देसाई, डॉ. वैभव चव्हाण यांनी सहभाग घेतला. तसेच ग्रीन कॉरीडोरसाठी शहर वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल गुजर व शहर पोलिसांचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मल्टिस्टेट’ वरील याचिकेचा निर्णय उद्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सर्वसाधारण सभेत 'मल्टिस्टेटचा' (बहुराज्यीय सहकारी संस्थांचा कायदा) निर्णय गुप्त पद्धतीने मतदान घ्यावा, मल्टिस्टेटचा ठराव घटनाविरोधी आहे, या दोन्ही याचिकांवर तब्बल पाच तास दोन्ही गटांकडून सहकार न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. या याचिकेवर न्यायमूर्ती दंडगे बुधवारी (ता.२६) निर्णय देणार आहेत.

'सहकारी कायद्याप्रमाणे मल्टिस्टेटचा निर्णय घटनाविरोधी आहे', यावर गोकुळ बचाव कृती समितीच्यावतीने अॅड के.डी. पवार यांनी युक्तिवाद केला. 'गोकुळ'च्यावतीने अॅड लुईस शहा यांनी सहकार कायदा २२ नुसार एखाद्या सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत पोटनियमात दुरुस्ती करुन सहकारी संस्था मल्टिस्टेट करता येते, असा युक्तिवाद केला. गोकुळच्या सर्वसाधारण सभेचे कार्यस्थळ बदलावे, मल्टिस्टेटचा निर्णय गुप्त मतदान पद्धतीने घ्यावा, असा युक्तिवाद अॅड प्रमोद पाटील यांनी केला. त्यावर गोकुळच्यावतीने अॅड शहा यांनी युक्तिवाद केला. सहकार कायदा १९६१ प्रमाणे सर्वसाधारण सभेत संस्थेचा अध्यक्ष अथवा सभेचा अध्यक्ष हात वरुन करुन किंवा गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेऊ शकतो. हा निर्णय सभा अध्यक्षांचा असल्याने कोर्टात या मागणीवर दाद मागता येत नाही, असा युक्तिवाद शहा यांनी केला. दोन याचिकांवर सुमारे पाच तास युक्तिवाद झाला. सहकार न्यायालयाचे न्यायाधीश दंडगे यांनी बुधवारी (ता. २६) यावर निर्णय देण्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा संशोधक योगेश उरूणकरचा सत्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

'माझे संशोधन समाजाला निश्चित उपयोगी पडेल. पदवीनंतर विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेत त्यातून संशोधन करून त्याचा समाजाला कसा उपयोग कसा होईल याचा विचार करावा' असे प्रतिपादन युवा संशोधक योगेश उरुणकर यांनी केले. डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अजितसिंह जाधव होते.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमीकल विभागाचे माजी विद्यार्थी ऊरुणकर यांना नाविन्यपूर्ण संशोधनासाठी यंग इनोवेटर (युवा संशोधक) पुरस्काराने सन्मानित केल्याबद्ल महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. त्यांनी कारखान्याच्या फ्लाय अॅश वेष्टनापासून उष्णतारोधक इन्शूलेशन (सिरॅमिक) तयार केले आहे.

योगेश उरुणकर म्हणाले, 'मला डी. वाय. पाटील कॉलेजमुळे संशोधनाची आवड लागली. विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजात गेले पाहिजे. प्रयोगशाळेतील प्रयोग हे समाजाचा विचार करून केले गेले पाहिजेत. मला त्यासाठी प्रा. अनिरुद्ध पंडित यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.'

विभागप्रमुख डॉ. के. टी. जाधव यांनी स्वागत केले. प्रा. राहुल महाजन यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डी. वाय. पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

युवा सन्मान

योगेश सध्या आयसीटी या नामांकित संसथेमध्ये पीएच. डी. करीत आहेत. यंग इनोवेटर (युवा संशोधक) पुरस्काराकरिता ९००हून जास्त युवा संशोधकामधून त्यांची निवड करण्यात आली. पुरस्काराचे वितरण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आयसीटी मुंबईचे कुलगुरू पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांच्या हस्ते झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथालये ‘लोकराज्य’चे वर्गणीदार करणार

$
0
0

कोल्हापूर: जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांना लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार करण्याची विशेष मोहीम सरकारच्या ग्रंथालय विभागातर्फे राबवली जाईल, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी शुक्रवारी दिली. त्या म्हणाल्या, जिल्ह्यात ६८५ सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालये आहेत. या सर्व ग्रंथालयांना लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार केले जाईल. लोकराज्य मासिकाची वार्षिक वर्गणी १०० रुपये आहे. त्यासाठी ग्रंथालयांनी लोकराज्य मासिकाची वार्षिक वर्गणी जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा रोड, कोल्हापूर, येथे रोख अथवा मनिऑर्डरने पाठवावी. जिल्हा माहिती अधिकारी एस. आर. माने यांनी लोकराज्य वाचक अभियानाबाबत माहिती दिली. यावेळी ग्रंथालय विभागाचे तांत्रिक सहाय्यक उत्तम कारंडे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षपदी देवणे

