Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महाबळेश्वर@ अशांवर

0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

यंदाच्या उन्हाळ्यात महाबळेश्वर मुंबईपेक्षा जास्त उष्ण आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत महाबळेश्वरमधील तापमान आयएमडीने मुंबईत नोंदवलेल्या तापमानापेक्षा जास्त आहे. मुंबईतील कुलाबा आणि सांताक्रुझ वेधशाळेने तापमानाची नोंद केली आहे. मुंबईच्या किनारी भागापेक्षा महाबळेश्वरमधील पारा हा सामान्यतः कमी असतो.

महाबळेश्वरमध्ये बुधवारी, बारा एप्रिल रोजी ३५.२ अंश सेल्सिअस तापमान होते, तर मुंबईत ३४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारी, महाबळेश्वरमध्ये तेरा एप्रिल रोजी ३५.९ अंश सेल्सिअस तापमान होते, तर मुंबईचा पारा ३४.८ अंश सेल्सिअसवर होता. गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये प्रत्यावर्त (अँटीसायक्लोन) मध्ये असलेल्या ईशान्येकडील उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे महाबळेश्वरमधील तापमान वाढल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पूर्वेकडील वारे ईशान्ये वाऱ्यात मिसळले आहेत. येत्या आठवड्यात हे वारे पुढे सरकल्यानंतर पुन्हा तापमान खालावेल, अशी माहिती आयएमडीने दिली आहे.

सौराष्ट्र आणि कच्छमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईत तापमान ३५ अंशाच्या आसपास आहे. येत्या काही दिवसांत पारा दोन अंशांनी वाढण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्नाटकाला पाणी देण्यास आमदारांचा विरोध

0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणातून कर्नाटकला पाणी सोडण्यास कृष्णा व कोयना नदी काठांच्या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई उद्भवणार आहे. त्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये, अशी आक्रमक भूमिका घेत सातारा जिल्ह्यातील आमदारांनी पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.

या बाबत सातारा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत आमदारांनी आपली पाणी सोडण्याविरोधी भूमिका मांडली.

दरम्यान, आमदारांचा वाढता विरोध लक्षात घेत विजय शिवतारे यांनी कोयना धरणातून पाणी सोडल्यास महाबळेश्वर, पाटण, व जावली तालुक्यातील किती गावांमध्ये टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचा अभ्यास करून २४ एप्रिलच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणीटंचाई आढाव बैठकीत जिल्ह्यातील आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, आनंदराव पाटील, मोहनराव कदम यांच्यासह जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी कर्नाटकाला कोयना धरणातून देण्यात येत असलेल्या २.६५ टीएमसी पाणी देण्याच्या सरकारच्या भूमिकेला विरोध केला आहे.

जॅकवेल उघडे पडणार?

मकरंद पाटील यांनी धरणालगत असलेल्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांचे जॅकवेल उघडे पडणार आहेत. त्यामुळे तेथील गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यासाठी धरणातून कर्नाटकाला पाणी सोडण्यात येवू नये, अशी मागणी केली. पाटील यांच्या भूमिकेला शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील व शंभूराज देसाई यांच्यासह सर्वच आमदारांनी पाठींबा दिला.
सिंचन, वीजनिर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा

कोयनेचे अभियंता ज्ञानेश्वर बागडेंची माहिती

म. टा. वृत्तसेवा, कराड

‘कोयना धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा असून, कर्नाटकला दोन टीएमसी पाणी देऊनही जूनपर्यंत सिंचनासह वीजनिर्मितीला पाणी पुरून शिल्लक राहील इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे,’ अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

कर्नाटकसाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्याबाबत राज्य सरकारचा आदेश आल्यानंतर बुधवारी रात्रीपासून कोयना धरणाच्या रिव्हर स्लुईस गेटमधून ९०७ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

बागडे म्हणाले, ‘राज्यात भीषण पाणीटंचाई असताना कर्नाटकाला पाणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका होत आहे. मात्र, गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे १०५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. आज रोजी धरणात ३९ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. वीज निर्मितीला लागणारे पाणी तसेच सिंचन व पिण्याच्या पाण्याची गरज भागून यंदा पावसाळ्यापर्यंत काही पाणी धरणात शिल्लक राहणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा याच दिवशी १३ एप्रिल रोजी धरणात ४ टीएमसी जादा पाणी आहे. धरणातील एकूण पाण्यापैकी वर्षभरात सरासरी ६ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत असते. या सर्व बाबींचा विचार करूनच हा निणय घेतला आहे, त्यामुळे येथील जनतेने या बाबत साशंकता बाळगू नये.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीषण अपघातात मिनी बसचा चुराडा; ६ ठार

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

मिरज-पंढरपूर रस्त्यार शुक्रवारी पहाटे मिनी बसला झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं.

अपघातग्रस्त मिनी बसमधील प्रवासी कोल्हापूर जिल्ह्यातील माले गावचे असल्याचं समजतं. हे सगळेजण पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना आवळगाव फाटा इथं त्यांची मिनी बस रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाळूच्या ट्रकवर मागच्या बाजूने येऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, मिनी बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. त्यात सहा लोक जागीच ठार झाले. मृतांमध्ये दोन लहान मुलं, एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. अपघातानंतर चालक संदीप यादव फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मृतांची नावे:

नंदकुमार जयंत हेगडे (वय ३७)
रेणुका नंदकुमार हेगडे (३५)
आदित्य नंदकुमार हेगडे (१२)
लखन राजू संकाजी (३६)
विनायक मार्तंड लोंढे (४०)
गौरव राजू नरदे (७)

गंभीर जखमी

रेखा राजाराम देवकुळे (४०)
स्नेहल कृष्णात हेगडे (२०)
काजल कृष्णात हेगडे (१९)

जखमी

सावित्री बळवंत आवळे (५५)
शीतल सुनील हेगडे (४२)
सोनल कांबळे (३६)
कोमल हेगडे (२०)
कल्पना बाबर (४०)
अनमोल हेगडे (१२)
गौरी हेगडे (७)
शुभम कांबळे (१०)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट पाइपलाइनच्या कामात घोळ

0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थेट पाइपलाइन योजनेच्या टेंडरमधील ढोबळ रकमेच्या चुकीच्या प्रकारामुळे पुलाच्या प्रत्यक्ष कामाचा खर्च व बिलाच्या रकमेत तफावत आली आहे. ज्या बाबी आता समोर आल्या आहेत त्यात तथ्य असल्याचे उपायुक्त विजय खोराटे व प्रभारी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी कबूल केले. तसेच योजनेतील अशा कामांची यादी, त्यासाठीचा खर्च याचा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. हा अहवाल लवकरच आयुक्तांसमोर ठेवून त्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, थेट पाइपलाइन योजनेतील २० कोटी रुपयांच्या होत असलेल्या घोटाळ्यात महापालिका प्रशासनातील अधिकारी, कन्सल्टंट व कंत्राटदार याची मिलीभगत असल्याचा आरोप करत मार्चमध्ये प्रथम काँग्रेस आघाडीनेच या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

काँग्रेस आघाडीचे उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार, सभागृह नेते प्रवीण केसरकर, गटनेते शारंगधर देशमुख यांनी भाजप, ताराराणी आघाडीने काँग्रेस नेत्यांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपात तथ्य नसून केवळ सूडबुद्धीने हा आरोप केल्याचे सांगितले.

योजनेच्या कामाबद्दल उपायुक्त खोराटे म्हणाले, ‘आतापर्यंत कंत्राटदाराला १७० कोटी रुपये देण्यात आले आहेत. पुलाबाबत ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्यानुसार कामाचा खर्च व बिलामध्ये दाखवण्यात आलेला खर्च यामध्ये तफावत आहे. यानुसार आणखी किती कामामध्ये अशा प्रकारे ढोबळ खर्चाची तरतूद केली असून त्यात प्रत्यक्षात किती जास्त वा किती कमी खर्च येणार आहे याचा अहवाल द्यायला सांगितले आहे.’ यावेळी युनिटी कन्सल्टंटचे अभियंता रवींद्र कुलकर्णी यांना या चुकीच्या बिलाबाबत विचारले असता त्यांना काहीच उत्तर देता आले नाही. यामुळे हा सर्व प्रकार चुकीचा झाला असल्याचे स्पष्ट होत आहे.

