Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चोरीच्या धास्तीने सुटीवर विरजण

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मे महिन्याची सुट्टी आणि पर्यटन हे समीकरणच. या काळात पर्यटन करणे किंवा गावाकडे जाऊन आठ-दहा दिवस आरामात घालवण्याचा मोह आवरत नाही. यंदा मात्र हा मोह अनेकांना चांगलाच महागात पडला आहे. मे महिन्यात चोरट्यांनी शहरात तब्बल २२ ठिकाणी चोऱ्या आणि घरफोड्या करून सुमारे ७० लाखांचा मुद्देमाल लंपास केला. त्यामुळे मे महिन्याची सुट्टी चोरट्यांसाठी पर्वणी ठरली असून, नागरिकांच्या आनंदावर मात्र विरजण पडले आहे.

शाळा, महाविद्यालयांच्या सुट्या संपताच घरोघरी पर्यटनाचे बेत ठरतात. अनेक कुटुंबे आठ-दहा दिवस मूळ गावाकडे जाऊन सुटीचा आनंद घेतात. या काळात कुलूपबंद घरे चोरटे हेरतात. दिवसाही ऐन वर्दळीच्यावेळी चोरटे हातोहात घर साफ करतात आणि सुटीसाठी शहराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या आनंदावर विरजण पडते. चोरीच्या घटनेत रोख रकमेसह किमती ऐजही लंपास केले जात आहेत. अनेकांची आयुष्याची पुंजीही लंपास होते. यंदाच्या मे महिन्यात शहरात अनेकांना असाच अनुभव आला. शाहूपुरी, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी आणि करवीर पोलिस ठाण्यात मे महिन्यात चोरीच्या २२ घडना घडल्या. या घटनांमधून रकमेसह दागिने असा सुमारे ७० लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. विशेष म्हणजे यातील केवळ ६ चोऱ्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सर्वाधिक १२ चोऱ्या शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. यात दोन ठिकाणी लूटमारीचीही घटना घडली. साइक्स एक्स्टेंशन, सीबीएस परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. बसस्थानक परिसरात महिलांची पर्स लांबवण्याचे प्रकार सलग चार दिवस घडले. त्यामुळे प्रवाशांसह पोलिसही हैराण झाले. पोलिसांनी लूटमार करणारी कनाननगर येथील एक टोळी पकडली. त्याचबरोबर साईक्स एक्स्टेंशन येथील घरात चोरी करणाऱ्या मोलकरणीस पकडून सात तोळ्यांचे दागिने हस्तगत केले. शिवाय सीबीएस परिसरात चोऱ्या करणारी महिलांची एक टोळीही पोलिसांच्या हाती लागली.

जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मेमध्येच सहा ठिकाणी चोऱ्या झाल्या. उपनगरांमधील अनेक नागरिक शहराबाहेर असल्याने काही चोऱ्यांची नोंद होऊ शकली नसल्याने घटना घडूनही याची नोंद पोलिस ठाण्यात झालेली नाही. दाखल झालेल्या ६ चोऱ्या सुर्वेनगर, सानेगुरूजी वसाहत आणि जिवबानाना जाधव पार्क परिसरातील आहेत. शिवाय गुजरीतही एका वृद्धेच्या घरात घुसून चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची साखळी लांबवली होती. या सहा चोऱ्यांमधील गुजरीतील चोरीचा पोलिसांनी छडा लावला. अन्य चोऱ्यांची उकल करण्याचे आव्हान कायम आहे. लक्ष्मीपुरी आणि राजारामपुरीच्या हद्दीत तुलनेने कमी चोऱ्यांची नोंद आहे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात चोरीच्या दोन घटनांची नोंद आहे. यातील एका चोरीची पोलिसांनी उकल केली. राजारामपुरीतही दोन चोरीच्या घटनांची नोंद आहे. करवीर पोलिस ठाण्यात मात्र मे महिन्यात एकाही चोरीची नोंद नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चोरट्यांनी लांबवला ७० लाखांचा मुद्देमाल

गेल्या महिन्याभरात चोरट्यांनी केलेल्या चोऱ्यांमध्ये सुमारे ७० लाखांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. यात रोख रकमेसह गंठण, मंगळसूत्र, अंगठ्या, सोनसाखळ्या, चांदीचे दागिने, चांदीची भांडी, मोबाइल अशा किमती वस्तूंचा समावेश आहे. चोरट्यांनी न्यू पॅलेस परिसरात भरदिवसा चोऱ्या करून अपार्टमेंटमधील सुरक्षाव्यवस्थेचा फज्जा उडवला, तर कुत्र्याला गुंगीचे औषध घालून घरफोडी करून पोलिसांना आव्हान दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खिद्रापुरेसह चौदाजणांवर आरोपपत्र

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

म्हैसाळ येथील बेकायदा गर्भपातप्रकरणी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेसह १४ जणांवर १८०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यात चार एजंट, तीन औषध पुरवठादार आणि खिद्रापुरेसह डॉ. श्रीहरी कृष्णा घोडके (कागवाड), डॉ. रमेश व्यंकटेश देवगिरीकर (विजापूर) यांचा समावेश आहे.

१४१ साक्षीदार, वैद्यकीय आणि कागदोपत्री भक्कम पुरावे आरोपपत्रात देण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली.

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या भारती हॉस्पिटलमध्ये मणेराजुरीतील गर्भवती स्वाती प्रविण जमदाडे हिचा गर्भपातावेळी एक मार्च रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी तीन मार्चला मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ म्हैसाळमध्ये धाव घेऊन जेसीबीच्या मदतीने संशयित ठिकाणी केलेल्या खोदाईत प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये गुंडाळलेले १९ भ्रूण सापडले. या प्रकाराने राज्यभर खळबळ उडाली. सुरुवातीला सहायक पोलिस निरीक्षक भारत शिंदे यांनी तपास केला. प्रकरण अधिकच गंभीर होत चालल्यानंतर तपास पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याकडे देण्यात आला. सात अधिकारी आणि सात स्वतंत्र पथकांच्या माध्यमातून ८९ दिवस सलग तपास केल्यानंतर १८०० पानांचे दोषारोप पत्र निश्चित करण्यात आले.

शिंदे म्हणाले, ‘म्हैसाळजवळील ओढ्याजवळ जमिनीखालून शोधून काढलेल्या १९ पैकी आठ भ्रूण डीएनए चाचणीसाठी पाठवले होते. या आठपैकी पाच पुरुष आणि तीन स्त्रीभ्रूणांची हत्या डॉ. खिद्रापुरेसह अन्य संशयितांनी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.’


खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवावा

अधीक्षक शिंदे म्हणाले की, या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून हर्षद निंबाळकर (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, जेणेकरुन आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होईल. भारतीय दंडविधानातील कलमे, वैद्यकीय सेवांमधील कलमांनुसार दाखल असलेल्या या गुन्ह्यातील आरोपींना जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते दुरुस्तीत मिलीभगत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘गेल्यावर्षी नगरोत्थान व महापालिकेच्या फंडातून शहरात केलेल्या साडेसहा कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामामध्ये डांबराचे प्रमाण अतिशय कमी आहे. खडी निकृष्ट दर्जाची वापरली असून खडी व डांबर मिक्सिंगचे प्रमाण कमी असल्याच्या बाबी वालचंद इंजिनी​अरिंग कॉलेजने महापालिकेला सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे’ असी माहिती नगरसेवक भूपाल शेटे यांनी दिली. वाहनांची वर्दळ असलेल्या ​ठिकाणी हे रस्ते टिकणार नाहीत, असा अभिप्राय कॉलेजने दिला असून या पद्धतीने केलेल्या ५६ रस्त्यांपैकी पाहणी केलेल्या केवळ १८ रस्त्यांच्या कामातून ७३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचेही शेटे यांनी सांगितले.

दरम्यान, ‘गेल्यावर्षी केलेल्या केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती तीन वर्षे करायची आहे. कंत्राटदारांनी दुरुस्ती करण्याचे पत्र महापालिकेला दिले. पण खराब झालेल्या रस्त्यापैकी केवळ दहा टक्केच दुरुस्ती केली व तीही पावसांमध्ये धुवून गेली आहे. यातून महापालिका अधिकारी व कंत्राटदारांमध्ये मिलीभगत झाली असून या रस्त्यांच्या नुकसानीसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर जबबादारी निश्चित करुन फौजदारी करावी’, अशी मागणीही शेटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

नगरसेवक शेटे म्हणाले, ‘शहरात ५६ रस्ते करण्यात आले. त्यातील अनेक रस्ते खराब झाले. तीन वर्षाची देखभालीची जबाबदारी असल्याने त्याची मागणी केली. त्यानंतर कंत्राटदारांनी दुरुस्ती करण्याचे पत्र महापालिकेला दिले. पण खराब रस्त्यांपैकी केवळ १० टक्केच दुरुस्ती केली. ही दुरुस्तीही त्यानंतर आलेल्या वळीव पावसामुळे धुवून गेली. त्यामुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करुन घेण्यास सांगितल्यानंतर वालचंद कॉलेजने ऑडिट केले. त्यामध्ये ५६ पैकी १८ रस्त्यांच्या पाहणीमध्ये अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्या अहवालात डांबर कमी आहे, निकृष्ट दर्जाची खडी वापरली असून डांबर व खडी मिक्सिंगचे प्रमाण कमी आहे. अशा प्रकारचे रस्ते वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी टिकणार नाहीत, असे नमूद केले आहे.’

