Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जनतेपुढे श‌िवसेनेला सत्ता गौन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

शिवसेना सत्तेला महत्व देत नाही. गरीबांच्यासाठी काम करणारा हा पक्ष आहे. सर्वसामान्य जनतेलाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दैवत मानतात. जनतेच्या भल्यापुढे सत्ता आम्हाला गौण आहे, असे प्रतिपादन गृह व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

ते मुरगूड (ता. कागल) येथे नगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या प्रारंभ, लाभार्थ्यांना अनुदान वाटप कार्यक्रमात‌ ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक होते.

केसरकर म्हणाले, दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली. त्यांचे कोकणावर विशेष प्रेम होते. त्यांचा आशिर्वाद मलाही मिळाला आहे. त्यांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी प्रा.संजय मंडलिक यांना खासदार करून दाखवावे. मुरगूड शहरासाठी २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी,अर्धवट राहिलेल्या अंबाबाई देवालयासाठी आणि स्वीमिंग तलावासाठी आवश्यक असणारा सर्व निधी मुख्यमंत्र्यांना भेटून देवू. मुरगूड शहर राज्यात आदर्श करण्यासाठी येथील पदाधिकाऱ्यांनी बांधलेला चंग निश्चित यशापर्यंत घेवून जाईल.

प्रा.संजय मंडलिक म्हणाले, ‘कागल तालुक्याने नेहमीच सामाजिक एकतेचा संदेश तडीस नेला आहे. मुरगूड ही संस्थान काळातील नगरपालिका असून सतेवर येतानाच पारदर्शी कारभार करण्याचे वचन सर्वानी दिले आहे. शहरात कोट्यावधीची कामे चालू आहेत.उर्वरित कामासाठी पुरेसा निधी देवून मुरगूड शहर राज्यात आदर्श करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे. बिद्री साखर कारखान्यासाठी दररोज शुभ संकेत मिळत असून अनेकजन मदतीसाठी पुढे येत आहेत. आमच्या मंडळीनी बिद्रीतील अपप्रवृती घालवण्यासाठी न्यायालयीन पातळीवर यशस्वी लढाई केली आहे. आता जनतेचा न्यायालयातही आम्हालाच न्याय मिळणार आहे.’

यावेळी विरेंद्र मंडलिक,आमदार प्रकाश आबिटकर यांचीही भाषणे झाली. विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनीनी स्वागत गीत सादर केले.यावेळी शहरातील नागरीकांना स्वच्छतागृहाचे अनुदान,अपगांना निधी,बकेट वाटप करण्यात आले.

यावेळी माजी आमदार दिनकरराव जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे,मंडलिक कारखाना उपाध्यक्ष बंडोपंत चौगले, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विजय सिंह मोरे, सभापती कमल पाटील आदी उप‌स्थ‌ित होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गोकुळ शॉपी’त ६३ लाखांचा अपहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संगम टॉकीजजवळील गोकुळ शॉपीत ६३ लाख ४७ हजार ९३३ रुपयांचा अपहार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शॉपीचा क्लार्क कम इन्चार्ज अमित अशोकराव पवार (रा. राशिवडे बु्द्रुक, सध्या रा. रितीका रेसिडन्सी, नवीन वाशीनाका) याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संगम टॉकीज परिसरातील ओपल हॉटेलशेजारी दूध संघाच्या मालकीच्या जागेत गोकुळ शॉपी आहे. शॉपीतून दूध, दही, लस्सी, श्रीखंड, तूप, बटर, ​यांसह अन्य गोकुळच्या पदार्थांची विक्री केली जाते. या शॉपीच्या व्यवहाराची जबाबदारी इन्चार्ज अमित पवार यांच्याकडे होती. डिस्ट्रिब्युटरने माल खरेदी केल्यावर येणारी रोख रक्कम, धनादेश गोकुळच्या खात्यात जमा करण्याचे काम पवार यांच्याकडे होते. पण पदार्थांच्या विक्रीनंतर पवार याने पैसे व चेक जमा न करता स्वतःकडे ठेवले. गोकुळ प्रशासनाने स्टॉक मोजल्यावर गैरव्यवहार उघड झाला. गोकुळने सनदी लेखा परीक्षक सुशांत शरदचंद्र फडणीस यांना शॉपीच्या ऑडिटसाठी नियुक्त केले. त्यांनी ऑडिटनंतर अपहाराबाबतचा अहवाल गोकुळला सादर केला. १ एप्रिल २०१६ ते १४ ऑगस्ट २०१७ या कालावधीत पवारने ६३ लाख ४७ हजार ९३३ रुपये ७९ पैशांचा अपहार केल्याचे उघड झाले. ​अहवालावरुन सदाशिव श्रीपती पाटील (हिरवडे खालसा, ता. करवीर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी पवार याच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, पवार हा गोकुळमधील एका नेत्याचा जवळचा कार्यकर्ता आहे. व्यसनी बनल्यानंतर त्याने खासगी सावकारांकडून कर्ज उचलले. कर्जाच्या विळख्यात सापडल्यानंतर त्याने शॉपीतील रक्कमेवर ढपला मारल्याची चर्चा आहे.



गोकुळ हा शेतकरी, दूध उत्पादकांचा संघ आहे. शेतकऱ्यांच्या कष्टातून दूध उत्पादने तयार केली असता या रक्कमेचा अपहार झाल्याबद्दल गुन्हा नोंद व्हावा अशी भूमिका संघाची आहे. अहाराची सर्व रक्कम वसुलीसाठी संघाचे प्रयत्न असतील.

- विश्वास पाटील, अध्यक्ष, गोकुळ


अपहाराचा तपशील

चेक डिसऑनर - १८,२०,७३५ रुपये

स्टॉक शार्टेज माल - ३२,४३,१८२

माल विक्रीनंतरचे पैसे - १२,८४,०१६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसाने शहर तसेच जिल्ह्याला तासभर झोडपून काढले. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने शहरात ठिकठिकाणी पाण्याची तळी निर्माण झाली. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली. जिल्ह्यातही झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

शनिवारी दुपारी शहर परिसराला झोडपून काढले होते. अर्धा तासच पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. करवीर तालुक्यात गेल्या २४ तासात १२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावडा हा नेहमी अतिवृष्टीचा तालुका ओळखला जातो. त्या तालुक्यापेक्षाही करवीरमध्ये जादा पाऊस झाला होता. रविवारी सकाळपासून स्वच्छ सूर्यप्रकाश होता. त्यामुळे वातावरणात उष्माही वाढला. अधूनमधून येणाऱ्या ढगांमुळे ऊन सावलीचा खेळ सुरू होता. पण पाऊस सुरू होईल, असे वाटत नव्हते. सायंकाळी पाचच्या सुमारास शहराच्या पश्चिम व दक्षिण उपनगरांमधून पावसाला प्रारंभ झाला. विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाटासह पडणाऱ्या पावसामुळे वळीव पावसाची आठवण येत होती.

