Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

एकसष्टीदिवशीच अपघाताने घेतला बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाढदिवसाचा उत्साह, शुभेच्छांचे फोन आणि सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव स्वीकारत संध्याकाळी घरगुती सेलिब्रेशनचा बेत प्रदीप पांडुरंग सोळंकी (वय ६१, रा. नागाळापार्क) यांनी आखला होता. नवी कपडे परिधान करून मुलांसोबत दुकानात वेळ घालवला आणि वाढदिवसाच्या तयारीसाठी नेहमीपेक्षा दुपारी लवकर घरी जाण्याची घाई केली. एकसष्टीच्या सेलिब्रेशनचा बेत आखतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. समोरून आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत ते क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि मोठ्या भावासमोरच ते गतप्राण झाले. एकसष्टीचे सेलिब्रेशन करण्याच्या तयारीत असलेल्या कुटुंबीयांना त्यांचा मृत्यूचा प्रचंड मोठा धक्का बसला.

प्रदीप सोळंकी हे सोळंकी परिवारातील नेहमी हसतखेळत राहणारे व्यक्तिमत्व. घरातील लहानग्यांसोबत लहान होणारे आणि मोठ्यांसोबत तेवढ्याच पोक्तपणाने वागणारे सोळंकी घरासह व्यावसायिक वर्तुळातही सर्वांचे लाडके. घरात तीन भावंडांमध्ये ते सर्वात लहान. तिघांचीही शितपेयाची दुकाने. प्रामाणिकपणा आणि सचोटीने त्यांनी स्वतःचा सोळंकी ब्रँड जपला आणि वाढवलाही. रोहित (२२) आणि याहित (२०) या दोन मुलांवरही त्यांनी असेच संस्कार केले, त्यामुळे भाऊसिंगजी रोडवरील त्यांच्या सोळंकी कोल्ड्रिंक हाऊसमध्ये नेहमीच वर्दळ असते. गप्पा मारण्यासाठी कोल्हापूरच्या आंदोलनांपासून ते मिसळपर्यंत आणि क्रिकेटपासून ते चित्रपटांपर्यंत कोणताच विषय त्यांना वर्ज नव्हता. वय वाढले, पण मनाने ते तरुणच होते. नेहमी टापटीप राहण्याच्या सवयीमुळे त्यांनी वयाची साठी ओलांडली यावर कुणाचा विश्वासच बसत नव्हता.

सोमवारी त्यांचा ६१ वा वाढदिवस असल्याने घरगुती सेलिब्रेशनचा बेत सुरू होता. सकाळीच आंघोळ आटोपून त्यांनी नवीन कपडे परिधान केली. मंदिरात जाऊन देवदर्शन केले. मोठा भाऊ किरण यांनीही प्रदीप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोबाइलवरून येणाऱ्या शुभेच्छा स्वीकारत सोळंकी कुटुंबीयांचा एकसष्टी सेलिब्रेशनचा प्लॅन सुरू होता. नाष्टा आटोपून दोन्ही मुलं भाऊसिंगजी रोडवरील दुकानाकडे गेली. काही वेळाने प्रदीप सोळंकी हेदेखील दुकानात गेले. दुपारपर्यंत दुकानातील कामे आटोपली. वाढदिवस असल्याने नेहमीपेक्षा थोडे लवकर घरी जाण्याची त्यांची घाई सुरू होती. सोबत मोठा भाऊ किरण हेदेखील होते. प्रदीप हे दुचाकीवरून घराकडे जाण्यासाठी निघाले.

उन्हामुळे रस्त्यावर फारशी वर्दळही नव्हती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे नवरंग अपार्टमेंटजवळ पोहोचताच समोरून आलेल्या दुचाकीचे हँडेल सोळंकी यांच्या दुचाकीला धडकले. यात सोळंकी यांची दुचाकी पडून ती रस्त्यावर घसरत काही अंतर फरफतट पुढे गेली. डोक्याला गंभीर जखम झाल्याने सोळंकी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मोठे भाऊ किरण सोळंकी यांच्यासमोरच हा प्रकार घडला. कार पार्क करून येईपर्यंत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. डोळ्यादेखत लहान भाऊ मृत्यूच्या दाढेत गेल्याचे पाहून किरण यांना धक्क बसला. प्रदीप सोळंकी यांना तातडीने नागरिकांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सोळंकी कुटुंबीयांवर दुःखाच डोंगर

अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेने सोळंकी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. काही तासांपूर्वी एकसष्टीच्या सेलिब्रेशनची तयारी सुरू होती, त्याच घरात अंत्ययात्रेची तयारी करावी लागली. आता बर्थडेचे सेलिब्रेशन कुणाचे करायचे आणि हॅप्पी बर्थ डे कुणाला म्हणायचे असा हंबरडा प्रदीप सोळंकी यांच्या मुलांनी फोडला. रात्री उशिरापर्यंत कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी नागरिकांची सोळंकी यांच्या घरी गर्दी होती.

धडक देणाऱ्या दुचाकीचा शोध सुरू

या अपघाताची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे. सोळंकी यांच्या दुचाकीला धडक देऊन पळालेल्या दुचाकीवर दोन तरुण होते, असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून धडक देऊन पळालेले दुचाकीस्वार शोधण्याचे काम शाहूपुरी पोलिसांकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीएसटीसाठी विक्रीकर कार्यालयात स्वतंत्र सेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्याची १ जुलैपासून प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विक्रीकर विभागाने विशेष जीएसटी सेल स्थापन केला आहे. मंगळवारपासून (२५ एप्रिल) विक्रीकर विभागाचे अधिकारी ठिकठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत.

