Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आजऱ्यात टस्करची दहशत

0
0


म. टा. वृत्तसेवा, आजरा

गेले काही दिवस आजरा शहरालगतच्या कर्पेवाडी बागेनजीकच्या परिसरातील शेतीमधील नुकसानीचे सत्र अवलंबलेला टस्कर आज चक्क आजरा शहरातील न्यायालयाच्या नव्या इमारतीपाठीमागे रात्री सव्वा आठ वाजताच अवतरला. यामुळे आजरा-आंबोली मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांची तारांबळ उडाली. टस्करच्या शहरातील आगमनाने शहरवासीयांता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टस्कर शहरात आल्याने आजरा-आंबोली मार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे डॉ. धनाजी राणे या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आजरा न्यायालयाच्या या इमारतीपाठीमागून टस्कर पुढे आजरा आयटीआय इमारतीच्या प्रांगणाच्या दिशेने सरकला. येथे साळगावनजीक हिरण्यकेशी नदी पात्रानजीक उसाचा मोठा परिसर असल्याने तो तेथे थांबण्याची शक्यता होती. मात्र, तासाभरानंतर हत्ती शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या आयडीयल कॉलनीतच अवतरला. अतिशय शांतपणे तेथील मुसाक दरवाजकर यांच्या घरानजीकच्या झाडावरील फणस खात होता. आवाज आल्याने दरवाजकर कुटुंबीयांनी सुळेधारी पण कमी वयाचा हा टस्कर पाहताक्षणी आरडा-ओरडा करावयास सुरवात केली. वनविभागाचे कर्मचारी वाहनासह तेथे पोहोचले. तरीही शांतपणे टस्कर एकाजागीच थांबून होता. अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी फटाके व सूरबाण लावून तेथून त्याला पळवून लावले. दरम्याच्या काळात संपूर्ण आजरा शहरच जमा झाले होते. शहरातच हत्ती आल्याने नागरिकांनी याबाबत दक्षता पाळावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चर्मकारांसाठी कर्जमर्यादा वाढवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करावा आणि संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग महामंडळामार्फत मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा पाच लाख रुपयापर्यंत वाढवावी असे ठराव चर्मकार समाजाच्या राज्यस्तरीय अ​धिवेशनात करण्यात आले. दरम्यान, समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर व पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाचे (म्हाडा) अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

अखिल महारष्ट्र चर्मकार समाज सेवा संघातर्फे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी झाले. महापौर हसीना फरास यांच्याहस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. माजी आमदार के. पी. पाटील, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा नीता माने, जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, संघटनेचे राम जाधव यांच्या उपस्थितीत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे मेळावा झाला.

संघाचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ मोरे यांनी समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघटित पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. चर्मकार समाजाचा राष्ट्रीय आयोग स्थापन करावा यासाठी समाजाने संघटित ताकद दाखवली पाहिजे असे आवाहन केले.

आमदार राजेश क्षीरसगर म्हणाले की, समाज दुर्लक्षित का राहिला हे पाहण्याची गरज आहे. समाजाच्या राज्य सरकारशी निगडीत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करीन. महापालिकेने संत रोहिदास स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी. स्मारकासाठी आमदार फंडातून पाच लाख रुपयेचे अर्थसहाय केले जाईल.

संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी चर्मकार समाज हा अल्पसंख्याक समाज आहे. संघटनेने गेल्या चार वर्षात १५ जिल्ह्यांत समाजाची बांधणी केली असल्याचे सांगितले.

दलितमित्र अशोक माने म्हणाले की, समाज एकसंध झाला तरच सरकार दरबारी दबावगट निर्माण होईल. समाजातील नागरिकांनी संघटनेच्या पाठीशी ताकद उभी करावी.

समाजातील गायक सदाशिव चौगुले, वास्तुविशारद विषयात पीएचडी मिळवणारे डॉ. राजकुमार चव्हाण, जलतरणपटू राजेंद्र मोरे आणि पंचायत समिती सदस्य सुनील पवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला रमेश टोणपे, विठ्ठल नांगरे, नंदा जाधव, शिवाजी गाडेकर, जीवन पोवार, निवृत्ती पोवार, मनिषा डोईफोडे, जयकुमार कमलाकर, युवराज सातपुते आदी उपस्थित होते.

…………………………………….

कागलमध्ये कर्तबगारांचे सेमिनार

दलित, चर्मकारांसह मागासवर्गीय समाजातील अनेकांनी स्वबळावर उद्योग, व्यापारक्षेत्रात नाव कमाविले आहे. अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. त्यांच्यापासून तरुण पिढीला प्रेरणा मिळावा, त्यांची कर्तबगारी समाजाला समजावी याकरिता सप्टेंबर महिन्यानंतर कागलमध्ये या समाजातील कर्तबगार व्यक्तींचे सेमिनार आयोजित करणार असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.

…………………………….

अधिवेशानातील प्रमुख मागण्या

चर्मकारांनी राष्ट्रीयीकृत बँकेतून घेतलेले कर्ज माफ करावे

संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाकडील कर्जाची माफी

प्रत्येक जिल्ह्यात संत रोहिदास स्मारकाची उभारणी

राज्यातील प्रमुख विद्यापीठांत गुरु रविदास अध्ययन केंद्राची स्थापना

चर्मोद्योग कारागीरांना पेन्शन मिळावे, अॅट्रॉसिटी कायदा कडक करावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोषणांपलिकडे विकास कधी होणार ?

0
0

हरीश यमगर, सांगली

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारबरोबरच सांगलीचे खासदार संजय पाटील यांच्या कार्यकिर्दीच्या तीन वर्षाच्या कालावधीत जिल्ह्याच्या विकासात काय भर पडली, असे विचारले तर खासदारांकडून ‘होय’ म्हणण्यापलिकडे काहीच मिळाले नाही, अशीच सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे. बहुतांशी दुष्काळी असलेल्या या जिल्ह्यातल्या उपसा सिंचन योजना मार्गी लागणे गरजेचे होते. परंतु टेंभू योजना कवठेमहाकाळ तालुक्याच्या काही भागापर्यंत आणण्यापलिकडे खासदारांना फारसे यश आलेले दिसत नाही. पूर्वी टंचाई योजनेतून का असेना, म्हैसाळचे वीजबील भरुन योजनेचे पाणी दिले जायचे. परंतु सत्तापालट झाल्यानंतर वीजबीलाच्या नावे योजना बंदच असते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आचारसंहिता असतानाही सरकारने स्वतः पुढाकार योजना सुरु ठेवली. परंतु निकाल लागताच पंपांनी पुन्हा दम टाकला. ही योजना २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उदिष्ट ठेवून १६४३ कोटींचा निधी देण्याच्या ठोस आश्वासनाच्या पलिकडे खासदार जाऊ शकलेले नाहीत.

सांगलीचा काँग्रेसचा बालेकिल्ला उध्वस्त करुन इतिहास घडविणारे खासदार संजय पाटील हे ‘अच्छे दिन’वाल्यांच्या पंगतीत जाऊन बसल्याने सांगलीकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. सांगलीत प्रचाराला आल्यानंतर खुद्द मोदींनी या परिसराचा ओसाड माळरान असा उल्लेख करुन उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून शिवार हिरवेगार करण्याची हमी दिली. त्यांच्या हमीला जोड मिळावी म्हणून जनतेनेही विक्रमी मताधिक्क्यांनी खासदार पाटील यांना दिल्लीला पाठवले. मात्र, त्यांना दिल्लीत धाडून विकासाकडे डोळे लावून बसलेल्या जनतेला तीन वर्षांनंतरही ठोस काहीतरी मिळालेय, असे वाटत नाही.