$
0
0

कोल्हापूर: जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या जिल्हा मुख्य संघटकपदी अध्यक्ष आर. के. देवणे यांची निवड झाली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी देवणे यांना निवडीचे पत्र दिले. याप्रसंगी काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. देवणे हे काँग्रेसमध्ये अनेकवर्षे कार्यरत आहेत. सेवादलाच्या जिल्हा संघटकपदी निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायंटसतर्फे वृक्षारोपण

$
0
0

कोल्हापूर: पाचगाव येथील मगदूम कॉलनी येथे जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूर मेट्रोतर्फे रोपांची लागवड करण्यात आली. कर्नल विश्वास देसाई यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. मेट्रोचे अध्यक्ष शिवाजीराव यादव, डॉ. शिवाजी हिलगे, बाळासाहेब सोनुले, सुनील बराले, शंतनु कोरडे, भिकाजी गायकवाड, यशवंत सातपुते, बाबुराव पाटील, शंकर निर्मळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरपंचांना हवे ग्रामसेवकांइतके मानधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे आयोजित सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या मेळाव्यात सरपंचांना ग्रामसेवकांच्या पगाराइतके मानधन मिळावे, यासह २३ मागण्यांवर चर्चा करण्यात आली. केशवराव भोसले नाट्यगृहात मेळावा झाला. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.

प्रशासकीय कामकाजासाठी मंत्रालयात जाण्यासाठी सरपंचांना ओळखपत्र मिळावे, जिल्हा परिषद, पंचायत समितीत सरपंच कक्ष असावा, मुंबईत सरपंच भवन बांधावे, सरकारी समितीत सरपंचांना प्रतिनिधीत्व असावे, स्वतंत्र निधी असावा, स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात सरपंच, सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा, ग्रुप ग्रामपंचायतीऐवजी स्वतंत्र ग्रामपंचायतींची स्थापना करावी, ग्रामपंचायतींना थेट अनुदान मिळावे, ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र इमारती असाव्यात, पूर्वीप्रमाणे शालेय शिक्षण समिती असावी, २५ लाखांपर्यंतची कामे ग्रामपंचायतींना करण्याची परवानगी मिळावी यासह २३ विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.

अध्यक्ष पाटील, कैलास गोरे, शंकर केंबळकर, शिवाजी मोरे यांची भाषणे झाली. सर्वच वक्त्यांनी मागण्या मान्य करून घेण्यासाठी सरकारी पातळीवर ठोस पाठपुरावा करण्यासाठी संघटीतपणे दबावगट निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा अध्यक्ष सागर माने, जिल्हा संघटक शिवाजी मोरे यांच्यासह जिल्हयातील सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृत्तपत्र विक्रेत्यांचे धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करावी यांसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येथील महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.

गेल्या बारा वर्षांपासून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, यासाठी सरकारकडे वृत्तपत्र विक्रेता संघटना पाठपुरावा करीत आहे. सरकारने स्वतंत्र मंडळाची स्थापना केलेली नाही. सर्वच असंघटीत कामगारांसाठी महाराष्ट्र असंघटीत कामगार सुरक्षा मंडळाची घोषणा करण्यात आली. मात्र वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. जुलैमध्ये कामगारमंत्री संभाजी निंलगेकर यांनी याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात काहीच कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे असंघटीत कामगार म्हणून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी सुरू करावी, मंडळाच्या कामकाजासाठी प्रशासकीय सुविधा द्याव्यात, भरीव आर्थिक निधीची तरतूद करावी, राज्य असंघटीत सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ गठीत करावे, मोक्याच्या ठिकाणी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, सरकारी घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा ठेवावा या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी जोरदार घोषणाबाजी करून मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास सरकारला महागात पडेल, असा इशाराही संघटनेचे रघुनाथ कांबळे यांनी दिला. आंदोलनात शिवगोंडा खोत, किरण व्हनगुत्ते, श्रीपती शियेकर, रवी लाड, आण्णा गुंडे, शंकर चेचर, सुरेंद्र चौगुले आदींसह वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे सभासद उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्यासाठी नंगीवली चौकात रास्ता रोको

$
0
0

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सातत्याने अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने शिवाजी पेठेतील महिला मंगळवारी आक्रमक बनल्या. तक्रारी देवूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त महिलांनी पाण्याचा खजिना येथील पाणीपुरवठा कार्यालयात जावून जाब विचारला. नंतर नंगीवली चौक येथे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान आलेल्या लोकप्रतिनिधींनी अर्वाच्य भाषेचा वापर करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. परिणामी परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.

शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीम परिसरात काही महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. गणेशोत्सवामध्ये नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी येथील नागरिकांनी अनेकवेळा लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या. पण तरीही पाणीपुरवठा सुरुळीत झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी अधिकाऱ्यांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याबांबत जाब विचारला. महिलांच्या प्रश्नांनी अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने नंगीवली चौकात महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे अर्धातास सुरु असलेल्या आंदोलनामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. परिणामी शाळा व कार्यालयात पोहोचण्यासाठी धावपळ करणाऱ्या विद्यार्थी व नोकरदारांची चांगलीच अडचण झाली. शेवटी उप जलअभियंता व्यंकटेश सरवसे यांनी आंदोलनस्थळी भेट देवून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात अर्चना कोराणे, रचना पावले, हेमा पाटील, सुचित्रा अपराध, सई शिंदे, रंजना पोवार, वैशाली निकम, सुनिता यादव, पूनम पोळ, सुनिता निकम, भाग्यश्री व्हटकर, सुवर्णा इंगवले, वर्षा माळी यांच्यासह परिसरातील महिला सहभागी झाल्या .

..............

चौकट

लोकप्रतिनिधींकडून अर्वाच्य भाषा

आंदोलन सुरू असताना नगरसेवक किरण नकाते व माजी नगरसेवक अदिल फरास पाणीपुरवठा विभागामध्ये दाखल झाले. प्रभागाच्या तक्रारी सांगत असताना फरास यांच्या आवाजाचा पारा चांगलाच चढला. उपजल अभियंता सरवसे यांना अर्वाच्य भाषेचा वापर करत फैलावर घेतले. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

....................

चौकट

तुम्ही तुमचे काम करा ...

पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी महिला आंदोलन करण्यासाठी आल्या असता, पोलिसांनी त्यांना आंदोलन करु नका अशी विनंती केली. पण संतप्त झालेल्या महिलांनी ऐन सणासुदीमध्ये पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. तेव्हा तुम्ही कोठे होता. अशी विचारणा करत 'तुम्ही तुमचे काम करा', असे सुनावले. त्यामुळे पोलिसांना तोडगा निघेपर्यंत वाट पहावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर ढकलाढकली प्रकरणावर पडदा

$
0
0

फोटो आहे

भाजप पदाधिकाऱ्यांकडून महापौर बोंद्रे यांची समजूत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षारक्षकांकडून महापौर शोभा बोंद्रे यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचे सोमवारी महापालिका वर्तुळात चांगलेच पडसाद उमटले. परिणामी हा वाद अधिक वाढणार अशी शक्यता असताना मंगळवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी महापौर बोंद्रे यांची भेट घेतली. मिरवणुकीदरम्यान घडलेला प्रकार गैरसमजुतीतून झाला असल्याचे स्पष्ट करत त्यांनी महापौरांची समजूत काढली. त्यानंतर वादावर पडदा पडला.

गणेशोत्सव मिरवणुकीला सुरुवात होण्यापूर्वी मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेश मूर्ती व पालखीचे पूजन करण्यात आले. पालखी पूजनादरम्यान उडालेल्या गोंधळामध्ये पालकमंत्री पाटील व पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सुरक्षारक्षकांनी कडे केले. त्याचवेळी महापौर बोंद्रे यांना सुरक्षारक्षकांचा धक्का लागला. शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना ढकलाढकली झाल्याची वार्ता संपूर्ण शहरभर पसरली. ढकलाढकली प्रकरणाबाबत महापौर बोंद्रे यांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. सोमवारी महापालिकेतील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालकमंत्री पाटील व पोलिस प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच यापुढे महापौर कोणत्याही सरकारी कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचा इशारा देत दोन दिवसांत सर्वपक्षीय बैठक घेण्याचे जाहीर केले. तसेच शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनीही पत्रकार परिषदेतून तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महापौर ढकलाढकली प्रकरण अधिक गंभीर बनणार अशी शक्यता होती.

मात्र प्रकरणाला गंभीर वळण लागण्यापूर्वीच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, भाजपचे गटनेते विजय सुर्यवंशी, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, राहुल चिकोडे आदींनी महापौर दालनात जावून बोंद्रे यांची भेट घेतली. मिरवणुकीदरम्यान झालेला प्रकार गैरसमजुतीतून झाला. याबाबत पालकमंत्री पाटील यांनी पोलिस प्रशासनाला सुनावले असल्याचे पदाधिकाऱ्यांनी महापौर बोंद्रे यांच्या निदर्शनास आणून दिले. महापौरांनीही पालकमंत्री पाटील यांच्याबद्दल कोणताही आकस नसून यापुढे सुरक्षारक्षकांना समज द्यावी, असे स्पष्ट केले. यावेळी उपमहापौर महेश सावंत, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, अफजल पिरजादे, ईश्वर परमार आदी उपस्थित होते. या भेटीनंतर दोन्ही बाजूंकडून वादावर पडदा पडल्याच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीपी कार्यालयाला ठोकले टाळे