विक्रीकर विभाग, केंद्रीय अबकारी विभाग आणि सीमा शुल्क विभाग हे संयुक्तपणे या कायद्याची अंमलबजावणी करणार आहेत. त्यानुसार विक्रीकर कार्यालयाने विशेष जीएसटी सेल स्थापन केला असून त्याचे पर्यवेक्षण उपआयुक्त सचिन जोशी करणार आहेत.
जीएसटीबाबतचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण सहाय्यक विक्रीकर आयुक्त नितीन बांगर देणार असून व्यापारी, उद्योजक व नागरिक यांच्यासाठी जागरुकता शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. संगणीकृत जीएसटी प्रणालीचे प्रशिक्षण १८ एप्रिल ते ५ मे या कालावधीत विक्रीकर कार्यालयात देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थी विक्रीकर विभागातील ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना संगणकीय प्रशिक्षण देणार आहेत. त्यासाठी संगणकीय प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या कार्यशाळेत ज्ञानोबा मुके, विकास पवार, अमित हसबनीस, संतोष साळुंखे, विक्रीकर अधिकारी चारुशीला काणे प्रशिक्षण देणार आहेत.

२५ ​एप्रिल रोजी गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, २६ ​एप्रिल रोजी रोटरी क्लब इचलकरंजी तसेच चेंबर्स ऑफ कॉमर्स, गडहिंग्लज शिबिर घेण्यात येणार आहे. २७ एप्रिल रोजी शिरोली मॅन्युफॅक्चरींग असोसिएशन, एम.आय.डी.सी. शिरोली येथे मार्गदर्शन केले जाणार आहे. यापुढे कोल्हापूर, जयसिंगपूर, शिरोळ, पंचतारांकित एम.आय.डी.सी., गारगोटी व चंदगड या ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जी.एस.टी.बाबत काही शंका असल्यास नितीन बांगर, सहाय्यक विक्रीकर आयुक्त आणि महाविकास यांच्याशी ०२३१-२६८९२७४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहआयुक्त विलास इंदलकर यानी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारूविक्रीने नागरिक बेजार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महामार्गाजवळ ५०० मीटर अंतरातील दारू विक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील १०२९ दुकानांना कुलूप लागले. यात शहरातील १६१ दुकानांचा समावेश आहे. दारूविक्रीची मोजकीच दुकाने आणि बिअर बार सुरू असल्याने या ठिकाणांवर तळीरामांची मोठी गर्दी होत आहे. बिअरबार फुल्ल होत असल्याने तळीरामांकडून खुल्या जागांचा वापर ओपन बार म्हणून होत आहे. काही दुकाने आणि बिअरबार भरवस्तीतही आहेत. संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत या दुकानांबाहेर वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे ट्रॅफिक जाम होते. ही अवैध दारू विक्री नागरिकांच्या मुळावर येत आहे.

पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागानेही कारवाया करण्यात हात आखडता घेतल्याने अवैध दारू विक्री आणि ओपन बारचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सुप्रिम कोर्टाने महामार्गावरील ५०० मीटर अंतरातील दारू विक्री बंद करण्याचे आदेश दिले. १ एप्रिलपासून निर्णायांची अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयाने तळीरामांची पंचायत झाली. शहरात बिअरबार, वाईन शॉप आणि देशी दारूची विक्री करणारी २१० दुकाने आहेत. यातील १६१ दुकानांना कोर्टाच्या निर्णयाचा दणका बसला. शहरात ४९ दुकाने सुरू आहेत. विशेष म्हणजे शहरातील बहुतांश मोठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील परमिटरूम बार बंद झाले आहेत. महामार्गांलगत मोक्याच्या ठिकाणी असलेली दारू दुकाने बंद असल्याने आडमार्गांवरील दुकानांत तळीरामांच्या रांगा लागत आहेत.

काही दुकाने आणि बिअरबार भरवस्तीतही आहेत. संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत या दुकानांबाहेर वाहनांची गर्दी होते. त्यामुळे ट्रॅफिक जाम होते. तळीराम अक्षरशः रांगा लावून दारू खरेदी करतात. काही ठिकाणी तर दुकानांच्या आसपासही अवैध विक्री सुरू असते. सर्वच बिअरबार फुल्ल असल्याने तळीरामांनी शहरातील ओपन स्पेस, उद्याने आणि रिंगरोडच्या फूटपाथवरही आक्रमण केले आहे. यामुळे रात्री जेवल्यानंतर पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना या ओपन बारच्या धास्तीने परतावे लागते. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही दारूच्या रिकाम्या बाटल्यांमधून वाट काढावी लागते.

दारूबंदीच्या पहिल्या आठवड्यात तर दुकानांसमोर तळीरामांची गर्दी उसळली होती. काही विक्रेत्यांनी छुपी दारूविक्री सुरू केल्याने दुकानांसमोरील गर्दी काहीशी कमी झाली. अजूनही काही विक्रेते दुकानांसमोर वाहने लावून त्यातून विक्री करतात. महामार्गांवरही रात्री काही ठिकाणी वाहनांमधून दारूविक्री सुरू आहे. या अवैध विक्रीचा नागरिकांना त्रास होतो. मात्र तक्रारी करण्यासाठी नागरिक धजावत नाहीत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शाहूपुरीतील एका विक्रेत्याने थेट दुकानाबाहेर स्टॉल मांडून विक्री सुरू ठेवली होती. याबाबत काही नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी विक्रेत्यावर कारवाई केली. मात्र याव्यतिरिक्त जिल्ह्यात एकाही ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर कारवाई केली नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवायाही जुजबी आहेत.


