Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

केशवराव भोसले नाट्यगृह जागतिक पुरस्काराने सन्मानित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदान या प्रकल्पाला जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या इटलीमधील ए डिझाइन अॅवॉर्ड अँड स्पर्धेमधील ‘ए डिझाइन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नाट्यगृहाच्या नुतनीकरण प्रकल्पाला येथील आर्किटेक्ट सुरत अंजली असोसिएशनला कल्चरल हेरिटेज आणि कल्चरल इंडस्ट्रियल डिझाइन या विभागात हा पुरस्कार मिळाला आहे. या रुपाने शहरातील वास्तूशिल्पाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रथमच पुरस्कार मिळाला आहे.

हा पुरस्कार जागतिक स्तरावर चांगल्या डिझाइनची जागरुकता व समज निर्माण करण्यासाठी दिला जात आहे. डिझायनर्स, ब्रँड, कंपन्यांना उत्कृष्ट व उच्च प्रतीचे काम आणि प्रकल्प तयार करण्यास उत्तेजन देणे हे या पुरस्कारामागील ध्येय आहे.

महापालिकेच्या अखत्यारित असलेले केशवराव भोसले नाट्यगृह पूर्वी पॅलेस थिएटर म्हणून ओळखले जात होते. राज्यातील एक प्रसिद्ध नाट्यगृह म्हणून ओळख होती. या नाट्यगृहाचे दोनदा नुतनीकरण झाले होते. त्यानंतर वेळोवेळी केलेल्या बदलांमुळे मूळ स्वरुप लोप पावले होते. त्यामुळे २०१३ मध्ये नाट्यगृहाचे मूळ रुप जपत नुतनीकरण करण्याचे महापालिकेच्यावतीने ठरवण्यात आले होते. त्यानुसार मार्च २०१३ ते एप्रिल २०१५ या कालावधीत नुतनीकरण करण्यात आले. त्यासाठी आर्किटेक्ट जाधव यांनी आराखडा तयार केला. यामध्ये यापूर्वी केलेल्या नुतनीकरणातील खटकणाऱ्या अनेक गोष्टी दूर करत ऐतिहासिक बाज जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी नाट्यगृहाच्या दगडी इमारतीचा वापर व्यवस्थित करुन लाकडी कामामुळे जुना लूक कायम ठेवण्यात यशस्वी झाले.

नाट्यगृह व मैदान या सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूचे जतन व संवर्धन करताना गतवैभव प्राप्त करुन दिले आहे. लाइट अँड साउंड, अॅकॉस्टिक्स, वातानुकुलीत यंत्रणा, अद्ययावत स्टेज या नवीन तंत्रज्ञानाचा अतिशय कुशलनेते वापर करण्यात आला आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यामध्ये सुचवलेले उपाय स्वीकारून हा परिसर पुढील शंभर वर्षांसाठी मजबूत व सुधारित करण्यात आला आहे. या प्रकल्पाला फेब्रुवारी २०१७ मध्ये आय. आय. आय. डी. या संस्थेचा पब्लिक स्पेसेस या वर्गवारीमध्ये नॅशनल अॅवॉर्ड देण्यात आले आहे. या स्पर्धेची ज्युरी दिल्ली येथे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकार आरएसएसच्या तालावर नाचते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय जनता पक्षाचे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालावर नाचणारे आहे. शेतकरी, गरीब, दलितांचा विश्वासघात करणारे सरकार असून भांडवलदारांचे हित जोपासणारे आहे. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफीसाठी पश्चिम महाराष्ट्रात येत असलेल्या संघर्ष यात्रेत लाखो शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

प्रा. कवाडे म्हणाले, ‘राज्यातील ८१ हजार शेतकऱ्यांची ३० हजार, ५०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. सरकार सहजपणे संपूर्ण कर्जमाफी करू शकते. मात्र सरकार केवळ नऊ औद्योगिक घराण्यांवर सवलत जाहीर करत आहे. काहींनी साडेआठ लाख कोटी रुपये कर्ज घेतले. त्यांनी घेतलेले कर्ज बुडविले आणि सरकराने माफही केले. मात्र राज्यात ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र सत्ताधारी संवेदनाशून्य आहेत. अर्थसंकल्पातही सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. भाजप विरोधात असताना कर्जमाफीसाठी आग्रही होते. निवडणुकीत जाहिरनाम्यात शेतकऱ्यांचा कैवार घेतला जात होता. मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सत्ताधारी कर्जबुडव्यांना पाठिंबा देणारे आहे. समृद्धी महामार्गांसाठी ४६ हजार कोटी, बुलेट ट्रेनसाठी एक लाख कोटी रुपये दिले जाते. शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीसाठी रस्त्यावर येण्याची वेळ आणली आहे. मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी सरकारन चालढकल करीत आहे. मुस्लिमांना पाच टक्के शैक्षणिक आरक्षण देण्याचा निर्णय झाला. मात्र त्याचा अध्यादेश काढला जात नाही. केंद्रीय अनुसूचित आयोगाच्या अध्यक्षांनी देशात दलितांच्यावर अत्याचाराचे प्रमाण ४४ टक्क्यांनी वाढल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर सिटी ही क्राइम सिटी बनली आहे. अॅट्रॉसिटी दाखल करण्यांनाच पोलिस वेगळ्या गुन्ह्यात अडकवित आहेत, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष डी. जी. भास्कर उपस्थित होते.


सनातनवर बंदी घालाच

यावेळी कवाडे यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली. ते म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचे मारेकरी अद्याप सापडत नाहीत. राज्य सरकारच्या विचारधारेची जुळणारे आरोपी असल्याने अटक केली जात नाही. सनातन संस्थेने गोवा, ठाणे, परभणीसह अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट केले आहेत. त्याच्या काही कार्यकर्त्यांच्यावर गुन्हेही दाखल आहेत. दाभोलकर यांच्या हत्येनंतर सनातन संस्थेने आनंदोत्सव साजरा केला. ही संस्था समाज विघातक असूनही सरकारने बंदी घातलेली नाही, याचे गौडबंगाल जनतेला माहिती आहे. राज्य सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबाव आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येलाही वेगळे रुप दिले जात आहे. त्यांची हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचे सकृतदर्शनी दाखविण्यात आले. मात्र त्यांच्या खूनाचा तपास सीबीआयकडून करावा. खरे सत्य आपोआपच उघड होईल. दरम्यान रेल्वेस्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेली वास्तूचे स्मारक म्हणून जतन करावे. अन्यथा येत्या राजर्षी शाहू जयंतीला पक्षातर्फे भूमिपूजन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बानगेतील वाळू उपशानेपिण्याचे पाणी गढूळ

$
0
0

कागल

कागल तालुक्यातील बानगे येथे वेदगंगा नदीवर यांत्रिक बोटीच्या सहाय्याने होत असलेल्या वाळू उपशामुळे नदीतील पाणी गढूळ झाले आहे. अशा गढूळ व दुषित पाण्याचा पुरवठा ग्रामस्थांना गेली दोन महिन्यापासून होत आहे. बानगे, कुरुकली, सोनगे, बस्तवडे, आणूर व म्हाकवे या सहा गावातील सुमारे चाळीस हजार नागरिकांचे आरोग्य या दुषित पाण्यामुळे धोक्यात आले आहे. या गावांना नदीतून थेट पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने गढूळ पाणीच ग्रामस्थांना प्यावे लागत आहे.

