Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मंडळांना डॉल्बीमुक्तीची साद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आवाज मर्यादेचा भंग करून ध्वनी प्रदूषण होऊ नये, असे आदेश सुप्रीम कर्टाने दिले आहेत. या आदेशाचे पालन करण्यासाठी पोलिसांकडून सर्वच सण-समारंभ आणि उत्सवांवर लक्ष ठेवले जाते. गणेशोत्सवात सर्वाधिक डॉल्बी साऊंड सिस्टिमचा वापर होत असल्याने डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी गणेश मंडळांना केले आहे. मंडळांनीही पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, डॉल्बीऐवजी विधायक उपक्रमांना प्राधान्य दिले जात आहे.

‘सार्वजनिक ठिकाणी ६० डेसिबलपेक्षा मोठा आवाज करून नागरिकांना त्रास देऊ नये. जाणीवपूर्वक कोणी याचे उल्लंघन करीत असेल तर, पोलिसांनी यावर कारवाई करावी,’ असे सक्त आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. दोन वर्षांपूर्वी शहरातील मंडळांनी आवाज मर्यादेचे पालन केले, मात्र गतवर्षी शहरातील १६ मंडळांनी ऐनवेळी डॉल्बीचा दणदणाट करून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले. मंडळांनी आवाज मर्यादेचे पालन करावे यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील सर्वच जिल्ह्यातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. बहुतांश मंडळांनी ‘नो डॉल्बी’चे शपथपत्र स्वतःहून लिहून दिले होते. जिल्ह्यातील डॉल्बी मालकांनीही आवाज मर्यादेचे पालन करण्याचे आश्वासन पोलिसांना दिले होते. गणेश विसर्जन मिरवणुकीत मात्र ऐनवेळी १६ मंडळांनी डॉल्बीच्या भिंती उभ्या करून दणदणाट केला. पोलिसांच्या नाकावर टिच्चून डॉल्बी वाजवल्याचा आनंदोत्सवही काही मंडळांनी साजरा केला. परिक्षेत्रातील २४ हजारहून अधिक मंडळांनी आवाज मर्यादेचे पालन केले, मात्र जिल्ह्यातील १६ मंडळांनी डॉल्बी मुक्तीच्या मोहिमेला हरताळ फासल्याने पोलिस यंत्रणा आक्रमक बनली. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात संबंधित सोळा मंडळांवर ध्वनी प्रदूषण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले.

यंदा पुन्हा पोलिसांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी नोंदणीकृत सर्व मंडळांना डॉल्बीचा वापर न करण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात परिसरातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. डॉल्बीचे तोटे समजावून सांगण्यासह पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. तरुणांच्या प्रचंड उर्जेचा सहभाग ही गणेशोत्सवाची जमेची बाजू मानली जाते. या उर्जेला विधायक उपक्रमांची जोड मिळाल्यास सार्वजनिक गणेशोत्सवाचा मूळ उद्देश साध्य होऊ शकतो. आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, मरणोत्तर देहदानाचा संकल्प, गरजू शैक्षणिक संस्थांना आर्थिक मदत, महापालिकेच्या शाळांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील शाळा, ग्रंथालये, स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करणारे केंद्र, शाळाबाह्य मुले यांना मदतीची गरज आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अशा गरजूंना मदतीचा हात मिळाल्यास सार्वजनिक गणेशेत्सवाचा खरा अर्थ साध्य होऊ शकतो.

मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद

शहरातील बहुतांश मंडळांनी डॉल्बीमुक्तीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे कबूल केले असून, सामाजिक उपक्रमांना मदत करण्याचेही मान्य केले आहे. मंडळे स्वतःहून पोलिस अधिकाऱ्यांकडे जाऊन डॉल्बीमुक्तीचा नारा देत आहेत. डॉल्बीमुळे होणारा अनावश्यक खर्च, ध्वनी प्रदूषण आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश याचा विचार मंडळे स्वतःहून करीत आहेत ही स्वागतार्ह बाब असल्याची भावना पोलिस अधिकारी व्यक्त करीत आहेत.

१६ मंडळांची आज सुनावणी

गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट करणाऱ्या १६ मंडळांवर पोलिसांचे गुन्हे दाखल केल आहेत. या मंडळांवर आरोपपत्रही दाखल झाल्याने कोर्टाने मंडळांना समन्स बजावले आहेत. आठवड्यापासून जिल्हा कोर्टात सुनावणी सुरू असून, सोमवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १) याबाबत सुनावणी होणार आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांना कोणती शिक्षा होणार याकडे इतर मंडळांच्याही नजरा लागल्या आहेत.

गणेशोत्सवात डॉल्बीचा वापर होऊ नये, यासाठी मंडळांना नोटिसा पाठवल्या आहेत. सामाजिक उपक्रमांनी उत्सव साजरा करावा, असे आवाहन मंडळांना केले आहे. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद येत असल्याने यंदा विधायक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा होईल.

- डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलिस उपअधीक्षक

व्हिनस कॉर्नर मित्र मंडळाने गणेशोत्सवात नेहमीच सामाजिक भान जपले आहे. तांत्रिक देखावे सादर करण्याची खासियत आमच्या मंडळाने कायम ठेवली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही आम्ही डॉल्बीला फाटा देऊन देखावे सादर करण्यावर भर देणार आहे.

- कय्युम मुजावर, अध्यक्ष, व्हिनस कॉर्नर मित्र मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यावरण समितीसाठी अखेर महापालिकेला मुहूर्त

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com
Tweet:@gurubalmaliMT

कोल्हापूर : महापालिकेत पर्यावरण समितीची स्थापना झाली नसल्याने शहरातील अनेक बांधकाम प्रकल्पांना परवाना मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे हवालदिल झालेल्या बांधकाम व्यावसायिकांना आता महापालिकेने दिलासा दिला आहे. पुण्यानंतर महाराष्ट्रात आघाडी घेत कोल्हापूर महापालिकेने पर्यावरण समितीबरोबरच पर्यावरण सेलची देखील स्थापना केली आहे. नोटबंदी, जीएसटी आणि महारेराच्या फेऱ्यांत अडकलेल्यांना या समितीमुळे मदतीचा हात मिळाला आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने याबाबत ६ जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेत समिती स्थापन करण्यात आली आहे.

बांधकाम परवाना मिळण्यासाठी महापलिकेत अनेक विभागांच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज असते. त्यामध्ये पर्यावरण समितीची परवानगी महत्वाची असते. पूर्वी पर्यावरण विभागाची मान्यता केंद्र सरकारकडून दिली जात होती. पण नंतर हा अधिकार महापालिकेस देण्यात आला. महापालिकेने स्थापन केलेल्या समितीच्या चौकशीनंतरच ना हरकत दाखला देण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्यात कोणत्याच महापालिकेने अशी पर्यावरण समिती स्थापन करण्यात फारसा रस दाखवला नाही. याचा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसत होता. परवाना मिळत नसल्याने बांधकामांच्या फायली महापालिकेत पडून होत्या. हेलपाटे मारूनही त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. कारण समितीच नसल्याने त्या फायलींवर निर्णयच घेतला जात नव्हता.

या पार्श्वभूमीवर क्रिडाई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा आयुक्तांची भेट घेतली. तरीही समितीची घोषणा होत नव्हती. ‘मटा’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी त्याची दखल घेत पर्यावरण समितीची स्थापना केली आहे. दोन लाख चौरस फुटांपेक्षा जादा बांधकाम असलेल्या प्रकल्पांना या समितीच्या परवागीशिवाय बांधकाम करता येणार नाही. यामुळे मोठ्या प्रकल्पांना अशी समिती आवश्यक होती. या समितीबरोबरच तज्ज्ञांचा समावेश असलेल्या पर्यावरण सेलचीही आयुक्तांनी घोषणा केली आहे.

