Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

...तर कामावर येऊ नका!

$
0
0

Udaysing.patil
@timesgroup.com

Tweet : @udaysingpatilMT

कोल्हापूर : वैद्यकीय कारणासाठी दिर्घ रजा काढायची आणि त्यानंतर मेडिकल बोर्डाचे फिटनेस सर्टिफिकेट न देता हजर व्हायचे या प्रकाराला महापालिका आयुक्तांनी चाप लावला आहे. दिर्घ मुदतीच्या रजेनंतर महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. अरुण वाडेकर यांना कामावर हजर राहण्यासाठी मेडिकल बोर्डाचे सर्टिफिकेट सादर करण्यास सांगितले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रथमच मेडिकल बोर्डाचे सर्टिफिकेट सादर करण्यास सांगण्यात आल्याने महापालिकेतील अधिकारी वर्गात अस्वस्थता पसरली आहे.

महापालिकेचे आरोग्याधिकारीपद म्हणजे शहराचे आरोग्याबाबतच्या विविध निर्णयांची अंमलबजावणी करणारे पद आहे. या विभागाबाबत नगरसेवक व नागरिकांच्या थेट तक्रारी असल्याने हे पद अतिशय संवेदनशील मानले जाते. दररोजच्या कचरा उठावपासून ते रुग्णालयातील सेवांबाबत आरोग्याधिकारीच जबाबदार असल्याने त्यांच्यावर महापालिकेतील स्थायी समितीपासून सर्वसाधारण सभेमध्ये नेहमी हाच विभाग टार्गेटवर असतो. अशा परिस्थितीमुळे ठोक मानधनावरील डॉ. दिलीप पाटील यांच्यानंतर महापालिकेकडील वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील कुणी या पदासाठी इच्छूक नव्हते. त्यामुळे प्रभारी कार्यभार देऊन कामकाज चालवले जात होते. अशा परिस्थितीत डॉ. वाडेकर यांची नेमणूक केली गेली.

वाडेकर यांनी फेब्रुवारीमध्ये दिर्घ मुदतीची रजा टाकली होती. वैद्यकीय कारणांसाठी जवळपास तीन महिन्याच्या रजेवर ते गेले होते. त्यानंतर १८ मे रोजी वाडेकर कामावर रुजू होण्यासाठी आले. त्यावेळी आयुक्त डॉ. चौधरी यांनी वैद्यकीय कारणासाठी दिर्घ मुदतीची रजा घेतली असेल तर नियमित मेडिकल सर्टिफिकेटऐवजी मेडिकल बोर्डाकडून फिटनेस सर्टिफिकेट सादर करण्यास सांगितले. त्यामुळे वाडेकर अद्यापही कामावर हजर झालेले नाहीत. त्यांचा प्रभारी कार्यभार डॉ. अरुण परितेकर यांच्याकडेच आहे. महापालिकेतील अधिकाऱ्याला मेडिकल बोर्डाचे सर्टिफिकेट सादर करण्यास सांगण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. अधिकाऱ्यांच्या पातळीवरच शिस्तीचा बडगा उगारला गेल्याने प्रशासनातील ‘आओ, जाओ घर तुम्हारा’ या प्रकाराला बराच आळा बसण्यास मदत होणार आहे.

किरकोळ रजांसाठी घ्या परवानगी

आतापर्यंत अधिकाऱ्यांच्या किरकोळ रजांसाठी परवानगी घेणे आवश्यक केले नव्हते. पण नवीन आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह सर्व विभागप्रमुखांच्या किरकोळ रजांसाठी मंजुरी आवश्यक केली आहे. त्यामुळे आयुक्तांची परवानगी असल्याशिवाय अधिकाऱ्यांना किरकोळ रजेवर जाता येणार नाही. यामुळे अनेकवेळा स्थायी सभा वा सर्वसाधारण सभा असेल तर किरकोळ रजा टाकून जाण्याचे प्रकार काही अधिकारी करत होते. त्यांना या नव्या नियमामुळे प्रतिबंध होणार आहे.


आरोग्याचे प्रश्न गंभीर, तरीही

शहरात सध्या कचरा उठावपासून त्याच्यावरील प्रक्रियेबाबतचा प्रश्न गंभीर आहे. झूममधील कचरा प्रकल्पावरील इनर्ट मटेरियल हलवण्याची प्रक्रिया करायची आहे. यासाठी सातत्याने केल्या जात असलेल्या विरोधामुळे आरोग्य विभागाच्या प्रमुखांची भूमिका महत्वाची असते. त्यांच्याकडूनच शहराचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाय करण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत. काही स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शहरात ठिकठिकाणी छोट्या प्रमाणावर कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या उपक्रमाला चालना देण्याची आवश्यकता होती. आता पावसाळा तोंडावर असताना नाल्यांच्या सफाईचा प्रश्न महत्वाचा होता. शहरात अनेक ठिकाणच्या नाल्यांची स्वच्छता झालेली नाही. अशा परिस्थितीत आरोग्याधिकाऱ्यांची आवश्यकता असते. मात्र तेच रजेवर असल्याने प्रभारींच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षकांकडून कामकाज चालवले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फळ विक्रेत्याचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहू मार्केट यार्डासमोर रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या गंभीर जखमी फळ विक्रेत्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. केरबा अर्जुन कांबळे (वय ४५, रा. शेणवडे ता. गगनबावडा) असे त्यांचे नाव आहे. केरबा यांच्या डोक्यावर खोलवर जखमा असल्याने हा अपघाती मृत्यू नसून, त्यांचा वाटमारीतून खून झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, केरबा कांबळे हे फणस, आंबे, चिवे, बांबू विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गेल्या १५ दिवसांपासून ते कोल्हापुरात मार्केट यार्डासमोर जाधववाडीकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला फणस विक्री करत होते. दिवसभर फणसांची विक्री करुन ते रात्री फूटपाथवरच झोपत होते. मंगळवारी सकाळी परिसरात फिरायला आलेल्या नागरिकांना ते रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडल्याचे आढळले. नागरिकांनी या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी कांबळे यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यावर, मानेवर, हनुवटीवर तीक्ष्ण आणि खोलवर जखमा आहेत. घटनास्थळी संशयास्पद स्थितीत हा मृतदेह आढळल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.

दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी मृताच्या कपड्यांची तपासणी केली असता कांबळे यांची ओळख पटली. ते शेणवडे (ता. गगनबावडा) येथील असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुले, आई असा परिवार आहे. सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती देशमुख तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूल वाढवा, पगार अन् प्रमोशन घ्या

$
0
0

Gurubal.Mali @timesgroup.com
Tweet:@gurubalmaliMT

कोल्हापूर : प्रमोशन आणि पगारवाढ हवा असेल तर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करा आणि तेथील कचऱ्याचा प्रश्न सोडवा असा आदेशच राज्य सरकारने काढला आहे. महसूल आणि वन खात्यानंतर महापालिका आयुक्तांनादेखील सरकारने ‘केआरए’ लागू केल्याने त्यांना महसूलवाढीसाठी नियोजनबद्ध काम करावे लागणार आहे. रखडलेल्या प्रकल्पांना गती देणाऱ्या आयुक्तांनाही खास बक्षिस मिळणार आहे.

