Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

डॉल्बीप्रकरणी समुपदेशन करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉल्बी लावणाऱ्या मंडळावर पोलिसांना कारवाई करावीच लागेल. कारवाई केल्यानंतर मंडळातील मुलांच्या करिअरला अडथळा येतो. गेल्या वर्षी डॉल्बी लावलेल्या १६ मंडळावर कारवाई झाली. त्यांनी यंदा डॉल्बी लावू नये, यासाठी समुपदेशन करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले. गणराया अॅवॉर्ड वितरण प्रसंगी धैर्यप्रसाद हॉलमध्ये ते बोलत होते. यावेळी छत्रपती शाहू महाराज, महापौर ह‌सीना फरास, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘छोट्या गावातील लोकसंख्येइतकी संख्या शहरातील एकेका मोठ्या मंडळात असते. त्यामुळे प्रत्येक मंडळांनी विधायक, रचनात्मक काम करण्याला प्राधान्य द्यावे. उत्सव काळात पोलिसांना सहकार्य करावे. बंदोबस्ताला असणाऱ्या महिला पोलिसांची गैरसोय होते. त्यांच्यासाठी मोबाइल चेजिंग रूम तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.’

नांगरे-पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरला समाज प्रबोधन, शिक्षण, शौर्याची परंपरा आहे. त्यामुळे सर्वच मंडळांनी यंदा रचनात्मक, प्रबोधनात्मक गणेशोत्सव साजरा करावा. कायद्याचा धाक दाखवून आनंदावर विरजण घालणार नाही. मात्र, डॉल्बी लावून कायद्याचा भंग केल्यास पोलिसांना कारवाई करावी लागेल. विधायक गणेशोत्सवाला पोलिस सहकार्य करतील.’

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘सर्वच मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा. पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. अनेक मंडळे समाज प्रबोधनपर देखावे साजरे करतात. त्यामुळे पोलिस प्रशासनाने रात्री वेळ वाढवून द्यावी.’

जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते म्हणाले, ‘यंदा जिल्ह्यात ७ हजार, १३० सार्वजनिक गणेश मंडळे गणपतीची प्रतिष्ठापना करणार आहेत. त्यापैकी ९२२ गणेश मंडळे शहरातील आहेत. प्रमुख मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन डॉल्बी न लावण्याची विनंती केली आहे. त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात डॉल्बीसाठी प्रसिद्ध असलेल्या अर्जुनवाड गावाने यावर्षी डॉल्बी न लावण्याचा निर्णय घेतला. त्याचा आदर्श सर्वच मंडळांनी घ्यावा.

यावेळी हसीना फरास यांचे भाषण झाले. रणरागिणी ग्रुपमधील महिलांनी ‘सोनु तुला भरोसा नाय काय’ या गाण्यातून डॉल्बीमुक्त गणशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास आमदार डॉ. सुजित ‌मिणचेकर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, आयुक्त अभिजित चौधरी, अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, दिनेश बारी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अप्पर अधीक्षक सुहेल शर्मा यांनी आभार मानले.

कोरा चेक

डॉ. प्रभू यांच्या हॉस्पिटलला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट दिली. तेथील रुग्णांची परिस्थिती डॉक्टारांनी सांगितले. ते ऐकूण गरीब रुग्णांना उपचारासाठी कोणत्याही सरकारी योजनेतून पैशाची तरदूत होत नाही, त्यांच्या खर्चासाठी मी कोरा चेक दिला आहे, अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी सांगताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वाभिमानीला आणखी एक मंत्रिपद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाभिमानी संघटनेतून हकालपट्टी केलेल्या सदभाऊ खोत यांचे मंत्रिपद मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील आहे. त्यामुळे त्यांचे पद कायम राहणार आहे. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणखी एक मंत्रिपद देण्याची मुख्यमंत्र्यांनी विनंती करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. यामुळे खोत यांचे मंत्रिपद कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, त्यांच्या मंत्रिपदाबाबत आठ दिवसांत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.

संघटनेच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप करत स्वाभिमानी संघटनेने कृषी राज्यमंत्री खोत यांची हकालपट्टी केली. सरकारमध्ये सहभागी होताना एक मंत्रिपद आणि एक महामंडळ देण्याचा निर्णय झाला होता, पण खोत यांच्या हकालपट्टीने त्यांचा संघटनेशी संबंध राहिला नाही. ही संघटना सरकारमध्ये कायम राहणार की बाहेर पडणार, याचा निर्णय अजूनही संघटनेने जाहीर केला नाही. खोत यांच्याबाबत सरकार आणि भाजपने आठ दिवसांत निर्णय घ्यावा, असे पत्र खासदार शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. खोत यांच्याबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, यावरच पुढील हालचाली होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री पाटील यांनी खोत मंत्रिमंडळात कायम राहतील, असे संकेत दिले आहेत. स्वाभिमानी सरकारमध्ये कायम राहण्यासाठी आणखी एक मंत्रिपद देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तथापि सरकारमध्ये राहायचे की नाही याबाबत शेट्टीच निर्णय घेणार आहेत. त्यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, आपल्याला केंद्रीय मंत्रीमंडळात सहभागी होण्याबाबत रस नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. गेले साडेतीन वर्षे आपल्या मंत्रिपदाबाबत चर्चा असून काही लोक मुद्दाम ही चर्चा पेरत असल्याची टीका त्यांनी केली.


राणे यांचे स्वागतच

काँग्रेसचे नेते नारायण राणे हे भाजपमध्ये येऊ​ इच्छित असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, अशा शब्दांत महसूलमंत्री पाटील यांनी राणे यांच्या भाजप प्रवेशाला पक्ष तयार असल्याची भूमिका मांडली आहे. गेले काही महिने राणे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यांना कोणते मंत्रिपद द्यायचे याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.


आम्ही खोत यांची दहा दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या मंत्रिपदाचा आमच्या संघटनेशी संबंध राहिला नसल्याने याबाबत भाजपची भूमिका आठ दिवसांत स्पष्ट करावी.

राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांना विश्वासात घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील रस्ते पूर्ण झाले आहेत. अमृत योजनेच्या कामात पुन्हा या रस्त्यांची खोदाई केली जाणार आहे. अमृत योजनेच्या कामासंदर्भात नगरसेवकांना विश्वासात घेतलेले नाही. या योजनेतील बारकावे कोणालाही माहिती नाहीत. त्यामुळे नगरसेवकांना विश्वासात घेऊनच या कामाची सुरुवात करा. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा बैठक घ्या, अशी मागणी नगरसेवकांनी प्रशासनाकडे केली. योजनेसंदर्भात करण्यात येणाऱ्या कामासंदर्भात महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात नगरसेवकांसमोर ‘स्लाइड शो’चे शुक्रवारी सादरीकरण झाले.