सहा सदस्यांच्या समितीचे आयुक्त अध्यक्ष आहेत. तर पर्यावरण सेलमध्ये शिवाजी विद्यापीठातील पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. पी. डी. राऊत व प्रा. गिरीश कुलकर्णी यांचा समावेश आहे. या समितीमुळे बांधकाम परवाना मिळण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे.


पर्यावरण समितीला सल्ला देण्याबरोबरची तज्ज्ञ म्हणून अहवाल देण्यासाठी पर्यावरण सेलची देखील स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. पुण्यानंतर राज्यात कोल्हापुरातच अशी स्थापना होत आहे. यापुढे बांधकाम परवाने तातडीने मिळण्यात या समितीमुळे गती येणार आहे.

डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाय दूध विक्रीदरात दोन रूपयांनी वाढ

$
0
0

कोल्हापूर ः गोकुळने गायीच्या दूध विक्रीदरात आज, मंगळवारपासून लिटरला दोन रूपयांनी वाढ केली. ही दरवाढ जिल्हासह पुणे, मुंबईसाठीही लागू होणार आहे. यामुळे गाय दूध खरेदी करताना लिटरमागे दोन रूपये ग्राहकांना अधिक मोजावे लागणार आहेत. महिन्यापूर्वी सरकारने दूध खरेदीदरात प्रति लिटर तीन रूपयांची वाढ केली. दरम्यान, गोकुळचा दर सरकारपेक्षा पहिल्यापासून दोन रूपये जास्त होता. त्यामुळे एक रूपयांची वाढ केली. त्याचवेळी विक्रीदरातही वाढ होण्याचे संकेत मिळाले होते. गोकुळ प्रशासनाने मंगळवारपासून गायीच्या दूधदरात वाढ केल्याचे सोमवारी अधिकृतपणे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांनी १९०२ मध्ये बहुजन समाजाला ५० टक्के आरक्षण दिले होते. त्यामध्ये मराठा समाजाचासुद्धा समावेश होता. आज मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, परिस्थिती हालाखीची असून त्यांना कुठल्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मागास मराठा समाजाला ओबीसीअंतर्गत आरक्षण द्यावे,’ अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेत केली. ते राज्यघटनेत १२३ वी घटना दुरुस्ती सुचविणारे विधेयक, इतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगात दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर झाल्यानंतर त्यावर बोलत होते.
दलित व बहुजन समाजाबद्दल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करताना खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘छत्रपती शाहू महाराज यांनी जाती निर्मूलनासाठी गंगाराम कांबळे या दलित समाजातील व्यक्तीला जेव्हा जातीच्या नावावरून केवळ पाणी प्यायल्याने उच्चवर्णीयांनी मारहाण केली. ही राजर्षी शाहू महाराजांना ही बातमी समजली. त्यांनी कांबळे यांना सत्यशोधक नावाचे हॉटेल काढून दिले. या हॉटेलवर शाहू महाराज आपल्या संस्थानातील सरदार, जहागीरदार आदी उच्चवर्णीय लोकांना चहा प्यायला घेवून जात होते, अशा प्रकारे त्यांनी जातीभेद मोडून काढला. ती समतावादी व्यवस्था आज आपल्याला निर्माण करावी लागेल. मराठा समाजाने राज्यभर अतिशय शिस्तबद्ध रीतीने लाखोंच्या संख्येने मूकमोर्चे काढले. या मोर्चात आरक्षण ही प्रमुख मागणी होती. महाराष्ट्रातील विदर्भात कुणबी समाज हा मराठाच असून त्याची गणना इतर मागासवर्गीयांमध्ये केली जाते. या समाजाला उत्तर भारतात कुर्मी म्हणून ओळखले जाते. आज महाराष्ट्रातील ३० टक्के मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम असून ७० टक्के मराठा समाज हा आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास आहे. गेल्या २० वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्रात ज्या आत्महत्या झाल्या त्यामध्ये बहुसंख्य मराठा समाजातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले म्हणून या समाजाला आरक्षणाची गरज आहे. मात्र, त्याचवेळी कुठल्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचा समावेश इतर मागासवर्गीय जातींमध्ये करावा, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन सात-बाराला मुदतवाढीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑनलाइन सात-बारासाठी राज्य सरकारने १ ऑगस्टचा मुहूर्त काढला होता, मात्र सात-बारामधील चुका आणि ऑनालाइनच्या तांत्रिक अडचणींमुळे हा मुहूर्त टळणार आहे. सात-बारांमधील त्रुटी दूर करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून महसूल विभागाकडून काम सुरू आहे. चावडी वाचन आणि अद्ययावत सॉफ्टवेअरच्या मदतीने ऑनलाइन सात-बारा करण्यावर महसूल विभागाचा भर आहे, मात्र त्रुटींमुळे अद्यापही हे शक्य होणार नसल्याने ऑनलाइन सात-बारासाठी मुदतवाढीची मागणी केला जात आहे.

मिळकतधारकांना बिनचूक आणि ऑनलाइन सात-बारा मिळावा यासाठी राज्य सरकारने सात-बाराचे रेकॉर्ड ऑनलाइन करण्याचे काम सुरू केले होते. गेल्या वर्षभरापासून हे काम सुरू होते. १ ऑगस्ट २०१७ पासून सर्व मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीचे सात-बारा ऑनलाइन पद्धतीनेच मिळावेत अशा सूचना महसूल विभागाला दिल्या होत्या. यासाठी चार महिन्यांपासून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये चावडी वाचनही करण्यात आले. चावडी वाचनातून कोल्हापूर जिल्ह्यातील सात-बारांमध्ये तब्बल दोन लाख चुका असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय नागरिकांच्या तक्रारींचेही समाधान झालेले नाही.

पीकपाणी व इतर हक्क या रकान्यांबाबत संभ्रमावस्था आहे. सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळेही सात-बारा सदोष बनत आहे. ऑनलाइनच्या तांत्रिक अडचणींमुळे महसूल विभागातील कर्मचारी आणि नागरिकही हैराण झाले आहेत, त्यामुळे ऑनलाइन सात-बारासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही मोजक्याच गावांमध्ये १ ऑगस्टच्या मुहूर्तावर ऑनलाइन सात-बारा काढणे शक्य होणार आहे. बहुतांश गावांमध्ये अद्यापही ऑनलाइन सात-बारात त्रुटी आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मुदत मागितली आहे. लोकप्रतिनिधींही याबाबत मुदतवाढीची मागणी केली आहे. ‘ऑनलाइन सात-बारासाठी मुदतवाढ मिळावी या मागणीचे निवेदन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले असून, लवकरच मुदतवाढ जाहीर होईल,’ अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंढरपूर

देशातील काही प्रमुख मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या उजनी धरणाच्या तपासणीसाठी केंद्रीय जल आयोगा (CWC)चे पथक दाखल झाले आहे. हे पथक धरणाची सुरक्षा व इतर बाबींचा बारकाईने अभ्यास करणार आहे. जल आयोगाने यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली आहे. या समितीत अमेरिकेतील एका भूगर्भ शास्त्रज्ञाबरोबरच देशातील विविध तज्ज्ञांचा समावेश आहे.

