Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

साखर हंगामात राज्यातील साखर उत्पादन निम्म्यावर

0
0

प्रकाश कारंडे, कागल

भरमसाठ वाढलेले खतांचे दर, उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळणारा ऊसदर आणि कमी झालेला पाऊस यामुळे ऊसाचे क्षेत्र घटले होते. परिणामी नुकत्याच संपलेल्या साखर हंगामात साखरेचे उत्पादन राज्यात निमम्याहून कमी झाले आहे. साखर उत्पादन कमी झाले असल्याने साखरेला चांगला दर मिळेल, अशी आशा सध्या साखर उत्पादक बाळगून आहेत. मात्र अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील साखर महाग असल्याने या साखरेची उचल कशी होणार याची चिंताही लागून राहिली आहे.

यावर्षीचा ऊस गाळप हंगाम १० एप्रिलला संपला आहे. गेल्यावर्षी राज्यात साखरेचे उत्पादन ८४.१५ लाख मेट्रिक टन झाले होते. यावर्षी ते ४१.८० लाख मेट्रिक टनापर्यंत खाली आले आहे. यावर्षीचा हंगाम १० एप्रिल रोजी संपला. नोव्हेंबरपासून १० एप्रिलपर्यंत राज्यातील सहकारी ९९ व खासगी ७८ कारखान्यांनी हंगाम घेतला. या हंगामात राज्यात ३७२.४५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ४१.८० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या २५ वर्षातील साखर उत्पादनाचा हा निच्चांक आहे. ज्या सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी किमान २०० लाख मेट्रिक टन ऊस गाळप होत होते, त्याठिकाणी केवळ ४० लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. मराठवाडा, विदर्भ व नगर विभागातही गेल्यावर्षीच्या तुलनेत २५ टक्केही गाळप झालेले नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यात ७५ टक्क्यापर्यंत गाळप झाले आहे. हंगामाच्या सुरवातीला राज्यात ३७ लाख मेट्रिक टन साखरेचा साठा शिल्लक होता. त्यात यावर्षीच्या ४१.८० लाख मेट्रिक टन साखरेची भर पडली. राज्यातील साखरेची गरज केवळ २८ ते ३० लाख मेट्रिक टन आहे. उर्वरित साखरेला गुजरातसह आंध्रप्रदेश, ओरीसा ही राज्ये बाजारपेठ आहेत. पण या राज्यात उत्तर प्रदेशची साखर महाराष्ट्राच्या साखरेपेक्षा प्रतिटन १०० ते १५० रुपये कमी दराने मिळत असल्याने महाराष्ट्रातील साखरेला या राज्यांतून मागणीच ठप्प आहे. परिणामी कारखानदारांना एक तर राज्यातच ग्राहक शोधावे लागतील किंवा कमी दराने ती इतर राज्यात पाठवावी लागेल. पण दोन्ही व्यवहारात तोटा असल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका साखर उद्योगाला बसू शकतो. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस क्षेत्रात मोठी घट झाली आहे. गेल्यावर्षी झालेल्या आढावा बैठकीत उसाचे क्षेत्र एक लाख ४७ हजार ९५२ हेक्टर होते. पुढील हंगामाचा जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी २५ एप्रिल रोजी जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीत जिल्ह्यात एक लाख ४३ हजार ९०५ हेक्टर क्षेत्र उसाखाली असल्याचे सांगण्यात आले. यावरून गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी ऊस क्षेत्रात तीन हजार हेक्टर क्षेत्राची घट झाली आहे.

...........

कोट

‘महाराष्ट्रात जरी साखर कमी उत्पादित झाली असली तरी उत्तर प्रदेशमध्ये याच्या उलटी परिस्थिती आहे. एकूणच भारतात साखर कमी उत्पादित झाली असली तरी इतकीही कमी झालेली नाही की ज्यामुळे साखरेचे भाव प्रचंड वाढतील. त्यातच सरकारचेही धोरण विशिष्ठ पातळीच्यावर साखर दर वाढू नये असेच असते. याशिवाय पाच लाख टन साखर आयातीचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. बाजारातील प्रचलित दर पाहून कारखान्यांनी साठवण्यापेक्षा साखर विकणे केव्हाही हितावहच आहे.

विजय औताडे, कार्यकारी संचालक, शाहू साखर कारखाना

-----------------------------------------------------------

चौकट

साखर का विकावी ?

उत्तरप्रदेशमध्ये खासगी कारखाने असून सरकारने ठरवलेला दर देणे बंधनकारक आहे. त्यामुळे आपला फायदा ठेवून येथील कारखाने महाराष्ट्राच्या दराच बरोबरीने दर ठेवून गुजरातपर्यंत आपली साखर आणत आहेत. याउलट महाराष्ट्रात सरकारचा दर हा पहिला हप्ता असतो आणि पुढचा हप्ता द्यावा लागतो. कधीतरी तिसरा हप्ता द्यावा लागतो .त्यामुळे बाजारातील साखर दराचा ‘डावघाव’ पहावा लागतो. परंतु सहकारी साखर कारखानदारी असल्याने परिस्थितीचा विचार करुन कुणीही साखर विक्री केल्यास त्या करखान्यावर संशयाची सुई जाते. याचा परिणाम जास्त दिवस साखर सांभाळल्याने व्याज, साठवण खर्च वाढतोच शिवाय साखरेची प्रतही बिघडते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कबनूर खूनप्रकरणीसहाजणांना अटक

0
0

इचलकरंजी

वाद सोडवण्यासाठी गेलेल्या बबलू सुभाष नवले (वय ३५, रा. जळगाव) याच्या खूनप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह सहाजणांना अटक केली आहे. अनिल विष्णू खोत (वय २९), अविनाश शेखर जर्मने (वय २५), नितीन महादेव लंगोटे (वय २५), विनायक अनिल सुर्यवंशी (वय २३) व अंकुश अशोक आमणे (वय २६) अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

जळगाव येथे वास्तव्यास असणारा बबलू नवले हा लग्नकार्यासाठी कबनूर (ता. हातकणंगले) येथे आला होता. त्याचा मेहुणा रोहन नेतले याच्याबरोबर तो वाद सोडविण्यासाठी गेला होता. यावेळी १० ते १२ जणांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बबलू याचा कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी १० ते १२ जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी मुख्य संशियत हा अल्पवयीन आहे. त्याला पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. त्याचबरोबर अनिल खोत, अविनाश जर्मने, नितीन लंगोटे, विनायक सुर्यवंशी, अंकुश आमणे या पाच साथीदारांनाही गजाआड केले. मुख्य संशयित हा अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर उर्वरीत पाचजणांना येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता त्यांना १२ मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. या प्रकरणातील आणखी एका संशयिताला पोलिसांनी रात्री उशीरा ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील फरारी संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई पोलिस उपअधिक्षक विनायक नरळे, पोलिस निरिक्षक सतीश पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष डोके यांनी केली. दरम्यान, मृत बबलू नवले याच्यावर सातारा येथील नेरी पेडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारनियमनाचा वस्त्रनगरीला फटका

0
0

राजेंद्र पाटील, इचलकरंजी

तांत्रिक अडचणी आणि कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे विद्युत निर्मिती करणारे संच बंद असल्यामुळे राज्यात विजेचा लपंडाव सुरु झालेला आहे. या भारनियमनाचा फटका वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीलाही बसला आहे. भारनियमनामुळे कापडाच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला असून दररोज ५०० कोटी रुपयांच्या उत्पादनाला फटका बसत आहे.