खास सभेची मागणी करणार

गटनेते शारंगधर देशमुख म्हणाले, ‘ठिकपुर्लीत झालेल्या एकमेव पुलाचा खर्च जास्तीत जास्त २५ लाख रुपये येऊ शकतो. पण त्यासाठी २ कोटी ४८ लाख रुपयांचे बिल तयार करण्यात आल्यानंतर २९ मार्च रोजी या प्रकाराची चौकशी करुन युनिटी कन्सल्टंटकडून अभिप्राय करण्याची मागणी करणारे पत्र जलअभियंत्यांना देण्यात आले होते. त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर युनिटीचे प्रमुख परदेशात असल्याने मेमध्ये अहवाल येईल, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. हा सर्व प्रकार कन्सल्टंट, कंत्राटदार व महापालिकेतील अधिकाऱ्यांनीच केला आहे. इस्टिमेटमध्ये अंदाजित खर्च पकडला असला तरी बिल अदा करण्यासाठी झालेल्या कामाचे मोजमाप होऊन त्यानुसार बिल तयार करण्याची आवश्यकता होती. पण, कन्सल्टंटने बनवलेल्या बिलावर शाखा अभियंत्यापासून जलअभियंता व त्यानंतर महापालिकेतील उपायुक्त पातळीपर्यंत मंजुरी देण्यात आली. कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी न करता केलेल्या बिलापोटी ६० टक्के रक्कम कंत्राटदाराला देण्यात आली आहे. कन्सल्टंट, अधिकारी व कंत्राटदारामुळे बदनामी होत असल्याने याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. हे चुकीचे बिल अदा करण्यासाठी ज्यांनी सह्या केल्या, त्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहेच. शिवाय बिलासाठी जादा देण्यात आलेली रक्कम कन्सल्टंटच्या शुल्कामधून वजा करण्यात यावी. इतर रक्कम या सर्व अधिकाऱ्यांच्या वेतनातून जमा करुन घेण्यासाठीही पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच लवकरच महापालिकेची खास सभा बोलवण्याचे आवाहनही महापौरांकडे करण्यात येणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेअर बाजारातील उसळीने गुंतवणूकदारांत उत्साह

0
0


कोल्हापूर टाइम्स टीम

शेअर बाजार सर्वोच्च पातळीवर असल्याने गुंतवणूकदारांत उत्साहाचे वातावरण आहे. त्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात विविध कंपन्याचे शेअर्सची खरेदीविक्री करणाऱ्या ब्रोकरकडे गुरूवारी अनेकांनी डीमॅट अकाउंट उघडले. गुंतवणूकदारांनी शेअर ब्रोकर कंपन्यांच्या शाखांत गर्दीही केल्याचे दिसत होते. मात्र शेअर्सचा अभ्यास, बाजारातील रोजची स्थिती पाहूनच नवीन गुंतवणूकदारांनी सावधगिरीने निर्णय घेण्याचा सल्ला शेअर बाजारातील सल्लागार देत आहेत.

जिल्ह्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सुमारे ७० च्या वर नामवंत शेअर ब्रोकरेज कंपन्याच्या शाखा कोल्हापुरात आहेत. यात जॉइंडर कॅपिटल, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मोतीलाल ओसवाल, शेरेखान, निर्मल बंग, अँजल ब्रोकिंग, ट्रेडनेट आदींचा समावेश आहेत. या शेअर ब्रोकरेज कंपन्यांच्या कोल्हापूर, सांगली, सातारा आणि बेळगांव जिल्ह्यातील शाखांतून गुंतवणूकदार शेअर्सची खरेदी-विक्री करतात. शेअर बाजार बुधवारी सर्वोच्च पातळीवर गेल्याने अनेक नवीन गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदीबाबत चौकशी केली. तर दीर्घकालीन गुंतवणूक केलेल्यांना आर्थिक फायदा झाला आहे. शेअर निर्देशांक आणि निफ्टी सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याने शेअर बाजारातील सर्वच गुंतवणूकदार फायद्यात आहेत. कोल्हापूर, सांगली, कोकण आणि सीमाभागातील गुंतवणूकदारही आर्थिक फायद्यात आले. दीर्घकालीन गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना गेल्या काही दिवसांतील तेजीचा हा लाभ झाला आहे. ज्यांनी गेल्या महिन्यापर्यंत शेअर्स खरेदी केली आहे त्यांच्या गुंतवणुकीत लाभाच्या शेअर्सचे प्रमाण जितके असेल त्या प्रमाणात केवळ दहा ते वीस टक्के लाभांत वाढ झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ९३०० च्या पुढे गेला आहे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सनुसार समभागधारकांना कमी-अधिक फायदा झाला आहे. साहजिकच शहरातील सुमारे वीस हजार गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.


शेअर बाजारातील वातावरण चांगले आहे. त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना होणार आहे. गुंतवणूकदारांनी घेतलेला निर्णय चांगला आहे. कोल्हापुरात शेअर ब्रोकरेज कंपन्याच्या शाखा आहेत. तेजीचा परिणाम म्हणून गुंतवणूकही वाढल्याचे दिसत आहे.

मनीष झंवर,अध्यक्ष, कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशन


शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातर्फे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. निर्देशकांने उच्चांक दर्शविला आहे. मात्र निर्देशांकाचे उत्पादन गुणोत्तर २३ पेक्षा अधिक असल्याने गुंतवणूकदारांनी मर्यादित भांडवलावर मर्यादित धोका स्वीकारूनच अभ्यासपूर्ण गुंतवणूक करावी. घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नये.

संजय पाटील, शेअर बाजार सल्लागार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिव, बसव जयंतीतून सामाजिक संदेश

0
0

कोल्हापूर टाइम्स

छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी शुक्रवारी विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. या दोन्ही उत्सवांना विधायकतेची किनार देत अनेक संस्था आणि मंडळांनी सामाजिक उपक्रमांची जोड दिली आहे. शहरातील तालमी व मंडळांनी लोकोपयोगी कार्यक्रम व उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचे भान जपले आहे. प्रबोधनात्मक फलक, व्याख्याने, रुग्णांना मदत, शाहिरी कलेला प्रोत्साहन, स्वच्छता मोहीम आणि पर्यावरण वाचवा मोहिमेला बळ देण्याबरोबर कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

शाहिरी कलेला प्रोत्साहन

वीर पुरूषांच्या पराक्रमाच्या गाथा सांगताना अंगावर रोमांच उभे करणाऱ्या शाहिरी परंपरेला यंदा पारंपरिक शिवजयंती महोत्सवात चांगलेच प्रोत्साहन मिळाले आहे. शिवशाहीर बजरंग आंबी (सांगली), शाहीर कृष्णात पाटील, शाहीर आझाद नायकवडी, युवराज पाटील यांच्या पोवाड्यांनी जुना बुधवार पेठ, राजर्षी शाहू तरुण मंडळ, संयुक्त राजारामपुरी, संयुक्त रविवार पेठेतील चौकामध्ये रात्री रंगू लागल्या आहेत. मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनाही प्रोत्साहन मिळत आहे.

स्पर्धांमधून कलागुणांना प्रोत्साहन

संयुक्त उतरेश्वर पेठेने शिवकालीन ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा, दत्त महाराज तालमीने लेझिम तर शिवाजी पेठ ताराबाई रोड येथील वखार ग्रुपने शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे. कसबा बावड्यातील विजयस्वतंत्र तरुण मंडळाने वक्तृत्व, चित्रकला, धावणे आणि हलगी वादन स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्थानिक खेळाडू व कलाकारांना उत्तेजन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धा होत आहेत.

