Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नऊशे गावांचा डॉल्बीला फाटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘पोलिसांनी केलेल्या डॉल्बीमुक्तीच्या आवाहनाला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ९०० हून अधिक गावांनी डॉल्बीला फाटा दिला आहे. बहुतांश मंडळे विधायक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करणार आहेत, तर यंदा ३०४ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवला जाणार आहे. सुरक्षेबाबत आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन मंडळांना केले जात असून, पोलिस आणि मंडळांच्या समन्वयाने गणेशोत्सवाचा उत्साह वाढवला जाणार आहे,’ अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषण रोखण्याचे काम पोलिसांकडून केले जाते. गणेशोत्सवात डॉल्बीचा दणदणाट करून काही गणेश मंडळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करतात. गेल्या वर्षी डॉल्बीमुक्तीच्या आवाहनानंतरही १६ मंडळांनी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केले. या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह डॉल्बीमालक आणि वाहनचालकांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. यंदाही मंडळांवर गुन्हे दाखल करण्याची वेळ येऊ नये यासाठी पोलिसांकडून मंडळांचे प्रबोधन केले जात आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याचे अधिकारी गावात आणि परिसरात जाऊन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत.’

ग्रामीण भागातून ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ३१४ ग्रामपंचायतींनी हा उपक्रम राबविणार असल्याचे पत्र पोलिस प्रशासनाला दिले आहे. जिल्ह्यातील ९०० गावांनी डॉल्बीला फाटा देण्याचा निर्णय घेतला असून, विधायक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यंदा ७१३० मंडळांची नोंदणी झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मंडळांनी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. स्वयंसेवकांनी पोलिसांना मदत करावी. गरजू शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्यावा, अशा सूचना मंडळांना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील मंडळे व एक गाव एक गणपती योजना राबवणारी गावे

विभाग मंडळे एक गाव एक गणपती

कोल्हापूर शहर ९२२ ०१

करवीर १७२८ १५

इचलकरंजी १४८७ ०१

जयसिंगपूर १०२१ ०३

शाहूवाडी १३६३ ९७

गडहिंग्लज ६०९ १८७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीसीटीव्ही फुटेजमुळे ६८ गुन्ह्यांची उकल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सेफसिटी प्रोजेक्ट अंतर्गत शहरातील ६५ चौकांमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांसाठी उपयुक्त ठरत आहेत. या तिसऱ्या डोळ्यामुळे गेल्या दोन वर्षात ६८ गुन्हे उघडकीस आले, तर आंदोलने, मोर्चे, निदर्शने यासह वाहतूक कोंडीवर नजर ठेवण्यासही पोलिसांना मदत झाली. वाहतुकीचे नियम मोडणारे २३६३६ बेशिस्त वाहनधारक सीसीटीव्हीच्या ट्रॅपमध्ये अडकले असून, या वाहनधारकांना नोटिसा पाठवल्या आहेत. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासही कॅमेरे उपयुक्त ठरत आहेत.

दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेने सेफसिटी प्रोजेक्ट अंतर्गत शहरातील महत्त्वाच्या ६५ चौकांमध्ये १६५ कॅमेरे लावले आहेत. यातील ११६ कॅमेरे स्थिर आहेत. ३२ कमेरे १८० अंशात फिरणारे म्हणजेच पॅनोरॉमिक आहेत, तर १७ कॅमेरे ३६० अंशात फिरणारे (पीटीझेड) आहेत. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरावर सतत २४ तास नजर राहत आहे. पोलिसांसाठी कॅमेऱ्यांची नजर म्हणजे तिसरा डोळा ठरत आहे. मोर्चे, आंदोलने, निदर्शने यासह वाहतुकीच्या कोंडीवरही लक्ष ठेवणे सोयीचे झाले आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रुममध्ये सर्व कॅमेऱ्यांचे थेट चित्रीकरण पाहता येते. एखाद्या चौकात अपघात झाल्यास वायरलेस यंत्रणेवरून काही क्षणात संदेशांची देवाण-घेवाण केली जाते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेला कंट्रोल रुममधून सूचना दिल्या जातात. चेन स्नॅचिंग, चोरी, मारामारीच्या घटनांमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करणारे संशयित सीसीटीव्हीत कैद होत आहेत. त्यामुळे तपासात पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजची मदत होत आहे.

कंट्रोल रुममध्ये २ अधिकारी आणि १३ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तीन शिफ्टमध्ये शहरातील ६५ चौकांवर नजर ठेवली जाते. एक महिन्याचे चित्रीकरण साठवून ठेवण्याची क्षमता या कंट्रोलरुममध्ये आहे. गेल्या दोन वर्षात शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, करवीर, आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ३२६ गुन्ह्यांच्या तपासासाठी कंट्रोल रुमकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. यातील ६८ गुन्हे उघडकीस आणण्यास मदत झाली आहे. चेन स्नॅचिंग, घरफोड्या आणि अपघातांमध्ये सीसीटीव्ही फुटेजचा फायदा पोलिसांना होत आहे. शहरातील बँका, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, खासगी संस्थांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेतली जात आहे. यातून गुन्हे उघडकीस येण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

चौकट

राजारामपुरीत १४ गल्ल्यांमध्ये सीसीटीव्ही

गणेशोत्सव काळात राजारामपुरीत मोठी गर्दी असते. उत्सव काळात गर्दीवर नजर ठेवण्यासाठी सर्व मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक केले आहे. पोलिसांच्या या आवाहनाला राजारामपुरीतील सर्व गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सर्व १४ गल्ल्यांमधील गणेश मंडळांनी सीसीटीव्ही यंत्रणा लावण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे संपूर्ण राजारामपुरी सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे. इतर मंडळांनीही असाच आदर्श घेऊन सीसीटीव्ही यंत्रणा पोलिस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रुमला जोडण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केले आहे.

चौकट

२३६३६ वाहनधारकांना नोटिसा

बेशिस्त वाहनधारक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत आहेत. रस्त्यात मध्येच वाहन उभे करून वाहतुकीला अडथळा आणणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे, वनवेतून बेदरकारपणे वाहन चालवणे, नो पार्किंगमध्ये वाहने पार्क करणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांच्या थेट घरी नोटिसा पोहोचत आहेत. कंट्रोल रुममधून वाहनांचे नंबर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे पाठवले जातात. यानंतर नोटिसा पाठवण्याची कारवाई होते. नियम मोडल्याचे फोटो आणि चित्रीकरणही कंट्रोल रुममध्ये ठेवले जाते. रोज किमान ३५ ते ४० बेशिस्त वाहनधारक सीसीटीव्हीच्या ट्रॅपमध्ये अडकत आहेत.

कोट – शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा मोठा फायदा पोलिसांना होत आहे. घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगारांचा शोध लावणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोयीचे होत आहे. गुन्ह्यांची उकल होण्यास सीसीटीव्हीची मदत होत असल्याने जितके कॅमेरे वाढतील तितकी सुरक्षा भक्कम होईल.

संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी डॉ. शिर्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची नियमित प्रकुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांनी डॉ. शिर्के यांच्या नियुक्तीचा आदेश शुक्रवारी जारी केला आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या कार्यकालाइतकाच डॉ. शिर्के यांचा कार्यकाळ असेल, असे या नियुक्तीपत्रात नमूद केले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे कायदा, २०१६च्या कलम १३ (६) अन्वये कुलपतींनी डॉ. शिर्के यांची निवड केल्याचे आदेशात म्हटले आहे.

