Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पेट्रोल पंपांवर छापासत्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे
ठाणे ये‌थील क्राइम ब्रँचने पेट्रोल पंपांवरील कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून, दुसऱ्या दिवशी (शनिवारी) गगनबावडा तालुक्यात दोन पेट्रोलपंपांवर कारवाई करण्यात आली. यात तिसंगीजवळील वेतवडे फाटा येथील ओम तत् सत‍ या पंपावरही इंधन कमी दिले जात असल्याचे स्पष्ट झाल्याने तो सील करण्याची कारवाई रात्री करण्यात आली. रुपाली सागर जामदार यांच्या मालकीचा हा पंप आहे. सागर जामदार हा व्यवस्थापक आहे.
या पंपावर केलेल्या तपासणीवेळी प्रमाणापेक्षा पेट्रोल ३८ आणि डिझेल ४३ मिलीलिटर कमी मिळत असल्याचे स्पष्ट झाले. पंप सील करून चार पल्सर कार्डस आणि दोन कंट्रोल पॅनेल्स जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान दुपारी गगनबावडा येथील महाराष्ट्र स्टेट को ऑप टोबॅको फेडरेशन लि. कोल्हापूरच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर पथकाने छापा टाकून येथील पंपाची तपासणी केली. मात्र यामध्ये त्रुटी आढळल्या नाहीत. तथापि, येथील चारपैकी तीन ऩोझलमधून पाच लिटरमागे १० ते २२ मिली पेट्रोल व डिझेल कमी आढळले. त्यामुळे संबंधित पेट्रोल पंपाला रि स्टँम्पिंग करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
दोन्ही ठिकाणी ठाणे क्राइम ब्रँचचे पोलिस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गगनबावडा पंपावर डिझेल व पेट्रोल सोडण्याचे प्रत्येकी दोन नोझल आहेत. या पथकाने या चारही नोझलची तपासणी केली असता डिझेलच्या एका नोझलमधून तंतोतंत तर अन्य पेट्रोल व डिझेलच्या तीन नोझलमधून पाच लिटरमागे १० ते ते २२ मिलीपर्यंत इंधन कमी मिळाले. त्यामुळे या पंपाला नोटीस बजावली आहे.
कारवाईत घोडके यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक अविनाश महाजन, हवालदार अंकुश भोसले, सुरेश यादव, संतोष सुर्वे, प्रशांत भुर्के, कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेचे एस. डी. चव्हाण, झेड. आर. पाटील, गगनबावडा पोलिस शिपाई प्रविण पाटील , कोल्हापूर वैधमापनशास्त्र निरीक्षक के. डी. बिराजदार, कागलचे निरीक्षक ल. अ. कुटे, गडहिंग्लजचे निरीक्षक अ. अ. शिंगाडी यांनी सहभाग घेतला घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लग्नास नकार दिल्याने घरात घुसून तलवार हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लग्नास नकार दिल्याच्या रागातून अमोल विठ्ठल गावडे (वय २३, रा. लक्ष्मीपुरी) याने सात ते आठ तरुणांसह आझाद गल्लीतील तरुणीच्या घरात घुसून दोघांवर तलवार हल्ला केला. या हल्ल्यात सुरेश बळवंत काकडे (वय ५५, आझाद गल्ली, गुजरी कॉर्नर) आणि त्यांचे जावई योगेश बाबासो घोसरवाडे (३५, रा. हळदी, ता. करवीर) हे दोघे गंभीर जखमी झाले. शनिवारी (ता. ८) पाचच्या सुमारास ही घटना घडली. प्रचंड दहशत निर्माण करून हल्लेखोर तरुण घटनास्थळावरून पसार झाले असून, या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत जखमींच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मीपुरीतील अमोल गावडे आणि आझाद गल्लीतील तरुणीच्या लग्नाची दोन्ही कुटुंबीयांकडून बोलणी सुरू होती. दोन दिवसांपूर्वी तरुणीच्या नातेवाईकांनी या लग्नास नकार दिला. याचा राग मनात धरून अमोल गावडे याने शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आयसोलेशन परिसरात संबंधित तरुणीला अडवले. लग्नास नकार का दिला? अशी विचारण करून त्याने तरुणीचा मोबाइल काढून घेतला. तिला शिवीगाळ आणि मारहाण करून गावडे निघून गेला होता. यानंतर तरुणीने राजारामपुरी पोलिस ठाण्यात गावडे याच्याविरोधात तक्रार दिली, मात्र पोलिसांनी संशयिताची चौकशी केली नाही, अशी माहिती जखमींच्या नातेवाईकांनी दिली.

संध्याकाळी पाचच्या सुमारास अमोल गावडे सात ते आठ तरुणांसह आझाद गल्लीतील सुरेश बळवंत काकडे यांच्या घरी पोहोचला. त्याने सुरेश काकडे आणि योगेश बाबासो घोसरवाडे यांच्यावर तलवारीने हल्ला केला. यावेळी घरातील इतरांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोर तरुणांनी नातेवाईकांनाही मारहाण केली. प्रचंड दहशत माजवून हल्लेखोर पळाले. नातेवाईकांसह गल्लीतील तरुणांनी जखणींना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले, सुरेश काकडे यांच्या डोक्याला तलवारीचा वर्मी घाव लागला आहे. जुना राजवाडा पोलिसांनी या घटेची माहिती मिळताच पोलिसांनी सीपीआरमध्ये धाव घेऊन जखमींचे जबाब घेतले. हल्लेखोरांच्या अटकेसाठी दोन पथके रवाना केली आहेत. लवकरच त्यांना अटक करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक निशिकांत भुजबळ यांनी दिली.



काकडे हिंदू एकताचे कार्यकर्ते

सुरेश काकडे हे हिंदू एकता आंदोलनचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर तलवार हल्ला झाल्याचे समजताच हिंदू एकतासह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. हल्ल्याच्या नेमक्या कारणावरूनही उलटसुलट चर्चा सुरू होती. हल्लेखोर अमोल गावडे हा एका गुन्हेगारी टोळीशी संबंधित असून, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असल्याची चर्चा सीपीआर परिसरात सुरू होती. जखमींच्या नातेवाईकांनीच हल्ल्याचे कारण आणि हल्लेखोरांबाबत माहिती दिल्यानंतर संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरशैक्षणिक धोरणांविरुद्ध आवाज उठवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘केंद्र सरकारने तयार केलेल्या शैक्षणिक धोरणात अनेक त्रुटी आहेत. शिक्षकांचे दर पाच वर्षांनी त्रयस्थ यंत्रणेकडून मूल्यमापन करण्याची अट आहे. अशा चुकीच्या धोरणांविरोधात आगामी काळात शिक्षक संघटनांनी आवाज उठवावा. आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ,’ असे आश्वासन आमदार सतेज पाटील यांनी रविवारी दिले.

खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांचा सेवानिवृत्तीबद्दल ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये कार्यक्रम झाला. महापौर हसीना फरास प्रमुख उ‌पस्थित होत्या.

आमदार पाटील म्हणाले, ‘राज्याचा शिक्षण विकास दर घसरला आहे. त्यामुळे भविष्यात शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने सतर्क राहण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने नवे शैक्षणिक धोरण तयार केले. त्यातील चांगल्या गोष्टींना पाठिंबा देऊन चुकीच्या गोष्टींना प्रखर विरोध करावा. त्यासाठी रसाळे यांनी राज्यभर दौरा करून जागृती करावी. शहरात दोन वर्षांत समितीचे कार्यालय बांधण्यासाठी हातभार लावणार आहे. डी. वाय. पाटील शिक्षण समूहातर्फे कार्यालयासाठी पाच लाख दिले जातील, तसेच जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.’