प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा मागणी जास्त असल्यामुळे विजेचे उत्पादन आणि पुरवठ्याचा मेळ घालण्यासाठी संपूर्ण राज्यात भारनियमन सुरु करण्यात आलेले आहे. याचा सर्वाधिक फटका औद्योगिक शहरांना सोसावा लागत आहे. कापडाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या इचलकंरजी, मालेगाव, भिवंडी, विटा, पेठ वडगाव या शहरातील साधे व स्वसंचलित यंत्रमागाचा खडकडाट काही तास ठप्प होत आहे. राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुमारे १५०० मेगावॅट भारनियमन सुरु असून महावितरणकडून विजेची दररोजची मागणी आणि पुरवठा यांचा ताळमेळ घालण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. कोळशावर आधारित काही संच बंद पडले आहेत, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पवन उर्जाद्वारे निर्माण होणाऱ्या विजेमध्ये ५०० मेगावॅट विजेची कमतरता निर्माण झालेली आहे. या सर्व कारणांमुळे सुमारे ३ हजार ५०० मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्याला भारनियमनाचे चटके सहन करावे लागत आहेत.

राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढली असतानाच भारनियमन सुरु झाल्याने जनता,शेतकरी आणि कापड उद्योगाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने ए,बी,सी,डी,ई,एफ अशी वर्गवारी करुन ग्राहकांची प्रामाणिकता तपासण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या ठिकाणी विजेची गळती,वीज चोरी अत्यंत कमी आहे आणि त्या ठिकाणी वसुली मोठ्या प्रमाणात होते, अशा विभागांना ‘ए’ दर्जा दिला आहे. यामध्ये वस्त्रनगरीचा समावेश आहे.

इचलकरंजीत साधेयंत्रमाग सुमारे सव्वा लाख तर स्वयंचलित (अॅटो) लूमची संख्या २५ हजारांच्या घरात आहे. एका साध्या यंत्रमागावर दहा ते बारा तासांच्या कालावधीत सरासरी ८० मीटर कापड उत्पादन होत असते. सव्वा लाख यंत्रमागावर दररोज १० कोटी मीटर कापड तयार होते.एका मीटरला २५ रुपयांचा दर धरल्यास सुमारे अडीचशे कोटी रुपयांचे कापडाचे उत्पादन भारनियमनामुळे होऊ शकत नाही.याशिवाय २५ हजार स्वयंचलित यंत्रमागावरील ३७५ कोटीचे कापड उत्पादन ठप्प झालेले आहे. गेल्या चार दिवसांपासून वस्त्रनगरीत सुरु असलेल्या भारनियमनामुळे कारखानदार हवालदिल झाला असून महावितरण कंपनीने वरिष्ठ कार्यालयाकडे बोट करुन आपली जबाबदारी झटकली आहे.

.............

चौकट

मंदी, दिवाळखोरी, आता भारनियमन



वस्त्रनगरीला गेल्या काही वर्षापासून मंदीने चांगलेच ग्रासले आहे. सूत दरातील चढ-उतार, कापडाला नसलेली मागणी, विजेचे वाढते दर यामुळे कारखानदार मेटाकुटीला आला असतानाच पॉपलीन अडत्याने १०० कोटींचे दिवाळ काढून पोबारा केला. सततच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या कारखानदारांना आता भारनियमनाला तोंड द्यावे लागत आहे.

.....................

सरकारची नामुष्की



औद्योगिक दर्जा मिळालेल्या शहरांना भारनियमनातून मुक्त करण्यात तत्कालीन कॉग्रेस,राष्ट्रवादी सरकारने यश मिळविले होते. परंतु सध्याच्या सरकारला उत्पादन आणि पुरवठा यांमध्ये ताळमेळ घालताना मोठी कसरत करावी लागत आहे. भारनियमनाचे नियोजन नसल्याने औद्योगिक प्रगतीला लगाम लावला जात आहे. भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर केल्यास सरकारची नाचक्की होऊ शकते म्हणून तांत्रिक कारण देऊन सरकारने आपली बाजू सावरली आहे.

..................

कोट

‘अनेक संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारखानदारांपुढे आता भारनियमनाचा मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. आधीच संकटांची मालिका सुरु असताना भारनियमनाच्या नव्या संकटामुळे कारखानदारांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. या विरोधात सोमवारी यंत्रमागधारकांची बैठक घेउन महावितरणच्या कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे.

विनय महाजन, अध्यक्ष , जागृती यंत्रमागधारक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभागातून गाळ उपसा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्यावर्षी जलयुक्त शिवार योजनेतून कळंबा तलावातील गाळ काढल्यानंतर पाणीपातळीत थोडीशी वाढ झाली होती. यावर्षी योजनेतून गाळ काढण्यास सुरुवात होण्यापूर्वीच लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे. दररोज डंपरच्या सहाशेवर फेऱ्या होत आहेत. ट्रॅक्टरचाही वापर करण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षी पुन्हा पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे सरकारी यंत्रणा सुस्त असताना लोकसहभागामुळे तळ्यातील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहे.

गेल्यावर्षी अत्यंत गाजावाजा करत कळंबा तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली होती. जलयुक्त शिवार योजनेसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी दिला होता. त्यामुळे केवळ दीड महिन्याच्या कालावधीत अडीच लाख घनमीटर गाळ काढण्यात यश आले होते. यापैकी शासकीय यंत्रणेद्वारे एक लाख ३० घनमीटर गाळ काढला होता. लोकसहभागातून एक लाख २० हजार घनमीटर गाळ काढला होता. त्यामुळे ३० कोटी लिटर पाणी क्षमता वाढली असल्याचा निष्कर्ष काढला होता. यावर्षीही मोठ्या प्रमाणात तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने जलयुक्त शिवार योजनेतून गाळ काढण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्याप या योजनेतून गाळ काढण्यास सुरुवात झालेली नाही.

एकीकडे शासकीय यंत्रणा सुस्त असताना गरजू शेतकरी मात्र मोठ्या प्रमाणात गाळ नेत आहेत. त्यामुळे रोज डंपर आणि ट्रॅक्टरच्या हजारो फेऱ्या होऊ लागल्या आहेत. कळंबासह पंचक्रोशीतील अनेक शेतकरी गाळाची वाहतूक करत आहेत. त्यामुळे पहाटे सहापासून सायंकाळी सातपर्यंत अखंड जेसीबी व डंपरची घरघर सुरू असतेआहे. तलावातील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यासाठी महापालिकेच्यावतीने वाहनचालकांना पास दिले जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वळवाने हजेरी लावल्याने पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी जलयुक्त शिवार योजनेतून गाळ काढण्यास सुरुवात करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

पाणलोटकडून गाळ उपसा

गेल्यावर्षी जेथे पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात होतो त्याच परिसरात सुमारे वीस फूट उंचीने गाळ काढण्यात आला. त्यामुळे पाण्याचा ऐतिहासिक पाटही निदर्शनास आला होता. काही तज्ज्ञांच्या मते बंधाऱ्याकडील बाजूचा गाळ मोठ्या प्रमाणात काढल्याने यावर्षी पाणीसाठा वेगाने कमी झाला. त्यामुळे यावर्षी लोकसहभागातून काढण्यात येणारा गाळ पाणलोट क्षेत्राकडील बाजूचा काढला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल ‘फाइन आर्ट’कडेच

0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMt

कोल्हापूर ः तुला मोठे होऊन कोण बनायचे आहे? या प्रश्नावर सहजपणे डॉक्टर, इंजिनीअर अशी उत्तरे देणाऱ्या शालेय मुलांकडून आता ‘मला मोठेपणी ग्राफिक डिझायनर, आर्ट डायरेक्टर किंवा फॅशन ​आर्टिस्ट, गायक, ​चित्रकार व्हायचे आहे.’ कुणीतरी प्रश्न विचारावा आ​णि उत्तर द्यावे इतक्या सहजपणे नव्हे तर मुलांची ही उत्तरे राज्य सरकारच्या शैक्षणिक मंत्रालयाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कलचाचणीतून समोर आली आहेत. कोल्हापुरातील ७० टक्के मुलांनी भविष्यात ‘फाइन आर्ट’ क्षेत्रात करिअर करायचे असल्याचे कलचाचणीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. राज्यभरातील सोळा लाख विद्यार्थ्यांमध्येही कलेच्या क्षेत्रात करिअर करण्याला पसंती असल्याचे दिसून आले आहे.

