Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

राजर्षी शाहू टर्मिनसवर कार्यक्रमांची जय्यत तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू शनिवारी (ता. २५) कोल्हापुरात येत आहेत. यापार्श्वभूमीवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचे सुभोभिकरण अंतिम टप्प्यात आहे. प्रवेशद्वारासमोर भव्य मंडप घालण्याचे काम सुरू आहे. स्टेशन अधीक्षक सुग्रीव मीना यांनी गुरुवारी स्टेशनवरील कामांची पाहणी केली.

रेल्वेमंत्री प्रभू यांचे शनिवारी सायंकाळी पाच वाजता स्थानकात आगमन होणार आहे. त्यांच्या हस्ते विविध कामांचा प्रारंभ केला जाईल. मंत्री प्रभू येत असल्याने स्थानक चकाचक करण्यात येत आहे. स्थानकाची रंगरंगोटी करण्यात आली आहे. आता दिवसातून तीनवेळा स्वच्छता केली जात आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संत निरंकारी मिशन ट्रस्टच्या सहकार्याने रोपांच्या शोभिवंत कुंड्या ठेवल्या आहेत. प्रवेशद्वाराला हिरवाईचा लूक देण्यात आला आहे. स्टेशनवरील धातूशोधक यंत्रणेची तपासणी करण्यात आली. रेल्वे सुरक्षादल, पोलिस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रवाशांसोबत सौजन्याने वागण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. रात्री उशीरापर्यंत रेल्वेस्थानकावर रोषणाई करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी रेल्वेचे इलेक्ट्रिकल विभागाने तयारी केली. अधीक्षक मीना यांनी स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात झोपलेल्या काहीजणांना हटकले.

दरम्यान, रेल्वे प्रवासी संघटना शनिवारी रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहेत. कोल्हापूरच्या स्थानकाबाबतच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. मंत्री प्रभू यांच्या हस्ते कोल्हापूर ते वैभववाडी नवीन मार्गाच्या कामाचा प्रारंभ केला जाण्याची शक्यता आहे. काही विकासकामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यातील बहुतांश कामांचे लोकार्पण पुणे स्टेशनशी संबंधित आहे. कोल्हापूर स्टेशनवर होणारे कार्यक्रम व्हिडीओ कनेक्टिव्हीटीच्या माध्यमातून पुणे स्टेशनवर दाखवण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उमेद फाउंडेशनतर्फे वंचितांसाठी झटणाऱ्या व्यक्तींचा सत्कार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

उमेद फाउंडेशनच्यावतीने वंचितांसाठी झटणाऱ्या व्यक्तींचा जीवनप्रवास आणि त्यांचा सत्कार अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मूठभर धान्य, वही, पेन या मोहिमेतील मदतीही संस्थेला देण्यात येणार असून हा कार्यक्रम २६ मार्चला शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

गाताडे म्हणाले की, सांगरुळच्या या फाउंडेशनच्यावतीने ग्रामीण भागात सामाजिक कार्य सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मूठभर धान्य, एक वही-पेन या मोहिमेअंतर्गत समाजातील कोणतीही व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहू नये व उपाशीपोटी झोपी नये, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमांतर्गत ५० क्विंटल धान्य, ४२०० वह्या, ३ हजार पेन व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात अमरावती येथील प्रश्नचिन्ह शाळेचे प्रमुख मतीन भोसले, बीड जिल्ह्यातील शांतिवन सामाजिक संस्थेचे दीपक नागरगोजे आणि शाहूवाडीतील आश्रमशाळेचे बाबासो मिसाळ यांचा सत्कार व प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला रोटरी क्लब होरायझन प्रसिडेंट सचिन झंवर, व्हाइट आर्मी अशोक रोकडे, जयेश कदम, अजय किंगरे, प्रा. जयंत आसगांवरक, किशोर देशपांडे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेला नितीन गोरे, विलास पाटील, प्रकाश म्हेतर, प्रा. एस.पी. चौगले, दिगंबर पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यव्यवस्था कोलमडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर कमालीचा ताण वाढला आहे. रुग्णसेवा जवळपास कोलमडल्यारखी स्थिती आहे. सीपीआर हॉस्पिटलमध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आली असली तरीही ती तोकडीच असल्याचे जाणवत आहे. त्यातच निवासी डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील तीन हजार डॉक्टरांनी हॉस्पिटल्स बंद ठेवून पाठिंबा दिल्यामुळे अडचणी वाढू लागल्या आहेत.

डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने सुरक्षा पुरवावी, या मागणीसाठी निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. ९१ निवासी आणि त्यांना मदत करणारे प्रशिक्षणार्थी १०९ डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. या सर्वांना कोर्टाच्या आदेशानुसार कामावरुन कमी करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. दरम्यान, रुग्णसेवेचा भार वैद्यकीय महाविद्यालयाचे ३४ सहयोगी प्राध्यापक व १७ प्राध्यापकांवर असून त्यांच्याकडून बुधवारी ​दिवसभरात ७५० हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. केवळ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या आहेत.

चार-चार डॉक्टरांचा भार

डॉक्टर संपावर गेल्याने कार्यरत असलेल्या एका डॉक्टरला दिवसभरात १०० ते २०० रुग्ण तपासावे लागत आहेत. अपघातातील जखमींवर मात्र तातडीने उपचार करण्यात येत आहेत. अत्यवस्थ रुग्ण तपासण्यासाठी चार डॉक्टरांची आवश्यकता असते. पण, सध्या एका डॉक्टरला चार डॉक्टरांचे काम करावे लागत असल्याने उपचारासाठी विलंब होत आहे. प्रसूती, अपघात, अस्थिव्यंग आणि सर्जरी विभागातील सेवा कायम असली तरी रुग्णांच्या नातेवाईकांत भीतीचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅडिशनल डीजींनी घेतला कामांचा आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्याच्या अप्पर पोलिस महासंचालक (प्रशासन विभाग) डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी गुरूवारी (ता. २३) आयजी ऑफिसमध्ये कोल्हापूर परिक्षेत्रातील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. २५ पोलिसांच्या चौकशी प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली. पोलिस मुख्यालयातील उद्यानाच्या कामाची पाहणीही त्यांनी केली. उद्यानाच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि अभिनेता अक्षयकुमारला निमंत्रित करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

अप्पर महासंचालक डॉ. सरवदे यांनी प्रशासकीय कामांचा आढावा घेतला. पोलिसांच्या विरोधातील आणि पोलिसांकडून दाखल विभागीय तक्रारी निकाली काढताना त्यांनी संबंधित तक्रारदारांचे म्हणणे जाणून घेतले. परिक्षेत्रातील २५ कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण विभागातील अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावाही त्यांनी घेतला. पोलिसांची नवीन घरे, जुन्या घरांचे नूतनीकरण, पोलिस कल्याण निधीबाबत त्यांनी चर्चा केली. परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सामाजिक उपक्रमांसाठी विशेष निधी मिळावा अशी मागणी सरवदे यांच्याकडे केली. विशेषतः युवकांसाठी वक्तृत्व स्पर्धा, निर्भया पथक, तरुणांसाठी मार्गदर्शन मेळावे आदींसाठी परिक्षेत्राला ७० लाखांचा निधी मिळावा अशी विनंती त्यांनी केली. यावर सरवदे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे, असे आयजी नांगरे-पाटील यांनी दिली.

उद्यानाच्या कामाचीही पाहणी डॉ. सरवदे यांनी केली. ३१५ फूट उंचीचा राष्ट्रध्वज, वाहतूक नियमांची माहिती देणारे संग्रहालय आणि पोलिस दलाचा प्रवास उलगडून दाखवणारे उद्यान तरुणांसाठी प्रेरक ठरेल असा विश्वास त्यांनी पाहणीवेळी व्यक्त केला. कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उद्यानाच्या कामाबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले. १ मे रोजी उद्यानाचे उदघाटन होईल. उदघाटनास बोलावण्यात येत असलेल्या मान्यवरांबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची निमंत्रितांशी चर्चा सुरू असल्याचे आयजी नांगरे-पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता कोल्हापुरात डॉक्टरला मारहाण

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

मारहाणीच्या मुद्यावरुन एकीकडे राज्यातील निवासी डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असताना दुसरीकडे कोल्हापुरात खासगी डॉक्टरला रुग्णाच्या मित्रांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

कोल्हापुरातील वालावलकर रुग्णालयात विश्वनाथ काकडे हे उपचार घेत होते. त्यांच्यावर गेले चार दिवस उपचार सुरु होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र त्याच वेळी बिल कमी करण्याच्या कारणावरुन रुग्णाच्या मित्रांनी डॉ. याकूब पठाण यांना धक्काबुक्की केली. त्यामुळं रुग्णालयाच्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

