Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लाचखोर पोलिसाने नोटा गिळल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पासपोर्ट पडताळणीसाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी करून दीड हजार रुपये स्वीकारताना जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक पंडित रंगराव पोवार (वय ३५, रा. बालिंगा, ता. करवीर) हा रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. कारवाईच्या भीतीने पोवार याने नोटा गिळंकृत केल्याने त्याची सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सोमवारी (ता. २८) दुपारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यातच ही कारवाई करण्यात आली.

मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असलेल्या तरुणाने पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता. जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडे अर्ज पडताळणीसाठी आल्यानंतर पोलिस नाईक पंडित पोवार याने गुरुवारी (ता. २४) संबंधित तरुणाला बोलवून घेतले. पासपोर्ट पडताळणीचे काम करून देण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी पोवार याने केली. यानंतर तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जाऊन पोवार याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिस उपअधीक्षक गिरिष गोडे यांनी तक्रारीची खातरजमा करून सोमवारी दुपारी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा रचला. तक्रारदाराकडून दीड हजार रुपये स्वीकारताच पोवार याला सापळ्याची कूणकूण लागली. कारवाईपासून पळ काढण्यासाठी त्याने पोलिस ठाण्याच्या बाहेर धूम ठोकली, मात्र एसीबीच्या पथकाने त्याला पाठलाग करून पकडले. याचवेळी लाचखोर पोवार याने लाचेच्या नोटा गिळंकृत केल्या.

नोटा गिळल्यामुळे काही वेळातच पोवार याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. पोटातील नोटांचा पुरावा मिळवण्यासाठी पोलिसांनी त्याची सोनोग्राफी केली, मात्र सोनोग्राफीत नोटा स्पष्ट दिसल्या नाहीत. सोमवारी सीपीआरमध्ये एन्डोस्कोपी यंत्रणा उपलब्ध नसल्याने ही चाचणी करता आली नाही. दरम्यान, एसीबीच्या पथकाने पोवार याचा स्टमकवॉश (पोटातील अंश) घेतला असून तो रासायनिक तपासणीसाठी पाठवला आहे. यात अंथ्रासिन पावडरचे अंश मिळतील, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक गिरीष गोडे यांनी दिली. लाचखोर पोवार याच्या घराची झडती घेण्यासाठी पथक रवाना झाले असून, त्याच्याकडील अपसंपदेची माहिती जमा केली जाणार आहे.

महिन्यांपूर्वी कौतुक

पासपोर्ट पडताळणीची कामे तातडीने पूर्ण करावित असे आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सर्वच पोलिस ठाण्यांना दिले आहेत. या अनुषंगाने पासपोर्टचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे काम सरू आहे. गेल्या महिन्यात आपटेनगर येथील संजय काटाळे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील पासपोर्ट विभागाच्या कामाचे कौतुक करणारे पत्र पोलिस अधीक्षकांना पाठवले होते. त्या पत्रात पंडित पोवार याच्याही नावाचा उल्लेख आहे. महिन्याभरात पंडित पोवार याच्या कारनाम्याने पासपोर्ट विभागाचे काम चव्हाट्यावर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सन्मान सामाजिक बांधिलकीचा

0
0

कोल्हापूर

कोणी बुडणाऱ्या महिलेला वाचवले, तर एका एसटी ड्रायव्हरने वर्दळीच्या ठिकाणी एसटीचा ब्रेकफेल झाला असताना प्रसंगावधान राखून अनेकांचे प्राण वाचवले तर एका सामान्य विक्रेत्याने नोटाबंदीच्या काळात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटेचा पर्दाफाश केला, अशा माणसातील देवांचा सन्मान महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मटा सन्मान’ कार्यक्रमात करण्यात आला. समाजोपयोगी काम करुनही दुर्लक्षित राहिलेल्या या सत्कारमुर्तींच्या कामगिरीला उपस्थितांनी सलाम केला.

‘काळ आला होता, पण’, तसेच ‘दैव बलवत्तर म्हणून …’ अशा म्हणींचा प्रत्यय अनेकांना दैनंदिन जीवनात येत असतो. ज्यांच्यावर असा बाका प्रसंग उद्भवतो त्यांना या म्हणींची प्रचिती येते. अशा बिकट आणि संकटकाळी जर कुणी मदतीचा हात दिला, तर त्याला थेट देवाची उपमा दिली जाते. अशा समाजातील ‘माणसांतील देवांनी’ अनेकांचे प्राण वाचवून आपली सामाजिक बांधिलकी जपली. अशा सन्मानमुर्तींचा सन्मान शाहू स्मारक भवन सभागृहात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

महापालिकेच्या अग्निशमन दलात सेवा बजावत असलेले भगवंत बबन शिंगाडे रंकाळा तलाव येथून जात असताना महिला बुडत असल्याचे निदर्शनास येताच क्षणाचाही विलंब न लावत त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्यात उडी घेऊन महिलेचे प्राण वाचवले. तर संदीप संभाजी कदम यांनी दाभोळकर कॉर्नरला एसटीचा ब्रेकफेल झाल्यानंतर अत्यंत वर्दळीच्या ठिकाणाहून एसटीचा मार्ग बदलत सुमारे ४० प्रवाशांचे प्राण वाचवले. नोटाबंदीच्या काळात सर्वत्र चलन टंचाई निर्माण झालेली असताना नव्याने आलेली दोन हजार रुपयांची बनावट नोट खपवण्याचा प्रयत्नात असलेल्या डॉ. सुधीर कांबळेला सतर्क विक्रेते औरंगजेब नदाफ यांनी शिताफीने पोलिसांच्या ताब्यात दिले. संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी घटना उघडकीस आणून एकप्रकारे देशसेवाच केली. समाजातील या तीनही अवलियांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानावेळी उपस्थितांनी त्यांच्या कामगिरीला सलाम करुन त्यांना मानवंदनाच दिली.

............

कोट

‘महापालिकेच्या अग्निशमन दलात काम करताना अनेक जोखमीच्या कामात सहभाग घेतला. रंकाळा येथे एका महिलेचे प्राण या कर्तव्य भावनेतूनच वाचविले. कर्तव्य म्हणून केलेल्या कामाची दखल महाराष्ट्र टाइम्सने घेऊन एक वेगळी आनंदानुभूती दिली आहे. २४ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये प्रथमच अशा मोठ्या व्यासपीठावर सन्मान होत असून अतिशय आनंद झाला आहे.

भगवंत शिंगाडे, अग्निशमन दल, महापालिका

कोट

‘विनअपघात सेवेबद्दल राज्य परिवहन व कोल्हापूर विभागाच्यावतीने नेहमीच प्रबोधन आणि मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे सहा वर्षांच्या काळात एकदाही अपघाताला सामोरे गेलो नाही. याबाबत अनेकवेळा कौतुक सोहळाही झाला. पण दाभोळकर कॉर्नर घडलेली घटना अचनाक आणि वर्दळीच्या ठिकाणी घडली होती. या प्रसंगातून प्रवाशांना सहीसलामत सुटका केली. ‘मटा’ च्या सन्मानामुळे माझ्यासह कुटुंबही भारावून गेले आहे.