सांगली जिल्ह्यातील दहापैकी आठ तालुक्यांना दुष्काळाच्या झळा सतत सहन कराव्या लागतात. त्यातल्या त्यात अधिकच झळा बसणाऱ्या मिरज पूर्व, कवठेमहाकाळ, जत आटपाडी, तासगाव पूर्व, खानापूर या भागाला तर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. उपसा योजना पूर्ण करून त्यांची आवर्तने नियमित करणे हेच जिल्ह्याच्या विकासातील मैलाचा दगड ठरणार आहे. परंतु याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे आणि लोकप्रतिनिधींचा तगादा कमी झाल्याचे दिसत आहे. जनतेला खासदारांकडून अधिक अपेक्षा आहेत. परंतु अद्यापही जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू या योजनांच्या पूर्तीबाबत खासदारांना आश्वासनांपलिकडे काहीच ठोस असे पदरात पाडून घेता आलेले नाही. उमदीपासून पायपीट करत सांगलीत येवून ठिय्या मारणाऱ्या जत तालुक्यातील ४२ गावांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही कायम आहे. टंचाईवेळी याच भागात सर्वात आधी टँकर सुरू करावे लागतात.

खासदार संजय पाटील यांनी तीन वर्षाच्या कार्यकिर्दपूर्तीचा शासकीय योजनांच्या माध्यमातून जी विकासकामे करणे किंवा सर्वसामान्यांना लाभ देणे क्रमप्राप्त आहे अशाच कामांची यादी दिली आहे. व्यतिरिक्त खासदार या नात्याने जिल्ह्याच्या विकासात नव्याने भर घालणाऱ्या गोष्टींची तशी वानवाच आहे. रोजगार निर्मितीकरीता कवठेमहाकाळ तालुक्यातील शेळीमेंढी पालन केंद्राच्या विस्तीर्ण जागेवर रेल्वेच्या वॅगन तयार करण्याचा कारखाना आणण्याचे सूतोवाच खासदारांनी केले होते. परंतु ती आशा धुसर होत आहे. मिरज-पंढरपूर रेल्वेमार्ग आणि त्याला क्रॉस करणारा गुहागर-विजापूर-गुहागर महामार्ग हा योग साधून कवठेमहाकाळ तालुक्यातील ढालगाव परिसरात विस्तीर्ण असा मालधक्का अस्तित्वात येऊ शकतो. तशी जागाही आहे. त्या परिसरात यापूर्वी तत्कालीन खासदार प्रतिक पाटील यांनी वीजनिर्मितीचा महाकाय प्रकल्प उभारण्यासाठी जागेचा सर्वे केला होता. जिल्ह्यात औद्योगिकीकरणाला पोषक वातावरण आहे. हाच धागा पकडून दीपक शिंदे-म्हैसाळकर आणि मिरजेचे गोपाळराजे पटवर्धन यांनी जिल्ह्याच्या विकासाला लाभदायी ठरु शकणाऱ्या मुंबई-बेंगलोर कॉरीडोरमध्ये सांगलीचा समावेश व्हावा म्हणून प्रयत्न केले. त्याला खासदारांनी अधिक पाठबळ देवून पाठपुरावा करणे अपेक्षित होते.

सर्वसामान्य रुग्णांसाठी एकमेव आधार असलेले शासकीय रुग्णालयच सलाइनवर असल्यासारखी परिस्थिती आहे. अद्याही द्राक्ष बागाईतदारांची संधीसाधुंकडून लाखो रुपयांची फसवणूक होतच आहे. बेदाण्यासारखा माल सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी आणि पणन खात्यांच्या माध्यमातून सरकारी कोल्ड स्टोअरजेची उभारणी करता आली असती. विमानतळ राहु द्या, किमान जिल्ह्याच्या ठिकाणी किमान धावपट्टी तरी करता येण्यासारखे आहे. पर्यटनस्थळांच्या परिसरात सुविधा देता येणे शक्य आहे. अशा अनेक गोष्टीं करण्यासारख्या आहेत. पण केवळ अभाव आहे, तो पायाभूत सुविधांच्या परिपूर्तीसाठी झटण्याचा आणि इच्छाशक्तीचा.

मनमाड-बेळगाव , गुहागर -विजापूर या राष्ट्रीय महामार्गांच्या आणि पुणे, मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, विश्रामबाग, किर्लोस्करवाडी, आरग, ताकारी, भिलवडी आदी ठिकाणच्या रेल्वेउड्डाण पूलांच्या मंजूरीसाठी खासदारांनी केलेला पाठपुरावा सत्तकारणी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. संसदेत शुन्यप्रहर आणि नियम ३७७ नुसार औषधांच्या किमतींबाबत, शेतकऱ्यांच्या अर्थिक कोंडीबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. म्हैसाळ बेकायदेशीर गर्भपात प्रकरणही त्यांनी संसदेत मांडले. स्थानिक प्रश्नांवेळी ते धावत जाताना दिसतात. त्याचवेळी ते स्थानिक पातळीवरील वादातही सापडल्याचे दिसतात. सांगलीतील बहुचर्चित वालचंद अभियांत्रिकी महाविद्यलयाच्या मालकीवरून सुरू असलेल्या वादात खासदारांनी उडी घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. आपल्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांबरोबर त्यांचा कलगीतुरा रंगला. आतातर भाजपचे जिल्हाध्यक्ष एका एमटीईचे अध्यक्ष आणि खासदार त्याच नावाच्या संस्थेचे अध्यक्ष झाल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे त्या दोघांतला कलगीतुरा पुन्हा जगासमोर येण्याची शक्यता आहे.

मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गालगतच्या पाचशे मीटरमधील मद्यविक्रीवर निर्बंध आल्याने सांगलीतील अनेक दुकाने, परमीटबार बंद झाले. त्यांची दुकाने पुन्हा सुरू व्हावीत याकरीता खासदारांनी संबधित रस्ते महापालिकेने ताब्यात घ्यावेत, असा अप्रत्यक्षपणे प्रयत्न केल्याचे समोर आले. त्यावेळी त्यांना विरोधकांच्या टोकदार टीकेचे लक्ष्य व्हावे लागले. खासदारांनी असा कोणताही प्रयत्न केला नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पण, अद्यापही रस्ते हस्तांतरणावरुनच त्यांना टिकेचे लक्ष व्हावे लागत आहे.

राजकीय पातळीवरही अपयश

खासदार म्हणून ऐतिहासिक मताधिक्यांनी जनतेने निवडून दिल्यानंतर संजय पाटील यांचा राजकीय ऐरावत रोखणे आता कठीण आहे, असे सुरुवातीला वाटले. तासगाव पालिकेतील राष्ट्रवादीच्या सदस्यांनाच आपल्या बाजूला करुन पालिकेत भाजपची सत्ता स्थापन केली. त्यानंतरच्या पालिका निवडणुकीतही पालिकेत भाजपची सत्ता कायम ठेवण्यात ते यशस्वी झाले. परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. तासगावला जसे झाले, तसेच कवठेमहाकाळलाही झाले. दोन्ही तालुक्यात त्यांनी ताकद लावली होती. लोकसभेच्या निवडणुकीत बरोबर असलेले माजी मंत्री अजितराव घोरपडे त्यांच्यापासून दुरावल्याचा फटकाही त्यांना बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यक व्यवसाय विधेयकाबाबत चर्चासत्र ‘नीमा’च्यावतीने आयोजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांच्या नोंदणी, कायदेशीर हक्क व वैद्यक व्यवसाय संदर्भातील सुधारणांबाबत केंद्र सरकारच्यावतीने मांडण्यात येणाऱ्या नवीन विधेयकाच्यादृष्टीने मा​हिती होण्यासाठी शनिवारी (१७ जून) एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (नीमा) करवीर शाखेच्यावतीने शाहू स्मारक भवनमध्ये चर्चासत्र आयोजित केले आहे.

