Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

काँग्रेस, शिवसेनेची उमेदवारांसाठी दमछाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजप व ताराराणी आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निम्म्याहून अधिक उमेदवारीचा टप्पा गाठला असून शिवसेना व काँग्रेसची मात्र अनेक ठिकाणच्या उमेदवारीसाठी दमछाक होणार आहे. कसबा बावड्यात काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या जास्त असली तरी शहरात इतर ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे. शिवसेनेलाही काही आजी, माजी नगरसेवक सोडल्यास पुढील टप्प्यात अन्य मोठे उमेदवार मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात राष्ट्रवादी, ताराराणीतील कुणी नाराज इच्छुक आला तर तो मिळवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने दक्षिण उपनगरांमधील प्रभागातील उमेदवारी सोडल्यास मोठ्या संख्येने उमेदवारी जाहीर केलेली नाही. कसबा बावड्यात त्यांच्याकडे इच्छूक भरपूर आहेत. त्यातील एकाला दिली तर अन्य इच्छूक दुसऱ्या पक्षाचा मार्ग स्वीकारतील, अशी स्थिती आहे. पण तिथून बहुतांश ई वॉर्डमधील प्रभागातील उमेदवारीच जाहीर केलेल्या नाहीत. दाटवस्तीच्या मानल्या जाणाऱ्या बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर, शिवाजी पेठ अशा ठिकाणी तर काँग्रेसला पूर्णपणे शेवटच्या खेचाखेची होणाऱ्या टप्प्यात काही सक्षम उमेदवार मिळतील अशी शक्यता आहे. इच्छूक भरपूर आहेत पण निवडून येण्याची क्षमता असलेले किती हा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीचीही अशी काही परिस्थिती असली तरी घोषित करायच्या प्रभागांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्यांना शेवटच्या टप्प्यावर चांगले उमेदवार मिळाल्यास ते सरप्लसच ठरतील. पण काँग्रेसमध्ये ही परिस्थिती नाही.

भाजपने ताराराणी आघाडीच्या सहकार्याने उमेदवारी घोषित केल्या. त्यांच्या उमेदवारीकडे डोळे लावून बसणारे आजी तसेच माजी नगरसेवक आता काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यांची संख्या मात्र मोजकी आहे. शिवसेनेचे काही प्रभागात ताकदवान उमेदवार आहेत. पण त्यांची नावे अजून जाहीर केलेली नाहीत. पहिल्या टप्प्यात ही नावे जाहीर होण्यासारखी असताना त्यांची नंतरच्या टप्प्यात उमेदवारी जाहीर होण्याचे कारण समजत नाही. उपनगरांमध्ये शिवसेनेचे वातावरण असले तरी स्थानिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचे धाडस केले जाण्याची शक्यता आहे. हे नवीन चेहरे असतील, पण प्रस्थापित अन्य पक्षांच्या उमेदवारांवरील नाराजी आपल्या मतात वळवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न झाले पाहिजेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युती सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक

$
0
0

मानसिंगराव नाईकांची टीका; शिराळ्यात शेतकऱ्यांचा मोर्चा

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

राज्यातील युतीचे सरकार शेतकऱ्यांना फसवत असून,त्यांनी शेतीच्या नुकसानीचे निकष त्वरित बदलून शिराळा तालुकादुष्काळग्रस्त जाहीर करावा, अन्यथा तीव्र लढा उभा करू, असा इशाराशिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी शिराळा तहसील कार्यालयावरकाढलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चावेळी दिला. या वेळी शिराळ्याचे तहसीलदार विजयपाटील यांच्याकडे दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांचेनिवेदन देण्यात आले. या वेळी भगतसिंग नाईक, हंबीरराव नाईक, शंकररावचरापले अशोकराव पाटील, विलासराव पाटील, रणजितसिंह नाईक उपस्थित होते.

नाईक म्हणाले,' तालुक्यातील धरणात पाणीसाठाकमी आहे. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरीसंघटनेचा झेंडा घेऊन विधानसभेची निवडणूक लढवणारे आणि ऊस दरांसाठीभांडणारे सध्याचे लोकप्रतिनिधी ते संस्थापक असलेल्या शिवाजी केनकारखान्याच्या ऊस दराबाबत का बोलत नाहीत. आम्ही विश्वास सहकारी साखरकारखान्याचा दर २४०० रुपयांच्या वर दिला आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठीया वर्षी साडेसात कोटी रुपयांची तरतूद केली आहे. माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत१२५ कोटी रुपयांचा निधी योजनेसाठी आणला होता. युती सरकारने निधी जाणीवपूर्वकअडवला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात दुष्काळी परीस्थितीअसताना शेतकऱ्यांची कर्जे माफ केली होती. या वेळी धनंजय माने, नारायणचव्हाण, विजयराव नलवडे यांची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवठेमहांकाळात राष्ट्रवादीची पीछेहाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीचीही पीछेहाट आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. तासगावात भाजपचा नगराध्यक्ष विराजमान झाल्यानंतर आता कवठेमहांकाळच्या राष्ट्रवादीच्या पंचायत समितीच्या सभापती वैशाली पाटील, सदस्य शिवाजी चंदनशिवे यांनी गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार संजय पाटील यांच्या पुढाकारात राष्ट्रवादीच्या अनेकांनी भाजपला जवळ करण्यासाठी पावले उचलली आहेत.

आर. आर. पाटील यांच्या नावाने संपूर्ण राज्यात तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ ओळखला जात होता. परंतु आर.आर. यांच्या निधनानंतर मात्र राष्ट्रवादीची या विधानसभा मतदारसंघावरील पकड ढिली होत असल्याचे दिसू लागले आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांनी राजीनामा देऊन काँग्रेस आघाडीजवळ केली. याचा फटका माजी मंत्री जयंत पाटील यांच्या आघाडीला बसला. त्यानंतर तासगावचे नगरसेवक भाजपात गेले. त्यानंतर गुरुवारी कवठेमहांकाळच्या सभापती, सदस्य , शिरढोणच्या सरपंच छाया नलावडे, सदस्या शालन पाटील आदींनीही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीत शिस्त राहिलेली नाही. प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. गजानन कोठावळे, सुरेश पाटील, सुरेखा कोळेकर या पदाधिकाऱ्यांनी मनमानी सुरू केल्याचा आरोप या वेळी प्रवेशकर्त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफआरपीसाठी स्वाभिमानीचा १६ ऑक्टोबरला मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकार आणि साखर संघाने तीन टप्प्यात एफआरपीची रक्कम देण्यास मंजुरी दिल्याने या मुद्द्यावरून पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सरकार आमने-सामने येणार आहे. ऊस ‌बील एकरकमी मिळावे या मागणीसाठी १६ ऑक्टोबरला साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळीच ऊस परिषदेची घोषणा करण्यात येणार आहे.