राज्यातील बहूसंख्य महापालिकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. जकात सुरू असताना महापालिकांना चांगले उत्पन्न मिळत होते. पण ती बंद झाल्याने उत्पन्नाचे मोठे स्त्रोत थांबले. नंतर राज्य सरकारने एलबीटी घेण्यास संमती दिली. त्यामुळेदेखील काही वर्षे महापालिकांना विकासकामांबरोबरच प्रशासकीय खर्चासाठी महसूल मिळत होता. पण तोसुद्धा बंद झाल्याने सध्या सरकारी अनुदानावरच त्यांना अवलंबून रहावे लागते. हे अनुदान कमी असल्याने मिळणाऱ्या अनुदानातून कर्मचारी व अधिकाऱ्यांचा केवळ पगार आणि प्रशासकीय खर्च होतो. यामुळे महापालिकांच्या हद्दीतील विकासकामांना मात्र खो बसत आहे. विकासकामे होत नसल्याने जनतेत नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनीच महसूल वाढीसाठी प्रयत्न करावेत यासाठी नवा आदेश सरकारने लागू केला आहे.

राज्य सरकारने आयुक्तांना केआरए (फलनिष्पती क्षेत्रे) लागू केला असून उत्पन्नवाढ आणि स्वच्छतेला त्यामध्ये अधिक महत्व दिले आहे. महापालिकेच्यावतीने वसूल होणाऱ्या सर्व करांची ९० टक्यांपेक्षा जादा वसुली करून महापालिकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करा आणि पगारवाढ मिळवा अशी अट यामध्ये घालण्यात आली आहे. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी आयुक्तांनी प्रयत्न करावेत यासाठी जीआयएस प्रणालीचा वापर करण्यास सुचवण्यात आले आहे. बऱ्याच महापालिकेत काही प्रकल्प निधीअभावी व अन्य कारणांनी रखडले आहेत. त्यामध्ये नगरोत्थान, अमृत योजना, स्मार्ट सिटीज याबरोबरच जेएनएनयूआरएम योजनेतील प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प तातडीने सुरू करून लवकर पूर्ण करणाऱ्या आयुक्तांना जादा गुण देण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या कामकाजाबाबत काही तक्रारी असतात. त्या लोकशाही दिनबरोबरच इतर माध्यमांतून आयुक्तांपर्यंत येतात. काही खर्चाबाबत महालेखापाल आक्षेप घेतात. न्यायालयात अनेक प्रकरणे वर्षानुर्षे प्रलंबित असतात. याबाबतही आयुक्तांनी निर्णय घेत महापालिकेचा कारभार गतिमान केल्यास त्यालाही जादा गुण देण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व आयुक्तांना आता केआरएनुसार काम करावे लागणार आहे. त्याच्यावरच पगारवाढ आणि प्रमोशन अवलंबून असल्याने आयुक्तांना चांगलीच धावपळ करावी लागणार आहे.

स्वच्छतेला प्राधान्य

शहर स्वच्छता आणि घनकचरा विलगीकरणास याला केआरएमध्ये जादा गुण देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील स्वच्छतेचा मुद्दा उचलून धरल्याच्या पार्श्वभूमीवर या केआरएमध्ये तब्बल ४० गुण यासाठी धरण्यात आले आहेत. त्यामुळे जो आयुक्त हे काम चांगले करेल, त्याला जादा पगारवाढ तर मिळणार आहे. शिवाय प्रमोशनदेखील मिळणार आहे. २ ऑक्टोबर २०१७ पर्यंत संपूर्ण शहर हागणदारीमुक्त करण्याचे मोठे आव्हान सर्व आयुक्तांपुढे असणार आहे. यात ते यशस्वी न झाल्यास दहा गुणांचा फटका बसणार आहे.

कोल्हापूर आयुक्तांसमोर मोठे आव्हान

कोल्हापुरात रूजू होताच महापालिकेतील अधिकाऱ्यांना केआरए लागू करणारे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनाही केआरए लागू झाला आहे. महापालिकेचे उत्पन्न कमी आहे. नगरोत्थान, कचरा प्रकल्प, कत्तलखाना यांसह अनेक प्रकल्प रखडले आहे. केवळ दरवाढ करत उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जुन्या अधिकाऱ्यांची मानसिकता बदललेली नाही. रखडलेल्या आणि सध्या सुरू असलेल्या सर्वच प्रकल्पांबाबत तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर नुतन आयुक्त चौधरी यांना काम करावे लागणार आहे. कचरा प्रकल्पच बंद असल्याने आणि उत्पन्नाचे स्त्रोत कमी असल्याने शहर विकासाचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटकविरोधात न्यायालयात दाद मागू

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘जय महाराष्ट्र’ म्हणणाऱ्या सदस्यांवर कारवाई करण्याबाबत कर्नाटक सरकारने कायदा केल्यास त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल,’ असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पाटील हे महाराष्ट्र व कर्नाटक सीमाप्रश्नाचे समन्वय मंत्री असून त्यांनी याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र पाठवले आहे.

कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग हे सोमवारी बेळगाव दौऱ्यावर होते. स्थानिक स्वराज्य संस्थातील सदस्यांनी जय महाराष्ट्र म्हटल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव विधानसभेत आणण्यात येणार असल्याचे त्यांनी या दौऱ्यात सांगितले. यामुळे महाराष्ट्रात या विधानाबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री पाटील यांनी तातडीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्र व कर्नाटकचा सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. अशावेळी बेग यांचे हे विधान बेजबाबदारपणाचे आहे. याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन त्यांना समज द्यावी. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने असा कोणताही निर्णय घेतल्यास त्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

.....


महाराष्ट्र सरकार कर्नाटकला मदत करत असताना सीमावासीयांवर अन्याय करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे तो संतापजनक आहे. यामुळे यापुढे असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही.

चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरमध्ये संतप्त पडसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्नाटकचे नगर विकासमंत्री रोशन बेग यांनी सीमाभागात ‘जय महाराष्ट्र,’ घोषणा दिल्यास पदाधिकाऱ्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा कायदा करण्याचे सूतोवाच केल्यानंतर मंगळवारी कोल्हापुरात संतप्त पडसाद उमटवले. सर्वस्तरांतून बेग यांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत बसस्थानकात आलेल्या कर्नाटकातील बसवर ‘जय महाराष्ट्र’चे फलक झळकवले. कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

अचानक झालेल्या या आंदोलनाने बसस्थानकांत गोंधळ उडाला. मात्र प्रवाशांना आंदोलनाची माहिती समजताच काही प्रवाशांनीही घोषणा द्यायला सुरूवात केली. कर्नाटक विरोधातील घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

शिवसेनेचे नेते संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे, दुर्गेश लिंग्रज, राजू जाधव, राजू यादव, रवी चौगुले, संभाजी भोकरे, शशी ‌बीडकर आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाहू नाक्यावर कर्नाटक बस अडवली. बसमधील चालक, वाहकांना ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यास भाग पाडले. त्यानंतरच त्यांची सुटका करण्यात आली.

ठाकरेंकडून ‌अभिनंदन

मंत्री बेग यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन केल्याबद्दल कोल्हापूरच्या शिवसैनिकांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोबाइलवर संपर्क साधून अभिनंदन केले, असे संजय पवार यांनी पत्रकारांना सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या कारभाराचे पितळ उघडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

​कायदा व सरकारी आदेशाबाबत सफाई कामगारांच्या असलेल्या अज्ञानाचा गैरफायदा उठवत महापालिका प्रशासनाने चालवलेल्या मनमानी कारभाराचे पितळ राज्य सफाई कर्मचारी आयोगाने उघडे पाडले. कामकाजात एक तरतूद नोंद आहे, सांगितले जाते दुसरेच आणि कागदावर असते तिसरेच असा प्रशासनाचा कारभार आयोगानेच उघड केला. नेमणुकीपासून ते निवृत्तीनंतरचे हक्काचे पैसे देण्यापर्यंतच्या कामात हेतू पूर्ण केल्याशिवाय हालचाल केली जात नसल्याचे थेट दाखले देत प्रशासनाला निरपेक्ष पद्धतीने प्रशासन चालवण्याचा आयोगाने गर्भित इशारा दिला आहे. त्यामुळे यंत्रणेने प्रचंड सुधारणा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन आयुक्तांनाही प्रशासनातील ‘या’ कारभाराचे दर्शन घडले असून त्यादृष्टीने कामाला शिस्त लावण्यासाठी तातडीने पाऊले उचलली पाहिजे.