गेली दोन ते अडीच महिन्यापासून हा वाळू उपसा राजरोज सुरु आहे. सुरवातीच्या काळात विनापरवाना वाळू उपसा सुरु होता. यावेळी प्रांताधिकारी मनीषा कुंभार यांनी या वाळू उपशावर धाड टाकून अड्डा उध्वस्त केला होता. तसेच वाहनेही जप्त केली होती. तलाठी, सर्कल व तहसिलदारांच्या आशिर्वादानेच सुरवातीच्या काळात हा वाळू उपसा सुरु होता. सध्या वाळू उपसा परवाना घेतला असला तरी परवान्यानुसार ज्या हद्दीत वाळू उपसा केला पाहिजे त्यापेक्षा अधिक हद्दीत नियमबाह्य वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ होत आहे. या वाळू उपशामुळे सरकारी पाणंद रस्ते खराब झाले आहेत, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

बानगे, सोनगे, कुरुकली बस्तवडे, म्हाकवे या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी नदीकाठालाला जॅकवेल आहेत. परंतु जॉकवेलमध्ये नदीतील थेट पाणी मिसळते. त्यामुळे गढूळ पाण्याचा पुरवठा या गावांना होत आहे. अक्षरशः पावसाळ्यापेक्षाही जास्त गढूळ पाणी ग्रामस्थांना मिळत आहे. जनावरेसुध्दा हे पिताना धजत नाहीत. त्यामुळे हा वाळू उपसा बंद करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. जादा वाळू काढण्याच्या हेतूने पाइपच्या सहाय्याने नदीत जादा अंतरावरून वाळू खेचली जात आहे. यामुळे नदीच्या कडाही ढासळत आहेत. यामुळेही गढूळ पाण्याची तीव्रता वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमावादाला जोडणार सांस्कृतिक पूल

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMt

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सीमावादामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ‌थांबलेला संवाद अ​खिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पुढाकाराने सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या निमित्ताने जोडण्याचे संकेत आहेत. सिनेमानिर्मितीची मोठी उलाढाल असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील चित्रपट संस्कृतीचा विस्तार करण्यासाठी महामंडळाने आश्वासक पाऊल टाकले आहे.

महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, रवींद्र गावडे आणि अश्विन सावनूर यांनी कर्नाटक फिल्म असोसिएशनचे अध्यक्ष एस. व्ही. राजेंद्रसिंग आणि निखिल मांजू यांची भेट घेऊन यासंबंधी चर्चा केली. चर्चेत महाराष्ट्रातील निर्मात्यांनी कर्नाटकात चित्रीकरणासाठी प्राधान्य द्यावे तर कर्नाटकातील निर्मात्यांनी महाराष्ट्रातील लोकेशन्सकडे वळावे यादृष्टीने एकमेकांना सहकार्याचे आश्वासन देण्यात आले. सध्या सिनेमातील लोकेशन्सबाबत​ निर्माते विशेष दक्ष असतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात लोकेशन्स निवड आणि चित्रीकरणासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील निर्मात्यांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कर्नाटक फिल्म असोसिएशन दरवर्षी केवळ मराठी सिनेमांसाठी बेंगळुरू येथे फिल्म फेस्टिव्हल आयो​​जित करेल आणि त्यासाठी मराठी दिग्दर्शक व निर्माते, कलाकार यांना निमंत्रित केले जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय या चर्चेत घेण्यात आला, तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने कर्नाटकात तयार होणाऱ्या कन्नड सिनेमांसाठी कोल्हापूर, मुंबई आणि पुणे यापैकी एका ठिकाणी दरवर्षी कन्नड चित्रपट महोत्सवाचे आायेजन करेल आणि त्यानिमित्ताने कन्नड निर्माते, कलाकार यांच्याशी मराठी चित्रकर्मींना संवाद साधण्याची संधी देईल असा निर्णय घेण्यात आला.

.............

​सिनेमाला भाषा नसते, या उक्तीनुसार दोन्ही राज्यांतील ​चित्रपट निर्मिती परंपरा आणि नवे प्रयोग करण्याची कल्पना यांना एकत्र आणण्यासाठी चर्चा यशस्वी ठरली. भविष्यात सांस्कृतिक माध्यमातून या दोन्ही राज्यांतील संवाद निकोप होण्यासाठी हा दुवा उपयोगी ठरेल.

धनाजी यमकर, उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैनुद्दीनच्या खबऱ्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथे शिक्षक कॉलनीतील इमारतीत कोट्यवधींची रक्कम असल्याची टीप देणारा मैनुद्दीन मुल्ला याचा टिप्सर मित्र महादेव उर्फ गुंडा नामदेव ढोले (वय ४४, रा. कोडोली, ता. पन्हाळा) याला पोलिसांनी रविवारी(ता. २३) अटक केली. संशयित ढोले वारणा शिक्षण संस्थेचे संचालक जी. डी. पाटील यांच्या कारवरील ड्रायव्हर असून, तो संस्थेचा कर्मचारीही असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी मैनुद्दीनचा साथीदार संदीप तोरस्करकडून चोरीतील २ लाख २० हजार रुपयांची रक्कम वसूल केली.

टीप मिळाल्यानंतर मैनुद्दीनने ढोले, विनायक जाधव आणि संदीप तोरस्कर या तिघांना सोबत घेऊन चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे. हे चौघेही वारणा शिक्षण संस्थेत ड्रायव्हर म्हणून काम करीत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ढोलेला कोडोलीतून अटक केली असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. संशयित तोरस्करने जाधववाडी येथील एका वृध्दास चोरीतील १ लाख २० हजार रुपये दिले होते. रविवारी ते पोलिसांनी हस्तगत केले. या प्रकरणातील पाचवा संशयित रेहान अन्सारी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

ढोले संचालकांच्या कारवरील चालक

ढोले हा वारणा शिक्षण संथेचे संचालक जी. डी. पाटील यांच्या कारवरील चालक आहे. तो संस्थेचा कर्मचारी असल्याने पाटील यांच्या फ्लॅटवर त्याचे येणे-जाणे होते. त्यानेच फ्लॅटमधील कोट्यवधीच्या रकमेची माहिती मैनुद्दीनला दिली होती. जी. डी. पाटील हे फिर्यादी झुंजार सरनोबत यांचे नातेवाईक आहेत.

सीआयडी तपासाला गती

तपासाचा आराखडा सीआयडीने तयार केला आहे. सोमवारपासून या प्रकरणाच्या तपासाला गती मिळेल. सर्वप्रथम या प्रकरणातील 'त्या' सात संशयित पोलिसांना अटक करून जबाब घेतले जाणार आहेत, अशी माहिती सीआयडीचे पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक पत्र द्या, दारुबंदी उठवू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुप्रीम कोर्टाने महामार्गांवरील ५०० मीटर अंतरातील दारूबंदीचा आदेश दिल्यानंतर यावर रस्ते हस्तांतरणाचा उतारा सरकारने काढला आहे. राज्य सरकारने २००१ मध्ये काढलेल्या रस्ते हस्तांतरणाच्या परिपत्रकामुळे सध्या शहरातील रस्ते महापालिकेच्या मालकीचेच आहेत. महानगरपालिकेने राज्य सरकारला एक पत्र दिल्यास शहरातील दारूदुकाने पुन्हा सुरू होऊ शकतात, असे महसूलमंत्री तथा पालकमं‌त्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी संध्याकाळी पोलिस उद्यानाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री पाटील यांच्या स्पष्टीकरणामुळे शहरातील दारूबंदी उठण्यात केवळ एका पत्राचे अंतर राहिले आहे. शिवाय दारू दुकाने सुरू करण्यासाठी काही नगरसेवक आणि कारभाऱ्यांनी सुरू केलेल्या व्यवहारालाही चाप बसणार आहे.