केंद्रात आणि राज्यातही स्वाभिमानी सत्तेत सहभागी असल्याने खासदार राजू शेट्टी ऊस दरासाठी आंदोलन करणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, शेट्टी यांनी एफआरपीच्या मुद्यावरून आंदोलनाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

एफआरपीचे तुकडे पाडण्याच्या विरोधात १६ फेब्रुवारीला कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. याच मोर्चात १५ व्या ऊस परिषदेची घोषणा होणार आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस जयसिंगपूरमध्येच ऊस परिषद होईल, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.

एकरकमी एफआरपीबरोबरच गत हंगामातील उर्वरित ऊसदराबाबतही राजू शेट्टी आक्रमक आहेत. ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांना दर दिलेला नाही अशा साखर कारखान्यांना नवीन गळीत हंगामासाठी परवाना मिळू नये, अशी मागणी शेट्टी यांनी साखर संघाकडे केली आहे. एकरकमी एफआरपी देण्याची कायदेशीर तरतूद असताना सरकार आणि साखर कारखाने मात्र साखर दराची कारणे पुढे करून शेतकऱ्यांच्या विरोधात षङयंत्र रचत आहेत. साखर कारखान्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मदतीचा हात मिळूनही शेतकरी विरोधात निर्णय घेतले जातात यावर खासदार शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरूस्त मतदार यादी निवडणूक आयोगाकडे

$
0
0

अंतिम मतदार यादी उद्या प्रसिद्ध होणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मतदार यादीतील घोळाबाबत मोठ्या प्रमाणात हरकती आल्यानंतर त्यात दुरूस्ती करून ती महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. आयोगाकडून ही यादी तपासून पुन्हा महापालिका प्रशासनाकडे पाठविण्यात येईल. तीन ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

प्रारूप मतदार यादीत यंदा असंख्य चुका झाल्या. प्रत्येक प्रभागात ५०० ते १००० च्या आसपास नावात घोळ झाले. अन्य प्रभागात नावांचा समावेश झाला होता. विधानसभा निवडणूक मतदार यादीत नाव असतानाही महापालिका निवडणुकीच्या प्रारूप यादीत अनेक मतदारांचा समावेश नव्हता. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप-ताराराणी आघाडी या प्रमुख पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी हरकती दाखल केल्या होत्या. काही प्रभागातील एकेक प्रगणक गटच दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासनाकडून गेले पाच दिवस यादीतील घोळ दुरूस्तीचे काम सुरू होते.

आलेल्या हरकतीनुसार यादीत दुरूस्ती केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरवर ही दुरूस्ती मतदार यादी अपलोड केली आहे. आयोगाकडून या यादीची तपासणी होणार आहे. त्यानंतर आयोगाकडून अंतिम मतदार यादी महापालिका प्रशासनाला सादर होईल. तीन ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

दुबार मतदाराबाबत दक्षता घेणार शहरातील विविध प्रभागातील मिळून ११,००० मतदारांची दुबार नोंदणी होणार आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून यादी निश्चित करताना अंतिम मतदार यादीतही नावे वगळली जाणार नसल्याचे वृत्त आहे. मतदार यादीत दुबार नावांची दुरूस्ती होणार नसली तरी प्रत्यक्ष मतदानादिवशी दुबार मतदान होणार नाही यासाठी महापालिका नियोजन करत आहे. दुबार नोंद असलेल्या मतदारांची नावे मार्क करण्यात येणार आहेत. मतदान केल्याची खूण पुसली जाऊ नये म्हणून मार्करचा वापर करण्यात येणार आहे.

असे होते घोळ

नगरसेवकांची नावे त्यांच्याच प्रभागातून वगळली

अनेक मतदारांची आडनावे गायब

१३२६ हरकती दाखल

८१ प्रभागातून मिळून १७,०६३ मतदारांची नावे अन्य प्रभागांत

तब्बल ११ हजार मतदारांची दुबार नोंदणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेण्यात महसूल..पोलिसांत स्पर्धा

$
0
0

नऊ महिन्यात जिल्ह्यात २८ जण 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

satish.ghatage@timesgroup.com

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील नऊ महिन्यात लाच घेणाऱ्या २८ जणांना जाळ्यात पकडले आहे. लाच घेण्यात महसूल व पोलिसांत स्पर्धाच लागल्याचे चित्र दिसत असून दोन्ही विभागाच्या ११ कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्याचे सिध्द झाले आहे. माजी महापौर तृप्ती माळवी यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लाच घेण्यात समावेश आहे.

कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला जानेवारी महिना कोरडा जाईल असे वाटत असताना ३० जानेवारी रोजी महापौर तृप्ती माळवी व त्यांचा खासगी स्वीय सहाय्यक अश्विन गडकरी याला १६ हजार रूपयाची लाच घेताना अटक केल्याने राज्यात खळबळ उडाली. माळवी या लाच घेणाऱ्या पहिल्या महापौर ठरल्या. थेट महापौरांच्यावर कारवाई होत असल्याने लाच घेणाऱ्या प्रवृत्तीच्याविरोधात तक्रार करण्यासाठी नागरिक पुढे येऊ लागले आहेत. लाच घेणाऱ्यांना थेट अटक होऊ लागली असून लाचेची मागणी घेणाऱ्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लाच घेण्यात महसूल व पोलिस विभाग आघाडीवर आहे. महसूल खात्यातील मंडळींनी थेट दोन लाख ५५ हजारांपासून ते दोन हजार रूपयांची लाच मागताना अटक झाली. हातकणंगलेचा मंडल अधिकारी हंबीरराव संकपाळ याला सातबारा जमिनीवर नोंद करण्यासाठी अडीच लाखाची लाच घेताना अटक झाली. महसूल विभागाचे पाच तलाठी, दोन मंडल अधिकारी व एक पोलिस पाटील जाळ्यात सापडला आहे. पोलिसांनी दहा हजारांपासून दीड हजारापर्यंत लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पण्ण झाले आहे. पाच सहाय्यक फौजदार, पाच हेड कॉन्स्टेबल व एका पोलिस नाईकाला लाच घेताना अटक झाली आहे.

महानगरपालिकेचा कनिष्ठ अभियंता मिलिंद पाटील याला पाच हजाराची, आरटीओचा सहाय्यक निरीक्षक प्रशांत शिंदे व त्याचा पंटर समीर शिनोळकरला १० हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली. एमएसईबीचा कनिष्ठ अभियंता हंबीरराव संकपाळ याला एक हजाराची तर इचलकरंजी नगरपालिकेतील शिपाई बाळू चंदर पाटील याला पाचशे रूपयाची लाच घेताना अटक झाली. सहकार विभागातील उपनिबंधक सुनिल सिंगतकर याला दहा हजार रूपयाची लाच घेताना रात्रीच्या वेळी अटक झाली.

