Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

​ ‘मला सत्तेचा मोह अज‌िबात नाही’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

‘सत्तेच्या राजकारणाचा मला कधीही मोह नव्हता व नाही. सत्तेत नसतानाही समाजासाठी खूप काही करता येते,’ असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत केले. संजय भोकरे शैक्षणिक संकुलात ‘जागर जाणिवांचा’ या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ‘राजकारणात सत्ता येते व जाते. मात्र, समाजाचे आपण काही देणे लागतो या जाणिवेतून काम करत राहिल्यास आपण बरेच काही करू शकतो. महाराष्ट्र राज्य देशात प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहावे हीच माझी इच्छा असून, त्यासाठी मी आजवर काम करत आले आहे. महाराष्ट्रात महिला व मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, त्यांच्या मनातील ही भीती काढण्यासाठी पक्षविरहित सामाजिक चळवळ उभी केली पाहिजे.’

देशाच्या इतिहासात झाल्या नव्हत्या इतक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात झाल्या असल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या तीन वर्षांत तिप्पट झाल्या असून त्यास केवळ हे शासनच जबाबदार आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी हाच त्यावर एकमेव उपाय आहे. शिक्षणक्षेत्राचा या शासनाने खेळखंडोबा केला असून विद्यार्थ्यांचे भवितव्य यामुळे धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतपासून ते राष्ट्रपती पदापर्यंतची सर्व सत्तास्थाने आज भाजपच्या हाती असूनही देशातील जनता सुखी व समाधानी नाही हे या शासनाचे फार मोठे अपयश आहे,, असेही त्या म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षणमंत्री तावडेंच्या अंगावरबुक्का फेरण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
शिक्षणमंत्री विनोद तावडे शुक्रवारी साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या एका कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रमादरम्यान ‘मल्हार क्रांती’संघटनेच्या मारुती जानकर याने अचानक तावडे यांच्या अंगावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न केला. घोषणाबाजीही केली. पोलिसांनी जानकरला त्वरित अटक केली आहे. दरम्यान, या घटनेचा भाजप नेते पुरुषोत्तम जाधव यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त सातारा येथील मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिक्षण क्रिडा व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे सभामंडपाकडे जात असताना मल्हार क्रांतीचे समर्थक मारुती जानकर यांनी अचानकपणे हातातील बुक्का शिक्षणमंत्र्यांच्या दिशेने फेकला. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. या वेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी त्वरित जानकर यांना अटक केली. धनगर आरक्षण व सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी मल्हार क्रांतीच्या वतीने अनेकदा निवेदन दिले होते. पण, त्याची गंभीर दखल न घेतल्यामुळे शिक्षणमंत्र्यांवर बुक्का टाकण्यात आला. दोन वर्षांपूर्वी सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या अंगावर धनगर मोर्चावेळीही मारुती जानकर यांनी बुक्का टाकल्यामुळे आमदार भोसले समर्थकांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. तसेच बुक्का टाकण्याच्या घटनेवरुन धनगर समाजाच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला होता.
रयतच्या कार्यक्रमाला मोठा पोलिस बंदोबस्त होता, तरीही असा प्रकार घडल्यामुळे भाजप नेते संतप्त झाले आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु, अशा पद्धतीने मंत्री महोदयांच्या अंगावर बुक्का टाकणे घटनाबाह्य आहे. अशा प्रवृत्तीला समाजानेही धडा शिकवावा, अशी मागणी भाजप नेते पुरुषोत्तम जाधव यांनी केली आहे. मराठा किंवा धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत भाजपची भूमिका सकारात्मक आहे. एवढेच नव्हे तर मराठा म्हणून जिल्ह्यातील व मुंबई शहरातील मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही सक्रीय सहभाग घेतला होता. त्यामुळे भाजपच्या भूमिकेला आमचा पाठींबा आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. सोलापूर विद्यापाठीला अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ आणि सिद्धेश्वर विद्यापीठ, असे नाव देण्याची मागणी पुढे आली आहे. एकटा शिक्षणमंत्री विद्यापीठाला नाव देऊ शकत नाही. मंत्रिमंडळाने तसा निर्णय घ्यावा लागतो. धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे, असेही तावडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शिक्षणासाठीचा निधीभविष्याची गुंतवणूकशिक्षणमंत्री विनोद तावडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
‘कर रुपातून मिळणाऱ्या प्रत्येकी २ रुपये ४० पैशापैकी ५७ पैसे आपण शिक्षणासाठी खर्च करतो. हा निधी खर्च नसून उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक आहे,’ असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३०व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. या वेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौंसिलचे सदस्य पतंगराव कदम, संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, संस्थेचे मॅनेजिंग कौंसिल सदस्य डॉ. एन. डी. पाटील, सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत आदी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या योजनेमुळे राज्यात १०१५३ शाळांचा दर्जा सुधारला आहे. ऑपरेशन डिजिटल शाळा कार्यक्रमातून ६००३२ शाळा डिजिटल झाल्या आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदातील शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी लोकांचा सहभाग घेतला. शाळा सुधारणेला चालना देण्याच्या धोरणाला चांगला प्रतिसाद मिळात आहे. लोक सहभागातून ३२६ कोटी रुपये उभे राहिले आहेत. त्यातून जिल्हा परिषद शाळांच्या प्रगतीला मोठा हातभार लागला आहे. शिक्षणात गती आणण्यासाठी मोबाइलचा वापर करण्यायची परवानगी दिली. आज स्मार्टफोनचा वापर करून १ लाख ८७ हजार शिक्षक नवनवे ज्ञान आत्मसात करीत आहेत.’
रयतला स्वायत्ता शक्य
या युगात गुणवत्ता महत्वाची आहे. त्यासाठी शिक्षणामध्ये नवनवे बदल करणे आवश्यक असून, कालानुरुप बदल करण्यासाठी आपण अनुकूल आहोत. रयत सारख्या शिक्षण संस्थांना स्वायत्ता देण्याचा विचार होऊ शकतो. रयत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी झटणारी संस्था आहे, म्हणूनच रयत शिक्षण संस्थेच्या गुरुकुलाला मान्यता दिल्याचेही शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.
परिसंवादाची कल्पना
रयत शिक्षण संस्थेला २०१९मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने रयत शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कर्मवीर भाऊराव पाटील आज असते तर त्यांनी शिक्षणात कोणते बदल केले असते’ यावर एक दिवसाचा परिसंवाद व्हावा. या परिसंवादात लोकांनी मांडलेल्या विचारांचा अहवाल तयार करून, तो राज्याच्या समोर ठेवू, अशी कल्पना शिक्षणमंत्र्यांनी मांडली. दरम्यान, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भाषणानंतर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायची मुभा दिली. मंचावरुन खाली उतरुन विद्यार्थ्यांमध्ये येऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ तीन वर्षांच्या भाचीवर बलात्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव
तीन वर्षांच्या भाचीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घृणास्पद आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील हारुगेरी गावच्या शिवारात ही घटना घडली. बलिकेवर अत्याचार करून तिचा गळा घोटणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.
बलिकेवरील अत्याचाराची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. गुरुवारी दुपारी कोणाचे लक्ष नसल्याचे पाहून भाचीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून गावाबाहेरील उसाच्या शेतात नेले. उसाच्या शेतात त्याने बालिकेवर अत्याचार करताना तिने ओरडण्यास सुरुवात केली असता आवाज बंद करण्यासाठी त्या नराधमाने तिच्या तोंडात माती कोंबली. तिला मातीत अर्धवट पुरले. हे दुष्कृत्य करून तो घरी आला तेव्हा मुलगी बेपत्ता झाले म्हणून शोधाशोध सुरू होती. या नराधमाने देखील शोधाशोध करण्याचे नाटक केले. पण, गावातील काही लोकांनी बालिकेला आरोपीने नेल्याचे सांगितले. पण त्याला विचारल्यावर त्याने कानावर हात ठेवले. अखेर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर त्याने आपल्या राक्षसी कृत्याची कबुली दिली. या घटनेचे वृत्त कळताच ग्रामस्थ पोलिस स्थानाकासमोर जमा झाले, त्यांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केल्याने गावात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विश्वशांतीसाठी जैन तत्त्वज्ञानाची गरज’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

‘देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सीमेवर रोज सैनिक धारातीर्थी पडत आहेत. समतेचा विचार मांडणाऱ्या दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांसारख्यांच्या हत्या होत आहेत. साम्राज्यवाद आणि धर्मविकृती यामुळे जग विनाशाकडे चालले आहे. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी व जगाला शांतता, अहिंसेच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी जैन तत्त्वज्ञान उपयोगी पडेल,’ असे प्रतिपादन इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले.