$
0
0

प्रलंबित प्रकरणामुळे माजी नगरसेवक मोरे आक्रमक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बांधकाम परवानगीच्या मंजूर आराखड्यावर नगररचना विभागातील (टीपी) अधिकारी जाणीवपूर्वक स्वाक्षरी करत नाहीत. वर्षानुवर्षे आराखडे धूळखात पडले असताना अधिकारी दिरंगाई करत असल्याचा आरोप करत मंगळवारी माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून टाळे ठोकले.

विद्यमान नगरसेविका सरिता मोरे यांच्या प्रभागातील चार बांधकाम आराखडे टीपी विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी आले आहेत. बांधकाम आराखड्यांना इतर विभागाची मंजुरी मिळाली असताना टीपी विभागाकडून मंजुरी मिळालेली नाही. याबाबत मोरे यांचे पती व माजी नगरसेवक नंदकुमार मोरे गेल्या चार महिन्यांपासून टीपी विभागात हेलपाटे मारत आहेत. मोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची १३ वेळा भेट घेतली, तरीही प्रकरणाची अद्याप निर्गत झालेली नाही. आपल्याप्रमाणे इतर अभ्यागतांचीही अशीच स्थिती असल्याने मंगळवारी मोरे चांगलेच संतप्त झाले होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. २५) आराखडा मंजूर करुन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मोरे कार्यालयात दाखल झाले, पण संबंधित अधिकारीच उपस्थित नसल्याने त्यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला. कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढत कार्यालयाला मोरे यांनी टाळे ठोकले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोरे यांची समजूत काढल्यानंतर तब्बल एक तासानंतर कार्यालयाचे टाळे काढण्यात आले.

................

चौकट

कार्यालयच रामभरोसे

सहायक नगररचना धनंजय खोत यांची पुणे प्राधिकरणाकडे बदली झाली आहे. खोत कोणत्याही क्षणी जाण्याच्या तयारीत आहेत. तर उपशहर रचनाकार नारायण भोसले यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिला आहे. तसेच अन्य अधिकाऱ्यांच्या निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या दिसतात. परिणामी टीपी विभागाचा कारभार रामभरोसे बनला आहे.

.....................

नागरिकांची ससेहोलपट

बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना महापालिकेला शुल्क जमा करावे लागते. जमा शुल्कातून महापालिकेला चांगला महसूलही मिळतो. तसेच बहुतांशी नागरिक अर्थसाह्य घेवून घरबांधणी करतात. पण कोणत्याही वित्त संस्थांकडून अर्थसाह्य मिळण्यासाठी महापालिकेचा बांधकाम परवाना अनिवार्य आहे. पण नगररचना विभागाकडून वेळत आराखड्याला मंजुरी मिळत नसल्याने त्यांची बांधकामे खोळंबून राहत आहेत. त्यामुळेच परवाना मिळण्याासाठी अभ्यागत दररोज कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत.

.....................

कोट

'विभागीय कार्यालयाकडून यापूर्वी बांधकाम परवाने दिले जात होते. पण नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी सुविधा सुरु केली. पण कार्यालयातील अधिकारी जाणीवपूर्वक त्रुटी काढून फाइल प्रलंबित ठेवत आहेत.

नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींच्या गर्दीने गोंधळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा , इचलकरंजी

वार्षिक उत्पन्न ५९ हजार व आधारकार्ड लिंक असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारक यांना अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या शिधापत्रकेवर 'प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी' असे शिक्के मारण्याची कार्यवाही मंगळवारपासून येथील पुरवठा कार्यालयात सुरू झाली. यावेळी शिधापत्रिकाधारकांनी एकच गर्दी केल्याने गोंधळ उडाला.

गेल्या आठवड्यात प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत अन्न सुरक्षा योजनेमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या हमीपत्रधारकांची चौकशी करून पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पुरवठा कार्यालयात नव्याने समाविष्ट केलेल्या शिधापत्रिकेवर प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी असे शिक्के मारण्यास सुरुवात केली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शहाजी भोसले, शशिकांत मोहिते, अनिल डाळ्या, वैशाली नायकवडी, आदी पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन शिक्के मारण्याची कार्यवाही तत्काळ करावी अशी मागणी केली. यावेळी पुरवठा अधिकारी एम. ए. शिंदे उपस्थित होते.

