Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूरचा रसिक दिलदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कोल्हापूरकरांचं सगळच कसं दिलखुलास असतं. अभिनय आवडला तर दिलदारपणे टाळ्या वाजवणारा, कौतुक करणारा इथला रसिक एखादी भूमिका आवडली नाही तर, हक्काने आपली नाराजी व्यक्त करतो. रसिकांची खरी पावती आम्हा कलाकारांना हवी असते. कोल्हापूरचा रसिक याबाबतीत ​जितका प्रामाणिक तितकाच दिलदार आहे...’ हे शब्द आहेत प्रख्यात ​अभिनेत्री रिमा लागू यांचे. हिंदी आणि मराठी सिनेमांत कशी सोशिक तर कधी कणखर आई साकारणाऱ्या लागू यांचे बुधवारी अचानक निधन झाल्याची बातमी आल्यानंतर कोल्हापुरातील रंगकर्मी आणि चित्रकर्मींच्या वर्तुळात आठवणींचा पट उघडला.

रंगभूमी, सिनेमा आणि मालिका अशा तीनही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची मोहर उमटवणाऱ्या रिमा लागू सात महिन्यांपूर्वीच रंगभूमी दिनाच्या औचित्याने कोल्हापुरातील देवल क्लबमध्ये खूप वर्षांनी आल्या होत्या. त्यावेळी भालजी पेढारकर यांच्यापासून ते आजच्या नवोदित कलाकारांपर्यंत त्या भरभरून बोलल्या. त्याआधीही विविध नाटकांच्या प्रयोगाच्या निमित्ताने आणि ​सिनेमाच्या ​चित्रिकरणाच्या निमित्ताने त्या कोल्हापुरात आल्या होत्या. यामध्ये उदय नारकर लिखित, दिग्दर्शित ‘जोडी तुझी माझी’ या नाटकात रिमा यांनी भूमिका केली. त्यावेळी कोल्हापुरात त्यांचा मुक्काम होता. ‘घर तिघांचं हवं’, ‘सौजन्याची एैशी तैशी’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ आणि ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकांच्या प्रयोगासाठीही रिमा कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. येथे आल्यानंतर गायन समाज देवल क्लब, चित्रपट महामंडळ या संस्थांसह जुन्या काळातील नाट्यकर्मींची त्या आवर्जुन भेट घेत.

रंगभूमीदिनीच शेवटची भेट

५ नोव्हेंबर २०१६ रोजी रंगभूमी दिनाच्या औचित्याने सांगली येथील एक कार्यक्रम झाल्यानंतर रंगकर्मी जयंत सावरकर यांच्यासोबत रिमा या कोल्हापुरात आल्या. यावेळी त्यांनी गायन समाज देवल क्लबमध्ये गप्पांची मैफल जमवली. गोविंदराव टेंबे रंगमंदिर पाहिले. देवल क्लबमधील नाट्यविभागाची आवर्जुन चौकशी केली होती.


रिमाताई आणि मोहन जोशी यांच्या भूमिका असलेल्या ‘अग्निदिव्य’ या सिनेमाच्या निमित्ताने त्यांच्या सहवासात आलो. हिंदी सिनेसृष्टीत प्रचंड यशस्वी असलेल्या रिमा या कलाकार आणि माणूस म्हणून खूप साध्या होत्या. शूटिंगवेळी लंचब्रेकमध्ये तर त्या ‘सगळे व्यवस्थित जेवले का’ याची विचारपूस करायच्या. ‘अग्निदिव्य’साठी रत्नागिरीत शूटिंगच्या निमित्ताने पाहताना त्यांच्यातील साधेपणा भावला. कोल्हापुरात त्या नवोदित कलाकार, लेखकांविषयी आस्थेने चौकशी करायच्या.

आनंद काळे, अभिनेता, निर्माता

रिमा यांनी रंगभूमीवरूनच अभिनयाची सुरूवात केली. ‘तुझी माझी जोडी’ या माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकात रिमा यांनी काम केले. सशक्त कथा आणि अभिनयाला आव्हान देणारे प्रसंग असावेत, असा त्यांचा आग्रह असायचा. या नाटकात रिमा यांनी तीन वेगळ्या स्वभावाच्या स्त्री छटा रंगवल्या. ‘सिंहासन’ सिनेमाने त्यांना वलय मिळालं तरी रंगभूमीवरील अभिनयाला त्यांनी शेवटपर्यंत अंतर दिलं नाही. कोणत्याही भूमिकेच्या खोलीत ​शिरण्याची त्यांच्यात उत्सुकता असायची.

उदय नारकर, नाट्यलेखक

कलाकारासाठी ज्या गोष्टी काळानुरूप आवश्यक असतात, त्या स्वीकारण्यात रिमा यांचा हातखंडा होता. नव्या पिढीतील नायकाची आई साकारताना, त्या पडद्यावर स्मार्ट बनल्या. ग्रामीणपेक्षा शहरी भूमिकांना त्यांनी न्याय दिला. मराठी सिनेमाने कात टाकल्यानंतर किंवा बदलाच्या उंबरठ्यावर असताना रिमा यांच्यासारखा चेहरा सिनेमातील आईसाठी योग्य ठरला. ‘अग्निदिव्य’ सिनेमावेळी रिमा यांच्या अ​भिनयाची ताकद जाणवली. चित्रपट महामंडळाविषयी त्यावेळी त्यांनी जाणून घेतले होते.

परशुराम गवळी, लेखक, सहाय्यक दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेच्या विकासाचा वेग वाढवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘रेल्वे हे सर्वसामान्यांसाठी महत्वाचे वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकांचा दर्जा वाढणे, स्वच्छता राखणे, रेल्वेट्रॅकची संख्या वाढणे आवश्यक आहे. कोल्हापूर रेल्वेचा विकास वाढविण्याची गरज आहे’ असे मत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केले. छत्रपती राजर्षी शाहू महाराज टर्मिनसच्या रेल्वेसेवेची १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शाहू महाराजांच्या हस्ते विशेष पोस्टल कव्हरचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास खासदार छत्रपती संभाजीराजे, धनंजय महाडिक, महापौर हसिना फरास, पुणे मंडळ रेल्वेचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय, कृष्णात पाटील, पोस्टाचे आर. एस. पाटील उपस्थित होते.

श्रीमंत शाहू महाराज यांनी भाषणात दोन्ही खासदारांना कानपिचक्या दिली. ते म्हणाले, ‘कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्ग ब्रॉडगेज होऊन बरीच वर्षे झाली. त्यानंतर कोल्हापूरसाठी गाड्यांची संख्या वाढण्यापलिकडे काही झाले नाही. आता रेल्वेची काही कामे होत आहेत. पण, हा वेग समाधानकारक नाही. आता विकासाचा वेग वाढला पाहिजे. शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी तीन वर्षे लागली. असा वेग रेल्वेसाठी चालणार नाही. कामे लवकर झाली नाहीत, तर जनता गप्प बसणार नाही.’

शाहू महाराज म्हणाले, ‘येत्या काळात कोल्हापूर कोकण रेल्वेशी जोडणे आणि कऱ्हाड-कोल्हापूर-बेळगाव मार्गाचे काम सुरू होणे गरजेचे आहे. रेल्वेस्टेशनचा हेरिटेज ढाचा सांभाळून विकास व्हावा.’

सदगुरू बाबा हरदेसिंहजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रेल्वे स्टेशनची स्वच्छता केल्याबद्दल संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला खासदार महाडिक यांनी प्रशिस्तीपत्रक प्रदान केले. पुणे मंडळ रेल्वेचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांनी प्रास्ताविक केले. कृष्णात पाटील यांनी आभार मानले.