महामार्गांवरील अपघातांना वाहनचालकांचे मद्यप्राशन हे महत्त्वाचे कारण ठरत असल्याने सुप्रीम कोर्टाने महामार्गांवरील ५०० मीटर अंतरातील दारूविक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. १ एप्रिलपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्याने महामार्गांवरीलदारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत, तर राज्यालाही कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे पेट्रोलवर तीन रुपये अधिभार लावण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या दारुबंदीच्या निर्णायानंतर यातून पळवाटा शोधण्याचेही काम सुरू होते. सरकार पातळीवरही काही घटकांनी यात पुढाकार घेतला होता. उत्तरप्रदेश सरकारने रस्ते हस्तांतरणाचा निर्णय घेऊन त्यांच्या राज्यापुरता हा प्रश्न निकालात काढल्यानंतर महाराष्ट्रातही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आग्रह दारू विक्रेत्यांनी धरला होता. याबाबत महापालिकांशी वाटाघाटीदेखील सुरू होत्या. अखेर महसूल मंत्र्यांनीच शहरांमधील रस्ते महापालिकांच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट केल्याने दारू विक्रेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

याबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात ढवळाढवळ करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, मात्र २००१ च्या परिपत्रकानुसार शहरांमधील रस्त्यांची मालकी संबधित महापालिकांचीच आहे. महामार्गांवरील दारू दुकाने सुरू करण्यासाठी महापालिकेतील ठरावाचीही गरज नाही. केवळ आयुक्तांनी एक पत्र राज्य सरकारला पाठवणे आवश्यक आहे. यानंतर दारूविक्री सुरू होऊ शकते. मात्र महापालिकांनी संबंधित रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी घेणे बंधनकारक आहे’, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. महसूल मंत्र्यांच्या या स्पष्टीकरणामुळे दारू विक्रेत्यांच्या आशा पल्लिवत झाल्या असून, महापालिकेच्या आयुक्तांनी रस्त्यांच्या देखभालीचे पत्र राज्य सरकारडे द्यावे यासाठी फिल्डिंग लावण्याचे कम सुरू झाले आहे. येत्या चार दिवसांत याची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्थलांतराचे १०० प्रस्ताव

दारूबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर गेल्या २३ दिवसांत जिल्ह्यातील १०० हून अधिक दारू विक्रेत्यांनी स्थलांतराचे प्रस्ताव दिले आहेत. यातील केवळ तीन दुकानांना स्थलांतराला परवानगी मिळाली असून, नवीन ठिकाणी ती दुकाने सुरू झाली आहे. अन्य प्रस्ताव मात्र अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून यावर कोणताच निर्णय न झाल्याने विक्रेते हवालदिल आहेत.

साडेतीन कोटींचा महसूल बुडाला

दारूबंदीच्या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील १०२६ दारू दुकानांना बसला आहे. १३५५ दुकानांपैकी केवळ ३२९ दुकाने सुरू आहेत. गेल्या २० दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा साडेतीन कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ५ कोटी, ६० लाखांचा कर जमा झाला होता. यंदा केवळ २ कोटी कर जमा झाला आहे.

दारूबंदी आणि इंधन दरवाढीचा संबंध नाही

दारूबंदीच्या निर्णयानंतर राज्याच्या महसुलात तूट आल्याने ही तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारने पेट्रेल आणि डिझेलची दरवाढ केल्याची चर्चा आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारणा केली असता, महामार्गांवरील दारूबंदी आणि इंधन दरवाढ याचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांना असुविधांचे चटके

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक अशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची ओळख. नवरात्र उत्सव असो की, सुटीचा कालावधी, या काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा प्रचंड ओघ असतो. दर्शनासाठी कर्नाटक, आंध्र परिसरातील भाविकांची संख्याही मोठी असते. मात्र मंदिरात येणाऱ्या भाविकांना पार्किंग व्यवस्थेपासूनच असुविधांचे चटके सहन करावे लागतात. दर्शन रांगेत ताळकळत उभे राहून दर्शनानंतर समाधानाचे चार क्षण मंदिर परिसरात घालवायचे म्हटले तरी तसा निवांतपणाही मिळत नाही. सध्याचा उन्हाचा चढता पारा लक्षात घेऊन देवस्थान समितीने मंदिर परिसरात मंडप घातला आहे. मात्र भाविक दर्शनानंतर समाधानाने परत जाईल, अशा आणखी सुविधा देण्याची गरज आहे.

पार्किंग नियोजनाचा बट्ट्याबोळ

विद्यापीठ परिसरात फोर‌ व्हिलरसाठी महापालिकेच्यावतीने पे अँड पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात ३ ते ४ कर्मचारी असूनही अनेकदा भाविकांच्या कार चुकीच्या पद्धतीने पार्क केल्यामुळे दर्शनासाठी आलेल्या किंवा दर्शन घेऊन जाणाऱ्या भाविकांना या मार्गावरुन कार बाहेर काढण्यासाठी जवळपास अर्धा तास वाट पहावी लागते. शिवाय पार्किंगचे २० रुपये घेऊनही परिसरात पार्किंग नियोजनाचा बट्ट्याबोळ दिसून येतो. बिंदू चौक परिसरात पार्किंगसाठी जागाच अपुरी असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. पार्किंगसाठी जायला आणि बाहेर पडायला एकच मार्ग असल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी तर होतेच, शिवाय भाविकांना सुरळीत सुविधाही ‌मिळत नाही.

माहिती कक्षाचा अभाव

भाविकांना मंदिर परिसरातील सर्व व्यवस्थांचा माहिती होण्यासाठी देवस्थान समितीने मंदिर आवारात माहिती केंद्र सुरू करण्याची गरज आहे. ते नसल्याने इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांना दर्शनरांगेपासून, धर्मशाळा, प्रसाद व्यवस्था, रिक्षा-बस सुविधा याची माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांची गैरसोय होते. यासाठी मंदिर परिसरात भाविकांसाठी माहिती केंद्र सुरू करून तेथे हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगू या भाषांत संवाद साधणारा संवादक नेमणे आवश्यक आहे.

रोजच्या धार्मिक विधीची माहिती व फलक हवेत

मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमाची माहिती असलेले फलक तर ये‌थे नाहीतच. मंदिरात अ‌भिषेक, नैवेद्य, कुंकूमार्चन, काकड आरतीपासून शेजारतीपर्यंतचे धार्मिक विधी होत असतात. मात्र त्यांची वेळच माहीत नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होते. दर्शनरांग तसेच मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावणे आवश्यक आहे.

विसाव्यासाठी ओवऱ्या रिकाम्या हव्यात

सुटीच्या काळात रोज ५० हजाराहून जास्त भाविक दर्शनासाठी येत असतात. अशावेळी गरुड मंडपात अभिषेक होतो. त्यानंतर भाविकांना दर्शनानंतर थोडा वेळ विश्रांतीसाठी मंदिर परिसरात असलेल्या ओवऱ्या खाली करणे गरजेचे आहे. जोतिबा मंदिर परिसरात या ओवऱ्या रिकाम्या असतात. त्यामुळे भाविकांना दर्शनानंतर निवांत बसण्याची व्यवस्था होते. तशीच व्यवस्था येथील अतिक्रमण केलेली दुकाने हटविल्यानंतर होऊ शकते.

कायमस्वरुपी हिरकणी कक्ष

अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्‍ये महिलांची संख्या लक्षणीय असते. त्यातही स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची कायमस्वरुपी सोय करण्याची गरज आहे. उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळी आणि ख्रिसमस, नवरात्रोत्सव या काळात भाविकांची संख्या जास्त असते. त्यामुळे केवळ नवरात्रोत्सव काळात ही सुविधा न करता हिरकणी कक्षाची व्यवस्था कायमस्वरुपी करावी.

.......