राज्यातील लाचप्रकरणी विभागवार झालेल्या कारवाया

पुणे १७२

नाशिक १३९

औरंगाबाद १३९

ठाणे ११४

अमरावती १०२

नांदेड ९३

मुंबई ४९

'लाच प्रवृत्तीविरूध्द दिवसेंदिवस नागरिकांच्यात जागृती होत असून अशा अधिकाऱ्यांच्या अन्यायाच्या विरूध्द लोक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पायरी चढू लागले आहेत.अत्याधुनिक साधनांचा वापर करून सापळे रचले जात असून राजकारणी, अधिकाऱ्यांची भीड न बाळगता लाचखोरांना जेरबंद केले जात आहे.

- उदय आफळे, उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चक्का जाम’मुळे लाखोंची उलाढाल थंडावली

$
0
0

मालवाहतूकदारांच्या संपामुळे महागाई भडकण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनामुळे जिल्ह्यातील मालाचे लोडिंग थांबले. अनेक व्यवहार थंडावले असून, लाखो रुपयांची उलाढाल गुरुवारी थांबली. आंदोलन आणखी काही दिवस लांबल्यास जीवनावश्यक वस्तूचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे.

चक्का जामची चाहूल लागल्याने मालवाहतूकदारांनी २७ सप्टेंबरपासूनच मालाची नोंदणी बंद केली आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या संपात मालवाहतूकदार, टँकर, टेम्पोधारक, जिल्हा वाळू वाहतूकदार, बॉक्साइट वाहतूकदार संघटनाही सहभागी झाल्या. त्यामुळे गजबलेले मार्केट यार्ड, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, धान्य आणि व्यापारी मार्केटमध्ये शुकशुकाट जाणवला. सप्टेंबर महिन्यात मालवाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यावेळी तीन ते चार दिवस चक्का जाम आंदोलन सुरू राहिले. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडून ठोस आश्वासन आणि अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ पुन्हा देशव्यापी चक्का जामची सुरुवात झाली आहे. यात जिल्ह्यातील मालवाहतूकदारांनी चक्का जामला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शहरातून दररोज सुमारे ४०० ते ४५० ट्रक साखर निर्यात केली जाते. जीवनावश्यक वस्तूंमध्ये कांदा, बटाटा, मिरची, टोमॅटोची कर्नाटक, गुजरात, पंजाब या राज्यांत निर्यात केली जाते, तर दिल्ली राइस, पंजाबमधून गहू, तांदूळ, कडधान्ये, राजस्थानवरून टाइल्स, भांडी आयात केली जातात.

चक्का जामची व्याप्ती वाढल्यास आयात आणि निर्यातीवर परिणाम होणार आहे. त्याचा फटका थेट मार्केटवर होणार असून काही वस्तूचे भाव वाढण्याची शक्यता आहे. बंदच्या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबणार आहे. काही किरकोळ आणि होलसेल व्यापाऱ्याकडे जीवनावश्यक वस्तू आणि धान्याचा काही टन साठा शिल्लक आहे. हा साठा येत्या काही दिवसांत संपल्यास ग्राहकांना दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. काही व्यापारी साठा अजूनही जादा दराने वस्तूंची विक्री करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

काय आहेत मागण्या

देशांतर्गत राष्ट्रीय महामार्गावर असलेले ३७२ टोलनाके बंद करुन वार्षिक टोल परमीट द्यावे. टीडीएस रद्द करावे, या मागण्यांसाठी १६ हजार मालवाहतूकदारांनी बंद पुकारला आहे. वाहनधारकांकडून बिल देण्यापूर्वी टी. डी. एस वसूल केला जातो, तो रद्द करावा. पर्यावरण कर, व्यवसाय कर रद्द करावा. जुन्या वाहनांना स्पीड गव्हर्नरची सक्ती करू नये.

'ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्टने (काँग्रेस) आणि राज्य ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक संघ (मुंबई) यांनी दिलेल्या आदेशानुसार देशव्यापी चक्का जाम आंदोलन सुरू झाले आहे. कोणालाही वेठीस धरण्याचा हेतू नाही. मात्र, नियमानुसार मालवाहतूकदारांना सवलती देण्याची गरज आहे.'

-सुभाष जाधव, अध्यक्ष, डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन

'केंद्र सरकारने दोन दिवसांत याबाबत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे. टोलच्या माध्यमातून सरकार मालवाहतूकदारांची फसवणूक करीत आहे. आमचा टोलला विरोध नाही. मात्र, टोलवसुलीत सुरू असलेला भ्रष्टाचार थांबविला पाहिजे.'

-भाऊ घोगळे, उपाध्यक्ष, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन

चक्का बंदचे आवाहन

लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्यावतीने बंदसाठी आवाहन केले होते. त्याला चेंबर ऑफ कॉमर्सनेही पाठिंबा दिला आहे. लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाध‍व, सेक्रेटरी हेमंत डिसले, खजिनदार प्रकाश केसरकर, विजय भोसले, शिवाजी चौगुले, बाबला फर्नांडिस, विलास पाटील, पंडित कोरगावकर, जगदीश सोमय्या, प्रकाश भोसले, विजय पोवार, विक्रम पाटील, उमेश महाडिक, वामन चौगुले यांनी चक्का बंदसाठी आवाहन केले.

मालवाहतूकदार - १६ हजार

टँकर - ७००

टेम्पोधारक - ९ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनुष्यबाण कोण खेचणार?

$
0
0

वीस प्रभागांमुळे अडली शिवसेनेची यादी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवसेनेने ४१ उमेदवारांची यादी प्रसिध्द केली असली तरी उरलेल्या ४० प्रभागातील २० प्रभागात उमेदवारी कोणाला द्यायची यावरून शिवसेनेतील गटातटाचे राजकारण उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २० प्रभागातील उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ नेत्यांकडे सोपवला जाण्याचे संकेत दिले जात आहेत.

शिवसेनेकडून ४५० हून अधिक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. पहिल्या टप्प्यात ४१ प्रभागातील यादी निश्चित करण्यात पक्षनेतृत्वाला यश आले आहे. पण २० प्रभागात आमदार क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यात एकमत झालेले नाही. रमणमळा प्रभागात सात उमेदवारांनी पक्षाकडे तिकीट मागितली आहे. त्यामध्ये घरचे व बाहेरचे असा वाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. व्हिनस टॉकीज प्रभागात शशी बीडकर यांच्यासह तिघांनी उमेदवारी मागितली आहे. २७ वर्षे शिवसेनेची एकनिष्ठ असलेल्या बीडकरांचे नाव पहिल्या यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सदर बाजार प्रभागात सात इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने तिढा सुटलेला नाही.

शाहूपुरी तालीम या प्रभागात काँग्रेस व ताराराणी आघाडी ज्याला उमेदवारी डावलेल तो सेनेच्या गळाला लागणार आहे. या प्रभागात शेवटच्या क्षणी धक्कादायक नाव पुढे येण्याची शक्यता आहे. बाजारगेट प्रभागातील तिढा सुटलेला नाही. माजी नगरसेवक नंदकुमार गजरेश्वर यांच्या स्नुषा अश्विनी गजगेश्वर व जोशी समाजाचे अध्यक्ष भरत काळे यांची पत्नी मंगल काळे यांनी उमेदवारी मागितली आहे.