दहावी-बारावी या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यावर करिअरची निवड करताना गुणपत्रिकेतील टक्केवारीला महत्त्व होते. इंजिनीअरिंग ​आणि मेडिकल या शाखांकडे शास्त्र विषयाच्या मुलांचा कल अधिक होता, तर कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थी अध्यापन आणि वित्तशाखांकडे करिअर म्हणून पाहत होते. फाइन आर्ट विभागातील अभ्यासशाखांमधून शिक्षण घेतल्यानंतर करिअरच्या संधी देणाऱ्या क्षेत्रातील असुरक्षितता, उपलब्ध संधी, कामातील सातत्य याबाबत पालकांमध्ये संभ्रमावस्था असल्यामुळे फाइन आर्ट शाखांकडे करिअर म्हणून पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर पालकांचा दबाव येत असल्याच्याही घटना घडल्या आहेत. मात्र, गेल्या वर्षीपासून घेण्यात येणाऱ्या कलचाचणीतील अहवालात दिसून येणाऱ्या निष्कर्षातून चित्र बदलत असल्याचे लक्षात येत आहे.

यावर्षी राज्यभरात १६ लाख ६७ हजार ४४५ विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी दिली. त्यामध्ये करिअर म्हणून निवडण्यात येणाऱ्या कोणत्या क्षेत्राकडे मुलांचा कल आहे हे तपासणाऱ्या प्रश्नांची रचना केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना करिअरचे सुमारे ८० हजार पर्याय सुचविले होते. त्यातून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी फाइन आर्ट विषयात करिअर करण्याची आवड असल्याचे उत्तरांमधून अधोरेखित केले आहे.

हटके करिअरकडे सर्वाधिक कल

फाइन आर्टमध्ये करिअर करण्याची वाढती आवड कलचाचणीच्या अहवालात दिसत आहे. यामध्ये ग्राफिक डिझाइन, गेम डिझाइन, आर्किटेक्टमधील रचनात्मक काम, फॅशन टेक्नॉलॉजी, ब्यूटी आणि वेलनेस, लँडस्केप डिझायनिंग, वेब डिझायनिंग, चित्रकार, शिल्पकार, फोटोग्राफी, इंटिरिअर डिझायनिंग, अॅनिमेशन, फूड टेक्नॉलॉजी या क्षेत्रांतील संधी आजच्या विद्यार्थ्यांना खुणावत आहेत. सिनेमा इंडस्ट्रीमध्ये आलेले व्हीएफएक्स तंत्र, साउंड इफेक्ट, फॅशन स्टेटमेंट याकडे मुलांचा ओढा आहे, तर एकाच कलाकृतीची होणारी भाषांतरे या संकल्पनेला वाढत्या पसंतीचा फायदा मुलांमध्ये डबिंग आर्टिस्ट होण्याचे स्वप्न निर्माण करण्यामध्ये झाला आहे.

०००००

अशी आहे वर्गवारी

कृषी ः २५ टक्के

फाइन आर्ट ः ७० टक्के

वाणिज्य ः ४५ टक्के

आरोग्य ः ४५ टक्के

तंत्रज्ञान ः ५५ टक्के

गणवेशधारी क्षेत्र ः ३० टक्के


करिअरच्या वेगळ्या संधी मुलांना खुणावत आहे. शिक्षणानंतर ज्या क्षेत्रात त्वरित नोकरी ​किंवा व्यवसायाच्या संधी आहेत अशा फाइन आर्टकडे यंदा विद्यार्थ्यांचा कल असणे स्वाभाविक आहे. कोल्हापुरात कलेला परंपरा आहे. मात्र, नव्या युगातील नव्या संधी कलेच्या क्षेत्रात उपलब्ध झाल्यामुळे आणि कौशल्याला वाव देणारे आर्थिक स्रोत मिळण्याची खात्री असल्यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक करिअर नको आहे हे या कलचाचणीच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

एम. के. गोंधळी, शिक्षण उपसंचालक

००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर असुरक्षितच

0
0


कोल्हापूर ः धुळे, मुंबई आणि कोल्हापुरात डॉक्टरांवर मार्चमध्ये झालेल्या हल्ल्यांचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर प्रशासनाने सीपीआरला सुरक्षा पोहचविण्याचे आश्वासन दिले, तर काही प्रमाणात सुरक्षाही पुरविली गेली. मात्र, शुक्रवारी रात्री सीपीआरमध्ये घडलेल्या मोडतोडीच्या प्रकारामुळे सीपीआरची सुरक्षा अजूनही धोक्यात असल्याचे वास्तव आहे. सुरक्षेसाठी प्रस्तावित उपाययोजनांची अंमलबजावणी अद्याप पूर्ण कार्यक्षमतेने झालेली नाही. हल्ल्याचे हे प्रकार तातडीने थांबवण्यासाठी आता हे उपाय तातडीने योजण्याची गरज व्यक्त होत आहे.

डॉक्टरांनी उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्यानेच रुग्ण दगावल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात गोंधळ घातला. व्हेंटिलेटर आदळून फोडला. त्यामुळे सीपीआरमध्ये काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजना दिखाऊ असल्याचे स्पष्ट झाले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांना सुरक्षा पुरविण्याचा आदेश देण्यात आला. मात्र या प्रकरणाला दीड महिना होऊन गेल्यानंतर सीपीआरमध्ये सुरक्षेसंबंधी योग्य ती खबरदारी घेतलेली नाही. सुरक्षेच्यादृष्टीने सीपीआरमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांच्या नातेवाईकांची चौकशी करुन त्यांना पास दिल्यानंतरच आत सोडण्यात येणार होते. मात्र या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. एक गेट बंद करुन दुसऱ्या गेटमधून आत येणाऱ्या लोकांची सुरक्षा रक्षकांकडून कोणतीच चौकशी केली जात नसल्याचे दिसून येते.

सीपीआरमध्ये पोलिस चौकी, २९ सीसीटीव्ही कॅमेरे, २० वॉकीटॉकीद्वारे अंतर्गत संवाद, माहिती फलक असे उपाय कितपत कार्यान्वित करण्यात आले, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

.........

शस्त्रधारी सुरक्षारक्षांची प्रतिक्षा अद्याप दोन महिने

सीपीआरमध्ये एप्रिलमध्ये महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे शस्त्रधारी सुरक्षा रक्षक पुरविण्यात येणार होते. मात्र शस्त्रधारी सुरक्षारक्षांचाच अभाव असल्यामुळे सीपीआरमध्ये असे ५० सुरक्षारक्षक येण्यासाठी अजून दोन महिन्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

................