याबाबत संयोजन अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, केंद्र सरकारने नीती आयोग स्थापन केला आहे. येत्या अधिवेशनात या आयोगाच्या माध्यमातून नवीन विधेयक मांडण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या नोंदणी, कायदेशीर हक्क व वैद्यक व्यवसायासंदर्भात सुधारणा सुचवणारे हे विधेयक असून त्याचे कायद्यात रुपांतर झाल्यास आयुर्वेदिक डॉक्टरांच्या अॅलोपॅथी वापरण्याच्या कायदेशीर हक्कावर बंधने येण्याची भीती आहे. त्यामुळे या विधेयकाची माहिती मुंबईतील ज्ये‍ष्ठ न्यायवैद्यक तज्ज्ञ डॉ. विनायक म्हात्रे या चर्चासत्राच्या माध्यमातून मांडणार आहेत. तसेच निमा संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. सुहास परचुरे, डॉ. चंद्रकांत कोलते, डॉ. कैलाश गौडही मार्गदर्शन करणार आहेत.

संयोजन सचिव डॉ. ऋषिकेश जाधव म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायदा विषयावर डॉ. सुभाष कांबळे, भारतीय गुन्हे विषयक कायदे आणि वैद्यक व्यवसाय विषयावर ज्येष्ठ विधीज्ज्ञ अॅड. शिवाजीराव राणे मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्रातून कायद्याबाबतची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. नोंदणीसाठी लक्ष्मीपुरीतील आयुर्वेद पंचकर्म सेंटरमध्ये संपर्क साधण्यात यावा.

यावेळी डॉ. शैलेंद्र चव्हाण, डॉ. अभिजित मुळीक, डॉ. आदित्य काशिद, डॉ. यशपाल हुलस्वार, डॉ. अरुण मोराळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचे आजपासून ‘कर्जमुक्त होणारच’ अभियान

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी शिवसेनेच्यावतीने ‘मी कर्जमुक्त होणारच,’ अभियान हाती घेतले असून जिल्ह्यात या अभियानाला सोमवारपासून (ता. २९) सुरुवात होणार आहे. कंदलगाव (ता. करवीर) येथे दुपारी १२ वाजता खासदार गजानन किर्तीकर व संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थित अभियानाला सुरुवात होईल.

अभियानामध्ये १२ प्रश्नाची प्रश्नावली शेतकऱ्यांकडून भरुन घेऊन प्रश्नावली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लाँग मार्चद्वारे देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकार बैठकीत दिली.

पवार म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबवण्यासाठी कर्जमाफी हा एकमेव मार्ग आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कार्याध्यक्ष ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे १९ मे रोजी मेळाव्या घेण्यात आला होता. मेळाव्यात शेतकऱ्यांच्या व्यथा बांधावर जाऊन समजून घेण्यासाठी ‘मी कर्जमुक्त होणारच,’ अभियान हाती घेतले आहे. त्याची सुरुवात जिल्ह्यातील कंदलगाव येथून होणार आहे.’

अभियानात शेतकऱ्यांची कौटुंबिक माहिती त्यांची सद्य:स्थिती यावर अधारित १२ प्रश्नांचा समावेश असलेली प्रश्नावली भरुन घेण्यात येणार आहे. कर्जाचा बोजा, पीक विमा योजना, मागेल त्याला कर्ज, भारनियमन आदी प्रश्नांचा समावेश आहे. शेतकऱ्यांकडून भरुन घेतलेली प्रश्नावली प्रथम कार्याध्यक्ष ठाकरे यांच्याकडे जमा करुन लाँग मार्चद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कला, क्रीडा विषयाच्या तासिका कमी करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शालेय शिक्षणाच्या तासिका वेळापत्रकात कला व क्रीडा या विषयाच्या तासिका कमी करण्याचा अध्यादेश यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय रद्द न केल्यास यापुढे होणाऱ्या सरकारी क्रीडा स्पर्धा, क्रीडाविषयक उपक्रम तसेच बालचित्रकला स्पर्धांवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. या मागणीचे निवेदन देण्यासाठी तसेच कला व क्रीडा विषयाच्या तासिका कमी केल्याच्या निषेधार्थ सोमवारी ​जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठचे सभाध्यक्ष एस. डी. लाड यांनी पत्रकार ​परिषदेत दिली. सकाळी ११ वाजता महावीर गार्डन येथून मोर्चाला सुरूवात होणार आहे.

लाड म्हणाले, महाराष्ट्र राज्य कला व शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्यावतीने जिल्ह्यातील पाचशेहून अधिक कला व क्रीडा शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. शालेय शिक्षणात कला व क्रीडा शिक्षण व आरोग्य या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वां​िगण विकासाला चालना मिळाली आहे. मात्र गेल्या काही वर्षात सरकारने या दोन्ही विषयांचे महत्त्व कमी होईल अशाप्रकारे तासिकांमध्ये कपात करण्याचे धोरण अवलंबले आहे. २८ एप्रिल २०१७ रोजी काढण्यात आलेल्या परीपत्रकानुसार पहिली ते दहावीपर्यंतच्या कला व क्रीडा विषयाचे तास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कला व क्रीडामधील गुणांना वाव मिळाला पाहिजे असे बोलले जाते मात्र दुसरीकडे शालेय स्तरावरच या दोन विषयांचे ज्ञान देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या दोन्ही विषयांच्या गुणांचा समावेश एकूण गुणांमध्ये केला जात होता. मात्र नवीन आदेशानुसार हे विषय श्रेणीमध्ये समाविष्ट केल्यामुळे विद्यार्थ्यावर अन्याय झाला आहे. तसेच तासिकांमध्ये कपात केल्यामुळे शिक्षकांनाही वाव नाही. यामुळे भविष्यात अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे.

यावेळी कोल्हापूर जिल्हा कला अध्यापक संघाचे अध्यक्ष दादासाहेब लाड, कोल्हापूर जिल्हा क्रीडा व कला शिक्षण शिक्षकसंघाचे अध्यक्ष आर. डी. पाटील, व्ही. जी. देशमुख, व्ही. जी. पोवार, प्रभाकर आरडे, सी.एम. गायकवाड, राजेश वरक, आर. बी. बुवा, एकनाथ कुंभार, आर . वाय. पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वास नांगरे-पाटील यांच्या गाडीला अपघात

0
0

मटा ऑनलाइन वृत्त। कोल्हापूर

कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या गाडीचा आज दुपारच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात नांगरे पाटील किरकोळ जखमी झाले असून ते सुखरुप असल्याचे समजते.

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईला परतण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर आले. त्यानंतर नांगरे-पाटील कोल्हापूर विमानतळाकडे जात असतानाच हा अपघात झाला. हा अपघात उजळाईवाडीजवळ झाला.



नांगरे-पाटील हे सरकारी गाडीने भरधाव वेगाने जात असताना एका वळणावर त्यांच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात ही गाडी जाऊन पडली. या अपघातात विश्वास नांगरे- पाटील किरकोळ जखमी झाले. नांगरे-पाटील त्यांच्यासोबत असलेले इतर तिघेजण सुखरूप असल्याचेही सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमजानचे रोजे सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यास रविवारपासून प्रारंभ झाला. त्यामुळे शहरातील सर्व मुस्लिम बांधवांची मशिदींमध्ये रोजा सोडण्यासाठी गर्दी होत आहे. रोजा सोडण्यासाठी विविध व्यावसायिक, कामगार एकत्र आल्याचे चित्र दिसले. रोजा सोडल्यानंतर सोमवार सोमवार पेठेतील मटण मार्केटशेजारील इब्राहिम खाटीक चौकातील कसाब मशिद ते बडी मशिद परिसरात गर्दी होत आहे. रोजे सोडल्यानंतर खाद्यपदार्थावर ताव मारण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. या परिसरात खमंग व चटकदार पदार्थ, फळ, सरबते, ज्युसचे स्टॉल लागले आहेत.