जयसिंगपूर येथे २२व्या जैन मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. लीलावती शहा होत्या. येथील सोनाबाई इंगळे सभागृहात प. पू. स्वस्तिश्री भट्टारक डॉ. लक्ष्मीसेन महास्वामी (कोल्हापूर) व प. पू. स्वस्तिश्री भट्टारक जिनसेन महास्वामी (नांदणी) यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी निवृत्त न्यायाधीश भालचंद्र वग्याणी, स्वागताध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, आदिनाथ कुरुंदवाडे, श्रीकांत नरुले प्रमुख उपस्थित होते.

कोकाटे म्हणाले, ‘मराठी-कानडी वाद निरर्थक असून, दोन्ही भाषा मायलेकींप्रमाणे आहेत. मराठी भाषा टिकविण्यामध्ये, तिचे जतन, संवर्धन आणि विकास करण्यात जैन साहित्याचा मोठा वाटा आहे. पुरातत्त्वीय उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरून हे सिद्ध होते. जैन धर्म श्रमणसंस्कृतीचे पालन करतो. क्रांती नेहमी लोकभाषेद्वारे होते. त्यामुळेच गौतम बुद्ध व महावीर यांनी त्यांच्या रचना प्राकृत भाषेतून केल्या. त्यांच्या विचारांचा शोध घेण्यासाठी इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे.’

संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. लीलावती शहा म्हणाल्या, ‘नव्या पिढीला इतिहास माहीत होण्यासाठी अशा प्रकारची संमेलने होणे गरजेचे आहे. जगाला हिंसेपासून वाचविण्यासाठी जैन धर्मीयांनी एकत्र येऊन प्रबोधन करावे. आज जग विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. खून, बलात्कार, हल्ले अशा घटना पावलोपावली घडत आहेत. समाजातील संवेदनशीलता हरवली की काय, असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. अशा परिस्थितीत नवलेखकांनी संवेदनशील लिखाणातून जनजागरण करावे. जैन धर्मातील अहिंसेचा संदेशच जगाला तारेल. जैन साहित्य समाजाला दिशा देईल.’

संमेलनास ग्रंथदिंडीने सुरुवात झाली. दिंडीचा प्रारंभ आप्पासाहेब पाटील यांच्याहस्ते झाला. ध्वजवंदन स्वातंत्र्यसेनानी आदगोंडा पाटील यांनी केले. प्राचीन दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. बी. ए. पाटील यांच्याहस्ते, तर डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जीवनदर्शन ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशांत शहा यांच्याहस्ते झाले. डॉ. रावसाहेब पाटील यांनी स्वागत केले. प्रा. डी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. तीर्थंकर माणगावे यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनाचे उपाध्यक्ष सागर चौगुले यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४५ दुचाकीस्वारांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील वाहतुकीच्या शिस्तीसाठी वाहतूक नियंत्रण शाखेने पुन्हा ट्रॅफिक ड्राइव्ह सुरू केला. शुक्रवारी (ता. २२) शहरातील सर्वच महाविद्यालयांच्या परिसरासह चौकांमध्ये कारवाई केली. भरधाव वाहने चालवून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १४५ दुचाकीस्वारांवर कारवाई करून २९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलिसांनी कॉलेज परिसरातील बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई करून त्यांच्या गतीला ब्रेक लावला.

बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करून शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची मोहीम वाहतूक नियंत्रण शाखेकडून सुरू होती. गणेशोत्सवादरम्यान ही मोहीम थंडावली होती. कारवाई थांबल्याने पुन्हा बेशिस्त दुचाकीस्वारांचा उपद्रव वाढला होता. विशेषतः कॉलेज परिसरात विना लायसन आणि सुसाट दुचाकी चालवणाऱ्या तरुणांची संख्या वाढली होती. ट्रॅफिक सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे, उलट्या दिशेने दुचाकी चालवणे, कर्कश्श हॉर्न वाजवण्याचे प्रकार सुरू असल्याने पोलिसांनी पुन्हा ट्रॅफिक ड्राइव्ह सुरू केला आहे. शुक्रवारी शहरातील विवेकानंद कॉलेज. शहाजी कॉलेज, शाहू कॉलेज, कॉमर्स कॉलेज, न्यू कॉलेज, गोखले, कॉलेज, सायबर चौक परिसर यासह विविध चौकांमध्ये कारवाई केली.

लायसन जवळ न बाळगणे, सदोष नंबरप्लेट, ट्रीपल सिट, गर्दीतून सुसाट वेगाने वाहन चालवणे अशा प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्या कॉलेज तरुणांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई केली. दिवसभरा १४५ दुचाकीधारकांकडून २९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने ही कारवाई केली अशून, यापुढेही कारवाई सुरू राहणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेला सव्वापाच लाखांचा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील सोन्या मारुती चौकात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून श्रीपाद विश्वनाथ ऐनापुरे (रा. आर. के. नगर सोसायटी) यांचा २१ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. या अपघाताबद्दल जिल्हा न्यायाधीश एम. ए. लव्हेकर यांनी महापालिकेला दोषी ठरवले असून, महापालिकेने मृताच्या वारसांना पाच लाख, २३ हजार, ६०० रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश दिला आहे. वीस वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर ऐनापुरे कुटुंबाला न्याय मिळाला.

श्रीपाद ऐनापुरे हे व्हिनस टॉकीजमध्ये डोअर कीपर म्हणून काम करीत होते. २८ जुलै, १९९६ रोजी रात्री ते स्कूटरवरून बुधवार पेठेतून व्हीनस टॉकीजकडे जाताना सोन्या मारुती चौकात ड्रेनेजच्या खड्डयात स्कूटर पडून अपघात झाला. खड्ड्याभोवती संरक्षक कठडा नसल्याने ऐनापुरे यांना जीव गमवावा लागला होता. यानंतर ऐनापुरे यांच्या पत्नी अंजना यांनी १८ फेब्रुवारी, १०९७ मध्ये महापालिकेला नोटीस पाठवून पाच लाख, ८० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली, मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. अंजना ऐनापुरे यांनी याविरोधात दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. तत्कालीन जिल्हा न्यायाधीश के. डी. भोसले यांनी अपघातास महापालिकेस जबाबदार धरून श्रीपाद ऐनापुरे यांच्या वारसांना एक लाख, ७६ हजार रुपये द्यावेत असा निर्णय दिला होता. महापालिकेने तात्पुरती एक लाख रुपायांची रक्कम देऊन या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने हा खटला पुन्हा जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित केला. जिल्हा न्यायाधीश एम. ए. लव्हेकर यांनी नुकताच याबाबत निर्णय दिला असून, अपघातास महापालिकेला दोषी धरले आहे. महापालिकेने मृत ऐनापुरे यांच्या वारसांना ५ लाख, २३ हजार, ६०० रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा निर्णय दिला आहे.