बिंदू चौक प्रभागात निष्ठावंतासह सातजणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पण काँग्रेसचे नगरसेवक इंद्रजित सलगर व राष्ट्रवादीचे नगरसेवक आदिल फरास यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने निष्ठावंताच्यात चलबिचल सुरू झाली आहे. शिवाजी उद्यमनगर प्रभागात पद्माकर कापसे, संदीप पाटील यांच्यासह माजी जिल्हाप्रमुख विनायक साळोखे यांचा मुलगा योगेश यांनी उमेदवारी मागितली आहे. पांजरपोळ प्रभागाताही निष्ठावंत कमलाकर जगदाळे यांच्या पत्नी सुखदा यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही. तटाकडील तालीम हा प्रभाग भाजपने प्रतिष्ठेचा केल्याने प्रबळ उमेदवार म्हणून माजी महापौर उदय साळोखे यांच्या उमेदवारीसाठी आमदार क्षीरसागर यांनी आग्रह धरला आहे. पण रिक्षासेनेचे राजू जाधव, परेश वेढे हेदेखील उमेदवारीच्या शर्यतीत असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे. बलराम कॉलनी प्रभागात गणेश खाडे यांनी ताराराणी आघाडीची वाट धरल्याने सेनेला इथे उमेदवार शोधावा लागणार आहे. पद्माराजे प्रभागात अजिंक्य चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधल्याने महेश चौगुले, स्वप्निल पाटोळे यांनी सेनेच्या उमेदवारीवर दावा केला आहे. संभाजीनगर बसस्थानक प्रभागातून माजी नगरसेवक दत्ताजी टिपुगडे यांचे नाव पाहिल्या यादीत जाहीर न झाल्याने निष्ठावंत गटात अस्वस्थता पसरली आहे. राजलक्ष्मीनगरातील निर्णयही प्रलंबित राहीला आहे.

इच्छुकांची वाढती संख्या

कैलासगडची स्वारी प्रभागात शिवसेनेचे गटनेते संभाजी जाधव यांनी हातात 'कमळ' घेतल्याने जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचे चिरंजीव अभिषेक व प्रतापसिंह जाधव यांच्यात उमेदवारीसाठी चुरस लागली आहे. सिध्दाळा प्रभागातही शिवसेनेचे माजी नगरसेवक बाबा पार्टे यांच्या स्नुषा प्रतिभा पार्टे, अक्षता कामते, अनिता हारूगले, राजू पाटील यांच्या पत्नींनी यांनी उमेदवारी मागितल्याने या प्रभागातील उमेदवारीचा प्रश्न सेनेच्यादृष्टीने चांगलाच जटील झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहलीच्या बसला अपघात

$
0
0

दोन शिक्षकांसह ११ विद्यार्थी जखमी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे-बेंगळुरू महामार्गावर अंबपजवळ सहलीच्या बसला अपघात होऊन मुख्याध्यापक आणि एका शिक्षिकेसह ११ विद्यार्थी जखमी झाले. कदमवाडी येथील भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलची ही सहल होती. खासगी आराम बसने ते कोयनेला निघाले होते. हॉटेल सागरजवळ रस्त्यात आलेल्या घोड्याला चुकवण्याचा प्रयत्नात बस उलटून हा अपघात झाला. सकाळी पावणेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अचानक झालेल्या या अपघातामुळे विद्यार्थी घाबरून गेले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढून शिक्षकांनी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मुख्याध्यापक अरूण बाळकृष्ण शिंदे, शिक्षिका स्वाती देसाई, विद्यार्थी मयूर शेळके, विवेक निरंकारी, पायल वाघेला, पंकज मुलचंदानी, प्रणिता चोपडे, सर्वेश कलागते, हर्षदा शिगारवाडे, शितल चौगुले, महेश डोईफोडे, अदित्य महाडिक, ब्रिजेश पटेल अशी जखमींची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी, भारती विद्यापीठ इंग्लिश स्कूलची सहल कोयना धरण येथे निघाली होती. खासगी बस(एमएच १५ एके७६४) मधून तीन शिक्षक आणि नववी आणि दहावीचे ५० विद्यार्थी जात होते. बस अंबप फाटा पार करुन पुढे आली असता रस्त्यावर अचानक घोडा आल्याने चालकाने बस उजव्या बाजूला वळवली. त्याचवेळी बस दुभाजकावर आदळून पुन्हा मुख्य रस्त्यावर आणताना बस उलटली. अचानक झालेल्या या प्रकाराने विद्यार्थी घाबरून ओरडू लागले. प्रसंगावधान राखून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी बाहेर काढले. त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा आर्थिक उन्माद उधळवा

$
0
0

आदिवासी, श्रमिक लढ्यातील नेत्या उल्का महाजन यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बहुजन समाज, शेतकरी वर्ग दोनवेळच्या अन्नाला महाग होत असताना सत्तेतील सरकार मोठे उद्योजक, भांडवलदार यांच्यावर सवलतींचा वर्षाव करत आहे. हा जो आर्थिक उन्माद सुरू आहे तो खपवून घेतला जाणार नाही. त्यासाठी लोकांनीही आता भानावर यावे आणि हा आर्थिक उन्माद उधळून लावा,' असे स्पष्ट आवाहन आदिवासी व श्रमिक लढ्यातील नेत्या उल्का महाजन यांनी केले.

कोल्हापूरच्या डाव्या व पुरोगामी चळवळीतील आघाडीचे नेते व माजी नगराध्यक्ष के. ब. जगदाळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आम्ही भारतीय लोक आंदोलनच्यावतीने या व्याख्यानाचे आयोजन केले होते, यावेळी त्या बोलत होत्या. 'केंद्र सरकारची विकासनीती आणि आपण' या विषयावर बोलताना महाजन यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार-पाटील होते.

महाजन म्हणाल्या, 'महाराष्ट्राला जनचळवळींची परंपरा आहे. लढणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजाने नेहमीच साथ दिली आहे. डाव्या आघाडीतील पुरोगामी विचारधारेनेही नेहमीच बहुजनांच्या प्रगतीचा विचार केला आहे. सरकारवर टीका केल्यास तो देशद्रोह ठरवला जाईल असा फतवा काढणारे भाजप सरकार जनतेची मुस्कटदाबी करत आहे. ज्या सरकारचे धोरण बहुजनांच्या हिताविरोधात आहे, त्या बहुजनांच्या हितासाठी उद्या रस्त्यावर उतरावे लागून भाजपवर टीकास्त्र सोडण्याची वेळ आली, आणि तेव्हा याच सरकारने आम्हाला देशद्रोही ठरवले तर आम्ही त्यासाठी तयार आहोत.'