रिंगरोडवर ओपन बार

शहराभोवती प्रशस्त रिंगरोड आहेत. सकाळी मॉर्निंग वॉक आणि रात्रीच्या वेळी सहकुटुंब फेरफटका मारण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. महामार्गांवरील दारूबंदीनंतर मात्र रिंगरोडचे रुपांतर ओपन बारमध्ये झाले आहे. रस्त्याकडेला वाहने लावून काही टोळकी थेट फूटपाथवर बसतात, तर काही अक्षरशः रस्त्यातच बसतात. शहरातील बावडा ते शिये टोल नाका, मिलिटरी कॅन्टीन ते विद्यापीठ चौक, विद्यापीठ चौक ते सायबर चौक, सायबर चौक ते संभाजीनगर रिंगरोड, फुलेवाडी रिंगरोड हे रिंगरोड अपन बार बनले आहेत. या ठिकाणी एकदाही कारवाई झाली नाही.

एकूण दारूविक्री दुकाने – १६२६

बीअर शॉपी ६५०

परमिट रुम – ६५०

देशी दारू – २८३

वाईन शॉपी – ४३

शहरातील दुकाने – १२०

बंद दुकाने – १६१

चौकट – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाया

कारवाया – ५६

अटक – ५६

जप्त वाहने – ३

जप्त मुद्देमाल – ६ लाख ५८ हजार ६८८ रुपये


महामार्गांवरील दारूबंदीची अंमलबजावणी सुरू असून, अवैध दारूविक्री रोखण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. अवैध विक्रीवर कारवाया करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांतर्फे पोलिस अधीक्षकांना दिले आहे. शिवाय आमची सात पथके कार्यरत आहेत. गेल्या २३ दिवसांत सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

संजय पाटील – प्रभारी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

‘दुकानांचे स्थलांतर हा

सुप्रिम कोर्टाचा अवमान’

दरम्यान, महामार्गांवरील ५०० मीटर अंतरातील दुकाने स्थलांतरित करणे हा सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने (आप) केला आहे. महामार्गांवरील दारूबंदीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधीक्षक संजय पाटील यांना सोमवारी निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, महामार्गांवरील दारू दुकाने इतरत्र हलवण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. हे गैरकृत्य असून, सुप्रिम कोर्टाच्या निर्णायाचा अवमान आहे. अवैध पद्धतीने दारूविक्री सुरू असून, पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणीही या विभागाकडून होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दोनवेळा स्मरणपत्र पाठवूनही उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी संपत्तीचे विवरणपत्र सरकारकडे सादर केलेले नाही. अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा आपच्या कार्यकर्त्यानी दिला आहे. नारायण पोवार, संदीप देसाई, जयवंत पोवार, नीलेश रेडेकर, नाथाजी पवार, आप्पासो कोकीतकर, सुरेश पाटील, अभिजित भोसले यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रपतिपदाची निवडणूक बिनविरोध शक्य

$
0
0

सोलापूर - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरविले आणि विरोधी पक्षाशी सल्लामसलत केल्यास राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक बिनविरोध होऊ शकते,’ असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

विधिमंडळ आणि संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्कार समारंभासाठी शरद पवार सोमवारी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी सरकारी विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. जून महिन्यात राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होत आहे आणि त्यासाठी आपल्या नावाची चर्चा सुरू असल्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, ‘मी राष्ट्रपतिपदासाठी इच्छुक नाही. ज्या पक्षाची लोकसभा-राज्यसभेतील सदस्य संख्या फक्त १४ आहे, त्या पक्षाने राष्ट्रपतिपदाचे स्वप्न पाहणे उचित नाही. स्वतःचा राष्ट्रपती निवडून आणण्याइतके पुरेसे संख्याबळ भाजपकडे आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षासमवेत चर्चा करून समन्वय साधल्यास राष्ट्रपतिपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकते.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​एमआयएमचे तौफिक शेखवरस्थानबद्धतेची कारवाई

$
0
0



सोलापूर

सोलापुरातील एमआयएमचे शहराध्यक्ष, नगरसेवक तौफिक शेख याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सोमवारी केली. शेख याची रवानगी पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

