Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

घागरभर पाण्यासाठी पायपीट

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापुरात बुडालेली उपसा केंद्रे आणि त्यासाठी महापालिकेची धडपड सुरू असली तरी नागरिकांना घागरभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. एरवी १२ ते १४ तास पाणी मिळत असलेल्या भागातील नागरिकांनाही पाण्याची दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. पाण्याची प्रचंड उधळपट्टी थांबून पाणी मिळवायचे कसे हाच प्रश्न रहिवाशांसमोर आहे. महापालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या टँकरची नगरसेवकांकडून पळवापळवी सुरू आहे. त्यातून ठराविक भागातच पाणी मिळत असल्याने इतर भागातील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. टँकर आला की पाणी मिळविण्यासाठी नागरिकांचा गराडा पडल्याचे दिसते. झुंबड उडत आहे. टंचाईमुळे खासगी टँकरचालक, पाणी विक्रेत्यांचा धंदा तेजीत आहे.

पंचगंगा नदीला महापूर आल्यानंतर शहराला पाणीपुरवठा करणारी तिन्ही उपसा केंद्रे बुडाली. तीनपैकी बालिंगा उपसा केंद्रातून पाणीपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहरवासियांना सध्या ८८ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत येत आहे. मात्र टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठ्यामध्ये प्रचंड विस्कळितपणा असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही नगरसेवक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करून टँकर आपल्या भागात नेत असल्याचा फटका इतर प्रभागातील नागरिकांना बसत आहेत.

महापालिकेच्या टँकरसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागात पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. यासह वापराच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण बनला नागरिक व्याकूळ झाले आहेत. अनेक प्रभाग, गल्ल्यांमध्ये एकदाही टँकर न आल्याने नागरिक नगरसेवकांच्या घरातच ठिय्या मारू लागले आहेत. नगरसेवकही फिल्टर हाउसमध्ये जाऊन अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करत आहेत. त्यामुळे संपूर्ण नियोजन कोलमडून पडत आहे. नागरिकांना पाणी देण्यासाठी ८८ टँकर असताना केवळ नियोजनाअभावी अनेकांना एकदाही पाणी मिळालेले नाही.

महापालिकेचा टँकर फिरकत नसल्याने अनेक ठिकाणचे नागरिक, सोसायट्या, अपार्टमेंटचे रहिवासी खासगी टँकरचालकांशी संपर्क साधत आहेत. त्यांच्या मागणीप्रमाणे दर देऊनही खासगी टँकरचालकांकडून पाणीपुरवठा सुरू नाही. अनेकांकडे दोन-दोन दिवसांचे बुकिंग असल्याने त्यांच्याकडून नागरिकांची अक्षरश: लूट सुरू आहे.

या गंभीर स्थितीतून बाहेर येण्यासाठी बालिंगा उपसा केंद्र सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. मात्र त्यालाही अद्याप दोन दिवस लागणार असल्याने नागरिकांचे आणखी हाल होणार आहे. शिंगणापूर योजनेतून उपसा होण्यास पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असल्याने 'ई' वॉर्डातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. इतरवेळी शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी करत असतात. मात्र निसर्गाने दिलेल्या फटक्यामुळे एक घागर पाण्यासाठी अनेकांना चांगलीच पायपीट करावी लागत आहे.

नगरसेविकेच्या पतींचे आकांडतांडव

पाणीपुरवठा, आरोग्य आणि रस्त्यांच्या प्रश्नाबाबत महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात मंगळवारी आढावा बैठक झाली. बैठकीत टँकर पळवापळवीविरोधात अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शास्रीनगर आणि उद्यमनगर परिसरातील एका नगरसेवकाने दमदाटी करत टँकर पळवला. त्यामुळे शेजारील प्रभागातील महिला नगरसेविका हतबल झाल्या. त्याबाबत एका नगरसेविकेच्या पतीने बैठकीत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. टँकर पळवापळवीचा निषेध करत ते बैठीकतून बाहेर पडले.

आजारी असूनही अधिकारी कामावर

उपशहर अभियंता हर्षजित घाटगे हे तब्येत बिघडल्याने काही दिवसांपूर्वी एका खासगी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. तर जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्या आई आजारी आहेत. मात्र, शहरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर दोन्ही अधिकारी तातडीने कामावर हजर झाले. शहरातील पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने कुलकर्णी यांना हजर राहावे लागले. त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येऊ नये, यासाठी या विभागाचा तात्पुरता कार्यभार पुणे महापालिकेतून आलेल्या उपायुक्तांकडे सोपवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संभाजीराजेंचा खासदार फंड पूरग्रस्तांना देणार

$
0
0

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पूरग्रस्तांसाठी पाच कोटी रुपयांचा खासदार फंड खर्च करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. आज सोमवारी संभाजीराजेंनी चंदगड तालुक्यातील किणी, कोवाड या गावांना भेटी देऊन पूर परिस्थितीतील पाहणी केली. लवकरच तहसीलदारांसोबत बैठक घेऊन नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्याला पुराने वेढल्यानंतर दिल्लीत नाविक दलाशी संपर्क साधून खासदार संभाजीराजे यांनी खास विमानाने १५ बोटी आणल्या होत्या. नाविक दलाच्या बोटीनी बचाव मोहीम आखताना करवीर तालुक्यातील चिखली आणि आंबेवाडीतील नागरिकांना बाहेर काढले होते. या मोहिमवर खासदार लक्ष ठेऊन होते. चिखली आणि आंबेवाडी या दोन्ही गावात बोटीने भेट देऊन नागरिकांना धीर देण्याचे काम केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलांचे ऑडिट करून उंची वाढवणार

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : अतिवृष्टी आणि महापुराचा विळखा यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे. राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील ५० हून अधिक पूल पाण्याखाली गेले. महापुराच्या तडाख्याने ठिकठिकाणी पुलांचा भराव खचण्यासह बांधकामांना धोका निर्माण झाला आहे. परिणामी अशा पुलांचे नजीकच्या काळात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. शिवाय महापुराने बाधित क्षेत्रातील रस्त्यांवर नव्याने पूल बांधताना उंची वाढवावी लागेल का? या दृष्टीने बांधकाम विभाग अभ्यास करत आहे. पावसामुळे खराब झालेल्या शहर व जिल्ह्यातील एकूण रस्त्यांच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी १२५ कोटींची गरज भासणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शहरात छत्रपती शिवाजी मार्केट आणि ताराराणी मार्केट या दोन विभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रभागांतील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे उत्तर व दक्षिण विभाग, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग आणि महापालिकेला तात्पुरत्या स्वरुपात या रस्त्यांची दुरुस्तीसाठी निधीची गरज भासणार आहे. यासाठी महापालिका सरकारकडे निधीसाठी पाठपुरावा करणार आहे.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांनी 'बांधकाम विभागाकडील उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यातील ३० राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांतील ५८ मिळून असे एकूण ८८ रस्ते खंडीत आहेत' अशी माहिती दिली. तर जिल्हा परिषदेच्या ताब्यातील रस्त्यांची लांबी सहा हजार किलोमीटर आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ७२ रस्ते वाहतुकीसाठी खंडित झाले होते. यामध्ये ग्रामीण रस्त्यांची संख्या ३७ तर ३५ इतर जिल्हा मार्ग आहेत. या रस्त्यांची तात्पुरत्या दुरुस्तीसाठी सुमारे २० कोटी रुपये लागतील. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दक्षिण विभागातील १९ प्रमुख जिल्हा मार्ग व दहा राज्य मार्ग बंद होते. या रस्त्यांची दुरुस्ती अत्यावश्यक आहे. रस्त्यांच्या सद्यस्थितीचा अहवाल पाठविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत' अशी माहिती दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांनी दिली. या रस्त्यांच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी १५ कोटींची गरज भासेल.

पुलांचा भराव खचला

जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्गावरील काही पूल अनेक दिवस पाण्याखाली होते. काही ठिकाणी पुलाचा भराव खचला आहे. भडगाव, गिजवणेजवळील पूल, निलजी, व्हिक्टोरिया पूल, इब्राहिमपूर, कानूर, चंदगड, माणगाव, करंजगाव, पाटणे, सिद्धनेर्ली येथील पूल अनेक दिवस पाण्यात होते. यांसह जिल्ह्यातील अन्य मार्गांवरील ज्या पुलांना धक्का बसला, भराव खचला त्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. महापुरामुळे बहुसंख्य पूल पाण्याखाली गेल्याने संबंधित मार्गावरील मोडकळीस आलेल्या पुलांची नव्याने बांधणी करताना उंची वाढवावी लागेल का? याचा बांधकाम विभाग अभ्यास करत आहे.

शहरात १६५ किलोमीटरचे रस्ते खराब

महापूर आणि अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहरातील १६५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची बिकट अवस्था बनली आहे. प्रमुख मार्गांवर खड्डे पडले आहेत. महापालिकेने शहरातील सर्व प्रभागांतील खराब रस्त्यांची माहिती संकलित केली आहे. विभागीय कार्यालयनिहाय डाटा तयार केला आहे. रस्त्यांच्या डागडुजीसाठी ४७ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. यासाठी सरकारने निधी द्यावा अशी मागणी महापालिकेने केली आहे.

