Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वजन कमी करायचंय? गोडलिंब खा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम
विविध अन्नपदार्थ चवदार होण्यासाठी कढीपत्ता अर्थात गोडलिंब वापरलं जातं. मात्र, केवळ पदार्थ चवदार होण्यासाठीच गोडलिंब उपयोगी पडत नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनंही गोडलिंब महत्त्वाचं असतं. गोडलिंबात अ, ब, क, ई, बी१, बी३ आणि बी९ ही जीवनसत्त्वं, लोह, कॅल्शियम आणि फॉलिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असतं. केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी गोडलिंब गुणकारी असतं. गोडलिंब वर्षभर उपलब्ध असल्यामुळे खाद्यपदार्थांमधील त्याचा वापर फायदेशीर ठरतो.

यकृत राहील तंदुरुस्त : दररोज गोडलिंबाचं सेवन केलं, तर शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन कमी होतं. अ जीवनसत्त्वामुळे यकृताचं कार्य व्यवस्थित सुरू राहातं. अधिक प्रमाणात मद्यसेवन किंवा धूम्रपान केल्यामुळे यकृत कमजोर होतं. त्यावर गोडलिंब परिणामकारक ठरू शकतं.

पचनक्रिया सुधारते : पचनासंबंधीच्या समस्यांवरही गोडलिंबाचं सेवन हा चांगला उपाय आहे. बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि अतिसारासारख्या आजारांवर गोडलिंब हा रामबाण उपाय मानला जातो.

दृष्टिदोष होतात दूर : गोडलिंबातील अ जीवनसत्त्व डोळ्यांसाठी चांगलं असतं. यामुळे दृष्टिदोष दूर होतात. डोळ्यांशी संबंधित इतर आजारांवरही गोडलिंब परिणामकारक ठरतं.

त्वचा आणि केसांसाठी : त्वचेसंबंधीच्या अनेक समस्यांवरही गोडलिंब परिणामकारक ठरतं. त्वचेवरील डाग आणि पुटकुळ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गोडलिंबाचा उपयोग होतो. गोडलिंबाचा
फेसपॅक लावल्यास चेहरा तजेलदार दिसतो. याशिवाय केस झडणं, कोरडेपणा आणि केसांमधील कोंडा यांसारख्या समस्याही गोडलिंबाच्या नियमित सेवनानं दूर होतात.

हृदयासाठी : गोडलिंबात अँटिऑक्सिडंट्स असतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील वाढत्या कॉलेस्टोरॉल नियंत्रित करतात. यात मोठ्या प्रमाणात लोह असल्यामुळे अशक्तपणा येत नाही.

इन्फेक्शनही टाळतं : गोडलिंबात अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुण असतात. त्वचेला होणारी विविध इन्फेक्शन्स दूर करण्यासाठीही गोडलिंबाचा वापर करता येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहा दिवसांत १० लाख भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून गेल्या सहा दिवसांत करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे तब्बल दहा लाख भाविकांनी दर्शन घेतले. मंगळवारी दिवसभरात दीड लाख भाविकांनी अंबाबाई मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतल्याची नोंद झाली. दरम्यान, मंगळवारी सकाळपासूनच भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला. दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी देवीची शारदांबा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. सकाळी साडेआठ आणि साडेअकरा वाजता देवीला देवस्थानतर्फे अभिषेक करण्यात आला.

मंगळवारी सकाळी नऊ वाजताच मंदिराच्या पूर्व दरवाजातील दर्शनमंडपात भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली. स्थानिक भाविकांनी मुखदर्शनाला पसंती दिली. सायंकाळी सहापर्यंत भाविकांची प्रचंड गर्दी होती. भवानी मंडप येथील तुळजाभवानीची दीपपूजा बांधण्यात आली.

कलाविष्काराला गर्दी
यावर्षी प्रथमच नवरात्रोत्सवानिमित्त भवानी मंडपात सादर होणाऱ्या लोककला उत्सवाला भाविकांनी प्रचंड गर्दीत प्रतिसाद दिला. मंगळवारी ‘शब्दसुरांच्या झुल्यावर’ प्रस्तुत ‘सत्यम शिवम सुंदरम’ या गीतमैफलीचा आस्वाद रसिकांनी घेतला. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी ‘तुझ्यात जीव रंगला’फेम हार्दिक जोशी व अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अष्टमीला दर्शनरांगेतूनच प्रवेश
गुरुवारी अष्टमीला देवीला होणाऱ्या उच्चांकी गर्दीमुळे यावर्षी अष्टमीदिवशी केवळ दर्शनरांगेतूनच मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय देवस्थान समितीतर्फे घेण्यात आला. त्यामुळे गुरुवारी अन्य प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश दिला जाणार नसून मंदिरातून बाहेर पडण्यासाठी सर्व दरवाजे खुले ठेवण्यात येणार आहेत.

भाविकांच्या गर्दीत पालखीप्रदक्षिणा
यावर्षी अंबाबाईची पालखीप्रदक्षिणा सुवर्णपालखीतून काढण्यात येणार आहे. मंगळवारी रात्री भाविकांच्या गर्दीत मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक लवाजम्यासह पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. गरुड मंडपातून पालखी बाहेर काढण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या आवारात पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. रात्री साडेअकरापर्यंत पालखीचा सोहळा सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली महापालिकेत धुमश्चक्री

