Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कारभाऱ्यांचे मौन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महानगरपालिकेतील सत्तारुढ राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील करतात. मात्र, गेल्या पाच महिन्यांत वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ होऊनही या दोन्ही नेत्यांनी ना महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवकांना फटकारले, ना जबाबदार अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाहतूक सुधारणेसाठी प्रयत्न केले.

दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहर वाहतूक नियंत्रणासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश ९ मे २०१७ रोजीच्या बैठकीत जिल्हा पोलिस अधीक्षकांना आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाच्या स्तरावरूनही फारसे काहीही झालेले नाही. लोकप्रतिनिधींच्या स्तरावर प्रश्नांच्या पाठपुराव्याकडे काणाडोळा झाल्यानेच ही स्थिती ओढवली आहे.

रविवारी (ता. १ ऑक्टोबर) झालेल्या भीषण अपघाताप्रमाणेच गेल्या सहा महिन्यांत शहरात अपघातांची संख्या वाढली आहे. २१ जुलै रोजी उमा टॉकीज चौकात चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे नियंत्रण सुटले. सिग्नलवर थांबलेल्या या एसटी बसने दोघांचा बळी घेतला. त्यासह शहर परिसरात झालेल्या अपघातात पाचजणांना जीव गमावावा लागला. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महानगपालिकेने वाहतूक सुधारणांसाठी फारसे प्रयत्न केलेले नाहीत. ऑक्टोबर २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत महापालिकेवर आघाडीची सत्ता आली. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे महापौरपद तर काँग्रेसकडे स्थायी समिती सभापतिपद आहे. मात्र, शहराच्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये गेल्या तीन महिन्यांत वाढ झाली आहे. सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, फेरीवाल्यांची बेशिस्त, रस्त्यावरच येऊन ठेपलेले फेरीवाले, पार्किंगचा प्रश्न शहरवासीयांसमोर असताना या नेत्यांनी यासंदर्भात ना महापौर, स्थायी सभापती, परिवहन सभापती यांच्याकडे विचारणा केली, ना अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जुलै महिन्यात झालेल्या उमा टॉकीज येथील अपघातानंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेबाबत तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता होती. प्रत्यक्षात सिग्नल सिंक्रोनायझेशन वगळता महापालिकेच्या स्तरावर काहीही झाले नाही.

आमदार क्षीरसागर यांच्या कार्यक्षेत्रात शहरातील ५३ प्रभाग आहेत. त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकाकडे केएमटीचे सभापतिपद आहे. त्यांच्याकडूनही केएमटी सुधारणेसह वाहतूक व्यवस्थेतील सुधारणांसाठी महापालिकेच्या स्तरावर बैठका, जादा निधी असे प्रयत्न झालेले नाहीत. केवळ पत्रक प्रसिद्ध करून त्यांनी महानगरपालिकेला जबाबदार धरले आहे.

पालकमंत्र्यांचे प्रयत्न पण...

नागपूरच्या धर्तीवर कोल्हापूर शहरात वाहतूक सुधारणा व्हावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रयत्न आहेत. त्यांनी यापूर्वी ९ मे २०१७ रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात वाहतूक नियोजन आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे मान्य करत यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शहराचा एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांना दिल्या होत्या. बैठकीत बंद ११ सिग्नल, सिग्नल सिंक्रोनायझेशन, वाहतुकीस अडथळा करणारे दुकानदार, फेरीवाल्यांवर कारवाई, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर आदी बाबींवर चर्चा झाली. प्रत्यक्षात प्रशासनाच्या स्तरावरूनही काहीही झाले नाही. यासाठीही पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यापुढे जामीन घेणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोकरीत कायम करावे यासह अन्य मागण्यांसाठी सलग २५ दिवस संप करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी गुरुवारी जेलभरो आंदोलन केले. सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य न केल्यास १० ऑक्टोबरला पुन्हा जेलभरो आंदोलन करणार असल्याची घोषणा यावेळी अंगणवाडी सेविकांनी केली. सेविका अटक करुन घेतील पण जामीन घेणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला.

अंगणवाडी सेविकांनी रेल्वे स्टेशन व जिल्हाधिकारी कार्यालय या दोन ठिकाणी आंदोलन केले. अंगणवाडी सेविकांच्या लाल निशान पक्षाच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन परिसरात रस्ता रोको आंदोलन केले. शाहूपुरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. महाराष्ट्र अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली टाऊन हॉल येथून भाकपचे नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ‘मानधन नको,पगार द्या’, ‘एक रुपयाची अंबाडी, सरकार करतेय लबाडी’, ‘एक रुपयाचा कडीपत्ता, पंकजा मुंडे बेपत्ता’, अंगणवाडी सेविकांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यावर ​निदर्शने करण्यात आली. त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी अटक करवून घेतली. पोलिसांनी शुभांगी पाटील, भारती चव्हाण, सुनंदा खाडे, जयश्री पोवार, रेखा आयवाळे, मीना पोवार, विद्या प्रभावळे, भारती बोलाईकर, मीना पाटील, वंदना चोपडे, शकुतंला पाटील, कांचन मगदूम, आनंदी कांबळे यांच्यासह अंगणवाडी सेविकांनी अटक करवून घेतली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन व्हॅनमधून पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर अटक न करता त्यांना सोडून दिले. अंगणवाडी सेविकांची मागण्या सरकारने मान्य न केल्यास १० ऑक्टोंबर रोजी पुन्हा जेलभरो आंदोलन करण्यात येईल. त्यावेळी जामीन घेणार नाही, असा इशारा संघटक शुभांगी पाटील यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर- शिर्डी रेल्वेसाठी ५३ प्रवाशांकडून आरक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर ते शिर्डी या मार्गावर सुरू करण्यात आलेल्या ‘हॉलिडे स्पेशल’ रेल्वेगाडीच्या दुसऱ्या फेरीसाठी ५३ प्रवाशांनी नोंदणी केली आहे. पहिल्या फेरीत या गाडीला १९० प्रवासी मिळाले होते. १० ऑक्टोबर रोजी रेल्वेची शेवटची फेरी असेल. या तीन आठवड्यांतील तीन दिवसांची सरासरी प्रवाशीसंख्या पाहून रेल्वेची नियमित सेवा देण्यासाठी पुणे विभागाकडून विचार केला जाईल. प्रतिसाद न मिळाल्यास ही रेल्वे मिरज येथून सोडली जाईल अशी शक्यता आहे.

छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवर २७ सप्टेंबरपासून सायंकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी गेल्या बुधवारी कोल्हापूर ते शिर्डी मार्गावर रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला. पर्यटनवाढीसाठी रेल्वेमोलाची कामगिरी बजाविणार आहे. मिरज रेल्वेस्थानकावर थांबणारी ही रेल्वे साईनगर (शिर्डी) मार्गासाठी मंजूर करण्यात आली. यापूर्वी कोल्हापूर ते तिरुपती मार्गावरील रेल्वेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्याने कायमस्वरुपी रेल्वे गाडी सुरू झाली. आता कोल्हापूर-शिर्डी मार्गावर हॉलिडे स्पेशल ट्रेन म्हणून सुरू झाली. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार रेल्वेसेवा नियमित सुरू राहणार आहे. मात्र दुसऱ्या फेरीत कोल्हापूर ते शिर्डीसाठी अपेक्षाइतका प्रतिसाद मिळालेला नाही.

हॉलिडे स्पेशल म्हणून दर बुधवारी ही रेल्वे कोल्हापूर रेल्वेस्थानकावरुन सायंकाळी ४ वाजून ३५ सुटणार आहे. गुरुवारी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी ती साईनगर (शिर्डी) येथे पोहोचेल. तीन तासांच्या विश्रांतीनंतर रेल्वे सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी तेथून प्रस्थान करेल. कोल्हापुरात रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी ही गाडी पोहोचेल. मिरज, सांगली, सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर हे याचे प्रमुख थांबे आहेत. सहा जनरल डबे, सात स्लीपर कोच, वातानुकूलित थ्री टायर दोन डबे, द्वितीय श्रेणीतील वातानुकूलित एक डबा असे एकूण १६ डबे या गाडीला आहेत. जनरलसाठी १७० रुपये, स्लीपर कोच ३३०, थ्री टायर एसी ९०५ आणि टू टायर एससीसाठी १२९५ रुपये तिकीटदर आहेत. रेल्वेची १२०० प्रवाशांची क्षमता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा मतदारांसाठी ऑनलाइन नोंदणी

$
0
0


कोल्हापूर ः मोबाइल आणि संगणकांशी मैत्री असलेल्या युवकांना घरबसल्या ऑनलाइन मतदार नाव नोंदणी करता येणे शक्य झाले असून त्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने कंबर कसली आहे. ऑनलाइन मतदार नोंदणी उपक्रमात शहरातील सर्व महाविद्यालयांना सहभागी करुन घेण्यात येणार आहेत. ही मोहीम सुरू झाली असून ती ३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. तीन ऑक्टोबर ते पाच जानेवारी या कालावधीत हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. एक जानेवारी २०१८ वर्ष पूर्ण असलेल्यांना मतदार यादीत नाव नोंदता येणार आहे. प्रत्येक मतदाराला मोबाइवरुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.