डॉ. शिर्के मूळचे वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील असून त्यांचे सुरुवातीचे शिक्षण वडगाव हायस्कूलमध्ये झाले. वारणा महाविद्यालय तसेच विवेकानंद महाविद्यालयातून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या सांख्यिकी अधिविभागातून १९८७ साली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्याचवर्षी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळवून ते संशोधक म्हणून विभागात रुजू झाले. १९९०मध्ये सांख्यिकी विभागात ते अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. मार्च २००५मध्ये ते प्राध्यापक झाले. सांख्यिकी विभागाच्या प्रमुख पदाबरोबरच त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिवपदही भूषविले आहे. त्यांना अध्यापनाचा २७ वर्षांचा, संशोधनाचा ३० वर्षांचा तर अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषदेसह विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवरील प्रशासकीय कामकाजाचा १५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. विद्यापीठाने त्यांना सन २०११मध्ये सर्वोत्कृष्ट अध्यापक म्हणूनही सन्मानित केले आहे.

डॉ. शिर्के यांचे ५५ हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. अमेरिका, स्वित्झर्लंड, पोर्तुगाल, जर्मनी, थायलंड, सिंगापूर, मलेशिया आदी देशांसह भारतातील ५० परिषदांना ते उपस्थित राहिले आहेत. सहा परिषदांच्या आयोजनात त्यांनी पुढाकार घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ स्थापन करा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळाची लवकर अंमलबजावणी करून रिक्षाची विमा रक्कम कमी करावी, अशी मागणी ताराराणी रिक्षा व्यावसायिक संघटनेच्यावतीने मोर्चाने केली. जिल्हाधिका ऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. संघटनेच्या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दाभोलकर कॉर्नरपासून मोर्चाची सुरुवात झाली. जिल्ह्याधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चा अडवण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने ऑक्टोबर २०१३ मध्ये रिक्षा व टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळासाठी अभ्यास समिती नेमली होती. त्या समितीने जानेवारी २०१४ ला अहवाल सादर केला आहे, परंतु अद्याप त्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. ती तातडीने करून रिक्षाचालकांना पेन्शन, विमा, आरोग्यविषयक मदत तसेच मुलांच्या शिक्षणासाठी मदत करावी. रिक्षा चालक सहा हजार ते नऊ हजारपर्यंत विमा भरतो, रिक्षांचे अपघाताचे प्रमाण खूप कमी असून विमा कंपन्यांचा फायदा जास्त आहे. तरी विमा रक्कम दोन ते चार हजार करावी अन्यथा एसटी महामंडळाच्या धर्तीवर विम्यासाठी मंडळ स्थापन करून त्यात विमा जमा करून घ्यावा.

मोर्चाचे नेतृत्व ताराराणी रिक्षा संघटनेचे शंकर पंडित, उपाध्यक्ष अरुण शिंदे, बाळू कांबळे, जानू धुरणे, पी. बी. कळंत्रे आदींनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घनवट, चंदनशिवेच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणा चोरीप्रकरणी सीआयडीकडे शरण आलेले विश्वनाथ घनवट आणि सूरज चंदनशिवे यांच्या पोलिस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ झाली. पन्हाळा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. ए. अवघडे यांनी हा निर्णय दिला. याच गुन्ह्यातील कुलदीप कांबळे याचा जामीन नाकारल्याने शुक्रवारी तो स्वतःहून पन्हाळा कोर्टात हजर असता त्याला कोर्टाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, सीआयडीच्या पथकाने शुक्रवारी रवींद्र पाटील याच्या सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील घरात छापा टाकला.

घनवट व चंदनशिवे यांना पन्हाळा कोर्टाने दिलेली सात दिवसांची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी (ता. ११) संपल्याने सीआयडीचे उपअधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी दोन्ही संशयितांना पन्हाळा कोर्टात हजर केले. ‘आरोपी पोलिस खात्यातील असल्याने तपासात कायद्यातील पळवाटा काढून तपासाला हुलकावणी देत आहेत. त्यांच्या घरांची झडती घेतली असता, आक्षेपार्ह काही आढळून आले नाही. त्यांचे आधार व पॅनकार्ड तसेच बँक पासबुके, मोबाइल जप्त केले आहेत. बँकेत झालेल्या व्यवहारांची तपासणी सुरू आहे. मोबाइल कॉल्सच्या डिटेल्स तपासासाठी पाठविले आहेत. चोरीतील रोकड हस्तगत करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडीची गरज आहे. आणखी सात दिवस कोठडी वाढवून मिळावी,’ अशी विनंती सरकारी वकील अमोल कांबळे यांनी केली. संशयितांच्या वतीने अॅड. राहुल धायगुडे यांनी बाजू मांडली. ‘घनवट व चंदनशिवे आजारी आहेत. गुन्ह्यासंबधी त्यांची चौकशी संपली आहे. इतर सहकारी तसेच मैनुद्दीन मुल्ला हे खरे आरोपी आहेत. त्यांना अटक करून तपास करावा,’ अशी मागणी केली. न्यायदंडाधिकारी अवघडे यांनी दोन्ही बाजूचे युक्त‌िवाद ऐकल्यानंतर घनवट आणि चंदनशिवे या दोघांच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ केली. हायकोर्टाने जामीन नाकारल्याने कुलदीप कांबळे हा शुक्रवारी पन्हाळा कोर्टात हजर झाला. कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

रवींद्र पाटीलच्या घरावर छापा

वारणा लुटीतील संशयित पोलिस हावलदार रवींद्र बाबूराव पाटील (वय ३०, रा. सिद्धनेर्ली, ता. कागल) याच्या घरावर छापा टाकला. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. सीआयडीच्या पथकाने रवींद्र पाटील याला सोबत घेऊन इन कॅमेरा छाप्याची कारवाई केली. छाप्यादरम्यान पाटील याची बँकांमधील पासबुके आणि इतर माहिती मिळवली. संशयितांच्या नातेवाईकांकडेही सीआयडीने कसून चौकशी केली. दरम्यान, सीआयडीच्या पथकांनी चोरटा मैनुद्दीन मुल्ला याच्याकडून बुलेट भेट घेणारा सांगली येथील पोलिस इरफान नदाफ याच्या अटकेसाठी सांगलीसह अन्य ठिकाणी छापे टाकल्याची चर्चा आहे. अधिकाऱ्यांनी मात्र याला रात्री उशिरापर्यंत दुजोरा दिला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनावणीचा सोमवारी फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी आणि पुजारी हटाव संघर्ष समितीच्या वादावर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेल्या सुनावणीचा सोमवारी (ता. १४) फैसला होणार आहे. पुजारी गजानन मुनीश्वर यांच्या दाव्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या वकिलांचा युक्त‌िवाद शुक्रवारी (ता. ११) वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांच्यासमोर पूर्ण झाला. सोमवारी निर्णय होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडील सुनावणी सुरू राहणार की याला मनाई मिळणार ते स्पष्ट होणार आहे.

अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांनी देवीच्या मूर्तीला घागरा-चोलीचा पोषाख परिधान केल्यानंतर पुजारी हटाओ संघर्ष समिती पुजाऱ्यांच्या विरोधात आक्रमक बनली. मंदिरातील पुजाऱ्यांना हटवून राज्य सरकारने पगारी पुजाऱ्यांची नेमणूक करावी या मागणीचा आग्रह धरला आहे. यावरून पुजारी आणि संघर्ष समितीत वाद निर्माण झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही बाजूची मते आणि पुरावे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची सूचना केली होती. यानुसार जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सुनावणी सुरू होताच पुजारी गजानन मुनीश्वर यांनी सुनावणीला स्थगिती मिळावी यासाठी दिवाणी न्यायालयात धाव घेतली. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने विशेष सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी युक्त‌िवाद केला. ते म्हणाले, ‘जिल्हाधिकाऱ्यांकडील सुनावणी ही मंदिरातील पुजाऱ्यांच्या हक्कांबाबत कोणताही निर्णय घेण्यासाठी नाही. या सुनावणीत दोन्हीकडून सादर होणारे पुरावे राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवले जाणार आहेत. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी सरकारचे प्रतिनिधी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः सुनावणीची सूचना केली होती. त्यामुळे ही सुनावणी सुरू राहावी.’

