Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जयसिंगपुरात झोपड्या हटविल्या

$
0
0

जयसिंगपूर

जयसिंगपूर औद्योगिक वसाहतीजवळील खासगी जमिनीवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली तात्यासाहेब कोरेनगर ही झोपडपट्टी सोमवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आली. सुमारे चाळीस झोपड्या जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्यामुळे झोपडपट्टीवासियांचे संसार उघड्यावर पडले.

औद्योगिक वसाहतीजवळ गट क्र. ४६/४ मध्ये फजलुल्ला मौलाना अब्दुसकादर इराणी, बापू आप्पाण्णा मगदूम, आण्णासो दत्तात्रय राजमाने यांच्या मालकीची सुमारे १९ एकर जागा आहे. त्यापैकी सुमारे साडेतीन एकर जागा ही रस्ता, नाले यांच्यासाठी सोडण्यात आली आहे. यापैकी काही जागेत गेल्या १५ वर्षांपासून अतिक्रमण करून झोपड्या उभारण्यात आल्या होत्या व त्याचे नामकरण तात्यासाहेब कोरेनगर असे करण्यात आले होते.

या ठिकाणी प्रारंभी बारा झोपड्या होत्या. त्यांची संख्या आता चाळीसपर्यंत पोचली होती.या जागेवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी फारूख पठाण यांनी २४ मे रोजी जिल्हा पोलिसप्रमुखांकडे पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली होती. तर या जागेवरील अतिक्रमणे कायम करावीत, अशी मागणी झोपडपट्टीवासीयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, ही अतिक्रमणे खासगी जागेवर असल्याने ती कायम करता येणार नाहीत, असा निर्वाळा जिल्हाधिकाऱ्यानी दिला होता. त्यामुळे ही अतिक्रमणे हटविण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात चार जेसीबींच्या साह्याने एकाचवेळी अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे झोपडपट्टीवासीयांचे धाबे दणाणले. प्रारंभी अतिक्रमणे काढण्यास विरोध झाला. मात्र, पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. अतिक्रमणे काढून घ्यावीत, अशा नोटीसा आपण पाठविल्याचे फारूख पठाण यांनी सांगितले. तर कोणतीही नोटीस न मिळाल्याचा आरोप झोपडपट्टीवासीयांनी केला. काही वेळातच जेसीबींच्या साह्याने ही झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाच घेताना मुख्याध्यापक जाळ्यात

$
0
0

जयसिंगपूर

शहरातील लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी कनिष्ठ लिपिकामार्फत तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लिपिक व मुख्याध्यापक यांना रंगेहात पकडले. दिलीप परसू घाटगे (रा. पेठवडगाव) असे मुख्याध्यापकाचे, तर सदाशिव श्रीपती शितोळे (रा. संभाजीपूर) असे लिपिकाचे नाव आहे.

उदगाव येथील मोहन भंडारे यांनी १८ मे रोजी पाचवीच्या वर्गात मुलास प्रवेश घेण्यासाठी मुख्याध्यापक घाटगे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शाळेत प्रवेश मिळणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे भंडारे यांनी प्रवेशासाठी शाळेकडे रजिस्टरद्वारे अर्ज पाठविला होता. यानंतर मुख्याध्यापक घाटगे यांनी भंडारे यांना १५ जून रोजी शाळेत बोलावून घेतले व प्रवेश हवा असेल, तर पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. मात्र, त्यांनी एवढे पैसे देण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर २० जून रोजी भंडारे यांनी मुख्याध्यापक घाटगे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. यानंतर भंडारे यांनी मुख्याध्यापक घाटगे यांची पुन्हा भेट घेतली असता घाटगे यांनी त्यांच्याकडे तीन हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम लिपिक शितोळे याच्यामार्फत स्वीकारल्यानंतर पथकाने शितोळे व घाटगे यांना ताब्यात घेतले. जयसिंगपूर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर अधीक्षक प्रसाद हसबनीस, उपाधीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, सहायक फौजदार शाम बुचडे, सर्जेराव पाटील, मनोज खोत, संदीप पावलेकर यांच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेटसक्तीची वसुली अंगलट

$
0
0

इचलकरंजी

हेल्मेट सक्तीच्या नावाखाली शहरात दुचाकी वाहनधारकांना वेठीस धरुन दंड वसूल करण्याचे प्रकरण शहर वाहतूक शाखेच्या अंगलट आले आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावरुन व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराची पोलिस अधिक्षकांनी गांभिर्याने दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

शहरात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचा आदेश नसतानाही शहापूर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सुरेश नलवडे यांनी वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांसह यड्राव फाटा नाकाबंदी केली. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकारात वाहनधारकांची अडवणूक करत वाहन परवाना, कागदपत्रे असतानाही हेल्मट सक्तीचा धाक दाखवत जबरदस्तीने वसुली सुरु केली. प्रत्येक वाहनधारकाकडून १०० रुपये वसूल केले जात होते. त्यापैकीच एका वाहनधारकाने मोबाइलवर चित्रीकरण करुन या प्रकरणाचा पर्दाफाश केला. हा व्हिडीओ सोशल मिडीयावरुन सर्वदूर पसरल्याने येथील वाहतूक शाखेतील कर्मचाऱंचा कारनामा आणि त्याला पोलिसांनी दिलेली साथ उघडकीस आली.

सोशल मिडीयावरुन वाहतूक शाखेच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याने त्याची पोलिस अधिक्षकांनी गांभिर्याने दखल घेतली आहे. त्यांनी या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून व्हिडीओमध्ये झळकणारे वाहतूक नियंत्रक नंदकिशोर कुंभार व प्रदीप शिंदे यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. तर या प्रकारातून झालेल्या बदनामीचा डाग पुसण्यासाठी यड्राव फाटा येथे ज्या ज्या वाहनधारकांची अडकवणूक करुन पैसे वसूल केले गेले. त्या सर्वांचा शोध घेऊन त्यांचा जाब-जबाब घेण्यात येत आहेत.

शहरात दैनंदिन वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील असताना नाक्याबाहेरच थांबण्यात वाहतूक शाखेचे काही कर्मचारी धन्यता मानतात. येथील सिग्नलची अवस्थाही दयनीय असल्याने चौकाचौकात वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. याठिकाणी राहून वाहतूक सुरळीत करण्याऐवजी प्रत्येक नाक्यावर अथवा आडरस्त्याला थांबून वाहनधारकांची अडवणूक करत नाहक त्रास दिला जात आहे. वाहतूक नियंत्रण शाखेचेच कर्मचाऱ्यावर नियंत्रण नसल्याने शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

..............

चौकट

पोलिस महानिरिक्षकांच्या सूचना पायदळी

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या जनता दरबारात अनेक नागरिकांनी वाहतूक शाखेच्या कारभाराचा पाढाच वाचला होता. त्यावेळी नांगरे-पाटील यांनी महिन्याभरात सुधारणा करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांच्या सूचनांना वरिष्ठ अधिकाऱ्यापासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच केराची टोपली दाखवली असल्याचेच दिसून येत आहे.

...............

