Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सोनालीला चढायचाय अधिकारीपदाचा इमला

$
0
0


प्रवीण कांबळे, हातकणंगले

सोनालीचे वडील गवंडीकाम करतात तर आई शेतमजुरी करते. हातावर पोट असणाऱ्या या दाम्पत्याच्या मुलीने विद्येच्या बळावर जीवनाचे ध्येय साध्य करायचा ध्यास घेत दहावीच्या परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळविले आहेत. यशाचा आलेख असाच कायम ठेवत सोनालीला अधिकारी व्हायचं आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जनसेवा तर करायचीच आहे, शिवाय कष्टकरी आईवडिलांच्या जीवनात आनंदही फुलवायचा आहे.

कुंभोज येथील सोनाली भोसले हिच्या घरची परिस्थती अत्यंत गरिबीची आहे. वडील शिवाजी गवंडी म्हणून काम करतात तर आई शेतमजुरी करते. सोनालीला दोन भावंडे आहेत. तिघा मुलांना शिकवताना भोसले दाम्पत्याची अक्षरशः दमछाक होते. परंतु, सोनालीची अभ्यासातील चमक पाहून कितीही कष्ट पडले तरी चालतील पण, मुलांना शिकवायचेच, असा निर्धार त्यांनी केला. सोनालीनेही आईवडिलांच्या कष्टाची जाण राखत जिद्दीने अभ्यास केला आणि दहावीत ९३.४० टक्के गुण मिळविले. बाहुबली विद्यापीठ या संस्थेच्या एम.जी. शहा विद्या मंदिरात शिकणाऱ्या सोनालीने येथील दहावी केंद्रातही दुसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे कोणताही खासगी क्लास न लावता तिने हे यश मिळवले. ‌अभ्यासासाठी वडिलांनी तिला घरातील दहा बाय दहाच्या खोलीत पोटमाळाही करून दिला होता.

आईवडील सकाळीच कामावर बाहेर पडल्यानंतर शाळेला जायच्या आधी आणि शाळेतून आल्यावर सोनाली अभ्यास करीत असे. आपल्या आईवडिलांना अभ्यासातील काही कळत नसले तरी त्यांच्या पाठिंब्याने आणि शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाने सोनालीने दहावीच्या वर्षातील क्षण अन् क्षण कारणी लावला. आजकाल खासगी क्लासचे प्रचंड आकर्षण असूनही तिने परिस्थितीची जाणीव ठेवत स्वअध्ययनावर भर देत यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला. तिच्या या प्रयत्नांची पोचपावती तिला निकालादिवशी मिळाली. आपल्या यशामध्ये आईवडील आणि शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे ती नम्रतेने सांगते.

सोनालीचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण विद्या मंदिर, कुंभोज येथे झाले, तर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण तिने एम.जी. शहा विद्या मंदिरमधून घेतले. या दोन्ही शाळांचे ऋण ती मनोमन मान्य करते. सोनालीचे हे यश इतरांना सांगताना आजही तिची आई संपदा यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात. लेकीचे कौतुक करताना त्या म्हणतात, ‘माझ्या लेकीनं खूप सोसलंय. गवंडीकाम रोज मिळेल याची शाश्वती नाही. शेतात मजुरी करून संसाराचा गाडा चालवला. घरात अनेक अडचणी असताना सोनालीने आम्हाला नाराज केले नाही. आमच्या कष्टाला सोनालीने यशाची झालर लावली आहे.’

......


‘व‌डील गवंडीकाम करतात. मात्र त्यांना रोज काम मिळेलच, याची खात्री नसायची. या परिस्थितीत आई मजुरी करुन पोटापाण्याचा प्रश्न सोडवते. अशा बिकट परिस्थितीत घराचा गाडा चालवताना आई कधीही खचली नाही. माझ्या शिक्षणासाठी खस्ता खाल्लेल्या वडिलांनी इतरांचे अनेक इमले बांधले. मला आता त्यांनी बांधलेल्या इमल्यांवर कळस चढवायचा आहे. आईवडिलांसाठी सुखाचे दिवस दाखवण्यासाठी उच्चपदस्थ अधिकारीपदाचा इमला चढायचा आहे.

सोनाली भोसले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापुरात साकारणार महिलांचे ढोल-ताशा पथक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरात फक्त तरुणींच्या ढोल ताशा पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. श्रीमंत जिजाऊ फाऊंडेशनने यासाठी पुढाकार घेतला असून ढोल-ताशा पथकासाठी सध्या नावनोंदणी सुरू आहे. पथकात शंभर महिलांचा समावेश असेल. सात जुलै रोजी पथकाचे उदघाटन होणार असल्याची माहिती फाऊंडेशनच्या अध्यक्षा साक्षी पन्हाळकर यांनी दिली. यंदाच्या गणेशोत्सवात या पथकाचे सादरीकरण हे आकर्षण ठरेल असेही पन्हाळकर यांनी सांगितले.

पन्हाळकर म्हणाल्या, ‘कोल्हापुरात सध्या आठ ढोल-ताशा पथक आहेत. श्रीमंत जिजाऊ फाऊंडेशनचे नववे ढोल ताशा पथक असेल. केवळ युवती आणि महिलांचा समावेश असलेले हे पहिलेच पथक ठरेल. पथकाच्या माध्यमातून होणारा फायदा समाजातील गरीब, गरजू मुलींच्या शिक्षणासाठी करण्यात येणार आहे. तसेच अंध, अपंग, अनाथ आणि वृध्दाश्रमासाठीही उत्पन्नातील रक्कम खर्च केली जाईल. पथकातील सहभागासाठी पापाची तिकटी येथील नंदिनी लेदर वर्क्स व शिवाजी चौकातील पटेल ज्वेलर्स येथे नावनोंदणी सुरू आहे. श्रीमंत जिजाऊ फाऊंडेशनमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. फाऊंडेशनने शाहूवाडी येथील कुंभारवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य, बायोमेट्रिकची यंत्रणा भेट दिली आहे. सामाजिक उपक्रम राबवितानाच महिलांचे ढोल ताशा पथक स्थापण्याचा निर्णय झाला. कोरगावकर ट्रस्टचे अमोल कोरगावकर यांचे ढोल ताशा पथक स्थापण्यासाठी सहकार्य लाभले आहे.’

पन्हाळकर म्हणाल्या, ‘दहा जुलैपासून फुलेवाडी रोड येथील सभागृहात सरावाला सुरुवात होईल. पंधरा दिवसाच्या सरावानंतर ऑगस्ट महिन्यात छत्रपती शिवाजी चौक येथे मानवंदनाचा कार्यक्रम होईल. तसेच गणेशोत्सवातील मिरवणुकीत सादरीकरणासाठी नोंदणीही घेतली जाणार आहे.’

पत्रकार परिषदेला रेश्मा मुजावर, प्रियांका हांडे, प्रज्ञा हांडे, ऋतुजा मोरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृसिंहवाडीतनवविवाहितेची आत्महत्या

$
0
0

जयसिंगपूर

नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथे विवाहितेने दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. श्रध्दा चेतन दळवी (वय १९) असे तिचे नाव आहे. या घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तीन महिन्यांपूर्वीच श्रध्दाचा विवाह ग्रामपंचायत कर्मचारी चेतन याच्याशी झाला होता. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लावून श्रध्दाने आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान आत्महत्येची घटना निदर्शनास येताच राजाराम चौगुले यांनी नृसिंहवाडी दूरक्षेत्र पोलिसांनी वर्दी दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या दिवशी दहा हजार अर्जांची विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अकरावी प्रवेशासाठी अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी, सोमवारी शहरातील सहा विक्री केंद्रांवर दिवसभरात १० हजार ०४ अर्जाची विक्री झाली तर ११०१ विद्यार्थ्यांकडून संकलित झाले. आज सर्वाधिक विज्ञान शाखेसाठी अर्ज विक्री व संकलन झाले. तर सर्वात कमी अर्ज इंग्रजी माध्यमातील कला विभागाकडे आले आहेत.

