Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महापालिकेत प्रमुख दहा पदे रिक्त

0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet :@Appasaheb_MT

‘कुणी अधिकारी देता का अधिकारी?’ अशी म्हणण्याची वेळ कोल्हापूर महापालिकेवर आली आहे. दोन उपायुक्त, एक सहायक आयुक्त, जल अभियंता, कार्यकारी अभियंता, आरोग्य अ​धिकारी ही राज्य सरकारकडून भरण्यात येणारी पदेही रिक्त आहेत. महापालिका पातळीवरील नवीन आकृतीबंधाचा निर्णय प्रलंबित आहे. दुसरीकडे कुरघोडीचे राजकारण आ‌णि आंदोलनाची धास्ती अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे जागा रिक्त असल्याचे बोलले जात आहे. या सर्वांचा परिणाम कामकाजावर झाला आहे. एकेका अधिकाऱ्यांकडे दोन, तीन खात्याचा कार्यभार सांभाळावा लागत आहे.

नगरसचिव, आरोग्य अधिकारी आ​णि कार्यकारी अभियंता या महत्त्वाच्या पदावरही प्रतिनियुक्ती झालेली नाही. महापालिकेने सरकारकडे वारंवार अधिकाऱ्यांची मागणी केली आहे. सध्या शहरात थेट पाइपलाइन योजना, नगरोत्थान योजना, अमृत अशा योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. मात्र प्रत्येक विभागाकडे सक्षम अधिकारी नसल्यामुळे विकास योजनांवर परिणाम होत आहे.

दोन-तीन विभागाचा भार

अधिकाऱ्यांची वानवा असल्यामुळे एकेका अधिकाऱ्याकडे दोन, तीन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संजय भोसले यांच्याकडे रचना व कार्य पध्दती अधिकारी, केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक व प्रभारी सहायक आयुक्त पदांची जबाबदारी आहे. घरफाळा अधीक्षक दिवाकर कारंडे यांच्याकडे नगरसचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडे चार विभागांचा कार्यभार आहे. वर्कशॉप, विद्युत विभाग, गार्डन, सार्वजनिक बांधकाम या चारही ठिकाणी ते प्रभारी पाहतात. केशवराव भोसले नाटगृहाचे व्यवस्थापक विजय वणुकद्रे यांच्याकडे आस्थापना अधीक्षक व निवडणूक अधीक्षकापदाचा अतिरक्त कार्यभार आहे. अधीक्षक प्रॉव्हीडंट फंड अधीक्षक उमाकांत कांबळे यांच्याकडे कामगार अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. भांडार अधीक्षक सुनील बिद्रे यांच्याकडे उपमुख्य लेखापालाचा जादा कार्यभार आहे. मुख्य आरोग्य निरीक्षकपदही रिक्त आहे. पशुवैद्यकीय अ​धिकारी डॉ. विजय पाटील यांच्याकडे मुख्य आरोग्य निरीक्षकपदाची जबाबदारी आहे. मेडीकल ऑफिसर अरुण परितेकर हे प्रभारी आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. बळवंत सुर्यवंशी सहायक अधीक्षक (आरोग्य प्रशासन) म्हणून काम करतात. मात्र त्यांच्याकडे महिला बाल कल्याण अधिकारपदाचा कार्यभार आहे.


महत्त्वाची प्रमुख पदे रिक्त

दोन उपायुक्त

एक सहायक आयुक्त

जल ​अभियंता, उप जलअभियंता

विद्युत विभाग सहायक अभियंता

उद्यान अधीक्षक

आरोग्य अधिकारी (दीड वर्षापासून रिक्त)

कार्यकारी अभियंता (वर्षभरापासून रिक्त)

नगर सचिव (दोन वर्षे रिक्त)

सततची आंदोलने आणि कुरघोडीचे राजकारण

महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकातील राजकीय कुरघोडी वाढली आहे. महापालिकेतील सततची आंदोलने आणि राजकारणामुळे काही अ​धिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. सक्षम अधिकारी कोल्हापुरात यायला तयार नाहीत.

०००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजीराव पाटील यांची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निवृत्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाजीराव शिवगोंडा पाटील (वय ६५) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. सायबर चौक, काटकर पार्क येथील फ्लॅटमध्ये त्यांनी गळफास घालून घेतला. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

पाटील यांचे मूळ गाव वाळवा तालुक्यातील नागाव आहे. सध्या ते येथील काटकर पार्क येथील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एकटेच रहात होते. सकाळपासून त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा बंद होता. दुपारी बाराच्या सुमारास मोलकरणीने फ्लॅटचा दरवाजा ठोठावला. पण आतून प्रतिसाद आला नाही. त्यानंतर तिने खिडकीतून वाकून पाहिले असता पाटील गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. तिने ही घटना शेजाऱ्यांना सांगितली. शेजाऱ्यांनी राजारामपुरी पोलिसांना आत्महत्येची माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडून खोलीत प्रवेश केला असता पाटील यांनी हुकाला नायलॉनची दोरी लावून गळफास लावल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी पाटील यांच्या भावाला ही माहिती दिली. भाऊ अरविंद कोल्हापुरात आले. त्यांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह स्वीकारला. पाटील यांच्यावर त्यांच्या नागाव या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

पाटील एकटेच राहत असल्याने ते निराश होते. गेले काही दिवस ते आजारी होते. आजारपण व एकाकीपणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटीखाली सापडून शिक्षिका ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएमटी बसखाली सापडून महावीर इंग्लिश स्कूलच्या ‌शिक्षिका ठार झाल्या. मंगळवार पेठ येथील बालसंकुलासमोर हा अपघात झाला. राधिका नरेंद्र तेरदाळ (वय ४५, रा. मंडलिक पार्क, राजारामपुरी) असे त्यांचे नाव आहे. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला.

राधिका तेरदाळ या सुर्वेनगरातील महावीर इंग्लिश स्कूलमध्ये इतिहास व भू​गोल विषयाचे अध्यापन करीत. शनिवार असल्याने सकाळची शाळा होती. शाळा सुटल्यानंतर साडेअकराच्या सुमारास त्या मोपोडवरुन घरी जात होत्या. या दरम्यान मंगळवार पेठेतील बालसंकुलासमोरील पार्श्वनाथ बँकेच्या शाखेत गेल्या. बँकेतील काम आटोपून त्या मोपेडवरुन पुन्हा संभाजीनगर, एससीबोर्डमार्गे जाण्यासाठी निघाल्या असताना बँकेत काहीतरी विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्या परत बँकेकडे येत असताना संभाजीनगरकडून एसटी स्टँडकडे जाणाऱ्या केएमटी बसच्या मागील चाकात त्या सापडल्या. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली. त्या परिस्थितीतही त्यांनी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करा, असे नागरिकांना सांगितले. त्यांना परिसरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये स्थानिक नागरिकांनी दाखल केले. पण, संबंधित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी परिस्थिती पाहून त्यांना अधिक उपचारासाठी सीपीआरमध्ये नेण्यास सांगितले. त्यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती समजताच स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री व्हनागडे शिक्षक, कर्मचाऱ्यांसह सीपीआरमध्ये आल्या. तेरदाळ यांच्या अपघाती मृत्यूने शिक्षकांना धक्काच बसला. त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या.

अपघाताची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. केएमटी चालक एम.एम. नाईक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तेरदाळ यांचे पती एमआर असून त्यांची मुलगी बेंगळुरू येथे नोकरीस आहे.