तालुकानिहाय खराब रस्त्ये

तालुका जिल्हा मार्ग राज्यमार्ग

शाहूवाडी ०६ ००

पन्हाळा ०४ ०४

गगनबावडा ०२ ०१

करवीर ०६ ०३

हातकणंगले ०४ ०७

कागल ०९ ०२

शिरोळ ०७ ०३

राधानगरी ०४ ०१

भुदरगड ०३ ०२

आजरा ०३ ०१

गडहिंग्लज ०७ ०३

चंदगड ०३ ०३

अतिवृष्टीमुळे खंडीत रस्ते

३०

राज्यमार्ग

५८

प्रमुख जिल्हा मार्ग

८८

एकूण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांची शर्थ

$
0
0

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पुरामुळे नादुरुस्त झालेले वितरण रोहित्र, उच्चदाब व लघुदाबाच्य वीजवाहिन्या, विजेचे खांब, आवश्यक उपकरणे व यंत्रसामग्री दोन्ही जिल्ह्यात पोहचली आहे. महावितरणच्या पुणे, औरंगाबाद, जळगाव, बारामती, नांदेड व लातूर परिमंडळातील कर्मचारी दोन्ही जिल्ह्यांत दाखल झाले आहेत. कोल्हापूर शहरातील ३३ आणि ११ केव्ही दुधाळी उपकेंद्राचा वीज पुरवठा सुरू झाला. जिल्ह्यातील सहा वीज उपकेंद्रे सुरू झाली आहेत. आतापर्यंत एक लाख २२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. सांगली शहरातील मिरज जॅकवेल व सांगलीवाडीसह अनेक गावातील ३८ हजार २२६ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू झाल्याचे महावितरणने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आभाळ फाटलं, सगळं हरवलं...

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

'जून महिन्यात पावसानं दडी मारली, म्हणून देवाकडं हात जोडलं होतं... पिकं उगवतील एवढा तरी पड म्हणून. त्यानं हाक ऐकली अन् पदरच फाडून नेला. आभाळासंग आमचं आयुष्यबी फाटलं' हे सांगताना साठीकडे झुकलेल्या आंबेवाडीच्या सुरेखा चव्हाण यांच्या डोळ्यात पाणी होतं. तोरस्कर चौकातील कल्याणी हॉलमध्ये आंबेवाडीतील नागरिक स्थलांतरित आहेत.

सुरेखा चव्हाण सांगतात, 'पावसानं जोर पकडलेला. आजवर आख्या हयातीत पाणी उंबऱ्यापर्यंत आलं नव्हतं. त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. पती गेले. दोन मुलं आहेत, पण ती मला पाहत नाहीत. सहा वर्षाच्या नातवाला घेऊन एकटी राहते. लेक वारली अन माझ्या फाटक्या पदरात लहान लेकरू टाकून गेली. संसाराचा समदा भार एकटीवर. आणि आता सगळं वाहून गेलं. रविवारी पावसाचा जोर वाढला. सोमवारी दिवसभर भयानक भीती वाटली. सगळं काळवंडून आलेलं. नातवाला उराशी घेऊन अंधारात बसून दिवस काढला. पाणी वाढत होतं. पाऊस कमी व्हावा म्हणून आभाळाकडे डोळे लावून माणसं वाट पाहत होती. सोमवारी पाण्याचा जोर वाढला तशी लोकांची बाहेर पडायला धडपड सुरू झाली. पाणी वाढलं तस भीतीने काळीज कापत होतं. मिलिटरी आली अन आम्हांला बाहेर काढलं. काळीज कापणारं लालभडक पाणी पाहून जीव घाबराघुबरा झाला होता.'

चव्हाण यांच्या नातवाला काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. उपचाराचा खर्च १ लाख १५ हजार रुपये आला. उसनेपासने घेऊन, कर्ज काढून नातवावर उपचार केले. आता सगळेच वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे याची चिंता त्यांना आहे. त्या डॉ. किरण दोशी यांच्याकडे सफाई कामगार म्हणून काम करतात. महापुरात त्यांच मातीचं दोन खण घर वाहून गेलं. आता मागे परतून करू काय? असा आर्त सवाल त्या भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला करतात.

ये कैलाश भय्या डूब जाता

गाव सोडून परक्या मुलखात आलेल्या त्यांनी इथल्या मातीशी इमान राखला. सुरुवातीला मिळेल ती कामे करून पोटाची गुजराण केली. एक एक जोडत स्वतःचा फरशी व्यवसाय उभा केला. २० वर्षांपूर्वी नैनितालहून कामाच्या शोधात आंबेवाडीत आलेल्या कैलास भय्या यांच्या फरशी कापायच्या सात ते आठ मशीन पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. कल्याणी हॉलमध्ये थांबलेल्या कैलाश यांच्या 'अब हम कैसे जिऐंगे' या प्रश्नाचं उत्तर कुणाकडे नव्हतं.

आंबेवाडी परिसरात फरशीकाम करून देण्यात कैलाश यांचा नावलौकिक होता. वीस वर्षांपूर्वी त्यांनी एकट्याने मजल-दरमजल करत कोल्हापूर गाठले. आंबेवाडीत मुक्काम केला. नंतर ते कायमचे आंबेवाडीकर झाले. कष्टाने स्वतःचा व्यवसाय उभारला. त्यात प्रामाणिकपणे काम करत भागात नाव मिळवले. मात्र, महापुराने त्यांचे कष्ट हिरावून घेतले. फरशीकाम करायच्या सर्व मशीन्स पाण्याबरोबर वाहून गेल्या. आता व्यवसायाचे काय? याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. बरोबर कुटुंबीय कोणीच नाहीत. केवळ व्यवसायासाठी जमा केलेले साहित्य हेच त्यांचे कुटुंब होते. प्रत्येकाला ते विचारायचे की पाणी ओसरले का? 'भाई, आप नदीपार जाके आये क्या' असं विचारत सैरभैर झाले होते.

पुराबद्दल कैलाश सांगतात, 'गेल्या वीस वर्षात अशी आपत्ती पाहिली नाही. पुरातून बाहेर पडण्यासाठी अनेक लोकांनी केलेला आक्रोश अजूनही आठवतो. सरकारने कितीही मदत केली तरी आम्ही पहिल्यासारखे पुन्हा उभा राहू शकतो का? कोल्हापूरच्या मातीने घडवले, पाडले. आता तीच माती पुन्हा उभा राहण्याची ताकद देईल' असे ते म्हणाले.

लेकाचा पहिला वाढदिवस महापुरात....

मुलाचा पहिला वाढदिवस जल्लोषात साजरा करायचा म्हणून घरी जय्यत तयारी चालू होती. आंबेवाडीतलं ११ माणसाचं भलं मोठं कुटुंब. घरातला कार्यक्रम भरगच्च असे. आराध्य या एक वर्षाच्या मुलाचा वाढदिवस घरी साजरा करायचे राहून गेल्याची खंत पुष्पा खोत व्यक्त करतात. मात्र, जैन मठात आपल्या मुलाचा वाढदिवस शेकडो अनोळखी लोकांनी उत्साहात साजरा केल्याचे त्या आनंदाने सांगतात. या क्षणाबद्दल व्यक्त होतानाही त्यांच्या आनंदाला दुःखाची किनार असल्याचे जाणवते.

पुरातील अनुभवाबद्दल पुष्पा खोत सांगतात, 'पाणी वाढत होते. मात्र, ते इतके वाढेल याबाबत घरातील अनुभवी ज्येष्ठांनाही कल्पना नव्हती. अनेकांनी आमची हयात गेली, पण पाणी आलं नाही असे ठामपणे सांगितले होते. सोमवारी दुपारनंतर पाणी वाढले. बघता बघता गळ्यापर्यंत आले. अनेकांनी दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर धाव घेतली. मदतीसाठी प्रयत्न सुरू झाले. मोबाइलवरून, मिळेल त्या मार्गाने मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. एनडीआरएफच्या जवानांनी कष्टाने आम्हाला वाचवले. लहान मुले बावरली होती. किमान सर्वांचा जीव वाचावा यासाठी प्रयत्न सुरू होता. घरात पाच लहान मुले आहेत. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जैन मठ व कल्याणी हॉलमध्ये जेवण, लहान मुलांना दूध, औषधांची सोय झाली. आता घरात काडेपेटीपासून चटणी, मिठापर्यंत पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. जीव वाचेल याची अपेक्षा नव्हती. मात्र, जवानांच्या मदतीने देवच धावून आला. अजूनही माणुसकी जिवंत असल्याचा पुरावा महापुरामुळे मिळाला' असे त्या म्हणाल्या.

माहेरवाशीण पुरात

आपलं सात महिन्याचं तान्हुलं घेऊन माहेरपणासाठी आईकडे आलेल्या शांता रडरट्टी यांनाही पुराचा तडाखा बसला. शांता यांची आई आंबेवाडीत राहते. त्यांना आई व मुलासह शनिवार पेठेतील मणेर गल्लीतील मदरशात हलविण्यात आले आहे. शांता यांचे पती सीआरपीएफ जवान म्हणून मेघालयात कार्यरत आहेत. त्यांना सात महिन्यांचा मुलगा आहे. शांता यांचे मूळ गाव कर्नाटकातील गोकाक. त्यांचे आई-वडिल आंबेवाडीत राहतात. पती सैन्यात असल्याने काही दिवस आईकडे राहण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यांचे वडील खुदाई काम करतात. घरातील सर्व साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. मुलाला घेऊन त्यांनी कसाबसा जीव वाचवला. भर पावसात मुलाला घेऊन पूर पार करण्याचा अनुभव भयानक असल्याचे त्या सांगतात. त्यांना मंगळवारी एनडीआरएफ जवानांनी सुखरूप बाहेर आणले. मदरशामध्ये सर्व जाती-धर्माच्या महिलांसाठी जेवण, औषधे, कपड्यांची सोय करण्यात आली होती. त्याठिकाणी रडरट्टी कुटुंबीयांना हलवण्यात आले.