पुजारी मुनीश्वर यांचे वकील नरेंद्र गांधी यांनी बाजू मांडताना मंदिरातील देवीची पूजा आणि विधीचे अधिकार पुजाऱ्यांकडे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘यापूर्वीच न्यायनिवाड्याद्वारे पुजाऱ्यांना देवीच्या पुजेचे अधिकार मिळाले आहेत. देवीची पूजा-आर्चा हा पुजाऱ्यांचा वैयक्तिक अधिकाराचा मुद्दा आहे, त्यामुळे यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होऊ शकत नाही. जिल्हाधिकाऱ्यांचा आहवाल राज्य सरकारलाच सादर होणार आहे, त्यामुळे या प्रक्रियेला स्थगिती मिळावी.’ दोन्ही बाजुचे युक्त‌िवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांनी यावर सोमवारी निर्णय होईल असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी सल्लागार वैभव इनामदार, देवस्थान समितीचे वकील ए. पी. पवार, पुजारी गजानन मुनीश्वर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवाजी द ग्रेट’ जाणार जगभर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजाराम कॉलेजचे माजी प्राचार्य आणि दिवंगत इतिहास संशोधक डॉ. बाळकृष्ण लिखित ‘शिवाजी द ग्रेट’ या पाच खंडातीत इंग्रजी भाषेतील १८०० पानांचे शिवचरित्र परदेशी आणि देशातील सर्व विद्यापीठ, ग्रंथालयांना पाठविले जाणार आहे. रविवारी (ता. १३) दुपारी तीन वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या खंडांचे वितरण होणार असल्याची माहिती इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आणि भालचंद्र चिकोडे स्मृती ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सावंत म्हणाले, ‘ डॉ. बाळकृष्ण आजच्या पाकिस्तानातील मूलतान येथील आर्य समाजिस्ट होते. ते राजाराम कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोल्हापुरात कार्यरत होते. १९३२ ते १९४० च्या दरम्यान शककर्ते ‌छत्रपती ‌शिवाजी महाराजांचे चरित्र ‘शिवाजी द ग्रेट’ या नावाने चार खंडात प्रसिद्ध केले. सआधार लिहिलेले हे पहिले चरित्र होय. काळाच्या ओघात हे शिवचरित्र विस्मरणात गेले होते. कालांतराने चारही खंड एकत्रित स्वरुपात मिळणे अशक्य झाले. मात्र, या ग्रंथाचे संपादन करून पाच खंडात प्रकाशित केले आहे. हे चरित्र देशविदेशातील मराठ्यांच्या अभ्यासकांना उपयुक्त आहे. संदर्भ साधनांच्या आणि इंग्रजी भाषेतील प्रभावी शिवचरित्राअभावी देशविदेशातील विद्वानांनी लिहिलेल्या इतिहासामध्ये शिवचरित्राची योग्य मांडणी झालेली नाही, यासाठी हे शिवचरित्र जगभर पोहोचविले जाणार आहे. सह्याद्री इतिहास संशोधन केंद्र आणि भालचंद्र चिकोडे ग्रंथालयामार्फत भारतातील सर्व विद्यापीठे आणि विदेशातील काही निवडक विद्यापीठांना हे खंड पाठविले जाणार आहेत.

राहुल चिकोडे म्हणाले, बाबा जरगनगर कमानीजवळील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत खंडांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. उद्योजक चंद्रकांत जाधव, संजय शिंदे, पोस्ट विभागाचे प्रवर अधीक्षक रमेश पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. परदेशी अभ्यासकांचा शिवाजी महाराजांवर अभ्यास सुरू आहे. या शिवचरित्रामुळे वास्तववादी इतिहास जगासमोर मांडण्यात मदत होणार आहे. कृष्णाजी केळुसकरांनी लिहलेल्या मराठीतील शिवचरित्राचे इंग्रजी भाषांतरही देशविदेशातील ग्रंथालयांना पाठविले होते. त्याच धर्तीवर पंचखंडात्मक शिवचरित्र पाठविले जाणार आहे. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, हर्षल सुर्वे, मंजित माने आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियतीचा क्रूर खेळ; नवरदेवाचा मांडवातच मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

नियती खूप क्रूर असते, ती कधी कसा खेळ खेळेल कुणीच सांगू शकत नाही, याचीच प्रचिती आज सांगलीमध्ये आली. लगीनघटिका समीप आलेली असताना, नवरदेव बोहल्यावर चढण्यासाठी तयार होत असताना, मुहूर्ताच्या वेळेआधी काळाने त्याला गाठलं आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊन गेलं.

रवी मदन पिसे (२७) या तरुणाचं आज लग्न होतं. कुटुंबीयांच्या आनंदाला उधाण आलं होतं. रवी आणि त्याची होणारी बायकोही नव्या नात्याची सुरुवात उत्सुक होते. पण नियतीने सगळाच खेळ बिघडवला.

लग्नाला उभं राहण्यासाठी रवी लगबगीने तयार होत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं. त्याला असह्य वेदना होऊ लागल्या आणि सगळ्यांच्याच पोटात धस्स झालं. कुटुंबीय आणि मित्रांनी त्याला तातडीने मिरजेतील मिशन रुग्णालयात नेलं, पण तिथे पोहोचण्याआधीच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचं निधन झालं होतं.