उत्तरेश्वरमध्ये ‘पक्षी वाचवा’ मोहीम

उत्तरेश्वर पेठेत पक्षी वाचवा मोहिमेंतर्गत परिसरातील लहान मुले व नागरिकांना शंभर घरटी व पाणी पिण्यासाठी मातीची भांडी वाटली आहेत. तसेच उतरेश्वर पेठ परिसरात झाडांवर ही घरटी बांधण्यात येणार असून यामध्ये परिसरातील मुलांनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतीला प्रोत्साहन देताना शेतकऱ्यांना कशी व कोणत्या प्रकारची मदत केली होती, याबाबतचे प्रबोधनपर फलकही परिसरात उभारले आहेत. त्याचबरोबर हल्लीचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कोणत्या नजरेने व गांभीर्याने पाहते याचा उहापोहही फलकावर केला आहे.

जुना बुधवार पेठकडून वृक्षारोपण

संयुक्त जुना बुधवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने ख्रिश्चन वसाहत येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पावसाळ्यातही मोठ्या प्रमाणावर ब्रह्मपुरी परिसरात वृक्षारोपण करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्यावतीने घेण्यात आला आहे.

व्याख्यानांचे आयोजन

उत्सवात विचारांचा जागर होण्यासाठी शिवजयंती उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी व्याख्यानांचे आयोजन केले. मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाने ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव, डॉ. जयसिंगराव पवार यांच्या व्याख्यानांचे आयोजन केले आहे. या माध्यमातून थेट जनमानसात छत्रपती शिवरायांच्या पराक्रम व राज्यकारभाराची मांडणी करण्यात आली. कोल्हापूर लिंगायत समाज संस्था व बसव केंद्रांच्यावतीने महात्मा बसवेश्वरांवरील व्याख्यानमालेचे आयोजन करण्या आले आहे. बसवेश्वरांचा विचार अंगीकरत असताना अंधश्रध्दा दूर करण्यासाठी प्रा. नितिन शिंदे, प्रा. शशिकांत पट्टन यांची व्याख्याने आयो​जित करण्यात आली. या व्याख्यानांना चांगला प्रतिसाद मिळाला.

रक्तदान व रुग्णांची मोफत तपासणी

दौलतनगर येथील जय शिवराय मित्र मंडळाने रक्तदान व मोफत नेत्रतपासणीचे आयोजन केले आहे. कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा रुग्णांनी लाभ घेतला. दत्त महाराज तालमीच्यावतीने सीपीआरमधील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. वीरशैव लिंगायत बिझनेस फोरमच्यावतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा महासंघातर्फे रविवारी आमसभा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढाकाराने जिल्हयातील पहिली मराठा आमसभा रविवारी (ता. ३०) होईल. मार्केट यार्डातील श्री राजर्षी शाहू सांस्कृतिक मंदीरात सायंकाळी ४ वाजता प्रारंभ होईल. लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवर असे ५ हजार जण उपस्थित राहतील. महासंघाचे जिल्हा अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मुळीक म्हणाले, ‘मराठा आरक्षण, स्वराज्य भवन, मराठा आचारसंहिता, समाजातील शेतकरी, विद्यार्थी, महिलांच्या मूलभूत प्रश्नांवर आमसभेत चर्चा होणार आहे. यावेळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे मराठा आरक्षण या विषयावर मार्गदर्शन करतील. आरक्षणाच्या सद्यस्थितीचा आढावा, पुढील दिशा ‌ठरवण्यात येईल. मराठा भवन बांधण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. सरकारी पातळीवर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. भवनसाठी निधी संकलन पारदर्शकपणे केली जाणार आहे.’

मुळीक म्हणाले, ‘आमसभेस छत्रपती शाहू महाराज, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, शिक्षण तज्ज्ञ डी. बी. पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, संध्यादेवी कुपेकर, उल्हास पाटील, अमल महाडिक, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, प्रकाश आबीटकर यांच्यासह लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे.’

महासंघाच्या महिला जिल्हा अध्यक्षा शैलजा भोसले, डॉ. शिवाजीराव हिलगे, शंकरराव शेळके, चंद्रकांत चव्हाण, उत्तम जाधव, अंजली समर्थ, संदीप पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलीत आमदारांचा हस्तक्षेप

0
0

Appasaheb.mali
@timesgroup.com

Tweet : @Appasaheb_MT

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकाऱ्याच्या आर्थिक गैरव्यवहारचे प्रकरण सध्या गाजत असताना महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण ​स​मितीच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचे कारनामे वाढले आहेत. प्रत्येक ठिकाणी डल्ला मारण्याच्या अधिकाऱ्याच्या कामकाजाला वैतागलेल्या शिक्षक संघटनांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडून पदभार काढून घेतला होता. पण त्या अधिकाऱ्याने महापालिकेतील राजकारणाशी निगडीत व एका प्रमुख पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या एका आमदारांकरवी बदली रद्द करुन घेतली. कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार घडत असल्यामुळे दाद मागायची कुणाकडे ? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

राजकीय हस्तक्षेपाने बदली रद्द झालेले अधिकारी व त्यांच्या मर्जीतील कनिष्ठ अधिकाऱ्यांचा तोरा आणखी वाढला आहे. प्राथमिक शिक्षण समितीमार्फत शहरातील महापालिकेच्या शाळा आणि खासगी शाळांवर नियंत्रण ठेवले जाते. महापालिकेच्या आणि खासगी शाळांची संख्या पाहता प्राथमिक शिक्षण समितीकडे पूर्णवेळ प्रशासनाधिकाऱ्याची नियुक्ती आवश्यक आहे. मात्र २०१० पासून प्राथ​मिक शिक्षण समितीचा कार्यभार हा ‘प्रभारीं’वर सुरू आहे. प्राथमिक शिक्षण समितीमध्ये पदाधिकाऱ्यांना अधिकार नाहीत. सगळा कारभार अधिकाऱ्यांच्या हाती एकवटला आहे.

मुख्याध्यापक पद मंजुरी, निवड श्रेणी मंजुरी, वैद्यकीय बिलांना मंजुरी अशा प्रत्येक कामात टक्का पध्दत सुरु केली आहे. व्यवहार झाल्याशिवाय या कामाच्या फायली पुढे सरकत नाहीत. व्यवहार फिसकटला तर फायलीत त्रुटी काढून शिक्षक व कर्मचाऱ्यांना हेलपाटे मारायला लावणारी यंत्रणा शिक्षण समितीत कार्यरत झाली आहे. सध्या मुख्याध्यापक आणि निवड श्रेणी मंजुरीच्या कामासाठी आर्थिक लुबाडणूक सुरू असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. खासगी शाळेत मुख्याध्यापक पदे रिक्त आहेत. सगळी प्रक्रिया पूर्ण होत असतानाही पद भरण्यात आडकाठी आणली. एका प्रकरणात तीस हजार रुपयांपर्यत राजरोस मागणी केली जाते. शिक्षण समितीमधील त्या अधिकाऱ्याने ‘कलेक्शना’ची जबाबदारी कार्यालयातील दोघा कनिष्ठ अधिकाऱ्यावर सोपविली आहे. कार्यालयातील एक अधिकारी खासगी शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे तर दुसरा अधिकारी महापालिका शाळेतील कामासाठीच्या वसुलीचे काम पाहत आहे. कार्यालयीन काम कमी आणि कार्यालयीन बाह्य कामात या अधिकाऱ्यांचा वेळ खर्ची पडत आहे.

राजकीय हस्तक्षेपच अधिक

शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू झाल्यामुळे शिक्षक संघटनांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार केल्या. उपसंचालक कार्यालयाने तक्रारींची दखल घेत त्या अधिकाऱ्याचा कार्यभार काढून घेतला. करवीर पंचायत समितीमधील विस्तार अधिकाऱ्यांकडे कारभार सोपविला. प्राथमिक शिक्षण समितीमधील मलईदार पद काढून घेतल्यामुळे आर्थिक उत्पन्नावरच मर्यादा पडल्या. तेव्हा त्या अ​धिकाऱ्यांनी आमदारांची भेट घेऊन आदेश रद्द करण्याची मागणी केली. आमदारांनी दूरध्वनी करुन बदली आदेश रद्द करायला लावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात पुरेसा उपयुक्त पाणीसाठा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात धरणांमधील उपयुक्त पाणी साठ्याची स्थिती समाधानकारक आहे. काळम्मावाडी, राधानगरी, तुळशी आणि वारणा या चार प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक साठा असून, या पाण्याचे काटेकोर नियोजन पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. काटकसरीने वापर केल्यास पावसाळा सुरू होऊपर्यंत उपलब्ध पाणी पुरणार असल्याचे उप कार्यकारी अभियंता के. सी. बावडेकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितले.

जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांमधील पाण्यांचे नियोजन कालवे सल्लागार समितीच्या माध्यमातून ऑक्टोबर २०१६ मध्येच करण्यात आले आहे. त्यानुसार कोल्हापूर पाटबंधारे विभागाकडून उन्हाळ्यातील आवर्तनाचे टप्पे सुरू आहे. यात एक मार्चपासून १० जूनपर्यंतची उन्हाळी आवर्तने ठरविण्यात आली होती. त्यातील सध्या २१ एप्रिल ते ७ मेपर्यंतचा चौथा टप्पा सुरू आहे. राधानगरी, दुधगंगा आणि तुळशी धरणांतून यंदा रब्बी पिकालाही मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. त्यात राधानगरीतून ३.४, दुधगंगा धारणातून १.७ तर तुळशी धरणातून ०.९ टीएमसी पाणी रब्बी पिकासाठी सोडण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीसाठी जास्त प्रमाणात पाणी देण्यात आल्याचे विभागातील अधिकारी सांगतात.

कर्नाटकर राज्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून ३.४३ टीएमसी पाणी देण्यात येते. त्यात दुधगंगा धरणातून करण्यात विसर्गाबरोबरच नद्यांमधूनही कर्नाटकसाठी पाणी देण्यात येत असल्याचे अधिकारी सांगतात. यंदा गेल्या वर्षीपेक्षा चांगली स्थिती असल्याने पॅनिक होण्याची गरज नाही. त्याच पूर्व मौसमी पाऊस झाल्यास त्याचाही फायदा शेतीला होणार आहे. पण, तरीही पाण्याचा काटकसरीनेच वापर करणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवानगीविनाच पोलिसांची तिकीट विक्री

0
0

कोल्हापूर : पोलिस कल्याण निधी जमवण्यासाठी पोलिस प्रशासनाने आयोजित केलेल्या ‘मराठी तारका’ या कार्यक्रमासाठी धर्मादाय कार्यालयाकडून परवानगी घेतलेली नाही. पोलिसांकडून बेकायदेशीरपणे तिकीटांची विक्री आणि देणगी जमा करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप प्रजासत्ताक जामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केला आहे. देसाई यांनी याबाबतचा पत्रव्यवहार मुख्यमंत्री कार्यालयालाही केला असून, जमा होणाऱ्या निधीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कोल्हापूर पोलिसांकडे कल्याण निधी उपलब्ध नसल्याने ‘मराठी तारका’ या कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात फलक लावून याची जोरदार जाहिरातबाजी केली जात आहे. १ मे रोजी पोलिस परेड ग्राउंडवर हा कार्यक्रम होणार आहे. मात्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यापूर्वी पोलिसांनी कायदेशीर बाबींची पूर्तता केली नसल्याचा आरोप प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेने केला आहे. धर्मादाय विभागासह करमणूक विभागाची परवानगी घेऊनच कार्यक्रमाची तिकिटे छापता येतात. पोलिसांनी मात्र बळाचा आणि पदाचा गैरवापर करून नागरिकांकडून पैसे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. कोल्हापूर पोलिसांनी २०१० मध्ये पोलिसांसाठी हॉस्पिटल उभे करण्यासाठी निधी गोळा केला होता. परंतु आजपर्यंत हे हॉस्पिलटल उभे राहिले नाही. ते पैसे कुठे गेले? असाही सवाल दिलीप देसाई यांनी केला आहे.


आम्ही सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊनच कार्यक्रम करीत आहोत. धर्मादाय कार्यालयाशीही आम्ही पत्रव्यवहार केला असून, त्यांच्या परवानगीचे पत्रही लवकरच मिळेल. कदाचित गैरसमजातून काही लोकांनी तक्रार केली असावी.

- एम. बी. तांबडे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरा केळकर, कविता राऊत यांना ‘भगिनी पुरस्कार’

0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिलखेचक नृत्य, धमाल विनोदी अभिनय आणि सुरेल गायकी अशा तिहेरी मनोरंजनाचा आस्वाद यंदाच्या भगिनी महोत्सवात शहरवासियांना घेता येणार आहे. येथील भगिनी मंचतर्फे २९ एप्रिल ते एक मे या कालावधीत आयोजित भगिनी महोत्सव होत आहे. यामध्ये ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर, अभिनेत्री नृत्यांगणा माया जाधव, सावरपाडा एक्सप्रेस ऑलिम्पियन कविता राऊत, आतंरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का पाटील आणि राष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेती ऐश्वर्या सुतार यांना ‘भगिनी पुरस्कार’देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सोमवारी (ता.१) महोत्सवाच्या सांगता समारंभात भगिनी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

दरम्यान महापौर हसीना फरास यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उध्यक्षतेखाली राजर्षी शाहू खासबाग मैदान येथे भगिनी महोत्सव भरविण्यात आला असून शनिवारी (ता.२९) सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर व भगिनी मंचच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी दिली. महोत्सवाचे यंदाचे सातवे वर्ष आहे. महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना, खाद्यपदार्थांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मोफत स्टॉल उपलब्ध केले आहेत. महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे. महाराष्ट्र संस्कृतीवर आधारित कार्यक्रमापासून खास महिलांसाठी लावणी कार्यक्रम असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्हीआयपी’ रोडवर स्पीडब्रेकर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खानविलकर पेट्रोल पंप ते धैर्यप्रसाद हॉल या मार्गावर अखेर स्पीडब्रेकर बसवण्याचे काम महापालिकेकडून सुरू झाले. बुधवारी आदित्य कॉर्नर चौकातील महाराष्ट्र बँकेसमोर स्पीडब्रेकर तयार करण्यात आला असून, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणखी तीन स्पीडब्रेकर तयार केले जाणार आहेत. एका अपघातात झालेल्या व्यावसायिकाच्या मृत्यूनंतरच या मार्गावरील स्पीडब्रेकरसाठी महापालिकेला मुहूर्त मिळाला.

शहरातील बहुतांश सरकारी कार्यालयांना जोडणारा मार्ग म्हणून खानविलकर पेट्रोलपंप ते धैर्यप्रसाद हॉल मार्गाची ओळख आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, उद्योगभवन, आरटीओ, महावितरण यांसह शासकीय विश्रामगृहाकडे जाण्यासाठी हाच मार्ग उपयोगात येतो. थेट रस्ता आणि कुठेच ट्रॅफिक सिग्नल नसल्याने बाइकर्सची गर्दी या रस्त्यावर असते. महाविद्यालयीन तरुणांची मोठी वर्दळ याच मार्गावरून असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.

खानविलकर पेट्रोल पंप ते धैर्यप्रसाद हॉलपर्यंत नऊ ठिकाणी उपरस्ते या मुख्य रस्त्याला जोडले आहेत. छोट्या कॉलनीजमधून येणारे रस्ते मुख्य रस्त्यावरील वाहनधारकांना दिसतही नाहीत, त्यामुळे अपघात होतात. याशिवाय बेपर्वाईने वाहने चालवणाऱ्यांची संख्या कमी नाही. याच बेपर्वाईचा फटका सोमवारी (ता. २४) प्रदीप सोळंकी या कोल्ड्रींक व्यावसायिकाला बसला. दोन तरुणांनी सोळंकी यांच्या दुचाकीला धडक दिल्याने सोळंकी रस्त्यात कोसळून जागीच गतप्राण झाले.