त्या पुढे म्हणाल्या, 'कॉर्पोरेट कंपन्यांना सवलती दिल्यामुळे सरकारच्या तिजोरीला ६२ हजार २९८ कोटींचा फटका बसला आहे. त्याबाबत हे सरकार चिडीचूप आहे. यूपीए सरकारपेक्षा हा तोटा आठ टक्क्यांनी जास्त आहे. मात्र, जेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्रस्ताव पुढे केला जातो तेव्हा याच सरकारला आर्थिक तोटा होत असल्याची आठवण येते. दुसरीकडे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही भाजप सरकारचा दबाव आहे. वाढत्या परदेशदौऱ्यांना विकासचर्चेची जोड देत आपली प्रतिमा उजळण्याचे काम पंतप्रधान मोदी करत आहेत. त्यासाठी त्यांची लॉबी सक्रिय आहे. हे सगळे थांबवायचे असेल तर त्यासाठी पुरोगामी विचारप्रवाहातील मतभेदांची दरी दूर करायला हवी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोध डावलून उदघाटनाचे नारळ

$
0
0

सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच होणार २० कोटींची कामे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वीस कोटी रुपयांच्या निधीची कामे महापालिकेकडून की सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करायची या मुद्यावरून गाजलेली कामे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी राज्य सरकारकडून शहरातील विविध विकासकामासाठी २० कोटी रुपयांचा निधी आणल्याचे जाहीर केले होते. त्यावरून भाजप आणि महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगले.

महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील आमदार अमल महाडिक यांनी वीस कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची घोषणा झाली होती. मात्र, महापालिकेला डावलून विकासकामे होणार असल्याने यावरून वादंगही झाले. सर्किट हाऊसवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. मात्र दोन्ही काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच कामे होणार आहेत. भागाभागात कामाच्या उदघाटनाचे नारळही फुटू लागले आहेत.

आता याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याने निवडणुकीच्या कालावधीतही कामे होतील. मात्र त्याचा लाभ सध्याच्या महापालिकेच्या सभागृहाला मिळणार नाही. निवडणुकीच्या कालावधीत ही कामे सुरू होणार असल्याने प्रचारात त्याचा फायदा उठविला जाण्याची शक्यता आहे. वीस कोटी रुपयांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, बगिचा सुधारणा अशी कामे होणार आहेत. १६ ऑक्टोबरपर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे होणार नाहीत. शहरातील सर्व ८१ प्रभागांसाठी वीस कोटीचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. प्रत्येक प्रभागात साधारणपणे २४ लाख ५० हजारहून अधिक निधी खर्ची पडणार आहे. यामध्ये ३०० विकासकामांचा समावेश आहे. १२१ कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदारांना कामे सोपविली आहेत. भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी हा निधी आणण्यासाठी पाठपुरावा केला होता. भाजप आणि ताराराणी आघाडीच्या संभाव्य उमेदवारामार्फत ही विकासकामे होणार असल्याने यावरून दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता.

नागरिकांच्या हस्ते ​कामांचे उद्घाटन

आचारसंहिता लागू झाल्याने नगरसेवक, इच्छुक उमेदवारांना विकासकामांच्या उदघाटनात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना विकासकामांचे नारळ वाढविण्याचा मान दिला जात आहे. मात्र या कार्यक्रमांचे संपूर्ण नियोजनच संभाव्य उमेदवारच करत आहेत. भाजप आणि ताराराणी आघाडीच्या संभाव्य उमेदवारांसाठी विकासकामांसाठी उपलब्ध निधीतील विकासकामे ही एका अर्थी निवडणुकीसाठी पॅकेजच ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालकांवर कारवाईची टांगती तलवार कायम

$
0
0

जिल्हा बँक गैरव्यवहार प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा बँकेच्या १४७ कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार ठरवलेल्या ४५ आजी-माजी संचालकांसह एका कार्यकारी संचालकावरील कारवाई तुर्तास पुढे गेली आहे. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर सुरू असलेल्या सुनावणीत अनेक संचालकांना नोटीस पोहोचली नसल्याचे लक्षात आल्याने १४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. काही संचालकांनी आपले म्हणणे सादर केले असले तरी, याबाबतचा निर्णय लांबणीवर पडल्याने संचालकांवर कारवाईची टांगती लतवार कायम आहे.

कर्जवाटप प्रक्रियेत १४७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी जिल्हा बँकेच्या ४५ संचालकांसह तत्कालीन कार्यकारी संचालकांना जबाबदार धरण्यात आले होते, त्यामुळे कलम ८८ नुसार संचालकांवर १४७ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्याचे काम सहकार मंत्र्यांकडून सुरू आहे. तीन महिन्यांच्या खंडानंतर झालेल्या सुनावणी प्रक्रियेत संबंधित संचालकांपैकी अनेकांना नोटिसाच पोहोचल्या नसल्याचे निदर्शनास आले, तर आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार सतेज पाटील, पी. एन. पाटील यांच्यासह अरुण नरके, संदीप नरके, एस. आर. पाटील आदी १८ जणांनी मंत्रालयात सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी म्हणणे सादर केले. संचालकांच्या वतीने अॅड. लुईस शहा, दत्ताजी राणे, शिवाजीराव चव्हाण यांनी लेखी म्हणणे सादर करून बँकेच्या आर्थिक नुकसानीचे निकषच चुकीचे असल्याचा युक्तीवाद केला आहे.

बारा आजी-माजी संचालकांना नोटिसा मिळाल्या नसल्याने पुन्हा सर्व संचालकांना नोटिसा पाठवण्याचे आदेश सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांना दिले आहेत. गेल्या काही दिवसात जिल्हाबँकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षामुळे सर्वांच्याच नजरा सुनावणीकडे लागल्या होत्या. आता पुढील सुनावणी १४ ऑक्टोबरला होणार असली तरी, आजी-माजी संचालकांवरील कारवाईची टांगती तलवार मात्र कायम आहे, त्यामुळे १४ तारखेला सहकार मंत्री काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.

नुकसानीचे निकष चुकीचे असल्याचा दावा

जिल्हा बँकेकडील २८ थकबाकीदार संस्थांची वसुली सुरू आहे. पूर्ण कर्जवसुलीसाठी संबंधित संस्थांवर न्यायालयीन कारवाईही सुरू आहे, त्यामुळे थकीत रक्कम वसूल होऊ शकते. बँकेचा चौकशी अहवाल पाठवण्यात मुद्दाम घाईगडबड केली आहे. चौकशी अधिका-यांनी जाणीवपूर्वक हा अहवाल तयार केल्याचा दावा आजी-माजी संचालकांच्या वकिलांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या इंधन दरासाठी दोन दिवस प्रतीक्षा

$
0
0

कोल्हापूर : राज्य सरकारकडून पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी रद्द करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात याबाबतची अधिसूचना गुरुवारी उपलब्ध झाल्यामुळे तत्पूर्वी शहरात आलेल्या पेट्रोल व डिझेलवर एलबीटी लागू झाला आहे. त्यामुळे हा साठा संपेपर्यंत एलबीटी समाविष्ट दराने पेट्रोल व डिझेल विक्री होणार आहे. परिणामी शहरात व शहराबाहेर पेट्रोल व डिझेलचे नवे दर लागू होण्यासाठी ग्राहकांना दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल, असे जिल्हा पेट्रोलपंप संघटनेचे अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी सांगितले.

