Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

यंत्रमाग कामगारांचाइचलकरंजीत मोर्चा

$
0
0

इचलकरंजी

कामगारांवर बाकीरुपी कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. यातून त्याला बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांप्रमाणे यंत्रमाग कामगारांनाही कर्जमुक्त करावे, प्रत्येक कामगाराच्या खात्यात सरकारने दोन लाख रुपये जमा करावेत, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कामगार संघटनेच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यंत्रमाग कामगाराला वाढत्या महागाईप्रमाणे मजुरीवाढ मिळत नसल्याने त्याच्यावर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. तो कर्ज फेडू शकत नसल्याने यंत्रमाग कामगारांनाही कर्जमाफी मिळावी यासाठी कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचा मोर्चा काढण्यात आला. यंत्रमाग कामगारांच्या अंगावर मालकांच्या बाकीरुपी कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. चार वर्षापूर्वी जाहीर केल्यानुसार सन २०१७ ची मजुरीवाढ सहाय्यक कामगार आयुक्तांनी अद्याप जाहीर केलेली नाही. कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळयासाठी यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना होणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारकडे वारंवार मागणी करुनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे यंत्रमाग कामगारांना कर्जमुक्त करावे, महागाईप्रमाणे मजुरीवाढ जाहीर करावी, यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाची स्थापना व्हावी, यंत्रमाग कामगारास दरमहा ३५ किलो धान्य, पाच किलो साखर व १० लिटर रॉकेल मिळावे, आयजीएम हॉस्पिटल त्वरीत चालू करावे, मुद्रा योजनेतील अर्जदारांना तातडीने कर्ज मिळावे, विधवा अपंग व ज्येष्ठ नागरिकांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळावी, आदी मागण्यात नमूद करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केएमटीला दोन कोटी ३० लाखांचा दंड

$
0
0

कोल्हापूर : महापालिकेच्या परिवहन विभागाला (केएमटी) कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम वेळेत जमा न केल्याबद्दल २ कोटी ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. इपीएफ कलम १४ ‘ब’ नुसार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने (पीएफ) एक कोटी ५४ लाख, ६२ हजार, ०८१ रुपये दंड व ७६ लाख, २२ हजार, १९४ रुपये व्याज असा हा दंड सुनावला आहे. तसेच परिवहन विभागाची शहरातील सात बँकांतील खातीही सील केली आहेत. पीएफ कार्यालयाच्या या दणक्यामुळे कर्मचाऱ्यांची पीएफ रक्कम खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या परिवहन विभागाकडून (केएमटी) शहरवासीयांना प्रवासी सुविधा दिली जाते. यासाठी केएमटीकडे सुमारे एक हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची मार्च २०१२ ते जुलै २०१५ पर्यंतचा एक कोटी १५ लाख, २९ हजार ४३ रुपये पीएफ कार्यालयाकडे जमा केलेला नव्हता. या कर्मचाऱ्यांची पीएफची रक्कम जून २०१६ पर्यंत जमा करण्याची सूचना भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने दिली होती. त्यानंतरही प्रशासनानेही पीएफची रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पुन्हा ऑक्टोबर २०१६ मध्ये ही रक्कम त्वरीत भरण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली.

प्रशासनाने या बाबी गांभीर्याने घेतल्या नाहीत. त्यामुळे पीएफ कार्यालयाने १३ जूनला केएमटीची आडीबीआय व बँक ऑफ इंडिया (लक्ष्मीपुरी) शाखेची बँक खाती सील केली. त्यानंतरही पीएफची रक्कम जमा न केल्याने चार जुलैला रत्नाकर बँक (लक्ष्मीपुरी), अॅक्स‌िस बँक (राजारामपुरी), कॅनरा बँक (लक्ष्मीपुरी) येथील खातीही सील केली. त्यानंतर ११ जुलै रोजी पुन्हा कोटक महिंद्रा बँक (लक्ष्मीपुरी) व रत्नाकर बँक (राजारामपुरी) येथील केएमटी विभागाची बँक खाती सील करुन संपूर्ण आर्थिक कोंडी केली आहे.

केएमटी प्रशासनाची सर्वच बँक खाती सील केल्याने दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. पीएफ रक्कम जमा केल्याशिवाय ही खाती सुरू होणार नाहीत. त्यामुळे प्रशासनाची धावधाव सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून केएमटी आर्थिक अरिष्ठात सापडली असल्याने कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेत होत नाहीत. त्यातच पीएफ कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारल्याने महापालिका प्रशासनाची चांगलीच अडचण झाली आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा

केएमटीमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पीएफ रक्कम मिळालेली नाही. अनेक कर्मचारी वारंवार पीएफ कार्यालयाशी संपर्क साधत आहेत. तसेच गुरुवारी (ता. १३) कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर श्रमिक संघाने मोर्चाकाडून पीएफ कार्यालयासमोर निदर्शने केली होती. मोर्चानंतर पीएफ कार्यालयाने केवळ पत्रव्यवहार न करता केएमटीला दंड व व्याजाची रक्कम जमा करण्यासाठी थेट कारवाई करुन निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.

=====

केएमटीकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची पीएफची रक्कम भरण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. पण ही रक्कम वेळेत भरलेली नसल्याने त्यांची बँक खाती सील करण्याची कारवाई केली.

सौरभ प्रसाद, विभागीय आयुक्त, भविष्य निर्वाह निधी कार्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्धवट सेट ऑफमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशभरात गुड्स अॅन्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) लागू झाल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात त्याचे पडसाद दिसू लागले आहेत. धान्य बाजार, ऑटोमोबाइल क्षेत्र, कापड उद्योग, हॉटेल-रेस्टारंट क्षेत्राबरोबरच टायर उत्पादन आणि विक्रीमध्येही जीएसटीचे वेगळे परिणाम दिसू लागले आहेत. सध्या टायर्सची विक्री करताना जुन्या ३० जून पूर्वीच्या टॅक्सवर भरलेल्या एक्साइज ड्युटीचा सेट ऑफ अर्धवट मिळत असल्याने विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

जीएसटी लागू होऊन दोन आठवडे झाले, तरी नव्या करप्रणालीविषयी कोणाकडेही स्पष्टता नाही. व्यापारीच नव्हे, तर ग्राहक देखील नव्या करप्रणालीविषयी अनभिज्ञ आहे. वेगवेगळ्या वस्तू वरचे टॅक्स स्लॅब जाहीर झाल्यानंतरही कोणती वस्तू महागली? कोणती स्वस्त झाली? याविषयी ग्राहकांना अंदाज बांधावे लागत आहे. वेगवेगळ्या वस्तूंना वेगवेगळ्या स्लॅबमध्ये समाविष्ट केल्याचा प्रकार टायर विक्री क्षेत्रात झाला आहे. जवळपास सर्व टायर्सवर २८ टक्के जीएसटी लागू झाला आहे. पण, ट्रॅक्टरचे मागील चाकाचे टायर आणि ट्यूब १८ टक्के जीएसटीमध्ये आहे. टायर विक्रीमधील जवळपास सर्व व्यवहार बिलिंगने होत असल्याने जीएसटीमुळे या क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता धूसर असल्याचे व्यवसायिक सांगतात. तसेच टायरचे हे क्षेत्र गरज टाळता न येण्यासारखे आहे. म्हणजेच टायर फुटला, किंवा पावसाळ्याच्या दिवसांत जास्त पंक्चर निघाले असतील, तर टायर बदलणे टाळता येत नाही. त्यामुळे जीएसटी लागू झाल्याचा मार्केटवर कोणताही परिणाम झालेला नाही. मार्केट गेल्या पंधरा दिवसांत स्थीर असल्याचे व्यवसायिकांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितले.

टायर विक्रेत्यांनी ३० जूनपर्यंतच्या स्टॉकवर १२.५ टक्के एक्साइज ड्युटी भरलेली आहे. पण, या जुन्या स्टॉकमधील १२.५ टक्के एक्साइज ड्युटीमधील केवळ ६० टक्केच ड्युटीचा सेट ऑफ विक्रेत्यांना मिळणार असल्याने एक्साइज ड्युटीतील उर्वरीत ४० टक्के रकमेचा भार विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे. दुकानांत ३० जूनपर्वीचा १० लाख रुपयांचा माल असेल, जवळपास ४४ हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचे टायर विक्रेते सांगतात.