सरकारकडून अमृत योजनेतंर्गत ११५ कोटींची निधी महापालिकेला मंजूर झाला आहे. या मंजूर झालेल्या कामाची चर्चा करण्यासाठी महापौर हसीना फरास यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीत नगरसेवकांनी योजनेच्या अंमलबजावणीला कडाडून विरोध केला. नगरसेवक जयंत पाटील, गटनेता शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, मुरलीधर जाधव, सभागृहनेता प्रवीण केसरकर यांनी या योजनेच्या अंमलबजावणीला विरोध केला. या योजनेच्या अंमलबजावसाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. त्याचा फटका शहरवासीयांना बसणार आहे. त्यामुळे या योजनेसंदर्भात पुन्हा बैठकीचे आयोजन करावे, अशी आग्रही मागणी केली. महिला, बालकल्याण वहिदा सौदागर, प्रभाग समिती सभापती सुरेखा शहा, राहुल चव्हाण, अभिज‌ित चव्हाण, नगरसेविका शोभा कवाळे यांनी प्रश्न उपस्थित केले. पाइपलाइन टाकण्याच्या कामाचे नकाशे आणि सॉफ्ट कॉपीची मागणी केली. यावेळी महापौर हसीना फरास यांनी नगरसेवकांना सात दिवसांत नकाशे देण्याच्या सूचना संबधित कन्सलटट, अधिकाऱ्यांना दिल्या. ही बैठक येत्या काही दिवसांत पुन्हा घेण्याचे ठरले.

जलअभियंता सुरेश कुलकर्णी म्हणाले, ‘अमृत योजनेअंतर्गत शहरांचा स्वच्छ आणि पुरेसा पाणी पुरवठा, सुसंचलित ड्रेनेज व्यवस्था, प्रदूषण कमी करण्यासाठी फुटपाथचा वापर, सार्वजनिक परिवहनला चालना देणे. पार्किंग सुविधा, लहान मुलांसाठी गार्डन, हरित क्षेत्रासह अन्य कार्यक्रमाची नियोजन करावे लागणार आहे.’

कन्सलटंट एसजीआय कंपनीचे अविनाश गाडेकर यांनी स्लाईड शोद्वारे या योजनेची माहिती दिली. अमृत सुधार पाणी पुरवठा योजनेच्या प्रकल्प अहवालामध्ये शहरांतर्गत मुख्य वितरण नलिका व अंतर्गत वितरण नलिका बदलण्याचे तसेच उपगरांमध्ये नव्या वितरण नलिका प्रस्तावित केली आहे. हायड्रॉलिक मॉडेलिंगनुसार वितरण व्यवस्थेचे रिझोनिंग करुन आठ नवीन झोन तयार करण्याचा प्रस्ताव आणि सन २०४९ मध्ये २०५ एमएलडी मागणीस २० तास पंपिंग गृहित धरुण या योजनेची आखणी केली आहे. सध्या असलेल्या साठवण टाक्यांची खराब स्थिती पाहून महानगरपालिकेने सांगलीच्या वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरींगकडून स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. त्यांच्या अहवालानुसार तीन उंच टाक्या पाडण्याचे आणि दोन इंच संपचा वापर बंद, पाच टाक्यांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित आहे. सध्या असलेल्या आणि प्रस्तावित टाक्यांच्या जागा सुरक्षित राहण्यासाठी काही ठिकाणी दगडी बांधकाम, चेन लिंक फेन्स‌िंग असलेले कंपाऊंड प्रस्तावित आहे. त्यासाठी ११४.८१ कोटी प्रस्तावित किंमत आहे.

या वेळी आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार, प्राथमिक शिक्षण समिती सभापती वनिता देठे, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, प्रभाग समिती सभापती प्रतीक्षा पाटील, अफजल पिरजादे, छाया पोवार, गटनेता सुनील पाटील, सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एन. बी. भोई आदी उपस्थित होते.

मंजूर योजनेतील समाविष्ट कामे

८.१६ किलोमीटर लांबीची २०० ते ११०० मिलीमीटर व्यासाची गुरुत्वनलिका, १०.७५ मि.मी. व्यासाची दाबनलिका, कसबा बावडा, राजेंद्रनगर, पुईखडी या ठिकाणी नऊ पंप आधुनिक मशिनरीसह बसविणे. कदमवाडी, सम्राटनगर, ताराबाई पार्क, राजेंद्रनगर, बोंद्रेनगर, पुईखडी, शिवाजी पार्क, बावडा वॉटर, कसबा बावडा, सुभाषनगर, राजेंद्रनगर, राजारामपुरी सायबर, राजारामपुरी लकी बाजार, आपटेनगर आदी १५ ठिकाणी उंच टाक्या बांधल्या जाणार आहेत. नवीन वितरण व्यवस्थेत ११० ते २५० मि. मि. व्यासाची ३१८. ३४ कि. मी., ३०० ते ७५० व्यासाची ३०. ७३ कि.मी. लांबीची नवीन वितरण वाहिनी टाकली जाणार आहे. जुनी वितरण व्यवस्था बदलात ११० ते २५० मि. मि. व्यासाची ४४. ४३ कि. मी आणि ३०० ते ४५० मि. मि. व्यासाची २.८३ कि. मी. जुनी वितरण बदलली जाणार आहे. सुभाषनगर, कसबा बावडा, राजेंद्रनगर येथे पंप हाऊस उभारले जाणार आहे. त्यासह सध्या असलेल्या टाक्यांची विशेष आणि किरकोळ दुरुस्ती प्रस्तावित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांताक्रुझ विमानतळावर स्लॅाटसाठी प्रयत्न

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet:@sachinyadavMT

कोल्हापूर : कोल्हापूरची विमानसेवा सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याची आशा पल्लवित झाली असून येत्या आठवडाभरात विमानाचा उड्डाणाचा परवाना मिळणार आहे. डे ऑपरेशन सुरू करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्याने सांताक्रुझ ( डोमॅस्टिक) विमानतळावर स्लॅाट मिळवावा लागणार आहे. यासाठी प्रयत्न सुरू असून सकाळी साडेसात, आठ आणि साडेआठची टेक ऑफची वेळ मिळल्यास विमानसेवा सोयीची ठरणार आहे. विमान प्रवाशांना मुंबईतील कामकाजासह पुढील प्रवासासाठी सोयीची वेळ ठरणार आहे.

कोल्हापूर विमानतळ येत्या सप्टेंबरपर्यंत केंद्र सरकारच्या उडाण या किफायतशीर प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीच्या योजनेसाठी सज्ज करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून पाठपुरावा अंतिम टप्प्यात आहे. विमानतळाच्या ऑडिटचे काम पूर्ण झाले असून येत्या आठवडाभरात विमान उड्डाणाचा परवाना मिळणार आहे. डे ऑपरेशनचा परवाना मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने नागरी हवाई वाहतूक संचलनालयाकडे परवान्यासाठी लागणाऱ्या अटींची पूर्तता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विमानाचा परवाना मिळाल्यास उडाण योजनेतून डेक्कन चार्टर्स एव्हीएशन कंपनीकडून विमानसेवा सुरू होणार आहे. या कंपनीसह राज्य सरकारकडून अन्य एका कंपनीने प्रस्ताव दिला आहे. येत्या काही दिवसांत विमान कंपनीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

केंद्र सरकारने नॉन-मेट्रो शहरातील विमानतळ कमी प्रवासी क्षमतेच्या विमानांनी जोडण्यासाठी ‘उडान’ ही योजना मे महिन्यापासून सुरू केली. या योजनेत कोल्हापूरच्या विमानतळाचा समावेश केला आहे. विमान उड्डाणाचा परवाना आठवडाभरात हाती मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॅाट मिळणे अशक्य आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह लहान विमानांना लँडिंग आणि टेक ऑफ करण्यासाठी वेळ लागतो. धावपट्टीही अधिक काळ वापरली जात असल्याने या ठिकाणी सकाळच्या वेळेत स्लाँट मिळणे अशक्य आहे. त्याला पर्याय म्हणून सांताक्रूझ विमानतळावर स्लॅाट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. हा स्लॉट मिळाल्यास सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू होणार आहे. कोल्हापूर ते मुंबई या मार्गावरील विमानसेवेसाठी ५० टक्के आसनाचे प्रवासभाडे २५०० हजार रुपये आकारले जाणार आहेत. पहिल्या नऊ प्रवाशांना अडीच हजार आणि उर्वरित प्रवाशांना सात हजार रुपये आकारले जाणार आहे. उर्वरित तिकीटे बाजारभावाप्रमाणे विक्री केली जाणार आहेत. राज्य सरकारकडून सवलतीच्या विमान भाड्यातील सवलत दिली जाणार आहे. एक तासांचा हा विमानप्रवास असेल. एटीआर ७२ सारखी विमाने लॅंडिंग आणि टेक ऑफ होण्यासाठी वेळ लागणार आहे.