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार सोमवारी शहरातील सर्व कनिष्ठ कॉलेजांवर अकरावी प्रवेशाला सुरुवात झाली. सकाळपासूनच वितरण केंद्रावर अर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांच्या रांगा लागल्या होत्या. सतत येणाऱ्या पावसामुळे पालक व विद्यार्थ्यांची धावपळ उडत होती. दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत गर्दीचा ओघ सुरूच होता.

दरम्यान, शहरातील ३२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी झाली आहे. कॉलेजांवरही पालक, विद्यार्थ्यांकडून चौकशी सुरू आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्याच दिवशी १ हजार जादा अर्जांची विक्री झाली, तर २८२ अर्जांचे ‌अधिक संकलन झाले आहे. अकरावीसाठी तिन्ही शाखांमध्ये एकूण १३ हजार ४०० जागा उपलब्ध आहेत. एकूण अर्ज विक्रीपैकी विज्ञान शाखेला अधिक कल असल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’मधील कामांची चौकशी

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

Tweet:@gurubalmaliMT

कोल्हापूर ः जलयुक्त शिवार योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याने जिल्ह्यातील सर्वच कामांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सहा समित्या नियुक्त केल्या आहेत. या चौकशीत घोटाळा झाल्याचे सिद्ध झाल्यास ठेकेदाराकडून बिलाची वसुली​ करण्यात येणार असल्याने त्यांचे धाबे दणादले आहेत. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ८० हून अधिक गावांत पन्नास कोटींपेक्षा जादा निधी खर्च झाला आहे.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून २०१५ व १६ सालात ६९ गावांत तीस कोटी रूपये निधी खर्चून जलसंधारणाची कामे करण्यात आली. ५५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. त्यानंतर पुढीलवर्षी वीस गावे या योजनेत समाविष्ट करण्यात आली. यासाठी वीस कोटींचा निधी देण्यात आला. ती कामे सध्या सुरू आहेत. आणखी पन्नास गावांत ही योजना सुरू करण्याची प्रशासनाची तयारी आहे. त्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

जिल्ह्यातील चार ठिकाणच्या या योजनेतील कामाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यात लाकूडवाडी, बावेली, महागाव व माणोली या गावांतील कामांचा समावेश होता. कृषी, सामाजिक वनीकरण आणि वन विभागासह तेरा विभागाच्यावतीने केलेल्या या कामांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चार गावांतील कामाबाबत तक्रारी असल्या तरी हीच परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच कामांची असल्याचा आरोप होऊ लागला. यामुळे अखेर सर्व कामांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यासाठी चार सदस्यीय सहा समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. प्रांताधिकारी या समितीचे अध्यक्ष असून गटविकास अधिकारी, उपअभियंता पाणी पुरवठा व सहायक लेखापरिक्षकांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यात सहा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांनी कोणत्याही कामांची चौकशी करून तातडीने अहवाल द्यावा, असे आदेश दिले आहेत. या अहवालात कामाचा दर्जा चांगला नसल्याचे सिद्ध झाल्यास ठेकेदाराकडून बिल परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्यानेच सर्वच कामांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चौकशीत घोटाळा उघडकीस आल्यास संबंधित ठेकेदाराकडून बिलाची वसुली करण्यात येईल.

अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

००००००००



‘मटा’चा पाठपुरावा

जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या कामांचा दर्जा सुमार असल्याचे वृत्त यापूर्वी ‘मटा’ने दिले होते. तीन दिवस दिलेल्या मालिकेत अनेक गावांतील कामांचा आढावा घेण्यात आला होता. याची दखल घेत प्रशासनाने चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


जलयुक्तची कामे आणि (कंसात) खर्च झालेला निधी

करवीर : ७० (२ कोटी २९ लाख)

गगनबावडा : ५४ (१ कोटी ६७ लाख),

आजरा : ४६ ( १ कोटी ३१ लाख)

भुदरगड : ३८ ( ७४ लाख)

चंदगड : १६५ (५ कोटी)

गडहिंग्लज : ११७ ( ४ कोटी ९२ लाख)

शिरोळ : ३२ ( ९३ लाख)

हातकणंगले : २४५ (२ कोटी ७१ लाख)

पन्हाळा : ७९ (२ कोटी ७८ लाख)

शाहूवाडी : १६३ (४ कोटी ५५ लाख )

राधानगरी : १५५ (२ कोटी ३१ लाख)

कागल : ४८ (१ कोटी ११ लाख).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरीत वैष्णवांचा मेळा; ५ लाख भाविक दाखल

$
0
0

सुनील दिवाण, पंढरपूर

टाळ-मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून खळाळत वाहणारा विठ्ठलभक्तीचा प्रवाह सोमवारी चंद्रभागारूपी महासागरात विलीन झाला. आषाढी वारीने पंढरीस निघालेल्या संतांच्या पालख्यांसह सुमारे ५ लाख वैष्णवांचा दळभार आज (सोमवार) भूवैकुंठभूमी पंढरी नगरीत दाखल झाला.

पालखी सोहळे पंढरपूरमध्ये दाखल होताना नगरवासीयांच्या वतीने संतांसह वैष्णवांचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. संतांच्या पालख्या शहरात दाखल होताच पंढरी नगरी १२ लाख लोकांनी भरून पावली. दरम्यान, फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या नवीन मंदिर समितीची माहिती समजताच शहरातील सरगम चौकात सोहळ्याने शासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. मुख्यमंत्री शहरात विविध कार्यक्रमांत व्यग्र असताना पालखी सोहळ्याच्या आंदोलनाने प्रशासनाने धावपळ करीत वारकरी नेत्यांच्या मानधरणीस सुरुवात केल्यावर पालखी सोहळे मार्गस्थ झाले. यानंतर पालकमंत्री विजय देशमुख आणि सदाभाऊ खोत या मंत्र्यांनी माऊलींच्या मठात सोहळ्यातील प्रमुख मानकरी आणि वारकरी नेत्यांसोबत चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत मंदिर समितीवर ५० टक्के वारकऱ्यांची नियुक्ती करावी या मागणीवर वारकरी संप्रदाय ठाम असल्याचा निरोप पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये दाखल झाले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, बबनराव लोणीकर यांच्यासह नवीन मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले हे उपस्थित होते. पंढरपूर बाजार समितीवर उभारलेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी शेतकरी मेळाव्यात त्यांनी कर्जमाफीचे समर्थन करीत विरोधकांवर टीकेची झोड उठवली. विश्रामगृहावर स्वच्छता दिंडीत मुख्यमंत्र्यांनी टाळ हातात घेऊन ठेका धरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची शक्ती दे'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पंढरपूर

'राज्यातील शेतकरी कर्जमुक्त झाला तरच तो खऱ्या अर्थानं सुखी होऊ शकतो. त्यामुळं शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करण्याची शक्ती आम्हाला दे,' असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूरच्या विठुरायाला घातलं.

आषाढी एकादशीनिमित्त प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पहाटे श्री विठ्ठल-रखुमाईची सपत्नीक महापूजा केली. बुलडाणा जिल्ह्यातील परशराम मेरत व अनुसया मेरत या वारकरी दाम्पत्याला आज श्री विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाला. मुख्यमंत्र्यांसोबत मेरत दाम्पत्यानंही पांडुरंगाची विधीवत पूजा केली. पहाटे दोन वाजता महापूजेला सुरुवात झाली. सुमारे दीड तास हा विधी सुरू होता. त्यानंतर विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं.