पोलिस मोबाइलमध्ये व्यस्त

निवासी डॉक्टरांनी संप पुकारल्यानंतर प्रशासनाने तत्काळ गस्तीसाठी सहा आणि फिरते २ असे आठ पोलिस सीपीआरमध्ये तैनात करण्यात आले. मात्र हे पोलिस अनेकदा गाड्यांवर गप्पा मारत किंवा मोबाइलमध्ये व्यस्त असलेले दिसतात. त्यामुळे सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत.

..................

अतिक्रमण अडकले ‘तारखां’मध्ये

सुरक्षेच्या मुद्द्यावरून सीपीआरमधील १४ अतिक्रमित खोकीधारकांना नोटीस पाठविण्यात आल्या. त्यांपैकी सातजणांनी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे कारवाईला मर्यादा पडल्या आहेत. अनधिकृत अतिक्रमणांचा हा प्रश्न न्यायालयाच्या तारखांत अडकून पडला आहे.


मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे पुढील टप्प्यात ५६ सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण देऊन नेमण्यात येणार आहे. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. हॉस्पिटलमधील व्हेंटीलेटरचे जे नुकसान केले आहे त्याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, झालेल्या नुकसानीची भरपाई नातेवाईकांकडून केली जाणार आहे.

डॉ. शिशिर मिरगुंडे,

वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रकर्मींचा सन्मानसोहळा आज

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे​ चित्रपट क्षेत्रातील कलावंत आणि तंत्रज्ञांना भरीव कामगिरीबद्दल देण्यात येणारे चित्रकर्मी पुरस्कार आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे प्रदान करण्यात येणार आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यात स्थानिक कलाकारांचा कलाविष्कार पहायला मिळणार आहे. यावर्षी १६ कलावंत व तंत्रज्ञांना चित्रकर्मी पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख दहा हजार रुपये, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कोल्हापुरात प्रथमच हा सोहळा होणार आहे.

दिग्दर्शक व लेखक चंद्रकांत जोशी, अभिनेता दिग्दर्शक विलास रकटे, गीतकार डॉ. श्रीकांत नरूले, लेखक प्रताप गंगावणे, निर्माता दिग्दर्शक जगदीश पाटणकर, छायाचित्रकार प्रकाश शिंदे, कलादिग्दर्शक व छायाचित्रकार अशोक पेंटर, ध्वनिरेखक अशोक निकम, अभिनेत्री गीता वंटमुरीकर, निर्मिती व्यवस्थापन सिद्धू गावडे, रंगभूषाकार शशी यादव, वेशभूषाकार कमल पाटील, लाइटमन किसन पोवार, लाइटमन कृष्णात चव्हाण, कामगार विजय कल्याणकर, भोजन व्यवस्थापक कै. बजरंग भोसले (मरणोत्तर) यांना चित्रकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राणे कुठेही जावोत, सेनेला फरक पडत नाही!

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

शिवसेना सरकारचा पाठिंबा काढणार नाही, असे नमूद करताना पुढील निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार, असे आज उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. नारायण राणे भाजपमध्ये गेल्यास शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार, या बातम्या चुकीच्या आहेत. राणे कोणत्याही पक्षात गेले तरी शिवसेनेला काहीच फरत पडणार नाही, असेही देसाई यावेळी म्हणाले.

नारायण राणे भाजपमध्ये गेल्यास शिवसेना-भाजपमधील दुरावा आणखी वाढेल व शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत आज देसाई यांना विचारले असता त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले. नारायण राणे कोणत्या पक्षात जातात, त्यांना कोणता पक्ष स्वीकारतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याने शिवसेनेला काहीही फरक पडत नाही, असे देसाई म्हणाले.

शिवसेना मुळात असल्या गोष्टींची दखलच घेत नाही. असे किती आले आणि किती गेले. शिवसेना त्या सगळ्यांनाच पुरून उरली आहे. अशा अनेकांना आम्ही टोलवून लावलं आहे. हा विषय शिवसेनेवर परिणाम करणारा नाही. आपल्याला काय परवडेल, काय झेपेल, काय होईल, याचा निर्णय त्या त्या पक्षाने घ्यायचा आहे. हा आमचा विषयच नाही, असेही देसाई यांनी पुढे स्पष्ट केले.

दरम्यान, नारायण राणे शिवसेनेत जाण्यासाठी आटापिटा करत असल्याच्या वृत्तावर नितेश राणे यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करावं इतकी वाईट वेळ राणे कुटुंबावर आलेली नाही, असे म्हणत नितेश यांनी या वृत्ताचं खंडन केलं होतं. त्या अनुशंगाने प्रश्न विचारला असता देसाई यांनी जोरदार पलटवार केला.

राणे यांना दिल्लीचं बोलावणं

नारायण राणे भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांमुळे राणेंची मनधरणी करण्यासाठी दिल्लीतून नव्याने हालचाली सुरू झाल्या आहेत. राणे यांना काँग्रेस श्रेष्ठींनी दिल्लीत बोलावून घेतलं आहे. राणेंची समजूत काढण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यावर सोपण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मैनुद्दीनच्या जीविताला धोका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत झालेल्या चोरीप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या सात पोलिसांपैकी दोन पोलिसांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (ता. ५) जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली. तब्बल तीन झालेल्या युक्त‌िवादात १४ कोटी रुपयांच्या चोरीचा बनाव असून, ईडी आणि आयकरचा ससेमिरा चुकवण्यासाठी सांगलीतील पोलिसांना बळीचा बकरा केल्याचा आरोप संशयित पोल‌िसांच्या वकिलांनी कोर्टात केला. याशिवाय संबंधित रक्कम वारणा शिक्षण समुहाची असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. पुढील सुनावणी शनिवारी (ता. ६) होणार आहे.

सांगलीतील काही गुंडांकडून माझ्या जीवितास धोका आहे. असा अर्ज मैनुद्दीन मुल्लाने सांगली पोलिस अधीक्षकांकडे पाठवल्याचे अ‍ॅड. जाधव यांनी न्यायालयात सांगितले. मैनुद्दीनच्या अर्जाची प्रतही त्यांनी कोर्टात सादर केली. यामध्ये झुंजार सरनोबत यांनी पैशाचे अमिष दाखवून कोल्हापुरात नेऊन मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर सांगलीतील एलसीबीचे तत्कालीन निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, कुलदीप कांबळे, शंकर पाटील, दीपक पाटील, रवींद्र पाटील यांच्यावर कोडोली (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यातील शंकर पाटील (वय ४५, रा. माधवनगर, सांगली), दीपक उत्तम पाटील (४१, विश्रामबाग, सांगली) आणि रवींद्र बाबूराव पाटील (४०, रा, कागल) या तिघांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. यापैकी शंकर पाटील आणि दीपक पाटील यांच्या अर्जावर शुक्रवारी न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. अॅड. श्रीकांत जाधव यांनी युक्त‌िवाद करताना फिर्यादी झुंजार सरनोबत यांच्या फिर्यादीबाबत संशय उपस्थित केला. सरनोबत यांचे वय आणि उत्पन्नाची साधने पाहता इतकी रक्कम कुठून आली? स्वतः फिर्यादीनेही याबाबत पोलिसांना वेळीच माहिती का दिली नाही? फिर्यादीला स्वतःच्याच रकमेची माहिती नव्हती काय? वर्षाने पुन्हा वेगळी फिर्याद का दाखल केली? असे सवाल अॅड. जाधव यांनी उपस्थित केले. संबंधित रक्कम वारणा शिक्षण समुहाची असावी, असा संशयही उपस्थित केला आहे. पोलिसांवर येणाऱ्या दबावापोटीच सांगलीतील पोलिसांना बळीचा बकरा केल्याचा युक्त‌िवाद अॅड. जाधव यांनी केला. सुमारे तीन तास हा युक्त‌िवाद सुरू होता.