विमानतळ सुरक्षा

सध्या कोल्हापूरच्या विमानतळावर पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि काही पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी असतात. सरकारी आणि काही खासगी विमाने कोल्हापूरच्या विमानतळावर लँण्डिंग होतात. सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू झाल्यास बंदोबस्त वाढवावा लागणार आहे. विमानतळाचे ऑडिट पूर्ण झाले असले तरी धातूशोधक यंत्रणा, अग्निशमन, भविष्यात नाइट लँडिंगची सुविधेची पूर्ती करावी लागणार आहे. शस्त्रधारी पोलिस तैनात असले तरी विमानतळाची सुरक्षा आणि अपहरणाचा प्रतिकार, प्रतिबंध करण्यासाठी विशेष प्रशिक्षित असलेले कर्मचारी तैनात करावे लागणार आहे. विमानतळांची सुसज्जता वाढवावी लागणार आहे.


डे ऑपरेशनच्या परवान्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर विमानतळावर लागणाऱ्या सर्व सुविधांची पूर्तता येत्या काही दिवसांत केली जाणार आहे. दिवसभरातील विमानसेवेसह भविष्यात नाइट लँडिंगची सुविधा केली जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात विमानसेवा सुरू होणार आहे. डीजीसीए आणि एएआयकडे लागणाऱ्या अटींची पूर्तता अंतिम टप्प्यात आहे.

खासदार धनंजय महाडिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पश्चिम महाराष्ट्राला भूकंपाचा सौम्य धक्का

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल एवढी होती. रात्री १० वाजून २५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपानंतर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील सर्व धरणं सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. सातारा येथील कोयनानगर भूकंपाचा केंद्र होते. कोकण पट्टयातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीतही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लैंगिक शोषणप्रकरणी चव्हाण कुटुंबीयांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर

महिलेचे लैंगिक शोषण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. अॅड. चारूलता राजेंद्र चव्हाण (वय ५०), ऋतुराज राजेंद्र चव्हाण (२४) आणि राजेंद्र चव्हाण (५४, सर्व रा. सारंग अपार्टमेंट, सुधाकरनगर) या तिघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. चव्हाण कुटुंबीयांनी धमकावून ६५ हजारांच्या रोख रकमेसह साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिनेही जबरदस्तीने काढून घेतल्याची नोंद तक्रारीत केली आहे.

राजारामपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुराज चव्हाण याच्या घरापासून जवळच तक्रारदार महिलेचे घर आहे. चारूलता चव्हाण यांचे अधूनमधून तक्रारदार महिलेच्या घरी येणे-जाणे होते, त्यातून ऋतुराज व तक्रारदार महिलेची ओळख झाली. ऋतुराजने ओळखीचा गैरफायदा घेऊन २०१५ पासून संबंधित महिलेशी वारंवार लगट करून लैंगिक अत्याचार केला. ऋतुराजने अश्लील फोटो काढले आणि चित्रीकरणही मोबाइलमध्ये केले आहे. पीडित महिलेने फोटो आणि चित्रीकरण डिलीट करण्यास सांगितल्यानंतर ऋतुराजसह त्याची आई चारूलता आणि वडील राजेंद्र यांनी पीडितेस धमकावले. फोटो आणि चित्रीकरण डिलीट करण्यासाठी रोख ६५ हजार रुपयांसह पाच लाख ३७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिनेही जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकारानंतर चव्हाण दाम्पत्याने सार्वजनिक ठिकाणी जातिवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली.

पीडित महिलेने शुक्रवारी (ता. १८) रात्री उशिरा राजारामपुरी पोलिस ठाण्यात चव्हाण कुटुंबीयांविरोधात फिर्याद दाखल केली असून, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर तपास करीत आहेत. याबाबत अॅड. चारूलता चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, ‘संबंधित महिला जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी खोटी तक्रार देऊन त्रास देत आहे. तिच्याविरोधात कोर्टात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याची योग्यप्रकारे चौकशी करावी.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा शिक्षक मनुगडेला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हॉकीचे प्रशिक्षण देण्याच्या निमित्ताने शालेय विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणारा क्रीडा शिक्षक विजय विठ्ठल मनुगडे (वय ३५, रा. फुलेवाडी) याला जिल्हा कोर्टात पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय युवक कॉँग्रेसनेही पोलिसांना निवेदन दिले असून, निष्पक्ष तपास करण्याचे आवाहन केले.

राजेंद्रनगर येथील शाळेतील क्रीडा शिक्षक मनुगडे याने शाळेतील एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला, तर इतर तीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले. गेली साडेतीन महिने सुरू असलेला प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांना धक्का बसला होता. पालकांनी शुक्रवारी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने मनुगडे याला अटक केले. अटकेतील मनुगडे याला पोलिसांनी शनिवारी जिल्हा कोर्टात हजर केले असता, कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी मनुगडे याचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्याची सोशल मीडियातील अकाउंट्सची तपासणी सुरू आहे. याशिवाय मोबाइल आणि लॅपटॉपमधील डाटा तपासला जात आहे. विद्यार्थिनींचे अश्लील फोटो आणि चित्रफिती तायार केल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केली आहे.

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या विजया रहाटकर यांनी विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणी शनिवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. ‘तातडीने या गुन्ह्याचा तपास करून संशयितावर भक्कम आरोपपत्र दाखल करावे,’ अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. याशिवाय युवक कॉँग्रेसनेही पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांची भेट घेतली. शालेय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार होणे ही गंभीर बाब आहे. पोलिसांनी कोणताही राजकीय दबाव न घेता निष्पक्ष तपास करून दोषीवर कडक कारवाई करावी. याशिवाय संबंधित संस्थेवरही कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा युवक कॉँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी रुपाली पाटील, सरदार पाटील, विष्णू पाटील, किरण पाटील, वैशाली महाडिक, नीलेश यादव, मयूर पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैनुद्दीनच्या पोलिस कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणा लुटीचा मुख्य सूत्रधार मैनुद्दीन मुल्ला याची पोलिस कोठडी संपल्याने सीआयडीने मैनुद्दीनला शनिवारी (ता. १९) जिल्हा कोर्टात हजर केले. कोर्टाने मैनुद्दीनच्या कोठडीत मंगळवारपर्यंत (तीन दिवस) वाढ केली. दरम्यान, सीआयडीकडे शरण आलेले निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि सूरज चंदनशिवे या दोघांनी जामिनासाठी वकिलांकरवी पुन्हा पन्हाळा कोर्टात अर्ज दाखल केले आहेत. उर्वरित दोन संशयित पोलिस मात्र अद्याप सीआयडीच्या हाती लागलेले नाहीत.