रमजान महिन्यात मुस्लिम ध​र्मीय कडक उपवास (रोजे) करतात. सुर्वोदयापूर्वी जेवण करून दिवसभर अन्न, पाणी वर्ज्य करुन कडक रोजे करतात. सध्या उन्हाळा असल्याने आणि दिवस मोठा असल्याने उपवासाचा कालावधी १५ तास इतका आहे. कडक उपवासातही दिवसभर पाच वेळा नमाज आणि दैनंदिन कामे सांभाळून नमाज पठण मुस्लिम धर्मियांकडून केले जात आहे. सायंकाळी सूर्यास्तानंतर सातच्या सुमारास नमाज झाल्यानंतर साखरपाणी, खजूर खाऊन उपवास सोडला जातो. त्यानंतर खाद्य पदार्थांवर ताव मारला जात आहे.

मटण मार्केटजवळील कसबा मशिदजवळ सायंकाळी खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. दुपारी तीन वाजल्यानंतर या परिसराला जाग येत आहे. मटण कबाब, तंदूर, फेरणी, बिर्याणी, फ्रूट सॅलड, अंडा भजी, मिरची, कांदा भजी, खजूर, समोसा, लॉलीपॉप या पदार्थांच्या स्टॉल्सवर दुपारी चारनंतर गर्दी होऊ लागली आहे. मुस्लिम धर्मियांव्यतिरिक्त अन्य धर्मातील व्यक्ती चार वाजल्यानंतर पदार्थाची चव चाखतात. रोजाची नमाज झाल्यानंतर स्टॉल्सवर मोठी गर्दी होत आहे. तंदूर व अन्य खाद्यपदार्थअयांच्या पार्सललाही मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांच्या स्टॉल गर्दी असते.

या काळात मटण, अंडी, चिकनलाही मागणी वाढते. रात्री उशिरापर्यंत मटण मार्केटमधील दुकाने उघडी असतात. खजूर आणि ड्रायफ्रूट्सच्या खरेदीकडेही अधिक ओढा असतो. सध्या आंबा, कलिंगड, सफरचंद, द्राक्षे या फळांचीही बाजारपेठेत बहरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पुरातत्त्व’चे अधिकारी पाहणी करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाई मूर्तीवर संवर्धन प्रक्रियेनंतरही काही प्रमाणात पांढरे डाग पडल्याचे दिसत आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांनी सोमवारी स्पष्ट केले. याबाबत संवर्धन प्रक्रिया राबवलेल्या औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क करून या आठवड्यात तज्ज्ञांकडून मूर्तीची पाहणी करण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालानंतर मूर्ती संवर्धनासंबंधी निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रासायनिक प्रक्रियेनंतर अंबाबाई मूर्तीची झीज होत असल्याची दखल घेत देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर औरंगाबादमधील ‘पुरातत्त्व’चे अधिकारी मिश्रा यांच्याशी संपर्क साधला. मूर्तीवर पडत असलेल्या डागाबाबतची माहिती दिली. ‘पुरातत्त्व’च्या तज्ज्ञ व्यक्तींनी मूर्तीची पाहणी करावी, अशी विनंती केली. त्यावर मिश्रा यांनी देवस्थानचे पत्र मिळाल्यानंतर आठवड्यातच पुरातत्त्वचे अधिकारी मूर्तीची पाहणी करण्यासाठी पाठवू, असे आश्वासन दिले. त्यानुसार देवस्थान समितीच्यावतीने दोन दिवसांत पत्र पाठविण्यात येणार आहे.

यावेळी देवस्थान सचिव विजय पोवर, श्रीपूजक केदार मुनिश्वर उपस्थित होते.

सोमवारी सकाळी मूर्तीची पाहणी केली. मूर्तीवर काही प्रमाणात पांढरे डाग असून याबाबतची अधिक माहिती पुरातत्व विभागाचे अधिकारी सांगू शकतील. त्यांच्याशी संपर्क साधला असून, ते मूर्ती पाहणी करतील. त्यांच्या अहवालानंतर निर्णय घेण्यात येईल.

- अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थलांतराला हरकतींचा अडसर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महामार्गांलगत ५०० मीटर अंतरातील दारू विक्री बंद करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिल्यानंतर ही दुकाने इतरत्र स्थलांतरीत करण्यासाठी विक्रेत्यांची धावपळ सुरू आहे. मात्र, दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी नागरिकांमधून जोरदार विरोध सुरू आहे. गेल्या दीड महिन्यात स्थलांतराचे १२१ अर्ज दाखल झाले. तर तितक्याच तोंडी तक्रारी राज्य उप्तादन शुल्क विभागाकडे आल्या आहेत. दरम्यान, मोक्याच्या जागांसाठी विक्रेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. यातून वादाचेही प्रसंग उद्भवत आहेत.

महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी सुप्रिम कोर्टाने महामार्गांलगत ५०० मीटर अंतरातील दारू विक्रीची दुकाने इतरत्र हलवण्याचे आदेश दिल्याने १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. अंतरात सवलत मिळवण्यासह रस्ते हस्तांतरणासाठी दारू विक्रेत्यांनी मोहीमच सुरू केली होती. मात्र अपेक्षित यश न आल्याने दुकाने स्थलांतरीत करण्याची धावपळ विक्रेत्यांकडून सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दारू विक्रीची दुकाने, बिअर बार, वाईन शॉपी यांची संख्या १३५५ आहे. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे यातील ८८७ दुकानांना टाळे लागले. यातील १२१ दुकान मालकांनी स्थलांतराचे प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत.

विशेष म्हणजे दारू दुकानांच्या स्थलांतराचे जितके प्रस्ताव आले आहेत, तितक्याच हरकतीही दाखल झाल्या आहेत. यातील २४ तक्रारी लेखी आहेत. तक्रारींची मोठी संख्या असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांच्या स्थलांतराला परवानगी देणे टाळले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी तीन दुकानांच्या स्थलांतराला परवानगी दिली, तर विद्यमान जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी एका दुकानाच्या स्थलांतराला परवानगी दिली आहे. उर्वरित ११७ विक्रेते अद्याप स्थलांतराच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

दारू दुकानांच्या स्थलांतराला नियमांनीही ब्रेक लावला आहे. देशी दारू, वाइन शॉपी आणि बिअर शॉपीसाठी दोन दुकानांमध्ये किमान ५०० मीटर अंतराची अट आहे. शहरात दुकानांची संख्या अधिक आहे. यातील बहुतांश दुकाने मोक्याच्या ठिकाणी आहेत. शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत मोठी हॉटेल्स आणि परमिट रुम आहेत. या दुकानांना केवळ वाईन शॉपी किंवा बिअर शॉपी इतरत्र हलवणे शक्य नाही, त्यामुळे हॉटेल्स मालक रस्ते हस्तांतरणासाठी प्रयत्नशील आहेत. रस्ते हस्तांतरणाला महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांकडून हालचाली सुरू नसल्याने हा पर्यायदेखील रखडला आहे.

मारामारी आणि दमदाटी

स्थलांतरीत दारू दुकानांसाठी विक्रेत्यांमध्ये प्रचंड चढाओढ सुरू आहे. मोक्याची जागा आपल्यालाच मिळावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क आणि महसूलमधून फिल्डिंग लावली जात आहे. काही विक्रेते बळाचाही वापर करीत आहेत. यातूनच थेट राज्य उत्पादन शुल्क विभागात विक्रेत्यांमध्ये मारामारीचीही घटना घडली. स्थलांतराच्या प्रस्तावांना विरोध करणे, दमदाटी करणे यामुळे विक्रेत्याममध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

अशा आहेत अटी

परमिट रुमसाठी सर्वत्रच ७५ मीटरची अट.