ही समिती तीन दिवस धरणाचा सर्वबाजूने अभ्यास करणार आहे. यात प्रामुख्याने धरणाचे बांधकाम भक्कम करणे आणि हायड्रोमेकॅनिकल भागांची सुरक्षा याचा अभ्यास केला जाणार आहे. सध्या नवीन धरणांची उभारणी अवघड बनली असताना पूर्वी बनवलेले हे मोठे प्रकल्प भविष्यात व्यवस्थित ठेवण्यासाठी ही समिती अभ्यास आणि तपासणी करत आहे. उजनी हे मॉडेल घेऊन धरणाचा अहवाल बनवण्यात येणार आहे . उजनी धरणाला ४० वर्षे पूर्ण झाली असून बांधकामाला जवळपास ५० वर्षे झाली आहेत.



गोपाळ कृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या या केंद्रीय पथकात अमेरिकन भूगर्भ अभ्यासक फ्लिंट यांच्यास सी. एस. माथूर, इ. डी. किलींत, विवेक त्रिपाठी, ए. के. सचंद्रा, वाय. पी. सरडा, ये. आर. अशोक, वसिष्ठ शिवशरण व घोश यांचा समावेश आहे. ही समिती तीन दिवस प्रत्येक भागाची पाहणी करून आपला अहवाल केंद्राला पाठवणार आहे. या समितीने धरणाच्या ५० वर्षाच्या इतिहासातील सर्व नकाशे, कागदपत्रे, माती आणि खडकांचे अहवाल ताब्यात घेतले आहेत. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौघुले , कार्यकारी अभियंता सोनेवार व इतर अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थान समितीने पक्षकार व्हावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाओ सुनावणीला विरोध करणाऱ्या दाव्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने त्रयस्थ पक्षकार व्हावे, अशी मागणी सोमवारी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे केली. या संदर्भातील अहवाल लवकरात लवकर राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाला पाठवावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

अंबाबाई मंदिरातील पारंपरिक पुजारी हटवून तेथे सरकारी पगारी पुजारी नेमावेत, या मागणीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे आहे. या सुनावणीला पुजाऱ्यांकडून विरोध होत असून पुजारी गजानन मुनिश्वर यांनी न्यायालयात दावा दाखल करून सुनावणी प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे. या दाव्याविरोधात संघर्ष समितीने केलेली त्रयस्थ पक्षकाराची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच प्रताप वरूटे यांचा एकमेव अर्ज दाखल करून घेतला आहे. त्यावर बुधवारी (ता. २) निर्णय होणार आहे.

या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सुभेदार यांची सोमवारी भेट घेतली. सुनावणीविरोधात समितीची त्रयस्थ पक्षकाराची मागणी नामंजूर झाली आहे. ‘मंदिराशी तुमचे थेट हितसंबंध नाहीत,’ असे सांगून न्यायालयाने संघर्ष समितीची पक्षकाराची याचिका फेटाळली आहे. ‘देवस्थान समितीचा मात्र यात थेट संबंध आहे. त्यामुळे त्यात देवस्थान समितीने त्रयस्थ पक्षकार व्हावे,’ अशी विनंती संघर्ष समितीने देवस्थान समितीचे देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. तसेच ‘या विषयावर आमचे म्हणणे पूर्ण झाले आहे, तरी सुनावणीचा अहवाल लवकरात लवकर सरकारकडे पाठवावा,’ अशी मागणी संघर्ष समितीने केली.

यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, डॉ. सुभाष देसाई, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, आर. के. पोवार, दिलीप देसाई, आनंद माने, राजेश लाटकर, बाबा पार्टे, शरद तांबट, सचिन तोडकर, अ‍ॅड. चारूलता चव्हाण उपस्थित होत्या.

अन्य ठिकाणचे निकाल सुपूर्द

संघर्ष समितीचे इंद्रजित सावंत यांनी काशी विश्वनाथ मंदिर, तिरूपती-बालाजी मंदिर, तसेच गुजरात व राजस्थानमधील मंदिरांचा निकाल जिल्हाधिकारी सुभेदार यांच्याकडे सुपूर्द केला. या मंदिरांमध्येही पूर्वी पारंपरिक पुजारी होते. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया होऊन तेथे सरकारी पुजारी नेमण्यात आले आहेत. यानुसार कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातही असा निर्णय व्हावा, अशी संघर्ष समितीची मागणी केली असल्याचे समिती सदस्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