डॉक्टर पठाण यांना तिघा जणांनी धक्काबुक्की केलीय. यावेळी रुग्णालयातील मनिषा खोत यांनी सतर्कता दाखवत रुग्णाच्या नातेवाईकांच्या तावडीतून पठाण यांची सुटका केली. मयूर पाटील, हसन शेख आणि माजी नगरसेवर रफिक मुल्ला अशी तीन आरोपींची नावं आहेत. तिघांपैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं, याचा तपास सुरु केला आहे. शिवाय तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापकाचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर तालुक्यात एका गावातील माध्यमिक शाळेत मुख्याध्यापकाने सातवीतील विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. मुख्याध्यापकाकडून वारंवार घडणाऱ्या या कृत्याला घाबरलेल्या विद्यार्थिनीने याची माहिती पालकांना दिल्यानंतर शुक्रवारी मुख्याध्यापक निवृत्ती साळवी (रा. बाचणी, ता. कागल) याच्या विरोधात करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकाराने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे.

याबाबत करवीर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार साळवी हा करवीर तालुक्यातील एका माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक आहे. जानेवारी २०१७ मध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल घेऊन गेल्यानंतर साळवी याने रात्रीच्या प्रवासात बसमध्ये सातवीतील विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले. याची माहिती कोणास दिल्यास शाळेतून काढून टाकण्याची धमकीही त्याने दिली होती. यानंतर दोनवेळा शाळेत साळवी याने संबंधित मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी पुन्हा असा प्रकार घडल्याने पीडित मुलीने घरी जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती आईला दिली. या प्रकाराने धक्का बसलेल्या पालकांनी करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुख्याध्यापक साळवी याच्याविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिस हवालदार तात्या मुंडे यांनी पीडित मुलीचा जबाब घेऊन साळवी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

फिर्याद दाखल होऊ नये यासाठी पीडित मुलीच्या वडिलांवर दबाव टाकण्याचे प्रयत्नही सुरू होते, अखेर शुक्रवारी रात्री उशीरा फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी मुख्याध्यापक साळवी याच्याविरोधात कडक कारवाई करावी, त्याचबरोबर त्याला सेवेतून निलंबित करण्याच्या मागणीसाठी शिक्षण अधिकाऱ्यांना भेटणार असल्याची माहिती पीडित मुलीच्या पालकांनी पत्रकारांना दिली. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांच्या सुरक्षेकडे कानाडोळा

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet : @sachinyadavMT

कोल्हापूर : एसटीत दहा पैशाची अफरातफर केली तर नोकरीतून निलंबित केले जाते. मात्र काही चालक आणि वाहक नियमभंग करूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. अनेक चालक मद्यपान करून वाहन चालवितात. तरीही त्यांच्याकडे कानाडोळा केला जातो. कामाचा अतिरिक्त ताण, मानसिक ताणतणाव, कौटुंबिक वादाचे प्रतिबिंब वाहन चालविताना दिसतात परिणाम लहान मोठे अपघात होत आहेत. अनेक चालकांच्या एका हातात स्टिअरिंग आणि दुसऱ्या हातात मोबाइल असे चित्र आहे. मार्ग तपासणी पथकाच्या नजरेतून अनेकदा हे चालक आणि वाहक सुटतात. सुरक्षा, दक्षता अधिकारी आणि मार्ग तपासणी पथकाचा धाक कोल्हापूर विभागात काहींना राहिलेला नाही. पाच वर्षांच्या कालावधी एसटीने २३८ चालकांना समज दिली आहे. चालकांच्या तपासणीसाठी ब्रेथ अल्कोहोलिक अनॉलायझर मशीन कोल्हापूर आगारात नसल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.

कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी बस (एमएच १४ बीटी ३००८) बसचा चालक संभाजी गोविंद पोवार (रा.बलवडी, ता.खानापूर, जि. सांगली) दारूच्या नशेत बस चालवत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने कोडोली पोलिसांच्या ताब्यात दिले. ही बस रत्नागिरी आगाराची होती. हा मार्ग घाटांतून जाणारा असल्याने असे चालक प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याचा प्रकार समोर आला.