आयोगाने १४ ऑगस्ट २०१७ रोजी इआरओ नेट (ERO-Net) ही प्रणाली सुरु केली आहे. या प्रणालीनुसार नवीन नाव नोंदणी, यादीतील नाव कमी करणे, नावात दुरुस्ती शिवाय स्थलांतरासाठी www.nvsp.in (National Voters Service Portal) या वेबसाइटवर अर्ज भरता येणार आहे. ऑनलाइन अर्जासाठी रहिवासी, जन्मतारखेचा पुरावा, फोटो असे तीन पुरावे जोडावे लागणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात १२२५ मतदारांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. पण युवकांची संख्या प्रचंड असल्याने महाविद्यालयस्तरावर यंत्रणा राबवण्यात येत आहे. बारावीची परीक्षेचा निकाल लागल्यानंतर प्रवेश घेणाऱ्या ८६ हजार ९७ हजार विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज भरले आहेत. त्यापैकी २३ हजार ७७० अर्जाची नोंदणी झाली आहे. अद्याप ५८ हजार ७९७ विद्यार्थ्यांची नोंदणी व्हायची आहे. यापुढे नवमतदार नोंदणी ऑनलाइन होणार असल्याने शहरातील सर्व महाविद्यालयांशी संपर्क साधण्यात आला आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयांत ही मोहीम पुढील टप्प्यात राबवण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात एका प्राध्यापकाची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. महाविद्यालयात मतदार नोंदणीसाठी कॉलेज बोनाफाइड उपलब्ध करुन देणार आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांचा रंगीत आयकार्ड साइज फोटो, रहिवासी दाखला म्हणून बँक पासबुक, वीज बिल, पाणी बिल यांची फोटो कॉपी घेण्यात येणार आहे. सर्व डाटा एकत्र झाल्यानंतर एकत्रित नोंदणी केली जाणार आहे.

ग्रामीण भागात ऑनलाइन सुविधा नसल्याने प्रत्येक मतदार केंद्रांवरील बीएलओ (बूथ लेव्हलिंग ऑफिसर) मतदार नोंदणी अर्ज व कागदपत्रे घेणार आहेत.

अशी करा ऑनलाइन मतदार नोंदणी

मोबाईलवर रहिवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा कागदपत्रांच्या फोटो कॉपी घ्या
www.nvsp.in वेबसाइट ओपन करुन अर्ज भरा

कागदपत्राच्या फोटोकॉपी अपलोड करा.


००००

ऑनलाइन मतदार नाव नोंदणीसाठी महाविद्यालयांशी संपर्क साधला आहे. प्रत्येक महाविद्यालयात नोडल ऑफिसर नेमले आहेत. ग्रामीण भागातही प्रांताधिकारी व तहसिलदारांना महाविद्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. मोबाइल व कम्प्युटर यूजर फ्रेंडली तरुणाई असल्याने या उपक्रमाला चांगले यश येईल.

संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांकडून आठ दुचाकी जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ शिरगाव पोलिसांनी रेकॉर्डवरील दोन चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे पावणेतीन लाख रुपये किमतीच्या चोरीतील आठ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. विद्यानंद बसवराज स्वामी (वय २६, रा. भैरापूर, पो. मतिवडे, जि. बेळगाव) आणि किसन उर्फ बोबड्या उमाशंकर कुंभार (१९, रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर) अशी अटकेतील संशयित चोरट्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी परिसरात कारखान्यांच्या बाहेर पार्क केलेल्या दुचाकी चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी परिसरातील गस्त वाढवली होती. एमआयडीसीतून विना नंबरप्लेट दुचाकीवरून जाणारा संशयित विद्यानंद स्वामी याला पोलिसांनी अडवून त्याच्याकडे अधिक चौकशी केली. त्याने गोकुळ शिरगावसह इचलकरंजी, निपाणी, चिकोडी येथून साथीदारांसह दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडील विनानंबर प्लेटची दुचाकी तीन महिन्यांपूर्वी त्याने कणेरीवाडी येथील रेणुका कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळाबाहेरून चोरली होती. स्वामी याच्याकडून चोरीतील सात दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी किसन उर्फ बोबड्या कुंभार यालाही संशयितरित्या वावरताना ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून चोरीतील एक दुचाकी हस्तगत केली. हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत चोरटे आहेत. त्यांच्याकडून सुमारे पावणेतीन लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून, आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक युवराज खाडे, पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, सहायक फौजदार प्रकाश भंडारे, पोलिस हेड कॉन्स्टेबल समीर मुल्ला, प्रदीप जाधव आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा महिन्यात १७ कर्मचारी निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेत गेल्या दहा महिन्यात विविध कारणाखाली तब्बल १७ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. कामकाजात हलगर्जीपणा, पगारातील फरकाची रक्कम काढण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्याकडून लाच घेण्याचा प्रकार, रेकॉर्ड विभागातील दाखला उपलब्ध करुन देण्यासाठी नागरिकांकडून पैशाची मागणी अशा विविध कारणाखाली महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये आरोग्य निरीक्षक, वर्कशॉपचे प्रभारी अधीक्षक, लिपिक, शिपाई व झाडू कामगारांचा समावेश आहे. यापैकी दोघांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे.

कार्यालयीन शिस्त आणि संस्थेचा लौकिक जपण्यासाठी कारवाईची पावले उचलली असली तरी या साऱ्या प्रकरणांत महापालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. पापाची तिकटी येथे केएमटी बस ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसून अपघात झाला. प्रथमदर्शनी या अपघाताला कारणीभूत धरुन चालक आर. पी. पाटील यांना निलं‌बित केले. या साऱ्या पार्श्वभूमीवर महापालिकेत गैर कामकाज, प्रशासनाचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला. महापालिकेचा आरोग्य विभागाचा कामकाज हा थेट जनतेशी निगडीत आहे. आरोग्य विभागामार्फत शहराची स्वच्छता, ड्रेनेज लाइन, गटर्सची साफसफाई कामे होतात. मात्र या विभागात गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक कर्मचारी प्रशासनाला पूर्वकल्पना न देता गैरहजर राहणे, महिनोनमहिने ऑफिसच्या कामकाजात सहभागी न होणे या कारणाखाली प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात ११ झाडू कामगार निलंबित केले. तर २९ कर्मचाऱ्यांची बडतर्फी केली होती. निलंबित कर्मचाऱ्यांच्या यादीत वर्कशॉपचे तत्कालिन प्रभारी अधीक्षक चेतन शिंदे यांचाही समावेश आहे.

लाच प्रकरणी दोघे निलंबित

एप्रिल महिन्यात रेकॉर्ड विभागातील श्रीमती लक्ष्मी चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. नागरिकाला जुना दाखला काढून देण्यासाठी चव्हाण यांनी लाचेची मागणी केली होती. आस्थापना विभागात पहारेकरी म्हणून नियुक्ती असलेल्या कुंदन लिमकरने पगारातील फरकाची रक्कम काढण्यासाठी महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांकडून २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. महापालिकेतील आरोग्य विभागातील निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यावर मे महिन्यात निलंबनाची कारवाई झाली. राजेंद्र पाटील यांनी कामावर हजर नसणाऱ्या कर्मचाऱ्यांची हजेरी मांडली होती. गैरहजर कर्मचाऱ्यांना ऑनड्युटी दाखविण्यासाठी त्यांनी संबंधितांकडून रक्कम उकळल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. नगरसेवकांनी या प्रकरणावरुन प्रशासनावर टीका केल्यानंतर चौकशी झाली होती.