चौकट

पावतीचा नवा फंडा

यड्राव फाटा येथे वाहनधारकांची हेल्मेट सक्तीच्या नावाखाली अडवणूक करुन प्रत्येकी १०० रुपये वसूल केले जात होते. सध्या राष्ट्रीय, राज्य महामार्गावर दुचाकीस्वारांसाठी हेल्मटची सक्ती करण्यात आली आहे. मोटर व्हेईकल अॅक्ट १२९/१७७ नुसार हेल्मेट न वापरणाऱ्यास ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहनधारकांसह स्वत:चाही फायदा व्हावा यासाठी नवा फंडा शोधला आहे. एका वाहनधारकाला १०० रुपये दंड आकारला जात असून अशा पाचजणांची मिळून म्हणजे ५०० रुपयांची एक पावती करुन हेल्मेट सक्तीची तंतोतंत अंमलबजावणी केल्याचे भासवले जात आहे. पण या फंड्याचा कोणत्याच वाहनधारकाला फायदा होत नाही. कागदपत्रे, परवाना असतानाही नाहक १०० रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

...................................

चौकट

‘नायक’ बनण्याचा प्रयत्न भोवला

शहापूर पोलिस ठाण्यातील पोलिस निरिक्षक सीताराम डुबल हे रजेवर असताना पोलिस उपनिरीक्षक नलवडे यांच्याकडे ठाण्याचा पदभार होता. त्यामुळे त्यांनी अनोखा कारनामा करीत ‘नायक’ बनण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या अंगलट आला आहे. नलवडे यांचीही या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे.

..............

कोट

‘शहरात हेल्मेट सक्ती नसतानाही वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहनधारकांची अडवणूक करणे योग्य नाही. शहापूर पोलिसांकडून नाकाबंदीसाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांना बोलावण्यात आले होते. झाल्या प्रकाराची वरिष्ठांकडून चौकशी सुरु आहे. शहरात कोणत्याही दुचाकीस्वारास पोलिसांकडून हेल्मेट सक्तीसाठी अडवणूक होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.

- अरुण पवार, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामावर कमी, दांडी जास्त

$
0
0

Bhimgonda.Desai
@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील बहुतांशी अधिकारी, कर्मचाऱ्यांची कामावर कमी, ‘दांडी’च जास्त अशी स्थिती असते. कार्यालयापेक्षा अन्य ठिकाणी राहून त्यांच्या ‘वाटाघाटी’ सुरू असतात. अनेक वर्षांपासून तशीच पद्धत सुरू आहे. विभागात नव्याने रूजू झालेल्यांनाही कामचुकारपणाची लागण त्वरीत होते. परिणामी विभागाचे कामकाज गलथान राहिले. चार दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी अचानक भेट दिल्यानंतर विभागातील एका उपशिक्षणाधिकाऱ्यांसह पाचजण गैरहजर असल्याचे उघड झाले. यावरून विभागात अधिकारी, कर्मचारी नसतात यावर शिक्कामोर्तब झाले.

शिक्षण विभागात शिक्षणाधिकाऱ्यांसह एकूण ३९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३१ पदे कार्यरत आहेत. आठ पदे रिक्त आहे. या पदांचा कार्यभार इतरांकडे आहे. मात्र कार्यालयीन वेळेत कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित असण्याचे प्रमाण कमी असते. कार्यालयाची सकाळी दहाची वेळ असली तरी कर्मचारी दुपारपर्यंत कधीही येतात. शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी हे शाळा भेटींना गेल्याचे सांगत, उशिरा आल्याचे नेहमी समर्थन करतात.

जिल्ह्यात सर्व माध्यमांच्या ९५३ माध्यमिक शाळा आहेत. साडेआठ ते ९ हजार शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. आस्थापना मोठी असल्याने विभागात वर्षभर कामानिमित्त गर्दी असते. मात्र येथे आल्यावर त्वरीत अधिकारी, संबंधीत टेबलचा कर्मचारी भेटला, काम झाले असे सांगणारी व्यक्तीच भेटत नाही. प्रचंड हेलपाटे मारायला लावायचे, प्रत्येकवेळी फाइलमध्ये त्रुटी काढायच्या, पैसे घ्या मात्र काम करा, अशी समोरच्या व्यक्तीची मानसिकता तयार करायची आणि मालामाल व्हायचे अशी व्यवस्था येथे रुळली आहे. अपवाद वगळता तत्कालीन सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांची मानसिकता खाबुगिरीची राहिली. विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नैतिक दबावही नाही. तत्कालीन सर्वच सीईओ, विभागावर आमचे ‌थेट नियंत्रण नसते असे सोयीस्कर उत्तर देत राहिले. तेथील भ्रष्ट प्रवृत्ती, कामचुकारपणा, दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले गेले. विद्यमान सीईओ डॉ. खेमनार हे दबाव झूगारुन विभागांचा कारभार सुधारण्याचा प्रयत्न करीत आहेत. चार दिवसांपूर्वी अचानक भेट दिल्यानंतर गैरहजर आढळलेल्या उपशिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी आंनदा आकुर्डेकर, आर. व्ही कांबळे, वरिष्ठ सहायक अभिजित बंडगर, परिचर शिवाजी पोवार यांना एक दिवस विनावेतन काम करण्याची नोटीस देण्याचे धाडस त्यांनी केले. त्यामुळेच वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या फाइल्सचे व‌र्गिकरण सुरू झाले आहे.

माझे थकीत वेतन द्यावे, असा आदेश शिक्षण उपसंचालक यांनी दिला. त्याची अंमलबजावणी करून वेतन मिळावे, या मागणीसाठी दीड वर्षांपासून माध्यमिक विभागात हेलपाटे मारत आहे. मात्र, अद्याप काम झालेले नाही. अधिकारी, कर्मचारी वेळेवर भेटत नाही. भेटले तरी प्रकरण न पाहता विविध कारणे सांगतात.

संजय तळेकर, शिक्षक, सावरवाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्काच्या घरासाठी कलाकार संघ रस्त्यांवर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कलाकारांना हक्काचे घर मिळालेच पाहिजे, पाच हजार रुपये मानधन मिळालेच, या प्रमुख मागण्यांसाठी कलाकार संघाने मंगळवारी कोल्हापुरात मोर्चा काढला. मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने कलाकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

कलाकारांच्या प्रश्नावर सरकार काहीही भूमिका घ्यायला तयार नाही, त्याचा निषेध करीत कलाकार संघाच्यावतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. आझाद चौकात मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चात कलाकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हलगी, ताशा, ढोल, तुणतुणे या वाद्यांसह कलाकार सहभागी झाले होते. कलाकारांना हक्काचे घर मिळालेच पाहिजे, अशा घोषणा मोर्चादरम्यान देण्यात आल्या. बिंदू चौक, शिवाजी चौक, महापालिका, सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोडमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. पण जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी किंवा निवासी उपजिल्हाधिकारी दुपारी तीनच्या सुमारास नियोजित बैठकांना गेल्याने निवेदन देण्यास अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे सुमारे तासभर कलाकारांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.