नगरसेवक शेटे म्हणाले, ‘शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यापासून उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता असे १६ जण या खराब कामासाठी कारणीभूत आहेत. ज्यांनी निकृष्ट कामे केली, त्याच अनिल पाटील, बबन पोवार, अनंत कन्स्ट्रक्शन, शिवपार्वती कन्स्ट्रक्शन, महेश भोसले, गणेश खोत या कंत्राटदारांना पुन्हा नवीन कामे दिली आहेत. अधिकारी व कंत्राटदार यांची मिलीभगत असून अशा अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी. तसेच त्यांच्यावर आयुक्तांनी पोलिस कारवाई करावी, अशी मागणी पत्राद्वारे करणार आहे. याबाबतची माहिती नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्राद्वारे देण्यात येणार असून त्यांच्याकडून कारवाईचे आदेश देण्याची मागणी करणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायगडावर मंगळवारी शिवराज्याभिषेक दिन सोहळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे मंगळवारी (ता. ६ जून) दुर्गराज किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो शिवभक्त या सोहळ्यात सहभागी होणार आहेत अशी माहिती आवाहन समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी (ता. ५ जून) व मंगळवारी या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सावंत म्हणाले, ‘सोमवारी गडपूजनाने शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. महादरवाजाला तोरण, शिरकाई देवीचा गोंधळ, शाहीर, शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, पुस्तक प्रकाशन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. सोहळ्याच्या मुख्य दिवशी मंगळवारी रायगडावरील नगारखान्यासमोर भगवा ध्वज उभारून सोहळ्याची सुरुवात होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. दुर्गसंवर्धनासाठी राज्यभरात काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि शिवभक्तांचा संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णनाण्यांचा अभिषेक केला जाणार आहे. होळीच्या माळावर शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. या लोकोत्सवात भव्य पालखी सोहळा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेची शोभायात्रा हे खास आकर्षण असणार आहे. रायगडावर दीड लाख लोकांसाठी अन्नछत्र उभारण्यात येणार आहे.’

सावंत म्हणाले, ‘शिवभक्त, दुर्गप्रेमी, इतिहास संशोधक, पर्यावरणप्रेमी, प्रशासन, स्थानिक रहिवाशी यांच्या मतांचा अभ्यास करून रायगड संवर्धन व विकास आराखडा तयार करण्यात आला तर तो जास्त प्रभावशाली होईल. त्यासाठी सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता ‘संवर्धन रायगडाचे...मत शिवभक्तांचे’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.’

यावेळी हेमंत साळोखे, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते, अमर पाटील, सुखदेव गिरी, संजय पोवार, सागर यादव, शाहीर दिलीप सावंत, सन्मान शेटे, प्रकाश मोरबाळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दातृत्वाच्या बळावर झळाळले कर्तृत्व

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आर्थिक अडचणींवर जिद्दीने मात करून दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक मार्क मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण पैशांअभावी अडू नये, याकरिता ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे हेल्पलाइन उपक्रम राबविला जातो. गेल्या चार वर्षांत कोल्हापूरकरांनी या उपक्रमाला ‘लाख’ नव्हे, तर ‘कोटी’मोलाची मदत करून मोठा प्रतिसाद दिला. महाराष्ट्र टाइम्सने दोन वर्षांपूर्वी केलेल्या आवाहनानंतर दहावीत यशवंत ठरलेल्या आणि आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असलेल्या निवडक पाच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी वाचकांनी भरभरून मदत केली. या विद्यार्थ्यांनीही आपल्या कर्तृत्वाची भरारी बारावीच्या परीक्षेत दाखवून दिली.

दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवलेल्या गरीब विद्यार्थ्यांना ‘मटा हेल्पलाइन’व्दारे आर्थिक मदतीसाठी आवाहन केले. त्यातून दरवर्षी आठ मुलांना मदत दिली जाते. गेले चार वर्षे हा उपक्रम सुरू आहे. वाचकांनी अतिशय उस्फूर्तपणे मदत केल्याने अनेकांच्या शिक्षणाला हातभार लागत आहे. केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून शिक्षण थांबविण्याची वेळ आलेल्या मुलांच्या शिक्षणाची वाट ‘मटा’मुळे सूकर झाली होती. दोन वर्षापूर्वी (२०१५) अकरावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आठ मुलांना वाचकांनी मदतीचा हात दिला. या मुलांनी आपली जबाबदारी वाढली असल्याची जाणीव ठेवत अभ्यास केला. बारावीच्या परीक्षेत या मुलांनी लख्ख यश मिळविले. दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या या मुलांनी बारावी परीक्षेतही अधिकाधिक गुण मिळवण्याचा प्रयत्न केला.

विवेकानंद कॉलेजमध्ये शिकणाऱ्या वैष्णवी खराडे हिने ९० टक्के गुण मिळवत आईच्या कष्टाचे चीज केले. वैष्णवी कॉमर्स शाखेत शिकते. नियमित अभ्यास करून तिने हे गुण मिळवले. तिला चार्टड अकाउटंट व्हायचे आहे. विवेकानंद कॉलेजमधूनच बारावी सायन्स झालेल्या प्रतीक्षा जाधवने ८३ टक्के गुण मिळवले. तिने सीईटीची परीक्षा दिली आहे. तिला इंजिनीअरिंग करायचे आहे. अधिराज धर्माधिकारी याने विवेकानंद कॉलेजमधून सायन्स शाखेतून ८४ टक्के गुण मिळवले. तो बीएस्सी करणार आहे. त्यालाही शासकीय सेवेत अधिकारी व्हायचे आहे. त्याची तयारी तो आतापासून करीत आहे.

इचलकरंजीतील गणेश गलांडे याने व्यंकटेश्वरा कॉलेजमध्ये सायन्स शाखेतून ७४.४६ टक्के गुण मिळवले. त्याला आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून सरकारी सेवेत अधिकारी व्हायचे आहे. ऐश्वर्या कोलप हिने मिरज येथील शिक्षण महर्षी बापूजी सांळुखे कॉलेजमधून सायन्स शाखेतून ७७ टक्के गुण मिळवले. ती बीएस्सीला प्रवेश घेणार आहे. तिलाही स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी अधिकारी व्हायचे आहे.

‘मटा हेल्पलाइनने’ मिळवून दिलेल्या आर्थिक पाठबळामुळे शिक्षणाची पुढील वाट सोपी झाली असे या सर्वांनी सांगितले. त्याबद्दल त्यांनी ‘मटा’चे विशेष आभार मानले. जर शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळाले नसते, तर आजचे यश कदाचित शक्य झाले नसते, अशा भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.


खडतर मार्ग सुकर

‘मटा’च्या वाचकांनी २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात ‘मटा हेल्पलाइन’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजांकरता आर्थिक आधार दिला. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा खडतर मार्ग सुकर झाला. समाजऋणाचे भान राखून या गुणवंतांनी यशाची नवी शिखरे गाठली आणि काही अंशी वाचकांच्या ऋणांची परतफेडही हे विद्यार्थी करत आहेत. वाचकांनी केलेल्या मदतीतून २०१५ च्या या गुणवंतांनी बारावीतही घवघवीत यश मिळवत वाचकांचा विश्वास सार्थ ठरवला. शिकण्याची जिद्द अंगी बाळगून या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वाटचालीत भरारी घेण्याचे ठरवले आहे.


हेल्पलाइनची साथ

समाजाच्या दातृत्वाचे लखलखीत उदाहरण ठरलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा हेल्पलाइन’ उपक्रमाने अनेक गुणवंतांच्या पंखांना बळ दिले. घरची बिकट आर्थिक स्थिती आणि समोर शिक्षणाच्या खर्चाचा डोंगर. त्यामुळे गुणवत्ता होती, पण शिक्षणाचा खर्च परवडणारा नव्हता. अंधारात जणू आशेचा प्रकाशकिरण मिळावा तशी या विद्यार्थाना 'हेल्पलाइन'ची साथ मिळाली आणि शिक्षणाचा राजमार्ग सापडला.


दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर गरीब परिस्थिमुळे आर्थिक अडचणी आल्या. त्यावेळी ‘मटा’ने पुढाकार घेत मदत मिळवून दिली. त्यामुळे बारावीला चांगले गुण मिळवले. ही मदत मिळाली नसती तर पुढील शिक्षण थांबले असते. परिणामी बारावीच्या गुणात ‘मटा’चे योगदान मोठे आहे.

प्रतीक्षा जाधव, विद्यार्थिनी


‘मटा’ने दहावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ दिले. त्यामुळे दोन वर्षे अडचणी आल्या नाहीत. ‘मटा’ने आवाहन करून मदत मिळवून दिली नसती तर, पालकांना माझ्या शिक्षणासाठी पैशांची उसनवारी करून जुळवाजुळव करावी लागली असती. समाजाच्या साथीने शिक्षणाची वाट सोपी झाली.

अधिराज धर्माधिकारी, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ तपासणार गुळाची गुणवत्ता

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘शिवाजी विद्यापीठात गूळ गुणवत्ता तपासणी केंद्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडे प्रस्ताव पाठवला जाईल. आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर केंद्र सुरू होईल. केंद्रात गुळाच्या गुणवत्तेसंबंधी प्रमाणपत्र देण्यात येईल. याशिवाय उत्पादकांना गूळ निर्मितीचे शास्त्रीय प्रशिक्षण दिले जाईल’, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘कोल्हापूरच्या गुळाची वेगळी ओळख आहे. मात्र, अलिकडे त्याचा दर्जा खालावल्याच्या तक्रारी आहेत. काही कंपन्या दर्जाहिन गूळ कोल्हापुरीच्या नावाने विकत आहेत. गूळ उत्पादनात तंत्रज्ञानचा वापर नाही. पारंपरिक पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या गुऱ्हाळ घरात गूळ बनविण्याचे एकच मापदंड नाही. त्यामुळे प्रत्येक गुऱ्हाळघरनिहाय गुळाची चव वेगवेगळी लागते. कोल्हापुरी नावाने इतर ठिकाणचा गूळ विकला जातो. हे चित्र बदलून कोल्हापूर गुळाची मूळ चव कायम राहावी आणि उत्पादकांनी गुणवत्ता पूर्ण गूळ तयार करावा, त्याला चांगला भाव मिळावा यासाठी मार्गदर्शन होईल.’

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘मंगळवारी विद्यापीठात जिल्हयातील गूळ उत्पादकांसोबत बैठक झाली. बैठकीस ज्येष्ठ शास्त्रज्ञ व राज्य सरकारच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. अनिल काकोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत शिवाजी विद्यापीठ, तंत्रज्ञान आयोगच्या सहकार्याने कोल्हापुरी गुळाच्या संदर्भात चर्चा झाली. संशोधन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, प्रक्रिया विकास याविषयी आधुनिक तंत्रज्ञानाधारीत गुऱ्हाळाचा पथदर्शी प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला. त्यास डॉ. काकोडकर यांनी आयोगाकडून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. बैठकीत मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे (आयसीटी) कुलगुरू पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांनी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे पूर्णवेळ सहभाग घेत मार्गदर्शन केले. कोल्हापुरी गुळास भौगोलिक मानांकन (जी.आय.) मिळाले. मात्र दर्जाकडे विशेष लक्ष‌ दिले नाही. त्यामुळे गुणवत्ता सुधारण्यासाठी तंत्रशुध्द मार्गदर्शनासाठी केंद्र सुरू करण्यात येईल.’

अभ्यासक्रमही सुरू करणार

‘दर्जेदार, निर्यातक्षम गूळ कसा तयार करावा, गूळ उत्पादनात अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर कसा करावा यासंबंधीचा पंधरा दिवस ते एक वर्ष अशा कालावधीचा अभ्यासक्रम तयार केला जाईल. त्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांसह उत्पादकांनाही प्रवेश दिला जाईल’, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संप यशस्वी करण्याचा निर्धार

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शेतीमाला योग्य भाव मिळावा, या मागणीबरोबरच स्वामिनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्यात या मागण्यांसाठी शेतक ऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या संपात सहभागी होऊन संप यशस्वी करण्याचा निर्धार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. राज्यातील किसान सभा, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटना या संपात सहभागी होणार आहेत. संपाचा पहिल्या टप्पा म्हणून केवळ पेरणी न करण्याचे आवाहन केले जात असले तरी त्यानंतर शहरात येणारा भाजीपाला, दूध आणि इतर शेतीमाल रोखून धरण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी एकीकडे कर्जमाफीची मागणी होत असताना एक जूनपासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची तयारी केली आहे. शेतीमालाला हमीभाव द्या या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी संपांची हाक दिली आहे. त्याची तयारी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू केली आहे. शेतकरी संघटनेच्यावतीने संपाबाबत तालुकावार जनजागृती निर्माण केली आहे. इतर जिल्ह्याप्रमाणे पेरणीपासून शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे शक्य नसले तरी उत्पादित कृषीमाल व दूध रोखून धरण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.


आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी एक जूनपासून संपावर जाणार आहे. संपात जिल्ह्यातील २५ टक्के शेतकरी सहभागी होणार आहे. शेतीमध्ये उत्पादितत झालेला कोणताही माल शहरात न पाठवता त्या-त्या गावात पुरवठा करण्याचे नियोजन सुरू आहे. संपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर दबाव निर्माण करुन मागण्या मान्य करण्यासाठी लढा देणार आहोत.

अॅड. माणिक शिंदे, युवा अध्यक्ष, शेतकरी संघटना


राज्य किसान सभेचा पाठिंबा

शेतकऱ्यांची कर्जे माफ करा, ६० वर्षांवरील शेतकरी, शेतमजूर व कारागीरांना तीन हजार रुपये पेन्शन द्या, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी स्वीकारा, शेतमालाच्या आयातकरात वाढ करा, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संपावर जाणार आहेत. या संपाला राज्य किसान सभेचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर आज (ता.१) जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार असल्याचे भाकपचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

प्राथमिक शिक्षकांच्या आतंरजिल्हा आपसी बदलीसंबंधी निष्काळजीपणा केल्याप्रकरणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांना मुख्य कार्यकारी ‌अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. यामुळे चौगुले यांची अकार्यक्षम कामकाज पद्धती उघड झाली आहे.

नोटीसीला समाधानकारक उत्तर न आल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे. दरम्यान, बुधवारी त्या १७ शिक्षकांनी प्रभारी शिक्षणाधिकारी ए. जे. मगदूम यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला का मुक्त करीत नाही, असा जाब मगदूम यांना विचारला. मात्र मगदूम यांच्याकडून त्यांना ठोस उत्तर मिळाले नाही. तब्बल अर्धा तास ते‌ मगदूम यांच्या दालनात ठाण मांडून होते.

सरकारच्या नियमानुसार जिल्ह्यातून १७ शिक्षकांची बाहेरील जिल्ह्यात बदली करायची होती. मुदत संपूनही त्यांना मुक्त करण्यात आलेले नाही. परिणामी सामान्य प्रशासनाकडे बदलीचे प्रकरण प्रलंबित राहिले. त्यासंबंधी सीईओ डॉ. खेमनार यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारीची दखल घेऊन खेमनार यांनी चौगुले यांना नोटीस दिली आहे. याप्रकरणातच प्रभारी शिक्षणाधिकारी ए. जे. मगदूम यांनी पी. आय. कांबळे यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

.............