तब्बल २१ वर्षे न्यायालयीन लढाई लढल्यानंतर मृत ऐनापुरे यांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय कोर्टाने दिल्याने ऐनापुरे कुटंबीयांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले. चार दिवसांपूर्वीच खानविलकर पेट्रोलपंपाजवळ ड्रेनेजच्या पाइपमुळे सख्ख्या भावंडांचे बळी घेतल्याने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. फिर्यादीच्या वतीने अॅड. अजित मोहिते यांनी काम पाहिले. निकालानंतर अॅड. मोहिते म्हणाले, ‘शहरातील रस्त्यांबाबत महापालिका प्रशासन उदासीन आहे. रस्त्यांची दुरुस्ती वेळेत होत नाही. खड्ड्यांमुळे नागरिकांचे बळी जातात, तरीही महापालिका पुरेशी दक्षता घेत नाही. या निर्णयामुळे महापालिका प्रशासनाला जाग येईल, अशी अपेक्षा आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीजीएस करून सव्वाकोटी लंपास

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नेटबँकिंगद्वारे युनिक ऑटोमोबाइल कंपनीला १ कोटी २४ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघकीस आला. युनिकचे मॅनेजर शक्ती जयसिंगराव घाटगे (वय ३६, रा. राजोपाध्येनगर) यांनी संशयित सुशांत दयानंद तुरंबेकर याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. युनिक ऑटोमोबाइल कंपनीच्या बँक खात्याचा यूजर आयडी आणि पासवर्ड मिळवून ही रक्कम लंपास केली आहे. रक्कम वर्ग झालेल्या १२ खातेदारांचीही चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.

शक्ती घाटगे हे जुना पुणे-बेंगळुरू महामार्गावरील युनिक ऑटोमोबाइल्स इंडिया प्रा. लि. या वाहन विक्रीच्या कंपनीत अकाउंट मॅनेजर आहेत. कंपनीचे आर्थिक व्यवहार पाहण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. कंपनीच्या बँक खात्यांचे व्यवहार घाटगे यांच्याकडेच आहेत. सुशांत तुरंबेकर नावाच्या संशयिताने घाटगे यांच्या मोबाइल नंबरवरून कंपनीच्या बँक खात्याचे तपशील मिळवले. नेटबँकिंगचा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून १ कोटी २४ लाख ६० हजार रुपयांची रक्कम आरटीजीएसद्वारे लंपास केली आहे. सोमवारी (ता. १८) हा प्रकार घाटगे यांच्या लक्षात आला. कंपनीतील अधिकाऱ्यांशी चर्चा करून घाटगे यांनी गुरुवारी रात्री उशिरा शाहूपुरी पोलिस ठाण्यात संशयित सुशांत तुरंबेकर याच्यासह रक्कम वर्ग झालेल्या १२ बँक खातेदारांवर फिर्याद दाखल केली आहे.

मोबाइल केला रि-इश्यू

संशयिताने नेटबँकिंगचा वापर करण्यासाठी शक्ती घाटगे यांचा मोबाइल क्रमांक रि-इश्यू केला. यासाठी कंपनीच्या बनावट कागदपत्रांचा वापर केला आहे. गुन्ह्यात मोठी रक्कम ऑनलाइन लंपास झाल्याने कंपनीतील अधिकारीही अवाक झाले आहेत. कंपनीने बँक खात्यांचे तपशील पोलिसांकडे दिले आहेत. ज्या खात्यांवर रक्कम वर्ग करण्यात आली आहे त्या १२ बँक खातेदारांची नावे आणि खाते क्रमांकही बँकेला मिळाले आहेत. ऑनलाइन गुन्हा घडल्याने याच्या तपासासाठी सायबर पोलिस ठाण्याचीही मदत घेतली जात आहे.


१२ खातेदार संशयाच्या भोवऱ्यात

संशयित सुशांत तुरंबेकर याने १ कोटी २४ लाख ६० हजार रुपयांची रक्कम १२ खात्यांवर वर्ग केली आहे. या खातेदारांची नावे आणि बँक डिटेल्स पोलिसांनी मिळवली आहेत. या खातेदारांशी संबंधित व्यक्तीनेच युनिक ऑटोमोबाइल कंपनीतील रक्कम लांबवल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. १२ खातेदारांची चौकशीही पोलसांनी सुरू केली आहे.

बनावट नावाची शक्यता

शक्ती घाटगे यांचा मोबाइल क्रमांक रि-इश्यू करण्यासाठी सुशांत दयानंद तुरंबेकर या नावाचा वापर झाला आहे. संशयिताने सुशांत तुरंबेकर हे बनावट नाव वापरून मोबाइल नंबर मिळवला असल्याची शक्यता आहे. १२ खातेदारांपैकी एखाद्या व्यक्तीनेच हा ऑनलाइन फ्रॉड केला असेल असाही संशय पोलिसांना आहे. या घटनेने ऑनलाइन आणि कॅशलेस व्यवहारांमधील त्रुटी समोर आल्या आहेत.

०००००००००

ही दक्षता घ्या...

बॅंकेचे व्यवहार ऑनलाइन किंवा मोबाइलवरून करताना दक्षता घेणे आवश्यक असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. असे प्रकार टाळण्यासाठी ही दक्षता घ्या :

- बॅंक खात्याला लिंक केलेल्या मेलवर लक्ष ठेवणे आवश्यक.

- मोबाइल क्रमांक ब्लॉक झाल्यास तातडीने बॅंकेला त्याची माहिती द्या, खात्यावरील व्यवहार थांबवा.

- बॅंक खात्याचा पासवर्ड सतत बदला.

- नवे अॅप डाउनलोड करताना मोबाइलवरील सर्व माहितीचा अॅक्सेस मागितला गेला तर त्यास नकार देण्याचा निर्णय आपण घेऊ शकता.

-बनावट अॅपला प्रतिसाद देऊ नका, तशी यादी उपलब्ध असते.

- फेक (बनावट) फोनकॉल्सना उत्तर देऊ नका,

- पासवर्डची माहिती कुणालाही देऊ नका.

-मोबाइल बॅंकिंगसाठी बॅंकेच्या सुरक्षा नियमावलीची अंमलबजावणी करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तर अधिकाऱ्यांना हाकलू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या संरक्षक भिंतीचे काम सात महिन्यापासून जैसे थे आहे. आता कामाचे टेंडर ३० सप्टेंबरपूर्वी प्रसिद्ध न केल्यास अतिरिक्त आयुक्तांना केबिनमध्ये बसू दिले जाणार नाही, असा इशारा देत महापौर हसीना फरास यांनी कामामध्ये प्रगती नसल्याबद्दल उपशहर अभियंता एस. के. माने यांना धारेवर धरले. महापौरांच्या आदेशाचे उल्लंघन करत असतील तर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्या, असा आदेशही दिला. तसेच वेळेत काम केला नाही‌ तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील खुर्च्या बाहेर फेकू, असा इशारा माजी नगरसेवक आदिल फरास यांनी दिला.