शेख याच्याविरुद्ध १९८९पासून फेब्रुवारी २०१७पर्यंत सोलापुरातील विविध पोलिस ठाण्यात विविध कालमांतर्गत एकूण २९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही गुन्ह्यातून तो निर्दोष मुक्त झाला आहे. त्याच्याविरुद्ध दोनवेळा फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई आणि चारवेळा महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून त्याने त्याच्या साथीदारांसह एमआयडीसी, सदर बझार, विजापूर नाका, जेलरोड, सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत शस्त्रनिशी फिरून खुनाचा प्रयत्न करणे, हल्ला करणे, खंडणी मागणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, अपहरण, गैरमंडळी जमाव जमवून गैरकृत्य करणे, बेकायदा दुकान घरजागा बळकावविणे, लोकांना किरकोळ कारणावरून घातक शास्त्रनिशी मारहाण करून परिसरात दहशत निर्माण करणे आदी गुन्हे दाखल आहेत. या वरून पोलिसांनी तौफिक शेख याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. तौफिक शेख याने मागील शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात एमआयएमकडून निवडणूक लढविली होती. त्याला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्या निवडणुकीत शेख याने प्रणिती शिंदे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना नामोहरम केले होते. या शिवाय नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत तौफिक याच्या नेतृत्वाखाली एमआयएमचे ९ नगरसेवकही निवडून आले आहेत. मनपा निवडणुकीत मतदानावेळी नई जिंदगी परिसरात राष्ट्रवादीचे माजी महापौर हरून सैय्यद याला तौफिक याच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून रक्तबंबाळ केले होते, त्यावेळी त्याच्याविरुद्ध आणि त्याचा मुलगा अदनान यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवस तौफिक फरार होता. मात्र पोलिस आयुक्त सेनगावकार यांनी अखेर तौफिकवर स्थाबद्धतेची कारवाई केली. तौफिक हा एकेकाळी सुशीलकुमार आणि कन्या आमदार प्रणिती यांचा कट्टर समर्थक होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात काँग्रेस किंगमेकर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आज, मंगळवारी दुपारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असून, दोन्ही पदे आणि सत्ता मिळविण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी आणि भाजप आघाडीने ताकद पणाला लावली आहे. भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. भाजपने आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. तर राष्ट्रवादीकडून शितलदेवी आणि स्वरूपराणी मोहिते-पाटील यांची नावे चर्चेत आहेत. खासदार विजयसिह मोहिते-पाटील आणि माजी खासदार रणजितसिह मोहिते-पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. २३ जागा जिंकून राष्ट्रवादी पक्ष सर्वात मोठा पक्ष बनला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाचीच मदत घ्यावी लागणार आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीने २३, भाजप-शिवसेना आघाडी २२, काँग्रेस ७, स्थानिक आघाडी १०, शेकाप ३ आणि अपक्षांनी ३ जागा जिंकल्या आहेत. ६८ सदस्य संख्या असलेल्या झेडपीमध्ये सत्ता स्थापन कारण्यासाठी ३५ जागांची जुळवाजुळव करण्यासाठी खासदार विजयसिह मोहिते-पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी २३, काँग्रेस ७, शेकाप ३ आणि अपक्ष किवा स्थानिक विकास आघाडीतील काहींना बरोबर घेऊन राष्ट्रवादी सत्ता स्थापन करू शकते, असे चित्र असतानाच भाजपने झेडपी ताब्यात घेण्यासाठी संजय शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. मोहिते-पाटील विरोधक आणि विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, मंगळवेढाचे समाधान आवताडे यांनीही भाजप पुरस्कृत महाआघाडीचे संजय शिंदे यांना मदत करण्याची तयारी दर्शविली असल्याने यामध्ये त्यांना कितपत यश येते याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादीचे २३ सदस्य निवडून आले आहेत, त्यामध्ये तब्बल ८ सदस्य एकट्या माळशिरस म्हणजेच मोहिते-पाटील यांच्या तालुक्यातील आहेत. अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या गटाचे म्हणजेच काँग्रेसचे सहाजण आणि आणखी एक असे सातजण ज्या पक्षाबरोबर जातात त्या पक्षाची सत्ता झेडपीत येणार आहे. त्यामुळे आमदार म्हेत्रे हे सत्तेचे किंगमेकर ठरू शकतात. आघाडी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. शरद पवार यांनी लक्ष घातल्यास आणि शिंदे यांना बोलल्यास आघाडीचा अध्यक्ष होऊ शकतो, असे चित्र आज दिसून येत आहे. राष्ट्रवादी २३, काँग्रेस ७, शिवसेना ४, शेकाप ३ असे ३७ संख्याबळाची जुळवाजुळव राष्ट्रवादी आघाडीने केली आहे. तर भाजप १४, परिचारक गट ६, भीमा परिवार ३, आवताडे गट ४, अपक्ष २, शिवसेना १ अशी ३१ जणांची जुळवाजुळव भाजप आघाडीने केली आहे. सत्तेसाठी जवळपास सहा जागा कमी पडत असतानासुद्धा माढामधील ७ सदस्य यांना गैरहजर ठेऊन भाजप आघाडीने चमत्कार घडविण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच शेकाप आणि काँग्रेस तटस्थ राहिल्यास भाजपाला विजय आणखी सोपा करण्यासाठीसुद्धा प्रयत्न सुरु असल्याने राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. एकूणच सत्तेसाठीचा मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांनीही आपली ताकद पणाला लावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सैराट'मधील आर्चीची छेड काढणारा ताब्यात

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । अकलूज (सोलापूर)

'सैराट'फेम आर्ची अर्थात, रिंकू राजगुरू हिची छेड काढल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अकलूज पोलिसांनी ही कारवाई केली असून संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय घरत असं या तरुणाचं नाव असून तो ठाण्याचा रहिवाशी असल्याचं समजतं.

मराठी सिनेसृष्टीत अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या 'सैराट' चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू अल्पावधीतच स्टार झाली आहे. तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तिला भेटण्यासाठी तरुण गर्दी करत आहेत. यापूर्वीही अनेकदा तिला धक्काबुक्की झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी एका तरुणानं तिची छेड काढल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशी करून दत्ता घरत याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सेना आमदार पाटीलविरोधात पोलिसात तक्रार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

‘शेतीच्या वादातून पोलिसात दाखल केलेली तक्रार माघार घे, नाहीतर तुला उलट टांगून मारीन,’ अशी धमकी दिल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्याविरोधात एका शेतकऱ्याने केला आहे. आमदार पाटील यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे, असा तक्रार अर्जही शेतकरी रोहिदास राजाराम कांबळे यांनी पोलिस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांच्याकडे केला आहे. नारायण पाटील करमाळ्याचे आमदार आहेत.

रोहिदास कांबळे यांची करमाळा तालुक्यात मौजे शेटफळ येथे शेतजमीन आहे. या शेतातील पाइपलाइन सचिन नरोटे यांनी फोडली. या विरोधात कांबळे यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तो गुन्हा माघार घ्यावा म्हणून नरोटे कांबळेंना धमकावत होता. या प्रकरणी शिवसेना आमदार नारायण पाटील यांनीही मोबाइलवरून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रार अर्ज शेतकरी कांबळेंनी दाखल केला आहे. आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कांबळे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ दहा एकर तुर जाळून टाकली

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

तुरीचे भाव पडल्यामुळे काढणी, मळणी आणि आडतीचा खर्चही निघत नसल्यामुळे अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांने तुरीच्या दहा एकर उभ्या पिकाला आग लावून तूर जाळून टाकली. ही दुर्दैवी बासलेगाव (ता. अक्कलकोट) येथे रविवारी घडली.