दर्शनासाठी आल्यानंतर अभिषेक कुठे घालायचा, याची चौकशी करत फिरावे लागते. धार्मिक विधीचे फलक कुठेच दिसत नाहीत. ते लावणे गरजेचे आहे. याचबरोबर दर्शनरांगेत किमान अर्धा-एक तास उभे रहावे लागते. यंग सीनिअर्सचा विचार करता रांगेत काही ‌ठिकाणी बसण्याची व्यवस्था हवी. पार्किंगसाठी पैसे मोजावे लागत असतील तर तशी व्यवस्था करण्याची जबाबदारीही प्रशासनाचीच आहे. अस्ताव्यस्त पार्किंगमुळे अर्धा तास गाडी अडकून पडते.

दिलीप भोसले, भाविक, मुंबई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग समित्यांच्या आज निवडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतिपदाची निवडणूक सोमवारी (ता. २४) होत असून दुपारी चार वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवडी होणार आहेत. चारही ठिकाणी संख्याबळामुळे काँग्रेस आघाडीचे सभापती होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. गांधी मैदान, शिवाजी मार्केट, राजारामपुरी मार्केट या ठिकाणी काँग्रेस आघाडीचे बहुमत आहे. ताराराणी मार्केट प्रभाग समितीत केवळ काँग्रेस व ताराराणी आघाडीचे संख्याबळ समान असल्याने दोनवेळा तिथे चिठ्ठी टाकून सभापती निवड झाली होती. त्यामध्ये भाजप आघाडीचे राजसिंह शेळके सभापती झाले होते. मात्र आता भाजप आघाडीकडील निलेश देसाई यांना अपात्र ठरवल्याने तेथील भाजप आघाडीचे संख्याबळ नऊ झाले आहे. यामुळे काँग्रेस आघाडीच्या सुरेखा शहा या सभापती होण्याची औपचारिकता राहिली आहे. तीन विद्यमान सभापतींना पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजप आघाडीचे संख्याबळ घटल्याने ताराराणी मार्केटमध्ये नवीन सभापती निवडून येणार आहेत.

गांधी मैदान

प्रतीक्षा पाटील (काँग्रेस आघाडी, विद्यमान सभापती ) विरूद्ध संतोष गायकवाड (भाजप, ताराराणी आघाडी)

शिवाजी मार्केट

अफजल पिरजादे (राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडी, विद्यमान सभापती )विरुद्ध सुनंदा मोहिते (भाजप, ताराराणी आघाडी)

राजारामपुरी मार्केट

छाया पोवार(काँग्रेस आघाडी, विद्यमान सभापती) विरुद्ध कमलाकार भोपळे (भाजप, ताराराणी आघाडी)

ताराराणी मार्केट

राजसिंह शेळके (भाजप, ताराराणी आघाडी, विद्यमान सभापती) विरुद्ध सुरेखा शहा (काँग्रेस आघाडी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भोगावती’ साठी ७८ टक्के मतदान

$
0
0

राधानगरी

परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी (ता.२३) चुरशीने ७८ टक्के मतदान झाले. एकूण २४,१६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर संस्था गटात ४६८ पैकी ४६० प्रतिनिधींनी मतदान केले. तिरंगी लढतीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले आहे. किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता मतदान शांततेत पार पडले. मतमोजणी सोमवारी (ता.२४) कोल्हापुरातील रमणमळा येथील हॉलमध्ये ५० टेबलांवर होणार आहे.

भोगावती कारखान्याच्या प्रचारातील चुरस रविवारी मतदानातही पहायला मिळाली. उमेदवार समर्थक आपल्या नातेवाईकांना आणि पॅनेलच्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी धडपड करत होते. सकाळी आठ वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळच्या वेळी महिलांनी गावोगावी मतपेट्यांचे पूजन केले. प्रत्येक पॅनेलकडून मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली .

सकाळच्या सत्रात दहा वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, तर दुपारी मतदान केंद्रावर गर्दी कमी होती. भोगावती कारखान्यासाठी प्रथमच गटवार पद्धतीने मतदान होत असल्याने काही वृध्द सभासद गोंधळले असल्याचे दिसून आले. प्रत्येक सभासदाला दहा मतपत्रिका दिल्या जात होत्या . मतदार मतदान कक्षात विलंब लावताना दिसत होते, त्यामुळे रांगा वाढत होत्या .

भोगावती कारखान्याचे राधानगरी आणि करवीर तालुक्यातील एकूण ५३ गावांतील ३०,५२१ शेतकरी सभासद आहेत. तर संस्था गटातील सभासद संख्या ४६८ आहे . सहा गटातून २१ उमेदवार निवडले जाणार आहेत .तिरंगी लढतीत काँग्रेसचे राजर्षी शाहू पॅनेल तर राष्ट्रवादी,शेकाप, भाजप, शिवसेना,शेतकरी संघटना, जनता दल यांची महाआघाडी दादासाहेब पाटील पॅनेल आणि सदाशिवराव चरापले यांच्या नेतृत्वाखालील भोगावती परिवर्तन पॅनेल रिंगणात आहे .

राधानगरी ,करवीर या दोन विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचे संदर्भ भोगावतीच्या निवडणुकीशी असल्याने, तिन्ही पॅनेलच्या वतीने आपल्याच विजयाचा दावा केला जात आहे .

कौलव ,राशिवडे ,कुरुकली या गटातून प्रत्येकी तीन उमेदवार निवडले जाणार आहेत तर सडोली , तारळे , हासूर या गटातून प्रत्येकी दोन उमेदवार निवडले जाणार आहेत. मागासवर्गीय एक,महिला प्रतिनिधी दोन ,इतर मागास एक ,भटक्या जमाती एक आणि संस्था प्रतिनिधी यामधून एकूण सहा उमेदवार निवडले जाणार आहेत .एकूण ९८ केंद्रांवर मतदान घेण्यात आले तर संस्था गटाचे मतदान भोगावती हायस्कूलच्या इमारतीत घेण्यात आले. मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी करवीर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता . कारखान्याच्या प्रचार सभांत महाआघाडीच्या वतीने खासदार राजू शेट्टी, आमदार चंद्रदीप नरके ,आमदार सुरेश हाळवणकर ,बाबा देसाई ,हिंदुराव शेळके तर शेवटच्या टप्प्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. काँग्रेसच्या बाजूने माजी आमदार पी. एन. पाटील ,अरुण डोंगळे ,कृष्णराव किरुळकर ,उदयसिंह पाटील यांनी प्रचार सभा गाजवल्या . तर परिवर्तन पॅनेलच्या वतीने सदाशिवराव चरापले ,अविनाश पाटील,सतीश बर्गे यांनी गड लढवला . माजी मंत्री हसन मुश्रीफ ,ए. वाय. पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग दिसला नसला तरी त्यांनी महाआघाडीला पाठबळ दिले . ‘भोगावती’च्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार हे सोमवारी मतमोजणी झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीचशेवर ‌शिक्षकांची पगारविना उपासमार

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMt

कोल्हापूर ः शिक्षकांचे समायोजन करण्याच्या शिक्षण आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणारे स्था​निक शिक्षणाधिकारी आणि अतिरिक्त ​शिक्षकांना सामावून घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या संस्थाचालकांच्या कात्रीत सापडलेल्या ५५ शाळांतील अतिरिक्त २५३ शिक्षकांवर वेतनाअभावी गेल्या पाच महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या वर्षभरात जवळपास ३३ आंदोलने करूनही या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न ‘जैसे थे,’ आहे. या ​शिक्षकांना उधार-उसनवारी करून घरखर्च चालवावा लागत आहे.