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या बुधवारच्या प्रचंड गोंधळ उडाला. सभा कायदेशीर की बेकायदा यावरुन सत्ताधारी, विरोधी राष्ट्रवादी आणि उपमहापौर गट, स्वाभिमानी विकास आघाडीमध्ये चांगलीच जुंपली होती. महापौरांनी उपमहापौरासह दोघांना निलंबित केल्याची घोषणा केली. चमचेगिरीपासून चोरांपर्यंतच्या उपमा दिल्या गेल्या. गोळीबार करण्याचीही भाषा झाली. शेखर मानेंनी राजदंड पळवून नेताच महापौरांनी त्यांच्यावर फौजदारी करण्याचे आदेश देत ही सभा रद्द केल्याची घोषणा करून सभागृह सोडले. गुंडगिरीने महापौर मागे हटणार नसल्याचे तर गुंडगिरीचा आरोप करणाऱ्यांनीच गुंडगिरी केल्याचा आरोप विरोधी गटाने पत्रकारांशी बोलताना केला.
सांगली महापालिकेची बुधवारी महापौर हारुण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली सुभा सुरू होताच विषयपत्रिकेवर असलेल्या माळबंगल्या नजीकच्या जागेचा मुद्दा उपस्थित झाला. त्याचवेळी उपमहापौर गटाचे नेते शेखर माने यांनी ही सभा कायदेशीर आहे की, बेकायदा याचा खुलासा महापौरांनी, आयुक्तांनी करावा आणि मगच सभेच्या कामकाजाला सुरुवात करावी, अशी मागणी केली. या मागणीने गोंधळ वाढला. सभा झालीच पाहिजे, असे म्हणत सत्ताधारी, विरोधी राष्ट्रवादीचे सदस्य व्यासपीठाकडे धावले. विरोधी गटाने सभेबाबत खुलासा करण्याची मागणी घेऊन व्यासपीठ गाठले. मग मात्र, महापौरांच्या शिपायाने राजदंड स्वतःच्या ताब्यात घेऊन सुरक्षित ठेवला. गोंधळ वाढतच गेला. राष्ट्रवादीच्या कोणीतरी गोंधळ थांवविण्यासाठी गोळीबार करण्याचा उपाय सुचविला. कोणी महापौरांच्या कानात काहीतरी सांगतेय. तोल ढळल्याप्रमाणे महापौरही काहीतरी बडबडू लागले. इतक्यात स्थायीचे माजी सभापती संतोष पाटील चोरांना सोडायचे नाही, यापुढे कोणाची चमचेगिरी खपवून घेणार नाही, अशी आरोळी ठोकली. त्यानंतर गोंधळात अधिकच वाढ झाली. हातवारे करून एकमेकांची लायकी काढण्याचा प्रकार सुरू असतानाच शेखर माने यांनी राजदंड उचलून सभागृहातून पळ काढला. त्यानंतर महापौरांनी तत्काळ राजदंड पळविणारांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश नगरसचिवांना दिले. त्यानंतर महापौर म्हणाले, ‘घन कचऱ्याचा महत्वाचा विषय आहे. त्याच्या आराखड्याला मंजुरी देणे महत्वाचे आहे. या विषयावर निर्णय घेणारी सभाच बेकायदा असल्याचा दावा करीत दंगा घालणारे कोर्टात गेले तर विनाकारण घन कचऱ्याचा विषयी लांबणीवर जाईल, असे म्हणून ही सभा रद्द करून पुढच्या सभेची नोटीस काढण्यात येईल.’
उपमहापौर विजय घाडगे, शेखर माने निलंबित
पत्रकारांशी बोलताना महापौर शिकलगार म्हणाले, माळबंगल्याजवळच्या जागेचा विषय आल्यामुळेच शेखर मानेंना राग आला. गोंधळ घालणारे दोघे तिघे आमचे काहीच करू शकत नाहीत. परंतु, नागरी हिताच्या दृष्टीने महत्वाचे असलेले विषय न्यायप्रविष्ठ होऊन लांबणीवर पडू नयेत, म्हणून सत्ताधाऱ्यांचे गटनेते किशोर जामदार, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, संजय बजाज, सुरेश आवटी यांच्याशी चर्चा करुन ही सभा रद्द केली आहे. दंगा करणारे उपमहापौर विजय घाडगे, शेखर माने यांना निलंबित केले आहे. पुढच्या सभेतही त्यांना येता येणार नाही. सात दिवसांपूर्वी सभेची विषयपत्रिका काढली आहे. प्रशासनालामार्फत सभेची कार्यवाही केल्याने प्रशासनाला ही सभा कायदेशीर की बेकायदा याची निश्चित कल्पना असणार आहे. महिन्याच्या २० तारखेपूर्वी सभा घ्यावी, असे नियमावलीत असले तरी त्यानंतर घेतलेली सभा ही बेकायदा ठरेल, असे कुठेही नमूद नाही. या पार्श्वभूमीवर सभा होत असताना काही ठराविक जणांनी गुंडगिरी करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गुंडगिरीच्या दबावाला आपण अजिबात भीक घालणार नाही. आमच्या पुढचे चमचे उचलून मोठे झालेल्यांची कुवत काय आहे, याची कल्पना आहे. लोकांतून निवडून येण्याचीही त्यांची कुवत नाही. पुस्तके वाटून कोणी मोठे होत नाही. पक्षातून बाहेर गेलेल्यांचाच आटापीटा सुरू आहे. माळबंगल्याच्या विषयाला घाबरुन त्यांनी सुरू केलेले उद्योग म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. परंतु, येत्या आठ दिवसांत माळबंगल्याविषयीचा अहवाल देण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. उपमहापौर घाडगे आणि माने या दोघांनी राजदंड पळवून नेल्याने त्याच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेशही दिलेले आहेत.
सभेबाबत स्पष्टीकरण दिले नाही
पत्रकारांशी बोलताना शेखर माने म्हणाले, महापालिकेच्या अधिनियमांतील सभेविषयीच्या नियमावली नुसार २० तारखेनंतर सभा घेता येणार नाही, याची कल्पना आयुक्तांना दिलेली होती. तरीही सभा घेतली जात असल्याने आपण सभा कायदेशीर की, बेकायदा याचा खुलासा करून सभा घेण्याचे आवाहन आपण केले. या विषयावर आयुक्तांनी कोणतेच स्पष्टीकरण दिले नाही. आपण महापौरांकडे खुलासा मागितल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी राष्ट्रवादीने गोंधळ घालायला सुरुवात केली. राजदंड समोर नसताना महापौरांना पिठासन अधिकारी म्हणून कोणताच निर्णय घेता येत नाही. गोंधळात राजदंडाचा अवमान होऊ नये म्हणून तो आपण उचलून आणून उपमहापौरांसमोर सुरक्षितपणे ठेवला आहे. काही सदस्य रिव्हॉल्व्हर घेऊन सभागृहात आले होते. आयुक्तांच्या सुरक्षा रक्षकाला गोळीबार करण्याचे आदेश दिले जाऊ लागले होते. असा गोंधळ घालून हवे ते बदल करून घन कचऱ्याचा आराखडा मंजूर करून ४२ कोटी रुपयांवर डल्ला मारायचा, हा त्यांचा डाव उपमहापौर गट आणि स्वाभिमानी विकास आघाडी यशस्वी होऊ देणार नाही. त्यांची उद्धट आणि उर्मट भाषा सभागृहाने अनुभवली आहे. सभागृहात महिला सदस्या मोठ्या संख्येने असताना महापौर असभ्य पद्धतीने हातवारे करीत होते. हे वर्तन त्या पदावरच्या व्यक्तीला न शोभणारे आहे. माळ बंगल्याचा विषय काढून टाकल्या जाणाऱ्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. महापालिकेच्या सभेला नियमावलीच नाही, त्यामुळे आम्हाला निलंबित करण्याचे महापौरांना अधिकारच नाहीत.
महापौर पदावरही नसतील : माने
शेखर माने म्हणाले, महापौर जर म्हणत असतील की, माझ्या फाईली ज्यांच्याकडे आहेत, तर ते गप्प का बसलेत? त्यांना माझे आव्हान आहे. आपण दोघे एकत्र बसून तुमच्या परवानगीनेच त्या फाईली सर्वांसमोर ठेऊ. त्या फाईली समोर आल्यानंतर आमचे निलंबन केल्याचे सांगणारे महापौर नजीकच्या काळात त्या पदावरही दिसणार नाहीत, इतका मसाला असलेल्या अनेक फाईली आमच्याकडे आहेत. केवळ त्यांनी एकत्रित बसून, फाईली जाहीर करण्याची तयारी ठेवावी, म्हणजे झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ टोल नाकाचालू देणार नाहीउदयनराजेंचा टोल प्रशासनाला इशारा