अक्कलकोट तालुक्‍यातील प्रयोगशील शेतकरी शशिकांत बिराजदार यांनी काढणी, मळणी, अडतीचा खर्च आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळ-मेळ बसत नसल्यामुळे पिकाची काढणी न करता उभे पीक जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. वर्षभर ज्या शेतीची निगा राखली तीच शेती पेटवण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यावर आली.

शशिकांत बिराजदार सधन शेतकरी आहेत. अक्कलकोट तालुक्‍यातल्या बासलेगावच्या पंचक्रोशीत ते प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. दर वर्षी साधारण १५० ते २०० क्विंटल तूर उत्पादन ते घेतात. यंदा ही त्यांनी आपल्या शेतात २६ एकर तूर पेरली होती. त्यापैकी १६ एकराची रास करून उत्पादनही घेतले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी विक्रीला पाठवली. परंतु, अजूनपर्यंत तूर विकली गेली नाही. ३५०० ते ४२००पर्यंत त्यांच्या तुरीला मागणी होती. परंतु सरकारने ५१०० रुपये हमी दराने विकत घ्यायचे धोरण जाहीर केल्यामुळे त्यांनी तुरीची विक्री केली नाही. काढणीपासून विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेत होणारा खर्च याचा कुठेच ताळमेळ लागणार नाही याचा अंदाज आल्याने दहा एकराच्या तूर शेतीला त्यांनी आग लावली. यंदा केलेली तूर शेती त्यांच्या अंगलट आली आहे.

गेल्यावेळी मिळालेला तुरीचा चांगला भाव पाहून त्यांनी तूर लावली. पण हळूहळू तुरीचे दर कोसळत गेले त्यामुळे बिराजदार यांनी किमान पुढील पिकासाठी शेत तरी मोकळे होईल म्हणून उभे पीक जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. अक्कलकोट तालुक्‍यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगलेच नुकसान सहन करावे लागले आहे. हमीभाव देण्याच्या आणि तूर विकत घेण्याच्या सरकारी यंत्रणेवर आता शेतकऱ्यांचा विश्‍वास उडाल्याचेच या घटनेतून समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनी काठावर गाळपेरणी सुरू

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

उजनी जलाशयातील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. जलाशयातील पाण्याने व्यापलेल्या जमिनी आता उघड्या पडल्या असल्याने या जमिनीवर उन्हाळी पिके घेण्याची बळीराजांची लगबग सुरू झाली आहे. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोंढार चिंचोलीसह परिसरात असे चित्र दिसून येत आहे.

उजनी जलाशयामुळे लाखो सजीवांची पाण्याची गरज भागविली जात असतानाच जलाशयातील पाण्याच्या आधारावर हजारो शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. दरम्यान, जलाशयातील पाणी कमी फायद्या शेतकऱ्यांना होते आहे, पाणी घटत असताना उघड्या पडणाऱ्या जमिनीवर शेतकरी उन्हाळी पिकांचे उत्पादन घेतात. यंदाही सद्यस्थितीत उजनी काठावर अशा गाळपेरण्या सुरू आहेत. या पेरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या जमिनींची हलकीशी मशागत करताना शेतकरी दिसून येत असून या भागात आता कडवळ, मका, कांदा, भुईमुग, मुग, बाजरी या पिकांची पेरणी होणार आहे.
कसदार जमिनी ठरतायत फायदेशीर

उन्हाळ्यात जलाशयाच्या पाण्याबाहेर पडणाऱ्या या जमिनीत गाळाचे प्रमाण जास्त असल्याने त्या कसदार असतात. या शिवाय जलाशयाकाठच्या या जमिनीत ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने पाण्याची गरज नसते. एकदा पेरणी झाली की खत, पाण्याविना पिके बहारदार येतात. एकूणच अल्प कष्ट व खर्चात चांगले उत्पन्न मिळते. कोंढारचिंचोली, पारेवाडी, उमरड, पोमलवाडी, जिंती, टाकळी, कात्रजसह परिसरातील शेतकऱ्यांना असा अनुभव आहे.

वेगाने पाण्यात घट

यंदा उजनी ११० टक्के भरले होते. मात्र, सद्यस्थितीत पाण्याची घट वेगाने होऊ लागली आहे. मुख्यतः धरणातून खाली सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जलाशयातील पाणीसाठा पोटाच्या दिशेने खाली सरकत आहे. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनात वाढ होत आहे, अशा स्थितीत जलाशयाने व्यापलेला जमिनीचा भाग उघडा पडण्याचा वेग आता वाढणार आहे. जमिनी उघड्या पडल्या की त्या ठिकाणी गाळपेरणी करण्याची लगबगही वाढणार आहे.
उजनीच्या पाण्याच्या नियोजनाची मागणी

उजनी जलाशयाने शंभरी ओलांडली तरी उन्हाळ्यात जलाशयाची पाणीपातळी वजा होऊन पाण्याची अडचण निर्माण होते. शेती पंपांची वीज कपात केली जाते. परिणामी धरणासाठी त्याग करणाऱ्या शेतकऱ्यांना पिके जगविणे अवघड होते, अशी स्थिती दर वर्षी आढळून येते. यंदा पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणेच वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंपदा मंत्री महाजन यांचीप्रतीकात्मक अंत्ययात्रा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी मागील पाच दिवसांपासून मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोरड्या उपोषणास सुरुवात केली आहे. सरकारी स्तरावर अद्याप आंदोलनाची दखल न घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून अंत्यविधी केला.