शांता रडरट्टी सांगतात, 'पाणी वाढल्यानंतर आपण वाचू की नाही याबद्दल खात्री नव्हती. सात महिन्यांच्या बाळाला उराशी घेऊन मी घराबाहेर पडले. सगळेजण मदतीसाठी धावा करत होते. काही काळ एका घराच्या चौथ्या मजल्यावर रात्रभर अन्नाविना बसून काढला. पाणी वाढत असताना समोर मृत्यू दिसत होता. मात्र, वेळेत मदत मिळाल्याने जीव वाचला. मदरशांमध्ये मुस्लिम बांधवांनी खूप चांगली सोय केली. याठिकाणी अल्ला आणि देव एकच असल्याची प्रचिती आली. माझे पती सैन्यात असतात त्यांनी कोल्हापूरवासियांचे आभार मानले आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन प्रभागांसाठीएक टँकर देणार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'शहरवासियांना पिण्याचे पाणी पुरेसे देण्यासाठी सध्या दोन प्रभागांत एक टँकर देण्यात येणार आहे. तीन दिवसानंतर प्रत्येक प्रभागासाठी एक टँकर देण्यात येणार असून त्यासाठी सांगली, सोलापूर व पुणे येथून टँकर आणले जाणार आहेत. बालिंगा उपसा केंद्रातून पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर परिस्थिती थोडी नियंत्रणात येईल' अशी माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि आमदार सतेज पाटील यांनी दिली.

महापूरानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आयुक्त डॉ. कलशेट्टी व आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. बैठकीनंतर आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'सद्यस्थितीत महापालिकेकडून ८८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र मागणी प्रचंड असल्याने तुटवडा जाणवत आहे. टँकर वाटपातील विस्कळितपणा टाळण्यासाठी दोन प्रभागांसाठी एक टँकर देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक प्रभागात एक टँकर देण्यासाठी सांगलीतून पाच, सोलापूर आणि पुणे येथून प्रत्येकी दहा टँकर येणार आहेत. दोन दिवसांत बालिंगा पंपिंग स्टेशन सुरू झाल्यानंतर ए, सी व डी वॉर्डातील पाणीपुरवठा सुरू होईल. त्यामुळे या प्रभागांतील सर्व टँकरचा वापर 'ई' वॉर्डासाठी करता येणार आहे. शिंगणापूर व नागदेववाडी पंपिंग स्टेशन सुरू होणास पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असल्याने टँकरची संख्या १६० पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे.'

डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'महापुरामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा आणि गाळ साचला आहे. प्रशासनाच्यावतीने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी रुकारी ट्रान्सपोर्टने १५ व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपने दोन जेसीबी दिले आहेत. क्रशर असोसिएशनने १३, अर्थमुव्हिंग असोसिएशनने चार तर व्ही. बी. पाटील यांनी एक डंपर दिला आहे. बीव्हीजी ग्रुपचे कर्मचारीही दाखल झाले आहेत. सद्यस्थितीत औषध फवारणीसाठी ५० पंप असून आणखी शंभर पंप खरेदी करण्यात येणार आहेत.'

यावेळी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपमहापौर भूपाल शेटे, दुर्वास कदम यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

महापुराची ३१ प्रभागांना झळ

आमदार सतेज पाटील म्हणाले, 'महापुरामुळे शहरातील ३१ प्रभाग बाधित झाले आहेत. पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांचे पंचनामे करण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांसोबत घरफाळा विभागाचा एक कर्मचारी असणार आहे. पुराचे पाणी ओसरल्यामुळे आता लगेच औषध फवारणी करण्यासाठी सांगोला येथून पाच छोटे ट्रॅक्टर आणले आहेत. याशिवाय रात्री उशीरापर्यंत आणखी दहा ट्रॅक्टर येणार आहेत. शहरात रोगराई पसरू नये याची खबरदारी घेण्यात येत आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांसाच्या औषधोपचारासाठी शिबिरे

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापुराच्या आपत्तीवर मात करण्यासाठी प्रत्येकजण झटत आहे. कुणी त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न आहेत. कुणी त्यांच्या निवासाची सोय केली. काहींनी अन्नधान्य पुरवठ्यासाठी सरसावले. 'कोल्हापूर वुई केअर'ने स्थलांतरित ठिकाणी पूरग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीवर भर दिला. पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिर, तपासणी, रुग्णावर औषधोपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत सोळा गावातील ५००० हून अधिक पूरग्रस्तांची तपासणी व औषधोपचाराची सुविधा केली आहे.

लोणार वसाहत, आंबेवाडी, मुक्त सैनिक वसाहतीसह पट्टणकोडोली, अब्दुललाट, हुपरी, नागदेववाडी, टाकळीवाडी अशा विविध गावातील नागरिकांना औषधोपचाराचा लाभ मिळाला आहे. कोल्हापूर वुई केअरने सुरू केलेल्या या वैद्यकीय उपक्रमाला समाजातील वेगवेगळ्या घटकांचा प्रतिसाद मिळत आहे. पूरस्थितीच्या सुरुवातीच्या कालावधीत 'कोल्हापूर वुई केअर'ने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. मात्र स्थलांतरित ठिकाणी औषधोपचाराची गरज असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आरोग्य शिबिराचे नियोजन केले.

समाजातील डॉक्टर, इंजिनीअर, व्यावसायिक, नोकरदारांनी एकत्र येऊन 'कोल्हापूर वुई केअर'ची स्थापना केली आहे. ग्रुपच्या सदस्यांना, पूरग्रस्त भागात आवश्यक औषधे जमा करण्याविषयी आवाहन केले. डॉ. हर्षवर्धन जगताप यांच्या नेतृत्वाखाली पंधरा डॉक्टरांचे पथक तयार केले. मुंबई, पुणे येथून साडेतीन लाख रुपयांची औषधे मिळाली. डॉ. रेश्मा पवार यांनी एक रुग्णवाहिका व औषधे दिली. डॉ. गीता पिल्लई यांनी एक रुग्णवाहिका व चार डॉक्टरांचे पथक मदतकार्यासाठी दिले. 'झेवियर्स १९९१' बॅचने सहकार्य केले. शिवाजी पार्कातील डॉ. अर्जुन आडनाईक यांच्या स्वस्तिक हॉस्पिटल येथे समन्वय व मदत कक्ष सुरू आहे.

यूथ अॅनेक्सचा सहभाग लक्षणीय

कोल्हापूर वुई केअरने शहर आणि परिसरातील चौदा कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थिनींची 'यूथ अॅनेक्स'ची स्थापना केली आहे. एका कॉलेजमधील ३० मुलांचा समावेश आहे. 'यूथ अॅनेक्स'मधील सहभागी युवक, युवती मदतकार्यात सहभागी आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पहिल्यांदा ब्लँकेटस, अन्नाची पाकिटे वितरीत केली. पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत, आरोग्य तपासणी आणि आवश्यक औषधोपचारावर भर आहे. डॉक्टरांच्या पथकाच्या माध्यमातून काम सुरू आहे.

- मिलिंद धोंड, कोल्हापूर वुई केअर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूर्गंधी अन् चिखलाचा थर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हाधिकारी कार्यालयात पुराचे घुसलेले पाणी ओसरल्यानंतर मंगळवारी अंतर्गंत स्वच्छता करण्यात आली. मात्र, तेथे प्रचंड दुर्गंधी, विस्कटलेले कागद, वीज नसल्याने अंधार, चिखलाच थर, अस्ताव्यस्त खुर्च्या असे चित्र होते. दुपारी संजय घोडावत विद्यापीठाच्या टँकरमधील पाण्यात कार्यालय धुण्यात आले. त्यामुळे आजही महसूल विभागाचे कामकाज विस्कळीतच राहिले. कामकाज सुरळीत होण्यास पुढील आठवडा लागण्याची शक्यता आहे.

पंचगंगा नदीला महापूर आल्यानंतर, ६ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पाणी घुसले. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष, महसूल, करमणूक, गृह, प्रोटोकॉल हे विभाग पूर्णपणे पाण्यात बुडाले. ११ ऑगस्ट रोजी पाणी कमी झाले. त्यानंतर आता स्वच्छता केली जात आहे. खासगी आणि महानगरपालिकेचे कर्मचारी सकाळपासूनच स्वच्छतेचे काम करताना दिसत होते. चिखलाचा थर झाडू, खराट्याने ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हे शक्य न झाल्याने घोडावत विद्यापीठाकडून टँकर आणून कार्यालय पाण्याने धुण्यात आले. बुडालेले झेरॉक्स मशीन बंद पडले आहे. कार्यालयातील वायरिंग खराब झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संगणक जोडून काम करता आलेले नाही. दुपारपर्यंत बंद जनरेटर दुरूस्त करण्यात आल्याने काही विभागात वीज सुरू झाला. महावितरणचे कर्मचारी वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी धडपडताना दिसले. स्पंजच्या खुर्च्यांतून दूर्गंधी सुटली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी कक्षातील किंमती खुर्च्या, फर्निचरही खराब झाले. अशा खुर्च्या वाळवण्यासाठी बाहेर आणून ठेवण्यात आल्या होत्या.

महत्वाची कागदपत्रे सुरक्षित

महापूर आल्यानंतर पाणी वाढत असल्याचे निदर्शनास येताच कर्मचाऱ्यांनी तातडीने महत्वाची कागदपत्रे, संगणक दुसऱ्या मजल्यावर हलविले. यामुळे बहुतांश कागदपत्रे सुस्थितीत आहेत. मात्र, कमी महत्वाच्या आणि घाईमध्ये न सापडलेल्या अनेक फायली पाण्यात बुडाल्या. या फायलींशी संबंधीत काम असलेल्या लोकांच्या कामांना विलंब होणार आहे.

तळमजल्याला तळ्याचेच स्वरूप

नविन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमधील तळमजला पार्किंगसाठी राखीव आहे. तेथे अजून पाणी तुंबून राहिल्याने तळे निर्माण झाले आहे. पार्किंग केलेली काही वाहने अजूनही पाण्यात आहेत. विद्युत पंपाच्या सहाय्याने तेथील पाणी बाहेर काढावे लागणार आहे. त्यासाठीचे प्रयत्न सुरू होते.

