Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

डॉ. अरुण पाटील यांच्यासह चौघांना न्यायालयीन कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

कुमारी माता व विधवा महिलांच्या अर्भकांची बेकायदेशीर विक्री प्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. अरुण पाटील याच्यासह चौघा आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. डॉ. अरुण पाटील, उज्ज्वला पाटील, अभियंता अनिल दशरथ चहांदे, त्याची पत्नी प्रेरणा चहांदे (दोघे रा. नवरगाव) या चौघांची कोल्हापूर येथील कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली. कुमारी माता व विधवा महिला यांची बेकायदेशीरपणे प्रसुती करुन त्यांच्या अर्भकांची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आल्यानंतर पोलिसांनी जवाहरनगर येथील डॉ. अरुण पाटील व त्यांच्या पत्नी उज्ज्वला यांना अटक केली आहे. तर पाटील यांच्याकडून अर्भक विकत घेतल्याप्रकरणी नवरगांव (जि. चंद्रपूर) येथील अनिल चहांदे व प्रेरणा चहांदे या अभियंता दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. या चौघांना न्यायालयाने तिसऱ्यांदा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज संपल्याने या चौघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस बळाचा वापर करून आंदोलन दाबले

$
0
0

म़ टा़ प्रतिनिधी, कोल्हापूर

एफआरपीची रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांवर फौजदारी दाखल करण्यास टाळटाळ करणाऱ्या लक्ष्मीपुरीतील प्रादेशिक सहसंचालकांना ऊस भेट देणे, एफआरपी कायद्याची प्रत जाळण्याच्या आंदोलनासाठी गुरूवारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दाखल झाले़ मात्र या आंदोलनाचा सुगावा लागातच पोलिसांनी पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे कारण सांगत बळाचा वापर करीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांच्या वाहनात बसूनच संघटनेचे अॅड. माणिक शिंदे यांनी जोरदार घोषणाबाजी करीत लक्षवेधी आंदोलन केले.

साखर हंगाम सुरू होण्याआधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शेतकरी संघटना, कारखानदारांच्या प्रतिनिधीसोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत एफआरपीवर २०० रुपये देण्याचा तोडगा काढला होता़ प्रत्यक्षात जिल्ह्यातील साखर काखानदार एफआरपीची रक्कमही कायद्यानुसार १४ दिवसांच्या आत दिलेली नाही़ साखर कारखाने कायदा मोडत पहिली उचल केवळ २५०० रुपये देत आहेत़ एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी दाखल करण्यास सहसंचालक टाळाटाळ करीत आहेत़ त्यांचा निषेध करण्यासाठी अॅड. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दुपारी साडेबारा वाजता सहसंचालक कार्यालयासमोर एकत्र आले. आंदोलनाची माहिती मिळताच येथे तातडीने पोलिस दाखल झाले. त्यांनी परवानगी घेतली नसल्याने आंदोलन करता येणार नाही, असे कार्यकर्त्यांना सांगितले. त्यावेळी अॅड. शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आणि पोलिसांत वादावादी झाली़ पोलिसांनी बळाचा वापर करीत अॅड. शिंदे, डी. एस. पाटील, टी. आर. पाटील, गुणाजी शेलार आदींसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले़ त्यामुळे आंदोलनच होऊ शकले नाही़

पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार

'हंगामाआधी संयुक्त बैठकीत ठरलेला ऊसदर मिळवून देण्याची जबाबदारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची आहे़ त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी कारखानदार करीत नाहीत़ तरीही पाटील दुर्लक्ष करीत आहेत़ चंद्रकांत पाटील महसूलमंत्री नसून फसवणूक मंत्री आहेत', असा आरोप शेतकरी संघटनेच्यावतीने सहसंचालकांच्या नावाने दिलेल्या निवेदनातून केला आहे. सरकारने १५ दिवसांच्या आत एकरकमी एफआरपी आणि २०० रुपये द्यावेत, अन्यथा पालकमंत्री पाटील यांना काळे झेंडे दाखवणार आहे़ कोणत्याही क्षणी साखर आयुक्तांच्या कार्यालयास टाळे टाकू' असा इशाराही अॅडय शिंदे यांनी यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुकाणू समितीचे एक मार्चपासून असहकार आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली, पण या कर्जमाफी योजनेतून आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्के शेतकऱ्यांनाच लाभ झाला आहे. सरकारने कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली असून याचा निषेधार्थ एक मार्चपासून राज्यात असहकार आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ पाटील व शेकापचे माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांनी दिली.

कोल्हापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीची बैठक टेंबरोड येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झाली. यावेळी बोलताना रघुनाथ पाटील म्हणाले, 'राज्य सरकारने कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली. ३४ हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केलेली असताना केवळ १४ ते १५ हजार कोटींची कर्जमाफी झाली आहे. पात्र असूनही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याने शेतकरी आर्थिक विवेंचनेत सापडला आहे. सरकारने पाठवलेल्या ग्रीन यादीमध्ये प्रचंड प्रमाणात त्रुटी असून अनेक धनदांडग्यांना कर्जमाफीचा लाभ दिला असून पात्र शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहे. त्यामुळे सरकारची योजनाच फसवी निघाली असल्याचा आरोप करत सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी असहकार आंदोलन करण्यात येणार असून आंदोलनाची सुरुवात इस्लामपूर (जि. सांगली) येथून होणार आहे. आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी कोणत्याही प्रकारचे कर देणार नसल्याचा ठामपणे सांगितले.'

'१९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून कुटुंबासह जीवनयात्रा संपवली. याची सरकारला आठवण करुन देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करण्यात येणार आहे. २३ मार्च हा दिवस शेतकरी हुतात्मा दिवस म्हणून पाळण्यात येणार असून राज्यातील प्रमुख शहरांतून या दिवसी संघर्ष यात्रा काढण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.' यावेळी माजी आमदार पवार-पाटील यांनी जिल्ह्यातील कर्जमाफीचा आढावा घेतला. बैठकीस अतुल दिघे, बाबासाहेब देवकर, माणिक शिंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जय भवानीच्या घोषणेत अश्वारुढ शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना

$
0
0

शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवास, 'गर्जना महाराष्ट्राची'मधून अविचारांवर ओढले ताशेरे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोमवारी (ता. १९) होणाऱ्या शिवजयंतीसाठी शहरासह जिल्ह्यात शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आले असून, शिवजयंतीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. भव्य मिरवणुका आणि प्रबोधनाचा जागर ठिकठिकाणी करण्यात येणार आहे. गल्लीबोळांत बच्चे कंपनी पताका लावण्यात मग्न असून, गडकोटांवरून शिवज्योत आणण्यासाठी तरुणाईने जय्यत तयार केली आहे. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या अश्वारूढ पुतळा मिरवणुकीने शुक्रवारपासून शिवजयंती उत्सवास सुरुवात झाली. 'जय भवानी, जय शिवाजी', 'शिवाजी महाराज की जय'च्या घोषणांमध्ये सकाळी अश्वारुढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शेकडो कार्यकर्ते मोटारसायकलसह सहभागी झाले होते.

