Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

खुपिरे, साबळेवाडीसहशिंदेवाडीत कडकडीत बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा , कुडित्रे

एक जूनपासून सुरू झालेल्या शेतकरी संपाची धग बुधवारी सातव्या दिवसीही कायम राहिली. विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातही याची तीव्रता वाढत आहे. शेतीप्रधान व सधन अशा कोल्हापूर जिल्ह्यातही ही संपाची व्याप्ती वाढत आहे. बुधवारी पश्चिम करवीरमधील कुडित्रे पाठोपाठ खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी या गावांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.

संपाच्या पहिल्या दिवसापासून थोड्याफार प्रमाणात सहभागी झालेला शेतकरी बुधवारी पूर्ण ताकदीने संपात सहभागी झाला. सुरूवातीच्या दिवसात फक्त दुध संकलन बंद ठेवून या परिसरातील शेतकरी संपात सहभागी होते.पाच जुनच्या महाराष्ट्र बंद नंतर बुधवारी तीच लाट कायम दिसली. मंगळवारी या परिसरामध्ये ग्रामपंचायतीने दवंडी देवून संपात सहभागी होण्यासाठी बंद पाळण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत सकाळपासून ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सर्व व्यवहार बंद ठेवले. या परिसरात जवळपास दैनंदिन १० हजार लिटर दुध संकलन होते. पण बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व दुध संस्थांनी संकलन पूर्णपणे बंद ठेवले. गावातून कोणत्याही प्रकारचा शेतीमाल बुधवारी शहराकडे गेला नाही. गावातील सर्व दुकाने, सहकारी संस्था, बॅंका व अन्य सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली. .

सकाळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतजवळ जमून गावातून पदयात्रेव्दारे लोकांना आवाहन केले. यावेळी ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो, कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतीला हमीभाव मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या पदयात्रेचे नंतर सभेत रूपांतर झाले. सभेत शेतकरी संघटनेचे पांडूरंग शिंदे, ज्ञानदेव पाटील तसेच के. डी. पाटील, संजय पाटील, शिवाजी पाटील यांनी आपली मते व्यक्त केली. यावेळी सरपंच प्रकाश चैगले, साबळेवाडी सरपंच तानाजी पाटील, कुंभी संचालक संजय पाटील, माजी संचालक तुकाराम पाटील, माजी चेअरमन सर्जेराव पाटील, बजरंग जांभळे, प्रविण पाटील, संजय पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकमंत्र्यांच्या वाढदिनी खतांच्या रुपातील शुभेच्छा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा यंदाचा वाढदिवस हा अन्नदाता शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त नागरिकांनी वस्तू, पुष्पगुच्छाच्या माध्यमातून शुभेच्छा न देता खते भेट द्यावीत. खतांच्या रुपातील या शुभेच्छा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत, असे आवाहन वाढदिवस गौरव समितीच्यावतीने करण्यात आले आहे. मंत्री पाटील यांचा १० जून रोजी वाढदिवस आहे.

पालकमंत्री पाटील यांनी यापूर्वी आपला वाढदिवस सामाजिक बांधलिकीचे उपक्रम राबवत साजरा केला. रद्दीच्या स्वरुपात शुभेच्छा स्वीकारून ती रद्दी आणि आपल्याकडील काही मदत देऊन त्यांनी विविध सामाजिक संस्थांना मदतीचा हात दिला. दिनकर कांबळे यांसारख्या समाजसेवकांना मदत केली. शहरातील वाढते प्रदूषण आणि तापमानवाढ रोखण्यासाठी झाडे लावण्याची गरज लक्षात घेऊन रोपांच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारल्या. सुमारे ३५ हजार रोपे शुभेच्छांच्या स्वरूपात आली. ही रोपे केएसबीसीच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी लावून शहराचे सौदर्य खुलवले. पर्यावरण रक्षणाचा संदेशही यातून दिला.

यंदाचा वाढदिवस बळीराजाला हातभार देण्यासाठी म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यातील बळीराजाची पीकपद्धती ध्यानात घेवून खताची मात्रा नत्र स्वरूपात देण्याचा मानस आहे. त्यासाठी इफको किंवा कृपको या नामांकित कंपनीच्या युरीया या दाणेदार खतांचे नियोजनपूर्ण वितरण केले जाणार आहे. यासाठी १० जून रोजी सकाळी ९.३० ते ७ या वेळेत संभाजीनगर येथे खतांच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारल्या जातील असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, शुभेच्छा देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी खालील ठिकाणी खते खरेदी करवीत आणि त्याची फक्त पावती जमा करावी. कोल्हापूर शहर व परिसर आणि कागल, हातगणंगले, शिरोळ, इचलकरंजी, करवीर तालुक्यातील नागरिकांनी शाहूपुरीतील राधानगरी शेतकरी सहकारी संघ लि. सरवडे शाखेतून खते खरेदी करावीत. भुदरगड तालु्क्यातील नागरिकांनी गारगोटीत भुदरगड शेतकरी सहकारी संघ लिमिटेड, गडहिंग्लज तालुक्यातील नागरिकांनी कौलगेतील श्री भावेश्वरी ग्राहक सहकारी संस्था लि, चंदगडमधील नागरिकांनी चंदगड शेतकरी सहकारी खत विक्री संघ लि. यशवंतनगर, आजरा तालुक्यासाठी आजरा तालुका शेतकरी सहकारी संघ, गगनबावडा तालुक्यासाठी महादेव हरी शिंदे तालुका सहकारी खरेदी विक्री संघ साळवण, शाहूवाडी तालुक्यासाठी उदयगिरी शाहू तालुका खरेदी विक्री संघ बांबवडे आणि पन्हाळा तालुक्यासाठी वारणा शेतीपूरक व सहकारी प्रशिक्षण संस्था लि. वारणानगर ही खत खरेदीची केंद्रे आहेत. खते उचलून आणण्याचा त्रास होवू नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगडिया कुरिअरवर छापा, तीस लाखाचा ऐवज ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

आनेवाडी टोलनाक्यावर एसटीमधून सोने, चांदी व कॉपर इत्यादी मौल्यवान वस्तू दोन मोठ्या बॅगमधून कोल्हापूरकडे घेऊन निघालेल्या संशयित परप्रांतीय युवकाला भुर्इंज पोलिसांनी ताब्यात घेतले. सुमारे तीस लाखांच्या आसपास हा ऐवज असण्याची शक्यता भुर्इंज पोलिसांनी व्यक्त केली आहे. संबंधित तरुणाने अंगडिया कुरिअरसाठी काम करत असल्याचे सांगितले आहे.

बुधवारी पहाटे पुणे-कोल्हापूर एसटीमधून एम एच १४ बी टी ४७२९ या गाडीतून परप्रांतीय प्रवाशी दोन मोठ्या बॅग घेऊन संशयास्पदरित्या प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भुर्इंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे व हवालदार उदय शिंदे, वाहतूक पोलिस कर्मचारी प्रवीण कांबळे यांनी आनेवाडी टोलनाक्यावर संबंधित एसटीमधून संशयित प्रवाशी व दोन बॅग ताब्यात घेतल्या. भुर्इंज पोलिस ठाण्यात या तरुणाला आणून त्याची सखोल चौकशी केली असता तो वेगवेगळी उत्तरे आल्याने त्या बॅगेचा पंचनामा करण्यात आला.