नव्या करप्रणालीविषयी जागरूकता नसल्याने गैरसमज होत आहे. पण, तीन-चार महिन्यांत याचा फायदा आपल्याला लक्षात येईल. एक्साइजचा सेट ऑफ मर्यादित असल्यामुळे व्यापाऱ्यांचे जुन्या स्टॉकवर नुकसान होणार आहे. पण, नव्या कर रचनेत टॅक्स लाइअबलिटी पूर्वी पेक्षा कमी राहील की जास्त, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.
- सतीश छाब्रिया, टायर विक्रेते

टॅक्स चोरीला पायबंद

जुन्या व्हॅट प्रणालीमध्ये जीपच्या टायरवर १२.५ टक्के एक्साइज आणि १३५ टक्के व्हॅट अशी आकारणी केली जात होती. त्यामुळे टायर उत्पादक जीपच्या टायरची निर्मिती करत होते आणि त्याला ट्रॅक्टरच्या मागील टायरप्रमाणे १२.५ टक्के एक्साइज आणि ६ टक्के व्हॅट अशा कर आकारणीत बसवून विकत होते. टॅक्स चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतरच जीएसटीमध्ये ट्रॅक्टरच्या टायरला १८ टक्क्यांवर ठेवण्यात आले आहे. जेणेकरून हा चोरीचा प्रकार पूर्णपणे बंद होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ दाम्पत्याचा शोध सुरूच

$
0
0

कुडित्रे

रविवार सकाळी साडेदहाच्या सुमारास पणुत्रे येथील श्रीकांत धोंडीराम कांबळे व त्यांची पत्नी लता या पती - पत्नीने गोठे (ता. पन्हाळा) येथील पुलावरून उडी मारल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांकडून तत्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी मृतदेह सापडले नसल्याने घटनेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारीही दिवसभर शोधमोहीम सुरूच होती. मात्र अद्याप कांबळे दाम्पत्याचे मृतदेह शोधण्यात यश आलेले नाही.

कांबळे दाम्पत्याचा शोध घेण्यासाठी कळे पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी व व्हाईट आर्मीचे जवान रविवारी कसोशीने प्रयत्न करत होते. सोमवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून व्हाईट आर्मीचे आठ जवान , कळे पोलिस ठाण्याचे दोन अधिकारी, २० कर्मचारी यांनी मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. या शोधमोहिमेसाठी १५ - २० पोलिस मित्र यांचेही सहकार्य घेण्यात आले. सायंकाळी साडेसहा वाजता ही शोधमोहीम थांबविण्यात आली.

दरम्यान, शोधमोहिमेत कोणतीही कसर राहू नये यासाठी करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांच्याशी संपर्क साधून त्यांचे सहकार्य घेऊन बालिंगा पुलापर्यंत कांबळे दापत्याचा शोध घेण्यात येत असल्याचे कळे पोलिस ठाण्याचे फौजदार मंगेश देसाई यांनी सांगितले. तसेच रात्रीच्या वेळीही मल्हारपेठ धरण व बालिंग धरणा येथे पाच लोक गस्त घालण्यासाठी, लक्ष देण्यासाठी नेमण्यात आले आहेत. सोमवारी मृतदेह सापडले नसल्यामुळे पुन्हा मंगळवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून शोधमोहीम सुरु करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भवतींसह नवजात शिशूंचे मृत्यू रोखण्यात यश

$
0
0

कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या जननी सुरक्षा योजनेमुळे जिल्ह्यातील गर्भवतींना चांगलाच फायदा झाला आहे. बेसिक लाइफ सपोर्ट व अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट सुविधांमुळे त्वरित रुग्णालयात दाखल करत बाल व मातामृत्यू प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. सरकारी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या लाभार्थींना अनुदानाच्या स्वरुपात पाच वर्षांत तब्बल पाच कोटी ३७ लाख रुपये मिळाले आहेत.

गर्भवतींना आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने माता व बालमृत्यूची समस्या गंभीर बनली होती. विशेषत: अनुसूचित जाती-जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांत ही समस्या जास्त होती. खासगी रुग्णालयांत प्रसूतीसाठी येणारा खर्च व सुविधांमुळे अनेकदा दायीकडूनच प्रसूती केली जात होती. त्यामुळे माता व बालमृत्यूचा धोका जास्त होता. असे मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २००८ मध्ये जननी सुरक्षा योजना सुरू झाली.

या योजनेत नियमित प्रसूतीसाठी ७०० व सिझेरियनसाठी १५०० रुपये अनुदानाबरोबर रुग्णालयातील वास्तव्यादरम्यान मोफत जेवणही देण्यात येते. याचा लाभ अधिकाधिक महिलांना व्हावा, यासाठी आशा कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली. प्रसूतीपूर्व व पश्चात्त गर्भवती आणि बालकांना आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा देण्यात आल्यामुळे माता व बालमृत्यू प्रमाण कमी करण्यात लक्षणीय यश आले आहे.

खासगी रुग्णालयात नियमित प्रसुतीसाठी किमान दहा व सिझेरियनसाठी किमान २५ हजारांपुढे खर्च येतो. त्या खर्चातही चांगलीच बचत झाली आहे. वैद्यकीय खर्च करण्याची क्षमता नसलेल्या अनेकांवर त्यामुळे संकट निर्माण होत होते. पण, जननी सुरक्षामुळे संपूर्ण वैद्यकीय खर्चात बचत झाली असून सरकारी रुग्णालायातील प्रसूतींच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अत्यावश्यक रुग्णसेवेसाठी १०२ व १०८ बेसिफ लाइफ सपोर्ट व अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट दिला जातो. क्रिटिकल वेळेत गर्भवतींना वेळेत रुग्णालयात पोहोचवले जाते. त्याचा फायदा शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील महिलांना चांगला झाला आहे.


अनुदान थेट खात्यावर जमा

योजनेतून गर्भवतींना अनुक्रमे ६०० व ७०० रुपये अनुदान दिले जात आहे. यापूर्वी अनुदान रोख स्वरुपात दिले जात होते. अनेकदा अनुदान मिळण्यास विलंब होत होता. २०१६-१७ पासून मात्र डायरेक्ट बेनिफिशरी टान्सफरअंतर्गत थेट बँक खात्यावर अनुदान जमा होते. १७-१८ मध्ये १,२५१ महिलांपैकी ६९३ महिलांच्या बँक खात्यावर अनुदान जमा झाले आहे.


दृष्टिक्षेपात जिल्हा आरोग्य सेवा

जिल्हा व ग्रामीण रुग्णालये २०

प्राथमिक आरोग्य केंद्रे ७३

आरोग्य उपकेंद्रे ४१३

बेसिक लाइफ सपोर्ट २६

अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट ८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'जयप्रभा' प्रकरणी लता मंगेशकरांची माघार

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या चित्रपटनिर्मितीची अस्मिता अशी ओळख असलेल्या जयप्रभा स्टुडिओच्या मालक प्रख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी जयप्रभा स्टुडिओच्या हेरिटेज वास्तू यादीतील समावेशविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली. कोल्हापूर महापालिकेने जिल्ह्यातील ज्या ७७ वास्तू हेरिटेज यादीत समाविष्ट केल्या होत्या त्यामध्ये जयप्रभा स्टुडिओचा समावेश होता. मात्र जयप्रभा स्टुडिओची सध्याची साडेतीन एकर जागा व्यक्तीगत मालकीची असल्यामुळे ती परस्पर हेरिटेजवास्तूच्या यादीत समाविष्ट करता येणार नाही या मुद्द्यावर लता मंगेशकर यांनी याचिका दाखल केली होती. दस्तूरखुद्द लता मंगेशकर यांनीच ही या​चिका मागे घेतल्यामुळे जयप्रभा स्टु​डिओची जागा कोणत्याही विकासकाला विकता येणार नसून भविष्यात याठिकाणी चित्रपटनिर्मितीच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत.

चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांना छत्रपती राजाराम महाराजांनी मराठी चित्रपटनिर्मितीसाठी कोल्हापुरातील बेलबाग परिसरातील १३ एकर जागा दिली. याठिकाणी भालजीनी अनेक मराठी चित्रपटांची निर्मितीही केली. दरम्यान, महात्मा गांधी हत्याकांडानंतर हा स्टुडिओ जाळण्यात आला. तरीही भालजीनी नव्या उमेदीने जयप्रभा उभा केला. त्यावेळी भालजी पेंढारकर यांना साठ हजार रूपयांचे कर्ज झाले. हे कर्ज फेडण्यासाठी लता मंगेशकर यांनी भालजीना आर्थिक मदत केली आणि त्या बदल्यात जयप्रभा स्टुडिओ भालजीनी लता मंगेशकर यांच्या नावे लिहून दिला. मात्र हा व्यवहार होत असताना स्टुडिओची जागा केवळ चित्रपट निर्मितीसाठीच वापरावी असे ठरले. परंतु भालजी बाबांच्या निधनानंतर मराठी चित्रपटाची निर्मिती थंडावली. दरम्यान या स्टुडिओच्या जागेपैकी साडेनऊ एकर जागा मंगेशकर यांनी विकासकाला विकल्यामुळे त्या परिसरात इमारती उभारण्यात आल्या. सध्या साडेतीन एकर जागा शिल्लक आहे.

