Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पुण्याचे दोघेजण वाचले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जोतिबाचे दर्शन घेऊन कोल्हापूरकडे येणाऱ्या मोटारीच्या चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ती रेडेहोहात पडली. शनिवारी रात्री नऊच्या सुमारात हा प्रकार घडला. सुरेंद्र गुरुराज राव (वय ५५) आणि विजय सरवदे (वय ५०, दोघेही रा. निगडी, पुणे) या दोघांनी प्रसंगावधान राखून बाहेर उड्या मारल्यामुळे दुर्घटना टळली. रात्री उशिरापर्यंत क्रेनच्या सहाय्याने पाण्यात बुडालेली वाहन काढण्याचे काम सुरू होते. ही घटना समजताच या परिसरात गर्दी झाल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण झाला.

पोलिसांनी सांगितले की, देवदर्शन करून राव आणि सरवदे कोल्हापूरकडे येत होते. रात्री नऊच्या रेडेडोहजवळ रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी रस्त्याच्या बाजूच्या पाण्यात गेली. सुमारे चार ते पाच फूट पाणी असल्याने या दोघांची भंबेरी उडाली. परिस्थिती ओळखून दोघांनी गाडीबाहेर उड्या टाकल्या. गाडी मात्र पाण्यात अडकली. शिवाजी पुलावर तैनात असलेल्या पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. महापालिका आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी दाखल झाले. पहिल्यांदा गाडी काढण्यासाठी ट्रॅक्टर आणला. मात्र ट्रॅक्टरने मोटार निघत नसल्याने क्रेन आणि हायमास्ट दिवा आणण्यात आला. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने बोटीतून गाडीचा शोध सुरू केला. मोटार काढण्यात साडेदहाच्या सुमारास कर्मचाऱ्यांना यश आले. करवीरचे डीवायएसपी सूरज गुरव, पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांच्यासह मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सदाभाऊ खोत यांचे ‘स्वाभिमानी’ सीमोल्लंघन

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

Tweet:@gurubalmaliMT

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राम राम ठोकण्याचे संकेत दिल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची नवी संघटना दसऱ्याच्या मुहूर्तावर स्थापन होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नव्या संघटनेत ‘स्वाभिमानी’ हा शब्द कायम राहणार आहे. सध्या संघटनेचे नाव काय असावे याची चाचपणी सुरू आहे. पावसाळी अधिवेशन संपताच राज्यभर दौरा करत नव्या संघटनेची नांगरणी करण्यात येणार आहे. योग्य मशागत झाल्यानंतरच नव्या संघटनेची पेरणी करण्याची खोत यांची चाल आहे. मात्र, नवी संघटना स्थापणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून खासदार राजू शेट्टी आणि मंत्री खोत यांच्यातील दुरावा कमी होण्याऐवजी वाढत आहे. दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्याने संघटना फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. ‘झेंडा माझा, दांडा माझा, दोरी माझी आणि खांदाही आपल्याच कार्यकर्त्यांचा,’ असा नारा खोत यांनी दिला आहे. यामुळे ते नवीन संघटना काढणार हे नक्की आहे. त्यांना संघटनेत ठेवायचे की नाही याचा फैसला चार दिवसांत होण्याची शक्यता आहे. सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा शेट्टी यांनी यापूर्वीच दिला आहे. याबाबतचा निर्णय २६ जुलैरोजी घेण्यात येणार आहे.

स्वाभिमानीतील सध्याच्या हालचाली पाहता सदाभाऊंची कोंडी करण्यासाठी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी हकालपट्टीची वाट न पाहता सदाभाऊ नवीन संघटना स्थापन करण्यास प्राधान्य देणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. सोमवारपासून अधिवेशन आहे. पंधरा दिवसांत ते संपेल. अधिवेशन संपताच सदाभाऊ राज्यभर दौरा करत नव्या संघटनेची नांगरणी करणार आहेत. आपल्यासोबत कोण कोण येऊ शकतील, कोणत्या भागात ताकद मिळेल? याबाबत माहिती घेतल्यानंतरच नव्या संघटनेची पेरणी करण्याचा बेत आहे.

दौरा संपताच नव्या संघटनेची स्थापना होणार आहे. नव्या संघटनेच्या नावात ‘स्वाभिमानी ’ हा शब्द मात्र कायम असेल. त्यामुळे सदाभाऊंच्या सातबाऱ्यावर हेच नाव चढणार हे पक्के आहे. स्वाभिमानी हा शब्द कायम ठेवत संघटनेचे नाव निश्चित करण्यासाठी सध्या चाचपणी सुरू आहे. महिनाभर राज्याचा दौरा काढल्यानंतर साधारणतः दसऱ्याच्या मुहूर्तावर नव्या संघटनेची घोषणा करण्याची शक्यता आहे.

०००

मी माझी बाजू संघटनेसमोर मांडली आहे. पुढील निर्णय समितीने घ्यायचा आहे. त्या निर्णयानंतरच माझी भूमिका जाहीर करणार आहे. ज्यांनी अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला, त्यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार आहे.

सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा जोर ओसरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात दिवसभर मिळालेल्या उघडीपीनंतर पावसाचा जोर ओसरला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी दिवसभरात दहा फुटांनी कमी झाली. तासाला सरासरी दोन इंचाने पाणी पातळी कमी होत आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला असला तरी पंचगंगा नदीची इशारा पातळी कायम आहे. रविवारी रात्रीपर्यंत पाणीपातळी ४० फुटांवर होती. राधानगरी धरण ९२ टक्के भरले आहे. जिल्ह्यात अजूनही ४१ मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

दरम्यान, रविवारी सुट्टी असल्याने नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी पिकनिक पाँइट आणि शिवाजी पुलावर गर्दी केली. हौशींना शिस्त लावण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली. पोलिस आणि नागरिकांमुळे वादाचे प्रसंगही उद्भवले. रेडेडोहाचा पाणी अद्याप रस्त्यावर असल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरून वाहतूक बंद आहे. परिसरातील गावांत जाण्यासाठी शिवाजी पूल फक्त हलक्या वाहनांसाठी खुला आहे. पाणलोट क्षेत्रात आणि शहरात पावसाचा जोर रविवारी ओसरला. राधानगरी धरण ९२ टक्के भरले आहे. धरणाच्या वीजगृहातून २२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. आठवडाभर झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील धरणांचा साठा वाढला आहे. सरासरी सर्वच धरणे ८० टक्के भरली आहेत. रविवारी गगनबावडा ३१ मिलीमीटर, आजरा २६, चंदगडमध्ये २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तीन तालुके वगळता अन्य तालुक्यात सरासरी १० ते १२ मिलीमीटर पाऊस झाला.

रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील ५८ बंधारे पाण्याखाली होते. रात्रीपर्यंत ३ बंधारे वाहतुकीसाठी खुले झाले. जिल्ह्यात अजूनही ४१ मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गे वळविली आहे. प्रमुख ५ राज्यमार्ग, ९ प्रमुख जिल्हा मार्ग, १२ इतर जिल्हा मार्ग आणि ५ ग्रामीण जिल्हा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गे वळविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूअड्ड्यांवर महिलांचा हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

हिंगणगाव (ता.हातकणंगले) येथे बंद असलेले गावठी दारुचे अड्डे पुन्हा चालू झाल्याने संतप्त महिलांनी रविवारी रात्री हल्लाबोल करुन विक्रेत्यांना बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. कुंभोजमधील महिलांनी गावातील बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या गावठी दारु अड्यांच्या विरोधात एल्गार पुकारत गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन करत दारु विक्रेत्यांना व तळीरामांना पाठलाग करत झोडपले होते.

महिलांच्या वाढत्या विरोधाने गावातील सर्व विक्रेत्यांनी अड्डे बंद केले होते. परंतु दारुबंदी असल्याने कुंभोजमधील तरुण वर्ग दारु पिण्यासाठी शेजारील हिंगणगाव येथे जात असल्याची माहिती महिलांना समजली. त्यामुळे महिलांनी रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सर्व अड्ड्यांवर हल्ला केला. तसेच गावठी दारु रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला.यावेळी दारु विक्रेत्या महिलांनी आंदोलनकर्त्यांना शिवीगाळ केल्याने मोठ्या प्रमाणात वादावादी झाली, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.

दरम्यान, ही माहिती समजताच हातकणंगले पोलिस ठाण्याचे तीन पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दारु विक्रेत्या महिलांना ताब्यात घेतले.रविवारी झालेल्या आंदोलनामध्ये आक्काताई घाटगे, ताराबाई कांबळे,मंगल आवळे, उजवला घाटगे, सुरेखा सुवासे,आनिता घाटगे, शालन लोंढे, शोभा घाटगे, सुमन भोरे, लता पांढरे,रूक्काबाई घाटगे, जानका घाटगे,आक्काताई घाटगे, मंगल आवळे आदींसह पन्नासहून अधिक महिला सहभागी झाल्या.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकाकचा धबधबा ठरतोय आकर्षण

$
0
0

बेळगाव ः बेळगावनजीकचा गोकाकचा धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. गोकाक धबधब्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे धबधबा ओसंडून वाहत आहे.

घटप्रभा नदीवरील हा धबधबा पावसाळ्यात अमेरिकेतील नायगारा धबधब्याची आठवण करून देतो. भले मोठे पात्र असलेली घटप्रभा नदीतील पाणी पावसाळ्यात रोरावत खाली कोसळते. त्यातून होणार आवाज, उडणारे तुषार पाहणे हा एक आनंददायी अनुभव असतो. घटप्रभा नदीचे पाणी बावन्न मीटर उंचावरून खाली कोसळते.

घटप्रभा नदीवरील ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आलेला झुलता पूल देखील पर्यटकांचे आकर्षण आहे. झुलत्या पुलावरून जाणाऱ्या व्यक्तीला आपला तोल सावरणे अवघड होते आणि त्याची फजिती उडते. ६५९ फूट लांबीचा हा झुलता पूल आजही सुस्थितीत आहे. एक जुने विद्युतनिर्मिती केंद्र देखील धबधब्याजवळ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टीचा बोजा वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात समान पाणीपुरवठ्यासाठी (२४ बाय ७) दरवर्षी पाणीपट्टीत वाढ प्रस्तावित असतानाच, आता जलसंपदा विभागाने पाणी वापर दरांत १४ टक्के वाढ सुचविली आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास महापालिकेचा पाण्यावरील खर्च वाढण्याची भीती असल्याने कोल्हापूरकरांना पुन्हा पाणीपट्टीच्या अतिरिक्त बोजाचा सामना करावा लागेल.

या प्रस्तावात ग्रामपंचायती आणि नगरपालिकांच्या घरगुती वापराच्या पाणीपट्टीत कोणतीही वाढ सुचविली नसली तरी महापालिकांच्या घरगुती वापराच्या पाणीपट्टीत १४.३ टक्के वाढ प्रस्तावित आहे. या वाढीसह पाणी वापरावर कडक निर्बंध लादले असून, मंजूर कोट्यापेक्षा पाणी वापर जास्त होत असल्यास अतिरिक्त दराने पाणीपट्टी वसुलीचा प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे, महापालिकेच्या पाणी खर्चात वाढ होणार आहे.

कोल्हापूर महापालिकेला दरवर्षी २.७०६ टीएमसी पाणी कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी टीएमसी पाणी वापरले जाते. केंद्रीय पाणी वाटप निकषांनुसार दरडोई दीडशे लिटर पाणी वापर अपेक्षित असल्याने त्यानुसार जादा पाणीवापर करणाऱ्यांकडून अतिरिक्त दराने पाणीपट्टी आकारली जाणार असल्याचे संकेत आहेत. मंजूर पाणीवापराच्या १२५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणी वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास दुप्पट दराने पाणीपट्टी आकारली जाणार आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर दरवर्षी पाणीपट्टीत १० टक्के वाढ करण्याची तरतूद केली आहे.

=======

पाण्याचे दर वाढल्यास उत्पन्न व खर्चाचा मेळ बसणे अवघड होणार आहे. कारण दर वाढल्यास महापालिकेच्या खर्चात वाढ होणार आहे. या वाढीव खर्चासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधावे लागतील.

सुरेश कुलकर्णी, जलअभियंता, पाणीपुरवठा विभागप्रमुख
===
पाणी वापरावर पालिकेतर्फे सध्या होणार खर्च ः ३६ कोटी रुपये

प्रस्तावित १४ टक्के वाढीने होणारा संभाव्य खर्च ः अंदाजे ४२ कोटी रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकांची ‘लाइफ लाइन’ वाढली