राज्यातील शेतकऱ्यांना सुखी ठेवण्याची प्रार्थना आपण विठ्ठलाकडं केल्याचं मुख्यमंत्र्यांनी पूजेनंतर बोलताना सांगितलं. 'शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच आहे. पण शेतकरी कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत तो सुखी होणार नाही. त्याला कर्जमुक्त करता यावं. गरिबांना, वंचितांना न्याय देता यावा, असं काम करण्याची शक्ती आम्हाला दे,' असं साकडं आपण घातल्याचं ते म्हणाले. 'विठ्ठल हा वंचितांचा देव आहे. वंचितांना तोच न्याय देऊ शकतो. त्यामुळं तो माझी मागणी नक्की पूर्ण करील,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'वारकऱ्यांचे आक्षेप दूर करू'

विठ्ठल मंदिराचं कामकाज पाहण्यासाठी नव्यानं नियुक्त करण्यात आलेल्या समितीबद्दलही मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाष्य केलं. 'विठ्ठल मंदिराच्या समितीबद्दल वारकऱ्यांचे काही आक्षेप आहेत. त्याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, ही समिती अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यातील बऱ्याच जागा रिकाम्या आहेत. त्या भरताना वारकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करू,' अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हिडिओः पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घ्या!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पंढरपूर

अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत, वारकऱ्यांची माऊली अर्थात पंढरपूरचा विठुराया... आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांनी आज पहाटे विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली. बुलडाणा जिल्ह्यातील परशराम मेरत आणि अनुसया मेरत या वारकरी दाम्पत्याला त्यांच्यासोबत पूजेचा मान मिळाला. या विधिवत पूजेचा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी शेअर केला आहे. त्यातील विठुरायाच्या साजिऱ्या रूपाचं दर्शन घेऊन आपणही आजच्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करू या...


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संत विसोबा खेचर विशेषांकाचे प्रकाशन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पंढरपूर

संतपरंपरेचा सामाजिक, सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या 'रिंगण' वार्षिकाच्या संत विसोबा खेचर विशेषांकाचे पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

दिवाळीचे अंक असतात तर महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा असलेल्या आषाढी एकादशीचे अंकही असायला हवेत, या भूमिकेतून 'रिंगण'ची सुरुवात झाली. याआधी संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई आणि संत निवृत्तीनाथ यांच्यावरील विशेषांकांना अभ्यासक आणि वारकरी दोघांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला होता. संतसाहित्यात रुची असणाऱ्यांना आता उपेक्षित संत विसोबा खेचर यांचा यातून नव्याने परिचय होणार आहे.

संत नामदेवांचे गुरू, लिंगायत साहित्यातील आद्य लेखक तसेच लिंगायत आणि वारकरी संप्रदायात समन्वय साधणारे महापुरुष, अशी संत विसोबा खेचर यांच्या कार्यकर्तृत्त्वाची ओळख या विशेषांकातून करून देण्यात आली आहे. संत विसोबा खेचर यांच्या प्रभावाच्या पाऊलखुणा शोधणारे आळंदी, बार्शी, औंढ्या नागनाथ या ठिकाणांचे रिपोर्ताज तसेच अनेक मान्यवर अभ्यासकांनी यात लेख लिहिले आहेत. सचिन परब आणि डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी या अंकाचं संपादन केलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी शक्ती देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विठ्ठला चरणी साकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
‘राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी दिली आहे, आता शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी आम्हाला शक्ती दे,’ असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले. मंगळवारी बारा लाख भाविकांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांसोबत सरकारी महापूजेत सहभागी होण्याचा मान परसराम उत्तमराव मेरत आणि त्यांच्या पत्नी अनुसया परसराम मेरत, या दाम्पत्याला मिळाला.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पहाटे सपत्नीक विठ्ठल आणि रखुमाईची सरकारी महापूजा केली. विठ्ठल मंदिराच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभात बोलताना फडणवीस म्हणाले, ‘सरकारने जाहीर केलेल्या नवीन मंदिर समितीबाबत वारकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. मात्र, अजून पूर्ण समिती बनली नाही. उर्वरित चार जागांची नियुक्ती करताना वारकरी संप्रदायाशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल.’ सरकारने चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी नमामि चंद्रभागा योजना हाती घेतली असून, यासाठी मदत करण्यास कॅनडा येथील कंपन्या पुढे आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
फडणवीस म्हणाले, मागील वर्षी मी विठ्ठलाच्या चरणी भरभरून पाऊस मागितला होता. विठ्ठलाच्या कृपेने मागील वर्षी राज्यभरात भरभरून पाऊस पडला. राज्य सरकारने नुकतेच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला सहाय्य देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकारला विठ्ठलाने बळ द्यावे. दरम्यान, विठुरायाच्या महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांसमवेत नीरा नरसिंगापूर येथे जाऊन आपल्या कुलदेवतांचे दर्शन घेतले.
बुलडाण्याच्या दाम्पत्याला
सरकारी पूजेचा मान
बाळसमुद्र (ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा) येथील मेरत दाम्पत्याला यंदा सरकारी पूजेचा मान मिळाला. हे दाम्पत्य गेली दहा वर्षे पंढरीची वारी करीत आहेत. मुख्यमंत्र्‍यांच्या हस्ते मानाचे वारकरी दाम्पत्य परसराम उत्तमराव मेरत (वय ५४) आणि अनुसया परसराम मेरत (वय ४५) यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना पंधरा हजार रुपयाचा धनादेश, वर्षभर प्रवासासाठी एसटीचा पास त्यांना देण्यात आला.
मंदिर समितीची फेररचना?
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये राजकारणी मंडळींचा भरणा केल्याच्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव केली असून, मंदिर समितीत फेररचना करून वारकऱ्यांना समितीत योग्य प्रतिनिधित्व देणार असल्याचे सांगून विषय मारून नेला. इकडे जोपर्यंत समितीतील राजकारण्यांना काढून वारकऱ्यांना स्थान मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय वारकऱ्यांनी घेतला आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती नेमण्यात यावी, असे आदेश कोर्टाने सरकारने राजकारण्यांचा भरणा असलेली आठ जणांची नावे जाहीर केली. मात्र, यामध्ये ९० टक्के राजकीय आणि केवळ दहा टक्के वारकऱ्यांना स्थान देण्यात आल्याने माउली पालखी सोहळा प्रमुखांनी सोमवारी पंढरीत सुमारे तीन लाख वारकऱ्यांसह तब्बल दीड तास ठिय्या आंदोलन केले होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी वारीच्या तोंडावर आंदोलन नको, आपल्या मागणीप्रमाणे समिती बरखास्त करून नवीन समिती स्थापन करण्याचा शब्द दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.
नोटांच्या हेरफेरीची चौकशी करणार
एक हजार आणि पाचशे रुपयांची नोटबंदी झाल्यानंतर विठ्ठलाच्या देणगी पेटीतील शंभर, पन्नास, वीस आणि दहाच्या नोटा गायब झाल्या होत्या. छोट्या नोटा गायब होत असताना देणगी पेटीत अतिशय दुर्मिळ आढळून येणाऱ्या एक हजार अन् पाचशे रुपयांच्या नोटांचा आकडा वाढला होता.
गरिबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवाचे भक्त अचानक गर्भ श्रीमंत झाले? की देणगी पेटीतील शंभर, पन्नास, वीस आणि दहाच्या नोटा काढून त्या ठिकाणी मोठ्या नोटा ठेवल्या? अशी शंका भक्तांनी व्यक्त केली होती. याबाबत प्रसार माध्यमांनी आवाज उठवला होता.
नोट बंदीनंतरच्या पहिल्या आठवड्यात समितीकडे १ कोटी १५ लाख रुपये देणगी रुपात जमा झालेले होते. यातील बहुतांश नोटा या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मिरज पाणीपुरवठ्याची१०३ कोटींची निविदा रद्द