शाहू समाधीस्थळाचे काम तातडीने पुर्ण करण्यासाठी महापौर हसीना फरास, सभागृह नेता प्रवीण केसरकर, विरोधी पक्षनेता किरण शिराळे या पदाधिकाऱ्यांनी नगररसेवकांसमवेत शुक्रवारी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

वास्तुशिल्पी अभिज‌ित जाधव यांनी समाधीस्थळासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याची माहिती दिली. महापौरांनी सात महिन्यापुर्वी केलेल्या पाहणीवेळी जी परिस्थिती होती, तीच परिस्थिती आता आहे. त्यावेळी संरक्षक​ भिंत बांधण्याचे ठरले होते. परंतु अद्यापही या कामाची निविदा काढण्यात आली नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. तसेच सहा कोटींची निविदा काढण्यात आली असून भिंतीसाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली होती. ७० लाख शिल्लक असल्याने त्याचे टेंडर काढून काम का सुरू केले नाही? अशी विचारणाही केली. स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी लक्ष ठेवून कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घेऊन नागरिकांनी समाधीस्थळाचे पावित्र्य राखावे, असे आवाहन महापौरांनी केले. उर्वरित निधीची तरतूद पुढील महासभेमध्ये करुन देऊ असेही स्पष्ट केले. याबाबत माने म्हणाले, सरकारकडून झोन बदलाची माहिती १५ दिवसांपूर्वी महापालिकेस मिळाली आहे. त्यामुळे आता संपुर्ण भिंतीचे टेंडर दोन टप्प्यामध्ये काढण्यात येईल. सिव्हील वर्कचे काम पुर्ण झाले असून ब्राँझ धातूपासून मेघडंबरी बनवण्याचे काम अंतिम टप्यात आहे. यावेळी नगरसेवक कमलाकर भोपळे, रियाज सुभेदार, इतिहास संशोधक इंद्रज‌ित सावंत, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, कंत्राटदार व्ही. के. पाटील उपस्थित होते.

...तर खुर्च्या बाहेर फेकू

वारंवार सूचना करूनही जर काम होत नसेल तर अधिका ऱ्यांच्या खुर्च्या बाहेर फेकाव्या लागतील, असा इशारा माजी नगरसेवक आणि महापौरांचे पुत्र आदिल फरास यांनी दिला. शाहू महाराजांच्या समाधीचे काम असताना प्रशासनाकडून दिरंगाई कशी होऊ शकते? मेघडंबरीचे काम लवकर होत नसेल तर भिंतीचे काम सुरू करा, असे सांगितले असतानाही त्याची निविदा का काढण्यात आली नाही, असा सवाल उपशहर अभियंत्यांना केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी सेविकांचे जेलभरो

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

काम बंद आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून जेलभरो केले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत जि.प.च्या आवारात घुसण्याचा प्रयत्न सेविकांनी केला. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलकांना पोलिस वाहनात घातले. त्यावेळी आंदोलन आणि महिला पोलिसांत जोरदार झटापट झाली. दरम्यान, मागण्यांचे निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांना देण्यात आले.

मानधन वाढीच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली ११ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. मागण्यांप्रश्नी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी अनेकदा चर्चा झाली. मात्र मुंडे यांनी सकारात्मक भूमिका घेतली नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच आहे. आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने आशा कार्यकर्त्यातर्फे अंगणवाड्या सुरू करण्याचा आदेश काढला. परिणामी अंगणवाडी सेविका, मदतनीस आक्रमक झाल्या. जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली महावीर गार्डनपासून शुक्रवारी मोर्चाची सुरूवात झाली. मोर्चा जिल्हा परिषदेवर आल्यानंतर सेविका, मदतनीस आक्रमक झाल्या. तेथे मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला.

यावेळी जयश्री पाटील म्हणाल्या, ‘महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे नाकर्त्या आहेत. एसी केबीनमध्ये बसून आंदोलन मोडून काढण्याचा त्यांचा डाव आहे. आघाडी सरकारच्या काळात आंदोलन केले नाहीत, आताच का आमच्या मागे लागला आहे, असे त्या विचारत आहेत. सेविका, मदतनीसाच्या मागण्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील नाहीत.’

सरिता कंदले म्हणाल्या, ‘पंकजा मुंडे यांच्याकडे मागण्यासंबंधी एक वर्षापासून पाठपुरावा करीत आहे. मात्र त्या बेदखल करीत आहेत. काम बंद आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे भविष्यात आंदोलन तीव्र करायचे आहे. त्यासाठी सज्ज राहावे.’

युनियनचे नेते आप्पा पाटील यांनी आंदोलन पुढील काळात तीव्र करण्याचा इशारा दिला.

आंदोलनात युनियनचे रघुनाथ कांबळे, शोभा भंडारे, दिलशाद नदाफ, शमा पठाण, सुरेखा कोरे, अर्चना पाटील, मंगल माळी यांच्यासह सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम बोर्डिंगसाठी उद्या मतदान

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुस्लिम समाजाच्या दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीची (मुस्लिम बोर्डिंग) त्रैवार्षिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोप, सोशल मीडियावरील प्रचार, पोस्टरबाजी आणि सभासदांच्या घरी जाऊन प्रचाराची यंत्रणा राबत आहे. बोर्डिंगच्या १३ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात असून, रविवारी (ता.२४) मतदान होत आहे. निवडणुकीसाठी दोन अधिकृत पॅनेल, दोन ग्रुप आणि दोन अपक्षांमध्ये लढत होणार आहे. रोडरोलर, कपबशी, पतंग, किटली या पॅनेलच्या चिन्हांची सोशल मीडियावर रणधुमाळी उडाली आहे.

बोर्डिंगच्या मतदानाची तयारीही अंतिम टप्प्यात आहे. रविवारी (ता. २४) सकाळी आठ ते चार या वेळेत मुस्लिम बोर्डिंग येथे मतदानाची प्रक्रिया होत आहे. त्यासाठी पाच मतदान केंद्र आहेत. मतदानासाठी २४३२ सभासद पात्र आहेत. एका केंद्रावर पाचशे सभासदांना मतदान करता येणार आहे. बोगस मतदान रोखण्यासाठी सभासदांना ओळखपत्रासह आधारकार्डाची सक्ती केली आहे. ओळखपत्रावरील नोंदणी क्रमांकाची काटेकोरपणे तपासली केली जाणार आहे. एका बूथवर एक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांसह सातजणांची नेमणूक केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नूरमहंमद मुजावर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मियालाल नाईक आणि धर्मादाय उपायुक्त कार्यालायचे ए. एन. शेख यांनी सांगितले.

जी. डी. इनामदारांची माघार

निवडणुकीतून जी. डी. इनामदार यांनी जाहीर माघार घेतल्याचे पत्र तौसिफ सोलापुरे यांनी दिले आहे. इनामदार यांनी सत्तारुढ पॅनेलचे गणी आजरेकर यांना पाठिंबा दिला आहे. राजर्षी शाहू महाराजांचा विचार आणि वारसा सत्तारुढ पॅनेल चालवित आहे. इनामदार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, आजरेकर सर्वधर्म समभावासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याने निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती सोलापुरे यांनी पत्रकातून दिली आहे.


बोर्डिंगच्या कार्याची माहिती सर्व मुस्लिम बांधवांना आहे. पारदर्शी आणि प्रत्येक सभासदाला विचारात घेऊनच सत्तारूढ पॅनेल आजअखेर कार्यरत आहे. निश्चितच बोर्डिंगच्या विकासाची वाट अधिक मजबूत करण्यासाठी सत्तारुढ पॅनेलला पुन्हा संधी देण्याची गरज आहे.

आदिल फरास, सत्तारुढ फताह उल आमिन पॅनेल


परिवर्तनाची संधी एकदाच मिळते. सत्तारुढ पॅनेलच्या स्वार्थी कारभाराला सभासद कंटाळले आहेत. समाजाचा विकास साधण्याऐवजी वैयक्तिक स्वार्थ साधला आहे. मनमानी कारभारामुळे अनेकांना राजीनामे द्यावे लागते. त्यामुळे सद्सद् विवेक बुद्धीने निर्णय घ्यावा.