या बॅगेत ३५ किलो चांदी, ३३ तोळे सोने, कॉपर व अन्य धातू यांचे पॉकिंग केलेले बॉक्स व त्यावर रकमेचा उल्लेख व संबंधित व्यापाऱ्याचे कोल्हापूर येथील नाव, मोबाइल नंबर असल्याचे दिसून आले. संशयित परप्रांतीयांचे नाव कुवर राहुल (वय २३) असे असून तो राजबहादूर, आग्रा येथील आहे. त्याने अंगाडीया कुरिअरसाठी वाहतूक करीत असल्याचे सांगितले. भुर्इंज पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेची नोंद भुर्इंज पोलिसात झालेली असून, सपोनि भरणे अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इएसआय हॉस्पिटल बंदच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कामगार राज्य विमा महामंडळाचे (इएसआय) हॉस्पिटल केंद्र सरकारच्यावतीने १ मेपासून सुरू करण्यात येईल ही केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या कामगार राज्य विमा महामंडळ समितीचे सदस्य खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेली घोषणा मुदत उलटूनही प्रत्यक्षात आलेली नाही. घोषणेतील मुदतीला महिना उलटून गेला तरी याबाबत कोणतीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे रुग्णांना हॉस्पिटलसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य सरकारच्या अनास्थेमुळे गेली २० वर्षांहून अधिक काळ हे हॉस्पिटल बंद आहे.

केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्यावतीने देशभर कामगार राज्य विमा योजना राबवली जाते. योजनेंतर्गत कामगारांना मोफत आरोग्यसेवा पुरविल्या जातात. मात्र, गेल्या २० वर्षांपासून जिल्ह्यातील हजारो कामगारांच्या पगारातून दरमहा इएसआयसाठीचा निधी कपात केला जातो. प्रत्यक्षात सुविधा दिल्या जात नाहीत.

कोल्हापुरातील कामगारांची संख्या लक्षात घेता, ताराबाई पार्कात सर्किट हाउसनजीक १५ एकर जागेत हे हॉस्पिटल बांधण्यात आले. १९९७ मध्ये यासाठी तब्बल १० कोटी रुपयांचा खर्च आले. एकूण नऊ एकर जागेवर शंभर बेडचे हॉस्पिटल उभारण्यात आले. त्यनंतर राजकीय इच्छाशक्ती आणि राज्य सरकारच्या अनास्थेमुळे तब्बल २० वर्षे हे हॉस्पिटल बंदच आहे. त्यामुळे कामगारांना मोठ्या प्रमाणात उपचारांसाठी खासगी हॉस्पिटल्सचा आधार घ्यावा लागतो. हॉस्पिटलच्या लाभासाठी कर्मचाऱ्यांकडून दरवर्षी सुमारे ३ कोटींचा निधी कपात केला जातो. त्यामुळे हे हॉस्पिटल केंद्र सरकारने तातडीने सुरू करावे अशी मागणी कामगार संघटना गेली अनेक वर्षे करीत आहेत.

याबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यानंतर पाच महिन्यांपूर्वी २३ डिसेंबर २०१६ रोजी, केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या कामगार राज्य विमा महामंडळ समितीचे सदस्य खासदार चंद्रकांत खैरे यांनी हॉस्पिटलची पाहणी केली. हे हॉस्पिटल १ मेपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची घोषणा केली. मात्र, या मुदतीला एक महिना उलटला तरीही काहीच हालचाली झालेल्या नाहीत. जिल्ह्यात सुमारे ५२ हजार कर्मचारी सदस्य आणि आणि त्यांच्या कुटुंबियांना हे हॉस्पिटल आधारवड ठरू शकेल. मात्र याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत.

पाच महिन्यांपूर्वी पाहणी

२३ डिसेंबर २०१६ रोजी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय विभागाच्या कामगार राज्य विमा महामंडळ समितीचे सदस्य खासदार चंद्रकांत खैरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हॉस्पिटलची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या इएसआय कॉर्पोरेशनच्यावतीने कोल्हापुरातील हे हॉस्पिटल चालविण्यास घेईल. १ मेपासून हॉस्पिटल सुरू करण्याची घोषणा केली. मात्र त्यानंतर याबाबत काहीही हालचाली झालेल्या नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटीला निर्भयपणे सामोरे जा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘एक जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटी कायद्याला निर्भयपणे सामोरे जा. या कायद्याच्या अंमलबजाणीत कोणालाही त्रास होणार नाही’, असे प्रतिपादन केंद्रीय अबकारी व उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूरचे अतिरिक्त आयुक्त के. के. श्रीवास्तव यांनी केले. कोल्हापूर सराफ संघ आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघातर्फे बुधवारी केशवराव भोसले नाट्यगृहात जीएसटीवर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

अतिरिक्त आयुक्त के. के. श्रीवास्तव म्हणाले, ‘सराफ व्यावसायिकांनी जीएसटीला घाबरण्याचे काहीच कारण नाही. केंद्र आणि राज्य सरकार असे दोन्ही प्रकारचे कर एकाच करातून घेतले जाणार आहेत. त्यामुळे दर महिन्याला व्यावसायिकांची कागदपत्रांच्या कटकटीतून मुक्तता होणार आहे. जीएसटीमुळे पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येणार आहे. जीएसटीच्या नोंदणीसाठी सराफ व्यावसायिकांनी बेवसाइटचा वापर करावा. व्यावसायिकांना टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिले आहेत. या ठिकाणी व्यापाऱ्यांना सर्व प्रकारच्या शंका समाधानाचे उत्तर मिळणार आहे.’

सहआयुक्त डी. पी. सिंग म्हणाले, ‘सर्व कर मिळून जीएसटी कराची निर्मिती झाली आहे. अनेक राज्यांनी ही करप्रणाली स्वीकारली आहे. केंद्र आणि राज्याला कराचा वाटा मिळणार आहे. देशातील सर्वच करदात्यांना हा कायदा फायदेशीर आहे.’

सहाय्यक आयुक्त विमलेश सिंग म्हणाले, ‘या कायद्यामुळे कोणत्याही प्रकारची कागदोपत्रांची अडचण येणार नाही. सर्व प्रकारचे व्यवहार ऑनलाइन आहेत. त्यामुळे कायद्यात पारदर्शीपणा आणि वेळेची बचत होणार आहे.’

चार्टर्ड अकाउंटंट चेतन ओसवाल म्हणाले, ‘हा कायदा आमूलाग्र बदल घडवणारा आहे. प्रत्येक व्यवसायिकाने जाणीवपूर्वक या कायद्याचा अभ्यास केला पाहिजे आणि माहिती घेतली पाहिजे.’

सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल म्हणाले, ‘पारंपरिक पद्धतीने चालणाऱ्या सराफ आणि सुवर्णकार व्यावसायिकांनी काळाची पावले ओळखून अपडेट झाले पाहिजे. अन्यथा स्पर्धेच्या युगात टिकाव लागणार नाही.’

दरम्यान चर्चासत्रात हुपरी येथील सराफ व्यावसायिकांनी चर्चासत्र आयोजित करण्याची मागणी केली. या वेळी अध्यक्ष भरत ओसवाल यांनी लवकरच मेळावा घेण्याचे आश्वासन दिले. चार्टर्ड अकाउंटंट दीपेश गुंदेशा यांनी मराठी भाषेतून स्लाइड शोच्या माध्यमातून जीएसटी विषयीच्या शंकाचे निरसन केले. यावेळी कोल्हापूर शहर सराफ व्यापारी संघाचे सचिव विजय हावळ, संचालक किरण गांधी, संजय चोडणकर, निलेश ओसवाल, अनिल पोतदार, नितीन ओसवाल, धर्मपाल जिरगे, शिवाजी पाटील, जिल्हा सराफ संघाचे उपाध्यक्ष दीपक वेर्णेकर, सहसचिव बाबूराव जाधव, संचालक राजेश राठोड, महेश जोके, सुनील मंत्री, स्वप्नील शहा, विजयकुमार भोसले, संजय पाटील, कुमार दळवी, सुहास जाधव, सुरेश पाटील, संजय माने, तुकाराम माने आदी उपस्थित होते. सचिव माणिक जैन यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरज पडल्यास उदयनराजेंना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोना अलाईज कंपनीतील अधिकारी राजकुमार जैन यांना मारहाण केल्याप्रकरणी खासदार उदयनराजे यांच्यावर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असून सर्व पुरावे तपासून वेळप्रसंगी उदयनराजे यांना अटक केली जाईल, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

याबाबत बोलताना आयजी नांगरे-पाटील म्हणाले, ‘कायदा सर्वांसाठी समान आहे. खासदार उदयनराजे यांच्याविरोधात खंडणी आणि जिवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल आहे. यातील ९ आरोपींना यापूर्वीच अटक केली असून, कोर्टाने खासदारांचा जामीन फेटाळला आहे. सातारचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. गरज पडल्यास खासदारांवर अटकेची कारवाई होईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुरगूडात बंगला फोडला, १७ तोळे लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,कागल

मुरगूडमध्ये बुधवारी दिवसाढवळ्या बंगला फोडून १७ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख अडीच लाख असा सुमारे साडेसात लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला. या घटनेने मुरगूडात खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण पसरले आहे. यशवंत गजानन भाट (सावर्डेकर कॉलनी) यांच्या मालकीचा हा बंगला आहे.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, यशवंत भाट दुचाकी मेकॅनिक आहेत. बुधवारी ते कुंटुबासमवेत चंदगड येथील कुलदैवत रवळनाथ दर्शनाला गेले होते. दुपारी बारा ते एकच्या सुमारास चोरट्यांनी बंगल्याचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. दुसऱ्या मजल्यावरील तिजोरीचे कुलूप कटावणीने उचकटून आतील सोन्याच्या अंगठ्या, चेन, दोन तोळ्याचा लप्पा, दोन साज, मंगळसूत्र, ब्रेसलेट, जुबेवेल, कानातील टॉप्स, फूल, तीन नाणी असे सुमारे १७ तोळ्याचा दागिने आणि रोख अडीच लाख असा साडेसात लाखांचा ऐवज लंपास केला.

दुपारी या बंगल्यातून दोघेजण बाहेर पडताना शेजारील महिलेने पाहिले. पण, ते भाट कुटुंबीयांशी संबंधित असावेत, असे समजून चौकशी केली नाही. काही वेळाने पुढे जाऊन पाहिल्यावर कडीकोयंडा उचकटलेला आणि दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. त्यांनी तातडीने भाट यांना या प्रकाराची माहिती दिली.

भाट कुटुंबीय परत आल्यावर चोरीचा नेमका तपशील समजला. भाट जुन्या चारचाकी गाड्या खरेदी-विक्रीचाही व्यवसाय करतात. कालच एका गाडीचा व्यवहार होऊन आलेले अडीच लाख घरी ठेवले होते, अशी माहिती भाट यांनी दिली. चोरीची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी येऊन पंचनामा केला.


स्वत:चे सोने गेले दुसऱ्याचे वाचले

भाट यांचे चुलतभाऊ लक्ष्मण भाट काही दिवसांपूर्वी पुण्याला गेले आहेत. जाताना चार तोळे सोने त्यांनी यशवंत यांच्याकडे ठेवले होते. ते तिजोरीत वरच्या कप्प्यात ठेवले होते. चोरट्यांनी तिजोरीचा खालचा कप्पा फोडला आणि हाती लागेल तो ऐवज लंपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूधदरवाढीच्या हालचाली

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : शेतकरी कर्जमाफीवरुन राज्यात असंतोषाचे वातावरण असतानाच दूध उत्पादकांना खरेदीदरात वाढ देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे साहजिकच दूध दरात वाढ होणार आहे. प्रधान सचिव प्रवीण परदेशी आणि पशुसंवर्धन व दुग्ध विभागाच्या आयुक्तांनी राज्यातील जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाच्या सहायक निबंधकांना सहकारी दूध संघाकडून माहिती मागवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दूध दरात वाढ करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुग्ध विभागाने घेतलेल्या बैठकीमुळे नजीकच्या काळात दूध खरेदी दरात वाढ होण्याचे स्पष्ट संकेत आहे.

संपूर्ण कर्जमाफी आणि स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू करण्यासाठी शेतकरी संप सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी किसान क्रांती मोर्चाच्या सुकाणू समितीबरोबर बैठक घेऊन मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले होते. २० जूनपर्यंत दूध खरेदीदरात वाढ करण्याचे जाहीर केले होते. यानंतर प्रधान सचिव परदेशी यांनी बुधवारी ‘पदुम’च्या सर्व सहायक निबंधकांची तातडीची बैठक बोलावली.

विभागावर मॅरेथॉन बैठक घेऊन सहकारी दूध संघांकडून दूध दरवाढीबाबत माहिती घेण्याच्या सूचना दिल्या. दोन्ही हंगामातील दूध पुरवठा आणि अपेक्षीत दराबाबत सर्व संघाकडून आठवड्यात सविस्तर माहिती वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सरकारी पातळीवर माहिती घेण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू झाल्याने नजीकच्या काळात दूध खरेदीदरात वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकरी संपातील सुकाणू समितीला २० जूनपर्यंत दूध खरेदी दरात वाढ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार बुधवारी सर्व सहायक निबंधकांची बैठक घेऊन सहकारी दूध संघाकडून माहिती घेण्यास सांगितल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने ‘मटा’शी बोलताना सांगितले.