शहरात व शहराबाहेरील पेट्रोलच्या दरांमध्ये एलबीटीमुळे सुमारे पावणेचार रुपयांचा फरक पडत असल्याने एलबीटी रद्द करावी, अशी मागणी पेट्रोलपंप संघटनेतर्फ सातत्याने करण्यात येत होती. बुधवारी राज्य सरकारने दुष्काळ निवारण निधी उभारण्यासाठी पेट्रोल व डिझेलवर प्रत्येकी दोन रुपयांचा कर लावल्यानंतर ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागू नये, यासाठी तातडीने या दोन्हीवरील एलबीटी रद्द करण्याचाही निर्णय जाहीर केला. मात्र, याबाबतचे अधिकृत सूचना सरकारतर्फे न आल्याने गुरुवारी शहरामध्ये आलेला पेट्रोल व डिझेलसाठी एलबीटी कर भरून आणावा लागला होता. हा साठा संपेपर्यंत ग्राहकांना एलबीटी समाविष्ट दरानेच पेट्रोल व डिझेल खरेदी करावी लागेल. शुक्रवारपासून शहरात येणाऱ्या पेट्रोल व डिझेल साठ्या एलबीटी आकारण्यात येणार नसल्याने दोन दिवसांमध्ये ग्राहकांना शहरात व शहराबाहेर एकसमान दराने पेट्रोल उपलब्ध होऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेकापची यादी सोमवारी जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी महापालिका निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष आणि समविचारी संघटनांची आघाडी बांधून भांडवलशाहीच्या बळावर मतदारांची दिशाभूल करणाऱ्या राजकीय पक्षांना सक्षम पर्याय देणार असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महापालिकेच्या रिंगणात शेकाप आणि समविचारी संघटनेच्या उमेदवारांची यादी पाच ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

मतदारांना आर्थिक आमिष देणाऱ्या, स्वत:चे खिसे भरणाऱ्या इच्छुकाला शेकापसोबत घेतले जाणार नाही ही पहिली अट असून चारित्र्यवान आणि स्वच्छ कारभार करणाऱ्यांना शेकापतर्फे उमेदवारीची संधी देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सर्व ८१ प्रभागात नसले तरी किमान १५ प्रभागात तरी शेकाप व समविचारी संघटनेचा उमेदवार उभा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाकीट संस्कृती मोडून काढण्यासाठी आणि पैशाच्या बळावर मतदारांना गृहित धरणाऱ्यांना भानावर आणण्यासाठी शेकाप रणनिती आखणार आहे. शेकापसोबत नॅशनल ब्लॅक पँथर, बहुजन परिवर्तन पार्टी, महाराष्ट्र विकास आघाडी, दलित ऐक्य चळवळ, संभाजी ब्रिगेड, निर्मिती विचारमंच, भटके व विमुक्त जमाती संघटना, प्रबोधन मंच, नालंदा विचारमंच, सम्यक प्रतिष्ठान, कोल्हापूर महापालिका बचाव कृती समिती आदी पक्षसंघटना मिळून महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार आहेत. त्यासाठी भ्रष्टाचारमुक्ती, महापालिकेच्या शाळांना ऊर्जितावस्था, महिलांसाठी स्वच्छतागृहे, सक्षम आरोग्यव्यवस्था रंकाळा व पंचगंगा प्रदूषणमुक्ती या अजेंड्यावर शेकाप विकासाची दिशा निश्चित करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

पत्रकार परिषदेला ज. रा. दाभोळे, डॉ. सुनील पाटील, अनिल म्हमाने, दिगंबर लोहार, बाजीराव नाईक, बाबूराव कदम, संदीप संकपाळ, मनीष महागावकर, पंडित सडोलीकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात व शहराबाहेर दर सारखेच

$
0
0

पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी रद्द झाल्याचा परिणाम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बुधवारी राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आता शहरात व शहराबाहेर एकाच दराने पेट्रोल व डिझेल उपलब्ध होऊ शकेल. यापूर्वी शहरामध्ये पेट्रोलसाठी ३.८५ रुपये, तर डिझेलसाठी २.८० रुपये एलबीटी आकारण्यात येत होता. आता हा कर रद्द झाल्याने राज्य सरकारने २ रुपये दुष्काळ निवारण निधी लागू केल्यानंतरही शहरवासियांना प्रत्यक्षात ६६.६८ रुपयांनी पेट्रोल उपलब्ध होऊ शकेल.

बुधवारच्या फेरआढाव्यात केंद्र सरकारने पेट्रोलच्या किमती 'जैसे थे' ठेवल्या असून डिझेलच्या किमतीत ५० पैशांची वाढ केली होती. त्याचवेळी राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवर दोन रुपये दुष्काळ निवारण निधी आकारताना दोन्हीवरील एलबीटी रद्दचा निर्णय घेतला होता. यामुळे पूर्वी शहरात व शहराबाहेरील पेट्रोलच्या किमतीत सुमारे पावणेचार रुपयांचा फरक असायचा, तो नाहीसा झाला आहे. डिझेलच्या किमतीवर मात्र या निर्णयामुळे केवळ तीस पैशांचा फरक पडेल. ३० सप्टेंबरपर्यंत डिझेलचा दर शहरात ५१.३५ रुपये, तर शहराबाहेर ४८.६८ रुपये इतका होता. आता केंद्रसरकारची डिझेल दरवाढ, एलबीटी रद्दचा निर्णय व दुष्काळ निवारण निधी अधिभार या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन डिझेलची किंमत शहरात व शहराबाहेर ५१.०६ रुपये इतकी असेल.

नवे दर (शहरात व शहराबाहेर)

पेट्रोल ६६.६८

डिझेल ५१.०६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आचासंहिता नाट्य’

$
0
0

निवेदन न स्वीकारल्याने कलेक्टर कक्षासमोर राष्ट्रवादीचा ठिय्या

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भर उन्हात मोर्चा घेऊन आलेल्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाचे निवेदन आचारसंहितेमुळे स्वीकारताना येणार नसल्याचा पवित्रा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी घेतल्याने राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने त्यांच्या कक्षासमोरच ठिय्या मारला. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी सुमारे अडीच तास हे 'आचारसंहिता नाट्य' रंगले. अखेर प्रधान सचिव (कामगार) यांच्या नावे निवेदन तयार केल्यानंतर त्यांनी सैनी यांनी निवेदन स्वीकारले.