या दुर्दैवी घटनेमुळे पिसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अख्खं गावच शोकसागरात बुडालं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ लग्नापूर्वीच वर मुलाचा हृदयविकाराने मृत्यूमिरजेतील हृदयद्रावक घटना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
घरात शनिवारी विवाह समारंभ असल्याने अतिशय आनंददायी वातावरण होते. अनेक नातेवाईक विवाह समारंभासाठी कार्यालयात दाखल झाले होते. शुक्रवारी रात्री मुलाच्या हळदीचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला होता. शनिवारी सकाळी नवऱ्या मुलाला अस्वस्थ वाटू लागले. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तो परत आलाच नाही. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. रवींद्र मदन पिसे, असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. भावी जोडीदाराबरोबर रंगवलेले एका तरुणाचे संसाराचे स्वप्न अपुरेच राहिले.
मंगळवार पेठ परिसरातील तानाजी चौकात राहणाऱ्या मदन पिसे यांचा मुलगा रवींद्र (३१) यांचा कसबा बावडा येथील एका मुलीशी शनिवारी ११.४६ वाजता टाकळी रस्त्यावरील शाही दरबार मंगल कार्यालयात विवाह समारंभ होता. शुक्रवारी रात्री कार्यालयात आनंदी आणि उत्साहात हळद लावण्याचा कार्यक्रमही पार पडला. रात्री आपल्या भावी जोडीदारासोबतची स्वप्ने रंगवत रवींद्र झोपी गेला. सकाळी विवाह समारंभाची घाई सुरू झाली. रवींद्र आवरण्यासाठी म्हणून दुचाकीवरुन आपल्या घरी आला. अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने शेजारच्या डॉक्टरांना दाखवले. त्यानी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. रवींद्रला तातडीने वॉन्लेस मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, हृदयविकाराचा झटका तीव्र असल्याने रवींद्रचा सकाळी साडेनऊच्या दरम्यान मृत्यू झाला. अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे सर्वच नातेवाईक भांबावले. कुणाला काहीच सुचेनासे झाले.
सकाळी कोल्हापूरहून नियोजित वधू येण्यास काही अवधीच उरला होता. परगावाहून पाहुणे कार्यालयाकडे येत होते. दीड-दोन हजार जणांच्या भोजनाची जोरदार तयारी सुरू होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कोणी कोणाला कसे समजावयाचे असा प्रश्नच होता.
नियोजित वधू आणि नातेवाईकांची अवस्था तर खूपच बिकट झाली होती. रवींद्र राहत असलेल्या मंगळवार पेठ परिसरातील तानाजी चौकातील वातावरण अगदी सुन्न होते.
होतकरू रवींद्र एका खासगी बँकेच्या सांगली शाखेत कामाला होता. त्यांच्या मागे आईवडील आणि दोन विवाहित बहिणी आहेत.
शनिवारी दुपारी मिरज-पंढरपूर रस्त्यांवरील स्मशानभूमीत रवींद्रवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्वप्न अपुरेच राहिले...
भावी वधू शनिवारी सकाळी आपल्या भावी पतीबरोबरची स्वप्ने रंगवत मिरजेत दाखल झाली. मात्र, काही वेळातच रवींद्रच्या अचानक झालेल्या मृत्यूच्या घटनेने तिच्यासह कुटुंबावर आभाळच कोसळले. नातेवाईकांनी धीर देत तिला कोल्हापूरकडे परत नेले. आपल्या भावी जोडीदाराबरोबर रंगवलेले तिचे संसाराचे स्वप्न अपुरेच राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ विजेच्या तारेलाचिटकून दाम्पत्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
निंबळक (वाजेगाव, जि. सातारा) येथे विजेच्या तारेला चिकटून दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली. दीपक रत्नसिंह मतकर (३५) आणि योगिता दीपक मतकर (३०) अशी मृतांची नावे आहेत.
मतकर मळा निंबळक येथील नागरिकांनी पालखी तळ येथील तुटलेल्या तारांची माहिती महावितरण विभागाला दोन दिवसांपूर्वी दिली होती. परंतु, महावितरणने याकडे दुर्लक्ष केले. महावितरणच्या दुर्लक्षामुळे या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरीकांतून केला जात आहे. घटनास्थळी तहसीलदार विजय पाटील व पोलिसांनी भेट दिल्यानंतर संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी टोळी गजाआंडकडेगावच्या पेट्रोल पंपावरील दरोड्याची कबुली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
कराड-तासगाव रस्त्यावरील वडगाव हवेली येथील दत्तकृपा पेट्रोलपंपावर दरोडा पडला. चोरट्यांनी हवेत गोळीबार करीत पंपावरील कर्मचाऱ्यांना चाकू व तलवारीचा धाक दाखवून लूट केली. मात्र, पोलिसांनी सहा जणांच्या टोळीला दरोड्यानंतर अवघ्या काही तासांतच अटक केली. एक जण अल्पवयीन असल्याने त्याची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
शहर व तालुका पोलिसांच्या सयुंक्त कारवाईत दरोडेखोरांची टोळी गजाआड झाली. त्यांच्याकडून ३० हजांराची रोकड, पिस्तूल, चाकू, तलवार व दोन मोटरसायकली, असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी शनिवारी सायंकाळी दिली.
पाटील म्हणाले, हवेत गोळीबार करणाऱ्या व पेट्रोलपंप लुटणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यातील पाच लोकांना अटक केली आहे. अन्य एक संशयित अल्पवयीन आहे. अटक केलेल्यापैकी चौघेजण हरियाणाचे आहेत. ईश्वर राजकुमार सैनी (२१), महेंद्र सूर्यग्यानगुजर (२०), दीपक राजकुमार गर्ग (२५), अनमोल जीवनसिंग शर्मा (२२, चौघे रा. हरियाणा), अक्षय भरत कावरे (२१, रा. अपशिंगे, ता. कडेगाव) अशी त्यांची आहेत. अन्य एक अल्पवयीन आहे. त्याची सुधारगृहात रवाणगी करण्यात आली आहे.
दत्त पेट्रोलपंपावर शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास दोन दुचाकीवरून सहा जण आले होते. त्यावेळी त्यांनी हवेत गोळीबार केला. कर्मचाऱ्यांना केबीनमध्ये घेऊन डांबून ठेवले. सुमारे ४० हजारांचा मुद्देमाल घेऊन ते शेणोली स्टेशनमार्गे सोनसळकडे पळाले. सोनसळहून कडेगाव व पुन्हा कराडकडे येत असताना त्यांना येथील कृष्णा कॅनॅलवर नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून पाच मोबाइल, एक पिस्तूल, दोन तलवारी, एक चाकू, दोन बुलेट, एक डिलक्स दुचाकी जप्त करण्यात आली आहे. लुटीतील रक्कमही जप्त केली आहे. ते येथील एका लॉजवर राहत होते. तेथेही रात्री छापा टाकून तपासणी केली. त्यावेळी त्यांचे अन्य साहित्यही येथून जप्त करण्यात आले आहे.
परप्रांतीय दराडेखोर स्थानिक गुंडांच्या मदतीने दरोडे, चोऱ्या करीत असल्याचे उघड झाले आहे. या पूर्वी कडेगाव येथील पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोड्याची कबुलीही या टोळीने दिली असल्याची माहिती संदीप पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपूरजवळ अपघातात दोघे ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

कोल्हापूर-सांगली मार्गावर कोंडिग्रे (ता.शिरोळ) येथे माणगावे डिझेल पंपाजवळ मारूती वॅगनॉर व मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघेजण ठार झाला तर एकजण जखमी झाला. शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

किरण विठ्ठल सलगर (वय २४, रा. गुळवंची, ता. जत, जि. सांगली) व केशव पांडूरंग वाघमोडे (वय ५०, रा. भोसे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. तर या अपघातात संदेश आनंदा शेटे (वय २८, रा. नरंदे, ता. हातकणंगले) हे जखमी झाले आहेत. सांगली येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवारी रात्री हिरोहोंडा मोटारसायकल (क्रं.एम.एच.१० बीएन ६१४१) वरून किरण सलगर व केशव वाघमोडे हे कोल्हापूरकडे जात होते. तर जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी संदेश शेटे हे वॅगनॉर (क्रं.एम.एच.४६ एन २०३६) मधून कोल्हापूरहून जयसिंगपूरकडे येत होते. माणगावे डिझेल पंपाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने मोटासायकल चालक किरण सलगर हे जागीच ठार झाले. तर केशव वाघमोडे व संदेश शेटे जखमी झाले. जखमींना सांगलीच्या शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान केशव वाघमोडे यांचा मृत्यू झाला. वॅगनॉर चालक शेटे यांनी जयसिंगपूर पोलिसांना अपघाताची वर्दी दिली. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास सहायक फौजदार प्रकाश देसाई करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा हजार क्विंटल साखर गायब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

हलकर्णी (ता. चंदगड) येथील न्युट्रियन्स (दौलत) साखर कारखान्याच्या गोदामातून ११ हजार साखर नऊ क्विंटल साखरेची पोती गायब झाल्याचे आज केलेल्या मोजणीवरून स्पष्ट झाले. साडेचार कोटी साखरेची बाजारभावाप्रमाणे किंमत आहे. चंदगड पोलिसांनी याबाबतचा पंचनामा केला. काल रात्री उशिरा गोडाऊन किपर नामदेव पाटील यांनी याबाबतची तक्रार चंदगड पोलिसात दिली होती.