८५ कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ रोखली

महापालिकेत दफ्तर दिरंगाई, मुदतीत फायलींचा निपटारा करण्यास विलंब ही जणू नित्याची बाब बनली आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने, नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी हेल्पलाइप कक्ष सुरू केला. नागरिकांना घरबसल्या सुविधा उपलब्ध केली. नागरिकांनी तक्रार नोंदविल्यानंतर संबंधित विभागाकडून त्यांच्या समस्यांची सोडवणूक झाली पाहिजे, यासाठी तत्कालिन आयुक्त पी. शिवशंकर यांनी हेल्पलाइन संकल्पना राबवली. अधिकाऱ्यांना कामकाजाच्या नोंदीचे गुगल कॅलेंडर सक्तीचे केले. मात्र त्याकडे काही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. कामकाजात हलगर्जीपणा दाखविणाऱ्या ८५ कर्मचाऱ्यांची पगारवाढ रोखण्याची कारवाई त्यांच्या कालावधीत झाली.

सावंत पुन्हा केंद्रस्थानी

केएमटी वर्कशॉप विभागाचे वर्क्स मॅनेजर एम. डी. सावंत पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आहेत. महापालिकेतील वर्कशॉपमधील घोटाळ्याप्रकरणी त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. केएमटीच्या अपघातानातर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चौकशीचे शुक्लकाष्ट त्यांच्या मागे लागले आहे. याआधी निविदा न काढता खरेदी, शंभर रुपयांची वस्तूची खरेदी १००० रुपयांना, एस्ट‌िमेटचा अभाव व वरिष्ठांची मंजुरी न घेता कंटेनर दुरुस्ती, बाजारभावापेक्षा जादा दराने स्पेअर पार्टची खरेदी याप्रकरणी सावंत यांच्यावर ठपका आहे. महापालिकेच्या वर्कशॉपमध्ये वाहने दुरुस्तीची यंत्रणा असताना बाहेरून वाहन दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये खर्ची टाकले आहेत. बूम वाहन खरेदीत तब्बल ४५ हजार रुपये जादाचे बिल लावले आहे. तत्कालिन उपायुक्त विजयकुमार खोराटे यांच्या वाहनातील सीट कव्हर बदलण्यासाठी बाजारभावापेक्षा तब्बल ४५ हजार रुपये जादा बिल दिले. सावंत यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला होता. सावंत यांच्या कामकाजाची दोन टप्प्यावर चौकशी झाली. महापालिकेकडून कागदोपत्री तर शिवाजी विद्यापीठातील तांत्रिक सल्लागारांकडून तांत्रिक कामाची चौकशी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस अपघातातील दोषींवर दोन दिवसांत कारवाई

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएमटी बस अपघाताची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने गुरुवारी सायंकाळी आयुक्त अभिजित चौधरी यांच्याकडे अहवाल सादर केला. मात्र या अहवालात काही त्रुटी आढळल्याने आयुक्तांनी, समिती सदस्यांना अहवाल परिपूर्ण होण्यासाठी तांत्रिकसह अन्य काही गोष्टींची सुधारणा करण्याच्या सूचना केल्या आहेत. आवश्यक त्या सुधारणा करुन फेर अहवाल सादर झाल्यानंतरच त्याला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे.

अपघातप्रकरणी चौकशीअंती जे दोषी असतील त्यांची सुटका नाही. येत्या दोन दिवसांत दोषीवर कडक कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी स्पट केले.

आयुक्तांनी अहवालात सुधारणा करण्याच्या सूचना केल्याने शुक्रवारी काही बाबींची चौकशी करुन त्यानंतर अहवालाला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासन, दोषी अ​धिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याआधी आरटीओचा अहवालही विचारात घेतला जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले आणि मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांच्या समितीने गेल्या चार दिवसांत अपघात नेमका कशामुळे घडला, याची चौकशी करताना तांत्रिक बाजू तपासल्या. बस सुस्थितीत होती की खराब, वर्कशॉप विभागातील लॉगबुकमधील नोंदी, त्या संदर्भात वर्कशॉप विभागातील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. तपासात कच्चे दुवे राहू नयेत म्हणून वर्कशॉप विभागातील तंत्रज्ञांची मदतही घेतली आहे.

गुरुवारी सायंकाळी समिती सदस्यांनी आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी आयुक्तांकडे पाच पानी चौकशी अहवाल सादर केला. यावेळी झालेल्या चर्चेत आयुक्तांना त्यात काही त्रुटी आढळल्या. अहवाल परिपूर्ण होण्याच्यादृष्टीने समितीने आवश्यक सुधारणा कराव्यात, काही घटकांचे तपशील जोडावेत असे आयुक्तांनी सुचविले. चौकशी समिती पुन्हा शुक्रवारी त्यावर काम करणार आहे. त्यानंतरच अहवालाला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे.


कारवाईसाठी वाढता दबाव

अपघातास जबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी यासाठी प्रशासनावर दबाव वाढत आहे. प्रशासनाने, प्रथमदर्शनी चालक आर. पी. पाटील यांना निलंबित तर केएमटी वर्कशॉप विभागातील वर्क्स मॅनेजर एम. डी. सावंत व प्रभारी वाहतूक निरीक्षक रवींद्र धुपकर यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. त्या दोघांवर कारवाईची मागणी राजारामपुरीतील शिष्टमंडळाने केल्यावर आयुक्तांनी चौकशीअंती चूक कुणाची हे स्पष्ट होईल, दोषी अधिकाऱ्यांची गय करणार नसल्याची ग्वाही दिली.


बसमध्ये दोष नाही

गंगावेश येथील अपघातातील केएमटी बसमध्ये दोष नसल्याचे सकृतदर्शनी निष्पन्न झाल्याचे समजते. त्यादृष्टीने विविध विभागांचे बसचे तपासणी अहवाल घेण्यात आल्याचे समजते. त्यानंतर हा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. बसमध्ये तांत्रिक दोषी नसल्याचा अहवाल जर सादर झाला तर या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका कुणावर कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फॉरवर्ड मराठी’ पाऊल पडते पुढे !

$
0
0

कोल्हापूरची क्रीडा परंपरा

Satish.ghatage@timesgroup.com

कोल्हापूर ः फुटबॉलवेड्या कोल्हापुरातील अनिकेत जाधव दिल्लीत होणाऱ्या ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून प्रतिनिधीत्व करणार आहे. अकरा क्रमांकाची जर्सी परिधान करणाऱ्या अनिकेत भारतीय संघातील मुख्य फॉरवर्ड असून प्रतिस्पर्धी संघावर गोल डागण्यासाठी सज्ज झाला आहे. सतरा वयोगटातील या स्पर्धा आहेत. महाराष्ट्रातून संघात निवड झालेला अनिकेत हा एकमेव खेळाडू आहे.

क्रिकेट, हॉकी, फुटबॉल या सांघिक खेळात भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना जिवाचे रान करावे लागते. सांघिक खेळात भारतीय क्रिकेट संघात एस.आर. पाटील एका कसोटी सामन्यात खेळले होते. महिला क्रिकेटमध्ये अमृता शिंदे तर व्टेंटी व्टेंटी भारतीय संघात कोल्हापूरच्याच अ​नुजा पाटीलने प्रतिनिधीत्व केले आहे. फुटबॉलमध्ये भारतीय संघाकडून निखिल कदम, सुखदेव पाटील, अनिकेत जाधव भारतीय संघात प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र भारतीय संघाकडून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उतरणारा पहिला खेळाडू म्हणून अनिकेतच्या नावाची नोंद इतिहासात होणार आहे.

लहानपणी शाहू स्टेडियमवर फुटबॉलचे सामने पाहणाऱ्या अनिकेतला त्याच्या मामांनी वयाच्या अकराव्या वर्षी पुण्यातील बालेवाडी क्रीडा प्रबोधिनीत दाखल केले. जयदीप अंग्रीवाल याच्याकडून त्याला फुटबॉलचे बाळकडू मिळाले. एकीकडे शिकत पुण्याच्या एफसीमध्ये १५ वयोगटात त्याचा समावेश झाला. पुण्याकडून खेळताना निवड समितीचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. २०१४ मध्ये जर्मनीच्या एफसी बायर्न संघाच्या पॉल ब्रेटनर यांनी अनिकेतला हेरले. त्यावेळी अनिकेत मधल्या फळीत राइट हाफ पोझिशनवर खेळत होता. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना झुकवत चढाया करणाऱ्या अनिकेतला फॉरवर्ड पोझिशनला खेळवण्याचा सल्ला पॉल ब्रेटनर यांनी पुणे एफसी संघाला दिला. लेफ्ट विंग ही फुटबॉलमधील अवघड पोझिशन आहे. डाव्या बगलेतून चेंडू पळवत डी क्षेत्रात धडक मारण्याचे कसब अनिकेतने बाणवले आहे. भारताचा मुख्य स्ट्रायकर, फॉरवर्ड म्हणून अनिकेतने दबदबा निर्माण केला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ अ​मेरिका, युरोप दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात त्याची कामगिरी डोळ्यात भरणारी ठरली आहे. युरोप दौऱ्यात स्पेनच्या क्लबच्या विरुद्ध अनिकेतने हॅट्ट्रीक साजरी केली. अमेरिका दौऱ्यात चिलीबरोबर भारताने १-१ अशी बरोबरी साधली तर कोलंबिया व मेक्सिकोबरोबर हार स्वीकारावी लागली, पण स्पर्धेतील अनुभवाच्या जोरावर गुरुवारी भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत उतरत आहे.