रसाळे यांनीही सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी, आमदार दत्तात्रय सामंत, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार के. पी. मगेन्नावर, डी. बी. पाटील, अर्जुन रसाळे, जयवंत हक्के यांची भाषणे झाली. अंजनकुमार पाटील यांनी स्वागत केले. रसाळे गौरव समितीचे अध्यक्ष आनंदा हिरुगडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रसाळे यांच्यावरील ‘भंबार झेप’ गौरवांकाचे प्रकाशन झाले. गौरव समितीतर्फे रसाळे यांना पाच लाखांचा धनादेश देण्यात आला. त्यामध्ये एक लाख घालून रसाळे यांनी समितीचे कार्यालय बांधण्यासाठी सहा लाखांचा धनादेश गौरव समितीकडे दिला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय पाटील, शांतादेवी डी. पाटील, प्रतिमा पाटील, कृष्णादेवी रसाळे, रेवती रसाळे, व्ही. बी. पायमल, शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, महावीर माने, आदींसह समितीचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृतज्ञतेची गुरुपौर्णिमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावर मार्गदर्शन करत जीवनाला आकार देणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. विविध संस्थांच्यावतीने ठिकठिकाणी गुरुवंदनाचा कार्यक्रम झाला. या दिनाला सामाजिक उपक्रमांची जोड देत वृक्षारोपण, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी शहरातील दत्त मंदिर, गणेश मंदिर, स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला. हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेच्यावतीने राजारामपुरी येथील इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन येथे गुरुपौर्णिमा साजरी झाली.

ठिकठिकाणी व्यासपूजन व गुरू पूजनाचा कार्यक्रम झाला. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आवडत्या शिक्षकांची भेट घेऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावरही गुरुभक्तीचा दरवळ पसरला होता. शुभेच्छा संदेश, गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश पाठवित सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

दरम्यान, शहरातील विविध भागांतील दत्त मंदिर, स्वामी समर्थ मंदिर आणि गणेश मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. कणेरी मठ येथेही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कॉलेज तरुणाईच्या ग्रुप्सनी एकत्रित येत वृक्षारोपण, रक्तदान शिबिर भरवित सामाजिक कार्याची जोड दिली.
दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा

कणेरी मठ येथेही सकाळपासूनच गर्दी झाली. मठ परिसरातील शिव मंदिरात पहाटे काकड आरती झाली. गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. कोल्हापुरातील गंगावेश, आझाद चौक, अंबाबाई मंदिर परिसरातील दत्त मंदिर भाविकांनी फुलला होता. मंदिरात ग्रंथ पारायण, होम हवन अशा धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती.

दरम्यान, श्री दत्ताबाळ मिशन डिव्हाईन संचलित श्री दत्ताबाळ विद्यामंदिर, श्री दत्ताबाळ हायस्कूल व श्री इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. शिक्षक दिगंबर बालदे यांचे व्याख्यान झाले. संस्थेचे सचिव नीलेश देसाई, उपाध्यक्षा पल्लवी देसाई, मुख्याध्यापक डी. व्ही.पाटील, एस. बी. डवंग, शिक्षिका बी. एस. चव्हाण आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठुरायाचा लाडू प्रसाद महागणार

$
0
0

वृत्तसेवा, पंढरपूर

पंढरीच्या पांडुरंगाचा प्रसाद म्हणून गेल्या काही वर्षात प्रचलित झालेल्या बुंदीचा लाडू प्रसाद आता महागणार आहे. तोटा भरून काढण्यासाठी २ रुपयांनी किंमत वाढवावी लागणार आहे. ५ रुपयाचा लाडू प्रसाद ७ रुपये करण्याचा मंदिर समितीचा विचार आहे.

विठुरायाच्या लाडू प्रसाद ५ रुपयाला एक याप्रमाणे भाविकांना देण्यात येतो. मात्र सध्या प्रति लाडू दीड ते दोन रुपयांचा तोटा मंदिर समितीला सोसावा लागतोय. वर्षभरात मंदिर समितीकडून जवळपास ५० लाख लाडूंची विक्री करण्यात येते. वाढलेली महागाई आणि नव्याने आलेला जीएसटीमुळे समितीला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे आता मंदिर समितीने या प्रसादाच्या लाडूची किंमत वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विजय देशमुख यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लाडूची किंमत वाढविणे किंवा लाडू दुसऱ्याला बनवायला देणे अशा दोन्ही पद्धतीने विचार सुरू आहे. सध्या वाढत्या महागाईमुळे लाडू विक्रीतून मंदिर समितीला तोटा होत असल्याने ना नफा ना तोटा याप्रकारची किंमत ठरवून दर वाढ केली जाईल, अशी माहिती देशमुख यांनी दिली. यामुळे ५ रुपयाचा लाडू प्रसाद आता ७ रुपयेपर्यंत महाग होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत-देवाची भेट; पालखी सोहळे परतीच्या मार्गावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
आषाढी यात्रेसाठी शेकडो मैलाचे अंतर चालत आलेल्या पालखी सोहळ्यातील पादुकांची रविवारी देवाच्या चरणाशी भेट झाली. देव आणि संत भेटीचा हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.
आषाढीसाठी आलेल्या संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत एकनाथ सात पालखी सोहळ्यांना मानाच्या पालख्या म्हणून ओळखतात. हे सर्व संत वर्षात फक्त एकदाच आषाढ पोर्णिमेला विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. वारकरी सांप्रदायात या संत-देव भेटीला फार महत्व असते. ज्या संतांचा जयजयकार सांप्रदाय आयुष्यभर करीत असतो, त्या संतांची आज आपल्या लाडक्या विठुरायाशी भेट होत असते.
शनिवारी भल्या पहाटे सर्व पालखी सोहळ्यांनी चंद्रभागा स्नान करून हरिनामाच्या जयघोषात गोपाळपूर येथे जाऊन गोपाळकाल्याच्या आनंद घेतला. दही, लाह्या यांच्या काल्याचा प्रसाद गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिरात दाखवून या काल्याच्या प्रसादाचे सर्वच भाविकांना वाटप करण्यात आले. तेथून या सर्व पालखी सोहळे एकापाठोपाठ एक विठ्ठल मंदिरात दाखल होऊ लागले. सुरुवातीला संत एकनाथ महाराज आणि त्यापाठोपाठ संत निवृत्तीनाथ, संत नामदेव, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई यांचे पालखी सोहळे मंदिरात दाखल झाले. या सर्व संतांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या आणि देवाची आणि या संतांची अनुपम भेट घडवून आणण्यात आली. दुपारी बाराच्या सुमारास हजारोंचा जनसागरासह जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देवाच्या भेटीसाठी दाखल झाला. पालखी सोहळ्याचे विश्वस्त अभिजित मोरे यांनी डोक्यावर पादुका घेऊन तुकाराम महाराजांना देवाच्या भेटीसाठी नेले. संत तुकाराम महाराज यांच्या भेटीनंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दुपारी एक वाजता मंदिरात दाखल झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने विठुराया आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यावर हा संत-देव भेटीचा सोहळा पार पडला.
वारकरी संप्रदायाने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आज सर्व पालखी सोहळ्यांनी परंपरागत भेटीचा सोहळा पार पाडत असताना सरकारचा निषेध म्हणून एकही पालखी सोहळ्याने समितीकडून सत्कार स्वीकारला नाही. नवीन मंदिर समिती बरखास्तीची संप्रदायाने आंदोलन छेडले असून, त्याचाच एक भाग म्हणून मंदिर समितीकडून कोणताही सत्कार स्वीकारण्यात आलेला नाही. आजच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानंतर आषाढी यात्रेची सांगता झाली असून, सर्वच पालखी सोहळ्यांनी रविवारी परतीचा प्रवास सुरू केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ खासदार बनसोडेंच्यापुतळ्याचे सेनेकडून दहन