रकमेबाबत संशय

वारणा शिक्षण समुहाचे सचिव जी. डी. पाटील यांचा मुलगा आशुतोष पाटील यांच्याशी भागीदारीमध्ये जमीन खरेदीसाठी रक्कम आणून ठेवल्याची माहिती सरनोबत यांनी जबाबात दिली होती. इतकी मोठी रक्कम कोणत्याही सुरक्षेविना वारणानगरमध्ये का ठेवली? हा मोठा प्रश्न आहे. अशावेळी आयकर व ईडीच्या चौकशीचा फेरा चुकविण्यासाठी तपासातील पोलिसांनीच रक्कम चोरल्याचा बनाव केल्याचा युक्त‌िवाद अ‍ॅड. जाधव यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरी चप्पलला बूस्ट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘राज्यातील सर्वच पारंपरिक व्यवसायांना चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोल्हापुरी चप्पल व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी सरकार सर्वती मदत करेल. कारागिरांनीही बदलत्या काळाला अनुसरून ग्राहकांना हव्या तशा आणि निर्यातक्षम कोल्हापुरी चप्पल बनविण्याचे कौशल्य आ‌त्मसात करावे,’ असे आवाहन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी येथे केले.

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे आयोजित‌ कोल्हापुरी चप्पल कारागीर कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रिचा बागल प्रमुख उ‌पस्थित होत्या. शाहू स्मारक भवनात कार्यशाळा झाली.

देसाई म्हणाले, ‘राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पिढ्यान्‍पिढ्या करणारे १२० व्यवसाय आहेत. त्यापैकीच एक कोल्हापुरी चप्पल आहे. कोल्हापुरी चप्पलची वेगळी ओळख राज्य, देशपातळीवर आहे. व्यवसायातून आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी कारागिरांनी ग्राहकांच्या पसंतीच्या फॅशनेबल चपला ‌तयार कराव्यात. मूळ ढाच्या कायम राखत विविध डिझाइन्समध्ये आणि पायांना टोचणार नाहीत असे कोल्हापुरी चप्पल तयार करणे काळाची गरज आहे. कारागिरांनी आपल्यातील व्यावसायिक स्पर्धा बाजूला ठेवून क्लस्टर करावे. त्या माध्यमातून कच्चा माल मिळवावा. ग्रामोद्योग मंडळाकडून या व्यवसायाला प्रोत्साहन देताना कारागिरांची उन्नती केंद्रस्थानी ठेवली. सरकार कोल्हापुरीसह सर्वच जिल्ह्यांतील पारंपरिक व्यवसायांना उत्तेजन देण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकत आहे.’

शिवाजी विद्यापीठाची मदत

कोल्हापुरी चप्पलला पेटंट मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या व्यवसायातील अडचणी, समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोल्हापुरी चप्पलवर नवीन संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाची मदत घेतली जाईल, असेही देसाई यांनी सांगितले.

शिवसेनेची स्वबळाची तयारी

दरम्यान, ‘सरकारचा पाठिंबा काढण्याचा शिवसेनेचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट करून देसाई यांनी. मध्यावधी निवडणुकीची शक्यताही नाही. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुढील विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढवून सत्तेत येण्यासाठी आतापासून ‌शिवसेनेने तयारी सुरू केली आहे,’ अशी माहिती देसाई यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैनुद्दीनच्या जीविताला धोका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थेट पाइपलाइन योजनेच्या कामातील २० लाख किंमतीच्या लोखंडी पुलासाठी सव्वा कोटी जादा बिल दिल्याची कबुली युनिटी कन्सल्टंट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा नमुनाच थेट पाइपलाइनसंदर्भात आयोजित बैठकीत पुढे आला. आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ व राजेश क्षीरसागर यांच्यासमोर कन्सल्टंटचे महेश पाठक यांनी ज्यादा बिलाची कबुली दिली. भोंगळ कारभाराला शिस्त लावण्यासाठी सुकाणू समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्य सरकारकडे प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विरोधी भाजप व ताराराणी आघाडीच्या सदस्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते.

थेट पाइपलाइनच्या कामांमध्ये युनिटी कन्सल्टंट कंपनीला अडीच कोटी रुपये जादा बिल दिल्याचा आरोप भाजप-ताराराणी आघाडीने केल्यानंतर जाग आलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शुक्रवारी बैठक घेतली. महानगरपालिकेतील ताराराणी सभागृहात तीन आमदारांसह, महापौर हसीना फरास, आयुक्त अभिजित चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी आमदार पाटील म्हणाले, ‘थेट पाइपलाइन योजनेच्या कामावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या योजनेला खो बसू नये यासाठी आढावा बैठक घेतली आहे.’

थेट पाइपलाइनच्या कामावर देखरेख करणाऱ्या युनिटी कन्सल्टंटीचे अधिकारी महेश पाठक यांनी वाढीव बिलाबाबत बैठकीच्या सुरुवातीला खुलासा केला. या योजनेचा आराखडा राज्य सरकार व जीवन प्राधिकरणनने बनविला आहे. यामध्ये योजनेसाठी अंदाजे रक्कमेचा विचार केला आहे. या योजनेतील कामांच्या बिलाबाबत उपमहापौर अर्जुन माने यांनी कन्सल्टंटकडे पत्राद्वारे विचारणा केली होती. निविदेतील अटींप्रमाणे बिले केली आहेत. सहा पूल, कॉपरडॅम, डी वॉटरिंग यांच्या कामांसाठी २५ लाख रुपये खर्च येतो. पण निविदेत या सर्व कामांसाठी दोन कोटी ३८ लाख रुपये तरतूद केली आहे. प्रत्यक्ष कामांपेक्षा जादा बिल दिली आहेत. बिलामध्ये तफावत आढळली आहे. पाइपलाइनसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी पुलाचा खर्च २५ लाख असून महानगरपालिकेने सव्वा कोटी रुपये बिल दिल्याची माहिती दिली. पण महानगरपालिकेने दिलेली रक्कम अॅडव्हॉन्स रक्कम असून जादा दिलेले बिल पुढील बिलात वळते करुन घेतले जाईल, असे स्पष्ट केले.

युनिटी कन्सल्टंटीचे अधिकारी व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त तपासणी करणे आवश्यक असताना ते केले नसल्याने घोळ निर्माण झाला आहे, असा आरोप प्रा. जयंत पाटील, भूपाल शेटे यांच्यासह नगरसे​वकांनी केला. त्यानंतर आमदार मुश्रीफ यांनी महापौर, उपमहापौर, सर्व पदाधिकारी, विरोधी पक्षनेता, अधिकाऱ्यांची सुकाणू समितीची नियुक्ती करण्याची घोषणा केली. तसेच प्रत्येक महिन्याला बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ढोबळ बिले न काढता प्रत्यक्ष काम पाहून बिले काढण्याचा आदेशही मुश्रीफ यांनी दिले.

‘योजनेचे वाटोळे केले’

नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी कन्सल्टंटीचे अधिकारी पाठक यांच्यावर योजनेचे वाटोळे केल्याचा आरोप केला. योजनेचा मार्ग बदलण्याची सूचना केली असताना कन्सल्टंटने ऐकले नाही. पण चूक लक्षात आल्यावर मार्ग बदलला. चांगल्या दर्जाचे इंजिनिअर दिले नाहीत. जागेवर बसून निविदा तयार केली. कन्सल्टंटकडून काही होणार नसून ही योजना बारगळेल, असे भाकितही केले.