मी राजेंच्या मागून जाईन

खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध असल्याचे सांगून खासदार महाडिक म्हणाले, ‘कोल्हापूर स्थानक हेरिटेज न राहाता, हायटेक होण्याची गरज आहे. सीएटी स्टेशनच्या धर्तीवर विकासाची गरज आहे. यासाठी बीओटी, पीपीटी अशा कोणत्याही प्रकारच्या मॉडेलने काम करण्याची तयारी आहे. खासदार संभाजीराजेंचे पंतप्रधानांशी चांगले संबंध आहेत. ते या गोष्टी पंतप्रधानांपुढे मांडतील. आम्ही त्यांच्या मागून पंतप्रधानांना भेटण्यासाठी जाऊ.’

‘दोघे मिळून जोर लावू’

कोल्हापुरातील रेल्वे आणि इतर विकासमांसाठी खासदार महाडिक यांच्या सोबत राहून काम करणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘रेल्वे स्थानक विकासाच्या गाडीला दोघांचा जोर लागला, तर चांगली गोष्ट आहे. कोल्हापूरच्या स्टेशनला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तरीही येथे संग्रहालय का होऊ शकले नाही, असा प्रश्न पडतो. किमान कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे कॉफीटेबल बुक प्रसिद्ध व्हावे, अशी अपेक्षा आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राचीन संस्कृतीची ‌घेतली अनुभूती

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भाजलेल्या मातीची १८८८ मधील वाद्ये, ११ व्या शतकातील पितळेचे उमलणारे कमळ, बिदरी कला, ब्रह्मपुरी उत्खननात सापडलेल्या वस्तूंसह दहा शतकापासूनचा खजिनाच गुरूवारी नागरिकांसाठी खुला करण्यात आला. टाउन हॉल संग्रहालयाला दिवसभरात एक हजार नागरिकांनी भेट दिली. जागतिक संग्रहालय दिनानिमित्त गुरूवारी टाउन हॉल उद्यानातील वस्तूसंग्रहालय आणि राजारामपुरीतील चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय नागरिकांना पाहण्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली. राज्य सरकारने सरकारी संग्रहालये गुरूवारी नागरिकांना पाहण्यासाठी विनामू्ल्य उपलब्ध करून द्यावीत, अशी सूचना संग्रहालयांना केली होती. त्यानुसार टाउन हॉल उद्यानातील शासकीय वस्तूसंग्रहालय आणि राजारामपुरी येथील चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले.

टाउन हॉलमधील संग्रहालयात शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांचे १९०४ मधील विविध संगमरवरी शिल्पे, शिलाहार राजवटीतील लोकांच्या दैनंदिन लोकांच्या वापरातील वस्तू, शिवकालीन, ब्रिटिशकालिन तलवारी, पहिल्या महायुद्धात वापरलेली शस्त्रात्रे, ११०० ते १५०० शतकातील वस्तू, केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बांधकामाच्या वेळी सापडलेल्या वस्तू मांडण्यात आल्या. ब्रह्मपुरी उत्खननात सापडलेल्या पंचरशी धातूंच्या वस्तू, मुठीचे दांडे, भांड्याचे नक्षीदार दांडे, वाटी, प्लेट, पेले, डबी, तिवई, छोटे माठ, घंटा, करंडा अशा वस्तू ठेवण्यात आल्या. चंदनाच्या लाकडीतील धातूच्या मूर्ती व प्रभावळ, ११ व्या शतकातील श्री विष्णू, दीप, लक्ष्मण, श्री दत्तात्रेय, चवरी, वादिका, अन्नपूर्णा, सरस्वती, मोठी प्रभावळ आणि शिवपंचातयनसह श्री अंबाबाईची जुनी मूर्ती ठेवण्यात आली. चिनी मातीच्या फुलदाणी, नक्षीदार मोठी थाळी, तंतूवाद्य, वाळूचे घड्याळ, मुखवटा, कळस, भांडी, वाडगा आदी वस्तू ठेवण्यात आल्या. शस्त्रास्रे दालनात प्राचीन काळापासून ते पहिल्या महायुद्धापर्यंत सैनिकांनी वापरलेली अत्याधुनिक हत्यारे, शिवकालीन हत्यारे, दरबारी अंगरखा, कमरपट्टा, शाली, फेटे विविध दालनात मांडण्यात आल्या आहेत.

००

चिमाजीआप्पांनी मिळविलेली घंटा

चिमाजीआप्पांनी जेव्हा वसईचा किल्ला जिंकला तेव्हा पोर्तुगीजपासून मिळविलेल्या तीनही घंटा सातारचे शाहू छत्रपती यांच्याकडे पाठविल्या. पैकी एक घंटा छत्रपती शाहूंनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीसाठी पाठविली. ही घंटा त्या काळात श्री अंबाबाई देवालयाच्या घाटी दरवाजावर बसविली होती. कालांतराने या घंटेला तडे गेल्याने छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी नवी घंटा आणली. इ. स. १९०१ मध्ये जुनी घंटा काढून नवीन घंटा बसविण्यात आली. या जुन्या घंटेबद्दलही नागरिकांत उत्सुकता होती.

००००००००

जागतिक संग्रहालय दिनानिमित्त सुमारे एक हजारांहून नागरिकांनी भेट दिली. जुन्या काळातील वस्तू पाहून अनेक नागरिक भारावून गेले. कोल्हापूर परिसरात उत्खननात सापडलेल्या वस्तूंसह दुर्मिळ वस्तू मांडण्यात आल्या. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

अमृत पाटील, सहायक अभिरक्षक, टाउन हॉल संग्रहालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत क्रेनचा रोप तुटला, ३ मजूर ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

इचलकरंजीतील सांगवडे येथे विहिरीतील गाळ काढताना अचानक क्रेनचा रोप तुटल्याने झालेल्या विचित्र आणि दुर्देवी दुर्घटनेत तीन कामगार ठार झाले. त्यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज सकाळी सांगवडे येथे ही दुर्घटना घडली. संजय अण्णा पाटील या शेतकऱ्याच्या शेतात विहिर खोदण्याचे आणि त्यातील गाळ काढण्याचे काम सुरू होते. विहिरीत काही कामगार उतरून गाळ उपसून क्रेनच्या ट्रॉलीत भरत होते. ट्रॅाली भरलेला क्रेनवर जात असताना अचानक क्रेनच्या यारीचा दोर (रोप) तुटला आणि विहिरीत काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर कोसळला. त्यामुळे रामचंद्र कालोजी साळवी, भैरूलाल गंगाराम माळी आणि बाबूराव शामराव वडार हे तिन्ही कामगार जागीच ठार झाले. तर शिवाजी दत्तू पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांपैकी रामचंद्र साळवी आणि भैरूलाल माळी हे दोन्ही कामगार राजस्थानचे रहिवाशी असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेचा पंचनामाही करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्सल्टंटमुळे चुकांचा डोंगर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कंत्राटदाराचा फायदा करणारा आणि त्यातून स्वतःचा फायदा करणारा प्रकल्प आराखडा युनिटी कन्सल्टंटने तयार केल्याने थेट पाइपलाइन योजनेत चुकांचा डोंगर उभा राहिला. एक वर्षाच्या मुदतवाढीनंतरही कामे पूर्ण होणार नसल्याचे वास्तव शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उघड झाले. योजनेचा मार्ग बदलल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी, जॅकवेलचे चुकीचे डिझाइन, ब्लॅकलिस्ट कंपनीकडून पाइपची चाचणी, पाणी उपशासाठी प्रतितासाऐवजी ढोबळ खर्च दाखवणे, डीएसआरपेक्षा सळीचा दर जादा दाखविल्याने योजनेचा खर्च वाढला आहे. यातून ५० कोटी रुपयांचा ढपला पाडला आहे. योजनेबाबत तळागाळापर्यंत चौकशी करण्याची मागणी सभेत करण्यात आली.