$
0
0

सोलापूर
‘इकडे महाराष्ट्रातल्या उमदीसारख्या गावामध्ये एकही माणूस मराठीत बोलत नाही, मग तुम्हाला कशाला पाहिजे बेळगाव,’ अशी मुक्ताफळे उधळणारे सोलापूर भाजपचे खासदार शरद बनसोडे यांचा शिवसेने चांगलाच समाचार घेतला आहे. शहरात शिवसेनेकडून बनसोडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
सोलापुरात शनिवारी झालेल्या कन्नड साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन बोलताना बनसोडे यांनी वादग्रस्त विधान केले होते. बनसोडे म्हणाले, मुंबईचे आमचे काही मित्र बेळगाव मागतात. आमच्या सांगलीजवळ जत तालुक्यात २५ हजार लोकवस्तीचे उमदी हे गाव आहे. या गावात एकही माणूस मराठीत बोलत नाही, मग आम्हाला कशाला हवाय बेळगाव, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. सीमाप्रश्नी आक्रमक राहिलेल्या मित्रपक्ष शिवसेनेला डिवचल्याच्या रागातून रविवारी सेनेचे शहराध्यक्ष प्रताप चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी बनसोडेंच्या निषेधार्थ घोषणा देत जुनी मिल कंपाउंड येथील शिवसेना कार्यालयासमोर बनसोडेंच्या पुतळ्याचे दहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वालचंद महाविद्यालयावर प्रशासक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय प्रशासकाच्या स्वाधीन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाविद्यालयाच्या मालकीचा व्यवस्थापकीय मंडळ आणि एमटीई सोसायटीत जुंपलेला वाद न्यायालयात गेला आहे. न्यायालयाचा फैसला येईपर्यंत महाविद्यालयाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने महाराष्ट्र टेक्निकल बोर्डाचे सहसंचालक प्रमोद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांचे प्रशासक मंडळ (अ‍ॅडव्हॉक कमिटी) नियुक्त केली आहे. मकरंद देशपांडे (मिरज) यांची मंडळाच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे.
सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यमान व्यवस्थापकीय मंडळाचे सर्वेसर्वा अजित गुलाबचंद आणि महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्यात महाविद्यालयाच्या मालकीवरुन आजवर अनेकवेळा धुमशान झाले आहे. व्यवस्थापकीय मंडळाला खुर्चीतून उठवून एमटीई सोसायटीने महाविद्यालयाचे प्रशासन ताब्यात घेतले होते. त्यानंतर काही दिवसांतच खासदार संजय पाटील यांच्या पुढाकाराने अजित गुलाबचंद यांच्या गटाने गर्दीने येऊन महाविद्यालयावर ताबा मिळवला. जसा त्यांनी ताबा घेतला तसेच आम्ही केल्याचे सांगून दोन्ही बाजूकडून महाविद्यालयात आवारात गुन्हेगार घुसविल्याचा आरोप करण्यात आले. वाद अगदी टोकाला गेल्यानंतर राज्य सरकारने तज्ज्ञांची समिती नियुक्त करून वस्तूस्थितीचा अहवाल मागविला. समितीने अहवाल दिल्यानंतरही बराच काळ सरकारने कोणताच निर्णय घेतला नव्हता. या दरम्यान अजित गुलाबचंद यांनी यंदाच्या पदवीदान समारंभाच्या निमित्ताने समितीचा अहवाल आमच्यासाठी सकारात्मक असल्याचा दावा केला होता. परंतु सरकारने थेट प्रशासक मंडळाच्या माध्यमातून महाविद्यालय ताब्यात घेऊन वाद घालणाऱ्या दोन्ही गटांना न्यायालयाच्या निर्णयापर्यंत महाविद्यालयापासून दूर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तंत्र व उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चौकशी समितीच्या अहवालानंतर व्यवस्थापकीय मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाला ताबा घेण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी (दि. १०) हे मंडळ पदभार घेणार आहे. या वादावर निकाल होईपर्यंत महाविद्यालयासंदर्भात सर्व कामकाज, निर्णयाचे अधिकार या मंडळाला देण्यात आले आहेत. या मंडळावर सदस्य म्हणून वर्णी लागलेले मकरंद देशपांडे यांची नियुक्ती या पूर्वीही सरकारनेच एमटीई सोसायटीवर सरकारी सदस्य म्हणून केलेली आहे. या पार्श्वभूमीवर देशपांडे यांची प्रशासकीय मंडळावरची वर्णी ही सोसायटीच्या दृष्टीने जमेची बाजू मानली जात आहे.

प्रशासक मंडळाचे सदस्य आणि भाजपचे प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महाविद्यालयाच्या मालकी आणि कामकाजावरून वालचंद ट्रस्टचे अजित गुलाबचंद, त्यांनी नियुक्त केलेले व्यवस्थापकीय मंडळ आणि एमटीई सोसायटी यांच्यात अनेक वर्षे वाद सुरू आहे. यातून एकमेकांनी ताबा घेण्यातून प्रकारण वादग्रस्त बनले होते. या सर्वाचा परिणाम महाविद्यालयाच्या कामकाजावर झाला आहे. देशात नावलौकिक असलेल्या महाविद्यालयावर वादाचा परिणाम झाला आहे. गेल्या काही वर्षांत तर या महाविद्यालयाची प्रगती थांबली आहे. अन्य महाविद्यालयांच्या तुलनेत येथील मंजूर संख्या वाढविण्यापासून ते कामकाज, विकासात्मक कामावर परिणाम झाला आहे. यातून विद्यार्थी, प्राध्यापकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. इमारत, वसतिगृह, प्रयोगशाळेपासून ते क्रीडांगणापर्यंत सर्वच बाबतीत दुरवस्था झाली आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. उलट हा वाद न्यायप्रविष्ट असल्याने संस्था बदनाम होऊ लागली आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी विद्यार्थी, प्राध्यापक तसेच नागरिकांनी सरकारकडे केली आहे. यामुळे महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मुख्यमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तावडे यांनी पुढाकार घेऊन वादावर न्यायालयाकडून तोडगा निघेपर्यंत सरकारकडूनच प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. तसे आदेश तावडे यांनी शुक्रवारी दिले आहेत. सोमवारी प्रशासक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद नाईक हे सांगलीत येणार आहेत. त्यांच्यासह समिती महाविद्यालयाचा ताबा घेणार आहे.
सरकारचा निर्णय मान्य : देशमुख
एमटीई सोसायटीचे अध्यक्ष आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, सरकार जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. या बाबत न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत आम्ही कामकाजात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. उलट महाविद्यालयाच्या भल्याचा विचार करीत प्रशासक मंडळाला आवश्यक ते सहकार्यच करू.
व्यवस्थापकीय मंडळाकडे लक्ष
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रशासन सध्या अजित गुलाबचंद यांच्या अधिपत्याखालील व्यवस्थापकीय मंडळाकडे आहे. सरकारच्या आदेशानुसार हे मंडळ बरखास्त करून प्रशासक ताबा घेणार आहे. त्यामुळे या मंडळाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अचानक सोमवारी महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करून प्रशासकाची वाट आडवून न्यायालयाच्या माध्यमातून सरकारच्या आदेशाला स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न विद्यमान व्यवस्थापकीय मंडळ करेल, अशी रविवारी दिवसभर चर्चा होती.
प्रशासक मंडळ
महाराष्ट्र टेक्निकल बोर्डचे सहसंचालक प्रमोद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांचे प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून यापूर्वी सोसायटीवर नियुक्त केलेले मकरंद देशपांडे यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. ते दुसरे सदस्य आहेत. शिवाय तिसरे सदस्य म्हणून एआयसीटी दिल्लीचे प्रतिनिधी काम पाहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बळीराजाचे डोळे आभाळाकडेफक्त ४० टक्केच पेरण्या; खरीप वाया जाण्याची भिती