आंदोलकांनी भालजी पेंढारकर यांच्या नावाने कलानगरी उभी करुन प्रत्येक कलाकाराला हक्काचे घर द्यावे, अशी मागणी केली. जिल्ह्यातील ११०८ कलाकारांचे जिल्हा परिषदेत धूळ खात पडलेले प्रस्ताव मंजूर करावेत. कलाकारांना पाच हजार मानधन द्यावे. अपघाती निधन झालेल्या कलाकारांच्या कुटुंबाला सांस्कृतिक विभागाकडून पाच लाखांची मदत द्यावी. कलाकारांच्या मुलांना सरकारी नोकरीत सामावून घ्यावे. कलाकारांसाठी विकास महामंडळ स्थापन करुन १०० कोटींचा निधी द्यावा. कलाकारांकडून ४८ हजार रुपये उत्पन्नाचा दाखल न मागता स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक, सरपंच, पोलिस पाटलांच्या दाखला ग्राह्य धरावा. कार्यक्रम सादर करण्यासाठी रात्री बारापर्यंत मुदत द्यावी. कलाकारांच्या वाहनांना टोलमाफी द्यावी. कलाकारांच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावीत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

कलाकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे, जिल्हाध्यक्ष जयवंत वायदंडे, कलापथक निर्माता संघाचे अध्यक्ष मुकुंद सुतार, शोभा पाटील, रजनी गोरड, अनिता पाटील, विश्वास ढाले, उदयराज पोवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घागरा-चोलीप्रकरणी पुजाऱ्यांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीला घागरा-चोली परिधान केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पुजाऱ्यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्या आदेशावरुन देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिवांनी मंगळवारी पुजाऱ्यांना ही नोटीस बजावली. भक्तांनी दिलेली घागरा-चोली देवीला परिधान करण्याचा प्रकार १० जूनला घडला होता. त्यानंतर भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात पुजारी अजित ठाणेकर, बाबुराव ठाणेकर आणि योगेश जोशी यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला फक्त काठापदराची साडी नेसवली जात असताना पुजाऱ्यांनी घागरा-चोली परिधान केल्याची बाब धार्मिक परंपरेविरुद्ध असून भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे भाविकांत असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत देवस्थान समितीकडेही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यापुढे अंबाबाई देवीस परंपरेनुसार वस्त्र परिधान करावे, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिल्या आहेत. त्यांच्या आदेशानुसारच देवस्थान सचिव विजय पोवार यांनी पुजाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाईच्या वेगाला पोलिसांचा ब्रेक

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम
शाळा, महाविद्यालये सुरू होताच पोलिसांनी या परिसरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. बहुतांश तरुण महाविद्यालयांच्या परिसरात भरधाव वाहने चालवून अपघातांना निमंत्रण देतात. अनेकांकडे दुचाकी चालवण्याचा परवाना नसतो. शिवाय ट्रीपल सिट, मोबाइलवर बोलत ड्रायव्हिंग करणारे स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालतात. या प्रकाराविरोधात वाहतूक पोलिसांनी मंगळवारी शहरातील सर्वच महाविद्यालयांच्या परिसरात १३५ विद्यार्थ्यांवर कारवाई करून सुमारे ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय गेल्या पंधरा दिवसांत २७० दुचाकीस्वारांचे परवाने तात्पुरते रद्द करण्याचे प्रस्तावही आरटीओकडे पाठवले आहेत.

शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात मोठी गर्दी असते. यातच बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतूक कोंडी होते. त्याचबरोबर अपघातांचाही धोका वाढतो. बहुतांश विद्यार्थ्यांकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतो. भरधाव वाहन चालवल्याने अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. याशिवाय महाविद्यालयांच्या परिसरात मुलींनाही याचा त्रास होतो. परिसरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने मंगळवारपासून विशेष मोहिमेला सुरुवात झाली. शहर वाहतूक नियंत्रण शोखेचे ६० कर्मचारी आणि मुख्यालयातील ३० कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासूनच शहरातील शहाजी कॉलेज, स्वामी विवेकानंद कॉलेज, न्यू कॉलेज, गोपाल कृष्ण गोखले कॉलेज, महावीर कॉलेज, कॉमर्स कॉलेज, कमला कॉलेज, शाहू कॉलेज, राजाराम कॉलेज आदी कॉलेजच्या परिसरात कारवाई सुरू केली.

विना लायसन दुचाकी चालवणे, भरधाव वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी दंडाची रक्कम भरण्यास चालढकल करणाऱ्यांची वाहने उचलून कार्यालात आणली. पालकांना घेऊन आल्याशिवाय वाहन परत न करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांसमोरच त्यांच्या चुकांचा पाढा वाचून पोलिसांनी कारवाया केल्या. दिवसभरात १३५ कारवाया करून ४० हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.

शहर वाहतूक नियंत्रण शाखेने १ जानेवारीपासून २० जूनपर्यंत शहरात १६ हजार १४० बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये दंडाची रक्कम वसूल केली. याशिवाय वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ७५ वाहनधारकांना थेट कोर्टात खेचले आहे. वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांचे तात्पुरते परवाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यानुसार पोलिसांनी गेल्या महिन्याभरात २७० वाहनधारकांचे प्रस्ताव आरटीओकडे पाठवले आहेत. आरटीओच्या परवानगीने लवकरच संबधितांचे परवाने तीन महिन्यांसाठी रद्द होणार आहेत. या काळात ते वाहन चालवताना सापडले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे.

मंगळवारची कारवाई – १३५

दंड वसुली – ४० हजार


फोनाफोनीने पोलिस त्रस्त

रस्त्यावर पोलिसांनी अडवताच लायसन दाखवण्यापेक्षा पोलिसांवर दबाव आणण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहेत. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनीही पोलिसांवरच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक, आमदारांचे पीए, पोलिस अधिकारी यांना फोन करून ते पोलिसांकडे देत होते. दबाव टाळण्यासठी अनेक पोलिसांनी फोन घेणे टाळले, त्यामुळे विद्यार्थ्यांना दंडाची पावती करूनच वाहन ताब्यात घ्यावे लागले. कारवाईदरम्यान फोनाफोनीचाही त्रास सहन करावा लागल्याने पोलिसांना कामात मर्यादा येत होत्या.


पालकांनाही समज

दंडाची रक्कम न भरणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहने जप्त करून वाहतूक शाखेत जमा केली होती. पालकांना सोबत आणल्याशिवाय दुचाकी मिळणारच नाही असे सुनावल्यामुळे दुपारपर्यंत विद्यार्थी आणि पालकांचीही शहर वाहतूक नियंत्रण शाखेत गर्दी केली होती. अल्पवयीन विद्यार्थ्यांकडे विना लायसन वाहने देणाऱ्या पालकांना पोलिसांनी चांगलेच खडसावले. यापुढे वाहतुकीचे नियम मोडल्यास पालकांवरही गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगताच दंडाची रक्कम भरून पालकांनी कार्यालयातून काढता पाय घेतला.


शाळा सुरू झाल्या आहेत, तर कॉलेजमध्येही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या काळात शाळा, महाविद्यालयांसमोर वाहतुकीची कोंडी होते, त्याचबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेशिस्तपणे वाहने चालवली जातात. कॉलेजशी काहीही संबंध नसलेल्या तरुणांचाही यात समावेश असतो, त्यामुळे शाळा आणि कॉलेज परिसरात कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

अशोक धुमाळ, निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुजारी हटावप्रश्नी पालकमंत्र्यांकडून दखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील ‘पुजारी हटाओ’ आंदोलनाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतली. या प्रश्नावर गुरुवारी (दि. २२) सायंकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. दरम्यान, आज (बुधवारी) दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी असतील तेथे जाऊन त्यांना निवेदन देण्याचा निर्णय अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीने जाहीर केला आहे.

श्री अंबाबाईची घागरा-चोली रुपात पूजा बांधल्यानंतर सुरू झालेला वाद आता ‘पुजारी हटाओ’ मोहिमेपर्यंत पोहचला आहे. पंढरपूरप्रमाणे अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमावेत, अशी मागणीही समितीने केली आहे.

अंबाबाई आणि राजर्षी शाहू महाराजांच्या वटहुकूमाचा अपमान करणाऱ्या पुजाऱ्यांविरोधात सर्व पक्ष, संघटना आणि सामाजिक संस्था एकवटल्या आहेत. न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईची सुरुवात करत रविवारी (दि. १८) पुजाऱ्यांना सुबुद्धी देण्याचे साकडेही अंबाबाईला घालण्यात आले. गेले दहा-बारा दिवस आंदोलन सुरू असतानाही प्रशासनाने काहीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे पुढचा टप्पा म्हणून देवस्थान समितीचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.