0
0

सातारा
‘राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी येथे असणाऱ्या टोल नाक्यावर, या परिसरातील स्थानिक व्यक्ती नोकरीला आहेत. स्थानिक भुमीपुत्रांना त्यामुळे रोजगाराची संधी मिळाली आहे. व्यवस्थापन बदलो किंवा न बदलो, स्थानिक कर्मचाऱ्यांवर या बदलामुळे गदा येणार असेल तर हा टोल नाका चालू देणार नाही. तुम्हाला उद्रेक पहायचा असले तर पहा,’ अशा इशारा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आनेवाडी टोल नाका व्यवस्थापनाला दिला. दरम्यान, स्थानिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले तर, अनर्थ घडेल, असा इशाराही त्यांनी पोलिस प्रमुखांशी दूरध्वनीवरुन बोलताना दिला.
आनेवाडी( ता. सातारा) येथे राष्ट्रीय महामार्गावर नॅशनल हायवे ऑथरिटी ऑफ इंडियाच्या अखत्यारितील टोल नाका आहे. सदर टोल नाक्याचे व्यवस्थापन रिलायंन्सच्या वतीने १ ऑक्टोबर २०१७पासून बदलले जाणार आहे. सध्याच्या कर्मचाऱ्यांना हटवून दुसऱ्या कर्मचाऱ्यांना नेमले जाणार असल्याने, आम्हा स्थानिक कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, असे निवेदन कर्मचाऱ्यांनी उदयनराजे भोसले यांना दिले होते. निवेदन मिळताच उदयनराजे भोसले यांनी तडक आनेवाडी टोल नाका गाठला. स्थानिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची नुसती भाषा जरी केली तरी टोल नाका चालू देणार नाही, असा इशारा व्यवस्थापनाला दिला. त्यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशीही दुरध्वनीवरुन बोलताना, स्थानिक कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यास सर्वस्वी टोल व्यवस्थापन जबाबदार राहील याची नोंद घ्या, असेही बजावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांच्या पीएवर खंडणीचा गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘मुख्यमंत्री सहायता निधीतील रक्कम पुन्हा सरकारकडे का पाठवली? यातील निम्मे पैसे आम्हाला द्या. तुमच्या हॉस्पिटलची बदनामी नको असेल तर पाच लाखांची खंडणी द्या,’ असे धमकावणाऱ्या संदीप तोडकर विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. न्यूरोसर्जन कौस्तुभ वसंत वाईकर (वय ४०, रा. प्लॉट नं. ५०, राजेंद्रनगर हाउसिंग सोसायटी) यांनी याबाबत बुधवारी (ता. २७) फिर्याद दिली आहे. तोडकर हा आमदार राजेश क्षीरसागर यांचा पीए आहे. दरम्यान, आमदार क्षीरसागर यांनी हा गुन्हा राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. कौस्तुभ वाईकर हे न्यूरोसर्जन असून, त्यांचे मंगळवार पेठेतील बेलबाग येथे प्राइम हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये सचिन ज्ञानदेव चव्हाण हा रुग्ण उपचारासाठी आला होता. त्याच्यावर मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचार करावेत, अशी विनंती आमदार क्षीरसागर यांनी पत्राद्वारे केली होती. हॉस्पिटल प्रशासनाने या रुग्णासाठी सहायता निधीचा प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री कार्यालाकडे पाठवला. उपचारापूर्वीच रुग्ण चव्हाण हा हॉस्पिटलमधून निघून गेला. त्यानंतर चारच दिवसात चव्हाण याचा सहायता निधीचा प्रस्ताव मंजूर झाला. मुख्यमंत्री सहायता निधीचे १ लाख रुपये मिळावेत, असा आग्रह रुग्ण चव्हाण याने डॉक्टरांकडे धरला. मात्र १४ हजार रुपयेच खर्च झाल्याने एवढीच रक्कम देऊन उर्वरित रक्कम सरकारडे पुन्हा जमा करणार असे डॉक्टरांनी सांगितले.

त्यानंतर आमदार क्षीरसागर यांचे पीए संदीप तोडकर यांनी डॉक्टर वाईकर यांची भेट घेऊन सहायता निधीतील निम्मे पैसे मागितले. ‘पैसे न दिल्यास तुमच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करू. बोगस रुग्ण पाठवून तुमच्या हॉस्पिटलची बदनामी केली जाईल. हे प्रकरण मिटवण्यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील,’ असे तोडकर याने धमकावले.

डॉ. वाईकर यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने त्यांच्या हॉस्पिटलमध्ये २०१५ ते २०१७ पर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीच्या रकमेत गैरप्रकार झाल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे झाली होती. याबाबत कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांनी तपासणी करून कोणताही गैरव्यवहार नसल्याचा अहवाल जून २०१७ मध्ये राज्य सरकारकडे पाठवला आहे. हॉस्पिटलमध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसून, संदीप तोडकर हे वारंवार धमकावून खंडणी मागत आहेत, अशी फिर्याद डॉ. वाईकर यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल केली.

संदीप तोडकर याच्या विरोधातील तक्रार राजकीय हेतूने केलेली आहे. ही तक्रार खोटी आहे. गणेशोत्सवात साऊंड सिस्टिम परवानगीचे आंदोलन आणि पोलिसांनी केलेल्या हेल्मेटसक्तीला विरोध केल्याने खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित डॉक्टरविरोधात पाच कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

राजेश क्षीरसागर, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाय दूध खरेदीदर कमी करण्याची मागणी

0
0

Maruti.Patil@timesgroup.com
Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या संपानंतर राज्यातील दूध उत्पादकांना दूध खरेदीदरात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, तीन महिन्यांनंतर वाढलेल्या खरेदी दरांमुळे संघांचे बजेट कोलमडत आहे. दरवाढ परवडणत नसल्याचे कारण पुढे करत गायीचा दूध खरेदी दर दोन रुपयांनी कमी करण्याचा ठराव राज्यातील दूध संघांनी नुकताच बैठकीत केला. याबाबत संघांचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खरेदीदर कमी करण्यासह संघांना अनुदान देण्याची मागणी करणार आहे. संघांच्या या पवित्र्यांमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसणार आहे.

यापूर्वी दोन वर्षांचा सततचा दुष्काळ आणि २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व गारपीटामुळे कृषी उत्पादनांचे मोठे नुकसान झाले होते. जोड व्यवसाय असलेल्या दूध व्यवसायाला याचा फटका बसला होता. सर्वच बाजूंनी शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडल्याने संपूर्ण कर्जमाफीसह दूध खरेदीदरात वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संपही पुकारला होता. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची घोषणा करण्यापूर्वी सरकारने २१ जून रोजी दूध खरेदीदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला.

सरकारच्या निर्णयानुसार गायीच्या ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी दोन रुपयांची वाढ करत प्रतिलिटर २७ रुपये दर निश्चित करण्यात आला. तर म्हैशीच्या ३.५ फॅट व ९.० एसएनएफ दुधासाठी तीन रुपयांची वाढ करत प्रतिलिटर ३६ रुपये करण्यात आला. गाय व म्हैशीच्या दुधासाठी प्रत्येक पॉइंटसाठी ३० पैसे वाढ करण्याचीही घोषणा केली. त्याची अमंलबजावणी करण्यास राज्यातील दूध संघांनी वीस दिवसांचा कालावधी लावला. संघांना निर्णयाची अंमलबजावणी करण्यास उत्पादकांनी भाग पडल्यानंतर संघांनी खरेदीदर वाढविण्याचा निर्णयाची अंमलबजावणी केली.