सध्या कोल्हापूर विभागात चालकांची संख्या १७७६ आहे. लांब पल्ल्याच्या मार्गासाठी अनेकदा एकच चालक दिला जातो. काही रोजंदारीवर चालकांना जादा काम दिले जाते. तर कायमस्वरुपी चालकाला काम कमी असल्याची तक्रार एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी पुणे विभागीय कार्यालयाकडे केली. मात्र त्या तक्राराची दखल घेतलेली नाही. लांब पल्ल्याच्या एसटी नेण्यासाठी स्थानकप्रमुखांकडून ड्युटी दिली जाते. यावेळी चालकांची कोणतीही तपासणी केली जात नाही. त्यांची ब्रेथ अल्कोहोलिक अनॉलायझर मशीनकडून तपासणी गरजेची आहे. मध्यवर्ती बसस्थानकासह कोल्हापूर विभागाच्या १२ आगारात तपासणी केली जात नाही. गत वर्षभराच्या कालावधीत चालक आणि वाहकांच्यासाठी प्रबोधनाची मोहीम राबविण्यात आली. यामधये ताणतणाव दूर करण्यासाठी योगशिबिर घेण्यात आले. वाहन चालविताना मन स्थिर राहण्यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. मानसोपचार तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. प्रत्यक्षात मात्र एका एसटीत ५० प्रवाशांची सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या चालकांची तपासणी केली जात नाही. कोल्हापूर विभागात या प्रकारची तपासणी करण्याची कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगलीसह अन्य आगारातील चालक आणि वाहकही कोल्हापूर आगारातून अन्य मार्गावर धावतात. त्यांचीही तपासणी गरजेची आहे.

०००

नियमबाह्य वर्तन केले की एसटी काय होते, याची पूर्वकल्पना प्रत्येक कर्मचाऱ्याला आहे. त्यामुळे सहसा दारुच्या नशेत वाहन चालविण्याचा प्रकार कोल्हापूर विभागात होत नाही. दर महिन्याला चालकांचे समुपदेशन केले जाते. प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा संशय आल्यास तातडीने कोल्हापूर विभागीय कार्यालयात किंवा जवळच्या स्थानकात संपर्क साधावा.

नवनीत भानप, विभाग नियंत्रक

०००

तो चालक निलंबित

कोल्हापूर विभागाने चालक संभाजी पोवारने केलेल्या वर्तनाची माहिती रत्नागिरी आगाराला कळविली आहे. त्यांच्या विरोधात कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्या प्रकरणी चालक पोवारला रत्नागिरी विभागाच्या विभाग नियंत्रकांनी निलंबित केले आहे.

००

कोल्हापूर विभाग

१२ बसस्थानके

एसटी संख्या ७५०

चालक १७७६

वाहक १८०९

कार्यशाळा कर्मचारी ९१५

००

४० वर्षावरील

चालक १०२८

वाहक ९७६

कार्यशाळा ४८२

००

दक्षता कागदावरच

पुणे स्वारगेट येथे संतोष माने या मनोरुग्ण चालकाने एसटी बसस्थानकातून बस एसटी पळविली होती. त्यामध्ये आठ पादचाऱ्यांच्या जीवावर बेतले. त्यानंतरही कोल्हापूर बसस्थानकात दोन दिवसांसाठी सुरक्षा मोहिम राबविली. २०१२ मध्येही कोल्हापूर-सोलापूर बसचे ( एसटी क्रमांक बीटी ०९६५) चालक बाबासाहेब कोळी बसमध्ये झोपले. त्याने अचानक बस सुरू करून शंभर किलोमीटरचा पल्ला गाठत सांगोल्यापर्यंत पल्ला गाठला. त्या प्रकारणी एसटी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी कारवाई केली होती. कोल्हापूर विभागातही मद्यपान करणाऱ्या चालक वाहकांचा अहवाल पुणे प्रादेशिक विभागाला दिला होता. मात्र या अहवालात काही संघटना प्रमुखांच्या सांगण्यावरून करण्यात आला. दोन संघटनांच्या वर्चस्ववादात निव्यर्सनी असलेल्यांची नावे यादीच टाकली होती. सध्याही सुरक्षा आणि दक्षता पथकाकडून ठाम कारवाई केली जात नाही.

०००

समुपदेशन चालक, वाहक (मार्च २०१६ ते फेब्रुवारी २०१७)

मार्च ८३

एप्रिल ८२

मे ७९

जून ७७

जुलै ६१

ऑगस्ट ७४

सप्टेंबर ८२

ऑक्टोबर ९१

नोव्हेंबर ७७

डिसेंबर ८०

जानेवारी ७९

फेब्रुवारी ७९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजाराम बंधाऱ्यावरून पडून शिक्षकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम हायस्कूलचे शिक्षक शहाजी बाबूराव मासाळ (वय ४६ ) यांचा राजाराम बंधाऱ्यावर चक्कर येऊन नदीत पडल्याने शुक्रवारी मृत्यू झाला. सायकलला बांधलेल्या वैरणीचा भारा घेऊन येत असताना त्यांचा चक्कर आली. भारा पिलरला लागल्याने ते नदीत पडले.