वारणानगर येथील शैक्षणिक संस्थेच्या इमारतीतून लंपास केलेल्या कोट्यवधींच्या रकमेबाबत सात पोलिसांसह नऊजणांवर गुन्हे दाखल आहेत. यातील पाच पोलिस सीआयडीकडे शरण आल्यानंतर सीआयडीने मुख्य चोरटा मैनुद्दीन मुल्ला याला पुण्यातून अटक केले होते. पन्हाळा कोर्टात हजर केले असता, त्याला सात दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती. शनिवारी कोठडीची मुदत संपत असल्याने याला पुन्हा पन्हाळा कोर्टात हजर केले जाणार होते. मात्र पन्हाळा कोर्ट रजेवर असल्याने मैनुद्दीनला कोल्हापुरातील कोर्टात हजर करण्यात आले. गुन्ह्यात लंपास केलेली रक्कम संशयितांकडून मिळालेली नाही, त्यामुळे पोलिस कोठडीची गरज असल्याची मांडणी सरकारी वकिलांनी केली. यानंतर न्यायाधीशांनी मैनुद्दीनच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ केली. न्यायालयीन कोठडीत असलेले निलंबित पोलिस निरीक्षक घनवट आणि सहायक निरीक्षक चंदनशिवे या दोघांनी शुक्रवारी वकिलांकरवी पन्हाळा कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, तपासामध्ये मैनुद्दीनचे असहकार्य कायम असल्याने लंपास झालेला मुद्देमाल मिळवण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही, अशी माहिती सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिकारी-युनियन’चा तिजोरीवर दरोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील विद्युत दिव्यांची दुरवस्था, लाइट मटेरिअलचा अभाव, निविदा प्रक्रियेत अडकलेली बूम खरेदी, स्पॉट बिलींगमधील त्रुटी, शहरातील खराब रस्त्यांची अवस्था यावरुन महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. महापालिकेतील पवडी आणि सफाई विभागातील बहुसंख्य कर्मचारी मूळ नियुक्तीच्या ठिकाणाऐवजी अन्यत्र कामे करत असतात. महापालिकतर्फे दरवर्षी १७५१ झाडू कामगारांच्या वेतनावर ३६ कोटी रुपये खर्ची पडतात. मात्र शहरातील साफसफाई, उद्यानांच्या देखभालीसाठी कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी त्यांना युनियनच्या दबावापोटी पाठीशी घालण्याचा उद्योग सुरू आहे. अधिकारी आणि कर्मचारी युनियनच्या संगनमताने महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घातला जात असल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी सभागृहात केला.

अनेक कर्मचारी अ​धिकाऱ्यांच्या घरी भाजीपाला आणणे, वाहन धुण्याची कामे करुन महापालिकेचे आर्थिक नुकसान करत आहेत. मूळ ​नियुक्तीच्या ठिकाणी संबंधित कर्मचारी हजर होणार नसतील तर त्यांना घरी घालवा, अशी आक्रमक भूमिका नगरसेवकांनी घेतली. महापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. मागील सभेचा इतिवृत्तांत कायम करण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर प्रश्नोत्तराला सुरुवात झाली. महिला सदस्यांनी प्रभागातील लाइट, खराब रस्ते, आयआरबी रस्त्यावरील बंद दिव्यांवरुन प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. परिवहन सभापती नियाज खान, नगरसेविका शोभा कवाळे, दीपा मगदूम, मुरलीधर जाधव, विलास वास्कर, राजाराम गायकवाड, महेश सावंत, गीता गुरव, महेजबीन सुभेदार, उमा बनछोडे, स्मिता माने,अश्विनी बारामते, शेखर कुसाळे, अजित ठाणेकर, किरण नकाते आदींनी चर्चेत सहभागी होत विद्युत विभागाच्या कामकाजावर टीका केली. नगरसेवक सत्यजित कदम यांनी काही कर्मचारी बायोमेट्रिक सिस्टीम मोडून काढण्याचा खटाटोप करत असून, त्याला आयुक्तांनी चाप लावावा, अशी सूचना केली. महिला-बालकल्याण विभागातर्फे सुचविलेल्या विकास कामांची अधिकाऱ्यांकडून पूर्तता होत नाही. दोन वर्षात आठ कोटी रुपयांची तरतूद होऊनही विकास कामांना गती मिळाली नसल्याचा आरोप सभापती वहिदा सौदागर, सदस्य सविता भालकर यांनी केला. नगरसेविका रुपाराणी निकम यांनी प्लास्टिकमुक्त कोल्हापूरच्या नियोजनाविषयी विचारल्यावर मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी टप्प्याटप्याने शहरात प्लास्टिकबंदी करण्याचा प्रस्ताव आहे. पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणी कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.

नेत्रदीप सरनोबतांना टोला

गौरी, गणपती सण आहे, शहरातील रस्त्यावर लाइट नाही. चोऱ्या अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे सांगत विद्युत दिवे तत्काळ सुरू करण्याची सूचना केली. शहरअभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी विद्युत मटेरिअल खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचे सां​गितल्यावर नगरसेवक आक्रमक बनले. उपमहापौर अर्जुन माने, किरण शिराळे, शारंगधर देशमुख यांनी सरनोबत यांना उद्देशून ‘किती दिवस कागदी घोडे नाचविणार’ अशी विचारणा करत तत्काळ खरेदी प्रक्रिया राबवावी अशी सूचना केली. नगरसेविका सुरेखा शहा यांनी घरफाळाप्रश्नी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला. शिक्षण समिती सभापती वनिता देठे यांनी प्रभाग क्रमांक ८० मधील पायाभूत सुविधांच्या दिरंगाईवरुन ​जाब विचारला. नगरसेवक संतोष गायकवाड यांनी स्पॉट बि‌लिंगमुळे महापालिकेला दरमहा कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असल्याचे निदर्शनास आणले. राजसिंह शेळके यांनी अधिकारी व प्लंबर यांच्या संगनमतातून पाइपलाइन खोदाईतून महापालिकेचे आर्थिक नुकसान करत असल्याचे सांगितले. काही अधिकाऱ्यांच्या कामकाजाची पद्धत बैलाच्या कामासाठी हत्तीचा वापर अशी असल्याची टीका गटनेते विजय सूर्यवंशी यांनी केली तसेच विभागप्रमुखांच्या कामांना शिस्त लावा अशी सूचना आयुक्तांना केली.

उद्यान निरीक्षकांचे वेतन रोखले

सहाय्यक उद्यान निरीक्षक निशिकांत कांबळे हे महिला सदस्यांशी उद्धटपणाने बोलतात, अशी तक्रार नगरसेविका दीपा मगदूम यांनी केली. निरीक्षक कांबळे यांच्या कामकाजाविषयी आक्षेप घेत नगरसेवकांनी त्यांना सभागृहात बोलावून घेण्याचा आग्रह धरला. सदस्यांशी अरेरावीपणाने वागणाऱ्या कांबळे यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा सभागृह चालू देणार नाही, असा इशारा ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी दिला. नगरसेवक विजय खाडे यांनी उद्यान निरीक्षक कांबळे यांच्या कामकाजाचा पाढा वाचत त्यांच्या दिशेने धाव घेतली. यावेळी नगरसेवक कदम, भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी यांनी त्यांना रोखले. आयुक्त अभिजित चौधरी यांनी यामध्ये हस्तक्षेप करत उद्यान निरीक्षक कांबळे यांचे शुक्रवारपासून वेतन रोखल्याची माहिती सभागृहाला दिली.