शासकीय विश्रामगृहात उतरणारे मंत्री, आमदार यांच्यासह व्हीआयपी लोकांना जिल्हाधिकारी कार्यालयासह अंबाबाई मंदिरापर्यंत तातडीने पोहोचता यावे यासाठी महापालिकेने हा मार्ग व्हीआयपी म्हणून राखीव ठेवला आहे. व्हीआयपी मार्ग असल्याने त्यावर स्पीडब्रेकर तयार केले जात नव्हते. मात्र ‘महाराष्ट्र टाइम्स’ने बुधवारच्या अंकात ‘व्हीआयपी मार्गावर बेफिकिरी’ या शीर्षकाखाली वृत्त छापून रस्त्यावरील अपघातांचा धोका दाखवला. याची दखल महापालिकेने घेतली असून बुधवारी स्पीडब्रेकरचे काम सुरू झाले. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणखी तीन स्पीडब्रेकर करण्याचे काम हाती घेतले आहे. यापूर्वीच हे काम होणे गरजेचे होते.


वडणगे (ता. करवीर) येथील मुख्य मार्गावर स्पीड ब्रेकर नसल्याने अपघातांचा धोका आहे. शिव पार्वती कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाने स्वखर्चातून रस्त्यात १४ ठिकाणी पांढरे पट्टे मारले. सुकेश जाधव, रमण देवणे, विजय साखळकर, सुजित साखळकर, रवि देवणे, संतोष आळवेकर आदींनी हे काम केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० लाखाच्या पुलासाठी ​अडीच कोटी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
थेट पाइपलाइन योजनेतील पाइप टाकण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या लोखंडी पुलासाठी २० लाखाचा खर्च असताना त्यासाठी २ कोटी ४८ लाखाचे अवाजवी इस्टिमेट करुन जनतेच्या पैशावर संगनमताने दरोडा टाकण्यात येत आहे. योजनेत ४० कोटींच्या पाडलेल्या ढपल्यातील रकमेची कंत्राटदाराला भरपाई करुन देण्यासाठीच २० कोटींचा हा खर्च मंजूर केल्याचा आरोप महापालिकेतील भाजपचे गटनेता विजय सूर्यवंशी व ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. चुकीचे इस्टिमेट करुन त्याला तांत्रिक मंजुरी देणाऱ्यांवर तातडीने फौजदारी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. तसेच योजनेच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही सांगितले.
योजना दर्जेदार होण्याबरोबरच काम लवकर व्हावे, अशा सूचना करुनही सत्तारुढ काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने पाठपुरावा केलेला नाही, असे सांगत सूर्यवंशी व कदम म्हणाले की, योजना सुरु करण्याची तत्कालीन मुख्यमंत्री व स्थानिक मंत्र्यांची गडबड भोवली. त्यामुळेच अनेक त्रुटी राहिल्या. सध्या पाइप टाकण्यासाठी कॅनॉल तसेच नदीवर सहा पूल बांधण्यात येत असून त्यासाठी २० कोटीच्या खर्चाचे इस्टिमेट केले आहे. ७५ फूट लांब व १२ फूट रुंदीच्या लोखंडी पुलाचा खर्च बाजारभाव पाहिल्यास १८ ते २० लाख रुपये येतो. त्यासाठी योजनेत २ कोटी ४८ लाखांचा खर्च दाखवला आहे. यासारख्या अनेक कामांबाबतची माहिती व्हावी यासाठी सातत्याने खास सभा बोलवण्याचा आग्रह केला जात आहे. पण सभाही बोलवली जात नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘चुकीच्या कामाची बिले येत असल्याचे सांगूनही प्रशासनाकडूनही काहीच कारवाई केलेली नाही. यासाठी आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. सर्व कामाची चौकशी करावी, अशी मागणीही केली आहे. त्याचबरोबर जीवन प्राधिकरणकडेही योजनेच्या तांत्रिक मंजुरीबाबत विचारणा करणार आहे. ज्यांनी मंजुरी दिली, त्यांच्यावर फौजदारीसाठी पाठपुरावा करणार आहे. योजनेतील प्रत्येक कामाच्या बिलाच्या चौकशी केल्याशिवाय ते मंजूर करणार नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी योजना पूर्ण करावी असे काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आता सांगत आहेत. आम्ही ही योजना निर्दोषपणे पूर्ण करुच. त्याचवेळी पालकमंत्री व आमदार अमल महाडिक यांच्या बिंदू चौकात करण्यात येणाऱ्या सत्कारास त्यांनी जरुर यावे.’
यावेळी विरोधी पक्ष नेते किरण शिराळे, अजित ठाणेकर, राजसिंह शेळके, ईश्वर परमार उपस्थित होते.

अहवाल मागवला आहे

योजनेचा डीपीआर करण्यापासून कामावर देखरेख ठेवण्यापर्यंतचे काम युनिटी कन्सल्टंटकडे आहे. पुलांची लांबी व रुंदी कमी अधिक असल्याने अंदाजित रकमेची तरतूद केली आहे. तरीही या कामाबाबत कन्सल्टंटकडून अहवाल मागितला आहे. अहवाल आल्यानंतर आयुक्तांशी चर्चा करुन कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कंत्राटदाराकडून आलेले बिल स्थगित ठेवले आहे. त्यावरही अहवालानंतरच निर्णय घेण्यात येणार आहे.

सुरेश कुलकर्णी, प्रभारी जलअभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'कृषी-पणन मंत्र्यांची हकालपट्टी करा'

0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘स्वयंघोषित राष्ट्रभक्त समजणारे राज्य आणि केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. छत्तीसगडमधील नक्षलींच्या हल्ल्यानंतर गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याची आणि तूर खरेदीचे नियोजन चुकल्याची फक्त कबुली देऊन चालणार नाही. कृषी व पणन मंत्र्यांची हकालपट्टी करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे,’ अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्य मागण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा मंगळवारी रात्री सांगलीत पोहोचली. बुधवारी सकाळी संघर्ष यात्रेतील नेत्यांनी सांगलीत वसंतदादा पाटील यांच्या समाधीला अभिवादन केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गटनेते जयंत पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, काँग्रसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, शहरजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार विद्या चव्हाण, रामहरी रुपनवर यांच्यासह दोन्ही पक्षाचे आजी-माजी आमदर, स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी संवाद साधला.
विखे-पाटील म्हणाले, ‘सर्वच पातळीवर अपयशी ठरत असलेल्या सरकारकडून काय अपेक्षा करायची? असा प्रश्न जनतेला पडलेला आहे. वसंतदादा पाटील यांच्या सारख्यांनी नेतृत्व करताना सुजलाम, सुफलाम करून ठेवलेल्या महाराष्ट्राची या सरकारने दयनीय अवस्था करून ठेवली आहे. लाखो क्विंटल तूर आज पडून आहे. हमीभाव निश्चित करून तूर खरेदीचे वचन देणाऱ्या सरकारला नियोजन चुकले, २२तारखेपर्यंत नोंद असलेली तूर घेणार असे सांगून जबाबदारी टाळता येणार नाही. कृषी व पणन मंत्र्यांची हकालपट्टी करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. तूर खरेदीतील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना बोनस म्हणून दिली पाहिजे. कोल्हापुरात महालक्ष्मीचे दर्शन, राजर्षी शाहूंचे आशिर्वाद घेतल्यानंतर सत्तेवर येताच धनगर समाजाला आरक्षण देण्याची भाषा करणाऱ्या सरकारने अडीच वर्षांनंतरही धनगर समाजाची फसवणूक चालविली असल्याने संत बाळू मामा यांची माफी मागितली. क्रांतिसिहांच्या सांगली जिल्ह्यातून वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांचे अशिर्वाद घेऊन पुन्हा संघर्षाची मशाल पेटवून शेतकरी कर्जमुक्त करायचा, सरकारला धडा शिकवायचा, असा निर्धार केला आहे. अशावेळी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. या घडीला त्यांनी सरकारला सळो की पळो करुन सोडले असते. चांद्यापासून बांद्यापर्यंत कर्जमाफी करीता सुरु असलेल्या संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेतून उस्फूर्त पाठींबा मिळत आहे. त्यामुळे कर्जमाफी आम्ही घेणारच आहोत. या करिता सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, यासाठी आम्ही राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना भेटणार आहोत.’