१७ जुलै २०१७ ते १० ऑगस्ट २०१७ या दरम्यान तीन नंबरच्या गोदामाचे शटर लोखंडी सळईने उचकटून गोदामातील ११ हजार नऊ क्विंटल साखर लंपास केल्याबाबत संशयित म्हणून युट्र‌ियन्स कंपनीचे मालक व कर्मचाऱ्यांच्यावर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

दौलत साखर कारखाना जिल्हा बँकेने ४५ वर्षांच्या कराराने गोकाक येथील न्यु्ट्र‌ियन्स कंपनीला चालविण्यासाठी दिला आहे. जिल्हा बँकेच्या ताब्यात असलेली दौलत न्यु्ट्र‌ियन्सची साखर कारखाना स्थळावरील गोदाम नंबर तीनमध्ये ठेवण्यात आली होती. त्या गोदामासमोरील व मागील बाजू जिल्हा बँकेने सील केल्या होत्या. शुक्रवारी गोदाम निरीक्षक नामदेव पाटील पाहणी करत असताना गोदामाची मागील बाजू अर्धवट उचकटलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यानंतर पाहणी केली करून वरिष्ठांशी संपर्क साधून याबाबत मा‌हिती दिली. त्यानंतर गोदामातील साखर पोत्यांची मोजदाद केली. कागल येथील कामगारांनी गोदामातील सर्व साखर पोत्यांची पुन्हा थप्पी मारून मोजदाद करण्यास मदत केली. आज जिल्हा बँकेचे सीईओ प्रताप चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. साखर पोत्याची संपूर्ण मोजदाद होईपर्यंत ते थांबून होते. शन‌िवारी चंदगडचे पोलिस निरिक्षक अशोक पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक प्रमोद वाघ, संग्राम पाटील, सागर चौगुले, नामदेव पाटील, जिल्हा बँकेचे कर्मचारी, दौलत व्यवस्थापनाचे कर्मचारी व हलकर्णीचे सरपंच एकनाथ कांबळे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.

‘न्युट्र‌ियन्स वादात’

आर्थिक अरिष्टात सापडलेला दौलत न्युट्र‌ियन्स कंपनीने चालविण्यास घेतल्यानंतर शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण होते. मात्र, पहिल्याच हंगामात देणी थकविल्याने शेतकरी, कर्मचारी आणि वाहतूकदार हवालदील झाले होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून काही प्रमाणात देणी देण्यास भाग पाडले. पहिल्यापासून वादात सापडलेली ही कंपनी साखरेच्या पोत्यांच्या चोरीवरून पुन्हा वादात सापडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोतवाडीच्या उपसरपंचाचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील उपसरपंच विनायक राजाराम माने (वय ३५) यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. यानंतर मृतदेह शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे येथे फेकण्यात आला. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत पोलिसांतून तसेच घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, खोतवाडी येथील मळा भागात राहणाऱ्या विनायक माने यांची चार महिन्यापुर्वीच उपसरपंचपदी निवड झाली होती. अॅटोलूमची दलालीही ते करीत होते. शनिवारी रात्री ते खोतवाडीतील कोल्हापूर धाबा येथे जेवणासाठी गेले असता काहीजणांनी त्यांना बोलवून नेले. यानंतर कोयता व चाकू सदृश्य धारदार हत्याराने विनायक माने यांच्या डोक्यात, मानेवर, चेहऱ्यावर तसेच पोटात वार करण्यात आले. विनायक यांच्यावर तब्बल १९ वार करण्यात आले होते. डोक्यावर मागील बाजूस तसेच पोटात वर्मी घाव बसल्याने विनायकचा मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोरांनी मृतदेह वाहनातून कोंडिग्रे येथे आणला. जयसिंगपूर रस्त्यालगत धोंडिराम बळवंत शेटके यांच्या गट क्रं.४२१ मधील शेताजवळ मृतदेह ओढत नेऊन फेकून हल्लेखोर पसार झाले.

दरम्यान, रविवारी सकाळी खुनाची ही घटना निदर्शनास आली. या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूरचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम, उपनिरीक्षक किरण दिडवाघ, बिट अंमलदार विक्रम चव्हाण, सहायक फौजदार बजरंग माने, असिफ मुलाणी, विजय मुंदाळे, अनिल चव्हाण, सुनील पाटील, साजिद शिकलगार, सागर सुर्यवंशी, कोंडिग्रेचे पोलिस पाटील सतिश कांबळे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानेही घटनास्थळी पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोल्हापुरी’ला पॅरिस लूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरी चप्पलला जागतिक बाजारपेठ ‌मिळवून देण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने पुढाकार घेतला आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांनी तयार केलेले चप्पल देश, विदेशात विकण्याची व्यवस्था निर्माण केली जात आहे. पॅरिस येथील डिझाइननुसार चप्पल तयार करण्यासाठी कोल्हापुरातील ३२ कारागिरांची निवड केली. त्यांनी तयार केलेल्या तीन हजार चप्पलची विक्री करण्याची जबाबदारी बाटा कंपनीने घेतली आहे. अशाप्रकारे कोल्हापुरी चप्पलला पॅरिस लूक देत व्यवसायाला उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळचे सभापती विशाल चोरडिया, मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रिचा बागल यांनी पत्रकार परिषदेत ‌दिली.

चोरडिया म्हणाले, ‘राज्यात कोल्हापुरी चप्पलची वेगळी ओळख आहे. या व्यवसायाला चालना देण्यासाठी मे महिन्यात कारागिरांची एक दिवसाची कार्यशाळा घेतली. व्यवसायातील अडचणी जाणून घेतल्या. विक्री व्यवस्था नसल्याने तेथे तयार झालेल्या कोल्हापुरी चप्पल व्यवसाय वाढत नसल्याचे प्रकर्षाने समोर आले. त्यामुळे पॅ‌रिस येथील चप्पल डिझायनर निओनी स्केन यांच्याशी संपर्क साधला. त्यांना कोल्हापुरात आणून आजपासून तीन दिवसाचे प्रशिक्षण कारागिरांना दिले जात आहे. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या हॉलमध्ये ३२ कारागिरांची कार्यशाळा झाली. तिथेच पुढील दोन दिवस कार्यशाळा होईल.

बदलत्या फॅशनच्या दुयिनेत आंतरराष्ट्रीय ग्राहकांना खेचण्यासाठी कोल्हापुरील चप्पलमध्ये काय बदल करायला हवे, या विषयी पॅरिसच्या निओनी यांनी मार्गदर्शन केले. तीन ‌दिवसाच्या कार्यशाळेत कारागीरांना प्रशिक्ष‌ित करण्यात येईल. पॅरिसच्या डिझायननुसार तीन महिन्यात तयार केलेले कोल्हापुरी चप्पल घेऊन देश, विदेशात विकले जाईल. या प्रयत्नाला यश आल्यास आणखी इच्छुक कारागीरांना सामावून घेतले जाईल. मंडळाच्या माध्यमातून कारागिरांतील कौशल्य वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. कोल्हापुरी चप्पलमधील मूळ बाज कायम ठेवत ऑनलाइन विक्रीसाठी नवे डिझायन्स तरुण कलाकारांपर्यंत पोहचवले जात आहे. ग्रामीण उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाखादी ब्रॅँडची नोंदणी करण्यात आली आहे. शहरी ग्राहकांसाठी पुणे येथे महाखादी शॉपी सुरू करण्यात आली आहे.’