दरवर्षी शिवाजी तरुण मंडळाच्यावतीने शिवजयंती भव्यदिव्य स्वरूपात साजरी केली जाते. मंडळाच्या वतीने चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवारी दसरा चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीचे उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. मंडळाचां तिरंगी ध्वज व भगवा ध्वज घेऊन कार्यकर्ते मोटारसायकलसह मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक दसरा चौक, आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक, शाहू मैदान, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, अर्धा शिवाजी पुतळामार्गे उभा मारुती चौकात दाखल झाली. चौकात अश्वारूढ पुतळा दाखल झाल्यानंतर पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.

शिवाजी तरुण मंडळाची सकाळी मिरवणूक पार पडल्यानंतर शहरातील गल्लीबोळांत लहान मुले आपल्या परिसरात भगव्या पताका लावताना दिसत होते. तर काही युवक गटागटाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व मावळ्यांच्या प्रतिकृती खरेदी करण्यासाठी पापाची तिकटी, गंगावेश व कुंभार गल्लीत गर्दी केली होती. सायंकाळी 'गर्जना महाराष्ट्रा'चा कार्यक्रमातून शाहीर दिलीप सावंत यांनी अविचारांवर प्रहार केले. सहशाहीर संजय गुरव, महिला शाहीर दीप्ती सावंत व तृप्ती सावंत यांनी पोवाडे सादर केले. यावेळी पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण झाले. महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते कार्यक्रमांचे उद्घाटन झाले.

दसरा चौकातून सुरू झालेल्या मिरवणुकीत शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, अशोक जाधव, लालासाहेब गायकवाड, सुरेश जरग, सदाभाऊ शिर्के, उत्सव समिती अध्यक्ष विशाल बोंगाळे, शाहीर दिलीप सावंत, सागर भालकर, अक्षय मोरे, अभिषेक शिंदे, अभिजित राऊत, समीर वर्णे, योगेश इंगवले, सुनील राऊत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0

सासू, सासऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकोंडी (ता. कागल) येथे विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन शुक्रवारी (ता. १६) सकाळी आत्महत्या केली. राजश्री राहुल खोंद्रे (वय २०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. राजश्री हिच्या वडिलांनी सासू मंगल आनंदा खोंद्रे (वय ५०), सासरे आनंदा निवृत्ती खोंद्रे (५५) यांच्यासह नणंद विजया सुभाष वाडकर (रा. दिंडनेर्ली, ता. करवीर) या तिघांच्या विरोधात कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. राजश्री हिचा पती भारतीय सैन्यदलात जम्मू येथे सेवेत आहे, तर तिला सात महिन्यांचा मुलगा आहे.

करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथील राजश्री या तरुणीचा २०१६ मध्ये एकोंडी येथील राहुल या तरुणाशी विवाह झाला. राहुल हा भारतीय सैन्यदलात कार्यरत असून, सध्या तो जम्मू येथे सेवेत आहे. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास राजश्री आणि सात महिन्यांचा मुलगा राजवर्धन हे दोघे घरी होते. साडेनऊच्या सुमारास नातेवाईक घरात आल्यानंतर राजश्री हिचा मृतदेह घरातील तुळईला लटकलेला दिसला. या घटनेची माहिती मिळताच सासू मंगल आनंदा खोंद्रे आणि सासरे आनंदा खोंद्रे हे शेतातून घरी आले. परिसरातील नागरिकांनी राजश्री हिला सीपीआरमध्ये दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

राजश्रीच्या वडिलांनी तिच्या सासू, सासऱ्यांसह नणंदेच्या विरोधात फिर्याद दाखल केली. यानुसार पोलिसांनी सासरे आनंदा खोंद्रे, सासू मंगल खोंद्रे आणि नणंद विजय वाडकर यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. संध्याकाळी सीपीआरमध्ये मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यावेळी एकोंडी आणि दिंडनेर्ली येथील नातेवाईकांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती. राजश्री हिच्या पतीवरही गुन्हा दाखल करावा असा आग्रह माहेरच्या काही नातेवाईकांनी धरला होता, मात्र करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव यांनी नातेवाईकांची समजूत काढली. कागल पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कदमवाडीत अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कदमवाडी येथील गणेश पार्कमध्ये चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख ७० हजार रुपये, असा सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. गुरुवारी (ता. १५) रात्री ते शुक्रवारी (ता. १६) पहाटेच्या दरम्यान चोरीचा प्रकार घडला. याबाबत रिया धनंजय दामुगडे (वय २९, रा. गणेश पार्क) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विशेष म्हणजे वरच्या मजल्यावर घरातील सर्वजण झोपले असतानाही चोरट्यांनी ग्राऊंड फ्लोअरला धाडसी चोरी केली.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिया दामुगडे या पती धनंजय आणि दोन मुलांसह कदमवाडीतील गणेश पार्कमध्ये राहतात. महादेव कृपा या दोन मजली इमारतीच्या ग्राऊंड प्लोअरला त्या राहतात, तर वरच्या मजल्यावर रिया यांची जाऊ, दीर आणि त्यांची मुले राहतात. धनंजय यांचा जुनी वाहने विक्रीचा व्यवसाय आहे. कामानिमित्त ते शुक्रवारी बाहेरगावी गेले होते. ते रात्री परत येणार नसल्याने रिया या दोन मुलांसह वरच्या मजल्यावरील जावेकडे झोपण्यासाठी गेल्या. रात्री दहाच्या सुमारास त्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजाला आतून कडी घातली होती, तर मुख्य दरवाजाला कुलूप लावले होते. सकाळी साडेसहाच्या सुमारास त्या उठून खाली येताच त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या स्थितीत दिसले. आत जाऊन पाहिल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला.