शिक्षक मेटाकुटीला

बदली प्रकरणात शिक्षक मेटाकुटीला आल्याचा अनुभव येत आहे. आतंरजिल्हा बदलीसाठी मुक्त करावे, यासाठी एक शिक्षक मगदूम यांना भेटले. गेले महिनाभर पाठपुरावा करतो. काम झालेले नाही. रोज ७०० रूपये देऊन लॉजवर राहतोय. साहेब मी हात जोडतो, मला कार्यमुक्त करा, अशी याचना एका शिक्षकाने मगदूम यांच्याकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गरजूंसाठी शिवसेना उभारणार पुस्तकांची भिंत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवसेनेतर्फे गरीब, गरजू आणि शिक्षण न परवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची भिंत उभारण्यात येणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून मुले वंचित राहू नयेत, यासाठी शिवसेनेच्या शहर शाखेतर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जुनी, चांगल्या स्थितीतील पुस्तके शनिवारी (१० जून) सकाळी दहा वाजल्यापासून राजारामपुरीतील दुसऱ्या गल्लीतील शिवसेना शहर कार्यालयात मोफत दिली जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना मदतीसाठी या वर्षापासूनच नवा उपक्रम सुरू केला जात आहे. या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन शिवसेनेने केले आहे. पहिली पासून ते बारावीपर्यंतचे कोणत्याही शाखेची चांगल्या स्थितीतील पुस्तके, गाईड्स १ ते १० जून या कालावधीत शिवसेनेच्या शहर कार्यालयात जमा करावीत. जिल्ह्यातील अनेक कुटुंबात शिक्षण घेण्याची तयारी आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांच्याकडे पुस्तकांसाठी पैसे नसतात. या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाल्यास शिक्षण घेण्यास मदत होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उभे करण्यासाठी मदतीची गरज आहे. कार्यालयात येणे शक्य नसल्यास जागेवरून पुस्तके नेली जाणार आहेत. त्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते सेवा बजाविणार आहेत. इच्छुकांनी पुस्तके घेऊन जाण्यासाठी ९६२३०१४१४०, ७७४४००८९९०, ९८२२५५८३८३, ९९२१५५२६७९ वर संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रज यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळचे दूध बंदोबस्तात मुंबईकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या राज्यव्यापी संपाचा परिणाम शहरातही जाणवला. आज, शुक्रवारपासून संपाची व्याप्ती वाढेल. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संधटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे व्यापारी, बाजारपेठांत तणाव जाणवत होता. कृषी उत्पन्न बाजार समितीत विदर्भ, मराठवाड्यातून येणाऱ्या कांदा, बटाटाची आवक घटली. संपाचा धसका घेऊन गोकुळ संघाने मुंबईला पाठवण्यात येणाऱ्या दुधाच्या टँकरना पोलिस बंदोबस्त पुरवला आहे. संपास पाठिंबा म्हणून स्वाभिमानी संघाने पहिल्याच दिवशी दूध संकलन बंद केल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

गुरुवारी पहाटे बाजार समितीत भाजीपाल्यांची आवक झाली. बेळगाव, शिरोळ, जयसिंगपूर, कोल्हापूर परिसरातून येणारा भाजीपाला दाखल झाल्यानंतर तातडीने प्रशासनाने सौदेही काढले. मात्र सौद्यावरही संपाची छाया राहिली. खरेदी केलेला माल व्यापाऱ्यांनी तातडीने कोकण भागात पाठविला. दुपारी बाराच्या सुमारास रघुनाथ पाटील प्रणित शेतकरी संघटनेने बाजार समितीत येऊन व्यापाऱ्यांनी व्यवहार थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. संघटनेचे माणिक शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तेथील टोमॅटो जमिनीवर ओतून सरकारच्याविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

दिवसभर बाजारपेठेत संपाची चर्चा सुरू होती. शेती उत्पादनांची टंचाई भासणार हे गृहीत धरून काही व्यापाऱ्यांनी साठा करण्यास सुरूवात केली. एकाच ठिकाणी संप नसल्याने पोलिस प्रशासनास बंदोबस्त ठेवताना तारांबळ उडाली. शेतकरी आक्रमकपणे संपात सहभागी झाल्यामुळे मोडतोड सुरू झाली आहे. सातारा येथे बुधवारी रात्री गोकुळचे दुधाचे टँकर रोखण्यात आले. दगडफेकही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिवसभर गोकुळ दूध संघासमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. गोकुळच्या प्रशासनाने ‌सकाळी आठपासून बंदोबस्तात दहा ते बारा टँकर एकाचवेळी मुंबईकडे रवाना या टँकरच्या मागे-पुढे पोलिस व्हॅन ठेवण्यात आली आहे. दिवसभरात ४० ते ५० टँकर बंदोबस्तात पाठवण्यात आले.


दूध, भाजीपाला टंचाई

दरम्यान, संपाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी संधाने दूध संकलन बंद केले. गोकुळ, वारणा संघाची वितरण व्यवस्था विस्कळीत झाली. आज, शुक्रवार कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असते. शनिवारी संपाची व्यापकता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजीपाला, दुधाची टंचाई भासणार आहे. मात्र जिल्हा प्रशासन याबाबत अद्याप गंभीर दिसत नाही.


संपास पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी दूध संकलन बंद केले आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला, दूध ओतून देऊन नासाडी करू नये, विकूही नये. संपात उत्फूर्त सहभागी व्हावे.

राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबूराव धारवाडे कालवश

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांच्या प्रसारातील अग्रणी, माजी आमदार बाबूराव आबासाहेब धारवाडे (वय ८७ वर्षे) यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोल्हापुरातील सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व क्षेत्रातील नेते कार्यकर्त्यांनी त्यांच्या सागरमाळ येथील निवासस्थानाकडे धाव घेऊन अंत्यदर्शन घेतले. आज, शुक्रवारी त्यांच्या सागरमाळ येथील आयडियल हौसिंग सोसायटीतील निवासस्थानाजवळून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात्त मुलगा उदय, सून, चार मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झालेल्या धारवाडे यांनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून ११ वर्षे काम केले होते. १९८५मध्ये त्यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाली होती. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. याच ट्रस्टच्यावतीने त्यांचा प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार देऊन २०११मध्ये गौरव केला होता. राज्य सरकारने त्यांना दलितमित्र पुरस्कार देऊन गौरविले होते.

धारवाडे यांनी आयुष्यभर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांशी निष्ठा ठेवली. शाहू महाराजांचे विचार आणि कार्य समाजात पोहचावेत यासाठी ते आयुष्यभर सक्रीय राहिले. विधानभवन आणि संसदेच्या आवारात राजर्षी शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात त्यांचा पुढाकार राहिला. शाहू स्मारक भवनबरोबरच भाई माधवराव बागल विद्यापीठाचे ते खऱ्या अर्थाने शिल्पकार होते.

राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी तत्कालीन सरकारने प्रकाशित केलेल्या कोल्हापूर गॅझेटमधील अवमानकारक मजकूर काढून टाकेपर्यंत त्यांनी निकराचा लढा दिला. तसेच या प्रश्नावर विधानपरिषदेत आवाज उठवित सरकारचे लक्ष वेधले. याप्रश्नी लोक आंदोलन उभे करत हा अवमानकारक ​मजकूर वगळायला सरकारला भाग पाडले. कोल्हापुरातील अनेक सामाजिक संस्थेशी त्यांचा निकटचा संबंध होता. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील सामाजिक चळवळीला बळ, पुरोगामी विचारांची रुजूवात करण्यासाठी त्यांनी भाई माधवराव बागल विद्यापीठाची स्थापना केली. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. रा. कृ. कणबरकर यांच्या साथीने त्यांनी प्रबोधनात्मक व्याख्यानमाला, कार्यकर्ता प्रबोधन शिबिराच्या माध्यमातून आयुष्यभर काम केले. काँग्रेसशी विचारधारा आयुष्यभर जपली. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल मॅनेजरवर फाळकूटदादाचा चाकूहल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हॉटेलमध्ये फुकट चहा, नाष्टा घेऊन शंभर रुपयांचा हप्ता मागणाऱ्या फाळकूटदादाने हॉटेल कस्तुरीचे मॅनेजर प्रकाश हरी लोखंडे (वय ५२, रा. मूळ गाव रत्नागिरी) यांच्यावर चाकूहल्ला केला. या घटनेत मॅनेजर लोखंडे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. रंकाळा चौपाटी परिसरातील या हॉटेलमध्ये गुरूवारी (ता. १ जून) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

रंकाळा चौपाटी परिसरात प्रदीप शिंदे हा फाळकूटदादा आहे. तो रोज हॉटेलमध्ये जाऊन चहा, नाष्टा घेतो. त्याचे पैसेही देत नाही. त्याने हॉटेल मॅनेजर प्रकाश लोखंडे यांच्याकडे हप्ता म्हणून रोज शंभर रुपयांची मागणी केली. यापूर्वी हफ्त्यावरून अनेकदा वादही झाले होते. गुरूवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शिंदे हॉटेलमध्ये आला. त्याने लोखंडे यांच्याकडे पैशांची मागणी केली, मात्र लोखंडी यांनी नकार देताच शिंदेने चाकूने लोखंडे यांच्या पाठीत वार केला. लोखंडे जखमी होऊन खाली पडल्यानंतर शिंदे हॉटेलमधून पळून गेला.