$
0
0

सांगली :
अतिक्रमण काढण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ आणि कृत्रिम पाणी टंचाई करून नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप करीत नगरसेवकांनी मंगळवारच्या महासभेत राडा केला. आयुक्त आणि महापौरांना जाब विचारत ठिय्या मारुन प्रशासनाचा निषेध केला. यामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक आघाडीवर होते. दरम्यान सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अमृत योजनेतर्गंतची मिरज पाणीपुरवठ्याची १०३ कोटी रुपयांची निविदा मंगळवारी महासभेत रद्द करण्यात आली. या निविदेवरून महासभा विरूद्ध स्थायी समिती असा नवा वाद उफाळून आल्याचे समोर आले. स्थायी समितीच्या सदस्यांनी महासभेच्या निर्णयाला विरोध केला आहे.
मिरजेतील १०३ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठ्याची योजना महापालिकेवरील अतिरिक्त बोजांमुळे गाजत आहे. मंगळवारच्या महासभेत महापौर हारूण शिकलगार यांनी सध्याची निविदा प्रक्रिया रद्द करून जलवाहिनी व सिव्हिल कामांच्या दोन स्वतंत्र निविदा काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले. या योजनेकरीता अमृत योजनेतून १०३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रियेवरून महिन्याभरापासून महापालिकेत वाद धुमसत आहे. महापौरांनी निविदेचा विषय विषयपत्रिकेवर घेऊन सभेत चर्चा घडवून आणली. तत्पूर्वीच निविदेच्या दर मान्यतेचा विषय स्थायी समितीसमोर आला होता. स्थायी समितीने सरकारच्या अहवालासाठी विषय प्रलंबित ठेवला असताना महासभेने निविदाच रद्द करून स्थायी समितीवर कडी केली. मंगळवारी महासभेत सदस्यांनी निविदा प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविल्याचे खापर प्रशासनावर फोडले. तसेच मंत्रालयातील सचिवांनाही नगरसेवकांनी टार्गेट केले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सादिलगे यांनी योजनेची माहिती दिली. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून ५२.३३ कोटी, राज्य सरकारकडून १७ कोटी निधी मिळणार असून, त्यामध्ये महापालिकेला २६ कोटी घालावे लागणार आहेत. योजनेची निविदा १३.११ टक्के जादा दराने आली आहे. सरकारपातळीवर वाटाघाटी होऊन ८.१६ टक्के जादा दराने निविदेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेवर आणखी ८ कोटी ९० लाखाचा बोजा पडणार आहे. परभणी, उदगिरी या नगरपालिकांच्या निविदाही जादा दराने आल्या होत्या. त्या मंजूर करण्यात आल्या आहेत. सांगली महापालिकेने निविदेला मंजुरी द्यावी, असे सादीलगे यांनी सांगितले.
योजनेवर बोलताना गौतम पवार यांनी ही योजना महापालिकेच्या मालकी आहे. सरकारने निधी दिला म्हणजे त्यांना मंजुरीचे अधिकार नाहीत. सभागृहाच्या भावना मंत्रालयातील सचिवांनाही कळल्या पाहिजेत. यासाठी ही निविदा रद्द करावी, अशी मागणी केली. शेखर माने यांनी जीवन प्राधिकरणाला सल्लागार म्हणून ३ टक्के रक्कम द्यावी लागणार असल्याचा मुद्दा उपस्थित केला. सरकारकडून वाढीव रक्कम मिळणार असेल तर निविदा मंजूर करावी. अन्यथा ती रद्द करून फेरनिविदा काढावी. इचलकरंजी नगरपालिकेत २० टक्के कमी दराची निविदा आली आहे. त्यांनी जलवाहिनी व सिव्हिल कामाच्या स्वतंत्र निविदा काढल्या होत्या. त्यांना सरकारने मंजुरी दिली होती. त्याच धर्तीवर मिरज पाणी योजनेची निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही माने यांनी केली.
स्थायीच्या सभापती संगीता हारगे, संतोष पाटील यांनी विरोध केला. निविदा दर मान्यतेचा विषय स्थायीकडे आहे. आम्ही सरकारकडून अहवाल मागविला आहे. याची दखल महासभेने घ्यावी, असे त्या म्हणाल्या. संतोष पाटील यांनी महासभा जो निर्णय घेणार आहे, तो कायदेशीर आहे का, हे तपासावे. निविदेचा विषय स्थायी समितीचा आहे. त्यामुळे निविदा मंजूर करायची की फेटाळायची, हे अधिकार स्थायीचे आहेत. वाढीव दराबाबत महासभेने धोरणात्मक निर्णय घ्यावा, पण निविदा मंजुरीबाबत निर्णय घेऊ नये, असे मुद्दा पाटील यांनी मांडताच त्याला शेखर माने यांनी विरोध केला. माने म्हणाले, महासभेने दरवाढ, मुदतवाढ न देण्याचा ठराव केला तेव्हा स्थायी समितीचे सदस्य सभागृहात होते. सर्वांच्या सहमतीनेच हा ठराव झाला होता. महासभेचा निर्णय सरकार, प्रशासन व स्थायी समितीवर बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. गटनेते किशोर जामदार म्हणाले, महासभेत ठरावाचा अपमान करून निविदा प्रक्रिया राबविली आहे. त्यामुळे सभागृहाचे मत विचार करून निर्णय घ्यावा. त्यानंतर अखेर महापौर शिकलगार यांनी निविदा प्रक्रिया रद्द ठरवली.
वाढीव निधीसाठी शिफारस : आयुक्त
नगरसेवक अत्तहर नायकवडी यांनी महासभेत निविदेबाबत जो निर्णय होईल, त्याची प्रशासन अंमलबजावणी करणार का? असा सवाल उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी खुलासा करीत जादा दराच्या निविदेमुळे महापालिकेवर बोजा पडणार आहे. स्थायी समितीने वाढीव निधी देण्याची मागणी केली आहे. त्याचा ठराव सरकारकडे पाठवून वाढीव निधीसाठी शिफारस करण्यात आली आहे. महासभेचा निर्णयही सरकारला कळवू, असे स्पष्ट केले.
अतिक्रमण तात्काळ हटविले.
सांगलीतील पन्नास फुटी रस्त्यावरील लतीफ पठाण कॉलनीतील अतिक्रमण काढण्यात प्रशासनन टाळाटाळ करीत असल्याने महासभेत नगरसेवकांनी राडा केल्यानंतर तत्काळ त्या अतिक्रमणावर हातोडा पडला. तेथील रस्त्यावरील बारा ते चौदा घरे पाडून हटविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ तेरा जणांच्या जामिनीवरशुक्रवारी सांगलीत सुनावणी