चोरट्याने बेडरुममधील कपाटातील दागिन्यांचा पितळेचा डबा लंपास केला. या डब्यात पाच तोळ्यांचे सोन्याचे गंठण, एक तोळ्याचा नेकलेस, एक तोळ्याची अंगठी, ५ लहान अंगठ्या आणि रोख ७० हजार रुपये होते. याशिवाय चोरट्यांनी हॉलमधील साडेसहा हजार रुपये किमतीचा मोबाइलही लंपास केला. रिया यांनी वरच्या मजल्यावरील नातेवाईकांना चोरीच्या घटनेची माहिती दिली. शाहूपुरी पोलिसांना माहिती कळवताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ठसेतज्ज्ञांनाही पाचारण केले होते. याबाबत रिया दामुगडे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. चोरीच्या घटना रोखण्यात पोलिसांना यश येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसपा लोकसभा, विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

$
0
0

बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणांची अंमलबजावणी सध्याचे भाजप सरकार करत असल्याने राज्यातील शेतकरी आत्महत्या, शिक्षणाचे खासगीकरण, रोजगारनिर्मितीकडे दुर्लक्ष झाले आहे. पुरोगामी राज्याला दिशा देण्याची क्षमता बहुजन समाज पक्षामध्ये असल्याने या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आगामी लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा लढवणार आहे. आरएसएस व भाजपने कोरेगाव-भीमा दंगल घडवून आणली असून, दंगलीत तेल ओतण्याचे काम भारतीय बहुजन पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले, असा आरोपही बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी पत्रकार बैठकीत केला.

साखरे म्हणाले, 'भाजप सरकारने शिक्षणाचे व्यापारीकरण चालवले असल्याने सर्वसामान्यांना भविष्यात शिक्षणापासून वंचित राहावे लागेल. दरवर्षी लाखो रोजगार निर्माण करण्याची घोषणा हवेत विरली असून, अनेक युवकांना सरकारच्या चुकीच्या धारोणांमुळे नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची केवळ घोषणाच केली जात आहे. ७० वर्षांत ज्या समस्या होत्या, त्या तशाच आहेत. बसपला सत्ता दिल्यास देशाचे चित्र बदलण्याची ताकद पक्षामध्ये आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी एव्हीएम मशिनचा वापर नको, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. पण निवडणुकीसाठी लागणाऱ्या मतपत्रिकेसाठी सरकारने निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे एव्हीएम मशिनच्या मदतीने निवडणुका जिंकण्याचे कारस्थान भाजप करत आहे.

ना. तु. खंदारे म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दलित वस्ती सुधारणा योजनांचा निधी वापरला आहे. शेतकऱ्यांबरोबरच बलुतेदार व आलुतेदारांनी त्यांचेही कर्जमाफ करा. लातूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराची सीबीआय चौकशी व्हावी.' पत्रकार बैठकीस अॅड. संजीव सदाफुले, अजित कुरणे आदी उपस्थित होते.

राजर्षी शाहू, फुलेंना भारतरत्न द्या

तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना बसपने मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी पाठिंबा दिला होता. या दोन्हीची अंमलबजावणी झाली. डॉ. आंबेडकरांप्रमाणेच राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी यापुढे करण्यात येणार असल्याचे साखरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमसी कॉलेजमध्ये कार्यशाळा

$
0
0

कोल्हापूर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजमधील इंग्रजी विभागातर्फे अग्रणी महाविद्यालय योजनेतंर्गत इंटरव्ह्यू टूल्स अँड टेक्निक्स या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश गवळी होते. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. व्ही. डी. तडसरे यांनी मुलाखत तंत्र या विषयी माहिती दिली. मुलाखतीसाठी सकारात्मक मानसिकता कशी विकसित करावी याविषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात प्रा. हेमंत पाटील यांनी मुलाखतीची पूर्वतयारी, भाषा कौशल्य, सामान्यज्ञान, वेशभूषा, देहबोली, नेटकेपणा, विनम्रता याविषयी दृकश्राव्य माध्यमाद्वारे विवेचन केले. तिसऱ्या सत्रात प्रा. एस. पी. चौगले यांनी मुलाखतीचे महत्त्व व रोजगार क्षमता या विषयी मनोगत व्यक्त केले. प्रा. पी. डी. तोरस्कर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. एम. शेख यांनी वक्त्यांचा परिचय दिला. डॉ. संजय कांबळे यांनी आभार मानले. सुप्रिया माने यांनी निवेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम सुरु

$
0
0

प्रभाग रचनेला सुरुवात

कोल्हापूर: राज्य निवडणूक आयोगाने जून २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम घोषित केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली. जिल्ह्यात सात मार्चपर्यत तहसीलदार प्रत्येक गावाचे नकाशांना अंतिम रुप देणार आहेत. नऊ मार्चपर्यत संबंधित गावचे तलाठी आणि ग्रामसेवकांनी स्थळ पाहणी करुन प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करुन व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचे आरक्षण निश्चित करणार आहेत. १२ मार्चपर्यत तहसीलदारांची समिती प्रारुप प्रभाग रचनेला मान्यता देणार आहेत. १५ मार्चपर्यंत विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदारांनी प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. २१ मार्चला प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर करावयाची आहे. तसेच २८ मार्चपर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशाला फसवून पळालेले सगळेच भाजप समर्थक: पवार

$
0
0

पंढरपूर :

देशाला टोपी घालणाऱ्या नीरव मोदीचा घोटाळा मोदी सरकारच्या काळातीलच असून त्याची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

नीरव मोदी प्रकरणी मनमोहन सरकारवर आरोप केले जात असले तरी नीरव याने २०११ मध्ये फक्त बँक खाते उघडले होते आणि बाकीची फसवणूक मोदी सरकारच्या काळातीलच असल्याचा आरोप पवार यांनी केला. पंतप्रधान कार्यालयाला याबाबत २०१६ मध्ये कळवूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने नीरव मोदी देशाला फसवून पळून जाण्यात यशस्वी ठरला, असेही पवार म्हणाले. देशाला फसवून पळून गेलेली ही मंडळी भाजपला पाठिंबा देणारी आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला.

पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथे काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी पवार आले होते. यावेळी बोलताना पवार यांनी अनेक मुद्द्यांवरून भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

स्वयंसेवकांना खरंच सीमेवर पाठवा!

पवार यांनी यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचीही खिल्ली उडवली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी संघ स्वयंसेवकांना लाठ्या घेऊन काश्मीर सीमेवर पाठवावे म्हणजे भागवत यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे हे देशाला कळेल, असा टोला पवार यांनी लगावला. काश्मीर सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना रोज आपले सैनिक शहीद होत असताना सैन्यदलाच्या बाबतीत असे कुप्रतिष्ठा करणारे विधान करणे योग्य नसल्याचेही पवार यांनी पुढे नमूद केले.

पवार यांची परखड मते...

>> संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याबाबत बोलताना, सध्याचे सत्ताधारी त्यांच्या पाया पडणारे असल्याने त्यांच्यावर कारवाई होईल असे वाटत नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

>> राज्यातील जनतेचा आता या सरकारवरील विश्वास उडाला असून निराश लोक मंत्रालयात येऊन आत्महत्या करू लागले आहेत. आपली कामे हे सरकार करीत नसल्याची भावना जनतेत असल्यानेच मंत्रालयात आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. यातून आतातरी सरकारने धडा घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले.

>> आगामी राजस्थान, कर्नाटक आणि त्रिपुरा या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागल्यास लोकसभेची निवडणूक शेवटच्या दिवसापर्यंत लांबवतील, असा अंदाजही पवारांनी व्यक्त केला. केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येऊन समर्थ पर्याय उभा करत आहेत, असेही पवार यांनी पुढे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीएसकेंच्या अटकेने ठेवीदार अस्वस्थ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डीएसके ग्रुपचे प्रमुख डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती या दोघांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी सकाळी दिल्लीत अटक केली. डीएसकेंच्या अटकेने कोल्हापुरातील २७५ गुंतवणूकदारांनी धसका घेतला आहे. या गुंतवणूकदारांची १८ कोटींहून अधिक रक्कम डीएसके ग्रुपमध्ये अडकली आहे. कोल्हापुरातील गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने प्रयत्न सुरू केले असून, डीएसकेंचा ताबा मिळण्यासाठी पुणे कोर्टात अर्ज केला जाणार आहे.

डीएसके ग्रुपमध्ये कोल्हापुरातील गुंतवणूकदारांनी सुमारे पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा दावा गुंतवणूकादार असोसिएशनचे अध्यक्ष बी. डी. किल्लेदार आणि अॅड. सत्यजित पवार यांनी केला होता. पोलिसांनी गुंतवणूकदारांना तक्रारी देण्याचे आवाहन केल्यानंतर २७५ गुंतवणूकदारांनी राजारामपुरी पोलिस ठाणे आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रारी केल्या. २७५ गुंतवणूकदारांनी सुमारे १८ कोटी रुपयांची रक्कम डीएसके ग्रुपमध्ये अडकली आहे. दरम्यान, डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवरही नोव्हेंबर २०१७ मध्ये राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.

पोलिसांनी डीएसके ग्रुपची कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील मालगाव येथील मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोल्हापुरात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी डीएसके दाम्पत्याचा ताबा मिळावा यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पुणे कोर्टात अर्ज केला जाणार आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक आर. बी. शेंडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखरेच्या दरात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साखर दरात घसरण झाल्याने हवालदिल झालेल्या साखर कारखानदारांना काहीप्रमाणात या आठवड्यात दिलासा मिळाला. नोव्हेंबर महिन्यापासून साखर दरात सुरू असलेली घसरण थांबली असून पुन्हा साखरेच्या दरात क्विंटलमागे ३०० ते ३५० रुपयांची वाढ झाली. साखरेचा दर सरासरी ३,००० ते ३,१०० रुपयांपर्यंत कमी झाल्यानंतर आता पुन्हा यामध्ये वाढ झाली असून हाच दर ३,३०० ते ३,३४० पर्यंत पोहोचला आहे. घाऊक बाजारात साखरेच्या दरात वाढ झाली असली, तरी किरकोळ बाजारात याचा फारसा परिणाम सद्य:स्थितीला झालेला नाही.

गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी घाऊक बाजारात ४,००० रुपये क्विंटल साखरेचा दर होता. हंगाम पुढे सरकत गेल्यानंतर साखरेच्या दरात प्रचंड प्रमाणात घसरण होऊ लागली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तर क्विंटलचा दर ३,००० ते ३,१०० पर्यंत कमी झाला होता. घाऊक बाजारात साखरेचा दर कमी होत असताना किरकोळ बाजारात मात्र दर कायम राहिला. पण त्यानंतर मात्र किरकोळ बाजारातही साखरेचा ४५ रुपयांवरुन टप्प्याटप्प्याने ३८ रुपयांपर्यंत कमी झाली.

साखर दर कमी झाल्याचा परिणाम साखर कारखानदारीवर मोठ्या प्रमाणात होऊन त्याचा फटका ऊस उत्पादकांना बसला. यातून मार्ग काढण्यासाठी आयत शुल्क, साठ्यावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर साखर दरात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. एस-वन साखरेचा दर ३,००० वरून ३,३०० तर एम-वन साखरेचा दर ३,१०० वरून ३,३४० रुपये झाला आहे. घाऊक बाजारात हा दर ३०० ते ३४० रुपयांनी वाढला आहे. घाऊक बाजारात साखरेच्या दरात वाढ झाली, तरी अद्याप किरकोळ बाजारात साखरेच्या दरात वाढ झालेली नाही, पण पुढील काही दिवसांत यामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. साखरेचा अपवाद वगळात इतर किराणामालाचे दर स्थिर राहिले आहेत. मात्र गेल्या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा या डाळी उत्पादक प्रदेशामध्ये झालेल्या गारपिठीमुळे भविष्यात डाळींच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किराणा दर (किलोमध्ये)

पोहे - ४० रु.

साखर - ३८ रु.

शेंगदाणा - ८० रु.

मैदा - २६ रु.

रवा - २८ रु.

आटा - २६ रु.

गूळ - ४० रु.

शाबू - ७५ रु.

तीळ - १४० रु.

डाळीचे दर (किलोमध्ये)

तूरडाळ - ७५ रु.

मूगडाळ - ७५ रु.

उडीदडाळ - १०० रु.

हरभराडाळ - ७० रु.