दरम्यान, यासंदर्भात भाजप वगळता सर्वपक्षीय शिष्टमंडळ बुधवारी पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांकडून गोकुळ सभास्थळाची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या सर्वसाधारण सभेबाबत कायदा व सुव्यवस्थेची काळजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पोलिस अधीक्षकांना दिले. आदेशनुसार पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी 'गोकुळ'चे अध्यक्ष व संचालक मंडळासोबत चर्चा केली. मंगळवारी सायंकाळी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी ताराबाई पार्क येथील 'गोकुळ'च्या सर्वसाधारण सभास्थळाची पाहणी करुन माहिती घेतली.

मल्टिस्टेटचा ठराव मंजूर करण्यासाठी सत्ताधारी संचालक मंडळाकडून एक हजार बोगस ठराव केले असल्याने प्रशासनाने सभेपूर्वी चोवीस तास अगोदर सभामंडपाचा ताबा घ्यावा, अशी मागणी गोकुळ बचाव कृती समितीने केली आहे. आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सुभेदार यांना सोमवारी (ता.२४) दिले होते. निवेदनातील मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक देशमुख यांना सभेबाबत कायदा व सुव्यवस्थेची काळजी घ्यावी, असे आदेश दिले.

दरम्यान, मंगळवारी गोकुळचे कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली. गोकुळची सभा ही सहकार कायद्यानुसार होणार असून सभेसाठी ठराव असलेली व्यक्तीच उपस्थित रहावी, यासाठी बारकोड पद्धत अवलंबली जाणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, पोलिस अधीक्षक देशमुख यांनी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील व अन्य संचालकांकडून सर्वसाधारण सभेचे नियम, कायदा यांची माहिती घेतली. तसेच बैठक व्यवस्था, आत व बाहेर जाण्याचे मार्ग, सभासदांना प्रवेश देण्याची पद्धत याची माहिती घेतली. गोकुळच्या यापूर्वीच्या सर्व सभा शांततेत व लोकशाही मार्गाने सहकार कायद्यानुसार घेतल्या आहेत, अशी माहिती अध्यक्ष पाटील यांनी दिली. त्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सभास्थळांची पाहणी केली.

.....................

कोट

'गोकुळची सभा ही सहकार कायद्याखाली होणार आहे. सहकार व पदुम विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेची काळजी पोलिस घेणार आहेत. यापूर्वी गोकुळच्या सभेला पोलिसांनी बंदोबस्त पुरवला होता. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून जादा बंदोबस्त दिला जाणार आहे. पुढील चार दिवसात सभामंडपाची पाहणी करुन पोलिस निर्णय घेतील.

अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिनेटोन आरक्षित ठेवा

$
0
0

कोल्हापूर

शालिनी सिनेटोनच्या जागेचा वापर चित्रपट निर्मितीसाठी व्हावा यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर केला आहे. व्यवसायिक वापरांसाठी जागेचा वापर होऊ नये, असाही ठराव करण्यात आला आहे. तरीही सिनेटोनच्या जागेवरील आरक्षण उठवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कलानगरी कोल्हापूरची ओळख अबाधित ठेवण्यासाठी सिनेटोनची जागा आरक्षित ठेवावी, अशी मागणी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुरेखा शहा यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे, शालिनी सिनेटोन १९३५ साली छत्रपती अक्कासाहेब महाराज यांनी ४७ एकर जागेत चित्रपट निर्मितीसाठी स्टुडिओ बांधला. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्याकडे चित्रपट निर्मितीकरीता सोपवला. हा ऐतिहासिक स्टुडिओ व जागा गिळंकृत करुन मोठा आर्थिक फायदा मिळविण्याच्या हालचाली सुरु आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीपोटी सहा गाळे सील

$
0
0

कोल्हापूर

महानगरपालिकेच्या मालकीच्या ए, बी, सी, डी व ई वॉर्ड च्या विविध मार्केटमधील थकीत असणाऱ्या गाळ्यांना थकबाकीपोटी सील करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मंगळवारी मोहिमेचा भाग म्हणून हुतात्मा पार्क मार्केटमधील पाच व शास्त्रीनगर मार्केटमधील एक असे सहा गाळे इस्टेट विभागाने सील केले. तसेच अन्य गाळेधारकांकडून दोन लाख दहा हजारांची थकीत रक्कम वसूल केली. ही मोहीम आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली इस्टेट विभागाच्यावतीने राबवली. थकबाकी वसुलीसाठी कारवाईची मोहीम कायमपणे राबवण्यात येणार असून थकबाकीदारांनी थकबाकी जमा करावी, असे आवाहन महापालिकेच्या इस्टेट विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रस्तावांना स्थगिती