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रावर गर्भवतींना मिळणाऱ्या सुविधा आणि आशा कर्मचाऱ्यांसाठी कार्यान्वित असलेल्या ‘चिरायू’ योजनेमुळे जिल्ह्यातील शून्य ते ५ वयोगटातील बालकांची ‘लाइफ लाइन’ वाढली आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या सुविधांमुळे बालमृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. मात्र, माता मृत्यू प्रमाणात असमानता दिसून येत आहे. बालमृत्यूचे प्रमाण राज्यात १८.५८ टक्के आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हेच प्रमाण १३.४२ टक्के आहे. त्यातून जिल्ह्याची आरोग्य सुविधा सक्षम होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यातील आरोग्य सेवा विविध कारणांनी नेहमीच टीकेचे लक्ष बनते. प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये मिळणाऱ्या सुविधा, तेथील औषधसाठा आणि डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या उपचारांबाबत नागरिकांत असंतोषाचे वातावरण असते. काहीवेळा अनेक आरोग्य केंद्रांना लक्ष्यही केले गेले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल होत गेले. विशेषत: बालमृत्यू आणि मातामृत्यूबाबत आरोग्ययंत्रणा खूपच दक्ष राहिल्याचे दिसून येते. गर्भवतींना १०२ आणि १०८ क्रमांकाच्या अॅम्ब्युलन्समधून सुविधा दिल्या जात असल्याने बालमृत्यू प्रमाण रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. मात्र, मातामृत्यूचे प्रमाण अद्याप चिंताजनकच आहे. २०१२-१३ मध्ये जिल्ह्यात ३८ मातांचा प्रसूतीवेळी मृत्यू झाला. २०१३-१४ मध्ये हे प्रमाण ३३ पर्यंत कमी करण्यात यश आले. मात्र, त्यानंतरच्या दोन वर्षांत अनुक्रमे ४० व ४४ मातांचा प्रसूतीवेळी मृत्यू झाला. २०१६-१७ मध्ये पुन्हा हे प्रमाण ३१ वर आले. त्यामुळे मातामृत्यू रोखण्यावर यंत्रणेला विशेष भर द्याव लागणार आहे.

याउलट बालमृत्यूची स्थिती आहे. न्यू बॉर्न कॉर्नर, न्यू बॉर्न स्टॅबिलायझर युनिट, सिक न्यू बॉर्न केअर, जननी सुरक्षा योजना, आदींमुळे बालमृत्यू रोखण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. २०१३-१४ मध्ये जिल्ह्यातील ४९१ बालमृत्यू झाले होते. २०१४-१५ मध्ये ४०५ बालकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच्या दोन्ही वर्षात अनुक्रमे १८० आणि १५८ बालमृत्यूच्या घटना घडल्या. २०१४-१५च्या तुलनेत हे प्रमाण निम्म्याने कमी झाले. त्यामुळे आरोग्याच्या मिळणाऱ्या सुविधांमुळे बालकांची लाइफलाइन वाढल्याचे दिसून येत आहे.

‘चिरायू’ योजना ठरली फलदायी

जिल्हा परिषदेने एक हजार लोकसंख्येसाठी एक ‘आशा’ कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात दोन हजार ८०० पैकी दोन हजार ६७५ ‘आशा’ कर्मचारी ग्रामीण भागात कार्यरत आहेत. यासाठी जिल्हा परिषदेने स्वनिधीतून ‘चिरायू’ ही कर्मचारी प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. स्थानिक पातळीवरील कर्मचारी असल्याने त्यांचा घरोघरी संपर्क असतो. त्याचा फायदा गावातील, पर्यायाने आरोग्यसेवेला झाल्याने बालकांचा जन्मदर वाढविण्यास ‘चिरायू’ योजना फलदायी ठरली आहे.

गेल्या पाच वर्षांतील बालमृत्यूचे प्रमाण

वर्ष बालमृत्यू मातामृत्यू

२०१२-१३ ४०५ ३८

२०१३-१४ ४९१ ३३

२०१४-१५ ४०५ ४०

२०१५-१६ १८० ४४

२०१६-१७ १५८ ३१


एक हजार लोकसंख्येमागे एक ‘आशा’ कर्मचाऱ्याची नियुक्ती केल्याने गर्भवतींची काळजी सुरूवातीलपासूनच घेता येते. त्याचबरोबर न्यू बॉर्न कॉर्नर, न्यू बॉर्न स्टॅबिलायझर युनिट व सिक न्यू बॉर्न केअर, आदी सुविधांमुळे जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यात यश आले आहे. हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी नागरिकांनी सरकारी सुविधांचा लाभ घ्यावा.

डॉ. एफ. ए. देसाई, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी

००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस ऑफर्सचाही

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पावसाबरोबरच शहरात मान्सून सेलमधील विविध ऑफर्सचा धमाकाही सुरू आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मूळ किमतीवर पन्नास टक्के सूट आणि एकावर अनेक फ्री अशा ऑफर्स सध्या शोरुमच्या बाहेर झळकत आहेत. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चप्पल अशा विविध वस्तूंवर मान्सून ऑफर दिल्या जात आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि गणपती, दसरा, दिवाळी या सणांपूर्वी स्टॉक क्लिअरन्साठी विक्रेत्यांची लगबग सुरू सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सून सेलचा धमाका सुरू झाला आहे.

शहरातील राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, गांधीनगर परिसरातील कपड्यांच्या शोरुमध्ये मोठ्या प्रमाणात ऑफर दिल्या जात आहेत. शिवाय शहरातील सर्वच मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट देण्यात येत आहेत. नेहमीपे॓क्षा कमी दरात वस्तू मिळत असल्यामुळे शनिवारी आणि रविवारी खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. ही गर्दी कॅश करण्यासाठी शक्यतो शनिवारी, रविवार अशा विकएंडला मोठ्या प्रमाणात ऑफर दिली जात आहे. शहरातील रिलायन्स मॉल, स्टार बझार, डी मार्ट, बिग बझार येथेही मोठ्या सवलती देण्यात येत आहेत.

कपड्यांवर सेल

राजारामपुरी, महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी आणि गांधीनगरात कपड्यांचे मोठे मार्केट आहे. या ठिकाणी स्टॉक क्लिअरन्साठी विविध ऑफर्स देण्यात येत आहेत. ब्रँडेड कपड्यांवर विशेष ऑफर दिल्या जात आहेत. लिव्हाइज, पीटर इंग्लंड, मुफ्ती अशा ठिकाणी ३० ते ५० टक्के ‌डिस्काउंट दिला जात आहे. शिवाय लेडीज कपड्यांवर बाय ३ गेट २ फ्री किंवा बाय २ गेट १ फ्रीच्या ऑफर्स दिल्या जात आहेत.

इलेक्ट्रॉनिक मार्केट

मान्सूमध्ये विशेषतः वॉशिंग मशीन, फ्रीज, कुलर, एसी अशा वस्तूंवर मोठ्या ऑफर्स दिल्या जातात. तसेच काही ठिकाणी टीव्ही, मोबाइल अशा वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डिस्काउंट ऑफर दिली जाते. काही विक्रेत्यांनी लोनची सुविधाही शोरुमच्या माध्यमातून पुरविली आहे.