भारताचा उद्घाटनाचा सामना अमेरिकेबरोबर होणार आहे. या सामन्यात अनिकेतला संधी मिळणार आहे. भारताचा स्टार खेळाडू म्हणून प्रतिस्पर्धी संघांची त्याच्यावर नजर असेल. अमेरिका, घाना आणि कोलंबिया या दिग्गज संघाबरोबर भारतीय संघाची कसोटी लागणार आहे. तीन सामन्यांपैकी एका सामन्यात तरी भारतीय संघ विजयी होईल, अशी प्रशिक्षकांना आशा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारी कर्मचाऱ्यांची कर्जमाफीसाठी मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , कोल्हापूर

दुष्काळ, इतर नैसर्गिक संकट, कर्जाचा बोजा यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यातील बहूसंख्य सरकारी कर्मचारी धावून आले. सरकारने कर्जमाफी जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर रिकाम्या तिजोरीत काही रक्कम जनतेने भरावी या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ राजपत्रित अधिकारी महासंघामार्फतच शंभर कोटीचा निधी जमा झाला आहे. इतर कर्मचारी व अधिकारी यांनीही मदतीचा हात पुढे केल्याने हा आकडा चारशे कोटीपेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे.

शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांच्या दबावानंतर राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे ८० लाखांवर शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी करण्यात येणार आहे. पण सरकारच्या तिजोरीत पैसा नसल्याने ही रक्कम देण्यासाठी सरकारने अनेक पर्याय खुले केले. सरकारी जागा विकण्याबरोबरच अन्य काही मार्गाने ही रक्कम उभी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी ‘शेतकरी सहायता निधी’ असा विशेष उपक्रम सुरू केला आहे. ज्यांना शेतकऱ्यांना मदत करायची आहे, त्यांनी यामध्ये आपली रक्कम जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यातील सर्व सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील आपला एक दिवसाचा पगार द्यावा अशी विनंती करण्यात आली. याबाबत परिपत्रक काढून त्याची सक्ती न करता ते ऐच्छिक ठेवण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला या अधिकारी व कर्मचाऱ्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

राज्यात एकूण वीस लाख सरकारी व निम सरकारी कर्मचारी आहेत. त्यामध्ये दोन लाख अधिकारी आहेत. राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्याची संख्या साडेपाच लाख आहे. इतर अधिकारी व कर्मचारी यामध्ये शिक्षक, पोलिस, महामंडळाचे कर्मचारी यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वाकडून मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आहे.

केवळ राजपत्रित कर्मचारी संघाचाच सप्टेंबर महिन्यात ५९ कोटीचा निधी जमा झाला असून ऑक्टोबर महिन्यात आणखी साठ कोटी जमा होण्याची शक्यता आहे. इतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्याकडून निधी जमा झाल्यास तो चारशे कोटींपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. शेतकरी सहायता निधी केवळ कर्जमाफीसाठी वापरण्यात येणार नसून ती आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे. दुष्काळी भागात काही उपक्रम राबवण्यासाठी या निधीतून मदतीचा हात पुढे करण्यात येणार आहे


मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकरी सहायता निधीला चांगला प्रतिसाद दिला. काहीनी विरोध केल्याने अपेक्षित रक्कम जमा होणे अशक्य आहे. देणाऱ्यांची संख्या ऐंशी टक्के असल्याने ​जमा झालेल्या निधीचा आकडा मोठा आहे.

मनोहर पोकळे, अध्यक्ष राजपत्रित अधिकारी महासंघ


राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था खरोखरच बिकट आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्याचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे. त्यामुळे मदत करणे हे आपले कर्तव्य मानून सर्वानी प्रतिसाद द्यावा असे आवाहन संघटनेने केले आहे. केवळ आवाहन न करता स्वतापासूनच त्याची सुरूवात केली.

ग. दि. कुलथे, संस्थापक, राजपत्रित अधिकारी महासंघ

होणार शिक्षणासाठी खर्च

शेतकरी सहायता निधी केवळ कर्जमाफीसाठी वापरण्यात येणार नसून ती आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे. दुष्काळी भागात काही उपक्रम राबवण्यासाठी या निधीतून मदतीचा हात पुढे करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना अजूनही मदत करायची आहे, त्यांनी आपली रक्कम सहायता निधीला दिल्यास त्याचा उपयोग शेतकऱ्यांना करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत २८ ग्रामपंचायती बिनविरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगली जिल्ह्यातील ४५३ पैकी २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होत असल्याचे चित्र उमेदवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले. सरपंच व सदस्यपदासाठी दहा तालुक्यांत सुमारे १० हजार २३६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. चिन्ह वाटपही झाल्यामुळे शुक्रवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. कडेगाव तालुक्यात निवडणूक प्रक्रियेत गोंधळ उडाल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली.
सांगली जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकासाठी १६ ऑक्टोंबर रोजी मतदान होत आहे. गुरुवारी अर्ज माघारीनंतर रिंगणातल्या लढती निश्चित झाल्याने शुक्रवारपासून प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. वाळवा तालुक्यातील २२३७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सरपंचपदासाठी २३१ जणांनी माघार घेतल्याने २४० अर्ज शिल्लक राहिले. तर सदस्यपदाच्या १२६२ उमेदवारांनी माघार घेतल्याने १९९७ जण रिंगणात आहेत. भरतवाडी, जुनेखेड, फार्णेवाडी (बोरगाव) कोळे, मरळनाथपूर ही गावे बिनविरोध झाली. ३२ सदस्य बिनविरोध झाले आहेत. तसेच चिकुर्डे, धोतरेवाडी, ढवळी येथील सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. डोंगरवाडी, बिचूद, फार्णेवाडी येथील सरपंचपद रिक्त राहणार आहे. तासगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीसाठी ५९८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. यापैकी सरपंचपदासाठी ६२ तर सदस्यपदासाठी ५३६ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. या तालुक्यातील जवळपास सर्वच गावात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगणार आहे. पलूस तालुक्यात सरपंचपदाच्या ८० जणांनी माघार घेतली. रिंगणात ३८ जण राहिले आहेत. तर सदस्यपदाच्या ४३६ जणांनी अर्ज परत घेतल्याने ४१५ जण निवडणूक लढविणार आहेत. पुणदीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. कडेगाव तालुक्यात ९०३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सरपंचपदाच्या १०२ व सदस्य पदासाठी ८०१ जण रिंगणात आहेत. मिरज तालुक्यात १२१२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सरपंचपदाच्या ११८ जणांनी माघार घेतल्याने ११० जणांचे अर्ज राहिले आहेत. तर सदस्यपदाच्या ६४२ जणांनी माघार घेतल्याने १००२ जण रिंगणात आहेत. रसुलवाडीचे सरपंचपद बिनविरोध झाले आहे. कवठेमहांकाळ २९ ग्रामपंचायतींपैकी केरेवाडी आणि लांडगेवाडी २ गावे बिनविरोध झाली. अलकुड एस २, बोरगाव १, जायगव्हाण १, खरशिंग १, कोंगनोळी ६, मळणगाव २, नागज १, शेळकेवाडी १, शिरढोण १ सदस्य बिनविरोध झाला आहे. २४७ जागांसाठी ५६७ जण तर २७ सरपंचपदाच्या जागेसाठी ७८ जण रिंगणात राहिले आहेत.
खानापूर तालुक्यात ८८८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सरपंचपदाच्या ११२ जणांनी माघार घेतल्याने १२२ जणांचे अर्ज राहिले आहेत. तर सदस्यपदाच्या ३६१ जणांनी माघार घेतल्याने ७६६ जण रिंगणार आहेत. ३० सदस्य बिनविरोध झाल्या. आटपाडी तालुक्यात २९१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सरपंचपदाच्या ५५ व सदस्यपदासाठी २३६ जण रिंगणात आहेत. जत तालुक्यात दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, या ठिकाणी चिन्ह वाटपावरुन तणाव निर्माण झाला होता. ८१ ग्रामपंचायतींमध्ये १ हजार ४७३ जण रिंगणात राहिले आहेत. सरपंचपदाच्या रिंगणात १३३ जणांचे उरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता निरीक्षक निलंबितचार वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कार्यभार काढला; आयुक्तांची कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगली महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी सदस्यांनी आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः धिंडवडे काढले. सदस्यांच्या आक्रमकतेची दखल घेऊन महापौरांनी स्वच्छता निरीक्षक व्ही. ए. दशवंत यांना निलंबित केले. आयुक्तांनी चारही प्रभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कार्यभार काढून घेण्यात येत असल्याची घोषणा केली.
माळ बंगल्याच्या परिसरातील जागेविषयी पुरावे देऊनही प्रशासनाकडून संबधितांवर कारवाई होत नाही. महापालिकेच्या मालकीची जागा पुन्हा महापालिकेला दिल्याचे दाखवून तिजोरीवर सात कोटी रुपयांचा दरोडा घातला जात असतानाही प्रशासन गप्प का? अशा प्रश्नांची सरबती होऊ लागल्यानंतर माळ बंगल्यावरील जागेचा सविस्तर अहवाल येईपर्यंत महासभा तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा महापौर हारुण शिकलगार यांनी केली.
सांगली महापालिकेची सभा नियमानुसार चालविण्याचा प्रयत्न म्हणून शुक्रवारच्या सभेत व्यासपीठावर केवळ महापौरांचीच खुर्ची होती. आयुक्त रवींद्र खेबुडकर सदस्यांच्या बाजूला बसले होते. त्यामुळे अनेकांनी शंका घेतल्या. त्यानंतर आयुक्तांना व्यासपीठावर स्थान देऊन यापुढे या दोनच व्यक्ती व्यासपीठावर असतील, असे महापौर शिकलगार यांनी स्पष्ट केल्यानंतर सभेला सुरुवात झाली. या आगोदर रद्द झालेल्या सभेत उपमहापौर विजय घाडगे आणि सदस्य शेखर माने यांना निलंबित केल्याने त्यांच्या बाजूने अश्विनी कांबळे, सुनिता पाटील यांनी खिंड लढवून ही सभा कायदेशीर की बेकायदा याचा खुलासा करण्याची मागणी केली. बेकायदा सभेला आम्ही बसणार नाही, असे त्यांनी सांगताच महापौरांनी तुम्हाला जायचे असेल तर जाऊ शकता असे सुनावले. त्यानंतर त्या दोघींनीही सभात्याग केला.