यासीन बागवान, पॅनेलप्रमुख, राजर्षी छत्रपती शाहू मुस्लिम बोर्डिंग परिवर्तन पॅनेल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेआठ कोटी गेले कुठे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका सांडपाणी अधिभार आकारते, पण उपनगरांमध्ये गटारी नाहीत. सांडपाण्याचा निचरा होत नाही. ठिकठिकाणी सांडपाण्याची डबकी साठली आहेत. तुंबलेले सांडपाणी काढण्यासाठी असलेली जेट मशीन नादुरुस्त आहे. ​वर्षभरात साडेआठ कोटी खर्च झाले तरीही सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था आहे. शौचालयांच्या दुरुस्ती आणि निर्गतीसाठी खर्च केलेले पैसे जातात कुठे? सफाईसाठी कर्मचारी कमी आहेत. स्वीपिंग मशिन नसल्याने रस्ते स्वच्छ होत नाहीत, अशी टीकेची झोड आरोग्य विभागाच्या कामकाजावर उठवण्यात आली. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्वच सदस्यांनी जोरदार टीका केली.

सभापती डॉ. संदीप नेजदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेबाबत टीका केली. किरकोळ दुरुस्ती केली तरी पुन्हा दुरवस्था होते मग काय दुरुस्ती केली जाते? मोडकळीस आलेल्या शौचालयावर प्रशासन काय कारवाई करणार आहे? याची विचारणाही आशिष ढवळे यांनी केली. याबाबत वैयक्तिक शौचालयासाठी सरकारकडून अनुदान मिळते. सार्वजनिक शौचालयासाठी एक वर्षात साडेआठ कोटींची कामे झालेली आहेत. तरीही दुरुस्ती केली तर नागरिकच त्याची दुरवस्था करतात. त्यामुळे वांरवार दुरुस्ती करावी लागते, अशी व्यथा प्रशासनाच्यावतीने मांडण्यात आली. रिना कांबळे व मनीषा कुंभार यांनी सांडपाण्याच्या निर्गतीबाबत प्रश्न मांडला. सांडपाणी अधिभार आकारला जातो पण गटारी नाहीत. रस्त्यावरुन किंवा खड्डयांमध्ये सांडपाणी साठून राहते. ले आऊटमध्ये संलग्नता नसेल तर पाणी पुढे जात नाही. राजोपाध्येनगर तसेच फुलेवाडी रिंगरोड येथे सांडपाण्याचा मोठा प्रश्न असल्याचे निदर्शनास आणून दिले. भागामध्ये स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी कमी आहेत. आरोग्याची स्वच्छतेची कामे खासगी विकसकाकडून करण्यात येणारी होती, त्याबाबत काय झाले याची विचारणा उमा इंगळे यांनी केली. तसेच स्वीपिंग मशीनबाबतही विचारणा केली. त्यावेळी ठेकेदाराने २५ सप्टेंबरपर्यंत मुदत मागितली आहे. आयुक्तांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. ठेकेदारास दर दिवशी पाच हजार रुपयांचा दंड सुरू आहे, असे प्रशासनाने सांगितले.

फुटपाथ साफ केले परंतु फेरीवाले फुटपाथवर स्टॉल लावत आहे. वाहने पार्किंग केली जात आहेत. एस. टी. स्टँडवरील फुटपाथवर हातगाड्या लावल्या जातात. तिथे कारवाई होत नाही. एक गाडी असताना अतिक्रमण काढले जात नाही. एकाच्या २५ झाल्यानंतर मग पोलिस बंदोबस्त लागतो आणि पोलिस बंदोबस्त मिळत नाही म्हणून कारवाई पुढे ढकलायची, असा प्रकार सुरू होतो. त्यामुळे दिवसा एकही गाडी फुटपाथवर उभी राहू नये, याची दक्षता घेण्याची सूचना आशिष ढवळे, कविता माने यांनी केली. सरळसेवेद्वारे भरलेल्या विद्युत इंजिनीअर हजर झाला नसल्याने वेटिंगवरील विद्युत इंजिनीअर घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. ईपीएफबाबत सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रस्तावावर तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

फायलींची निर्गत करा

जनतेच्या तातडीच्या प्रश्नांच्या कामांच्या फायलींबाबत लवकर निर्णय व्हावा. प्रत्येक फाइलसाठी कालमर्यादा ठरवून द्या. ४५ दिवसांत फायली निर्गत झाल्याच पाहिजेत, विद्युत विभागाकडे कनिष्ठ अभियंतापासून सर्व पदे रिक्त आहेत. कामे कशी करायची निविदा कधी निघणार? ठोकमानधन तत्त्वावर कमी कर्मचारी घ्या, अशा सूचना राहुल माने यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाणेकरांचा मंदिरप्रवेश रोखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरातील पुजारी आणि पुजारी हटाओ कृती समिती यांच्यातील वाद मिटेपर्यंत पुजारी अजित ठाणेकर यांनी मंदिरात जाऊ नये, असे आवाहन पुजारी हटाव कृती समितीने केले होते. ठाणेकर यांनी मात्र नवरात्रोत्सव काळात मंदिरात जाणे हा वंशपरंपरागत अधिकार असल्याचे सांगत यासाठी पोलिस बंदोबस्ताचीही मागणी केली आहे. ठाणेकरांच्या या भूमिकेवर पुजारी हटाव कृती समितीने जोरदार आक्षेप घेतला असून, ठाणेकरांना मंदिरात जाण्यापासून रोखा, असे आवाहन निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे केले. शुक्रवारी (ता. २२) निवेदन देण्यात आले.

करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीला घागरा-चोलीचा पोषाख परिधान केल्यानंतर मंदिरातील पुजाऱ्यांना हटवून सरकारी पुजारी नेमण्याच्या मागणीने जोर धरला. पुजारी अजित ठाणेकर यांच्याविरोधातील रागातून पालकमंत्र्यांसमोरील बैठकीत ठाणेकर यांना मारहाण झाली होती. यानंतर वाद मिटेपर्यंत ठाणेकर यांना मंदिरात प्रवेश देऊ नये, यावर हटाव समिती ठाम होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यात मध्यस्थी करून काही काळ अजित ठाणेकर मंदिरात जाणार नाहीत, असे सांगितले होते. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अजित ठाणेकर यांनी मात्र मंदिरात जाण्याचा आणि देवीची पूजा करण्याचा आग्रह धरला आहे. ‘मंदिरात जाणे हा वंशपरंपरागत अधिकार असल्याने तो कोणीही रोखू नये. मंदिरात गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी संरक्षण द्यावे,’ अशीही मागणी त्यांनी निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षकांकडे केली होती.

पुजारी हटाव कृती समितीने याला जोरदार आक्षेप घेतला आहे. शुक्रवारी याबाबत पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले असून, यात म्हटले आहे, ‘पुजारी हटाओ आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. ठाणेकर पिता-पुत्र मुद्दाम कुरापत काढून मंदिरात प्रवेश करण्याचा हट्ट करीत आहेत. एका व्यक्तीमुळे संपूर्ण शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर पोलिसांनी याची वेळीच दखल घ्यावी. ठाणेकरांना मंदिरात जाण्यापसून वेळीच रोख, अन्यथा पुजारी हटाव कृती समिती जशास तसे उत्तर देईल. शासकीय पुजाऱ्यांची नेमणूक होईपर्यंत मंदिराच्या गाभाऱ्यात २४ तास पोलिस बंदोबस्त तैनात करावा. पुजाऱ्यांनीच मूर्तीची विटंबना केल्याचा अहवाल भारतीय पुरातत्व खात्याचे अधिकारी डॉ. एम. आर. सिंग यांनी दिला आहे. यापुढेही मूर्तीची विटंबना होण्याचा धोका नाकारता येत नाही, त्यामुळे मूर्तीच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त पुरवावा,’ अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी विजय देवणे, दिलीप पाटील, इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, सुरेख साळोखे आदी उपस्थित होते.