संघर्ष समिती म्हणते

- देवस्थान समितीने त्रयस्थ पक्षकार व्हावे

- सुनावणीतील विषयावर संघर्ष समितीचे म्हणणे पूर्ण झाले

- अहवाल लवकर विधा व न्याय विभागाकडे पाठवावा

- इतर राज्यांतील मंदिरांप्रमाणे कोल्हापुरात निर्णय व्हावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाहीरांच्या अनाधिकृत पुतळ्याने तणाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सांगलीत दोन ठिकाणी अनाधिकृतपणे पुतळा बसविल्याप्रकरणी दोन पोलिस ठाण्यात ६० जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. मध्यवर्ती बसस्थानकाशेजारी झुलेलाल चौकात विकसित करण्यात आलेल्या आयलँडची नासधूस करून त्या ठिकाणी लोकशाहीरांचा पुतळा बसविल्याचे दिसताच तणाव निर्माण झाला. सिंधी समजाने आपले व्यवहार दिवसभर कडकडीत बंद ठेऊन संबधित पुतळा काढण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनीही महापालिकेच्या आयुक्तांना आदेश देऊन संबधित पुतळा काढण्यास सांगितले. मात्र, रात्री उशीरांपर्यंत परिस्थिती जैसे-थे होती.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी जागा देऊन सांगलीत पुतळा बसवावा, अशी वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याचा दावा करीत काहींनी सोमवारी पहाटे कर्मवीर भाऊराव चौकातील उद्यानात पुतळा बसविला. अनाधिकृतपणे आणि कोणतीही परवानगी न घेता पुतळा बसविल्याने विश्रामबाग पोलिसात ३० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. परंतु निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पुढील दहा दिवस पुतळा तसाच ठेवण्याचा आदेश दिल्याने वातावरण शांत होते. परंतु, मंगळवारी सकाळी झुलेलाल चौकात आयलँडची मोडतोड करून त्यावर अण्णा भाऊ साठेंचा पुतळा बसविल्याचे समजताच तणाव निर्माण झाला. तत्कालीन नगरपालिकेने १९८५मध्ये ठराव करून त्या चौकाचे झुलेलाल चौक, असे नामकरण केले होते. अलीकडे सिंधी समाजाने चौकाच्या शुशोभिकरणाची जबाबदारी घेतली. महापालिकेने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून चौक सुशोभिकरणासाठी दिला. त्या ठिकाणी कोणाही व्यक्तीचा पुतळा बसविला जाऊ नये, अशी अट घातली होती. त्यामुळे सिंधी समाजाने अटीला अधीन राहून मोठा खर्च करून चौक सुशोभित केला आणि त्याठिकाणी एक मासा आणि त्यावर ग्रंथ असे शिल्प साकारले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास काहींनी ते शिल्प बाजूला काढून ठेवले आणि त्या ठिकाणी अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसविला. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आल्यानंतर सिंधी समाजात खळबळ माजली. समाज व्यवसाय बंद ठेवून एकत्र आला. सुरुवातील महापौर, आयुक्त आणि नंतर अप्पर पोलिस अधीक्षक आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबधित पुतळा काढून घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याशी संपर्क साधून तो पुतळा काढून घेण्याचे आदेश दिले. महापालिकेने तत्काळ ३३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मंगळवारी रात्री उशीरापर्यंत त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात होता.
कर्मवीर भाऊराव पाटील चौकातील बागेच्या खुल्या जागेत अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा तात्पुरत्या स्वरुपात बसविल्याने फारशी गडबड झाली नव्हती. परंतु, पुन्हा झुलेलाच चौकातही असाच प्रकार झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. सिंधी समाजाने एकत्रित मेळावा घेऊन समाजाला संयमाचे आवाहन केल्याने परिस्थिती नियंत्रणाखाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तक्रार मिटविण्यासाठीपाच कोटींची खंडणी-----------------------------------------४० लाख रोख आणि ४ कोटी ५६ लाखांचे धनादेश घेताना सोलापुरातील पत्रकार, ठेकेदारला रंगेहात पकडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
जमिनीच्या व्यवहाराविरोधात दिलेली तक्रार मिटविण्यासाठी सुमारे पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या सोलापुरातील एका पत्रकारासह पाच जणांच्या टोळीला बार्शी पोलिसांनी पकडले. सोमवारी रात्री बार्शीतील एका सोसायटीतील प्राध्यापकाच्या घरात रोख ४० लाख रोख आणि चार कोटी ५६ लाखांच्या धनादेशाची देवाव-घेवाण होत असताना पोलिसांनी कारवाई करून त्यांना रंगेहाथ पकडले.
पत्रकार रवींद्र मनोहर दुबे (रा. पाणीवेस सोलापूर), सुभाष नागनाथ जाधव (गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर. रा. अशोक नगर, विजापूर रोड, सोलापूर), नितीन राजेंद्र वाजपेयी (रा. औरंगाबाद) आणि दर्शन दुबे, दर्पण दुबे (रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
सोलापूर येथील अचल अॅटो या चारचाकी वाहन विक्री व्यावसायिक आणि जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय असलेल्या सुहास गुरप्पा हुंबरवाडी (रा. वैष्णवी पार्क, सोलापूर) यांनी प्रकाश राजाराम बोलगमवार यांच्याकडून सोलापूर महानगरपालिका हद्दीतील गट नं. जुना ३१२, नवीन १३० मजरेवाडी सोलापूर, ही मिळकत सन २००६ साली खरेदी केली होती. महानगरपालिकेचे आरक्षण डिसेंबर २०१६मध्ये रितसर आदेशाने उठल्यानंतर त्याचे बाजारमूल्य वाढले. त्यानंतर हा व्यवहार बेकायदा असल्याची तक्रार पोलिस महासंचालक कार्यालय मुंबई यांच्याकडे करून संशयित आरोपींनी तक्रार मिटविण्यासाठी दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. संशयितांची बार्शीतील मध्यस्तामार्फत दोन दिवसांपासून तडजोड सुरू होती. तडजोडीने ५ कोटी सहा लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम देण्याचे जागा मालकाने मान्य केल्यानंतर बार्शीत कर्मवीर हाउसिंग सोसायटीजवळील मध्यस्ताच्या घरी सदरचा व्यवहार सुरू होता.
संशयितांकडून घटनास्थळाहून ५०० रुपयांच्या नोटांचे १० लाख रुपये, २०० हजार रुपयांच्या नोटांचे २० लाख रुपये, १००, ५०, २० आणि १० रुपयांच्या नोटांचे १० लाख रुपये ४० लाख रोख, ४ कोटी ५६ लाख रुपयांच्या किमतीचे लिहून घेतलेले धनादेश, ह्युंदाई कंपनीची क्रेटा मॉडेलचे चारचाकी वाहन, पाच मोबाइल आणि खंडणीच्या बदल्यात स्टँप पेपरवर लिहून दिलेले प्रतिज्ञापत्र, असा मुद्देमाल पोलिसांच्या पथकाने हस्तगत केला आहे.
सापळा रचून कारवाई झाली
सतत खंडणीची मागणी होत असल्याने मानसिक त्रास झालेले तक्रारदार सुहास गुरप्पा हुंबरवाडी यांनी बार्शी पोलिसांना या प्रकाराची कल्पना दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गजेंद्र मनसावाले यांनी सापळा रचून अत्यंत गोपनीयतेने संशयितांना मुद्देमालासह अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंत उड्डाणपूल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शिरोली जकात नाका ते शिवाजी पूल या मार्गावर उड्डाणपूल उभारणीसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचबरोबर सातारा-कागल दरम्यान सहापदरीकरणासाठी तीन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्पाचे चार टप्पे करुन २० डिसेंबर २०१९ पर्यंत तो पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही गडकरी यांनी बैठकीत दिली. महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेसाठी उचगाव, उजळाईवाडी, कणेरी आणि कागल या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

शहराचे प्रवेशव्दार असलेल्या शिरोली जकात नाका, कावळा नाका ते स्टेशन रोड हा सर्वाधिक रहदारीचा मार्ग आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी नित्याची बाब आहे. महामार्गाचे सहापदरीकरण आणि नागपूर-रत्ना​गिरी मार्गाचे चौपदरीकरण यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण पडणार आहे. हा ताण कमी करण्यासाठी शहरातून नवीन उड्डाणपूल उभारणीसह शहराभोवती रिंगरोडचा पर्यायही गडकरी यांनी सुचविला आहे. या बैठकीत गडकरी यांनी राज्यातील महामार्ग आणि सागरी मार्गांचा आढावा घेतला. बैठकीत खासदार धनंजय महाडिक यांनी शिरोली जकात नाका ते शिवाजी पुलापर्यंतच्या मार्गावर उड्डाणपूल उभारणीचा आग्रह धरला.

सातारा ते कागल या टप्प्यातील महामार्ग विस्तारीकरणाचे काम रखडले आहे. त्याच्या सहापदरीकरणाचे काम जलद झाले पाहिजे. त्याचवेळी सेवा रस्ते सुस्थितीत असावेत. प्रत्येक ५० किलोमीटरच्या टप्प्यावर प्रवाशांसाठी सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी. महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार ठिकाणी उड्डाणपूल बांधणीसंदर्भात चर्चा झाली.

बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, निरज वर्मा, डी. ओ. तावडे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्रा​​धिकरण व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


बास्केट ब्रीज उभारणी स्वतंत्र

कोल्हापूर शहरासाठी बास्केट ब्रीज उभारणीला मान्यता मिळाली आहे. ते काम सहापदरीकरणाच्या कामात समाविष्ट न करता स्वतंत्र करावे, अशी विनंती खासदार महाडिक यांनी गडकरी यांच्याकडे केली. गडकरींनी त्याला संमती देत महाडिक यांच्या सूचनांचा विचार करुन महामार्ग सहापदरीकरण आराखड्यात आवश्यक ते बदल करावेत, असे अ​धिकाऱ्यांना सांगितले.


कोल्हापुरातील वाहतूक व्यवस्थेसाठी शिरोली जकात नाका ते शिवाजी पूल रस्त्यावर उड्डाणपूल अत्यावश्यक आहे. सध्या नागपूर ते रत्नागिरी हा चारपदरी महामार्ग प्रस्तावित आहे. हा मार्ग शहरातून जाणार असल्याने वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण येणार आहे. उड्डाणपूल झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार‍ नाही.