हॉटेलमधील कर्मचारी मुकेश साठम आणि मधू स्वामी या दोघांनी लोखंडे यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. हल्ल्यातील चाकू हॉटेलमध्येच पडला होता. जुना राजवाडा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल झाले. लोखंडे यांचा जबाब घेवून शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरचे नाले अडवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढल्यान इचलकरंजीसह १६ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील जयंती, दुधाळी तसेच इतर नाल्यांवरील प्रकल्प तातडीने पूर्ण करा. जयंती नाला ओसंडून वाहिला की त्यातील मैलामिश्रित सांडपाणी मिसळून नदी प्रदूषित होण्यापासून वाचवण्यासाठी नाल्यावर पर्यायी पंप व जनरेटरची व्यवस्था तातडीने करण्याची मागणी इचलकरंजी शहर काँग्रेसच्यावतीने आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे गुरुवारी केली.

इचलकरंजीतील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पंचगंगा नदीतील प्रदूषणाचे वास्तव आयुक्तांसमोर मांडले. पंचगंगा नदीत औद्योगिक वसाहती, कारखाने, नागरी वस्तीचे सांडपाणी मिसळते. त्यामुळेच २०१३ मध्ये काविळीची साथ उद्भवली. ४० नागरिकांचा बळी गेला. आताही प्रदूषणामुळे नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. शिवाय जमिनींचेही नुकसान झाले आहे. या प्रदूषणाबाबत हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आल्यानंतर ‘नीरी’ ला अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार कोर्टाने महापालिकेला प्रदूषण रोखण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे शहरातील नाले अडवणे व एसटीपी प्रकल्पांचे काम २०१४ पर्यंत पुर्ण करण्याची आवश्यकता होती. पण अद्यापही जयंती नाल्यावरील एसटीपी पूर्ण क्षमतेने सुरू नाही. दुधाळी नाल्याबरोबर बापट कॅम्प, लाइन बाजार येथील प्रकल्पांचीही तशीच अवस्था असल्याने इचलकरंजीसह १६ गावांना प्रदूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे अशी स्थिती यावेळी आयुक्तांसमोर मांडण्यात आली.

प्रदूषण थांबवण्याठी जयंती नाल्यावर पर्यायी पंप तसेच जनरेटरची सोय करण्याची आवश्यकता आहे. बापट कॅम्प व लाइन बाजारमधील प्रकल्पांचे काम पूर्ण करण्याबरोबरच दुधाळी नाल्यावरील एसटीपी प्रकल्पाचे काम १५ जूनपूर्वी पूर्ण करावी, अशा मागणी करण्यात आल्या. अमृत अभियानांतर्गत मिळालेला निधी याच कामांसाठी वापरण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आयुक्त चौधरी यांनी जयंतीसह अन्य प्रदूषणाचे विषय मार्गी लावण्यासाठी वेगाने प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. याप्रसंगी उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार उपस्थित होते.

इचलकरंजी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, शशांक बावचकर, शेखर शहा, सुनिल पाटील, राहुल खंजिरे, अहमद मुजावर, रमेश पाटील, किरण करके, सचिन हेरवाडे, प्रकाश दत्तवाडे आदींचा समावेश शिष्टमंडळात होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात ‘रेरा’कडे बिल्डरांची पाठ

0
0

Gurubal.Mali @timesgroup.com

Tweet:@gurubalmaliMT

कोल्हापूर ः बांधकाम व्यवसायात विश्वार्हता निर्माण करण्यासाठी केंद्रिय रियल इस्टेट कायदा (रेरा) लागू होऊन महिना उलटला, तरीही कोल्हापुरातील एकाही बिल्डरने त्याची नोंदणी केली नाही. जिल्ह्यातील चारशेहून अधिक बिल्डरकडून शंभरावर बांधकाम प्र्रकल्प सुरू असतानाही सर्वांनीच या नोंदणीकडे पाठ फिरवली आहे. रेरा आणि जीएसटी यामधून सुटण्यासाठी सध्या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे. कोल्हापूरप्रमाणे इतर जिल्ह्यातही अशीच अवस्था असून राज्यात केवळ अकरा बिल्डरांनी नोंदणी केल्याचे समजते.

देशात एक मे २०१७ पासून रेरा कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार कोणताही नवा गृहप्रकल्प सुरू होण्यापूर्वी त्याची माहिती प्रा​धिकरणाला देणे अत्यावश्यक आहे. या नोंदणीनंतरच बिल्डरला ग्राहकाकडून बांधकामाची रक्कम घेता येणार आहे. नोंदणीसाठी जुलैअखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. कायदा लागू होऊन तब्बल महिना उलटला तरी जिल्ह्यातील एकाही ​बिल्डरने ‘रेरा’मध्ये नोंदणी केली नाही. पुणे विभागात तीन तर कोकण विभागात एकाने नोंदणी केली आहे.

कोल्हापूर शहरात कार्यरत असलेल्या क्रिडाई संघटनेचे १२० सभासद आहेत, तर सव्वाशेवर बिल्डर संघटनेचे सभासद नाहीत. कागल, इचलकरंजी, जयसिंगपूर भागात बांधकाम व्यवसायिकांची संख्या मोठी आहे. तेथेही क्रिडाई संघटना आहे. एवढे बिल्डर असूनही सर्वांनीच ‘रेरा’कडे पाठ फिरवली आहे. या कायद्याच्या फेऱ्यात अडकू नये यासाठी सध्या जे प्रकल्प सुरू आहे, ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे. जादा कामगारांच्या मदतीने काम सुरू आहे. एक जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. यामुळे किमान सतरा ते एकोणीस टक्के कर भरावा लागणार आहे. त्यामुळे जीएसटी आणि रेरा या दोन्ही कायद्यातून वाचण्यासाठी बिल्डरांनी प्रकल्प पूर्ततेला प्राधान्य दिले आहे. कारण जुलैअखेर प्रकल्प पूर्ण असेल तर त्याला रेरा लागू होणार नाही. त्यामुळेच ही धडपड सुरू आहे.

कोट

रेरा आ​णि जीएसटी या दोन्ही कायद्याबाबत अजूनही बिल्डरांना परिपूर्ण माहिती मिळाली नाही. अजूनही माहिती घेण्याचे काम सुरू आहे. क्रिडाईने यासाठी मार्गदर्शन कार्यशाळाही आयोजित केली आहे. अजून दोन महिने अवकाश असल्यानेच कदाचित ‘रेरा’साठी एकाचीही नोंदणी झाली​ नसेल.

महेश यादव, अध्यक्ष, क्रिडाई कोल्हापूर


नवीन प्रकल्प नाही

‘रेरा’मधून सुटका होणार नाही, याची खात्री असल्याने सध्या नवीन प्रकल्प सुरू होताना दिसत नाही. कारण आता प्रकल्प सुरू केला तर तो तीन महिन्यांत पूर्ण होणे अशक्य आहे. यामुळे जुलैनंतरच नवीन प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात सध्या सत्तरपेक्षा अधिक प्रकल्प सुरू आहेत. हे सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी काही ठिकाणी अहोरात्र काम सुरू आहे.

काय आहे रेरा ?

प्रकल्पाची संपूर्ण नोंदणी आवश्यक, सोबत मंजूर व प्रस्तावित आराखडा देणे बंधनकारक

ग्राहक व बिल्डर यांच्यात करारनामा आवश्यक

प्रकल्प मुदतीत पूर्ण न केल्यास ग्राहकांना द्यावा लागणार दंड

रेरा कायद्यातील निर्णयाची अमंलबजावणी न केल्यास बिल्डरला तुरूंगवास

जाहिरातीत सांगितलेल्या सुविधा न दिल्यास होणार दंड

सत्तर टक्के रक्कम बँकेत भरावी लागणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवरायांची खरी प्रतिके जपण्याची गरज’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘राजकारणी सोयीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करीत आहेत. गेल्या दोनशे वर्षांत विश्लेषकांनी शिवरायांची वेगवेगळी प्रतिके रंगविली. शिवराय कट्टर हिंदुत्ववादी, क्षत्रिय, जातीय अभिमानी असल्याचे चित्र साहित्य, चित्रपटातून लोकांसमोर मांडले. मात्र शिवराय मानवतावादी, सामाजिक न्यायाचे प्रतिक, आंतरजातीय विवाहाचे प्रोत्साहक होते. काही मंडळी सत्तेसाठी, सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यासाठी सोयीनुसार महाराजांच्या नावाचा वापर करीत आहेत. त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक पेचप्रसंग उभे केले. यातून शिवरायांची प्रतिमा वेगळी करण्याचे आव्हान आजही सर्वांसमोर आहे’ असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांनी केले. अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टतर्फे शाहू स्मारक भवनात शिवाजीराज्याभिषेक व्याख्यानमाला सुरू आहे. या व्याख्यानमालेतील त्यांनी दुसरे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक होते.