केएमटीचा दुसरा अपघात

केएमटीखाली सापडून ठार होण्याची या महिन्यातील दुसरी घटना ठरली आहे. गंगावेश येथे नऊ जूनला कोगे येथील मंगला शिवाजी जाधव बसच्या मागील चाकात सापडून ठार झाल्या होत्या. त्यानंतर शनिवारी झालेल्या अपघातात शिक्षिका ठार झाल्याने केएमटी वाहतुकीबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील अनेक रस्ते अरूंद आहेत. त्याच्या बाजूलाही पार्किंग होत असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. यातूनच शहरात अपघातांची संख्या वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार कर्जमाफीला फाटे फोडतयं: अजित पवार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीएने) सरकारने एकच अध्यादेश काढून देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारनेही कर्जमाफीसाठी तीन हजार कोटी रुपये उपलब्ध करुन दिले होते. पण भाजप आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून रोज नवेनवे सरकारी अध्यादेश काढत कर्जमाफीच्या आदेशाला फाटे फोडायला सुरूवात केली आहे. कर्जमाफी पुढे ढकलून वेळकाढूपणा करण्यासाठीच सरकारचा हा खटाटोप असल्याचा आरोप करत कर्जमाफीच्या बाबतीत राज्य सरकार आकडे व शब्दांचा खेळ करत असल्याने या मुद्द्यावर सरकारला येत्या पावसाळी अधिवेशनात धारेवर धरले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार यांनी आज येथे दिला.

कोल्हापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार आसूड ओढले. शेतकऱ्यांना सारखी कर्जमाफी देऊ नये या मताची मी नाही. पण नैसर्गिक संकटामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. नोटाबंदीनंतर राज्यातील तूर, कांदा, आंबा, सारख, द्राक्षे, सोयाबीन, कापूस यांचे भाव कोसळले. शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशात कर्जमाफीची तरतूद करा अशी आम्ही मागणी केली. पण सरकारने आमची मागणी धुडकावून लावताना विरोधी पक्षातील सतरा आमदारांना निलंबित केले. सभागृहात सरकार दाद लागू देत नसल्याने आम्ही रस्त्यांवरची लढाई सुरु केली. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारानी चांदा ते बांदा अशी 'संघर्ष यात्रा' काढली. संघर्ष यात्रा काढली म्हणून कर्जमाफी मिळाली असे मला वाटत नाही. पण या मुद्द्यावर राज्य ढवळून निघाले. संघर्ष यात्रेबरोबर अन्य पक्षांनीही 'आसूड' यात्रा, 'आत्मक्लेश' यात्रा काढली. पण राज्य सरकारने निर्णय घेतला नाही. पण ज्यावेळी शेतकरी संपावर गेले आणि मुंबईचे दूध व भाजीपाला बंद झाला तेव्हा मात्र सरकार हलले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी संप केला हे भाजप सरकारचे अपयश आहे, अशी खरमरीत टीका पवार यांनी केली.

शेतकरी संपानंतर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी रोज नवे अध्यादेश सरकार काढत आहेत. मुख्यमंत्री आभाळ फाटलयं पण कसे शिवायचं अशी वक्तव्ये करुन कर्जमाफी प्रश्नावर नकारात्मक सूर काढत आहेत. थकलेल्या कर्जदाराला माफी मिळालीच पाहिजे पण योग्य वेळी कर्ज भरणाऱ्याला सवलत मिळत नाही. प्रामाणिक कर्ज फेडणाऱ्या २५ हजार रुपये अनुदान दिलेच पाहिजे. दीड लाखाच्यावर ज्यांचे कर्ज असेल त्यांनी दीड लाखावरील रक्कम भरली तरच कर्जमाफी मिळेल असा आदेश सरकारने काढला आहे. दीड लाखापेक्षा जास्त असलेली रक्कम शेतकऱ्याकडे असती तर कर्जमाफी कशाला मागितली असती? असा सवाल करतानाच त्याऐवजी सरकारने दीड लाख रुपये कर्जमाफी देऊन शिल्लक कर्ज भरावे, असा आदेश काढायला हवा होता. सरकार शब्द व आकड्याचा खेळ करुन राजकारण करत आहे आगामी अधिवेशनात सर्व आयुधांचा वापर करुन कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारला घेरले जाईल, असे पवार म्हणाले.

बँकाचा फायदा

मग आता काय? विरोधी पक्षांनी कर्जमाफीची मागणी केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे तर बँकांची कर्जमाफी’ हवी अशी टीका केली. मग आता सरकारने शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिली ती कसली? असा टोला पवार यांनी राज्य सरकारला लगावला.

मध्यावधी निवडणूक लागणार नाही

जुलैमध्ये भूकंप होणार, अशी घोषणा सरकारमधील पक्ष करत आहेत. पण पंधरा वर्षांनी सत्ता मिळाल्याने ती कशी सोडतील. भाजप व शिवसेना मध्यावधी निवडणूक लावणार नाहीत, असं भाकितही पवार यांनी वर्तवलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कास तलाव भरला

0
0

सातारा
मुसळधार पावसाने कास तलावात भरला आहे. धरणात १०७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा निर्माण झाला आहे. तलावातून १३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण भरल्यामुळे साताऱ्याचा पाणीप्रश्न मिटला आहे. गेल्या पंधरा दिवसांत तळ गाठलेला कास तलाव भरून वाहू लागल्याने नगरपालिका पदाधिकाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.
कास तलावाच्या माध्यमातून प्रामुख्याने शहराच्या पश्चिम भागातील व्यंकटपुरा पेठ, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, रामाचा गोट, प्रतापगंज पेठ, शनिवार पेठ या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. व्यंकटपुरा तसेच शुक्रवार पेठेतील काही परिसराला महादरे तलावातूनही पाणी दिले जाते. मात्र, महादरे आटल्यानंतर या सर्व पेठांची भिस्त कास तलावावरच होती. कास तलावातून त्या परिसरातील काही गावांनाही पाणीपुरवठा केला जातो. या गावांनाही टंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार होत्या. मात्र, तलाव भरल्याने चिंता दूर झाली आहे.
आठ दिवसांपूर्वी तलावात जेमतेम पाच फूट पाणीच शिल्लक होते. आठ-दहा दिवस पुरेल एवढाचा पाणीसाठा राहिल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यांनी दिवसांआड पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या चार दिवसांपासून कास तलाव पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कास तलाव गुरुवारी रात्री साडेआठ वाजता भरून वाहू लागला.
स्वच्छ पाण्याचा झरा
ब्रिटिशकालीन असलेल्या या कास तलावातून शहरास सायफन पद्धतीने पाणी येते. देशातील पिण्याच्या पाण्याच्या जलस्त्रोतांमध्ये कास तलावातील पाण्याने शुद्धतेच्या बाबतीत पहिल्या पाच क्रमांकामध्ये स्थान मिळवले होते. त्यामुळे कास पाणीयोजनेला विशेष महत्त्व आहे.
पेरण्या खोळंबल्या
कराड :
जून महिना संपला तरी कराड, पाटण परिसरात अजूनही समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतीची मशागत व पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरण्या झालेल्या शेतात पीक उगवून आले आहे, मात्र पावसाअभावी कोमेजून जाऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत.
यंदा मान्सून वेळेत हजर होईल, अशी आशा असताना सातारा जिल्ह्यात मात्र उशिरा मान्सून सक्रिय झाला. पावसाचे आगार असलेल्या पाटणसह कराड तालुक्यांत अनेक ठिकाणी अजूनही म्हणावा असा मान्सून पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने तेथील शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या; तर काही परिसरात मान्सून पूर्व एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी मोठ्या किमतीची खते तसेच बी-बियाणे खरेदी केली असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

कोयनेत जोर ओसरला

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. कोयनानगर या ठिकाणाचा अपवाद वगळता पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतल्यामुळे रविवारी सायंकाळी सहा वाजता संपलेल्या चोवीस तासांत धरणाच्या जलपातळीत केवळ तीन फुटाने तर पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात पावसामुळे येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. तरीही धरणात सध्या ३० टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर : जिद्दी सोहमला हवी समाजाची साथ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाण्याला जीवन म्हटले आहे; पण २००५ साली हेच पाणी पुराच्या रूपाने काळ बनून आले आणि सोहम चौगुले याच्या घराला उद्ध्वस्त करून गेले. पंचगंगा नदीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सोहमच्या घरी होत्याचे नव्हते झाले. तेव्हा पाच-सहा वर्षांच्या असलेल्या सोहमला एवढंच कळत होतं की, घरात पाणी घुसलं आहे आणि आई, बाबा, आजी, आजोबा, बहीण घरातील साहित्य वाचविण्यासाठी जीवाचं रान करताहेत. पूर ओसरला तरी डोळ्यांदेखत घराचं रिकामेपण पाहताना डोळ्यांतलं पाणी काही आटेना. या घटनेला सोहमच्या दहावीच्या निकालादिवशी बारा वर्षे झाली.