धनंजय महाडिक, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठाप्रश्नी चर्चेची तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाच्यावतीने येत्या ९ ऑगस्टला मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व ती तयारी झालेली असतानाच मोर्चा काढण्याआधी शिष्टमंडळाने सरकारशी चर्चा करावी, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे. आतापर्यंत सरकारला जे जे करणे शक्य होते ते सर्वकाही केलेले आहे. तरीही सरकारने आणखी काही करावे असे वाटत असेल ते सर्व करायची आमची तयारी आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

कोपर्डी प्रकरणानंतर मराठा समाजाच्यावतीने बहुतांश जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या शहरांत भव्य मोर्चे काढण्यात आले. जवळपास ५५च्यावर मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकारने सकारात्मक भूमिका घेत मराठा तरुणांसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत, असे स्पष्ट करून पाटील म्हणाले की, मराठा समाजासाठी आरक्षण आणि अॅट्रॉसिटीचा मुद्दा अद्याप न्यायप्रविष्ठ आहे. सरकार त्यासाठी चर्चेतून तोडगा काढू इच्छिते. त्यासाठी चचेने मार्ग निघू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिभेने आले सौंदर्याला तेज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिसण्यासोबत ‘असणं’ किती आणि कसं महत्त्वाचं आहे हे सांगताना झळकणारा आत्मविश्वास, आजकालच्या मुलींना काय येतं या प्रश्नावर, पर्यावरण संवर्धन, अनाथ मुलांची सेवा, प्लास्टिक मुक्तीसाठी प्रयत्न, व्यवसायाच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत दिले जाणारे खणखणीत उत्तर, करिअरकडे पाहण्याचा ठाम दृ​ष्टिकोन आणि सक्षम बनण्यासाठीची जिद्द या गुणांनी परिपूर्ण युवतींच्या सहभागाने ‘महाराष्ट्र श्रावणक्वीन’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रतिभेसोबत सौंदर्याला तेज आले.

सौंदर्याला विचारांची आणि नव्या कल्पनांची वैचारिक जोड असेल तर ते सौंदर्य नजरेत भरते. या उक्तीची प्रचिती देणारा ‘श्रावणक्वीन २०१७’ सोहळा कोल्हापुरात रसिक प्रेक्षकांच्या मनामनावर कोरला. आपल्या मतातून, दृष्टिकोनातून आणि विचारांतून आपले असणेही विलोभनीय असू शकतं हे दाखवत ‘श्रावणक्वीन’च्या मंचावर आलेल्या प्रत्येकीने या स्पर्धेची नजाकत आणखी वाढवली. डॉक्टर, इंजिनीअर, आर्किटेक्ट अशा उच्चशिक्षित तरुणींनी मॉडेलिंग, अभिनयाच्या स्वारस्यातून सौंदर्यस्पर्धेच्या रँपवर पहिल्यांदाच पाऊल ठेवल्याचे सांगितले. तर सध्या अभिनय, मॉडेलिंग करत असलेल्या तरुणींनी ‘श्रावणक्वीन’चा मंच गॉडफादर असल्याची भावना व्यक्त केली.

स्पर्धेचे दुसरे सत्र सुरू झाले ते योगिता डागा हिच्या दिलखेचक बेली डान्सने. काहीसा हिप्पी लूक करत कमरेवर चकत्याची माळ लावून स्टेजवर आलेल्या योगिताने बेलीच्या ठेक्यावर झोकून देताच टाळ्याचा गजर झाला. तर त्रिशा भोळे हिने कला फेरीसाठी गाण्याची निवड केली आणि स्पर्धेचा सूर मिळवला. भगव्या रंगाची मॉडर्न नऊवारी नेसून आलेल्या सुविधा रावराणे हिने बेली डान्स करत वेगळेच फ्यूजन सादर केले. गायत्री शिंदे हिने गायलेल्या गाण्याला रसिकांनीही उत्स्फूर्त दाद दिली. वैष्णवी ​जाधव हिच्या अ​भिनयाने उपस्थितांना स्तब्ध केले. अनिशा राजमाने हिने एक वेगळाच कलाप्रकार सादर करत स्पर्धेला प्रबोधनाची जोड दिली. कुटुंबात किंवा परिचयातील कोणत्याही व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तर त्याचे प्राण वाचवता येतील अशा प्रथमोपचारांची माहिती तिने कलाफेरीत सादर करून संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. पांढऱ्या रंगाचा लांचा आणि गुलाबी ओढणी अशा पेहरावात आलेली रितिका पाटील हिने कथक नृत्यातील एक तराणा पेश केला. तर भविष्यात प्रभावी वक्ता होण्याची इच्छा असलेल्या तेजस्विनी कालेकर हिने या फेरीत एक भाषणच सादर केले.

आई माझे टॉनिक... बाबा माझी ताकद

‘माझ्या इथपर्यंतच्या प्रवासात आईची खूप साथ आहे’ असं सांगत सिद्धी सरनाईक हिने, आईमुळेच ती या मंचावर असल्याचे सांगितले. तीच गोष्ट इचलकरंजीच्या मयुरी वाडेकरचीही. वडिलांचा चेहराही न पाहिलेल्या मयुरीने आईच तिचे जग असल्याचे सांगताना डोळ्यात पाणी आले. खूप कष्टाने आईने वाढवले असून मॉडेलिंगसारख्या अधांतरी विश्वात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकींच्या पाठीशी त्याची आईच असल्याच्या भावना ओठावर आल्या. तर रेश्मा पवार हिने कला फेरीत बाबांवर आधारीत कविता सादर करत वडील आपली ताकद असल्याचे सांगितले.


स्पर्धेतील शेवटचा परफॉर्मन्स संपल्यानंतर प्रत्येकीच्याच चेहऱ्यावर श्रावण क्वीनच्या पहिल्या फेरीची विजेती कोण होणार याची उत्सुकता दिसत होती. अखेर परीक्षकांनी प्राथमिक फेरीतील विजेत्यांची नावे जाहीर करताच दिव्याने आनंद व्यक्त केला. तयारी करून आले असले तरी विजेती होईन असे वाटले नव्हते. पुढच्या फेरीसाठी जोमाने तयारी करणार आहे.

दिव्या सावंत, प्रथम

खरं तर मला बाइक चालवायला, घोडेस्वारी करायला, स्वीमिंग आणि ट्रेकिंग करायला आवडतं. माझा स्वभाव काहीसा टॉमबॉय आहे. हे काम मुलींचे नाही किंवा ते काम मुलांचे नाही ही वर्गवारीच मला पटत नाही. मला सगळ्या गोष्टी करायला आवडत असल्या तरी श्रावणक्वीनसारख्या सौंदर्य स्पर्धेत मी विजेती होईन असे वाटले नव्हते. मला जे वाटते ते ठामपणे मांडले. पुढच्या फेरीसाठी स्वताला अधिक सक्षम करेन.

​ऋग्वेदा कोडावे, फर्स्ट रनरअप

एकेकाळी माझे केस मोठे होते. घरी कुणाचीही परवानगी न घेता मी ते कापले आणि बॉयकट केला. काहीजणांनी चांगल्या तर काहीजणांनी वाईट प्रतिक्रिया दिल्या. घरातूनही ओरडून घेतले. पण मला वाटले म्हणून मी माझे साधे केसही कापू शकत नाही का? या प्रश्नाने मला अस्वस्थ केले. माझ्या आयुष्यातील ते वळण माझ्यात आत्मविश्वासाची पहिली ठिणगी टाकणारे ठरले. निर्णय घेणे आणि कोणत्याही परिस्थितीत त्या निर्णयावर ठाम राहणे हे माझे सूत्र आहे. या आत्मविश्वासालाच या मुकुटाने पावती दिली.