$
0
0

. टा. वृत्तसेवा, मिरज
जून महिना संपून जुलैचा पहिला आठवडा संपला तरी पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम पेरण्या रखडल्या आहेत. मिरज, तासगाव, कवठेहाकाळ, जत, खानापूर, आटपाडी, पलूस, कडेगाव, वाळवा आणि शिराळा या दहाही तालुक्यात अपवाद वगळता समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्यात सरासरी ४० ते ४४ टक्के इतक्याच पेरण्या झाल्या असून, सुमारे ६० टक्के क्षेत्र कोरडेच राहण्याची भिती आहे. येत्या आठवडाभरात पाऊस पडला नाही तर सर्व खरीप हंगामच वाया जाण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
मान्सूच्या सुरुवातीला अपवाद वगळता काही भागात पाऊस थोडाफार पडला. नंतर मात्र पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. यंदा तरी पाऊस वेळेत आणि समाधानकारक पडेल असा वेधशाळेने अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे जून महिना संपून जुलैचा दुसरा आठवडा सुरु झाला मात्र पाऊसाने अपेक्षित सुरूवात केली नाही. सुरुवातीला थोडाफार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची मशागतीच्या कामाने वेग घेतला. मशागतीपाठोपाठ शेतकऱ्यांनी पेरण्याची धांदल सुरू केली. मिरज तालुक्यात सुमारे ४४ हजार हेक्टर खरीप क्षेत्र आहे. ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तसेच मूग, चवळी, उडीद आदी पिके घेतली जातात. मिरज पूर्व भागात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात होणाऱ्या पेरण्या लांबल्या आहेत. केवळ ४० टक्केच पेरण्या झाल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असल्या तरी पाऊसच नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर शेतीची सर्व मशागत करून पाऊस कधी पडणार आणि पेरण्या कधी करायच्या या चिंतेत शेतकरी आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात २४ हजार २७५ हेक्टर खरीप पीकांचा आराखडा कृषी विभागाने तयार केला आहे. तरीही ५० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे १२ हजार १४० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, मूग, उडीद, तूर या सारख्या पिकांची पेरणी केली असली तरी येत्या चार-आठ दिवसांत पाऊस झाला नाही, तर मात्र शेतकऱ्यांना मोठा भुर्दड बसणार आहे. आजही तालुक्यातील ४६ हजार लोकांना टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाने ओढ दिली तर आणखी टॅँकर वाढवण्याची गरज भासण्याची शक्यता आहे.
जत तालुक्यात वरुण राजाने अपेक्षित कृपादृष्टी न दाखवल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या खरीप हंगामात जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. पण पाऊसच नसल्याने दुबार पेरण्या करून तरी पिके तग धरतील का? या चिंतेत आहेत. तासगाव तालुक्यातील ४३ हजार हेक्टर क्षेत्रापैकी अवघ्या साडेबारा हजार हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. पावसाने अबोला धरल्याने शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचेही संकट वाढण्याची शक्यता आहे. विहिरीतील पाण्याची पातळी खाली गेली असून, तालुक्यातील अपवाद वगळता तलावातील पाण्याचा साठाही झपाट्याने कमी होत असल्याने शेतकरी व्यथित झाला आहे. खानापूर-आटपाडीमध्येही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. कडेगाव-पलूस तालुक्यातही ५० टक्के पेरण्या झाल्या आहेत. पावसाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या केल्या असल्या तरी मेघराजाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंतातूर दिसत आहे.
शिराळा तालुक्यात जूनमध्येच पेरण्यांची धांदल सुरू असते. कोकण पट्याजवळील भाग असल्याने अधूनमधून पाऊस पडतो. मात्र, पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. सुमारे २८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात भात पिक पेरणी केली आहे. उर्वरित क्षेत्रात मका, नाचणी, उडीद, सोयाबीन, आदी पीकांची पेरणी करण्यात आली आहे.१५० गावांना टँकरने पाणीपुरवठा
जुलैचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. मात्र, अजूनही पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नाहीत. उन्हाळ्यात सुरू केलेले पाण्याचे टॅँकर अद्याप सुरूच आहेत. येत्या आठवडाभरात पाऊस पडलाच नाही तर परिस्थिती अतिशय कठीण होण्याची शक्यता आहे. जत, कवठेमहाकाळ, तासगाव, खानापूर आणि आटपाडी तालुक्यात समारे दीडशेहून अधिक गावांना टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. तसेच वाड्यावस्त्यावरही पाणीपुरवठा करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृसिंहवाडीत भाविकांची दर्शनासाठी गर्दी

$
0
0

जयसिंगपूर

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गुरूपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. कन्यागत महापर्वकाळ, गुरूपौर्णिमा तसेच रविवार सुट्टीचा दिवस असा त्रिवेणी योग साधत भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी ‘दिगंबरा.. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ जयघोषने परिसर दुमदुमला.

मंदिरात पहाटे चार वाजता काकड आरतीस सुरूवात झाली. यावेळी श्रीं च्या चरणकमलावर उष्णोदकाचे स्नान घालण्यात आले. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सांगली, मिरज, जयसिंगपूर, इचलकरंजी येथून अनेक भाविक चालत आले होते. कृष्णा नदी पात्रात स्नान करून भाविकांनी दर्शन घेतले.

मंदिरात सकाळी आठ ते बारा या वेळेत पंचामृत अभिषेक करण्यात आला. दुपारी बारा वाजता महापूजा झाली. यावेळी भाविकांच्या गर्दीने मंदिरासमोरील घाट फुलला होता. श्री गुरूदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष भाविकांनी केला.

कन्यागत महापर्व काळातील गुरूपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आल्याने नृसिंहवाडीतील रस्ते गर्दीने फुलले होते. मंदिरात सायंकाळी पाच वाजता शरदबुवा घाग यांचे किर्तन झाले. रात्री नऊ वाजता धूप, दीप, आरती व पारंपारिक पध्दतीने इंदूकोटी स्तोत्र झाले.

भाविकांच्या सोयीसाठी दत्त देवस्थानने क्लोज सर्किट टिव्हीची व्यवस्था केली होती. तर ग्रामपंचायतीने पार्किंगची व्यवस्था केली होती. देवस्थानचे अध्यक्ष राजेश खोंबारे, सचिव दामोदर संत, सरपंच अरूंधती जगदाळे, उपसरपंच धनाजीराव जगदाळे यांनी व्यवस्थेची पहाणी केली. अन्नछत्रात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपात्रतेची टांगती तलवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहकार कलम ७८ ‘अ’ नुसार ज्या सहकार संस्थेवर प्रशासकांची नियुक्ती होईल, अशा संस्थेच्या विद्यमान संचालकांना दहा वर्षे कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक लढवता येत नसल्याने देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स स्टोअर्सच्या (जनता बझार) सर्वच विद्यमान संचालकांवर अर्ज अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे. अपात्रतेबाबत प्रशासकांची भूमिका निर्णयाक ठरणार असल्याने सोमवारी (ता.१०) होणाऱ्या अर्ज छाननीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. अपात्रतेची शक्यता असल्याने अनेक विद्यमान संचालकांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा अर्ज

दाखल करुन जनता बझारच्या चाव्या आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी व्युहरचना केली आहे.

मॉल संस्कृती रुजण्याच्या कितीतरी वर्षे अगोदर जनता बझारने ग्राहकांच्या मनात चांगला विश्वास निर्माण केला होता. बझारच्या शाखा आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नांमुळे बझारची भरभराट चांगली सुरू होती. ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर सुमारे ७०० ते ८०० कर्मचाऱ्यांचे संसार फुलले. पण बझारची वाढती आर्थिक प्रगती पाहून येथे राजकीय हस्तक्षेप झाला. नंतर ग्राहक हितापेक्षा स्वहिताला अधिक प्राधान्य देण्यात आले आणि बझारला उतरती कळा लागली. शेतकरी संघानंतर जनता बझारचे नाव आदराने घेतले जात होते. पण सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाने गैरकारभार केल्याच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर बझारवर प्रशासक नियुक्ती झाली.