$
0
0

सांगली :
म्हैसाळ येथील बेकायदा गर्भपात प्रकरणातील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेसह तेरा जणांच्या जामीन अर्जावर सात जुलै रोजी सांगली कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर उपस्थित राहणार आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. ३१ मे रोजी संबधितांवर पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले आहे.
मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील भारती हॉस्पिटलमध्ये बेकायदा रित्या गर्भपात करून निघृणपणे भ्रूणांची हत्या केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार चव्हाट्यावर आला होता. एजंटामार्फत डॉ. खिद्रापुरेपर्यंत आलेल्या तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील स्वाती प्रवीण जमदाडे (वय २६) या विवाहितेचा गर्भपाताच्या वेळी एक मार्च रोजी मृत्यू झाला. या मृत्यूनेच डॉ. खिद्रापुरेच्या काळ्या कृत्याला चव्हाट्यावर आणले. त्यानंतर डॉ. खिद्रापुरेने गर्भपात करून जमिनीखाली गाडलेल्या एकोणीस भ्रूणांच्या प्लास्टिक पिशव्या सापडल्या. त्यापैकी आठ भ्रूणांच्या डीएनएनंतर आठपैकी पाच भ्रूण पुरुष जातीचे असल्याचे समोर आल्याने प्रकरणांचे गांभीर्य आणखी वाढले. केवळ पैशासाठी डॉ. खिद्रापुरे आणि त्याची टोळी भ्रूणांच्या हत्या करीत सुटली होती, हे स्पष्ट झाले. तपासाच्या दरम्यान आणखी दोन डॉक्टरांसह चौदा जण गजाआड झाले. पोलिस उपअधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी ८९ दिवस सलग तपास करुन १८०० पानांचे, १४१ साक्षीदार, कागदोपत्री भक्कम पुरावे असलेले दोषारोप पत्र ३१ मे रोजी कोर्टात दाखल केले आहे. तपासाच्या दरम्यान काहींनी जामिनासाठी प्रयत्न केले. परंतु अनेकांच्या जामीनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात येत होती. आता दोषारोप पत्र दाखल झाल्याने तेरा जणांच्या जामिनावर ७ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. यामध्ये डॉ. खिद्रापुरे (म्हैसाळ), डॉ. श्रीहरी घोडके (कागवाड), प्रवीण जमदाडे (मणेराजूरी), उमेश जोतीराव साळुंखे (नरवाड, कपाउंडर), कांचन कुंथीनाथ रोजे (शेडबाळ, परिचारिका), सुनील खेडेकर (माधवनगर), सातगोंडा कलगोंडा पाटील (कागवाड), यासीन तहसीलदार (तेरवाड), संदीप विलास जाधव (शिरढोण), विरणगौडा गुमटे (कागवाड), भरत गटागट (सांगली, औषध पुरवठादार), दत्तात्रय भोसले (मुंब्रा, ठाणे), रवींद्र विष्णू सुतार (म्हैसाळ) आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपर टाकत जिंकली दहावीची शर्यत

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Twitt:satishgMT

लहान भावाचे आजारपण. त्यातच दवाखाना मागे लागलेला. भावाच्या उपचारासाठी वडिलांनी काढलेले कर्ज आणि ते फेडण्यासाठी सुरु असलेली त्यांची प्रामाणिक धडपड, या परिस्थितीत कुटुंबाची होणारी ओढाताण तो रोज अनुभवत होता. या परिस्थितीत वडिलांना मदत केली पाहिजे, या भावनेने भल्या पहाटे उठून तो पेपर टाकण्याचे काम करू लागला. थंडी आणि पावसातही त्याने हे काम करीत राहिला. मात्र ते करताना अभ्यासाकडेही दुर्लक्ष केले नाही. दहावीत चांगले यश मिळवायचेच, या जिद्दीने तो अभ्यास करीत राहिला आणि त्याने ८१ टक्के मार्कही मिळवले. बुधवार पेठेतील शिवम संतोष चव्हाण या विद्यार्थ्याची ही यशोगाथा. आता शिवमला सीए व्हायचे आहे.

बुधवार पेठेत शिवमचे चौकोनी कुटुंब राहते. वडील वृत्तपत्र विक्री करतात. शुभमचे दहावीपर्यंतचे शिक्षण राजर्षी शाहू विद्यालयात झाले. शिवम बालवाडीत असतानाच त्याचा भाऊ नयन याला झटके येऊ लागले. हातपाय ताट होऊन डोळे पांढरे होण्याचा प्रसंग रात्री अपरात्री घडायचा. आईवडील घाबरून जायचे. शिवमलाही हा सर्व प्रकार पाहून भीती वाटायची. हळूहळू त्याची भीती मोडू लागली. नयनवरील उपचारासाठी आईव‌डिलांनी अनेक हॉस्पिटल्स पालथी घातली. त्याच्यावर उपचारासाठी बँकेचे कर्जही काढले. वृत्तपत्र विक्रीतून घरखर्च भागवून नयनवरील उपचाराचा खर्च पेलवताना आईवडिलांची ओढाताण लहानग्या वयातच शुभमच्या लक्षात आली. त्यावेळीच त्याने वडिलांना पेपर टाकण्यात मदत करण्याचा निश्चय त्याने केला.

सहावीत असताना शिवम सायकल शिकला. त्यानंतर तो वडिलांबरोबर वृत्तपत्रे टाकण्याचे काम करू लागला. वडील संतोष रोज सकाळी अडीच वाजता उठतात. पेपर ताब्यात घेतल्यानंतर ते शिवमला पहाटे साडेचार, पावणेपाचच्या दरम्यान मोबाईलवर रिंग देतात. मोबाईलची रिंग होताच तो उठतो. तोंड धुऊन चहा घेतो आणि लागलीच बुधवार पेठेतील घरातून थेट तीन किलोमीटर अंतरावरील चिले कॉलनीत जात असे. तिथे रोज ७५ ते १०० घरात पेपर टाकून आल्यावर घाईगडबडीने क्लासला जाई. दहावीतही त्याचा हा दिनक्रम असाच सुरू होता. पेपर विक्री झाल्यावर तो थेट क्लासला जायचा. क्लासहून परत घरी जेवण करून जुना बुधवार पेठेतील राजर्षी शाहू विद्यालयात जात असे. दिवसभर शाळा आणि रात्री अभ्यास असा त्याचा दिनक्रम होता. गणित आवडता विषय असलेल्या शिवमने अभ्यासातही चांगलीच चमक दाखवली. दहावीतील शेवटचे तीन महिने त्याने अभ्यासासाठी जादा वेळ दिला. त्याचे फळही त्याला मिळाले. ८१ टक्के गुण मिळाले.

आईवडिलांना पडणारे कष्ट आणि भावावर चांगले उपचार करण्यासाठी चांगले शिकायचे आहे. वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन सीए व्हायचे आहे. कॉलेज सुरू झाले तरी वडिलांना मदत करत राहणार आहे. लहानपणी जास्त खेळायला मिळाले नाही. पण, शालेय शिक्षणाबरोबर व्यावहारिक जगात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सीए होईपर्यंत वडिलांना सर्वतोपरी मदत करणार आहे. शाळा ‌आणि पेपर विक्री अशी कसरत करीत यश मिळवले. आता समाजही माझ्या पाठिशी राहील, असा विश्वास आहे.

शिवम चव्हाण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिद्दी शिवमला व्हायचंय सीए

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घर म्हणजे दोन छोट्या खोल्या. गतीमंद भावाचे सततचे आजारपण, त्याच्या उपचारासाठी आई -वडिलांच्या शहरातील हॉस्पिटल्समध्ये सुरू असणाऱ्या फेऱ्या, अशा तणावपूर्ण वातावरणात शिवमचे बालपण गेले. मात्र, वडिलांना मदत करण्यासाठी तो पहाटे पाच वाजता उठायचा. वडिलांच्या बरोबरीने वृत्तपत्रांची विक्री करायची. मग क्लास, शाळा, रात्री अभ्यास अशा धावपळीत त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले नाही. संध्याकाळी चार ते पाच अभ्यास करून शिवम चव्हाणने ८१ ​टक्के गुण मिळवले. आता त्याला सी.ए. व्हायचे आहे. त्यासाठी वडिलांना मदत करतच तो स्वतःला अभ्यासात गुंतवून घेणार आहे.

जुन्या बुधवार पेठेतील हळदकर गल्लीत आठ बाय दहाच्या दोन खोल्यांमध्ये चव्हाण कुटुंब राहते. खालच्या मजल्यावर स्वयंपाकघर तर वरच्या खोलीत हॉल कम बेडरूम. वडील संतोष चव्हाण गेली ३० वर्षे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. आई माधवी गृहिणी आणि बारा वर्षांचा गतिमंद भाऊ नयन असे चव्हाण यांचे चौकोनी कुटुंब. वडिलांचे कष्ट, गतिमंद भाऊ नयन याच्यावर उपचारापोटी झालेला साडेपाच लाख रुपयांचा खर्च, त्यासाठी घेतलेल्या बँकेच्या कर्जाचे हप्ते यामुळे शिवम लहानपणापासून वडिलांना वृत्तपत्र विक्रीसाठी मदत करत आहे.