अर्ध्या तासातच सर्व शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. एकसारख्या कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते म्हणजे नाले बनले. प्रत्येक रस्त्यावरुन वाहणाऱ्या पाण्यामुळे सखल भागात पाण्याची तळी निमार्ण झाली. सीपीआर चौक, बसंत बहार रोड, राजारामपुरी या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले. पुर्ण रस्ता पाण्याने व्यापला गेल्याने दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक सावधगिरीने वाहन चालवत होते. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीची कोंडी झाली होती. तासभर झोडपून काढल्यानंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली. पण रात्री नऊनंतर पुन्हा पावसास प्रारंभ झाला. या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडले निसर्गाचेही ‘लाइफ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हिरवाईने नटलेल्या निसर्गाचा देखणा आविष्कार घडविणारी निसर्गचित्रे, मानवी भावभावना, चेहऱ्यावरील हावभावांचे रचनाचित्रांत उमटलेले प्र​तिबिंब ‘लाइफ’चित्र प्रदर्शनात उमटले आहे. चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आरिफ तांबोळी आणि महेश पुजारी या चित्रकारांनी रंग आणि रेषांच्या माध्यमातून घडविलेला निसर्गासह मानवी भावभावनांचा आविष्कार घडविला आहे. येथील शाहू स्मारक भवन येथील कलादालनात रविवारी चित्रप्रदर्शनास सुरुवात झाली.

आरिफ हा मूळचा सातारा जिल्ह्यातील वडूज येथील तर महेश हा कोल्हापूर येथील आहे. दोघांनी दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये जीडीआर्टचे शिक्षण पूर्ण केले. चित्रकलेचे रितसर शिक्षण पूर्ण केल्यानंतर या दोघांनी आपआपल्या कलाकृती पहिल्यांदाच कलाप्रेमींच्या भेटीस आणल्या आहेत. प्रदर्शनात एकूण २२ चित्रांचा समावेश आहे. यामध्ये निसर्ग चित्रे आणि रचना चित्रांची संख्या सर्वाधिक आहे. अॅक्रेलिक आणि मिक्स मेडिया माध्यमात ही चित्रे रेखाटली आहेत.

विशेष म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन त्याची नानाविध रुपे कॅनव्हासवर उतरविली आहेत. जोतिबा देवस्थान परिसर, कोकणातील देवगडचा भाग, वडूज परिसर कॅनव्हासवर अवतरला आहे. रचना चित्रांत मानवी चेहऱ्यावरील भाव हुबेहुब उतरले आहेत. दैनंदिन जीवनात वापरावयाच्या वस्तूंनाही चित्रकारांनी रंग, रेषांच्या माध्यमातून आकार दिला आहे. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि प्राचार्य अजय दळवी, प्रा. दीपक कांबळे, प्रवीण वाघमारे, चित्रकार विजय टिपुगडे आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी प्रदर्शनाचे उदघाटन झाले. प्रदर्शन बुधवारपर्यंत (ता. १३) अखेर सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत खुले राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेनेच्या दोन्ही शहरप्रमुखांची लवकरच हकालपट्टी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर शिवसेना पदाधिकारी निवडीवरून झालेल्या गोंधळानंतर आपल्याकडे शहरातील सर्व शिवसेना उपशहरप्रमुख असल्याने लवकरच शहरप्रमुख शिवाजीराव जाधव व दुर्गेश लिंग्रस यांची पदावरून हकालपट्टी करुन त्याठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे. त्यासाठी लवकरच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून त्यानंतर नव्याने संघटना बांधणी करणार असल्याचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘शिवसेनेचा एक गट सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेत आहे. त्यामुळे शहरातील शिवसेनेचे नुकसान होत आहे. गेल्या महिन्यात शहर पदाधिकारी निवडीवरुन असेच झाले. त्यामुळे शहरातील संघटनेची नव्याने बांधणी केली जाईल. माझ्यासोबत शहरातील सर्व शिवसेना उपप्रमुख व रिक्षा सेनेचे पदाधिकारी असल्यामुळे जाधव व लिंग्रस यांची हकालपट्टी करुन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन पुन्हा शहरात नव्याने संघटनेची बांधणी करणार आहे. यासाठी लकरच शहरप्रमुखांची हकालपट्टी करण्यात येणार आहे. याबाबत पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. शहरातील सच्चा शिवसैनिकाला पक्षासाठी प्रामाणिकपणे काम कोण करत आहे, याची सर्व माहिती असते. त्यामुळे अशा छुपा विरोधकांना सोबत घेणार नाही.’

भाजपच्या भूमिकेवर बोलताना ते म्हणाले,‘गणेशोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या विरोधकांची ओळख पटली आहे. त्यामुळे आता अधिक सावध राहावे लागणार आहे. प्रत्येक पक्षाला भरती-ओहटीचा काळ अनुभवावा लागतो. १९९५ मध्ये शिवसेनेमध्ये अनेक दिग्गज आले होते. अशीच स्थिती आता भाजपची आहे. पण याचा उत्तर विधानसभा मतदारसंघावर परिणाम होणार नाही. सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीचे अस्तित्व नगण्य राहिल्याने खरी लढत शिवसेना-भाजपमध्येच होणार आहे.’

पोटनिवडणुकीच्या दोन्ही जागा लढवणार

विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड फरक आहे. महापालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या जास्त असते. तसेच पैशाच्या वापर जास्त होतो. त्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज होतात, तसेच पैशाचा वापर करता येत नसल्याने महापालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवारांचा पराभव होता. तरीही उत्तर व दक्षिण मतदारसंघातील प्रत्येकी एका प्रभागात महापालिकेची पोटनिवडणूक होत आहे, निवडणुकीसाठी दोन्ही प्रभागात शिवसेनेचा उमेदवार उभा करणार असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसाला होते ३०० मोबाइलची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात ३० पोलिस ठाण्यात दर महिन्याला किमान एक हजार मोबाइल गहाळ झाल्याच्या नोंदी होतात. मोबाइल चोरीला गेला तरीही गहाळ वहीतच नोंद करण्याचा पोलिसांचा आग्रह असतो. कुणाच्यातरी संदर्भाने आलेल्या तक्रारदाराची विशेष नोंद घेऊन त्याच्या मोबाइलचा छडा लावण्याचा प्रयत्न केला जातो. सायबर पोलिस ठाण्यापर्यंत ही तक्रार पोहोचली तरच शोधाची प्रक्रिया सुरू होते, मात्र अपुऱ्या यंत्रणेमुळे हरवलेला मोबाइल सापडेल याची खात्री मिळत नाही. दरम्यान, चोरीचे मोबाइल आणि त्याचे पार्ट विक्रीचा चोर बाजारातील उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवसाकाठी ३०० मोबाइल चोरी होत असतानाही पोलिस याबाबत काहीच कारवाई करत नाहीत.