प्रशासक नियुक्तीनंतर केवळ भाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर बझारचे अस्तित्व शिल्लक आहे. गैरकारभार केल्यानेच प्रशासक नियुक्त झाल्याने विद्यमान संचालकांवर निवडणुकीतून अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारमधील प्राबल्य कमी करण्यासाठी राज्य सरकारने एक वटहुकूम काढला. ज्या संस्थेवर प्रशासक नियुक्त होईल त्या संस्थेच्या संचालकांना पुढील दहा वर्षे कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक लढवता येणार नसल्याचा त्यामध्ये समावेश आहे.

याच वटहुकूमातील तरतुदी जनता बझारमधील विद्यमान संचालकांना लागू होत असल्याने त्यांच्यावर अर्ज अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे. निवडणुकीतील अपात्रतेची शक्यता लक्षात घेऊनच अनेक विद्यमान संचालकांनी आपल्या नातेवाईकांचे अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे विद्यमान संचालक अपात्र ठरले, तरी त्यांच्या नातेवाईकांचा शिरकाव बझारमध्ये होणार असल्याने बझारच्या भवितव्याबाबत आतापासूनच सभासदांतूनच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रशासक न्यायालयात दाद मागणार?

महापालिकेच्या जागेवर कराराने जनता बझारसाठी इमारती उभा केल्या. जनता बझाराने पुन्हा कराराने पोटकुळे ठेवली. संचालक मंडळाने पोटकुळासोबत केलेला करार रद्द करण्यात आला. एखादी जागा भाडे करारावर घेताना, त्याच जागेवर पोटकुळ ठेवता येत नसल्याने याच कायदेशीरबाबीचा आधार घेत प्रशासक न्यायालयात संचालकांच्या विरोधात दाद मागणार का असा प्रश्न निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.


‘बिनविरोध’ची शक्यता धुसर?

संचालकांच्या गैरकारभारांवर बझारच्या माजी कर्मचाऱ्यांनीच तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याची दखल घेत बझारवर प्रशासकांची नियुक्ती केली. प्रशासकांचा कार्यकाळ संपत आल्याने सहकार निवडणूक प्राधिकरणने निवडणूक जाहीर करुन अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र अर्ज दाखल करताना विद्यमान संचालकांमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे. तसेच माजी कर्मचाऱ्यांच्यावतीनेही पॅनेल बांधणीची सुरुवात झाली आहे. त्यामुळे बझारची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर बनली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धर्मापलीकडे जाऊन माणसात देव शोधा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘एकीकडे आशिर्वाद देणाऱ्या महाराजांकडे गर्दी होते तर विचार देणाऱ्या महापुरूषांकडे समाजाकडून पाठ फिरवली जाते. समाजात अनेक विरोधाभासाच्या घटना घडत असताना जात, धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने सामान्य माणसात देव शोधावा’, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले. शिवरत्न कला, सांस्कृतिक, सामाजिक फाउंडेशनच्यावतीने आयोजित

शिवरत्न कला महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होत. महावीर महाविद्यालयाच्या आचार्य विद्यानंद सांस्कृतिक सभागृहात कार्यक्रम झाला.

आमदार कडू म्हणाले, ‘समाजात अनेक विरोधाभासाच्या घटना पहायला मिळतात. गावात मंदिर व मशिदीच्या इमारती सुसज्ज असतात. पण अपंगांची घरे मोडकी तोडकी असतात. स्वातंत्र्याचा लाभ फक्त श्रीमंताना मिळाला पण दीन दलितांना मिळाला नाही. महिलांचा सन्मान राखण्यासाठी दुर्गेची पूजा केली जाते पण विधवांना सन्मान मिळत नाही. प्रत्येक धर्माचे लोक स्वतःचे सण धुमधडाक्यात साजरा करता पण १५ ऑगस्ट, व २६ जानेवारी या राष्ट्रीय सणाच्यावेळी सर्वजण एकत्र येत नाहीत. समाजातील हा विरोधाभास संपला पाहिजे.’

आमदार कडू म्हणाले, ‘अपंगांना ६०० रुपये पेन्शन मिळते तर निवृत्त आमदारांना दीड लाख पेन्शन मिळते. सत्तेतून आमदारांना काय फायदा मिळतो याचे मुल्यांकन होण्याची गरज त्यांनी व्यकत केली. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली असली तरी जे कर्जमाफीत नापास झाले आहेत त्यांना कर्जमाफी मिळाली आहे व ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरले आहे त्यांना कर्जमाफीतून वगळले आहे. सरकारने कर्जमाफी करताना चार वेळा अध्यादेश बदलले. ज्या ज्यावेळी कर्जमाफीत शेतकऱ्यांच्यावर अन्याय होईल, तेव्हा सरकारला अध्यादेश बदलायला भाग पाडू.’

यावेळी मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. विलासराव परळकर, संदीप पाटील, राज्यवर्धन मोहिते, देवदत्त माने, संदीप मोहिते, अफजल देवळेकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पेशल ऑलिम्पिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीय स्तरावरील स्पेशल ऑलिंम्पिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी देशभरातील १५० खेळाडू कोल्हापुरात दाखल झाले आहेत. सोमवारी (१०) सायंकाळी पाच वाजता कदमवाडी येथील साई एक्झिक्युटिव्ह हॉल येथे स्पर्धेस प्रारंभ होणार आहे, अशी माहिती ‘स्पेशल ऑलिंम्पिक भारत’ महाराष्ट्राच्या डायरेक्टर सॅन्ड्रा वाझ यांनी दिली. या स्पर्धेचे नियोजन ‘जिज्ञासा’ संस्था करत आहे.

दर चार वर्षांनी स्पेशल ऑलिंम्पिक आयोजित केले जाते. या स्पर्धेत जगभरातील १७० देश सहभागी होतात. सोशल ऑलिंम्पिकच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा कोल्हापुरात प्रथमच होत आहे. पॉवरलिफ्टिंग नॅशनल चॅम्पियनशिप या स्पर्धेसाठी १७ राज्यातील १५० खेळाडू सहभागी होणार आहे. १४ जुलैपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. महाराष्ट्राच्या संघात कोल्हापूरच्या दोन खेळाडूंचा सहभाग आहे. स्पर्धा १४ वयोगट, १९, २३, २९, ३९ वयोगटासह मास्टर गटात होणार आहेत.

सोमवारी (१०) सकाळी नऊ वाजता बिनखांबी गणेश मंदिर येथून स्पर्धेनिमित्त ‘टॉर्च रन’ रॅली होणार आहे. यावेळी निर्मिती ग्राफिक्सचे अनंत खासबागदार, शिरीष खांडेकर, समाज कल्याण अधिकारी प्रदीप भोगले उपस्थित राहणार आहेत. शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅलीचा समारोप शिवाजी चौकात होणार आहे. महापौर हसिना फरास यावेळी उपस्थित राहणार आहेत. कदमवाडी येथील साई एक्झिक्युटिव्ह हॉल येथे स्पर्धेचे उदघाटन सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पत्रकार परिषदेला व्हिक्टर वाझ, हंसिनी राऊत, भारतश्री बिभिषण पाटील, स्मिता दीक्षित उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिकूल परिस्थितीवर शीतलची मात

$
0
0

युवराज पाटील, कुडित्रे

घरी अठराविश्व दारिद्र्य. वडिलांना तिन्ही मुलींच्या शिक्षणाचा न पेलवणारा खर्च. त्यांनी ट्रॅक्टरचालक म्हणून काम केल्याशिवाय, मोलमजुरीशिवाय प्रपंच चालणार नाही अशी स्थिती. अनेकदा शाळेला जाण्यासाठी एसटीच्या पासचीही तजवीज होण्याची भ्रांत. असे परिस्थितीचे चटके सहन करत, आई-वडिलांच्या कष्टाची जाण राखत करवीर तालुक्यातील आमशी येथील शीतल कृष्णात पाटील हिने दहावीच्या परीक्षेत ९०.४० टक्के गुण मिळवत यशाची यशस्वी मोहोर उमटवली. तिला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचे आहे.