मसूरडाळ - ६२ रु.

मूग - ८० रु.

मसूर - ८० रु.

चवळी - ८० ते १०० रु.

हिरवा वाटाणा - ४० ते ६० रु.

काळा वाटाणा - ७२ ते ८० रु.

मटकी - ६० रु.

छोले - १४० रु.

पावटा - १२० रु.

तेलाचे दर (किलोमध्ये)

शेंगतेल - १०० रु.

सरकीतेल - ७६ ते ७८ रु.

खोबरेलतेल - २२० रु.

डालडा - ९० रु.

बार्शी शाळू - ३२ ते ३४ रु.

ज्वारी नं. १ - ३० ते ३२ रु.

ज्वारी नं. २ - २७ ते २९ रु.

ज्वारी नं. ३ - २२ ते २४ रु.

बाजरी - १७ ते २४ रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटका अड्डयावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरी पोलिसांनी शनिवारी टेंबलाईवाडी आणि विक्रमनगर परिसरात तीन मटका अड्ड्यांवर छापा टाकून कारवाई केली. यात माजी उपमहापौर समिना मुल्ला यांचा पती मटका बुकी सलीम यासीन मुल्ला (वय ३९, रा. यादवनगर) याच्यासह पाचजणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी साडेपाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मटका अड्डयाचा मालक राहुल जोतिराम पाटील (४४, रा. राजारामपुरी), दिग्विजय श्रीकांत साळुंखे (३२, रा. विक्रमनगर), जितेंद्र विष्णू रेणके (४९, रा. टेंबलाईवाडी), राजू अर्जुन कांबळे (३०, रा. विक्रमनगर) अशा पाचजणांना पोलिसांनी अटक केली. विक्रमनगर आणि टेंबलाईवाडी येथील मुख्य रस्त्यावर उघड्यावर मटका घेतला जात होता. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक शहाजी निकम, गजेंद्र लोहार, आदींनी ही कारवाई केली. संशयितांना रविवारी कोर्टात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार शेट्टींचा १५ दिवसांचा अल्टीमेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कायद्यानुसार व बैठकीत ठरल्याप्रमाणे कारखानदार एफआरपी देणार नसतील, तर कारखान्यांची मालमत्ता जप्त करुन उत्पादकांची पंधरा दिवसांत देणी भागवा. देणी न भागवल्यास आंदोलनाचा भडका उडेल,' असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व खासदार राजू शेट्टी यांनी जोपर्यंत एफआरपीची उर्वरीत रक्कम मिळत नाही, तोपर्यंत सरकारचा कोणताही कर भरणार नसल्याचे ठणकावून सांगितले. ऊसदरप्रश्नी मध्यस्थी करणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील लपून बसले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

एफआरपीच्या पहिल्या उचलीमध्ये कपात केल्याच्या निषेधार्थ शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चानंतर झालेल्या सभेत केंद्र, राज्य सरकारची धोरणे, कारखानदार, व्यापाऱ्यांची साखळी आणि त्याला सरकारी यंत्रणांचे मिळणारे संरक्षण यावर जोरदार टीका करताना खासदार शेट्टी म्हणाले. 'कारखानदारांच्या मनमानीला सरकारचे पाठबळ मिळत आहे. सत्ता अन् पैशाच्या जोरावर काहीही करत असाल तर खपवून घेतले जाणार नाही. पाकिस्तानातून चोरट्या मार्गाने साखर येत असताना सरकारने बघ्याची भूमिका घेतली. शेतकऱ्यांना मातीत घालण्यासाठी शत्रूराष्ट्राला मदत करत असाल, तर तुमची थडगी बांधायला वेळ लागणार नाही.'

'राष्ट्रीय, राज्य सहकारी साखर संघ व खासगी असोसिएशनने हंगामापूर्वी २६० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल असे सांगितले. उत्पादित होणाऱ्या साखरेतून देशाची गरज भागणार आहे. पण सरकारकडे देशात साखरेचे किती उत्पादन होईल याची माहिती घेणारी यंत्रणा नसल्याने नंतरही या चारही असोसिएशनने साखर उत्पादन जास्त होईल असे सांगितले. त्यामुळे बाजारातील साखरेचे दर पडले. उत्पादकांना ७० टक्केपेक्षा जास्त हिस्सा द्यावा लागणार अशी शक्यता असल्यानेच षडयंत्र करुन दर पाडले. दर कमी झाल्यानंतर झालेल्या खरेदी-विक्रीची चौकशी करण्याची मागणी करत शेतकऱ्यांच्या पाठबळांमुळेच सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांना लाज असेल, तर कारखानदारांवर कारवाईचा बडगा उगारावा. कारखानदार आमचे शत्रू नाहीत, पण आम्हाला कोण फसवत असेल तर त्यांच्या नरड्यावर बसून घामाचे दाम वसूल करण्याची आमची धमक असल्याचा इशाराही खासदार शेट्टी यांनी दिला.

पालकमंत्री पाटील कुठे आहेत

'शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केली. बैठकीत तोडगा निघाल्यानंतर पालकमंत्र्यांनी सुमारे शंभर पोस्टर लावत श्रेय घेतले. पोस्टरबाजीतून जणू काय आपणच शेतकऱ्यांचे तारणहार असल्याचे दाखवले. पण कारखानदारांनी घेतलेल्या निर्णयानंतर पालकमंत्री कुठे लपून बसले आहेत, हे कळत नाही, असा टोलाही खासदार शेट्टी यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिरो पेंडन्सी अत्यावश्यकच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नागरिकांची आणि प्रशासकीय कामे जलदगतीने होऊन सरकारी कार्यालयांचे व्यवस्थापन सूत्रबद्धरीत्या व्हावे यासाठी १५ फेब्रुवारीपासून 'झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल' कामकाज पद्धती राज्यातील सरकारी व निमसरकारी कार्यालयांसाठी लागू केली आहे. हा निर्णय अत्यंत सोप्या भाषेत असून, प्रत्येक सरकारी, निमसरकारी कार्यालयांनी झिरो पेंडन्सीची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागातील अधिकाऱ्यांसमवेत विभागीय आयुक्त दळवी यांनी बैठक घेतली. ते म्हणाले, झिरो पेंडन्सी अभियानामध्ये पुणे विभागाने दिलेल्या संपूर्ण योगदानामुळेच या अभियानांतर्गत सुमारे ९० ते ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सोलापूर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांची यातील कामगिरी अत्यंत अभिमानास्पद आहे. झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजलबाबत आपण जमाबंदी आयुक्त, सहकार आयुक्त असतानाही यापूर्वी कार्यवाही केली होती. पण पुणे महसूल आयुक्त म्हणून काम करत असताना केवळ सहा महिन्यांत हे अभियान विभागात यशस्वीपणे राबविले. दहा आयएएस अधिकारी व सर्व सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या सकारात्मक दृष्टिकोनातून हे शक्य झाले. त्यामुळेच पुणे विभाग या अभियानामध्ये अव्वल स्थानी आहे.