नियतीने सोहमच्या कुटुंबाकडून करवून घेतलेली ही तपश्चर्याच होती. पुराच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेलं घर पुन्हा उभं करताना गेली बारा वर्षे सोहमचं सारं कुटुंब पापड लाटून उदरनिर्वाह करत आहे. कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी कष्ट उपसत आहे. मात्र, नियतीने घेतलेल्या परीक्षेला सोहमने, त्याच्या ​जिद्दीने चोख उत्तर दिले आहे.

पंचगंगा तालमीशेजारच्या एका अरुंद बोळात छोट्याशा दोन खोल्यांमध्ये सोहम राहतो. घर स्वतःचं असलं तरी त्यावर अजून कर्ज आहे. गेल्या दहा वर्षांपासून सोहमचं संपूर्ण कुटुंब राबतं. आई, वडील आणि आजी दररोज कष्ट करतात तेव्हा कुठे जेमतेम कमाई होते. महापुराने वाहून गेलेले घर उभे करताना कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी या घरातील प्रत्येकजण कष्ट करीत होते. वडिलांनी एका खासगी गाडीवर ड्रायव्हरचे काम स्वीकारले. अशावेळी सोहमच्या वडिलांच्या मित्रांनी सुरुवातीच्या काळात घरातील किराणा माल भरून दिला. सोहमच्या रिक्षामामांनी त्याला पैसे न घेता शाळेत सोडले. शिक्षकांनी फी भरण्यासाठी पुढाकार घेतला आणि सोहमनेही त्या प्रत्येकाने दाखविलेल्या विश्वासाचे यशाच्या रूपाने चीज केले.

दहा वर्षांपूर्वीच्या महापुरातील काळरात्रीत होत्याचे नव्हते झाले आणि सोहमचे कुटुंब उघड्यावर पडले. घर मोडून पडले. आई, वडील, आजी, आजोबा आणि बहीण यांच्यासोबत राहणाऱ्या सोहमने नैसर्गिक आपत्तीमुळे कुटुंब होत्याचे नव्हते होताना पाहिले. त्या परिस्थितीत आजोबा घर सोडून गेले, जे आजतागायत परत आलेले नाहीत. कर्ज काढून पुन्हा घर उभे करताना कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली. त्या काळात सोहमच्या आजीने आई-वडिलांसोबत पापड लाटून कुटुंबाला हातभार लावला. आजीचे कष्ट पाहताना सोहम शिक्षणाची जिद्द बळकट करत होता. दहावीत ९२ टक्के गुण मिळवत त्याने आजीच्या कष्टाचे पांग फेडले.

आजीला वृद्धापकाळात पापड लाटण्याचे काम करावे लागते, या विचाराने सोहमने खूप अभ्यास करून दहावीत चांगले मार्क मिळवण्याचा निश्चय केला. पहाटे तीन वाजता उठून आपल्या शिक्षणातूनच सर्वांना मदत करायची ही जिद्द त्याने ठेवली. शून्यातून कुटुंब उभं करण्यासाठी त्याची ही धडपड आहे.


मला एरोनॉटिकल इंजिनीअर व्हायचं आहे. ‘नासा’ करीत असलेल्या नवनव्या प्रयोगांची आवड मला आहे. अवकाशातील संशोधनावर आधारित कार्यक्रम पाहायला मला आवडतात. त्यामुळे इंजिनीअरिंग अँड पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकल डिप्लोमासाठी मला प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी मदत मिळावी अशी अपेक्षा आहे.

- सोहम चौगुले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपुरात लोटला भाविकांचा महापूर

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

यंदा आषाढी यात्रेसाठी फार मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. रविवारी, नवमीलाच विठुरायाच्या दर्शनाची रांग मंदिरापासून जवळपास पाच किलोमीटर एवढी लांब गेली आहे. विठ्ठल मंदिराजवळील सात माजली दर्शन मंडपातून रांग चंद्रभागेच्या घाटावरून थेट गोपाळपूर येथील पत्राशेडपर्यंत गेली आहे. गोपाळपूर येथील उभारलेली दहाही पत्राशेड भरल्याने रांग गोपाळपूर मंदिराकडून रांजणी रोडकडे वळविण्यात आली आहे. दोन्ही पालखी सोहळे रविवारी अखेरच्या वाखरी येथील मुक्कामाला येत असल्याने दर्शनासाठी गर्दी आणखी वाढणार आहे.

२५ लाख बुंदीचे लाडू

आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांमधून विठुरायाचा प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडूला मागणी वाढत आहे. मागणीची दखल घेऊन यंदा मंदिर समितीने २५ लाख लाडू बनविण्यास सुरुवात केली आहे. भाविकांना यंदा हवा तेवढा प्रसाद खरेदी करता येण्याची व्यवस्था मंदिर समितीने केली आहे. यात्रा काळात १५ ते २० लाख भाविक येत असल्याने या लाडू प्रसादाच्या विक्रीला मर्यादा होत्या. मात्र, यंदा मंदिर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी भाविकांना हवा तेवढा प्रसाद देण्याची तयारी सुरू केली असून, मंदिर समितीच्या भक्त निवासामध्ये २५ लाख लाडू बनविण्याचे काम वेगाने सुरू आहे

तुळशीमाळेचे मार्केट सज्ज

विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार आणि वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीमाळ, देव आणि भक्तांचे हे अनोखे नाते गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेले आहे. गळ्यात तुळशीची माळ असलेला वारकरी हीच त्याची ओळख असते. पंढरपूरमध्ये ही माळ गळ्यात घालून वारकरी संप्रदायात प्रवेश करता येतो म्हणून या माळेला इथे विशेष महत्त्व असते. पंढरपूरमधील काशीकापडी समाजातील बरीच कुटुंबे माळेचा परंपरागत व्यवसाय करीत आहेत. जपमाळ, पाचपट्टी माळ, दोन पट्टी माळ, गोल मण्यांची माळ, डबलपट्टी, चंदन माळ, कातीव माळ असे माळेचे प्रकार उपलब्ध आहेत. या माळेची किंमत दहा रुपयांपासून १५० रुपयापर्यंत आहे.

अशी आहे दर्शन रांग

दर्शन रांगेला बॉरिकेड न लावल्याने रांगेत घुसखोरी होत आहे.

मुखदर्शनाची रांगही लांबू लागली आहे.

देवाच्या दर्शनाचा वेग प्रति मिनिट ४० भाविक

तासाला फक्त २४०० भाविकांनाच दर्शनाचा लाभ

दर्शन रांगेत सुमारे तीन लाख भाविक

रांगेतील भाविकांना एकादशीच्या पहाटे दर्शन मिळणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तिरसात न्हाले रिंगण

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

आसमंत व्यापून टाकणारा टाळ-मृदंगाचा गजर, माउली...माउली.., नामाचा अखंड जयघोष…अशा भक्तिरसाने भारलेल्या वातावरणात वाखरी येथे सर्वांत मोठा म्हणून ओळखला जाणारा रिंगण सोहळा रविवारी पार पडला. वाखरीच्या उभ्या व गोल रिंगणात अश्वांनी नेत्रदीपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. उडीच्या खेळानंतर हा सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला. आनंद व प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी विठू माउलीच्या ओढीने निघालेला संतांचा विराट मेळा रविवारी पंढरीनजीक वाखरीत विसावला.

भंडीशेगांव मुक्कामी पहाटे माउलींची विधिवत पूजा करण्यात आली. दिवसभर माउलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कांदेनवमीच्या निमित्ताने पालखी तळावर दिंड्यादिंड्यांमध्ये कांदेनवमी साजरी करण्यात आली. दुपारचे भोजन घेऊन हा सोहळा शेवटच्या वाखरी मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. दुपारी तीन वाजता पालखी सोहळा बाजीराव विहीर येथे उभ्या रिंगणासाठी पोहोचला. चोपदारांनी अश्व धावण्यासाठी सोडला. पुढे स्वाराचा अश्व, तर मागे माउलींचा अश्व धावत होता. टाळ मृदंगाच्या गजरात माउली...माउली.., नामाचा अखंड जयघोष चालू होता. अश्व धावत जाऊन माउलींना प्रदक्षिणा पूर्ण करून रथामागे २० दिंड्यांपर्यंत गेला. त्यानंतर पुन्हा रथाजवळ येवून माउलींचे दर्शन घेतले. नारळ, प्रसाद घेऊन पुन्हा तो पुन्हा पंढरीच्या दिशेने धावत आला. या वेळी पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल..,असा जयघोष वैष्णवांनी केला व उभे रिंगण पूर्ण करण्यात आले.