वाइन शॉपी, देशी दारू आणि बिअर शॉपीसाठी एकाच प्रकारच्या दोन दुकानांमध्ये ५०० मीटर अंतराची अट.

देशी दारू, वाईन शॉपी आणि बिअर शॉपीसाठी महापालिका क्षेत्रात मंदिरे, शाळा, बसस्थानकांपासून ५० मीटर, नगरपालिका आणि ग्रामीण परिसरात १०० मीटरची अट.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयाकडे लक्ष

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बाजवण्यात आलेल्या नोटिशींवर आज बँकेच्या आजी माजी संचालक व व्यवस्थापकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे म्हणणे सादर केले. बँकेच्या हिताला बाधा येईल असे कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत. त्यामुळे बँकेचे आर्थिक नुकसान झाले नसल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. लेखापरीक्षण अहवाल आणि संचालक, व्यवस्थापकांनी मांडलेल्या म्हणण्याची तपासणी करून जिल्हा उपनिबंधक निर्णय देणार आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक, व्यवस्थापकांवर सहकार कायदा ८८ नुसार चौकशीची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

बँकेच्या २०१५-१६ या आर्थिक वर्षात लेखापरीक्षकांनी गंभीर दोष व अनियमितता निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे कारवाईची शिफारस केली होती. त्यानुसार करवीचे सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून कलम ८३ नुसार चौकशी केली. चौकशीमध्ये बँकेच्या २०१५-१६ च्या आर्थिक वर्षात ताळेबंदामध्ये दाखवलेला दोन कोटी ५१ लाखांचा नफा बोगस असून संचालकांनी ४७ लाख ४६ हजारांचे बँकेचे नुकसान केल्याचा ठपका ठेवाला होता. त्यानुसार कलम ८८ नुसार चौकशी होण्यापूर्वी सर्व आजी-माजी संचालकांनी विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे यांच्याकडे अपील करून कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यानुसार डोईफोडे यांनी संबंधितांचे म्हणणे ऐकून घेण्याची सूचना जिल्हा उपनिबंधकांना केली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी सर्वांना नोटिसा काढून म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार सोमवारी सर्व संचालकांच्यावतीने सीईओ मोहन भारते यांनी दोन पानी लेखी म्हणणे सादर केले. लेखापरीक्षण अहवाल, प्राधिकृत अधिकाऱ्यांचा अहवाल व संचालकांनी सादर केलेल्या म्हणण्याची तपासणी करून यावर जिल्हा उपनिबंधक निर्णय देणार आहेत. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बँकेचे आर्थिक नुकसानीचा ठपका ठेवला असल्याने त्यांचा हा निर्णय कायम ठेवल्यास सर्व आजी-माजी संचालकांसह व्यवस्थापक अशा ४० जणांवर कलम ८८ नुसार चौकशीची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिम्मत असेल तर चर्चेला या

0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

शेतकरीहिताचे निर्णय घेत असल्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पराभूत करून भारतीय जनता पक्ष देशात एक नंबरचा पक्ष बनला आहे. पंधरा वर्षांत त्यांनी जे केले नाही ते आम्ही अडीच वर्षांत केले. हिम्मत असेल तर विरोधकांनी एका व्यासपीठावर येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करावी,’ असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले.

इस्लामपुरात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना काही काम नाही. ते सकाळी-दुपार गाळ काढत फिरत आहेत, असे जयंत पाटील म्हणतात. ते खरे आहे. कारण गेल्या पंधरा वर्षांत त्यांच्या सरकारने करून ठेवलेला गाळ काढण्याचे काम मला करावे लागत आहे. आम्ही शेतकरीविरोधी असतो तर जनतेने सत्ता दिली नसती. गेल्या पंधरा वर्षांत यांनी शेतकऱ्यासाठी काहीच केले नसल्याने लोकांनी आम्हाला मते देऊन त्यांना चपराक लगावली आहे. शेतकरीहिताचे निर्णय घेतल्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळाला. ज्यांना राजकारणापेक्षा समाजकारण करायचे आहे, असे चांगले लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आम्ही शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवले आहेत, असा आमचा दावा नाही. पण, लोकांना आमच्या प्रामाणिकपणावर विश्वास असल्यामुळेच ते आमच्या पाठिशी आहेत.’

ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत ९९ टक्केच्यावर एफआरपीचे पेमेंट केले आहे. कारखान्यांना बिनव्याजी रक्कम दिली. ही रक्कम देताना हे राज्य कारखानदारांचे नाही, शेतकऱ्यांचे पैसे तातडीने द्या, असे बजावले. केंद्र सरकारने एफआरपी वाढवून देण्याचाही निर्णय घेतला.’

मला खलनायक करण्याचा प्रयत्न

कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ‘सदाभाऊ काय करणार याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. मी कुठेही जाणार नाही. मी फक्त एकच करणार ते म्हणजे शेतकऱ्याची कर्जमुक्ती. शेतकऱ्याच्या बांधावर काळ्या मातीची सेवा शेवटपर्यंत करणार आहे. मी अनेक वादळे पहिली. त्यांना पुरून उरलो. अनेकदा तुरुंगात गेलो. आता दोन हात करायला तयार आहे. मला खलनायक करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण लक्षात ठेवा, मलाही पेरणी करता येते. मी घात आल्यावर पेरणी करतो. कणसे आली कि मचाण उभारतो आणि गोफण घेतो. माझी गोफण तुटेल पण, कणसाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतो.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरेंच्या सत्काराला मुख्यमंत्री येणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणा समूहाचे संस्थापक आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक माजी आमदार विनय कोरे यांना डी. लिट. पदवी मिळाल्याबद्दल जून महिन्यात पन्हाळा येथे नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या समारंभाला उपस्थित राहू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. जनसुराज्य पक्षाच्या आणि जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची सोमवारी विमानतळावर भेट घेऊन त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली. जिल्हा परिषद निवडणुकीत कोरे हे भाजप आघाडी सोबत होते. शिवाय त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अधूनमधून सुरू असतात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन हे नवी समीकरणे निर्माण करणारे आहे.

मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गारगोटी येथील कार्यक्रम संपल्यानंतर एकाच हेलिकॉप्टरमधून कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. लातूर येथे हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना ताजी असल्याने मुख्यमंत्र्याच्या कोल्हापूर दौऱ्यावर चोख बंदोबस्त होता. विमानतळ परिसरात पोलिस फौजफाटा तैनात होता. सहा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री व पालकमंत्री विमानाने मुंबईला रवाना झाले. दरम्यानच्या कालावधीत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली.

डॉ. डी. वाय.पाटील विद्यापीठाने नुकतेच पुणे येथे माजी आमदार कोरे यांना डी. लिट. पदवी देऊन सन्मानित केले. कोरे यांच्या सहकार, राजकारण, समाजकारण, अर्थकारणातील योगदानाबद्दल या पदवीने सन्मानित केल्याने त्यांचा पन्हाळा येथे नागरी सत्काराचे नियोजन सुरू आहे. जून महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात नागरी सत्कार होणार आहे. या नागरी सत्कार सोहळ्याला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे याकरिता जनसुराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिष्टमंडळात पन्हाळा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अवधूत भोसले, नगरसेवक चेतन भोसले, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती विशांत महापुरे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, शिवाजी मोरे, पंचायत समिती सदस्य अनिल कोंदूरकर, संजय माने, रणजित शिंदे, माजी नगराध्यक्ष विजय पाटील आदींचा समावेश होता.