ब्रँडेड कपड्यांवरही ऑफर्स

शहरात काही ठिकाणी मल्टी ब्रँडेड शोरुम असल्यामुळे एकाच ठिकाणी अनेक नामवंत ब्रँडचे कपडे मिळतात. सर्वसाधारणपणे ब्रँडेड कपड्यावर सवलत कमी असते. पण मान्सूमध्ये राजारामपुरीमधील ब्रँडेड कपड्यांवर ३० ते ५० टक्के डिस्काउंटच्या ऑफर्स दिल्या जात आहेत.


‘ऑनलाइन’वरही ऑफर्स

ऑनलाइन शॉपिंगकडील कल लक्षात घेता स्मार्ट फोनच्या माध्यमातून तसेच वेगवेगळ्या कंपन्यांच्या ऑनलाइन बाजारपेठांत अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. घरबसल्या हव्या त्या-वस्तू ऑनलाइनच्या माध्यमातून मागविता येत असल्यामुळे तसेच सध्या ऑनलाइनवरही मान्सूनची ऑफरचा लाभ घेतला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळांना दारूचा विळखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील शाळा आणि प्रार्थनास्थळांभोवती दारू दुकानांचा विळखा पडत आहे. शाळा, कॉलेज, प्रार्थनास्थळांपासून ७५ मीटर अंतराबाहेर दारू दुकानांना परवाना देण्याचा निकष आहे. मात्र शहरात काही ठिकाणी थेट शाळा आणि प्रार्थनास्थळांना लागूनच दारू दुकाने सुरू आहेत. हवाई अंतर मोजण्याऐवजी वळणदार रस्त्यांचे अंतर मोजून निकषांची पूर्तता केली जात आहे. स्थलांतरित दारू दुकाने सुरू झाल्यानंतर हा विळखा आणखी घट्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दारू दुकाने आणि शाळा, कॉलेज, प्रार्थनास्थळांत किमान ७५ मीटर अंतर असावे, या नियमाला सोयीस्कर बगल दिली गेली आहे. अनेक ठिकाणी शहरात शाळा परिसरात दारू दुकाने सुरू आहेत. काही दुकाने मंदिराला लागूनच आहेत. या दुकानांना कोणते नियम लागू केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार महामार्गांवरील ५०० मीटर अंतरातील दारू दुकाने बंद झाल्यानंतर काही विक्रेत्यांनी मोक्याच्या जागा मिळवल्या आहेत. हॉकी स्टेडियमसमोरील इमारतीत नव्याने सुरू झालेले वाइन शॉप सोसायटीच्या मंदिरापासून अवघ्या ३० मीटरवर असल्याचा परिसरातील नागरिकांचा दावा आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभागासह जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रारी झाल्या. हॉकी स्टेडियममध्येही मद्यपींचे अतिक्रमण झाल्याने खेळाडूंची सुरक्षा धोक्यात आहे.

ओढ्यावरील गणपती मंदिरालगत एक दारूचे दुकान आहे. मंदिरालगतचे हे दुकान कसे सुरू राहिले असा प्रश्न नागरिकांचा आहे. कसबा बावडा येथील रेणुका मंदिरासमोर काही अंतरावर परमिट रुम आहे. माईसाहेब बावडेकर हायस्कूलसमोरही परमिट रुम, बार आहे. बिंदू चौकाजवळील प्रार्थनास्थळासमोर दारू दुकान आहे. येथील बारमध्ये दिवसभर तळीरामांची वर्दळ असते. शाळेच्या कोपऱ्यापासून काही मीटरवरील या बारसमोर विद्यार्थ्यांची नेहमीच वर्दळ असते.

विळखा घट्ट होण्याचा धोका

महामार्गांचे डिनोटिफिकेशन न झाल्यास अनेक दारू दुकाने मोक्याच्या ठिकाणी ठाण मांडणार आहेत. यासाठी अंतराच्या निकषात सोयीस्कर पळवाटा काढल्या जात आहेत. शाळा, प्रार्थनास्थळांमधील हवाई अंतर मोजावे अशी नागरिकांची मागणी आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून वेडीवाकडी वळणे, जिने, पायऱ्यांचेही अंतर मोजून निकष पूर्ण केले जातात. बदलत्या निकषांनी स्थानिकांच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राचीही गरज उरलेली नाही. त्यामुळे दारू दुकानांचा विळखा घट्ट होण्याची भीती आहे.

तक्रारींची होणार चौकशी

अंतर मर्यादेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी उत्पादन शुल्क विभागाकडे नेहमी येतात. गेल्या काही दिवसांत तक्रारींत वाढ झाल्याने शाळा, कॉलेज आणि प्रार्थनास्थळांजवळील दारू दुकानांची तपासणी केली जाणार आहे. ज्या दुकानांबाबत तक्रारी आहेत त्यांना नोटिसा पाठवून म्हणणे मागविले जाईल.

समाधानकारक खुलासा न आल्यास अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे.

नव्या सर्वेक्षणाची गरज

दारू दुकानांना परवानगी देताना दोन वाइन शॉपी, परमिट रुम आणि देशी दारू दुकानांतील किमान ५०० मीटर अंतराची अट आहे. या अंतरातही गोलमाल केल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील सर्वच दुकानांची पाहणी करून त्यांचे शाळा, प्रार्थनास्थळांपासूनचे अंतर मोजण्याची गरज आहे. अनेकदा उत्पादन शुल्क विभागाचे काही कर्मचारी-विक्रेत्यांत संगनमताने निकष डावलले जातात. त्यामुळे नव्याने दारू दुकानांचा सर्व्हे केल्यास वस्तुस्थिती समोर येईल.

========

निकषांची नियमानुसार पूर्तता होत असेल तरच दारू दुकानांना परवाने दिले जातात. त्यातूनही काही विक्रेत्यांनी नियम भंग केला असेल तर चौकशी केली जाईल. नियमांची पुरेशी माहिती नसल्याने नागरिकांच्या तक्रारी नेहमीच येतात. गरज असेल तर सर्व्हेही करू.

गणेश पाटील, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग

दारू दुकानांना परवाने देतानाच प्रत्यक्ष जागेवर येऊन उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अंतर मोजतात. नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी आम्ही असोसिएशनच्या पातळीवर दक्षता घेतो. नियमांबाहेर जाऊन कुणी विरोध करीत असेल तर तेही योग्य नाही.