सफाई कामगार म्हणजे रस्त्यावरचा कामगार. एकदा नेमणूक मिळाली की नेमलेला रस्ता व मुकादम हेच त्यांचे प्रशासनाशी नाते असते. फारच गरज भासल्यास कामगार संघटनेच्या कार्यालयात जाऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे महापालिकेतील प्रशासनातील यंत्रणेशी त्यांचा थेट संबंध येतच नाही. ​शिक्षण नसल्याने सरकारने केलेल्या कायद्याची तसेच नवनवीन आदेशांची माहिती होणे दूरच असते. मुकादम, कामगार संघटनेचे नेते जे सांगतील ती पूर्व दिशा मानली जात असल्याने सफाई कामगार म्हणजे गरीब बिचारी, कुणीही हाका असा प्रकार सुरु झाला आहे. यातूनच मनमानी कारभाराला वाव मिळत गेला आहे.

कामगारांच्या नेमणुकीसाठी आकृतीबंध ठरलेला असतो. त्यानुसार रिक्त असलेल्या पदांवर नेमणुकीसाठी आग्रह धरला तर प्रस्तावच असा तयार करायचा की त्यामध्ये त्रुटी असतील. परिणामी प्रशासनाकडून मागितले जाणारे मार्गदर्शन व वरिष्ठ पातळीवरील मंजुरीच्या जंजाळात कित्येक वर्षे नेमणुकाच रखडवल्या जातात. प्रशासकीय खर्च, आकृतीबंधाची मर्यादा अशी कारणे सांगत नव्या नेमणूक केल्या जात नाहीत. तसेच सफाई कामगारांच्या वारसांना नेमणूक देत असताना तर नाना तऱ्हेच्या अडचणी निर्माण करुन ठेवल्याचे आयोगाने साऱ्यांसमोर उघड केले. एकदा वारस नेमल्यानंतर मागितले जाणारे संमतीपत्र, कामगार संघटनेकडून घेतला जाणारा अभिप्राय, कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रकार अशा निर्माण केलेल्या अडचणी त्यातीलच एक भाग आहेत.

२० वर्षे सेवा झाल्यानंतर ऐच्छिक निवृत्ती घेता येते. त्यासाठी मेडिकल सर्टिफिकेटची आवश्यकता नसताना येथे सक्ती केली जात आहे. ही अडवणूकच आहे. सफाई कामगारांना आवश्यक साहित्य देण्याची तरतूद आहे. पण अनेकदा हे साहित्य कमी दर्जाचे असते तर अनेकवेळा ते दिलेच जात नाही. कुणाला विचारायचे असे म्हणत कामगार धोकादायक परिस्थितीत काम करत राहतात. त्यांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. शहराचे आरोग्य जपणाऱ्या या घटकाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचेच दिसते.

कामगारांच्या वारसांची शैक्षणिक पात्रता पाहून त्यांना इतर पदांवर नेमणूक देता येते. पण येथील प्रशासनाने आपल्याला हवा तसा अर्थ लावत अशा वारसांना पुन्हा सफाई कामावर नियुक्त करण्याचा प्रकार गंभीरच आहे. निवासस्थाने, निवृत्तीनंतर घराची सुविधा, हक्काच्या सुटी, कामगारांच्या वस्तीमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्षच आहे. प्रशासन या साऱ्यांकडे फार गांभीर्याने पहात नाही, हे आयोगासमोर माहिती देत असताना केलेल्या चुकांमधून दिसून येते. मुख्य आरोग्य निरीक्षकांनी दहा अतिरिक्त सुटी तर कामगार युनियनच्या प्रतिनिधींना बारा सुटी दिल्याचे सांगितले. प्रशासनाने दुकान गाळे दिले नसल्याचे सांगितले तर ​युनियनच्या प्रतिनिधींनी आतापर्यंत चार गाळे दिल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटारू टोळ्यांची दहशत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सुट्ट्या सुरू होताच चोरटे सक्रीय होतात आणि घरफोड्या वाढतात. यंदा घरफोड्यांसह वाटमारीच्याही घटना वाढल्या आहेत. कोल्हापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या तावडे नाका परिसरात लुटारूंनी चार दिवसांत तिघा तरुणांना लुबाडले, तर वर्दळीच्या स्टेशन रोडवरही दोन तरुणांना दमदाटी करून लुटण्याचा प्रकार घडला. याशिवाय लुटारू टोळ्यांच्या दहशतीने शहरालगतचे नाके आणि निर्जन रस्तेही धोकादायक बनले आहेत. यामुळे शहराची सुरक्षितताच धोक्यात आली आहे.

पुणे-बेंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूर शहरात प्रवेश करणारा मुख्य मार्ग तावडे हॉटेलपासून सुरू होतो. तावडे हॉटेल ते शिरोली टोल नाका परिसरात मोठा ओढा असल्याने या ठिकाणी दुकाने किंवा घरेही नाहीत. काही परप्रांतीय विक्रेत्यांच्या झोपड्या रस्त्यालगत आहेत, मात्र रात्रीच्या अंधारात या झोपड्याही सामसूम असतात. फारशी वर्दळ नसलेली ही जागा लुटारूंनी वाटमारीसाठी हेरली असून, गेल्या चार दिवसांत वाटमारीच्या दोन घटना या एकाच ठिकाणी घडल्या आहेत. दुचाकीवरून जाणारे दोघे या परिसरात लघुशंकेसाठी थांबले असता, लुटारूंनी दमदाटी करून त्यांच्याकडील रोख रकमेसह किमती मोबाइल काढून घेतले. सोमवारी रात्री घडलेल्या प्रकारात लुटारूंनी एका तरुणाकडील तीस हजाराची रोख रक्कम घेऊन पोबारा केला. या दोन घटनांनी तावडे हॉटेल परिसरातील लुटारूंची दहशत स्पष्ट झाली आहे.

पुणे, मुंबईहून येणाऱ्या आणि पुढे बेळगाव, बेंगळुरूकडे जाणाऱ्या काही खासगी ट्रॅव्हल्स कोल्हापुरात उतरणाऱ्या प्रवाशांना तावडे हॉटेल परिसरातच उतरवतात. रात्री उशिरा आलेल्या प्रवाशांना शहरात जाण्यासाठी रिक्षा न मिळाल्यास त्यांना खासगी वाहनधारकांकडून लिफ्ट घ्यावी लागते. अनेकदा प्रवाशांना पायी चालत शहरात पोहोचावे लागते. अशावेळी तावडे हॉटेल ते शाहू मार्केट यार्ड हा परिसर अगदीच निर्मनुष असतो. याचाच गैरफायदा लुटारूंकडून घेतला जात आहे. या परिसरात शाहूपुरी पोलिसांची नियमित गस्तही नसते. महामार्गाच्या पूर्वेला गांधीनगर पोलिसांची हद्द आहे, तर पश्चिमेला शाहूपुरी पोलिसांची हद्द आहे. गांधीनगर पोलिस महामार्गापर्यंत गस्त घालतात. शाहूपुरी पोलिसांची गस्त शाहू मार्केट यार्डपर्यंत असते, मात्र तावडे हॉटेल परिसरात अपवादानेच पोलिस आढळतात असा प्रवाशांचा अनुभव आहे. पोलिसांचा वावर नसल्याने रात्रीच्या अधारात या ठिकाणी लुटारूंचा वावर वाढला आहे.