बांधकाम, घरेलू कामगार आणि झोपडपट्टीधारकांच्या मागण्यांसाठीचा राष्ट्रवादी पक्षाने मोर्चा काढला होता. दुपारी दीडच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आला. आंदोलकांनी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरण्याचा प्रयत्न केला. पण, मोठ्या प्रमाणात तैनात असणाऱ्या पोलिसांनी त्यांना आडविले. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना विनंती केल्यानंतर काही निवडक लोकांचे शिष्टमंडळ आत सोडण्याची परवानगी देण्यात आली. आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली निवडक कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी गेले. मात्र जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी आचारसंहितेमुळे भेटू शकत नाही, निवेदन पोलिसांना देण्यात यावे, असा पवित्रा घेतला. यामुळे शिष्टमंडळ भडकले. जिल्हाधिकारी जनतेचा नोकर आहे, आम्ही कोणतीही चोरी केलेली नाही, लोकांच्या प्रलंबीत प्रश्नांसाठी येथे आलो आहोत, आचारसंहितेमुळे निवेदन घेता येत नसल्याचा शासकीय आदेश दाखवावा अशा स्वरुपाच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी दरवाजावर आदळआपट केली. तर काही कार्यकर्ते करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे यांच्या अंगावर धावून गेल्याने वातावरण काहीकाळ तणावपूर्ण झाले.

जिल्हा पोलिसप्रमुखांची पळापळ

दरम्यान, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी शिष्टमंडळाची भेट घेऊन निवेदन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शिष्टमंडळही इरेला पेटले होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनीच निवेदन स्वीकारावे अन्यथा ते त्यांच्या कक्षाच्या दरवाजाला चिकटवून जाण्याचा इशारा दिला. यामुळे ‌शर्मा यांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांच्याकडून आणलेल्या आचारसंहितेच्या प्रतीतील नियम दाखवून त्यांनी निवेदन इतर अधिकाऱ्यांना द्यावे असे सुचविले. मात्र हा प्रस्ताव धुडकावून लावत आ. मुश्रीफ यांनी थेट निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. झाला प्रकार सांगितल्यावर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मोबाइल देण्यास सांगितले. यामुळे स्वत: जिल्हा पोलिसप्रमुख मोबाईल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. त्यांचे बोलणे झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन 'प्रधान सचिव (कामगार)' यांच्या नावे द्यायला सांगून अडीच तासानंतर ते स्वीकारले.

हक्कभंग दाखल करणार सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासंदर्भातील निवेदन घेऊन न येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या ‌शिष्टमंडळाला अशी वागणूक देणाऱ्या जिल्हाधिकारी सैनी यांचा निषेध करतो. आगामी अधिवेशानात त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारी निश्चितीवरून काँग्रेसमध्ये गटबाजी

$
0
0

नेते मंडळीतच एकमत नसल्याने यादीला उशीर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इच्छुकांची संख्या मोठी आहे, सोबतीला कार्यकर्ते आहेत. पण पक्षातील गटबाजी मात्र संपायला तयार नाही. परिणामी निवडणुकीच्या धामधुमीत अन्य पक्षांनी उमेदवारी जाहीर करत एक पाऊल पुढे टाकले असताना काँग्रेस पक्षात मात्र अजून उमेदवारी निश्चितीवरून राजकारण सुरू आहे. काही प्रभागात नेते मंडळीतच एकमत होत नसल्याने उमेदवारी यादीची घोषणा प्रदेश पातळीवर पोहचली आहे. दुसरीकडे गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले काही नगरसेवक अन्य पक्षाची वाट धरत आहेत.

महापालिकेत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. येत्या निवडणुकीत महापालिकेत पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस कमिटीत दोन दिवस झालेल्या मुलाखती दरम्यान प्रभागनिहाय मुलाखती झाल्या. ८१ प्रभागासाठी ३५० हून अ​धिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी मुलाखती घेतल्या. एकेका प्रभागासाठी चार, पाच उमेदवार इच्छुक आहेत. यामुळे उमेदवारी द्यायची कुणाला आणि एकाला उमेदवारी दिली तर दुसरा बंडखोरी करणार हे निश्चित असल्याने काँग्रेसकडून यादी जाहीर करण्यास उशिर होत असल्याचे कारण सांगितले जात आहे.

वास्तवात काही प्रभागातील उमेदवारीवरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत होत नाही. गेल्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे ३३ नगरसेवक निवडून आले. मात्र हे सगळे नगरसेवक माजी मंत्री सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या गटात विखुरले. गेली पाच वर्षे महापालिकेवर सतेज पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. या कालावधीत सतेज पाटील गटाच्या नगरसेवकांना झुकते माप मिळाल्याची अन्य गटाच्या नगरसेवकांची तक्रार आहे. यंदाच्या निवडणुकीत माजी आमदार मालोजीराजे छत्रपती हे अलिप्त आहेत. गेल्या पाच वर्षात राजे गटाला सन्मानाची वागणूक मिळाली नाही असे त्यांचे म्हणणे आहे. यंदा तर मालोजीराजे निवडणुकीपासून अलिप्त राहिल्याने त्यांचे समर्थक आजी माजी नगरसेवक अन्य पक्षाची उमेदवारी घेत आहेत. जिल्हाध्यक्ष पाटील गटाच्या नगरसेवकांनाही पदे मिळाली नाहीत. सध्या काँग्रेसचे सूत्रे जिल्हाध्यक्ष पाटील व माजी मंत्री पाटील यांच्याकडे आहेत. माजी मंत्री पाटील यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. काँग्रेसने पहिल्या टप्प्यात १८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये बहुतांश सगळे उमेदवार हे सतेज पाटील यांना मानणारे आहेत. उमेदवारी जाहीर करण्यात अन्य पक्षांनी बाजी मारली असताना काँग्रेसमध्ये मात्र उमेदवारी कुणाला द्यायची यावरून एकमत होत नाही. शहरातील काही प्रभागातील उमेदवारीवरून नेत्यांमध्ये मतभेद आहेत. बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, राजारामपुरी एक्स्टेंशन येथील उमेदवारी कुणाला ? हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम महिलांना ‘निवडणूक बंदी’ !

$
0
0

'मज्लिसे शुरा उलेमा ए' चा अजब फतवा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजकारणात महिलांना कर्तृत्व दाखवण्याची संधी देण्यासाठी पन्नास टक्के आरक्षण दिले असतानाच मुस्लिम महिलांनी निवडणुकीच्या, राजकारणाच्या फंदातच पडू नये, असा अजब फतवा कोल्हापुरातील मुस्लिम धर्मगुरूंनी काढला आहे. याबाबत 'मज्लिसे शुरा उलेमा ए कोल्हापूर,' यांनी हा फतवा काढल्याने मुस्लिम समुदायात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महापालिका निवडणुकीत मुस्लिम महिलांना उमेदवारीच देऊ नका अशी गळही या संघटनेच्यावतीने काही पक्षांना घालण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याबद्दल प्रगतशील मुस्लिम संघटनांच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. १ नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. सर्वच पक्षांनी ४० ते ५० उमेदवारांची घोषणा केली आहे. येत्या पाच दिवसांत इतर उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर 'मज्लिसे शुरा उलेमा ए'च्या फतव्याने काही पक्षासमोर व इच्छूक उमेदवारासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 'मज्लिसे शुरा उलेमा ए,' ही मशिदीचे मौलाना अर्थात धर्मगुरूंची संघटना आहे. कोल्हापुरात साधारणतः १५० मशिदी आहेत. प्रत्येक मशिदीत एक धर्मगुरू असून त्यांची ही संघटना आहे.