गायत्री शिंदे, सेकंड रनरअप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालयांचे अनुदान लाटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

व्यक्तिगत शौचालय बांधणीसाठी अर्ज करायचा, कागदपत्रे रंगवायची. सरकारी अनुदान लाटायचे पण प्रत्यक्षात बांधकामच करायचे नाही. सरकारी अनुदान लाटणाऱ्या कोल्हापूर शहरातील ३०० लाभार्थ्यांवर महापालिका प्रशासनाने कायदेशीर बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातल वॉर्ड निहाय संबंधितांची यादी तयार करुन नोटिसा पाठविल्या आहेत. अनुदानाचा गैरवापर केलेल्या लाभार्थ्यांवर पोलिस कारवाईसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. दुसरीकडे महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी २९ लाभथार्थ्यांनी अनुदानाची रक्कम परत केली आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागरिकांना व्यक्तिगत शौचालय बांधणीसाठी १५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. यामध्ये केंद्र सरकार चार हजार, राज्य सरकारकडून आठ हजार आणि महापालिका स्वनिधीतून तीन हजार रुपयांचे अनुदान देते. लाभार्थ्यांनी महापालिकेने अर्ज केल्यानंतर संबंधितांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारितील ११ वॉर्डनुसार या कामावर देखरेख ठेवली जाते. अनुदानास पात्र ठरल्यानंतर सहा हजार रुपये तत्काळ खात्यावर जमा केले जातात. दुसऱ्या टप्प्यात नऊ हजार तर शेवटी तीन हजार रुपये जमा होतात. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून या कामाचा आढावा घेऊन निधी वितरित केला जातो. दरम्यान गेल्या दीड वर्षात वितरीत केलेल्या अनुदानाचा आढावा घेतला. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत १३४० नागरिकांनी अनुदान योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

दरम्यान महापालिकेच्यासर्व्हेक्षणात शहर आणि उपनगरातील ३०० हून अधिक लाभार्थ्यांनी अनुदानाची रक्कम घेतली, पण शौचालयाचे बांधकामच केले नसल्याचे सामोरे आले आहे. आरोग्य विभागाच्या वॉर्ड विभागाकडून माहिती संकलित केली आहे. या लाभार्थ्यांना प्रशासनाने नोटिसा काढल्या आहेत. १५ दिवसांत बांधकाम केले नाही तर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. ३०० पैकी १०० लाभार्थ्यांनी महापालिकेच्या नोटिशीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. तर काही जणांनी आठ दिवसांची मुदत घेतली आहे. या कालावधीत त्यांच्याकडून कसलीही कार्यवाही झाली नाही तर कारवाई होणार आहे.

२९ लाभार्थ्यांकडून रक्कम परत

शौचालय बांधण्याच्या अनुदानाची रक्कम इतर कामासाठी वापरणाऱ्या लाभार्थ्यांना नोटिसा पाठविणे सुरू आहे. नोटीस मिळाल्यानंतर २९ लाभार्थ्यांनी गेल्या आठवडाभरात अनुदानाची रक्कम परत जमा केली आहे. जे लाभार्थी अनुदानाची रक्कम जमा करत आहेत, त्यांना कारवाईतून वगळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र जे रक्कमही परत करणार नाहीत आणि शौचालय बांधणीतही टाळाटाळ करत आहेत त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसऱ्या टप्प्यात २५०० अर्ज

व्यक्तिगत शौचालय बांधणीसाठी दुसऱ्या टप्प्यात २५०० नागरिकांनी अनुदानासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी ७०० जण अपात्र ठरले आहेत. उर्वरित अर्जांची छाननी व इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी प्राप्त अर्जांचे काम सध्या सुरू असल्याने नव्याने अर्ज स्वीकृतीचे काम दोन महिने बंद राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्या, ऋग्वेदा, गायत्रीला मिळाला सौंदर्यमुकुट

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकापेक्षा एक देखण्या आणि बुद्धिचातुर्याची चुणूक दाखवणाऱ्या तरूणींमध्ये रंगलेल्या श्रावण क्वीन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत कोल्हापुरातून दिव्या सावंत, ऋग्वेदा कोडावे आणि गायत्री शिंदे यांनी पुणे येथे होणाऱ्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. मंगळवारी हॉटेल 24 k या हॉटेलमध्ये रंगलेल्या श्रावण क्वीनच्या प्रा​​थमिक फेरीतील पहिला क्रमांक दिव्या सावंत हिने पटकावला. तर फर्स्ट रनरअपचा किताब ऋग्वेदा कोडावे तर सेकंड रनरअपचा किताब गायत्री शिंदे हिला मिळाला. अमोघा ब्युटी ब्रँडच्या संचालिका ब्युटिशियन डॉ. वृषाली शिंदे, मिसेस महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेतील सेकंड रनरअप गौरी शिरोडकर, पर्सनॅलिटी डेव्हलपर अनुराधा घाटगे आणि सौंदर्यतज्ज्ञ अनुराधा पित्रे यांनी परीक्षण केले. कोरिओग्राफर सागर बगाडे यांच्या निवेदनाने स्पर्धेची रंगत अधिकच वाढली.

पहिल्या स्पर्धकापासूनच या स्पर्धेचा मंच थिरकायला सुरूवात झाली. शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, एकपात्री अभिनय, कविता वाचन, अभिनय अशा सरस कला सादर करत तरूणींनी टॅलंट राउंडमध्येही वैविध्यपूर्ण कलाविष्काराचे दर्शन घडवले. स्पर्धकांमध्ये कुणी प्राणीप्रेमी तर कुणी पर्यावरण संवर्धनात अग्रेसर. सौंदर्यासोबत सामाजिक जाणिवांनाही स्पर्श झाल्यामुळे श्रावणक्वीनच्या रँपवर कॅटवॉक करणाऱ्या युवतींची सामाजिक बाजूही उजेडात आली. परीक्षकांच्या प्रश्नफेरीत महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाड, करिअर की कुटुंब या पर्यायातून निवड करताना होणारी कसरत, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा अनेक वैचारीक गोष्टीही तपासल्या गेल्या. सौंदर्याला विचारप्रतिभा लाभली तर ते सौंदर्य खुलून येते याचे प्रत्यंतर देणारी श्रावणक्वीन ही स्पर्धा ठरली. ओळख, टॅलंट आणि परीक्षक प्रश्न अशा तीन फेऱ्यांमध्ये ‘श्रावणक्वीन’ बनण्यासाठी आलेल्या स्पर्धक तरूणींमध्ये चांगलीच चुरस रंगली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झिरो पेंन्डसी’मुळे दिरंगाईला चाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फायलींच्या ढिगाऱ्यांतून मोकळा श्वास घेऊन प्रशासन गतिमान करण्यासाठी झिरो पेंन्डसी उपक्रम राबवला जात आहे. विविध कारणांमुळे फाइल्स दाबून ठेवण्याला यामुळे चाप लागणार आहे. प्रत्येक फाइल कोणत्या टप्यात आहे, हे झिरो पेंडन्सीमुळे कळणार आहे. त्याचा फायदा प्रामाणिक कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या सामान्य नागरिकांना होणार आहे. प्रत्येक फाईलची जबाबदारी निश्चित होणार आहे. मात्र, या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना काटेकोरपणे काम करावे लागणार असल्यानेच झिरो पेंन्डसीला विरोध होत आहे.