घटती पटसंख्या आणि शाळांची वाढती संख्या यामुळे जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला. यातून मार्ग काढण्यासाठी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यातील अन्य शाळांत करण्याचा निर्णय शिक्षण आयुक्तांनी घेतला. तसेच या शिक्षकांचे मासिक वेतन समायोजन केलेल्या शाळांच्या संस्थाचालकांनी द्यावे, असा आदेश शिक्षण आयुक्तांनी दिला. अतिरिक्त ​शिक्षकांना ज्या शाळांत समायोजित केले त्या संस्थांकडून वेतन देणे अपेक्षित आहे. मात्र संबंधित संस्था शिक्षक ज्या शाळेतून आले आहेत त्या मूळ संस्थांनी वेतन द्यावे, असा आग्रह धरून बसल्यामुळे पाच महिन्यांपासून हा प्रश्न भिजत पडला आहे.

२६ दिवस वाया

समायोजित शिक्षकांचे वेतन तातडीने देण्याचा आदेश शिक्षण आयुक्तांनी २ मार्च २०१७ रोजी दिला. मात्र जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून २९ मार्चअखेर या आदेशावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आदेश देऊनही शिक्षकांच्या वेतनाबाबत ​निर्णय घेण्यासाठी २६ दिवस प्रशासनाच्या दिरंगाईने वाया गेले.

प्रश्न का निर्माण झाला?

पूर्वी एका तुकडीला दीड शिक्षक असे प्रमाण होते. सध्या ३० मुलांसाठी एक शिक्षक असे प्रमाण आहे. शाळांची वाढती संख्या आणि विद्यार्थ्यांची विभागणी यामुळे पटसंख्या कमी होत आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या शाळा, सध्याच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे व्यस्त प्रमाण याचा कोणताही आराखडा निश्चित नाही. यामुळे शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आहे.


अद्याप गेल्या शैक्षणिक वर्षात ​अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजन व वेतनप्रश्नाचा गुंता सुटलेला नाही. त्यातच २०१६-२०१७ या वर्षाची संचमान्यता पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत किमान १०० शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या काळातील अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सुटण्याची आवश्यकता आहे.

राजेश वरक, अध्यक्ष, कोल्हापूर माध्यमिक शिक्षक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच लाखांपर्यंत कर्जमाफीची तयारी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार सकारात्मक आहे, पण, सरसकट कर्जमाफी दिल्यास ज्यांना कर्जमाफीची गरज नाही, अशा बड्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होईल. यामुळे राज्यातील ४३ हजार गावांचा सर्व्हे करुन ज्यांना खरेच कर्जमाफीची गरज आहे, अशा शेतकऱ्यांना प्रसंगी ५ लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा विचार सुरू आहे,’ अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. रविवारी पोलिस उद्यानाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांतर्फे मंगळवारपासून (दि. २५) संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘विरोधकांकडे कोणताच मुद्दा शिल्लक नसल्याने ते संघर्ष यात्रा काढत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. केवळ शेतकर्यांना कर्जमाफी देऊन हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार नाही. यासाठी शेतकर्यांना सक्षम करण्याचा विचार सरकार करत आहे. याबाबतच्या योजना सरकारच्या विचाराधीन आहेत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यापेक्षा राज्यातील ४३ हजार गावांचा सर्व्हे करुन खर्या लाभार्थींनाच प्रसंगी ५ लाखापर्यंतची कर्जमाफी करण्याची सरकारची तयारी आहे. या दृष्टीने सरकारचे काम सुरू आहे.’

शेतकऱ्यांच्या रचनात्मक विकासासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कर्जमाफीचा बोजा शेवटी नागरिकांवरच पडणार असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या गळ्यापर्यंत कर्ज आले आहे, त्यांनाच हातभार लावण्याचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले. कर्जमाफीची मर्यादाही सरकारने निश्चित केल्याचे पाटील यांच्या वक्तव्यामुळे स्पष्ट होत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे किमान ५ लाखांपर्यंतचे कर्ज माफ होण्याची शक्यता बळावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भोगावती’त सत्तांतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसप्रणीत राजर्षी शाहू शेतकरी पॅनेलने सत्तांतर घडवले. रात्री सव्वा दहाच्या सुमारास उत्पादक गटातील ११ आणि संस्था गटांतील एका जागेसह १२ जागांवर विजय मिळवत सत्तांतराचा मार्ग प्रशस्त केला. सत्तारुढ दादासाहेब पाटील-कौलवकर विकास महाआघाडी आणि परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडवला. सडोली-खालसा उत्पादक गटातून पॅनेल प्रमुख पी. एन. पाटील यांच्यासह दत्तात्रय मेडशिंगे यांनी विजय मिळवला. विद्यमान चेअरमन धैर्यशील पाटील, व्हाईस चेअरमन अशोक पवार-पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एकहाती सत्ता फिरवत किंगमेकर पी. एन. पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार राजू शेट्टी, चेअरमन पाटील, के.पी. पाटील, सुरेश हाळवणकर, ए. वाय. पाटील यांना जबर धक्का दिला आहे.

जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या भोगावती कारखान्याच्या २१ जागांसाठी रविवारी चुरशीने ७४ टक्के मतदान झाले होते. सोमवारी रमणमळा येथील बहुउद्देशीय शासकीय हॉलमध्ये ५० टेबलावर मतमोजणीला सुरुवात झाली. प्रथम गटनिहाय मतपत्रिकांची विभागणी करण्यात आली. त्यानंतर संस्था गटातील मतमोजणीला प्रारंभ झाला. केवळ अर्धा तासात मतमोजणी पूर्ण होऊन ‘शाहू’च्या प्रा. शिवाजी पाटील-देवाळकर यांनी २७८ मिळवत महेश वरुटे (१७४) यांचा १०४ मतांनी पराभव करत विजयाचे खाते उघडले. पहिल्याच निकालात विजय मिळाल्याने काँग्रेस समर्थकांनी जल्लोष सुरुवात केला.

त्यानंतर उत्पादक गटातील १५ जागांसाठी मतमोजणी सुरु झाली. त्यात सडोली खालसा, राशिवडे, कौलव आणि कुरुकली या चार उत्पादक गटांची पहिली फेरी पार पडली. पहिल्याच फेरीत ‘शाहू’च्या अकराही उमेदवारांनी सरासरी अडीच हजारांचे मताधिक्य मिळवले. त्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांनी गर्दी करायला सुरुवात केली. रात्री आठ वाजता सडोली खालसा उत्पादक गटातील निकाल जाहीर झाला. यात पी. एन. यांना १३ हजार ४३१ व दत्तात्रय मेडशिंगे यांनी १२ हजार ६४९ मते मिळवली. महाघाडीचे विद्यमान व्हाइस चेअमरन पवार-पाटील यांना ८ हजार ५० व सुरेश चौगले यांना सात ४६४ मते मिळाली. पी. एन. यांनी पाच हजार ९६७ तर मेडशिंगे यांनी पाच हजार १८५ मतांनी विजय मिळाल्याने जल्लोषाला उधाण आले. रात्री उशीरा कौलव गटातील, विद्यमान चेअमरन पाटील-कौलवकर सुमारे चार हजार मतांनी पिछाडीवर राहिल्याने संस्थापकांच्या वारसांचा पराभव होणार हे जवळपास निश्चित झाले.