मुस्लिम महिलांनी निवडणूक लढवणे म्हणजे मुस्लिम धर्माच्या विरोधात असल्याचे या संघटनेने म्हटले आहे. कुराण, बुखारी शरीफ, शरहुस्सुन्नह, तिमर्जी शरीफ या धार्मिक ग्रंथांतील काही दाखले देत महिलांनी मुक्तपणे समाजात वावरणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. याबाबत एक निवेदन देण्यात आले असून 'मुस्लिम महिलांनो, निवडणुकीच्या फंदात पडू नका', असा फतवाच काढला आहे. या फतव्यामुळे अनेक महिलांनी निवडणुकीपासून चार हात लांब राहणे पसंत केले आहे. मात्र काहींनी धाडस करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे महिलांना राजकारणात संधी मिळावी, यासाठी पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पण, दुसरीकडे महिलांनी राजकारणातच येऊ नये म्हणून फतवा निघाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

धर्मगुरूंच्या या संघटनेने हे निवेदन अनेक ठिकाणी वितरीत केले. इच्छूक महिला उमेदवारांनाही ते देण्यात आले. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सध्या सर्वच पक्षाच्या वतीने लढण्यासाठी कोल्हापुरातील १५ ते २० प्रभागात मुस्लिम महिला इच्छूक आहेत. काही महिला अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मुस्लिम महिलांना उमेदवारी दिल्यास मुस्लिम तुमच्या पक्षाला मतदान करणार नाहीत, असा इशाराही दिल्याचे स​मजते. यामुळे पक्षाच्या नेत्यांत तसेच प्रगतशील मुस्लिम संघटनांच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

मत विकू नका

एकीकडे महिलांनी राजकारणात येऊ नका असा आदेश देताना दुसरीकडे या समितीने निवडणुकीत वाटल्या जाणाऱ्या पैशाबाबत आक्षेप घेतला आहे. तुमचं मत विकू नका असे आवाहन करताना मतासाठी पैसा देणारा व घेणाराही दोषी आहे. मतासाठी पैसे घेणे म्हणजे लाच घेण्यासारखे आहे. किरकोळ पैशासाठी स्वाभिमानाचा सौदा करू अशी सुचना त्यांनी केली आहे.

पुरोगामी नगरीत पडसाद उमटणार

पुरोगामी शहर म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरातच असा फतवा प्रथमच निघाला आहे. या आधी महापालिका सभागृहात तीन ते चार मुस्लिम महिलांनी प्रतिनिधीत्व केले आहे. पण निवडणूक लढवणाऱ्या महिलांची संख्या कमी होती. यंदा ती वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर निघालेल्या या फतव्याबाबत प्रमुख राजकीय पक्ष काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली, साताऱ्याला पावसाने झोडपले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगली जिल्ह्यात सर्वत्रच दमदार पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी सांगली, मिरज, तासगावसह अनेक भागांत जोरदार पाऊस कोसळत राहिला. विजांच्या कडकडाटासह रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर तासगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.

तीन दिवसांपासून सांगली जिल्ह्यातल्या विविध भागांत पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. सलग तीन दिवस पाऊस सुरु असल्याने रब्बी पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त आहे. मात्र, या वेळी सोयाबीन काढणी आणि मळणीचा हंगाम असल्याने तो शेतकरी खोळंबला आहे. शुक्रवारी तासगाव तालुक्यातील कवठेएकंद परिसराला पावसाने चांगलेच झोडपले. सांगलीत रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरू होती. सांगली जिल्ह्यात गुरुवारी आणि शुक्रवारी सलग झालेल्या दमदार पावसामुळे रब्बी हंगामाच्या तयारीला वेग येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूमुळे आरोग्य यंत्रणा सज्ज

$
0
0

स्वाइनफ्लू, डेंगीसह साथीच्या रूग्णांत होतेय वाढ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गर्दीच्या ठिकाणी स्वाइन फ्लूची बाधा होण्याची शक्यता जास्त असल्याने गणेशोत्सवानंतर स्वाइन फ्लू, डेंगीसह साथीच्या आजाराच्या रूग्णांत वाढ होत आहे. हे आजार हवेमार्फत होत असल्यामुळे गर्भवती महिला, लहान मुले आणि मधुमेह व रक्तदाब असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी गर्दीत गेलेल्यांपैकी अनेकांना या आजाराची लागण झाल्याची नोंद शहर व जिल्ह्याच्या आरोग्य केंद्रांत झाली आहे. प्राथमिक टप्प्यावर असलेल्या रूग्णांना टॅमी फ्ल्यू गोळ्या महापालिका व सीपीआर हॉस्पिटलच्या आरोग्यविभागामार्फत पुरवण्याची यंत्रणा सतर्क झाली आहे. तमनाकवाडा आणि कापशी येथील रुग्णांचा बळी गेल्याने भीतीचे वातावरण आहे.

दहा दिवस धोक्याचे

गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी गर्दीत गेलेल्यांपैकी काहीजणांना स्वाइनफ्ल्यूची बाधा असल्याचे निदान झाले आहे. आता गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत ज्यांचा गर्दीतील लोकांशी संपर्क आला होता त्यांना स्वाइनची लक्षणे दिसू लागली आहेत. मात्र स्वाइनफ्ल्यूचे निदान होण्यासाठी किमान दहा दिवसाचा अवधी लागतो. त्यामुळे हे दहा दिवस धोक्याचे असू शकतात. येत्या चार दिवसांमध्ये रूग्णांचे निदान होण्याची शक्यता जास्त आहे.

९ महिन्यात ३६ जणांचा बळी

जानेवारी ते सप्टेंबर या या नऊ महिन्यांच्या काळात स्वाइनची लक्षणे असलेले ३१० रूग्ण आढळून आले. त्यापैकी १४८ जणांना प्रत्यक्ष स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. यामध्ये शहरातील ४६ रूग्णांचा समावेश आहे तर ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांपैकी सहाजण कोल्हापूर शहरातील आहेत. मृतांमध्ये कोल्हापूर शहरासह कागल, हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, इचलकरंजी, गडहिंग्लज येथील रूग्णांचा समावेश आहे.

महापालिका आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये गर्दीच्या ठिकाणी, उद्याने, चित्रपटगृहे, मैदाने याठिकाणी काळजी, लक्षणे याविषयी माहितीफलक लावले आहेत. आयसोलेशन हॉस्पिटल येथे ​स्पेशल वॉर्ड तयार करण्यात आला आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

-डॉ. दिलीप पाटील, आरोग्य अधिकारी, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images