आमशी येथील कृष्णात लहू पाटील आणि त्यांच्या पत्नी संगीता यांनी प्रचंड काबाडकष्ट करून आपल्या दोन मुलींच्या उच्च शिक्षणाबरोबरच तिसरी मुलगी शीतल हिच्या शिक्षणासाठी धडपड केली. शीतलनेही अत्यंत हलाखीची कौटुंबिक परिस्थितीचे भान राखत आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. शीतलने घरामध्ये पदोपदी प्रत्ययास येणाऱ्या आर्थिक टंचाईच्या झळा सोसल्या. आई-वडिलांना आपच्यासाठी ज्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, ती परिस्थिती बदलण्यासाठी शिकून, चांगल्या पगाराची नोकरी करून त्यांना सुखी करायचे आहे, हा दृढनिश्चय तिने केला. अभ्यासात स्वतःला झोकून दिले. शीतलचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले.

त्यानंतर तिने पाचवीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण सांगरुळ हायस्कूलमध्ये घेतले. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी शाळेत जादा तास घेतले जायचे. त्यामुळे ती सकाळी साडेसहाला घराबाहेर पडायचे. गावापासून दीड किलोमीटर चालत पासार्डे फाट्यावर जायचे आणि तेथून सांगरुळला जाणारी बस पकडायची. संध्याकाळी पाचच्या बसने परत पासार्डे फाट्यावर यायचे आणि फाट्यावरून चालत घरी यायचे असा तिचा शाळेचा दिनक्रम होता. सायंकाळी घरी सहा ते नऊ वाजेपर्यंत अभ्यास त्यानंतर जेवण आणि जेवणानंतर पुन्हा २ तास अभ्यास असे तिचे टाइमटेबल होते. त्यात कधीही खंड पडू दिला नाही. तिने अभ्यासातील सातत्य परीक्षेपर्यंत टिकवले. घर अत्यंत लहान असल्याने पोटमाळ्यावर ती अभ्यास करायची. शाळेला सांगरुळला एसटीने जाण्यासाठी तिला महिन्याचा पास काढावा लागायचा. अनेकवेळा या पासचीसुद्धा सोय करताना आई-वडिलांना अडचणी यायच्या. त्यांनी आर्थिक चणचण भासली तरी काबाडकष्ट करून, मुलींचे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. शीतलला सायन्स शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम करण्याची तिची इच्छा आहे. त्यासाठी कष्टाची तिची तयारी आहे. जीवनात आर्थिकदृष्ट्या सक्षम बनून आईवडील, आजीची त्यांच्या कष्टांतून सुटका करून सुखात ठेवण्याची इच्छा आहे. माझ्यासारख्या गरिबीचे चटके सोसणाऱ्या मुलींना शिक्षणासाठी जमेल तेवढी मदत करायचे ध्येय मी बाळगले आहे असा मनोदय शीतलने व्यक्त केला.

आईवडील खूप काबाडकष्ट करून आम्हा तिन्ही मुलींना शिकवत आहेत. आर्थिक कुवत नसताना त्यांनी आम्हाला शिकवण्याचे धाडस केले आहे. आजपर्यंत प्रसंगी कर्ज काढून त्यांनी आमचे शिक्षण सुरू ठेवले आहे. यासाठी वडिलांनी ट्रॅक्टरवर ड्रायव्हर तर आईने मोलमजुरीचे काम केले आहे. मला सायन्स शाखेतून पुढील शिक्षण घेऊन हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करायचा आहे. मात्र घरची परिस्थिती पाहता पुढच्या शिक्षणासाठी पैसे जमा करणे सोपे नाही. गरिबीमुळे मला शिक्षण पूर्ण करायला मिळेल की नाही यात शंकाच आहे. काही वेळा आई-वडिलांना त्रास देण्यापेक्षा पुढे शिक्षण न घेतलेलेच बरे असे वाटू लागते. पण शिक्षणातूनच घरची आर्थिक परिस्थिती आपण बदलू शकतो हा आत्मविश्वास असल्याने मला पुढे शिकायचे आहे.
- शीतल पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपी प्लॅन कागदावर; विकास वाऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा, नागरिकांना सार्वजनिक सुविधा मिळाव्यात यासाठी दर वीस वर्षांनी शहराचा विकास आराखडा सुधारित तयार केला जातो. उपनगरांतील रस्त्यांपासून ते बांधकामांपर्यंतच्या विकासाचे नियोजन या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये केले जाते. मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. १९९९ मध्ये महानगरपालिकेने दुसरा सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध केला. प्रत्यक्षात त्याचेही काही झाले नाही. महापालिकेची दुबळी आर्थिक स्थिती, नियोजनाचा अभाव यामुळे या विकास आराखड्यातील १०० फुटी रोड, १२ आणि १५ मीटरचे रस्तेही विकसित झाले नाहीत. या दुसऱ्या सुधारित विकास आराखड्यातील अनेक तरतुदी कागदावर असताना महापालिका पातळीवर तिसरा सुधारित विकास आराखडा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हद्दवाढीअभावी कोल्हापूर शहराचा विस्तार खुंटला आहे. हॉकर्स झोन, पार्किंगची व्यवस्था आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करत सार्वजनिक वापरासाठीच्या जागांचा विकास हे महापालिकेसमोर आव्हान आहे. हद्दवाढीला विरोधातून शहरासह आसपासच्या गावांसाठी विकास प्राधिकरणाची घोषणा केली गेली. प्रत्यक्षात त्याचेही काही झाले नाही. दुसऱ्या विकास आराखड्यानुसार ७० टक्के जागा विविध विकास कामांसाठी आरक्षित आहेत, मग आता तिसऱ्या विकास आराखड्यासाठी नव्या जागा कुठून आणणार? असाही प्रश्न आहे.

१९९९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या विकास आराखड्यात बायपास रोड प्रस्तावित केले होते. वीस वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला, पण प्रस्तावित केलेल्या अनेक रस्त्यांसाठी अजून भूसंपादन नाही. दुसऱ्या विकास आराखड्यातील ५० टक्के रिंगरोड तयार करण्यात महापालिका असमर्थ ठरली आहे. शहरातील खानविलकर पेट्रोल पंप ते कसबा बावडा, कदमवाडी ते कसबा बावडा या दोन्ही शंभर फुटी रस्त्यांसाठी मार्किंग केले गेले. मात्र या रस्त्यांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. काही मार्गांवरील अतिक्रमणेही कायम आहेत. नगरोत्थान योजनेंतर्गत रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला. पण महापालिकेच्या ताब्यात जागा नसल्यामुळे निधी पडून आहे. कळंबा ते नवीन वाशी नाका या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. नवीन वाशी नाका ते फुलेवाडीपर्यंतच्या रिंगरोडची ‘वाट’ लागल्याचे जाणकार निदर्शनास आणून देतात.

शहराचे भविष्य आणि वाढती लोकसंख्या विचारात घेऊन आराखडा तयार केला जातो. दुसऱ्या विकास आराखड्यात रहिवासी वापर, शैक्षणिक वाहतूक, ग्रीन झोन, सार्वजनिक वापर यांसाठी जागा आरक्षित केल्या गेल्या. मात्र अद्याप त्या विकसित झालेल्या नाहीत. या जागा विकसित करण्यासाठी महापालिकेने आरक्षण टाकलेले आहे. आता तिसऱ्या विकास आराखड्यासाठी, सध्या ज्या जागा शिल्लक आहेत, त्यावर आरक्षण टाकावे लागणार आहे. मात्र, तशा जागा कुठे उपलब्ध होणार, त्यासाठी निधी कसा आणणार हा प्रश्नच आहे.