'तूर खरेदीला तारखेची अट चालणार नाही'

‘खरी गरज असलेल्यांना कर्जमाफी देण्याची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नेमक्या गरजेची व्याखा सांगावी. तुम्ही आधुनिक जमान्यात आहात. मी लक्ष घालतो, माहिती मागविली आहे. समिती नेमली आहे, अहवाल यायचा आहे, हा वेळकाढूपणा बंद करा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या नाहीतर तुम्ही महाराष्ट्राला मुक्त करा,’ असा इशारा अजित पवार यांनी दिला.
पवार म्हणाले, ‘हे सरकार रोज चुका करीत आहे. त्यातून पावलोपावली सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे. नोटांबदीनंतर शेतकऱ्यांच्या तारणहार असलेल्या जिल्हा बँकांची अर्थिक कोंडी करुन ठेवली आहे. आघाडीच्या काळात वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेल्या या राज्यात शेतकऱ्यांना वीज दरात सवलत देण्याऐवजी २२०, २९५, ३११ टक्के दरवाढ सुचवता? पुरेशी साखर आणि कारखानदारी अडचणीत असताना कच्ची साखर आयात कोणासाठी केली जात आहे. तूर खरेदीला तारखेची अट अजिबात चालणार नाहीत. जोपर्यंत तूर शिल्लक आहे, तोपर्यंत्त ५ हजार ५०० रुपये या दराने खरेदी होत राहिली पाहिजे. आपले अपयश झाकण्यासाठी वाट्टेल तसे निर्णय घेऊन ते जनतेवर लादण्याची जुलमी राजवट बंद करून डोळे उघडे ठेवून निर्णय घ्या, अन्यथा शेतकऱ्यांना एकत्र करून आम्हाला टोकाची भूमिका घेऊन सरकारची कोंडी करावी लागेल. विशेष अधिवेशन घ्यायचेच असेल तर जीएसटी ऐवजी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि वीजदरवाढ या बाबत घेतले पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’


'शेतकऱ्यांविरोधात बोलणाऱ्यांना पंतप्रधान, मुख्यमंत्र्‍यांची फूस'

निती आयोगाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कर लावण्याची सुचना अहवालात केली आहे. हे म्हणजे अतीच झाले. सरकारांच्या प्रमुखांच्या परवानगीशिवाय एक शब्दही न काढणारे रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला देताय?, असे बोलून टाकतात तर एसबीआय बँकेच्या प्रमुख भट्टाचार्य म्हणतात, कर्जमाफी दिलीतर बँकांची अर्थिक अडचण होईल. त्यामुळे अशी वक्तव्य करण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचीच फूस असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे राज्यातले असो किंवा केंद्रातले भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातच आहे.


शिवसेनेने नौटंकी बंद करावी : विखे-पाटील

सर्वाधिक भ्रष्टाचार असलेल्या मुंबई महापालिकेतील कारभाराचे पितळ उघड पडू नये म्हणून सत्तेला चिकटून बसलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अभिनय ‘चला हवा येऊ द्या,’ मधील नटांच्या अभिनयालाही मागे टाकणारा आहे. त्यांनी नौटंकी बंद करावी. मंत्रिमंडळात त्यांच्या मंत्र्यांनी ढिम्मासारखे बसायचे आणि बाहेर येऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे म्हणायचे. संसदेत खासदाराच्या विमान प्रवासासाठी मंत्र्यांच्या अंगावर धावून जायचे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मात्र मूग गिळून गप्प बसायचे. खिशात ठेवलेले राजीनामे बदललेल्या कपड्याबरोबर गेले काय? अशा सेनेने खरचं शेतकऱ्यांबद्दल कळवळा असेल आणि थोडीफार नैतिकता शिल्लक असेल तर सरकारमधून बाहेर पडून संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे.


‘स्वाभिमानी’ हा शब्द शोभत नाही : विखे-पाटील

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे भले करायला निघालेले खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तोंडाला पट्ट्या बांधल्या आहेत. त्यांची कथनी आणि करणी स्वाभिमानी या शब्दाला शोभणारी नाही. शेतकऱ्यांच्या जीवावर मंत्रिपदावर विराजमान झालेल्या खोत यांना सरकार प्रमाणेच इव्हेंटची लागण झालेली आहे. कधी बाजार भरविल्याचा तर कधी अन्य कशाचातरी इव्हेंट सुरू असतो. जितक्या गतीने ते मंत्रिपदावर पोहचलेच, तितक्याच गतीने शेतकरी त्यांना खाली आणतील. अशी टीकाही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.


शेतकरी उद्धवस्थ करण्याचे कारस्थान

‘शेतकरी उद्धवस्थ करण्याचे कारस्थान मुंबईत शिजत आहे. ऊस, तूर उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. पोपटासारखे मिठू मिठू बोलून वेळकाढूपणा सुरू आहे. शेतकरी विरोधी बोलणारे भाजपचे सरकारला मस्तवाल झाले आहे. शेतकरी हितापेक्षा उद्योगपतींचे हित साधले जात आहे,’ टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मल्लिकार्जुन देवालयापासून बाजारपेठ-शिवाजी चौक-स्टेट बँक कार्नर-अंबिका मंदिरपासून खुल्या नाट्यगृहापर्यंत राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल युनायटेड, आरपीआय कवाडे गट, समाजवादी पक्ष या प्रमुख विरोधी पक्षांनी शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढली. बैलगाड्यातून नेत्यांनी सभास्थळी येताना शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. खुल्या नाट्यगृहामध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
पवार म्हणाले, भाजपमध्ये सर्वसामान्यांची नाडी ओळखणारे नेतृत्व नाही. त्यामुळे लोकहिताचे निर्णय घेतले जात नाहीत. केवळ उद्योगपतींनी खूष ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. हिरे व्यापाऱ्यांसाठी एक लाख कोटी रुपये खर्चून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन केली जाते. मात्र, त्यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्यास पैसे नाहीत. लोकशाहीचा खून पाडला जात आहे. हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो लावण्याची सक्ती असो किंवा राज्यातील आमदारांचे निलंबन. आले मोदींच्या मना, तेथे कोणाचे चालेना, अशी स्थिती झाली आहे.’

सिंचन योजनांना वीजबिल माफी द्या

कर्जमाफी मागणारे विरोधी पक्षांचे आमदार निलंबित केले; आता सर्व विरोधी आमदारांचे निलबंन झाले तरी चालेल मात्र, कर्जमाफी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला. सध्या राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारकडून फुकटचे श्रेय घेण्याचा धंदा सुरू आहे. क्रांतिसिंहाच्या जिल्ह्यातून क्रांतीची मशाल पेटवा आणि भाजपवाल्यांच्या बुडाखाली जाळ करा. त्याशिवाय सरकार जागे होणार नाही. शेतकऱ्यांना हमी भाव नाही, त्याचे जगणे मुश्किल झाले आहे. या काळात ताकारी, म्हैसाळ, टेंभूसह राज्यातील सर्वच सिंचन योजनांना पाच वर्षांसाठी वीजबिल माफी द्यावी. शेतकऱ्यांकडून वीजबिल आकारू नये, अशी मागणीही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.


आर. आर. आबा असते तर...

संघर्ष यात्रेत आर. आर. आबांची आठवण सर्वच वक्त्यांनी प्रामुख्याने काढली. आबा असते तर सरकारला सळो की पळो करून सोडले असते. सर्वसामान्य माणसाच्या आणि शेतकऱ्यांच्या दु:खावर ते पेटून उठत. त्यामुळे आता ते स्वस्थ बसले नसते. भाजपचे वाभाडे काढले असते, त्यांची उणीव संपूर्ण महाराष्ट्राला जाणवत असल्याचे अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. आबांच्या आठवणी त्यांनी जागवल्या. त्याचबरोबर महांकाली कारखान्याचे अध्यक्ष विजयराव सगरे यांची आठवण अजित पवार यांनी काढली.