ग्राहकांवर बोजा नको

दूध खरेदीदरात वाढ झाल्यानंतर विक्रीत वाढ करण्याचा अनुभव नेहमीच येत असतो. तसेच पशुखाद्यांच्या दरांतही वाढ होते. त्यामुळे झालेली दरवाढ उत्पादकांनाही मिळत नाही आणि त्याचा फटका ग्राहकांनाही बसतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर दूध खरेदीदरात वाढ झाली तरी त्याचा बोजा ग्राहकांवर बसायला नको, अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचगंगा पुन्हा प्रदुषित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदी पुन्हा प्रदुषित झाली असून रसायनयुक्त सांडपाण्यामुळे नदीचे पाणी फेसाळले आहे. याचबरोबर नदीपात्रातील मासे तसेच अन्य जलचर मृत झाले आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नदीप्रदुषणाकडे लक्ष वेधल्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले.

कोल्हापूर, इचलकरंजी येथील उद्योगांचे रसायनयुक्त सांडपाणी मिसळल्याने पंचगंगा नदीचे पाणी दूषित झाले आहे. शिरोळ तालुक्यात तेरवाड बंधाऱ्याजवळ नदीच्या पाण्यावर फेस निर्माण झाला आहे. तसेच पाण्याला हिरवट काळसर रंग आला आहे. प्रदुषणामुळे नदीपात्रातील मासे तसेच अन्य जलचर मेल्याने ते पाण्यावर तरंगत आहेत. नदीकाठी मृत माशांचा खच पडल्याने परिसरात दुर्गंधीही पसरली आहे.

दरम्यान, पंचगंगा प्रदुषणाकडे शिरढोण व हेरवाड येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाचे लक्ष वेधले. यानंतर राजेश आवटी व अविनाश कडले या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले.

कोल्हापूर व इचलकरंजी येथून दुषित पाणी सोडण्यात येते. याचा फटका शिरोळ तालुक्यात पंचगंगा काठच्या गावातील नागरिकांना बसतो. पंचगंगा प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदुषण करणाऱ्या उद्योगांवर काहीच कारवाई होत नाही. कापडावर प्रक्रिया करणाऱ्या अनेक उद्योगामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाच कार्यान्वित नाही. याकडे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष का असा नदीकाठच्या गावातील नागरिकांचा सवाल आहे. आता प्रदुषणामुळे जीवन धोक्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

..............

कोट

‘प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून दुषित पाण्याचे नमुने घेतले जातात ,मात्र पाणी तपासणीचा अहवाल दिला जात नाही. पंचगंगेचे प्रदुषण थांबवावे अन्यथा पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल.

-विश्वास बालिघाटे, कार्यकर्ता स्वाभिमानी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तोपर्यंत मला जाळू नका; शेतकऱ्याची चिठ्ठी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त | सोलापूर

शेतकरी संपामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालेलं असतानाच सोलापुरात कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यानं 'मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका', असं म्हटलं आहे. राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरू असतानाच ही घटना घडल्यानं सरकारच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.

धनाजी चंद्रकांत जाधव (४५) असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. करमाळा तालुक्यातील वीट या गावाचा रहिवासी असलेल्या जाधव यांनी शेतीसाठी सावकार आणि बँकेकडून कर्ज घेतलं होतं. ते फेडता न आल्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी बुधवारी रात्री गावातील चौकात लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशात आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. 'जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत नाहीत, तोपर्यंत माझे अंत्यसंस्कार करू नका', असं त्यात म्हटलं आहे.

संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यात सध्या शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असलेल्या या संपात जाधव देखील सहभागी झाले होते. संपाला सात दिवस होऊनही त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. मुख्यमंत्र्यांकडून कर्जमुक्तीची मागणी पूर्ण झालेली नाही. या साऱ्याला कंटाळून आणि कर्जाचं ताण येऊन जाधव यांनी स्वत:ला संपवल्याचं सांगितलं जात आहे.

पालकमंत्री करमाळ्यात

आत्महत्येमुळे वीट गावात तणावपूर्ण वातावरण असून ग्रामस्थांनी संतप्त होऊन रास्तारोको केला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत राज्याचे पालकमंत्री विजय देशमुख घटनास्थळी दाखल झाले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्र्यांची फोनवरून बातचीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची दखल घेऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांशी फोनवरून बातचीत केली. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांना तातडीने १ लाख रुपयांची मदत देण्याचं आश्वासन दिलं. याशिवाय, जाधव हे अल्पभूधाकरक असल्यानं त्यांचं कर्ज माफ करणार असल्याचंही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाल्याची अद्याप टंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या संपानंतरची परिस्थिती निवळली असली तरी अद्याप भाजीपाल्याची टंचाई मात्र कायम आहे. दूध संकलन, वितरण नियमित सुरू झाले आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व फळांची ‍आवक निम्म्याने झाल्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. दरम्यान, बुधवारी सुकाणू समितीच्यावतीने शिवाजी चौकांतील निदर्शने व खुपीरे येथे बंद पाळण्यात आला.

शेतकऱ्यांच्या संपामुळे दूध व भाजीपाला मार्केटवर परिणाम झाला होता. संपाला एक दिवस दूध संकलन बंद ठेवून पाठिंबा दिल्याने, संपाची तीव्रता वाढली होती. बुधवारीपासून मात्र संपाची तीव्रता कमी होऊन जनजीवन पूर्वपदावर आले. कोल्हापूर बाजार समितीत भाजीपाला, फळे, कांदा व बटाट्याची आवक गेल्या दोन दिवसांपेक्षा जास्त असली, तरी गेल्या आठवड्यापेक्षा ती निम्म्याने झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना जादा दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. संपाची धग ग्रामीण भागात जास्त असली तरी वारणा, स्वाभिमानी दूध संघाप्रमाणेच गोकुळने दैनंदिन दहा लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे आदी शहरांत सुमारे ३० टँकरने पुरवठा करण्यात आला. जिल्ह्यात संपाची धग कमी होऊ लागली असली, तरी गुरुवारी नाशिकमधील सुकाणू समितीच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. या बैठकीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौटुंबिक कलहात मोबाइल, हुंडा खलनायक

$
0
0

कोल्हापूर :

मोबाइलमुळे व्यक्ती जवळ आणल्या. मात्र जवळच्या व्यक्ती दुरावण्यासही मोबाइलच कारणीभूत ठरत आहे. कौटुंबिक कलहांमध्ये मोबाइल खलनायक ठरत असून, पोलिस ठाण्यांत येणाऱ्या तक्रारींमध्ये ३० टक्के तक्रारी मोबाइलच्या कारणावरून दाखल झाल्या आहेत. पती-पत्नीसह कुटुंबामध्ये मोबाइलने दरी वाढत आहे. शिवाय कौटुंबिक कलहात हुंड्याचे कारणही कायम आहे.

तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरामुळे तोटेही सोसावे लागत आहेत. जिल्ह्यात दरवर्षी कौटुंबिक कलहाच्या सुमारे ७०० तक्रारी दाखल होतात. यात सर्वाधिक ३० टक्के तक्रारी मोबाइलवरून निर्माण होणाऱ्या गैरसमजातून दाखल झाल्या आहेत. लग्नानंतर काही महिन्यातच पत्नीकडून मोबाइलचा अतिवापर होत असल्याच्या तक्रारी सुरू होतात. पतीच्या मोबाइलला लॉक असल्याने संशय वाढतो. कॉल लॉगमधील काही नंबरवरून एकमेकांत कुरबुरी होतात. पत्नी मोबाइलवरून वारंवार माहेरच्या लोकांशी बोलते, हे कारणही वादाचे ठरत आहे.