याशिवाय शहरातील स्टेशन रोड या वर्दळीच्या मार्गावरही लुटारूंनी दहशत निर्माण केली आहे. वाटसरूंना धमकावून त्यांचे किमती मोबाइल हातोहात लंपास केले जात आहेत. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात तर पर्स लांबवणाऱ्या महिलांच्या टोळ्या सक्रीय आहेत. यातील एक महिला पोलिसांच्या हाती लागली, मात्र अन्य चोरटे अद्याप पोलिसांना सापडले नाहीत. राजाराम तलाव, शाहू नाका, शेंडा पार्क, सायबर चौक ते संभाजीनगर रिंग रोड या मार्गांवरही वारंवार लूटमारीच्या घटना घडत असल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे धोकादायक बनले आहे.


महामार्गही असुरक्षित

पुणे-बेंगळुरू महामार्गावरून रात्री उशिरा कागल पंचतारांकित एमआयडीसी, गोकुळ शिरगाव आणि शिरोली एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांना प्रवास करावा लागतो. या कर्मचाऱ्यांना अनेकदा लुटारू टोळ्यांचा सामना करावा लागला आहे. दुचाकीच्या आडवे वाहन मारून दमदाटी करून लुटणे, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वाठार ते कागल दरम्यान दर आठवड्याला एखादी लुटीची घटना घडतेच. यातील सर्वच घटनांची नोंद पोलिस ठाण्यात होतेच असे नाही.


सांगली मार्गावरील दहशत कायम

कोल्हापूर ते सांगली मार्ग वाटमारीसाठी पूर्वीपासूनच बदनाम आहे. हातकणंगले परिसरातील मजले खिंड, हातकणंगले ते पेठवडगाव मार्गावरील आळते खिंड हे रात्रीच्या प्रवासासाठी डेंजर झोन झाले आहेत. कुंथुंगिरी डोंगर आणि बाहुबली मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर तर भरदिवसा लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा परिसर आजही सुरक्षित नाही. पोलिसांनी गस्त वाढवूनही या मार्गांवरील लुटीच्या घटना कमी झालेल्या नाहीत.


लूटमारीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांना विशेष सूचना दिल्या आहेत. रेकॉर्डवरील चोरट्यांच्या चौकशीसह काही संशयित ठिकाणांवर पोलिसांची गस्त वाढवली आहे. लवकरच लुटारू जेरबंद होतील.

संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तावडे हॉटेल परिसरात पुन्हा वाटमारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तावडे हॉटेल परिसरात सोमवारी रात्री पुन्हा वाटमारीची घटना घडली. २२ मे रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास तीन लुटारूंनी रवी अशोक माने (वय २९, रा. प्रयाग चिखली, ता. करवीर) या तरुणाला अडवून धमकावत त्याच्याकडील तीस हजार रुपये लंपास केले. परिसरात गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा वाटमारीचा प्रकार घडल्याने पोलिसांसमोर लुटारूंना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

शाहूपुरी पोलिसांनी सांगितले की, रवी माने हा प्रयाग चिखलीतील नवीन वसाहतीमध्ये राहतो. त्याचा आतेभाऊ सिद्धू कोळेकर याला ३० हजार रुपयांची गरज होती. त्यामुळे रवी याने मित्र उमेश श्रीपती पाटील याच्याकडून उसने पैसे मागितले. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास उमेशकडून पैसे आणण्यासाठी रवी गांधीनगरातील गुरूनानक मार्केटमध्ये गेला. त्याने ३० हजार रुपये असलेली प्लास्टिकची पिशवी दुचाकीच्या हँडलला अडकवली. घरी परतताना तावडे हॉटेल ते शिरोली टोलनाक्यादरम्यान ओढ्यावरील पुलावर स्प्लेंडर मोटारसायकलवरून आलेल्या तीन तरुणांनी त्याला अडवले. एकाने रवी याची गळपट पकडून दमदाटी केली, तर इतर दोघांनी दुचाकीच्या हँडलला अडकवलेली ३० हजार रुपये ठेवलेली कॅरीबॅग घेऊन कावळा नाक्याच्या दिशेने पोबारा केला. माने याने लुटारूंचा पाठलाग केला, मात्र ते सापडले नाहीत. तिघांनीही तोंडाला मास्क लावले होते. शाहूपुरी पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून लुटारूंचा शोध सुरू केला. मात्र ते सापडले नाहीत.

मास्क गँग सक्रीय

रवी माने यांना धक्काबुक्की करून लुटणारे लुटारू मजबूत बांध्याचे होते. त्यांनी तोंडावर मास्क लावला असल्याने चेहरा ओळखता येत नव्हता असे त्यांनी पोलिसांना सांगितले. यापैकी एकाने बिनबाह्यांचा टी शर्ट आणि जिन्सची पॅँट घातली होती. दुसऱ्याने काळा टी शर्ट आणि जिन्सची पँट घातली होती. चार दिवसांपूर्वीच्या वाटमारीतील संशयितांचे वर्णन अशाच पद्धतीचे आहे. त्यांनीही तोंडावर मास्क लावले होते. त्यामुळे तावडे हॉटेल परिसरात मास्क गँग सक्रीय आसल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिकारी नसतील तर बैठक कशाला?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थायी समिती बैठकीची ‌तारीख पूर्वनियोजित होती. तरीही महत्वाच्या विभागांचे ‌अधिकारी रजेवर कसे जातात? प्रभारी अधिकारी निर्णय घेण्यास सक्षम आहेत का? अ‌धिकारी रजेवर जाणार असतील तर बैठक का बोलावली? असा सवाल मंगळवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत उपस्थित करण्यात आला. यावरून सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले. वसंतराव नाईक सभागृहातील सभेत समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. अध्यक्षा शौमिका महाडिक या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी घुले यांनी कामकाजाची माहिती दिली. सदस्य अरूण इंगवले यांनी अधिकारी रजेवर गेल्याचा प्रश्न उपस्थित केला. सदस्य युवराज पाटील यांनीही यासदुजोरा दिला. यावर घुले यांनी, ‘सीईओ प्रशिक्षणासाठी गेलेत. मे महिना आहे. शाळांना सुटी आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी रजेवर आहेत. कार्यभार असलेले अधिकारी उपस्थित आहेत’ असे सांगितले.

‌शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे म्हणाले, ‘कागलकर हाऊसमध्ये आरोग्य विभागाचे औषधांचे गोडाऊन आहे. तेथे मुदत संपलेली औषधे अस्ताव्यस्त पडलेली आहेत. प्रचंड अस्वच्छता आहे. गोडाऊनमध्ये वाईट अवस्था का?’ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी, ‘गोडाऊनमध्ये स्वच्छता ठेवण्याची सूचना दिली जाईल. मुदत संपलेली औषधे त्या-त्या वेळी बाजूला काढण्याचे आदेश देऊ’ असे सांगितले.

सदस्य राजवर्धन निंबाळकर म्हणाले, ‘शिरोळ तालुक्यातील सात शाळा दुर्गमध्ये बसण्यास पात्र आहेत. तरीही त्या सुगम यादीत आहेत. हे चुकीचे आहे.’ घाटगे यांनी, ‘सुगम-दुर्गम शिक्षक बदलीचे प्रकरण न्यायालयात गेले आहे. बदली प्र‌क्रियेस न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यावर ‌भाष्य करता येणार नाही’ असे सांगितले. समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाचे साहित्य खरेदीला मुदतवाढ दिल्याचा विषय चर्चेला आला. समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांनी समितीने निर्णय घेतल्याने मुदतवाढ दिल्याचे सांगितले. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी हरीष जगताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्र्रजित देशमुख आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंबा जेल सुरक्षेच्या टप्प्यात

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर ः कैद्यांची गांजा पार्टी आणि चिकन पार्टीने बदनाम झालेल्या कळंबा कारागृहाची सुरक्षा वाढवण्यासाठी कारागृहाच्या सर्व बराकींसह तटबंदीवर ८० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. कारागृह विभागासह जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या विशेष निधीतून कारागृहात सुरक्षेचा तिसरा डोळा कार्यान्वित करण्यात आला आहे. २४ तास सुरू राहणाऱ्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण जेलवर पोलिसांना विशेष नजर ठेवता येणार आहे.