अनुकंपासाठी ५० हजार दर

नगरसेवक भूपाल शेटे यांनी मूळ नियुक्तीच्या ठिकाणाऐवजी अन्यत्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विभागनिहाय आकडेवारी सादर केली. उद्यान विभागातील २५० कर्मचाऱ्यांवर ७५ लाख रुपये खर्च होतात. मात्र बहुसंख्य कामगार कामावर आढळत नाहीत. एकही बाग स्वच्छ नाही. मुख्य लेखापाल संजय सरनाईक, प्रभारी सहायक आयुक्त संजय भोसले, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत या अधिकाऱ्यांचे ​त्रिकूट युनियनच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. नगरसेवक संतोष गायकवाड यांनी अनुकंपा तत्त्वारील भरतीत घोटाळा झाला आहे. अनुकंपा तत्त्वावरील भरतीत कर्मचारी युनियने कर्मचाऱ्यांच्याकडून ५० हजार रुपये घेतल्याचा आरोप केला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लैंगिक छळ प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रत्येक शाळेत लैंगिक तक्रार निवारण समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीची स्थापना न केल्यास संबंधित शाळेवर आणि त्या घटकांवर कारवाई केली जाणार आहे. राजेंद्रनगरातील कोल्हापूर पब्लिक स्कूलमधील विद्यार्थिनींचे लैंगिक शोषणाचे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाची तड लागेपर्यंत राज्य महिला आयोग लक्ष ठेवणार आहे. पोलिसांना या प्रकरणाचा अहवाल दररोज देण्याच्या सूचना केल्या आहेत. संबंधित प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविले जाणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. रहाटकर म्हणाल्या की, क्रीडा शिक्षकाकडून लैंगिक शोषण होत असल्याच्या प्रकरणाची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन घेतली आहे. या पीडित मुलींच्या कुटुंबाची भेट घेतली. प्रकरणाचा तपास गतीने सुरु करण्याच्या सूचना केल्या आहेत. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा २०१२ अंतर्गत हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविले जाणार आहे. या प्रकरणाचा निकाल एक वर्षाच्या आत लागणे अपेक्षित आहे. संबंधित प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात पोलिसांनी संशयित आरोपींवर कायद्यानुसार सर्व प्रकारचे कलमे दाखल केली आहेत. या घटनेचे सत्य लवकरच बाहेर येईल.’


मनुगडेला पोलिस कोठडी

दरम्यान, या प्रकरणाचे तीव्र पडसाद शहरात उमटले. युवक काँग्रेसने पोलिसांना निवेदन देऊन प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्याचे आवाहन केले. दरम्यान, संशयित विजय विठ्ठल मनुगडे (वय ३५, रा. फुलेवाडी) याला जिल्हा कोर्टात पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुन्यांना तातडीने पकडा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. एम.एम. कलबुर्गी यांच्या खुन्यांना पकडण्यात राज्य व केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. याचा निषेध करीत अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि गोविंद पानसरे समता समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी धरणेही धरण्यात आली. या नेत्यांच्या खुन्यांना तातडीने अटक करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दाभोलकर यांच्या खुनाला चार वर्षे तर पानसरे यांच्या खुनाच्या घटनेला अडीच वर्षे झाली आहेत. कलबुर्गी यांच्या खुनाला दीड वर्षे पूर्ण झाली. या तिन्ही नेत्यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पानसरे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी समीर गायकवाडला जामीन मिळाला आहे. सारंग अकोलकर व विनय पवार या फरारी आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. तिघांच्या खुनातील प्रमुख आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी ‘आम्ही सारे पानसरे’, ‘फुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर’, ‘राष्ट्रीय एकात्मता जिंदाबाद’, ‘भारतीय संविधानाचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात आल्या.

आंदोलनात प्रा. टी.एस. पाटील, कॉ. दिलीप पवार, अनिल चव्हाण, सतीशचंद्र कांबळे, रमेश वडणगेकर, प्रा. मेघा पानसरे, कृष्णा स्वाती, धनाजीराव जाधव, व्यंकाप्पा भोसले, नसिमा अपराध, दिलीप कांबळे, सीमा पाल, अनिल म्हमाणे, गौतम कांबळे, सुरेश शिपुरकर, एस.बी. पाटील, अरुण पाटील, गीता हासूरकर, एम.बी. पडवळे, कृष्णात चौगुले, रेखा निकम, मालती कुरणे, स्नेहल कांबळे, प्रकाश हिरेमठ, अनिल शेलार, संजय कळके, वसंतराव मुळीक, दत्ता घुदुगडे, प्रमोद शिंदे यांचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'राष्ट्रवादीच्या एका मतामुळे पटेल निवडून आले'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुजरातमधील राष्ट्रवादीच्या दोन आमदारांपैकी राष्ट्रवादीच्या एका आमदाराचे मत काँग्रेसला मिळाल्याने राज्यसभेच्या निवडणुकीत अहमद पटेल विजयी झाले असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला लगावला. गुजरातच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची दोन मते फुटली या काँग्रेसकडून होणाऱ्या अप्रत्यक्ष टीकेवर त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पवार रविवारी कोल्हापुरात खासगी दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची चांगलीच खिल्ली उडवली.

भाजपविरोधात विरोधी पक्षांचे आघाडीचे प्रयत्न सुरू असताना राष्ट्रवादी पक्षाची भूमिका काय असेल या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले, भाजपविरुद्ध काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची चर्चा गेली तीन वर्षे सुरू आहे. पण या प्रश्नांवर काँग्रेसकडून धोरसोड वृत्ती असते. गुजरातमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटली असा काँग्रेसकडून आरोप होत आहे. गुजरातमध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या एका आमदाराने भाजपला मतदान केले. पण राष्ट्रवादीच्या दुसऱ्या आमदाराने काँग्रेसला मतदान केले. ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. त्यामध्ये अहमद पटेल अवघ्या अर्ध्या मताने विजयी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या एका मताचे मोठे महत्व आहे. राष्ट्रवादीच्या एका मतामुळे अहमद पटेल विजयी झाले. पण तरीही काँग्रेसकडून शंका घेतली जात असल्याने विरोध पक्षाचे ऐक्य करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

लोकसभा निवडणुकीत भाजपला ३५० जागा मिळतील असा दावा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून केला जात आहे याकडे लक्ष वेधले असता भाजपची खिल्ली उडवत ते म्हणाले, 'भाजपने आता पंचाग घेऊन भविष्य सांगण्याचा नवीन व्यवसाय सुरु केला आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीचं भाकित ते सांगत आहेत.'