जशास तसे उत्तर देऊ

ठाणेकर पिता-पुत्रांनी उर्मटपणा केल्यास त्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा इशाराही संजय पवार, जयंत पाटील आणि बाबा पार्टे यांना दिला. अजित ठाणेकर यांचे देवस्थान समितीकडील पुजाऱ्यांच्या यादीत नाव नसल्याचे जयंत पाटील यांनी अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले.

नवरात्रोत्सव काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. मंदिर प्रवेशाबाबत ठाणेकर पिता-पुत्रांशी चर्चा केली जाईल. कृती समितीने कोणतीही आक्रमक कृती करू नये.

संजय मोहिते, पोलिस अधीक्षक


ठाणेकर पिता-पुत्रांनी उर्मटपणा केल्यास त्यांना जशास तसे प्रत्युत्तर देऊ. अजित ठाणेकर यांचे देवस्थान समितीकडील पुजाऱ्यांच्या यादीत नाव नाही. वाद मिटेपर्यंत त्यांनी मंदिरात जाण्याचा आग्रह करू नये. आंदोलन स्थगित केले आहे, माघारी घेतलेले नाही.

संजय पवार – सदस्य, पुजारी हटाव कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... तर जबाबदारी सरकारची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘मानधनात वाढ करावी, उन्हाळी सुट्टी मिळावी, कर्मचाऱ्यांना इतर कामे लावू नयेत, यांसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ११ सप्टेंबरपासून अंगणवाडी बेमुदत बंद आंदोलन सुरू आहे. बंद काळात आशा, शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंगणवाड्या सुरू ठेवून पोषण आहार वितरणाची पर्यायी व्यवस्था तयार करण्याचे आदेश सरकारने दिली. बंद काळात पोषण आहार वाटपानंतर काही अघटित घडल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील,’ असा इशारा कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे नेते अतुल दिघे, सुवर्णा तळेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारने मानधन वाढीचा घेतलेला निर्णय मान्य नाही. त्यामुळे काम बंद आंदोलन सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.

तळेकर, दिघे म्हणाले, ‘भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर अनियमित मिळणारे कमी पैसे, खात्यातील भ्रष्टाचारामुळे अनेक बचत गटांनी अंगणवाडी पोषण आहाराचे काम बंद केले. नाइलाजास्तव सेविका, मदतनीस आहार पुरवठा करतात. त्यांच्या मागण्यांसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, सरकारने दुर्लक्ष केले. प्रत्येकवेळी सेविका, मदतनीसना फसवत राहिले. परिणामी राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे काम बंद आंदोलन सुरू आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार मानधन वाढ करावी, अशी मागणी आहे. त्यासाठी मानधनवाढ समितीची स्थापना केली. परंतु, केवळ दीड हजार, एक हजार मानधन वाढ करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. काम बंद आंदोलन यापुढील काळातही सुरू राहील. आंदोलनास आशा कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला आहे. यामुळे पर्यायी व्यवस्था उभारून आंदोलन मोडून काढण्याचा सरकारचा डाव सफल होणार नाही.

यावेळी प्रा‌थमिक शिक्षक समितीचे सुधाकर सावंत यांनी पाठिंबा दिला. पत्रकार परिषदेस लता कदम, सुभाष जाधव उपस्थित होते.

आदेश रद्द करा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने अंगणवाड्या बंद आहे. आशा कार्यकर्तींनी अंगणवाड्या सुरू करून शालेय पोषण आहार पुरवण्याचा सरकारने आदेश काढला. तो रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारीकडे एका निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे, शालेय पोषण सुरू कण्यासंबंधी आशा, गटप्रवर्तकांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे त्यांना पोषण आहाराचे काम देऊ नये. सरकार अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. निवेदनावर जिल्हा सचिव सुभाष निकम, प्रा. सुभाष जाधव यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणीकडून २ लाखांची खंडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीस ठार मारण्याची व बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्याकडून सोन्याच्या दागिण्यांसह रोख रक्कम अशी २ लाख ७ हजार रुपयांची खंडणी उकळली आहे. याप्रकरणी अक्षय बबन केसरकर (वय १९, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर) आणि प्रदीप प्रकाश बराले (वय २७, रा. पंचशील कॉलनी, पाचगाव) यांच्यासह तीन अल्पवयीन मैत्रिणींवरही गुन्हा दाखल झाला आहे.

करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द गावात राहणारी पीडित तरुणी शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेते. तिच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन पैसे उकळण्याचा प्लॅन तिच्या मैत्रिणींनीच केला होता. मैत्रिणींनी हा प्लॅन एका मित्राला सांगितला. यानंतर ४ ते १४ सप्टेंबर २०१७ या कालावधीत पीडित अल्पवयीन तरुणीला बदनामीची आणि कुटुंबीयांना ठार मारण्याची भीती घालून अक्षय केसरकर व प्रदीप बराले यांच्यासह तीन तरुणींनी सहा तोळ्यांचा कोल्हापुरी साज, चार तोळ्यांचा नेकलेस, दोन अंगठ्या, चांदीची चेन, रोख १५ हजार रुपये आसा सुमारे दोन लाख सात हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. खंडणी वसूल करणारे अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नव्हते, मात्र पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करवीर तालुक्यातील एक तरुणी शहरातील नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेते. तिच्याच गावातील अन्य मैत्रिणी आणि तरुणही कॉलेजमध्ये येतात. संबंधित तरुणी एका कॉलेजच्या बाहेर तरुणाशी बोलत होती. हीच संधी साधून तिच्याच गावातील दोन तरुणांनी मोबाइलवर शुटिंग घेतले आणि फोटोदेखील काढले. हे फोटो आणि शुटिंग संबंधित तरुणीला दाखवून त्यांनी ब्लॅकमेलिंग सुरू केले. ‘कॉलेजमध्ये तरुणांशी बोलत असल्याचे सांगून घरात फोटो दाखवणार, गावात बदनामी करणार,’ अशी भीती घालून या तरुणांनी पैशांची मागणी सुरू केली. तरुणीने बदनामीच्या भीतीने हजार-पाचशे रुपये देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र यातूनच ब्लॅकमेलिंग करणाऱ्या तरुणांचा आत्मविश्वास वाढला. त्यांनी वारंवार पैशांची मागणी करीत १७ हजार रुपये उकळले. अखेर या तरुणांपासून सुटका मिळावी यासाठी तरुणीने घरातील आईचा सोन्याचा साज चोरून तरुणांना दिला. या प्रकाराने तरुणीच्या घरातही वाद झाले.

दीड लाखांचा साज ११ हजारांत विकला
चैनीसाठी पैसे उकळणाऱ्या तरुणांना मात्र याचे काहीच वाटत नव्हते. हॉटेल्समध्ये जेवणे, फिरणे आणि कपड्यांवर त्यांनी पैसे उधळले. दीड लाख रुपये किमतीचा सोन्याचा साज या तरुणांनी अवघ्या ११ हजार रुपयांना विकला. हे पैसेदेखील त्यांनी चैनीसाठी उडवले. तरुणीच्या आई-वडिलांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी थेट करवीर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तरुणीकडे चौकशी करून संबधित तरुणांना पोलिस ठाण्यात आणले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या तरुणांना पोलिसांनी बोलते केल्यानंतर तरुणांच्या पालकांनाही धक्का बसला. आपली मुले अशी वागणारच नाहीत, अशा अविर्भावात वावरणाऱ्या पालकांना मुलांचे कारनामे अनपेक्षित होते. अखेर त्यांनी सोन्याचा साज आणि उकळलेली रक्कम परत करण्याचा शब्द देऊन प्रकरणावर पडदा टाकला, मात्र या घटनेने चैनीखोर तरुणांची वृत्ती गुन्हेगारी कृत्यांकडे वळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहूंनी शिक्षणात आधुनिकता आणली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराजांनी प्राथामिक शिक्षणाची सक्ती करण्याबरोबरच शिक्षणात अधुनिकता आणून समाज परिवर्तनाची नवी दिशा दिली. शिक्षण हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने शाहू महाराजांनी २१ सप्टेंबर, १९१७ रोजी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. केवळ कायदाच केला नाही, तर शिक्षणाला अधुनकितेची जोड देवून औद्योगिक, कृषी क्रांती घडविली असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांनी केले. राजर्षी शाहू शिक्षण क्रांतीदिन शताब्दी समारंभाच्या अनुषंगाने राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट आणि शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेचा उद्‍घाटनप्रसंगी डॉ. ताकवले बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार होते.