सभेचे कामकाज सुरू होताच संजय मेंढे यांच्यासह काही सदस्यांनी क्षेत्रातील कचरा उचलण्याचे फुटके डबे महापौर आणि आयुक्तांना भेट देण्याचा प्रयत्न करून स्वच्छतेबाबत चांगलेच धारेवर धरले. घंटा गाडीवरचे डबे फुटल्याने बुट्ट्या वापरण्याची वेळ आल्याने महापालिकेच्या अब्रुचे धिंडवडे निघत आहेत. कोट्यवधीचा खर्च करणारी महापालिका डबे घ्यायला विलंब का करीत आहे. मोकाट कुत्री आणि डुकरांनी थैमान घातले आहे. सभागृहात स्वच्छता निरीक्षकांला रजा कोणी दिली यावरुन रणंकंदन झाले. ७० ते ८० हजार रुपये पगार घेणारे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. संजय कवठेकर यांनी खोटी उत्तरे दिल्याने सभागृह संतप्त झाले. कंटेनर फुटले आहेत, जेसीबी सुरू असतानाही बंद आहे, असे परस्पर सांगितले जाते. शहरभर कचरा पसरुन घाणीचे साम्राज्य असल्याचे स्पष्टपणे दिसत असतानाही स्वच्छता अभियानात सांगली प्रथम आलीच कशी? केवळ कागदोपत्री टॉपला असून, काय उपयोग. फायबरचे डबे घ्या, असे सांगितले असताना वर्षभर काहीही प्रशासनाने केले नाही. महापालिकेला भिक लागली काय? भागात फिरताना आम्हाला लाज वाटते आहे. स्वच्छते अभावी महापालिकेची अब्रू जात आहे. दशवंत नावाचे स्वच्छता निरीक्षक सदस्यांना जुमानतच नाहीत, घंटागाडीचे डबे बंद का, असे विचारले तर आयुक्तांना विचारा, असे उत्तरे देतात, असा संताप व्यक्त केला.

सुरेश आवटी म्हणाले, ‘स्वच्छतेबाबत महापालिका एक नंबरला आहे, ही निव्वळ दिशाभूल आहे. युवराज गायकवाड म्हणाले, संगणक बंद आहे, कचरा साठला आहे, घंटागाड्या बंद आहेत, औषध फवारणीने डासच काय साधी मुंगीही मरत नाही.’
प्रशांत मजलेकर म्हणाले, ‘स्वच्छता निरीक्षक घरात बसून कारभार करतात. कर्मचारी कामावर नसताना हजेरी मांडली जातेच कशी? हजेरी फुल्ल आणि कामावर गुल्ल असणाऱ्यांच्या पगाराचे पैसे संबधित नगरसेवकांना दिले जातात म्हणे, या प्रकाराची चौकशी करावी. मजलेकरांनी अशी मागणी करताच बाळासाहेब गोंधळी भलतेच संतप्त झाले. त्या दोघांत जोरदार खडाजंगीही झाली. दोन तास वादळी चर्चा झाल्यानंतर महापौर शिकलगार यांनी मिरजेचे स्वच्छता निरीक्षक एस. व्ही. दशवंत यांना निलंबित केल्याची घोषणा केली. तर आयुक्तांनी डॉ. विजय ऐनापुरे, डॉ. वैभव पाटील, डॉ. रवींद्र ताटे, डॉ. संजय कवठेकर यांच्याकडील सहायक आरोग्याधिकाऱ्यांचा कार्यभार काढून घेण्यात असल्याचे सांगितले.
अजब कारभार
गटनेते किशोर जामदार यांनी प्रशासनाच्या कारभाराचा अजब नमुनाच मांडला. माझ्या भागात ९९ टक्के लोकांनी शौचालये बांधली आहेत, म्हणून मी स्वतः जुने पडीक असलेले शौचालये पाडण्यास सांगितले. तशी टीप्पण तयार केले. तर आरोग्य विभागाने शौचालय पाडण्याऐवजी या शौचालयाची रंगरंगोटी करून दिली, अशी घटना सांगून प्रशासनाच्या कारभाराचा अजब नमुना सभेसमोर ठेवला.
औषधाने डासही मरेनात
युवाराज गायकवाड यांनी औषध खरेदी आणि फवारणी यंत्रेणेच धिंडवडे काढले. त्यांच्या सुरात सूर मिसळून धनपाल खोत म्हणाले, मराठवाड्यात औषध फवारणीने माणसांचा जीव जाऊ लागला आहे आणि आमच्याकडे साधे डासही मरत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यरात्रीच्या धुमश्चक्रीत दोघे गंभीर जखमीउदयनराजे-शिवेंद्रराजेंच्या विरोधात गुन्हे दाखल