तुकोबारायांचे उभे रिंगण

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा चार वाजता बाजीराव विहिरीजवळ पोहोचला. उभ्या रिंगणासाठी चोपदारांनी अश्व सोडले. अश्वांनी लाखो वैष्णवांच्या साक्षीने तुकोबारायांना प्रदक्षिणा घालून एक रिंगण पूर्ण केले. तुकाराम, तुकाराम असा जयघोष करीत हा सोहळा वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.

माउलींचे गोल रिंगण

उभ्या रिंगणानंतर आखीव रेखीव रिंगणावर माउलींच्या गोल रिंगणाला सुरुवात झाली. सुरुवातीला माउलींचा व स्वारांचा अश्व रिंगणाच्या मध्यभागी आणण्यात आला. त्यानंतर पताकाधारी व माउलींची पालखी दिंड्यांसमवेत एक प्रदक्षिणा पूर्ण करून रिंगणाच्या मध्यभागी आणण्यात आली. सायंकाळी सव्वा चार वाजता जरी पटक्याचा भोपळे दिंडीचा ध्वज रिंगणात धावण्यासाठी सोडण्यात आला. त्याने दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. स्वच्छ सूर्यप्रकाशात स्वारांच्या अश्वासह माउलींच्या अश्वाने लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत नेत्रदीपक दौड करून दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. या वेळी उपस्थितीत भाविकांनी माउली...माउली.., नामाचा जयघोष करीत अश्वांवर खारीक, बुक्क्याची उधळण केली. रिंगण सोहळ्यानंतर दिंड्यादिंड्यामध्ये उडीचे खेळ रंगले. उडीच्या खेळानंतर हा सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला. समाज आरतीनंतर तो वाखरीत विसावला.

पालख्या आज पंढरीत

संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत चौरंगीनाथ, चांगा वटेश्वर, गुलाबबाबा, संतनाथ महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी (तुकाराम महाराजांचे टाळकरी), संत गोरोबा काका, जगनाडे महाराज आदी संतांच्या पालख्यांना विठुरायाच्या नगरीत नेण्यासाठी संत नामदेव यांची पालखी वाखरीत येईल. त्यानंतर हे सोहळे पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतील. सर्व संतांना पुढे करून सर्वांत शेवटी दुपारी माउलींची पालखी वाखरीतून पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गस्थ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठिय्या आंदोलनानंतरमाउलींची पालखी मार्गस्थ

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
राज्य सरकारने रविवारी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची घोषणा केली होती. कराडमधील भाजप नेते अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एकूण नऊ जणांचा या समितीत समावेश आहे. मात्र, वारकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला असून, या समितीत वारकऱ्यांचा कुणीही प्रतिनिधी नसून, समितीत वाकऱ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी करीत वारकऱ्यांनी माउलींची पालखी सरगम टॉकीजसमोर थांबवून ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीत वारकऱ्यांच्या प्रतिनिधीचा समावेश करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सुमारे तीन लाख वारकऱ्यांनी दीड तास आंदोलन केले.
आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीची सरकारने घोषणा केली. कराडचे भाजप नेते अतुल भोसले समितीचे अध्यक्ष असून, आमदार रामचंद्र कदम, शकुंतला विजयकुमार नडगिरे, दिनेशकुमार कदम, सचिन अधटराव, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर, संभाजी हिरालाल शिंदे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांची पदसिद्ध सदस्य आहेत.
‘या मंदिर समितीमध्ये राजकारण्यांचा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे ही समिती बरखास्त करून वाकऱ्यांचे प्रतिनिधी असलेल्या नवी समिती स्थापन करण्यात यावी,’ या मागणीसाठी माउलींच्या पालखीतील वारकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सुमारे तीन लाख वारकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला. मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीत वारकऱ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेऊन पालखी मार्गस्थ झाली. सुमारे दीड तास आंदोलन सुरू होते.
बारा लाख वैष्णावांचा मेळा
पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेसाठी सुमारे बारा लाख भाविक दाखल झाले आहेत. सर्व पालखी सोहळ्यांसह महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून मोठ्या संख्येने भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. पालख्या, वारकरी, दुकाने आणि हरी नामाच्या गजराने पंढरी गजबजून गेली आहे. प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र, भाविकांच्या मोठ्या संख्येसमोर प्रशासनाने उभारलेल्या सोयी-सुविधा अपुऱ्या पडत आहेत. विठ्ठलाच्या कृपेमुळे
हेलिकॉप्टर अपघातातून वाचलो
विठ्ठलाच्या कृपेमुळे निलंग्यातील हेलिकॉप्टर अपघातातून वाचलो, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते पंढरपुरात बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘निलंग्यात हेलिकॉप्टर अपघात झाला. या अपघाताच्या आदल्या दिवशी मी एका गावात कीर्तनाला गेलो. तिथल्या कीर्तनकारांनी मला विठ्ठल-रखुमाईची मूर्ती मला भेट दिली होती. दुसऱ्या दिवशी ती मूर्ती घेऊन मी प्रवासाला निघालो होतो. पण, त्यादिवशी हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यात हेलिकॉप्टरमधील सर्व साहित्याचे नुकसान झाले. पण, विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीला थोडाही धक्का लागला नव्हता.’


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ फडणवीसांकडूनलोकशाहीचा खूनथेट सरपंच निवडीबाबत अजित पवारांची टीका