गरज कशी भागणार?
तासगावात अजित पवार म्हणाले, ‘हे सरकार माणशी वीस लिटर पाणी देतंय. त्यात पंतप्रधानांनी शौचालये बांधण्याचे आवाहन केले आहे. आघाडी सरकारच्या काळात आम्ही माणसी ४० लिटर पाणी देत होतो. त्याचबरोबर अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटातील दृश्य आठवले आणि दगडांचा उल्लेख झाला की, दगडावर कशी गरज भागविली जात होती, हे कळते. पण आता वीस लिटरमध्ये कोणती आणि कशी गरज भागवायची , एवढेही सरकारला कळत नाही का?’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय मोहिते नवे पोलिस अधीक्षक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांची सोलापूर येथे पदोन्नतीवर बदली झाली आहे. पोलिस उपआयुक्तपदावर त्यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी संजय मोहिते यांची नियुक्ती झाली आहे. मोहिते हे मुंबई शहर येथे पोलिस उपआयुक्त पदावर कार्यरत होते. लवकरच ते कोल्हापूर अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. तांबडे यांच्याव्य‌‌तिरिक्त सहायक अधीक्षक हर्ष पोद्दार आणि सीआयडीचे अधीक्षक आर. आर. बनसोडे यांच्याही बदलीचे आदेश आले आहेत. गृह खात्याने राज्यातील १०४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, या बदल्यांचे आदेश गुरुवारी रात्री उशिरा जाहीर केले.

दरम्यान, मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी आशुतोष डुंबरे यांची बदली करण्यात आली असून वाहतूक पोलिसांच्या प्रमुखपदाची धुरा अमितेश कुमार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अर्चना त्यागी यांच्याकडे मुंबईच्या सहपोलिस आयुक्त (प्रशासन) पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनेक दिग्गज अधिका‍ऱ्यांना मुंबईबाहेर नियुक्ती देण्यात आली असून फेरबदलात मुंबईत ११ नवीन पोलिस उपायुक्तांची भर पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीएसटीनंतर वस्तूंच्या किंमती समान होतील

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘एक जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर सर्वच वस्तूंच्या किंमती निश्चितच कमी होतील. देशभरात कराचे दर एकच होणार असल्याने वस्तूंची किंमत एकसारखी राहील. जीएसटी करप्रणाली ही करदात्यांसाठी सोयीची आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय उत्पादन सहाय्यक आयुक्त के. के. श्रीवास्तव यांनी केले. शिरोली औद्योगिक वसाहतीतील शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे स्मॅक भवन येथे जीएसटी करप्रणालीची माहिती देण्यासाठी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील होते. स्मॅक, विक्रीकर कार्यालय आणि केंद्रीय उत्पादन विभागातर्फे चर्चासत्र झाले.

सहायक आयुक्त के. के. श्रीवास्तव म्हणाले, ‘जीएसटी लागू झाल्यानंतर सर्वच वस्तूंच्या किंमती सर्वच ठिकाणी समान राहतील. त्यामुळे कोणत्याही राज्यात वस्तू खरेदी केल्यास एकाच किंमतीला मिळू शकेल. करदात्याला उत्पादन किंवा विक्रीकर विभागाकडे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. करप्रणालीची कामे ऑनलाइन करू शकतात. जीएसटीच्या बदलात आयजीएसटी हा टॅक्स आला आहे. सेट ऑफ मिळण्यासाठी हा आयजीएसटी टॅक्स केला आहे. इंपोर्टला टॅक्स लावला जाणार नाही. सी फार्म पद्धत राहणार नाही. एक्स्पोर्ट वगळता रिफंडची पद्धत राहणार नाही. सुरूवातीला जीएसटी टीन दिला जाईल. त्यानंतर येत्या सहा महिन्यात तपासणी करून कायमस्वरूपी जीएसटी टीन नंबर दिला जाईल.’

सहायक विक्रीकर आयुक्त अभिजित पोरे यांनीही मार्गदर्शन केले. स्मॅकचे हिंमतराव साळुंखे, अमर जाधव, एम. वाय. पाटील, सी. पी. सोवनी, प्रवीण पटेल, पवन रोचलानी आदी उपस्थित होते. अध्यश्र राजू पाटील यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष दीपक परांडेकर यांनी प्रास्ताविक केले. सेक्रेटरी टी. एस. घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. जी. बी. वझे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवरायांचा अखंड जयघोष

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अंगावर शहारे आणणारे आणि वीररसांनी ओथंबलेले पोवाडे, गल्लोगल्ली काढण्यात आलेल्या आकर्षक रांगोळ्या, ‘जय भावनी, जय शिवाजी’चा जयघोष, चौकाचौकांत लावलेल्या भगव्या पताकांमुळे तयार झालेल्या भगव्या वातावरणात शहरात सर्वत्र शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शुक्रवारी पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

शहरातील मंडळांचे कार्यकर्ते पन्हाळा तसेच विशाळगड येथून शिवज्योती घेऊन येत होते. शहरात गुरुवारी रात्रीपासूनच या शिवज्योतीचे आगमन होत होते. त्यामुळे भगवे झेंडे हातात घेऊन येणारे तरुण आणि शिवरायांचा जयजयकार यामुळे वातावरण शिवजयंतीमय होण्यास सुरुवात झाली होती. शिवज्योत घेऊन येणारे मंडळांचे कार्यकर्ते शिवाजी चौकातील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून पुढे जात होते. मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आदल्या दिवशीची रात्र तयारीच्या निमित्ताने जागून काढली. तर दुपारी हेच कार्यकर्ते सायंकाळच्या मिरवणुकीच्या तयारीत गुंतले होते.

सकाळी शहरातील गल्लीबोळ रांगोळ्यांनी सजले होते. रात्री पताका लावून पूर्ण झाल्याने गल्ल्या आणि चौकांना शिवजयंती उत्सवाची झालर चढली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे, प्रतिमांचे पूजन करण्यात आले आणि पाळणाही म्हणण्यात आला.


मंगळवार पेठेची भव्य मिरवणूक

सायंकाळनंतर शहरात शिवजयंतीच्या भव्य मिरवणुका निघाल्या. दुपारी चारनंतरच तालमी आणि मंडळांचे सजवलेले ट्रॅक्टर मुख्य चौकांत आले होते. सजीव देखाव्यांची तयारी सुरू होती. संयुक्त मंगळवार पेठ शिवजयंती उत्सव समितीसह सोमवार पेठ, रविवार पेठ, राजारामपुरी येथील मंडळे आणि तालमींनी संयुक्तपणे मिरवणुका काढल्या.

डॉल्बीसह पारंपरिक वाद्ये, सजीव देखाव्यांचा समावेश होता. मंगळवार पेठेच्या मिरवणुकीत डॉल्बीबरोबरच एक बँड पथक, लेझीम पथक, मर्दानी खेळ, सहा घोडे असा लवाजमा होता. त्याचबरोबर मंगळवार पेठेतील सात लक्षवेधी रिक्षा या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. त्या रिक्षांवर किल्ल्यांची सध्या झालेली दुर्दशा, कोल्हापूरच्या खंडपीठाचा प्रश्न असे विविध प्रश्न मांडणारे फलक लावण्यात आले होते. या मिरवणुकीत १३ तालमींसह जवळपास शंभरहून अधिक तरुण मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. खासदार धनंयज महाडिक, मालोजीराजे छत्रपती आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्याप्रमुख उपस्थितीत सायंकाळी सहाच्या सुमारास मिरवणुकीचे उद‍्घाटन झाले.
हिंदू एकता आंदोलन

दरवर्षीप्रमाणे हिंदू एकता आंदोलन संघटनेच्यावतीने सकाळी दहा वाजता शिवजन्मकाळ सोहळा संपन्न झाला. महापौर हसीना फरास यांच्या उपस्थितीत पाळणागीत म्हणण्यात आले. यावेळी जुना राजवाड्याचे पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत बराले, लालासाहेब गायकवाड, अण्णा पोतदार, किशोर घाटगे, गणेश नारायणकर, श्रीकांत पाउंडकर, अजित तोडकर, शिवाजीराव ससे, दिलीप सूर्यवंशी, मामा बालिघाटे, अजित चव्हाण, तानाजी सुतार, समीर जोशी, म्हाकू, घाटगे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जिल्हा सर्वोदय मंडळ

कोल्हापूर जिल्हा सर्वोदय मंडळ, स्वातंत्र्यसैनिक संघटना, कोल्हापूर जिल्हा खादी संघ आणि समता हायस्कूल यांच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई, दादासाहेब जगताप व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व्ही. डी. माने यांच्याहस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी एस. एस. तुपद, बी एस. शिंगे, प्रा. आशा कुकडे, गीताताई गुरव, अप्पासाहेब देसाई. प्रा. सुजय देसाई आदी प्रमुख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४ मार्ग वन वे, अवजड वाहनांना गर्दीच्यावेळी नो एन्ट्री

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने अवजड वाहनांसाठी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार या वाहनांना शहरात दुपारी १ ते ४ या वेळेतच प्रवेश मिळणार आहे. शिवाय शहरातील २४ मार्ग एकेरी केले आहेत. ७ चौकात अवजड वाहनांना बंदी केली आहे.