मोबाइल हा आता चैनीची वस्तू राहिलेला नाही. दैनंदिन जगण्यात मोबाइल गरजेची वस्तू बनला आहे. विजेचे बिल भरणे. सिनेमाचे तिकीट काढणे, टीव्हीचा रिचार्ज मारणे, विविध प्रकारची माहिती घेणे अशी अनेक कामे मोबाइलवरच केली जातात. प्रत्येकाजवळ किमान एक मोबाइल आहेच. बाजारात, गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रवासात हातोहात मोबाइल लंपास केले जातात. मोबाइल हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर तो परत मिळेल या आशेने नागरिक जवळच्या पोलिस ठाण्यात धाव घेतात. तक्रार देतानाच नागरिकांना पोलिसांच्या कारभाराचा अनुभव येतो. मोबाइल गहाळ झाला की चोरीला गेला यावरूनच नागरिकांना पेचात पकडले जाते. अखेर गहाळ वहीत नोंद करून, ‘सापडल्यास कळवतो’ असे जुजबी उत्तर देऊन पाठवले जाते. मोबाइल बळजबरीने पळवल्याची माहिती देणाऱ्या तक्रारदाराला अनेक प्रश्न विचारून हैरान केले जाते. तक्रारदार कुणाच्यातरी संदर्भाने आला असेल तरच त्याची विशेष दखल घेतली जाते. विशेष म्हणजे शहरातील चार पोलिस ठाण्यात दर महिन्याला सरासरी ८० मोबाइल चोरीला जातात किंवा गहाळ होतात. यापैकी २० ते ३० टक्केच मोबाइलचे आयएमइआय नंबर सायबर पोलिस ठाण्याकडे पाठवले जातात.

सायबर पोलिस ठाण्यात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने चोरीस गेलेल्या सर्वच मोबाइलचा शोध घेणे शक्य होत नाही. काही मोबाइलची शोध प्रक्रिया सुरू होते, मात्र चोरट्यांच्या हुशारीमुळे मोबाइल सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. चोरट्यांनी लंपास केलेले मोबाइल कर्नाटकमार्गे बांगलादेश आणि नेपाळला पाठवले जातात. काही मोबाइल रिसेट करून त्याचे आयएमइआय नंबरही बदलले जातात. यातील किमती मोबाइलचे पार्ट्स काढून त्यांची विक्री केली जाते. जसे जिल्ह्यातील चोरीचे मोबाइल राज्याबाहेर जातात, तसेच राज्याबाहेरील चोरीचे मोबाइलही जिल्ह्यात विक्रीसाठी येतात. मोठ्या शहरांससह आता छोट्या शहरांमध्येही मोबाइलच्या चोर बाजारातील उलाढाल वाढली आहे. हरवलेले मोबाइल शोधण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत नाहीत किंबुहना अनेक पोलिसांना मोबाइल चोरटे कोण आहेत हे माहीत असूनही त्याबाबत कारवाई केली जात नाही, असा आरोप तक्रारदार करतात.

रोज सरासरी ३०० मोबाइलची चोरी

जिल्ह्यात रोज सरासरी ३०० मोबाइलची चोरी होत आहे. यात कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, पेठ वडगाव, हातकणंगले, गडहिंग्लज आदी शहरांमध्ये मोबाइल चोरीचे प्रमाण जास्त आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानक आहे. या परिसरात मोबाइल चोरीचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतही मोबाइल चोरीच्या घटना सातत्याने घडतात.

कसबा बावड्यातील आठवडी बाजारातून माझा मोबाइल गहाळ झाला. यांतर तातडीने मी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेला दोन महिने उलटले, मात्र मोबाइल मिळाला नाही. सायबर पोलिस ठाण्याकडेही याबाबत काहीच माहिती मिळाली नाही.

ओंकार करपे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेच्या जागांवर भाजपचा डोळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

​जिल्ह्यातील विधानसभेच्या दहापैकी आठ जागा जिंकण्याचा मनसुबा वेळोवेळी व्यक्त करताना भाजपने शिवसेनेच्या सहा जागांवर डोळा ठेवूनच वाटचाल चालवली आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरील संभाव्य उमेदवारांना गोटात घेण्याबरोबरच विविध गटांना सामावून घेत मतदार संघात भाजपने ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून स्थानिक आघाडींच्या राजकारणाला चालना देऊन आगामी विधानसभेची तयारी केली आहे. शिवसेनेकडून मात्र या जागा पुन्हा निवडून याव्यात यादृष्टीने काही आखणी केल्याचे दिसत नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने जिल्ह्यात दहांपैकी सहा मतदार संघात झेंडा फडकवला. जिल्ह्यात शिवसेनेचे मतदान आहे हे खासदारकीच्या निवडणुकांमधून दिसत होते. पण आमदारकीच्या निवडणुकीत या मतदानातून आमदार निवडून येण्यास कुमक कमी पडत होती. या मतदार संघात शिवसेनेच्या मतांबरोबरच स्थानिक नेत्यांची ताकद एकटवली गेल्याने ​शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. त्यासाठी स्थानिक गटांच्या मदतीमुळे विजयश्री खेचता आली हे दुर्लक्षून चालणार नाही. अशा परिस्थितीत भाजपने या मतदार संघांमध्ये आता आपला झेंडा फडकवण्याचे ठरवले आहे.

कोल्हापूर उत्तर, दक्षिण, कागल, करवीर, राधानगरी, इचलकरंजी, चंदगड, शिरोळ या मतदार संघामध्ये करवीर वगळता भाजपने पेरणी केल्याने उमेदवार मिळाले आहेत. हे मतदार संघ व मित्र पक्षाला सोडण्यात येणारे मतदार संघ पाहता शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना आगामी निवडणूक सोपी नसेल, हेच भाजपने दाखवून दिले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक राजकारणांमध्ये बेरजेचे राजकारण करत तेथील नेत्यांना भाजपमध्ये आणले आहे. करवीर, चंदगड, राधानगरी, उत्तर या मतदार संघात निवडणुकीपूर्वी मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर उत्तरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांना तोंड देण्यासाठी भाजपने ताकदवान उमेदवाराचा शोध चालवला आहे. अनेक प्रकरणांमधून पालकमंत्री व क्षीरसागर यांच्यातील दरी रुंदावली आहे. भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी पालकमंत्र्यांनी जोरदार प्रयत्न चालवला आहे. करवीरमध्ये आमदार चंद्रदीप नरके यांच्याविरोधात लढण्यासाठी शोधमोहिम सुरू आहे. त्याची चाचपणी सुरू आहे. निवडणूक टप्प्यामध्ये आल्यानंतर या मतदार संघात भाजपच्या हालचाली वाढणार आहेत. राधानगरी मतदार संघात आमदार प्रकाश आबिटकर यांच्याविरोधासाठी राहुल देसाई यांचा प्रवेश पूर्वीच केला आहे. तेथील आणखी काही गटांना सोबत घेण्याचाही प्रयत्न सुरू असल्याने आबिटकर यांच्यासमोर आव्हान असेल. शाहूवाडीमध्ये आमदार सत्यज‌ित पाटील यांना विनय कोरे यांचा कडवा विरोध असेल. त्याला आता भाजपचे बळ मिळणार असल्याने पाटील यांच्यासमोरी अडचणी नक्कीच वाढतील.