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्याजवळ गुरुवारी मध्यरात्री झालेल्या राड्यानंतर शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एक तक्रार पोलिसांनी खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या विरोधात दिली आहे. दुसरी तक्रार आमदार गटांकडून खासदार गटाविरोधात दिली आहे.
गोळीबार नेमका कोणी केला हे गुलदस्त्यात आहे. मात्र, रात्रीपासून परिसरात वातावरण तंग आहे. आमदार शिवेंद्रराजे यांच्या गटातर्फे विक्रम पवार यांनी उदयनराजे गटाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या शिवाय पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोघांचीही नावे आहेत. सध्या आमदारांच्या सुरुची बंगल्याजवळ पोलिस बंदोबस्त असून, परिसरात अजूनही तणावाचे वातावरण आहे. या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी काचांचा खच पडला असून, ते पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.
मध्यरात्रीच्या धुमश्चक्रीत पोलिस अधिकाऱ्यांसह दोन गंभीर जखमी झाले आहेत. रात्री घटनास्थळी गोळीबाराच्या फैरी पोलिसांनी झाडल्या नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितल्याने त्या ठिकाणी नेमका कोणी गोळीबार केला, याचा पोलिस शोध घेत आहेत. गोळीबार नेमका कुणाच्या कार्यकर्त्याने केला, याचा शोध सुरू झाला आहे. शाहूपुरीकडून येणारा रस्ताही पोलिसांनी बंद केला आहे. मध्यरात्रीच्या राड्यानंतर खासदार उदयनराजे शेकडो समर्थकांसह शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. या ठिकाणी पोलिस अधीक्षक संदीप पाटील व इतर पोलिस अधिकाऱ्यांसोबत सुमारे एक तासभर उदयनराजेंची चर्चा झाली. त्यानंतर उदयनराजे गटाच्या समर्थकांची फिर्याद नोंदवून घेऊन ती शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे पाठवून देण्यात आली. उदयनराजे गटाच्या वतीने अजिंक्य मोहिते यांनी ही फिर्याद दिली. दरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटाच्या वतीने विक्रम पवार यांनी उदयनराजे गटाविरुद्ध गुन्हा दाखल केला. एकमेकांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या दोन्ही फिर्यादीत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोघांचीही नावे आहेत.
मध्यरात्रीच्या धुमश्चक्रीत जखमी झालेले पोलिस अधिकारी किशोर धुमाळ यांच्यावर उपचार करण्यात आले. जखमी अवस्थेतही धुमाळ यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूच्या फिर्यादी दाखल करून घेतल्या.
आठ तास टोल बंद
आनेवाडी (ता. जावली) येथील टोलनाका गुरुवारी सायंकाळी सहा वाजता खासदार उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह बंद पाडला होता. त्यामुळे रात्री दोन वाजेपर्यंत हजारो वाहने टोल न देताच मार्गस्थ झाली. रात्री दोननंतर टोल आकारणी सुरू करण्यात आली.
सांयकाळी सहा ते रात्री दोन वाजेपर्यंत आनेवाडी टोल नाक्यावरील टोल आकारणी आठ तास बंद होती.
.उदयनराजेंच्या आर्थिक कोंडीचा प्रयत्न
टोलनाक्यातून मिळणारी रसद तोडून खासदार उदयनराजे यांची आर्थिक कोंडी करण्यासाठीच राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चक्रव्यूह आखला आहे. त्यात उदयनराजे अडकत चालले आहेत. दोन राजेंतील वादाच्या केंद्रस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर असल्याची चर्चा साताऱ्यात आहे.
खासदार उदयनराजे यांच्या समर्थकांकडून टोल वसुलीचे काम काढून घेतल्यामुळे उदयनराजेंना टोलमधून मिळणारी मिळकत बंद झाली. टोल नाका कुणीही चालवावा मात्र, आमच्या घरावर त्यांच्या समर्थकांनी केलेला हल्ला खपवून घेणार नाही,असे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. तर उन्माद शिवेंद्रराजेंनी सुरू केला आहे. आजिंक्यतारा कारखान्यांत त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. मी दात टोकरून पोट भरणारा माणूस नाही. टोल नाक्याचा विषयही शिवेंद्रराजेंनी उकरुन काढला आहे. मी गप्प बसणार नाही. माझी कुठेही आणि कसेही पुढे येण्याची तयारी आहे, असे उदयनराजे भोसले म्हणाले,

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ वीज पडून दोघांचा मृत्यू; पाच जखमी

$
0
0

सोलापूर
पापरी व हिवरे (ता. मोहोळ) परिसरात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अंगावर वीज पडून दोन जण जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पांडुरंग चांगदेव लबडे आणि योगेश सुनील भोसले, असे मृतांचे नाव आहे.
हिवरे येथे सदाशिव डिकरे शेतात पेरणीचे काम करीत असता दुपारी तीनच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाल्याने पांडुरंग चांगदेव लबडे (वय ६५), विष्णू नरहरी डिकरे (वय ५०), लताबाई सिद्राम मते (वय ५०), सदाशिव श्रीरंग डिकरे (वय ५०), मैनाबाई सदाशिव डिकरे (वय ४५), कविता जागनाथ डिकरे (वय ३०) हे सहा जण एका लहान मंदिरामध्ये बसले असता अचानक पांडुरंग चांगदेव लबडे यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले. तर वरील पाच जण जखमी झाले. जखमीमध्ये दोघांची परिस्थिती चिंताजनक आहे. पापरी परिसरात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या योगेश सुनील भोसले (वय २०) यांच्या अंगावर त्याच दरम्यान वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंजी गल्लीत दोन गटात मारामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लक्ष्मीपुरीतील गंजी गल्लीत शुक्रवारी (ता. ६) दुपारी पूर्ववैमनस्यातून दोन गटात जोरदार मारामारी झाली. या घटनेत महिलेसह चौघे जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूने मोठा जमाव जमल्याने गंजी गल्लीत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून जमावाला पांगवले. वासिम दिलावर खान (वय ३२), निखिल संग्राम स्वार (२०), रुपाली संग्राम स्वार (४७) आणि पांडुरंग दत्तोबा स्वार (८७) हे जखमी झाले आहेत. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली असून, दोन्ही बाजूच्या सात संशितांना ताब्यात घेतले आहे.

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार गंजी गल्लीतील निखिल स्वार या तरुणाचा शुक्रवारी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे कॉलेजमधील २० ते २५ मित्र घरी आले होते. निखिलच्या घरासमोरील वासिम खान याचे मोटर दुरुस्तीचे दुकान आहे. स्वार आणि खान या दोघांमध्ये किरकोळ वादाचे प्रसंग घडले होते. गल्लीत तरुणांचा ग्रुप का आला आहे? अशी विचारणा खान याने केल्याने निखिल आणि वासिम या दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. वासिम यानेही काही मित्रांना बोलवून घेतल्याने गंजी गल्लीत दोन गटात धुमश्चक्री सुरू झाली. यात वासिम खान याच्या डोक्यात लोखंडी पाटी लागल्याने तो जखमी झाला, तर निखिल स्वार, त्याची आई रुपाली स्वार आणि आजोबा पांडुरंग यांना काठीने मारहाण करण्यात आली.

दोन गटात मारामारी सुरू असल्याची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत फौजफाट्यासह तातडीने गंजी गल्लीत पोहोचले. दोन्ही बाजूने मोठा जमाव जमल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी मारामारीतील संशयितांना ताब्यात घेऊन जमाव पांगवला. जखमी वासिम खान याच्यावर उपचार सुरू आहेत, तर दोन्ही गटातील सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी वाद मिटवण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह गणी आजरेकर पोलिस ठाण्यात आले होते. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि निशिकांत भुजबळ यांच्याशी चर्चा करून दोषींवर कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केले. दोन्ही बाजूच्या समर्थकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. निखिल स्वार आणि वासिम खान या दोघांची परस्परविरोधी फिर्याद पोलिसांनी दाखल केली आहे. या घटनेनंतर गंजी गल्लीत पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुमची फाइल तुम्ही शोधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘तुमचे काम आहे, गठ्ठ्यावरील धूळ झटका, फाइल शोधून काढा...असा कारभार जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात सुरू आहे. झिरो पेंन्डसी मोहिमेनंतरही कर्मचारी कक्षात फायलींचे ढिगारे कायम आहे. या ढिगाऱ्यातील फाइल हवी असेल तर अधिकारी चक्क शिपायाऐवजी संबधित शिक्षक आणि कामानिनिमित्त आलेल्या लिपिकालाच कामाला लावत आहेत. याबाबत संबधितांना कडक सूचना देण्यात येतील अशी माहिती शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.

पुणे विभागात महिन्यापूर्वी झिरो पेंन्डसी मोहीम राबविली. त्यामध्ये विभागात कोल्हापूर जिल्हा परिषद आघाडीवर राहिला. विशेष मोहीम राबवून सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. परिणामी प्रलंबित फायलींचा निपटारा करण्यात आला. नाशवंत फाईल्स विक्रीची प्र‌क्रिया सुरू आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे कार्यालयात धूळ खात पडलेल्या फाइल्स नाहिशा होत आहेत‌. त्यास माध्यमिक शिक्षण विभाग अपवाद ठरला आहे. अजूनही त्या विभागात फायलींचे ढीग पडूनच आहेत. ‌उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षाजवळ असलेल्या कार्यालयात गुरुवारअखेर केवळ एक खुर्ची एक टेबल होता. उर्वरित जागेत फायलींचा ढीग आहे.

कामानिमित्त आलेल्या शिक्षकांनाच फायालींच्या ढिगातून आपल्या शाळेची फाईल शोधून काढण्याचे आदेश संबधित शिक्षक आणि लिप‌‌िकास देत आहेत. कामाची निकड असल्याने भीतीपोटी साहेबाने सांगितलेली फाइल शोधण्याचे काम संबंधित शिक्षक, लिपिक मुकाट्याने करताना दिसतात.