दरम्यान, ही जागा राजाराम महाराजांच्या काळातील असल्याने आणि याठिकाणी असलेल्या वास्तूंचे बांधकाम दगडी असल्यामुळे ही जागा वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट व्हावी या हेतूने महापालिकेने २००३ साली ज्या ७७ जागा हेरिटेज वास्तू म्हणून निश्चित केल्या, त्यामध्ये जयप्रभा स्टुडिओचा समावेश केला. मात्र या समावेशाला लता मंगेशकर यांनी हरकत घेत उच्च न्यायालयात महापालिकेविरोधात दावा दाखल केला. अखिल भारतीय मराठी ​​​चित्रपट महामंडळानेही यामध्ये महापालिकेला साथ देत लता मंगेशकर यांच्याविरोधात लढा दिला. अखेर लता मंगेशकर यांनी हेरिटेज वास्तूयादीतील जयप्रभा स्टुडियोच्या समावेशाला विरोध दर्शवणारी याचिका मागे घेतल्यामुळे आता मंगेशकर यांचा जयप्रभा स्टुडिओवरील मालकी हक्क संपुष्टात आला आहे.

जयप्रभा वाचवू शकलो याचा आनंद वेगळाच

जयप्रभा स्टुडिओ ही केवळ काही एकर जागा नसून त्याठिकाणी मराठी सिनेमानिर्मितीची मुहूर्तमेढ रोवली आहे. सध्या एकेक स्टु​डिओ ​आपले आस्तित्व हरवत असताना आणि बिल्डरांच्या घशात जात असताना जयप्रभा स्टुडिओसारखी कोल्हापूरची अस्मिता वाचवू शकलो याचे महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने वेगळेच समाधान आहे. पाच वर्षापूर्वी हा स्टुडिओ गुंदेशा बिल्डर्स यांना विकला गेला होता. मात्र त्याविरोधात कलाकारांनी काढलेला मोर्चा आणि कोल्हापूरकरांचा जनक्षोभ यामुळे लता मंगेशकर यांना झालेला आर्थिक व्यवहार रद्द करावा लागला होता. त्यानंतर हा स्टुडिओ मंगेशकर यांच्याकडून सील करण्यात आला होता. मात्र आता मंगेशकर यांच्याकडून याचिका मागे घेतल्यामुळे ‘जयप्रभा’वरील मंगेशकर यांची मालकी संपून या स्टुडिओच्या जागेवर राज्य सरकारचा हक्क निर्माण झाला आहे. जयप्रभा स्टुडिओ हेरिटेज वास्तूयादीत समावेश झाल्यानंतरही याठिकाणी चित्रपटनिर्मिती सुरू राहणार असल्यामुळे कोल्हापुरातील चित्रपटनिर्मितीचा खंडित झालेला प्रवाह सुरू होण्याचा दिलासा देणारा हा निर्णय आहे. - मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात खरिप वाया जाण्याची भीती

$
0
0

सोलापूर
आर्द्रा पाठोपाठ पुनर्वसू नक्षत्र कोरडे गेल्याने खरीप पेरण्या केलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बळीराजाची चिंता वाढली असून, शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे. पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम भुईसपाट होण्याची भीती बळीराजाला वाटू लागली आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी कृषी विभागाने यंदाच्या वर्षी सुमारे ७९ हजार १८ हेक्टर क्षेत्र खरिपाच्या पेरणीसाठी निर्धारित केले आहे. मूग, उडीद, तूर, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कापूस आदी पिकांची आखणी केली. या शिवाय मका आणि कडवळही पेरले आहे. यंदा कधी नव्हे ते सोलापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. जूनच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने दमदार एंट्री केली. मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाल्यानंतर खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजाची लगबग जिल्हाभरात सुरू झाली. वाफसा आल्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची उघडीप मिळाल्यानंतर खरिपाच्या पेरण्यांना जोर धरला. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये खरिपाच्या पेरण्या झाल्या. जमिनीतून पिके बाहेर येत असतानाच पावसाने पाठ फिरविली अन् बळीराजाची चिंता वाढली. पिके कोमेजू लागल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे .जवळपास २० दिवसांचा कालावधी लोटला तरी पावसाने कृपा केलेली नाही. परिणामी बळीराजाने डोक्याला हात लावला आहे.
करमाळा तालुकात वरुणराजाने पाठ फिरविल्याने तेथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. बार्शी तालुक्यात मूग, उडीद आणि सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली असून, तुरीचे प्रमाण कमालीचे घटले आहे.
तुरीचे क्षेत्र १२० टक्क्यांनी घटले
महाराष्ट्रात सर्वत्र तुरीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मागील वर्षी तुरीचे उत्पादन अधिक झाल्याने त्याचा थेट परिणाम खरेदीवर झाल्याने शेतकऱ्यांची पुरती वाट लागली. तो धोका यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी पत्करला नाही. मागील वर्षी जिल्ह्यात सुमारे २८६ टक्के तुरीची पेरणी झाली होती. यंदाच्या वर्षी हे प्रमाण १६६ टक्यांवर आले आहे. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत तुरीच्या पेरणीच्या १२० टक्क्यांनी घट झाली आहे. एकूणच तूर खरेदीच्या कटकटीतून बाहेर पडण्यासाठी यंदा शेतकऱ्यांनी तुरीकडे बऱ्याचअंशी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेत मुसळधार पाऊस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. जलाशयात ३६२११ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील बामणोली, वळवण, प्रतापगड, कारगाव, सोनाट, काठी आणि कांदाटी खोऱ्यातही मुसळधार पाऊस पडत असल्याने शिवसागर जलाशयातील पाणीसाठ्यात गेल्या चोवीस तासांमध्ये चार टीएमसीने वाढ झाली आहे.
नवजा येथे चोवीस तासांत सर्वाधिक ३०० मिलीमीटर, महाबळेश्वर २१४ व कोयनानगर येथे २०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण 50 टक्के भरले असून, पाणीसाठ्याने अर्धशतक गाठले आहे. मंगळवारी सायंकाळी पाचवाजेपर्यंत धरणात ५२.३६ टीएमसी इतका पाणीसाठा झालेला होता.
पाटण तालुक्यासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या चार दिवसांपासून संततधार आणि जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. कोयनानगर येथे मंगळवारी १८ रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत १२८, नवजा १५० आणि महाबळेश्वरात ८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कराडसह पाटण तालुक्यातील इतर विभागातही पावसाने चांगलीच हजेरी लावली असून दिवसभर जोरदार संततधार व अंध:कारमय वातावरण निर्माण झालेले होते. काजळी, काफना, मोरणा, तारळी, केरा, वांग, उत्तरमांड या तालुक्यातील प्रमुख नद्यांना पूर आले असून, कोयनानदीतील पाण्याच्या पातळीतही मोठी वाढ झाली आहे. निसरेसह इतर ठिकाणचे छोटे छोटे फरशी पूल पाण्याखाली गेले आहेत. पाटण परिसरात प्रचंड पर्जन्यवृष्टी झाल्याने कवरवाडी, मुळगाव येथे नदीकाठावर असणाऱ्या शेतात पाणीच पाणी झाल्याने संपूर्ण भात शेती पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत आहे.
कराड तालुक्याच्या पश्चिम, दक्षिणेकडील उंडाळे, सवादे, येणपे विभागासह मणदुरे विभागातील साखरी-चिटेघर धरणही पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने केरा व कोयना नदी तर कराडपासून पुढे कृष्णा नदी पात्रातील पाण्यात मोठी वाढ झाली आहे. मोरणा विभागातील मोरणा-गुरेघर धरणाच्या सांडव्यातूनही पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. तारळी, उत्तरमांड धरणातही पुरेशा प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. तसेच ढेबेवाडी (सणबूर) येथील महिंद धरणाच्या मुख्य भिंतीवरून पाण्याचा वेगाने प्रवाह सुरू झाला आहे. एकंदरीत पाटणसह सर्वच परिसरात दिवसभर मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने सर्वत्र गारठ्याचे प्रमाण वाढले आहे.
दिवशी घाटात दरड कोसळली
पाटण विभागात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे नवारस्ता-ढेबेवाडी मार्गावर मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दिवशी घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला केल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांगलीत संततधार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगली जिल्ह्याच्या काही भागात मंगळवारी पहाटेपासून पावसाने संततधार धरली असून, पेरणीनंतर अद्यापही तग धरुन असलेल्या खरिपाला काहीअंशी जीवदान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अधूनमधून काहीसा जोर असलेली सर येवून जाते. या पावसाने पाणी खळाळून वाहताना दिसत नाही. परंतु, एकसारखी संततधार असलेला पाऊस जमिनीत मुरत आहे. याचा फायदा पिकांना निश्चित होणार आहे.
दीर्घकाळ दडी मारल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यासारखे चटके देणारे वातावरण आणि सोसाट्यासारखा वाहणारा एकसारखा वारा यामुळे पाऊस गायबच झाल्याची चर्चा सुरू होती. यंदाच्या पावसाळ्यात कायम दुष्काळी असलेल्या जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आदी भागात सुरुवातील दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपून घेतल्या होत्या. पहिल्या ओलीवर पीक अंकुरले पण पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. अद्यापही दुष्काळी भागात पावसाचा थेंब नाही. जून जुलैमध्ये हिरवाईने नटणाऱ्या टेकड्या, डोंगर, शिवारे आजच्या घडीला ओसाड दिसत आहेत. दूरवर ढग दाटून येतात. दूर कुठेतरी पाऊस पडत असल्याचा भासही होतो. काही वेळेला गार वारेही झोंबून जाते. परंतु, प्रत्यक्षात आपल्या वावरात पाऊस नसल्याची जाणीव होताच बळीराजा हिसमुसतो. त्याने अजूनही आशा सोडलेली नाही. दुबार पेरणी करायची तयारी आहे, परंतु त्यासाठीही पाऊस लागणार आहे. दुबार पेरणीतून भले पीक हाताला लागणार नाही, पण जनावरांना चारा मिळेल, अशी त्यांना आशा आहे.
दुष्काळी भाग अद्याप कोरडा
सांगली आणि आजूबाजूच्या मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव या तालुक्यातल्या काही भागात मंगळवारी दिवसभर संततधार होती. सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ५.१ मिलीमीटर इतका पाऊस नोंदला गेला आहे. दिवसभर सांगलीच्या पश्चिम भागातील वाळवा, शिराळा आणि पूर्व भागातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्याच्या बहुतांशी भागात संततधार होती. कडेगाव, खानापूर आणि आटपाडी तालुक्याच्या काही भागापर्यंत रिमझीम पोहचली आहे. कवठेमहांकाळ तालुक्याचा पूर्व आणि संपूर्ण जत तालुक्यात मात्र थंड वाऱ्याशिवाय काहीच नव्हते. वातावरण मात्र ढगाळ होते. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांतील नोंदीनुसार मिरज २.१, खानापूर-विटा २, वाळवा-इस्लामपूर १०.८, तासगाव १, शिराळा २५.२, कवठेमहांकाळ ०.६, पलूस ३ आणि कडेगाव तालुक्यात ५.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
वारणा दुथडी
चांदोली धरण परिसरात रविवारी रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस अद्याप सुरूच आहे. धरण पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात धरणात येत असल्यामुळे धरणाची पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. रविवारपासून पडत असलेल्या पावसामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. धरण ५८.३२ टक्के भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत ५३ मिमी पाऊस पडल्याची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापकावर झाली आहे. धरणात २०.०६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आतापर्यंत चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात ९४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणीपातळी ६१०.४० मीटर इतकी झाली आहे. सोमवारी आणि मंगळवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. गेल्या बावीस दिवसांत धरणात ८.५७ टीएमसीने पाणी वाढले आहे. या दरम्यान धरण परिसरात ६७२ मिमी पाऊस झाला आहे. पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या चांदोली धरण परिसरात यंदा जुलै महिना संपत आला तरी पाऊस म्हणावा तसा सुरू नव्हता. पिकांना तरवणी मिळेल इतकाच पाऊस परिसरात सुरू होता. वर्षांत तीन ते चार हजार मिमी पाऊस या परिसरात हमखास पडतो. यंदा पावसाचे प्रमाण कमी दिसत आहे. दरम्यान या परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे कोकरूड-शेडगेवाडी रस्त्यावर झाड उन्मळून पडल्यामुळे सोमवारी काहीकाळ वहातूक ठप्प झाली होती. स्थानिक ग्रामस्थ आणि कोकरूड पोलिसांच्या मदतीने पाच ते सात तासांनी या झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जयप्रभा’ बद्दलची याचिका लता मंगेशकरांकडून मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या चित्रपटनिर्मितीची अस्मिता असलेल्या जयप्रभा स्टुडिओच्या मालक, गानकोकिळा लता मंगेशकर यांनी जयप्रभा स्टुडिओच्या हेरिटेज वास्तू यादीतील समावेशविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली. कोल्हापूर महापालिकेने ज्या ७७ वास्तू हेरिटेज यादीत समाविष्ट केल्या होत्या त्यात जयप्रभा स्टुडिओचा समावेश होता. मात्र स्टुडिओची सध्याची साडेतीन एकर जागा व्यक्तिगत मालकीची असल्यामुळे ती परस्पर हेरिटेजच्या यादीत समाविष्ट करता येणार नाही, या मुद्द्यावर मंगेशकर यांनी याचिका दाखल केली होती. मात्र ती मंगेशकर यांनीच मागे घेतल्यामुळे जयप्रभा स्टु​डिओच्या हेरिटेजचा मार्ग मोकळा झाला आहे. आता ही जागा कोणत्याही विकसकाला विकता येणार नाही.

चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांना छत्रपती राजाराम महाराज यांनी चित्रपटनिर्मितीसाठी बेलबाग परिसरातील १३ एकर जागा दिली. या ठिकाणी भालजींनी अनेक मराठी चित्रपटांची निर्मितीही केली. गांधी हत्येदरम्यान हा स्टुडिओ जाळण्यात आला. मात्र भालजींनी नव्या उमेदीने जयप्रभा उभा केला. त्यावेळी भालजी पेंढारकर यांना साठ हजारांचे कर्ज झाले. ते फेडण्यासाठी मंगेशकर यांनी भालजींना आर्थिक मदत केली आणि त्या बदल्यात स्टुडिओ लता मंगेशकर यांच्या नावे लिहून दिला. मात्र हा व्यवहार होत असताना स्टुडिओची जागा केवळ चित्रपट निर्मितीसाठीच वापरावी असे ठरले. परंतु पेंढारकरांच्या निधनानंतर मराठी चित्रपटाची निर्मिती थंडावली. दरम्यान स्टुडिओच्या जागेपैकी साडेनऊ एकर जागा मंगेशकर यांनी विकसकाला विकल्यामुळे त्या परिसरात इमारती उभारण्यात आल्या. सध्या साडेतीन एकर जागा शिल्लक आहे.

दरम्यान, ही जागा ऐतिहासिक असल्यामुळे तिचा समावेश महापालिकेने २००३ मध्ये वारसास्थळांच्या यादीत केला. मात्र याला मंगेशकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. अखिल भारतीय मराठी ​​​चित्रपट महामंडळानेही यात महापालिकेला साथ देत मंगेशकर यांच्याविरोधात लढा दिला. अखेर मंगेशकर यांनी याचिका मागे घेतल्यामुळे आता स्टुडिओ हेरिटेजचा मार्ग मोकळा झाला आहे.

भांडायची इच्छा नाही

कोणाशीही भांडण्याची इच्छा नसल्याने मी ही याचिका मागे घेतली. हा स्टुडिओ १०० वर्ष जुना असल्याचा दावा या मंडळींनी केला आहे. प्रत्यक्षात १९४८मध्ये हा स्टुडिओ जाळण्यात आल्यानंतर भालजींनी बँकेचं कर्ज काढून तो नव्याने उभारला. त्यामुळे १०० वर्षांचा हा हिशेब माझ्या आकलनापलीकडचा आहे. आता कोल्हापूरमध्ये चित्रिकरण होत नाही. तरीही हा स्टुडिओ मी भाड्याने देते तुम्ही तेथे चित्रिकरण करा, असं मी मराठी चित्रपट महामंडळाला सुचवलं होतं. त्यावरही काहीच हालचाल झाली नाही. कोल्हापूरशी जुने ऋणानुबंध असूनही या मंडळींनी केलेल्या पराकोटीच्या विरोधामुळे मी खूप दुखावले आहे.

लता मंगेशकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भर पावसात प्रवेशाची धांदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अकरावीच्या कला, वाणिज्य आणि शास्त्र या तिन्ही शाखांसाठी कट ऑफ यादी जाहीर झाल्यानंतर मंगळवारी अकरावीसाठी प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली. प्रवेश निश्चितीच्या पहिल्या दिवशी कला, वाणिज्य आणि शास्त्र या तिन्ही शाखांमध्ये १०६० विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले.

मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून शहरातील ३३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चिती करण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. भर पावसात मंगळवारी दिवसभर प्रवेशाची धांदल सुरू होती. दरम्यान कट ऑफ यादीनुसार निवड झालेल्या कॉलेजमध्ये प्राधान्यक्रमानुसार प्रवेश घेण्यासाठी २१ जुलैअखेर मुदत असून त्यानंतर रिक्त जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया २४ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

३३ कनिष्ठ महाविद्यालयातील १३५०० जागांसाठी अकरावीसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू असून मंगळवारी या प्रक्रियेतील दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा सुरू झाला. ३ जुलैपासून अर्ज वितरण आणि अर्ज संकलन प्रकिया सुरू झाली होती. त्यानंतर कट ऑफ यादीकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून राहिले होते. यंदा दहावीचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत उशीरा जाहीर झाल्यामुळे प्रवेशप्रक्रियेला विलंब झाल्याचा परिणाम दिसून येत आहे. प्रवेश निश्चिती करण्यासाठी विद्यार्थ्यांना चार दिवसांचा अवधी मिळाल्याने प्राधान्यक्रमानुसार कॉलेजची निवड करणे आणि कट ऑफ यादीचा मेळ जुळवणे यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे.