कोल्हापुरीला मागणी

चप्पल डिझायनर निओनी म्हणाल्या, ‘फॅशनच्या दुनियेत ‌विविध डिझायन्सच्या कोल्हापुरी चप्पलला चांगली मागणी आहे. काळानुरूप चप्पलच्या डिझायन्समध्ये बदल होणे गरजेचे आहे. यामुळे ग्राहकांच्या पसंतीनुसार कोल्हापुरी चप्पल तयार करून दिल्यास परदेशात विक्रीला संधी आहे.’


‘कोल्हापुरी’च्या पेटंटसाठी प्रयत्न

‘कोल्हापुरी चप्पलच्या नावाखाली पर्यटकांची फसवणूक होत असते. हे थांबण्यासाठी कोल्हापुरी चप्पलला पेटंट मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’ असेही चोरडिया यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यांची कामे रखडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी कंत्राटदारांना वस्तू व सेवा (जीएसटी) कर १८ टक्के ला‍वण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र निर्णय घेताना त्याची अंदाजपत्रकात तरतूद केली नसल्याने कंत्राटदारांवर बोजा पडणार आहे. अंदाजपत्रकात तरतूद करुन जीएसटीची अंमलबजावणी करण्याची मागणी करत निविदा प्रक्रियेत सहभाग न घेतल्याने पावसाळ्यापुर्वी व नंतर करण्यात येणारी रस्ता दुरुस्ती बारगळली आहे. जीएसटीबाबत कंत्राटदारांमध्ये असंतोष असताना दररोज सार्वजनिक विभागाच्यावतीने (पीडब्ल्यूडी) नव-नवीन आध्यादेश काढले जात असल्याचे त्यांच्या संभ्रमावस्था अधिकच निर्माण झाली आहे. तर या निर्णयाचा फटका छोट्या कंत्राटदारांना झाला असून त्यांची कामेच बंद पडली आहेत.

देशभरात जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर शासकीय कंत्राटदारांवर जीएसटी लावण्यात आला. जीएसटीमध्ये व्हॅट, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांचा अंतर्भाव केला आहे. कंत्राटदारांना यापूर्वी केवळ पाच टक्के व्हॅट द्यावा लागत होता. त्याचा परतावाही मिळत असे. शासकीय इमारत, रस्ते, धरणे, कॅनॉल, शेतीकाम आणि खोदाईसाठी व्हॅट लावला जात नव्हता. पण जीएसटीमध्ये व्हॅट अंतर्भाव केला असल्याने, कंत्राटदारांवर अधिकचा बोजा पडत आहे. अंदाजपत्रकांमध्ये जीएसटीची तरतूद नसल्याने या भुर्दंडामध्ये अधिकच भर पडणार आहे.

पीडब्ल्यूडी विभागाने एक ते दोन किमीचे नवीन व दुरुस्तीचे रस्त्यांची निविदा न काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केवळ दहा किमीचे रस्त्यांची बांधणी व दुरुस्तींच्या निविदा काढण्यास सुरुवात झाली आहे. जास्त लांबीच्या रस्त्यांची निविदा काढताना दोन वर्षाची वॉरंटीही घेण्यात येणार आहे. त्यामुळे या निविदांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवली आहे. एकीकडे कंत्राटदार निविदांना प्रतिसाद देत नसताना विभागातील काही उच्चपदस्थ अधिकारी या निविदा दाखल करत असल्याचा आरोप कंत्राटदारांकडून होऊ लागला आहे. मोठ्या कामाचा निविदा काढण्यासाठी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात न आल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. याविरोधात नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या वार्षिक बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींनी रस्त्यांची दुर्दशा आणि निधीवरुन जोरदार आक्षेप नोंदवला होता. पावसाळ्यानंतर या रस्त्यांची दुरुस्ती होणार असली, तरी त्यासाठी निविदाच दाखल होत नसल्याने प्रश्न अधिक जटील होऊ लागला आहे.

‘जेवढ्या कराची आकारणी होईल, तेवढ्या रकमेची अंदाजपत्रकांमध्ये तरतूद करण्याची मागणी कंत्राटदारांकडून होत आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर होणार असल्याने याबाबत पेच निर्माण झाला असला, तरी वाढीव अंदाजपत्राकानुसार निविदा काढल्यास कंत्राटदार तयार असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.’ या प्रश्नातून सरकारने मार्ग काढण्यासाठी जिल्हा कंत्राटदार महासंघाच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून त्यामध्ये जिल्हा महासंघाचे सचिव विजय सावंत, अतुल मिरजकर, एन. डी. लाड, किशोर खारगे, प्रशांत तिळंगणी, विक्रम नलवडे, सुंजीव श्रेष्ठी आदी सहभागी झाले आहेत.

शाखा अभियंत्यावर आरोप

जीएसटीच्या विरोधात राज्यभरात कंत्राटदारांना आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कंत्राटदारांनी सर्व प्रकारच्या निविदांवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने काढण्यात आलेल्या निविदांना अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा धास्तावली असली, तरी यातून मार्ग काढण्यासाठी काही बड्या कंत्राटदारांना हाताशी धरुन शाखा अभियंत्यांनी स्वत:च निविदा दाखल केल्या असल्याचा आरोप महासंघाच्यावतीने केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या निधीचे ‘कल्याण’ होईना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस कल्याण विभागाकडील पैशांच्या कमतरतेमुळे ‘मराठी तारका’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. १ मे रोजी पार पडलेल्या कार्यक्रमाला तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरीही या कार्यक्रमाचा हिशोब अद्याप तयार झालेला नाही. देणगी रुपाने मिळालेल्या धनादेशांपैकी दीड कोटींचे धनादेश वटले आहेत. तर जवळपासएक कोटींचे धनादेश अद्याप वटलेले नाहीत. याशिवाय जमा-खर्चाच्या लेखापरीक्षणाला विलंब होत असल्याने कल्याण निधी कार्यक्रमाचा हिशोब रखडला आहे.

पोलिस कल्याण विभागाला निधीची कमतरता असल्याने पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मुलांना दिली जाणारी शिष्यवृत्तीदेखील थकली होती. याशिवाय इतर उपक्रमांनाही मर्यादा आल्या होत्या. तत्कालीन पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी पोलिस कल्याण विभागाला निधी जमवण्यासाठी पोलिस महासंचालकांकडून मनोरंजनाच्या कार्यक्रमाची परवानगी घेतली. एक मे रोजी पोलिस मुख्यालयातील परेड ग्राऊंडवर मराठी तारका हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम होऊन तीन महिने १२ दिवस उलटले, मात्र अद्याप कार्यक्रमाच्या जमा-खर्चाचा हिशोब तयार नाही. मराठी तारका या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीतून ७७ लाख रुपये जमा झाले आहेत, तर देणगीतून एक कोटी ७९ लाख रुपयांचे धनादेश पोलिसांकडे जमा झाले. राष्ट्रीयीकृत बँकेतील पोलिस कल्याण विभागाच्या खात्यात धनादेश जमा करण्याचे काम सुरू आहे, पण याला अपेक्षित गती नाही. दीड कोटींचे धनादेश जमा झाले. उर्वरित धनादेश अजून जमा होत आहेत.