सभेमध्ये विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार झाल्यानंतर भाजपचे अजित ठाणेकर यांनी थेट पाइपलाइनवर प्रथम चर्चा करा अशी मागणी केली. तेथूनच सत्ताधारी व विरोधकांमधील गोंधळाला सुरुवात झाली. आयुक्तांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप ठाणेकर यांनी केला. त्याला काँग्रेस आघाडीचे शारंगधर देशमुख, भूपाल शेटे यांनी जोरदार हरकत घेतली. कोण दिशाभूल करत आहे, त्यांचे नाव जाहीर करा असे आव्हान दिले. त्यावेळी सत्यजित कदम यांनी महापौरांसह आयुक्तांनी योजनेची का पाहणी केली? अशी विचारणा केल्याने सभागृहात गोंधळ आणखी वाढला. महापौर फरास यांनी, ‘मूळ मुद्दा बाजूला पडत आहे. चुकीचे आरोप करुन वातावरण बिघडवू नका. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी चर्चा करावी. गोंधळ घालू नये’, असे आवाहन वारंवार केले.

त्यानंतर ठाणेकर यांनी योजनेतील कन्सल्टंटकडून झालेली फसवणूक मांडली. कन्सल्टंटने तयार केलेले चुकीचे टेंडर व त्याला दिलेली मंजुरी यामुळे संबंधितांवर फौजदारी खटला दाखल करण्याची मागणीही केली. सत्यजित कदम म्हणाले, ‘खोदाईनंतरचा मुरूम विकला आहे. कामातील खर्चामध्ये ४५ ते ५० कोटी रुपयांचा फरक दिसत आहे. जॅकवेलच्या कामासाठी १८ कोटी ५९ लाख रुपयांवर खर्च होऊ नये. या कामातील कन्सल्टंट, कंत्राटदार व अधिकाऱ्यांची साखळी मोडावी.’

प्रा. जयंत पाटील यांनी मुदतवाढीचा मुद्यावर प्रशासनाला विचार करण्यास भाग पाडले. ते म्हणाले, ‘मुदतवाढ देण्याचा निर्णय घेणार असाल तर पुढील कामासाठी ६५ कोटी रुपयांच्या निधीसाठी काय तरतूद केली आहे ते सांगा. कमी खर्चातील कन्सल्टंट म्हणून नेमल्यामुळे त्याच्या कामाचा फटका आता बसत आहे. या कंपनीने तयार केलेला प्रकल्प आराखडा ७५ टक्के बदलला आहे. योजनेतील घोटाळ्यामध्ये काही नतद्रष्ट माणसे आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव घेत आहेत. पण मुश्रीफ यांनी आतापर्यंत कधीही या योजनेतील त्रुटी मांडताना अडवले नाही. या योजनेतील भ्रष्टाचार बाहेर काढायचा असेल तर राजेंद्र माळी यांची चौकशी करावी.’

विजय सूर्यवंशी म्हणाले, ‘ज्या कंपनीला पिंपरीमध्ये ब्लॅकलिस्ट केले, त्यांच्याकडून पाइपलाइनची चाचणी करुन घेण्यात येत आहे. भविष्यात जर पाइप फुटल्या तर त्याची जबाबदारी कोण घेणार? योजनेतील कामाबाबत टप्पे असतात. पण येथे पाइपलाइन टाकण्याचे जे सर्वात शेवटी काम करायचे असते, ते सर्वात आधी पूर्ण करण्यात आले आहे.’

भूपाल शेटे यांनी ढोबळ खर्चातील घोळाचा आणखी एक नमूना दाखवला. पाणी उपशासाठी प्रतितास असे मोजमाप केले जाते. पण येथे ढोबळ खर्च दाखवला असून त्यामधूनही मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता वर्तवली. सभागृह नेते प्रविण केसरकर, नियाज खान, रुपाराणी निकम, अशोक जाधव यांनीही योजनेबाबत चर्चा केली.

प्रा. जयंत पाटील व सुनिल कदमांमध्ये वाद

‘महापालिकेला भविष्यात आणखी ६५ कोटी उभे करावे लागतील. महापालिकेची पत संपली असून निधी उभा करता येणार नाही. नगरसेवकांना गहाण टाकले तरी पैसे मिळणार नाही’ या प्रा. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर सुनील कदम यांनी जोरदार विरोध केला. ‘महापालिकेची पत कमी झालेली नसून नगरसेवकांना गहाण टाकण्याच्या वक्तव्याने महापालिकेची अवहेलना होत आहे’ असे कदम यांनी सांगताच प्रा. पाटील यांनी, ‘मी नगरसेवकांबाबत काही बोललो नाही’ असे सां​गितले. त्यावरुन दोघांमध्ये वाद होऊन एकमेकांना एकेरी बोलण्यापर्यंत मजल गेली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवनदायी योजनेतून होणारी लूट थांबवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी योजनेची अंमलबजावणी काटेकोर होत नाही. या योजनेच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक लूट होण्याच्या तक्रारींत वाढ होत आहे. यावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. ठराविक रुग्णालयांच्या मनमानी कारभारास खतपाणी घातले जात आहे. ही लूट थांबवावी,’ अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.

रुग्णालयांच्या समस्या जाणून घेऊन आगामी महात्मा जोतीबा फुले योजनेत या त्रुटींचे निराकरण व्हावे, यासाठी प्रशासन आणि रुग्णालयांची येत्या १५ दिवसात बैठक घेऊन, समस्यांचा सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणीही त्यांनी केली.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील मान्यताप्राप्त रुग्णालयांच्या प्रमुख, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात केले होते. त्यावेळी क्षीरसागर यांनी या सूचना केल्या.

हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर आरोग्य योजनेचा प्रत्यक्ष लाभ रुग्णास दोन ते तीन दिवसानंतर दिला जातो. तोपर्यंत रुग्णाकडून हजारोंचे बिल वसूल केले जाते. योजनेतून होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधने निकृष्ठ असतात, असे नातेवाईकांना सांगून त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे उकळले जातात, ही बाब यावेळी निदर्शनास आणून ‌देण्यात आली.

बैठकीत राजीव गांधी योजनेची माहिती देताना योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी, सध्या या योजनेंतर्गत सरकारची १८ रुग्णालयाची मर्यादा असताना जिल्ह्यासाठी ३२ रुग्णालये मंजूर करण्यात आली आहेत. ज्या तालुक्यामध्ये हॉस्पिटल नाहीत त्या ठिकाणी योजनेचे काम सुरु करण्याच्यादृष्टीने विशेष प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. आतापर्यंत सुमारे ४१ हजार रुग्णांनी उपचार घेतले असून, सुमारे ७१ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. फुले योजना अंमलात येईल त्या योजनेत रुग्णालयांच्या संख्येवरील निर्बंध उठविण्यात येणार असून, सुमारे ७५० रुग्णालयांना मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती दिली.

बैठकीस अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एल. एस. पाटील, तक्रार निवारण अधिकारी डॉ. परशुराम हरणे, वरिष्ठ व्यवस्थापक एम.ए. वारीस, जिल्हा समन्वयक डॉ. सागर पाटील, विभागीय प्रमुख डॉ. निशांत जाधव, डॉ. प्रशांत क्षेत्रे, डॉ. सुनील पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माधवराव शिंदेंचे सिनेमे आत्मभान देणारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘चित्रपट हे जरी मनोरंजनाचे माध्यम असले तरी चित्रसाधक माधव शिंदे यांचे​ सिनेमे मनोरंजनासोबत आत्मभान जागृत करणारे होते. पन्नास वर्षापूर्वी त्यांनी आपल्या सिनेमातून जातीभेद, कुटुंब नियोजन, स्त्री शिक्षण अशा विषयांना हात घातला आणि त्यातून जाणीवजागृती केली. आजही हे प्रश्न आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या सिनेमातून समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्याचा हा उत्सव सार्थ ठरला आहे’ अशा शब्दात ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी भावना व्यक्त केल्या.