डॉ. ताकवले म्हणाले, ‘माणसाचं जीवन घडविण्याचं काम शिक्षण क्रांतीमधून शाहूंनी केले आहे. शिक्षणातून औद्योगिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनशील बनविण्यावरही त्याकाळी भर दिला. आजच्या डिजिटल क्रांतीच्या युगात नवीन शिक्षणातून माणूस घडविण्याचे काम होणे काळाची गरज आहे. डिजिटल क्रांतीच्या युगात नवशिक्षणातून माणूस तयार करणे महत्त्वाचे आहे. माणूस हा सर्व श्रेष्ठ असून सृजनशील आणि नवनिर्मितीचे विचार जोपासण्याची क्षमता माणसामध्ये आहे, त्यामुळे डिजिटल युगातही मुलांना घडविणारं शिक्षण देणं खऱ्या अर्थाने गरजेचे आहे.’ यावेळी डॉ. ताकवले यांनी समाजात निर्माण झालेल्या वैज्ञानिक क्रांती, औद्योगिक क्रांती, डिज‌िटल क्रांती आणि सद्या सुरू असलेली मोबाइल क्रांती यांचा मागोवा घेऊन विद्यार्थी घडविणारे तसेच नवनिर्मिती करणारे शिक्षण महत्वाचे असल्याचे सांगितले.

दुपारच्या सत्रात प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांचे ‘राजर्षी शाहू छत्रपतींचे प्राथमिक शिक्षणाचा कायदा’ या विषयावर भाषण झाले. तर सायंकाळच्या सत्रात ‘आजची शैक्षणिक मूल्यव्यवस्था’ विषयावर प्राचार्य आनंद मेणसे यांचे भाषण झाले.

कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक उपस्थित होते. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अशोक चौसाळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्हा पुरवठा अधिकारी तथा राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरात्रोत्सवात दोन लाख लाडू

$
0
0

दोन शिफ्टमध्ये कळंबा कारागृहात १०० कैद्यांकडून लाडू प्रसादाचे काम

कोल्हापूर टाइम्स टीम

करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी गेल्या वर्षभरापासून कळंबा कारागृहातील कैदी लाडू प्रसाद तयार करतात. यंदा नवरात्रोत्सवासाठी दोन लाख लाडू तयार केले जाणार आहेत. रोज किमान २० हजार लाडू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे सोपवले जात आहेत. कारागृहातील १०० कैदी रोज दोन शिफ्टमध्ये काम करून भाविकांसाठी लाडू प्रसाद तयार करीत आहेत.

अंबाबाई देवीच्या लाडू प्रसादाची निर्मिती कारागृहातील कैद्यांकडून करून घेण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी घेतला होता. या निर्णयाला काही संघटनांनी विरोधही दर्शवला, मात्र नागरिकांच्या मनातील कारागृहाची प्रतिमा बदलून टाकणारा हा निर्णय कैद्यांची मानसिकता बदलण्यासाठीही तितकाच उपयुक्त ठरला आहे. १४ जुलै, २०१६ पासून कळंबा कारागृहातील कैद्यांनी सुमारे एक कोटी रुपये किमतीचे १० लाख लाडू देवस्थान समितीला दिले आहेत. गेल्यावर्षी नवरात्रोत्सवात एक लाख ८० हजार लाडू तयार केले. यंदा भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता गृहीत धरून दोन लाख लाडूंची मागणी करण्यात आली आहे. कारागृह प्रशासनाने याचे नियोजन पूर्ण केले असून, पहिल्याच दिवशी २० हजार लाडू देवस्थान समितीकडे सोपवले आहेत. गरजेनुसार लाडूंची संख्या वाढवली जाणार आहे. लाडू तयार करण्यासाठी कारागृहातील १०० कैदी कार्यरत आहेत. यात ७० पुरुष आणि ३० महिला कैद्यांचा समावेश आहे. सीसीटीव्हीसह अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली दोन शिफ्टमध्ये हे काम सुरू आहे.

कारागृहात लाडू प्रसाद तयार करण्यासाठी तीन कक्ष तयार आहेत. पहिल्या कक्षात बुंदी तळण्याचे काम केले जाते. दुसऱ्या कक्षात लाडू बांधण्याचे काम केले जाते. विशेष म्हणजे प्रत्येक लाडूचे वजन करूनच तो पॅकिंगसाठी पाठवला जातो. काही काळ सुकवल्यानंतर तिसऱ्या कक्षात लाडूचे पॅकिंग केले जाते. यासाठी लागणारी हरभरा डाळ, रिफाईंड तेल, बेदाने, काजू, वेलची आणि जायफळ याची टेंडरनुसार खरेदी केली जाते. पावित्र्य राखून कैद्यांकडून लाडू प्रसादाची निर्मिती केली जाते. स्वच्छतेच्या बाबतीतही कैदी स्वतःच खबरदारी घेतात. भक्तीगीते ऐकत आणि गुणगुणत लाडू तयार होतात. यातून कैद्यांच्या मानसिकतेतही सकारात्मक बदल झाला आहे, असे कारागृह अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे.

अन्न व औषधकडून लाडूची तपासणी

लाडू तयार केल्यानंतर तो तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवला जातो. स्वच्छता, कच्च्या मालाचा दर्जा आणि चवीच्या निकषांवर अन्न व औषध प्रशासनाकडून अहवाल दिला जातो. यानंतरच लाडू देवस्थान समितीकडे पाठवले जातात. १०० ग्रॅम वजनाच्या लाडूची किंमत नऊ रुपये इतकी आहे. दर्जा संभाळण्यात कारागृह प्रशासन नेहमीच दक्षता घेते, त्यामुळे गेल्या वर्षभरात एकही तक्रार कारागृह किंवा देवस्थान समितीकडे आलेली नाही.