महेश गणवाणी - सदस्य, कोल्हापूर जिल्हा वाईन मर्चंट असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयना ७५ टक्के भरले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ३४ हजार क्युसेकपर्यंत पोहोचली आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासांत चार टीएमसीने वाढ झाली असून, धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसी झाला आहे.
सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजा संपलेल्या चोवीस तासांत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे १५० मिमी, नवजा येथे ९७ मिमी महाबळेश्वर येथे १३४ मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी दिवसभर पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर कायम होता.
सोमवारी निसरे येथील जुना फरशी पूल पाण्याखाली गेला तर ढेबेवाडी विभागात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे वांग-मराठवाडी धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे.त्यामुळे धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तारळे विभागातील तारळी धरणही निम्म्यापेक्षा जास्त भरले आहे. या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाल्याने बळीराजाने भात रोप लागणीची कामे आणखी गतिमान केली आहेत. सोयाबीन, भुईमूग, भात, ज्वारी या पिकांना खतांची मात्रा देण्याचे कामही सुरू असल्याचे शेतशिवारांतील चित्र दिसून येत आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सलग सहा दिवस मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने कोयना धरणातील शिवसागर जलाशयातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील पाण्याची आवकही कमी झाली होती. कराड, पाटणसह विभागात कडक ऊन पडले होते.

कराड तालुक्यातही हजेरी
पाटणसह कराड तालुक्यातही सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्याच्या पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी असले तरी दक्षिण, पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढण्यासही मोठी मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिद्धेश्वर दर्शनासाठी सोलापुरात गर्दी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
ओम नम: शिवाय, शंभो शिवशंकर, श्री सिद्धेश्वर महाराज की जय, असा जयघोष करीत सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत हजारो भक्तांनी सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतले.
पहाटे मंदिरातील गाभाऱ्यात पूजाविधी पार पडला. त्यानंतर गदगीस अभिषेक करून योगसमाधीची विधिवत मंत्रोपचाराच्या जयघोषात पूजा बांधण्यात आली. दरम्यान, सिद्धेश्वर मंदिरातील महाराजांच्या योगसमाधीवर आकर्षक फुलांची सजावट करण्याची परंपरा अखंडितपणे सुरू आहे. पहिल्या सोमवारी योगसमाधीवरील मेघडंबरी विविध फुलांनी सजविण्यात आली होती. सिद्धेश्वर भक्त गणपती घोडेकर यांच्यावतीने भारत फ्लॉवरचे भारत तेलसंग यांनी पांढरी आणि पिवळी शेवंती, पिवळा आणि केशरी झेंडू, आष्टर आदी पाच प्रकारची बंगळूरू येथून आणलेली सुमारे ६०० किलो फुले वापरून तब्बल २० कर्मचाऱ्यांनी दोन दिवस आणि एक रात्र कामातून मेघडंबरी सजविण्यासाठी कष्ट घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाला हवेत ५५०० कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरला स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याच्या निर्णयाची घोषणा पुढील महिन्यात होणार आहे. १५ ऑगस्टपूर्वी स्थापन होत असलेल्या या प्राधिकरणाने विकासाचा मार्ग खुला होणार असून विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे. दरम्यान, प्राधिकरणातून होणाऱ्या विविध विकासकामांच्या अमंलबजावणीसाठी साडेपाच हजार कोटींचा निधी महापालिकेस हवा आहे. तशी मागणी महापालिकेने सरकारकडे केली आहे. पहिल्या टप्यातच शंभर कोटी निधी मिळणार असल्याने विकासकामांचा नारळ फुटण्यास मदत होणार आहे.

कोल्हापूर शहराची गेल्या पन्नास वर्षात एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे विकासाला अडथळा येत आहे. हद्दवाढीसाठी चाळीस वर्षे विविध पातळीवर प्रयत्न सुरू होते. पण, राजकीय नेत्यांनी त्यांच्या सोयीसाठी त्याला विरोध केला. गेल्यावर्षी हद्दवाढीची घोषणा होण्याची जवळजवळ सर्व तयारी झाली होती. जिल्हाधिकारी, पालकमंत्री, विशेष समिती आणि मुख्यमंत्रीदेखील याबाबत सकारात्मक होते. पण ऐनवेळी काही राजकीय नेत्यांनी टोकाचा विरोध केल्याने सरकारने एक पाऊल मागे घेतले. हद्दवाढीला पर्याय म्हणून प्राधिकरणाचा मुद्दा पुढा आणला. वर्षभर त्यावरही चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत.

वर्षानंतर आता प्राधिकरणाची​ घोषणा होण्याची वेळ जवळ आल्याचे दिसत आहे. येत्या पंधरा ऑगस्टला कोल्हापूरच्या प्राधिकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करण्याची शक्यता आहे. तशी सर्व तयारी करण्यात आली आहे. पन्नासपेक्षा अधिक गावे यामध्ये समावेश करण्यात येणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नेमण्यात येणार आहे. शिवसेनेला यामध्ये उपाध्यक्षपद देण्यात येणार असल्याचे समजते. जिल्हाधिकारी, महापौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अ​धिक्षक अभियंता, उपसंचालक भूमी अभिलेख यांच्यासह अनेकांचा यामध्ये समावेश आहे.

प्राधिकरण झाल्यास महापालिकेस साडेपाच हजार कोटींचा निधी मिळावा अशी मागणी महापालिकेने सरकारकडे केली आहे. प्रशासकीय इमारत, रस्ते, उद्यान, स्मशानभूमी, दवाखाना, वाहतूक व्यवस्था सुधारणा, उड्डाणपूल, मल्टीलेव्हल कार पार्किंग, रंकाळा संवर्धन यासाठी साडेतीन हजार कोटींची गरज आहे. रिंगरोड व इतर जमीनींच्या भूसंपादनासाठी दोन हजार कोटी रुपये आवश्यक आहेत. त्यामुळे सरकारने हा निधी तातडीने दिल्यास शहराच्या विकासाला गती देता येईल असा महापालिकेने स्पष्ट केले आहे.

प्राधिकरण झाल्यास सरकार तातडीने निधी देणार आहे. पहिल्या टप्यातच तातडीने शंभर कोटी निधी सरकारकडून मिळण्याची शक्यता आहे. मागणीच्या प्रमाणात हा निधी अतिशय कमी आहे. पण निधी देण्याची सुरूवात होणार विकासकामांना त्याचा उपयोग होणार आहे. ​आगामी दोन वर्षानंतर विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे तातडीने मोठ्या प्रमाणात निधी देत भाजपच्यावतीने वातावरण निर्मीती करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या प्राधिकरणाची तातडीने घोषणा करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील चौघांना अटक

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मिरज

रेल्वेवर दरोडा टाकून प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना मिरज रेल्वे पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. चौघेही संशयित कोल्हापूरचे आहेत. चंद्रकांत भिकन पवार (वय २२, कावळा नाका) आकाश शिवाजी गवळी (२८) सागर अशोक कांबळे (२८, दोघेही रा. निळा चौक, विचारे माळ) आणि रोहन नंदकुमार जगताप (१९, भगवा चौक, विचारे माळ) अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २१ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रोहन जगताप आणि आकाश गवळी या दोघांवर कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिस ठाण्यात याआधी गुन्हे दाखल आहे. रोहन सध्या जामीनावर होता.