मात्र १३५०० जागांसाठी १२४८९ अर्ज आले असल्याने प्रवेश क्षमता आणि प्राप्त अर्ज हे समीकरण यंदा जुळणार असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याची ग्वाही शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी आणि प्रवेश प्रक्रिया निवड समितीचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. नागेश नलवडे यांनी ​दिली आहे. प्रवेशनिश्चितीच्या पहिल्या दिवशी कला शाखेतील इंग्रजी व मराठी माध्यमासाठी २८० विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रे आवश्यक दाखले जमा करून प्रवेश नि​श्चित केला.तर कॉमर्सशाखेतील इंग्रजी व मराठी माध्यमासाठी ३१० विद्यार्थ्यांनी प्रवेशनिश्चित केला. शास्त्र शाखेतील केवळ ७० विद्यार्थ्यांनीच मंगळवारी प्रवेश निश्चित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि जिल्ह्यात सर्वदूर गेले दोन दिवस संततधार सुरू आहे. धरणक्षेत्रांतही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणसाठ्यांत वाढ होत आहे. शिवाय नद्यांच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी २२ फुटांवर असलेली असलेली पंचगंगेची पाणीपातळी मंगळवारी रात्रीपर्यंत २४ फुटांपर्यंत पोहोचली होती. दिवसभर पावसाच्या दमदार सरी कोसळत राहिल्या. पंचगंगा घाटाजवळची मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, शाहूवाडी तालुक्यातील उखळू येथील धबधब्याच्या पाण्यात सांगली जिल्ह्यातील बागणी येथील तरुण वाहून गेला.

मंगळवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली नाही. त्यामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचले. काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहनांचा वेग मंदावला. लक्ष्मीपुरी, गंगावेश, राजारामपुरीतील जनता बजार, व्हीनस कॉर्नर आदी परिसरात दिवसभर वाहतूक कोंडी होत होती. त्यातच संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर कोंडीत भर पडली. यातच रस्त्यांवरील खड्ड्यांचीही भर पडली. लक्ष्मीपुरीतील धान्य बाजारात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले होते.

दरम्यान, संततधारेमुळे राधानगरी धरणातून प्रति सेंकद १२०० क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे उद्यापर्यंत नदीची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. गगनबावडा धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. कोल्हापूर-गारगोटी मार्गावर निगवे खालसा येथे झाड पडल्याने सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

युवक वाहून गेला

दरम्यान, शाहूवाडी तालुक्यातील उखळू गावाजवळच्या आंबाईवाडी येथील धबधब्याच्या पाण्यातून सांगली जिल्ह्यातील युवक वाहून गेला. त्याचा शोध रात्री उशीरापर्यंत सुरू होता. खुदबुद्दीन बाबासो फकीर (वय ३५, रा. बागणी) असे या बेपत्ता युवकाचे नांव आहे. यावेळी वाहून जाणारे अन्य चार युवक वाचले आहेत. शाहूवाडी पोलीसांत रात्री उशिरा घटनेची नोंद झाली आहे. मंगळवारी दुपारी १२-३०च्या सुमारास मेहबूब बाबासाहेब फकीर, खुदबुद्दीन फकीर, दिलीप सदाशिव नगारे, राजेंद्र बाबूराव शेळके, प्रदीप रघुनाथ माळी (वय ३०, सर्व रा. बागणी) व अमोल अशोक माळी (वय २७, रा. माधवनगर, सांगली) हे युवक पिकनीकसाठी आले होते. पैकी खुदबुद्दीन धबधब्याच्या प्रवाहात उतरला. यावेळी पाण्याचा जोर वेगात असल्याने त्याला बाहेर येता आले नाही. त्याने झाडीलगतच्या वेलीचा आधार घेऊन बाहेर येण्याचा प्रयत्न केला. परंतु तेही शक्य झाले नाही.

=======

उखळू येथे धबधब्यातून युवक वाहून गेला

कोल्हापूर-गारगोटी मार्गावर वाहतूक विस्कळीत

गगनबावड्यात अतिवृष्टी

राधानगरीतून १२०० क्युसेक विसर्ग

चांदोली परिसरात मुसळधार

कोयना धरणातील पाणीसाठा पन्नास टक्क्यांवर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

$
0
0

कोल्हापूर

सोमवार सकाळपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार कायम असून मंगळवारी जिल्ह्यात पाऊस सर्वदूर पोहोचला. चंदगड, आजरा तसेच भुदरगड तालुक्यात दमदार तर अन्य ठिकाणी संततधार पाऊस झाला. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा दमदार पावसाने सुखावला असून रोपलावणीच्या कामाला वेग आला आहे.

पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला

जयसिंगपूर

तब्बल दोन आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर शिरोळ तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली असून बळीराजा सुखावला आहे.

शिरोळ तालुक्यात पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, यानंतर पिकांची उगवणही चांगली झाली होती. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाला होता. यानंतर पावसाने तालुक्यात ओढ दिली होती, परिणामी माळरानातील पिकांनी माना टाकल्या होत्या. कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या बारमाही वाहणार्या नद्यांमुळे तालुक्यातील बहुतांश क्षेत्र बागायत आहे. मात्र तमदलगे, निमशिरगाव, कोंडिग्रे, चिपरी, धरणगुत्ती परिसरात मात्र पावसाअभावी पिके कोमेजली होती. यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला होता. शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागले होते. आता तब्बल दोन आठवड्यानंतर मंगळवारी पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

.............

वेदगंगेचे पाणी पात्राबाहेर

गारगोटी

भुदरगड तालुक्यात रविवारपासून पावसाची संततधार सुरू असून सोमवारपासून रात्रभर पाऊस कोसळत आहे. वेदगंगा नदीसह ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास वेदगंगेस पूर येण्याची शक्यता आहे.

मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होते. पिके करपण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. भाताची उगवण झाली होती, पण पाऊस नसल्याने पिकाची वाढ खुंटली होती. सध्या जोरदार पाऊस सुरू झाल्याने पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

पावसाअभावी ऊस पिकावर हुमणी किडीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. कीटकनाशकांचा वापर करूनही हुमणी किडीचा प्रतिबंध होत नव्हता. आताच्या पावसाने वाफ्यात पाणी तुंबल्यामुळे हुमनी कीड मरणार असून असाच पाऊस राहिल्यास किडीचा नायनाट होणार आहे. तर उसावर पडणाऱ्या लोकरी माव्याला मोठ्या पावसाने धुवून घालवले आहे. पावसाने पुन्हा गती घेतल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकांच्या अंतर मशागती, खताचे हप्ते देण्याच्या कामाने गती घेतली आहे.

तालुक्यात आज ११५ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली तर आजअखेर २३०१ मिलीमीटर पाऊस झाला. पाटगाव धरण क्षेत्रात ९४ मिलीमीटर पाऊस झाला. पाटगाव धरणात ६२.५९ टक्के पाणीसाठा आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असून वेदगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे.

.............

आजऱ्यात रोपलावण वेगात

आजरा

गेले तीन दिवस सुरू असलेल्या दमदार पर्जन्यवृष्टीमुळे आजरा परिसरात खोळंबलेल्या रोपलावणीला वेग आला आहे. सोमवारपासून येथे पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे सर्व परिसर शेतकरी महिला व पुरूषांनी भरून गेला आहे. गवसे परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी नोंदली गेली आहे. सोमवारी सायंकाळी एरंडोळ प्रकल्प भरला असून चित्री प्रकल्पातील पाणीसाठाही वाढू लागला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत हा प्रकल्प ४३ टक्के भरला आहे. हिरण्यकेशी व चित्री नद्यांचे पात्रही दुथडी भरून वाहू लागले आहे. मात्र अद्याप कोणत्याही बंधाऱ्यावरून पाणी वाहिलेले नाही. तसेच नुकसानीचीही नोंद झालेली नाही. आजरा तालुक्यात आज सरासरी ३६ मिमी तर आतापर्यंत एकूण पाऊस ५०३ मिमी नोंदला गेला आहे.

.............

गडहिंग्लजमध्ये रिपरिप

गडहिंग्लज

गडहिंग्लज तालुक्यात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नसला तरी मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरु राहिली. तालुक्यात पेरणीची कामे उरकली आहेत. त्यामुळे उगवून येत असलेल्या पिकांना आता पाण्याची आवश्यकता आहे. मात्र गेल्या चार दिवसात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र तालुक्याच्या पूर्व भाग अजूनही उपेक्षित असून अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

तालुक्यातील बहुतांश लघुपाटबंधारे तलावात अजूनही अपेक्षित पाणीसाठा झाला नसला तरी आता पाणी साठायला सुरवात झाली आहे. आंबोली व आजरा परिसरात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडहिंग्लजकरांसाठी जीवनदायिनी असलेल्या हिरण्यकेशी नदीपात्राची पातळी वाढली आहे.

.............