$
0
0

कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शाळांच्या खोल्या पाडण्याचे पंधरा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी थांबविले आहेत. या इमारती पाडण्याऐवजी त्यांनी दुरुस्ती केली तर खोल्या पुन्हा वापरात येऊ शकतात का, हे तपासण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. जिल्हा परिषद मालकीच्या शाळांच्या इमारतींना ठिकठिकाणी गळती लागली आहे. काही वर्गखोल्या नादुरुस्त झाल्या आहेत. छत कमकुवत बनले आहे, भिंतीला तडे गेले आहेत. अशा इमारती व वर्ग खोल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होवून ते पाडण्याची कार्यवाही होते. पंधरा खोल्या पाडण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर दाखल झाल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती घेतली. तेव्हा काही खोल्यांची डागडुजी केल्यास त्या पुन्हा वापरात येऊ शकतात. खोल्या पाडण्यापेक्षा त्यांची दुरुस्ती होवू शकते, असे अधिकाऱ्यांसोबत चर्चेअंती स्पष्ट झाले. यानंतर सीईओ मित्तल यांनी पंधरा खोल्या पाडण्याच्या प्रस्तावाला तात्पुरती स्थगिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिकांवर बदनामीचा पाच कोटींचा दावा करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मुश्रीफांचे नेतृत्व दलाल व व्यापाऱ्यांच्या जिवावर निर्माण झालेले नाही, ते गोरगरीबांच्या जिवावर झाले आहे. त्यामुळे मला नेस्तनाबूत करण्याचा अधिकार महाडिकांना नसून गोरगरीब जनतेला आहे,' असा पलटवार आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. खोटे व गंभीर आरोप केल्याप्रकरणी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर बदनामीचा पाच कोटी रुपयांचा फौजदारी दावा दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

आमदार मुश्रीफ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे , 'गोकुळ' च्या मल्टीस्टेटला कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता मी व राष्ट्रवादीने विरोध करण्याचे ठरवले आहे. गोकुळच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने महाडिक यांना पाठिंबा दिला होता. याचा अर्थ गोकुळ मल्टीस्टेट करून घशात घालावा असा होत नाही. सोमवारी (ता. २४) गोकुळ बचाव समितीच्या बैठकीत मी किंवा आमदार सतेज पाटील यांनी कोणाचेही नाव घेतले नव्हते. फक्त त्याचे राजकीय दुष्परिणाम होतील, असा इशारा दिला होता. महानंद दूध संघांमध्ये हैदराबादची तीनशे मुले भरल्याचा आरोप महाडिक यांनी माझ्यावर केला होता. आजच्या घडीला महानंदमध्ये भाजपची सत्ता असून तिथे एकनाथ खडसेंच्या पत्नी अध्यक्ष आहेत. त्यांनी त्या मुलांची नावे जाहीर करावीत.

महाडिक हे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक असून त्यांना माहिती घेण्याचा अधिकार आहे. बँकेमध्ये आतापर्यंत हार्डवेअरची खरेदीच झालेली नाही. हैद्राबाद व मॉरिशिअसमधील संचालकांच्या सहली या स्वखर्चातून झालेल्या आहेत. महाडिक सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले असल्याने त्यांनी या विषयांची सीआयडी चौकशी लावावी. संचालक मंडळाच्या सहलीच्या संदर्भाने त्यांनी केलेल्या खोट्या व गलिच्छ आरोपामुळे बँकेच्या संचालक मंडळाची नाहक बदनामी झाली. शिवाय या सहलीमध्ये संचालक मंडळातील भगिनीही सहभागी होत्या हेही त्यांनी लक्षात घेतले नाही.

केडीसीसी बँकेतून माझ्या मुलाच्या नावावर विमा घेतला जातो, असा आरोप करणाऱ्या महाडिक यांनी अजूनही माहिती घेऊन बोलावे. कागल शाखेतील घोटाळ्याबद्दल वारंवार शिळ्या कढीलाच ऊकळी आणणाऱ्या महाडिक यांनी कागल शाखेतील प्रकरणाची यापूर्वी सीआयडीने केलेल्या चौकशीत वस्तुस्थिती समोर आली आहे.

.......................

चौकट

'नोकरभरतीत साधा चहासुद्धा पिऊन मिंधा झालेलो नाही. परंतु नुकत्याच झालेल्या गोकुळ भरती मध्ये पंधरा ते वीस वीस लाख रुपये घेऊन महाडिकांनी दुकान उघडले. हे ऐकून स्वतःचीच लाज वाटली. ज्या मुलांनी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या त्यांनी नोकरीसाठी घरदार तारण ठेवून आई आणि पत्नीच्या अंगावरील दागिने विकून पैसे दिले आहेत, हे ऐकून अवाक झालो, असेही मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहारांना पुन्हा हाकलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा आदेश डावलून माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार मंगळवारी पुन्हा कार्यालयात हजर झाले. त्यांच्या या कृत्यामुळे संतापलेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे तक्रारी केल्या. मित्तल यांनी लोहार यांना तत्काळ कार्यालय सोडण्याचे आदेश दिले. शिवाय त्यांना बुधवार (ता.२६) पासून सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषदेच्या ११ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत शिक्षणाधिकारी लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश दिला. आदेशानंतरच्या दुसऱ्याच दिवशी लोहार जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. तेव्हा सदस्यांनी अध्यक्ष व सीईओ मित्तल यांच्याकडे आक्षेप नोंदविले. परिणामी लोहार यांना कार्यालयाबाहेर पडावे लागले होते.

पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या पातळीवर मंगळवारी चौकशी समिती स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच लोहार कार्यालयात हजर झाले. जिल्हा परिषद सदस्यांनी त्याची गंभीर दखल घेत पदाधिकारी व सीईओंपर्यंत तक्रार केल्या. सीईओंनी सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना केल्या. सीईओंचा निरोप मिळताच लोहार घाईगडबडीने कार्यालयाबाहेर पडले. दरम्यान, सर्वसाधारण सभेत लोहार यांच्यावर झालेला आरोप, अध्यक्षांचा कारवाईचा आदेश यासंदर्भातील इतिवृत्तांत सीईओंना प्राप्त झाला आहे. यामुळे लोहारांवरील कारवाईची प्रक्रिया वेगावली आहे. त्यांना बुधवारपासून सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई होऊ शकते अशी शक्यता आहे.

०००००

जावई अध्यक्ष, सासरा सदस्य

शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. यामध्ये नामानिर्देशित सदस्य म्हणून अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, तर विशेष तज्ज्ञ म्हणून भगवान पाटील यांचा समावेश आहे. इंगवले हे सभागृहात सीनिअर सदस्य म्हणून ओळखले जातात. त्यांच्यासह खोबरे, पाटील यांची अभ्यासू सदस्य म्हणून ओळख आहे. दरम्यान, शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे हे इंगवले यांचे जावई आहेत. चौकशी समितीचे अध्यक्ष जावई, तर सासरा सदस्य असे चित्र आहे.

०००००

समिती समावेशास आडसुळांचा नकार

लोहार यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती नेमली आहे. त्यामध्ये समिती सचिव म्हणून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांची नियुक्ती केली. दरम्यान, आडसूळ यांनी, सध्या आपल्याकडे सामान्य प्रशासन आणि प्राथमिक शिक्षण असा दोन विभागांचा कार्यभार आहे. या दोन्ही विभागांतील कामकाजामुळे, चौकशी समितीसाठी वेळ देणे शक्य होणार नाही. यामुळे चौकशी समितीत आपला समावेश करू नये, असे अध्यक्ष व सीईओंना कळविले आहे. समितीच्या स्थापनेच्या लेखी आदेशानंतर ते रितसर नकार कळविणार असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर चौकशी समिती सचिव म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपसचिव प्रियदर्शिनी मोरे यांची नियुक्ती होण्याचे संकेत आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास योजनेतील त्रुटी विकासाला मारक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'प्रादेशिक विकास योजनेतील रेखांकन व नियमावलींमध्ये राहिलेल्या त्रुटी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला मारक ठरत आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी योजनेतील त्रुटी गांभीर्याने घ्याव्यात आणि त्या दूर कराव्यात. त्रुटी दूर न केल्यास कायदेशीर बाबींचा अवलंब करू,' अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, असोसिएशनचे माजी अध्यक्ष व आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.

प्रादेशिक योजनेसंदर्भातील १९५० हरकतींसंदर्भात २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत त्रिसदस्यीय समितीसमोर फेरसुनावणी होणार आहे. समितीत प्राधिकरणचे सीईओ शिवराज पाटील, नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांच्यासह नगररचना विभागाच्या निवृत्त उपसंचालकांचा समावेश आहे. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना शनिवारी सुनावणीसाठी बोलावले आहे. प्रादेशिक योजनेतील त्रुटी मांडताना अध्यक्ष कोराणे म्हणाले, 'गावठाण क्षेत्रापासून लोकसंख्येवर आधारित ५०० ते १००० मीटर परिघ अंतरामध्ये १५ टक्के प्रीमियम आकारून बांधकाम परवानगी दिली जाते. रस्त्यांचा पत्ता नाही, अन्य सुविधा नाहीत अशा जमिनीवर पंधरा टक्के कराची आकारणी म्हणजे नागरिकांवर अन्यायकारक आहे. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रादेशिक विकास योजना आराखडा तयार केला नाही.'

जिल्ह्याचा ७० टक्के भाग बृहत आराखड्यात समाविष्ठ केला आहे. अधिकाऱ्यांनी योजनेचे सूक्ष्म नियोजन न केल्यामुळे नियमावलीत संदिग्धता निर्माण झाली आहे. विकास योजना या सध्याची लोकसंख्या व भविष्यातील लोकसंख्येवर आधारित बनवली जाते. नागरी व ग्रामीण भागातील लोकसंख्येवर आधारित जमीन वापरासंदर्भात फार मोठ्या चुका घडून आल्या आहेत.' पत्रकार परिषदेला असोसिएशचे सचिव राज डोंगळे, संचालक उमेश कुंभार, अनिल घाटगे, प्रशांत काटे, प्रसाद मुजुमदार, गडहिंग्लज असोसिएशनचे अजित उत्तुरे उपस्थित होते.