उपायुक्तांचे बांधकामांच्या फायलीकडे जादा लक्ष

पाइपलाइन योजनेचे काम उपायुक्तांकडे असायला हवे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. उपायुक्तांचे लक्ष लोकोपयोगी कामापेक्षा बांधकामाच्या फायली, टीडीआर, एफएसआयकडे जास्त लक्ष असतो, असा आरोप केला. पण आपल्याकडे पूर्वीपासून जबाबदारी असल्याचे उपायुक्त खोराटे यांनी स्पष्ट करुन आपल्या कामाला मर्यादा असल्याची कबुली दिली.

तीन आमदार देणार लक्ष

राज्य सरकारकडे रखडलेल्या कामाच्या परवानगीसाठी आमदार मुश्रीफ, आमदार पाटील व आमदार क्षीरसागर यांना माहिती द्यावी. ते राज्यसरकारकडे पाठपुरावा करतील, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची स्वबळाची तयारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘सरकारचा पाठिंबा काढण्याचा शिवसेनेचा कोणताही विचार नाही. मध्यावधी निवडणुकीची शक्यताही नाही. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुढील विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढवून सत्तेत येण्यासाठी आतापासून ‌शिवसेनेने तयारी सुरू केली आहे,’ अशी माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोल्हापुरी चप्पल कारागीर कार्यशाळेच्या उद्‍घाटन सोहळ्यासाठी ते आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘शिवसेना सरकारमध्ये आहे. ती यापुढील काळातही राहील. पाठिंबा काढून घेण्यासंबंधी‌चा विचार शिवसेनेने केलेला नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना पूर्ण ताकदीने लढवेल. राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढवेल. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना तयारी करण्याच्या सूचना पक्षाकडून दिल्या आहेत.’

दिवसेंदिवस शिवसेना मजबूत होत चालली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी कोणत्या पक्षात जाणार हे आमच्यादृष्टीने महत्त्वाचे नाहीत. ते कुठे जातात, त्याची दखलही आम्ही घेत नाही. त्यांचे भले होईल तिथे त्यांनी जावे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडा टाकून शिष्टाई करू नका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आयआरबी रस्ते प्रकल्पानंतर दरोडा टाकण्यासाठी थेट पाइपलाइनसारखी महत्त्वाच्या योजना आणली. ज्यांनी या योजनेत ढपला पाडला, त्याच दोन खऱ्या सूत्रधारांनी महापालिकेत येऊन भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. पण भाजप ताराराणी आघाडी शांत राहणार नाही, असा इशारा माजी महापौर सुनील कदम यांनी आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता केला. ज्यांनी जागांवर दरोडे टाकले, त्यांनी शिष्टाई करण्याचा प्रयत्न करु नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

थेट पाइपलाइन योजनेतील भ्रष्टाचाराच्या निमित्ताने काँग्रेस आघाडी व भाजप आघाडीमधील वातावरण पुन्हा तापले आहे. भाजप आघाडीने यातील घोटाळा उघड केल्यानंतर काँग्रेस आघाडीनेही या भ्रष्टाचाराला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र योजनेबाबत शुक्रवारी बोलवलेल्या आढावा बैठकीस भाजप आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रितच न केल्याने संतापलेल्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आघाडीच्या नेत्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप केले.

याबाबत सुनील कदम यांनी या योजनेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आता देण्यात आलेले बिल पुढील बिलात वजा करून घेण्यापेक्षा ज्यांनी बिले दिली त्यांच्याकडून वसूल करून घेऊन त्यांच्यावर आयुक्तांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. तसेच ज्यांनी दरोडे घातले, त्यांच्याकडून शिष्टाई करण्याचा प्रयत्न म्हणजे स्वत‍ःच्या भ्रष्टाचारावर पांघरुण टाकण्यासाठी केलेला प्रकार आहे, असाही आरोप केला. योजनेची मूळ किंमत ४२४ कोटी रुपयांची असताना ती ४८५ कोटी रुपयांची कशी झाली? यातील ६० कोटी रुपये गेले कुठे? हे सारे सत्य बाहेर येण्यासाठी नार्को टेस्ट करावी. ज्यांनी चोर पकडून दिला, त्यांनाच या बैठकीला बोलवले नाही. कदाचित त्यांना बोलवले तर आणखी काही उघड होईल ही भीती त्यामागे असेल, असा टोलाही कदम यांनी लगावला.

ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम म्हणाले, ज्यांनी टोलच्या आंदोलनात उपोषणाला बसलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना फसवले, त्यांनी या योजनेत जनतेला फसवण्याचे काम केले आहे. योजना सुरू झाल्यापासून तीन वर्षात एक आढावा बैठक न घेतलेल्या नेत्यांना मुदत संपून पाच महिने उलटून गेल्यानंतर आढावा बैठक घेण्याचे स्वप्न पडले काय? आम्ही दाखवून दिलेली चूक प्रशासनाने व कन्सल्टंटनेही कबूल केली. त्यामुळे या चुकीतून झालेल्या भ्रष्टाचारावर पांघरुन घालण्यासाठी ते आले होते. मात्र भाजप आघाडीच्यावतीने योजनेतील साऱ्या त्रुटी जनतेसमोर मांडणार आहे. तसेच सीआयडी चौकशी व नार्को टेस्टच्या माध्यमातून भ्रष्टाचार उघड करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस किरण नकाते, ईश्वर परमार, अजित ठाणेकर, राजाराम गायकवाड, राज​सिंह शेळके, शेखर कुसाळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआरमध्ये मोडतोड

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉक्टरांनी उपचार करण्यास हालगर्जीपणा केल्यानेच रुग्ण दगावल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात गोंधळ घातला. संतप्त नातेवाईकांनी विभागातील व्हेंटिलेटर जमिनीवर आदळून फोडल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन जमावाला शांत केले. त्यानंतर हे प्रकरण आपसात मिटवण्यात आले. शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.

सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार शेतात काम करताना काहीतरी चावल्याने सुनील रावण (वय २८, रा. हारुगडेवाडी, ता. शाहूवाडी) या तरुणास उपचारासाठी दोन दिवसांपूर्वी दाखल केले होते. मूत्राशयात बिघाड झाल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली होती. त्यामुळे डायलेसिससाठी सुनीलला अतिदक्षता विभागात ठेवले होते. शुक्रवारी रात्री त्याची प्रकृती अधिकच बिघडली. रात्री एकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. आपल्या भावावर डॉक्टरांची तातडीने व योग्य उपचार केले नाहीत, असा आरोप करीत नारायण रावण व इतर नातेवाईकांनी ड्युटीवरील डॉक्टरांशी वाद घातला. त्यावेळी काही तरुणांनी व्हेंटिलेटर उचलून जमिनीवर आदळला. वादाची माहिती मिळताच बंदोबस्तासाठी असलेले पोलिस अतिदक्षता विभागात पोहोचले. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने वाद वाढला नाही. उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत पोलिसांत नोंद झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गद्दारी करणाऱ्यांना शिवसैनिक धडा शिकवतील

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मध्यावधी निवडणुकीचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी शिवसेना तयार आहे. सेनेचे जिल्ह्यात सहा आमदार आहेत. काही राजकीय पक्ष फाटाफुटीसाठी प्रयत्न करत आहेत. पण, शिवसेनेचा एकही आमदार फुटणार नाही. कुणी गद्दारी केली तर मधमाशाचे पोळे फुटल्यावर जशा माशा बाहेर पडतात त्याप्रमाणे शिवसैनिक गद्दारांना धडा शिकवतील, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, परिवहन सभापती नियाज खान उपस्थित होते. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात मेळावा झाला.