कागल

कागल तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. गेले तीन दिवस कागल तालुक्यात धुवांधार पाऊस पडत आहे. या पावसाळ्यात प्रथमच ओढे,नाले आणि नद्याही दुथडी भरुन वाहत आहेत. तालुक्यातील वेदगंगा नदीवरील बस्तवडे, कुरणी, सुरुपली आणि नानीबाई चिखली हे चारही बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तालुक्यात आतापर्यंत २६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

पावसाळ्याच्या सुरवातीपासून कागल तालुक्यात मात्र म्हणावा तसा पाऊस पडला नव्हता.त्यामुळे माळरानावरील पिके धोक्यात आली होती.काही ठिकाणी तर भात पिवळे पडण्याचे प्रमाण जस्तच वाढले होते.परंतु आता झालेल्या पावसाने भात खाचरांमध्ये तसेच ऊस पिकामध्येही पाणी साठले आहे. भातामया कोळपण्या बऱ्यापैकी आटपल्या असून रोप लागणीही झाल्या आहेत. हुमणी पिकाने मात्र मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे.

..............

हुपरी परिसराला झोडपले

हातकणंगले

हातकणंगले तालुक्याला मंगळवारी दिवसभर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सोमवारी दुपारनंतर सुरु असलेला पाऊस रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात सुरू होता. हुपरीसह तालुक्यातील पेठ वडगाव, घुणकी, हेर्ले,कुंभोज,रुकडी, पट्टणकोडोली, रांगोळी, रेंदाळ या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच-पाणी झाले होते. पावसाच्या जोरदार आगमनाने पंचगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आाहे.

-------------------


...............

करवीर परिसरात शेतीकामांना गती

कुडित्रे



गेल्या चार - पाच दिवसांपासून बरसणाऱ्या समाधानकारक पावसाच्या सरींनी शेतीकामांना वेग आला आहे. या पावसामुळे करवीर तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या भात रोपलागणीच्या कामांना पुन्हा गती मिळाली आहे.

आर्द्रा नक्षत्रात पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकरी समाधानी झाला असून या पावसामुळे सर्वत्र पाणी-पाणी केल्यामुळे सगळीकडे ओढे,नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. यावर्षी रोहिणी नक्षत्रापासून पावसाला सुरुवात झाली. रोहिणी नक्षत्रानंतर मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. त्यापाठोपाठ आर्द्रा नक्षत्रात पावसाचे प्रमाण चांगले झाले. पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळे करवीर तालुक्यात खरीप पेरणीनंतर भात रोपलागणीच्या कामांची लगबग सुरू झाली होती. मात्र त्यानंतर आठ - दहा दिवस पावसाने दडी मारल्यामुळे ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी रोपलागणीची कामे थांबली होती. मात्र गेल्या चार - पाच दिवसांपासून पावसाने दमधार सुरुवात केल्यामुळे खोळंबलेल्या रोपलागणीला किंवा थांबवलेल्या रोप लागणीच्या कामासाठी शिवारात पुन्हा लगबग सुरू झाली आहे .




...........................................

चंदगड तालुक्यात नद्या तुडुंब

चंदगड

मंगळवार सकाळपासून चंदगड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे ताम्रपर्णी व घटप्रभा दोन्हीही नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. संततधार पावसामुळे वातावरणामध्ये कमालीचा गारवा जाणवत आहे. वातावरणातील बदलामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या पावसामुळे रोपलावण व नाचणा पिकांना पोषक ठरला आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. फाटकवाडी व जांबरे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे तालुक्याला उन्हाळ्यामध्ये पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी विविध मार्गावरील झाडांच्या फांद्या पडल्याने नुकसान झाल आहे. ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या विद्युत तारांच्यावर पडल्याने विजेचा लपंडाव सुरु आहे. नांदवडे परिसरात गेले दोन दिवस वीज गायब आहे. चंदगड शहरातही विजेचा लपंडाव सुरु आहे. मंगळवारी सकाळी आठवाजेपर्यंत झालेल्या २४ तासात तालुक्यात सरासरी ३१.५० तर आतापर्यंत ७०८.०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७० लाखांचे चंदनाचे लाकूड, चंदन तेल लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वन विभागाच्या चिखली (ता. करवीर) येथील नर्सरीत सोमवारी (ता. १७) मध्यरात्री सशस्त्र चोरट्यांनी दरोडा घातला. या घटनेत चोरट्यांनी नर्सरीतील पाच टन चंदनाचे लाकूड, चंदन तेलाचे डबे असा सुमारे ७० लाख ५० हजाराचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी सुरक्षा रक्षकासह वनमजुराला मारहाण करीत खोलीत डांबून घातले आणि चंदन लंपास केले. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांसह वनविभागाची नऊ पथके तैनात केली आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पत्रकारांना दिली.

चिखलीतील नर्सरीच्या आवारात अवैध वाहतुकीतील चंदनाचे लाकूड आणि चंदनाच्या तेलाचे डबे ठेवले होते. कोर्टाच्या आदेशाने हा मुद्देमाल सांभाळण्याची जबाबदारीही वनविभागाकडे होती. वनअधिकाऱ्यांनी नर्सरीच्या देखभालीसह मुद्देमालाच्या सुरक्षेसाठी वनमजुराची नियुक्ती केली होती. सोमवारी रात्री वनमजूर उत्तम निवृत्ती कांबळे (मूळ रा. मिणचे, ता. हातकणंगले, सध्या रा. अस्वले मळा, वडणगे, ता. करवीर) आणि वनरक्षक संजय आनंदा सातपुते (५५, रा. जाफळे, ता. पन्हाळा) हे दोघे रात्रपाळीसाठी असल्याने नर्सरीतील खोलीत झोपले होते. सातपुते आजारी असल्याने त्यांचा मुलगा लक्ष्मण हाही त्यांच्यासोबत होता. मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठजणांनी कटावणीने दरवाजा तोडून सुरक्षारक्षकांच्या खोलीत प्रवेश केला. चोरट्यांनी उत्तम कांबळे, संजय सातपुते आणि लक्ष्मण या तिघांनाही कोयत्याचा धाक दाखवत त्यांचे हायपाय दोरीने बांधले. तिघांनी आरडाओरडा करताच त्यांच्या तोंडात कापडाचे बोळे घालून मारहाण केली. शिवाय परिसरातील कुत्र्यांना मांसाच्या तुकड्यांतून गुंगीचे औषधही घातले.

चोरट्यांनी नर्सरीतील ट्रकमधील ९ लाख किमतीचे पाच टन चंदनाचे लाकूड, ६० लाख किमतीचे चंदन तेलाचे ४ डबे आणि दीड लाख किमतीचे १०० किलो चंदनाच्या लाकडाचे तुकडे घेऊन पोबारा केला. चोरट्यांनी सुरक्षारक्षक आणि वनमजुराचे मोबाइलही लंपास केले. चोरटे निघून गेल्यानंतर काही वेळाने सातपुते आणि कांबळे यांनी स्वतःची सुटका करून घेतली. नर्सरीतील लाकडाची चोरी झाल्याचे लक्षात येताच दोघांनी करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. पोलिस ठाण्यातून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही दरोड्याबाबत कळवण्यात आले. सकाळी उपवन संरक्षक प्रभुनाथ शुक्ल यांनी चिखली नर्सरीत जाऊन पाहणी केली. त्याचबरोबर वन रक्षक आणि वन मजुराशीही चर्चा केली. वन मजूर उत्तम कांबळे यांच्या फिर्यादीवरून सात ते आठ अज्ञात चोरट्यांच्या विरोधात करवीर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दिलीप जाधव अधिक तपास करीत आहेत.

======

घटनेची माहिती मिळताच मंगळवारी चिखली नर्सरीची पाहणी केली. सुमारे ७० लाखांचे लाकूड आणि चंदन तेलाची चोरी झाली आहे. अजूनही दीड कोटींचा मुद्देमाल नर्सरीत असल्याने पोलिस संरक्षण मागवले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

प्रभुनाथ शुक्ल, उपवनसंरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवड्यातील तीन दिवस यंत्रमाग बंद

$
0
0

इचलकरंजी

जीएसटीमधील गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे शहरातील सुताची आवक बंद राहिल्याने यंत्रमागाचा खडखडाट बंद पडू लागला आहे. तसेच उत्पादीत कापडाची खरेदी-विक्री बंद पडली आहे. नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून आता आठवड्यातून तीन दिवस यंत्रमाग कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एक जुलैपासून जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये कॉटन व पॉलिस्टर सुतावरील कराबद्दल संभ्रमावस्था आहे. तर ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याने गुंतागूंत दूर करुनच त्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी घाऊक कापड खरेदी करणाऱ्या पाली-बालोत्रा, दिल्ली अशा मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी जीएसटीच्या विरोधात खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवले आहेत. त्यामुळे इचलकरंजीतील यंत्रमाग कापडाचा होणारा उठाव पूर्णत: ठप्प झाला आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांनी कापड उत्पादनात घट करण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय शहरातील सायझिंग, प्रोसेसिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात बंद आहेत.