मात्र, गायीच्या दूध खरेदीदरात झालेली वाढ परवड नसल्याचे कारण पुढे करत संघांनी दर कमी करण्याची मागमी राज्य सहकारी संघांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आली. त्याचबरोबर सरकारकडून अनुदान म्हणून प्रतिलिटर तीन रुपये देण्याची मागणी करण्यात येणार आहे. वाढीव दराचा केवळ दूध उत्पादकांना तीन महिनेच फायदा झाला. आता सहकारी दूध संघांनी तिरकी चाल करुन सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. सरकार जर खरेदीदर कमी करणार नसेल, तर सरकारने दूध खरेदी करून विक्री करावी, अशी टोकाची मागणी करण्यात आली आहे. दूध खरेदीदराची अंमलबजावणी केवळ सहकारी संघ करत असून खासगी संघ वाढीव दर देत नसल्याने सर्वांचे समान दर ठेवावेत असाही सूर बैठकीत उमटला. संघांच्या भूमिकेमुळे राज्यातील उत्पादक कात्रीत अडकणार आहेत. संघांनी असा निर्णय घेतल्यास ऊस व दूध दरांवरून पुन्हा राज्यात असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

आवळा देवून कोहळा काढण्याचा प्रयत्न

शेतकरी संपानंतर राज्यातील दूध उत्पादकांना खरेदीदरात वाढ करण्याचा निर्णय राज्यातील सहकारी संघांनी घेतला. एक महिनाभर दूध उत्पादकांना वाढीव दर दिल्यानंतर पशुखाद्याच्या दरात वाढ करण्याबरोबरच दूध विक्रीदरातही वाढ केली. पण दोन महिन्यानंतर दर कमी करण्याची मागणी पुढे आली. बैठकीत विक्री दर किंवा पशुखाद्यांच्या दरात केलेल्या वाढीबाबत चर्चाच झाली नाही. त्यामुळे सहकारी संघ ‘आवळा दे‍वून कोहळा’ काढण्याचा प्रयत्न करत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदीस्त नाल्यांमुळे पाणी रस्त्यावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्टार्म वॉटर मॅनेजमेंटच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च करुन नाले बंदिस्त केले. त्याचा फायदा बांधकाम व्यावसायिकांना झाला असून स्टार्म वॉटर मात्र रस्त्यावरच आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला असून त्याची जबाबदारी महापालिकेवर असेल, असा इशारा प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेने महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

संस्थेने अनाधिकृत बांधकामाबाबत पुराव्यासह तक्रारी दाखल केल्या आहेत. पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अशा अनाधिकृत विकासाला पाठीशी घातल्याचा आरोप संस्थेने या निवेदनाद्वारे केला आहे. गेल्या दोन आठवड्यापासून रस्त्यावर पाणी येत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. विकास नियमावलीनुसार नाल्याच्या दोन्ही बाजूस नऊ मीटर जागा सोडून बांधकाम करता येते. पण अनेक बांधकामे नाल्यांक भराव टाकून झाली आहेत. त्यामुळे नाला अरुंद झाला असून अनेक ठिकाणी​ बेसमेंटमध्ये पाणी साठत आहे. बसंत बहार रोडवर असलेल्या इमारतीची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी धोक्यात आली असण्याची शक्यताही वर्तवली आहे. कायद्याची अधिकाऱ्यांकडून पायमल्ली होत असून त्याची जबाबदारी महापालिकेच्या प्रशासनावर असेल, असा इशारा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने पुन्हा शहराची कोंडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर तसेच परिसराला बुधवारी दिवसभर पुन्हा पावसाने झोडपून काढले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीचा तुंबलेल्या शहराचा अनुभव शहरवासियांनी पुन्हा घेतला. त्यामध्येच नवरात्रीनिमित्त आलेले भाविक व त्यांच्या वाहनांमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचे चित्र होते. एकीकडे पाऊस व दुसरीकडे खोळंबलेली वाहतूक यामुळे नागरिकांची कोंडी झाली.

बुधवारी दिवसभरात टप्प्याटप्प्याने पण जवळपास तासभर एकसारख्या कोसळणाऱ्या पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी करुन टाकले. गडगडाटासह झालेल्या पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी परिसरात पाण्याचे तळे साठले. दुपारी दोनच्या सुमारास व चारच्या सुमारास झालेल्या पावसामुळे गटारीतून पाणी वाहण्याऐवजी अनेक रस्त्यांवरुन पाण्याचे लोट वाटत होते. बिंदू चौक, उद्यमनगर या परिसरात त्याची तीव्रता जास्त जाणवत होती. शाहूपुरीतील गवत मंडई, परीख पूल, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार टॉकीजजवळील परिसरातही पाणी साचल्याने पादचाऱ्यांना त्यामधून वाट काढावी लागत होती. देवकर पाणंद परिसरातील रस्त्यावरही पाणी साचल्याचे चित्र होते. सकाळी काही काळ दिलेली उघडीप वगळता दिवसभर शहरात पावसाळी वातावरण होते. रात्रीही पावसाची रिपरिप सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आयआरबीच्या गटारीतून रस्त्यावर पाणी येत होते. त्यामुळे शेजारील घरांच्या आवारात पाणी शिरले होते.

एकीकडे पावसाचे पाणी तुंबल्याने वाहतूक खोळंबत होती. त्याचवेळी नवरात्रीनिमित्त ठिकठिकाणाहून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांच्या वाहनांमुळे शहरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. मंदिराकडे जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांची पावसामुळे तारांबळ उडाली. पुणे, फलटणहून एकाचवेळी आलेल्या अनेक वाहनांमुळे खानविलकर बंगला, जिल्हाधिकारी कार्यालय, आदित्य कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी या मार्गावर ठिकठिकाणी वाहतूक अन्य मार्गानी वळवल्यामुळे काहीवेळात वाहतूक सुरळीत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वॉचमनचा खून करून एटीएम फोडले

0
0

मिरज : शहरातील बॅँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून अज्ञात चोरट्यांनी राजाराम कृष्णा जाधव (वय६०) या वॉचमनचा खून केल्याची घटना बुधवारी घडली. शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पंचायत समिती कार्यालयासमोर बॅँक ऑफ इंडियाची शाखा आणि एटीएम मशीन आहे. येथे जाधव हे रात्रपाळीच्या ड्युटीला होते. बुधवारी मध्यरात्री एटीएममध्ये अचानक शिरलल्या चोरट्यांनी जाधव यांच्या डोक्यात काठीने घाव घालून एटीएम मशीन फोडले. मात्र, चोरट्यांना एटीएममधील पैशाची पेटी फोडता आली नाही. त्यामुळे पेटीतील सुमारे दहा लाखांची रक्कम बचावली. बुधवारी सकाळी एटीएम मशीन फोडल्याचे आणि राजाराम जाधव यांचा मृतदेह बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना दिसून आला. अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, शहर पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील, शहर पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, श्रीकांत पिंगळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जाधव याच्या हत्येसाठी चोरट्यांनी वापरलेली काठी मृतदेहाजवळ दिसून आली. खुर्चीवर बसलेल्या ठिकाणीच जाधव यांचा मृत्यू झाला. सीसीटीव्हीमध्ये दोन चोरटे एटीएम मशीन सोडताना दिसून आले आहेत. रात्री एक ते तीनच्या सुमारास ही घटना घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरदिवसा नाचवल्या तलवारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रविवार पेठेतील बागवान गल्लीत हल्लेखोरांनी भरदिवसा तलवारी नाचवल्या. या सशस्त्र हल्ल्यात पेट्रोल बॉम्बचाही वापर झाला. शौकत बागवान यांच्यासह गल्लीतील इतर नागरिकांच्या वाहनांचीही हल्लेखोरांनी तोडफोड केली. हल्लेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखून बागवान यांच्या घरातील रोख रकमेसह किमती ऐवज लंपास केला. याशिवाय तडाखा ग्रुपचे कार्यालयही पेटवण्याचा प्रयत्न केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

मुस्लिम बोर्डिंगच्या निवडणुकीचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. रविवारी (ता. २४ सप्टेंबर) पार पडलेल्या निवडणुकीत शौकत बागवान यांनी गणी आजरेकर यांना पाठिंबा दिला. यावरून परिसरातील काही लोक बागवान यांच्यावर नाराज होते. यातून वाढलेला संघर्ष वादाला कारणीभूत ठरला. ३५ ते ४० हल्लेखोरांनी सशस्त्र हल्ला करून प्रचंड दहशत माजवली. हातात तलवारी, कोयते, चाकू, पेट्रोल बॉम्ब आणि काठ्या घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी शिवीगाळ करत बागवान यांच्या घराची आणि वाहनांची तोडफोड केली.