सरकारी निर्णयाच्या मॉनिटरिंग सिस्टीमची पॉकेट डायरी काढण्यात येणार असल्याचे सांगून दळवी यांनी हा सरकारी निर्णय म्हणजे सरकारी कार्यालयाची कार्यपद्धती कशी असावी याबाबतचे पहिले डॉक्युमेंट आहे. यामुळे राज्यातील सर्व कार्यालये एका सूत्रामध्ये बांधली जाणार आहेत. १८ एप्रिलनंतर डाटा संकलनाचे काम युद्धपातळीवर करण्यात येणार असल्याने, त्यापूर्वी कार्यालयप्रमुखांनी आपल्या कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण द्यावे अशा सूचना केल्या.

यावेळी विभागीय आयुक्तांनी जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी चंद्रकांत मुगळी यांचा सत्कार केला. झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल या कार्यप्रणालीचा सरकारने स्वीकार केल्याबद्दल जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आयुक्त दळवी यांचा सत्कार केला.

यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, महसूल उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, उपविभागीय अधिकारी डॉ. समीर शिंगटे, संगीता चौगुले, सचिन इथापे, अजय पवार, संपत खिलारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरफाळा वाढीचा प्रस्ताव महासभेच्या कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी मालमत्ता करामध्ये(घरफाळा) वाढीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनातर्फे शनिवारी स्थायी समिती सभेपुढे हा प्रस्ताव मांडला, पण 'स्थायी'ने त्यावर कसलीही चर्चा न करता घरफाळाबाबतचा निर्णय सर्वसाधारण सभेने घ्यावयाचा असल्याची भूमिका स्वीकारात प्रस्ताव पुढे पाठविला. महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी(ता.२०) होणार आहे. यामुळे घरफाळ्याचा फैसला सर्वसाधारण सभेत होणार आहे.

प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे प्रस्ताव तयार केले आहेत. वाणिज्य मिळकतीच्या करात वाढ तसेच १००० चौरस फुटावरील रहिवासी मिळकतीत करवाढ प्रस्तावित असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्या संदर्भात अधिकृत माहिती दिली नाही. गतवर्षी सभागृहाने घरफाळा वाढीला विरोध केला होता. पूर्वानुभव पाहता मंगळवारची सभाही घरफाळ्यावरुन गाजण्याची शक्यता आहे. जकात, एलबीटी बंद झाल्यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मर्यादा पडल्या आहेत. त्याचा परिणाम थेट विकासकामांवर होत आहे. प्रशासनाने या बाबीचा विचार करुन घरफाळा वाढीसाठी वेगवेगळे प्रस्ताव सादर केले आहेत. दरम्यान, कोल्हापुरात भाडेतत्वावरील वाणिज्य मिळकतींवर इतर महापालिकेपेक्षा सात पट जादा घरफाळा आकारणी होत असल्याचे क्रिडाईने महापालिकेच्या निदर्शनास आणले. जादा घरफाळा आकारणीमुळे मोठमोठ्या कंपन्या, संस्था कोल्हापुरात व्यवसाय सुरु करण्यास राजी नाहीत. त्यामुळे रोजगार आणि अर्थार्जनावर परिणाम झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

भाडेतत्वावरील वाणिज्य मिळकतीवरील घरफाळा कमी केल्यास ती तूट कुठे भरुन काढता येईल यासंदर्भात प्रशासन चाचपणी करत आहे. उत्पन्नवाढ हा उद्देश ठेवून प्रशासनाने २०१८-१९ या वर्षासाठी रहिवासी, वाणिज्य व इंडस्ट्रीज मालमत्ता कर सुधारित करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

नागरी दलित वस्ती सुधारण्यासाठी उपलब्ध दोन कोटी रुपयांसाठी कामांची निश्चिती, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दुर्बल घटकातील लाभार्थ्यांसाठी ऑफीस प्रस्ताव मंजुरीसाठी आहेत. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची अंमलबजावणी न करणाऱ्या संस्थांवर दंडात्मक कारवाई, सावित्रीबाई फुले रुग्णालयात सोनोग्राफीसाठी दराची निश्चिती, केएमटी कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंड फंडासाठी महापालिकेकडून अर्थसहाय करण्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी वसंत साखरे यांची नियुक्ती झाली आहे. नियुक्तीचा आदेश जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव सभेसमोर आहे.मनीषा हौसिंग सोसायटी व जवाहरनगर खणभाग येथील ओपन स्पेसमधील जागा नाममात्र भाड्याने देण्याचा सदस्यांनी मांडलेले प्रस्ताव मंजुरीसाठी सभेपुढे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ नाल्यांमधून सांडपाणी नदीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदी प्रदूषणासाठी शहरातील केवळ जयंती व दुधाळी नव्हे तर इतर नालेही कारणीभूत असून आतापर्यंत महापालिकेच्यावतीने केवळ जयंती नाल्यातील सांडपाणी रोखण्यात यश मिळवले आहे. पण दुधाळी, कसबा बावडा, लाइन बाजार, जामदार क्लब, बुधवार पेठ, सीपीआर, राजहंस, रमणमळा, वीटभट्टी या नाल्यांतील सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळत आहे. बापट कॅम्प व लाइन बाजार येथील सांडपाणी अडवून एसटीपीकडे वळवण्यासाठी उपसा केंद्र बांधण्यात येत आहे. मे महिन्यापर्यंत या नाल्यांचे पाणी वळवण्याचे महापालिकेचे टार्गेट आहे.