लढा तीव्र करणार

पुजाऱ्यांच्या प्रवृत्तीविरोधातील लढा अधिक तीव्र करणार आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर जसे बडवेमुक्त करण्यात आले तसेच येथील मंदिरही पुजारीमुक्त करुन सरकारी पुजारी नेमावेत, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी केली आहे. हा लढा जातीविरुद्ध नसून पुजाऱ्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध आहे. त्यामुळे भक्तांनी मंदिराचे पावित्र्य व शांतता भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.

अंबाबाई मंदिरात घुसणार : जिजाऊ बिग्रेड

श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवावेत, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात जिजाऊ ब्रिगेड सहभागी झाली आहे. मंदिरात दान स्वरुपात येणारे पैसे, दागीने, साहित्य घरी पळवणाऱ्या भ्रष्ट पुजाऱ्यांची हकालपट्टी करावी, स्त्री देवता असल्याने यापुढे महिलांनीच देवीची पूजा-अर्चा करावी. मंदिर पुजारीमुक्त करावे, या मागणीसाठी साकडे घालणार असल्याचे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा डॉ. जयश्री चव्हाण यांनी सांगितले आहे.


आंदोलने थांबविण्याचे आवाहन

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले अंबाबाईच्या नावावर सुरू असलेले आंदोलन थांबवावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे अनिल घाटगे यांनी पत्रकाद्वारे केली. या आंदोलनामुळे पर्यटकांच्या भक्तांच्या मनात कोल्हापूरविषयी गैरसमज निर्माण होत आहे. पुजारी, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनाने याबाबत एकत्रित बैठक घेऊन चर्चेने हा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट सोने देऊन महिलेची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लक्ष्मीपुरी येथील आठवडी बाजारात कोंबड्या विकण्यासाठी आलेल्या अक्काताई तातोबा पाटील (वय ६०, रा. वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांची खऱ्या सोन्याच्या बदल्यात बनावट सोने देऊन फसवणूक करण्यात आली. याबाबत एका अज्ञात महिलेसह तरुणावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडणगेतील अक्काताई या लक्ष्मीपुरीतील आठवडी बाजारात कोंबड्या विकण्यासाठी आल्या होत्या. रविवारी (ता. १८) त्या बाजारात कोंबड्या विकताना एक तरुण आणि एक महिला त्यांच्याजवळ आली. जुने सोन्याचे दागिने घेऊन नवीन सोने देतो, असे सांगून ते त्यांना लुगडी ओळमध्ये घेऊन गेले. त्यांच्या जवळची ५ ग्रॅमची बोरमाळ, अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले असे १९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख एक हजार रुपये घेतले. या बदल्यात त्यांनी पिवळ्या रंगाच्या धातूच्या ८ पुतळ्या अक्काताई पाटील यांना दिल्या. अक्काताई यांनी घरी जाऊन पहिले असता फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रकार पाटील यांना केंद्र सरकारची शिष्यवृत्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील युवा चित्रकार युवराज पाटील यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने २०१७ ते २०१९ या कालावधीसाठीची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. युवा चित्रकारांसाठी दिली जाणारी अशा प्रकारची ही शिष्यवृत्ती एकूण १५ चित्रकारांना जाहीर झाली आहे.

मूळचे राधानगरी तालुक्यातील पिंपळगाव शेतकरी कुटुंबातील युवराज पाटील यांची ‘चारकोल’च्या माध्यमातून कॅनव्हासवर काळ्या व पांढऱ्या रंगांच्या विविध छटांचा वापर करून चित्रे साकारण्याची हातोटी आहे. कृष्ण-धवल चित्रे ही त्यांच्या चित्रांची खासियत. चित्र खुलविण्यासाठी लाल रंगाचा अचूक वापर ते करतात. ‘ब्लॅक अँड व्हाइट’ रंगांच्या दुनियेत रसिकांना अलौकिक सफर घडवून आणणाऱ्या पाटील यांची आजवर मुंबई, दिल्ली, गोवा यांसह कोल्हापूरमध्येही प्रदर्शने झाली आहेत.

कला, संगीत, नाट्य या क्षेत्रातील तरुणाईसाठी केंद्र सरकारची ही शिष्यवृत्ती योजना आहे. देशभरातील तीन हजारांहून अधिकजणांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. त्यातील प्रत्येक क्षेत्रातील निवडक व्यक्तींना शिष्यवृत्तीसाठी निवडले जाते. चित्रकला क्षेत्रासाठी देशभरातील १५ जणांमध्ये युवराज पाटील यांची निवड झाली. पाटील यांच्या ‘ब्लॅक इज बॅक’ या चित्रमालिकेची निवड शिष्यवृत्तीसाठी करण्यात आली. रिअॅलिस्टिक प्रकारातील वेगळ्या माध्यमातील कामाची नोंद या यातून झाली आहे.

युवराज यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर, कौलव येथे झाले. त्यांनी चित्रकलेचे धडे कलाशिक्षक संजय कुंभार यांच्याकडून घेतले. दहावीनंतर कला शिक्षक डिप्लोमा व जी. डी. आर्ट उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्यात कला क्षेत्रातील पदवी संपादन केली.

सध्या ते मुंबईत डोंबिवलीतील करंदीकर कला अॅकॅडमीत सहायक अधिव्याख्याता आहेत. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन, मुंबई (वरळी) येथील नेहरू सेंटर, प्रदर्शक आर्ट गॅलरी, आर्टिस्ट सेंटर येथे त्यांची चित्रप्रदर्शने झाली आहेत. नुकतेच मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीत त्यांचे दुसरे चित्रप्रदर्शन झाले. यापूर्वी त्यांची सोलो एक्झिबिशनही झाली आहेत. अनेक पारितोषिके मिळवत त्यांनी आपला कलाप्रवास नव्या दिशेला नेला आहे.

माझ्या या यशात सर्व गुरुजनांसोबत, कुटुंबीयांचाही सहभाग आहे. आजवर केलेल्या कामाची ही पोहोचपावती आहे. नव्या कामासाठी यातून प्रेरणा मिळाली आहे.
- युवराज पाटील, चित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतन आयोगासाठीकर्मचाऱ्यांचा ठिय्या

$
0
0

इचलकरंजी

केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, सुधारीत आकृतीबंध करुन वर्ग ३ व ४ सफाई कर्मचाऱ्यांच्या वाढीव पदांना मंजुरी द्यावी, पगार व पेन्शनवर १०० टक्के अनुदान द्यावे, अनुकंपा नोकरभरती विनाअट करण्यात यावी यासह विविध न्याय मागण्यांसाठी येथील नगरपरिषद कर्मचारी संघटनांच्यावतीने नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागण्यांचा गांभिर्याने विचार न झाल्यास १४ ते १७ जुलै या कालावधीत लाक्षणिक संप करण्याचा इशारा देण्यात आला.

इचलकरंजी नगरपरिषदेतील सर्वच कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मागील महिन्यात बैठक होऊन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी सर्व कामगार संघटनांनी मिळून लढा देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर राज्यातील सर्वच नगरपरिषदांमधील कर्मचारी संघटनांनी २० जून रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या निर्देशानुसार मंगळवारी येथील कर्मचारी संघटनांनी आंदोलन केले.