संजय पवार म्हणाले, ‘काही पक्ष ताकद वाढवण्यासाठी मनी टॉनिक दाखवत असतील तर शिवसेना मसल टॉनिक दाखवेल. काहीजण मी स्वतःच्या जीवावर आमदार झालो आहे, अशी भाषा करत असतील तर ते शिवसेनेमुळे आमदार झाले आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे. अशी भाषा करणारी मंडळी शिवसेनेला विसरली तर त्यांचे नामोनिशाणही राहणार नाही.’

विजय देवणे म्हणाले, ३१ वर्षांपूर्वी सुरेश साळोखे व शिवाजीराज जाधव यांनी शिवसेनेची शाखा स्थापन केली होती. गावागावात जाऊन शिवसैनिकांनी शिवसेनेची बांधणी केली. आज शिवसैनिकांच्या जोरावर जिल्ह्यातील १० पैकी सहा आमदार निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेत दहा सदस्य आहेत. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसैनिकांनी झेंडा फडकावण्यासाठी सज्ज रहावे. लोकसभा निवडणुकीत दोन खासदार व दहा आमदार जिंकण्यासाठी शिवसेना तयार आहेत.

शहर प्रमुख शिवाजीराव जाधव व दुर्गेश लिंग्रस यांची भाषणे झाली. कमलाकर जगदाळे यांनी सूत्रसंचलन केले.

सुनील शिंत्रे, सुजीत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, नगरसेविका प्रतिभा निल्ले, महिला आघाडी प्रमुख शुभांगी पोवार, शहरप्रमुख रिया पाटील, शशी बीडकर, हर्षल सुर्वे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोणत्याही चौकशीची काँग्रेस आघाडीची तयारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एका महासभेत ५३ आरक्षणे उठवून जमिनीच्या व्यवहारातून कोट्यवधींची माया जमवणाऱ्या तसेच सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्याची चौकशी लागलेली असताना त्याचे कोट्यवधी रुपये हडप करणाऱ्या कदम बंधूंचीच दरोडेखोरी प्रवृत्ती आहे. दुसऱ्याच्या ताटातील ओरबडण्याच्या प्रवृत्तीमुळे सारे जगच दरोडेखोर वाटत असल्याचा प्रतिटोला काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने शनिवारी प्रसिद्धी पत्रकाद्वात केला आहे. आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांनी हजारो कोटींचा निधी आणला. पण, जनतेशी कधी प्रतारणा केली नाही. त्यामुळे नार्को टेस्टच नव्हे, कोणतीही परीक्षा द्यायला नेते तयार असल्याचे आव्हानही दिले आहे.

काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या महापौर हसीना फरास वगळता उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार, गटनेते शारंगधर देशमुख व राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील यांनी संयुक्तरिक्ता दिलेल्या पत्रकात भाजप ताराराणी आघाडीचे माजी महापौर सुनील कदम व नगरसेवक सत्यजीत कदम यांच्यावर कडवट टीका केली आहे. गेली २५ वर्षे सार्वजनिक जीवनात काम करत असताना जिल्ह्यासाठी हजारो कोटींचा निधी आणला. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याच्या उंचीची बरोबरी होत नसताना आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर कदम बंधूंनी आरोप करणे हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. कदम बंधूंनी दुसऱ्याच्या ताटातील ओरबडण्याचे काम केले. ताराराणी आघाडी सत्तेत असताना महासभेत आरक्षणे उठवून त्यातून कोट्यवधीची संपत्ती जमवली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्याची चौकशी लागलेली असताना त्याची संपत्ती हडप केली. असे दरोडे घालण्याची प्रवृत्ती असलेल्या कदम बंधूंना सारे जगच दरोडेखोर वाटत आहे.

काँग्रेस आघाडीची योजना म्हणून विरोधक हेतूपुरस्सर पाइपलाइन योजना प्रलंबित ठेवून जनतेच्या प्रश्नाशी खेळत असल्याचा आरोप करताना म्हटले आहे की, भाजपची केंद्रात सत्ता येऊन तीन वर्षे तर राज्यात सत्तेला अडीच वर्षे झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे महत्त्वाची खाती असताना अजूनही सरकारकडील आवश्यक परवानगी प्रलंबित आहेत हे दुर्दैव आहे. योजनेबाबतचे इस्टिमेट, खर्च करणे, मंजुरी देणे ही कामे प्रशासकीय अधिकाऱ्यांची असतात. या योजनेबाबतही सर्व प्रक्रिया पूर्ण करुन केंद्र सरकारची परवानगी घेतली. याबाबतची माहिती कॅडसन कंपनीमार्फत मंत्र्यांची चमचेगिरी करुन सार्वजनिक बांधकाम विभागातील कोट्यवधीची कामे मिळवणाऱ्या ठेकेदार लोकप्रतिनिधी सत्यजीत कदम यांना आहे. पण, केवळ उत्तर मतदार संघात भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरु आहे. ज्या थेट पाइपलाइन योजनेच्या मंजुरीचा वापर करुन मताचा जोगवा मागितला. तसेच योजनेच्या सादरीकरणावेळी योजना परि​पूर्ण असल्याचे सांगणाऱ्या नाना कदम यांनी आता आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार आहे, असा टोलाही लगावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांनी स्वप्ने पाहणे बंद करावे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
‘सात वर्षे आमदार म्हणून काम करताना कोल्हापूरच्या विकासासाठी खूप कामे केली. याच कामांच्या जोरावर जनता पुन्हा मला निवडून देईल. मी हॅट्‍ट्रिक साधल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मंत्र्यांनी स्वप्ने पाहणे बंद करावे,’ असा टोला आमदार राजेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.
जिल्हा शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. केशवराव भोसले नाट्यगृहात मेळावा झाला.
मेळाव्यात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवचरित्र व्याख्याते शिवरत्न शेटे, आमदार वैभव नाईक प्रमुख उपस्थित होते. गेल्या आठवड्यात भाजपच्या जिल्हा मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी निवडणुकांत भाजपचे जिल्ह्यात दोन खासदार आणि दहा आमदार असे टार्गेट असल्याचे जाहीर केले. त्याला आमदार क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, ‘आपल्या जिल्ह्यातील मंत्री जिल्ह्यातून दोन खासदार आणि सगळे आमदार भाजपचे निवडून आणू, असे सांगत आहेत. पण, गेली सात वर्षे मी आमदार आहे आणि आजही रस्त्यावर आहे. सत्तेवर आहे म्हणून बोलत नाही तर जनतेतून बोलत आहे. इगो आहे म्हणून मी सांगत नाही, तर ही जनताच मला पुन्हा निवडून देईल, असा ठाम विश्वास आहे. सत्तेवर आहात म्हणून तुम्ही काहीही बोलता, हे बरोबर नाही.’

शहराचा आमदार शिवसेनेचाच

आमदार क्षीरसागर यांनी पालकमंत्री पाटील यांनाच लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘शिवसेनेचे कोल्हापूरशी अतूट नाते आहे. त्यामुळेच सहापैकी पाच वेळा शहरातून शिवसेनेचा आमदार निवडून आला. एकावेळचा अपवाद हा छत्रपती घराण्याच्या सन्मानासाठी होता. त्यामुळे पुढच्या निवडणुकीतही शहराचा आमदार शिवसेनेचाच असेल. जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस एकत्र असताना आणि शेकापचा बालेकिल्ला असताना शिवसेना वाढली, रुजली. त्यामुळे आता सेनेला लक्ष्य करू पाहणाऱ्यांनी स्वप्ने पाहणे बंद करावीत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोरदार वाऱ्यामुळे ध्वज उतरवला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या दोन दिवसांपासून वाऱ्याचा वेग जास्त असल्याने रविवारी सकाळी राज्यामध्ये सर्वात उंच असलेला ध्वज उतरवण्यात आला. मंगळवारी वाऱ्याची माहिती घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पाचे प्रमुख सुजय पित्रे यांनी सांगितले. चार दिवसांपासून वाऱ्याचा वेग वाढला आहे.