दीड वर्षापूर्वी कळंबा कारागृहात कैद्यांनी गांजा आणि चिकन पार्टी झोडली होती. या प्रकाराची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने कारागृहातील सुरक्षा ऐरणीवर आली होती. यानंतर कारागृह अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारलेले शरद शेळके यांनी संपूर्ण कारागृह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत आणण्यासाठी कारागृह विभागासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही प्रस्ताव दिले होते. या दोन्ही प्रस्तावांचा पठपुरावा केल्याने कळंबा कारागृहासाठी नवीन ६५ सीसीटीव्ही कॅमेरे, सर्व्हर आणि सुसज्ज केंट्रोल रुमसाठी निधी उपलब्ध झाला. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी विशेष बाब म्हणून कारागृहातील सुरक्षेसाठी १२ लाख ४३ हजार रुपये मंजूर केले, तर कारागृह विभागाने ३६ लाख रुपये मंजूर केले. या निधीतून कारागृहातील अंडा सेल, सर्व बराकी आणि तटबंदीवरही सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. विशेष म्हणजे सर्व कॅमेऱ्यांमधील एक महिन्याचा डाटा सर्व्हरमध्ये सेव्ह करण्याची व्यवस्था केली आहे. यात दोन स्वयंचलित कॅमेरे आहेत. ९० अंशाच्या कोनात फिरून सुमारे ५०० मीटर अंतरातील सूक्ष्म हालचालीही टिपण्याची क्षमता या कॅमेऱ्यांची आहे. यापूर्वीचे १५ कॅमेरेही नवीन यंत्रणेत जोडल्याने कारागृहात एकूण ८० कॅमेरे सुरू झाले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढून कॅमेरे बसवण्याचे काम केले असून, पाच वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीच्या कमावरही सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष ठेवणार आहे. बराकींमधील काही कॅमेरे छुप्या पद्धतीने बसवले आहेत, तर कॅमेऱ्यांचे वायरिंगही जमिनीखालून असल्याने कॅमेरे आणि वायरिंगशी छेडछाड होणार नाही. कारागृहाच्या तटबंदीवर आणि आतील रिकाम्या जागेत मोठ्या क्षमतेचे कॅमेरे बसवले आहेत. रात्रीच्या अंधारातही हे कॅमेरे हालचाली टिपतात, त्यामुळे तटबंदीच्या आत आणि बाहेरही नजर ठेवण्यास कारागृह पोलिसांना मदत होत आहे. कंट्रोल रुमसाठी तीन पोलिसांची नियुक्ती केली आहेत. संशयास्पद हालचाली निदर्शनास येताच त्यांच्याकडून संबंधितांना पुढील सूचना दिल्या जातात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण कारागृहात तिसऱ्या डोळ्याची नजर असल्याने कारागृहातील सुरक्षा भक्कम झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


कळंबा कारागृहाचा परिसर प्रचंड मोठा आहे. उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक बराकीसह संपूर्ण कारागृहात लक्ष ठेवणे शक्य नसल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोठी मदत होत आहे. यातून कैद्यांवर वचक राहील, त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.

शरद शेळके, कारागृह अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी भाषिकांची गळचेपी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीमाभागात ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिल्यास महापालिका, नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा कायदा करू, असे वक्तव्य कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी सोमवारी बेळगावात केले. त्यांच्या या वक्तव्याने कर्नाटक सरकार मराठी भाषिकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होत असल्याच्या प्रतिक्रिया विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना व्यक्त केल्या.

कर्नाटकचे मंत्री बेग यांच्या वक्तव्याचे पडसाद मंगळवारी शहरासह जिल्ह्यात उमटले. स्वाभिमान संघटनेतर्फे कर्नाटक सरकारचा निषेध केला. याबाबत संघटनेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहे. महाराष्ट्रात कर्नाटकातून येणाऱ्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिण्याचे आंदोलन स्वाभिमान संघटनेतर्फे केले जाईल. जिल्हा अध्यक्ष सचिन तोडकर, सचिन खांडेकर, शक्ती सारंग आदींनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. तर बेग यांच्याकडून मराठी अस्मितेवर हल्ला झाल्याची भावना जिल्हा सर्वोदय मंडळाने व्यक्त केली. बेग यांनी मराठी अस्मिता डिचवली आहे. त्यांनी एकप्रकारे लोकशाहीचा अपमान केला आहे. त्यांना लगाम घालावा अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्हा सर्वोदय मंडळाचे सचिव सुंदरराव देसाई यांनी व्यक्त केली. जिल्हा सर्वोदय मंडळ, जिल्हा स्वातंत्र सैनिक संघटनेच्या निषेध बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी प्राचार्य व्ही. डी. माने होते. एम. आर. चौगले, प्रा. आशाताई कुकडे, प्रा. सुजय देसाई, स्वाती कल्याणकर, गीताबाई गुरव, छायाताई भोसले, सविता देसा, प्रा. डी. डी. चौगले, आर. डी. पाटील आदी सर्वोदय मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सदाशिव मनुगडे यांनी आभार मानले.


जय महाराष्ट्र अशी घोषणा दिल्यानंतर पद घालवण्याचा कायदा करण्याची भाषा करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध केला पाहिजे. कोल्हापूर जिल्हा नेहमी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी राहिला. सदस्यत्व रद्दचा कायदा कर्नाटक सरकारने केल्यास ‌त्यास जिल्ह्यातून ‌तीव्र विरोध करू. जनआंदोलन उभारू. कर्नाटक सरकार वेळोवेळी मराठी भाषिकांवर अन्याय करीत आहे. हे थांबले पाहिजे.

सतेज पाटील, आमदार, काँग्रेस

सीमा भागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गाने लढत आहेत. सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषिकांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांची दडपशाही कायम आहे. मराठी भाषिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर पद रद्द करण्याचा कायदा आणू असे म्हणून पुन्हा मराठी भाषिकांना डिचवले आहे. लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत.

वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष, मराठा महासंघ

सीमाभागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना भाषिक अल्पसंख्याक आयोगच्या शिफारसीप्रमाणे मराठी भाषेत कागदपत्रे दिली जात ‌नाही. सातत्याने त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांचे पद घालवण्याचा कायदा करण्याची घोषणा मंत्री बेग यांनी केली. ती चुकीची आहे. ही घोषणा ते जोपर्यंत मागे घेत नाहीत, तोपर्यंत शिवसेना जनआंदोलन करीत राहिल.

विजय देवणे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

सीमाभागातील मराठी ‌भाषिकांची महाराष्ट्रात येण्याची तीव्र इच्छा आहे. त्यांना डिचवण्यासाठी आणि सवंग प्रसिद्धीसाठी कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी जय महाराष्ट्र अशी घोषणा दिल्यास पद घालवण्याचा कायदा करण्याची भाषा केली. ते निषेधार्ह आहे. सीमाप्रश्न न्यायालयात असताना असे वक्तव्य करून भावना भडकवणे चुकीचे आहे.

राजू लाटकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शास्त्रीनगर’मध्ये प्रकाशझोतात रंगणार सामने

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

twitter:@satishgMT

अमित गद्रे मैदानाचा फोटो देणार आहेत.