इचलकरंजी नगरपरिषद कामगार युनियन (सिटू)चे शंकर अगसर, जनरल कामगार संघ (इंटक)चे शिवाजी जगताप, म्युन्सिपल वर्कर्स युनियन (इंटक)चे के. के. कांबळे, आदर्श कामगार युनियनचे संजय कांबळे, स्वाभिमानी कामगार संघटनेचे सुनील बेलेकर, भारतीय मजदूर संघाचे दस्तगीर सादुले, नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती पुणे विभागाचे आण्णासाहेब कागले, धनंजय पळसुले यांमया नेतृत्त्वाखाली सर्व कामगारांनी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारात एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर प्रवेशद्वारातच ठिय्या मारला. यावेळी शिष्टमंडळामयावतीने नगराध्यक्षा अलका स्वामी, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मद्यमार्ग’ मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मद्याची दुकाने पूर्ववत सुरू ठेवण्याचा मार्ग म्हणून महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आणलेला रस्ते हस्तांतरणाचा ठराव प्रचंड गोंधळात मंजूर करण्यात आला. या विषयावरुन अभूतपूर्व गोंधळ उडाला. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना आणि विरोधी भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. धक्काबुक्की आणि प्रचंड आरडाओरडीने सभागृह चालविणे अवघड झाले. त्यामुळे एकवेळ सभा तहकूबही करावी लागली.

काही वेळानंतर सुरू झालेल्या सभेतही गोंधळ सुरू झाला. त्यावेळी भाजप, ताराराणी आघाडीचे नगरसेवक विलास वास्कर, संतोष गायकवाड, किरण नकाते यांनी महापौरांसमोरील मानदंड पळविण्याचा प्रयत्न केला. तर रस्ता हस्तांतरण ठराव मंजूर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी दोन कोटींची सुपारी घेतल्याचा थेट आरोप ताराराणी आघाडीचे नगरसेवक सुनील कदम यांनी केला. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. ​काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनीही विरोधी गटांनी सध्या सुरू असलेल्या दारू दुकानादारांकडून सुपारी घेऊन त्यांच्या फायद्यासाठी ठरावाला विरोध करत असल्याचा प्रतिटोला लगावला.

आरोप, प्रत्यारोप आणि मानदंड पळवण्याच्या प्रयत्नामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत प्रचंड झटापट झाली. गोंधळ आणि आरडाओरडीतच सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीने बहुमताच्या बळावर ४७ विरुध्द ३२ मतांनी ठराव मंजूर करुन घेतला. भाजप, ताराराणी आघाडीच्या ३२ नगरसेवकांनी ठरावाविरोधात मतदान केले. महापौर हसीना फरास अध्यक्षस्थानी होत्या. रस्ते हस्तांतरण ठराव मंजूर केल्याचा निषेध करत भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.

रस्ते हस्तांतरणाचा विषय पुरवणी पत्रिकेतील आठ नंबरवर होता. त्यावर दुपारी दीडच्या सुमारास चर्चा सुरु झाली. अपेक्षेनुसार विरोधी भाजप, ताराराणी आघाडीने आक्रमक पवित्रा घेत ठरावाला विरोध केला. दुसरीकडे ठराव मंजुरीसाठी सत्ताधारी गटाकडून प्रचंड आटापिटा सुरु होता. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गातील काही रस्ते आयआरबीने तयार केले आहेत. रस्ते विकास प्रकल्पांतर्गत करारानुसार हे रस्ते आयआरबी कंपनीकडे हस्तांतरित असून टोलप्रश्नी सुप्रीम कोर्टात केस सुरु आहे. रस्त्याचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असताना महापालिकेला ते ताब्यात घेता येतील का? असा सवाल नगरसेवक सुनील कदम व भाजप गटनेते विजय सुर्यवंशी यांनी उपस्थित केला. त्याचवेळी सत्ताधारी गटांने संपूर्ण जिल्ह्यात दारुबंदी करा, केवळ शहरापुरता नको. रस्ते हस्तांतरण ठराव आ​​णि दारुबंदी हे विषय वेगवेगळे असल्याचे सांगत ठराव मंजूर करु, असा घोषा लावला.

.............

विलास वास्करांना शिक्षा

रस्ता हस्तांतरण ठरावावरुन दोन्ही आघाड्या आमनेसामने उभ्या ठाकल्याने घोषणेबाजी वाढली. विरोधी गट दारुबंदी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत महापौरांच्या टेबलासमोर आले. ठरावाला विरोध दर्शविण्यासाठी महापौर टेबलासमोर जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. यावेळी नगरसेविका आक्रमक झाल्या होत्या. ‘सत्ताधारी गटाचे नगरसेवकही संपूर्ण जिल्ह्यात दारुबंदी करा,’ अशा घोषणा देत पुढे सरसावले. त्यामुळे प्रचंड गदारोळ सुरू झाला. गोंधळातच विरोध गटाचे नगरसेवक विलास वास्कर यांनी मानदंड उचलला. संतोष गायकवाड, किरण नकाते यांनीही त्याना मदत केली. मानदंड पळविण्याच्या प्रकारामुळे महापौरांसह सत्ताधारी नगरसेवक संतप्त बनले. या प्रकाराबद्दल महापौरांनी वास्कर यांना सभागृहातून तत्काळ बाहेर जाण्याची शिक्षा सुनावली. वास्कर दहा मिनिटे बाहेर थांबून पुन्हा कामकाजात सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटीचा सर्व्हर डाउन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिल्ली येथील जीएसटीएन नेटवर्कच्या सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील करदात्यांच्या नोंदणीची विभागवार आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. विक्रीकर कार्यालयाकडेही दहा जूनपर्यंतची आकडेवारी उपलब्ध असल्याची स्थिती आहे. देशभर वस्तू आणि सेवाकर कायद्याची (जीएसटी) अंमलबजावणी १ जुलैपासून होत आहे. मात्र, १५ जून रोजी जीएसटीएनची विंडो बंद करण्यात आली. अद्याप, कोल्हापूर कार्यक्षेत्रातील करदात्यांची नोंदणी निश्चित झालेली नाही. दहा जूनपर्यंत ४० हजार ६०० करदात्यांची नोंदणी झाली आहे. करदात्यांना पुन्हा संधी म्हणून २५ जून ते २५ जुलैपर्यंत जीएसटीएनची विंडो खुली होणार आहे.

‘व्हॅट’चा डाटा जीएसटी नेटवर्ककडे स्थलांतरित करण्यासाठी जीएसटीएनचा दुसरा टप्पा १ ते १५ जून या कालावधीत सुरू झाला. या कालावधीत कोल्हापूर कार्यक्षेत्रातील सुमारे ५० हजार करदाते जीएसटीएन नेटवर्ककडे स्थलांतरित झाले. पहिल्या टप्प्यातील नोंदणी १५ जून रोजी संपली. मात्र या नोंदणीची आकडेवारी विक्रीकर खात्याच्या कोल्हापूर विभागाकडे अद्याप उपलब्ध नाही. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातून ३० हजार करदात्यांची नोंदणी पूर्ण झाली. दिल्लीत जीएसटीएन नेटवर्कमधून १० जूनपर्यंत ४० हजार ६०० करदात्यांच्या नोंदणीची संख्या दिसत होती. त्यानंतरची माहिती कार्यालयाकडे उपलब्ध नाही. एकाच वेळी नोंदणी केल्याने या नेटवर्कचा सर्व्हर डाऊन झाला आहे. २४ जूनपर्यंत ही प्रक्रिया बंद राहिल. नवीन करदात्यांना जीएसटीएनची विंडो २५ जूनपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एक जुलैपर्यंत नोंदणी केलेल्या करदात्यांना लाइव्ह डिलरचा जीएसटीचा क्रमांक दिला जाणार आहे. पाच जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची कागदपत्रांचे स्कॅनिंग आणि अपलोडची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक महिन्यांचा अवधी मिळेल. नोंदणी केलेल्यांपैकी पाच हजार करदाते जीएसटीएनच्या नेटवर्कबाहेर आहेत. व्यवसाय बंद, बदल आणि वीस लाखांच्या आत उत्पन्न असल्याने काही करदात्यांनी व्हॅट स्थलांतराला पसंती दर्शविलेली नाही. मात्र, उत्पन्न जादा ्सूनही नोंदणी केली नसलेल्यांची शोधमोहीम १ जुलैपासून सुरू होईल असे सूत्रांनी सांगितले.