काही तरुण रेल्वेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या पथकाने प्लॅटफॉर्मवर पाळत ठेवली होती. त्यावेळी हे चौघेही संशयित रविवारी रात्री स्टेशनवरील पाच नंबर प्लॅटफॉर्मवर संशयितरित्या फिरत होते. त्यांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे एक सुरा, मिरची पूड असे साहित्य सापडले. तसेच त्यांच्याकडे रोख रक्कम, महागडे मोबाइल, सिमकार्ड असा मुद्देमालही सापडला. पोलिसांनी तो जप्त केला आहे.

पुणे विभाग रेल्वे पोलिस अधीक्षक प्रभाकर बुधवंत, अप्पर पोलिस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय अधिकारी नंदकुमार घोरपडे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबिन्सचा विळखा घट्टच

$
0
0


कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर शहरातील प्रमुख चौक, सरकारी कार्यालये, चित्रपटगृहांच्या परिसरात अनधिकृत केबिन्स, टपऱ्या, फोफावल्या आहेत. राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून शहरातील सुमारे ५६० केबिनधारकांच्या अतिक्रमणाला पाठबळ दिले जात आहे. या अतिक्रमणांमुळे शहराचे विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचा वाहतुकीच्या नियोजनात अडथळा ठरत आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरात ५६० अनधिकृत केबिन्स उभारण्यात आल्याचे उघड झाले आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाकडे २७० केबिन्सची नोंद आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार अपंगांसाठी कल्याणकारी योजना राबवण्याचे बंधन महापालिकेला आहे. त्यानुसार महापालिकेच्या महसुली जमेपैकी तीन टक्के रक्कम अपंगांच्या कल्याणासाठी वापरली जाणे आवश्यक आहे. २०१५-२०१६ मध्ये महानगरपालिकेने अपंगांसाठी १७३ केबिन्स तयार केल्या आहेत. त्यांचे वाटप करण्यात येत आहे. महानगरपालिकेने अपंगांच्या घरापासून जवळ असलेल्या ठिकाणी केबिन थाटण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत. सायबर चौक, राजोपाध्येनगर, जरगनगर, आरटीओ, कसबा बावडा, रेल्वे फाटक, टेंबलाई मंदिर, दसरा चौक ते कसबा बावडा रस्ता येथे अपंगांसाठी केबिन उभारण्यात नियोजन सुरू केले आहे. मात्र, त्यातही झोल सुरू झाला आहे.

महापालिकेतर्फे अपंगांसाठी केबिन दिल्या जात असल्याने हुबेहूब तशीच रचना करून केबिन बसविण्याचा गैरप्रकार सुरू झाला आहे. अशा बनावट केबिन शहरातील काही चौकात, रस्त्यांवर अनधिकृतपणे थाटण्यात आल्या आहेत. अशा केबिनवर नगरसेवक, अधिकारी, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने कारवाईसाठी अधिकारी, कर्मचारी धजावत नाहीत. अनधिकृत केबिन्सविरोधात सर्वसाधारण सभा व स्थायी समितीत नगरसेवक प्रशासनावर टीका करतात. मात्र कारवाई करण्यास गेल्यास नगरसेवकांसह ‘सर्वपक्षीय’ विरोध होतो.

इथे आहेत अनधिकृत केबिन्स

बिंदू चौक, सीपीआर चौक, महावीर गार्डन, खाऊगल्ली , खासबाग, लक्ष्मीपुरी, दसरा चौकासह शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत केबिन्स उभारल्या जात आहेत. कारवाईला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना बनावट बायोमेट्रीक कार्डची झेरॉक्स दाखवून अरेरावी केली जात आहे. केबिन तयार करणाऱ्यांमध्ये एका नगरसेवकाच्या नातलगांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. ‘विशिष्ट’ वॉर्डातच या केबिन वाढत असल्याचा आरोप नगरसेवकांसह अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. या नगरसेवकांना महानगरपालिकेतील सत्ताकारण बिघडू नये म्हणून जिल्ह्यातील नेतेमंडळी खतपाणी घालत आहेत. काही नगरसेवकांनी ‘हप्तेबाजी’ सुरू केल्याची कुजबूज महानगरपालिकेत सुरू आहे.

अनेकांकडून हप्तेबाजी...

केबिन्सवर कारवाई होऊ नये म्हणून केबिनचालक अधिकाऱ्यासह नगरसेवक, राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना हप्ते देत असल्याची चर्चा आहे. आपला मतदार कायम रहावा यासाठी नगरसेवक अनधिकृत केबिनधारकाची पाठराखण करतात. तर काही नगरसेवकांनी थेट केबिन उभारण्यासाठी पागडी घेतल्याची चर्चा आहे. काहीजणांनी महिन्याचे हप्ते ठरवून घेतले आहेत. अनधिकृत केबिनवर कारवाई होऊ नये यासाठी काही संघटना धडपडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वासराला पायावर उभे राहण्याचे बळ

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मिरज
जन्मत:च एका पायाने अधू असलेल्या वासराच्या पायावर टप्प्याटप्प्याने तीन यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान देण्याचे काम प्रसिद्ध अस्थिरोतज्ज्ञ डॉ. किरण प्राणी यांनी केले. यापूर्वी डॉ. प्राणी यांनी सांगलीच्या प्रतापसिंह उद्यानातील सिंहापासून ते कुत्रा, मांजरासह आता खिलार जनावरांपर्यत यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.
खात्रीशीर उपचार करणारे म्हणून डॉ. किरण प्राणी यांची ख्याती महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोव्यातही आहे. त्यांनी माणसांबरोबरच अनेक प्राण्यांचेही मोडलेली हाडे बसविली आहेत. गेल्या आठवड्यात डॉ. प्राणी यांच्या बेडग येथील शेतातील गायीने वासराला जन्म दिला होता. वासराचा जन्मताच त्याचा पुढील डावा पाय अधू होता. वासरास ‘आर्थोग्रायफोसिस’ हा आजार झाल्याचे तज्ज्ञांनी निदान केले होते. यावर डॉ. प्राणींचे समाधान झाले नाही. त्यांनी घालवाडचे डॉ. शिवाजी मगदूम यांच्याशी चर्चा करून वासरावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वासराच्या पायाला ‘एक्स्टर्नल फिक्सेटर’ लावण्याची पहिलीच शस्त्रक्रिया केली. यामुळे वासराच्या हाडांच्या सांध्यातील वाकडेपणा दूर झाला. त्यानंतर स्नायूंची वाढ होण्यासाठी दुसरी शस्त्रक्रिया केली. तिसऱ्या शस्त्रक्रियेत वासराच्या पायाला प्लास्टर घालण्यात आले. काही दिवसांनी प्लास्टर काढल्यानंतर वासरू नेहमीप्रमाणे बागडू लागले. डॉ. किरण प्राणींनी आपल्या नावातील साधर्म्याप्रमाणेच अधू वासराच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवदान देत आपल्या नावाचीही प्रचिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोटरचा शॉक बसूनसोनतळीत युवकाचा मृत्यू