दुसऱ्या मजल्यावर कामकाज, पण

जुन्या आणि नविन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कार्यालय सुरक्षित आहेत. तेथील कामकाज सुरळीत आहे. पुरवठा, निवडणूक, अतिरिक्त जिल्हाधिकारी, आयटी, रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज पूर्ववत झाले. मात्र या विभागांतील खातेप्रमुख जिल्हा परिषदेत पूरस्थितीमधील लोकांना मदतीचे काम करण्यात व्यस्त आहेत. यामुळे अनेक कर्मचारी केवळ हजेरी लावण्यासाठीच उपस्थित राहिल्याचे दिसत होते.

जिल्हा परिषदेतून कामकाज

पुरावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात एक फूट पाणी होते. येथे पाणी न वाढल्याने कक्षातील फर्निचर, एसी, फॅन सुरक्षित आहे. शिपायांनी सकाळी कक्षाची स्वच्छता केली. वीज पुरवठा सुरू झाल्यास जिल्हाधिकारी कक्षात बसून कामकाज करू शकतात. मात्र विविध विषयांच्या बैठका घेण्यासाठीच्या शाहूजी आणि ताराराणी हॉलमध्ये पाणी घुसल्याने फर्निचर, इलेक्ट्रिक यंत्रणेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे कामकाज जिल्हा परिषदेतूनच चालणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेडीमिक्सद्वारे रस्त्यांची डागडूजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुराचा फटका सर्वच घटकांना बसला आहे. महापालिका हद्दीतील रस्त्यांची तर अक्षरश: चाळण झाली आहे. शहरातील सुमारे ६५ किमी रस्त्यांवरुन वाहन चालवणे मुश्किल बनले आहे. त्यामुळे अशा रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याची आवश्यकता आहे. पारंपरिक पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती केल्यास त्याला बराच अवधी लागणार असल्याने रस्त्यांची दुरुस्ती रेडीमिक्स पद्धतीने करण्यात येणार आहे. दुरुस्ती कामासाठी लागणारा निधी प्रत्येक नगरसेवकांच्या स्वनिधीतून उभा करण्यात येणार असून त्याला नगरसेवकांनी संमती दिली आहे. मंगळवारी याबाबतचा निर्णय महापालिकेच्या आढावा बैठकीत घेतला.

जून महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यांच्या झालेल्या अवस्थेमुळे महापालिकेच्या कारभारांविरोधात वाहनधारक मोठ्याप्रमाणात नाराजी व्यक्त करत होते. प्रशासनाने याची दखल घेत दोन महिन्यात अनेकवेळा मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला. मुरुम टाकल्यानंतर तीन ते चार दिवस वाहनधारकांना खड्ड्यापासून मूक्ती मिळाली. पण पुन्हा खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागला. २९ जुलैपासून सुरू झालेल्या पावसामुळे तर सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. अशा खड्ड्यातून वाहन चालवणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच झाले आहे. शहरातील अशा ६५ किमी लांबीच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. हे सर्व खड्डे पारंपरिक पद्धतीने न बुजवता रेडीमिक्स पद्धतीने बुजवण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील सर्वच रस्ते नवीन बांधायचे धोरण ठरवल्यास निधीचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केंव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच गणेशोत्सवापूर्वी रस्ते तयार करण्यासाठी नगरसेवकांचा स्वनिधी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. प्रत्येक नगरसेवकांना अडीच लाखाचा स्वनिधी दिला जातो. यापैकी सर्व नगरसेवकांनी प्रत्येकी ५० हजार रुपये निधी देण्यास संमती दिली आहे. तर पदाधिकारी ५० हजारांपेक्षा जास्त निधी देण्यात येणार आहे. रेडीमिक्स पद्धतीने रस्त्यांची डागडुजी करताना एक दिवस संपूर्ण मार्ग बंद करावा लागणार आहे. मार्ग बंद केल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने बुहतांशी काम रात्री किंवा कमी रहदारीच्या ठिकाणी दिवसा काम करण्याचे नियोजन सुरू आहे. महापालिकेच्या नियोजनप्रमाणे रस्त्यांची डागडुजी झाल्यास गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमूर्क होऊन वाहनधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

...

कोट

'महापुराने अनेक रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यांची दुरुस्ती पारंपरिक पद्धतीने केल्यास बऱ्याच दिवसांचा अवधी लागेल. त्यासाठी सर्व रस्ते रेडीमिक्स पद्धतीने करण्याची सूचना केली आहे. त्याला आयुक्त व शहर अभियंत्यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्रशासन नियोजन करत आहे.

सतेज पाटील, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोन्याचा संसार पाण्यात बुडाला

$
0
0

केव्हीज पार्क

Balasaheb.Patil@timesgroup.com

Tweet@balpatilMT

कोल्हापूर : २००५ ला आलेल्या महापुराचे पाणी अगदी उंबऱ्यापर्यंत आले, त्यामुळे पाणी वाढले तर जास्तीत जास्त फूट-दीड फूट वाढेल, असा सर्वांचाच अंदाज. आठ दिवसांपूर्वी सोमवोरी रात्री सर्वजण झोपल्यानंतर दोन अडीचच्या दरम्यान पाणी घरात शिरले आणि संसार बुडू लागला. तरीही भयानक परिस्थितीची जाणीव होत नव्हती. सकाळी बघता बघता पाणी सहा फुटावर गेले आणि सर्वांचाच धीर सुटला. शहरातील मध्यवर्ती असलेल्या केव्हीज पार्कमध्ये अनेकांचे संसार बघता बघता पाण्यात गेले आणि अनेकांचे अश्रू कोसळत्या पावसात थिजून गेले. मंगळवारी पाणी ओसरल्यानंतर प्रत्येकाच्या घरासमोर गाद्या, अंथरुण, सोफ्यावरच्या गाद्या, कोंब आलेले गहू, कुजलेले तांदूळ आणि बरंच काही डोळ्यात अश्रू आणत होतं.

सोमवारी (ता. ५) रात्री महापुराचे पाणी कॉलनीत घुसले. तत्पुर्वी महावीर गार्डन, जिल्हाधिकारी कार्यालय, महावीर कॉलेजकडील परिसरात पाणी साचू लागले होते. हळू हळू वाढणारे पाणी केव्हीज पार्क तरुण मंडळापर्यंत आले. कितीही महापूर आला तरी पाणी वर चढणार नाही हा सगळ्यांना आत्मविश्वास. मात्र, महापुराचे पाणी वेगाने वाढत गेले. सकाळी आठपर्यंत हा वेग कमी होता. त्यानंतर प्रचंड वेगाने पाणी वाढू लागले. मुसळधार पाऊस सुरू झाला. लहान मुले, वृद्ध, आजारी महिला, गरोदर स्त्रिया भेदरून गेल्या. आपत्ती व्यवस्थापन पुर्णपणे कोलमडले होते. अनेकांची वाहने पाण्याखाली जात होती. ज्यांना शक्य आहे ते बाहेर पडले. कोसळत्या पावसात रिक्षाचा टफ आणि टायर ट्यूबच्या सहाय्याने अनेकांना बाहेर काढले. अनेकांनी आपले फ्रीज, एलईडी, इलेक्ट्रॉनिक साहित्य बाहेर काढून दुसऱ्या मजल्यावर चढवले. घरातील अंथरून, पांघरून, संसारपयोगी साहित्य, भांडी तसेच सोडून बाहेर पडताना अनेकांच्या डोळ्याला धारा लागल्या. आठ दिवसांनंतर पाणी ओसरल्यावर अनेकजण घरी पतरतले आणि महापुराच्या तडाख्यात सापडलेला संसार पाहून त्यांना हुंदका फुटला. मात्र, कोलमडलेला संसार उभा करावाच लागेल या अपरिहार्यतेमुळे अनेकजण कामाला लागले. घरातील साहित्य गल्लीत आणून ठेवले. गाद्या, सोफ्याच्या गाद्या,कपडे आणि अन्य खराब झालेल्या साहित्याचे ढीग लागले. भांडी आणि अन्य साहित्य एकत्र करून घरातील घाण बाहेर काढण्यास सुरुवात केली. चार ते पाच इंच गाळ साचल्याने तो भरून काढण्याची कसरत सुरू होती. अनेकांचे सोफे, दिवाण, फर्निचर कुजून खराब झाले आहे. अनेकांना सुईपासून संसार उभा करण्याचे आव्हान या महापुराने समोर उभे केले आहे.