भाजप ‘ना खाऊंगा, ना खाने दुँगा’ अशा वल्गना करत सत्तेवर आला आहे. पण भ्रष्टाचाराचे आरोप होऊन मंत्र्यांनी राजीनामे न दिल्याने सामान्यांचा विश्वास उडू लागला आहे. भाजप-शिवसेनेला १५ वर्षांनी सत्ता मिळाली असल्याने यापुढे सत्ता मिळेल की नाही असा विश्वास नसल्याने मंत्री राजीनामे देत नाहीत, असे पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांकडील माहिती आधारे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

$
0
0

मटा वृत्तसेवा, सोलापूर

कर्जमाफीची ऐतिहासिक फसवी घोषणा करणाऱ्या भाजप सरकारने कर्जमाफीची ऑनलाइन आणि ऑफलाईन अर्ज भरण्याच्या सुरू केलेल्या प्रक्रियेचे नाटक ताबडतोब थांबवून बँकांकडील शेतकऱ्यांच्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी सुकाणू समितीचे राज्याचे निमंत्रक डॉ.अजित नवले यांनी रविवारी सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

डॉ.नवले म्हणाले, सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकरी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी बँकांसमोर दिवसभर रांगा लावून थांबत आहेत. दिवसभर थांबूनही अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. शेतीची सर्व कामे सोडून शेतकरी आपल्या कुटुंबासह बँकेच्या दारात पडून आहे. शेतकऱ्यांना फडणवीस सरकारने एकप्रकारे कामच लावले आहे. त्यामुळे सरकारने अर्जाची ही सर्व प्रक्रिया बंद करून थेट सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्याची मागणी डॉ. नवले यांनी केली.

राज्यात १ कोटी २५ लाख शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी ९० लाख शेतकरी बँकांशी संबंधित आहेत. ज्यामध्ये ४४ लाख शेतकरी थकबाकीदार आहेत आणि ४६ लाख शेतकरी कर्ज भरणारे,कर्जाचे पुनर्गठन केलेले आहेत. सुमारे १ लाख १५ हजार कोटींचे पीककर्ज शेतकऱ्यांनी घेतले आहे. ज्यामध्ये सावकारी, पतसंस्था, शेतीपूरक, गोल्ड लोन, मायक्रो फायनान्स यांच्या कर्जाचा समावेश नाही, असे असताना भाजप सरकारने संपूर्ण कर्जमाफी देण्याचे टाळले आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ऐतिहासिक नसून ऐतिहासिक फसवी असल्याचे सांगत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी सरकारच्या मानगुटीवर बसू असा इशाराही नवले यांनी यावेळी दिला.

मराठवाड्यात दररोज ५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून याची कसलीच चाड फडणवीस सरकारला राहिलेली नाही. समितीने शेतकऱ्यांना पुरेसे कर्ज देण्याची मागणी केली होती, १० हजाराच्या तुकड्याची कधीच मागणी केली नाही. संकटाचे मॅनेजमेंट करण्यासाठी सरकारने हा पर्याय शोधला असल्याचे सांगत सुमारे ४४ लाख शेतकरी थकीत असताना महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ ३२०० शेतकऱ्यांना १० हजाराचे वाटप करण्यात आल्याची माहिती डॉ. नवले यांनी दिली.
----------------------------------------
फडणवीस यांच्या बेताल वक्तव्याचा समाचार घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुकाणू समिती , शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांबाबत जी बेताल वक्तवे करीत आहेत ती त्यांना शोभणारी नाहीत. त्यांचा समाचार घेण्यासाठी लवकरच सुकाणू समितीची एक बैठक घेण्यात येणार आहे. आगामी आंदोलनाचे समितीचे केंद्रस्थान हे मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांचे निवासस्थान असणार असल्याचा इशारा डॉ.अजित नवले यांनी दिला. आमचा ध्वजारोहण करण्याला विरोध नव्हता तर शेतकऱ्याच्या हातून ध्वजारोहण व्हावे हा उद्देश होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र सुकाणू समिती ध्वजारोहणाला विरोध असल्याचा अपप्रचार करीत असल्याचे डॉ. नवले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत पावसाची संततधार

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगलीसह जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाची संततधार रविवारी दिवसभर सुरु राहिली. संततधारेमध्ये जोर आणि खंडही नव्हता. याला भीज पाऊस असेही म्हटले जाते. परंतु पावसात जोरच नसल्याने हा पाऊस जमिनीत पिकांच्या मुळापर्यंत पोहचण्याची शक्यता कमी असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव, आटपाडी आणि जतच्या काही भागात काही दिवसांपूर्वी दमदार सरी कोसळून गेल्याने त्या ठिकाणच्या तग धरून असलेला खरीप काही प्रमाणात वाढेल. चारा म्हणून का असे ना तो हाताला लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
राज्यात मराठवाड्यासह अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावसाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सध्यातरी पावसाळी वातावरण आणि चिटचिट पाऊस सुरू आहे. शनिवारी सकाळी काहीवेळ रिमझिमची हजेरी लावून गेलेला पाऊस रविवारी पहाटेपासून कायम आहे. जोर नसला तरी हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ४.३ मिलीमीटर पाऊस झाला असून, सर्वाधिक म्हणजे ११ मिलीमीटर पाऊस खानापूर-विटा भागात नोंदला गेला आहे. अधिक पावसाचा परिसर असलेल्या शिराळा तालुक्यातही अवघा २ मिलीमीटर पाऊस झाला आहे. चांदोली
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र चोवीस तासात १६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सांगली जिल्ह्यात आटपाडी ७, जत ४, सांगली ३, मिरज १ मिलीमीटरची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात पावसाची संततधार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
दीर्घ विश्रांतीनंतर रविवारी साताऱ्यात पावसाने पुनरागमन केले. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. यामुळे बळीराजासह नागरिकही चिंतेत होते. जुलै महिन्यात जोरदार सरी बरसल्यानंतर बऱ्याच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, शनिवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बऱ्याच काळानंतर झालेल्या या पावसामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तरी देखील इथला बळीराजा जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.
रविवारी वाई तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये रात्रभर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तर महाबळेश्वर पाठोपाठ जावळीत व विविध भागात रात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावली. कुडाळ, मेढा, मोहाट, केरघळ, करहर, पाचगणी पायथा, जावळी कास परिसर, जावळी पश्चिम विभागात सर्वच तालुक्यात पाऊस दमदार कोसळला. जावळी तालुक्यातील तापोळा परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे.
कोरेगाव तालुक्यात रविवारी मध्यरात्रीपासून तुरळक ते हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. कोरेगावात मध्यराञीपासून सर्वत्र तुरळक ते हलक्या स्वरूपात पावसाने केलेली सुरूवात आतापर्यंत सुरू आहे. वाई तालुक्याच्या पूर्व भागातील गावामध्ये रात्रभर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खंडाळा तालुक्यात रविवारी रात्रीपासून रिमझिम पाऊसाने हजेरी लावली असल्याने शेतकरी वर्गात काही प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बाजरी, ऊस, कांदा आदी पिके पाण्याअभावी करपून चालली होती. त्यामुळे या पिकासाठी पाऊस फायदा होणार आहे. रविवारी सकाळपर्यंत चोवीस तासांत लोणंद १५.८ मिमी खंडाळा १३ मिमी पाऊसाची नोंद झाली होती. फलटणमध्ये शनिवार रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसाचा आनंद लुटण्यासाठी सातारा नजीकच्या कास, ठोसेघर, बामणोली येथे पर्यटकांनी प्रचंड पावसातही गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोलापुरात दमदार हजेरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
मागील दोन महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवार सायंकाळपासून दमदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूरसह अन्य तालुक्यातही पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र दडी मारलेल्या पावसाचे अचानक आगमन झाल्याने ऊस आणि केळी पिकांचे नुकसान झाले.
शनिवारी दिवसभर ढग दाटून आले, परंतु नेहमीप्रमाणे पाऊस आलाच नाही मात्र, सायंकाळी संततधार पावसाला सुरूवात झाली. रात्रभर सुरू असलेला पाऊस सकाळपर्यंत सुरूच होता. या पावसाने जमिनीत चांगली ओल झाली असून, उभ्या पिकास चांगला लाभ होणार असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. सोलापूर शहरासह पंढरपूर, माळशिरस, माढा, मोहोळ, बार्शीसह सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा काही अंशी समाधानी झाला असल्याचे सांगण्यात आले. पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील बळीराजालाही शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या भीज पावसाने दिलासा दिला. खरीपाच्या पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे. तालुक्यातील सलगर, निंबोनी, बावची, जित्ती, पाठखळ, भाळवनी, हाजापुर, हिवरगाव, तळसंगी, नंदेश्वर, भोसे, हुन्नूर, महमदाबादसह परिसरात संततधार सुरू आहे. पश्चिम भागात आंधळगाव, गणेशवाडी, अकोला, शेलेवाडी, मारापुर, घरनिकी, गुंजेगाव लेंडवे, चिंचाळे या परिसरात पाऊस झाला आहे.
दरम्यान शहर शिवारातील सूर्यफूल आणि तुरीची अगोदर पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना मात्र फटका बसला आहे. योग्य वेळी पावसाने दडी मारल्याने पिके जळून गेली आहेत. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, त्यानंतर दोन महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसामुळे माळशिरस तालुक्यातील निमगाव येथील केळीच्या पीकासह ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजू शेट्टीच्या टीकेला उत्तर देणार नाही ः खोत