घटनेची माहिती मिळताच शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यापूर्वीच हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर गणी आजरेकर घटनास्थळी आले. निरीक्षक सावंत यांनी संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दी वाढत असल्याने पोलिसांनी शीघ्र कृतीदलाच्या तुकडीला पाचारण केले. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवले.

याबाबत शाकिरा बागवान यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, फिर्यादीनुसार इरफान हलगले, सूरज साखरे, शहरुख शिकलगार, सुयम डांगे, युनुस मुजावर, जमिर मणेर, आसिफ दिलावर खान, पप्पू रणदिवे, कय्यूम अणि अनोळखी ४ ते ५ संशयितांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

हल्ल्याचा पूर्वनियोजित कट

हल्लेखोरांपैकी काहींचा चार दिवसांपूर्वीच शौकत यांच्याशी वाद झाला होता. हल्ला करण्यासाठी आलेले तरुण २५ ते ३५ या वयोगटातील होते. तोंडावर रुमाल बांधून त्यांनी ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल आणि रॉकेलच्या बाटल्या, हॉकी स्टिक, काठ्यास लोखंडी गज, तलवारी आणि चाकू अशा शस्त्रांसह आलेल्या हल्लेखोरांनी पूर्वनियोजित कट करून हल्ला केला आहे. शौकत यांच्या घरातील महिलांना धक्काबुक्की झाली. मात्र, गंभीर इजा पोहोचवली नाही, त्यामुळे दहशत माजवण्यासाठीच केलेला हा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग बारा तास सादर १२५ नाट्यगीतांचे सादरीकरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्राला नाटक, संगीत, नाट्यसंगीताची परंपरा आहे. पण विशेषत‍ः नाट्यगीताची परंपरा कमी होत आहे. हा ठेवा जपण्याचा प्रयत्न म्हणून कोल्हापुरातील ज्येष्ठ गायक व वादक रविवारी (ता. १ ऑक्टोबर) सलग बारा तास १२५ नाट्यगीते सादर करण्याचा विश्वविक्रमी कार्यक्रम करणार आहेत. सीमा जोशी यांनी ही माहिती दिली. रविराज इव्हेंट मॅनेजमेंटच्यावतीने संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी आठपासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.

स्वयंवर, संशयकल्लोळ, पुण्यप्रभाव यांना १०० वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन केले आहे. याचदिवशी संगीत रंगभूमीदिन आहे. यामध्ये आद्य नाटककार कै. विष्णूदास भावे यांनी लिहिलेल्या पहिल्या नाट्यगीतापासून ते साखर खाल्लेला माणूस या नाटकातील सूर जुळावे जगण्यासाठी इथपर्यंतच्या नाट्यगीतांचा समावेश आहे. नाट्यगीतांच्या दरम्यान या सर्व नाटकांवर माहितीपुर्ण असे निवेदनही वेगळे ठरणार आहे.

या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक ते उदयोन्मुख कलाकारांचा समावेश आहे. त्यामध्ये गायक मधुसूदन शिखरे, प्रकाश सप्रे, नीला नागावकर, वीणा जोशी, ऑर्गन वादन पंडित विश्वनाथ कान्हेरे, डॉ. ज. ल. नागावकर, लक्ष्मण पाटील करणार आहेत. तर तबला वादन डॉ. नंदकुमार जोशी, शंतून कुलकर्णी, मयुरेश शिखरे व व्हायोलिन वादन मृणालिनी परुळेकर करणार आहेत. या साऱ्यांचे निवेदन सीमा जोशी करणार आहेत. हा उपक्रम विनामूल्य आहे. सकाळी आठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उपक्रमाला सुरुवात होणार असून यामध्ये चार वेगवेगळी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर रेल्वे टर्मिनल इमारत आराखडा लवकरच

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

येथील रेल्वेस्टेशनवर टर्मिनल इमारत उभारण्याचा विचार सुरू असून, गोकुळ हॉटेल शेजारच्या जागेत टर्मिनल इमारत उभारण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. कोल्हापूर रेल्वेस्थानक मार्केट यार्ड परिसरात हलविण्यासाठी पुणे येथे आयोजित बैठकीवेळी तशी सूचना आली होती. रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणासह मॉडेल रेल्वे स्थानक, पर्यायी रेल्वेस्थानक उभारण्याचा विचारही सुरु झाला आहे. रेल्वेचा स्वनिधी किंवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) च्या माध्यमातून टर्मिनल इमारत बांधून स्थानकाच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली जाण्याची शक्यता आहे.

पुणे येथे नुकतीच मध्य रेल्वेच्या विभागीय प्रबंधकांच्या कार्यालयात खासदारांची बैठक झाली. त्यात टर्मिनल इमारतीचा आराखडा तयार करण्याची सूचना आली. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एक, दोन आणि तीन वरील प्रवाशांना या इमारतीचा फायदा होणार आहे. यामध्ये प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था, प्रतीक्षा खोली, निवास व्यवस्था, फूड मॉल, खाद्यसंस्कृती जपणारी विविध दालने उभारण्यात येणार आहेत. तिकिटांसाठी पर्यायी काउंटर व्यवस्थाही करण्यात येणार आहे. इमारतीत एटीएम सुविधांसह शहर परिसरातील पर्यटनाच्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रॅव्हल्सची सुविधा केली जाणार आहे. त्यातून पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. पर्यटकांना अंबाबाई दर्शनासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी विशेष बसेस सुरु करण्याचा विचार आहे. मोबाइल चार्जिंग, वायफायची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. गोकुळ हॉटेलशेजारी रेल्वेची सुमारे एक एकर जागा आहे. यामध्ये ही इमारत उभारण्यात येणार आहे. गेली काही वर्षे टर्मिनल इमारतीची मागणी होती. ही मागणी रेल्वेच्या विभागीय प्रबंधकांनी मान्य केली आहे. येत्या काही दिवसांत इमारतीचा आराखडा तयार केला जाणार आहे. आराड्यात टर्मिनल इमारतीसाठी लागणारा निधी रेल्वेच्या स्वनिधी आणि पीपीपीमधून उभा केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजाराम कारखान्याची वार्षिक सभा गाजणार?

0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

येथील छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याची गुरूवारी (ता. २८ सप्टेंबर) होणारी ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्या संघर्षामुळे नुकतीच कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) सभा वादग्रस्त ठरली. या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या वार्षिक सभेकडे लक्ष लागले आहे. कारखाना कार्यस्थळावर, सकाळी ११ वाजता सभा होणार आहे.