शहराच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत येणारे छोटे मोठे असंख्य नाले आहेत. छोट्या नाल्यांमधून मोठ्या नाल्यांमार्गे पंचगंगा नदीमध्ये जाणारे सांडपाणी सध्याही कायम वाहत आहे. जयंती व दुधाळी हे प्रमुख नाले असले तरी याशिवाय अन्य नाले परस्पर नदीमध्ये मिसळतात. त्यासाठी महापालिकेने वेळोवेळी सांडपाणी अडवण्याचे, त्यातील प्रदूषण कमी करण्याचे काम केले. पण या नाल्यांमधील सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया करता आली नाही. जयंती नाल्यात येणारे सांडपाणी अडवून कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे नेण्यात आले. पण नाला अडवल्यानंतर त्यापुढील भागात मिसळणारे सीपीआर, बुधवार पेठ, राजहंस नाल्यातून सांडपाणी नदीतच जात आहे. हीच परिस्थिती दुधाळी नाल्याबाबत आहे. रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी अडवून दुधाळी नाल्याकडे वळवण्यात आले. या नाल्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी १७ एमएलडी प्रक्रिया प्रकल्प बांधण्यात येत आहे. त्यामुळे तेथील सांडपाणी नदीत मिसळत आहे. याशिवाय लाइन बाजार व बापट कॅम्प, वीटभट्टी या नाल्यामध्ये अनेक छोटे नाले मिसळत आहेत. त्यांचे सांडपाणी वळवण्यात आलेले नाही.

राष्ट्रीय नदी कृती योजनेतून सध्या बापट कॅम्प व लाइन बाजार येथे नाला अडवून सांडपाणी कसबा बावडा प्रक्रिया प्रकल्पाकडे वळवण्यात येणार आहे. त्यासाठीचे सिव्हील वर्कचे काम संपत आले आहे. इलेक्ट्रिकल व ऑटोमेशनचे काम होण्यास दोन महिन्याचा अवधी लागणार आहे. जामदार क्लब नाला दुधाळीकडे वळवण्यात येणार आहे. या दोन नाल्यांचे सांडपाणी वळवल्यानंतर पंचगंगा नदीमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यापैकी ७५ टक्के सांडपाणी अडवले जाणार आहे. याशिवाय जुना बुधवार, सीपीआर, राजहंस, रमणमळा, कसबा बावडा व वीटभट्टी हे नाले वळवण्यासाठी १० कोटी १५ लाखाची निविदा काढण्यात आली आहे. पण त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. जयंती व दुधाळी नाल्याकडे वळवण्यात येणाऱ्या नाल्यांमुळे वाढणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कसबा बावडा व दुधाळी येथे आणखी छोट्या दोन प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.

सांडपाणी अडवण्याचे काम केले जाणारे नाले

बापट कॅम्प, वीटभट्टी, लाइन बाजार, कसबा बावडा, रमणमळा, राजहंस, सीपीआर, जुना बुधवार, जामदार क्लब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूत्रधार नामानिराळे, कारवाई गुंडाळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत दगाफटका करणाऱ्या दोघा सदस्यांविरोधात पक्षाकडून कारवाईची प्रकिया सुरू आहे. मात्र, त्या सदस्यांना बंडखोरीची शिकवण देणाऱ्या बड्या नगरसेवकांबाबत राष्ट्रवादीने नरमाईचे धोरण स्वीकारल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. सभापतिपदाची निवडणूक होऊन सहा दिवस झाले, अजूनही राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना पुरावे सापडले नाहीत. या प्रकरणातील बडा नगरसेवक हा नेते मंडळींच्या मर्जीतील असल्यामुळे जाणूनबुजून कारवाईस विलंब होत असल्याची भावना राष्ट्रवादीत बळावली आहे. दुसरीकडे स्थायीतील घडामोडींची इत्थंभूत माहिती राष्ट्रवादीतील एका यंत्रणेने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे सादर केली आहे.

नगरसेवक अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजादे यांनी स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत उघडपणे बंड केले. या फुटीर नगरसेवकांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून मोर्चे काढले. बुधवार पेठ आणि शिवाजी पेठेत जाऊन आंदोलने केली. फुटीर नगरसेवकांना गद्दार, सूर्याजी पिसाळ अशा जहरी शब्दांत टीकास्त्र सोडले. दोघा नगरसेवकांच्या बंडखोरीला राष्ट्रवादीमधील एका वजनदार नगरसेवकाने फूस दिली. नगरसेवकांची फोडाफोडी ते अर्थपूर्ण घडामोडीत त्या बड्या नगरसेवकाची मोलाची भूमिका राहिल्याची शंका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना आली.

चव्हाण व पिरजादे या नगरसेवकांविरोधात मोर्चा आणि निषेध सभेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरीमागील सूत्रधार शोधा, त्या मास्टर माईंडवर कारवाई करा अशा घोशा लावला होता. जिल्ह्यातील पक्षाचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणाशी संबंधित माहिती गोळा करत आहे, पुरावे उपलब्ध झाल्यावर कारवाई करू असे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. मात्र, राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी, स्थायीची घटना घडून सहा दिवसांचा कालावधी उलटला तरी पुढे काहीच झाले नाही.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अहवाल

नाव न छापण्याच्या अटीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थायीतील घडामोडींची संपूर्ण माहिती पक्षाच्या नेत्यांना कळविली आहे. दोन्ही नगरसेवक, 'स्थायी'त सत्तांतर घडविण्यात भूमिका बजावणारा कारभारी नगरसेवक, त्यांचा गेल्या काही वर्षांपासून महापालिकेतील निर्णय प्रक्रियेतील सहभाग, नेत्यासोबतची जवळीकता याबाबतचा अहवाल पाठविला असल्याचे वृत्त आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार हा नगरसेवकांना विश्वासात न घेता ठराविक सदस्यांच्या मर्जीने सुरू आहे, पदाधिकारी निवडीपासून ते सभागृहातील धोरणापर्यंत प्रत्येकवेळी सोयीचे निर्णय होतात आणि त्यांना नेत्यांचा वरदहस्त असल्याचेही अहवालात नमूद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घामाचे दाम सोडणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पैसे आमच्या घामाचे, नाही कुणाच्या बापाचे', 'घामाचे दाम सोडणार नाही', 'एकच गट्टी, राजू शेट्टी', 'उचल कमी करणाऱ्या कारखानदारांचा धिक्कार असो' अशा गगनभेदी घोषणा देत रखरखत्या उन्हात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखानदारांनी एफआरपीचे तुकडे पाडल्याच्या निषेधार्थ प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चानंतर झालेल्या सभेत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर आणि कारखानदारांच्या एकतर्फी निर्णयावर कठोर प्रहार करत घामाचे दाम सोडणार नसल्याचा इशारा दिला. मागण्यांचे निवेदन साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी व्यासपीठावर येऊन शिष्टमंडळाकडून स्वीकारले.