मागील सतरा वर्षांपूर्वी युती सरकारच्या काळात येथील १४ गावांच्या शेतकऱ्यासाठी आष्टी उपसा सिंचन योजना मंजूर झाली. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गमावल्या मात्र, त्यांना मोबादला मिळाला ना पाणी. आजही येथील शेतकरी पाण्यावाचून वंचित आहेत. शेतीला पाणी मिळेल याकडे या आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची एक पिढी संपली आहे. सरकार अद्यापही चाल ढकल करीत असल्यामुळे सरकारला जाग अणण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मागील पाच दिवसांपासून ३० फूट खोल खड्यात बेमुदत आंदोलन सुरू आहे. यात आतापर्यंत प्रकृती खालावल्याने पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, सरकारी स्तरावर आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने शुक्रवारी जलसंपदा मंत्र्यांची यांची प्रेतयात्रा काढून अंत्यविधी करण्यात आला. सरकारने आताही दखल न घेतल्यास मंत्री महोदयाना खरोखरच कॅनॉलमध्ये गाढू, असा इशारा या वेळी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सहाय्यक आयुक्तांच्याकार्यालयाची झाडाझडती

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाकडील कर्मचारी संजय होटकर यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले सहायक आयुक्त अभिजित हराळे यांच्या कार्यालयाची शुक्रवारी दुपारी सोलापूर पोलिसांनी झाडाझडती घेतली. मात्र, त्याना कोणतीही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली नाहीत.

संजय होटकर मनपाची वादग्रस्त ठरलेली कचरा टेंडरची फाइल सांभाळत होते. या पूर्वी बेकायदा काम करण्यासाठी दबाव टाकला म्हणून दोन नगरसेवकांच्या त्रासाला कंटाळून होटकर यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर काही दिवसांतच म्हणजेच गुरुवारी त्यानी होटगी रस्ता परिसरात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या चिट्टीमध्ये सहायक आयुक्त हराळे यांच्यासह राजू सावंत, ए. के. आराधे यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. संबधितांनी भ्रष्टाचार केला असून, त्याची चौकशी करावी, असेही चिठीत लिहिले होते. त्यानंतर पोलिसांनी हराळे, सावंत आणि आराधे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पोलिसांनी होटकर यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेले हराळे तसेच अन्य दोघांची चौकशी करण्यासाठी महापालिका गाठली. हराळे यांच्या कार्यालयात जाऊन झाडाझडती घेतली मात्र. पोलिसांच्या हाताला काहीही लागले नाही. परंतु आत्महत्येचे नेमके कारण कचरा टेंडरची फाइल होती की, आणखी काय याची चौकशी सदर बाजार पोलिस करीत आहेत. अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खराब चेसीमुळे८७ बसची नोंदणी रद्दसोलापूर मनपाच्या बसेसवर आरटोओची कारवाई

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू शहरी विकास योजनेंतर्गत (जेएनएनयूआरएम) सोलापूर महानगरपालिकेला अशोक लेलेंड कंपनीमार्फत शंभर बसेसची चेसी पुरविण्यात आल्या होत्या. १०० पैकी तब्बल ८७ बसेसची चेसी खराब असल्याचे पुराव्यानिशी आढळून आले आहे. सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने या सर्व ८७ बसेसची नोंदणी रद्द केली आहे. आरटीओ बजरंग खरमाटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या बाबतची माहिती दिली. या कारवाईमुळे अशोक लेलेंड कंपनीला जबरदस्त दणका बसला आहे.

तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आपल्या प्रयत्नातून महापालिका परिवहन उपक्रमासाठी २०० बसेसची मागणी केली होती. त्यापैकी १९० बसेस मंजूरही करण्यात आल्या होत्या. त्यासाठी सरकार आणि मनपा यांचा हिस्सा भरण्याचे ठरले होते. त्यानुसार मनपाच्या ताफ्यात पहिल्या टप्यात शंभर बसेस आल्या. त्यांची नोंदणी करून त्या सर्व एसी आणि नॉन एसी बसेस रस्त्यावर धावत होत्या. परंतु २०१५ सालात तत्कालीन विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांनी अशोक लेलेंड कंपनीने पुरविलेल्या या बसेसची चेसी खराब असल्याची तक्रार सोलापूरचे आरटीओ बजरंग खरमाटे यांच्याकडे केली होती. त्यानुसार परिवहन अधिकाऱ्यांनी पहिल्या टप्यात ४७ बसेसची पाहणी आणि नंतर उर्वरित बसेसची पाहणी केली असता या सर्व ८७ बसेसची चेसी खराब असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार आरटीओने महापालिकेला या बसेस बंद ठेवण्यास सांगितले.

दरम्यान, मनपाने बस पुरविणाऱ्या कंपनीला खराब बसेसची चेसी बदलून देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. शिवाय पालकमंत्री विजयकुमार देशमुख, परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यासमवेत मुंबईत बैठकही घेण्यात आली होती, तेव्हाही कंपनीने चेसी बदलून देण्यास नकार दिला होता. त्यामुळे आरटीओने आपली कारवाई सुरू केली. बस पुरविणारी कंपनी कोणत्याच हालचाली करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मनपाने आपल्या वाट्याची सुमारे २४ कोटींची रक्कम अडवून ठेवली आहे. साठ कोटींपैकी ३४ कोटी रक्कम कंपनीला देण्यात आली आहे.

...........

चेसी खराब असल्याचा अहवाल

बसेसची चेसी खराब असल्याबाबत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट, पुणे आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे यांच्याकडूनही अहवाल आल्यानंतर सोलापूर आरटीओने बसेसची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र तत्काळ मनपा आयुक्तांना पाठवून देण्यात आले. गाड्यांची नोंदणी करताना आरटीओने दिलेले आरसी बुक, योग्यता प्रमाणपत्र, टॅक्स भरलेली कागदपत्रे तातडीने आरटीओ कार्यालयाकडे सादर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आरटीओ खरमाटे यांनी या वेळी बोलताना दिली.