‘गोकुळ’च्या सभेप्रमाणे या वार्षिक सभेसाठीही आमदार सतेज पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांची उत्तरे न मिळाल्यास समांतर सभा घेण्याची सूचनाही त्यांनी समर्थकांना केली असल्याचे समजते. नुकताच कसबा बावड्यामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून त्यांनी सभेबाबतची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होण्याची चिन्हे आहे. ‘मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. उत्तरे मिळाली नाहीत तर कारखान्याच्या परिसरात समांतर सभा घेऊ’ असे आव्हान आमदार पाटील यांनी दिल्याने कारखान्याच्या गुरुवारच्या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

विरोधकांनी केलेल्या जोरदार तयारीच्या पार्श्वभूमीवर सत्तारुढ गटानेदेखील जोरदार तयारी केली आहे. सभेच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ओळखपत्र असलेल्या सभासदांनाच सभेला उपस्थित राहता येणार आहे असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागवान गल्लीत सशस्त्र हल्ला

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुस्लिम बोर्डिंग निवडणुकीच्या वादातून बिंदू चौकातील बागवान गल्ली येथे शौकत इक्बाल बागवान (वय ४२) यांच्या घरावर ३५ ते ४० जणांच्या जमावाने सशस्त्र हल्ला केला. हल्ल्यात प्रापंचिक साहित्याचे नुकसान करून चार दुचाकी आणि एका रिक्षाचीही मोडतोड केली. हल्लेखोरांनी जाळपोळीसाठी पेट्रोलबॉम्बचा वापर केला. कपाटातील चार तोळे सोन्याच्या दागिन्यांसह २५ हजारांची रोकड लंपास केल्याची फिर्याद शाकिरा शौकत बागवान (वय ३८) यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात दिली आहे. बुधवारी (ता. २७) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

इरफान हलगले, सूरज साखरे, शहरुख शिकलगार, सुयम डांगे, युनुस मुजावर, जमिर मणेर, आसिफ दिलावर खान,पप्पू रणदिवे, कय्यूम अणि अनोळखी ४ ते ५ संशयितांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, घटनास्थळी शीघ्रकृती दलाची तुकडी तौनात केल्याने बिंदू चौक परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. वादामुळे बागवान गल्ली आणि महात गल्लीत दिवसभर तणाव होता.

शौकत बागवान यांचे बागवान गल्लीत दुमजली घर आहे. आई, पत्नी आणि दोन मुलींसह ते या ठिकाणी राहतात. बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास त्यांच्या घरावर ३५ ते ४० जणांच्या जमावाने सशस्त्र हल्ला केला. काठ्या, लोखंडी गज, तलवारी, पेट्रोल, रॉकेलच्या बाटल्या आणि चाकू घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी बागवान यांच्या घराच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकींची आणि लोखंडी कपाटाची मोडतोड केली. काही हल्लेखोरांनी घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊन काचांची फोडल्या. घरातील साहित्य विस्कटले. इरफान हलगले याने शाकिरा बागवान यांना कोयत्याचा धाक दाखवून गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून तोडले. यावेळी काही हल्लेखोरांनी बेडरुममधील कपाटातील साहित्य विस्कटून त्यातील चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख २५ हजार रुपये लंपास केले. हॉल आणि कीचनमधील साहित्यही विस्कटले.

हल्लेखोरांनी महिलांच्या अंगावर पेट्रोल आणि रॉकेलचे बोळेही टाकले होते, मात्र गल्लीत नागरिकांची गर्दी जमताच हल्लेखोरांनी पळ काढला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र बिंदू चौक परिसरात दिवसभर तणाव होता. शाकिरा बागवान यांनी रात्री लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दखल केली असून, पोलिसांनी १५ ते १६ संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर-शिर्डी रेल्वे सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर ते शिर्डी मार्गावरील हॉलिडे स्पेशल रेल्वेगाडीला बुधवारी हिरवा झेंडा दाखवून आणि पूजन करून शुभारंभ झाला. रेल्वेच्या पहिल्या फेरीत १९० जणांनी कोल्हापूर ते शिर्डी मार्गावरील प्रवास केला. पुढील दोन आठवडे दर बुधवारी ही रेल्वे धावणार आहे. त्यानंतर प्रवाशांनी दिलेला प्रतिसाद पाहूनच दर बुधवारी रेल्वेसेवा दिली जाणार आहे. छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवर भर पावसात सायंकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वेचा शुभारंभ झाला.

यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘शताब्दी महोत्सवातच कोल्हापूर ते शिर्डी रेल्वेची सुरुवात झाली आहे. त्याचा फायदा पर्यटनवाढीसाठी होणार आहे. मिरज रेल्वेस्थानकावर थांबणारी ही रेल्वे साईनगर (शिर्डी) मार्गासाठी मंजूर करण्यात आली. यापूर्वी कोल्हापूर ते तिरुपती मार्गावरील रेल्वेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्याने कायमस्वरुपी रेल्वे गाडी सुरू झाली. आता कोल्हापूर-शिर्डी मार्गावर हॉलिडे स्पेशल ट्रेन म्हणून सुरू करण्यात आली. या रेल्वेला प्रवाशांनी दिलेला प्रतिसाद पाहूनच भविष्यात सुरु ठेवली जाणार आहे.’

या सोहळ्यानिमित्त रेल्वेचे इंजिन आकर्षक फुलांनी सजविण्यात आले. रंगीबेरंगी पताकांनी स्थानकाचा प्लॅटफॉर्म क्रमांक तीन सजविण्यात आला. इंजिनजवळच उभारलेल्या शामियान्यात शाहीरी पोवाडा, हलगीचा कडकडाट सुरू होता. यावेळी साईभक्तांनी जयघोष केला. शहरातील साई मंदिरात लाडूचे वाटप करण्यात आले. भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मोटरमन गणेश सोनवणे, असिस्टंट लोकोपायलट रंजन प्रताप आणि गार्ड विठ्ठल गावडे यांचा कोल्हापुरी फेटा, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

आमदार अमल महाडिक, महापौर हसीना फरास, रेल्वे सल्लागार समितीचे समीर शेठ, मोहन शेटे, शिवनाथ बियाणी, स्टेशन व्यवस्थापक सुग्रीव मीना, नगरसेविका रुपाराणी निकम, शेखर कुसाळे, जयेश ओसवाल, संतोष गायकवाड, हॉटेल मालक संघाचे उज्जवल नागेशकर, अरुण चोपदार, नितीन पाटील, वल्लभ बांगडे आदी उपस्थित होते.