दुसऱ्या सुधारित विकास आराखड्यातील सार्वजनिक वापरासाठीच्या जागा अद्याप विकसित झाल्या नाहीत. यातील डेव्हलपमेंट झोनखालील ७० टक्के भाग असताना तिसऱ्या सुधारित विकास आराखड्यासाठी जागा कुठून आणणार? असा प्रश्न आहे. राज्य सरकारने ‘ड’ वर्ग महापालिकांसाठी ‘डी’ क्लास बांधकाम विषयक नियमावली अंमलात आणली आहे. त्या नियमावलींच्या आधारे तिसरा विकास आराखडा होणार असेल तर हद्दवाढ आणि प्राधिकरणाशिवाय पर्याय नाही.

- राजेंद्र सावंत, आर्किटेक्ट


महापालिकेच्या हद्दीतील खुल्या जागा लोकसहभागातून विकसित करणे शक्य आहे. तसे केले असते तर विविध ठिकाणी जीम, वॉकिंग ट्रॅक, उद्यानांच्या माध्यमातून त्या त्या परिसराच्या सौंदर्यात भर पडली असती. ज्या कारणांसाठी आरक्षण टाकले, त्यासाठी योग्य वापर न झाल्याने आरक्षण उठविण्याचे प्रकार घडल्याची उदाहरणे आहेत. आरक्षित जागांचा त्याच कारणांसाठी वापर होताना दिसत नाही. मूळ उद्देश बाजूला पडतो. बस टर्मिनस, मैदान, हॉस्पिटल विकसित करण्यासाठी महापालिकेने फंड नसतील तर प्रशासनाने आराखडा बनवून सरकारकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

- संजय पाटील, बांधकाम व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेन्शनर्स संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निवृत्तीवेतनधारकांना साडेसहा हजार रुपये पेन्शनसह महागाई भत्ता द्या, बायोमेट्रिक पद्धतीपेक्षा हयातीच्या दाखल्याच्या आधारे पेन्शन मिळावी आणि पेन्शनखात्याला झिरो बॅलन्स सुविधा मिळण्यासाठी सर्व श्रमिक संघाच्यावतीने गुरुवारी (ता. १३ जुलै) सकाळी ११ वाजता भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. विक्रम हायस्कूल येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी ही माहिती दिली.

अतुल दिघे म्हणाले, ‘निवृत्त कर्मचाऱ्यांना किमान साडेसहा हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली आहे. यासाठी कोशियारी समितीने अहवालही दिला आहे. पण अद्याप कोशियारी समितीच्या शिफारसी सरकारने स्वीकारलेल्या नाहीत. विरोधी पक्षात असताना भाजपने या विषयावर आवाज उठवला होता, पण सत्तेत आल्यानंतर त्यांना विसर पडला आहे. केंद्र सरकारच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून पेन्शनधारकांना बायोमेट्रिक सक्ती केली आहे. बायोमेट्रिक पद्धत चांगली असली, तरी यामध्ये त्रुटी असल्यामुळे जिल्ह्यातील अनेकजण पेन्शनपासून वंचित राहिले आहेत. तसेच स्टेट बँकेने पेन्शनधारकांना बचत खात्यावर किमान तीन हजार रुपयांच्या बँलन्सची सक्ती केली आहे. त्याविरोधातही भविष्यात आंदोलन केले जाईल.’

यावेळी अनंत कुलकर्णी, प्रकाश जाधव, बाळकृष्ण शिरगावकर, विलास चव्हाण, बाबूराव काटकर, इमाम राउत, व्ही. डी. भोसले, दामोदर गुरव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर जिल्ह्याला साथीच्या आजारांचा विळखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हवामानातील बदलामुळे जिल्ह्यात साथीच्या आजारांचा वेगाने फैलाव झाला आहे. पोषक वातावरणामुळे स्वाइन फ्लूने थैमान घातले. यंदा जानेवारीपासून आजअखेरपर्यंत तब्बल १० जणांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाला. तर चिकनगुण्या, डेंगी, कांजिण्या, काविळ, मलेरिया, अतिसार या आजांराचेही रुग्ण वाढले आहेत. आजारी रुग्णांमध्ये बालकांसह ज्येष्ठ नागरिकांचा समावेश अधिक आहे. सरकारची आरोग्य यंत्रणा तोकडी आणि साथीच्या आजाराचा वेगवान फैलाव असे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. साथरोगांचा फैलाव असाच राहिल्यास आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

सद्यस्थितीत घालवाड (ता. शिरोळ) येथे एकास डेंग्यूची लाग झाली. जानेवारी ते जुलैअखेर विविध साथीच्या आजारांची २५ जणांना लागण झाली. तर कोल्हापूर शहरात पाच महिन्यांत ७ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यातील ६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले. एका रुग्णाचा मृत्यू झाला. ‌छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये अद्याप दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जयसिंगपूर, पेठवडगाव नगरपालिकेच्या हद्दीत प्रत्येकी एकाला स्वाइन फ्लूची लागण झाली होती. तर जानेवारी ते जुलैअखेर एकूण ८४ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला.

कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ५, सिंधुदूर्ग जिल्हा आणि कर्नाटकातील प्रत्येक एक, रत्नागिरीतील दोन जणांचा मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे. हातकणंगले तालुक्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला. दरवेश पाडळी (ता. हातकणंगले) येथे चिकनगुण्याचे ४ संशयित रुग्ण आहेत. सर्दी, ताप, खोकल्यासह अन्य आजारांचे रुग्ण जवळच्या हॉस्टिटल्समध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत.


स्वाइन फ्लूची धास्ती वाढली

गेल्या सहा महिन्यांतील स्वाइन फ्लूची ८४ जणांना लागण झाली. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. यात सिंधुदूर्ग जिल्हा आणि कर्नाटकातील रुग्णांचाही समावेश आहे. सर्वाधिक लागण हातकणंगले तालुक्यात झाली असून ६ पैकी ३ जणांचा मृत्यू झाला. आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला असून भुदरगड, चंदगड, पन्हाळा तालुक्यातील प्रत्येकी १ तर राधानगरी तालुक्यातील २ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. करवीर तालुक्यात ५ जणांना लागण झाली तर एका रुग्णाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.

सद्यस्थितीत हवामानातील बदलांमुळे साथीच्या आजारांचा फैलाव वाढला आहे. आजार रोखण्यासाठी नागरिकांनीही विशेष काळजी घ्यावी. स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सीपीआरमध्ये स्वतंत्र कक्ष आहे. तालुका स्तरावरही उपाचरांची सोय करण्यात येत आहे.

- डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुपिरे परिसरात गव्यांचा वावर

$
0
0

कुडित्रे



निटवडेच्या मसोबा डोंगरावरून वरणगे-पाडळी, शिंदेवाडी परिसरात जाताना काही शेतकऱ्यांना शनिवारी दुपारनंतर गव्याचां कळप दिसला होता . तर रविवारी याच कळपाचा वावर खुपिरे परिसरात काही शेतकऱ्यांना आढळला. शनिवारीच वनविभागास याची माहिती देण्यात आली होती. पण त्या दिवशी वनविभागाचे कर्मचारी फिरकलेच नाहीत. खुपिरे ,वरणगे पाडळी व शिंदेवाडी परिसरात सलग दुसऱ्या दिवशी गव्यांच्या कळपाचा वावर सुरु राहिल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

खुपिरे, वरणगे-पाडळीच्या गावांना लागून डोंगर परिसर आहे. यात छोटे जंगलही आहे. पण या परिसरात गव्यांचा कधीही वावर नव्हता. येथे जंगलामध्ये मुबलक चारा, पाणी उपलब्ध असल्यामुळे गवे इकडे आले असावेत. भटकत भटकत आता त्यांचा वावर मानवी वस्तीकडे वाढू लागल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