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘सरपंच जनतेतून निवडण्याचा निर्णय लोकशाहीला घातक आहे. यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण भागातील लोकशाही मजबूत करण्याबरोबरच विकासाला दिशा देण्याचा निर्णय घेतला होता. आघाडी सरकारच्या काळात आमच्याकडूनही थेट नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला गेला. परंतु, तो निर्णय चुकल्याचे कळताच आम्ही सुधारणा केल्या. फडणवीस सरकार हुकूमशाही पद्धतीने सरकार चालवून लोकशाहीचा खून करीत आहे,’ असा थेट आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह पक्षाचे दिग्गज नेते सोमवारी दिवसभर सांगलीच्या दौऱ्यावर होते. या वेळी पवार आणि तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींमध्ये जाणार आहे. अशावेळी सरपंच एका पक्षाचा आणि सदस्यांचे बहुमत दुसऱ्या पक्षाकडे किंवा गटाकडे असेल तर विकास कामांचा मेळ बसणे कठीण आहे. विलासराव देशमुख यांचे सरकार असताना लातूरला थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली. नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा आणि सदस्य काँग्रेसचे असे चित्र समोर आले. नगराध्यक्षांना पाच वर्षे काहीच करता आले नाही. ही चूक लक्षात येताच आम्ही त्यामध्ये सुधारणा केली. नुकत्याच झालेल्या नगर परिषदांमध्ये थेट नगराध्यक्षांच्या निवडी झाल्या असून, यामध्येही नगराध्यक्ष एकाचा आणि बहुमत दुसऱ्याचे असा खेळखंडोबा झाल्याचे चित्र समोर आले आहे. याचा कारण नसताना नागरिकांना त्रास होणार आहे. त्यामुळे आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा हा हेकेखोरपणा सरकारने सोडला पाहिजे. मंत्रिमंडळात ग्रामीण चेहऱ्यांना संधी नसल्यामुळे बहुमताच्या जोरावर हे सरकार कसेही वागत आहे. लोकशाहीचा खून करण्याचे काम हे सरकार करीत आहे. थेट नगराध्यक्ष, थेट सरपंच निवडणार असाल तर मग पंचायत समितीचा सभापती, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधानही लोकांमधूनच निवडणार आहात काय? असा सवालही पवार यांनी केला.
निकष बाजूला ठेवून कर्जमाफी दिली पाहिजे : पवार
घाडी सरकारच्या काळात ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली, त्यावेळी कोणाच्या तक्रारी आल्या नव्हत्या. जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला गेला. शेतकऱ्याना कर्जमाफी म्हणजे बँकाचा फायदा असा सूर लावणाऱ्या सरकारला अखेर कर्जमाफी द्यावी लागली. परंतु, अद्यापही हे सरकार आकड्यांमध्ये आणि निकषातच घुटमळत आहे. १ मार्च २०१२ पूर्वीचे थकबाकीदार शेतकरी या कर्जमाफीत अपात्र ठरवले जात आहेत. हे बरोबर नाही. सलग तीन वर्षे दुष्काळ असल्याने अडचणीमुळेच ते शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. त्यांना पात्र करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा कर्जमाफी हा केवळ बोभाटा ठरेल आणि कर्जमाफीला हरताळ फासल्यासारखे होईल. दीड लाखांपर्यंत्त कर्जमाफी देतानाही एक निकष आहे. तो म्हणजे एखाद्याचे पाच लाख कर्ज असेल तर त्याने साडेतीन लाख रुपये भरले तरच त्याला दीड लाख माफीचा लाभ मिळणार म्हणे. हे म्हणजे अती झाले. त्या शेतकऱ्यांकडे इतके पैसे असते तर ते थकबाकीदार झाले असते का?, इतकेही या सरकारला कळत नाही का? या निकषामुळे जिल्ह्यातील २६ हजार ७०० शेतकरी अपात्र ठरतात. जाणीवपूर्वक निकष लावून, ते पुन्हा बदलणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे. खरीप संपत आला तरी अद्याप एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी दिलेली नाही. त्यामुळे सरकारने कर्जमाफीबाबत त्वरीत भूमिका स्पष्ट केली पाहिजे. येत्या अधिवेशनातही हा मुद्दा आम्ही लावून धरणार आहोत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीपेक्षा भाजप कितीतरी पटीने बरा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
‘राष्ट्रवादी कॉँग्रेसपेक्षा भाजप कितीतरी पटीने बरा आहे,’ असे म्हणत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे भाजपचे गुणगाण गायले. सोमवारी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाच्या महापूजेसाठी सोलापुरात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ढोबळे यांनी सोलापूर विमानतळावर भेट घेऊन स्वागत केले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेले प्रा. लक्ष्मण ढोबळे यांना आता भाजपचे डोहाळे लागले आहेत. लक्ष्मण ढोबळे म्हणाले, ‘पूर्वीच्या सरकारने कधी कर्जमाफी तर कधी विजबिलाचे नाव घेऊन भाजप सरकारला खिळखिळे करायचा चंग बांधला होता. सरकारची तिजोरी जर खाली झाली तर भाजप सरकार राज्य करायला लायक नाही हे लोकांना दाखविण्यासाठी पुढच्या निवडणुकीपर्यंत विरोधक अशाच प्रकारे वातावरण तापवत राहतील. जे करायचे ते भाजप सरकारने केले आहे. भाजप सरकार करीत असलेले काम इतके चांगले आहे की, कोणत्याही पक्षाला पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी किमान दहा वर्षे लागतील.’
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे भवितव्य काय या प्रश्नाला उत्तर देताना ढोबळे म्हणाले, ‘दोघांचेही भविष्य चांगले आहे, मिळालेल्या सत्तेचा उपयोग भाजपने चांगुलपणाने केला तर त्यां आणखी १५ वर्षे वाट पहावी लागेल.’
गडकरी, फडणवीसांनी मदत केली
मला अडचणीच्या काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत करून सोडविले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपेक्षा आपणास आता भाजप पक्ष बरा वाटत असून, अखेरच्या क्षणापर्यंत आपण भाजपात राहणार आहे. लवकरच आपण भाजप प्रवेश करणार असल्याचे ढोबळे यांनी सांगितले. मोठ्या साहेबांना (शरद पवार) आपण वर्षातून तीन वेळा भेटतो. मात्र, छोट्या (अजित पवार ) साहेबांना समोर आले तरी बाजूने निघून जातो, असे म्हणत ढोबळे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कोयनेत सापडली मगर

0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील पुनर्वसित चेवलेवाडी (नेरळे) गावालगत असणाऱ्या कोयना नदी पात्रात पाच फूट तीन इंच लांबीची व ३० किलो वजनाची मगर सापडली. ग्रामस्थांनी त्या मगरीला दोरखंडाच्या सहाय्याने बांधल्यानंतर याची माहिती तत्काळ पाटण वनविभागाला देण्यात आली. पाटण वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मगर ताब्यात घेऊन कोयना धरणातील नैसर्गिक आदिवासात सुखरूप सोडले.
गेल्या एक ते दीड वर्षांपूर्वी सांगवड-नेरळे परिसरात ग्रामस्थांना कोयना नदीपात्रात मगरीचे दर्शन झाले होते. ग्रामस्थांनी या बाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर त्यावेळी मगरीचा शोध घेण्यात आला होता. मात्र, ती मगर सापडली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरुंद रस्त्यांवरील कोंडी जिवावर

0
0


satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर ः अरुंद रस्ते, दुभाजक, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पार्किंग, पार्किंगच्या पुढे चारचाकी, रिक्षा आणि फेरीवाल्यांमुळे रस्त्यावरून केवळ एकच वाहन जाईल, अशी भयंकर स्थिती शहरात आहे. रस्त्यांवरील ही वाहतूक कोंडी आणि वाहतूक नियोजनाचा अभाव नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. गेल्या महिनाभरात रस्ते अपघातात दोन महिलांचा मृत्यू होऊनही महापालिका, शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभाग डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहे.

गंगावेशसारख्या वर्दळीच्या भागात केएमटी बसच्या मागील चाकात सापडून कोगेच्या मंगला शिवाजी जाधव यांचा तर शनिवारी संभाजीनगर ते नंगीवली रस्त्यादरम्यान बसच्या चाकात सापडून राधिका तेरदाळ या शिक्षिकेचा मृत्यू झाला. या दोन्ही अपघातात चालकाकडून गंभीर चूक झाली नसली तरी अरूंद रस्ते, पार्किंग, गर्दी आणि कोंडीमुळे अपघात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात शंभर वर्षांपूर्वी जे रस्ते होते तेवढेच आजही अनेक ठिकाणी आहेत. रस्ते रुंदीकरणात महापालिकेची अनास्था दिसून येते. रुंदीकरणाविरोधात कोर्टात सुरु असलेल्या खटल्यांचा निकालाला विलंब व्हावा यासाठी महापालिका व घरमालकांत मिलीभगत असल्याचे दिसते. वाहतूक नियोजनासंदर्भात महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि वाहतूक नियंत्रण शाखा व आरटीओचा काणाडोळा हा प्रकारच नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. रस्त्यांवर अनेकदा किरकोळ अपघात होतात. वाहनचालक, पादचारी जखमी होण्याचे प्रकार होतात. पण, याचे गांभीर्य संबंधित यंत्रणा केवळ कागदी घोडे नाचवतात आणि बैठकांचे नियोजनाचा देखावा करतात.

००००००

पार्किंगच्या ठिकाणी सिमेंट, पेव्हिंग ब्लॉक

अरुंद रस्ते, प्रमुख चौक आणि व्यापारी पेठांत अनेक दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या पार्किंगच्या ठिकाणी सिमेंटचा कोबा, पेव्हिंग ब्लॉक टाकून शोभेच्या झाडांच्या कुंड्या, खुर्च्या टाकून पार्किंग स्वतःच्या ताब्यात घेतले आहे. याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. पार्किंग ताब्यात घेतल्याने रस्त्यांवर वाहने पार्क केली जातात. शिवाजी चौकात या बाबी ठळकपणे दिसतात. त्यामुळे अपघातांचे गांभीर्य वाढले आहे.