सोमपासाठी मंजूर झालेल्या सुमारे १५६ कोटी खर्चाच्या १९० बसेसपैकी काही बसेस २०१४ सालापासून खरेदी करण्यास सुरुवात झाली. प्रथम सुमारे ६० कोटी रक्कम असलेल्या १०० बसेस खरेदी करण्यात आल्या. त्यामधील एक बस जळाली आहे. उर्वरित ९९ पैकी ८७ बसेसची नोंदणी आरटीओने रद्द केल्यामुळे आता या बसेस रस्त्यावर कधीच धावू शकणार नाहीत. उर्वरित १२ बसेस चांगल्या आहेत, भविष्यात जर त्यामध्येही काही त्रुटी निर्माण झाल्यास त्या बसेसवरही कारवाई करू, असा इशाराही आरटीओ खरमाटे यांनी दिला आहे.

अपिलासाठी ३० दिवसांची मुदत

आमच्या निर्णयाविरोधात मनपा किंवा कंपनीला अपील करायचे असेल तर त्यासाठी तीस दिवसांची मुदत आहे. अपील थेट परिवहन आयुक्तांकडे करावयाचे आहे. चेसी खराब असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याने कंपनी अपील करण्याचे धाडस कितपत दाखवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मोटार वाहन कायदा कलम ५५ (३) आणि ५५ (५), अन्वये आरटीओने बसेसची नोंदणी रद्द केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सातारा झेडपीचेअध्यक्ष संजीवराजे?

$
0
0



सातारा

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेची रंगीत तालिम सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडले. दोन तासांच्या राजकीय खलबतानंतर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले. उपाध्यक्ष निवडीसाठी पाटण तालुक्यातून माजी आमदार विक्रमसिह पाटणकर यांचे समर्थक राजेंद्र पवार व खटाव तालुक्यातून सुरेंद्र गुदगे यांच्या प्रत्येकी सव्वा वर्षे मुदत देण्याच्या चर्चा रंगल्या. या निवडी जवळपास निश्चित असून मंगळवारी प्रत्यक्ष सभेपूर्वी शरद पवार यांच्याकडून निवड जाहीर करणारा दूरध्वनी केला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार उदयनराजेंवर मारहाण, खंडणीचा गुन्हा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील संघर्षातून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन गटांतील संघर्ष पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे.

सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराजवळ सोना अलाईज कंपनीत उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणारी एक माथाडी कामगार संघटना आहे, तर दुसऱ्या संघटनेचे नेतृत्व रामराजे निंबाळकर हे करतात. कंपनी रामराजेंच्या संघटनेला झुकतं माप देते तसेच त्यांना अधिक काम देते, असा उदयनराजे यांचा आरोप होता. त्यामुळे १८ फेब्रुवारीला त्यांनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घेतले होते.

सातारा विश्रामगृहात आल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकुमार जैन यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडे असलेला ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनराजे यांचे समर्थक अशोक सावंत, रणजीत माने, सुकुमार रासकर, धनाजी धायगुडे, राजकुमार गायकवाड, अविनाश सोनवले, ज्ञानेश्वर कांबळे आणि योगेश बांदल अशा ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अफजलखानाच्या कबरीभोवतीच्या१९ अवैध खोल्या पाडण्याचे आदेश

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

किल्ले प्रतापगड येथील अफझलखानाच्या कबरीभोवती वन खात्याच्या भूमीवर बेकायदा बांधण्यात आलेल्या १९ खोल्यांचे बांधकाम काढून टाकण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३० मार्च रोजी वनखाते आणि सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाला दिला आहे.

विधानभवनातील सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात दुपारी तीन वाजता श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुनगंटीवार यांची भेट घेतली. चर्चेनंतर त्यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा आदेश दिला.

या बैठकीला वन विभागाचे सचिव खारगे, मुख्य वनसंरक्षक पाटील, विभागीय वनअधिकारी अंजनकर, श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि सांगलीचे माजी आमदार आणि मनसेचे नेते नितीन शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे प्रितिनिधी उपस्थित होते.

अफझलखान कबर परिसरातील वनखात्याच्या भूमीवर केलेले बेकायदा बांधकाम त्वरित हटवण्यात यावे, असा आदेश मुंबई हायकोर्टाने सरकारला दोन वेळा दिला आहे. तरीही सरकारने बांधकामे हटविली नाहीत. या पूर्वीच्या सरकारने या विषयी काहीच कृती केलेली नाही. सरकारने संबधित बांधकामे हटवावीत, अशी मागणी नितीन शिंदे यांनी मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्यांना अवैध बांधकामांची छायाचित्रेही दाखवली.

मुनगंटीवार म्हणाले, ‘वन खात्याच्या जमिनीवरील बेकायदा १९ खोल्यांचे बांधकाम हटवण्यात येईल; मात्र वनखात्याची जमीन सोडून अन्य ठिकाणी असलेले बांधकाम आम्हाला पाडता येणार नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वर बंदला प्रतिसाद

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

जंगलात चोरून सुरू असलेल्या गोहत्येच्या निषेधार्थ तालुक्यातील ११० गावांनी पुकारलेल्या तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाबळेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलिसांच्या असमाधानकारक तपासाच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. तेथेच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले

गोहत्या व धोंडीबा आखाडे यांच्या खुनाचा तपास सीआयडी मार्फत करण्याची मागणी तहसीलदार रमेश शेंडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली

गोहत्या बंदी असतानाही महाबळेश्वर तालुक्याच्या ग्रामीण भागात जंगलात गोहत्या केली जात आहे. तसेच देवळी गावातील वृद्ध शेतकरी धोंडीबा आखाडे यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त करून या दोन्ही घटनांचा परस्पर संबधित आहेत. मात्र, पोलिस या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासात दिरंगाई करीत आहेत. २५ दिवसांत पोलिस काहीच प्रगती करू शकले नाहीत, त्यामुळे तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांच्या अशा कामगिरीच्या निषेधार्थ तालुक्यातील ११० गावातील जनतेने आज तालुका बंदची हाक दिली होती. या बंदला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी महाबळेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. महाबळेश्वर बंद ठेवून तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने येथीय छ. शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. तेथे छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून मार्चाला प्रारंभ करण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्ष संतोष आखाडे, गणेश उतेकर आदींनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात पाऊस

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा

पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाने अंगाची लाही लाही होत होती. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अखेर रात्री सात वाजण्याच्या सुमारास सातारा शहरासह परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच उन्हाची चाहूल जाणवू लागली होती. त्यात मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तर उन्हाने अंगाची लाहीलाही होत होती. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर वगळता सर्वत्र पारा ४० अंशावर गेला होता. मात्र, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता अचानक ढगाळ वातावरण झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने गवत, काडी, लाकुड फाटा झाकून ठेवण्याची धांदल उडाली. रात्री सातच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि पावसाने सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. शाहुपुरी अंजली कॉलनी येथे जोरदार वाऱ्याने वडाचे झाड कोसळले. वीजवाहक तारा तुटल्याने शाहुपुरी करंजे सदर बझार बोगदा-पोवई नाका तसेच प्रतापगंज पेठ येथे सुमारे पाऊण तास वीज गायब झाली होती. संध्याकाळच्या वळीवाने वातावरणात काहीकाळ गारवा निर्माण झाला मात्र, पुन्हा अंगाची काहिली सातारकरांना सहन करावी लागली.

औंध परिसरात पावसाचा शिडकावा

शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास औंध परिसरात वादळी वारे, मेघगर्जनेसह काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

औंधच्या उत्तरेकडील जायगाव येथे सुमारे वीस मिनिटे पाऊस पडला. भोसरे, चौकीचा आंबा, वरूड, औंध व अन्य भागात पावसाचा काही प्रमाणात शिडकावा झाला. आकाश काळवंडून आल्याने जोरदार पाऊस होईल व हवेत गारवा निर्माण होईल, अशी आशा नागरिक, शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे पावसाने हुलकावणी दिली. रात्री उशीरा हवेत पुन्हा कमालीचा उष्मा निर्माण झाला होता, तसेच ढगाळ वातावरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ डॉ. अशोक चौसाळकरांनामहर्षी शिंदे पुरस्कार जाहीर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा २१वा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांना जाहीर झाला आहे. १९८० नंतरच्या काळात मराठी भाषेतील वैचारिक साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका डॉ. चौसाळकर यांनी बजावली आहे. प्रतिष्ठानचे ज्येष्ठ विश्वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते, दलितमित्र संभाजीराव पाटणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या पुरस्काराचे वितरण रा. ना. चव्हाण यांच्या २४व्या स्मृतिदिनी, दहा एप्रिल रोजी ब्राह्म समाज रविवार पेठ, वाई येथे सकाळी साडेनऊ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

दलितमित्र रा. ना. चव्हाण यांनी ज्यांच्या प्रेरणेने आपले प्रबोधनपर साहित्य समृद्ध व समर्थ केले त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात, संशोधन क्षेत्रात व साहित्यिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दर वर्षी सन्मानपूर्वक दिला जातो. स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

समाजप्रबोधन पत्रिकेचे संपादक असलेले प्रा. डॉ. अशोक चौसाळकर राज्यशास्त्राचे नामवंत प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जातात. शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. एक निष्णात राजकीय, सामाजिक विश्लेषक म्हणून ते सतत सक्रिय राहिले असून, त्यांनी संशोधनाच्या व वैचारिक लेखनाच्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून विपुल, अशी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली आहे. १९व्या शतकातील सामाजिक आणि धर्मविचार हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वर@ अशांवर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

यंदाच्या उन्हाळ्यात महाबळेश्वर मुंबईपेक्षा जास्त उष्ण आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत महाबळेश्वरमधील तापमान आयएमडीने मुंबईत नोंदवलेल्या तापमानापेक्षा जास्त आहे. मुंबईतील कुलाबा आणि सांताक्रुझ वेधशाळेने तापमानाची नोंद केली आहे. मुंबईच्या किनारी भागापेक्षा महाबळेश्वरमधील पारा हा सामान्यतः कमी असतो.

महाबळेश्वरमध्ये बुधवारी, बारा एप्रिल रोजी ३५.२ अंश सेल्सिअस तापमान होते, तर मुंबईत ३४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारी, महाबळेश्वरमध्ये तेरा एप्रिल रोजी ३५.९ अंश सेल्सिअस तापमान होते, तर मुंबईचा पारा ३४.८ अंश सेल्सिअसवर होता. गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये प्रत्यावर्त (अँटीसायक्लोन) मध्ये असलेल्या ईशान्येकडील उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे महाबळेश्वरमधील तापमान वाढल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पूर्वेकडील वारे ईशान्ये वाऱ्यात मिसळले आहेत. येत्या आठवड्यात हे वारे पुढे सरकल्यानंतर पुन्हा तापमान खालावेल, अशी माहिती आयएमडीने दिली आहे.

सौराष्ट्र आणि कच्छमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईत तापमान ३५ अंशाच्या आसपास आहे. येत्या काही दिवसांत पारा दोन अंशांनी वाढण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images