शिरोळ, हातकणंगलेत काटा लढत

शिरोळमध्ये स्वाभिमानी संघटनेतून बाहेर पडून शिवसेनेतून आमदारकी लढवणाऱ्या उल्हास पाटील यांच्याभोवतीही भाजपने अडचणींचे जाळे​ विणले आहे. तेथील काँग्रेसमधील अनिल यादव यांना भाजपमध्ये घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. शाहूवाडीबरोबर हातकणंगले मतदार संघ जनसुराज्यसाठी देण्यात येणार असल्याने येथेही डॉ. सुज‌ित मिणचेकर यांना भरपूर प्रयत्न करावे लागतील. या मतदार संघांसाठी काही ठिकाणी उमेदवार म्हणून स्थानिकांना भाजपने गोटात दाखल करुन घेतले आहे. काहींचे प्रवेश निवडणुकीच्या तोंडावर होतील. भाजपने सर्व ताकदीनिशी प्रयत्न चालवले आहेत.​ शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून या मतदार संघातील शिवसेनेची विजयी घौडदौड कायम ठेवण्यासाठी तयारी चालवली आहे, असे दिसून येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादग्रस्त पुजाऱ्यांची नियुक्ती नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरात सरकारी पगारी पुजारी नेमण्याबाबत येत्या तीन महिन्यांत निर्णय घेणार असल्याची घोषणा विधी व न्यायमंत्री रणजित पाटील यांनी केली आहे. मात्र या निकषाला पात्र ठरणाऱ्या सध्याच्या पुजाऱ्यांपैकी वादग्रस्त ​किंवा ज्यांच्या नावावर गुन्हा नोंद आहे अशा पुजाऱ्यांची नियुक्ती करू नये, अशी मागणी अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्यावतीने रविवारी घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली.

पुजारी हटाओसंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी संघर्ष समितीच्या सदस्यांनी शासकीय विश्रामगृह येथे रविवारी बैठक घेतली. यावेळी राज्य सरकारच्या पुजारी हटाओ व सरकारी पुजारी नियुक्तीबाबतच्या धोरणातील काही त्रुटींबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. ११) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

अंबाबाई मंदिरात पंढरपूर धर्तीवर सरकारी पुजारी नेमण्यात येतील असा निर्णय एक महिन्यापूर्वी घेण्यात आला होता. यासाठी पौरोहित्यातील ज्ञान असलेले प्रशिक्षित पुजारी नेमण्यावर भर देण्यात येणार आहे. मात्र सध्या अंबाबाई मंदिरात जे पुजारी कार्यरत आहेत त्यापैकी काही पुजाऱ्यांच्याबाबत यापुर्वी वादग्रस्त घटना घडल्या आहेत. तसेच घागराचोली पोषाख परिधानप्रकरणासोबत अंबाबाई मूर्तीवर करण्यात आलेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेतही त्रुटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे वादग्रस्त पुजारी जरी सरकारी पुजारीपदी नियुक्तीसाठी पात्र ठरत असले तरी त्यांच्या नियुक्तीबाबत विचार करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे असेही समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.

दरम्यान, येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे विधी व न्यायमंत्री रणजित पाटील यांनी जाहीर केले आहे. त्याबाबत ​जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

बैठकीला संजय पवार, इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, सुरेश साळोखे, स​चिन तोडकर यांच्यासह संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

कसबा सांगाव (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथे चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा गळा चिरुन खून केल्याची घटना उघडकीस आली. अण्णाभाऊ साठे नगर परिसरात आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. सेंट्रिंग काम करणाऱ्या पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले.

वर्षा प्रल्हाद आवळे (वय ३८) असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपी पती प्रल्हाद रामचंद्र आवळे (वय ४५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलगी ऋुतूजा प्रल्हाद आवळे (वय १६) हिने याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्वच्छता कीटचे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वच्छता न पाळणाऱ्या आणि आरोग्यासाठी सुर​क्षिततेची काळजी न घेणाऱ्या कोल्हापुरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थांच्या हातगाडीचालकांना मुक्ता मंचतर्फे स्वच्छतेतून आरोग्याकडे असा मंत्र दिला. या प्रबोधनात्मक उपक्रमांतर्गत हॉटेल व्यावसायिकांना हँडग्लोज आणि कॅप असे स्वच्छता कीट देण्यात आले. प्रतिभानगर येथील हुतात्मा चौकातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्वच्छता कीटचे वाटप करत सोमवारी (ता. ११) सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. या उपक्रमासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे माध्यम प्रायोजक म्हणून सहकार्य करण्यात आले.

कोल्हापुरात पर्यटकांची संख्या वाढत आहे. तसेच स्थानिक नागरिकांमध्येही हॉटेलिंग व स्नॅक्स खवय्येगिरी वाढली आहे. मात्र, स्वच्छतेअभावी साथीच्या रोगांचा फैलावही होत आहे. खाद्यपदार्थ बनवणाऱ्या व्यावसायिकांमध्ये स्वच्छतेबाबत कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे मुक्ता मंचच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीत दिसून आले. त्यानुसार चौपाटी पदार्थ बनवताना पदार्थांशी थेट हाताचा संपर्क येतो त्यांच्याकडून हँडग्लोजचा वापर केला पाहिजे. या जागृतीसाठी मुक्ता मंचतर्फे पहिल्या टप्प्यात १०० कीटचे वाटप करण्यात आले.

प्रतिभानगर, राजारामपुरी आणि ताराबाई पार्क या परिसरात स्वच्छता किट आणि आरोग्य संदेश देणारे फलक वाटण्यात आले. पहिल्या टप्प्यात प्रतिभानगर ते ताराबाई पार्क या परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल्सचालक यांच्या प्रबोधनासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला आठ जागांची ऑफर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोमवारपासून बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असताना शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. अबिटकर यांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे. भेटी दरम्यान भाजपला आठ जागा देण्याची तयारी दर्शवली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत भाजपची युती झाली असून पाच जागा देण्याचे निश्चितही केले असताना भाजपपुढे नवा प्रस्ताव आल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. पालकमंत्री पाटील यांच्या निर्णयानंतर कोणासोबत युती होणार हे निश्चित होणार असले, तरी यानिमित्ताने भाजपने राष्ट्रवादीवर दबाव टाकण्यास यश मिळवले आहे.