संदीप कदम, ड्रायव्हर, मलकापूर आगार

कोट

‘सर्वसामान्य व्यक्तींची समाजात फारशी ओळख नसते. नोटाबंदीच्या काळात घडलेली घटना सहजरीत्या घडून गेली. पण त्यानंतर ‘मटा’ ने दिलेल्या प्रसिद्धीमुळे समाजात एक वेगळी ओळख निर्माण झाली असून त्यामुळे जबाबदारी अधिक वाढली आहे. सामाजिक कार्यात यापुढे असेच कार्यरत राहून अधिकजोमाने देशासाठी कार्यरत राहणार आहे.

औरंगजेब नदाफ, विक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमीत पगार सुरू करा

0
0



कोल्हापूर टाइम्स टीम

अंगणवाडी सेविकांना मानधनऐवजी पगार द्यावा, यांसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्यावतीने सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपाची नोटीस प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) एस. डी. मोहिते यांना देण्यात आली.

मे महिन्याची सुट्टी भर पगारी करावी, निवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांमधून सुपरवायझरची पदे भरावीत, ८०० लोकसंख्या मागे १ याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती करावी, नोकरीवर हजर झाल्याचे पत्र लेखी स्वरूपात मिळावे, पगाराइतका बोनस दरवर्षी मिळावी, मिनी अंगणवाडीला अंगणवाडीचा दर्जा मिळावा, थकीत मानधन मिळावे या मागण्यांसाठी वारंवार अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी प्रशासन, सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. या मागण्यांची योग्य दखल न घेतल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

टाउन हॉलपासून ‌युनियनच्या नेतृत्वाखाली मोर्चाला प्रारंभ झाला. मागण्या आणि सरकारच्या विरोधात घोषणा देत मोर्चा जिल्हा परिषदेवर आला. तेथे जोरदार निदर्शने करण्यात आली. मोर्चात युनियनचे राज्य सरचिटणीस नामदेव गावडे, सतिशचंद्र कांबळे, शुभांगी पाटील, भारती चव्हाण यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात जाऊन डॉल्बी जप्त करू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी यंत्रणा लावू दिली जाणार नाही. व्यावसायिकांनी डॉल्बीची उपकरणे मुख्यालयात जमा करावीत. जे जमा करणार नाहीत त्यांच्या घरात जाऊन ती जप्त केली जातील,’ असा दम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना भरला. पालकमंत्र्यांसह पोलिस प्रशासनाच्या आक्रमक भूमिकेने डॉल्बीवाल्या मंडळांचे धाबे दणाणले आहेत.

डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सोमवारी (ता. २८) पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत पोलिस अधीक्षक कार्यालयात मंडळांचे पदाधिकारी, राजकीय नेते, महापौर, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत पाटील बोलत होते.

सार्वजनिक ठिकाणी आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासन आक्रमक आहे. आगमन मिरवणुकीत याचे प्रत्यंतर आल्यानंतर किमान दोन बेस आणि दोन टॉप लावण्यास परवानगी मिळावी, असा आग्रह मंडळांकडून सुरू होता. पोलिस प्रशासनाने याबाबत पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेतली.

पाटील म्हणाले, ‘गणपतीच्या आगमन मिरवणुकीत डॉल्बी न वाजल्याने राज्यात कोल्हापूरची वाहवा होत आहे. विसर्जन मिरवणुकीतही डॉल्बीचा आवाज येऊ नये, यासाठी सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष करून विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणल्यास संबंधित मंडळांवर महाद्वार रोडवरच कडक कारवाई करण्यात येईल. कायदेशीर बाबींचा अभ्यास करून डॉल्बीवाल्या मंडळांसाठी १४४ कलम लागू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. डॉल्बी व्यावसायिकांनी डॉल्बीची उपकरणे पोलिस मुख्यालयात जमा करावीत. शिवाय मंडळांवर ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार गुन्हेही दाखल केले जातील.’

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, ‘ध्वनीलहरींची तीव्रता मोजण्यासाठी जिल्ह्यात ८० ध्वनीमापक यंत्रे उपलब्ध आहेत. ६० डेसिबलपेक्षा अधिक आवाज आल्यास कारवाई अटळ आहे.’

पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी शहरातील बहुतांश मंडळांनी डॉल्बीमुक्तीसाठी सहकार्य केले आहे. विसर्जन मिरवणूकही डॉल्बीमुक्त करून विधायकतेकडे पाऊल उचलूया.’

अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची माहिती दिली. महापौर हसीना फरास, आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, बालगोपाल तालमीचे अध्यक्ष निवास साळोखे, यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.


डॉल्बी मुख्यालयात जमा करा

डॉल्बी व्यवसायिकांनी उपकरणे जमा न केल्यास ती जप्त करू. त्यानंतर ही उपकरणे कोर्टातूनच सोडवून घ्यावी लागणार आहेत. जमा केलेली उपकरणे उत्सव संपताच परत केली जातील. विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये, नृत्याविष्कारासाठी मंडळांना आवश्यक ती मदत करू. परराज्यातील सांस्कृतिक कलाविष्कार मिरवणुकीत सादर करावेत, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तारळी’ ओव्हरफ्लो

0
0

कराड : पाटण तालुक्यातील तारळी विभागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. तारळी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. ५.८५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे तारळी धरण मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणातील जलपातळी नियंत्रित करण्यासाठी सायंकाळी ४.३० वाजता धरणाचे तीनही दरवाजे ०.२५ने उचलून तारळी नदीपात्रात २ हजार १८० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तारळी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तारळी परिसरात आजपर्यंत एकूण १२७० मिलीमीटर पाऊस पडला आहे. सध्या धरणात २९४३ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्थानच्या श्रीगणेशाला निरोप