चित्रसाधक माधव शिंदे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित चर्चासत्रात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. माधव शिंदे यांच्या वैचारिक सामर्थ्याबरोबरच रसिकांना आपल्या सोबत घेऊन जाणाऱ्या मराठी चित्रपटातील त्यांचे कसब याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. अजय कुरणे आणि कॅमेरामन प्रकाश यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

चंद्रकांत जोशी पुढे म्हणाले, ‘चित्रसृष्टीत झालेल्या संस्कारांचे प्रतिबिंब शिंदे यांच्या प्रत्येक चित्रपटात दिसून येते. ८० व्या दशकापर्यंतचा सिनेमा हा कोल्हापूर स्कूलचा होता. अर्थात बौद्धिक क्षमतेचा पूरेपूर वापर करुन चित्रपट अंतर्मुख करणारा होता. शिंदेंच्या चित्रपटांनी सामाजिक विषयांची कोंडी फोडली आणि दाहक वास्तवातून समाजप्रबोधनाची दिशा दिली.’

अजय कुरणे म्हणाले, ‘माधव शिंदेंच्या दिग्दर्शकीय कौशल्यात चार पाच पात्रांवर चित्रपट बांधून ठेवण्याचे कौशल्य होते. त्यांना तंत्राची जाण होती. त्यांच्या सिनेमात कथेला महत्त्व होते.’

माधव शिदे यांच्यासोबत काम केलेले कॅमेरामन प्रकाश म्हणाले, ‘पूर्वी ट्रीक सीन्स करण धोक्याचे होते. पण माधवरावांच्या तंत्रातील कौशल्याने ते पडद्यावर लीलया साकारायचे.’

प्रसेनजित कोसंबी यांनी चर्चासत्राचे निवेदन केले. बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे सचिव दिलीप बापट, समीक्षक अनमोल कोठाडिया यांच्यासह चित्रपट प्रेमी उपस्थित होते .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभागातून सीपीआरला ६१ बेड सुपूर्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केवळ सरकारी निधीतून सर्व सुधारणा होतील ही अपेक्षा बदलून सुधारणांसाठी जनसहभाग वाढला पाहिजे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची प्रतिमा हळूहळू बदलत असून खासगी रुग्णालयांना दर्जेदार पर्याय म्हणून सीपीआर उभे राहवे, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

श्री रवीशंकर यांच्या जन्मदिनानिमित्त छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात लोकसहभागातून रुग्णांच्या सोईसाठी अद्ययावत ६१ बेड प्रदान कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, खासगी रुग्णालयांना दर्जेदार पर्याय म्हणून सीपीआर उभे राहिले पाहिजे. सर्वच आर्थिक स्तरातील रुग्णांची सीपीआरला पहिली पसंती असावी, इतकी या रुग्णालयाची प्रतिमा उंचावणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे बेड उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले.

सीपीआरने आपल्या गरजा प्रभावीपणे मांडाव्यात, त्यासाठी त्यांना आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगून स्वच्छाता व वातावरण अल्हाददायक ठेवल्यास रुग्णांना औषधोपचाराबरोबरच चांगल्या वातावरणाचाही लाभ मिळून रुग्ण लवकर बरा होईल, असे सांगितले. यावेळी त्यांनी हृयशस्त्रक्रिया विभागातील मशनरी महिनाभर बंद असणे ही बाब अत्यंत खेदजनक असून प्रशासनाने अशा बाबी वेळीच निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत, असे सांगितले.

इंटेन्सिव्ह केअरमध्ये चेअर उपलब्ध करुन दिल्याबद्दल आमदार अमल महाडिक यांचे पालकमंत्री पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच ऑटो ब्लड गॅस अॅनालायझर ही साडेसहा लाख रुपये किमतीची ह्दय शस्त्रक्रिया विभागातील मशिनरी आमदार महाडिक आणि गांधीनगरचे व्यापारी शंकर दुराणी यांनी प्रत्येकी १ याप्रमाणे उपलब्ध करुन दिल्याबद्दल दोघांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


योजना आणली, भ्रष्टाचार केला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आयआरबीचे पैसे माजी मंत्र्यांनी खाल्ले आणि कारभाऱ्यांनाही वाटले हे सारे जगजाहीर आहे. थेट पाइपलाइन योजना ज्यांनी मंजूर करून आणली, त्यांनीच यामध्ये भ्रष्टाचार केला असा आरोप माजी महापौर सुनील कदम यांनी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्याला जोरदार हरकत घेतल्याने सभेत गोंधळ उडाला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावे न घेता केल्या गेलेल्या आरोपांमुळे महापौर हसीना फरास यांनीही ‘नेत्यांबाबतचे आरोप ऐकून घेतले जाणार नाही,’ असा इशारा देत गोंधळ थांबवण्यासाठी अखेर काही वेळासाठी सभा तहकूब केली. दरम्यान, योजनेतील सदोष कामाबाबत अहवाल आल्यानंतर अधिकाऱ्यांसह कन्सल्टंटवर कारवाई करू, असे आश्वासन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.

महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. नूतन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची ही पहिलीच सभा होती. गेल्या महिन्यापासून गाजत असलेल्या थेट पाइपलाइनच्या विषयावर सभेत जोरदार चर्चा होण्याची अपेक्षा होती. झालेही तसेच नगरसेवकांनी केलेल्या चर्चेतून योजनेतील शंकास्पद कामाची लक्तरे मांडली. कंत्राटदाराला मुदतवाढ दिली जाणार असेल तर त्या कालावधीत योजना पूर्ण होणार का? ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनीकडून पाइपलाइनची तपासणी केली जात असेल तर भविष्यातील घोटाळ्याला कोण जबाबदार? कन्सल्टंटने महापालिकेचा विश्वासघात केला आहे. त्याबाबत त्याच्यावर फौजदारी दाखल करावी. कामाची ऑडिटर जनरल कडून तपासणी करण्यात यावी. नार्को टेस्ट, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशा अनेक मागणअया यावेळी करण्यात आल्या.

माजी महापौर कदम यांनी या ‘योजनेत सुरुवातीपासून त्रुटी आहेत. त्या दूर करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी चांगले अधिकारी नेमा. जर ही योजना बदनाम झाली तर त्यापुढे कोल्हापूरला काम करण्यासाठी कुणी येणार नाही’, असे सांगितले. ‘आयआरबी, एसटीपीच्या प्रकल्पांत काय झाले हे सर्वांसमोर आहे. दोन माजी मंत्र्यांनी आयआरबीच्या प्रकल्पात पैसे खाल्ले. कारभाऱ्यांनाही वाटले हे जगजाहीर आहे. थेट पाइपलाइन योजनेतही नगरसेवकांवर दबाव टाकून ती मंजूर करून घेतली. ज्यांनी ही योजना मंजूर करून आणली, त्यांनीच या योजनेत भ्रष्टाचार केला’ असा आरोपही केला.

त्याला प्रा. जयंत पाटील, काँग्रेसचे सभागृह नेते प्रविण केसरकर, भूपाल शेटे, अशोक जाधव, मोहन सालपे यांनी जोरदार आक्षेप घेतल्यामुळे गोंधळ उडाला. त्यानंतर कदम यांच्याबरोबर सत्यजित कदम यांनीही हेच आरोप केल्यामुळे गोंधळ आणखी वाढला. महापौर फरास यांनी सर्वांना सातत्याने शांतता राखण्याचे आवाहन केले. तरीही गोंधळ थांबत नसल्याने शेवटी सभा काही काळासाठी तहकूब केली.