मोबाइलवरील मेसेज हेही पती-पत्नीत वाद निर्माण करतात. मोबाइलमुळे एकदा निर्माण झालेला संशय कमी होण्याऐवजी बळावतच जातो. वेळीच पती-पत्नी एकत्रित बसून गैरसमजांवर बोलत नाहीत. आपलेच कसे खरे आहे ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे दरी वाढतच जाते. अनेकदा एकमेकांचे मोबाइल जाणीवपूर्वक तपासले जातात. शंकास्पद नंबरचे कॉल ड्युरेशन, सेव्ह केलेले नाव यावरही परस्परांची नजर असते. मोबाइलवरील रेकॉर्डर सुरू ठेवून संशयास्पद संभाषण पुरावा म्हणून पोलिसांकडे दिले जाते. घरांमधील वाद पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हुंडा हे पारंपरिक कारण आजही वरच्या क्रमांकावर आहे. शिवाय व्यसनांमुळे बहुतांश घरांमध्ये वाद होतात. अनैतिक संबंध हे कारण स्त्री आणि पुरुषांकडूनही मान्यच केले जात नाही. अगदीच अपवादात्मक प्रसंगी हे कारण मान्य केले जाते. मात्र एकूण तक्रारींपैकी सुमारे १० टक्के तक्रारींमध्ये अनैतिक संबंधांचे कारण आहे. आजही मूल होत नसल्याने पती-पत्नी एकमेकांपासून काडीमोड घेण्यासाठी पोलिस ठाण्यात आणि कोर्टात जातात, ही वस्तुस्थिती आहे. यातील मोबाइलचे कारण बदलत्या पिढीसाठी धोकादायक असून, वेळीच याबाबत जागरुकता न झल्यास मोबाइलमुळे कुटुंबांसह सामाजिक स्वास्थ्यही धोक्यात येणार हे नक्की.


वाढत्या एकटेपणामुळे मोबाइलचा मनोरंजनासाठी वापर वाढला आहे. विशेषतः महिला मोबाइल अॅडिक्ट होत आहेत. मोबाइलचा अतिवापर टाळून घरातील व्यक्तींशी संवाद वाढल्यास एकमेकांवरील विश्वास वाढेल. यातून मोबाइलमुळे होणारे वाद कमी होतील.
- कालिदास पाटील, मानसोपचार तज्ज्ञ

अलिकडे मोबाइल घरांमधील वादांचे कारण ठरत आहे. एकमेकांमधील विश्वास कमी होत असल्याने अशा घटना वाढत आहेत. याबाबत वेळीच जागृती न झाल्यास सोयीसाठी घेतलेले मोबाइल गैरसोयीचे ठरण्याची शक्यता आहे.
- आरती नांद्रेकर,
सहायक पोलिस निरीक्षक, महिला सहायता कक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८० मटका बुकी होणार हद्दपार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर परिक्षेत्रात मटका आणि जुगार अड्डे चालवणाऱ्या १८० मटकाबुकींवर हद्दपारीचे प्रस्ताव आयजी नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवले होते. या प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून, कोणत्याही क्षणी मटका बुकींवर हद्दपारीची कारवाई होणार आहे. कोल्हापुरातील मटका किंग विजय पाटील याच्यासह इचलकरंजीतील टोळ्यांचा यात समावेश आहे. मटका बंद करण्यासाठी सुरू असलेली ही गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठी कारवाई ठरणार आहे.

कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण या कार्यक्षेत्रात वाढलेला मटका आणि जुगार अड्डे बंद करण्यासाठी मटका बुकींवर कडक कारवाई करण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले होते. वारंवार या गुन्ह्यात सापडणाऱ्यांवर हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मिळाल्याने परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षकांनी मटका बुकींवर कारवाईला सुरुवात केली होती. यात शहरातील मटकाकिंग विजय पाटील याच्यासह ५० हून अधिक नामचिन मटका बुकींचा समावेश आहे. सर्व जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांनी संबंधित मटका बुकींवर गुन्हे दाखल करून त्यांना म्हणणे मांडण्याचीही संधी दिली, मात्र बहुतांश मटका बुकींकडून समाधानकारक खुलासा मिळालेला नाही, त्यामुळे अधीक्षकांनी संबंधित मटका बुकींवर हद्दपारीच्या कारवाईचे प्रस्ताव आयजी नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवले होते. नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील ३० टोळ्यांमधील १८० मटका बुकींवरील हद्दपारीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. या मंजुरीमुळे १३० मटका बुकींवर कोणत्याही क्षणी कारवाई होणार आहे.

आयजींची मंजुरी मिळाल्याने हे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी संबंधित जिल्ह्यांमधील पोलिस अधीक्षकांकडे पाठवले आहेत. काही तांत्रिक बाबींची पूर्तता होताच मटका बुकींवर कारवाई होणार आहे. ‘या कारवाईमुळे परिक्षेत्रातील मटका आणि जुगार अड्डे बंद होण्यासह कायदा सुव्यवस्था राखण्यातही मदत होईल. याशिवाय अवैध व्यवसाय आणि धंदे सुरू ठेवणाऱ्यांवरही वचक निर्माण होईल. गेल्या दहा वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई ठरेल’, असा नांगरे-पाटील यांनी व्यक्त केला.


चोरट्यांची टोळी जेरबंद

गेल्या महिनाभरात शहरासह जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. यातील काही चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून सुमारे ४० चोऱ्यांची कबुली मिळाली आहे. या टोळीतील अन्य चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. सराईत टोळीकडून मोठ्या संखेने चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीर्थक्षेत्र आराखड्यावर आज शिक्कामोर्तब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरवासियांच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या ६८ कोटी रुपयांच्या अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंतिम मंजुरीसाठी शुक्रवारी (९ जून) मुंबईत राज्याचे प्रधान सचिव तसेच उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सादरीकरण केले जाणार आहे. या सादरीकरणामुळे मंजुरीचे सर्व टप्पे पूर्ण होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्यावतीने केवळ अध्यादेश काढण्याची औपचारिकता राहणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्व कोल्हापूरवासियांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या आराखड्याचे गुरुवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोरही सादरीकरण करण्यात आले.

आयुक्त डॉ. अभिजित चौधरी हे स्वतः मुंबईतील बैठकीमध्ये आराखड्याचे सादरीकरण करणार आहेत. आयुक्तांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुभेदार यांच्यासमोर आराखड्याचे सादरीकरण केले. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची आठ वर्षाहून अधिक काळापासून तयारी केली जात आहे. लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून आलेल्या विविध सुचनांनुसार या आराखड्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रधान सचिव व उच्चाधिकार समितीसमोर सादर करण्यात येणाऱ्या आराखड्यामध्ये ६८ कोटी रुपयांची विविध कामे सुचवण्यात आली आहेत. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत सादरीकरणानंतरही काही बाबी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुचवल्या जाऊ शकतात. त्या सूचनांचा अंतर्भाव करुन हा अंतिम आराखडा मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. त्यामुळे या बैठकीत काही सूचना न झाल्यास मुख्यमंत्र्यांकडून हा आराखडा मंजूर होण्याची केवळ औपचारिकता राहणार आहे.