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
पावसाच्या रिमझिम धारा अंगावर झेलत गणपती बाप्पा मोरयाच्या जयजयकार करीत, पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालत गर्दीने फूलून गेलेल्या सांगलीने मंगळवारी श्री गणपती पंचायतन संस्थानच्या श्री गणेशाला निरोप दिला. दुपारी राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन आणि कुटुंबीयांकडून विधिवत पूजा आटोपल्यानंतर परंपरेनुसार समाजातील विविध घटकांना पानसुपारी दिल्यानंतर गणपती बाप्पा मोरयाचा गजर झाला. अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, अभिमन्युराजे, हिमालय, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांच्या उपस्थितीत सजविलेल्या रथात विसर्जनासाठी श्रीगणेश विराजमान झाले.
पाचव्या दिवशी संस्थानच्या मानाच्या श्री गणेशाला निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील गावे आणि शहरांच्या विस्तारीत भागातून मिरवणुकीच्या मार्गाकडे भाविकांचे मंगळवारी लोंढे लागले होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. राजवाड्यापासून ते कृष्णा नदीवरील आयर्विन पूलापर्यंतच्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाचा परिसर गर्दीने फूलून गेला होता.
सडा-रांगोळ्यांनी सजविलेल्या मार्गावरुन पेढ्यांची उधळण आणि ठिकठिकाणी स्वागत स्वीकारत मिरवणुक पुढे जात होती. भालदार, चोपदार, मावळ्यांच्या गणवेशातील घोडेस्वारांच्या लवाजम्यात, छबीना गोल फिरवत निघालेल्या या शाही मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांनी, मुलींच्या लेझीम पथकांनी, हलगीच्या कडकडाटांनी आणि वारकऱ्यांच्या टाळमृदंगाच्या ठेक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपारिक मिरवणुकीला अध्यावत साधनसामुग्रीने घेरल्यासारखी स्थिती होती. कोणी सेल्फी घेण्यात मग्न होते, तर कोणी हा क्षणाचे व्हिडिओ चित्रण करण्याची हौस पुरी करून घेत होते. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारातून उत्सवमूर्तीचे मंदिर परिसरात आगमन होत असतानाच कमानीतून पटवर्धन कुटुंबीयांनी पुष्पवर्षाव केला. रथातून श्रींची मूर्ती पालखीत ठेवून मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर आरती झाली. त्यानंतर स्वागत कमानींत आगत स्वागत स्वीकारत लोकमान्य टिळक चौकातून मिरवणूक सायंकाळी कृष्णानदीवरील सरकारी घाटावर पोहोचली. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालून श्रींची मूर्ती सजविलेल्या होडीतून कृष्णा नदीच्या पात्रात मध्यावर नेऊन विधिवत पद्धतीने विसर्जित करण्यात आली. होडीतून मूर्ती विसर्जनाचा मान सांगलीतील आंबी कुटुंबीयांकडे असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन विभागाला मगरीचा गुंगारा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
पिंजऱ्यातील भक्ष खावून सापळ्यात न अडकता गायब होणाऱ्या मगरींचा शोध घेताना महाकाय जेसीबीने शंभर मीटरचा नाला खोदून काढण्यात मंगळवारचा अख्खा दिवस गेला. नाल्यातील पाणी उपसून इंजिन बंद पडायची वेळ आली तरी मगरीचे दर्शन होऊ शकले नाही. प्रादेशिक वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची आठ जणांची टीम मगर दिसताच जाळे टाकण्यासाठी आणि काहीजण काठीला तयार केलेला फासा घेऊन त्या नाल्याभोवती घिरट्या मारत राहिले. अंधार झाल्याने पुन्हा माघारी फिरले.
सांगलीत आजवर कृष्णा नदीच्या पात्रात आणि शेरीनाल्याच्या मार्गावर वारंवार मगरींचे दर्शन होऊ लागले आहे. महाकाय मगरी आ वासून नाल्याच्या कडेला पहुडलेल्या पाहूण अनेकांच्या उरात धडकी भरायची. त्याच मगरींचे आता बायपास रस्त्याच्या दक्षिणेला रहिवाशी एरीया असलेल्या काकानगर, दत्तनगर भागानजीकच्या नाल्यात दर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे त्या भागातील रहिवाशी, नाल्याच्या परिसरात जनावरे घेऊन जाणारे पुरते धास्तावले आहेत. त्या परिसरातल्या प्लॉटची मालकी असलेल्यांचा तर धंदाच बसला आहे. त्यामुळे मणुष्यबळ आणि पाणी उपसण्यासाठीची यंत्रणा घेऊन मंगळवारी त्या ठिकाणी हजर झाले. प्लॉटच्या मालकाने महाकाय जेसीबी दिमतीला दिला. बघता बघता नाल्याची एका बाजूचे पानसळ गवत उपसून टाकण्यात आले. नाल्यातील पाणी काढण्यात आले. पण एकही मगर दिसली नाही किंवा तिचे पिल्लूही दिसले नाही. त्यामुळे पुन्हा नाल्याच्या दुसरा काठही खोदून काढण्यात आला. हे होईपर्यंत सायंकाळ झाली. अंधार पडला पण एकही मगर सापडू शकली नाही. मगरींच्या वावरांमुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी मागणी केल्यानंतर वनविभागाने बायपास पूलानजिकच्या नाल्यात अनेक दिवसांपासून पिंजरे लावून मगरीला जेरबंद करण्याचे प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणुकीसाठी हालचाली गतीमान

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शासकीय मध्यवर्ती कारागृह आणि ताराबाई पार्क प्रभागातील पोट निवडणुकीसाठी दोन्ही प्रभागातून मिळून २५ हरकती दाखल झाल्या आहेत. मतदार यादीत नाव समाविष्ठ करणे,वगळण्याच्या संदर्भातील हरकतींचा समावेश आहे. पोट निवडणुकीसाठी सात सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्याच दिवशी मतदान केंद्राची निश्चिती होणार आहे. दरम्यान दोन्ही प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. भागात इच्छुकांची फलकबाजी वाढत आहे.

या दोन्ही प्रभागात काँग्रेस विरुध्द भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीतील उमेदवारांत खरी लढत आहे. माजी महापौर अश्विनी रामाणे,माजी नगरसेवक निलेश देसाई यांचे जातीचे दाखला अवैध ठरल्याने नगरसेवक पद रद्दची कारवाई झाली. यामुळे या दोन्ही प्रभागासाठी पोट निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरु आहे. ऑक्टोबर महिन्यात पोट निवडणुकीची शक्यता आहे. या दोन्ही प्रभागातून २८ ऑगस्टपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. ताराबाई पार्क प्रभागातून अकरा तर शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागातून १४ हरकती दाखल आहेत.

हरकतींची तपासणी करुन सात सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महापालिकेकडून राज्य निवडणूक आयोगाला माहिती सादर करण्यात येईल. अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसचिव दिवाकर कारंडे, आस्थापना अधीक्षक विजय वणकुद्रे, नोडल ऑफीसर म्हणून हर्षजित घाटगे, रमेश मस्कर हे निवडणूक विषयक काम पाहत आहेत. दरम्यान दोन्ही प्रभागातील इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. सण, समारंभाचे औचित्य साधून मतदारांच्या भेटीगाठी सुरु आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन्यथा उपोषणाला बसू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मिरवणुकीमध्ये दोन बेस आणि दोन टॉप लावण्याची परवानगी सरकारने तीन सप्टेंबर रोजी ११ वाजेपर्यंत न दिल्यास त्याच दिवशी शिवाजी चौकात अकरा ते पाच वेळेत उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला. मुंबई, पुणे, सातारा आदी ठिकाणी मर्यादेनुसार डॉल्बी लावण्यास परवानगी असताना, कोल्हापूर जिल्ह्याला वेगळा न्याय का? असा प्रश्न उपस्थित करत सत्ता उलथवायला वेळ लागणार नसून सत्तेची मस्ती जनताच उतरवेल, अशी टीका आमदार क्षीरसागर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.