६२५ फाईल्स प्रलंबित

झिरो पेंन्डसी मोहिमेत माध्यमिक शिक्षण विभागातील ६२५ फायली प्रलंबित असल्याचे समोर आले. त्यातील २१८

फाईल्स दोन महिन्यापेक्षा अधिक काळ प्रलंबित आहेत. इतके दिवस फायली का दाबून ठेवल्या या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही.

गर्दी कायम

‘माध्यमिक’च्या कक्षासमोर नेहमी गर्दी असते. शिक्षणाधिकारी कक्षात असले तर बाहेर अभ्यगतांना बसण्याची सुविधा अपुरी पडते. अनेकवेळा शिक्षणाधिकाऱ्यासमोर विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, वजनदार संस्थाचालक बसलेले असतात. चर्चा दीर्घकाळ रंगत असल्याने बाहेर ‌अभ्यगताना तासनतास ताटकळत बसावे लागत आहे.

दिवसातून दोन, तीनवेळा विभागातील सर्व टेबलला भेट देण्याचा प्रयत्न असतो. शिक्षक, लिपिक‌ व अभ्यगतांना ढिगातून फायली शोधायला सांगणे चुकीचे आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नये, अशी सूचना दिल्या जातील.

किरण लोहार, शिक्षणाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृषी वीजप्रश्नी प्रसंगी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

‘कृषिपंपाच्या विजेचा १ रुपये १६ पैशांचा दर तीन वर्षे स्थिर ठेवण्याबाबत ऊर्जामंत्र्यांनी शब्द दिला होता. त्याप्रमाणे अंमलबजावणी न झाल्यास दिवाळीनंतर ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करू,’ असा इशारा कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या गुरुवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर होते. तसेच महावितरणकडून मीटर दिले जात नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार व सांगली जिल्ह्यातील १२ हजार कनेक्शन बंद असल्याबाबत सभेत निषेध करण्यात आला.

शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या सभेमध्ये वीज दर, त्याबाबतचा आगामी लढा यावर काय चर्चा होणार याकडे साऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. त्यानुसार विविध तालुक्यातून शेतकरी सभेसाठी उपस्थित होते. सभेमध्ये प्रामुख्याने वीज दराबाबतचा विषय चर्चेला घेतला. यावेळी अध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले, ‘नोव्हेंबर २०१६ पासून तीन वर्षे शेतीपंपासाठी १ रुपये १६ पैसे वीज दर ठेवण्याचे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. मात्र, सध्या महावितरणकडून १ रुपये ९७ पैसे दराप्रमाणे बिले दिली जात आहेत. शेतकऱ्यांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे १ रुपये १६ पैसे प्रमाणे बिले भरली आहेत. उर्वरित फरकाची रक्कम सरकारकडून जमा करण्यात येणार होती. त्याबाबत अजून अंमलबजावणी झाली नसल्याने थकबाकी दिसत आहे. त्यामुळे याबाबत सरकारने दिवाळीपर्यंत आश्वासनाप्रमाणे अंमलबजावणी केली नाही तर प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मेळावा घेऊन आंदोलन करू.’

यावेळी उपाध्यक्ष आनंदराव नलवडे म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्री प्रयत्नशील आहेत; पण त्यांच्याकडून समाधानकारक काम होत नाही. अशा परिस्थितीत योग्य निर्णय करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट आवश्यक आहे.’ संचालक सखाराम पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकित्सा विधेयक दुरुस्त करा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
निती आयोगाने प्रस्तावित केलेले भारतीय चिकित्सा परिषद विधेयक दुरुस्त करा, या मागणीसाठी बीएएमएस डॉक्टरांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मोर्चात बीएएमएस डॉक्टर व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) च्या करवीर शाखेच्यावतीने मोर्चाचे आयोजन केले होते.

निती आयोगाने प्रस्तावित केलेले भारतीय चिकित्सा परिषद विधेयकाच्या निषेधार्थ बीएएमएस डॉक्टरांनी शुक्रवारी एक दिवस काम बंद आंदोलन केले. हॉस्पिटल व कॉलेज बंद करुन डॉक्टर व विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात कोडोली, जयसिंगपूर, पेठवडगाव, गडहिंग्लज येथील बीएएमएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. दसरा चौकातून सकाळी अकराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या हातातील ‘रिवाई एनसीआयएसएम बिल २०१७ बीएएमएस डॉक्टरांचे कायदेशीर हक्क अबाधित ठेवा’, ‘निमा फाइट फॉर युवर राइट’, ‘बीएएमएस डॉक्टरों की पुकार, मत छिनो हमसे हमारा अधिकार’ असे फलक लक्ष वेधून घेत होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यावर डॉ. सुनील पाटील यांनी मोर्चासमोर मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. सुनील पाटील म्हणाले, ‘केंद्र सरकारने १९७० च्या आणि राज्य सरकारच्या १९६१ च्या कायद्यातून आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथी औषधे देण्याचा अधिकार दिला आहे. भारतीय चिकित्सा परिषदविषयक निती आयोगाने प्रस्तावित विधेयक तयार केले आहे. त्यामध्ये बीएएमएस हक्काबाबत व अॅलोपॅथी औषधे वापरण्याबाबत काही उल्लेख केलेला नाही. या कायद्यात दुरुस्ती करताना बीएएमएस डॉक्टरांना कायदेशीर अधिकार द्यावा. विधेयकात दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी १० नोव्हेंबरला दिल्लीत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कोल्हापुरातील डॉक्टरांनी त्यामध्ये सहभागी व्हावे.’

आंदोलनात डॉ. हृषिकेश जाधव, यशवंत हुलस्वार, डॉ. अभिजित मुळीक, डॉ. अदित्य काशीद, डॉ. शैलेंद्र चव्हाण, डॉ. बी. आर. पाटील, डॉ. मधुरा कुलकर्णी, डॉ. अरुण मोराळे, डॉ. मुकुंद मोकाशी, डॉ. शिवराज देसाई, रणजित पाटील, नितीन देशपांडे, सहभागी झाले होते. यावेळी ‘निमा’च्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटीत पर्यटनासाठी ‌ब‌ुकिंग फुल्ल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळीची सुटी आणि हिवाळ्याची चाहूल भटकंतीसाठी सुखकर असल्याने पर्यटकांनी अभयारण्य, धार्मिक स्थळ, समुद्रकिनारा या ठिकाणी भटकंतीचे नियोजन केले आहे. दिवाळीची सुटी सुरू होण्यापूर्वीच १५ दिवस आधी पर्यटनस्थळांची नोंदणी सुरू केली आहे. छोट्या सुट्यांसाठी कोकणातील समुद्रकिनारे, महाबळेश्वर, गोव्यातील समुद्रकिनारे आदी ठिकाणांना पसंती दिली आहे. आठवडाभराच्या पर्यटनासाठी राजस्थान, केरळ, मध्यप्रदेश, तिरुपती बालाजी, शिर्डी, गुजरात, अंदमानचे नियोजन केले आहे. त्यासह परदेशी पर्यटनासाठी कंपन्यांनी आकर्षक ऑफर दिल्या आहेत.

कोल्हापूरचे महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे (एमटीडीसी) कार्यालय पुणे प्रादेशिक कार्यालयाकडे स्थलांतरित झाले आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. एमटीडीसीचे गणपतीपुळे, तारकर्ली, महाबळेश्वर, वेळणेश्वर , कुणकेश्वर, पानशेत, कार्ला या ठिकाणीची रिसॉर्ट हाउसफुल्ल होत आहेत. खासगी हॉटेलनाही मागणी असून, त्यांचेही दोन महिन्यांपुर्वीच बुकिंग केले आहे. राज्यांतर्गत पर्यटनासाठी यंदाही कोकणाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्यासह तिरुपती, शिर्डी, श्री क्षेत्र अक्कलकोट, तुळजापूरला धार्मिक पर्यटनासाठी पसंती दिली आहे. लक्ष्मी पूजनादिवशीदेखील काही रिसॉर्टमध्ये बुकिंग झाले आहे. पाडव्यापासून कोकणातील तारकर्ली, वेंगुर्ला, देवबाग, अलिबाग, हरिहरेश्वर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, दिवेआगर, गुहागर हे समुद्रकिनारे फुलणार आहेत. स्थानिक पर्यटन संस्थांनी पर्यटनासाठी चालना दिली आहे. जिल्ह्यातील राधानगरी, दाजीपूर, नृसिंहवाडी, खिद्रापूर, कणेरी मठ, जोतिबा, पन्हाळा, आंबा, आंबोली, गगनबावडा, रामलिंग, बाहुबली या ठिकाणी पर्यटनाला पसंती दिली आहे. महाबळेश्वर, भंडारदरा, आंबोली, माथेरान येथेही बुकिंग सुरू झाले आहे. दिवाळीमध्ये बहुतांश कंपन्यांना तीन ते चार दिवस सुट्या असल्याने छोट्या सहलींना पसंती दिली जात आहे.