डॉ. गावडेंचे ग्रंथालय बुडाले

महावीर कॉलेज येथील बीएबीएड विभागात कार्यरत असलेले लेखक डॉ. गोपाळ गावडे यांचे पाच ते साडेपाच हजार पुस्तकसंग्रह असलेले ग्रंथालय पाण्यात गेले. डॉ. गावडे यांच्याकडे अनेक दूर्मिळ पुस्तकांचा संग्रह होता. पंचगंगा तालमीजवळील त्यांच्या घरात सोमवारी पाणी घुसले. त्यानंतर त्यांनी कपाटातील पुस्तके लॉप्ट आणि अन्य सुरक्षित ठिकाणी ठेवली. मात्र, पाण्याचा फुगवटा वाढत गेला आणि संपूर्ण घरात पाणी गेले. त्यामुळे त्यांच्याकडील दूर्मिळ ग्रंथसंपदा खराब झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्कालीन व्यवस्थेसाठी तीन अधिकारी रुजू

$
0
0

कोल्हापूर

शहरात उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारने दोन उपायुक्त व एक सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची कोल्हापूर महापालिकेकडे नियुक्ती केली आहे. सोमवारी (ता. १२) सरकारचे सहसचिव एस. एस. गोखले यांनी आदेश काढले. त्यानुसार पुणे महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे, संतोष भोर तर पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. महापुरामुळे शहरात आरोग्य, पाणी, वीज, रस्ते अशा सर्वच आपत्कालीन स्थितीचा बोजवारा उडाला आहे. नागरिकांना महापुराच्या विळख्यातून बाहेर काढण्याबरोबर त्यांना सर्व सुविधा देण्यासाठी अतिरिक्त अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. राज्याचे सहसचिव गोखले यांनी त्यांच्या तात्पुरत्या नियुक्तीचे आदेश काढले. त्यानुसार पुणे महापालिकेचे उपायुक्त मुठे व भोर यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त अष्टीकर यांनी पदभार स्वीकारला. महापालिकेच्या नियमित सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना दमदाटी करुन पिण्याच्या पाण्याचे टँकर पळवले जात आहेत. त्याला चाफ लावल्यासाठी तीनपैकी एका अधिकाऱ्यांकडे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुडघाभर पाणी, फूटभर चिखल

$
0
0

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सुतारवाड्याला पुराचा अनुभव नवा नाही. पावसाळ्यात हमखास जयंती नाला ओव्हरफ्लो होऊन पाणी सुतारवाड्यात पसरते. यंदा मात्र पावसाने आणि पुराने अक्षरश: थैमान घातले. गेल्या आठवड्यात पाणीपातळीत वाढ होऊ लागली. म्हणून रात्रीच अंगावरील कपड्यासह चित्रदुर्ग मठात आसरा घेतला. सकाळी उठून पाहतो तर कपडे, भांडीकुंडी, सिलिंडर टाक्या असे संसारोपयोगी साहित्य पुराच्या पाण्यासोबत वाहत होते. 'डोळ्यादेखत जणू संसारच विस्कटत होता. आठ दिवस झाले, घराची आस लागली आहे, आता पुन्हा नव्याने संसार उभारायचा आहे', डबडबलेल्या डोळ्यांनी सुतारवाड्यातील नागरिकांनी भावना व्यक्त केल्या.

महापुराचे पाणी ओसरत आहे. मात्र सुतारवाड्यातील काही भागात अजूनही गुडघ्याइतके पाणी आहे, फूटभर चिखल आहे. चित्रदुर्ग मठालगतच्या बारा घरांतील पाण्याचा निचरा झाला. त्या घरात साफसफाई सुरू आहे. सगळ्या प्रापंचिक वस्तू पाण्यात बुडाल्या आहेत. टीव्ही, फ्रीज खराब झाले आहेत. जयंती नाल्याच्या काठावर चित्रदुर्ग मठालगत सुतारवाड्यातील १०० हून अधिक कुटुंबांची चित्रदुर्ग मठ, मुस्लिम बोर्डिंगच्या हॉलमध्ये निवासाची सोय केली आहे. स्थलांतरित ठिकाणी आसरा मिळाला, तरी घर संसारोपयोगी साहित्य डोळ्यादेखत वाहून गेल्यामुळे मनाची घालमेल होत आहे. या पूरग्रस्तांच्या नजरा पुराच्या पाण्यात घर शोधत आहेत.

सुतार, शिंदे, पडवळे, वडणकर, साळोखे, पोवार कुटुंबीयांचा समावेश आहे. खासगी नोकरी, कारखान्यात काम करुन, रिक्षा चालवून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवितात. तरुण मुलांपैकी कोण गॅरेजमध्ये कामाला आहे. कोण मेस्त्रीकाम करतो. काहीजण खासगी नोकरीला आहेत, तर काहीजण लहानसहान व्यवसाय करुन कुटुंबांचा गाडा ओढतात. मुळात सुतारवाड्यातील घरे दाटीवाटीने वसलेली. आठ ते फुटापर्यंत भिंतीवर पत्र्याचा शेड मारुन घराची निर्मिती केलेली आहे. यंदाच्या महापुरात प्रत्येकाच्या घरात पाणी. सगळे प्रापंचिक साहित्य पुराच्या पाण्यात बुडाले आहे. भिंती ढासळल्या आहेत. काही ठिकाणी तडे गेले आहेत. गेल्या आठवड्यापासून स्थलांतरित ठिकाणी साऱ्यांचे वास्तव्य आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था त्यांच्या मदतीसाठी धावल्या आहेत. चहा, नाष्टा, भोजनाची सोय केली आहे. सुतारवाड्यातील वडणकर कुटुंबीयांतील ३५ लोक चित्रदुर्ग मठात आहेत. वडणकर कुटुंबीयांत चार भाऊ. चौघांच्या घराला पुराचा विळखा बसला आहे. चित्रदुर्ग मठ येथे दोन गर्भवतीही आसऱ्याला आहेत.

सुतारवाड्यातील बहुतांश नागरिकांच्या व्यथा एकसारख्या. रिक्षा ड्रायव्हर दत्ता वडणकर म्हणाले, 'अंगावरील कपड्यानिशी अख्खं कुटुंब घराबाहेर पडले. पुराने सगळे संसारोपयोगी साहित्य गिळकृंत केले.' सुतारवाडा येथील पवनकुमार हा तरुण उद्यमनगरमध्ये खासगी नोकरी करतो. तो म्हणाला, 'दोन दिवसांपूर्वी रात्रीच मठात आसरा घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहतो तर पुराच्या पाण्यात सुतारवाड्यातील वस्तू वाहून जात होत्या. अख्खा सुतारवाडाच पुराच्या पाण्याखाली आहे. कागदपत्रे, कपडे वाहून गेले आहेत.सगळयाच गोष्टींची नव्याने जुळवाजुळव करायची आहे.' लॉन्ड्री व्यावसायिक राजू पोवार यांच्या घरातील सगळ्या साहित्याची नासधूस झाली आहे. सतीश शिंदे हे सुतारकाम करतात. दोन आठवड्यानंतर त्यांच्या घरातील पाणी ओसरले नाही. त्यांच्यासह अनेकांच्या नजरा घराकडे लागल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापुराने पुसली शाळांची पाटी

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : महापूर आणि अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांवरही आपत्ती कोसळली आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या तब्बल २२९ शाळांची पडझड झाली आहे तर ८११ वर्ग खोल्या नादुरुस्त बनल्याचे प्राथमिक अंदाज आहे. तात्पुरत्या स्वरुपातील दुरुस्तीसाठी नऊ कोटी ९६ लाख रुपयांची गरज भासणार आहे. अनेक खोल्या पूर्णपणे खराब झाल्या असून नव्याने बांधणी करावी लागणार आहे. त्यासाठी पाच कोटी, ७६ लाख, ५० हजार रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. मोडकळीस आलेल्या शाळा व वर्गखोल्यांची दुरुस्ती करताना अन्य आवश्यक साहित्याची जुळवाजुळव करताना शाळा व्यवस्थापनाला कसरत करावी लागणार आहे.

करवीर, शिरोळ तालुक्यातील अनेक शाळा आजही पाण्याखाली आहेत. यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आणखी काही दिवस अंधातरी राहणार आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव सोळा ऑगस्टअखेर शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक टप्प्यात जिल्ह्यातील पूरबाधित शाळांचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविला आहे. पूर ओसरल्यानंतर येत्या काही दिवसामध्ये पूरबाधित शाळांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे. गेल्या आठवडाभरातील पावसामुळे शाळांची अवस्था बिकट झाली आहे. ठिकठिकाणच्या वर्ग खोल्यांच्या भिंती ढासळल्या आहेत. काही ठिकाणी छताला तडे गेले आहेत. भिंती ओलसर होऊन खोल्यामध्ये पाणी पसरले आहे. शाळेतील दफ्तर, कम्प्युटर संच, प्रोजेक्टरही पाण्याखाली आहेत.

\Bसाडेतीन कोटींहून अधिक गरज\B

महापुराचा सर्वाधिक तडाखा हातकणंगले, शिरोळ आणि करवीर तालुक्यातील शाळांना बसला आहे. करवीर तालुक्यातील शाळांच्या डागडुजी व नवीन बांधकामासाठी साडेचार कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. त्यापाठोपाठ शिरोळ तालुक्यातील वर्ग खोल्यांच्या दुरुस्ती व नवीन बांधकामासाठी साडे तीन कोटीहून अधिक रक्कम लागणार आहे. हातकणंगले तालुक्यातील शाळा व वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी ३९लाख रुपये तर नवीन वर्ग खोल्यासाठी एक कोटी ३९ लाख ५० हजार रुपयांचा गरज भासणार आहे.

\Bमहापालिकेच्या सहा शाळांना झळ

\Bकोल्हापूर महापालिकेच्या मालकीच्या सहा शाळा आणि २९ वर्ग खोल्यांना महापुराची झळ बसली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी ३६ लाख रुपयांची आवश्यकता आहे.

तालुकानिहाय चित्र पुढीलप्रमाणे

तालुका शाळा वर्ग खोल्या

कागल ११ ३८

भुदरगड ६ ११

करवीर ३० १६३

हातकणंगले ३१ १३४

शाहूवाडी १० १९

पन्हाळा १४ ६२

गडहिंग्लज २ २

आजरा २ ३

राधानगरी १२ १७

चंदगड १३ २२

गगनबावडा १० ५५

शिरोळ ८२ २५६

\Bशाळांना गरज

\B९ कोटी ९६ लाख रुपये

दुरुस्तीसाठी अनुदान

५ कोटी ७६ लाख ५० हजार रुपये

नवीन खोल्यासाठी

पुरामुळे ज्या गावातील शाळांचे नुकसान झाले आहे, त्याचा तालुकानिहाय अहवाल मागविला आहे. शाळा, वर्गखोल्याबाबत अपडेटस देण्याच्या सूचना आहेत. संपूर्ण माहिती उपलब्ध झाल्यानंतर सरकारकडे अहवाल सादर केला जाईल.