आराखड्यामध्ये मंदिर आवारातील कोणत्याही कामाचा समावेश नाही. मंदिर आवार सोडून शहरात राबवण्यात येणाऱ्या कामांचा या आराखड्यात समावेश असून त्यामध्येही पर्यटक, शहरवासियांची सोय करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या कामांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे.अंबाबाई मंदिर परिसरातील दर्शन मंडप, व्हीनस कॉर्नर येथील बहुमजली पार्किंग व भक्तनिवास, सरस्वती टॉकीज परिसरातील पार्किंग, युटिलिटी शिफ्टिंग, दिशादर्शक ही कामे प्राधान्याने घेण्यात येणार असून त्यानंतर बिंदू चौकातील पार्किंग, बिंदू चौक ते भवानी मंडपापर्यंतचा पादचारी मार्ग, अग्निशमन यंत्रणा, सुशोभीकरण, आरोग्याच्या सुविधा, कचरा संकलन अशी कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. पार्किंग तसेच पर्यटकांच्या निवास व्यवस्थेची कामे हा आराखड्याचा मुख्य भाग आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता पो‌लिसांचा शोध घेण्याचे आदेश

$
0
0

सांगली : वारणानगरमधील कोट्यवधींच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असलेल्या निलंबित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याची जबाबदारी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेवर सोपविण्यात आली आहे. तसे आदेश राज्य गुन्हे अन्वेषण ( सीआयडी) विभागाने सांगली पोलिसांना दिले असल्याचे गुरुवारी सांगण्यात आले. संबंधित संशयित पोलिस अधिकारी, कर्मचारी दोन महिन्यांहून अधिक काळ बेपत्ता आहेत.
सांगली पोलिस दलाकडील तत्कालीन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एका वर्षापूर्वी बेथेलहेमनगर ( मिरज) येथे सुमारे तीन कोटी रुपयांची रोकड पकडण्याची कारवाई केली होती. ही कारवाई करताना चोरटा मैनुद्दिन मुल्लाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या मदतीने पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सुरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे आदींनी पुन्हा वारणानगरमधील शिक्षक कॉलनीत जाऊन कोट्यवधींची रोकड चोरली. पहिल्यांदा ६ कोटी रुपये आणि दुसऱ्यावेळी ३ कोटी १८ लाख अशी एकूण ९ कोटी १८ लाख रुपयांची रोकड चोरल्याचा गुन्हा संबधितांच्या विरोधात कोडोली पोलिसात दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत सुरु आहे. सर्वच संशयीतांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धडपड केली. पण त्यांना जामीन मिळू शकला नाही. त्यानंतर सीआयडीच्या पथकाने त्या सहाही जणांचा शोध घेतला. परंतु अद्यापही ते सापडलेले नाहीत. त्यामुळे आता त्या सातही संशयीतांना शोधून काढण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला देण्यात आले आहे. पोलिस निरिक्षक बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक तयार करुन संबधितांचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांची केएमटीवरच भिस्त

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com
Tweet:@anuradhakadamMT

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वडापचा वाढता विळखा, महाविद्यालयीन तरुणाईत असलेली दुचाकीची क्रेझ, इंग्रजी माध्यमांच्या शाळांची स्वतंत्र बस सुविधा, रिक्षा-व्हॅन सेवा यामुळे केएमटी बस तोट्यात असल्याचे चित्र आहे. मात्र तोट्यात असलेल्या केएमटीला ऊर्जितावस्था देण्याचे काम विद्यार्थी पास सुविधेने केले आहे. शहरालगतचा ग्रामीण भाग व उपनगरांतून शाळा, कॉलेजसाठी दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक पास योजनेमुळे केएमटीच्या खात्यात वर्षभरात एक कोटी ७० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

दरवर्षी जून महिन्याच्या सुरूवातीला विद्यार्थी पास काढण्यासाठी केएमटीच्या पास वितरण केंद्रावर गर्दी होते. यावर्षीही पुढील आठवड्यापासून पास सुविधा केंद्र गजबजतील. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोजच्या प्रवासासाठी केएमटीतर्फे मासिक पास दिला जातो. यात पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केएमटीच्या अखत्यारितील कोणत्याही ठिकाणावरून दररोज ये-जा करण्यासाठी १५५ रुपयांचा मासिक पास उपलब्ध आहे. तर सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी याच योजनेंतर्गत पासची किंमत दरमहा २१० रुपये आहे. बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना महिन्याच्या तिकीट दरामध्ये ५० टक्क्यांची सवलत आहे. या सुविधेचा लाभ जिल्ह्यातील हजारो शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी घेत आहेत.

शहरातील स. म. लोहिया हायस्कूल, पद्माराजे हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, उषाराजे हायस्कूल, मेन राजाराम हायस्कूल, नूतन मराठी या शाळेत उपनगरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. काही विद्यार्थी शहरापासून दहा ते पंधरा किलोमीटरवरील ग्रामीण भागातूनही शाळेसाठी कोल्हापुरात येतात. केएमसी कॉलेज, महावीर कॉलेज, शहाजी कॉलेज, न्यू कॉलेज, कमला कॉलेज येथे बसने प्रवास करून येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विशेषत: ग्रामीण भागातून शहरातील कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थिनी केएमटी बसलाच प्राधान्य देतात. रोजच्या तिकीटाऐवजी महिन्याचा पास काढण्याकडे त्यांचा कल असतो. याचा परिणाम केएमटीला दरमहा पास सुविधा यंत्रणेमुळे चांगले उत्पन्न मिळते.

सुविधांमध्ये वाढ

शहरात महाराणा प्रताप चौक आणि गंगावेश येथे पास सुविधा केंद्र आहे. १५ जून ते १५ जुलै या कालावधीचा पास घेण्यापासून शैक्षणिक वर्षातील प्रक्रियेला दरवर्षी सुरूवात होते. त्यामुळे दर महिन्याच्या वि​शिष्ट दिवशी पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी पास केंद्राची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ अशी करण्यात आली आहे. एकावेळी महिन्याचा पास देण्यापेक्षा सहा महिन्यांचे सहा पास एकाच वेळी काढण्याची सुविधाही आहे. त्यामुळे पास काढण्यासाठी दर महिन्याला पालकांना किंवा विद्यार्थ्यांना यावे लागत नसल्याने वेळेची बचत होते.


इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि शहरापासून लांब पल्ल्याच्या अंतरावरील व्यावसायिक अभ्यासक्रम ​शिकवणारी महाविद्यालये वगळल्यास शाळांसाठी खाजगी रिक्षा, व्हॅनसह केएमटी तर कॉलेजसाठी केएमटी हा एकमेव पर्याय आहे. शाळा आणि कॉलेजच्या वेळा लक्षात घेऊन केएमटीच्या फेऱ्या सुरू करण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचणे सुलभ होते. मुलींसाठी केएमटी हा सुरक्षित प्रवासाचा पर्याय असल्याचे पालकांचे म्हणणे असते. त्यामुळे बसची पास सुविधा उपयुक्त ठरत आहे.

संजय इनामदार
जनसंपर्क अधिकारी, केएमटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ निवडणुकीत नवी समीकरणे

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com
Tweet :@Appasaheb_MT

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा आणि विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकीत यंदा नवी समीकरणे पाहावयास मिळणार आहेत. सिनेटवर वर्चस्व मिळवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भारतीय जनता पक्षाचे नेते पडद्याआडून सूत्रे हलवतील. नोंदणीकृत पदवीधरांमध्ये मुसंडी मारण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तयारीला लागली आहे. दुसरीकडे विद्यापीठीय निवडणुकीत आपला वरचष्मा कायम ठेवण्यासाठी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी प्रयत्नशील आहे. राज्यातील सत्ताबदलाचा प्रभाव या निवडणुकीवर आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीतील ‘दोस्त’ आता एकमेकांविरोधात उभे राहतील अशी स्थिती आहे. जिल्ह्यातील शिक्षणसंस्था आणि अभिमत विद्यापीठांशी निगडीत आमदार, शिक्षणसम्राट, कारखानदार यासाठी सक्रीय झाले आहेत.

जुलै महिन्यात सिनेटच्या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. सिनेटसह विविध अधिकार मंडळांची निवडणूक प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल असे विद्यापीठ प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू आहे. निवडणूक तयारीचा एक भाग म्हणून प्रशासनाने अधिसभेवर पदवीधर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. पहिल्यांदा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने नावनोंदणी (ता. २५ जून) व त्यानंतर आवश्यक कागदपत्रासह अर्जाची एक प्रत २७ जूनपर्यंत विद्यापीठाकडे सादर करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तिन्ही जिल्ह्यांतील मतदान केंद्राची यादीही प्रसिध्द केली आहे.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हा हे शिवाजी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. सिनेट आणि व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अभ्यास मंडळ या अधिकार मंडळासाठी दर पाच वर्षांनी निवडणूक होते. सिनेटमध्ये पदवीधर, कॉलेज प्राध्यापक, पदव्युत्तर प्राध्यापक, संस्थाचालक अशा गटातून उमेदवार निवडले जाणार आहेत. राज्यातील सत्ताबदल, स्थानिक राजकारणाचे संदर्भ आणि उच्च शैक्षणिक क्षेत्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळींनी विणलेले शैक्षणिक जाळे या साऱ्या घटकांचा प्रभाव निवडणुकीवर असणार आहे. नोंदणीकृत पदवीधरच्या दहा जागेसाठी अभाविपने जोरदार तयारी केली आहे. यावेळी अभाविपने इतर घटकांना सोबतीला घेऊन ताकत दाखविण्याच्या विचारात आहे. याकरिता त्यांनी गेल्या काही महिन्यापासून जिल्हा निहाय पदवीधर नोंदणीची मोहिम उघडली आहे.

गेल्या निवडणुकीत शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकत्र होते. तर त्यांच्या विरोधात शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा), विवेकानंद शिक्षण संस्था आणि रयत अशी आघाडी झाली होती. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पाठबळ व संस्थाचालकांचा सहभाग असणाऱ्या शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीनेही तयारी केली असून यावेळी विवेकानंद व रयत शिक्षण संस्था आपल्या सोबत राहावे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे. तीनही जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर कार्य करणाऱ्या शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघही सिनेट व अधिकार मंडळाच्या निवडणुका ताकतीने लढविणार आहे. यंदा सुटा, विवेकानंद व रयत अशी आघाडी कायम राहते की या दोन्ही शिक्षण संस्था नवीन दोस्ताना करतात यावर निवडणुकीची ग​णिते अवलंबून राहणार आहेत. अद्याप कुठल्याच संघटनांनी भूमिका स्पष्ट केली नाही. निवडणुकीची अधिसूचना निघाल्यानंतर घडामोडी वेगावणार आहेत.

सद्यस्थितीत वर्चस्व कोणाचे ?

सिनेट, व्यवस्थापन परिषद - शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी व अभाविप वर्चस्व

विद्या परिषद आणि अभ्यास मंडळ - सुटा, विवेकानंद व रयत शिक्षण संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली, इचलकरंजी मार्ग सर्वांत धोकादायक

$
0
0

Raviraj.gaikwad@timesgroup.com

Twitter - @rg_ravirajMT

प्रचंड गाजावाजा करून उभारण्यात आलेल्या कोल्हापूर-सांगली चौपदरी महामार्गावर आजही वाहतुकीसाठी धोकादायक आहे. या मार्गावर लहान-मोठा अपघात होऊ शकतो अशी दहा ठिकाणे आहेत. तसेच याच मार्गावर कोल्हापूर-इचलकरंजी वाहतूक होत असल्याने तेथेही अपघात होण्याची सर्वांत जास्त ठिकाणे असल्याचे एसटी महामंडळाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. या दोन्ही मार्गांवर मिळून जवळपास वीस अपघातांचे स्पॉट्स असून, त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात महामार्गावर एखादा अपघात नित्याची बाब झाली आहे. तो टाळण्यासाठी आता एसटी महामंडळानेच पावले उचलायला सुरुवात केली आहे. महामंडळाच्या चालकांनीच फेऱ्यांदरम्यान धोकादायक अवघड वाटत असलेल्या वळणांचे किंवा किरकोळ उपाययोजना गरजेच्या असलेले स्पॉट नोंदविले आहेत. त्याचा एक अहवाल तयार करण्यात आला असून, तो जिल्हा प्रशासन, प्रादेशिक वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. अहवालातील स्पॉट्सवर काही ठिकाणी मोऱ्यांची उंची वाढविणे गरजेचे आहे, काही ठिकाणी दिशादर्शक किंवा धोक्याचे फलक तर काही ठिकाणी स्पीड ब्रेकर करणे गरजेचे असल्याचे अहवालात म्हटले आहे. याची जबाबदारी त्या त्या विभागांच्या देखभाल खात्याची असून, यातील काही किरकोळ उपाययोजना केल्या तरी मोठा धोका टाळता येण्यासारखा आहे.