००००

असोसिएशनचे म्हणणे...

पर्यटन आराखडा व नियमावली स्वतंत्रपणे प्रसिद्ध करावे

दुग्ध प्रकल्प, चांदी उद्योग, वस्त्र उद्योगासाठी स्पष्ट नियमावली असावी

मंजूर प्रादेशिक योजनेत ग्रामीण संकुले कमी

भविष्यकालीन विचार करुन १२ ग्रामीण विकास संकुले असावीत

जिल्ह्यातील नदी, धरणे, तलाव प्रादेशिक विकास आराखड्यामध्ये दाखविणे आवश्यक

००००

'इको सेन्सिटिव्ह'चा प्रश्न, वस्त्या बेकायदेशीर ठरविण्याचा प्रकार

सावंत म्हणाले, 'संवेदनशील क्षेत्रात (इको सेन्सिटिव्ह) समाविष्ठ १९२ गावांमध्ये मूळ गावठाण क्षेत्रापासून फक्त २०० मीटरवर विकासाला मान्यता आहे. गावठाण क्षेत्राच्या आसपास २०० मीटरच्या बाहेर सर्वसाधारण ७०० मीटरपर्यंत झालेले विकसन लक्षात न घेता सध्य परिस्थितीवर बेकायदेशीर ठरविले आहे. तसेच २०० मीटरच्या बाहेर असलेल्या जमिनी, ज्या शेती विभागात समाविष्ठ केल्या आहेत. या ठिकाणी शेतीपूरक व्यवसायाला परवानगी नाकारल्या जात आहेत. परिणामी नागरिकांना नियमावलीचा फटका सहन करावा लागत आहे. शेतीपूरक मुख्य उद्योग दूध, गुळासंदर्भात क्लस्टर योजना आवश्यक असताना कोणतीही दखल आराखड्यात घेतली नाही. शिवाय चार हजाराहून अधिक वाड्या वस्त्यांचे विकसन या मंजूर आराखड्याच्या परिक्षेत्रात येत नाहीत. या वस्त्यांची दखल विद्यमान जमीन वापरात न घेतल्यामुळे हजारो वाड्या वस्त्या बेकायदेशीर ठरविण्यात येत आहेत. चुकीच्या पध्दतीने मोठ्या प्रमाणात जमीन क्षेत्र प्रादेशिक उद्यान संकल्पनेत समाविष्ठ केले आहे. जागांचे मंजूर ले आऊटही विचारात घेतले नाही.'

.........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार महाडिक यांच्या प्रयत्नातून दहा कोटींचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नगरपरिषद आणि नगरपंचायतींना देण्यात येणाऱ्या विशेष अनुदान योजनेतून कोल्हापूर महापालिकेसाठी दहा कोटीचा निधी मंजूर झाला आहे. आपल्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झालेल्या निधीतून भाजी मंडई, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण आणि ओपन जीम उभारण्यात येणार आहे असे पत्रक आमदार अमल महाडिक यांनी प्रसिद्धीला दिले आहे.

आमदार महाडिक यांना १२ सप्टेंबर रोजी निधी मंजुरीचे पत्र प्राप्त झाले आहे. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते. योजनेतून दहा कोटीचा निधी मंजूर झाला आहे. प्राप्त निधीतून सानेगुरुजी वसाहत प्रभाग ७४ मधील राजाोपाध्येनगर येथील भाजी मंडई ६० लाख रुपये खर्च करुन विकसीत करण्यात येणार आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ठ असणाऱ्या प्रभागातील २० ठिकाणी ओपन जीम साहित्य, विरंगुळा केंद्र आणि लहान मुलांची खेळणी बसवण्यासाठी दोन कोटी ४० लाखांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ५० लाखाच्या निधीतून प्रभागातील २० ठिकाणच्या चौकांचे सुशोभीकरण करण्यात येईल.

दक्षिण मतदारसंघातील समाविष्ठ असणाऱ्या प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण, गटर्स, सामाजिक सभागृह आणि खुल्या जागा विकसीत करण्यासाठी पाच कोटीचा निधी मंजूर झाला आहे. तसेच एक कोटीच्या निधीतून स्मशानभूमी, ऑक्सीजन पार्क, वाचनालय बांधणे आणि क्रिडांगणाचा विकास करण्यात येणार आहे. मतदारसंघात विकासकामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेने निधी मंजूर झाला असल्याचे प्रसिद्धी पत्रक आमदार महाडिक यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images