याबाबत अधिक माहिती अशी, मासाळ शुक्रवारी वैरण आणण्यासाठी शेताकडे गेले होते. बंधाऱ्यावरून कसबा बावड्याकडे येत असताना त्यांना बंधाऱ्याच्या मध्यावर आल्यानंतर चक्कर आली. सायकलला बांधलेला भारा पिलरला लागल्याने त्यांचा तोल गेला व ते नदीत पडले. त्यांना पोहता येत नसल्याने आणि पाण्याच्या प्रवाहाने ते पाण्यात बुडाले. त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न करून मदतीसाठी हात वरती केला. पण पाण्याचे वेग असल्याने ते वाहून गेले. तेथे असणाऱ्या महिलांनी आरडाओरडा केला, तसेच तरुणांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. तरुणांनी मासाळ यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शक्य झाले नाही. ही घटना समजताच बावड्यातील तरुणांनी पाण्यात उतरून शोधकार्य चालू केले. अडीच तासानंतर दुपारी साडेतीन वाजता त्यांचा मृतदेह सापडला. राहुल भोजने या विद्यार्थ्याने त्यांचा मृतदेह पात्राबाहेर आणला.

सीपीआरमध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या अपघाताची माहिती समजताच कुटुंबीयांसह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. सांयकाळी साडेसहाच्या दरम्यान कसबा बावडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मासाळ यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, वडील, दोन भाऊ. असा परिवार आहे. छत्रपती राजाराम हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक होते. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते असलेले मासाळ कसबा बावडा परिसरात परिचयाचे होते.

नशीब बलवत्तर म्हणून

वरच्या धरणातून पाणी सोडण्याअगोदर एक दिवस अगोदरच यवलूज चा तरुण या बंधा ऱ्यावरून पडला. त्यांच्या डोक्याला हेल्मेट असल्याने व पाणी कमी असल्याने तो वाचला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पासपोर्टसाठी केवळ तीनच पुरावे

$
0
0

कोल्हापूर ः आधारकार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र आणि पॅनकार्ड असेल तर यापुढे पोलिस व्हेरिफिकेशनशिवाय पासपोर्ट देण्यात येणार आहे. यामुळे पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा फटका पासपोर्टधारकांना बसणार नाही. ‌शिवाय अनाथ, दत्तक, घटस्फोटितांनाही सहज पासपोर्ट मिळण्याची सोय करण्यात आली आहे. या कार्यालयातील कागदपत्रांचे जंजाळ कमी केल्याने तीन महिन्यांत पासपोर्ट मागणीत तीस टक्के वाढ झाली आहे.

पासपोर्टसाठी लागणाऱ्या ढीगभर कागदपत्रांच्या मागणीमुळे संबंधिताची दमछाक होत असे. आता मात्र या प्रक्रियेत सुलभता आली आहे. विशेषतः या खात्याचे सचिव म्हणून ज्ञानेश्वर मुळे यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक बदल केले. यामुळे पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या तीन महिन्यांत तीस टक्के वाढली. पासपोर्ट काढताना पोलिस व्हेरिफिकेशनला फार वेळ लागतो. त्यामुळे तो तत्काळ मिळत नाही. यापुढे आधारकार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र आणि पॅनकार्ड असेल तर पोलिस व्हेरिफिकेशनशिवायही पासपोर्ट मिळणार आहे. संबं​धितांनी आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यायचे आहे. पासपोर्ट दिल्यानंतर पोलिस व्हेरिफिकेशन होणार आहे.

अनाथ, दत्तक व घटस्फोटित, घटस्फोटितांची मुले आणि विधवांना पासपोर्ट काढताना अनेक अडचणी येत होत्या. या अडचणीही दूर करण्यात आल्या आहेत. अनाथआश्रमाच्या एका पत्रावर अनाथांना पासपोर्ट मिळणार आहे. त्याच्या आईवडिलांच्या पुराव्याबाबत कागदपत्राची गरज भासणार नाही. घटस्फोटित कुटुंबाच्या मुलांनाही ते राहत असलेल्या आई अथवा वडिलांच्याच कागदपत्रांचा पुरावा द्यावा लागेल. सन्याशी व साधू लोकांनी त्यांच्या गुरूबाबत सरकारी नोंदीचा पुरावा दिला तर त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