दहावीत असतानाही त्याने वडिलांना मदत करण्याचे टाळले नाही. वडील मध्यरात्री अडीच वाजता वृत्तपत्र विक्रीसाठी बाहेर पडायचे. ​वडिलांचा फोन आल्यावर पहाटे साडेचार ते पावणेपाच वाजता उठून तो मंगळवार पेठेतील चिले कॉलनीत जायचा. तेथे चिले कॉलनी, यल्लमा मंदिर, सुभाषनगर परिसरात १०० घरांमध्ये वृत्तपत्र वाटून तो घरी परतायचा. घरी येऊन चहा घेतल्यानंतर धावपळ करत ज्ञानदीप क्लास गाठायचा. क्लास संपल्यावर साडेआठ वाजता घरी येऊन जेवण. मग शाळेतील जादा तासाला साडेदहा वाजता वेळेत पोहोचायचा. साडेअकरा ते पाच या वेळेत शाळा. तेथून घरी आल्यावर सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत अभ्यास करून तो झोपी जायचा. असा कष्टप्रद दिनक्रम असूनही त्याने अभ्यास चुकवला नाही. परीक्षेत ८१ टक्के गुण मिळवूनही शिवम अद्याप वृत्तपत्र वितरणाचे काम करतो.

गणित हा शिवमचा आवडता विषय. त्याला समाजशास्त्र विषय थोडा अवघड जायचा. शाळेतील शिक्षिका शितोळे यांनी त्याच्याकडून समाजशास्त्राचा अभ्यास करवून घेतला. महानंदा कदम यांनी संस्कृत तर क्लासमधील पाटील सरांकडून त्याने इंग्रजी आणि गणित सोपे जाण्यासाठीचा अभ्यास केला. अभ्यास चांगला झाल्यामुळे चांगले गुण मिळणार याची शिवमला खात्री होती. पण गणित विषयात कमी गुण मिळाले. गणित विषयात शाळेतील सर्व परीक्षांत ९० ते ९५ गुण मिळाले होते. मात्र परीक्षेत ७४ गुण मिळाल्याने शिवम थोडा नाराज झाला आहे. मराठीत ८०, संस्कृतमध्ये ८६, इंग्रजीत ८८, विज्ञानात ६१ तर समाजशास्त्र विषयात ७६ गुण त्याला मिळाले. शाळेत घेतलेल्या कलचाचणीतही कॉमर्स शाखेकडे त्याचा कल असल्याचे दिसून आले. त्यामुले विज्ञानऐवजी कॉमर्स शाखेत प्रवेश घेणार असून सीए होण्याचे ध्येय आहे असे शिवमने सांगितले.

यापुढेही वृत्तपत्र वितरणाचे काम करत ​वडिलांना मदत करणार असल्याचे शिवम म्हणाला. वृत्तपत्र वितरणाचे काम करत असल्याने मित्रांत्रकडून कसा प्रतिसाद होता?, असे विचारले असता, तो म्हणाला, ‘वर्गातील सगळीच मुले माझ्यासारखी आहेत. त्यामुळे चिडवण्याचा प्रश्नच नव्हता. वडिलांना मदत करत शिक्षण घ्यायचे. मग, कितीही अडचण आली तरी चालेल हे मी लहानपणापासूनच ठरवले आहे, असे शाळकरी शिवमचे प्रगल्भ बोलणे ऐकून त्याच्या जिद्दीची ओळख पटून जाते.

हरवले बालपण

शिवम बालवाडीत असताना नयनचा जन्म झाला. लहानपणापासून त्याला फिट्स येत असत. अचानक हात-पाय ताठरणे, डोळे पांढरे केल्यानंतर आम्ही दोघे घाबरून जात होते. शिवम मला बिलगायचा. पण नंतर तो संमजस झाला असे त्याची आई माधवी चव्हाण यांनी सांगितले. ‘वडील बाहेर गेल्यावर मी स्वयंपाक करत असताना तो नयनकडे लक्ष द्यायचा. हॉस्पिटलमध्ये आम्ही दोघे गेलो की तो घर सांभाळायचा. त्यामुळे अन्य मुलांप्रमाणे लहानपणी खेळायला मिळाले नाही. त्याला बालपण हरवून गेले याचे वाईट वाटते. पण त्याने अभ्यासात घेतलले कष्ट पाहून आनंद वाटतो’ असे माधवी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासपोर्ट कागदपत्र पडताळणी ७२ तासांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना आता पोलिस ठाण्यात वारंवार चकरा माराव्या लागणार नाहीत. पोलिसांनी अर्जदाराची मुलाखत घेतल्यानंतर ७२ तासांत कागदपत्रांची पडताळणी पूर्ण होणार आहे. वारंवार पोलिस ठाण्यात येऊन चौकशी करण्याचा त्रास अर्जदारांना सहन करावा लागणार नाही. याशिवाय पासपोर्ट कार्यालयातील प्रलंबित अर्जांचाही निपटारा करण्याचे काम सुरू असून, गेल्या महिन्यात दोन हजारहून अधिक अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे.

नोकरी, शिक्षण आणि पर्यटनासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांची संख्या दिवेसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पासपोर्ट कार्यालयात दर महिन्याला सरासरी १८०० अर्ज दाखल होत आहेत. अर्जांतील त्रुटी आणि यंत्रणेतील दोषांमुळे पासपोर्ट मिळवणे हे काम मोठे जिकिरीचे ठरत होते. यातच एजंट लोकांकडूनही अर्जदारांची दिशाभूल होत असल्याने पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्जदारांना यातायात करावी लागते. अर्जदारांचा वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पासपोर्ट कार्यालयातील कामकाज गतिमान केले आहे. अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यातून कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलवले जाते. पोलिस ठाण्यात मुलाखत झाल्यानंतर अर्जदाराची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठवली जाते. पोलिसांनी अर्जदाराची मुलाखत घेतल्यानंतर ४८ तासांत संबंधित अर्जदाराची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवणे बंधनकारक आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयातून २४ तासात ही माहिती पुढे पाठवली जाणार आहे. अर्जदाराची मुलाखत घेतल्यापासून कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जास्तीतजास्त ७२ तासांचा कालावधी देण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षकांनी सर्वच पोलिस ठाण्यांना हा आदेश दिला असून, यानुसार कामकाजाला सुरुवातही झाली आहे. या बदलांमुळे अर्जदारांना वारंवार पोलिस ठाण्यांत हेलपाटे मारावे लागणार नाहीत, त्याचबरोबर अर्जांची पडताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही एकाचवेळी अर्जांची पडताळणी काळजीपूर्वक करावी लागणार आहे. मुद्दाम उणिवा काढून अर्जदारांना हेलपाटे घालायला लावण्याचे प्रकारही यामुळे थांबणार आहेत. दरम्यान, पासपोर्ट कार्यालयातील प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्याचेही काम सुरू आहे. पासपोर्टसाठी वर्षाला सरासरी २१ हजार अर्ज येतात. २ मे २०१७ रोजी ४५०० अर्ज प्रलंबित होते. गेल्या दोन महिन्यात अडीच हजारहून अधिक अर्ज पुढे पाठवले आहेत. ४ जुलैला पासपोर्ट कार्यालयाकडे १९५७ अर्ज होते.