एक मे रोजी ध्वज फडकवण्यात आल्यानंतर एक दिवस वगळता वाऱ्याचा वेग जास्त आहे. त्याचा फटका ध्वजाला बसू नये यासाठी एका वादळी वाऱ्यानंतर ध्वज उतरवून तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री तो ध्वज बदलून नवीन ध्वज फडकवण्यात आला होता. रविवारी सकाळी तो ध्वजही उतरवण्यात आला. याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाल्याने पित्रे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन ध्वजासाठी घेण्यात येत असलेल्या दक्षतेबाताचा खुलासा केला. ​ते म्हणाले, ‘ध्वजाची उभारणी करण्याकरिता वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करण्यात आला होता. पाच मीटर प्रतिसेकंद वाऱ्याचा वेग असल्यास ध्वज योग्य पद्धतीने फडकू शकतो. तसेच ध्वजावर काहीही परिणाम होणार नाही. पण वाऱ्याचा वेग त्यापेक्षा वाढल्यास ध्वजाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. गेल्या दोन दिवसांपासून ८.५ मीटर प्रतिसेकंद इतका वाऱ्याचा वेग आहे. यानुसार ३० किलोमीटर प्रतितास वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ध्वजाच्या रिंग सैल झाल्या. त्यामुळे शुक्रवारी रात्री तो बदलण्यात आला.

यापुढे ध्वजासाठी घेण्यात येत असलेल्या दक्षतेबाबत ते म्हणाले, ‘ध्वज उभारण्यापूर्वी केलेल्या पाहणीनुसार मे ते जुलै दरम्यान वाऱ्याचा वेग वाढलेला आढळून आला. त्यामुळे या कालावधीत दररोज अथवा दोन दिवसांच्या कालावधीत वाऱ्याचा वेग किती राहणार याची हवामान खात्याकडून माहिती घेण्यात येणार आहे. त्यावेळी वाऱ्याचा वेग जास्त राहणार असल्याचे ​समजल्यास दक्षता म्हणून ध्वज काढून ठेवण्यात येणार आहे. केएसबीपीने आतापर्यंत ११ महिन्यात २१ आयलँड, ११ चौक व २ उद्याने विकसीत केली असून यापुढे ३० चौक विकस‌ित करण्याचे नियोजन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंपदामंत्र्यांचा आदेश धाब्यावर

0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet :@Appasaheb_MT

प्रशासनातील लालफितीच्या कामकाजाचा फटका पुन्हा एकदा थेट पाइपलाइन योजनेच्या कामाला बसला असून दूधगंगा नदीच्या कॅनॉलच्या बाजूने टाकण्यात येणाऱ्या बारा किलो मीटर लांबीच्या पाइपलाइन मार्गाच्या परवानगीवरुन पाटबंधारे विभाग आणि महापलिका यांच्यामध्ये ताकतुंबा सुरू आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाइपलाइन कामाला परवाना देण्याबाबत स्पष्ट आदेश देऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला. मात्र लेखी आदेश नसल्याचे कारण पुढे करत पाटबंधारे विभागाकडून पाइपलाइन कामात अडवणूक केली जात आहे. लिंगाचीवाडी येथे गेले आठवडाभर महापालिकेची मशिनरी, वाहने विनावापर थांबून आहेत.

महापालिका आणि पाटबंधारे विभागातील विसंवादामुळे प्रस्तावित काम यंदा तरी पावसाळ्याच्या अगोदर सुरू होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रस्तावित पाइपलाइन मार्ग हा दूधगंगा नदीपासून एरिगेशन कॉलनीमार्गे काळम्मावाडी गाव ते सोळांकूर कॅनॉलपर्यंत आहे. पाटबंधारे विभागाकडून बारा किलो मीटर लांबीच्या मार्गासाठी महापालिकेकडून वार्षिक केवळ एक रुपया भाडे आकारणी करणार आहे. पाटबंधारे विभागाच्या उदारतेमुळे महापालिकेची वार्षिक दोन कोटी रुपयांची बचत झाली असली तरी दुसरीकडे प्रत्यक्ष काम सुरू करण्यास पाटबंधारे विभागाकडून मान्यता मिळत नसल्यामुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करण्यासारखी स्थिती महापालिकेची झाल्याची अ​​धिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ९४ वी बैठक १७ मार्च, २०१७ रोजी मुंबई येथे झाली. जलसंपदामंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत थेट पाइपलाइन योजनेसाठी पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जागेतील पाइपलाइन मार्गाला मान्यता देण्यावर शिक्कामोर्तब झाला होता. महापालिकेच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा निर्णय होता. पाइपलाइन योजना सार्वजनिक हितासाठी असून नाममात्र भाडे आकारणी करावी अशी बाजू लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मांडली. या बैठकीला कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी, नगरसेवकासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पाटबंधारे विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर बारा किलो मीटर लाबीच्या पाइपलाइन कामाला तत्काळ सुरुवात होईल, ही अपेक्षा मात्र फोल ठरली.

महापालिकेच्या पत्राला प्रतिसाद नाही

नियामक मंडळाची बैठक होवून दीड महिन्याचा कालावधी लोटला. पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी या मार्गावरील पाइपलाइन कामासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. प्रस्तावित कामात मार्गासाठी खोदाई आणि त्यामध्ये पाइपलाइन टाकण्याचा समावेश आहे. महापालिकेने एप्रिल महिन्यात पाटबंधारे विभागाला बारा किलो मीटर लांबीच्या मार्गावरील पाइपलाइन काम सुरु करण्यासंदर्भात दोन पत्रे दिली. मात्र पाटबंधारे विभागाकडून लेखी आदेश दिले नसल्याचे कारण सांगत पाइपलाइन काम खोळंबून ठेवले असले आहे. महापालिकेने लिंगाचीवाडी येथे जागा खोदाईसाठी मशिनरी, वाहने तयार ठेवली आहेत. गेल्या आठ दिवसापासून महापालिकेची मशिनरी त्या जागेवर आहे. जेसीबी, डंपरसह इतर मशिनरी अशी यंत्रणा ठप्प राहिली आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. पण पाटबंधारे विभागाकडून हिरवा सिग्नल मिळाला नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंक्यतारा किल्ल्यावरून तरुणीची आत्महत्या

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीनं साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायली पवार असं या तरुणीचं नाव आहे.

रविवारी दुपारपासून सायली घरात नसल्याचं लक्षात येताच तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली होती. आसपासच्या परिसरात चौकशी केली असता, ती अजिंक्यतारा किल्ल्याच्या दिशेनं गेल्याचं काही जणांनी तिच्या वडिलांना सांगितलं होतं. त्यांनीही लगेचच त्या दिशेला धाव घेतली. पण सायली कुठेच सापडली नव्हती. अखेर, पोलिसांनी साताऱ्यातील सह्याद्री ट्रेकर्स ग्रूपच्या मदतीनं दरीत तिचा शोध घेतला. तेव्हा त्यांना तिचा मृतदेह सापडला. जीवन संपवण्याचं टोकाचं पाऊल सायलीनं का उचललं, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images