दैवज्ञ बोर्डिंगमध्ये शहरातील तालीम संस्था, सार्वजनिक मंडळे, साउंड सिस्टिम व्यावसायिकांच्या बैठकीला मोठ्या संख्येने तरुण आले होते. यावेळी उपस्थित सर्वच वक्त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्ये आधी बंद करावेत, मग डॉल्बीबंदीवर बोलावे, अशी टीका केली. डॉल्बीला विरोध करणारे पोलिस अवैध धंद्यांना अभय देत असल्याचा आरोपही बैठकीत केला.

आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘सोमवारच्या बैठकीत घरात घुसून डॉल्बी जप्त करु, मंडळाचा अध्यक्ष आहेस का, कोठडीत टाकेन, अशी धमकी देऊन पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण केली आहे. एक प्रकारे हा लोकशाहीचा खून असून राजर्षी शाहूंच्या स्वाभिमानी नगरीत हिटलरशाही खपवून घेणार नाही. २००८ च्या मिरवणुकीमध्ये अशीच दडपशाही करण्याचा प्रयत्न केला होता, पण विधानसभेमध्ये हक्कभंग प्रस्ताव सादर करुन आपण काय करु शकतो, हे दाखवून दिले असून पोलिस प्रशासनाने त्याची दखल घ्यावी. मीही सरकारचा प्रतिनिधी आहे, जिल्ह्यात सेनेलाही मंत्र‌िपद मिळणार आहे, याचे भान ठेवून मंडळांवर कारवाई करावी. जर सत्तेची मस्ती दाखवल्यास सत्तेची मस्ती जनताच उतरवेल. मंडळांनीही डॉल्बीच्या भिंती उभा न करता न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करुन सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. कोल्हापूरात निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी सकाळी चर्चा झाली असून, पोलिस जर दडपशाही करत असतील तर ‘आगे बढो’चा संदेश दिला असून प्रसंगी संपूर्ण सेनेचे आमदार व खासदार कोल्हापूरात पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.’ असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.

हिंदू धर्मावरील अन्यायविरोधात ही बैठक आहे, सेना-भाजपमधील वादाची बैठक नाही, असे स्पष्ट करत, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले म्हणाले, ‘पालकमंत्र्यांचे काम चांगले काम आहे, पण त्यांना पोलिसांचे अवैध धंद्यांना दिले जात असलेले अभय दिसत नाही का? उत्सवातून धर्माची ताकद दिसत असले तर गैर काय? इतर धर्मियांचे ध्वन‌िप्रदूषण दिसत नाहीत का? असे प्रश्न उपस्थित करत हिंदूच्या भावना दुखावल्यास सरकार कोसळण्यास वेळ लागणार नाही.’

बैठकीत अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करत न्यायालयाच्या निर्देशानुसार डॉल्बी लावण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी परिवहन सभापती नियाज खान, किशोर घाटगे, किसन कल्याणकर, जनता बझारचे चेअरमन उदय पोवार, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांनी मनोगत व्यक्त करुन पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. बैठकीस प्रकाश सरनाईक, उदय भोसले, दत्ताजी पाटील, जयंत हारुगले यांच्यासह शहरातील तालीम संस्था व सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

अमिताभ, रजनीकांतला घाबरले

‘गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बीबाबत जिल्हा पोलिस मुख्यालयात बैठक झाली. बैठकीला काही कारणास्तव आमदार क्षीरसागर व मी वेळाने उपस्थित झालो. बैठकीत अमिताभ व रजनीकांत यांचा प्रवेश करताच बैठक संपल्याचे जाहीर केले,’ असे रविकिरण इंगवले म्हणताच एकच हशा पिकला

पर्यावरणप्रेमीमुळे शिवाजी पुलाचे काम रखडले

धार्मिक उत्सव व शहरातील प्रश्नाबाबत पर्यावरणप्रेमी मंत्री व अधिकाऱ्यांच्या कानाला लागतात. मंत्री व अधिकारी अशा पर्यावरण प्रेमीच्या भूलथापांना बळी पडून निर्णय घेतात. अशाच कारणामुळे शिवाजी पुलाचा प्रश्न प्रलंबित राहिला असल्याचा आरोप शिवसेनेचे पदाधिकारी किशोर घाटगे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नराधमास फाशी द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जन्मदात्या आईचा निर्घृण खून करणारा क्रूरकर्मा मुलगा सुनील कूचकोरवी याच्याविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी कूचकोरवी समाज सेवा मंडळाने केली. मंगळवारी (ता. २९) पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून या मागणीचे निवेदन पोलिस उपअधीक्षक सतीश माने यांच्याकडे देण्यात आले. मोर्चात कूचकोरवी समाज सेवा मंडळातील महिला आणि तरुणांचा सहभाग लक्षणीय होता.

कावळा नाका परिसरातील सुनील कूचकोरवी याने दारूच्या नशेत आपल्या जन्मदात्या आईचा निर्घृण खून करून तिच्या मृतदेहाची विटंबना केली होती. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी सुनील कूचकोरवीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. सुनीलने केलेल्या या कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. कूचकोरवी सेवा मंडळाने या सुनील कूचकोरवी याच्या निषेधार्थ मंगळवारी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात कूचकोरवी समाजातील महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर हल्लेखोर सुनीलच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी पोलिस उपअधीक्षक सतीश माने यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, ‘कूचकोरवी समाज अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर येण्याच्या प्रयत्न करीत आहे. समाजातील तरुण शिक्षण घेऊन गुणवत्ता सिद्ध करीत आहेत. मात्र सुनील कूचकोरवी याच्या कृत्याने समाजाची बदनामी होऊ शकते. सुनीलने केलेली घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. त्याला कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. अशा घटनांना आळा बसण्यासाठी हल्लेखोर सुनीलच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा. त्याला तातडीने फाशीची शिक्षा द्यावी. यावेळी प्रवीण पुजारी, देवेंद्र जोंधळे, किशोर माने. प्रा. सुनील भोसले, शिवाजी कोरवी, अनिल कूचकोरवी, विशाल माने, आनंद माने, परशुराम पवार यांच्यासह कूचकोरवी समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी हल्लेखोर सुनील कूचकोरवी याचा जबाब नोंदवला. शिवाय कूचकोरवी वसाहतीतील इतर नागरिकांचेही जबाब घेतले आहेत. त्याला कोर्टात हजर केले असता, एक सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडळे वाद्यांच्या शोधात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर पोलिस दल आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी आग्रही भूमिका घेतल्याने मंडळांनी डॉल्बीला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये, नृत्यसंच आणि देखावे सादर करण्यावर मंडळे भर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय मंडळाच्या कर्यकर्त्यांनी ढोल, झांजपथकांसह परराज्यातील वाद्यांचाही शोध सुरू आहे. ग्रामीण भागातील ढोल आणि झांज पथकांसह लेझीम पथकांनाही मागणी वाढणार आहे. मंडळांची ही कृती डॉल्बीमुक्तीच्या दिशेने पुढचे पाऊल असल्याचे मानले जात आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या भिंती उभ्या करून किळसवाणा नाच करण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे. मंडळांमधील इर्षा वाढल्याने डॉल्बीचा आवाज वाढत आहे, परिणामी कर्णकर्कश्श आवाजाचा नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. रात्रंदिवस विसर्जन मिरवणुकीत वाजणाऱ्या डॉल्बीमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढतात. याला आळा घालण्यासाठी मंडळांनी डॉल्बीचा आग्रह सोडून पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. सोमवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी डॉल्बीवाल्या मंडळांना अक्षरशः दम भरला. डॉल्बी लावण्यापूर्वीच तो जप्त करण्याचा इशारा त्यांनी मंडळांना दिला आहे. याशिवाय डॉल्बी व्यावसायिकांनी कारवाई टाळण्यासाठी आधीच डॉल्बी यंत्रणा पोलिस मुख्यालयात जमा कराव्यात, असे आवाहन केले आहे. पालकमंत्री आणि पोलिस प्रशासनाच्या आक्रमक भूमिकेमुळे मंडळांचे धाबे दणाणले आहेत. अनेक मंडळांनी स्वतःहून डॉल्बीला फाटा देणार असल्याचे जाहीर केले.