शहर व परिसरात मिळून सुमारे सव्वालाख यंत्रमाग आणि ३५ हजारपेक्षा सेमीऑटो व आधुनिक ऑटोलूम्स आहेत. या दोन्हींच्या माध्यमातून दैनंदिन सुमारे १५० कोटी रुपयांची कापडाची निर्मिती केली जाते. तर यापैकी ८० टक्के यंत्रमागांवर केवळ सूती कापड तयार केले जाते. पण जीएसटीमुळे सूती कापडावर पाच टक्के व सिंथेटिक (पॉलिस्टर) कापडावर १८ टक्के कर लागू झाला आहे. संपूर्ण वस्त्रोद्योगाला जीएसटीमधून वगळण्यात यावे या मागणीसाठी गुजरात, राजस्थान व दिल्ली येथील घाऊक कापड व्यापाऱ्यांनी दोन आठवड्यांपासून पूर्णत: बंद पुकारला आहे. त्याचा परिणाम म्हणून इचलकरंजीतून गुजरात, राजस्थान व दिल्ली येथील व्यापाऱ्यांकडून केली जाणारी ८५ टक्के कापड खरेदी ठप्प झाली आहे. परिणामस्वरुप वस्त्रनगरीतील खडखडाट बंद पडण्याच्या मार्गावरुन असून कापडाचा उठाव होत नसल्याने यंत्रमागधारकांनी आपापले कारखाने आठवड्यातून तीन दिवस बंद ठेवण्याचा कटू निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर सुतापासून बिमे तयार करण्यासाठी सूत येणे बंद झाल्याने सायझिंगमधील उत्पादन घटले आहे.

कापड विक्रीसाठी इचलकरंजीतील यंत्रमाग कारखानदारांकडून जीएसटीचा नंबर काढण्यास सुरुवात झाली आहे. जीएसटी नंबर घेण्यासाठी शहरातील चार्टर्ड अकाऊंटंटच्या कार्यालयांमध्ये गर्दी दिसून येत आहे. मात्र, ज्यांना यंत्रमागावर निर्मित कापड विकायचे, अशा व्यापाऱ्यांकडून अद्याप जीएसटीचा नंबर येण्यास सुरुवात झाली नसल्याने वस्त्रोद्योगात मोठ्या गोंधळाचे वातावरण आहे.

शहर व परिसरातील सेमी ऑटो व ऑटोलूम्स कारखान्यांतून निर्माण होणाऱ्या सुती व सिंथेटिक कापडालासुद्धा गिऱ्हाईक नसल्यामुळे कापडाच्या मागणीत घट झाली आहे. याचा परिणाम म्हणून ऑटोलूमच्या जॉब रेटमध्ये घट झाली असून, मागील महिन्यात १६ ते १९ पैसे प्रतिमीटर मिळणारा जॉबरेट आता १० ते १२ पैशांवर घसरला आहे. तर कापडाच्या मागणीत घट होऊ लागल्याने ऑटोलूम कारखानेसुद्धा पुढील आठवड्यापासून बंद पडू लागतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

इचलकरंजीतील यंत्रमागधारकांकडून ग्रे कापड खरेदी करून ते राजस्थान, अहमदाबाद व दिल्ली येथील व्यापाऱ्यांना पाठविण्यात येते. पण जीएसटीमुळे अडत व्यापाऱ्यांनी खरेदी बंद करण्याचा निर्णय जाहीर केलेला नसला तरी बड्या व्यापाऱ्यांकडून कापडास मागणी नसल्यामुळे अडत व्यापाऱ्यांनीही सौदे करण्यावर रोख लावला आहे. शिवाय जुन्या सौद्यातील कापड खरेदीसुद्धा बंद केल्यामुळे इचलकरंजीतील कापड बाजारात शुकशुकाट जाणवू लागला आहे.

..............

कोट

‘जीएसटी करप्रणातील गुंतागुंतीबाबत कापड व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. सरकारकडून यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल अशी शक्यता दिसत नाही. काही व्यापाऱ्यांनी सौदे सुरु केले आहेत. वस्त्रनगरीवर सध्या बंदचा परिणाम जाणवत असला तरी येत्या काही दिवसात येथील स्थिती पूर्वपदावर येईल, अशी आशा आहे.

विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रगाधारक जागृती संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शालिनी ​सिनेटोनसह मंदिर प्रश्नाकडे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील हक्कदार पुजारी हटवून त्या ठिकाणी सरकार नियुक्ती पगारी पुजाऱ्यांची नेमणूक करावी असा सदस्य ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मं​जुरीसाठी आला आहे. महापालिकेची गुरुवारी (ता. २० जुलै) सर्वसाधारण सभा आहे. शालिनी सिनेटोन आणि जयप्रभा स्टुडिओच्या उर्वरित जागेत बांधकाम अथवा इतर कोणत्याही व्यवसायासाठी महापालिकेने परवानगी देऊ नये हा ठरावही मंजुरीसाठी सभेपुढे आहे.

अंबाबाई मंदिरातील हक्कदार पुजारी हटविण्यासाठी सध्या शहरात आंदोलन सुरू आहे. संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने महापौर हसीना फरास व इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन मंदिरातील पुजारी हटावचा ठराव सर्वसाधारण सभेने मंजूर करावा अशी मागणी केली होती. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंदिरातून पुजारी हटविण्याचा ठराव यापूर्वीच मंजूर केला आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला ठराव मंजूर करण्याची ग्वाही दिली आहे. शालिनी सिनेटोनमधील स्टुडिओची जागा विक्रीचा घाट बांधकाम व्यावसायिकांनी घातला आहे. त्याविरोधात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व चित्रपट व्यावसायिकांनी आयुक्त अभिजित चौधरी यांची भेट घेतली होती. स्टुडिओच्या जागेत बांधकामास व अन्य व्यवसायाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. महापालिकेने बांधकामास मनाई करण्याचा आदेश दिला आहे. शालिनी सिनेटोन आणि जयप्रभा स्टुडिओची जागेचा चित्रपट निर्मितीसाठीच वापर झाला पाहिजे. यासाठी महापालिकेने या दोन्ही स्टुडिओंच्या उर्वरित जागेवर बांधकाम करण्यास कुणालाही परवानगी देऊ नये असा सदस्य ठराव नगरसेविका सुरेखा शहा यांनी मांडला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील नगर- जिवबा नाना जाधव पार्क प्रभागातील जलकुंभाला क्रांतिसिंह नाना पाटीलनगर जलकुंभ परिसर असे नामकरण करण्याचा ठरावही सभेसमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पांच्या मूर्तींना जीएसटीची झळ

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) परिणाम सर्वच व्यवहारावर झाला आहे. जीएसटीबाबत अनेक पातळ्यांवर अद्यापही संभ्रम आहे. या कराचा परिणाम संपूर्ण औद्योगिक क्षेत्रावर झाला आहे. त्याची झळ सर्वसामान्यांनाच बसणार आहे. भक्तीच्या दारीही जीएसटी सोसावा लागणार आहे. गणेशचतुर्थीचे वेध आतापासूनच लागले आहेत. गणेशमूर्तींवरही जीएसटी लागणार असल्यामुळे मूर्तींच्या किमती महागणार आहेत. नेहमीच्या तुलनेत यंदा बाप्पाच्या मूर्तींच्या किमतीत १५ ते २० टक्के वाढ होणार आहे. जीएसटीमुळे शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून मूर्तिकारांना हे दर वाढवण्याशिवाय पर्याय नाही.

यावर्षी बाप्पांचे आगमन लवकर होणार आहे. त्यामुळे कुंभार गल्ल्यांमध्ये मूर्तिकांराची लगबग सुरु झाली आहे. अवघ्या ३५ ‌दिवसांनी म्हणजेच २५ ऑगस्टला गणेशचतुर्थी सणाला प्रारंभ होत आहे. मोठ्या भक्ती-भावाने घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहेत. प्रथेप्रमाणे अनेक मंडळांनी मूर्तींचे बुकिंग आधीच करून ठेवले असले तरी जीएसटीमुळे त्यांना आणखी पैसे द्यावे लागणार आहेत. मूर्तिकामासाठी लागणारा शाडू आणि प्लास्टरवर १ जुलैपासूनच जीएसटी लागू झाला आहे. मूर्तिकारांनी चढ्या दरानेच शाडू, प्लास्टर आणि रंग खरेदी केले आहेत. त्याचा परिणाम साहजिकच विक्रीच्या किमतीवरही होणार आहे. सर्व खर्च लक्षात घेऊन मूर्तिकारांनी यंदा १५ ते २० टक्के दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

गणपतीची मूर्ती बनविण्यासाठी लागणारा रंग यावर ३ ते ४ टक्के जीएसटी, कच्चा माल म्हणजेच पीओपी ला ५ टक्के आणि वाहतूक खर्च ५ टक्के असा जीएसटीच्या अधिक भार सोसावा लागणार आहे. शाडू, प्लास्टर ऑफ पॅरिस प्लास्टिक पेंट, वॉटर पेंट, काथ्या अशा सर्वच कच्च्या मालावर जीएसटी लागू आहे. शिवाय कारागिरी आणि मजुरीचा खर्च यामुळे एकूणच मूर्तिकामाचा खर्च वाढणार आहे. या आधी शाडूची एक फुटाची मूर्ती साधारण ११०० रुपयांना मिळत होती. ती यंदा १५०० रुपयांच्या घरात जाणार आहे. तर प्लास्टरची मूर्ती १२०० रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. प्रत्येक मूर्तीमागे साधारण ३०० ते ४५० रुपयांचा खर्च जास्त द्यावा लागणार आहे. मूर्तीवरील नक्षीकाम आणि वेगवेगळ्या रुपातील गणपती यावर त्या मूर्तीची क‌िंमत ठरते.