$
0
0

कुडित्रे



चिखलीपैकी सोनतळी (ता. करवीर) येथील अक्षय शिवाजी माने (वय २३) या युवकाचा इलेक्ट्रीक मोटरचा शॉक बसून जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी १० वाजता ही घटना त्याच्या राहत्या घरी घडली.

अक्षय हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डीग्रीच्या शेवटच्या वर्षात रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील तासगावकर शिक्षण संस्थेत शिकत होता. आठवड्यापूर्वी कॉलेज सुरू होणार म्हणून तो कॉलेजकडे गेला होता. पण बहुतांशी वर्गमित्र अजून आले नव्हते म्हणून तो गुरुवारी २० जुलै रोजी गावी परत आला होता आणि पुढील आठवड्यात पुन्हा कॉलेजला जाणार होता.

सोमवारी सकाळी वडील कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे जनावरे धुण्यासाठी अक्षयने घरातील पाण्याची इलेक्ट्रिक मोटर चालू केली. गाई धुवून झाल्यावर मोटर उचलून घरात नेत असताना अचानक अक्षयला शॉक बसला आणि तो खाली कोसळला. यावेळी मोटर त्याच्या अंगावर पडली. त्यामुळे काही क्षणातच त्याची हालचाल बंद झाली. हा प्रकार लक्षात येताच त्याची आई संगीता यांना आरडाओरडा करत लगेच वीजप्रवाह बंद केला. मात्र तोपर्यंत अक्षयचा जागीच मृत्यू झाला होता. गरीब , हुशार व होतकरू अक्षयच्या जाण्याने त्याच्या कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षांच्या दालनासमोर शिक्षकांचा ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आंतरजिल्हा बदलीद्वारे आलेल्या १०६ शिक्षकांनी सोमवारी सोयीच्या शाळा मिळाव्यात याप्रमुख मागणीसाठी ‌जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या मारला. अध्यक्षांना भेटण्यासाठी सर्व शिक्षक एकाचवेळी आले. मात्र, सर्वांना दालनात न सोडल्याने त्यांनी हा प‌‌वित्रा घेतला. शेवटी शिक्षकांना बाहेर काढण्यात आले.

गेल्या आठ दिवसांपासून बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले शिक्षक पदस्थापनेचा आदेश मिळण्यासाठी जिल्हा परिषदेत दररोज येतात. मात्र, शिक्षण विभागाने पूर्वतयारी न केल्याने पदस्थापनेच्या प्र‌क्रियेस विलंब झाला. सोमवारी दुपारी बारा वाजता शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीत एकाचवेळी प्रवेश केला. ग्रामविकास विभागचे अवर सचिव भरत पाटील हे अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांच्यासोबत अॅन्टीचेंबरमध्ये चर्चा करीत होते. सर्व शिक्षक अध्यक्षा महाडिक, सचिव पाटील, सीईओ डॉ. खेमनार यांना भेटण्यासाठी अध्यक्षांच्या दालनात येऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले.

केवळ तीन ते चार शिक्षकांनी भेटावे अशी विनंती स्वीय सहायक आणि पोलिसांनी केली. त्यामुळे नाराज झालेल्या शिक्षकांनी बाहेर जाऊन अध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या मारला. शेवटी जिल्हा दूर्गम शिक्षक संघाचे पद‌ाधिकारी, पोलिसांनी त्या शिक्षकांना बाहेर काढले. बाहेर जाऊन शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या आवारात सायंकाळपर्यंत ठिय्या मारला. सायंकाळी पदस्थापनची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गेले.

सचिवांना निवेदन

वर्षानुवर्षे दूर्गम तालुक्यांत काम केलेल्या शिक्षकांना न्याय मिळावा, दूर्गम शाळांची संख्या कमी करू नये, अशी मागणी जिल्हा दूर्गम शिक्षक संघाचे अध्यक्ष निवास पाटील, उपाध्यक्ष राहुल जाधव, संजय पोतदार, रवी शेंडे यांनी अवर सचिव पाटील, सीईओ डॉ. खेमनार यांना निवेदन दिले.

सचिवांच्या आदेशाने दूर्गम शाळांच्या यादीसंबंधीच्या तक्रारप्रश्नी प्रशासनाशी चर्चा केली. शिक्षक संघटनांशी स्वतंत्रपणे चर्चा करणार नाही. मात्र, माझ्याकडे दिलेले निवेदन सीईओ डॉ. खेमनार यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

भरत पाटील, अवर सचिव, ग्रामविकास

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीचे वर्ग आजपासून सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून मंगळवारपासून अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. शहरातील ३३ कनिष्ठ कॉलेजमध्ये अकरावीचे वर्ग सुरळीत सुरू करण्याची यंत्रणा कार्यरत झाली असून कॉलेजचा पहिला दिवस अनुभवण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्येही उत्सुकतेचे वातावरण आहे.

श्रावण महिना सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अकरावीचे वर्ग सुरू होत असल्यामुळे कॉलेजच्या आवारातही उत्साही वातावरण आहे. दहावीनंतर पहिल्यांदाच कॉलेजच्या गुलाबी विश्वात पाऊल टाकण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी काही कॉलेजमध्ये खास तयारी करण्यात आली आहे.

अकरावीसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीन शाखांसाठी शहरातील ३३ महाविद्यालयामध्ये साडेतेरा हजार प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी प्रवेशप्रक्रियेतंर्गत ७४०९ प्रवेश निश्चित झाले आहेत. महाविद्यालयीन आणि संस्था कोट्यातील राखीव प्रवेश प्रक्रिया जुलैअखेर सुरू राहणार आहे. त्यामुळे रिक्त जागांच्या प्रवेशासाठी ३१ जुलैअखेर कॉलेजमध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी राहणार आहे. दरम्यान केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे अकरावीचे वर्ग मंगळवारी सुरू होत असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.