गेल्यावर्षी पोलिसांचे आवाहन धुडकावून डॉल्बी लावल्यामुळे १६ मंडळांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर कोर्टात चकरा मारण्याची वेळ आली आहे. यंदा पोलिसांसह पालकमंत्रीही आक्रमक आहेत, त्यामुळे आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर तातडीने गुन्हे दाखल केले जाणार आहेत. कारवाईच्या इशाऱ्याने मंडळांचे पदाधिकारी धास्तावले असून, डॉल्बीला पर्यायी वाद्यांचा शोध सुरू केला आहे. ऐनवेळी नामांकित वाद्यवृद्ध मिळणे कठीण असल्याने मंडळांनी ग्रामीण भागातील पारंपरिक ढोल पथके, झांजपथकांसह लेझीम पथकांकडे मोर्चा वळवला आहे. ज्या मंडळांची आर्थिक ऐपत अधिक आहे ती मंडळे परराज्यातील वाद्यवृद्धांचे बुकिंग करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कर्नाटक, आंध्रप्रदेशातील ढोल पथके, कोकणातील खेळे, केरळमधील पारंपरिक वाद्यवृंद मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ग्रामीण भागातील वाद्य पथकांना मागणी

डॉल्बीमुक्तीमुळे सर्वच मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली आहे. ढोल पथक, झांज पथक यासह हलगी वादकांनाही मागणी वाढली आहे. दहा हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत वाद्यवृंदांची बिदागी आहे. पट्टणकोडोली, कागल परिसरातील पारंपरिक ढोल पथकांना मागणी आहे. हातकणंगले, इचलकरंजी परिसरातील बँजो पथकांचे बुकिंग सुरू आहे. याशिवाय करवीर, राधानगरी, कागल तालुक्यातील लेझीम पथके आणि पारंपरिक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करणाऱ्या मंडळांनाही मिरवणुकीत संधी मिळत आहे.

कडक उपाययोजना

गणेश आगमन मिरवणुकीत पोलिसांना डॉल्बी रोखण्यात यश आले. विसर्जन मिरवणुकीतही डॉल्बी येऊ नयेत, यासाठी मंडळांसह डॉल्बी व्यावसायिकांचे प्रबोधन करणे सुरू आहे. डॉल्बी पोलिस मुख्यालयात जमा करणे, वापर न करण्याचे प्रतिज्ञापत्र देणे, महाद्वार रोडवर प्रवेश करण्यापूर्वीच मंडळांच्या वाहनांची तपासणी करण्याचे उपाय पोलिसांनी योजल आहेत. यातून डॉल्बीमुक्त गणेशोत्सव शक्य असल्याचा विश्वास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

डॉल्बीला फाटा देण्याचे आवाहन पोलिसांसह पालकमंत्र्यांनी केल्याने दयावान मंडळाने नाशिकच्या ढोल पथकाचे बुकिंग केले आहे. मोठ्या आवाजात डॉल्बी वाजवण्यास आमचाही विरोध आहे. कायद्याचे पालन व्हावे यात दुमत नाही. आवाज मर्यादेचे उल्लंघन न करता डॉल्बी वाजवण्यास परवानगी मिळाली तर मंडळाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ.

प्रताप देसाई, पदाधिकारी, दयावान ग्रुप

विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी न वाजवण्याचा शब्द आम्ही पोलिस प्रशासनाला दिला आहे, त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते हालगी आणि घुमक्याच्या ठेक्यावर लेझीम खेळत मिरवणुकीत सहभागी होतील. नंगीवली तालीम मंडळाचे लेझीम पथक मिरवणुकीत नक्कीच वेगळा ठसा उमटवेल.

बाळासाहेब पाटील, अध्यक्ष, नंगीवली तालीम मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’चा आज होणार फैसला

0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजपने राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची पाठराखण सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेत तीव्र संताप आहे. त्यामुळे सरकारला पुन्हा अल्टिमेटम देण्यापेक्षा सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. सहा महिन्यापासून अनेकदा अल्टिमेटम देऊनही भाजपने दुर्लक्ष केल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची आज (बुधवारी) पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वाभिमानी संघटनेने भाजपबरोबर युती केली. त्या बदल्यात राज्यात सत्ता आल्यास एक आमदार आणि एका मंत्रिपदाबरोबरच एक महामंडळ देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सत्ता येताच महामंडळ दिल्यानंतर आमदार आणि मंत्रिपदाबाबत भाजपने टाळाटाळ सुरू केली. खोत यांना उशिरा मंत्रिपद दिले गेले. त्यानंतर मात्र संघटना आणि खोत यांच्यात मतभेद झाल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली. संघटनेने केंद्र व राज्य सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत. त्याची पूर्तता न केल्यास सत्तेतून बाहेर पडण्याचा इशाराही अनेकदा देण्यात आला आहे. तोंडी इशारा देऊनही भाजपने काहीच भूमिका न घेतल्याने बारा दिवसांपूर्वी लेखी इशारा देण्यात आला.

खोत यांचा संघटनेशी कोणताही संबंध न राहिल्याने स्वाभिमानीचा कोणताही प्रतिनिधी सत्तेत राहिला नाही. यामुळे खोत यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर संघटनेच्या नव्या सदस्याला संधी देण्याबाबत भाजपने भूमिका जाहीर करावी, असे पत्र संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या दोघांनाही दिले, मात्र बारा दिवसानंतरही या दोघांकडून कोणतेही उत्तर आले नाही. गेल्या काही दिवसांत शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली असली तरी भाजपने त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. याउलट खोत यांची पाठराखण सुरू केल्याने स्वाभिमानीत सरकारविषयी संतप्त भावना उमटत आहेत.