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

मला शेतकऱ्यांच्या हिताचे काम करायचे आहे. भविष्यात माझी लढाई गरिबीच्या विरोधातली असेल, सामान्य माणसाला बरोबर घेऊन काम करायचे असल्याने माझ्याकडे सध्या वेळ नाही. यापुढे राजू शेट्टीच्या टीका टिपण्णीला मी उत्तर देणार नाही. टीका करायला त्यांच्याकडे वेळ आहे. मात्र, माझ्याकडे वेळ नाही अशी भूमिका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मांडली.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ‘मी रचनात्मक कामात व्यस्त आहे. भाजपने विश्वासघात केला असे, राजू शेट्टी म्हणतात. माझा विधान परिषदेचा अर्ज भरताना शेट्टी स्वतः हजर होते. माझी विजयी मिरवणूक त्यांनी काढली. त्या वेळी भाजपा आपला विश्वासघात करीत आहे. हे समजले नाही का? आता त्यांचा सर्व उपदव्याप दुकानदारी चालण्यासाठी सुरू आहे.
चौकशी समिती लायक नव्हती
राजू शेट्टीना सरकारमधून बाहेर पडायचे नव्हते. तर सदाभाऊला बाहेर काढायचे होते. माझी चौकशी करण्यासाठी नेमलेली चौकशी समिती त्या पात्रतेची होती का? त्यांच्यापेक्षा संघटनेसाठी माझे योगदान मोठे आहे. त्या सदस्यांची माझी चौकशी करण्याची पात्रता नसतानाही मी चौकशीला सामोरे गेलो कारण, मला संघटनेतून बाहेर पडायचे नव्हते. प्रत्येक वेळेला ते म्हणतात, माझे हात स्वच्छ आहेत. देह स्वच्छ आहे. मग, आम्ही त्यांच्याबरोबर काम करताना आमचा देह चुलीत जळण्यासाठी होता का? शेट्टींना दुसऱ्यांच्या योगदानाचा विसर पडतो. सध्या माझे नाव घेऊन टीआरपी वाढवायचा तोपर्यंत ऊस हंगाम येतोय पुन्हा लोकांच्या भावनेला हात घालायचा आणि मीच दर मिळवून दिला म्हणून सहा महिने सत्कार घेत फिरायचे आणि निवडणुकीला सामोरे जायचे ही त्यांची रणनिती आहे. कर्जमाफीचा निर्णय पुणतांब्याच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे यश आहे. ज्यावेळी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले त्या वेळी राजू शेट्टींनी संपावर जाने शेतकऱ्यांना परवडणारे नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. पण, शेतकऱ्यांचा संप यशस्वी होतोय म्हटल्यावर ते आंदोलनात सहभागी झाले. सरकार बरोबरच्या चर्चेत कर्जमाफी स्वीकारली. त्यानंतर लगेचच सदाभाऊनी शेतकऱ्यांचा संप फोडला म्हणून माझ्यावर आरोप करीत गुलाल उधळत मुंबईपासून शिरोळपर्यंत आले. मिरवणुका काढल्या. यात ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा धनलाभ मिळाला नाही ते शेतकरी आपल्याबरोबर राहणार नाहीत, असे लक्षात आल्यावर परत दुकानदारी चालण्यासाठी त्यांनी संपूर्ण कर्जमाफीला नारा दिला, अशीही टीका खोत यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’ कॉन्क्लेवमध्ये आज होणार विकासाची चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कोल्हापूर आवृत्तीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (ता. २१) ‘मटा कॉन्क्लेव’चे आयोजन केले आहे. ‘मेक इन कोल्हापूर’ संकल्पनेंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. हॉटेल सयाजी येथे सायंकाळी साडेचार वाजता राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मटा कॉन्क्लेव’ होणार आहे. यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर सर्वंकष चर्चा होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या सत्रात ‘आयटी स्टार्टअप आणि गुंतवणूक’यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

अर्थमंत्री मुनगंटीवार आणि पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते कॉन्क्लेवचे उद्घाटन होणार आहे. यावेळी शहर आणि जिल्ह्याच्या विकासात योगदान देणारे उद्योजक, व्यावसायिक, शिक्षण, आयटी, वैद्यकीय क्षेत्रातील निवडक प्रतिनिधी, विद्यमान खासदार, आमदार, महापौर तसेच राज्य सरकारचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी होणार आहेत.

उद्यमशीलतेसाठी अत्यंत पूरक वातावरण असलेल्या कोल्हापूरची भौगोलिक रचना महत्त्वाची आहे. येथे शेतीबरोबरच उद्योग, व्यवसाय, शिक्षण आणि सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळाली. भरपूर महसूल देणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाची कोंडी कशी फोडता येईल, प्रश्न कसे गतीने सोडविता येतील, याबाबत चर्चा घडवून आणण्यात येणार आहे. निधीअभावी जिल्ह्यात विविध क्षेत्रांतील रखडलेले प्रश्न मार्गी लागावेत आणि विकासाचा अजेंडा निश्चित व्हावा, याबाबत ‘मटा कॉन्क्लेव’मध्ये मान्यवरांची चर्चा होणार आहे.

कोल्हापूरचे उद्योग आणि आयटी हा कॉन्क्लेवचा मुख्य अजेंडा आहे. उद्योगवाढ आणि त्यासोबत रोजगारनिर्मिती हा यामागील हेतू आहे. यामुळे दुसऱ्या सत्रात ‘आयटी स्टार्टअप आणि गुंतवणूक’ या महत्त्वाच्या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. यात मनोरमा इन्फो सोल्युशन्सच्या सीईओ अश्विनी दानिगोंड, वेलसर्व्ह आयटीचे सीईओ अभिजित खोत तसेच आयसायबरसेकचे सीईओ पंकज घोडे मार्गदर्शन करणार आहेत.