‘छत्रपती शिवाजी महाराज : प्रतिमा आणि राजकीय व्यवहार’ या विषयावर डॉ. प्रकाश पवार म्हणाले, ‘गोपाळ हरि देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख क्रांतिकरक असा केला. राजारामशास्त्री भागवतांनी शिवाजी महाराज सर्व जातीधर्मांचे राजे आहेत, अशी राजकीय प्रतिमा उभी केली. त्यांनी शिवरायांना जातमुक्त केले. मात्र, वर्णव्यवस्थेत अडकविले. न्यायमूर्ती रानडे यांनी वारकरी संप्रदाय आणि कर्तृत्वाचे प्रतिक म्हणत शिवरायांना राष्ट्रीय राजकारणाचे प्रतिक म्हटले. लोकमान्य टिळक यांच्या कालखंडापासून शिवरायांच्या प्रतिमेला नवा अर्थ लावला गेला. ते कट्टर हिंदू संरक्षक असल्याची प्रतिमा उभी करण्यात आली. याचा उलट अर्थ म्हणून ते मुस्लिम विरोधी असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. टिळकांच्या या हिंदुत्ववादी विचारांना कोल्हापूरच्या पेंढारकरांनी बळ दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभेचे विचार पसरविणारे शिवाजी महाराज अशी प्रतिमा निर्माण केली. स्मृती, आठवणी, मूकचित्रपट, बोलपटातून पेंढारकरांनी हिंदू छत्रपती अशी प्रतिमा उभी केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही शिवाजी महाराजांना राष्ट्रीय प्रतिक दिले नाही. हिंसक आणि अहिंसक असा पेच निर्माण करण्यात आला. त्यानंतर सुमारे ५५ वर्षे काँग्रेसने लक्ष दिले नसल्याचा फायदा आरएसएस आणि हिंदूमहासभेने घेतला. शिवाजी महाराजांचे खरे विचार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पुढे आणले. मात्र मालिका, चित्रपट, जेम्स लेन प्रकरणातून शिवरायांना बदनाम केले गेले. महात्मा जोतिबा फुले, केळुस्कर, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार बाळासाहेब ठाकरे यांनी खरे शिवराय लोकांसमोर मांडले. शिवरायांची सामाजिक न्यायाची परंपरा राजर्षी शाहू महाराजांनी पुढे नेली.’

यावेळी उद्योजक सचिन पाटील, मोहनराव जाधव, सोमनाथ घोडेराव, बी. वाय. कडोलकर आदी उपस्थित होते. शशिकांत पाटील यांनी स्वागत केले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. शिरीष जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सुरेंद्र घोरपडे यांनी आभार मानले.


शिवरायांचे दैवतीकरण नको

‘शिवाजी महाराजांनी कर्तुत्वाच्या जोरावर रयतेचे राज्य निर्माण केले. पण, मिथकाव्दारे महाराजांना देव करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाचा इतिहास जगाला कळण्यासाठी महाराजांनी दैवतीकरण करु नये’, असे आवाहन प्रा. डॉ. आनंद पाटील यांनी केले. ‘महाराष्ट्राला माहीत नसलेले छत्रपती शिवाजी महाराज’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.

डॉ. पाटील म्हणाले, आज शिवरायांच्या नावाचा वापर करुन राजकारण केले जात आहे. लढाई, मुत्सदेगिरी, व्यवस्थापन कौशल्य व रयतेचा विश्वास या बळावर महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. स्वराज्य स्थापन करताना त्यांनी सर्वसामान्य, गरीब जनतेला सोबत घेतले. सैन्यभरती व अधिकारपदाची निवड करताना गुणवत्तेला प्राधान्य दिले. महाराजांनी जात, धर्म व वंश पाहिला नाही. त्यांच्या ३३ सुरक्षा रक्षकापैकी ११ सुरक्षा रक्षक मुस्लिम होते. प्रत्यक्ष लढाईवेळी महाराज रणांगणात उतरत. आपला राजा रणांगणात उतरत आहे पाहून मावळ्यांना स्फुरण चढत असे.’

डॉ. पाटील म्हणाले, ‘सांस्कृतिक सत्ता ही राजसत्तेपेक्षा प्रबल असते. आपल्याकडे इतिहासाची साधने जपली गेली नाहीत. त्यामुळे ज्यांना लिहिता-वाचता येत होते, त्यांनी सोयीनुसार ​इतिहास लिहिला. अनेकदा शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगितला. मिथक आणि इतिहासामध्ये पुसटशी रेषा असते. मिथकावर विश्वास ठेवला की आपण गुलाम होतो आणि खरा इतिहास अंधारात राहतो. या मिथकांनी शिवाजी महाराजांना देवपण देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आपत्काळात स्वसुरक्षाही महत्त्वाची

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कोणत्याही आपत्तीवेळी मदतीसाठी जाणाऱ्यांनी स्वतःची सुरक्षा जपणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे’, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी गुरूवारी केले. शिवाजी विद्यापीठात आयोजित दहा दिवसांच्या ‘आव्हान-२०१७’ राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिरच्या औपचारिक उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. लोककला सभागृहात कार्यक्रम झाला. दरम्यान, शिबिराचे औपचारिक उद्घाटन आज (ता. २ जून) सायंकाळी ४ वाजता कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते होईल.

डॉ. शिंदे म्हणाले, ‘प्रशिक्षणाचा उपयोग केवळ शिबिरापुरताच न करता भावी आयुष्यातही त्याचा समाजासाठी करावा. प्रशिक्षणाचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी सर्व प्रशिक्षण स्थळांना आपण स्वतः भेट देणार आहे.’

प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे यांनी या प्रशिक्षण शिबिरामधून १०० उत्कृष्ट शिबिरार्थी निवडून त्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तळेगाव येथील शिबिरात विशेष प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले. एनडीआरएफचे निरीक्षक एस. डी. इंगळे यांनी शिबिरार्थींना थोडक्यात माहिती दिली. राज्यभरातून आलेल्या राष्ट्रीय येवा योजनेच्या सुमारे १२०० विद्यार्थी प्रशिक्षणात सहभागी झाले आहे. कार्यक्रमास प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, एनडीआरएफचे निरीक्षक सी. डी. इंगळे, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मावा, गुटख्याने अंबाबाईचा गाभारा अपवित्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात काही श्रीपूजक मावा, गुटखा खाऊन गाभारा अपवित्र करीत आहेत असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी केला. अशा पद्धतीने गाभारा अपवित्र करणाऱ्या श्रीपूजकांना एकदा विनंती करू. त्यानंतरही असे प्रकार सुरू राहिल्यास शिवसेना हिसका दाखवेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. गाभाऱ्यात गुटका खाण्याच्या प्रकाराला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या, पद्मजा तिवले यांनीही दुजोरा दिला.

अंबाबाई मूर्तीवर दोन वर्षापूर्वी पुरातत्व विभागाने रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली होती. या प्रक्रियेनंतर मूर्तीची झीज होणार नाही असे सांगितले होते. पण अवघ्या काही महिन्यांत मूर्तीवरील रासायनिक संवर्धन केलेला लेप निघून पांढरे डाग दिसू लागले आहेत. प्रक्रिया केलेला थरही निघून जात आहे. त्यामुळे रासायनिक संवर्धन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, उपप्रमुख रवी चौगुले यांच्यासह कार्यकर्त्यांनी उभा मारुती चौकातील देवस्थान समितीच्या कार्यालयावर धडक मारली. समितीच्या सदस्या संगिता खाडे, सहसचिव एस. एस. साळवी यांना रासायनिक संवर्धनाबाबत विचारणा केली. साळवी यांनी मूर्ती संवर्धन प्रक्रियेबाबत काही माहिती नाही असे सांगताच कार्यकर्ते भडकले. त्यांनी साळवी यांच्या निषेधाच्या घोषणात देत त्यांना कामावरून काढण्याची मागणी केली.

जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, ‘अंबाबाई हे लाखो भक्तांचे श्रध्दास्थान आहे. ती कुणाची खासगी मालमत्ता किंवा प्रयोगशाळा नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे. मूर्ती संवर्धन प्रक्रियेमुळे देवीची बदनामी होत असल्याने शिवसेना गप्प बसणार नाही. दख्खनचा राजा जोतिबाची, पंढरपुरातील पांडुरंगाची मूर्तीचे संवर्धन जेवढे दर्जेदार झाले, तेवढे संवर्धन अंबाबाईच्या मूर्तीचे का झाले नाही? असा प्रश्न पडतो. अनेकांनी मंदिराच्या नावावर अर्थकारण सुरू केले आहे. नियम, अटींचे उल्लंघन करून पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही श्रीपूजक मंदिराच्या गाभाऱ्यात गुटखा खातात, हे अयोग्य आहे.’