या पार्श्वभूमीवर पुण्यात संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. लेखी पत्र देऊनही त्याची दखल न घेतल्याने पुन्हा मुदत देण्यापेक्षा सरकारमधून बाहेर पडण्यावर कार्यकारिणीतील बहुतांशी सदस्य ठाम आहेत. त्याचवेळी सत्ता न सोडता सत्तेत राहून सरकारवर दबाव आणत कामे करून घेण्याचा आग्रह काहींनी धरला आहे. यामुळे संघटनेतील सदस्यांच्या या दोन्ही मतप्रवाहावर या बैठकीत चर्चा होणार आहे. सरकारवर असलेली नाराजी ज्या पद्धतीने शेट्टी व्यक्त करत आहेत, ते पाहता ते सरकारमधून बाहेर पडण्याचीच दाट शक्यता आहे.

==========

लेखी पत्र दिल्यानंतर तरी सरकार त्याची दखल घेईल अशी अपेक्षा होती. पण बारा दिवसानंतरही त्याचे उत्तर आले नाही. यावरून सरकारची भूमिका लक्षात येते. सत्तेवर रहायचे की नाही याबाबत निर्णय बुधवार (ता.३०)च्या कार्यकारिणी बैठकीत सदस्य निर्णय घेतील.

राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीधारकांची यादी तयार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी प्रशासनाने यादी तयार केली आहे. थकीत रकमेच्या वसुलीसाठी पथक कार्यान्वित असून एप्रिलपासून आतापर्यंत एक कोटी ९० लाख रुपयांची वसुली केली. सोमवारी (ता.२८) दिवसभर १ लाख १६,६१९ रुपयांची थकबाकी वसुली झाली. तर सदर बाजार झोपडपट्टी परिसरातील आठ ​अनधिकृत कनेक्शन खंडीत करण्यात आले. दरम्यान शहरालगतची ग्रामपंचायती, सरकारी कार्यालयाकडे पाणीपट्टी थकीत आहे. त्यांच्यासह शहरातील थकबाकीधारकांकडील मिळून १९ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे.

दरम्यान संपूर्ण शहरासाठी एकच वसुली पथक आहे. यामध्ये एक वसुली अधिकारी, दोन सहायक अधिकारी, एक फीटर, एक मीटर रीडर व सहायक अशा सहा जणांचा समावेश आहे. मात्र शहराचा विस्तार आणि कनेक्शनधारकांची संख्या मोठी असल्याने कारवाईला मर्यादा येत आहेत. प्रत्येक विभागीय कार्यालयानुसार वसुली पथक स्थापन केल्यास कारवाईची व्याप्ती वाढू शकेल. तसेच अनधिकृत कनेक्शनला चाप बसू शकेल, असे पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. शहरातील विविध भागात अनधिकृत नळ कनेक्शनची संख्या मोठी आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी, बोगस नळ कनेक्शनच्या विरोधात कारवाईची मोहीम उघडण्याची सूचना केली होती.

आयुक्त अभिजित चौधरी यांनी पाणी पुरवठा विभागाला अनधिकृत नळ कनेक्शन खंडीत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहराच्या विविध भागात पाणी पुरवठा विभागाकडून कारवाई सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत, वसुली पथक प्रमुख मोहन जाधव यांनी कर्मचाऱ्यांसहित कारवाई सुरू केली आहे. सोमवारी, सदरबाजार, नागाळा पार्क, निंबाळकर कॉलनी परिसरातील शारदा दाभाडे, शिवाजी नाथा पोवार व शिवाजी धनवडे या तीन थकबाकीधारकांवर कारवाई केली.

सरकारी कार्यालये, ग्रामपंचायतींकडील वसुलीसाठी हालचाली

शहरालगतच्या १२ ग्रामपंचायतींकडे सहा कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. तीन कोटी रुपयांच्या थकीत रकमेवर तीन कोटी रुपये व्याजाची आकारणी झाली आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी २० ते २५ वर्षांपासून पाणीपट्टी भरली नाही. या ग्रामपंचायतींना थकीत रकमेसंदर्भात पुन्हा नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. तसेच सरकारी कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकीत आहे. सरकारी कार्यालयाकडील थकीत रकमेच्या वसुलीसाठी महापालिका प्रयत्नशील आहे. महापालिकेने शहरातील थकबाकीधारकांची यादी तयार केली असून नजीकच्या काळात कारवाईची व्याप्ती वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’साठी होतेय लूट

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर :आधार कार्ड काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरून घेण्यासाठी मनमानी पद्धतीने पैसे घेतले जात असून सर्वसामान्यांची लूट केली जात आहे. जिल्ह्यात केवळ २५ ‘आधार’ यंत्र सुरू असून शेतकरी कर्जमाफीसाठी आधार क्रमांकाची आवश्यकता आणि यंत्र कमी असल्यामुळे अक्षरशः केंद्र चालक लूट करत आहेत. १०० ते ५०० रुपये अर्ज भरण्यासाठी घेत असूनही महसूल विभाग ‘केंद्र चालकांविरोधात तक्रारी करा, कारवाई करू,’ असे म्हणत बघ्याच्या भूमिकेत आहे.

सरकारी योजनांचा लाभ, बँका, शाळा, कॉलेज आदी ठिकाणी आधार कार्डची सक्ती केली जात आहे. आधार नसेल तर लाभांपासून निराधार राहावे लागते आहे. घरातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड काढले जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात ११० ‘आधार’साठीची माहिती भरून घेण्यासाठी यंत्र होती. महा-ई सेवा आणि आपले सरकार केंद्रात यंत्र होते. याशिवाय जिल्हा परिषदेमधील ग्रामपंचायत विभागतर्फे‌ फिरती यंत्रे देऊन दूर्गम गावात आधार काढून दिले. यामुळे जिल्ह्यातील ९७ टक्के लोकांनी आधार काढले. अजूनही २ लाख २८ हजार ७०० जणांकडे आधार नाही.

नियमाप्रमाणे आधार मोफत काढून देणे बंधनकारक आहे. सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान संचलनालयाकडून यंत्र दिले जातात. मात्र महसूल प्रशासनची ‘मेहर’नजर असल्याने खुलेआम लूट सुरू आहे. आधार कार्डसाठी माहिती भरून घेण्याचा ठेका असलेल्या खासगी कंपनीचा करार संपला. मे महिन्यात सर्व यंत्रे जमा करून घेतली. प्रत्येक महसूल मंडळात, जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयात यंत्र देऊन आधार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ७० ठिकाणी यंत्र दिले आहेत. त्यापैकी २५ यंत्रे सुरू आहेत. यंत्रे कमी असल्याने आधार काढू इच्छिणाऱ्यांची गैरसोय होत आहे. कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज भरताना शेतकरी पती, पत्नीचा आधार क्रमांक भरावा लागतो. त्यामुळे सुरू असलेल्या आधार केंद्रावर गर्दी होत आहे. हीच संधी साधत केंद्र चालकांनी मनमानी पैस वसुली सुरू केली आहे. काही केंद्र चालक आधार कार्डला लॅमिनेशन करून देत पैसे उकळत आहेत.