गेल्यावर्षी आम्ही देवस्थान समितीच्या मागणीप्रमाणे लाडू प्रसादाची पूर्तता केली. यंदा दोन लाख लाडूंची मागणी आहे. याचे नियोजन पूर्ण झाले असून, रोज २० हजार लाडू तयार करून पाठवले जातात. मागणीनुसार लाडूंची संख्या वाढवली जाईल.
- शरद शेळके,
कारागृह अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ड्रेनेज ठेकेदाराला५० लाखांचा दंड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
लोकायुक्तांच्या कारवाईच्या बडगा. सांगली आणि मिरज भुयारी गटार योजनेतील टप्पा क्रमांक दोनचे काम रखडवले. बेकायदा दरवाढ तसेच मुदतवाढ प्रकरणी एस. एम. सी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. ठाणे या ड्रेनेज ठेकेदारावर ५० लाख रुपयांच्या दंडात्मक कारवाईचे आदेश सांगली महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी दिले आहेत.
दंडात्मक कारवाईची रक्कम ठेकेदाराच्या बिलातून कपात करायची आहे. कारवाईनंतरही वेळेत काम पूर्ण केले नाहीतर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणी उपमहापौर गटाचे नेते नगरसेवक शेखर माने यांनी लोकायुक्तांकडे तक्रार करुन ठेकेदारावर कारवाई करण्याबाबत पाठपुरावा केला होता.
ठेकेदारावरील दंडात्मक कारवाईबाबत बोलताना शेखर माने म्हणाले, एप्रिल २०१३ च्या आदेशाप्रमाणे पुण्याच्या एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला महापालिकेतील ड्रेनेजचे काम दिले होते. स्थानिक पातळीवरील अडचणीमुळे २०१४मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले. पंपहाऊसची जागा निश्चित नसल्याने काम रेंगाळले. ठेकेदाराने वारंवार सूचना दिल्यानंतरही अधिकारी, कारभारी यांनी सगंनमत करुन योजना रखडवली. एसटीपीची कामे, शामरावनगर अतंर्गत मुख्य सिव्हर नलिका कामाबाबत, शेरीनाला ट्रंक लाइन मुख्य काम, धामणी रोड मुख्य सिव्हर नलिकेचे काम, कोल्हापूर रोडवरील पंपिंग स्टेशनचे काम एसझोनमध्ये १५०००मीटर लांबीच्या सिव्हर नलिकेच्या कामाबाबत आयुक्त खेबूडकर यांनी ठेकेदाराला वारंवार सूचना दिल्या होत्या. तरीही ठेकेदाराने कामे वेळेत पूर्ण केली नाहीत. केंद्र सरकारच्या अमृत योजनेतंर्गत मिरज शहरासाठी ११४ कोटीची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. ही योजना अनुक्रमे ५० व ५३ टक्के ज्यादा दराने मंजूर केल्याने ती १८० कोटीवर पोचली व भाववाढीसह २०० कोटींवर गेली आहे. आतापर्यंत ९० कोटींची बिले दिली आहेत. आजच्या घडीला एक फुटही लाइनची योजना कार्यान्वित नाही. तीन-चार वर्षांपासून ही योजनाच रखडली आहे. कोट्यावधी रुपये खर्च होऊनही एकही लाइन अ‍ॅक्टिव्हेट झालेली नाही. योजना पूर्ण करण्याचा कालावधी २९ एप्रिल २०१७रोजी संपला आहे. आतापर्यंत सहा कोटींची बेकायदा भाववाढ दिली आहे. उत्पादन शुल्क कर चुकविल्याबद्दल लेखापरीक्षणात १ कोटी ६० लाखांचा दंड ठोठावला आहे. सांगली व मिरज ड्रेनेज योजना सुरुवातीपासून संथगतीने सुरु आहे. या बाबत लोकायुक्त यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती. लोकायुक्तांकडून तत्काळ कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांना आले होते. या पार्श्वभूमीवर एस. एम. सी. इन्फ्रास्ट्रक्चरला २० सप्टेंबर २०१७ रोजी दरमहा १२ लाख या प्रमाणे ४ महिन्यांचा दंड सुमारे ५० लाख रुपये या प्रमाणे वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह पंधरा जणांवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
गुन्हेगारीतील टोळी युद्धातूनच सांगलीत भर दुपारी शकील मकानदार या तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी राष्ट्रवादी समर्थक माजी नगरसेवक सचिन रमाकांत सावंत याच्यासह १५ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी एक जण अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. इतर तिघांना कोर्टाने २८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सांगलीतील भरवस्तीत शुक्रवारी दुपारी पाठलाग करून शकील मकानदार (वय ३४) या तरुणाचा भर रस्त्यात जांबीयाने वार करून खून करण्यात आला होता. या घटनेने खळबळ माजल्यानंतर पोलिसांनी संशयिताच्या दिशेने पोलिस पथके रवाना केली होती. खुनी हल्ल्याच्या वेळी मकानदार बरोबर असलेला परंतु, हल्लेखोरांच्या तावडीत न सापडलेला सराईत गुन्हेगार महेंद्र उर्फ बाळासाहेब भोकरे (वय ४२) याने विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याने माजी नगरसेवक सचिन सावंत, सिद्धू कांबळे, सचिनच्या गाडीचा चालक गौरव, इम्रान आवटी, नागेश ऐदाळे, शादाब जमादार, शाम हत्तीकर, सौरभ शितोळे, करण शिंदे, अल्पवयीन गुन्हेगार राहुल आदींसह पंधरा जणांनी हल्ला केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी शाम बापू हत्तीकर (वय २३, आनंदनगर, भारत सुतगिरणीनजीक), सौरभ संजीवकुमार शितोळे (वय २०), करण बाळू शिंदे (वय १९, सावंत प्लॉट, चौथी गल्ली) आणि अल्पवयीन राहुल, अशा चौघांना जयसिंगपूर भागातून अटक केली आहे. खुनात बळी पडलेला शकील मकानदार हा पूर्वी सचिन सावंत याचा विश्वासू सहकारी म्हणून वावरत होता. पैशाच्या देवघेवीतून त्यांच्यात वाकडे आल्यानंतर मकानदार पूर्वाश्रमीचा सचिनचा साथीदार बाळू भोकरे याच्याबरोबर वावरु लागला. बाळू आणि सचिन सावंत अनेक वर्षांपासून दुरावलेले आहेत. मकानदार हा भोकरेबरोबर वावरत असल्याचे सचिनला खटकत होते. खुनाच्या घटनेच्या दिवशीही शकील मकानदार आणि सावंतचे साथीदार यांच्यात वाद झाला होता. या वादाची कल्पना भोकरेला नसल्याने तो नेहमीप्रमाणे मकानदारच्या गाडीवर बसून जात असतानाच हल्लेखोरांनी पाठलाग करून शकीलला गाठून त्याचा खून केल्याचे तपासात पुढे आल्याचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी सांगितले. या खुनाचा तपास विश्रामबाग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्तिकर विभागाकडूनपतसंस्थांची चौकशी

$
0
0

कराड
कराडमधील संभवनाथ नागरी सहकारी पतसंस्था व चावडी चौकामतील पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. शुक्रवार आणि शनिवारी दिवसभर या संस्थांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे आर्थीक व्यवहारांसंदर्भात कसून चौकशी सुरू होती. कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली. चौकशी सत्रामुळे आर्थिक संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. या दोन्हीही संस्था व्यापाऱ्यांच्या अर्थवाहिन्या समजल्या जातात.
पार्श्वनाथ आणि संभवनाथ पतसंस्थेमध्ये प्राप्तिकर विभागाकडून दोन दिवसांपासून तपासणी सुरू आहे. प्राप्तिकरच्या संस्थेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे आर्थिक व्यवहारांसंदर्भात चौकशी केली. तसेच संस्थांमधील कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली. शनिवारी सकाळी प्राप्तिकरच्या अधिकाऱ्यांनी संस्थेच्या अधिकाऱ्यांकडे व्यवहारांसंबंधी माहिती मागवली. काही मोठ्या ठेवीदारांनी सर्वसामान्य नागरिकांच्या नावावर मोठ्या रक्कमा ठेवल्याची शहरात चर्चा सुरू आहे.
तपासणी सुरू असताना प्राप्तिकरच्या अधिकाऱ्यांवर दबाव यावा म्हणून दोन्हीही पतसंस्थांतील पदाधिकाऱ्यांचे समर्थक मोठ्या संख्येने दत्त चौक व चावडी चौक येथे जमा होत होते. याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी दोन्हीही ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला. प्राप्तिकर विभागाने चौकशी दरम्यान कोणत्याही कर्मचाऱ्याला बाहेर जाऊ दिले नाही. त्यांचे मोबाइलही बंद ठेवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images