कर्नाटक सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी घातली आहे. त्यामुळे तेथील अनेक कामगार बेरोजगार आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या मजुरांनीही दरवाढ केली आहे. कास्टिंग आणि फिनिशिंगचे दरही वाढले आहेत. एका मूर्तीच्या फिनिशिंगसाठीचा दर २०० ते ३०० रुपये झाला आहे. तर कास्टिंगसाठी मूर्तीच्या आकारावरुन ३० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत मजुरी घेतली जात आहे.

पन्नास टक्के काम पूर्ण

कुंभारवाड्यात गणेशमूर्ती बनविण्याचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. रंगरंगोटीचे काम करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे मूर्ती साकारण्याची गती थोडी कमी झाली आहे.

============

१ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यामुळे मूर्तीसाठी लागणारा कच्चा माल, रंग, वाहतूक असा सर्व खर्च लक्षात घेता यंदा मूर्तींच्या किमती १५ ते २० टक्क्यांनी वाढणार आहेत. कर्नाटकात प्लास्टर मूर्तींना बंदी आहे. त्यामुळे अनेक कामगारांना रोजगार नाही.

उदय कुंभार, मूर्तिकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भिलारे गुरुजी यांचं निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । भिलार (सातारा)

महात्मा गांधी यांच्यावर झालेला चाकूहल्ला परतवून लावणारे सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार भि. दा. भिलारे ऊर्फ भिलारे गुरुजी यांचं आज पहाटे पाचच्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. आज दुपारच्या सुमारास त्यांच्यावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भिलारे गुरुजींचा जन्म महाबळेश्वरजवळच्या भिलार गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. सुरुवातीच्या काळात प्राथमिक शिक्षक असलेले भिलारे हे संपूर्ण महाराष्ट्रात गुरुजी म्हणूनच परिचित होते. ब्रिटिशांच्या विरोधात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सुरू केलेल्या 'प्रति सरकार'मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. भूमिगत राहून पत्रकं वाटण्याचं काम ते करत. महात्मा गांधी, साने गुरुजी यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. या दोघांसोबत त्यांनी अनेक सेवा कार्यात सहभाग घेतला होता. १९४४च्या जुलै महिन्यात महात्मा गांधी यांच्यावर नथुराम गोडसे व त्याच्या साथीदारांनी केलेला चाकूहल्ला त्यांनी परतवून लावला होता. गुरुजी यांनी त्यावेळी नथुरामला पकडून दिले होते.

नंतरच्या काळात ते राष्ट्र सेवा दलातही सक्रिय झाले. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले. ग्रामोन्नती संघ, सर्वोदय योजनांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामांचा डोंगरच उभा केला. १९६२ ते १९८० अशी तब्बल १८ वर्षे ते आमदार होते. त्यापैकी १२ वर्षे त्यांनी जावली तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. तर, ६ वर्षे विधान परिषदेवर होते. आमदार म्हणून त्यांनी जावली तालुक्यातील अनेक प्रश्नांची तड लावण्यात यश मिळवले. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.

ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला

गांधी युगाचे प्रत्यक्ष साक्षीदार, महात्मा गांधीजींवर नथुराम गोडसेने केलेल्या हल्ल्याचा प्रतिबंध करणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भिलारे गुरुजी यांच्या निधनाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा ज्येष्ठ व जुना मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे. भिलारे गुरुजी गांधीवादी विचार आणि काँग्रेस पक्षाचे तत्वज्ञान प्रमाण मानून आयुष्यभर सार्वजनीक जीवनात कार्यरत राहिले. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. महाराष्ट्र विधानसभेमध्ये त्यांनी महाबळेश्वर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या काळातच महाबळेश्वर येथे पर्यटकांसाठी आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे मुलभूत काम झाले होते. आज स्वातंत्र्य चळवळीच्या नितीमूल्यांना आव्हान मिळत असताना भिलारे गुरुजींचे आम्हाला सोडून जाणे अधिक क्लेशदायक आहे, असे चव्हाण यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णाला बेशुद्ध न करता हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआरमध्ये) ६५ वर्षाच्या एका रुग्णावर ओपन हार्ट सर्जरी यशस्वी करण्यात आली. त्या रुग्णाला बेशुद्ध न करता, त्याच्याशी संवाद साधत शस्त्रक्रिया करण्याची किमया सीपीआरच्या वैद्यकीय टीमने केली. गफूर सौदागर असे रुग्णाचा नेव आहे. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या चार रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतरची ही अतिशय अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. छत्रपती प्रमिलाराजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

डॉ. रामानंद म्हणाले, ‘विक्रमनगर येथील गफूर सौदागर यांना दम लागून अस्वस्थ वाटू लागल्याने १८ जून रोजी दाखल करण्यात आले. विविध चाचण्या केल्यानंतर त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीन रक्तवाहिन्या ९० टक्के तर एक रक्तवाहिनी १०० टक्के ब्लॉक झाल्याचे निदान झाले. हृदयरोग विभागप्रमुख डॉ. रणजीत जाधव यांनी ओपन हार्ट सर्जरी करण्याचे निश्चित केले. ही शस्त्रक्रिया रुग्णाला बेशुद्ध न करता, रुग्णाबरोबर संवाद साधत केली. शस्त्रक्रियेदरम्यान व्हेंटीलेटर वापरला नाही आणि श्वसननलिकेत नळी न टाकता शस्त्रक्रिया केली. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्ण लवकर बरा होतो. तसेच फुप्फुसाचा न्युमोनिया होण्याचे प्रमाण कमी होते. ही शस्त्रक्रिया जीवनदायी आरोग्य योजनेतून मोफत केली. अशा प्रकारची गुंतागुतीची शस्त्रक्रिया सीपीआरमध्ये प्रथमच करण्यात आली. ही शस्त्रक्रिया अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हेमलता देसाई, डॉ. माजिद मुल्ला, डॉ. सचिन पाटील, डॉ. रणजित पवार, अरुण पाटील, उदय बिरांजे आणि विनायक चौगुले या टीमने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठानेही पाठवले ‘ते’ बनावट परिपत्रक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उच्चशिक्षण खात्याच्या कोल्हापूर विभागीय सहसंचालकांनी १ जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकात फेरफार करून त्यांच्या नावे बनावट काढलेले बनावट परिपत्रक शिवाजी विद्यापीठाकडून सर्व कॉलेजांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या पदभरतीत गोंधळ उडाला आहे. शिक्षण सहसंचालकांनी बनावट परिपत्रक रद्द केल्याचे जाहीर करूनही विद्यापीठाकडून हा घोळ घातला गेला आहे.

उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय साळी यांच्या नावे काढलेले बनावट परिपत्रक व्हॉट्सअॅपवरून प्रसारित करण्यात आले होते. वेतनावरील खर्च नियंत्रित करण्याबाबत असलेल्या या परिपत्रकात बनावट मजकूर घुसडण्यात आला होता. कॉलेजांकडून याबाबत विचारणा होऊ लागल्यानंतर डॉ. साळी यांनी १३ जुलै रोजी याबाबत सुधारित आदेश काढून व्हॉट्सअॅपवरील परिपत्रक बनवाट असल्याचे स्पष्ट केले होते. हे परिपत्रक बनावट असल्याचे सहसंचालक कार्यालयाने आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आणि संलग्नित महाविद्यालये, शिवाजी विद्यापीठाला कळविले.

मात्र, शिवाजी विद्यापीठाच्या विशेष कक्षाद्वारे १३ जुलै रोजीच जावक क्रमांक ५४ अन्वये तेच परिपत्रक सर्व कॉलेजांना पाठविण्यात आले. त्यामुळे प्राध्यापक व अन्य पदांची भरती सुरू आहे, अशा कॉलेजांमध्ये गोंधळ उडाला आहे.

दरम्यान, सध्या सुरू असलेली विद्यापीठ कार्यक्षेत्रातील भरती प्रक्रिया रखडावी यासाठी जाणीवपूर्वक हे प्रयत्न केले गेल्याची चर्चा सुरू आहे. उच्च शिक्षण सहसंचालकांनी परिपत्रक बनावट असल्याचे जाहीर केल्यानंतरही ते परिपत्रक विद्यापीठापर्यंत कसे पोहोचले? विद्यापीठाच्या विशेष कक्षाने ते परिपत्रक पुढे ई-मेलद्वारे सर्व कॉलेजांना कसे पाठवले? आदी प्रश्न उपस्थित झाले आहेत. उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाचे त्यानंतरचे पत्र अद्याप संबंधित कॉलेजांना पाठविण्यात आलेले नाही. त्यामुळे भरती प्रक्रिया रखडविण्यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यासंदर्भात कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images