कोल्हापूर ः कोल्हापुरात उत्कृष्ट क्रिकेट मैदान विकसित व्हावे यासाठी शास्त्रीनगर मैदानाच्या विकासासाठी राज्य सरकारने तीन कोटींचा निधी महापालिकेला दिला आहे. उत्कृष्ट दर्जाच्या मैदानाबरोबर दिवस रात्रीचे सामने खेळण्यासाठी प्रकाशझोताची व्यवस्था करण्यात येणार असून मैदानाभोवती चार टॉवर उभारण्यात येणार आहेत.

लेदर क्रिकेटसाठी शहरात शाहूपुरी जिमखाना, शिवाजी स्टेडियम, शिवाजी विद्यापीठ ही प्रमुख मैदाने आहेत. शाहू स्टेडियमवर फुटबॉल मैदान विकसित झाल्याने क्रिकेट सामन्यावर वेळेचे बंधन आले आहे. शिवाजी स्टेडियमवर स्थानिक फुटबॉल संघांनी अतिक्रमण केल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टर्फचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या क्रिकेट खेळण्यासाठी चांगले मैदान नसल्याने कोल्हापुरातील काही सामने कागलच्या मैदानावर खेळवले जातात. काही सामने पोलो आणि पोलिस क्रीडा संकुलात खेळले जातात. या पार्श्वभूमीवर शास्त्रीनगर मैदानावर सागरमाळ स्पोर्टसच्या प्रयत्नातून तीन वर्षे उत्कृष्ट दर्जाचे मैदान विकसित झाले आहे. महापालिका, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सरकारी अधिकारी व दानशूरांच्या मदतीतून क्रिकेटचे मैदान विकसित झाले आहे. सध्या मैदानावर ताज नांद्रेकर यांच्या मार्गदर्शनातून १८ ​टर्फ विकेट आणि आठ नेट विकेट तयार करण्यात आल्या आहेत.

कोल्हापुरात चांगले क्रिकेट मैदान विकसित व्हावे यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अमल महाडिक यांनी राज्य सरकारकडून तीन कोटींचा निधी मंजूर केला आहे. मैदानाच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. ११८ डाय मीटरचे टर्फ विकसित केले जाणार असून पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी कव्हर्ड विकेट तयार केली जाणार आहे. तसेच प्रकाश झोतात सामने खेळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे चार टॉवर उभे केले आहेत. २०० प्रेक्षक क्षमतेची छोटी गॅलरी उभी केली जाणार आहे.

मैदानाचे अत्याधुनिकरण झाल्यावर स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव मिळणार आहे. प्रकाशझोताची सोय केल्यानंतर संयोजकांना शुल्क आकारुन सामने घेण्याची संधी मिळणार आहे. सध्या प्रकाशझोतातील सामने खेळवण्यासाठी मंडप डेकोरेशनवाल्यांकडून सेटअप उभारावा लागतो. पण तज्ज्ञांच्या सल्ल्याने टॉवरची उभारणी होणार आहे. मैदान विकसित करण्यासाठी वर्षाचा कालावधी लागेल.


युवा पिढीला क्रिकेट मैदान मिळावे यासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. पावसाळ्यात क्रिकेट खेळता यावे, यासाठी टर्फ विकेट तयार करण्यात येतील. तसेच प्रकाशझोतात सामने व्हावे यासाठी डिझाइन करण्यात येत आहे.

आमदार अमल महाडिक


आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नॉर्मस लक्षात घेऊन शास्त्रीनगर मैदान विकसित करण्याचा प्रयत्न आहे. सरकारकडून आलेला तीन कोटींचा निधी व मैदानासाठी येणार खर्च याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. पुढील आठवड्यात मैदानाचे अंदाजपत्रक तयार होईल.

संदीप गुरव, अर्किटेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रो कबड्डीत झळकले कोल्हापूरचे चौघे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तब्बल १३ आठवडे चालणाऱ्या यंदाच्या यंदाची प्रो कबड्डी लिग स्पर्धेत कोल्हापूरच्या चार खेळाडूंची निवड झाली आहे. मूळचा चंदगड आणि सध्या सेनादलात कार्यरत असलेल्या सूरज देसाईला ‘दिल्ली दबंग’ने ५२ लाख रुपयांना करारबद्ध केले. आणाजेचा अक्षय जाधव (पुणेरी पलटण), करवीर तालुक्यातील सडोलीच्या तुषार पाटीलला (जयपूर पिंक पँथर्स) आणि हातकणंगले तालुक्यातील शिरोली येथील आनंद पाटीलला (दिल्ली दबंग) या खेळाडूंचाही यात समावेश आहे. १८ जुलैपासून लिग स्पर्धेत १२ संघ एकमेकांशी झुंजतील. आठवडाअखेरीस या लढतींचे आयोजन होईल.

भारतात प्रो कबड्डीला २०१४ मध्ये प्रारंभ झाला. गेल्या दोन वर्षआत स्पर्धा लोकप्रिय झाली. सध्या याला मोठा प्रेक्षकवर्ग लाभला आहे. स्पर्धा लोकप्रिय होऊ लागली असल्याने खेळाडूंनाही चांगली रक्कम मिळू लागली आहे. दिल्ली दंबगचे प्रशिक्षक म्हणून प्रा. डॉ. रमेश भेंडीगिरी यांना करारबद्द करण्यात आले आहे. त्यांना १० लाख ५० हजार रुपये मानधन मिळाले आहे. गेल्यावर्षी प्रा. भेंडीगिरी हे ‘तेलगू टायटन्स’ संघाचे सहायक प्रशिक्षक होते. सेनादलाचा सूरज देसाई हा यंदा प्रथमच प्रो कबड्डीमध्ये खेळणार आहे. सेनादलाने प्रथमच त्यांच्या खेळाडूंना प्रो कबड्डी लिग खेळण्याची संधी दिली असल्याने देसाई यांना ५२ लाख रुपये मिळणार आहेत. सूरज हा पुण्यातील ‘सतेज संघ बाणेर’ संघाकडून प्रतिनिधीत्व करीत आहे. याच संघात शिरोली पुलाची येथील छावा संघाचा खेळाडू आनंद पाटील याची निवड झाली आहे. त्याला २० लाख रुपये मिळणार आहेत. दोघेडी रायडर आहेत.

आणाजे येथील अक्षय जाधवला पुणेरी पलटन संघाने निवडताना आठ लाख रुपयांची बोली लावली. अक्षयही रायडर असून सडोलीच्या तुषार पाटीलला ‘जयपूर पिंक पँथर्स’ने १४ लाख ५० हजार रुपयांना करारबद्ध केले. याचबरोबर सांगलीचा नितीन मदने आणि काशिलिंग आडके यांना ‘यू मुंबा’ने करारबद्द केले आहे.

राज्य, राष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचा दबदबा

कोल्हापूर शहरासह ग्रामिण भागात कबड्डीचे ४५ ते ५० संघ आहेत. पुलाची शिरोली, शिरोळ, इचलकरंजी, गडहिंग्लज, तळसंदे, कोरोची, गुडाळ, कसबा तारळे, आणाजे, आजरा, चंदगड आदी ठिकाणी संघांनी भक्कम बांधणी केली आहे. आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील खेळाडू आक्रमक आहेत. ९० च्या दशकात ताराराणी स्पोर्टसच्या संघाने राज्यात दबदबा वाढवला. या संघातील उमा भोसले, मुक्ता चौगुले, अनुराधा भोसले यांना राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्काराने गौरवले. प्रा. रमेश भेंडीगिरी हे उत्कृष्ट प्रशिक्षक तर संभाजी पाटील यांना संघटक म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजारामपुरीत घरफोडी; १२ तोळे सोने लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, राजारामपुरीतील सातव्या गल्लीत राहणाऱ्या मंगल दिलीप घाडगे (वय ५५) यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी १२ तोळे सोने लंपास केले. सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. मंगळवारी सकाळी ही चोरी उघडकीस आली. मंगल यांचे दीर माधव घाडगे यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात या चोरीची फिर्याद दाखल केली.