वीस लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असूनही नोंदणी न केलेल्या करदात्यांवर कारवाई केली जाईल. १ जुलैपासून अशा करदात्यांचा शोध विक्रीकर विभाग घेईल. कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई करू. त्यांचे व्यवसाय बंद केले जातील. पाच जिल्ह्यांतील करदात्यांची आकडेवारी लवकरच उपलब्ध होईल.

- विकास इंदलकर, सहआयुक्त, विक्रीकर विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची हायकोर्टात धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत चोरटा मैनुद्दीन मुल्ला याच्याशी संगनमत करून ९ कोटी १८ लाख रुपयांवर डल्ला मारणाऱ्या पोलिसांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. या लुटीतील सहभागी सात पोलिसांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, हवालदार दीपक पाटील आणि पोलिस नाईक कुलदीप कांबळे या तिघांनी हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला असून, यावर गुरूवारी (ता. २२) सुनावणी होणार आहे.

सात पोलिसांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला होता. यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, हवालदार दीपक पाटील आणि पोलिस नाईक कुलदीप कांबळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. या तिघांसह सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, रवींद्र कांबळे हे अद्याप फरार आहेत, तर प्रवीण सावंत याचा जामीन अर्ज मंजूर झाला आहे. दरम्यान, सर्व फरार संशयितांच्या अटकेसाठी सीआयडीकडून प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यांमधील सर्व पोलिस ठाण्यांना पोलिसांच्या छायाचित्रांसह माहिती पाठवली असून, त्यांच्या अटकेच्या सूचना दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिष्यवृत्तीतून गुणवत्ता वाढीचा प्रयत्न’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘ज्ञानसंस्कार वृद्धीसाठी शिष्यवृत्ती हे प्रोत्साहनाचे महत्त्वाचे माध्यम आहे. या शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये विद्यार्थ्यांना सहकार्य व प्रेरित करणे आणि आत्मविश्वास वाढविणे हा उद्देश आहे. तसेच येत्या काळात महाविद्यालयातील संशोधनात्मक कार्य पाहून 'रिसर्च परफॉर्मिग कॉलेज' म्हणून महाविद्यालयांचा गौरव करण्याचा मानस आहे,’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज केले.

इचलकरंजी येथील डीकेटीई महाविद्यालयात झालेल्या शिष्यवृत्ती गुणगौरव समारंभात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठ आणि डीकेटीईचे टेक्स्टाइल अॅण्ड इंजिनीअरिंग इन्स्टिट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने डीकेटीईच्या ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती गुणगौरव समारंभ, गुणवत्ताप्राप्त महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या सत्कार समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘गेली १९ वर्षे शिवाजी विद्यापीठाने विद्यापीठातील जे विद्यार्थी अभ्यासक्रमात पहिल्या, दुसऱ्या व अंतिम वर्षाच्या परीक्षांत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत येतात. त्यांच्यासाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शहरी, निमशहरी व ग्रामीण गटातून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता शिष्यवृत्ती संपादन केलेली आहे. अशा महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यामागे गुणवत्ता वाढवण्याचा मुख्य हेतू आहे.’

कार्यक्रमात कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, शिक्षण शास्त्र व विधी विद्याशाखांच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला.

संस्थेचे डेप्युटी डायरेक्टर अॅडमिनिस्ट्रेशन प्रा. डॉ. यू. जे. पाटील, प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे, शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी, घाळी कॉलेजचे प्राचार्य एम. आर. पाटील, डीकेटीईच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे आदी उपस्थित होते.

कल्लाप्पाणा आवाडे यांनी डीकेटीईची स्थापना व वस्त्रोद्योगाच्या प्रगतीचा इतिहास सांगितला. संचालक प्रा. डॉ. पी.व्ही. कडोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. एस. जी. कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापुरात मुस्लिम तरुणांनी दिला मुखाग्नि

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जात आणि धर्मापेक्षा माणुसकी ही सर्वात श्रेष्ठ असल्याचा प्रसंग मंगळवारच्या रात्री कोल्हापुरात पाहायला मिळाला. ७० वर्षाच्या एकट्या राहणाऱ्या आक्काताई जाधव यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी बाराईमाम मोहल्ल्यातील मुस्लिम युवकांनी पार पाडली. रमजान निमित्त मशिदीमध्ये नमाज अदा करून दुवा मागणाऱ्या युवकांनी जातीधर्मापेक्षा माणुसकीचा धर्म जपत अनोखा आदर्श समाजासमोर उभा केला.

घरी एकट्या असलेल्या ७० वर्षाच्या आईच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलेल्या मुलीला आई निपचित पडल्याचे दिसले. आई कॉटवरून खाली पडलेल्या अवस्थेत पाहून मुलीची अस्वस्थता वाढली. आईचे अचेतन शरीर पाहून तिच्या भावनांचा बांध फुटला आणि तिने टाहो फोडला. बिंदू चौक परिसरातील बाराईमाम मोहल्ल्यातील आक्काताई जाधव यांच्या मुलीच्या रडण्याच्या आवाजाने मशिदीत रमजानच्या नमाजानंतर थांबलेल्या युवकांनी थेट आक्काताईचे घर गाठले.

आईच्या निधनानंतर एकटीने अंत्यसंस्कार कसे करायचे हा प्रश्न पडलेल्या मुलीला या मुस्लिम युवकांच्या मदतीने मोठा आधार मिळाला. आक्काताईचे पार्थिव पाहून मुस्लिम युवकांनी अंत्यसंस्काराची तयारी केली व परिसरातील मुस्लिम युवकांनी माजी नगरसेवक आदिल फरास यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिरडी बांधण्यापासून अंत्यविधी आणि मुखाग्नि देण्यापर्यंत परिसरातील मुस्लिम युवकच आक्काताईंची मुलं बनली व त्यांनी ती जबाबदारी पार पाडली. रमजानच्या महिन्यात नमाज करत असताना दुवा मागण्याची पद्धत आहे. माझ्या हातून समाजासाठी चांगले कार्य घडू दे अशी प्रार्थना या दुवामध्ये असते. ही दुवा मागून निवांत बसलेल्या मुस्लिम युवकांच्या कानावर अचानक आक्काताईच्या मुलीच्या रडण्याचा आवाज पडला आणि प्रार्थनेतील दुवा कृतीत उतरवण्याचे भाग्य आम्हाला मिळाले अशी प्रतिक्रिया बाराईमाम मोहल्ल्यातील मुस्लिम तरुणांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशी अहवाल दडपला

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com
Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : दोषींना अभय देणारी टोळी जिल्हा परिषदेत सक्रिय आहे. त्यामुळे काहीही केले तरी कडक कारवाई होत नसल्याची उदाहरणे असल्याने कामचुकार, खाबुगिरी करणाऱ्यांत सराईतपणा आला आहे. यामुळे शिक्षणाधिकारी ज्योस्त्ना शिंदे, विस्तार अधिकारी आर. व्ही. कांबळे यांच्यासह विभागातील ११ कर्मचाऱ्यांवरील कारवाई प्रलंबित आहे. महिन्यापूर्वी चौकशी झालेले कांबळे यांचा अहवाल विभागात दाबून ठेवल्याचे बुधवारी उघड झाले. त्यांचा चौकशी अहवाल शिक्षण विभागात दोन आठवड्यांपूर्वी आला. मात्र, प्रशासनाने तो दाबून ठेवला.