दौलत देसाई, जिल्हाधिकारी

महापुरामुळे गेले अनेक दिवस पूरबाधित गावातील शाळा पाण्याखाली आहेत. प्रशासनाने, त्या इमारतींचे पहिल्यांदा स्ट्रक्चरल ऑडिट करावे. वर्ग भरविण्यासाठी त्या सुरक्षित आहेत का हे तपासावे. पूरबाधित शाळांच्या डागडुजी व नवीन बांधकामासाठी सरकारने तत्काळ निधी उपलब्ध करावा.

प्रसाद खोबरे, सदस्य जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर बुडले...संसार वाहून गेले

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Sachin.patil1@timesgroup.com

कोल्हापूर : शनिवारी, ३ ऑगस्टची रात्र पाऊसकाळ बनून आली आणि कुणाच्या घरात नदीचे लोट तर कुणाच्या घरात नाल्याचा लोंढा घुसला. पाणी इतक्या वेगाने घरात शिरायला सुरूवात झाली की अंगावरच्या कपड्यानिशी बुडत्या घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हाताऱ्याकोताऱ्यांना हात देत आणि चिमुकल्यांना छातीशी कवटाळून लाखो पूरग्रस्त स्थलांतरीत झाले.

जिल्ह्यातील आंबेवाडी, चिखली, केर्ली, दोनवडे येथील लोकांनी वाहून जाणाऱ्या जनावरांचे हंबरडे कानात साठवत घर सोडले. गेले सात दिवस बैठे घर संपूर्ण तर दोन मजली घराचा पहिला मजला पाण्यात आहे. शहरातील उच्चभ्रू भागातील अपार्टमेंटचे पार्किंगसह दोन मजले बुडाले आहेत. प्रापंचिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागदागिने, गाठीशी ठेवलेला पैसा, महत्त्वाची कागदपत्रे, हप्त्यावर घेतलेले सांसारिक साहित्य सारं काही पुरात वाहत्या पाण्याला लागलं आहे तर अनेक साहित्य पाण्यात राहिल्याने निकामी झाले आहे.

शहरातील २५ स्थलांतरीत कँपमध्ये पूरग्रस्त सुरक्षित असले तरी प्रत्येकाचे डोळे आता जमीनदोस्त झालेल्या संसाराकडे लागले आहेत. पूर ओसरल्यावर जेव्हा घराकडे पाय वळतील तेव्हा चिखलाने माखलेले, दुर्गंधीने भरलेले घर उभे कसे करायचे या काळजीचे ढग आता पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर दाटून आले आहेत. पुराचा तडाखा बसलेले बहुतांशीजण हातावरचं पोट असलेले आहेत. मोलमजुरीकरून घरात काही वस्तू हौसेने घेतल्या होत्या त्या सगळ्या वस्तू वाहून गेल्या. मातीच्या भिंतीही कधी कोसळतील सांगता येत नाही अशी अवस्था आहे. आधीच कर्जाचे हप्ते फिटलेले नाही तोपर्यंत नियतीने नवा डोंगर उभा केला आहे. महिनाभरापूर्वीच घेतलेली मुलांची वह्यापुस्तके, दप्तरेही पुराने मिठीत घेतली आहेत. त्यामुळे आता शून्यातून पुन्हा गेलेलं छोटस जग उभं करण्याचं आव्हान या पूरग्रस्तांसमोर आहे. अनेकांची घरच नव्हे तर उदरनिर्वाहाची साधनेही गेली आहेत. माणुसकीतून मदतीचे हात पुढे येत आहेत. स्थलांतरीत कँपमधून घरी जाताना एका महिन्याचे रेशन, साहित्य मदत म्हणून मिळेल. त्यानंतर जगण्यासाठी लागणारी प्रत्येक गरज भागवण्याची लढाई पूरग्रस्तांना लढायची आहे.

संसाराची खूणच शिल्लक नाही

पोटाची खळगी भरण्यासाठी कर्नाटकातून काही वर्षापूर्वी कोल्हापुरात आलेले राजू व आशा चोळकोप हे कुटुंब. नवरा बायको आणि पाच वर्षांच्या आतील दोन मुलं. लक्ष्मीपुरीतील एका व्यावसायिक इमारतीच्या देखभालीसाठी मिळणाऱ्या कमाईतून संसार चालवत जगत होते. जयंती नाल्याचे पाणी बघता बघता लक्ष्मीपुरीत घुसले तेव्हा त्यांचे पूर्ण घर पाण्याने भरले. कार्यकर्त्यांनी आहे त्या अवस्थेत हाताला धरून मुस्लिम बोर्डिंगमध्ये आणले. बांधकामावरील रखवालदार म्हणून राजूने अनेकांची घरे उभारताना पाहिली. महापुरात मात्र तो आपलं छोटसं घर वाचवू शकला नाही. पूर ओसरल्यानंतर सोमवारी सकाळी राजूचे पाय घराच्या दिशेने वळले. इथे त्याचा आणि आशाचा संसार होता याची एकही खूण शिल्लक नाही. पाच आणि तीन वर्षाची दोन मुलं घेऊन आता कुठे जायचे? हा प्रश्न त्याच्यासमोर आवासून उभा आहे. पाणी मागे सरलं. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्ते स्वच्छ केले. आता स्थलांतरीत कॅम्पमधील मदतीचा ओघ संपल्यानंतर राजू आणि आशा यांच्या चौकोनी कुटुंबाचे भविष्य काय याचे उत्तर सध्या तरी नाही.

घराचा सांगाडा बघवेना

महापालिकेत झाडू कामगार म्हणून नोकरी पूर्ण झाल्यावर धनुबाई घरनिया यांनी आपल्या जागी मुलाला नोकरी लावली. सून, नातवंडांच्या गोकुळात धनुबाईचं निवृत्त जीवन आनंदात सुरू होतं. शाहूपुरी गवत मंडईतील कुंभार गल्लीत साधं बैठं घर. जास्तीचा पाऊस झाला की दरवर्षी पाणी उंबऱ्यापर्यंत येणं हे काही धनुबाईना नवं नाही. पण यंदा मात्र पुराने थेट स्वयंपाकघरच गाठलं. डोळ्यादेखत पुराच्या पाण्यात प्रापंचिक साहित्य वाहून गेलं. एकही सामान पुन्हा वापरता येईल असं उरलेलं नाही. धनुबाईच्या पतीने हे नुकसान पाहून गेल्या आठ दिवसांपासून अंथरूण धरलं आहे. मुलगा रोज घराजवळ जिथेपर्यंत पाणी थांबले आहे, तिथंपर्यंत जातो आणि बुडलेलं घर पाहून येतो. काय परिस्थिती आहे असं विचारलं की आईला उत्तर देणं टाळतो. हौसमौजेला फाटा देऊन खरेदी केलेल्या वस्तूंचे हप्ते फिटल्याचा आनंद घेण्यापूर्वी ती वस्तूच पुरात वाहून गेली आहे. कष्टाने उभ्या केलेल्या घराचा सांगाडा बघवेना झालाय.

उघड्यावर पडला संसार

सुतारवाड्यात राहणाऱ्या रेखा कुट्टे यांनी पै-पै साठवून घर बांधले. घर साधच असलं तरी स्वकमाईतून उभारलेल्या घराचा आनंद वेगळाच. दरवर्षी सुतारवाड्यात पाणी येतं. चित्रदुर्ग मठात स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांमध्ये रेखाही असतात. पण पाऊस कमी झाल्यानंतर जेव्हा सुतारवाड्यात त्या जातात तेव्हा घर सुरक्षित असायचं. घरातील प्रापंचिक वस्तू जागच्याजागी असायच्या. यंदा मात्र सारं काही उघड्यावर पडलं असल्याचीच शक्यता जास्त. स्थलांतरीत छावणीत बसून असलेल्या रेखा यांच्या चेहऱ्यावर घराची काळजी स्पष्ट दिसतेय. रेखा यांच्यासह चार जण कुटुंबात आहेत. मोलमजुरीवरच त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ. यावर्षी पुराचे पाणी फोर्ड कॉर्नर ओलांडून पुढे गेलं. शाहूपुरीच्या सहाही गल्ल्या पाण्याखाली होत्या. त्यामुळे सुतारवाड्यातील माझं घर कसं असेल, असे त्या मदतीसाठी छावणीत येणाऱ्या प्रत्येकाला डोळ्यात पाणी आणून विचारतात. मुस्लिम बोर्डिंगमधील छावणीत फक्त त्या शरीराने आहेत, त्याचं मन मात्र उघड्यावर पडलेल्या घराभोवती पिंगा घालत आहे.

कुटुंब पडलंय चिंतेत

अमर दुर्गे यांच्या कुटुंबात ३ वर्षांच्या मुलीपासून सत्तरी ओलांडलेल्या आजीपर्यंत १० जण. चहा विक्रीवर अशोक हे कुटुंबाची गुजराण करतात. हसत्याखेळत्या घराची एका पावसाळी रात्रीने वाट लावली. कुटुंबासह अशोक सध्या स्थलांतरीत छावणीत आहेत. पत्नी, बहीण, आई, मुलं, आजी यांच्यासोबत एका रात्रीत घर सोडून छावणीत आले. शाहूपुरीतील एकही गल्ली पाण्यापासून वाचली नसल्याने वडणकर यांचे कुटुंबही चिंतेत पडले आहे. महिन्याच्या कमाईतून कसाबसा घरखर्च भागवणे अवघड होते. तेथे आता नव्याने घर बांधण्याचा विचारही सध्या ते करू शकत नाहीत. इतके दिवस पाणी साठून राहिल्याने संसारिक साहित्याचे नुकसान झाले असणार या विचारानेच ते अस्वस्थ आहेत. ज्या चहागाडीवर आर्थिक कमाई होते, ती गाडीही पुरात वाहून गेल्यामुळे दुर्गे यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किटवडेत पावसाने केली दैना

$
0
0

रमेश चव्हाण, आजरा

किटवडे (ता. आजरा) मध्ये सततच्या ३०० ते ३५० मिमी पावसाने अक्षरशः दाणादाण उडाली आहे. इथे चांगली उगवण झालेले भात, ऊस अक्षरश: कुजला आहे. सततच्या पावसामुळे ग्रामस्थांचे हात आणि पायांना इजा झाली असून आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा आहे. घरे, पूल आणि रस्त्यांची दैना झाली आहे. दरवर्षी अति अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या किटवडेकरांनी वाहून गेलेल्या पुलाची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे.