खासदार संभाजीराजेंनी घेतली भेट

खासदार संभाजीराजे छत्रपती, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी विमानतळावर मुख्यमंत्र्याची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट ही सदिच्छा भेट असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. संभाजीराजे व मुख्यमंत्री यांच्यामध्ये काही वेळ चर्चाही झाली. अध्यक्षा शौ​मिका महाडिक यांनीही पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्याचे स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायगडावर ३२ मण सोन्याचे सिंहासन

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

‘हिंदुस्थानला प्रेरणादायी ठरेल, असे ३२ मण (१२८० किलो) वजनाचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सोन्याचे सिंहासन पुनर्स्थापित करण्यात येणार आहे. या कार्यपुरतीचा कालावधी निश्चित करता येणार नाही. परंतु, राजकीय पक्ष किंवा नेत्यांची मदत घेणार नाही. आम्ही समाजासमोर हात पसरणार आहोत. तीन जून रोजी रायगडावरुन या संकल्पाची घोषणा होईल,’ असे श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सोमवारी यांनी ये‌थे सांगितले.

ते म्हणाले, ‘याबाबतचा व्यवहार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असा पूर्णतः कॅशलेस पद्धतीचा असेल. परंतु, सिंहासन पुनर्स्थापित करताना सरकारची कोणतीही, कसल्याही प्रकारची परवानगी घेणार नाही, सरकारच्या दारात जाणार नाही, आम्ही सरकार मानत नाही.’

भिडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर वयाच्या ४४व्या वर्षी ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर आरुढ झाले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर रायगड मोगलांच्या हातात गेला. त्यांनी गडावरील सर्व वस्तू, वास्तू, ऐतिहासिक कागदपत्रे जाळली. ३२ मण सोन्याचे सिंहासन तुकडे करून पळविले. या घटनेला ३२९वर्षे झाली आहे, असे प्रेरणादायी ३२ मण म्हणजे १२८० किलो सोन्याचे सिंहासन पुनर्स्थापित करण्याचा संकल्प रायगडावरुन सोडण्यात येत आहे. त्या दिवशी रात्री नऊ वाजता संकल्प कार्यक्रम सुरू होऊन तो दुसऱ्या दिवशी सकाळी संपणार आहे. यावेळी सुमारे दोन लाखावर समुदाय गडावर उपस्थित राहील. त्या ठिकाणी येणाऱ्यांनी पुरेल इतके चार वेळचे जेवण, पाणी घरातूनच आणायचे आहे. भगवा फेटा बांधावाच लागणार आहे. बरोबर पेन आणि वही असावी. दोन व्याख्याने आणि अन्य कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थितांना हिंदवी स्वराज्य व्रताची शपथ दिली जाणार आहे, अशा संपूर्ण कालावधीत अन्य कुणाची, कसलीही मदत घ्यायची नाही. निधी संकलनासाठी संस्थेचे नाव जाहीर करण्यात येईल. कुणीही रोख रक्कम स्वीकारायची नाही. ती केवळ बँकेच्या खात्यावरच जमा झाली पाहिजे, अशा सक्त सुचनाही सर्वांना देण्यात येणार आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर-पुणे पॅसेंजरमध्ये दाम्पत्याला मारहाण

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

महिला प्रवाशाला पाय लागल्याच्या कारणावरून पुण्याला निघालेल्या प्रवाशी दाम्पत्याला अकरा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी सोलापूर-पुणे पॅसेंजर ट्रेनच्या जनरल डब्यात घडली. याप्रकरणी अकरा आरोपींना दौंड पोलिसांनी अटक केली असून गुन्हा कुर्डुवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

माढा येथून पुणे (औंध, हनुमाननगर मंदिरामागे, इंदिरा वसाहत, गणेशखिंड) येथे जाण्यासाठी भीमराव लक्ष्मण भोसले हे पत्नी प्रेमा तसेच भाची साक्षी सुनील खरात (वय १०) आणि अन्य सदस्यांसह निघाले होते. माढा येथून गाडी सुटली. पॅसेंजर डब्यात गर्दी होती. दरम्यान दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास कुर्डुवाडी ते पारेवाडी दरम्यान डब्यात बसलेल्या एका महिलेला साक्षीचा पाय लागला आणि वादाला तोंड फुटले. या क्षुल्लक कारणावरून अकरा जणांच्या टोळक्याने भोसले, त्यांची पत्नी प्रेमा, भाची साक्षी आणि अन्य सहकाऱ्यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. अकरा जणांनी इतका हैदोस घातला की भांडण सोडविण्यास येणाऱ्या प्रवाशांवरही ते अंगावर धावून गेले. रक्तबंबाळ अवस्थेत भोसले आणि भाची तसेच त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांनी दौंड येथे पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

दरम्यान, दौंड पोलिसांनी या गाडीतून प्रवास करणारे आणि भोसले यांनी मारहाण करणारे जावेद शेख, महादेव साळवे, सुनील भोसले, गणेश नगरे, महादेव ढवळे, सागर शिंदे, पद्मेश नगरे, अशोक साळवे, गणेश शेलार, पैगंबर तांबोळी आणि विशाल नगरे (सर्व राहणार पारेवाडी, ता. करमाळा) अशा ११ आरोपींना अटक केली. अमानुष मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. या गुंडांना कठोर शिक्षा करण्याची मागणी महिलांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चाहूल मृग नक्षत्राची

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेले दोन महिने तळपत्या उन्हाने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना मंगळवारी दिलासा मिळाला. पावसाच्या हलक्या सरी, ढगाळ वातावरण आणि हवेत निर्माण झालेला गारवा यांमुळे प्रत्येकजण सुखावला. शहरात रात्री उशीरापर्यंत संततधार सुरू होती.

केरळमध्ये प्रवेश केलेल्या मान्सूनची चाहूल, कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्याला लागल्याने सामान्य माणसासह शेतकरी सुखावला. या पावसामुळे येत्या आठवड्यात पेरण्यांच्या कामाला वेग येणार असून, ग्रामीण भागात शेतीच्या कामांची धांदल सुरू होणार आहे.

पावसाने दिवसभर अधूनमधून कोल्हापुरात हजेरी लावली. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. सकाळी दहाच्या सुमारास शहराच्या उपनगरात पावसाच्या सरींनी हजेरी लावली. त्यानंतर पावसाची उघडझाप सुरू होती. शहरात काही भागांत ढगाळ वातावरण तर, काही भागात स्वच्छ कडक ऊन, असे वातावरण होते. दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा काही भागात हलका शिडकावा झाला. अधून-मधून आलेल्या या सरींमुळे वातावरणात दुपारीपासूनच गारवा निर्माण झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास पुन्हा शहराच्या काही भागात पावसाने हजेरी लावली, तर सायंकाळीस सातनंतर संततधार सुरू झाली.

त्यामुळे पावसाच्या हजेरीने सायंकाळी अनेकांची धांदल उडाली. विशेषतः फेरीवाले आणि व्यवसायिकांना व्यवसाय बंद करावा लागला.

जवळपास फेब्रुवारीपासून उन्हाचा तडखा सहन करणाऱ्यांना शहरवासीयांसाठी हे आल्हाददायक वातावरण सुखावणारे होते.

मध्यंतरी काही दिवस वळवाच्या सरींनी हजेरी लावल्याने उकाडा कामी झाला होता. पण, त्यानंतरही गेल्या काही दिवसांत असह्य उकाडा जावणत होता. मंगळवारच्या पावसामुळे मात्र वातावरणातील बदल अधोरेखीत झाला आहे. वळीव चांगला झाला, पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. आता केरळमध्ये दाखल झालेला मान्सून येत्या काही दिवसांत कर्नाटक, गोव्याच्या सीमा ओलांडून घाटमाथ्यावर कोल्हापुरात दाखल होणार असल्याने शेतकरी आणि सामान्यांत चैतन्याचे वातावरण आहे.