ना एजंट, ना नोटरी

पासपोर्ट काढताना एजंट किंवा कोणतेही कागदपत्र नोटरी करण्याची गरज नाही. यामुळे अतिशय कमी रकमेत पासपोर्ट मिळणार आहे. यासाठी लागणारे कोणतेही प्रतिज्ञापत्र केवळ साध्या कागदावर करायचे आहे. पासपोर्ट काढताना जन्मतारखेच्या दाखल्याबाबत अनेकदा अडचणी येतात. मात्र आता सरकारी नोंदीतील जन्मतारखेचा कोणताही पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. आता असलेली विवाह नोंदणी प्रमाणपत्राची सक्ती रद्द करण्यात आली आहे. केवळ एका कागदावर आपल्या सहीने विवाह झाल्याचे लिहून दिल्यास तेही ग्राह्य धरण्यात येणार आहे.


प्रक्रियेत सुलभता

ज्ञानेश्वर मुळे यांनी परराष्ट्र खात्याचे सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर पासपोर्ट काढण्याच्या प्रक्रियेत अतिशय सुलभता आणली. पुराव्यांच्या कागदपत्रांची संख्या १५ वरून नऊपर्यंत खाली आणली. पोस्टात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेत जवळपास पाचशे कोटींची बचत करण्यात आली. देशातील ६५० पोस्टांत दोन वर्षांत ही कार्यालये सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.


भारतातील कोणत्याही व्यक्तीला सहजपणे पासपोर्ट काढता यावा, यासाठीच अनावश्यक कागदपत्रांचा पुरावा कमी करण्यात आला आहे. याचा फायदा झाला असून, तीन महिन्यांत पासपोर्टसाठी येणाऱ्या अर्जात तीस टक्के वाढ झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ज्ञानेश्वर मुळे, सचिव, परराष्ट्र खाते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीट परीक्षेचे कोल्हापुरात केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नवीन २३ केंद्रांना मान्यता दिली असून यामध्ये कोल्हापूरचाही समावेश केला आहे. त्यामुळे येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूरसह सातारा, अमरावती व अहमदनगर जिल्ह्यातील केंद्रावरही नीट परीक्षा होणार हे. एमबीबीएस, बीडीएसप्रमाणे बीएचएमएस, बीएएमएस, बीयूएमएस वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा अनिवार्य केली आहे. त्यामुळे २०१७-१८ च्या अभ्यासक्रमासाठी सात मे रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. मात्र या परीक्षेसाठी राज्यातील केवळ मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे व नागपूर या सहा केंद्राचा समावेश होता. त्यामुळे इतर जिल्ह्यातील परीक्षार्थींना परीक्षा केंद्रासाठी चांगलीच धावपळ उडणार होती. याबाबत अनेक विद्यार्थी संघटना व राजकीय पक्षांनी केंद्रे वाढवण्याची मागणी केली होती.

शुक्रवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवीन २३ केंद्राची घोषणा केली. त्यात कोल्हापूर येथील केंद्राचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळा-पाणीपट्टीवाढ फेटाळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रस्तावित घरफाळा आणि पाणीपट्टीवाढीला विरोध करत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने दोन्ही करवाढीचे प्रस्ताव फोटाळून लावले. या प्रस्तावावरुन सभागृह आणि प्रशासन आमनेसामने उभे ठाकले होते. यापूर्वी सभागृहात दोन वेळेला सर्वपक्षीय नगरसेवकांनी करवाढीला विरोध केल्यामुळे शुक्रवारच्या सभेत औपचारिकताच शिल्लक होती. अधिकाऱ्यांनी योग्य प्रस्ताव सादर केला नाही, विविध पर्याय सुचवूनही प्रशासनाने त्या अनुषंगाने चर्चा केली नसल्याचा आक्षेप ठेवत नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध केला. सभागृहाने नामंजूर केलेले करवाढीचे प्रस्ताव प्रशासनाने सरकारकडे विखंडीत करण्यासाठी पाठवू नयेत, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.