सभेतील मागण्या

गैरव्यवहाराला कारणीभूत युनिटी कन्सल्टंटला तातडीने दूर करावे

महापालिकेच्या फसवणुकीबाबत कन्सल्टंटवर फौजदारी करा

अधिकाऱ्यांचे मोबाइल रेकॉडिंग तपासा

अधिकाऱ्यांना निलंबीत करा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताकारी, म्हैसाळला चालना देणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

‘राज्यातील दुष्काळ हटवण्याच्यादृष्टीने जलयुक्त योजनांची कामे मोठ्या संख्येने हाती घेतली आहेत. त्याशिवाय अपूर्ण योजना पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्याचाच भाग सांगली जिल्ह्यातील ताकारी-म्हैसाळ योजनेला चालणार देणार आहोत,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

सांगलीत नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भव्य इमारतीचे उद्घाटन, जलयुक्त शिवार योजनांची पाहणी असे कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर मिरज येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

सांगली जिल्ह्यातील सिंचन योजना मार्गी लावण्यात येईल, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, राज्यातील अपूर्ण प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावण्याचे नियोजन आहे. त्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सांगलीतील ताकारी, म्हैसाळ योजनेलाही पाहिजे तेवढा निधी देण्यात येईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

टेंभू उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी महाजेनकोने सर्व्हेक्षण केले आहे. यासाठी कालव्यावरील जागा व सरकारची जागा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टेंभू एक पथदर्शी योजना करणार आहे. ती पूर्ण क्षमतेने चालविली तरच शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे आणि त्यातून उत्पादन वाढणार आहे. यापुढे या योजनेचे पाणी कालव्यांऐवजी बंदिस्त पाइपद्वारे देण्यात येणार आहे. तलाव आणि इतर कामेही करण्यात येणार आहेत. टेंभू योजनेबरोबरच ताकारी व म्हैसाळ योजनांनाही चालना देणार आहे. कृषी पंपांची मागणी असलेल्या शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याची योजना तयार करण्यात येत आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादी कमी होईल, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळ्यात अखंडित वीज

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet:@sachinyadavMT

कोल्हापूर ः आगामी पावसाळ्यात ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीने सर्व ती तयारी सुरू केली आहे. कोल्हापूर आणि सांगली असे कार्यक्षेत्र असलेल्या विभागीय कार्यालयाने सहा हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू केली आहे. काही नैसर्गिक आपत्ती वगळता आवश्यक कामासाठी काही फिडरवर मोजक्याच परिसरातील वीज बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्यात घरगुती, औद्योगिक आणि शेतीला अखंडित वीज पुरवठा करण्याचा निर्धार महावितरणने व्यक्त केला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षासह प्रत्येक गावांतील फिल्डवरील कामाचे आउटसोर्सिग केले आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात वाऱ्यामुळे उखडलेले लोखंडी पोल, सिमेंटचे पडलेले आणि गंजलेले पोल, लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या, झुकलेले पोल, निसटलेले कंडक्टर, ट्रान्सफार्मरमधील ऑइलची लेव्हल तपासणीचे आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ५०० हून अधिक पोल पडले. काही पोलही झुकले. त्याची दखल घेऊन महावितरणने चार दिवसांत पोल दुरूस्ती आणि बदलण्याचे आदेश दिले. पंचगंगा काठावरील गावे, पाण्यात बुडणारे ट्रान्स्फार्मर, धोकादायक ठिकाणी सुरू राहणारा वीजपुरवठा बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी पातळी झपाट्याने वाढून वीज पुरवठा करणारा ट्रान्सफार्मर बंद करण्यात येणार आहे. या ट्रान्सफार्मरमधून मोजक्याच घरे आणि शेतीपंपासाठी करण्यात येणारा पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तेवढ्या भागासाठी सर्व गावचा पुरवठा खंडित केला जाणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे काही ठिकाणी पुरवठा खंडित झाल्यास महावितरणचे कर्मचारी आणि नियुक्त केलेल्या खासगी यंत्रणेकडून तातडीने दुरुस्ती केली जाणार आहे.

एसएमएसद्वारे अलर्ट

महावितरण धोक्याची सूचना देण्यासाठी ३१४ सेक्शनला बल्क पद्धतीने एसएमएस देण्याची सुविधा आहे. कोणत्याही गावांतील वीज पुरवठा बंद करायचा असेल तर महावितरणच्या मुख्य कार्यालयातून सूचना दिल्या जाणार आहेत. वीज, वारा, पाण्याची तीव्रता पाहून संबंधित गावांला अलर्ट दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे त्यासाठी दोन कर्मचारी कायमस्वरूपी असतील. त्यासह महावितरणचा स्वतंत्र कक्ष स्थापना करण्यात येत आहे. वीज पुरवठा बंद करण्याचा एसएमएस अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर दिला जाणार आहे. पुढील टप्पा म्हणून फिडर ते ग्राहकांपर्यंत संदेश देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तिन्ही प्रकारचे मिळून १८ लाख ग्राहक आहेत.

००

महावितरण

३० उपविभागीय कार्यालये

कोल्हापूर ६ विभाग- शहर, जयसिंगपूर ग्रामीण एक जयसिंगपूर ग्रामीण २, गडहिंग्लज, इचलकरंजी

सांगली- सांगली शहर, सांगली ग्रामीण, विटा, इस्लामपूर, कवठेमहाकांळ,

५४ उपविभागीय कार्यालये- कोल्हापूर ३० , सांगली २४

३१४ सेक्शन

कर्मचारी ५०००

वायरमन ४०००

ऑपरेटर १०००

अभियंता ७५०

नवीन भरती १२५

अजूनही गरज २२५

००

वाहिन्या

११ केव्ही २३ हजार १७२ किलोमीटर

लघुदाब वाहिनी- ४४ हजार ६६० किलोमीटर

ट्रान्सफॉर्मर ४१ हजार १७६

०००

बिल्डर्सना सूचना

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बिल्डर्सनी विजेची मीटर पहिल्या मजल्यावर बसवावीत, अशा सूचना केल्या आहेत. काही भागात पावसाचे पाणी अपार्टमेंटच्या तळघरात जाते. बहुतांशी अपार्टमेंटमध्ये तळघरातच वीज मीटर आहेत. त्याचा फटका ग्राहकांना बसू शकतो. धोकादायक प्रसंगही उद्भभवू शकतो. त्या पार्श्वभूमीवर महावितरणने बिल्डर्स असोसिएशनला पहिल्या मजल्यावर विजेचे मीटर बसविण्याच्या सूचना केल्या आहेत.

००

महावितरणचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज आहे. महावितरणचे कर्मचारी, काही खासगी यंत्रणाही कार्यरत झाली आहे. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पोल पडले होते. या पोलची दुरूस्ती पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी सिंमेटचे आणि लोखंडी पोल बदलले आहेत. जमिनीपासून सुमारे ३० फूट उंच असलेल्या तारांची पाहणी केली आहे.

एम. जी. शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या मुलासाठी सीबीएसई स्कूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘पोलिसांच्या मुलांना कमी किंमतीत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सीबीएससी पॅटर्नचे स्कूल उभे केले जाईल. त्यासाठी घोडावत इन्स्टिट्यूटची मदत घेण्यात येईल’ असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे सांगितले. पोलिस निवासस्थानाच्या दुरुस्तीच्या कामाच्या पुर्णत्वाबाबत पोलिस बॉइज असोसिएशनच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, सहायक अधीक्षक हर्ष पोतद्दार, आमदार अमल महाडिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, उपाधीक्षक सतीश माने, भरतकुमार राणे उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘यूपीएससी, एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या पोलिसांच्या मुलांसाठी याठिकाणी सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. विद्याप्रबोधनी संस्थेमध्ये पोलिसांच्या मुलांना निःशुल्क प्रवेश देण्यात येणार असून महिला पोलिसांसाठी फिरते चेजिंग रुम लवकरच सुरू केले जाईल. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रिक्त असलेल्या सरकारी निवासस्थानांचा सर्व्हे केला जाईल. त्यांचे रुपांतर पोलिसांसाठीच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये (तात्पुरती निवासस्थाने) करण्यात येईल’, असे प्रतिपादन पालकमंत्री म्हणाले.