सह्याद्री ठरला कळीचा मुद्दा

‘भोगावती’च्या प्रचारात महाआघाडीच्या सर्वच नेत्यांनी पी.एन. यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपचे आमदार हाळवणकर यांनी तर जाहीर सभेतून जोरदार टीका केली होती. ‘सह्याद्री’ कारखान्याला उभारी देण्यासाठी बाहेरील नेते ‘भोगावती’ मोडीत काढण्याचे षड्‍यंत्र खेळत असल्याचा आरोप करत पी. एन. यांनी सभासदांच्या अस्मितेला हात घातला. नोकर भरती, पाच वर्षातील गैरकारभारांबरोबरच पी.एन. यांनी ‘सह्याद्री’चा मुद्दा उपस्थित करत सभासदांना परिवर्तनाची हाक दिली. हाच मुद्दा चांगलाच फायदेशीर ठरला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघर्षातूनच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शेतमालाला जोपर्यंत रास्त भाव मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी कर्जमुक्त होऊ शकणार नाही. शेतकऱ्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने चळवळीच्या माध्यमातून संघटित होऊन संघर्ष केल्यास शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, असे विचार त्या काळात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मांडले होते. त्या विचारांचे अनुकरण करण्याची आवश्यकता असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले.

राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या सभागृहात प्रा. एन. डी. पाटील प्रतिष्ठानच्यावतीने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन.डी. पाटील होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर उपस्थित होते.

‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि शेती प्रश्न’ या विषयावर बोलताना प्रा. डॉ. चौसाळकर म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या जडणघडणीत महर्षी शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र त्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष केले गेले. महर्षींच्या कार्याचे अनेक पैलू असून, त्यांचे विचार समजून आत्मसात केले पाहिजेत. महाराष्ट्रात मोठा जमीनदार शेतकरी, कुणबी शेतकरी, लहान शेतकरी व शेतमजूर असे शेतकऱ्यांचे वर्ग आहेत. या शेतकऱ्यांत जागृती करण्याची महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली होती. सरकार, सावकार आणि व्यापारी हे शेतकऱ्यांचे तीन शत्रू असून हे तिन्ही शत्रू एकमेकांना पाठिंबा देतात. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारपेठेवर नियंत्रण आणले पाहिजे. तसेच शेतमालाची किंमत स्वतः ठरवून ग्रामीण अर्थव्यवस्थेवर वर्चस्व प्रस्थापित करणे आवश्यक आहे. ’

प्रा. एन. डी. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. टी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अशोक चव्हाण यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयितांच्या घरांवर सीआयडी छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथील लूटप्रकरणी सोमवारी (ता. २४) सीआयडी पथकाने सांगलीतील संशयित पोलिसांच्या घरांवर छापे टाकले. मात्र संशयित पोलिस कुटुंबांसह फरार आहेत. सातही संशयित पोलिसांच्या संपत्तीची माहिती घेण्याचे काम सुरूच आहे. सीआयडी पथकाने वारणानगरातील शिक्षक कॉलनीतील घटनास्थळाचीही पाहणी केली. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मैनुद्दिनसह त्याचा साथीदार विनायक जाधव या दोघांचा जामीन रद्द व्हावा, यासाठी कोर्टात धाव घेतली आहे.

या चोरीचा तपास करण्याच्या बहाण्याने सांगली गुन्हे अन्वेषणच्या सात पोलिसांनी संगनमताने ९ कोटी १८ लाख रुपये हडप केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सांगलीचे गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांच्यासह मैनुद्दीन मुल्ला, प्रवीण भास्कर सावंत यांच्याविरोधात कोडोली पोलिसात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास सीआयडी करीत आहे.

संशयित पोलिसांच्या अटकेसाठी सीआयडीने तीन विशेष पथके नियुक्त केली आहेत. त्यांनी सोमवारी पुणे, सांगली, मिरज, कौलापूर येथील घरांवर छापे टाकले. संशयितांनी मोबाइल बंद ठेवल्याने त्यांचे लोकेशन मिळत नाही. मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये राहणाऱ्या मैनुद्दीनच्या घराचीही पथकाने झडती घेतली. यावेळी मैनुद्दीनच्या पत्नीचा जबाब घेतला.

रक्कम कुणाची?

लुटीतील रकमेवर बांधकाम व्यावसायिक झुंजार सरनोबत यांनी दावा केला आहे, मात्र या रकमेबाबत त्यांच्याकडून पोलिसांना विसंगत माहिती मिळाली. वर्षभराने पुन्हा फिर्याद दखल केल्यानंतर सुमारे १४ कोटींची रक्कम फ्लॅटमध्ये असल्याची माहिती फिर्यादिंनी दिली आहे. या विसंगतीमुळे सीआयडीने रकमेच्या मुळाशी जाऊन तपास सुरू केला आहे. सोमवारी सीआयडी पथकाने सरनोबत यांच्याकडे विचारपूस केली. ही रक्कम नेमकी कुणाची याचा छडा यातून लागणार आहे.

बँक खात्यांची चौकशी

अटकेतील संशयित महादेव ऊर्फ गुंडा नामदेव ढोले (वय ४४, रा. कोडोली, ता. पन्हाळा) याला सोमवारी पन्हाळा न्यायालयात हजर केले असता, त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. पोलिसांनी त्याच्यासह विनायक जाधव (रा. भामटे, ता. करवीर), संदीप बाबासाहेब तोरस्कर (रा. बापट कॅम्प, कोल्हापूर) यांच्या बँक खात्यांची चौकशी सुरू केली आहे, तर मैनुद्दीन आणि विनायकचे जामीन रद्द होण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघर्ष यात्रा आज कोल्हापुरात

$
0
0

‌म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय कवाडे गट, युनायटेड जनता दल, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, समाजवादी पार्टीच्यावतीने राज्यभरात काढण्यात येत असलेली संघर्ष यात्रा मंगळवारी (२५ एप्रिल) कोल्हापुरात दाखल होत आहे. सकाळी साडेआठ वाजता शाहू जन्मस्थळापासून संघर्ष यात्रेला सुरुवात होणार असून, यासाठी विरोधी पक्षातील दिग्गज नेते कोल्हापुरात येणार आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण ‌विखे- पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या नेत्यांच्या उपस्थितीत संघर्ष यात्रेला प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांसमोर भूमिका मांडण्यासाठी तीन विविध ठिकाणी संघर्ष मेळावे घेण्यात येणार आहेत. कोल्हापूर, मुदाळ तिट्टा व जयसिंगपुरात मेळाव्यांचे आयोजन केले आहे.

राधानगरी, भुदरगड, शिरोळ, हातकणंगले तालुक्यातून यात्रा निघेल. यात्रेत सहभागी असलेले शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, जयदेव गायकवाड, चित्रा वाघ, माजी मंत्री जयंत पाटील, आरपीआयचे आमदार जोगेंद्र कवाडे हे मेळाव्याला प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाहणी करा, टँकर द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनेक गावांत पाण्याची टंचाई असूनही त्यांचा समावेश यादीत न करता केवळ कागदोपत्री रकाने भरून टंचाईग्रस्त दाखविण्यात प्रशासनाने धन्यता मानली आहे. जिल्ह्यातील ७४ गावे टंचाईग्रस्त दाखवली होती. मात्र, त्याव्यतिरिक्त बरीचशी गावे टंचाईग्रस्त असल्याचे आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले. तहानलेल्या गावांची यादीच बैठकीत सादर केली. पाण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टंचाईग्रस्त गावांना तहसीलदारांनी भेटी देऊन पाहणी करावी, खातरजमा करून ताबडतोब टँकर सुरू करण्याचे आदेश दिले.