सर्व सरकारी कार्यालयात फायलींचा ढिगारा आहे. टेबल, खुर्च्या ठेवण्यास जागा नाही, एवढी थप्पी आहे. एक जुनी फाईल शोधण्यासाठी कमीत कमी एक दिवस लागतो. अनेकदा ‌वशिल्याने फायलींचा निपटारा वेळेत होतो, हे जगजाहीर आहे. सामान्य लोकांना मात्र, कामासाठी हेलपाटे मारावे लागतात. हे ‌‌चित्र बदलण्यासाठी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी झिरो पेंन्डसी उपक्रम राबविण्याचा आदेश दिला. त्यानुसार ‌पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांत दीड महिन्यापासून फायलींचा निपटारा करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामध्ये १९६२ पासूनचे जुनी कागदपत्रे बाहेर काढली आहेत. त्यामध्ये वर्षानुवर्षे जपून ठेवणे आवश्यक असलेली कागदपत्रे नव्या कापडात बांधणे, कोणत्या गठ्यात कोणती फाईल आहेत, ते नोंदवणे अपेक्षित आहे. त्याशिवाय प्रत्येक विभागात प्रलंबित कामांची यादी तयार करणे, निर्गत करावयाची कागदपत्रे बाजूला काढणे, अभिलेख वर्गीकरण करणे, प्रतिक्षादिन नोंद वही ठेवणे, आगामी कामांची नोंदवही ठेवणे, अनावश्यक कागदपत्रे नष्ट करणे आदी कामे केली जात आहेत. झिरो पेंन्डसी व अभिलेख वर्गीकरणाचे काम करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. अनेक कर्मचारी स्वतःहून हे काम करीत आहेत. मात्र कामचुकार कर्मचारी नेहमीप्रमाणे कारणे सांगून त्यातून त्याविरोधात बोलत आहेत.

पहिल्या टप्प्यातच विरोध

झिरो पेंन्डसी उपक्रमात दुसऱ्या टप्यात प्रलंबित कामांची यादी तयार करणे, विशिष्ट वेळेत ती कामे मार्गी लावण्याचे काम करावे लागणार आहे. पहिल्या टप्यात त्यास विरोध करायचा. झिरो पेंन्डसी उपक्रम गुंडाळायला लावायचा, जुनी कामे मार्गी लावायची नाहीत, जेणेकरून आपली दुकानदारी सुरू राहील असाच काहींसा डाव असल्याचे बोलले जात आहे. झिरो ‌पेंन्डसीमुळे गरीब, सामान्य लोकांची प्रलंबित कामे मार्गी लागणार आहे. त्यांना न्याय मिळणार आहे. त्यामुळे या उपक्रमाला सामान्य लोकांतून पाठिंबा दिला जात आहे.

‌जबाबदारी त्यांचीच

निर्धारित वेळेत कामे होण्यासाठी सेवा हमी कायदा, नागरिकांची सदन आहे. झिरो पेंन्डसीची जबाबदारीही संबंधित टेबलच्या कर्मचाऱ्याचीच आहे. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. सामान्यांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे या उपक्रमामुळे जबाबदारी निश्चितीला वेग येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन अपघातांना दोघे ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरनोबतवाडी आणि पन्हाळा मार्गावरील पडवळवाडी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात रघुनाथ गणपती गवड (वय ४७, रा. बाडेवाडी, ता. पन्हाळा) आणि संतोष भाऊसो मिरजे (वय ३५, रा. तामगाव, ता. करवीर) या दोघांचा मृत्यू झाला. गवड हे राजर्षी शाहू मार्केट यार्ड येथे हमाली करत होते तर मिरजे हे किराणा दुकानदार होते.

पुणे बेंगळुरू महामार्गावर सरनोबतवाडी हद्दीतील रस्त्यांवर अज्ञात वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने मोटारसायकलस्वार संतोष भाऊसो मिरजे जागीच ठार झाले. मंगळवारी दुपारी मिरजे हे दुचाकीवरून किराणा मालाचे साहित्य घेऊन तामगावकडे जात असताना त्यांचा तोल गेल्याने ते रस्त्यांवर पडले. यावेळी पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहन त्यांच्या अंगावरुन गेले. अपघाताची माहिती कळताच गांधीनगर पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर पडवळवाडी (ता. करवीर) येथे मोटार सायकल घसरून झालेल्या अपघातात रघुनाथ गणपती गवड (वय ४७, रा. बाडेवाडी, ता. पन्हाळा) ठार झाले. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास अपघात झाला होता. महादेव खोत यांच्या मोटार सायकलवर पाठीमागे गवड बसले होते. दोघे मार्केट यार्डात कामावर येत असताना अपघात झाला. गंभीर जखमी झालेल्या गवड यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुजारी वादातून मंदिराची बदनामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सध्या अंबाबाई मंदिराबाबत सुरू असलेल्या बदनामीला देवस्थान समिती आणि पुजारी यांच्यातील वादच कारणीभूत असून त्यामुळेच देवीची पावित्र्य चव्हाट्यावर आले आहे. भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने योग्य भू​मिका घेण्याची गरज आहे अशी भूमिका शिवाजी पेठ अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने अध्यक्ष सुरेश पोवार यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, पुजारी हटाओचा वाद सध्या ऐरणीवर आहे. देवी ही महालक्ष्मी नसून अंबाबाई आहे हा वाद गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. तिरूपती देवस्थानकडून येणारा शालू स्वीकारण्याची प्रथा देवस्थान समितीने सुरू केली. पुजारी हटाओ या मागणीने जोर धरल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समिती नेमण्याचे आदेश दिले. मात्र या समिती नेमण्याच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देवस्थानच्या अखत्यारितील जमीनींचे लेखापरीक्षणाचा मुद्दा वादग्रस्त आहे. लाडू प्रसादातील भ्रष्टाचार, नोकरभरतीसाठी संचालकांच्या नातेवाईकांची वर्णी याबाबतही देवस्थान समितीचे मौन आहे. यामुळे अंबाबाई मंदिराची बदनामी होत आहे. भविष्यात गैरसमजांमुळे पर्यटकांची संख्या घटली तर त्याला देवस्थान समिती आणि पुजारी यांच्या वादातून निर्माण झालेल्या समस्याच कारणीभूत ठरतील. त्यामुळे या प्रकरणी योग्य न्याय करणारी आणि कायदेशीर वैधता असणारी समिती स्थापन करावी अशी मागणीही या संघटनेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमित बांधकामांसाठी कृत्रिम वाळूचा वापर शक्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

‘मानवनिर्मित कृत्रिमरित्या उत्पादित केलेली वाळू नदीच्या वाळूची जागा निश्चितच घेऊ शकते. या वाळूचा पुरवठा पुरेसा होणे शक्य आहे’ असे प्रतिपादन इंजिनीअर सुधीर हंजे यांनी केले. ‘नदीच्या वाळुला कृत्रीम वाळुचा पर्याय’ या विषयावर असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्सच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलत होते.

इंजिनीअर सुधीर हांजे म्हणाले, ‘सध्या बांधकाम क्षेत्रात नदीच्या वाळूची टंचाई हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे. त्यावर पर्याय म्हणून २० ते २२ टक्के स्वस्त असणारी, कृत्रिमरित्या उत्पादित केलेली वाळू वापरणे शक्य आहे. भविष्यात ही वाळू आणखी स्वस्त मिळू शकेल. क्रशर रॉक, फ्लाय अॅश, ग्रानाइट आणि जुन्या बांधकामाची खरमाती यांपासून ही वाळू तयार केली जाऊ शकते. विशेष म्हणजे त्यामध्ये आपल्याला विविध ग्रेडिंगचे उत्पादन घेणेही शक्य आहे.’