पोलिस मुख्यालयात १८९० ते १९२० या कालावधीतील एकूण २५ जुन्या वसाहती आहेत. यामध्ये ५१८ पोलिस निवासस्थाने आहेत. १९८६ मध्ये आरसीसी ३४ पोलिस लाइन बांधण्यात आल्या. त्यामध्ये २००० ​ निवासस्थाने आहेत. नोव्हेंबर २०१६ मध्ये पालकमंत्री पाटील यांनी या सर्व निवासस्थानांना भेट देऊन तेथील प​रिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ६०० निवासस्थानांबाबत दुरुस्ती, पाणी व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था, रंगकाम, विद्युतीकरण, काँक्रीटीकरण अशा अनेक कामांचे तत्काळ आदेश दिले होते. त्यानुसार निवासस्थानांमध्ये आवश्यक ती सर्व कामे करून सहा महिन्यांत नूतनीकरण करण्यात आले. याबद्दल पोलिस बॉईस असोसिएशनतर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी नूतनीकरण केलेल्या घरांचे फिडबॅक फॉर्म भरून घ्यावे असे आदेश दिले. पोलिसांच्या कुटुंबियांनी कोणताही संकोच न ठेवता काही त्रुटी असल्यास त्या नजरेस आणून द्याव्यात, असे सांगितले. अनेक वर्ष जुन्या निवासस्थानांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर तेथील कुटुंबांनी कोठे राहायचे असा प्रश्न निर्माण होतो. यावर मार्ग काढण्यासाठी ज्या ठिकाणी सरकारी निवासस्थाने रिकामी आहेत, अशा निवासस्थानांचा सर्व्हे करुन त्याचे रुपांतर ट्रान्झिस्ट कँम्पमध्ये करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी सहा महिन्यांत १० कोटींची कामे युद्धपातळीवर पूर्ण करून पोलिस निवासस्थानांचे नूतनीकरण केल्याबद्दल त्यांचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आभार मानले. पोलिस कल्याण‍ निधीच्या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांनी पाठिंबा दिल्याने त्यातून जमा झालेल्या निधीतून पोलिसांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे शक्य झाल्याचेही सांगितले. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी, पोलिसांना पायाभूत सुविधा मिळाल्यास पोलिस २४ तास काम करतील असे सांगून दसरा चौकातील पोलिस निवासस्थाने अन्यत्र हलविण्याबाबत प्रयत्न व्हावेत अशी विनंती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी शिवाजी पूल कुणामुळे झाला हो ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्यायी शिवाजी पुलाच्या उर्वरित कामकाजास केंद्र सरकारने बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. हा निर्णय सहजपणे नक्कीच झाला नाही. त्यासाठी अनेकांच्या प्रयत्नांचे प्रयत्न होते. पण ‘पुलाला मंजुरी माझ्यामुळेच मिळाली’ असे म्हणत कोल्हापुरात दोन दिवस चांगलेच श्रेयवाद रंगत आहे. कुणामुळे का होईना पण अतिशय चांगले काम झाले अशा भावना कोल्हापुरात व्यक्त होत आहेत. इतर रखडलेल्या प्रश्नाकडे याच गांभीर्याने बघा अशा प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहेत.

शिवाजी पुलाला सव्वाशे वर्षे पूर्ण झाल्याने त्याला पर्यायी पूल आवश्यक होता. त्यानुसार तत्कालिन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी प्रयत्न करत केंद्राकडून हा पूल मंजूर करून घेतला. त्यानंतर त्याचे काम सुरू झाले, अर्धे काम पूर्ण झाल्यानंतर पुरातत्व खात्याचा मुद्दा पुढे करत काहींनी विरोध केला. यामुळे गेले दोन वर्षे पुलाचे काम रखडले. या काळात हे काम तातडीने सुरू व्हावे यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू होते. सर्वपक्षीय कृती समिती कोल्हापुरात आंदोलनाच्या माध्यमातून वातावरण निर्मीती करत होती.

खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत हा प्रश्न मांडला. बांधकाम मंत्र्यांना भेटून हा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहचवला. खासदार संभाजीराजे यांनी तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून हा प्रश्न निकाली काढण्याची विनंती केली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारच्या पातळीवर बराच पाठपुरावा केला. यामुळे कोल्हापूरच्या या शिवाजी पुलाचा विषय केंद्रीय मंत्रीमंडळात चर्चेला आला आणि तेथे तो मार्गीदेखील लागला.

पर्यायी पूल आवश्यक असल्याने तो तातडीने व्हावा अशी नागरिकांची मागणी होती. पण पुरातत्व खात्याचा मोठा अडथळा असल्याने मोठी अडचण झाली होती. अनेकांच्या प्रयत्नामुळे अखेर हा अडथळा दूर झाला. पण मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन मंजूर मिळेपर्यंत ही ‘बातमी’ यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपर्यंत पोहचलीच नाही. लोक​प्रतिनिधीच काय तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनादेखील याचा थांगपत्ता लागला नाही. अडथळा दूर झाल्याची बातमी वृत्तपत्रात छापून आली आणि मग श्रेयवादासाठी धडपड सुरू झाली. अनेकांनी पत्रकबाजी सुरू केली. भाजपने तर चौकाचौकात साखर वाटले. माझ्यामुळेच हे झाले हे सर्वच नेते म्हणून लागल्याने ‘नेमके कुणामुळे झाले हो’ असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

पुलाचे निम्मे काम झाल्यानंतर त्याला पुरातत्व खात्याने खो घातला होता. पुरातत्व खात्याचे नियम अतिशय कडक असतात. त्यामुळेच हे काम कधी होणार? असा सवाल जनतेतून केला जात होता. पण अनेक लोकप्रतिनिधींनी आपली राजकीय ताकद आणि संबंध वापरल्याने हा प्रश्न सुटला आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल तर कोणताही प्रश्न मार्गी लागू शकतो हेच या पुलाच्या मान्यतेने सिद्ध् झाले आहे. निवडणुकीत राजकारण करा, पण मुंबई आणि दिल्लीत कोल्हापुरी ताकद दाखवा, म्हणजे कोल्हापूरचे सर्व प्रश्न नक्की सुटतील अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकतीस गावांचा फेरप्रस्ताव पाठवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर

पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरत असलेल्या ३९ गावांपैकी आठ गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे काम मार्गी लागत आहे. उर्वरित ३१ गावांत प्रकल्प उभारण्यासाठी नव्याने प्रस्ताव पाठविण्याचे आदेश जिल्हा परिषदेला देण्यात आल्याची माहिती शनिवारी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर दळवी यांनी पहिल्यांदाच कोल्हापूरला भेट दिली. जोतिबा मंदिर विकास आराखडा, कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पंचगंगा नदी प्रदूषण आणि विभागीय क्रीडा संकुल या सर्व विषयांचा कामांचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी संबंधित विषयांमधील कामांची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार प्रमुख उपस्थित होते.