शहरातील प्रलंबित अर्ज

पोलिस ठाणे प्रलंबित अर्ज

जुना राजवाडा २८८

शाहूपुरी १७६

राजारामपुरी १०६

लक्ष्मीपुरी ७४

करवीर २०६

००००००००

१९५७

जिल्ह्यातील प्रलंबित अर्ज

२१०००

वार्षिक सरासरी आवक



नागरिकांना वेळेत पासपोर्ट मिळावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी ७२ तासांत पूर्ण करण्याचे आदेश सर्वच पोलिस ठाण्यांना दिले आहेत. यामुळे कमीत कमी वेळात पासपोर्ट मिळण्यास मदत होणार आहे.

संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धान्यबाजाराची कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर शहरात सर्वांत मोठा परिणाम धान्य बाजारात जाणवत आहे. नव्या कर प्रणालीत धान्यातील केवळ ब्रँडेड उत्पादनांवर पाच टक्के जीएसटीची तरतूद असली, तरी सर्वाधिक गोंधळ या क्षेत्रात आहे. त्यामुळे बाजारातील आवक मंदावली आहे. ग्राहकांची संख्या रोडावली असून, व्यापारी संभ्रमात आहेत. हा संभ्रम दूर करण्यासाठी उद्या (बुधवार, ५ जून) धान्य व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी जीएसटी भवनला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

जीएसटी कर प्रणाली लागू होऊन चार दिवस झाले असून त्याचे पडसाद धान्य बाजारात उमटले आहेत. धान्यातील ब्रँडेड उत्पादनांवर पाच टक्के जीएसटी जाहीर करण्यात आला. पण, बाजार समितीचा सेस, धान्याच्या वाहतुकीवरील जीएसटी, एचएसएन कोड यांसारख्या गंभीर विषयांवर कोणतीही स्पष्टता नसल्याने व्यापाऱ्यांत गोंधळ उडाला आहे. काही मोजक्या व्यापाऱ्यांकडे अकाउंटिंगचे प्रशिक्षित मनुष्यबळ असल्याने इतरांनी सध्या व्यवसाय थांबवून ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

अनेक व्यापाऱ्यांकडे जीएसटी नंबर नसल्याने इतर ठिकाणाहून त्यांना माल पाठविणेच बंद झाले आहेत. यात गुजरात, मध्य प्रदेशातून येणारा गहू, लातूरी तुरडाळ, इंदौरची मसूर डाळ, जळगाव, अकोल्याहून येणारी उडीद डाळ, तसेच दिल्ली, डेहराडून येथून येणारा बासमती तांदूळ यांची गेल्या चार दिवसांत कोल्हापुरात आवक झालेली नाही. केवळ नॉन ब्रँडेडमध्ये असणारी बार्शीहून येणारी ज्वारी शहरात येत असल्याचे व्यापाऱ्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितले. जीवनाश्यक वस्तूंना जीएसटी लागणार नाही, असे जाहीर करूनही सरकारने धान्यावर ब्रँडेडच्या नावाखाली जीएसटी का लावला?, असा प्रश्न व्यापारी उपस्थित करत आहेत.

जीएसटी नंबरच नाही

शहरात धान्य व्यापारी असोसिएशनचे सुमारे २६० सभासद आहेत. त्यापैकी केवळ ६० जणांकडे पूर्वीच्या करप्रणालीतील व्हॅट क्रमांक होते. विक्रीकर भवनातून सर्व व्यपाऱ्यांना जीएसटी नंबरसाठी नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण, २६० पैकी किमान १५० जणांकडे जीएसटी नंबरच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे त्यांची खरेदी पूर्णपणे ठप्प झाली आहे.

एचएसएन कोड नाही

धान्य व्यापाऱ्यांना प्रत्येक वस्तू किंवा मालासाठी एक एसचएसएन कोड मिळेल, असे जाहीर करण्यात आले आहे. कोणतेही बिल करताना त्यात संबंधित वस्तूचा कोड नंबर देऊनच हे बिल करायचे आहे. मात्र, वस्तूंचे हे कोड कोण आणि कोठे जाहीर करणार, याविषयी अजूनही स्पष्टता नाही. यासंदर्भात सीए किंवा कर सल्लागारांना विचारणा केली, असता ‘ऑनलाइन चेक करा’ असे उत्तर व्यापा‍ऱ्यांना मिळते.

ट्रान्सपोर्टवर जीएसटी द्यायचा की नाही, याविषयी व्यापाऱ्यांत संभ्रम आहे. ट्रान्सपोर्टर्सकडूनही त्याविषयी स्पष्ट काही सांगण्यात आलेले नाही. रिटेल व्यवसायिकांकडे ग्राहक फिरकलेले नाहीत. शहरातील अनेक व्यापाऱ्यांकडे जीएसटी नंबर नसल्याने धान्याची आवकच ठप्प झाली आहे. काही नॉन ब्रँडेड मालाची आवक आहे.

- वैभव सावर्डेकर, धान्य व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनडी’ घेणार सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील पुन्हा सक्रीय झाले आहेत. सहा जिल्ह्याच्या खंडपीठ कृती समितीला बैठकीची वेळ मागण्यासाठी प्रा. पाटील सोमवारी (१०) मुंबईत मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शिंदे आणि सर्वपक्षीय खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आर.के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास भेट घेतली. पाटील यांनी खंडपीठप्रश्नी पुन्हा सक्रीय होण्याची विनंती केली. कोल्हापुरात खंडपीठ स्थापन व्हावे, यासाठी आपण आंदोलनात कायम सहभागी असणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरची मागणी न्याय्य आहे. राज्य मंत्रिमंडळाने जो ठराव केला आहे, त्यात कोल्हापुरातच खंडपीठ स्थापन करावे, असा स्पष्ट उल्लेख असल्याने राज्य सरकारला ठरावाशी बांधील रहावे लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेचे दरवाजे खुले केले असल्याने त्यांची भेट घेणे महत्त्वाचे असल्याने सोमवारी मुख्यमंत्र्याची मुंबईत भेट घेऊ, असे प्रा. पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

२४ जुलै रोजी विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार असून, तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांसमवेत कृती समितीची बैठक घेण्याबाबत पाटील यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती यावेळी बार असोसिएशनचे पदाधिकारी व सर्वपक्षीय कृती समितीने केले. मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ दिल्यानंतर सहा जिल्ह्यातील वकिलांची बैठक कोल्हापुरात आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

यावेळी महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य शिवाजीराव चव्हाण, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजित मोहिते, शिवाजीराव राणे, अॅड के.ए. कापसे, डी.बी. भोसले, के.के. माळवदे, कीर्तिकुमार शेडगे, सतीश कुंभार, सुघोष खांडेकर, इंद्रजित चव्हाण, राहुल भोसले, बाबा पार्टे, जयकुमार शिंदे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानी झाली प्रायव्हेट लि कंपनी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

‘स्वाभिमानीसाठी मी अनेकांना अंगावर घेतले, प्रामाणिकपणे संघटना वाढीचे काम केले. मात्र, गेल्या काही दिवसांत चळवळीशी कसलाही संबंध नसलेले लोक संघटनेत घुसले आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार माझ्यावर चौकशी समिती नेमली गेली. शेट्टींभोवती खूशमस्करे गोळा झाले आहेत. संघटना आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखी काम करू लागली आहे,’ अशी टीका राज्यमंत्री सदाभाऊ यांनी खासदार शेट्टी यांच्यावर केली.

गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत खासदार शेट्टी आणि सदाभाऊ यांच्यात वाद सुरू आहे. या वादाने सध्या टोक गाठले आहे. त्यामुळे आता स्वाभिमानीमध्ये फूट अटळ बनल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावरील चौकशी समितीबाबत शेट्टी यांच्यावर टीकेची झोड उठवली.