आरक्षण सुरू

हॉलिडे स्पेशल म्हणून दर बुधवारी ही रेल्वे कोल्हापूर रेल्वेस्थानकावरुन सायंकाळी ४ वाजून ३५ सुटणार आहे. गुरुवारी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी ती साईनगर (शिर्डी) येथे पोहोचेल. तीन तासांच्या विश्रांतीनंतर रेल्वे सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी तेथून प्रस्थान करेल. कोल्हापुरात रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी ही गाडी पोहोचेल. मिरज, सांगली, सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर हे याचे प्रमुख थांबे आहेत. सहा जनरल डबे, सात स्लीपर कोच, वातानुकूलित थ्री टायर दोन डबे, द्वितीय श्रेणीतील वातानुकूलित एक डबा असे एकूण १६ डबे या गाडीला आहेत. जनरलसाठी १७० रुपये, स्लीपर कोच ३३०, थ्री टायर एसी ९०५ आणि टू टायर एससीसाठी १२९५ रुपये तिकीटदर आहेत. रेल्वेची १२०० प्रवाशांची क्षमता आहे. कोल्हापूर स्थानकातून या मार्गाचे आरक्षणही सुरु झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजारामच्या सभेत गोंधळ

0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

‘राजाराम कारखान्यातील कारभाराबाबत विचारलेल्या प्रश्नांची प्रथम उत्तरे द्या,’ असे सांगत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या भाषणामध्ये आमदार सतेज पाटील गटाच्या समर्थकांनी अडथळे आणल्याने राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी गोंधळ झाला. कारखान्याचे सेक्रेटरी उत्तर देत असतानाही विरोधकांनी गोंधळ सुरू केल्याने अखेर सभा आटोपती घ्यावी लागली. सभा संपल्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्या एकमेकांच्या दिशेने फेकल्यामुळे काही काळ तणाव झाला. विरोधकांनी तिथेच घेतलेल्या समांतर सभेमध्ये माजी चेअरमन विश्वास नेजदार यांनी सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ घडवून आणून सभा गुंडाळल्याचा आरोप केला.

दरम्यान, कुणी काहीही म्हटले तरी सरकारची परवानगी घेऊन सहवीज प्रकल्प राबवण्यात येणारच. तसेच सभासदांची परवानगी घेऊन कारखान्याची गाळप क्षमता ३५०० मेट्र‌िक टनवरुन ५००० मेट्र‌िक टन इतकी वाढवण्यात येणार असल्याचे माजी आमदार महाडिक सांगितले. अध्यक्षस्थानी चेअरमन सर्जेराव माने होते.

माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी ‘प्रश्न विचारणाऱ्यांचे स्वागत करून सर्वांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली जातील, असे सांगताना गोंधळाचा प्रयत्न केल्यास उत्तरे दिली जाणार नाहीत,’ असाही इशारा दिला. त्यांनी जिल्ह्यापासून देशापर्यंतच्या साखर उद्योगाचा आढावा घेतला. कधी कधी निसर्गाची साथ नसल्याने हा व्यवसाय अडचणीत येतो, असे सांगून महाडिक म्हणाले, ‘गेल्या १५-२० वर्षांपासून कारखाना काटकसरीने व पारदर्शकपणे चालवला असून लेखापरीक्षणमध्ये अ वर्ग मिळाला. कारखान्याने व्यावसायिक व्यवस्थापन स्वीकारले आहे. सहवीज निर्मितीचा प्रस्ताव साखर आयुक्तांच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. त्याला मंजुरी मिळताच कार्यान्वित करण्यात येईल. त्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध आहे. महाडिकांचे भाषण सुरू असतानाच विरोधकांनी ‘प्रथम आमच्या लेखी प्रश्नांना उत्तरे द्या’ असे विचारण्यास सुरुवात केली. त्यांच्या भाषणानंतर सेक्रेटरी उदय मोरे हे विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत असताना पुन्हा गोंधळ वाढला. त्यानंतर तातडीने राष्ट्रगीत सुरू करून सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.

यामुळ आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूस येऊन व्यासपीठासमोर समांतर सभा घेतली. यावेळी माजी चेअरमन नेजदार म्हणाले, ‘सत्ताधाऱ्यांना लेखी प्रश्न दिले होते. पण समाधानकारक उत्तरे न देता त्यांच्याच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून सभा गुंडाळली. या सभेनंतर सर्व कार्यकर्ते जात असताना प्रथम काही कार्यकर्त्यांनी खुर्च्या विस्कटण्यास सुरुवात केली. तसेच विरोधी बाजुच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर फेकून मारण्यास सुरुवात केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. यावेळी आमदार अमल महाडिक, नगरसेवक सत्यजित कदम तर पाटील गटाचे नाना उलपे, जे. एल. पाटील, अॅड. प्रल्हाद लाड यांनी कार्यकर्त्यांना रोखले.


मैदान सोडून पळू नका....

पंधरा मिनिटानंतर महाडिक यांच्या भाषणावेळी आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांनी उठून भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला त्याच वेळी महाडिक गटाचे कार्यकर्ते उठून उभा राहिले असता त्यांना ‘तुम्ही शांत बसा. ते रडीचा डाव खेळत आहेत. मैदान सोडू नका, पळून जाऊ नका थांबा,’ असे महाडिक यांनी सुनावले. दरम्यान, विश्वास नेजदार यांनी महाडिक यांच्या भाषणादरम्यान ​प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केल्यामुळे महाडिक यांनी त्यांना इशारावजा सल्ला दिला.

‘त्यांचा’ अहवाल दाखवा आणि बक्षीस मिळवा

डॉ. डी. वाय. पाटील सहकारी कारखान्याचा अहवाल दाखवा आणि अकरा हजार बक्षीस घेऊन जा, असे सांगत माजी आमदार महादेवराव म​हा​डिक यांनी आमदार सतेज पाटील हे विरोधासाठी विरोध करत आहेत, असा आरोप सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केला. डी. वाय. पाटील कारखान्याकडे २०१२ - १३ मध्ये अ वर्ग सभासदांची संख्या ६५५३ होती. ती २०१३ - १४ मध्ये ४३४१ ने कमी होऊन २२१२ फक्त सभासद राहिले. एका रात्रीत हे सभासद कमी कसे झाले? असा सवालही महाडिक यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच लाखांचे मद्य जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकाने करवीर तालुक्यातील पिरवाडी येथे गोवा बनावटीचे पाच लाखांचे मद्य पकडले. या कारवाईत दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडील वाहनही जप्त केले. राहुल भीमराव जाधव (वय २७, रा. ए वॉर्ड, निवृत्ती चौक, शिवाजी पेठ, कोल्हापूर) आणि महादेव विठ्ठल म्हाडगूत (२९, रा. खंडोबा तालीम शेजारी, शिवाजी पेठ, कोल्हापूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