मराठी तारका या कार्यक्रमासाठी पोलिसांनी २५ लाख रुपये मोजले, तर कार्यक्रमासाठी स्टेज, बैठक व्यवस्था, साऊंड सिस्टिम, कलाकारांची राहण्याची व्यवस्था यावर सुमारे २५ लाख रुपये खर्च झाले. सर्व बिले अदा झाली आहेत. देणगी आणि तिकिटांची रक्कम यातून दोन कोटी ५६ लाख रुपये पोलिस कल्याण निधीला जमा झाले. नियमानुसार एकूण रकमेतील दहा टक्के रक्कम पोलिस महासंचालक कार्यालयाला जमा करावी लागणार आहे. कार्यक्रमाचा खर्च आणि पोलिस महासंचालक कार्यालयाला द्यावी लागणारी रक्कम वजा करता पोलिस कल्याण विभागाला एक कोटी ७१ लाख रुपये शिल्लक राहणार आहेत. सुमारे एक कोटीहून अधिक रकमेचे धनादेश अजूनही वटलेले नाहीत, त्यामुळे पोलिस कल्याण निधीचा हिशोब रखडला आहे. लेखापरीक्षणाला चार ते सहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे, त्यामुळे पोलिस कल्याण निधीचा हिशोब आणखी लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोन वर्षांची शिष्यवृत्ती थकली

पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांसाठी दरवर्षी कल्याण निधीतून शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते. ५ ते १० वी पर्यंतच्या वर्गात ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये दिले जातात. ११ वी आणि १२ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये, पदवी आणि पदव्युत्तरसाठी तीन हजार रुपये, अभियांत्रिकीसाठी सात हजार, तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. गेल्या दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीची रक्कम थकली आहे. पोलिस कल्याण विभागाकडे रक्कम जमा होऊनही लेखापरीक्षण झाले नसल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता मैनुद्दीनला पुण्यात अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील १३ कोटी रुपयांच्या लूट प्रकरणातील मुख्य संशयित मैनुद्दीन मुल्ला याला पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथील पिंपळे गुरव या गावात अटक करण्यात आली. कोल्हापूर व पुणे सीआयडीने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत वर्षभर बेपत्ता असलेल्या मुल्ला याला अटक करण्यात यश आले. जामिनावर सुटल्यानंतर मैनुद्दीन बेपत्ता झाला होता.

वारणानगरातील शिक्षक कॉलनीत मैनुद्दीन मुल्ला याने सुमारे साडेतीन कोटी रुपयांची लूट केली होती. या चोरीप्रकरणी त्याला अटक केल्यानंतर सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट व सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्यासह नऊजणांनी तेथील ८ कोटी १८ लाख रुपयांची लूट केली. याप्रकरणी कोल्हापूर अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी नऊ मार्च २०१७ रोजी गुन्हा दाखल केला. चोरटा मैनुद्दीन मुल्ला, पोलिस अधिकारी चंदनशिवे, घनवटसह पोलिस कर्मचारी दीपक पाटील, कुलदीप कांबळे, रवींद्र पाटील, शरद कुरळपकर, शंकर पाटील, प्रविण सावंत हे यातील संशयित आरोपी आहेत. त्यानंतर हा गुन्हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. अटक टाळण्यासाठी चंदनशिवे, घनवट, दीपक पाटील, कुलदीप कांबळे यांनी केलेले जामीन अर्ज जिल्हा कोर्टाने फेटाळले. त्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने जामीन फेटाळून त्या पोलिसांना शरण येण्यास सांगितले.

गेल्या आठवड्यात घनवट, चंदनशिवे शरण आले. त्यानंतर दीपक पाटील, कुलदीप कांबळे, रवींद्र पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. पण या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी मैनुद्दीन मुल्ला बेपत्ता होता. घनवट, चंदनशिवेला अटक केल्यानंतर पोलिस मैनुद्दीनच्या मागावर होते. एका खबऱ्याने मैनुद्दीन पुण्यात असल्याची माहिती दिली. कोल्हापूर व पुणे सीआयडीने संयुक्त कारवाईत शनिवारी रात्री पिंपरी-चिंचवड येथील पिंपळे गुरव गावी त्याला अटक केली. सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई झाली. मैनुद्दीनने राहण्यासाठी भाड्याने फ्लॅट घेतला होता.

सीआयडीचे पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड हे मैनुद्दीनला घेऊन कोल्हापुरात आले. वैद्यकीय चाचणी घेऊन त्याला पन्हाळा कोर्टात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विजय अवघडे यांनी त्यास सात दिवसांची पोलिस कोठडी दिली. त्यानंतर सीआयडीने मैनुद्दीनला पुण्याला तपासासाठी नेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होणार अनेकांची पोलखोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बहुचर्चित वारणा लूट प्रकरणातील मुख्य आरोपी मैनुद्दीन मुल्ला याला सीआयडीच्या पथकाने अटक केल्याने या प्रकरणातील अनेकांच्या कारनाम्यांवर प्रकाश पडणार आहे. तसेच या लुटीतील नेकमी रक्कम किती याचाही उलघडा होणार आहे.

वारणा येथील शिक्षक कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये तीन कोटी ११ लाख रुपयांची चोरी केल्याप्रकरणी मार्च २०१६ मध्ये मैनुद्दीन मुल्ला याला सांगली स्था​निक गुन्हे अन्वेषण विभागाने केला. याबाबतची फिर्याद कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक झुंझार सरनोबत यांनी दिली होती. मैनुद्दीनला वारणा पोलिसांनी अटक केल्यानंतर १४ दिवसांनी त्याला जामीन मिळाल्यानंतर तो पळून गेला. या चोरीतील एक कोटी रुपयांची रक्कम मैनुद्दीनने भामटे गावातील विनायक जाधवला याला दिली होती. त्यांच्याकडून ७० लाख रुपये घेऊन पोबारा केला. मैनुददीन कुठे गेला याचा पत्ताच लागत नव्हता. त्याचा घातपात झाल्याचा संश​यही व्यक्त केला जात होता. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस त्याचा माग काढत होता परंतु तो सापडला नव्हता.

पोलिस मैनुद्दीनचा शोध घेत असताना या गुन्ह्यातील फिर्यादी सरनोबत यांनी आपली आठ कोटीहून अधिक रक्कम चोरुन नेल्याची तक्रार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली. या तक्रारीवरून नांगरे-पाटील यांनी कोल्हापूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे तपास दिला. या तपासात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकानेच आठ कोटी १७ लाख रुपयांवर डल्ला मारल्याचे लक्षात आले. वारणेतील शिक्षक कॉलनीतील फ्लॅटमध्ये एकूण चारवेळा चोरी झाली. मैनुद्दीनने दोनवेळा चोरी केली होती. प्रत्येक वेळी त्याने वेगवेगळ्या साथीदारांना नेले. चोरी उघड झाल्यावर सांगली पोलिस मैनुद्दीनला घेऊन पुन्हा शिक्षक कॉलनीतील फ्लॅटवर तपासासाठी गेले. फ्लॅटमधील रक्कम पाहून पोलिसही चक्रावले. त्यांनी दोन वेळा फ्लॅटला भेट देऊन आठ कोटी १८ लाख रुपयांच्यावर डल्ला मारला. हा गुन्हा कोल्हापूर पोलिसांकडून सीआयडीकडे वर्ग करण्यात आला.

मोबाइल कॉल्सचीही तपासणी

गुन्ह्यातील संशयित ‌पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनश‌िवे यांच्यासह त्यांचे साथीदार कोर्टात जामिनासाठी प्रयत्न करत होते तर दुसरीकडे सीआयडीला मैनुद्दीन सापडत नव्हता. घनवट आणि चंदनशिवे यांच्यासह चौघे शरण आल्यावर मैनुद्दीनला अटक करण्यात सीआयडीला यश आले आहे. गुन्हा दाखल केल्यावर घनवट, चंदनशिवे यांचे पुणे, अहमदनगर, सोलापूर परिसरात त्यांचे वास्तव होते. तसेच पोलिस अधिकाऱ्यांचे मोबाइल कॉलही तपासण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिसांचा आणि मैनुद्दीनचा संपर्क होता का याचा तपास सीआयडी करत आहे.