खासदार धनंजय महाडिक, आमदार उल्हास पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, प्रकाश आबिटकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. हातकणंगले तालुक्यातील चिपरी, तमदलगे, निमशिरगांव, संभाजीपूर या गावात पाणी टंचाई जाणवत असून काही ठिकाणी टँकर पुरवावे लागत असल्याचे सदस्यांनी सांगितले. गगनबावड्यात एकाही गावात टंचाई नसल्याचा अहवाल असला तरी धुंदवडेजवळील सात वाड्यांत भीषण टंचाई असून पिके करपू लागली आहेत, याकडे लक्ष वेधण्यात आले. पन्हाळ्यातील नावलीतही पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

शिरोळचे सभापती मल्लाप्पा चौगुले यांनी हेरवाड गावातील नवीन पाणी पुरवठा योजनेला वीज कनेक्शनची परवानगी मिळाली नसल्याने गावात पाणी टंचाई जाणवत असल्याकडे लक्ष वेधले. आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी रखडलेले सिंचन प्रकल्प लवकर मार्गी लागले तर टंचाई दूर होण्यास मदत होईल, असे सूचविले.

बैठकीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री पाटील यांनी ७२ टंचाईग्रस्त गावांची नावे जाहीर केली असून अन्य काही गावात टंचाई जाणवत असेल तर त्या गावांनी, लोकप्रतिनिधींनी प्रातांधिकारी आणि तहसीलदारांकडे संपर्क साधवा, असे आवाहन केले. तहसीलदारांनी ताबडतोब गावांना भेटी देऊन टंचाईची तीव्रता समजावून घेऊन उपाय करण्याचे आदेश दिले. विंधन विहिरीचे प्रस्ताव मंजूर केले असून ताबडतोब टेंडर काढून कुपनलिका खोदाव्यात, असे आदेश दिले. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त अभिजित चौधरी, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

उन्नत शेती अभियान २५ मे पासून

ठिबक सिंचन, सेंद्रीय शेतीचा प्रसार करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने २५ मे पासून उन्नत शेती अभियान सुरु करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. १०० हून छोट्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ठिबक सिंचनसाठी प्रयत्न केल्यास सरकार मदत करेल. पण, निम्मा खर्च शेतकऱ्यांना करावा लागेल. ऊस, कापूस या पिकांसाठी ठिबक सक्ती केली जाईल. तीन वर्षात संपूर्ण जिल्ह्यात ठिबक सिंचन योजना लागू केली जाईल.

कर्जाखाली दबलेले शेतकरी शोधा

जिल्ह्यातील कर्जाखालील दबलेला शेतकरी शोधण्याचा सल्ला पालकमंत्री पाटील यांनी विरोधी पक्षांना दिला आहे. सरसकट सर्व शेतकऱ्यांना व संपन्न शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधक स्वार्थासाठी संघर्ष यात्रा काढत असून त्यांना राज्याची आर्थिक घडी कुमकुवत करायची आहे, असा आरोप केला.

२२ तारखेपर्यंत नोंदणी झालेली तूर खरेदी करणार

२२ एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी नाफेडकडे तूर खरेदीसाठी नोंदणी केली आहे त्यांची तूर खरेदी केली जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. ४० लाख क्विंटल तूर खरेदी केली असून यापूर्वी फक्त तीन लाख तूर खरेदी केली होती याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आणखीन आठ ते नऊ लाख क्विंटल तूर खरेदी करायची असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेनेरिक औषधांसाठी वाढणार दबाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉक्टरांनी औषधाचे प्रीस्क्रिप्शन लिहून देताना जेनेरिक औषधांची नावे लिहून न दिल्यास अशा डॉक्टरांविरुद्ध मेडिकल कौन्सिल किंवा राज्य मेडिकल कौन्सिलकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा या संस्थांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात जेनेरिक औषधांसाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांना स्वस्तात औषधोपचार करणे शक्य होणार आहे.

मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने २१ सप्टेंबर २०१६ला प्रत्येक डॉक्टरने जेनेरिक नावानेच औषधे लिहून द्यावीत, ती स्वच्छ अक्षरात व कॅपिटलमध्ये असावीत असा नियम अस्तित्वात आणला. या नियमाचे पालन न करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जेनेरिक नावाने औषधे लिहून देण्याविषयी मेडिकल कौन्सिलने यापूर्वी २२ नोव्हेंबर २०१२ आणि १८ जानेवारी २०१३ रोजी परिपत्रके काढली होती. मात्र, त्यात डॉक्टरांनी, ‘शक्यतो’ जेनेरिक नावानेच औषध लिहून द्यावे (अॅज फर अॅज पॉसिबल), असे म्हटले होते. त्यानंतर इंडियन मेडिकल कौन्सिल (व्यावसायिक वर्तन, नीतीमूल्ये) कायदा, २००२ या नियमांच्या कलम १.५ मध्ये २०१६ मध्ये दुरुस्ती केली. त्यानुसार वर उल्लेख केलेला बदल करण्यात आला. त्यामुळे आता डॉक्टरांनी जेनेरिक नावानेच औषध लिहून देणे अभिप्रेत आहे.

या नियमामुळे डॉक्टरांवर दबाव तर वाढणार आहे, शिवाय जेनेरिक औषधांची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. औषधांच्या वाढत्या किमतीमुळे कायमस्वरुपी आजार असलेल्या रुग्णांना उपचार अर्धवट सोडावे लागतात. महाग औषधांमुळे उपचाराकडे दुर्लक्ष केले जाते. यासाठी अशा रुग्णांना जेनेरिक औषधे पर्याय ठरत आहे. ब्रँडेड कंपन्यांच्या तुलनेत जेनेरिक औषधे ४० ते ६० टक्के स्वस्त मिळतात. जेनेरिक औषध म्हणजे मूळ औषध किंवा औषधाचे मूळ नाव. बाजारात असलेल्या विविध कंपन्या त्या औषधाला स्वत:चे ‘ब्रॅँडनेम’ देऊन त्याची विक्री करतात. प्रत्येक कंपनीनुसार एकाच औषधाच्या दरात तफावत आढळते. बहुतांश सर्वच रोगांवर जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत. मात्र, डॉक्टरच जेनेरिक औषध लिहून देण्यासाठी सहसा तयार होत नाहीत. सध्या कोल्हापुरात जेनेरिक औषधांमध्ये अनेक उत्पादन कंपन्या आहेत.

डॉक्टरांनी प्रीस्क्रिप्शनमध्ये जे औषध लिहून दिले, तेच औषध फार्मासीस्टने देणे त्याची जबाबदारी आहे. प्रत्येक औषधांची चाचणी होऊन ती बाजारात येत असतात. जेनेरिक औषध हे त्या-त्या ड्रग्जनुसार स्वतंत्र घ्यावी लागतात, तर काही ब्रँडेड कंपन्यांमध्ये एकाच डोसमध्ये सर्व ड्रग्जचा समावेश करतात. त्यामुळे काही ब्रँडेड औषधे स्वस्त मिळू शकतात.

मदन पाटील, अध्यक्ष,कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन

सर्वत्र जेनेरिक औषधे त्या प्रमाणात उपलब्ध असायला हवीत. शिवाय जसे ब्रँडेड औषधांच्या दर्जाबाबत नियंत्रण असते, तसेच जेनेरिक औषधांबाबतीत दर्जावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. दर्जाबाबत आणि त्याच्या गुणाबाबत डॉक्टरांच्या मनात शंका असल्यामुळे, औषधोपचारानंतर उपचाराचा गुण न आल्यास डॉक्टरांना जबाबदार धरले जाऊ शकते.