समुद्र किनारे, थंड हवेच्या ठिकाणांबरोबरच जंगल पर्यटनाला छोट्या पर्यटकांची पसंती मिळाली आहे. वन्यजीवांबद्दल वाढलेल्या आकर्षणामुळे जंगल सफारीची मागणीही वाढली आहे. पावसाळ्यात बंद राहणारी देशभरातील अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प एक ऑक्टोंबरपासून सुरू झाले आहेत. ताडोबा, नागझिरा, पेंच, दाजीपूर, चांदोली अभयारण्याला पसंती दिली आहे. देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. जिल्ह्यातून बेळगांव आणि पुणे विमानतळावरून प्रवासाला पसंती दिली आहे. बेळगाव मुंबई-चेन्नईसाठी नोंदणी सुरू आहे. दोन दिवस तीन रात्री, तीन दिवस चार रात्रीसह आठवडाभराच्या पॅकेजही पर्यटकांकडून मागणी आहे. पर्यटकांकडून रत्नागिरी, सिंधुदूर्ग, गणपतीपुळे आणि आंबोलीला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरील आरे-वारे ढोकमळे हा सागरकिनारा, हरिहरेश्वर, हर्णे-मुरुड, तारकर्ली, दापोली हे समुदकिनारेदेखील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. बहुतांशी हॉटेल व्यावसायिकांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दरात विशेष सवलत दिली आहे. आंदोलानामुळे दार्जिलिंग आणि थंडीमुळे कुलू, मनाली, शिमला, जम्मू, काश्मीरला पर्यटकांनी पसंती दिलेली नाही.

कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातून एमटीडीसीच्या रिसॉर्टसाठी बुकिंग होत आहेत. यंग सीनिअर्स, केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दरात दहा टक्के सवलत दिली जात आहे. त्यासह पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइन नोंदणीची सुविधा असल्याने फायदा होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय जवळील उद्योग भवनाच्या इमारतीत कार्यालय आहे.

राहुल गवळी, प्रतिनिधी, एमटीडीसी, कोल्हापूर


राजस्थान, केरळ, मध्यप्रदेश, गुजरात या ठिकाणी मागणी आहे. त्यासाठी २० हजारांपासून पुढे पॅकेज आहे. दुबई, सिंगापूर, श्रीलंकेसाठी जिल्ह्यातील पर्यटकांचे नोंदणी सुरू आहे. दुबईसाठी ६५ हजार, सिंगापूरसाठी १ लाख १० हजार आणि श्रीलंकेसाठी ६५ हजार रुपये प्रति व्यक्तिसाठी आकारले जात आहेत. देशातंर्गत सहलीसह परदेशी पर्यटनाचा टक्का वाढला आहे.

दिनेश वालावलकर, व्यवस्थापक श्री ट्रॅव्हल्स

लांब पल्ल्याच्या पर्यटनासाठी विश्वासहर्ता आणि पॅकेजमध्ये दिलेल्या सुविधा महत्त्वाच्या आहेत. पर्यटनाचे ठिकाण, तीन ते चार दिवसांचे पॅकेज, कुटुंबाची सुरक्षितता, परिसरातील पर्यटन स्थळांची चौकशी करुनच ट्रॅव्हल्स कंपन्याकडे नोंदणीचा निर्णय घेतला आहे. अनेकदा छुपे खर्च आणि पॅकेजमध्ये वाढीव खर्च दाखविला जातो. अधिकृत टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपन्या पाहूनच नोंदणी करावी.

नितीन पाटील, पर्यटक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भवानी मंडपात वर्ल्ड कपचा थरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भवानी मंडप येथे १७ वयोगट फिफा वर्ल्डकपमधील भारत व अमेरिका सामन्याचे थेट प्रक्षेपण स्क्रीनवर पाहण्यासाठी फुटबॉल शौकिनांनी गर्दी केली होती. भारताचा अमेरिकेकडून पराभव झाला असला तरी अनिकेत जाधव, कोमल थोताल, गोलरक्षक धीरज यांच्या खेळाला फुटबॉल शौकिनांनी चांगलीच दाद दिली.

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्यावतीने वर्ल्डकपच्या निमित्ताने स्क्रीन लावण्यात आली आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत स्क्रीनवर सामना पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिली. श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते या स्क्रीनचे उद्‍घाटन केले. सामना सुरू झाल्यानंतर पावसातही फुटबॉल शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. भारत व अमेरिका संघातील खेळाडूंसमवेत ओळख परेडच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरच्या अनिकेत जाधवशी शेकहॅन्ड करताच फुटबॉल शौकिनांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

सामन्याच्या सुरुवातीपासून अमेरिकेचे सामन्यावर वर्चस्व होते. सातव्या मिनिटाला भारतीय बचावपटू जितेंद्र सिंगने अमेरिकेच्या खेळाडूला रोखल्यावर पंचांनी पेनल्टी कीक बहाल केली. यासंधीचा लाभ घेत जोश सार्जरने गोल केला. या गोलमुळे शौकिनांच्यात निराशा पसरली. अनिकेत जाधवचा फटका अ​मेरिकन गोलरक्षकाने पंच केल्यावर भारताला पहिला कॉर्नर मिळाला. पण या संधीचा फायदा भारताला उठवता आला नाही. मध्यंत्तरास अमेरिका संघ १-० आघाडीवर होता. यावेळी कॅमेरा अनिकेतवरच असल्याने टाळ्यांचा वर्षाव होत होता.

उत्तरार्धात भारताने अमेरिकेवर दबाव वाढवला. अनिकेत जाधव, कोमल थताल यांच्या चढाया दाद मिळवणाऱ्या ठरल्या. दरम्यान शहरातील प्रमुख हॉटेल, रेस्टारंट, बारमध्ये फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी नागरिकांनी टेबल बुक केले होते. घरोघरी भारताचा सामना पाहिला गेला. पण पराभवामुळे सर्वत्र निराशा पसरली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रकार गौरी लंकेश हत्येतही सनातन रडारवर?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
बेंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येत सनातन संस्थेच्या फरार साधकांचा समावेश असू शकतो, असा संशय कर्नाटक एसआयटीने व्यक्त केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येत वापरलेल्या शस्त्रात एसआयटीला साम्य आढळले आहे. यावरून रुद्रगौडा पाटील (वय ३७, रा. जत), प्रवीण लिमकर (३४, रा. कोल्हापूर), विनय पवार (३२, रा. उंब्रज, सातारा), सारंग आकोलकर (३८, रा. पुणे) आणि जयप्रकाश उर्फ अण्णा (४५, रा. मेंगलोर) या संशयितांचा शोध सुरू केला आहे. सनातन संस्थेने मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे.
लंकेश यांची ५ सप्टेंबरला हत्या झाली होती. हत्येत वापरलेल्या गोळ्यांचा आकार ७.६५ एम. एम. इतका असल्याचे तपासात स्पष्ट झाले. अंनिसचे प्रमुख डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि कर्नाटकातील डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येतही ७.६५ एमएम आकाराच्या गोळ्यांचा वापर झाला होता. गोळ्यांसह हत्या करण्याच्या पद्धतीत साम्य आढळल्याने कर्नाटक एसआयटीने आधीच्या तिन्ही हत्यांची माहिती घेतली. एसआयटीच्या हाती लागलेल्या माहितीनुसार सनातन संस्थेच्या फरार साधकांवर संशय व्यक्त केला आहे. २००९ मध्ये मडगावात झालेल्या स्फोटातही यातील काही संशयितांचा समावेश होता. राष्ट्रीय तपास पथकाने रुद्रगौडा पाटीलला फरार घोषित केले असून, त्याच्यासह लिमकर, आकोलकर आणि जयप्रकाशविरोधात रेडकॉर्नर नोटीस जारी केली आहे.
कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विनय पवार आणि सारंग आकोलकर यांना आरोपी केले आहे. दोन वर्षांपासून यांचा शोध सुरू आहे. महाराष्ट्र एसआयटीने पवार आणि आकोलकर या संशयितांवर १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. लंकेश यांच्या हत्येतही सनातनचे साधक रडारवर आले आहेत.
याबाबत सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘कर्नाटक एसआयटीने तपासात कुठेही सनातन संस्थेचे नाव घेतलेले नाही. सनातनच्या बदनामीसाठी काही बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. काही साधक फरार असतील तर ते गुन्हे कसे करू शकतात?’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images