कसबा बावडा : बुधवारी दिवसभर पावसाळी वातावरण होऊन सायंकाळी तुरळक पाऊस झाला. सकाळी ढगाळ हवामान होते तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडल्या. दुपारच्या दरम्यान वादळी वाहत होते. सायंकाळी पाचच्या सुमारास काही वेळ पावसाच्या हलक्या सरी पडल्या आणि मान्सूनच्या आगमनाच्या चाहुलीने शेतकरी सुखावून गेला.

शेतकरी सुखावला

मान्सूनपूर्व पावसाने वेळेआधीच जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतींना यापूर्वीच वेग आला आहे. त्याचबरोबर जेथे धूळवाफ पेरणी झाली आहे त्यासाठी हा पाऊस अतिशय पोषक मानला जातो. यामुळे पिकांची उगवणक्षमता वाढणार आहे. मंगळवारचा पाऊस आणि गेल्या दोन दिवसांतील पोषक वातावरण यामुळे बियाणे आणि औषध विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषद, वन, सामाजिक वनीकरणाची आघाडी

0
0

satish.ghatage@timesgroup.com

twitter:@satishgMT

कोल्हापूर ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सात लाख ३८ हजार रोपलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार वन विभाग, सामाजिक वनीकरण विभागाबरोबर जिल्हा परिषदेने मोठी आघाडी घेतली आहे. वनखाते चार लाख ४५ रोपांची लागवड करणार आहे. त्यासाठी सर्व खड्डे मारुन तयारी ठेवली आहे. जिल्हा परिषदेने दोन लाख १९ हजार ५८० रोपलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून दोन लाख पाच हजार २५६ खड्डे तयार करण्यात आले आहेत. एक जुलै ते १० जुलै या कालावधीत वृक्षलागवड होणार आहे.

गेल्यावर्षी २०१६ मध्ये राज्य सरकारने राज्यात दोन कोटी रोपांची लागवड करण्याचे संकल्प केला होता. कोल्हापूर जिल्ह्यात सात लाख ८२ हजार रोपे लावली होती. त्यापैकी एप्रिल २०१७ अखेर सहा लाख ५९ हजार रोपे वाचली आहेत. हे प्रमाण ८३.८३ टक्के आहे. यावर्षी एक जुलैला वृक्षलागवड होणार असून जिल्ह्यात आठ लाख १७ हजार रोपे लावण्याचे लक्ष्य आहे. वनखाते चार लाख, सामाजिक वनीकरण ६७ हजार अन्य विभाग एक लाख ६५ हजार तर जिल्हा परिषदेला एक लाख ७७ हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. पण जि.प.ने उद्दिष्टांपेक्षा जादा म्हणजे दोन लाख १९ हजार ५८० रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार दोन लाख पाच हजार २५६ खड्डे मारुन ठेवले आहेत. बारा तालुक्यातील ग्रामपंचायत विभाग, प्राथमिक व माध्यमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्य, ग्रामिण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, बांधकाम विभागाला लक्ष्य देण्यात आले आहे. ग्रामपंचायत विभागाला दोन लाख सहा हजार रोपे लावणार आहे.

गेल्यावर्षी वृक्षलागडीसाठी रोपांची टंचाई जाणवली होती. जिल्हा प्रशासनाने खासगी नर्सरीमधून रोपे खरेदी केली होती. हा अनुभव लक्षात घेऊन वन विभाग, सामाजिक वनीकरणाने रोपे तयार करण्याचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. गेल्यावर्षीची ४६ हजार रोपे तयार असून यावर्षी २२ लाख ४५ हजार रोपे तयार झाली आहे. पुढील वर्षी १३ लाख ८७ रोपे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिल्लक रोपांची नर्सरीमध्ये देखभाल केली जात आहे. जेवढी रोपे मोठी तेवढे झाडे जगण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे नर्सरीत शिल्लक राहणारी रोपे उंचीने मोठी असल्याने रोपे जगण्याचे प्रमाण जास्त असेल, असा दावा वनविभागकडून केला जात आहे.


जिल्हा परिषदेने गेल्यावर्षी एक लाख ९८ हजार ३५२ रोपांची लागवड केली होती. त्यापैकी एक लाख ६० हजार २८ झाडे म्हणजे ८९.६९ टक्के रोपे वाचली आहेत. हा अनुभव लक्षात घेता यावर्षीही जिल्हा परिषदेने तयारी केली आहे. दोन लाख १९ हजार ५८० रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले असून जिल्हा परिषदेचे सर्व विभाग हे लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावी परीक्षेत कोल्हापूर विभागात यंदाही मुलींनीच बाजी मारली. मात्र मुलांच्या टक्केवारीच्या तुलनेत तब्बल १०.४९ टक्के जास्त मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. कोल्हापूर विभागाचा निकाल ९१.४० टक्के लागला असून विभागात सातारा जिल्हा अव्वल ठरला.

कोल्हापूर विभगाचा गेल्यावर्षीचा निकाल ८८.१० टक्के होता. या तुलनेत यंदा एकूण निकाल‌ही वाढला. मंडळाचे विभागीय अध्यक्ष व्ही. बी. पायमल यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत निकाल जाहीर केला. विभागात सातारा जिल्हयाने तर राज्यात कोकण विभाग पहिला आला आहे. राज्यात आणि विभागात कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर तर सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला. गेल्यावर्षीच्या तुलनेत विभागात कोल्हापूरचा पहिला क्रमांक चार टक्क्यांनी हुकला.

बारावी परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ७६३ कनिष्ठ महाविद्यालयातील १४६ केंद्रांवर परीक्षा झाली होती. मंगळवारी वेब‌साइटवरील निकाल पाहण्यासाठी शहरातील नेट कॅफेमध्ये विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती. इंटरनेट सुविधा असलेल्या अनेकांनी मोबाईलवरच निकाल पाहिला. अपेक्षे‌इतके गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

तीन जिल्ह्यांतून १ लाख २६ हजार ९७० विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज भरले. त्यापैकी १ लाख २६ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १ लाख १५ हजार ८६३ विद्यार्थी पास झाले. पुनर्परीक्षेसाठी ५ हजार ९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांपैकी केवळ १८९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तिन्ही जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५ टक्क्यांवर राहिले. मुलांचे प्रमाण ८४ टक्क्यांच्या जवळपास आहे.



उत्तीर्ण मुलींची जिल्हानिहाय आकडेवारी (कंसात परीक्षेला बसलेल्या मुलीची संख्या)

सातारा – १६५१३ (१७२८५), सांगली – १४९१० (१५६९०), कोल्हापूर – २१७७२ (२२७८२). एकूणमध्ये सातारा जिल्हात ३८६५९ ‌विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३५४३८ विद्यार्थी पास झाले. सांगली जिल्ह्यातून ३५९८८ पैकी ३२६७४ विद्यार्थी तर कोल्हापूर जिल्ह्यातून परीक्षा दिलेल्या ५२११४ विद्यार्थ्यांपैकी ४७७५१ विद्यार्थी त्तीर्ण झाले.



गुणपत्रिका ९ जूनला शाळेत

गुणपत्रिकेची साक्षां‌किंत प्रत ९ जून रोजी संबंधित शाळांत तीन वाजता दिली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची आहे त्यांनी ९ जूनअखेर विभागीय मंडळाच्या कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे. नापास विद्यार्थ्यांसाठी ११ जुलैपासून फेरपरीक्षा प्र‌क्रिया सुरू होणार आहे.



यंदाही मुलीच आघाडीवर राहिल्या. अगदी कमी टक्क्याने कोल्हापूर जिल्ह्याचा पहिला क्रमांक हुकला. परीक्षा काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या. त्याचा सकारात्मक परिणाम झाला.