बिद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने भुदरगड, कागल व राधानगरी तालुक्यामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोण कोणासोबत युती करणार यावरुन राजकीय चर्चांना कारखाना कार्यक्षेत्रात ऊत आला आहे. त्यामुळे राजकीय हालचालीही गतिमान झाल्या आहेत. प्राथमिक टप्प्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची युती झाली असल्याची चर्चा असून भाजपला पाच जागा देण्याचेही मान्य केले आहे. पण याबाबत अद्याप निर्णय झालेला नसला, तरी विरोधी आमदार अबिटकर, माजी आमदार दिनकर जाधव, संजय घाटगे व प्रा. संजय मंडलिक भाजपसोबत युती करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

त्याचाच भाग म्हणून सोमवार आमदार अबिटकर यांच्यासह जाधव व मंडलिक यांनी पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन युती करण्याचे आवाहन केले. भेटी दरम्यान पालकमंत्री पाटील यांना आठ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र मंत्री पाटील यांनी यापुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला युती करण्याबाबतचा शब्द दिल्याने त्यांनी याबाबत कोणतेही ठोस अश्वासन देण्यास नकार दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र शिवसेनेच्या या खेळीमुळे राष्ट्रवादीवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेने अधिक जागांची ऑफर दिल्याने पालकमंत्री पाटील याचाच फायदा घेऊन अधिक जागांची मागणी करण्याची शक्यता आहे. भेटीमधील तपशीलाबाबत अत्यंत गुप्तता पाळली जात असल्याने बिद्रीच्या अर्ज माघारीपर्यंत फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येणार आहे.

देसाई गटाची अडचण होणार

भुदरगड तालुक्याचे राजकारण माजी आमदार के. पी. पाटील, बजरंग देसाई व आमदार अबिटकर यांच्याभोवती फिरत आहेत. तसेच अनेक छोटे-मोठे गट तालुका व कारखाना कार्यक्षेत्रात आहेत. देसाई यांचे चिरंजीव व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कारखान्याचा निवडणुकीमध्ये त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नसली, तरी के. पी. पाटील व अबिटकर त्यांचे राजकीय विरोधक आहेत. पालकमंत्री पाटील यांनी कोणत्याही एका गटासोबत युती केल्यास त्यांच्याबरोबर देसाई यांना जावे लागणार आहे. त्यामुळे देसाई गटाची चांगलीच अडचण होणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली आहे. अद्याप कोणताही प्रस्ताव ठेवलेला नसला, तरी अर्ज माघारीनंतर याबाबत पुन्हा चर्चा होणार आहे.

आमदार प्रकाश अबिटकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप ताराराणीकडून लोळगे, शिरोळकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या ताराबाई पार्क प्रभाग व शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागातील पोट निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीने उमेदवार निश्चित केले. ताराबाई पार्क प्रभागातून रत्नेश शिरोळकर (ताराराणी आघाडी) तर शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागातून अश्विनी लोळगे (भाजप) यांना उमेदवारी दिली जाणार आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सतीश लोळगे यांच्या अश्विनी या पत्नी आहेत. लोळगे हे गुरुवारी (ता.१४) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान पोट निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चिती संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची मंगळवारी (ता.१२) बैठक होणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक व भाजप आघाडीचे नेते सुहास लटोरे, निलेश देसाई यांची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही प्रभागातील उमेदवारी संदर्भात चर्चा झाली. विविध नावांच्या चर्चेअंती ताराबाई पार्कमधून शिरोळकर तर शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागातून अश्विनी लोळगे यांची उमेदवारी निश्चित केली. ताराबाई पार्क प्रभागातील जागा आपल्याकडेच राखण्यासाठी ताराराणी आघाडी सक्षम उमेदवाराचा शोध घेत होती. या प्रभागात माजी नगरसेवक निलेश देसाई यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. त्यांच्याशी चर्चा करुन शिरोळकर यांचे नाव निश्चित झाले.

शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागातून गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून अश्विनी रामाणे निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत येथील लढत भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना लोळगे यांनी दोन नंबरची मते मिळवली होती. त्यांनाच पक्षात घेऊन भाजपने बेरजेचे राजकारण केले. या दोन्ही प्रभागासाठी २३ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी आहे. ११ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. शासकीय मध्यवर्ती कारागृह येथून काँग्रेसकडून वैभवी जरग यांच्या नावाची चर्चा आहे.या अनुषंगाने काँग्रेसच्या पातळीवर शांतता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुजारीप्रश्नी प्रसंगी अध्यादेश काढू’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीबाबतचा प्रस्ताव ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळात मंजूर होईल. तो हिवाळी अधिवेशनात मंजूर होईल,’ अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अधिवेशनात कायदा मंजूर करताना लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना आणि उपसूचना आल्यास कायदा मंजुरीस विलंब झाल्यास प्रसंगी अध्यादेश काढण्याचा निर्धारही पाटील यांनी व्यक्त केला. अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीने पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी पाटील यांनी यांनी भूमिका स्पष्ट केली.

पाटील म्हणाले, ‘पुजारी नियुक्तीविषयी तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांना अहवाल तयार करण्याचा आदेश दिला आहे. त्यांनी संबंधित घटकांची मते आजमावून अहवाल तयार केला आहे. तो गुरुवारी (ता. १४) विधी व न्याय विभागाला सादर होईल. याबाबत सर्वंकष अभ्यास करून फक्त अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीचा स्वतंत्र कायदा तयार होईल. कायद्याच्या प्रस्तावावर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळेल. या कायद्याला कोर्टात आव्हान दिले तरी तो टिकला पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पगारी पुजारी नियुक्तीचे निकष, पगार, निवृत्तीवेतन, स्थानिक पुजाऱ्यांनी मिळणारी संधी या सर्व गोष्टींचा विचार कायदा करताना केला जाईल.’

समितीच्या शिष्टमंडळात माजी आमदार सुरेश साळोखे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजू लाटकर, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, माजी नगरसेवक बाबा पार्टे, क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य दिलीप पाटील, शरद तांबट यांचा समावेश होता.

हिस्सेदारी नको

‘तुळजापूर मंदिरातील उत्पन्नाची विभागणी पुजारी व संस्थानमध्ये केली जाते’, अशी माहिती पाटील यांनी समिती सदस्यांना दिली. यावर समिती सदस्यांनी, ‘पुजाऱ्यांना जादा पगार द्या. पण उत्पन्नातील हिस्सा व टक्केवारी देऊ नका. सर्व पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होईल, असा कायदा करा,’ अशी मागणी केली.

अशी होणार प्रक्रिया

- जिल्हाधिकारी अहवाल विधी व न्याय विभागाकडे पाठविणार

- विधी व न्याय विभाग बनवणार पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा

- ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळात मंजुरी

- हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर कायदा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व डीबी पथके बरखास्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुन्हे अन्वेषण पथकांच्या (डीबी पथके) अकार्यक्षमतेमुळे जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथके बरखास्त करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिले. शिवाय सर्वच पोलिस ठाण्यांमधील पासपोर्ट पथकांचीही फेररचना केली जाणार आहे. तातडीने मंगळवारी नवीन पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. सोमवारी अधीक्षक कार्यालयात झालेल्या क्राइम आढावा बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अधीक्षक मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची मासिक क्राइम आढावा बैठक पार पडली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पोलिस अधीक्षक मोहिते म्हणाले, ‘गेल्या चार महिन्यात डीबी पथकांचे काम समाधनकारक नाही. त्यामुळे सर्वच ठाण्यांमधील डीबी पथके बरखास्त केली आहेत. तातडीने मंगळवारी संध्याकाळपर्यंत नवीन डीबी पथकांच्या निर्मितीचे आदेश सर्व ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. पासपोर्ट विभागाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करूनही काही कर्मचाऱ्यांमुळे गालबोट लागले आहे. या विभागातही फेररचना करण्याचे आदेश दिले आहेत. बदलांचे परिणामही तातडीने दिसतील.’

पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी संबंधित ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे. याबाबत ते म्हणाले, ‘मटका, जुगार, अवैध दारुविक्री, व्हिडिओ गेम सेंटर्स यावर कारवाईचे आदेश मागील बैठकीत दिले होते. नेसरी आणि शिरोली एमआयडीसी वगळता अन्य ठिकाणी अवैध धंदे सुरूच आहेत. विशेष पथकाच्या कारवाईत अवैध धंदे उघडकीस आल्यास संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. एकाच ठिकाणी तळ ठोकणारे पोलिस पदाचा गैरवापर करतात. त्यामुळे दर तीन महिन्यांनी महत्त्वाच्या पथकांत बदल केले जाणार आहेत.’ या बैठकीत नवरात्रौत्सव, मोहरम, ग्रामपंचायत निवडणुका आणि गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात ४७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या सर्व गावांमध्ये जाऊन नागरिकांशी चर्चा करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षकांना दिल्या आहेत. शिवाय गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा आणि बिद्री साखर कारखाना निवडणुकीसाठी कायदा सुव्यवस्थेचीही चर्चा करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक सतीश माने (गृह), रमेश सरवदे, आर. आर. पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते आणि जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते.

दोषी पोलिसांवर कडक कारवाई

गेल्या महिन्यात लाचखोरीच्या घटनेत दोन पोलिस अडकले. शिवाय गगनबावड्यात मद्यधुंद अवस्थेत रुग्णालयात धिंगाणा घातल्याने तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनांनी पोलिसांचे कारनामे चर्चेत आले असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जात आहे. असे प्रकार रोखण्यासाठी कसूरदार पोलिसांवर कडक कारवाई करण्याचे आदेश अधीक्षक मोहिते यांनी बैठकीत दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा लाख बोगस शेतकरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘राज्यातील ८० लाख पात्र शेतकऱ्यांना ऑक्टोबर अखेरपर्यंत कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा होईल. पण कर्जमाफीचा लाभ घेऊ इछिणाऱ्यांमध्ये दहा लाख बोगस शेतकरी असल्याने त्यांनाच ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी येत आहेत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. थेट जनतेतून निवड करण्याच्या पद्धतीमुळे राजकीय पार्श्‍वभूमी नसलेले, चांगले लोक नगराध्यक्ष झाले. त्यामुळे चांगला विकास होत आहे. हीच पद्धत महापालिकांमधून आली तर शहराचा विचार करुन विकास करणारा माणूस महापौरपदापर्यंत पोहचेल,’ असे सांगत थेट जनतेतून महापौर निवडीसाठी सकारात्मक असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

सोमवारी सीपीआरमधील कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज करताना अजून शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याबद्दल पाटील यांच्याकडे विचारणा केल्यानंतर ते म्हणाले, ‘राज्यातून सुमारे ७२ लाख ऑनलाईन अर्ज सरकारकडे आले आहेत. त्यांच्या छाननीसाठी समित्या नेमल्या आहेत. छाननीनंतर पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. राज्यभरात ८९ लाख शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज करतील अशी अपेक्षा आहे. यापैकी सुमारे दहा लाख शेतकरी बनावट असल्याचा सरकारचा संशय आहे. त्यामुळे अशा बनावट शेतकऱ्यांनाच ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी येत आहेत. उर्वरित ८० लाख शेतकरी कर्जमाफी मिळण्यास पात्र आहेत. त्याची प्रक्रिया जलद सुरु आहे. त्यात अडचणी आल्या तर हे सरकार शेतकऱ्यांचेच असल्याने त्यांच्यासाठी योग्यवेळी सवलतही दिली जाईल. कर्जमाफीची प्रक्रिया राबविताना काही गावात शेतकरीच शिल्लक नसल्याचेही पुढे आले आहे.’

थेट जनतेतून महापौर निवडीच्या संभाव्य निर्णयाबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘शहराचा विचार करुन विकासाची कामे करणारा महापौर हवा असेल तर त्यासाठी थेट जनतेतून महापौर निवडला गेला पाहीजे, असा राज्य सरकारचा विचार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचपध्दतीने विचार करतात. नगरपालिकांमध्ये घेतलेल्या नगराध्यक्षांच्या निर्णयातून चांगला अनुभव आला आहे. चांगले लोक नगराध्यक्ष झाले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच नव्हे तर राज्यभरातील इनामजमिनी संस्थाकडे न ठेवता त्या रेडीरेकनरदराप्रमाणे देण्याचा विचार आहे. अशा प्रकारच्या जमिनी संबधित संस्थानी कुळांनाच दिल्या आहेत. या जमिनी आता कुळांना देताना रेडीरेकनरदराप्रमाणे दिल्या जातील. पण यासाठी कायदा करावा लागणार आहे. देवस्थान समितीसह कोणत्याही संस्थांच्या अथवा सरकारी जमिनीवर अतिक्रमणे असतील तर ती काढायला हवी. पोलिस बंदोबस्त, खासगी सुरक्षा व्यवस्था घेऊन या जमिनी अतिक्रमणमुक्त केल्या पाहिजेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिक तांदूळ निर्मिती अशक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या सहा महिन्यांपासून प्लास्टिक तांदळाची भेसळ करून विक्री केली जात असल्याचा आरोप करून संभ्रमावस्था निर्माण केली जात आहे. प्लास्टिकचा तांदूळ चायनीज असल्याचा प्रचार करून भेसळबाबत कारवाई करण्याची मागणी होत आहे. प्रत्यक्षात असा तांदूळ अस्तित्वात नसून तसे भारत सरकारने जाहीर केले आहे. तांदळामध्ये प्लॅस्टिक तांदळाची भेसळ करणे अतार्किक असल्याचे माहिती कोल्हापूर राइस मिल असोसिएशनचे अध्यक्ष कुबेर भिवटे यांनी दिली. दरम्यान राइस मिल किंवा शहरातील कोणत्याही दुकानात जाऊन तपासणी करून कारवाई करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केली असल्याची माहिती जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी दिली.