००००००००

साहित्य रस्त्यांवरच

फेरीवाले, दुकानदारांकडून रस्त्यांवर साहित्य मांडण्याचे प्रकार सर्रास दिसून येत आहे. आईसाहेब महाराज चौक ते विल्सन पूल, महाव्दार रोड, पापाची तिकटी, पाईपलाईन, गंगावेश, रंकाळा वेश, राजारामपुरी मुख्य रस्ता, मध्यवर्ती बस स्थानक ते परिख पूल या मार्गावर दुकानदार रस्त्यांवरच साहित्य मांडतात. पार्किंगच्या जागा फेरीवाले आणि दुकानदारांनी मांडलेल्या साहित्याने भरून गेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच वाहतूक कोंडी होते. वृद्ध, महिला आणि विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत आहे.

अतिक्रमण निर्मूलन विभाग सुस्त

शहरात चौकाचौकांत व रस्त्याकडेला नवीन केबिनचे अतिक्रमण वाढत आहे. बिंदू चौक, देवल क्लब, भवानी मंडप, महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, सीपीआर चौक, भाऊसिंगजी रोड या रस्त्यांवर अतिक्रमण वाढले आहे. स्थायी समितीत अतिक्रमणविरोधात कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. पण, अतिक्रमणधारकांना अभय देण्यात काही नगरसेवकच पुढे असतात. अनेक ठिकाणी नगरसेवकांची आर्थिक गणिते अवलंबून आहेत. यामुळे ६० कर्मचाऱ्यांचा स्टाफ असलेला अतिक्रमण विभाग सुस्तच आहे. तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांच्या काळात दर सोमवारी प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून कारवाईचा आढावा घेतला जाई. मात्र आता अतिक्रमण निर्मूलन मोहिमही बंद पडली आहे.

पार्किंगमध्ये गाळे

व्यापारी इमारतींमध्ये पार्किंगसाठी गाळे बांधले जातात. महापालिका इमारतीसमोर माळकर तिकटी लागून असलेल्या नव्या इमारतीत पार्किंग दिसत नाही. शिवाजी टेक्निकल स्कूलजवळील नवीन इमारतीच्या पार्किंगमध्ये गाळे पाडले जात आहे. स्थायी समिती सभेत अनेक नगरसेवक पार्किंगमध्ये गाळे बांधले जात असल्याचे सांगत तोडपाणी करतात. पण पार्किंगमधील गाळे हटवण्याची मोहीम महापालिकेकडून सुरू होत नसल्याने सर्व रस्त्यांवर पार्किंग होत असून त्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे छोटेमोठे अपघात होत आहेत.

रुंदीकरण रखडले

शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यात बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची या मार्ग तातडीने रुंद करण्याची गरज आहे. महाव्दार रोडला संलग्न असलेले रस्ते अरुंद आहेत. महाराणा प्रताप चौक ते महापालिका, तेली गल्ली ते उत्तरेश्वर पेठ, मिरजकर तिकटी ते नंगीवली चौक यांसह छोट्या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने पावले उचलण्याची गरज आहे.

चौक बनताहेत मृत्यूचे सापळे

वाहतूक कोंडीमुळे प्रमुख चौक मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत. व्यापारी व दुकानदारांचे पार्किंगमधील अतिक्रमण, रिक्षा, वडापचे अनधिकृत थांबे आणि फेरीवाल्यांमुळे दर दहा ते पंधरा मिनिटाला कोंडी होत असते. चारचाकी, रिक्षा, सहा सीटर या अवैध वाहतुकीकडे वाहतूक पोलिस आणि आरटीओ फक्त दंडात्मक कारवाई करुन कारवाईचे नाटक करत आहेत. महापालिका, वाहतूक पोलिस व आरटीओ विभागाकडून वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.



शहर वाहतूक नियंत्रण शाखा वाहतुकीचे नियोजन करत असताना महापालिका गाफील असते. अरुंद रस्ते आणि पार्किंगच्या समस्येबाबत नगरसेवक सभागृहात आवाज उठवत नाहीत. रस्ते अपघातात दोन बळी गेल्यानंतरही महापालिका डोळ्यावर पट्टी बांधून आहे. अपघातात बळी पडलेल्या कुटुंबातील व्यक्ती ज्यावेळी महापालिकेविरोधात कोर्टात जातील, त्याचवेळी महापालिकेला जाग येईल.

सतीश पाटील, वाहतूक सल्लागार



उमा टॉकीज येथे एसटी अपघात झाल्यानंतर केएमटीच्या सर्व चालक व वाहकांची खासगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. केएमटीच्या वेगावर मर्यादा येण्यासाठी सर्व बसेसना स्पीड गव्हर्नस् प्रणाली बसवण्यात येईल. तसेच चालकांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर घेण्यात येईल.

नियाज खान, परिवहन समिती सभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिनविरोधवर शिक्कामोर्तब

0
0

कागल

हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१६- १७ ते २०२१- २२ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी २१ जागांसाठी २१ जणांचे अर्ज राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांनी अधिकृतरित्या ही निवडणूक बिनविरोध घोषित केली. बिनविरोध निवडीच्या घोषणेनंतर कारखाना कार्यस्थळावर फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली. नूतन संचालक मंडळाने कारखान्याचे संस्थापक दिवगंत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या कारखाना कार्यस्थळारील पुतळ्याला अभिवादन केले.

मंडलिक कारखान्याच्या स्थापनेपासून पहिल्या १९९७ व २००२ च्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. तर २००७ व २०१२ च्या निवडणुकीमध्ये सदाशिवराव मंडलिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील संघर्ष राज्यभर गाजला होता. इर्षेने झालेल्या या दोन्ही निवडणुकीत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने मोठ्या मताधिक्याने सर्वच्या सर्व जागा जिंकत सत्ता कायम ठेवली होती. मात्र मागील वर्षी सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनानंतर या दोन्ही गटांतील वाद कमी झाला. कारखान्याची निवडणूक बिनविरोध करुन दिवंगत मंडलिकांना आदरांजली वाहण्यासाठी सर्व सभासदांसह नेतेमंडळींनी पुढाकार घेतला. सर्वांनीच सकारात्मक दिलेल्या प्रतिसादामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणुकीसाठी ६४ जणांनी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, माघारीच्या पहिल्याच दिवशी ३१ उमेदवारांनी माघार घेतली होती. त्यामुळे माघारीनंतर राहिलेले उमेदवार त्या त्या मतदारसंघात निवडणून द्यावयाच्या जागेइतकेच राहिल्याने मंडलिक कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणेश शिंदे, सुनिल चव्हाण यांनी काम पाहिले.

.............

चौकट

बिनविरोध संचालक मंडळ

उत्पादक गट क्रमांक १ मुरगूड - प्रा. संजय मंडलिक (चिमगाव), दत्तात्रय सोनाळकर (भडगाव), मारुती काळूगडे (बेनिक्रे). गट क्रमांक २ बोरवडे - बापूसो भोसले-पाटील (बस्तवडे), दिनकर पाटील (कौलगे), मसू पाटील (उंदरवाडी). गट क्रमांक ३ कागल - शिवाजीराव इंगळे (शेंडूर), शहाजी पाटील (सिध्दनेर्ली), धनाजी बाचणकर (साके). गट क्रमांक ४ मौजे सांगाव - शंकर पाटील (मौजे सांगाव), बंडोपंत चौगुले (म्हाकवे), कैलास जाधव (कसबा सांगाव). गट क्रमांक ५ सेनापती कापशी- आनंदा मोरे (हमिदवाडा), सात्तापा तांबेकर (मांगनूर), दत्तात्रय चौगले (तमनाकवाडा).

संस्था प्रतिनिधी- विरेंद्र मंडलिक. अनुसूचित जाती, जमाती प्रतिनिधी- चित्रगुप्त ऊर्फ ईगल प्रभावळकर, महिला प्रतिनिधी - नंदिनीदेवी घोरपडे, राजश्री चौगुले. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी - शहाजी यादव. भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रतिनिधी - जयसिंग गिरीबुवा.