खासदार शेट्टी यांनी दसरा चौकात राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर दुपारी तीन वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा दसरा चौकातून सीपीआर, महापालिका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, फोर्ड कॉर्नरमार्गे साखर सहसंचालक कार्यालयावर दाखल झाला. यावेळी ट्रॉलीवरच व्यासपीठ तयार करण्यात आले. उन्हाचा तडाखा प्रचंड असूनही मोर्चात उत्पादकांची उपस्थिती लक्षणीय होती.

खासदार शेट्टी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, अण्णासाहेब चौगुले, सयाजी मोरे, विकासकाका देशमुख यांची भाषणे झाल्यानंतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, 'साखर दराचा मुद्दा उपस्थित करत कारखानदारांनी बेकायदेशीररीत्या ५०० रुपये कमी केले आहेत. ३१ जानेवारीनंतर गाळप झालेल्या उसाची बिले प्रतिटन २,५०० रुपयांप्रमाणे जमा केली असून, कारखानदारांनी कायद्याचे उल्लंघन करत उत्पादकांची फसवणूक केली आहे. हंगामापूर्वी ऊसदाराचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तोडगा निघाला. यानुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिले जमा झालीत. पण त्यानंतर साखरदराचा मुद्दा उपस्थित करत कारखानदारांनी बैठक घेऊन परस्पर एफआरपीचे तुकडे पाडून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.'

'सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखरेचे दर कोसळले असताना त्याचा फटका मात्र उत्पादकांना बसला असून कारखानदारांना याचा फायदा घेत उत्पादकांच्या २०० कोटींवर दरोडा घातला आहे. कायद्याने १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक असताना कायदा मोडण्याचा अधिकार कारखानदारांना कोणी दिला? स्वाभिमानी संघटना हे कधीही मान्य करणा नसून ठरल्याप्रमाणे एक रुपयाही कमी घेणार नसल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.'

सहसंचालक रावळ यांनी निवेदन स्विकारल्यानंतर तातडीने संघटनेच्या मागणीचे निवेदन साखर आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात आले. यावेळी रावळ यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक आर. बी. बारडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिन्ही राज्यांच्या सीमांवर ३५ चेकपोस्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमाभागातील पोलिस अधिकाऱ्यांची बॉर्डर कॉन्फरन्स शनिवारी बेळगावमध्ये पार पडली. निवडणूक काळात अवैध धंदे, तस्करी आणि सराईत गुन्हेगारांचा वावर रोखण्यासाठी पोलिसांनी सीमाभागात नव्याने ३५ ठिकाणी चेकपोस्ट नाके सुरू करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय हवालामार्गे होणारी पैशांची देवाण-घेवाण आणि सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला. याच बैठकीत कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी हत्या तपासाबाबतही महत्त्वाची चर्चा झाली. कॉन्फरन्ससाठी तिन्ही राज्यांच्या सीमाभागातील वीसहून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

कर्नाटक विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आली आहे. निवडणूक काळात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यांच्या सीमाभागात सराईत गुन्हेगार आश्रय घेतात. हवालामार्गे कोट्यवधी रुपयांची देवाण-घेवाण केली जाते. याशिवाय मोठ्या प्रमाणात मद्यतस्करीही होते. अलीकडे सोशल मीडियातील आक्षेपार्ह मजकुरामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी सोशल मीडियावरही नजर ठेवली आहे. निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याचे नियोजन करण्यासाठी शनिवारी बेळगावातील सर्किट हाउसमध्ये सीमाभागातील पोलिस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला बेळगावचे आयजी अलोक कुमार, कोल्हापूरचे आयजी विश्वास नांगरे-पाटील, कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक संजय मोहिते, सांगलीचे सुहेल शर्मा, सिंधुदुर्गचे दीक्षित गेडाम, गोव्याचे चंदन चौधरी, बेळगावचे सुधीरकुमार रेड्डी, कारवारचे विनायक पाटील, बागलकोटचे संतोष बाबू, धारवाडच्या रेणुका सुकुमार, हावेरीचे के. परशुराम यांच्यासह वीसहून अधिक अधिकारी उपस्थित होते.

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बॉर्डर कॉन्फरन्समध्ये अधिकाऱ्यांनी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. सीमाभागातील गुन्हे, आंतरराज्यीय गुन्हेगार, मद्यतस्करी, वाळूतस्करी, गुन्हेगारांच्या माहितीची देवाण-घेवाण करण्याच्या मुद्द्यांवर कॉन्फरन्समध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांचा वापर होतो. हा पैसा हवालामार्गे पोहोचविला जातो. त्याचबरोबर मद्यतस्करीही मोठ्या प्रमाणात होते. काही ठिकाणी सराईत गुंडांकडून मतदारांना धमकावले जाते, त्यामुळे निवडणुकीवर परिणाम होतो. असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या माहितीची देवाण-घेवाण केली जाणार आहे. मद्यतस्करी, वाळूतस्करी आणि गुन्हेगारांचा वावर रोखण्यासाठी सीमाभागात ३५ ठिकाणी चेकपोस्ट नाके सुरू करण्याचा निर्णय कॉन्फरन्समध्ये घेण्यात आला. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची मदत घेतली जाणार आहे. बेळगावातील सर्किट हाउसमध्ये सुमारे चार तास कॉन्फरन्स सुरू होती.

पानसरे-कलबुर्गी तपासाबाबतही चर्चा

बॉर्डर कॉन्फरन्समध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासाबाबतही सविस्तर चर्चा झाली. सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पानसरे हत्येच्या तपासाची माहिती दिली, तर कलबुर्गी हत्येचा तपास करणारे बेंगळुरू येथील अधिकाऱ्यांनी तपास अहवाल सादर केला. दोन्ही गुन्ह्यांतील साम्य, शस्त्रांची माहिती, संशयित आणि तपासाची पुढील दिशा याबाबत महत्त्वाची चर्चा झाली. यावेळी कोल्हापूर आणि बेळगावच्या आयजींनी तपास अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images