राजारामपुरीत शाहू मिल कॉर्नरला मंगल घाडगे कुटुंबीय राहते. त्यांच्या शेजारी एकाबाजुला दीर माधव आणि दुसरीकडे दुसरे दीर अरुण हे राहतात. मंगल यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांचा मुलगा मुंबईत नोकरीला आहे. त्या घरी एकट्याचा असतात. शनिवारी त्या साळोखेनगरात माहेरी गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांचे दीर माधव हे नेहमीप्रमाणे अंबाबाई मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी घराबाहेर आले असता, त्यांना मंगल यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी मंगल घाडगे यांना याची माहिती दिल्यावर त्यांनी घरी येऊन पाहणी केली. घरातील मधल्या खोलीतील लोखंडी तिजोरीचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी त्यातील १२ तोळे सोन्याचे दागिने व ८ हजार रोख रक्कम गायब केल्याचे लक्षात आले. यात लक्ष्मी हार, दोन सोन्याच्या अंगठ्या, कोल्हापुरी साज, नाकातील नथ, कानातील सोन्याचे डुल असा ऐवज होता.

घाडगे यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक संजय साळोखे यांनी घटनास्थळी पाहणी केली. श्वानपथकालाही पाचारण केले होते. मात्र श्वान घरापासून अवघ्या २५ मीटरवरून परत आले. उपनिरीक्षक अण्णाप्पा कांबळे हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'प्रगती झाली असेल तर आरक्षण घेऊ नका'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या ७७ वर्षांत दलित व आदिवासी समाजानं मोठ्या प्रमाणावर सवलती घेतल्या. पण, मोठा समाज अजूनही आहे तिथंच आहे. अशा मागे राहिलेल्यांना पुढं आणायची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळं ज्यांची प्रगती झाली आहे. त्यांनी आरक्षण सोडून देण्याचा विचार करावा,' असं आवाहन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केलं.

राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्त बुधवारी कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार व शाहू फुले आंबेडकर पुरस्कारांचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. 'माझी प्रगती झाली असेल. पत्नीही नोकरी करत असले आणि सर्वकाही व्यवस्थित चाललं असेल, तर आरक्षण कशाला घेऊ? असा विचार प्रत्येकानं केल्यास सरकारी योजनांचा लाभ गरजूंना मिळेल. मागे राहिलेला माणूस पुढं येईल, असं पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ST चालकाला हार्टअॅटॅक; अपघातात २ ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि एसटी बसने अनेक वाहनांना चिरडत नेले. या भयंकर अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, सात ते आठ जण जखमी झाले आहेत. संध्याकाळी सहाच्या सुमारास शहरातील वर्दळीच्या उमा टॉकीज चौक परिसरात ही दुर्घटना घडली. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

ही बस संभाजीनगर डेपोची आहे. बसचालक अद्याप बेशुद्धावस्थेत आहे. जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसने आठ दुचाकी, तीन चारचाकी वाहनांसह एका रिक्षाला चिरडले. या अपघातानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. अनेकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी गर्दी झाली. त्यामुळे उशिरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीने दोघांना चिरडले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील उमा टॉकीज चौकात हुपरीहून रंकाळ्याकडे जाणाऱ्या एसटी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसखाली चिरडून दोघे ठार झाले, तर नऊजण जखमी झाले. बुधवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास हा अपघात घडला. चालकाला भोवळ आल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वी पुण्यात संतोष माने यानं ज्या बसनं लोकांना चिरडलं होतं, तीच ही गाडी असल्याचं बोललं जात आहे. त्या बसचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

संभाजीनगर बस डेपोची हुपरी-रंकाळा बस (एमएच १४, बीटी १५३२) हुपरीकडून रंकाळ्याच्या दिशेने निघाली होती. बसमध्ये ३५ प्रवाशी होते. ओढ्यावरील गणपती मंदिराजवळ बस आल्यानंतर चालक रमेश सहदेव कांबळे (वय ४२, रा. कांडगाव, ता. करवीर) यांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि चौकात सिग्नलवर थांबलेल्या दुचाकी, कार आणि रिक्षाला चिरडत बस पुढे निघाली. सिग्नलवरील पोलिसांनी बस थांबवण्यासाठी आरडाओरडा केला, मात्र चौकातील विजेच्या खांबाला धडकल्यानंतर बस थांबली. सात दुचाकी बसखाली चिरडल्या, तर दोन जीप, एक कार आणि एका रिक्षालाही बसने जोराची धडक दिली.

सिग्नलवर थांबलेले दुचाकीस्वार देवास शामराव घोसरवाडे (वय ४५, रा. कांडगाव, ता. करवीर) आणि सुहास युवराज पाटील (२२, सध्या रा. उचगाव, मूळ गाव मुटकेश्वर, ता. गगनबावडा) या दोघांच्या अंगावरून बस गेल्याने ते जागीच ठार झाले. जखमींमध्ये सिग्नलवरील हवालदार राजाराम भीमराव पाटील (५७, रा. पोलिस मुख्यालय), राजाक्का गुलाब लोखंडे (३५, रा. वाशी, ता. करवीर), बाबूराव केशव वडणगे (रा. ७ वी गल्ली, कोल्हापूर), विक्रम विठ्ठल घोरपडे (३४, रा. पाचगाव), श्रीपती ईश्वर पवळकर (४९), पांडुरंग गुड्डू पाटील (५६, दोघेही रा. दोनवडे, ता. करवीर), सतीश कृष्णात पाटील (२२, रा. उचगाव), प्रतिभा नाळे (सांगरूळ, ता. करवीर) आणि बसचालक रमेश कांबळे यांचा समावेश आहे. जखमींना पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले असून, उपचारानंतर जखमींची प्रकृती स्थिर आहे.

मृतांमधील देवास घोसरवाडे फायनान्स कंपनीत कामाला होते. कामानिमित्त ते कोल्हापुरात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे, तर सुहास पाटील हा कसबा बावडा येथील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. क्लाससाठी जाताना त्याला मृत्यूने गाठल्याचे समजताच नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयाच्या परिसरात हंबरडा फोडला. दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी केल्यानंतर रात्री उशिरा ते नातेवाईकांकडे सोपवण्यात आले.

चालक कांबळे यांना भोवळ आल्याने नियंत्रण सुटून अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे, मात्र या अपघाताची चौकशी करण्याचेही आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बसचालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिस निरीक्षक निशिकांत भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, महापौर हसीना फरास, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, वाहतूक निरीक्षक अशोक धुमाळ, एसटी महामंडळाने अधिकारी नवनीत भानप यांनी सीपीआरमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली, त्याचबरोबर घटनास्थळाचीही पाहणी केली.

हा योगायोग की...

२५ जानेवारी २०१२ रोजी पुण्यातल्या रस्त्यांवर बेदरकारपणे गाडी चालवून संतोष मानेनं ९ जणांचा बळी घेतला होता. त्या अपघातात वापरलेली बस ही एमएच-१४ बीटी- १५३२ नंबरची होती. तर, कोल्हापुरातही काल झालेल्या अपघातामध्ये याच बसने १० वाहनांना धडक दिली. हा योगायोग की आणखी काही याबाबत शंकाकुशंका व्यक्त होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात १३ ठिकाणी ओपन जीम बसवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावसाळ्यामध्ये पाण्याच्या गळतीमुळे रुग्णांना होणारा त्रास बंद करण्यासाठी सावित्रीबाई फुले रुग्णालयावर शेड उभारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी ४८ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. तसेच तेरा विविध ठिकाणी ओपन जीम बसवण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत अनेक सदस्य ठराव करण्यात आले असून त्याबाबत प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करण्याची सूचनाही करण्यात आली.