‘या नियमावलीची तातडीने अंमलबजावणी केली जाणार असून, जे वाहनचालक उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. प्रसंगी वाहन जप्तीची कारवाईही केली जाईल’, असा इशारा वाहतूक निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिला आहे.

सकाळी ९ ते १ आणि दुपारनंतर ४ ते रात्री १० पर्यंत शहरात वाहनांची वर्दळ असते. याच दरम्यान शाहूपुरी, लक्ष्मीपुरी धान्यबाजार, उद्यमनगर परिसरात जाणारी वाहने शहरातील रस्त्यांवर आल्यास कोंडी निर्माण होते. त्यातच स्टॉपवर केएमटी बस थांबली असेल तर दुसरे मोठे वाहन पुढे जाऊ शकत नाही. हा प्रकार टाळण्यासाठी अवजड वाहतुकीची वेळ निश्चित केली आहे. माल उतरवल्यानंतर काही वाहने जागा मिळेल त्या ठिकाणी पार्क केली जातात, अशा वाहनांवरही कारवाई होणार आहे.

अवजड वाहतूक शहराबाहेरून

बॉक्साइट वाहतुकीचे ट्रक शाहूवाडीकडून रजपूतवाडी फाटा, निगवे फाटामार्गे हायवेकडे जातील. भुदरगड, मुरगूड, बिद्री, परिसरातील इस्पुर्लीमार्गे येणाऱ्या अवजड वाहनांना हॉटेल इंदिरा सागर-संभाजीनगर या ठिकाणी तर राधानगरी, भोगावतीकडून वाशी नाकामार्गे येणाऱ्या वाहनांना नवा वाशीनाका येथे, बिनखांबी गणेश मंदिराकडून महाव्दारवर येणाऱ्या वाहनांना पापाची तिकटी येथे तर सीपीआर चौकातून शिवाजी चौक पुतळामार्गे जाणारी सर्व वाहने सीपीआर चौकात अडवली जाणार आहेत. फोर्ड सिग्नल चौक येथून आईसाहेब पुतळा चौकातून बिंदू चौकाकडे जाणारी अवजड वाहने आईसाहेब पुतळा येथे, कोंडाओळ सिग्नल चौक येथून स्वयंभू गणेश मंदिर चौकातून महाराणा प्रताप चौकाकडे जाणारी वाहने कोंडाओळ सिग्नल येथून टायटन चौक, दसरा चौक, सीपीआर चौक, बुधवार पेठ, तोरस्कर चौक, शिवाजी पूल, जामदार क्लब, गंगावेश सिग्नल चौक, रंकाळा, एस. टी. स्टँड मार्गे पुढे जातील.

वन-वे असे असतील

एस.टी.स्टॅड-परिख पूल, राजारामपुरी बस रुट-आईचा पुतळा, आईचा पुतळा-जनता बझार, माळकर चौक- मिलन हॉटेल, महाराणा प्रताप चौक-महापालिका, लुगडी ओळ-महाराणा प्रताप चौक, खाँसाहेब पुतळा-ते दुर्गा हॉटेल, दुर्गा हॉटेल-आझाद चौक-टेंबे रोड-खाँ साहेब पुतळा, बिनखांबी गणेश मंदिर- पापाची तिकटी, बिनखांबी-मिरजकर तिकटी, मिरजकर तिकटी-खरी कॉर्नर, खरी कॉर्नर-बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी-महापालिका, शिवाजी महाराज पुतळा-पापाची तिकटी, गुजरी-महाव्दार रोड, महाव्दार रोड-जोतिबा रोड, भवानी मंदिर-सबजेल कमान, बिंदू चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महापालिका-सम्राट चौक, साकोली कॉर्नर-चिंतामणी हॉस्पिटल, रंकाळा स्टँड-ताराबाई रोड, भवानी मंडप-बालगोपाल तालीम, इगल प्राईड-भवानी मंडप, वटेश्वर मंदिर ते ट्रॅफिक चौकी स्टँड.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबा बावडा परिसर झाला शिवमय

0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

जय भवानी, जय शिवराय अशा जयघोषाने कसबा बावडा परिसर शुक्रवारी दुमदुमला. पारंपरिक पद्धतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परिसरातील २५ हून अधिक मंडळांनी ठिकठिकाणी शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करून शिवरायांना अभिवादन केले. यासाठी कार्यकर्त्यांनी गेले काही दिवस जय्यत तयारी केली होती.

शिवरायांच्या प्रतिमेला आकर्षक सजावट करण्यात आली होती. कसबा बावड्यातील आकर्षण असणाऱ्या माळ गल्लीतील विजय स्वतंत्र तरुण मंडळाच्या शिवप्रतिमेचे पूजन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, प्रतिमा पाटील, सर्व नगरसेवक उपस्थित होते. मराठा कॉलनी फ्रेंड्स सर्कलमध्ये सुरेश चौगुले यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाले. वाडकर गल्ल्तीली शिवाजी तरुण मंडळात संजय वाडकर यांच्या हस्ते पूजन झाले. ठोंबरे गल्लीतील जय शिवराय तरुण मंडळ, कवडे गल्ल्तीली गणेश पूजा मित्र मंडळ, जय भवानी फ्रेंड्स सर्कल, जय भवानी गल्ल्तील दिवंगत राजू मोरे पाउंडेशनप्रणित शिवसेना शाखा, जय हनुमान तरुण मंडळ प्रणित शिवनेरी ग्रुप, हनुमान गल्ली, चव्हाण गल्लीतील स्वराज्य ग्रुप, सम्राट मित्र मंडळ, त्र्यंबोली नगरातील जगदंब मित्र मंडळ, लाइन बाजारमधील छावा मित्र मंडळ, शिवप्रेमी मित्र मंडळ, संयुक्त मित्र मंडळ आदी ठिकाणी शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. लाइन बझार परिसर भगवे झेंडे, पताका, विद्युत रोषणाईने सजला होता. सायंकाळी विजय स्वतंत्र तरुण मंडळाच्यावतीने शिवप्रतिमेची मोठी शोभायात्रा काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाचगाव येथील योगेश्वर कॉलनीत बोअरवेलमधील मोटर दुरुस्ती करताना महेश तिपगोंडा पाटील (वय ३८, रा. रत्नाप्पा कुंभार नगर, पाचगाव ) यांचा विजेच्या धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २८) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आप्पासाहेब गाडीवडर यांच्या घरी घडली. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाब करवीर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, महेश पाटील हे दहा वर्षांपासून विद्युत मोटर दुरुस्तीचे काम करत होता. शुक्रवारी सकाळी ९ वाजता ते पाचगाव येथील योगेश्वर कॉलनीत राहणारे आप्पासाहेब गाडीवडर यांच्या घरातील बोअरमधील बंद पडलेली मोटार दुरुस्तीसाठी गेला होता. मोटर दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा बोअरमध्ये सोडून ट्रायल घेताना अचानक महेशला विजेचा जोरदार धक्का बसला. विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेले महेश यांना गाडीवडर यांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

महेश पाटील यांनी दहावीनंतर आयटीआयमधून विद्युत मोटार दुरुस्तीचा कोर्स केला होता. तो दुरुस्तीची कामे करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images