व्ही. बी. पायमल, अध्यक्ष, कोल्हापूर विभागीय मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरचा निकाल ८९ टक्क्यांवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेत राज्यात कोल्हापूर विभागने दुसरा क्रमांक मिळवला. कोकण विभागाने पहिला क्रमांक तर तिसरा क्रमांक पुणे विभागने मिळवला.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुणवत्ता यादी जाहीर करण्याचे बंद केले आहे. त्यामुळे विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती जाहीर झाली नसली तरी बहुतांश कॉलेजांनी शाखानिहाय पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक जाहीर ‌केले. मंडळाने विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी तज्ज्ञ व त्यांचे मोबाइल क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. मात्र मंगळवारी निकालाच्या दिवशी एकाही विद्यार्थ्याने तज्ज्ञास संपर्क साधला नाही. नापास क‌िंवा कमी गुण मिळाल्यानंतर तणावातून कसे मुक्त व्हावे, चांगले गुण मिळाल्यानंतर पुढील करिअर कोणते निवडावे, यासंबंधीचे मार्गदर्शन मिळण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती मंडळाने केली आहे.

विवेकानंद कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिवाष्णू कापसे (९५.३८ टक्के), शिरीष चौगुले (९४.९२), प्रतिक मोरे (९४) तर कॉमर्स शाखेमध्ये सुमीत नेचनाळी (९३.५४), नम्रता पाटील (९३.८), मनीष वालेचा (९२.६२) आणि आर्टस शाखेमध्ये मानषी वांगीकर (८७.६९), मुस्कान मुजावर (८७.३८), ऋतुजा मोरे (८६.४६) यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक‌ मिळवला.

ताराराणी विद्यापीठच्या कमला महाविद्यालयाचा बारावीचा विज्ञान शाखेचा ९२. १६ टक्के, वाणिज्य शाखेचा ९८.३२ टक्के तर कला शाखेचा ८५. ९४ टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेत प्राजक्ता सासमिले (८७.८५), ज्योती डावरे (७९.३८), वैभवी उथळे (७८.६२) वाणिज्य शाखेत जयश्री पाटील (८८), विभावरी जगदाळे (८८), हर्षदा पाटील (८७.०७) तर कला शाखेत वर्षा दुधाळे (८६.३०), अपुर्वा माने (८५.२३), आरती पाटील (८२.६१) यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळवला.

समुपदेशकांशी साधा संपर्क

विभागातील समुपदेशक व त्यांचे मोबाइल क्रमांक

कोल्हापूर – ‌शशिकांत कापसे (९१७५८८०००८)

एस. एस. कोंडेकर (९४२११०९७२१)

रवींद्र पायमल (९८२२३०७१४१)

टी. आर. मोरे – (९४२०३५३४३०).

सांगली – एन. डी. बिरनाळे – (९३७१४७४९९०)

नेहा वाटवे ( ९८५००५७६३०)

एन. ए. पाटील (९६६५३०८००८).

सातारा - पी. एस. पवार (९४२३८०४२४९)

अकुंश डांगे (९८२२२२००४१)

सचिन नलवडे (९७६६९२२६०५).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुटखा, तंबाखूची विक्री सुरूच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने कॅन्सरसारख्या भयानक आजारांचा सामना करावा लागतो. यातून उद्भवणाऱ्या आजारांमुळे देशात रोज शेकडो कुटुंबे उद्धवस्त होत आहेत. मरणयातनांचा भोग वाट्याला येऊ नये, यासाठी राज्य सरकारने २०१२ मध्ये गुटखाबंदीचा निर्णय घेतला. याशिवाय तंबाखू विक्रीवरही मोठ्या अक्षरात वैधानिक इशाऱ्यासह गुटख्यापासून होणाऱ्या गंभीर परिणामांचे छायाचित्र छापणे बंधनकारक केले, तरीही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री कमी झालेली नाही. याउलट खुलेआम विक्री सुरू असल्याची वस्तुस्थिती आहे.

देशात इतर कोणत्याही आजारांपेक्षा तंबाखुमुळे होणारे आजार अधिक गंभीर स्वरुपाचे आहेत. तंबाखुमधील निकोटीन थेट शरीरात जाऊन ते फुफुस, आतडी, अन्ननलिका यावर गंभीर परिणाम करते. पचन व्यवस्था उद्धवस्त करणारे निकोटीन माणसांच्या मृत्युलाही कारणीभूत ठरते. सतत तंबाखू आणि गुटखा सेवनामुळे अनेकांचे चेहरे विद्रूप झाले आहेत. शस्त्रक्रियेने आजार आटोक्यात आले तरीही यातना संपत नाहीत, त्यामुळेच तंबाखू सेवनापासून होणारे आजार टाळण्यासाठी तंबाखूचे सेवन टाळणे हाच पर्याय उरतो.

स्वस्तात नशा देणारी आणि सहज उपलब्ध होणाऱ्या तंबाखूचा विळखा संपूर्ण देशाला आहे. थेट तंबाखूसह सिगारेट, सिगार, विडी, मसेरी (दंतमंजन) अशा विविध पद्धतीने तंबाखुचे सेवन केले जाते. सामान्यांपासून ते थेट मंत्र्यांपर्यंत अनेक लोक तंबाखुचे व्यसनी होतात आणि वेळ निघून गेल्यानंतर त्यांना व्यसनाच्या परिणामांची जाणीव होते. राज्यातील काही मंत्रीदेखील तंबाखू सेवनाने कॅन्सरच्या विळख्यात सापडले. याशिवाय रोज शेकडो तरुण तंबाखू सेवनाने उद्भवणाऱ्या कॅन्सरचे बळी ठरत आहेत. तंबाखूह तंबाखूजन्य पदार्थामुळे वाढणारे विकार आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारने २०१२ मध्ये गुटखा बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता, मात्र याच्या अंमलबजावणीत कधीच गांभीर्य दिसले नाही.

राज्यातील गुटखा निर्मिती, वितरण आणि विक्री यावर राज्य सरकारने निर्बंध घातल्यानंतर गुटख्याचे दर वाढले एवढाच काय तो फरक पडला आहे. राज्यात आजही गुटखा निर्मितीचे छुपे कारखाने सुरूच आहेत. याशिवाय कर्नाटकातून येणारा गुटखा थेट मुंबईपर्यंत पोहोचतो. विक्री सुरू ठेवण्यातही मोठे आर्थकारण दडले आहे. वितरक थेट दुकानांमध्ये गुटखा पोहोच करतात, पण तो पोलिसांच्या नजरेत कधीच येत नाही. अन्न व औषध प्रशासन तर केवळ उदिष्टापुरत्या कारवाया करून थांबते, त्यामुळे विक्रेत्यांचे फावते.

वैधानिक इशारा न छापलेली विदेशी शिगारेट विक्री शहरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या दीड महिन्यात लक्ष्मीपुरी पोलिसांनी तीन ठिकाणी छापे टाकून सुमारे चार लाख रुपयांची विदेशी शिगारेट जप्त केली. इतर ठिकाणीही अशा पद्धतीच्या शिगारेट विकल्या जातात, मात्र कारवाई कधीच होत नाही. बंदी असूनही गुटख्यासह तंबाखुजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याने बंदीचा हेतू साध्य होत नाही. त्यामुळे तंबाखू विरोधी जाणीवजागृती करण्यावरच भर द्यावा लागणार आहे.

शाळांच्या आवारातही गुटखा विक्री

शाळा, महाविद्यालयांपासून कमान १०० मीटर अंतरात गुटखा आणि तंबाखूची विक्री करू नये, असा नियम आहे, मात्र शाळांच्या आसपास असलेल्या किराणा दुकानांमध्येही गुटखा विक्री सुरू असते. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात बिस्किट, चॉकलेट विक्री करणारे विक्रेतेही छुप्या पद्धतीने गुटखा आणि तंबाखुची विक्री करतात. हा गंभीर प्रकार शाळा प्रशासनासह पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाकडूनही दुर्लक्षित केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images