सभापती वहिदा सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ओपन जिमसाठी साहित्य खरेदी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये पाण्याची होणारी गळती, महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, बेंच, शाळेसाठी खेळणी, महिलांसाठी किती शौचालयांची बांधकामे पूर्ण करणार, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये पडून असलेला स्क्रॅप असे अनेक प्रश्न नगरसेविका सुरमंजिरी लाटकर, दीपा मगदूम, सविता भालकर, सीमा कदम यांनी मांडले.

ओपन जीमच्या खरेदीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून सावित्रीबाई फुले रुग्णालयावर शेड उभारणीसाठी टेंडर प्रक्रिया सुरु आहे. ४८ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश पालकांनी घ्यायचा असून त्याची पावती सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना बेंच, खेळणी खरेदीची प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही सुरु असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. पाच ठिकाणी महिलांसाठी शौचालय बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे असे सांगण्यात आले.

टाकाळा विद्यामंदिर येथे खोली बांधणे, प्राथमिक शाळेसाठी सॅनिटरी नॅपकीन देणे, मनपा प्राथमिक शाळेत बोलक्या भिंती करणे, पद्मश्री वि.स.खांडेकर विद्यालयासाठी विविध साहित्य देण्याचे सदस्य ठराव मंजूर करण्यात आले. सावित्रीबाई फुले रुग्णालय व पंचगंगा हॉस्पिटलसाठी बजेटमध्ये ८० लाख लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील आयसीयू रुमसाठी ६० लाख बजेट उपलब्ध करुन देण्यास सांगण्यात आले.

बैठकीस उपसभापती छाया पोवार, माधुरी लाड, गीता गुरव, अर्चना पागर, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगरसचिव दिवाकर कारंडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘...तर तुम्ही आरक्षण घेऊ नका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशाच्या स्वातंत्र्यानंतर दलित आणि आदिवासी समाजाने गेल्या ७७ वर्षांत मोठ्या प्रमाणावर सवलती घेतल्या. पण, समाज अजूनही आहे तिथेचे आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींबरोबरच समाजातील प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. आता जर प्रगती झाली असेल, माझे सर्व व्यवस्थित चालले असेल, तर मी मुलांसाठी आरक्षण कशाला घेऊ. माझी पत्नीही नोकरी करत असेल, स्वस्त घरांसाठीच्या योजनेचा आधार कशाला घेऊ, असा जर प्रत्येकाने विचार केला, समाजात मागे राहिलेला माणूस पुढे येईल, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्त हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार व शाहू़, फुले, आंबेडकर पुरस्कारांचे वितरण बुधवारी कोल्हापुरात झाले. त्यावेळी पाटील बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त पियूष सिंह, प्रादेशिक आयुक्त रवींद्र कदम-पाटील, सहायक आयुक्त विशाल लोंढे, बाळासाहेब कदम अतिरिक्त आयुक्त डॉ. सदानंद पाटील उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सामाजिक न्याय विभागात जास्त निधी असला, तरी त्याच्या मर्यादा आहेत. त्यात सर्वांना न्याय मिळायचा असेल, तर ज्यांना आजवर लाभ मिळाले, त्यांनी इतरांना लाभ मिळू दिला पाहिजे. जसजसे आपण प्रगतीमध्ये पुढे जाऊ, तसा खालचा माणूस पुढे येत राहिला पाहिजे. अन्यथा तो खालीच राहील. स्वातंत्र्यानंतर आजही दलित समाज झोपडपट्टीतच का राहतो? घरांच्या इतक्या योजना झाल्या तरी समाज आहे तिथेच का आहे.? याचा अर्थ पैसा काहीजणांमध्येच फिरतो आहे. त्यामुळे सर्वांना न्याय मिळण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे.’

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झालेल्या ठिकाणांचा विकास करण्याचे काम राज्य सरकारच्यावतीने सुरू आहे. याशिवाय, आता दलित समाजात उद्यमशीलता वाढावी यासाठीही विभाग प्रयत्न करत आहे.’

राज्यमंत्री दिलिप कांबळे यांनी सरकार करत असलेल्या कांमाचा आढावा घेतला. कांबळे म्हणाले, ‘राज्यात ५० नवीन वसतीगृहे मंजूर करण्यात आली आहेत. वूमेन्स होस्टेलसाठीही काम सुरू आहे. सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकाराने ७५ विद्यार्थी विदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. दलित तरुणांनी व्यवसायातही पुढाकार घेतला पाहिजे, यासाठी त्यांना अर्थसाह्य करण्याचे काम सुरू आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखरीत ‘जलयुक्त’चा पंचनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जलयुक्त शिवार योजनेतून साखरी-म्हाळुंगे (ता. गगनबावडा) गावातील बंधाऱ्याच्या कामाचा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन जागेवर पंचनामाच केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, युवा शहर प्रमुख हर्षल सुर्वे यांनी योजनेच्या बंधाऱ्याच्या निकृष्ट कामांकडे लक्ष वेधले.

साखरी-म्हाळुंगे येथील वनविभागच्या जमिनीत कृषी विभागाने दगड, मातीचे बंधारे बांधले. गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील जंगलक्षेत्रात एका खालोखाल एक असे दोन बंधारे आहेत. अनुक्रमे २२.४८ टीसीएम आणि २१. २३ टीसीएम पाणी साठवण क्षमतेच्या बंधाऱ्यासाठी प्रत्येकी ६ लाख ८३ हजार १३८ रुपये मंजूर केले. त्यापैकी प्रत्येक बंधाऱ्यासाठी ५ लाख २७ हजार ३१० रुपये खर्च झाले. दोन्ही बंधाऱ्यांचे काम ठेकेदार जयंत नाईक यांनी केले. दरम्यान, काम मुदतीत पूर्ण झालेले नाही. नियमानुसार जीपीआरएसद्वारे जयलुक्त शिवार योजनेच्या वेबसाइटवर काम, कामावर झालेल्या खर्चाचा तपशील अपलोड केलेला नाही. त्यामुळे बंधाऱ्याच्या कामात पैसे मुरविल्याचा संशय आल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख पवार यांनी सांगितले.

बंधाऱ्यास कार्यकर्त्यांनी भेट दिली तेव्हा, निकृष्ट काम दिसले. बंधारे अपूर्ण आहेत. दगडी पिचिंग, मातीचा भराव चांगला केलेला नाही. मोठा पाऊस पडल्यास बंधारा वाहून जाण्याचा धोका आहे. दोन बंधाऱ्यातील अंतर नियमानुसार नसल्याचे दिसले. शिष्टमंडळात शहाजी देसाई, सर्जेराव पाटील, रवी चौगुले आदी उपस्थित होते.

गगनबावडा तालुक्यात जलयुक्त योजनेत ६० ते ७० लाखांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. साखरीतील दोन बंधाऱ्यांची कामे पाहिल्यानंतर अधिकाऱ्यांनी पैसे मुरवल्याचे दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्टी दाखवत ही योजना राबवली. मात्र, अधिकारी आपल्या तुंबड्या भरून घेत आहेत.

-संजय पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना


‘मटा’ मालिकेला पुष्टी

जिल्ह्यातील जलयुक्त‌ शिवार योजनेच्या कामात कशा पद्धतीने पैसे मुरवले गेले, निकृष्ट दर्जाची कामे कशी झाली याची वृत्तमालिका आठवड्यापूर्वी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध केली. त्यानंतर शिवसेनेने बुधवारी साखरीतील जलयुक्तच्या कामातील भ्रष्टाचार उघडकीस आणला. त्यामुळे ‘मटा’ने वृत्तमालिकेत जलयुक्त शिवारच्या निकृष्ट कामांवर प्रकाशझोत टाकला होता, त्यास पुष्टी मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images