दळवी म्हणाले, ‘कोल्हापूर आणि इचलकरंजी पालिकांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. या दोन्ही शहरांच्या बरोबरीने जिल्ह्यातील १७४ गावे नदीप्रदूषणात भर घालत आहेत. या गावांतही त्यांच्या लोकसंख्येनुसार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज आहे. यातील पंधरा हजारावर लोकसंख्या असलेल्या ३९ गावांमधील जवळपास ७० टक्के पाणी थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे या गावांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया झाल्यास नदीप्रदूषणाचा मोठा टप्पा रोखण्यात यश येणार आहे. यातील आठ गावांत नाबार्डच्या माध्यमातून काम सुरू झाले आहेत. एका गावात प्रकल्पाला जागा मिळाली असून, इतर सात गावांत जागा मिळवणे सुरू आहे. उर्वरित ३१ गावांच्या प्रकल्पांसाठी स्वतंत्र प्रस्ताव पाठवून त्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर करून घ्यावा लागेल.’

या प्रस्तावाचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या आठ दिवसांत प्रस्ताव पाठिवण्यात येईल. काही औद्योगिक कारखान्यांमधूनही बाहेर पडणाऱ्या पाण्यातूनही नदीचे प्रदूषण वाढत आहे. ज्या कंपन्यांकडे पाणी प्रक्रिया प्रकल्प नाही, त्यांना नोटीस काढण्यात आल्या आहेत. ज्या दहा साखर कारखान्यांमधील जादा क्रशिंगमुळे प्रदूषित पाणी नदीत मिसळत आहे त्या कारखान्यांना त्यांच्या प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढविण्याचे आदेश दिले आहेत, असेही आयुक्त दळवी यांनी सांगितले.


जोतिबा परिसरात पंधरा दिवसांत स्वच्छता

आयुक्त दळवी यांनी सकाळी जोतिबा मंदिराला भेट दिली. त्यावेळी मंदिर परिसरात असलेल्या अस्वच्छतेवरून नाराजी व्यक्त केली. येत्या पंधरा दिवसांत स्वच्छतेच्या कामाचे आउटसोर्सिंग करण्याचे आदेश दिल्याची माहिती दळवी यांनी दिली. ते म्हणाले, ‘जोतिबा मंदिराच्या डोंगर परिसरात अतिशय अस्वच्छता आहे. दर रविवारी लाख ते दीड लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे परिसर कायम स्वच्छ असला पाहिजे. त्यासाठी पंधरा दिवसांत स्वच्छतेच्या कामाचे आउटसोर्सिंग करावे, अशा सूचना देवस्थान समिती अध्यक्ष आणि सचिवांना दिल्या आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपायुक्तांसह चौघांना नोटिसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थेट पाइपलाइन योजनेंतर्गत ठिकपुर्ली कॅनॉलवर बांधलेल्या लोखंडी पुलासाठी जादा बिलाचे प्रकरण चार अधिकाऱ्यांना भोवण्याची शक्यता आहे. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या प्रकरणी उपायुक्त विजय खोराटे, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, शाखा अभियंता हेमंत गोंगाणे आणि महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे यांना मंगळवारपर्यंत खुलासे करण्याचे आदेश दिले आहेत.

ठिकपुर्ली कॅनॉलवरील लोखंडी पुलाच्या कामावरुन महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. आयुक्त चौधरी यांनी सर्वसाधारण सभेत जादा बिलाच्या प्रस्तावावर सही करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्वाही दिली होती. लोखंडी पुलासाठी २५ लाख रुपये खर्च असताना दोन कोटी ४८ लाख रुपयांचे इस्टिमेट केल्याचा प्रकार नगरसेवकांनी उघडकीस आणला. महापालिकेने ठेकेदार जीकेसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला एक कोटी ७१ लाख रुपयांचे बिल दिले आहे. ठेकेदार व सल्लागार कंपनीने अधिकाऱ्यांशी संगनमत करुन महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी कसलीही चौकशी न करता लोखंडी पुलाच्या जादा बिलाच्या प्रस्तावावर सही केली. हे प्रकरण आता चारही अधिकाऱ्यांना महागात पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

.......

ज्यांना नोटीस तेच तांत्रिक समितीत

आयुक्तांनी पाइपलाइन योजनेच्या तांत्रिक कामावर देखरेख, बिले काढण्यासाठी ​त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या स​​मितीत उपायुक्त खोराटे, जल अभियंता कुलकर्णी यांचा समावेश आहे. दुसरीकडे कंपनीला जादा बिल दिल्याप्रकरणी आयुक्तांनी उपायुक्त व जल अभियंत्यांना नोटीसही काढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मारहाण करणाऱ्या पुजाऱ्याचे निलंबन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

विठुरायाच्या दर्शनासाठी नगर जिल्ह्यातील शेवगाव येथून आलेल्या भाविकास मारहाण करणाऱ्या अशोक भणगे या सरकारी पुजाऱ्यास शनिवारी मंदिर समितीने निलंबित केले. भणगेविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू केल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.

भाविकांशी गैरवर्तन करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा या पूर्वीच जिल्हाधिकारी भोसले यांनी दिला होता. शनिवारी सकाळी मंदिर समितीने या मारहाण करणाऱ्या अशोक भणगे या सरकारी पुजाऱ्यास निलंबित केले.

देवाच्या दर्शनासाठी १७ मे रोजी सकाळी साडेसहाला आलेल्या दत्तात्रय सुसे या भाविकांने विठ्ठल मूर्तीला हार घालण्याचा प्रयत्न केला म्हणून भणगे याने सुसेंना मारहाण केली होती. यानंतर संतप्त झालेल्या भाविकांनी पंढरपूर शहर पोलिसात या पुजाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'छत्रपतींचं मुस्लिमांशी जिव्हाळ्याचं नातं'

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शाहू महाराज यांनी मुस्लिम समाजाबरोबरच सर्व बहुजन समाजातील लोकांसाठी शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली आणि तेव्हापासून छत्रपती घराणे आणि मुस्लिम समाजाचे जिव्हाळ्याचे नाते आहे. प्रत्येक धर्माने माणुसकी जपली तर जातीय संघर्ष होणारच नाही हीच जाणीव शाहू महाराजांमुळे करवीर नगरीच्या सर्व लोकांना असल्याने इथे जाती, धर्माचा एकोपा आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे युवराज आणि राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. कोल्हापुरातील हज फाउंडेशनच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

हज यात्रेसाठी जास्तीत जास्त लोकांना जाता यावे यासाठी हजला जाण्यासाठी लागणाऱ्या कोट्यात वाढ कशी करता येईल यासाठी खासदार म्हणून प्रयत्न करणार असे प्रतिपादन यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी केले. या जन्मात एकदा तरी मक्का आणि मदिनाला जाऊन येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोल्हापुरात शाहू महाराजांचा सामाजिक सलोख्याचा विचार रुजलेला आहे. त्यामुळे जातीय आणि धर्मातील तेढ कोल्हापुरात कधीच निर्माण होणार नाही, असेही खासदार महाडिक म्हणाले.

कोल्हापुरातून हज यात्रेसाठी गेलेल्या लोकांसाठी मक्का-मदिना येथे रिबात म्हणजेच ठिकाणा किंवा जागा अत्यंत कमी खर्चात मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून सौदी अरेबियाशी याबाबत बोलावे अशी मागणी कार्यक्रमाचे अध्यक्ष काझी मुफ्ती इर्शादुल्लाह मखदुमी कास्मी यांनी धनंजय महाडिक आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे केली. त्यावर याबाबत नक्की प्रयत्न करू असे उपस्थित दोन्ही खासदारांनी सांगितले.

२४० जण हज यात्रेसाठी जाणार आहेत. हे त्यांचे भाग्य आहे. प्रत्येक धर्म हा प्रेम, करुणा आणि त्याग याचीच शिकवण देतो. हजला जाऊन आलेल्या त्या हाजींचे जीवन सफल होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले. कोल्हापूरच्या प्रथम नागरिक महापौर हसीना फरास यांनी हज यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी हजला जाणाऱ्या मुस्लिम बांधव आणि महिला भगिनी यांना छत्री वाटप करण्यात आले.