देवस्थान समितीच्या सदस्या संगिता खाडे यांनी या आरोपाला दुजोरा दिला. ‘ज्यावेळी मंदिराची साफसफाई केली जाते, मंदिर पाण्याने धुतले जाते, तेव्हा गुटख्याच्या पुड्या आढळल्या होत्या’ असे त्यांनी सांगितले. सुजित चव्हाण यांनी मंदिरात अभिषेकावेळी एक पुजारी मावा खाऊन गाभाऱ्याच्या परिसरात थुकत होता, असा आरोप केला. अशा पुजाऱ्यांना धडा शिकवायला हवा असेही ते म्हणाले. मंदिराच्या पावित्र्यासंदर्भात भाजपचे नगरसेवक अजित ठाणेकर यांच्यासमवेत शिवसेना श्रीपुजकांची बैठक घेऊन विनंती करतील. अन्यथा त्यांचा बंदोबस्त करू असा इशारा संजय पवार यांनी दिला.

संवर्धन प्रक्रियेची सीडी ‘बॉम्ब’च

मूर्ती संवर्धन प्रक्रियेचे चित्रण केले आहे. ते सीडीत उपलब्ध आहे. ही सीडी देवस्थान समितीच्या ताब्यात देताना, तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी, ‘ही सीडी म्हणजे एक बॉम्बच आहे. सीडी व्यवस्थित ठेवा’ अशा सूचना केल्या होत्या, असे समितीच्या सदस्या संगिता खाडे यांनी सांगितले. सीडी देवस्थान समितीच्या लॉकरमध्ये सुरक्षित आहे. सीडीतील चित्रण, संवर्धन स​मितीचा अहवाल याची माहिती देवस्थान समितीच्या सदस्यांना दिलेली नाही. देवस्थान स​मितीने प्रक्रियेसाठी फक्त धनादेश दिला. रासायनिक संवर्धन श्रीपूजक आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीत झाले. फक्त धनादेश देण्याचे काम देवस्थान समितीने केले असे त्यांनी सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांचे स्वराज्यात संरक्षण’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘लोकांनी, लोकांसाठी निर्माण केलेल्या स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी, कारागिर, छोट्या व्यापाऱ्यांचे सरंक्षण केले’, असे प्रतिपादन प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार यांनी शुक्रवारी केले. अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे मूळ व परिणाम’ असा व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक होते.

डॉ. कुंभार म्हणाले, ‘अकराव्या शतकात जगभरात भाषिक राष्ट्रे निर्माण झाली. भारतातही वेगवेगळ्या प्रातांत भाषा बोलणाऱ्यांची सत्ता होती. अशा धामधुमीच्या काळात ज्ञान हेच प्रगतीचे साधन आहे अशा धारणा असलेल्या संतांनी लोकांत जागृती केली. संत नामदेवांनी भारतात भ्रमण केले. ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ या अंभगातून ज्ञानाचे महत्व सांगितले. सर्व जातींचे संत लिहू लागले. संत तुकारामांनी मावळ प्रांतातील शेतकऱ्यांत अभंगातून स्वाभिमान जागृत केला. त्यांच्या किर्तनाची प्रेरणा घेऊन मावळ प्रांतातील शेतकऱ्यांनी तलवार हातात घेण्यात सुरुवात केली.’

डॉ. कुंभार म्हणाले, ‘शिवाजी महाराजांनी रोख पगार सुरू केल्याने शेतात पीक पिकले नाही तरी सैनिकांच्या पगारावर कुटुंब चालत असे. दुष्काळाची स्थिती उद्भवली तरी सरकारी आदेशाची वाट न बघता शेतकऱ्याला मदत करावी, असे आदेश महाराजांनी दिले. शेतकऱ्यांना फक्त बी-बियाणेच नव्हे तर नांगरट करण्यासाठी मराठवाड्यातून बैल विकत आणून दिले होते. शेतकरी जगला तर स्वराज्य जगणार आहे हे माहित असल्याने महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये असे आदेश काढले होते.’

डॉ. कुंभार म्हणाले, ‘शेतकऱ्यांबरोबर सर्व जाती धर्मातील लोकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढले होते. देशमुख, देशपांडेंचे तनखे रद्द केले. रयतेला कायदे समजावेत यासाठी राज्य व्यवहारकोष तयार केला. मराठी भाषेतील पहिला शब्दकोष तयार केला. हे राज्य आपले आहे अशी भावना प्रत्येक व्यक्तीची होते. त्यामुळे शत्रूशी लढता स्वराज्य टिकले पाहिजे यासाठी लोक लढले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर वीस वर्षे ही भावना रयतेत होती यावरुन शिवाजी महाराजांच्या कार्याचे महत्व स्पष्ट होते.’

व्याख्यानाच्या सुरवातीला माजी आमदार बाबूराव धारवाडे यांना आदरांजली वाहण्यात आली. शशिकांत खोत यांनी स्वागत केले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिवेंद्र पाटणकर, अॅड. एल. ए. केसरकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजोपाध्येनगरात तीन घरे फोडली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली असली तरीही त्या रोखण्यात यश आलेले नाही. सलग तिसऱ्या दिवशी चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून राजोपाध्येनगर येथे तीन घरफोड्या केल्या आहेत. या तिन्ही घरातील रहिवाशी बाहेरगावी असल्याने चोरट्यांनी किती ऐवज लंपास केला याची माहिती मिळू शकलेली नाही.

न्यू कणेरकरनगर येथे चोरट्यांनी बुधवारी रात्रीत अकरा घरफोड्या करून सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. यानंतर सुरक्षा वाढवून पोलिस दिलासा देतील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात उलट घडत आहे. चोरट्यांनी गुरूवारी रात्री राजोपाध्येनगरात राजे संभाजी चौकातील विक्रम वसंत यादव यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी केली. यादव एमआयडीसीत खासगी कंपनीत नोकरी करतात. ते दोन दिवसांपूर्वी देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले आहेत. जवळच असलेल्या प्रमिला महामुनी (वय ७०) या डोळ्यावरील उपचार घेण्यासाठी १५ दिवसांपासून भाच्याकडे आहेत. चोरट्यांनी महामुनी यांचेही घर फोडले. चोरट्यांनी शेजारील अवधूत भिसे, सचिन संकपाळ आणि कुलदीप अतेकर यांच्या घरांना बाहेरून कड्या घातल्या होत्या. शिवाय डायना टाउनमध्ये राहणारे महापालिकेतील निवृत्त वाहनचालक शरद मेथे यांचाही बंगला चोरट्यांनी फोडला. मेथे हे दोन दिवसांपूर्वी पुणे येथे मुलाकडे गेले आहेत.

या तिन्ही घरातील नागरिक जागेवर नसल्याने चोरट्यांनी नेमका किती लाखांचा मुद्देमाल लंपास केला याबाबत पलिसांना माहिती मिळू शकली नाही. परिसरातील नागरिकांनी चोरीच्या घटनेची माहिती देताच जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. बाबूराव बोडके यांनी फिर्याद दाखल केली.


नागरिक संतप्त

चोरीची घटना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले, मात्र पोलिस वेळेत घटनास्थळी पोहोचले नाहीत. पोलिसांनी गांभीर्याने पंचनामेही केले नाहीत. केवळ जुजबी माहिती घेऊन चोरी झालेल्या घरांना कुलपे लावण्याची जबाबदारी परिसरातील नागरिकांकडेच देऊन ते निघून गेले. चोरीच्या घटना वाढूनही पोलिसांना गांभीर्य नाही, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट

0
0

Sachin.Yadav@timesgroup.com
tweet:@sachinyadavMT

कोल्हापूर : शहरातील काही पेट्रोल आणि डिझेल पंपावर ग्राहकांची फसवणूक होत आहे. मीटरकडे लक्ष नसताना इंधन टाकणाऱ्या नोझलमध्ये हातचलाखी करून ‘मापात पाप’ केले जात आहे. ‘०’ रिंडिग न करताचा बाइकमध्ये पेट्रोल सोडले जाते. याबाबत ग्राहकांनी केलेल्या तक्रारी केराच्या टोपलीत टाकल्या गेल्याचा अनुभव येत आहे. पेट्रोल पंपांवरील ही लूट थांबविण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग, वैधमापनशास्त्र विभाग, पेट्रोलियम कंपन्याचे अधिकारी यांच्याकडून ‘ऑन दी स्पॉट’ कारवाईची गरज आहे.

दरम्यान, पुरवठा विभाग, वैधमानपन शास्त्र विभाग आणि पेट्रोलियम कंपन्यांकडून होणाऱ्या कारवाईवेळी खबऱ्यांकडून पंपमालकांना आधीच ‘टीप्स’ मिळतात. त्यामुळे अनेकदा कारवाई कागदावरच राहते. फसवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या यंत्रणेचे ‘लिकिंग’ असल्याने ग्राहकांच्या लुटीला अधिक बळ मिळत आहे.