अध्यक्ष कुबेर म्हणाले, ‘चायनीज बनावटीच्या प्लास्टिक तांदळाची निर्मिती करुन त्याचा वापर तांदळामध्ये केली जात असल्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. पण हा एक पूर्वग्रदुषित व काल्पनिक तर्क आहे. त्यामुळे प्रामाणिक राइस मिल चालकांवर त्याचा परिणाम होत आहे. प्लास्टिकपासून तांदूळ बनवल्यास प्लास्टिक १२५ रुपये किलो होईल. त्यापासून तांदूळ बनवल्यास हा दर २०० रुपये प्रतिकिलोमध्ये तयार होईल. त्यामुळे ३० ते ४० रुपये कमी किंमतीमध्ये विक्री करावी लागेल, अशी विक्री अव्यावहारिक ठरेल.’

सदानंद कोरगावकर म्हणाले, ‘तांदळामध्ये सुमारे ८० टक्के कार्बोहायड्रेटस् (स्टार्च) व अॅमिलोज घटक असतात. अशा नैसर्गिक तांदळाचा भात बनवून त्याचा चेंडूचा आकार बनविल्यास व तो जमिनीवर फेकल्यास उसळी घेतो. स्टार्चचा नैसर्गिक गुणधर्म चिकटणे असल्याने चेंडूमध्ये जी हवा असते, ती त्याला पुन्हा वर फेकते. त्यामध्ये अनैसर्गिक असे काहीही नसल्याचा अहवाल सेंट्रल फूड टेक्निकल रिसर्च इन्स्टिट्यूट व इंडियन अॅग्रीकल्चर जेनेटिक रिसर्च इन्स्टिट्यूटने दिला आहे. भातापासून तांदूळ बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये स्टिम राइस तयार करताना प्लास्टिक असल्यास वितळून जाईल व त्याचा आकारही बदलेल. त्याउलट नैसर्गिक तांदळाचा भात तयार केल्यानंतर चव बदलत नाही.’

पत्रकार बैठकीस अमर क्षीरसगार, किशोर तांदळे, पुरुषोत्तम बियानी, अनिल झंवर, अरविंद जैन यांच्यासह ग्रेन मर्चंटस् असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

अन्न व औषध प्रशासनाला आवाहन

दरम्यान पत्रकार बैठकीनंतर उद्योग महासंघ व राइस मिल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासनाचे अधीक्षक एस. ए. चौगुले यांची भेट घेतली. राइस मिल व दुकानातील तांदळाची तपासणी करून कारवाई करा अथवा क्लिन चीट देण्याची मागणी केली. यानंतर चौगुले यांनी दुकानांतील तांदळांचा नमुना घेऊन प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवणार असून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला पुजाऱ्यांची नेमणूक करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मनोवृत्ती आणि चारित्र्याने भ्रष्ट असलेल्या पुजाऱ्यांना हटवून अंबाबाईच्या गाभाऱ्यात १०० टक्के महिला पुजारी नेमण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी ‍केली. कोल्हापुरातील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात देसाई यांनी सरकारी पुजारी नियुक्तीच्या मुद्द्यावरून महिलांकडे अंबाबाईचे पौरोहित्य सोपवण्याची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘जेव्हा जेव्हा महिला रणरागिणीचे रुप घेतात तेव्हा इतिहास घडतो. महिलांचे हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी त्या प्रसंगी हातात लेखणी घेतात, तलवार घेतात. त्यामुळे केवळ महिला आहेत म्हणून त्यांना एखाद्या मंदिरात प्रवेश नाकारणे हे मानसिक विकृतीचे लक्षण आहे. पुरुषी मानसिकतेच्या विळख्यात आजवर अनेक महिलांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यासाठीच भूमाता ब्रिगेडची चळवळ देशभर सुरू आहे. महिलांना देशातील अनेक मंदिरांमध्ये प्रवेश नाकारण्याचे कारण त्यांना अपवित्र करणारा मासिकधर्म आहे असे सांगितले जाते. शबरीमाला मंदिरात तर महिलांना महिन्याचे चार दिवस नव्हे तर पूर्ण वर्षभर मंदिरात प्रवेश दिला जात नाही. महिलांना ज्या शारिरीक कारणामुळे अपवित्र ठरवले जाते ती निसर्गानेच त्यांना दिलेली देणगी आहे. हे नाकारण्याचा अधिकार समाजातील पुरूषांना कुणीही दिलेला नाही. जर अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रशिक्षित पुजारी सरकारी पगारावर नेमण्याचा निर्णय घेतला जाणार असेल तर त्यासाठी शंभर टक्के महिला पुजाऱ्यांचीच नेमणूक झाली तरच मंदिराच्या गाभाऱ्यातील भ्रष्ट प्रवृत्तीला आळा बसेल आणि भक्तांना न्याय मिळेल.’

दारूमुक्त हुंडामुक्त महाराष्ट्र आंदोलन नोव्हेंबरपासून

मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीबाबत आंदोलनामुळे चर्चेत असलेल्या भूमाता ब्रिगेडतर्फे येत्या नोव्हेंबरपासून दारूमुक्त महाराष्ट्र आणि हुंडामुक्त महाराष्ट्र या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. दारू व्यसनाच्या आहारी गेलेल्या पतीच्या त्रासाला कंटाळून राज्यात दरवर्षी शेकडो महिलांचे संसार उद्ध्वस्त होतात. त्यामुळे यासाठी पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये पाच लाख महिला सहभागी होणार आहेत अशी माहिती देसाई यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारंपरिक उत्पादनाचा ‘क्लस्टर’ला ब्रेक

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : पारंपरिक गुळाचा गोडवा कायम ठेवताना, गूळाचा दर्जा, त्यामधील संशोधन, आरोग्यदायी उत्पादन आणि मानांकन मिळवून देण्यासाठी गुळाचे आगर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गूळ क्लस्टर योजनेला मंजुरी मिळाली. पण उद्योग म्हणून याकडे लोकप्रतिनिधी, उत्पादक आणि संबंधित घटकांचे झालेले दुर्लक्ष यामुळे ही योजना रखडली आहे. घोषणेनंतर योजना त्वरित कार्यन्वित झाली असती, तर गूळ उत्पादकांना आर्थिक फायदा होण्याबरोबर कोल्हापूरच्या गुळाची चव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली असती. पारंपरिक गूळ उत्पादनातच सर्वांनीच स्वारस्य दाखवल्याने क्लस्टर योजनेला अढथळा निर्माण झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा फाउंड्री उद्योग हा येथील उद्योगाचा पाया असला, तरी येथील कोल्हापुरी गूळ, चप्पल, दूध आणि तांबडा-पांढरा रस्सा आपली खासियत आहे. आपली खासियत जपताना या उद्योगांच्या विकासाला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रयत्नातूनच येथील सहकारी दूध संघांनी आपली स्वतंत्र बाजारपेठ तयार केली आहे. अशीच काहीशी स्थिती कोल्हापुरी चप्पलबाबत पाहला मिळते. अशीच वाटचाल गूळ उद्योगाची सुरू झाली होती. त्याला गती देण्यासाठी गूळ क्लस्टर योजना करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर योजनेला केंद्र सरकारच्या सुक्ष्म व लघू मंत्रालयाने योजनेला मंजुरी दिली. १५ कोटींच्या प्रकल्पाला ९० टक्के म्हणजे सुमारे १३ कोटीचे अनुदान मिळणार असल्याने योजना त्वरित कार्यन्वित होईल, अशी शक्यता निर्माण झाली.