खोत म्हणाले, माझ्याकडे काही प्रश्नांबाबत खुलासे मागितले होते, ते देण्याची तयारी सुरू करताच अजून काही प्रश्न असल्याचे सांगण्यात आले. शेट्टी यांनी दोन व्यक्तीतील वादात संघटना आणि कार्यकर्त्यांना ओढले आहे. माझ्यावर घराणेशाहीची आरोप करणाऱ्या शेट्टी यांनी कोल्हापुरात ज्या महाडिक गटाशी युती केली तेव्हा कोणते तत्व पाळले? शेट्टी सोयीचे राजकारण करीत आहेत. मी सत्तेत सहभागी होऊन दहा महिने झाले. यातील चार महिने मी दवाखान्यातच होतो. या सहा महिन्यांत असे काय झाले की ज्यामुळे आमच्या तीस वर्षांच्या मैत्रीत असूया तयार झाली?

फुटीला मी जबाबदार नाही!

‘शेट्टींच्या मनाचा थांगपत्ता कुणाला समाजत नाही. गेल्या सहा महिन्यांपासून मला संघटनेतून बाहेर घालविण्यासाठी आपल्या मागे जे शिजते आहे, ते सगळे समजते आहे. यामागे कोण आहे, याचीही माहिती आहे. आता संघटना फुटत असेल तर त्याला मी जबाबदार नाही. या वाईट वेळेत मुख्यमंत्री आणि भाजपमधील मित्रांनी साथ दिली, त्यांच्यासाठी मी सदैव सज्ज असणार आहे. नव्या उमेदीने राज्याचा दौरा करून कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहे,’ असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रामाणिक शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी आहे. त्याचा पश्चिम महाराष्ट्रातील प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ होत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणताही निकष न लावता सरसकट ५० हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने बुधवारी करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.

सरकारच्या कर्जमाफी विरोधात काँग्रेसने आदित्य कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आमदार सतेज पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. ‘संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे’, ‘बळीराजाचा विजय असो’, ‘भाजप सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मोर्चात शेतकरी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि पदाधिकारीही सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. त्यात आमदार पाटील यांनी राज्य सरकारवर टिका केली. ते म्हणाले, ‘हे सरकार केवळ जाहिराती करणारे सरकार आहे. त्यांनी कर्जमाफीचे पैसे बँकांना चार वर्षांत देण्याचे नियोजन केले आहे. असे नियोजन केले तरी चालेल, पण, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा १०० टक्के लाभ द्या. २०१९ ला सत्तेवर आल्यानंतर आम्ही या कर्जमाफीचा भार उचलायला तयार आहोत.’

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा परिषद सदस्य बंडा माने, जयराम पाटील, सत्यजित जाधव, बजरंग पाटील, विजयसिंह मोरे, संध्या घोटणे, सदाशिव चरापले, मुकुंद आपटे, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती डॉ, संदीप नेजदार आदी प्रमुख उपस्थित होते.

न शिजलेले जेवण

राज्य सरकारवर टिका करताना आमदार पाटील म्हणाले, ‘भाजपचे सरकार सामन्यांना सरळ खाऊ देणारे नाही. त्यांनी कर्जमाफीच्या रुपाने ताटात जेवण वाढले. त्यावर ताट झाकले. पण, प्रत्यक्ष जेवताना लक्षात आले की, ताटात न शिजलेला तांदूळ आणि भाजी आहे. त्यामुळे या कर्जमाफीचा फायदा होणार तरी कोणाला?’

निवेदनातील मागण्या

- कर्जावर दीड लाखांऐवजी ३० जून अखेर थकबाकीदार असलेल्या सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी

- कर्जमाफीला कोणतेही निकष आणि मर्यादा लावू नयेत

- मध्यम मुदत, रुपांतरीत, पुर्नगठीत आणि आकस्मिक कर्ज पूर्ण माफ करावे

- स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी

- दीड लाखावरील कर्जाची परतफेड करण्याचे आदेश दिले असताना कर्जमाफीतील लाभाची रक्कम पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी

- खरीपासाठी देण्यात आलेल्या कर्जासाठी लावलेल्या अटी रद्द कराव्यात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकअदालतीत ९३०४ खटल्यांवर होणार सुनावणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोर्टात दाखल केल्यानंतर विविध कारणांनी प्रलंबित असलेले त्याचबरोबर कोर्टात दाखल नसलेल्याही खटल्यांचा न्यायनिवाडा करण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. ८) कसबा बावडा येथील न्यायसंकुलासह जिल्ह्यातील १३ न्यायलयांमध्ये याचे कामकाज चालणार आहे. या लोकअदालतीत कोर्टात दाखल असलेले ४७७४ आणि दाखलपूर्व ४५३० खटल्यांवर सुनावणी होणार आहे.

दुरावलेले संबंध आणि प्रलंबित असलेले न्यायप्रविष्ट खटले सामंजस्याने निकाली काढण्याची संधी राष्ट्रीय लोकअदालतीने उपलब्ध केली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत लोकअदालतीचे कामकाज होणार असून, शनिवारी (ता. ८) कसबा बावडा येथील न्यायसंकुलासह जिल्ह्यातील १३ न्यायालयात लोकअदालतीचे कामकाज होणार आहे. यात दाखल ४७७४ आणि दाखलपूर्व ४५३० अशा एकूण ९३०४ खटल्यांवर सुनावणी होणार आहे. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत शिंदे आणि मुख्य जिल्हा न्यायाधीश आर. जी. अवचट यांच्या हस्ते न्यायसंकुलात सकाळी दहा वाजता लोकअदालतीचे उद्घाटन होणार आहे. दाखलपूर्व प्रकरणांमध्ये बँकांसंबंधी तक्रारी, खरेदी-विक्री, कामगारांचे वाद, वीज आणि पाणी बिलांचे वाद यासह तडजोडपात्र फौजदारी, दिवाणी आणि कौटुंबिक तक्रारींवर सुनावणी होणार आहे. कोर्टात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमधील तडजोडपात्र फौजदारी, खरेदी-विक्री, बँक प्रकरणे, कामगारांच्या तक्रारी, वीज आणि पाणी बिले, कौटुंबिक वाद, भूसंपादन तक्रारी, महसूलबाबतच्या तक्रारी यासह दिवाणी खटल्यांवर सुनावणी होणार आहे.

लोकअदालतीमध्ये दाखल होणाऱ्या खटल्यांसाठी कोणतीही फी भरावी लागणार नाही, त्याचबरोबर कायदेविषयक सल्लाही मोफत मिळणार आहे. यातील निर्णयाविरोधात आपिलदेखील करता येणार नाही, त्यामुळे जास्तीतजास्त लोकांनी लोकअदालतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांनी केले आहे.


३१ कोटींहून अधिक तडजोडमूल्य

गेल्या वर्षभरात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ४६३३ खटले निकाली निघाले आहेत. यातून तक्रारदारांना ३१ कोटी ४५ लाख ६१ हजार ४३६ रुपये तडजोड मूल्य मिळाले. याशिवाय कायद्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने २९९ कार्यक्रम घेतले. यातून ५५ हजार १५६ नागरिकांपर्यंत कायद्याचे ज्ञान पोहोचवता आले.


मोटार अपघातांचे खटले

कोल्हापूरसह इचलकरंजी आणि जयसिंगपूर येथील मोटारवाहन अपघातांच्या खटल्यांचे काम कोल्हापुरातील न्यायसंकुलात चालणार आहे. गडहिंग्लज येथील मोटार अपघात खटल्यांचे काम मात्र गडहिंग्लज येथील कोर्टात चालणार आहे, अशी माहिती न्यायाधीश मोरे यांनी दिली.


मदतीसाठी वकिलांचा फौज

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तक्रारी दाखल करणाऱ्या नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणमार्फत वकिलांची फौज उपलब्ध केली आहे. १३ न्यायालयांमध्ये २६ वकील यासाठी काम करणार आहेत. दाखलपूर्व प्रकरणांमध्ये तक्रारदारांना वकिलांची मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images