अहवालानुसार जिल्ह्यात ४० हून अधिक धोकादायक ठिकाणे आहेत. त्यातील जवळपास वीस ठिकाणे कोल्हापूर-सांगली आणि त्या मार्गावरून उजवीकडे वळणाऱ्या कोल्हापूर-इचलकरंजी मार्गावर आहेत. कोल्हापूर-सांगली मार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना या मार्गावर अपघातांची संख्या वाढली होती. अजूनही या चौपदरीकरणाचे काम अपुरे आहे. काही ठिकाणी पूल बांधणीचे काम संथ गतीने सुरू आहे, तर काही ठिकाणी काम अर्ध्यावरच बंद ठेवल्याचे दिसते. त्यामुळे हा महामार्गच धोकादायक बनल्याचे दिसत आहे. संबंधित विभाग याकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अहवालातील महत्त्वाचे धोकादायक स्पॉट

कोल्हापूर-इलकरंजी – हालोंडी, माले फाटा, माले फाटा पूल, रुई फाटा, तिळवणी फाटा, यड्राव फाटा, हेर्ले माळभाग, अतिग्रे, चोकाक गाव

कोल्हापूर-सांगली – हालोंडी, हेर्ले माळभाग, हेर्ले गाव, माले फाटा, कोंडिग्रे फाटा, निमशिरगाव फाटा, चिपरी फाटा, जयसिंगपूर दीपनगर चौक, खोत पेट्रोलपंप, रुकडी फाटा

कागल-इचलकरंजी – मुलाणवाडी

कोल्हापूर-कागल – काणेरीवाडी फाटा

कोल्हापूर-जोतिबा – केर्ले गाव, केर्ली ते रजपूतवाडी, जोतिबा डोंगर

कोल्हापूर-रत्नागिरी – निळेगाव, करंजोशी, मसोबा डेकडीजवळील मोरी

कोल्हापूर-बांदा – फोंडा घाटातील शेवटचे वळण

राधानगरी-निपाणी – मांजरखिंड

लिंगनूर-गडहिंग्लज – शिंदेवाडी

कवळीकट्टी-गडहिंग्लज – दड्डीक्रॉस

गारगोटी-कोल्हापूर – कावणे

कारीवडे-गारगोटी – आकुर्डे फाटा

कोल्हापूर-पुणे – वाठार उड्डाणपुलाजवळील बायपास कोपरा

कोल्हापूर-बांबवडे – पडळवाडीफाटा


एसटीच्या चालकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातांच्या ठिकाणांचा अहवाल करून प्रादेशिक परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम आणि महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या सर्व ठिकाणांवर उपाययोजनांची अपेक्षा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्ह्याच्या वाहतूक आराखडा बैठकीतही या विषयावर चर्चा झाली आहे.

- डी. बी. कदम, विभागीय वाहतूक अधीक्षक, एसटी महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांगल्या सिनेमांना प्रोत्साहन हवे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘राष्ट्रीय पुरस्काराची मोहर ज्या सिनेमांवर उमटते, त्या सिनेमांची खूप चर्चा होते. हे सिनेमे महोत्सवात प्रेक्षकांची पसंती मिळवतात. मात्र ते चित्रपटगृहांपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात अनेक अडथळे येतात. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सिनेमा आणि प्रेक्षक यांच्यातील ही दरी मिटवण्यासाठी ​सिनेमा चळवळीतील संस्थाच्या पुढाकाराने प्रदर्शित केले पाहिजेत. तसेच हे सिनेमे पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी तिकिट काढावे. ‘कासव’च्या बाबतीतही हा सिनेमा आवडला तरच तिकिटाचे पैसे संयोजकांकडे द्यावेत’ असे आवाहन सिनेमाचे दिग्दर्शन सुनील सुकथनकर यांनी केले.

कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी आणि दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्यावतीने राम गणेश गडकरी सभागृहात दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या ' कासव ' या सिनेमाला राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळाल्याबद्दल विनोदकुमार लोहिया यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. यावेळी सुकथनकर यांनी पुरस्कारप्राप्त सिनेमा चित्रपटगृहात प्रद​र्शित होण्याचा प्रवास, त्यातील अडथळे याविषयी भाष्य केले.

सुनील सुकथनकर म्हणाले, ‘मराठी चित्रपट महिलांना रडवणारे आणि पुरुषांना हसवणारे असतात अशी व्याख्या केली जात होती. आजही काही प्रमाणात कौटुंबिक सिनेमांचा प्रेक्षक महिला तर कॉमेडी, अॅक्शन अशा सिनेमांचा प्रेक्षक पुरूष किंवा तरूणाई अशी वर्गवारी केली जाते. सिनेमांकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी वेगळा विषय, वेगळा आशय आणि वेगळी मांडणी या त्रिसूत्रीवर मराठी सिनेमाने अधिक वेगाने काम केले तर भविष्यात सिनेमा हा सर्वसमावेशक होईल.’

फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी प्रास्ताविकात म्हणाले, ‘श्यामची आई, श्वास यांनंतर बऱ्याच वर्षांनी ‘कासव’ला राष्ट्रपती पदक मिळाले. सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे या दिग्दर्शक द्वयींनी मराठी चित्रपटाचा दर्जेदारपणा टिकवला आहे. पण तरीही असे चित्रपट चित्रपटगृहात येत नाहीत किंवा त्यांना खूप प्रतीक्षा करावी लागते.’

फिल्म सोसायटीचे सचिव दिलीप बापट यांनी स्वागत केले. यावेळी दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे विनोदकुमार लोहिया, आर्किटेक्ट शिरीष बेरी, प्रकाश गुणे, पद्माकर सप्रे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दोन स्पेशल’ अन् ‘हंडाभर चांदण्या’ नाटकांची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘दोन स्पेशल’ आणि ‘हंडाभर चांदण्या’ या दोन नाटकांच्या प्रयोगाची पर्वणी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कोल्हापुरातील ‘कल्चर क्लब’ सदस्यांना मिळणार आहे. १६ जून रोजी ‘हंडाभर चांदण्या’ तर १७ जून रोजी ‘दोन स्पेशल’ या नाटकाचा प्रयोग संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रात्री साडेनऊ वाजता होणार आहे.

‘हंडाभर चांदण्या’ या नाटकात पाण्याचा अत्यंत भीषण प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. पाण्याच्या टँकरची डोळ्यात प्राण आणून वाट पाहण्यासाठी माळावर जमलेल्या छोट्याशा दुष्काळी गावातील विलक्षण कथा त्यात आहे. लोकसंगीताच्या प्रभावी माध्यमातून सद्यस्थितीवर साध्या जगण्यातून उपहासात्मक आणि टोकदार भाष्य या नाटकात आहे. दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित या नाटकात प्रमोद गायकवाड यांची प्रमुख भूमिका आहे.

जितेंद्र जोशी, गिरिजा ओक आणि रोहित हळदीकर अभिनित ‘दोन स्पेशल’ हे नाटक ह. मो. मराठे यांच्या ‘न्यूज स्टोरी’ या कथेवर आधारित आहे. माध्यमांतर करताना सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते, तशी या नाटकातही आहे. १९८९ साली पुण्याच्या ‘हिंदुस्थान’ नावाच्या दैनिकाच्या ऑफिसात घडणारी गोष्ट रंगमंचावर मांडली आहे.

‘मटा कल्चर क्लब’ सदस्यांसाठी एका कार्डवर दोन तिकीटे मोफत देण्यात येणार आहेत. अन्य वाचनांसाठी तिकीट दर ३०० रूपये आहे. अधिक माहिती व तिकीटांसाठी ९७६७८९०६२६ या क्रमांकावर सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images