पेट्रोल पंपावर ग्राहकांना दुचाकी वाहनात पेट्रोल कमी सोडण्याच्या तक्रारींत सातत्याने वाढ झाली आहे. काही ठराविक पेट्रोल पंपांवर ठराविक किंमतीचे पेट्रोल, नोझलमधील हातचलाखी, सुट्या पैशांचा वाद, ग्राहकांचे लक्ष नसताना मीटरची गती वाढविणे, स्टॅम्पिंगसाठी टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. एकाद्या ग्राहकाने पन्नास रुपयांचे पेट्रोल घेतले आणि दुसऱ्या ग्राहकांना शंभर रुपयांचे पेट्रोल घेतले तर मीटर रिडिंग ‘झिरो’ केले जात नाही. शंभर रुपयांचे पेट्रोल घेतल्यास प्रत्येक पंपावर रिंडीग वेगवेगळे दाखविले जाते. पेट्रोल-डिझेलचा दर सातत्याने बदलतो. मात्र, अनेकदा दर कमी झाला असल्यास, दर बदलाच्या दुसऱ्या दिवशीही जुन्या दरानेच पेट्रोल-डिझेल विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत.

अशा तक्रारींची पडतालणी करून वैधमापन शास्त्र विभागाने वितरकांविरोधात खटले दाखल करण्याची गरज आहे. गंभीर तक्रारी असल्यास पंप जप्त करण्याची कारवाईही करण्याची तरतूद आहे. मात्र तसे धाडस अधिकारी करीत नाही. महाराष्ट्र वैध मापनशास्त्र (अंमलबजावणी) नियम २०११ मधील तरतुदींनुसार पेट्रोलियम पदार्थांच्या अचूक वितरणाची खात्री करण्यासाठी प्रत्येक पंपावर पाच लीटर क्षमतेचे प्रमाणित माप ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, काही पंपांवर प्रमाणित माप नाही. त्याची तपासणीही पथकांकडून केली जात नाही. पंपाची पुनर्पडताळणी व मुद्रांकन दर महिन्याला करणे गरजेचे आहे. तेही होत नसल्याची स्थिती आहे.


संयुक्त तपासणी नाहीच

उत्तरप्रदेशमधील काही पेट्रोल पंपावर एक वर्षापूर्वी चिप बसविल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे केंद्रीय पेट्रोलियम विभागाकडून राज्यातील सर्वच पंपाची तपासणीची मोहिम राबविली. वाहनांत पेट्रोल टाकणाऱ्या डिस्पेन्सरमध्ये चिप बसविली जाते. टाकीत पेट्रोल पडायचे बंद झाले तरी मीटर रिंडिग सुरूच राहते. ही चिप दिल्ली आणि कानपूरच्या बाजारात एक ते दोन हजार रुपयांना मिळत असल्याचेही तपासात पुढे आले होते. कोल्हापुरातही काही पंपांवर इलेक्ट्रॉनिक चिप बसविल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी तपासणीची गरज आहे.

अशी होतेय फसवणूक

सातत्याने नोजल दाबणे : पंपावरील कर्मचारी पेट्रोल भरण्याच्या पाइपजवळील नोजल सातत्याने दाबतात. एकदा स्विच ऑन केल्यानंतर नोजल सारखे दाबून कमी पेट्रोल टाकले जाते. नोजलचा संबंध मीटरशी आहे. पेट्रोल टाकताना नोजलचं स्वीच बंद केला, तरीही मीटर चालू राहते. मात्र पेट्रोल टाकीत पडत नाही. याचा फायदा काही पेट्रोल पंपावर कर्मचारी घेतात. पेट्रोल टाकताना मध्येच स्वीच बंद करतात. त्यामुळे पेट्रोल टाकीमध्ये हळूहळू जाते. दहा सेकंदासाठी जरी स्विच बंद केला तरी ५० रुपयांचे पेट्रोल कमी भरले जाते.

झिरो रिंडिग पाहा : पेट्रोल भरण्यापूर्वी मीटरचं रिडिंग शून्य असल्याची खात्री गरजेची आहे. पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचा संशय आल्यास फिल्टर पेपर परीक्षणाची मागणी ग्राहक करू शकतात. भरलेल्या पेट्रोलच्या रक्कमेची पावती घ्यावी.

चिपमधून चोरी : पेट्रोलच्या मशीनमध्ये एक विशेष चीप बसविली जाते. या चीपला रिमोटने नियंत्रित केले जाते. पंपावरील कर्मचारी चिपला बटणाने नियंत्रित करतो. ग्राहक पेट्रोल भरताना बटण दाबल्यास पेट्रोल कमी पडते. मीटर सुरू असल्याचे ग्राहकांना स्पष्टपणे दिसते. जिल्ह्यातील काही पंपावर चिप वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फिक्स किंमतीचे पेट्रोल नकोच : अनेकदा सुट्या पैशाचा वाद नको म्हणून शंभर, दोनशे रुपयांचे पेट्रोल किंवा डिझेल टाकण्याकडे ग्राहकांचा अधिक कल असते. मात्र ठराविक किंमतीचे पेट्रोल भरल्याचा ग्राहकांना फटका बसू शकतो. काही पंपचालकातील कर्मचारी मशीनची छेडछाड करून वेग वाढवितात. त्यामुळे मीटर जम्प करते. ऑड नंबरचं पेट्रोल टाकल्यास म्यॅनुअली पेट्रोल टाकावे लागेल आणि मीटरही जम्प करणार नाही.

सुट्या पैशांचा घोळ : सध्या पेट्रोलचा प्रतिलिटरचा दर ७७ रुपये ६१ पैसे आहे. डिझेलचा प्रतिलिटरचा दर ६० रुपये ५४ पैसे आहे. एक लिटर पेट्रोल टाकण्यासाठी ग्राहकांकडून ७८ रुपये घेतले जातात. दोन रुपये सुट्टे नसल्याने ८० रुपयांचे पेट्रोल टाकले जाते. काही पंपावर पेट्रोल पाँइटमध्ये कापले जाते. प्रत्येक ग्राहकाला सुट्टे पैसे नसल्याचे पंपधारकांकडून सांगितले जाते. त्यामुळे ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात सातत्याने वाद होतात.



ग्राहकांनी तक्रार केलेल्या पंपावर तातडीने कारवाई केली जाते. गेल्यावर्षी वैधमापन विभाग, पेट्रोलियम कंपनीचे प्रतिनिधी, उत्पादक कंपनी, जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभाग अशी संयुक्त कारवाई करण्यात आली. तक्रारीनुसार देवकर पाणंद येथील जुना पंप सीलही केला होता. पेट्रोलपंप मालकांनी वेळेवर कॅलिबेशन न केल्यास तातडीने नोटिस बजावली जाते.

डी. टी. पवार, सहाय्यक नियंत्रक, वैधमापन शास्त्र



अनेकदा शंभर रुपये दिले तरीही ९९ रुपयांचे पेट्रोल सोडले जाते. अनेक पंपांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांत केवळ हवाच भरली जात असल्याचा अनुभव आहे. मात्र रिडिंग चोख दाखविले जाते. तक्रार केल्यास कंपनीचे विक्री प्रतिनिधी कधीही वेळेवर येत नाही. अनेक तक्रारींना केराची टोपली दाखविली जाते.

मगनलाल जैन, ग्राहक


जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्राहक संरक्षण परिषदेत अनेक मुद्दे मांडले. मात्र, अनेकदा कारवाई करणाऱ्या पथकातील खबऱ्यांकडूनच पेट्रोल पंप चालकांना टिप्स दिली जाते. त्यामुळे कारवाईपूर्वी कर्मचारी सावध होतात. अचानकपणे ऑन दि स्पॉट तक्रार असलेल्या पंपावर कारवाई करणे गरजेचे आहे. कॅलिब्रेशनमध्ये बनवेगिरी करून ग्राहकांची लुबाडणूक केली जाते.

संजय हुकिरे, सदस्य, ग्राहक संरक्षक परिषद



ग्राहकांची फसवणूक करा नका, असा सूचना सर्व पंपधारकांना केल्या आहेत. ग्राहक तक्रार असल्यास पंपावरील तक्रार पेटी, कंपनीचे विक्री अधिकारी, वैधमापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करू शकतात. तक्रार केल्यास आणि तक्रारीत तथ्य असल्यास संबधित कंपनीचे विक्री अधिकारी त्यास न्याय देतात. त्यामुळे ग्राहकांत खोट्या तक्रारी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. चांगले पंप विनाकारण बदनाम होत आहेत.

गजकुमार माणगावे, अध्यक्ष, पेट्रोल डिझेल असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images