सभेत वादळी चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. सर्वपक्षीय नगरसेवक दोन्ही करवाढीच्या विरोधात एकवटले. करवाढीच्या फेरप्रस्तावासंदर्भात अधिकाऱ्यांनी नियोजन किंवा योग्य प्रस्ताव तयार केल्याचे सभागृहात दिसले नाही. आक्रमक सभागृह आणि हताश प्रशासन असेच चित्र यावेळी पाहायला मिळाले. करवाढीबाबतच्या नगरसेवकांच्या आक्षेपांना प्रशासनाकडून उत्तरेही दिले नाहीत. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी सभागृहाने घरफाळा आणि पाणीपट्टीवाढ नामंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने करवाढीबाबत कसलाही प्रस्ताव सादर केला नाही, गटनेत्यांशी चर्चा केली नाही. त्यामुळे सभागृह प्रशासनाचा निषेध करत आहे, असे सांगितले.

प्रा. जयंत पाटील यांनी प्रशासनाच्या कारभाराची लक्तरे काढताना नगरसेवक गेली महिनाभर घरफाळा आणि पाणीपट्टी प्रस्तावाबाबत प्रशासनाला योग्य प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करत आहेत. पाणीपट्टीच्या थकीत रकमेवरील दंडात सवलत देण्यासाठी आयुक्तांना त्यांच्या अखत्यारित निर्भया योजना सुरु करण्याचा अधिकार आहे. सवलत योजनेमुळे उत्पन्न वाढले असते. शिवाय सभागृहाकडूनही व्यापार प्रकारातील पाणीबिलात वाढ करण्यास मंजुरी मिळाली असती. पण प्रशासनाकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आक्षेप ठेवला.



नागरिकांवर कसल्याही प्रकारची करवाढ नको अशी सभागृहाची पहिल्यापासून भूमिका होती. प्रशासनाला तसे आधीच कळविले होते. शुक्रवारच्या सभेत घरफाळा आणि पाणीपट्टीवाढीचे प्रस्ताव फेटाळले आहेत.

महापौर हसीना फरास


प्रशासनाचे करवाढीतून वीस कोटीच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट होते

महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने रेडीरेकनरनुसार घरफाळा आकारणी आणि पाणीपट्टीत तीस टक्क्यांनी वाढ हे प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहासमोर होते. प्रशासनाने घरफाळा वाढीतून १२ कोटी तर पाणीपट्टीत आठ कोटींची वाढ अपेक्षित धरली होती. मात्र भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीमुळे घरफाळ्यात भरमसाट वाढ होऊन नागरिकांचे कंबरडे मोडणार असल्याचे सांगत नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता. करवाढीला विरोध करत सोमवारची (ता.२० मार्च) सभा तहकूब केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पुलासाठी पंतप्रधानाचे आश्वासन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुरातत्व खात्याच्या मंजुरीकडे बोट दाखवून ​येथील ब्रिटीशकालीन शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाच्या कामावर घालण्यात आलेल्या निर्बंधाबाबत तातडीने मार्ग काढण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या. जनतेच्या सुरक्षेशी खेळता कामा नये, असे सांगत पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना शुक्रवारी दिले. यामुळे पुरातत्त्व कायद्यात आवश्यक दुरुस्ती होण्याची आशा वाढली आहे.

शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे काम सुरू आहे. ७० टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले असून शहराच्याबाजूने असलेल्या पुलाचे काम पुरातत्त्व विभागाच्या निर्बंधामुळे रखडले आहे. याबाबत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी शिवाजी पुलाबाबत कायदा व न्याय मंत्रालयाकडे कायद्यात दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवला. पण, कायदा व न्याय मंत्रालयाकडून कायद्यात कोणत्याही प्रकारचे बदल करता येत नसल्याचे दोन्ही मंत्र्यांना कळवण्यात आले होते. कायद्यात दुरुस्ती करायची असेल तर त्याचे सर्वस्वी अधिकार संसदेला आहेत. त्याचे गांभीर्य ओळखून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेमधील कार्यालयात भेट घेतली. सुमारे वीस मिनिटे संभाजीराजे छत्रपतींनी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या शिवाजी पुलाचे काम पुरातत्त्व विभागाने घातलेल्या निर्बंधामुळे रेंगाळले असल्याचे संभाजीराजे यांनी पंतप्रधानांना सांगितले.