गोवा बनावटीच्या मद्याची छुपी वाहतूक सुरू असून, राधानगरी मार्गावरून एका वाहनातून मद्य कोल्हापुरात पोहोचणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यानुसार भरारी पथकाने पिरवाडीजवळ सापळा रचून संशयित सुमो व्हिक्टा (एम. एच. ०७ एच २०९९) या वाहनाची तपासणी केली. यावेळी गोवा बनावटीचे आणि केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेले ४ लाख ९३ हजार रुपये किमतीचे विदेशी मद्य जप्त केले. हे वाहन घेऊन आलेले राहुल जाधव आणि महादेव म्हाडगूत या दोघांना पथकाने अटक केले. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. भरारी पथकातील युवराज शिंदे, सुनील परळे, एस. आर. जाधव, जी. पी. थोरात, संतोष बिराजदार, श्रीपाद पाटील, आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासवर्ड विचारून लाखाचा गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बँक खात्याला आधार नंबर लिंक करण्यासाठी ऑनलाइन बँकिंगचा पासवर्ड विचारून घेऊन एका नागरिकाला लाखाचा गंडा घालण्यात आला. याबाबत दत्तात्रय लक्ष्मण भोसले (वय ४७, रा. पेरीड, ता. शाहूवाडी) यांनी बुधवारी (ता. २७) शाहूवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा गुन्हा सायबर पोलिस ठाण्याकडे वर्ग केला असून, पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तात्रय भोसले हे पेरीड येथील ठाणेश्वर दूध संस्थेचे पदाधिकारी आहेत. रत्नाकर बँकेतील त्यांच्या खात्यावर १ लाख, ५७ हजार रुपये शिल्लक होते. १९ सप्टेंबरला त्यांना मोबाइलवर फोन आला. ‘रत्नाकर बँकेतून बोलत असून, तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचे आहे. आधार कार्डचा नंबर द्या आणि तुमच्या मोबाइलवर येणारा ओटीपी (वन टाइम पासवर्ड) सांगा.’ बँकेत न जाताच आधार कार्ड लिंक होईल या हेतूने भोसले यांनी आधार कार्ड आणि ओटीपी सांगितला. यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यावरील ९७ हजार रुपये ऑनलाइन दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यात आले. बँकेतून येणारा मेसेज न पाहिल्याने भोसले यांना सुरुवातीला रक्कम गायब झाल्याचे समजलेच नाही. चार दिवसांपुर्वी बँकेत गेल्यानंतर रक्कम लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी बँक अधिकाऱ्यांना माहिती दिली, मात्र अधिकाऱ्यांनी हात झटकल्यानंतर त्यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर क्राइमशी संबंधित असल्याने पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी हा गुन्हा सायबर पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे. ऑनलाइन रक्कम हडप करणाऱ्या संशयिताने वापरलेल्या मोबाइल नंबरवरून पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

बँकांनी झटकले हात

कोल्हापुरातील युनिक ऑटोमोबाइल कंपनीच्या बँक खात्यातून सव्वा कोटींची रक्कम लंपास झाली आहे. याशिवाय दोनच दिवसांपुर्वी जयसिंगपूर येथील एका व्यक्तीच्या खात्यावरूनही रक्कम लंपास झाली आहे. या घटनांमध्ये बँक खात्यांची माहिती आणि संबंधित खातेदारांचे मोबाइल नंबर संशयितांना कसे मिळाले? याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. गुन्हे घडल्यानंतर बँक जबाबदारी झटकते अशा खातेदारांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे बँकांकडून खातेदारांची गोपनीय माहिती सुरक्षित ठेवली जाते की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांच्या गर्दीची अष्टमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शारदीय नवरात्रोत्सवातील अष्टमीच्या दिवशी, गुरुवारी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी झाल्यामुळे मंदिर परिसर फुलून गेला. दरम्यान, अष्टमीदिवशी केवळ पूर्व दरवाजातूनच प्रवेश दिला जात असल्यामुळे काही काळ गर्दीचे नियोजन करण्यात अडथळा येत होता. मात्र, ज्येष्ठ व लहान मुलांसोबत असलेल्या महिलांना दुपारनंतर घाटी दरवाजामार्गे प्रवेश देण्यात आला.

गुरूवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली. पर्यटक भाविकांसह गुरूवारी स्थानिक भाविकांची संख्या जास्त होती. नवरात्रकाळात देवीला तेल वाहण्याची प्रथा असल्यामुळे महिला भाविकांची मोठी गर्दी होती.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरासह शहरात खंडेनवमीची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे. खंडेनवमीला शस्त्रपूजनाचा विधी केला जातो. त्यामुळे या पूजनाला लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे.

दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आज खंडेनवमीदिवशी शुक्रवारी अंबाबाई मंदिर सकाळी ९ वाजता खुले करण्यात येणार आहे. त्याआधी पुण्यवचन आणि घट उठण्याचा विधी होणार आहे. यावेळी तोफेची सलामी दिली जाणार आहे. आजच्या दिवशी मंदिरातील घट उठवल्यानंतर करण्यात येणार असून त्याचबरोबर परंपरेप्रमाणे मंदिरातील देवीच्या खजिन्यावर शस्त्रपूजन करण्यात येणार आहे. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात संस्थानकालीन परंपरेनुसार शस्त्रपूजनाची तयारी करण्यात आली आहे. बाजारपेठेत गर्दीखंडेनवमीला होणाऱ्या शस्त्रपूजनाला लागणाऱ्या साहित्य खरेदीची लगबग गुरूवारी दिवसभर शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये सुरू होती. खंडेनवमीसाठी घरोघरी शस्त्र व गृहोपयोगी साधने तसेच व्यवसायाची साधने यांची पूजा केली जाते. त्यासाठी गुरूवारी स्वच्छता करण्यात आली. झेंडू, ऊस, लव्हाळा, रांगोळीची खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ ठिकाणी पे अँड पार्क

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सध्या शहरात पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत असून त्यावर मार्ग काढण्यासाठी शहरातील आठ वर्दळीच्या ठिकाणी केएमटीच्यावतीने पार्किंगच्या नवीन जागा निश्चित केल्या आहेत. त्यासाठी पे अँड पार्कसाठी ठेका देण्यात येणार असून आर्थिक चणचणीत असलेल्या केएमटीला वर्षाला किमान ९१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत या ठेक्याचे टेंडर भरण्याची मुदत आहे.

पार्किंगची नीट व्यवस्था नसल्याने शहरात कुठेही वाहने उभी केली जात आहेत. वर्दळीच्या रस्त्यांवर पार्किंग नसताना वाहने उभी केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात असताना वाहने कुठे पार्क करायची हे दाखवा असे वाद नागरिक व पोलिसांमध्ये होत असतात. महापालिकेने पार्किंगच्या जागा उपलब करून देण्याची आवश्यकता असते. सध्या केएमटीच्यावतीने बिंदू चौकामध्ये पे अँड पार्क चालवले जाते. त्याचा अनुभव घेऊन शहरात अन्य ठिकाणीही पार्किंगचा ठेका सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेसमोर ठेवला होता. त्याप्रमाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने केएमटीसाठी जागा देण्याचा ठराव केला.

शहरातील अनेक ठिकाणी दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था आवश्यक होती. त्याप्रमाणे केएमटीने आठ विविध ठिकाणच्या जागा निश्चित केल्या असून त्याचे पे अँड पार्कसाठी टेंडर काढले आहे. या ठेक्यातून महापालिकेला वर्षासाठी किमान ९१ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. सर्वात जास्त उत्पन्न सीपीआर हॉस्पिटल रस्त्यावरून अपेक्षित आहे. तिथे दुचाकीबरोबर चारचाकी हलकी वाहनेही पार्किंग करण्याची व्यवस्था केली आहे. तर स्टेशन रोडवरही चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची जागा निवडली आहे. चारचाकी व अवजड वाहनांसाठी हुतात्मा पार्कच्या दक्षिणेकडील बाजूला जागा ठेवली आहे.


पार्किंगची नवीन ठिकाणे

दुचाकीसाठी

रंकाळा पदपथ उद्यान

​कपिलतीर्थ मार्केट

चारचाकी वाहने

डी. एड. कॉलेज, रंकाळा टॉवर

ताराबाई रोड, पाटणकर हायस्कूललगत

स्टेशन रोड, गोकुळ हॉटेल लगत

दुचाकी व चारचाकी वाहने

सीपीआर हॉस्पिटल रोड

आरटीओ ऑफिससमोर

चारचाकी व अवजड वाहने

हुतात्मा पार्कशेजारी



पार्किंगचे दर प्रति तास, रुपयांत

दुचाकीसाठी ५

चारचाकीसाठी २०

मिनी बससाठी ५०

आरामबस, अवजड वाहने १००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images