इंजिनीअर हांजे म्हणाले, ‘सध्या बांधकाम क्षेत्रात वाळूच्या तुटवड्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. वाळू मिळत नाही म्हणून बांधकामे थांबत आहेत. प्रकल्पांच्या किंमती वाढत आहेत. यावर पर्याय म्हणून कृत्रिम वाळूचा वापर केला पाहिजे. नदीतून वाळूचा अमर्याद उपसा होत असल्याने पर्यावरणाची साखळी बिघडत असून नदीतील जीवसृष्टीही धोक्यात आली आहे. आपण नैसर्गिक वाळूचा आणि गौण खनिजांचा वापर काटकसरीने केला पाहिजे. पुढील पिढीचा विचार आपण केला पाहिजे. ती आपली जबाबदारीही आहे.’

अध्यक्ष सुधीर राऊत म्हणाले, ‘बांधकाम उद्योगाशी संबंधीत उपक्रमांमुळे कोल्हापूरच्या असोसिएशनचा नावलौकिक राज्यभर निर्माण झाला आहे. सध्या बांधकाम क्षेत्रात वाळूचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला पर्याय निर्माण केला पाहिजे. त्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.’

कार्यक्रमास संस्थेचे व्हाइस प्रेसिडन्ट आर्किटेक्ट राज डोंगळे, सेक्रेटरी प्रसाद मुझुमदार, अनुप जयस्वाल, महावीर चौगुले आणि बहुसंख्येने इंजिनीअर व आर्किटेक्ट उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे हत्या: मारेकऱ्यांवर १० लाखांचं बक्षीस

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपींची माहिती देणाऱ्यास राज्य सरकारनं १० लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. विनय पवार व सारंग अकोलकर हे पानसरे हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी आहेत.

कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर विनय पवार आणि सारंग आकोलकर या दोघांनी गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. पानसरे यांच्या पत्नी उमा यांनीही या दोघांचे फोटो ओळखले आहेत. याशिवाय एका साक्षीदारानेही पवार आणि आकोलकर पिस्तूल मिळवण्यासाठी बिंदू चौकातील दुकानात आल्याची साक्ष पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला समीर गायकवाड याच्याशी या दोघांचाही संपर्क आल्याचे तपासात समोर आलं आहे. मात्र, पानसरे यांची हत्या झाल्यापासून हे दोघीही फरार आहेत. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही बजावण्यात आलं आहे. तरीही ते अद्याप पोलिसांच्या हाती आलेले नाहीत.

या पार्श्वभूमीवर त्यांची माहिती देणाऱ्या बक्षीस जाहीर करण्याचा प्रस्ताव विशेष तपास पथकानं (एसआयटी) राज्य सरकारकडं ठेवला होता. सरकारनं हा प्रस्ताव मान्य करत आरोपींविरोधात बक्षीस जाहीर केलं आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे-पाटील यांनी ही माहिती दिली. सीबीआयनं याआधीच दोन्ही संशयितांवर ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलक आज पुतळा काढून घेणारसिंधी समाजासमोर व्यक्त केली दिलगिरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगलीत झुलेलाल चौकात एका रात्रीत बसवण्यात आलेला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा स्वतःहून काढून घेण्याचे लेखी पत्र राष्ट्रविकास सेनेने बुधवारी महापालिकेच्या आयुक्तांना दिले. दरम्यान सिंधी समाजाने बुधवारीही आपले व्यवहार बंद ठेवून पुतळा काढून घेण्याची मागणी कायम ठेवली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेत प्रशासन, पोलिस आणि पुतळा बसविणारे यांच्यात बैठक झाली. त्यानंतर संबधित आंदोलकांनी सिंधी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यासमोर जाऊन दिलगिरी व्यक्त केली. आज, गुरुवारी सकाळी दहा वाजता अण्णा भाऊ साठेंचा पुतळा हलवण्याचे लेखी दिले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे निमित्त करुन एक आंदोलन म्हणून काहींनी सांगलीतील झुलेलाल चौकात शिल्फ हटवून त्या ठिकाणी लोकशाहीरांचा पुतळा बसविला होता. त्यामुळे सिंधी समाज नाराज झाला. त्यांनी आपली व्यवहार बंद ठेवले. काहीसा तणावही निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिकेत बैठक घेण्यात आली. या वेळी लोकशाहीरांसह अन्य राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांसाठी ३ कोटी ८१ लाखांच्या प्रस्तावाला महासभेची मान्यता घेऊन तो प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सरकारकडे पाठवला जाईल, असे लेखी पत्र महापालिकेच्या प्रशासनाने आंदोलकांना दिले.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, यांनी मध्यस्थी करून आयुक्त रवींद्र खेबूडकर, महापौर हारुण शिकलगार, उपायुक्त सुनिल पवार, पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या उपस्थितीत बुधवारी आंदोलकांशी पुन्हा चर्चा घडवून आणली. स्मारक होईपर्यत पुतळा हटवणार नाही, अशी भूमिका घेणारे आंदोलक चर्चेच्या दरम्यान दोन-तीन दिवस तरी पुतळा असू द्या, असे म्हणू लागले. मात्र, महापौर शिकलगार यांनी झुलेलाल चौक हा सिंधी समाजाला सुशोभिकरणासाठी दिला आहे. या समाजाने स्वतः पैसे खर्च करुन चौकाचे सुशोभिकरणाचे काम सुरू केले आहे. या चौकात शिल्प साकारण्याचे काम सुरु असताना राष्ट्रविकास सेनेने कायदा हातात घेऊन बेकायदा पुतळा उभारणे चुकीचे आहे, अशी ठाम भूमिका मांडली.
माजी मंत्री ढोबळे यांनी ‘महापालिकेने दिलेल्या प्रस्तावाचा आदर करुया, रागाच्या भरात अण्णा भाऊ साठेंचे स्मारक होत नाही, म्हणून ही घटना झाली आहे. आम्ही २५ वर्षे राजकारणात आहोत. त्यामुळे यातून सामंजस्याने मार्ग काढूया,’ अशी भूमिका मांडली. शिवाजी डोंगरे यांनीही टोकाची भूमिका न घेता सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.
त्यानंतर पुन्हा महापौरांच्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये महापौर शिकलगार, माजी मंत्री ढोबळे, राष्ट्र विकास सेनेचे पदाधिकारी यांची पुन्हा गुप्त बैठक झाली. शेवटी बाहेर येऊन महापौर शिकलगार यांनी आज, गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यत राष्ट्र विकास सेनेने लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचा पुतळा सन्मानने काढून घेऊ, असे लेखी दिले असल्याचे सांगितले. त्यानंतर ढोबळे, डोंगरेसह आंदोलकांनी झुलेलाल चौकात येवून सिंधी समाजासमोर दिलगीरी व्यक्त करीत पुतळा काढून घेण्यात येईल, असे जाहीर केले.

लोकशाहीरांच्या स्मारकाचा प्रस्ताव
पाठविण्याचा फडणवीस यांचा आदेश
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सांगलीत भव्य स्मारक उभा करण्याची मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी निधी व जागा यांच्यासह प्रस्ताव सदर करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.
स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या शाहिरीने लोकजागृती करणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे मराठी साहित्य विश्वासात मोलाचे योगदान आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे, यासाठी बहुजन समाजातील कार्यकर्त्यांसह विविध संघटनांनी केलेल्या मागणीकडे आजपर्यंत दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने त्वरीत अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारून वैचारिक चळवळीचे व्यासपीठ उभा करावे, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे गाडगीळ म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images