पैसे घेत असल्याचे...

आधार कार्डसाठी पैसे घेतात हे प्रशासनासही माहीत आहे. तरीही व्यापकपणे अचानकपणे तपासणी करून कारवाई करण्याऐवजी प्रशासन तक्रारीची वाट पाहत आहे. त्यामुळे पैसे घेण्याची प्रवृती फोफावत आहे.

अपलोड केलेली माहिती गायब

आधार कार्डसाठी ७७ हजार, ९६१ जणांनी अर्ज भरले. मात्र त्यांना आधार कार्ड मिळाले नाहीत. आधार ऑनलाइन यंत्रणेत तयार झालेले दिसत नाहीत. यावरून केंद्र चालकांनी माहिती भरून घेतली मात्र ती आधारच्या वेबसाइटवर ऑनलाइन यंत्रणेवर न भरता गायब केल्याचे स्पष्ट होत आहे.

३९ लाख जणांकडे आधारकार्ड

आधार कार्ड काढलेल्यांची तालु‌कानिहाय संख्या अशी – करवीर – ९,३१,३१७, हातकणंगले – ६,३७,१२३, राधानगरी – ६,३७,१२३, शिरोळ – ३,४४,८५४, कागल – २,७८,२६७, पन्हाळा – २,४९,५९२, गडहिंग्लज – २,४०,४११, चंदगड – १,८९,५८२, शाहुवाडी – १,८३,६७२, भुदरगड – १,५०,१४८, आजरा – १,०९,३२९, गगनबावडा – ३८,२७८.

आधार कार्डसाठी नव्याने यंत्रे देण्याची प्र‌क्रिया सुरू आहे. माहिती भरून घेण्यासाठी पैसे घेणाऱ्या केंद्र चालकांविरोधात तक्रार करावी. त्वरित कारवाई केली जाईल. यंत्रणा कमी असल्याने प्रत्येक केंद्र चालकाची प्रशासनातर्फे तपासणी करण्यावर मर्यादा येत आहे.

संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयना धरणात ९७ टीएमसी पाणी

0
0

कोयना धरणात ९७ टीएमसी पाणी
कराड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. सोमवारी रात्रीपासून पाटण तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल ३.६३ टीएमसीने वाढ झाली आहे. नवजा येथे १९८, महाबळेश्वरला १८० मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. शिवसागर जलाशयात ९६.८६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात २०७८९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे.
सोमवारी सायंकाळी सहा नंतर कोयनेत मुसधार पाऊस सुरू झाला. रात्रभर पाऊस कोसळतच होता. मंगळवारी दिसभरही पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे.
मंगळवारी कराड, पाटणसह तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. खरीपाची पिके करपू लागली असतानाच पाऊस सुरू झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. पाटण तालुक्यातील केरा, कोयना, तारळी, वांग, उत्तरमांड, काजळी, काफना, मोरणा नद्यांच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरीप सुरू होती. ढेबेवाडी, मल्हारपेठ, तारळे, पाटण, मणदुरे, मोरणा विभागासह कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तालुक्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे.

उजनीतून बारा हजार क्युसेक विसर्ग
सोलापूर : उजनी धरणाच्या पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील धरणे भरली आहेत. या धरणांतून सकाळी आठ वाजल्यापासून सुमारे ५५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी उजनी धरणात येत असल्यामुळे उजनी धरण मंगळवारी सांयकाळी सहा वाजेपर्यंत धरण ९४.९ टक्के भरले होते. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी उजनीतून भीमा नदीमध्ये बारा हजार क्सुसेकने पाणी सोडण्यास येत आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत धरणातील उपयुक्त पाण्याची टक्केवारी ९४.९ टक्के झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गड मुड‌शिंगीत नवजात बालिकेला जिवंत पुरले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुलगी झाल्याने नवरा नांदवणार नाही, त्याचबरोबर मुलीच्या ओठात व्यंग असल्याच्या भीतीने नवजात मुलीस जिवंत पुरण्याचा प्रकार गडमुडशिंगी येथील माय-लेकीने केला. परिसरातील महिलांच्या दक्षतेमुळे नवजात मुलीला जीवदान मिळाले असून, तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी गांधीनगर पोलिसांनी नकुशा सिद्राम भोसले (वय ४८) आणि सारिका लखन मोरे (२५, दोघीही रा. शांतीप्रकाशनगर, गडमुडशिंगी) या माय-लेकीवर गुन्हा दाखल केला असून, नकुशा भोसले या महिलेला अटक केले आहे.

गांधीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गांधीनगर रेल्वे स्टेशनच्या समोर गडमुडशिंगीच्या हद्दीत शांतीप्रकाशनगर नकुशा भोसले राहते. तिच्या मुलीचे लग्न लखन मोरे (रा. तासगाव, ता. मिरज, जि. सांगली) याच्याशी झाले आहे. मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या लखन मोरेस पहिल्या पत्नीपासून चार मुली आहेत. मुलगा होत नसल्याने त्याने पहिल्या पत्नीस माहेरी पाठवले. यानंतर सारिका हिच्याशी लग्न केले. सारिकाला पहिली मुलगी आहे. यावेळी मुलगी झाल्यास तुला नांदवणार नाही, अशी धमकी त्याने सारिकाला दिली होती. सोमवारी पहाटे मुलीचा जन्म झाला. या मुलीच्या ओठात व्यंग होते. पुन्हा मुलगी झाल्याने नवरा नांदवणार नाही याच्या भीतीने दोघींनीही मुलीला पुरण्याचा विचार केला. सारिकाच्या आईने नवजात मुलीस कापडात गुंडाळून पोत्यात घालून रेल्वे रुळानजीकच्या खड्ड्यात पुरले.

पहाटे सहाच्या सुमारास सारिकाची आई रेल्वे रुळानजिक खड्डा खोदत असल्याने परिसरातील महिलांना शंका आली. या दोघींकडे नवजात मुलीबाबत विचारण केली असता या दोघींनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. शिवानी हंकारे, लक्ष्मी कोलप, गीता डिग्रज, दीपा यादव, रमिना शेख, आशा जाधव, मंगल आयरेकर, मंगल कांबळे या महिलांनी चोप देताच नवजात मुलीस खड्ड्यात पुरल्याची कबुली या दोघींनी दिली. महिलांनी तातडीने रेल्वे रुळानजीक जाऊन खड्ड्यातील बालिकेला बाहेर काढले. दरम्यान गांधीनगर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अत्यवस्थ अवस्थेतील बालिकेला तातडीने गांधीनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर नवजात बालिकेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सीपीआरमधील डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी नकुशा भोसले या महिलेस अटक केले असून, सारिका मोरे हिच्यावर उपचार सुरू आहेत.

करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव आणि गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस उपनिरीक्षक ए. जी. फाळके पुढील तपास करीत आहेत.

गांधीनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर पोलिसांनी बालिकेला तातडीने सीपीआरच्या नवजात शिशु विभागात दाखल केले. श्वास कोंडल्याने तिला धाप लागत होती. उपचारानंतर तिच्या प्रकृतीती सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या उपचारासाठी स्वतंत्र पथक आणि सुरक्षेसाठी दोन गार्डही तैनात केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर-मुंबई संपर्क यंत्रणा कोलमडली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबईत झालेल्या धुवाँधार पावसाने कोल्हापूर-मुंबई संपर्काची वाहतूक व्यवस्था कोलमडली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली रेल्वेची यंत्रणा रात्री कोलमडली. दररोज रात्री साडेआठ वाजता कोल्हापूर ते मुंबई धावणारी श्री महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द करण्यात आली. त्यानंतर सह्याद्री एक्सप्रेससंबंधीही रात्री उशीरापर्यंत कोल्हापूर रेल्वे प्रशासनाला सूचना नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. श्री महालक्ष्मी रद्द झाल्याने मुंबईला धावणाऱ्या एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेस्थानकापर्यंत सोडल्या. तीसहून अधिक खासगी आराम बसेस रद्द करण्यात आला. त्यामुळे मुंबईकडे जाण्यासाठी आधी रिझर्व्हेशन केलेले प्रवासी आणि आरामबस चालकांत वादावादी झाली.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज टर्मिनन्सवरुन रात्री साडेआठ वाजता सुटणारी श्री महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. तिकिटाची नोंदणी केलेल्या प्रवाशांना उशीरा एसएमएस मिळाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. दोनशे प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत दिले. काही प्रवासी साडेदहा वाजता सुटणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेससाठी थांबून राहिले. मात्र रेल्वे प्रशासनालाच सूचना नसल्याने प्रवाशांत आणखी गोंधळ उडाला. त्याचा परिणाम म्हणून काही प्रवाशांनी एसटी स्थानकावर गर्दी केली. एसटीने अलिबाग, नाशिकसह बेळगांव-मुंबई ही रात्री शेवटची साडेआठची बस सोडली. रेल्वे आणि एसटी सेवा विस्कळीत झाल्याने मध्यवर्ती बसस्थानकावर खासगी आराम बसेसच्या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी झाली. मुंबईकडे जाणे अत्यावश्यक असलेल्यांनी जिथेपर्यंत जाणे शक्य आहे, तिथेपर्यंत बसेस सोडण्याचा आग्रह धरला. त्यासाठी खासगी आराम बसेसच्या काउंटरवर प्रवाशांचा वादही होताना दिसत होते. रात्री दहा वाजेपर्यंत कोल्हापूरहून मुंबईकडे धावणाऱ्या ३० बसेस रद्द करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर जिल्ह्यात संततधार

0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या आठवड्यात शहर परिसरातच पडणाऱ्या पावसाने मंगळवारी जिल्ह्याच्या सर्व भागात जोरदार हजेरी लावली. ग्रामीण भागात महिन्याच्या कालावधीनंतर पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शहरातही सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने झोडपून काढले. बऱ्याच दिवसानंतर पावसाळी वातावरण तयार झाले. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जुलैमधील जोरदार हजेरीनंतर दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात सोमवारपासून हजेरी लावण्यास सुरुवात केली. शहर परिसरात सोमवारी रात्रीपासून पावसाने चांगली हजेरी लावली. जोर नसला तरी सतत पडलेल्या सरींमुळे वातावरण पावसाळी बनले. या पावसासोबत वातावरणात गारवा वाढला आहे. गणेश आगमनाच्यादिवशी काही भागात पाऊस झाला. तसेच काही तालुक्यातील डोंगरी भाग वगळता पावसाने पाठच फिरवली होती. त्यामुळे शेतकऱ्याची ​चिंता वाढली होती. भात, भुईमूग, सोयाबीन तसेच ऊसाचे पिकांनाही धोका निर्माण झाला होता. गेल्या आठवड्यात शहर परिसरात पावसाने हजेरी लावली. पण ग्रामीण भागात पावसाची चिन्हे नव्हती. दोन दिवसांपासून झालेल्या वातावरणानंतर सोमवारी दिवसभर पावसाच्या किरकोळ सरी पडल्या. सोमवारी रात्रभर व मंगळवारी दिवसभर चांगली हजेरी लावली. बऱ्याच दिवसानंतर एकसारख्या झालेल्या पावसामुळे माळरानावरील पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता थोडी कमी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा नदी धोक्याच्या पातळीवर

0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणातून वारणा नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणाच्या सांडव्यातून ११५००क्युसेक तर वीजगृहातून १५५० क्युसेक असा एकूण १३०५० क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडल्यामुळे वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
वारणा नदीवरील आरळा-शित्तुर, चरण-सोंडोली हे दोन्ही पूल पाण्याखाली गेले आहेत. वारणा नदीवरील काखे-मांगले पुलाला आणि मांगले-सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्याला घासून पाणी वाहत आहे. वारणा पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिराळा तालुक्यात इतरत्र पावसाचा जोर मंदावला असला तरीही चांदोली धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येथील डोंगर माथ्यावरील ओढे- ओहळांतून पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात आलेला विसर्ग सकाळपासून वाढविला आहे. नदी काठावर असणारी ऊस, भात शेती पाण्याखाली गेली आहे. चांदोली धरणक्षेत्रात आजवर एकूण १८८७ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
शिराळ्याचा पूर्व भाग कोरडा
तालुक्याचा पश्चिम भागात दमदार पाऊस सुरू असला तरी पूर्व भागात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. दिवसांतून एखादी दुसरी मोठी सर पडत आहे. माळरानातील भूईमुग, सोयाबीन, हायब्रीड पिकांना संजीवनी मिळण्याइतपत पाऊस पडत आहे. भात पिकांचे मोठ्या पावसाअभावी नुकसान होणार असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ उजनी भरले; ४० हजार क्युसेक विसर्ग

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
उजनी धरणाच्या पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे भरली आहेत. धरणांतून सोडलेले पाणी उजनी धरणात येत असल्यामुळे धरण पूर्ण भरले आहे. बुधवारी दुपारी चार वाजता धरण ९९.६७ टक्के भरले होते. साडेसहा वाजता धरण ९९.८९ टक्के भरले होते. सायंकाळी उजनीतून ४० हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता.
पुणे जिल्ह्यातील दौंड येथून ७३ हजार क्युसेकने उजनी धरणात पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी भीमा नदी, कालवा व बोगद्यातून सुमारे ४० हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. नदीकाठच्या गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images