माध्यमिक शिक्षणाधिकारी शिंदे या सक्तीच्या रजेवर गेल्याने त्यांचा अतिरिक्त कार्यभार टी. एल. मोळे यांच्याकडे आहे. ते प्रभारी असल्याने गतीमान प्रशासन, प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात त्यांना अपयश येत आहे. कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने ‘माध्यमिक’ला कुणी वालीच नाही, असे चित्र आहे. अधीक्षक एस. एम. शेख ३१ मार्च २०१७ रोजी निवृत्त झाले. त्यांचाही अतिरिक्त कार्यभार प्राथमिक शिक्षण विभागातील अधीक्षक पी. एन. नलवडे यांच्याकडे आहे. ते विभागात बसून वेळ मिळेल त्यावेळी फाइल्स हातावेगळ्या करतात. परिणामी अनेक फाइल्स पडून आहेत.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कुणाल खेमनार यांनी विस्तार अधिकारी आर. व्ही कांबळे यांची कार्यालयीन वेळेत बाहेर फिरणे, मद्यप्राशन करून वरिष्ठांबद्दल अपशब्द वापरणे अशा तक्रारींवरून स्वतंत्र समितीतर्फे चौकशीचा आदेश दिला. समितीने चौकशी करून पुढील कार्यवाहीसाठीचा अहवाल विभागात दिला. तो शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी वेळेत पुढील कार्यवाहीसाठी सामान्य प्रशासनाकडे पाठवणे अपेक्षित होते. मात्र अहवाल सीईओंकडे विलंबाने जाईल असेच काम यंत्रणेने केले. परिणामी अहवाल प्राथमिक शिक्षण विभागातच अडकला. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने बुधवारी अहवालासंबंधी चौगुले यांच्याकडे विचारणा केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

निलंबित कर्मचारी ‘कलेक्टर’

सहा महिन्यांपूर्वी सांगली जिल्हा परिषदेत लाच घेताना सापडलेल्या एका वरिष्ठ लिपिकाची नियुक्ती माध्यमिक विभागात केली. निलंबित असल्याने त्यांना केवळ हजेरी लावण्याचा आदेश आहे. हजेरी लाऊन त्यांनी ‘कलेक्टर’चे काम जोरात सुरू ठेवले. त्यांच्यावर कुणाचे नियंत्रणच नसल्याचे दिसते.


‘अतिरिक्त’ची माहिती नाही..

‘माध्यमिक’मध्ये कार्यरत अभिजित बंडगर यांच्याकडे अतिरिक्त शिक्षकांचा विषय आहे. मात्र शैक्षणिक हंगाम सुरू झाला तरी यावर्षी किती शिक्षक अतिरिक्त होणार याची माहिती उपलब्ध नाही. गेल्या वर्षी अतिरिक्त झालेल्या अनेक शिक्षकांचे समायोजन झाले नाही. अर्धवेळ शिक्षकांचे वेतन निघालेले नाही. नव्या शिक्षक मान्यतेचे प्रस्तावही रखडले आहेत.


आर. व्ही. कांबळे यांचा चौकशी अहवाल प्राथमिक शिक्षण विभागाकडे आला आहे. आता माझी स्वाक्षरी घेऊन तो सामान्य प्रशासनाकडे तातडीने पाठवण्याची सूचना दिली आहे.

सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आप’ची नगरविकासकडे तक्रार

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिकेने रस्ते हस्तांतरणाचा ठराव बेकायदेशीररित्या मंजूर केल्याची तक्रार आम आदमी पक्षाने मुंबईत नगरविकास विभागाकडे केली आहे. ‘आप’च्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाण, ठराव करण्याची पद्धत, यासंदर्भातील बातम्यांची कात्रणे बुधवारी मंत्रालयात नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आली. या संदर्भात लवकरच सुनावणीच्या नोटीसा लागू होऊन चौकशी सुरू होईल असे आपच्यावतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, महापौर हसीना फरास यांना काळे फासण्याचा भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी दिलेल्या इशाऱ्याविरोधात निषेधासाठी महापालिका कर्मचारी संघाने गुरुवारी (ता. २२ जून) तासभर काम बंद आंदोलनाची घोषणा केली आहे. तर सभेत रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर करणाऱ्या नगरसेवकांवर सोशल मीडियावरून टीकेचा भडीमार झाला.

‘आप’ने दिलेल्या पत्रकात नगरविकास विभागाकडे केलेल्या तक्रारींची माहिती दिली आहे. महापालिकेने सरकारचे रस्ते आपल्याकडे हस्तांतरीत करण्याच्या केलेल्या ठरावाची चौकशी करून तो रद्द करावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे हा ठराव वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. संदीप देसाई, जयवंत पोवार, आप्पासाहेब कोकीतकर, उत्तम पाटील, यशवंत निकम, आदम शेख, व्ही. एन. शेट्टी आदींनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

मंगळवारच्या सभेतील वादाचे सावट बुधवारी महापालिकेच्या कामकाजावर पडल्याचे दिसत होते. सत्तारुढ गटाचे प्रमुख पदाधिकारी दिवसभर महापालिकेकडे फिरकले नाहीत. नगरसेवकांची वर्दळही कमी होती.

दरम्यान भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी महापौरांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी महापालिका कर्मचारी संघाने गुरुवारी (ता.२२) सकाळी ११ ते १२ या वेळेत तासभर काम बंद आंदोलन पुकारले आहे. मात्र महापौरांच्या पाठिंब्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. या आंदोलनाला पदाधिकाऱ्यांनी नातेवाईकांनी फूस दिल्याची चर्चा आहे. महापालिका कर्मचारी संघाचे महासचिव अजित तिवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘शहराच्या प्रथम नागरिकांना काळे फासण्याचा इशारा देणे चुकीचे आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या महापौरांविरोधातील आंदोलनाचा निषेध नोंदविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेचे सर्व कर्मचारी गुरुवारी तासभर आंदोलन करतील. या आंदोलनातील कामाची भरपाई जादा कामाद्वारे भरुन काढू.’ कर्मचारी संघाच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनीही पत्रकाद्वारे महापौरांबाबत तृप्ती देसाई यांनी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

कर्मचारी संघाने गुरुवारच्या आंदोलनाविषयी मला सायंकाळी सहा वाजेपर्यंत माहिती दिलेली नाही. आंदोलनासंदर्भात प्रशासनासोबत कसलीही चर्चा केलेली नाही. आंदोलनासाठी काम बंद करणे योग्य नाही. कार्यालयीन वेळेत काम बंद ठेवणे, आंदोलन करणे हे गैर आहे. कर्मचारी वेगवेगळ्या मार्गाने निषेध नोंदवू शकतात.
- अभिजित चौधरी, आयुक्त

तर बास्केट ब्रीजचा निधी अडचणीत

भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी आयुक्त चौधरी यांची भेट घेऊन रस्ते हस्तांतरणाने महापालिकेचे नुकसान होत असल्याचा मुद्दा मांडला. नॅशलन हायवे अॅथोरिटीने बास्केट ब्रीजसाठी सुमारे १०० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. बास्केट ब्रीजही महामार्गालगतच होणार आहे. हे रस्ते वर्ग झाले तर नॅशनल हायवे अॅथोरिटीची मालकी संपुष्टात येईल. त्यामुळे निधी मिळण्यात अडचणी येऊ शकतात असे नगरसेवक सत्यजित कदम यांनी सांगितले. कावळा नाका ते शिवाजी पूल आणि अन्य मार्गांवर उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. त्यातही अडथळे येतील असे नगरसेवक नकाते यांनी सांगितले. गेल्या दीड वर्षात शहरात ४०० केबीन बेकायदेशीर उभारल्याचा आरोप नगरसेवक नकाते यांनी केला.