स्वागत हाजी बाबासाहेब शेख यांनी केले. प्रास्ताविकामध्ये पत्रकार व हज फाउंडेशनचे सचिव समीर मुजावर यांनी फाउंडेशनच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. यावेळी संचालक हाजी बालेचांद म्हालदार, इम्तियाज बागवान,सादत पठाण, यासीन उस्ताद,अस्लम मोमीन, इम्तियाज बारगीर, समीर पटवेगार, हाजी बाळासाहेब आत्तार,मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणीभाई आजरेकर यांच्यासह सदस्य आणि मुस्लीम बांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीच्या आरोपानंतर प्राचार्यांची आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पंढरपूर

प्राचार्यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप करीत त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्राचार्यांनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिलीप खडतरे असे या प्राचार्यांचे नाव असून ते न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य होते. खडतरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ आहे.

आत्महत्येपूर्वी प्राचार्य दिलीप खडतरे यांनी तीनपानी चिठ्ठी लिहिली असून आपल्याला विनयभंग प्रकरणात गोवण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास खडतरे चालत गोपाळपूर येथील स्वेरी इंजिनियरिंग कॉलेजच्या आवारात आले. तिथून ते डिप्लोमा विभागाच्या इमारतीवरील चौथ्या मजल्यावर पोहचले व त्यांनी उडी मारून आत्महत्या केली.

कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना आवाज येताच त्यांनी धाव घेतली. खडतरे याना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांना खडतरे यांची सुसाईड नोट, कॉलेजमधील सीसीटीव्ही फूटेज आणि इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत. आपल्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले असून त्यांना धमक्या मिळत होत्या. गेली २६ वर्ष प्रामाणिकपणे काम केल्यावर त्यांना गोवण्यासाठी षडयंत्र रचणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय त्यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली.

छेडछाडीचा आरोप करणाऱ्या मुलींची चौकशी करण्याची मागणी प्राचार्यांच्या पत्नी शोभा खडतरे यांनी केली आहे. आपल्या भावाच्या मृत्यूला शिवसेनेचे कार्यकर्ते व त्यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या विद्यार्थिनी जबाबदार आहेत. सर्वांची चौकशी करण्याची मागणी त्यांचे भाऊ अनिल खडतरे यांनी केली. शनिवारी प्राचार्य दिलीप खडतरे यांच्यावर त्यांच्याच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी छेडछाडीचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने प्राचार्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांविरोधात खडतरे कुटुंबीयांनी पंढरपूर तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गवा, करवंद, देवगांडूळ, अन् ग्रेट हॉर्नबिल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जैवविविधतेने नटलेल्या कोल्हापूर जिल्ह्याची मानांकने पहिल्यांदाच जाहीर करण्यात आली आहे. उद्या (सोमवार, २२ मे) साजरा होत असलेल्या जागतिक जैवविविधता दिवसाच्या पार्श्वभूमीवर ही मानांकने जाहीर करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रभू नाथ शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मानांकनांमध्ये कोल्हापूरचे वैभव असलेल्या गवा या प्राण्यासह देवगांडुळ, ग्रेट हॉर्नबिल, करवंद, सरडा डारविनी आदींची समावेश आहे.

‘संबंधित प्राणी, पक्षी, फुलांचा जिल्ह्यातील आढळ, दूर्मिळ किंवा त्यांना असणाऱ्या धोक्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी असलेली गरज लक्षात घेऊन मानचिन्हे ठरविण्यात आली’ असे शुक्ला यांनी सांगितले. शुक्ला म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्हा जैविविधतेने नटला असून, अनेक तालुके पश्चिम घाटाच्या वनसंपदेत येतात. मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व प्राणी मात्रांचे जिल्ह्यात वास्तव्य आहे. असे जिल्हे राज्यातच नव्हे, देशात काही मोजकेच आहेत. जिल्ह्यात सपूष्प वनस्पतींच्या २ हजार २२७ जाती आहेत. फक्त भारतीय उपखंडात आढळणाऱ्या वनस्पतींपैकी ६९४ प्रजाती कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. सस्तन प्राण्यांच्या ४० पेक्षा जास्त प्रजातींची नोंद कोल्हापुरात असून, वन्य प्राण्यांत पट्टेरी वाघापासून पट्टेरी मानेचे मुंगूस असे दुर्मिळ प्राणी कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. तर फुलपाखरांच्या ६० हून अधिक प्रजाती येथे आढळतात.’

जिल्ह्याची मानचिन्हे ठरविताना कोणत्या प्र्रजातींचे संवर्धन केल्यास इतर प्रजातींचेही संवर्धन होईल, याचा विचार करून या प्राणी, पक्षी आणि वनस्पतींची निवड केल्याचे शुक्ला यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘लोकांना माहिती असणारे आणि सहज सोप्या पद्धतीने या जातींचे संवर्धन करता येईल, असे नियोजन केले आहे. मुळात संवर्धन हे लोकसहभागातून होणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय जैवविविधता व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली असून, जिल्ह्यात १ हजार ३० ग्रामपंचायतींमध्ये समितींची स्थापना करण्यात आली आहे. जैवविविधतेच्या उपाय योजना राबविण्यासाठी जिल्ह्यातील १२ गावांची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे.’

ही आहेत मानचिन्हे

सपरपटणारा प्राणी सरडा डारविनी

पक्षी महाधनेश (ग्रेट हॉर्नबिल)

वन्यप्राणी गवा

फूल सोन घंटा

फुलपाखरू ग्रेट ऑर्गर टीप

फळ करवंद

वृक्ष भेरली माड

उभयचर देवगांडूळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हज यात्रेकरू कोटा वाढवण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘प्रत्येक धर्माने माणुसकी जपली तर जातीय संघर्ष होणारच नाही ही जाणीव शाहू महाराजांमुळे करवीरनगरीच्या सर्व लोकांना असल्याने येथे जाती, धर्माचा एकोपा आहे,’ असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. कोल्हापुरातील हज फाउंडेशनच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. हज यात्रेसाठी जास्तीत जास्त लोकांना जाता यावे यासाठी यात्रेकरूंच्या कोट्यात वाढ कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापुरात शाहू महाराजांचा सामाजिक सलोख्याचा विचार रुजलेला आहे. त्यामुळे जातीय आणि धार्मिक तेढ कोल्हापुरात कधीच निर्माण होणार नाही असेही खासदार महाडिक म्हणाले.

कोल्हापुरातून हज यात्रेसाठी गेलेल्या लोकांसाठी मक्का-मदिना येथे रिबात म्हणजेच जागा अत्यंत कमी खर्चात मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून सौदी अरेबियन राष्ट्राशी यांबाबत बोलावे, अशी मागणी कार्यक्रमाचे अध्यक्ष काझी मुफ्ती इर्शादुल्लाह मखदुमी कास्मी यांनी खासदार धनंजय महाडिक आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे केली.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापौर हसीना फरास यांनी हज यात्रेकरूना शुभेच्छा दिल्या. यावेळी हजला जाणाऱ्या मुस्लीम बांधव आणि महिला भगिनी यांना छत्री वाटप केले.

हाजी बाबासाहेब शेख यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात फाउंडेशनचे सचिव समीर मुजावर यांनी हज फाउंडेशन स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. संचालक हाजी बालेचांद म्हालदार, इम्तियाज बागवान,सादत पठाण, यासीन उस्ताद,अस्लम मोमीन, इम्तियाज बारगीर, समीर पटवेगार, हाजी बाळासाहेब अत्तार, मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images