दृष्टिक्षेपात प्रवेश

१३ हजार ५००

शहरातील ३३ महाविद्यालयांतील प्रवेश क्षमता

१३१

महाविद्यालयांतील अकरावीच्या तुकड्या

१४ हजार २९९

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून विक्री अर्ज

१२ हजार ३५९

केंद्रीय समितीकडे जमा झालेले अर्ज

७४०९

प्रवेश निश्चिती केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळतोय ‘मागेल त्याला प्रवेश’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अकरावी प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यावर आला असताना काही कॉलेजांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीतील प्रवेशाचे नियम शिथिल होत असल्याचे चित्र आहे. प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी नमूद केलेल्या कॉलेज प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिले जातील असे सांगण्यात आले असले तरी सध्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज आल्यामुळे जागा रिक्त असल्याचा फायदा काही विद्यार्थी व पालक हव्या असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत.

बहुतांशी ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश क्षमता आणि दाखल झालेले अर्ज यानुसार जागा रिक्त असल्यामुळे प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यावर भर आहे. तर काही वरिष्ठ कॉलेजमध्ये मात्र भागातील राजकीय नेते किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना हाताशी धरून जाणाऱ्यांना शेवटच्या टप्प्यात प्रवेश देण्यासाठी मंजुरी दिली जात आहे. यामुळे गुणवत्ता यादी, कॉलेज निवड आणि प्राधान्यक्रम हे नियम काही अंशी डावलून प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.

अकरावी प्रवेशाला १७ जुलैपासून सुरुवात झाली. यामध्ये अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा झाला. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीन शाखानिहाय जाहीर करण्यात आलेल्या कट ऑफ यादीनुसार गुणवत्ता यादी जाहीर झाली. या यादीच्या अनुषंगाने कॉलेजमधील तीन विद्याशाखांच्या प्रवेशासाठी अंतिम टक्केवारीही निश्चित करण्यात आली. अर्ज भरण्याच्या प्रकियेत विद्यार्थ्यांनी तीन कॉलेज पसंतीक्रमानुसार लिहिणे आवश्यक होते. दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांची टक्केवारी, कट ऑफ यादी आणि कॉलेज यांची छाननी करून प्रवेश निश्चितीच्या फेरीत विद्यार्थ्यांना कट ऑफ यादीनुसार जाहीर करण्यात आलेल्या कॉलेजमध्येच प्रवेश घेणे बंधनकारक असल्याचे प्रवेशसमितीने जाहीर केले. मात्र, यादीनुसार मिळालेले कॉलेज नको असलेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी जे कॉलेज हवे आहे तेथे प्रवेशासाठी प्रयत्न करण्यास सुरूवात केली.

१२३५९ अर्ज दाखल होऊनही प्रवेश नि​श्चितीच्या मुदतीअंती ७४०९ हजारच विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांपैकी अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजप्राधान्यक्रमानुसार प्रवेश घेतलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी शिफारसपत्राचा मार्ग अवलंबला आहे. कॉलेज व्यवस्थापनाला प्रवेश देण्यासाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या २० टक्के राखीव जागा देण्यात आल्या आहेत. या राखीव जागांची आकडेवारी निश्चित करूनच कॉलेजला त्यांची शाखानिहाय प्रवेश क्षमता केंद्रीय प्रवेश समितीला सादर करणे आवश्यक असल्यामुळे कॉलेजांच्या व्यवस्थापनाच्या राखीव कोट्यातून हव्या असलेल्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी सध्या पालक व विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे. यासाठी कॉलेज प्रशासनातील ओळखी, भागातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांच्याकडेही फोनाफोनी सुरू आहे.

त्यामुळे एकीकडे केंद्रीय प्रवेश समितीने कडक केलेल्या नियमांची जंत्री असतानाही दुसरीकडे मात्र हव्या असलेल्याच कॉलेजांत प्रवेश मिळवण्यासाठी क्लुप्तीही वापरल्या जात आहेत. ​विनाअनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश हवा असेल तर प्रतीवर्ष पाच हजार रुपये फी आकारली जात आहे. नको असलेल्या कॉलेजमध्ये यादीनुसार प्रवेश घेण्याऐवजी हव्या असलेल्या कॉलेजमधील विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घेण्यासाठी फी भरण्याची तयारी काही पालकांनी दाखवल्याने कट ऑफ यादीनुसारच प्रवेश मिळेल ही सूचना काही कॉलेजमध्ये केवळ कागदावर उरली आहे.

यावर्षी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि प्रवेशक्षमता व अर्ज दाखले केलेले विद्यार्थी यांची संख्या पाहता १४०० विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश घेण्यासाठी अर्जच दाखल केलेला नाही, त्यामुळे हे १४०० विद्यार्थी पदविका किंवा आयटीआय किंवा अन्य अभ्यासक्रमांकडे वळले असण्याची शक्यता आहे. परिणामी कॉमर्स इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त प्रवेश क्षमतेपेक्षा इतर शाखांकडे आलेले अर्ज कमी असल्यामुळे जागा रिक्त आहेत. या जागा रिक्त राहू नयेत यासाठी शेवटच्या टप्प्यात कॉलेजकडूनही मागेल त्यांना प्रवेश दिला जात असण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमाप्रश्नाची सुनावणी आता १० ऑगस्टला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव
सर्वोच्च न्यायालयात सीमप्रश्नासंबंधी सुरू असलेल्या खटल्याची सोमवारी होणारी सुनावणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता १० ऑगस्टला पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सीमाप्रश्नाच्या सुनावणीसाठी गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ वकील राम आपटे, राजाभाऊ पाटील दिल्लीत तळ ठोकून होते. या कालावधीत त्यांनी प्रतिज्ञापत्रांचे काम पूर्ण केले आहे. वकिलांच्या सोबत महाराष्ट्र समितीची नेतेमंडळी देखील तळ ठोकून होते. दिल्ली मुक्कामात महाराष्ट्राच्या खासदारांच्या, नेते मंडळींच्या गाठीभेटी घेतल्या असून, सीमप्रश्नासंबंधी संसदेत आवाज उठवण्याची मागणी केली आहे.
सुनावणी लवकर होण्यासाठी वकील शिवाजीराव जाधव सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत. सीमाप्रश्नासंबंधीच्या तज्ज्ञ समितीचे सदस्य दिनेश ओऊळकर, वकील संतोष काकडे यांनी महाराष्ट्राची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी साळवे यांनी ऑगस्ट महिन्यातील सुनावणीला आपण उपस्थित राहण्याची ग्वाही दिली आहे.
आमदार संभाजी पाटील, प्रकाश मरगाळे, जयराम मिरजकर, सुनील आनंदाचे यांच्यासह समितीचे पदाधिकारी सुनावणीसाठी दिल्लीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images