सोशल मीडियावर टोलेबाजी

दरम्यान, ‘सामाजिक समस्येवर उपाय’ म्हणून रस्ते हस्तांतरित ठराव मंजूर करणारी देशातील पहिली महापालिका होण्याचा बहुमान कोल्हापूरने पटकाविला असा उपरोधिक टोलेबाजी सोशल मीडियावर दिवसभर सुरू होती. रस्ता हस्तांतरण ठरावावरुन सत्ताधाऱ्यांना नेटकऱ्यांनी टीकेचे लक्ष्य केले. बहुमताच्या बळावर लिकर लॉबीसाठी ठराव मंजूर करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी शहराची अब्रू धुळीस मिळवल्याचे मेसेज व्हॉट्सअॅपवरून फिरत होते. फेसबुकसह अन्य साइट्सवरही याबद्दल चर्चा सुरू होती. महिला महापौर असताना दारु दुकानदारांना पूरक निर्णय कसा होऊ शकतो असा खोचक सवालही अनेकांनी विचारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारुबंदीचा निर्णय आयुक्तांच्या कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते हस्तांतरणाबाबत मंगळवारी प्रचंड गदारोळात संमत करण्यात आलेला ठराव आता आयुक्तांच्या कोर्टात गेला आहे. या संदर्भात वकिलांचा अभिप्राय आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व बाबी तपासून मगच निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्त अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रस्ते हस्तांतरणाचा फैसला सर्वस्वी आयुक्तांकडेच असेल.

दरम्यान भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन आयुक्तांच्या पातळीवरच ठराव रद्द करावा, या मागणीसह ठराव रद्द झाला नाही तर कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनही कायदेशीर अभ्यास करुन ठरावाबाबत निर्णय घेणार असल्यामुळे ठराव मंजूर झाला तरी अंमलबजावणीसाठी अडथळयांची शर्यत पार करावी लागणार आहे.

आयुक्त अभिजित चौधरी यांनी रस्ता हस्तांतरणाचा ठराव अद्याप आपल्यापर्यंत आला नाही. तो सरकारकडे पाठविता येतो का? तसेच सदस्य ठरावाच्या प्रक्रियेबाबत कायदेशीर बाबी तपासली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान बुधवारी सायंकाळी भाजप, ताराराणी आघाडीच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन सत्ताधारी मंडळींनी रस्ते हस्तांतरणाचा ठराव चुकीच्या पध्दतीने मंजूर केला आहे. राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग हे बांधकाम विभागाच्या मालकीचे आहेत. दुसऱ्यांच्या मालकीचे रस्ते ताब्यात घेऊन महापालिकेला काय फायदा? उद्या ही मंडळी बहुमताच्या बळावर महापालिका विकायला काढतील, जिल्हाधिकारी कार्यालय ताब्यात घ्या, असा ठराव करतील ते कायद्याला धरुन होईल का? तेव्हा आयुक्तांनी त्यांच्या पातळीवरच रस्ता हस्तांतरणाचा ठराव रद्द (विखंडीत) करावा. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या ठरावाच्या विरोधात कोर्टातही जाऊ, असा इशारा नगरसेवक सुनील कदम, विजय सुर्यवंशी, सत्यजित कदम यांनी दिला.

शिष्टमंडळात​ विरोधी पक्षनेते किरण शिराळे, शेखर कुसाळे, ईश्वर परमार, आशिष ढवळे, आशिष ढवळे, सचिन मोहिते, अमित गुरव आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोलची चढ्या दरानेच विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील काही पेट्रोल आणि डिझेल पंपावर ‘मापात पाप’ केले जात आहे. त्याशिवाय आता दररोज बदलणाऱ्या दरानुसार विक्री केली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी प्रति लिटर २० ते ६० पैशांपर्यंत झाले. मात्र, काही पंपांवर या दराऐवजी आधीच्याच दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. याऊलट जिल्हा पुरवठा अधिकारी, वैधमापन शास्त्र विभाग आणि कंपन्याचे अधिकारी यांच्या नुसत्या बैठकाच सुरू आहेत.

दरम्यान, ठाणे आणि परिसरात पंप मशिनमधील ‘पल्सर’, कंट्रोल कार्ड, की पॅड तसेच सॉफ्टवेअरमध्येही टेंम्परिंग (फेरफार) करून पेट्रोल-डिझेलची चोरीचा प्रकार उघडकीस आला. राज्यात चार हजार पंपांवर ग्राहकांची फसवणूक होत असल्याची शक्यता गुन्हा अन्वेषण विभागाने व्यक्त केली आहे. कोल्हापुरातही अशा पद्धतीने ग्राहकांची फसवणूक केली गेली असल्याची चर्चा आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सुस्तच आहे.

ठाणे आणि परिसरात पेट्रोलपंप मालकांनी टेक्नॉलॉजी वापरत ग्राहकांची फसवणूक केल्याचे गुन्हे शाखेच्या चौकशीत निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातही काही पंपांवर पेट्रोल आणि डिझेलमध्ये मापात ‘पाप’ होत असल्याच्या तक्रारी आहेत. पेट्रोल टाकणाऱ्या डिस्पेन्सरमध्ये चिप बसविली जाणे, टाकीत पेट्रोल पडायचे थांबल्यावरही मीटर रिंडिग सुरू राहणे असे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे.

काही ठराविक पंपांवर ठराविक किंमतीचे पेट्रोल, नोझलमधील हातचलाखी, सुट्या पैशांचा वाद, ग्राहकांचे लक्ष नसताना मीटरची गती वाढविणे, स्टॅम्पिंगसाठी टाळाटाळ असे प्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. शंभर रुपयांचे पेट्रोल घेतल्यास प्रत्येक पंपावर रिंडीग वेगवेगळे दाखविले जाते. अनेकदा दर कमी झाला असल्यास, दर बदलाच्या दुसऱ्या दिवशीही जुन्या दरानेच पेट्रोल-डिझेल विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. सातत्याने नोझल दाबणे, रिंडिग झिरो न करणे अशा प्रकारांसह फिक्स किंमतीचे पेट्रोल भरा असा आग्रह पंपांवर कर्मचारी करतात असे ग्राहकांचे म्हणणे आहे.

पंपांवर कॅलिब्रेशनमध्ये बनवेगिरी करून ग्राहकांची लुबाडणूक केली जाते. त्यामुळे पथकाने ऑन दि स्पॉट पंपावर कारवाई करणे गरजेचे आहे. लेखी तक्रारीसाठीही ग्राहकांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध हवेत.

- संजय हुकिरे, सदस्य, ग्राहक संरक्षक परिषद

दररोज सकाळी सहा वाजता नव्या दराचा बदल केला जातो. काही ठिकाणी मॅन्युअल यंत्रणा आहे. तेथे पंपचालक सकाळी दर बदलतात. बदललेल्या दरांची माहिती पेट्रोल पंपांच्या फलकावर दिली जाते. टोल फ्री क्रमांकही उपलब्ध आहेत.

- गजकुमार माणगावे, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images