उद्योगांचे काही क्लस्टर प्रकल्प प्रलंबित आहेत. नवीन औद्योगिक क्षेत्रे, उद्योग, इचलकरंजीचा कापड उद्योग, गूळ क्लस्टर, कृषिपूरक उद्योग यांसह पर्यटनवाढीसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोल्हापुरी चप्पल, सराफ पेठ, भाजीपाला उत्पादन या पारंपरिक उद्योगांनाही झळाळी मिळाल्यास रोजगारनिर्मितीसह आर्थिक क्षमताही वाढू शकते. परिणामी जिल्ह्याच्या अर्थकारणावर याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

कोल्हापूरच्या औद्योगिक परंपरेचा विचार करता मुंबई, पुणे, बेंगळुरू कॉरिडॉरमध्ये जिल्ह्याचा समावेश असायलाच हवा. कोल्हापूर-कोकण रेल्वेला जोडण्याचा विषय याच पातळीवर अत्यंत जिव्हाळ्याचा म्हणून प्राधान्याने विचारात घेतला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतेच रेल्वे मार्गाच्या सर्व्हेचे उद्घाटनही केले.

रेल्वे मार्गाद्वारे कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. गेली काही वर्षे ‘मटा’ने हा प्रश्न सातत्याने मांडून सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले होते. अखेर कोल्हापूर-कोकण मार्ग प्रत्यक्षात साकारण्याचे निश्चित झाले आहे. कोल्हापूरच्या विकासाला बळकटी देणाऱ्या मुद्द्यांवर ‘मटा कॉन्क्लेव’मध्ये सविस्तर चर्चा होणार आहे.

मटा कॉन्क्लेवसाठी मनोरमा इन्फो सोल्युशन प्रा. लि. पॉवर्ड बाय स्पॉन्सर आहेत. जाधव इंडस्ट्रीज स्पॉन्सर-पार्टनर आहेत, तर हॉटेल सयाजी हे हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत. चाटे एज्युकेशन ग्रुप एज्युकेशन पार्टनर आहेत, तर नंदादीप आय हॉस्पिटल आणि वार्डविझ इंडिया सोल्युशन प्रा. लि. हे स्पॉन्सर-पार्टनर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुमखुमी असेल तर माझ्याशी लढा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले
‘माझ्यावर बेछूटपणे आरोप करणाऱ्यांना दुसऱ्याचे चांगले बघवत नाही. त्यामुळेच पोटशूळ उठला आहे. त्यांनी काढलेली आत्मक्लेश यात्रा नसून सदाभाऊ क्लेशयात्रा होती. आतापर्यंत फक्त फसवण्याचा उद्योग करणाऱ्यांनी रघुनाथ पाटील, उल्हास पाटील यांच्यानंतर माझा नंबर लावला आहे. माझ्या या मित्रांना एवढी खुमखुमी असेल तर हातकणंगले व माढा सोडून कोठेही लढायला यावे, मी त्यासाठी तयार आहे,’ असे जाहीर आव्हान खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.
रुकडी (ता.हातकणंगले) येथे लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीमधील भव्य पुतळ्याचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा तसेच पाणीपुरवठाचे थकीत विज बील भरण्यासाठी ग्रामपंचायतीस आर्थिक सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांच्या जाहीर सत्कार सोहळ्यात खोत बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार निवेदिता माने होत्या. खासदार संभाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे खोत म्हणाले, ‘स्वामिनाथन आयोग लागू करण्याची आमचीही इच्छा आहे. मात्र, तो विषय केंद्राच्या अखत्यारित असल्याने खासदारांनी आंदोलनापेक्षा तेथे पाठपुरावा करावा. असे न करता ‘खोटे बोल पण रेटून बोल’ या उक्तीप्रमाणे जाणीवपूर्वक माझ्यावर व सरकारवर आरोप करत आहेत. सहा महिन्यात माझी अँलर्जी झालेल्यांनी माझ्यावर बेझूटपणे सोशल मीडियावर आरोप सुरूच ठेवले आहेत. मी आज मंत्री आहे, उद्या नसेन पण आयुष्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढत राहीन. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली ऐतिहासिक ३४ हजार कोटींची कर्जमाफी ही पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी दिलेल्या योगदानातून झालेली आहे.’
खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘माझी खासदारकी ही महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी असून यासाठी सुमारे सहाशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आगामी काळात केंद्राकडून हजारो कोटींचा निधी मिळणार आहे.
यावेळी कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील, मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष वसंतराव मुळीक माजी आमदार राजीव आवळे, जि. प. माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने, शहाजी कांबळे, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते.
प्रास्ताविक मिलिंद ढवळे-पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन ताज मुल्लाणी यांनी केले. शेवटी सरपंच मिनाश्री अपराज यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमच्या एका मतामुळे पटेल निवडून आले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुजरातमधील राष्ट्रवादीच्या दोन आमदारांपैकी एका राष्ट्रवादीच्या आमदाराचे मत मिळाल्यानेच राज्यसभेच्या निवडणुकीत अहमद पटेल विजयी झाले, असा दावा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केला. ‌काँग्रेसमध्ये सध्या धरसोड वृत्ती असल्याने भाजपविरोधक एकत्र येत नाहीत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

गुजरातच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची दोन मते फुटली या काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेवर त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. भाजपच विरोधात विरोधी पक्षांची आघाडीचे प्रयत्न सुरू असताना राष्ट्रवादी पक्षाची भूमिका काय असेल या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले, ‘भाजप विरुद्ध काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची चर्चा गेली तीन वर्षे सुरू आहे. या प्रश्नांवर काँग्रेसकडून धरसोड वृत्ती सुरू आहे. गुजरातमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटली असा काँग्रेसकडून आरोप होत आहे. गुजरातमध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या एका आमदाराने भाजपला मतदान केले. पण राष्ट्रवादीच्या दुसऱ्या आमदाराने काँग्रेसला मतदान केले. ही निवडणूक अतिशय अटितटीची झाली. त्यामध्ये अहमद पटेल अवघ्या अर्धा मताने विजयी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या एका मताचे मोठे महत्त्व आहे. राष्ट्रवादीच्या एका मतामुळे अहमद पटेल विजयी झाले तरीही काँग्रेसकडून शंका घेतली जात असल्याने विरोधी पक्षाचे ऐक्य करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येत आहे.’

शहा भविष्य सांगतात का?

लोकसभा निवडणुकीत भाजपला ३५० जागा मिळतील, असा दावा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा करत आहेत, याकडे लक्ष वेधले असता. भाजपचे अनेकजण व्यवसायात आहेत. आता पंचाग घेऊन भविष्य सांगण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर मला माहीत नाही. त्यामुळेच कदाचित पुढील निवडणुकीचे भाकित ते सांगत आहेत, अशी खिल्लीही उडवली.

कर्जमाफीचे निकष मलाही माहीत नाहीत

राज्य सरकारने ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी घोषणा केली असली तरी कर्जमाफी झालेला एकतरी शेतकरी दाखवावा. कर्जमाफीचे निकष काय आहेत हे मला माहीत नाहीत. १९७८ मध्ये राज्यात पुलोद आघाडीचे सरकार असताना मी आणि एन. डी. पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. त्यानंतर २००८ मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. शेतीच्या व्यवसायात सातत्य नसते. शेतमालाच्या भावाचे चक्र स्थिर नसते. त्यामुळे ज्यावेळी शेतकरी अडचणीत येईल त्यावेळी शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी लागणार आहे, असे पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images