क्लस्टर योजना कार्यन्वित करण्यासाठी शाहू गूळ खरेदी-विक्री संघाने पुढाकार घेऊन त्यासाठी सात सदस्यीय समितीची स्थापना केली. बेले (ता. कागल) परिसरात जागाही घेण्यात आली. योजनेच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने गूळ तयार करणे, उपपदार्थांची निर्मिती, सेंद्रिय गूळ उत्पादनाला गती, निर्यातीला चालना आणि शाश्वत दराची हमी मिळणार होती. मात्र या योजनेकडे एक उद्योग म्हणून पाहिले गेले नसल्याने ही योजना अद्याप कार्यन्वित झालेली नाही. गूळ उत्पादनाकडे एक उद्योग क्षेत्र म्हणून पाहिल्याशिवाय ही योजना कार्यन्वित होणार नाही. यासाठी उत्पादकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी सामुदायिकपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

गूळ उद्योगावरील दृष्टिक्षेप

नोंदणीकृत गुऱ्हाळ घरे : १२५०

गत हंगामातील सुरू गुऱ्हाळ घरे : ३५०

एकूण आवक : ५ लाख ८७ हजार ८३३ क्विंटल

एकूण उलाढाल : २ कोटी १९ लाख ४५ हजार ६७०

समितीला (सेस) मिळणारे उत्पन्न : दोन लाख १९ हजार


क्लस्टरचा उद्देश

उत्पादकांना प्रशिक्षण देणे

सेंद्रिय गूळ निर्मिताला चालना

उपपदार्थ निर्मितीला संधी

कोल्ड स्टोरजची उभारणी

गूळ उत्पादनाला दर्जा प्राप्त करून देणे

राज्यातील ४७ कृषी उत्पादनाचा निर्यात झोन निश्चित केला आहे, पण गुळासाठी अशा निर्यात झोन केलेला नाही. तसेच या पारंपरिक उद्योगाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. तसेच गुळाबाबत कोणतेही संशोधन झालेले नसल्याने उत्पादनामध्ये घट होऊ लागली आहे. क्लस्टर योजनेला गती देण्यासाठी संशोधन, निर्यात झोन याबाबींचा विचार करुन सर्वांनी योजना कार्यन्वित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

राजाराम पाटील, अध्यक्ष, गूळ क्लस्टर योजना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी सेविका आक्रमक

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मानधन वाढीसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी सोमवारी काम बंद करून जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढला. ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्ची खाली करा,’ ‘एक रूपयाचा कडीपत्ता, सरकार झाले बेपत्ता,’ अशा घोषणा देत सेविकांनी आक्रमकपणे निदर्शने केली. जिल्हा परिषदेच्या दारातच ठिय्या मारून रास्ता रोको केला. सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शिष्टमंडळाने काम बंद आंदोलनाची माहिती आणि मागण्यांचे निवेदन प्रभारी महिला व बाल कल्याण अधिकारी एस. डी. मोहिते यांना देण्यात आले.

सरकारने वेळोवेळ मानधनवाढीचे आश्वासन वेळोवेळी दिले. मात्र ते पाळले नाही. त्यामुळे राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी काम बंद आंदोलन सुरू केले. त्याला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद ‌मिळाला. अंगणवाड्या बंद करून जिल्ह्यातील सर्व सेविका, मदतनीस टाउन हॉल येथे एकत्रित आल्या. तेथून दुपारी १ वाजता मोर्चा सुरू झाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रोडवरून मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर आला. मोठ्या संख्येने आलेल्या सेविका, मदतनिसांनी मुख्य प्रवेशव्दारासमोर ठिय्या मारला. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली. त्यानंतर सायंकाळी सेविका, मदतनीस मंगळवारच्या मोर्चासाठी मुंबईला रवाना झाल्या.

मोर्चासमोर बोलताना जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे म्हणाले, ‘सरकारकडे मागण्यासंबंधी अनेकवेळा पाठपुरावा केला. ३० मोर्चाला महिला व बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बैठक घेऊन १ महिन्यात मानधनवाढीवर प्रस्तावाला मंजुरी घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर २५ जुलैला आझाद मैदानात आलेल्या मोर्चासमोर १ आठवड्यात मंजुरी घेण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्याप ही आश्वासने पाळली नाहीत. केवळ वेळकाडूपणाचे धोरण अवलंबत मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. सोमवारपासून राज्यातील सुमारे दोन लाख सेविका, मदतनीसांनी काम बंद आंदोलन सुरू केले. जिल्ह्यासह राज्यातील सर्व अंगणवाड्या बंद आहेत. सरकार सेविका, मदतनीस यांची फसवणूक करीत आहे. त्याविरोधात सेविका, मदतनीसमध्ये प्रचंड असंतोष आहे. आज, मंगळवारी मुंबई विधानसभेवर राज्यातील सर्व अंगवाडी सेविका, मदतनीसांचा मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतरही सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन आक्रमकपणे केले जाईल.’

मोर्चात कर्मचारी संघाच्या सचिव सुवर्णा तळेकर, भारती पाटील, संगीता पोवार, छाया तिप्पट, कुसूम पोवार, शोभा धुमाळ यांच्यासह सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टीतील मुलांसाठी केएमटी बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मार्केट यार्ड प्रभागातील राजीव गांधी वसाहत झोपडपट्टीतील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी मोफत बससेवा सुरू करण्यात आली. प्रभाग समिती सभापती सुरेखा शहा यांनी याकामी पुढाकार घेतला. केएमटीने बससेवा उपलब्ध केल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित झाला आहे. दररोज सकाळी व सायंकाळी शाळेला ने-आण करण्याच्या वेळेत ही बस धावेल.

राजीव गांधी वसाहत झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थी जाधववाडीतील महापालिका शाळेत जुन्या पुणे-बेंगलोर हायवेवरून चालत जात होती. हाय-वेवर वाहनांची सतत वर्दळ असते. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी दफ्तराचे ओझे सांभाळत रस्ता ओलांडत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करुन शाळेला ये-जा करण्यासाठी केएमटीने बससेवा सुरू करावी अशी मागणी नगरसेविका शहा यांनी केली होती.

केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले यांनी बससेवा सुरू करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सोमवारी या सेवेचा प्रारंभ झाला. यावेळी केएमटीचे अधिकारी मनोहर सावनूर, मुख्याध्यापक प्रतापसिंह निकम, शिक्षक दत्तात्रय तडस, मयूर जाधव, वसाहतीतील कार्यकर्ते संतोष जाधव, शिवनाथ जगताप आदी उपस्थित होते. बससेवा सुरू केल्याबद्दल नागरिकांच्यावतीने नगरसेविका शहा यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images