या परिसरातील शेतकरी वर्ग जनावरांच्या वैरणीसाठी व सध्या चालू असलेल्या शेतीकामासाठी सकाळपासूनच शेतात असतात. पण या परिसरातील गव्यांच्या वावराने लोकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे. भितीपोठी लोक शेतात जाणे टाळत आहेत. सकाळी वैरणीसाठी गेलेल्या लोकांना शेतामध्ये गव्याच्या पाऊलखुणा व माग दिसले आहेत. शेतकऱ्यांनी गरजेसाठी शेतामध्ये जावे तसेच शेतामध्ये सावधानतेने वावरावे, अशा सूचना स्वतःच लोक एकमेकांना देत आहेत. या गव्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्रातील ग्राहक पेट्रोलसाठी कर्नाटकात

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

पेट्रोल आणि डिझेलवरील एलबीटी रद्द करून आकारण्यात येणाऱ्या स्थानिक व दुष्काळ करामुळे महाराष्ट्रात इंधन महागले आहे. कर्नाटकात इंधन स्वस्त असल्याने कर्नाटक सीमेवरील व महामार्गावरील महाराष्ट्रातील पेट्रोल पंपांना मोठा फटका बसला आहे. कर्नाटक सीमेवरील पेट्रोल पंपांवर ‘महाराष्ट्रापेक्षा स्वस्त’ असे फलक लावण्यात आले आहेत. इंधन कर कमी करण्यासाठी पेट्रोल पंपचालक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

राज्यात एक ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी रद्द करून डिझेलवर प्रति लिटर दोन रुपये दुष्काळ कर आकारणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही डिझेल आणि पेट्रोल महागले आहे. महाराष्ट्रात विविध स्थानिक करांमुळे लगतच्या कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, गोवा या सात राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सरासरी ३.५० रुपये प्रति लिटर जादा दर आहे. पेट्रोलचा ९ रुपयांनी जादा दर आहे. त्यामुळे राज्याच्या सीमेवर असलेल्या पेट्रोल पंपांच्या इंधन विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यात मुंबई विकास कर (स्टेट स्पेसिफिक सरचार्ज) म्हणून प्रति लिटर तीन रुपये आकारणी होते.

नागपूर, औरंगाबाद, नंदुरबार, ठाणे, अमरावती, बारामती या शहरात रस्ते विकासासाठी प्रति लिटर १ ते ४ रुपये जादा व्हॅट आकारणी होते. पुणे, नाशिक, औरंगाबाद व अहमदनगर या शहरात लष्करी छावणी असल्याने येथे इंधनावर एलबीटी व जकात वसुली आजही सुरू आहे. त्यातच या महिन्यापासून डिझेलवर दुष्काळ कर आकारणी सुरू करण्यात आल्याने, शेजारच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात इंधनाचे दर वाढले आहेत. अनेक शहरात पेट्रोल, डिझेलचे दर वेगवेगळे असल्याने शहरातील व शहराबाहेरील पेट्रोल पंप चालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. राज्यांतर्गत मालवाहतुकीतून ४० टक्के डिझेल विक्री होते.

दरवाढीमुळे डिझेल विक्री शेजारच्या राज्यात स्थलांतरित होऊन हजारो कोटींचे नुकसान होण्याची भीती राज्यातील पेट्रोल पंप चालकांना आहे. महाराष्ट्रात इंधन दरवाढ झाल्यामुळे कर्नाटक सीमेवरील पेट्रोल पंपांच्या इंधन विक्रीत घट झाली आहे. कर्नाटक हद्दीतील पेट्रोल पंपांवर स्वस्त इंधनाचे फलक झळकत आहेत.


पंपचालक चिंताग्रस्त

महाराष्ट्राच्या तुलनेत डिझेल गोव्यात प्रति लिटर ५.५० रुपये, गुजरातमध्ये ३.६२, कर्नाटकात ३.५२, छत्तीसगडमध्ये ३.५३, आंध्रमध्ये १.८१ रुपये स्वस्त आहे. पेट्रोल सरासरी २ ते ३ रुपये स्वस्त आहे. त्यामुळे इंधन विक्री व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे पेट्रोल पंपचालकांचे म्हणणे आहे. कर रद्द करण्याच्या मागणीबाबत मंगळवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत पेट्रोल पंपचालकांची बैठक होणार आहे.

कर्नाटक सरकारने व्हॅट कमी केला आहे. ज्यामुळे रविवारचा महाराष्ट्रातील पेट्रोलचा दर ७३ रुपये ५५ पैसे आणि कर्नाटकातील ६४ रुपये ८८ पैसे होता. तर डिझेलचा दर महाराष्ट्रात ५७ रुपये ८८ पैसे होता तर कर्नाटकात ५४ रुपये ३५ पैसे होता. आमच्या पंपावर पेट्रोल सहा हजार लिटर ऐवजी नऊ हजार लिटरने विक्री होत आहे. - रामदास, मॅनेजर, कोगनोळी पेट्रोल पंप


तीन हजार लिटरने वाढ

कोल्हापूर जिल्ह्यातील पेत्रील पंपावर असणाऱ्या रांगा आता कमी होत असून सीमेवरील कर्नाटकातील पेट्रोल पंपांवरील इंधन विक्रीत दररोज दररोज तीन हजार लिटर पेट्रोलच्या विक्रीत वाढ झाली आहे. विक्री वाढली आहे कारण या पंपांवर सीमाभागातील महाराष्ट्रातील लोकही गर्दी करू लागले आहेत. त्यातच या पंपचालकांनी आपल्याकडे कमी दरात पेट्रोल आणि डिझेल मिळत असल्याच्या गाडी फिरवून जाहिराती करण्यास सुरवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीची फेरपरीक्षा उद्यापासून सुरू होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळामार्फत घेण्यात येणाऱ्या फेर परीक्षांना उद्यापासून सुरुवात होणार आहे. २८ जुलैपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे. मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेतील दहा हजार ८९८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. तसेच जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र ज्यांना गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करायचे आहेत असे विद्यार्थीही या परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत.

बारावीचा निकाल लागल्यानंतर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी राज्य शिक्षण मंडळाने पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांची परीक्षा जुलैमध्ये घेऊन त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरपासून शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्याची सुविधा आहे. कमी गुणांनी नापास झाल्यामुळे वर्ष वाया जाण्यापेक्षा नापास विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देण्याची संधी ऑक्टोबर ऐवजी जुलैमध्ये मिळणार आहे.

कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या केंद्रातील ७६३ महाविद्यालयातील १४६ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये सातारा केंद्रातून ३२२१ विद्यार्थी, सांगली केंद्रातून ३३१४ विद्यार्थी तर कोल्हापूर केंद्रातून ४३६३ विद्यार्थी फेर परीक्षा देणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे ११६१ विद्यार्थी फेरपरीक्षा देणार आहेत. कला शाखेतून अनुत्तीर्ण झालेले ७८८९ विद्यार्थी फेरपरीक्षेला बसणार आहेत. वाणिज्य शाखेतून बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या आणि जुलैमध्ये होणाऱ्या फेरपरीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १२६० आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर दोन महिन्यातच फेरपरीक्षेची संधी विद्यार्थ्यांना मिळत असल्यामुळे त्यांना उजळणी करणे शक्य झाले आहे.

बारावी परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १०.४९ टक्के अधिक आहे. त्यामुळे फेरपरीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नापास मुलांची संख्या अधिक आहे. गेल्यावर्षी नापास विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येच्या ५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांना सप्टेंबरपासून अकरावीच्या वर्गात प्रवेश देण्यात आला होता. यंदाही फेरपरीक्षेतील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या वर्गात सप्टेंबरपासून प्रवेश देण्यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना महाविद्यालयांना राज्य बोर्डातर्फे देण्यात आल्या आहेत.

पुरवणी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. परीक्षेच्या कालावधीत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी तसेच आऊट ऑफ टर्न परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images