----------

कोट

‘ कारखाना बिनविरोध करण्यासाठी सर्वच सभासद, नेतमंडळी, कार्यकर्ते तसेच सुकाणू समितीने मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच जास्तीत जास्त इच्छुकांनी अर्ज माघारी घेवून बिनविरोध निवडणुकीला पाठबळ दिले आहे. कागलमध्ये सध्या चार साखर कारखाने असून सर्वांनीच गाळप क्षमता वाढवली आहे. त्यामुळे उसाची टंचाई भासू नये यासाठी शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

विरेंद्र मंडलिक, संचालक, सदासाखर

----

चौकट

जुन्या- नव्यांचा समतोल

कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये प्रा. संजय मंडलिक हे जुन्या सर्वच संचालकांना बदलून नव्या चेहऱ्यांना संधी देणार की जुन्यांनाच पुन्हा प्रमोट करणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र प्रा. मंडलिकांनी अनुभवी दहा संचालकांना संधी दिली तर नव्या ११ संचालकांना संधी देवून कारखाना प्रशासन आणि गटाचा समतोल साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजय पाटीलसह आठजण हद्दपार

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अवैध मटका आणि जुगार अड्डे चालवणारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील मटकाकिंग विजय पाटील याच्यासह आठजणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. पाटीलसह अजित संपतराव बागल, मकरंद मारुती मुद्गल, चंद्रकांत तुळशीदास माने आणि मुन्ना बाबू हुक्केरी यांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे, तर हेमंत बाबूराव घोरपडे, किशोर बाजीराव माळी आणि प्रमोद आनंदा हेगडे या तिघांना शहरासह करवीर तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले. याशिवाय अवैध मटका व्यवसायाशी संबंधित १३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी हद्दपारीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी तीन महिन्यांपूर्वी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका बुकीच्या अड्डयावर छापा टाकला होता. या कारवाईत अड्ड्यावरून २१ जणांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी करून वारंवार अवैध व्यवसायात पोलिसांच्या हाती लागणाऱ्या सराईतांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठवले होते. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी या प्रस्तावांना मंजुरी दिली असून, मटकाकिंग विजय पाटीलसह आठजणांना हद्दपारीचे आदेश दिले, तर उर्वरित १३ जणांना ५० हजार रुपये जातमुचलक्यासह चांगल्या वर्तनाची लेखी हमी घेण्याचे आदेश दिले आहेत.


मटका ‘सम्राट’वर कारवाई कधी होणार?

पोलिसांनी मटका किंग विजय पाटील याच्या टोळीवर हद्द्पारीसह प्रतिबंधात्मक कारवाई केली, मात्र शहरातील मटका ‘सम्राट’ पोलिसांच्या नजरेत कसा आला नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मटका ‘सम्राट’चे अड्डे शहरात अगदी मोक्याच्या ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे मटका ‘सम्राट’वर कधी कारवाई होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोनालीची परिस्थितीवर मात

0
0

प्रविण कांबळे, हातकणंगले

वडील सेंट्रीग कामाला, त्यातही त्यांचे गवंडीकाम. मिळणाऱ्या रोजंदारीवर कुटंबाची होणारी जेमतेम गुजराण. पावसाळ्यात तर उत्पन्नाचीही खात्री नाही अशी स्थिती. कुंभोज गावातल्या दहा बाय दहाच्या छोट्याशा घरातील पोटमाळ्यावर ‘ती’नं अहोरात्र अभ्यास केला. दहावीत ९३.४० टक्के गुणांची मजल मारून सोनाली शिवाजी भोसलेनं आपली जिद्द दाखवून दिली आहे. परिस्थितीशी झुंज देत सोनालीनं यशाला गवसणी घातली. करिअरच्या पहिल्याच टप्प्यात मिळालेल्या यशानं सोनालीचं उच्चपदस्थ अधिकारी बनण्याचं स्वप्न विस्तारलं आहे.

श्री बाहूबली विद्यापीठाच्या एम. जी. शहा विद्यामंदिरमध्ये शिकणाऱ्या सोनालीने शाळेत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करत दुसरा क्रमांक पटकावला. तिचे वडील शिवाजी हे गावात आणि परिसरात सेंट्रीग कामाला जातात. गवंडी म्हणून ते काम करतात. हाताला मिळेल तेवढ्या कामावर त्यांचे घर चालते. त्यातही अनेकदा काम मिळत नाही. या परिस्थितीत घरची आर्थिक ओढाताण कमी करण्यासाठी आई संपदा यादेखील शेतमजुरी करून संसाराला आर्थिक मदतीचे ठिगळ लावण्याचा प्रयत्न करतात.

सोनालीच्या आई-वडिलांच्या अपार कष्टामुळे दर महिन्याला कुटुंबाची कशीबशी गुजराण होते. घरखर्चासह नियमित शिक्षणासाठी हे पैसे संपतात. गाठीशी आर्थिक बळ नसले तरी सोनालीच्या शिक्षणात तिच्या आई-वडिलांनी काही कमी पडू दिले नाही. आई-वडिलांच्या पाठबळाला सोनालीच्या जिद्दीची जोड मिळाली आणि तिने सोनेरी यश मिळवले. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या सोनालीला तिच्या क्लासच्या शिक्षकांनी फीमध्ये सवलत देत मोठे सहाय्य केले. ती सकाळी सहा वाजता क्लासला जायची. त्यानंतर दिवसभर शाळा. जीवनात काहीतरी बनण्याची जिद्द तिच्यात असून कष्ट करण्याची तयारी आहे. वडिलांच्या मित्रांनी दिलेल्या वह्या, सेकंडहँड पुस्तके, गाइड वापरून आतापर्यंत अभ्यास केल्याचे ती सांगते.

सोनालीचे कुटुंब दहा बाय दहाच्या घरात राहते. या घराला पोटमाळा आहे. आई, वडील व एक भावासह सोनाली रहात असलेला हा परिसर म्हणजे आजुबाजूला कायम कोलाहल, वर्दळीचा. या अडथळ्यांचा विचार न करता, मनापासून अभ्यास करण्याचे ध्येय बाळगल्याचे ती सांगते. रात्रीच्या निरव शांततेत सोनाली पोटमाळ्यावर अभ्यासाला बसायची. इतरांची झोपमोड नको म्हणून छोट्या लॅम्पच्या मदतीने सोनाली एका कोपऱ्यात अभ्यास करायची. आतापर्यंत पोटाला चिमटा काढून सोनालीला

शिक्षणासाठी हवे असलेले साहित्य उपलब्ध करून दिल्याचे तिची आई संपदा यांनी सांगितले. सोनालीने आर्थिक अडचणींना तोंड देत दहावीचे शिक्षण पूर्ण केले खरे, मात्र आतापर्यंत तिच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्याचे आव्हान भोसले कुटुंबापुढे आहे. उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी गरज आहे समाजाच्या मदतीची. तिच्या स्वप्नांना बळ देण्याची.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सायबर गुन्हे रोखण्यासाठी कोल्हापूर पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात आले आहे. शनिवारपासून या पोलिस ठाण्याचे काम सुरू झाले. नोटाबंदीनंतर ऑनलाइन व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच केंद्र सरकारने जीएसटीचीही अंमलबजावणी केली. त्यामुळे ऑनलाइन व्यवहारांमध्ये मोठी वाढ होत आहे. याशिवाय सोशल मीडियाचाही वापर वाढल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात आले आहे.

राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत सायबर गुन्हे रोखणे आणि घडलेल्या गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी सायबर लॅब सुरू केली होती. गुन्ह्यांच्या शोधासाठी तांत्रिक मदत करणाऱ्या या विभागाचे काम दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाइन व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढल्याने यातील गुन्हेही वाढत आहेत. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासह घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी स्वतंत्र सायबर पोलिस ठाणी निर्माण करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत.

या आदेशानुसार पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलचे रुपांतर सायबर पोलिस ठाण्यात केले. १ जुलै रोजी या स्वतंत्र पोलिस ठाण्याची सुरुवात झाली आहे. सायबर आणि आयटी अॅक्टशी संबंधित जिल्ह्यातील गुन्ह्यांची नोंद, हाताळणी या पोलिस ठाण्यांतर्गत होणार आहेत. फिर्याद दाखल करून घेण्यापासून ते संशयितांचा शोध घेणे, गुन्ह्यातील पुरावे गोळा करणे, कोर्टात खटले दाखल करण्याचे काम हे पोलिस ठाणे करणार आहे.

जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सायबर पोलिस ठाण्याची धुरा पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्याकडे आहे. एक पोलिस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल यांसह मुख्यालयातील दोन कॉन्स्टेबल या पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. लवकरच येथील मनुष्यबळ वाढविले जाणार आहे. सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी फॉरेन्सिक टूल्स, सॉफ्टवेअर्स आणि तांत्रिक साहित्य उपलब्ध आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जात आहे. याशिवाय आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे. इंटरनेट बँकिंगद्वारे होणारी फसवणूक, फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअप आदी सोशल मीडियातून होणारे गैरप्रकार आणि ब्लॅकमेलिंग रोखण्याचे काम केले जाणार आहे. याबाबत येणाऱ्या तक्रारींची निर्गत हे पोलिस ठाणे करेल.


वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्याची गरज होती. अत्यावश्यक तांत्रिक साधनांनी सज्ज असलेले हे पोलिस ठाणे गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासह सायबर गुन्ह्यांची उकल करण्याचे काम करेल. याशिवाय जनजागृती करण्याचेही काम या पोलिस ठाण्यातून होईल.

- संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भर पावसात विठूनामाचा गजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचक्रोशीतून आलेल्या वारकऱ्यांनी भर पावसात ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल...’च्या गजरात भवानी मंडपातील नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. दिंडीच्या नगरप्रदक्षिणेमुळे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येलाच शहरातील वातावरण भक्तीमय बनले होते. श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळाच्यावतीने दरवर्षी कोल्हापूर-नंदवाळ दिंडीचे आयोजन केले जाते. यंदा सोमवारी यात नगरप्रदक्षिणेचा सोहळा रंगला.

पालखी, माऊलीचा रथ, भालदार चोपदार, भजनी मंडळ, बैलगाड्या, घोडे, टाळ मृदंगाच्या गजरात मग्न झालेले वारकरी महिला डोक्यावर तुळस घेऊन वारीत सहभागी झाल्या होत्या. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आणि महालक्ष्मी दिनदर्शिकेचे सदाभाऊ शिर्के, द‌िंडीप्रमुख आनंदराव लाड महाराज, चोपदार भगवान तिवले यांच्या उपस्थितीत सायंकाळी पालखी पूजन झाले. त्यानंतर नगरप्रदक्षिणा झाली. बिनखांबी गणेश मंदिराजवळ संयोजक ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळाने अध्यक्ष बाळासाहेब पवार, दीपक गौड, अॅड. राजेंद्र किंकर यांनी महापौर हसिना फारास व आदिल फरास यांचे श्रीफळ देऊन स्वागत केले. मव्हादार रोड-जोतिबा रोडमार्गे पालखी भवानी मंडपात पोहचल्यावर रिंगणात अश्व संग्रामने सात फेऱ्या पूर्ण केल्या. यावेळी फुगडीसह विविध खेळात वारकरी भर पावसात दंग झाले. त्यानंतर पालखी टिंबर मार्केट येथे सासने इस्टेटमध्ये मुक्कामास गेली. तिथे शिलावती बाबासाहेब सासने परिवाराच्यावतीने सर्वांना प्रसाद देण्यात आला. यावेळी एम. पी. पाटील यांचे प्रवचन झाले. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे शशिकांत भुजबळ, विठ्ठल दराडे यांचे स्वागत श्रीफळ देऊन संतोष कुलकर्णी , राजेंद्र मकोटे,शाम जोशी, सुरेश जरग, किशोर घाटगे आदीनी केले.

मंगळवारी (ता. ४ जून) सकाळी ७.३० वाजता चांदीच्या पालखीसह दिंडी प्रतिपंढरपूर नंदवाळकडे रवाना होणार आहे. पुईखडीत संकल्प सिध्दी मंगल कार्यालयासमोरील मैदानात वाखरीप्रमाणे भव्य रिंगण सोहळा होईल. यावेळी पोलिस उपाधिक्षक आर. आर. पाटील, आमदार सतेज पाटील, कणेरीतील सिद्धगिरी मठाचे सीईओ आर. डी. शिंदे, नगरसेवक सांरगधर देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत . राधेय समुहाच्यावतीने सर्वाना फराळ वाटप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेशासाठी इचलकरंजीतप्राचार्यांना कोंडले

0
0

इचलकरंजी

टक्केवारी कमी असलेल्या अन् प्रवेशापासून वंचित सर्वच विद्यार्थी-विद्यार्थीनींना प्रवेश द्यावा या मागणीसाठी सोमवारी विविध विद्यार्थी संघटनांच्यावतीने व्यंकटेश महाविद्यालयातील प्राचार्यांच्या कार्यालयास टाळे ठोकून ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, १२० विद्यार्थी-विद्यार्थीनींना प्रवेश देण्याची तयारी प्राचार्यांनी दर्शविली असून विद्यापीठाच्या मंजरीनंतरच ही प्रक्रिया होणार आहे.

येथील व्यंकटेश महाविद्यालयात सध्या प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. टक्केवारीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून महाविद्यालयातर्फे ४८० विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तरीही अद्याप २२५ विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रवेशापासून वंचित आहेत. त्यांना प्रवेश मिळावा यासाठी दीपक पाटील, अमृत भोसले, प्रमोद खुडे, मोहन मालवणकर, सदा मलाबादे, नितीन लायकर, संतोष कांदेकर, निहाल कलावंत, विजय रवंदे आदी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी महाविद्यालयावर मोर्चा काढला. जोपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही तोपर्यंत न हटण्याची भूमिका घेत आंदोलकांनी प्राचार्य बी. ए. खोत यांच्या कार्यालयासमोरच ठिय्या मारला. आंदोलन करुनही महाविद्यालयाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त आंदोलकांनी प्राचार्यांच्या कार्यालयास टाळे ठोकून त्यांना कोंडले. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस उपअधिक्षक विनायक नरळे हे पोलिस फौजफाटा घेऊन महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढून कार्यालयाचे टाळे काढले. त्यानंतर प्राचार्य आणि आंदोलक यांच्यात चर्चा घडवून आणली. चर्चेदरम्यान एकाचवेळी अनेकजण उठून आपले मत मांडू लागल्याने गोंधळ निर्माण होत होता. अखेरीस प्राचार्य खोत यांनी शिवाजी विद्यापीठाची मंजुरी घेऊन नियमानुसार १२० विद्यार्थी-विद्यार्थीनींना प्रवेश देण्याचे मान्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यड्रावमध्ये कडकडीत बंद

0
0

जयसिंगपूर

यड्राव (ता.शिरोळ) येथे महावितरणच्या कारभाराचा निषेध करीत ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. शेतात तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने दोन दिवसांपूर्वी युवराज महादेव कोळी या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, विविध मागण्यांबाबत पंधरा दिवसात कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

युवराज कोळी याचा विजेचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी गाव बंदची हाक दिली होती. यामुळे सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थ जमले. यानंतर महावितरणच्या निषेधाच्या घोषणा देत मोटारसायकल फेरी काढण्यात आली.

यानंतर ग्रामपंचायतीच्या राजर्षी शाहू सभागृहात महावितरणचे अधिकारी व प्रमुख नागरिक यांच्यात बैठक झाली. यावेळी मागण्यांचे निवेदन शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव, अभियंता आनंदा शिंदे यांना देण्यात आले. मृत युवराज कोळी यांच्या कुटुंबियास अधिकाधिक नुकसान भरपाई द्यावी, युवराजच्या पत्नीला नोकरी द्यावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचा पाठपुरावा करण्याची ग्वाही अभियंदता शिंदे यांनी दिली. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे युवराजचा मृत्यू झाला असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, जि.प. सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, पं.स. सदस्य संजय माने, शेतकरी संघटनेचे जिल्हा युवाध्यक्ष सागर संभूशेटे, शिवसेनेचे तालुका प्रमुख सतीश मलमे, सरपंच उषा तासगावे, उपसरपंच विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images