डॉ. रवींद्र शिंदे, अध्यक्ष, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्ड्रींक व्यवसायिक सोळंकींचा अपघाती मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नागाळा पार्क येथे नवरंग अपार्टमेंटजवळ समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने हँडेलला धडक दिल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कोल्ड्रींक व्यवसायिक प्रदीप पांडुरंग सोळंकी (वय ६१, रा. नागाळा पार्क) यांचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. २४) दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात घडला. सोळंकी यांचा सोमवारी वाढदिवस होता. एकसष्टी साजरी करण्यापूर्वीच त्यांच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

सोळंकी यांचे भाऊसिंगजी रोडला शीतपेयाचे दुकान आहे. रोहीत आणि याहित या दोन मुलांसह ते दुकानातील काम पाहतात. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे त्यांची दोन्ही मुले दुकानाकडे गेली. काही वेळाने प्रदीप सोळंकी हेही दुचाकीवरून दुकानात गेले. सोमवारी वाढदिवस असल्याने दुकानातून लवकर घरी जाण्याची त्यांची घाई सुरू होती. दुपारी दोनच्या सुमारास ते दुचाकीवरून बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ मोठे भाऊ किरण सोळंकी हेही घरी जात होते. नागाळा पार्क कमानीपासून काही अंतरावर असलेल्या नवरंग अपार्टमेंटजवळ पोहचताच समोरून आलेल्या दुचाकीस्वाराने सोळंकी यांच्या दुचाकीच्या हँडेलला धडक दिली. धडकेत सोळंकी यांची दुचाकी घसरली. त्याचे डोके रस्त्यावर आदळले. डोक्याला गंभीर जखम झाल्याने मोठा रक्तस्राव सुरू झाला. पाठीमागून येणारे मोठे भाऊ किरण काही क्षणात घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने प्रदीप यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एकसष्टी साजरी करण्याचे त्यांचे नियोजन होते, मात्र त्याआधीच काळाने घाला घातला. सोळंकी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष्यांसाठी मिळाली घरटी आणि धान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संवेदनशील नागरिकांनी पक्ष्यांसाठी धान्य, घरटी, पाण्याच्या भांड्याच्या रुपातून ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या ‘पक्षी वाचवा’ उपक्रमांतर्गत जमा केलेली मदत प्रत्यक्ष पक्ष्यांच्या उपयोगी पडू लागली आहे. ठिकठिकाणची उद्याने, उजाड परिसर, घराचे अंगण, टेरेसवर घरटी, अन्न व पाण्याची भांडी पक्ष्यांची भूक व तहान भागवू लागली आहेत. ‘स्पर्श’ व ‘समर्पण’ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून हे साहित्य लावण्यात येत आहे. तसेच त्यामध्ये धान्य व पाण्याची व्यवस्था वेळीच केली जात आहे. यामुळे आता अन्न व पाण्यासाठी पक्ष्यांना करावी लागणारी वणवण थांबण्यास मदत होऊ लागली आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या ‘पक्षी वाचवा’ उपक्रमाला संवेदनशील कोल्हापूरवासियांनी भरभरुन मदत केली. अजूनही अनेक संस्था व कुटुंबिय पक्ष्यांसाठी धान्य, पाण्याची भांडी तसेच घरटी घेऊन येत आहेत. हे सर्व साहित्य ‘स्पर्श’ व ‘समर्पण’ च्या माध्यमातून पक्ष्यांच्या मदतीसाठी देण्यात येत आहे. ‘स्पर्श फाउंडेशन’ च्या कार्यकर्त्यांनी शनिवार व रविवार सुटीचे दिवस पकडून शहरातील मोठ्या उद्यानांमध्ये तसेच जिथे पक्ष्यांना मदत होऊ शकेल, असा परिसरांमध्ये घरटी व भांडी ठेवण्यास सुरुवात केली आहे.

शहराच्या मध्यवस्तीत असलेले व वृक्षसंपदेमुळे पक्ष्यांची नेहमी गजबज असलेल्या महावीर उद्यानात प्रथम घरटी व भांडी लावण्यात आली. तसेच या परिसरात फिरण्यास येणाऱ्या नागरिकांची व लहान मुलांची संख्या प्रचंड असते. त्यांचीही संवेदनशीलता जागृत करण्यासाठी विविध घोषणांचे पर्यावरणस्नेही फलक तिथे लावण्यात आले. याबरोबर शिवाजी विद्यापीठाचा परिसर, राजारामपुरीतील मुख्य रस्त्यावरील उद्यान, आयुक्त बंगल्याशेजारील उद्यान, भारत हौसिंग सोसायटी परिसर, माळी कॉलनी, केएसबीपीचे राजाराम कॉलेजजवळील उद्यान या परिसरातही घरटी, भांडी लावण्यात आली. समर्पण फाउंडेशनच्यावतीने अन्य विविध ठिकाणी घरटी लावली आहेत. ब्रह्मपुरी पिकनिक पॉईंट येथे अनुराधा पाटील, शुभांगी घाटगे, प्रांजल घाटगे, शामल घाटगे, वैभवी चव्हाण, श्रृती चव्हाण, वेदांत चव्हाण, सोनाली चव्हाण, ज्योती चव्हाण, स्वानंद माने, रोहिते झोले, यश दुर्गुळे, शाहबाज मुजावर, विनोती नलवडे, रुतिका नलवडे, श्रद्धा पाटील या साऱ्यांनी घरटी व पाण्याची भांडी परिसरातील महिलांना व फिरण्यास येणाऱ्या नागरिकांना दिली.


पक्ष्यांसाठी शंभर घरटी

दि कॉन्झर्व्हशेन फाउंडेशन ऑफ इंडियाच्यावतीने सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील मुख्य कार्यालयाच्या आवारात पक्ष्यांसाठी शंभर घरटी लावण्यात आली. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मिळून ही सर्व घरटी लावली. अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष घेवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात कोट्यवधींचा तूर घोटाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
‘बोगस शेतकरी दाखवून व्यापाऱ्यांनी ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत तूर खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केला. हतबल तूर उत्पादकांची लूट केली. त्यासंबंधीचे पुरावे आमच्याकडे आहेत. सरकारने त्याची तातडीने चौकशी करावी, शेतकऱ्यांची तूर चांगल्या दराने खरेदी करावी, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिला.
अलिकडे खासदार शेट्टी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापुरात ४ मे रोजी भव्य मोर्चा काढण्यासाठी ते जिल्ह्यात जागृती करीत आहेत. सोमवारी तूर घोटाळ्याचे नवे प्रकरण बाहेर काढल्याने सरकारला घरचा आहेर मिळाला.
खासदार शेट्टी म्हणाले, ‘नाफेड (नॅशनल अॅग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह फेडरेशन) शेतकऱ्यांना हमीभाव देऊन तूर खरेदी करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. बोगस शेतकरी दाखवून व्यापारी आणि नाफेडच्या अधिकाऱ्यांनी संगनमत केले. तूर उत्पादकांना त्यांनी गाठले. व्यापाऱ्यांनी प्रती क्विंटल ३८०० ते ४००० रूपयांनी गेल्या दोन ते तीन महिन्यात तब्बल ३५ लाख ‌‌‌क्विंटल तूर खरेदी केली. साठा केला. ती तूर आता बाजारात प्रती क्विंटल ५ हजारांनी विकली जात आहे. तुरीचे दर पडले. उत्पादकांकडून तूर खरेदी घटली. उत्पादक शेतकरी अडचणी आला. त्यामुळे सरकारने त्वरित व्यापाऱ्यांकडे तूर आली कुठून, खरेदी कुणाकडून आणि कशी केली, ‌विकत आहेत कुठे याची चौकशी करावी. त्यांच्या गोडावूनवर धाडी टाकाव्यात. घोटाळ्यात सहभागी नाफेड अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात. दोषी व्यापाऱ्यांवर कारवाई करावी.’

घोटाळा असा....
व्यापाऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचे सातबारा जोडून तूर खरेदी केली. त्या सातबारावर तुरीची नोंद नाही. यावरून व्यापाऱ्यांनी बोगसगिरी केल्याचे स्पष्ट होते. नाफेडचे अधिकारीही त्यात सहभागी आहेत. पुरावे आमच्याकडे आहेत. ते संबंधित यंत्रणेकडे देण्यात येईल, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images