समोरासमोर घेणार जबाब

मैनुद्दीनला अटक केल्यानंतर या गुन्ह्यातील अनेक कारनाम्यांवर प्रकाश पडणार आहे. वारणेतील एकूण किती रक्कम होती. या रक्कमेची मैनुद्दीनला टीप कोणी दिली. चोरी केलेल्या रक्कमेचे वाटप कसे झाले, याची माहिती मिळणार आहे. मैनुद्दीनने किती रक्कम चोरली. या रक्कमेची विल्हेवाट कशी लावली. या गुन्ह्याचा आणखी आरोपी आहेत का? सांगली एलसीबीच्या पथकाने नेकमी किती रक्कम लंपास केली, याचा तपास होण्यास मदत होणार आहे. सीआयडीचे अधिकारी मैनुद्दीन व संशयित पोलिसांचा समोरासमोर जबाब घेणार असल्याने या गुन्ह्याची उकल होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुनिया फोटोग्राफीची ‘फोटोग्राफी इज एव्हरीथिंग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

त्यांच्यापैकी कोण कॉलेजियन्स आहेत, तर कुणी इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळत त्या साऱ्यांनी फोटोग्राफीची आवड जोपासली आहे. ‘फोटोग्राफी इज एव्हरीथिंग’ या भावनेतून एकवटलेल्या ग्र्रुपमध्ये हौशी आणि व्यावसायिक छायाचित्रकारही सहभागी आहेत. या साऱ्यांनी मनाला साद घालणारी निसर्गाची नानाविध रुपे, ऐतिहासिक वास्तू, शौर्याचा वारसा ठरलेली गडकिल्यांपासून सण, संस्कृतीतील वेगळे क्षण कॅमेऱ्यात टिपत ते प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांच्या भेटीस आणले आहेत. येथील शाहू स्मारक भवनच्या कलादालन येथे फोटोग्राफीचे प्रदर्शन भरविले आहे.

सांगली, कोल्हापूरसह आसपासच्या शहरातील फोटाग्राफर्सच्या वेगळ्या नजरेची ही दुनिया प्रेक्षकांना भुरळ पाडणारी आहे. सांगली येथील आयर्विन पूल, कोल्हापुरातील न्यू पॅलेस, खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर, गणपतीपुळे, ऐतिहासिक हम्पी, बदामी, किल्ले प्रतापगडसह जवळपास १२० हून अधिक छायाचित्रे प्रदर्शनात आहेत. जवळपास ४० छायाचित्रकारांचा समावेश आहे. सण, समारंभातील वेगवेगळ्या प्रसंगाची छायाचित्रे संस्कृतीचे अनोखे दर्शन घडवितात.

कोल्हापुरातील रांगडी आणि कलासक्त व्यक्तीमत्वेही टिपली आहेत. म्हैशींच्या शर्यती, चिखलगुट्टाची छायाचित्रे वेगळेपणा दर्शवितात. छायाचित्रकारांनी दैनंदिन जीवनातील टिपलेल्या गमंतीजमती, लहान मुलांच्या भावविश्व उलगडून दाखविणारी छायाचित्रे पाहताना नागरिक हरवून जातात. शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक आर.आर.पाटील यांच्या हस्ते व उत्सव लॅबचे विश्वनाथ बनसोडे (इचलकरंजी), सांगलीचे टी. ए. साळुंखे, पत्रकार अनंत सरनाईक, महेश कुर्लेकर यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे.



कोल्हापूर, सांगलीतील फोटोग्राफर्सचा समावेश

प्रदर्शनात कोल्हापुरातील जानकी भोसले, श्रीप्रसाद पुनाळकर, अमोल लायकर, अमित पोवार, जेम्स नाचणकर, अनिकेत गुरव, विनोद पाटील, कुलदीप सावंत, सुनील लायकर, प्रणव घोटगे,, अथर्व देव, वैभव पाटील, शैलेश चांदूरकर यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. योगेश माने (इचलकरंजी), दगडू जगताप (चंदूर), अक्षय मगदूम, अरुणकुमार चौगुले, अजित चौगुले (उदगाव), ज्ञानदेव सलाते (बुबनाळ) यांची छायाचित्रे लक्ष वेधणारी आहेत. सांगलीतील राम म्हस्के, किरण चव्हाण, ​अनिल अकिवाटे, योगेश गुरव, शितल पाटील, रोकश बिरादार, शुभम गावडे, अमित कणिरे, रोहित कांबळे, सुनील कदम यांच्या छायाचित्रांनी प्रदर्शनाची शोभा वाढली आहे.


वॉटसअॅप ग्रुप ते फेसबुक पेज

उदगाव येथील विनायक पाटील यांच्या पुढाकारातून २६ जून २०१६ रोजी ‘फोटोग्राफी इज एव्हरीथिंग’ या नावांनी ग्रुपची स्थापना केली. ख्यातनाम फोटोग्राफर मनोज मुसळे, विजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभते. ग्रुपच्या सदस्यांची संख्या १२० आहे.ग्रुपच्या अध्यक्षपदी शितल पाटील (सांगली) तर उपाध्यक्षपदी अरुणकुमार चौगले (उदगाव) आहेत. कोल्हापुरातील टीमचे प्रमुख शैलेश चांदूरकर, अमोल लायकर आहेत. ज्यांच्याकडे डीएसएलआर कॅमेरा आहे. ते ग्रुपचे सदस्य होऊ शकतात. कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारासह विविध शहरातील फोटोग्राफरही सदस्य आहेत. ग्रुपतर्फे फेसबुकवर ‘फोटाग्राफी इज एव्हरीथिंग’ नावाचे पेज तयार केले आहे.



ग्रुपच्या सदस्यांनी फोटोग्राफीतील कौशल्ये आत्मसात करावीत यासाठी प्रयत्न असतो. नवीन शिकण्याची आणि सातत्याने वेगळे काही तरी करण्याची वृत्ती वाढीस लागावी म्हणून वॉटसअॅप ग्रुपवर रोज दोन फोटो टाकले जातात. सदस्य त्या फोटोची वैशिष्ट्ये नमूद करतो. वॉटसअॅप ग्रुपवर फोटोग्राफी व्यतिरिक्त अन्य कुठल्या पोस्ट नसतात. ग्रुपचे वैशिष्ट म्हणजे कॉले​जियन्स युवक युवतींपासून नोकरदार, व्यावसायिक फोटोग्राफर, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक असे विविध वयोगटातील सदस्य आहेत.

- विनायक पाटील, संस्थापक फोटोग्राफी इज एव्हरीथिंग ग्रुप


ग्रुपतर्फे वर्षातून दोन वेळेला छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले जाते. कोल्हापुरातील हे पहिलेच प्रदर्शन आहे. यापूर्वी सांगलीत भरविलेल्या प्रदर्शनास नागरिकांचा प्रतिसाद मिळाला होता. ग्रुपतर्फे छायाचित्रांच्या प्रदर्शनाबरोबरच फोटो वॉक, फोटो टूर अशा संकल्पना राबविल्या जातात. महिला सदस्यासाठी फोटाग्राफी विषयक कार्यशाळा आयोजित केल्या जातात. छायाचित्रांविषयी प्रत्येक सदस्यांनी आपआपली मते नोंदवावीत असा नियम केल्यामुळे सुधारणेला संधी मिळते.

- शितल पाटील, अध्यक्ष फोटोग्राफी इज एव्हरीथिंग ग्रुप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images