यावर्षी आजरा तालुक्यात २७१२ मिली मीटर पाऊस झाला आहे. पश्चिमेकडील गवसे विभागात तब्बल ४२२१ मिमी पाऊस पडला आहे. पण एकट्या किटवडे गावातील पावसाचे प्रमाण आहे ५८३० मिमी….! येथे नेहमीच जोरदार पाऊस होत असला तरी यंदाचा पाऊस काही वेगळाच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अख्ख्या हयातीत असा पाऊस झाला नाही असे वयोवृद्धांचे म्हणणे. हा परिसर अतिपावसाचा असल्याने ग्रामस्थ सर्व बेगमी करतात. घरांना झडी बांधतात, पण यावर्षी अति-अतिवृष्टीने जुनी घरेच नव्हे, तर स्लॅबची घरेही गळू लागली आहेत. या गावात झोपायलाच नव्हे, तर बसायलाही कोरडी जागा राहिलेली नाही. गेले महिनाभर शेतात पाणी असल्याने भात, ऊस, नांगलीची पिके कुजून गेली आहेत. त्यामुळे यावर्षी जगायचे कसे, असा मोठा सवाल किटवडेकरांसमोर उभा ठाकला आहे.

तालुक्याच्या पश्चिमेकडे कावळेसाद दरी (आंबोली)नजीक वसलेल्या किटवडे गावच्या दैनावस्थेची ही कथा. केवळ राज्यातच नव्हे, तर देशात सर्वाधिक पाऊस पडणारा चेरापुंजीसारखा परिसर म्हणून किटवडेची ख्याती आहे. याची अनेकदा माहिती देऊनही येथील पर्जन्यमानाची प्रशासनाने दखल घेतलेली नाही. सध्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील महापूर आणि नुकसान सर्वत्र चर्चेत असताना किटवडेकरांची शेकडो हेक्टर जमीन आणि त्यातील हुकमी भात आणि ऊस कुजून-वाहून गेले आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थ हवालदिल आहेत. पण टाहो फोडण्यापेक्षा, अत्यंत संयमाने आल्या संकटाशी एकजुटीने दोन हात करीत आहेत.

किटवडेकरांचे हाल विचारण्यासाठी प्रशासनाला वेळ नाही. या गावात पंधरा दिवस झाले तरी वीज नाही. वादळी वाऱ्याने ग्रामपंचायत कार्यालयाचे छप्पर उडून गेले. घरांचे दरवाजे तुटले. वाहतुकीच्या एकमेव मार्गावर दलित वस्तीनजीकचा पूल तुटला. झाडांच्या फांद्या लावून डागडुजी करण्यात आली. रात्र झाल्यावर काळोखात झोपणेही भीतीदायक झाले असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

किटवडेकरांची स्थिती ओळखून जीवनावश्यक साहित्य वाटप आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. आरोग्य विभागाने नेहमीप्रमाणे आवश्यक औषधे दिलीत. नेहमी असेच असते. त्यानंतर काही मदत होईल, अशी अपेक्षाही नाही. खचलेले रस्ते, पूल दुरुस्त करण्याचे आणि परिस्थितीतून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आर. डी. सावंत, ग्रामस्थ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिरोळमध्ये २२ गावे अद्याप पाण्यातच

$
0
0

पाणीपातळीत संथगतीने घट

कवठेगुलंद, कनवाडसह परिसरात हेलिकॉप्टरमधून मदत

कोल्हापूर-सांगली मार्गावर वाहतूक सुरू

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यात पूरस्थिती नवव्या दिवशीही कायम आहे. कृष्णा, पंचगंगा, वारणा आणि दूधगंगा नद्यांचे पुराचे पाणी संथपणे ओसरू लागले आहे. मंगळवारी उदगाव येथे कोल्हापूर-सांगली मार्गावरील पुराचे पाणी ओसरल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. तालुक्यातील २२ गावे अद्याप पुराच्या विळख्यात आहेत. एनडीआरएफ, लष्कर, नौदल तसेच वायूदलाच्या जवानांनी मदत कार्य सुरू ठेवले आहे. मंगळवारी हेलिकॉप्टरमधून कवठेगुलंद तसेच परिसरात बकेटमधून जीवनावश्यक साहित्य टाकण्यात आले. पूरग्रस्त भागात ग्रामस्थांबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा तसेच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा नदीच्या महापुराचा फटका घालवाड, जुने कवठेसार, खिद्रापूर, अकिवाट, कनवाड, शिरटी, जुने दानवाड, बस्तवाड, राजापूर, राजापूरवाडी, कुटवाड, हसूर, तेरवाड, नृसिंहवाडी, औरवाड, कवठेगुलंद, गौरवाड, गणेशवाडी, आलास, बुबनाळ, शेडशाळ, धरणगुत्ती, नांदणी, उदगाव यासह तालुक्यातील ४५ गावांना बसला आहे. पुराचा विळखा सैल होऊ लागला असला तरी गावात शिरलेले पाणी संथपणे परतू लागले आहे. पिके कुजल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. काही ठिकाणी पुराच्या पाण्याखाली गेलेल्या कमकुवत घरांच्या भिंती कोसळू लागल्या आहेत.

मंगळवारी कृष्णा नदीच्या पातळीत तीन फुटांनी घट झाली. मात्र नद्या अजूनही धोका पातळीवरून वाहत आहेत. अंकली पुलानजीक कृष्णा नदीची पाणी पातळी ५३ फूट होती. येथील धोका पातळी ५०.३ फूट आहे. राजापूर बंधाऱ्याजवळ ६०.२ पाणी पातळी होती. पंचगंगेची पातळी तेरवाड बंधाऱ्याजवळ ७८.३, नृसिंहवाडी येथे ७३.२ फूट होती.

०० ०० ० ००

पाणी पातळी

राजाराम बंधारा : ४४ फूट

पंचगंगा, नृसिंहवाडी : ७३ फूट

कृष्णा, सांगली : ४५ फूट

०० ०० ०

०० ०० ०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसवेश्वर सोसायटीमध्ये ६३ लाखांचा अपहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शुक्रवार पेठ येथील बसवेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटीमध्ये बनावट खर्चाचा हिशोब दाखवून सभासदांची फसवणूक करुन सुमारे ६३ लाख ६५ हजार ४१४ रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरिक्षणामध्ये उघडकीस आले. या प्रकरणी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष पांडूरंग वडगावकर याच्यासह उपाध्यक्ष, संचालक व कर्मचारी अशा १४ जणांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला.

सहकार खाते लेखापरीक्षण विभागाचे विशेष लेखापरीक्षक प्रतापसिंह बाबासाहेब काशिद (रा. कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली. या अपहार प्रकरणामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितले की, लेखापरीक्षक काशिद यांनी बसवेश्वर क्रेडीट सोसायटी या संस्थेचे २०१५ पासून ३० मे, २०१९ या चार वर्षाचे आर्थिक लेखापरीक्षण केले. संशयित नामदेव हावळ यांनी संस्थेचे २०१३ ते २०१५ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण केले. त्यांना संस्थेमध्ये ४८ लाख, ९५ हजार ४१४ रुपयांचा अपहार झाल्याचे माहिती होते. तरीही त्यांनी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करुन अपहाराबाबत फौजदारी गुन्हा दाखल न करता तो लपविला. संशयितांनी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करुन आर्थिक फायद्याकरीता सभासदांचा विश्वासघात करुन बनावट जमा खर्च दाखवून ६३ लाख ६५ हजार ४१४ रुपयांचा अपहार केला. त्यानंतर लेखापरीक्षण कालावधीत २३ लाख व लेखापरीक्षणावेळी २ लाख ५२ हजार ३१४ असे एकूण २५ लाख ५२ हजार ३१४ रुपये संस्थेत भरले. उर्वरित रक्कम ३८ लाख १३ हजार १०० रुपये आजअखेर भरलेले नाहीत.

...

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे

संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष पांडूरंग शंकरराव वडगांवकर (रा. मंगळवार पेठ), उपाध्यक्ष सुनील रामचंद्र सावर्डेकर (रा. बुरुड गल्ली, शनिवार पेठ), व्यवस्थापक राजेश संभाजी गवळी (रा. गवळी गल्ली, शनिवार पेठ), संचालक अनंत चंद्रकांत सांगावकर (रा. डी वॉर्ड, बाजार गेट), संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षक नामदेव हावळ (रा. रायगड, कॉलनी, पाचगाव), लिपिक दत्तात्रय रामचंद्र शेटे (रा. शिवाजी गल्ली, वडणगे, ता. करवीर), संचालक भूपाल मल्लाप्पा रंगमाले (रा. शनिवार पेठ), रमेश महादेव बनछोडे (रा. बाजार गेट), श्रीकांत दत्तात्रय बनछोडे (गवळी गल्ली, शनिवार पेठ), मोहन शंकरराव फल्ले (रा. मंगळवार पेठ), राजेंद्र काशिनाथ पाटणे (रा. सुभाष रोड, गडहिंग्लज), दिलीप विष्णू पंतगवळी , चंद्रकांत शिवरुद्र स्वामी (रा. दोघे, गवळी गल्ली, शनिवार पेठ), कल्पना कृष्णात वडगावकर (रा. मंगळवार पेठ). मृत आदिनाथ उर्फ अनंत गोपाळ रंगमाले (रा. शनिवार पेठ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मोहक लस्सी’च्या मालकावर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुराच्या काळात खाद्यपदार्थांची जादा दराने विक्री करु नये, या जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी महानगरपालिकेसमोरील मोहक लस्सी या दुकानाचा मालक प्रसाद शहा याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरपरिस्थिती काळात जादा दराने खाद्यपदार्थ विक्री करू नये, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संशयित शहा याच्यावर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. भाऊसिंगजी रोडवरील मोहक लस्सी या दुकानात खिचडी, शाबूवडा दर हे नेहमीपेक्षा जादा दराने विक्री केल्याच्या आरोपावरून १२ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय करजगार आणि अन्य कार्यकर्त्यांनी दुकानमालक प्रसाद शहा यांना जाब विचारत मारहाण केली होती. या प्रकरणी शहा यांनी करजगार यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती. या घटनेचा निषेध करीत सर्वपक्षीय समितीने मंगळवारी पोलिस निरीक्षक बाबर यांची भेट घेवून शहा याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना पुरस्कार समर्पित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ओंकार अगदी लहानपणापासून टक्केटोणपे खात मोठा झालेला. त्यातूनच नडलेल्या लोकांबाबत नेहमीच एकप्रकारची सहानभूती निर्माण होत गेली. अशा गरजवंतांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याचा ध्यास घेतला. त्याच ध्यासाने त्याला राष्ट्रीय युवा पुरस्कारापर्यंत पोहचवले. या धडाडीच्या कार्याचा गौरव करणारा पुरस्कार स्वीकारताना एकीकडे आनंद होता तर दुसरीकडे ज्या कोल्हापुरातून कामाला सुरुवात केली ते शहर महापुराच्या विळख्यात अडकल्याचे अतीव दु:ख होते. त्याच्या संवेदनशील मनाला मात्र वैयक्तिक आनंदापेक्षा लाखो पूरग्रस्तांचे दु:खच भिडले आणि त्याने हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर क्षणाचीही उसंत न लावता तो कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना समर्पितही केला.

केंद्रीय युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते कोल्हापूरच्या ओंकार नवलिहाळकर याला राष्ट्रीय युवा पुरस्काराने सोमवारी दिल्लीमध्ये सन्मानित करण्यात आले. पन्नास हजार रुपये, मेडल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.

वडील रिक्षाचालक व आई खासगी नोकरी करणाऱ्या. सामान्य घरातील ओंकारला नेहमीच सामाजिक काम खुणावत होते. आपत्ती व्यवस्थापनात कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास केलेल्या ओंकारला पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर मोठा आनंद झाला होता. पण पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाताना त्याच्यासमोर कोल्हापूरला पडलेला महापुराचा विळखा दिसत होता. त्यामध्ये अडकलेले लाखो नागरिक डोळ्यासमोर येत होते व पुरस्कार स्वीकारण्यापेक्षा खरी गरज कोल्हापुरात असल्याच्या भावना तो बोलून दाखवत होता. नातेवाईक, मित्रांच्या आग्रहानंतर तो शरीराने दिल्लीला गेला असला तरी त्याचे चित्त मात्र कोल्हापुरातच होते. महापुराचे अपडेट त्याला अस्वस्थ करत होते. कधी एकदा पुरस्कार घेतो व कोल्हापुरात पोहचतो, अशी त्याची अवस्था होती. ज्या आपत्ती व्यवस्थापनाची सुरुवात कोल्हापुरातून झाली त्यातील पुरस्कार स्वीकारताना कोल्हापूरवर आपत्ती कोसळावी हा दुर्दैवी क्षण असल्याच्या त्याच्या भावना होत्या. त्यामुळे कार्यक्रम झाल्यानंतर त्याने तातडीने हा पुरस्कार कोल्हापुरातील पूरग्रस्त व त्यांना मदत करणाऱ्या नागरिकांना समर्पित केला.

देशप्रेमाने भारलेल्या ओंकारला संरक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. पण लहानपणी डोळ्याला आलेल्या अपंगत्वामुळे त्याची इच्छा पूर्ण होणे अशक्य होते. त्यामुळे त्याने शिक्षण घेत असताना आपत्कालीन सेवा संस्थांच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली. अनेक आपत्ती ठिकाणच्या मदतकार्यात तो हिरीरीने सहभागी होत होता. जीवन ज्योत आपत्कालीन सेवा संस्था, जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या माध्यमातून अनेक नागरिकांचे जीव वाचवण्याचे काम केले. त्यानंतर त्याने सलाम मुंबई फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरमधील शाळा तंबाखूमुक्त करण्यामध्ये ओंकारने महत्त्वाचे योगदान दिले. आपत्ती व्यवस्थापनाची आवड असलेला ओंकार सध्या मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आहे.

.............

आपत्ती व्यवस्थापनातील कामाची सुरुवात कोल्हापुरातून केली. त्याबद्दल मिळालेला पुरस्कार स्वीकारण्यासाठी जात असताना कोल्हापूरवर आपत्ती कोसळल्याने लक्ष कार्यक्रमात नव्हते. कार्यक्रमानंतर तातडीने माघारी कसे येता येईल, लवकरात लवकर कोल्हापुरात पोहचून कोणते काम करता येईल, याचाच विचार येत होता. त्यानुसार परतीच्या प्रवासात असून लवकर काम सुरू करण्याची इच्छा आहे.

ओंकार नवलिहाळकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेट मशिनद्वारे ड्रेनेजलाइनची स्वच्छता

$
0
0

फोटो आहेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूर ओसरलेल्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवली जात असताना शहरातील ड्रेनेजलाइनची स्वच्छता करण्यासाठी तीन जेट पंप महापालिकेच्या ताफ्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या मशिनरीद्वारे पूर ओसरलेल्या भागातील ड्रेनेजलाइनची स्वच्छता केली जात होती. तीन मशिनद्वारे शहरातील भागात मंगळवारी दिवसभर स्वच्छता केली. त्याचबरोबर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पूर ओसरलेल्या भागात स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छतेनंतर तातडीने धूर व औषध फवारणी करण्यात आली.

महापुराच्या विळख्यातून शहराची सुटका होऊ लागली आहे. मात्र पुराच्या पाण्याबरोबर आलेला गाळ आणि कचऱ्यांमुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा स्थितीत आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. कसबा बावडा, उत्तरेश्वर पेठ, सिद्धार्थनगर, व्हिनस कॉर्नर, गवत मंडई, कुंभार गल्ली, लक्ष्मीपुरी परिसराची स्वच्छता करण्यात आली. या परिसरातून तब्बल ७० डंपर कचरा व गाळाची उचल करण्यात आली. तसेच स्वच्छतेनंतर तातडीने औषध व धूर फवारणी करताना ब्लिचिंग पावडर टाकण्यात आली.

आरोग्य व पवडी कर्मचाऱ्यांकडून पूर ओसरलेल्या भागाची स्वच्छता सुरू असताना ड्रेनेजलाइनचीही स्वच्छता करण्यात येत होती. ड्रेनेजमध्ये मोठ्याप्रमाणात गाळ व कचरा असल्याने कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना मर्यादा येत होत्या. त्यामुळे महापालिकेने मुंबई महापालिकेकडे जेट मशिनरीची मागणी केली होती. त्यानुसार तीन मशिनरी महापालिकेच्या ताफ्यात तात्पुरत्या स्वरुपात दाखल झाल्या. पूर ओसरलेल्या व अन्य भागातही या मशिनरीच्या मदतीने ड्रेनेजलाइनची स्वच्छता करण्यात आली. १४ जेसीबी, १९ डंपरच्या सहाय्याने गाळ व कचरा काढण्यात आला.

शहरातील स्वच्छता मोहीम वेगाने राबवण्यासाठी अनेक संस्था व वैयक्तिक लोकांनी जेसीबी मशिन, डंपर व अन्य साहित्य उपलब्ध करुन दिले. महापालिकेच्या चार जेसीबीसह देवस्थान समिती व डी. वाय. पाटील ग्रुपने प्रत्येकी चार तर व्ही. बी. पाटील व सत्यजित कदम यांनी प्रत्येकी एक जेसीबी गाळ व कचरा काढण्यासाठी दिली आहेत. गाळ वाहतूक करण्यासाठी क्रशर असोसिएशनने १२ डंपर दिले आहेत. महापालिकेकडील ६०० कर्मचाऱ्यांसह देवस्थान समितीने ८० व बीव्हीजी कंपनीचे ८५ सफाई कर्मचारी स्वच्छता करत आहेत. तसेच मुंबई महापालिकेच्या अत्याधुनिक तीन जेट मशिन उपलब्ध केल्या आहेत.

आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, नेजदार फाउंडेशन, हनुमान मंदिर मंडळ, क्रिडाई, संत निरंकारी सेवा संस्थेसह सामजिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

...

चौकट

पाण्याअभावी पंचाईत

पूर ओसरलेल्या ठिकाणी महापालिकेच्यावतीने जोरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्याचबरोबर पुरामध्ये बुडालेली घरे, दुकाने, शोरुम यांची स्वच्छता वैयक्तिक पातळीवर केली जात आहे. मात्र स्वच्छता करताना नागरिकांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्याचा वापर केला जात आहे. पण ज्याठिकाणी असे पाणी मिळत नाही, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>