यासाठी पुरातत्त्व खात्याची मंजुरी आवश्यक असल्याने उर्वरित काम ठप्प झाले. महाडसारखी दुर्घटना होऊ नये, यासाठी तत्काळ मार्ग काढावा, असे संभाजीराजे छत्रपतींनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणले. पंतप्रधानांनी गांभीर्य ओळखून खासगी सचिव राजीव टोपनो यांना बोलावून याप्रश्नी तातडीने मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. जनतेच्या सुरक्षेशी खेळता कामा नये, असेही ते म्हणाले. हा प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिलाच्या वादातून डॉक्टरला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रुग्णाला डिस्चार्ज देताना बिलावरून झालेल्या वादातून उद्यमनगरातील वालावलकर लक्ष्मीनारायण ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला बेदम मारहाण केली. शुक्रवारी (ता. २४) दुपारी दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेत डॉ. याकूब नजरखान पठाण (वय ३८, रा. लोहार गल्ली, कागल) जखमी झाले आहेत. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी मयूर दत्तात्रय पाटील (२३) आणि हसन रफिक शेख (दोघेही रा. बागल गल्ली, यादवनगर) या दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. हल्लेखोरांपैकी माजी नगरसेवक रफिक मुल्ला फरार आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यभरात डॉक्टरांनी गेली चार दिवस काम बंद केले होते. हा मुद्दा हायकोर्टासह राज्याच्या विधानसभेतही गाजला असतानाच कोल्हापुरात नातेवाईकांनी डॉक्टराना लक्ष्य केले. कराडमधील विश्वनाथ काकडे यांना चार दिवसांपूर्वी मधुमेहावरील उपचारासाठी वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांचे बिल १५ हजार रुपये केले होते. याबाबत नातेवाईकांनी आक्षेप घेतला. शाब्दिक वादानंतर मयूर पाटील, हसन शेख आणि माजी नगरसेवक मुल्ला या तिघांनी डॉ. पठाण यांना मारहाण केली. यावेळी हॉस्पिटलमधील कर्मचारी मनीषा खोत यांनी सतर्कता दाखवत डॉ. पठाण यांना हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवले. या घटनेने रुग्णालयात प्रचंड तणाव निर्माण झाला. त्याचबरोबर रुग्णांतही भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाटील आणि शेख या दोघांना अटक केली. मात्र मुल्ला फरार झाला.

घटनेची माहिती शहारातील खासगी डॉक्टरांना मिळताच त्यांनी वालावलकर हॉस्पिटलमध्ये गर्दी केली. जखमी डॉ. पठाण यांच्यासह इतर डॉक्टरांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात जाऊन संशितांविरोधात फिर्याद दाखल केली. डॉक्टर पठाण यांच्यावर सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलवले आहे. हल्लेखोरांविरोधात पोलिसांनी तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्ड्रिंक मार्केट हाउसफुल

$
0
0


satish.ghatage@timesgroup.com

twitter:@satishgMT

कोल्हापूर ः खुळुखुळू घुंगरांच्या तालावर चरकात निघणारा उसाचा रस, चित्रपटाच्यागृहाच्या बाहेर ‘थंडगार लेमन,’ ची पल्लेदार जाहिरात करणारे विक्रेते, ताक, लस्सी, विक्री करणाऱ्या डेअऱ्या आणि कोल्ड्रिंक हाउसमध्ये सरबत, ज्यूस आणि शेक असे थंडगार पदार्थ... उन वाढेल तसे ज्यूस, सरबत आणि अन्य थंडगार पदार्थांचे मार्केट तेजीत आले आहे. सकाळी दहा ते मध्यरात्री उशिरापर्यंत हातगाड्या कोल्ड्रिंक आणि रसवंतीगृहात हाउसफुल्ल गर्दी असते. फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत सरबत व ज्यूसच्या मार्केटमध्ये शंभर ते दीडशे कोटींची उलाढाल होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

उन्हाळा सुरु झाला की शीतपेयांच्या जाहिरातींचा मारा होत असतो. पण, शीतपेयांपेक्षा ग्राहक आजही पारंपरिक सरबत, रसालाच पसंती देतात. रस्त्यावरील गाड्यापासून मॉलपर्यंत सरबत, ज्यूस मिळतात. सर्व सरकारी कार्यालये, चित्रपटगृहे, बसस्टॉप आणि मंदिरांबाहेर सरबत, सोड्याच्या गाड्या पाहायला मिळतात. कोल्हापूर शहरात १०० हून अधिक कोल्ड्रिंक्स दुकाने आहेत. घट्ट दही आणि मलईपासून तयार केलेल्या लस्सी आणि ताकाचे मार्केटही सध्या तेजीत आहे.

सरबतमध्ये लिंबू, कोकम, वाळा (खस), ऑरेंज, लेमन या सरबतांपैकी लिंबू व कोकम सरबताला सर्वांत जास्त मागणी आहे. लिंबू सरबत तयार करण्यासाठी काही ठिकाणी लिंबू वापरतात तर बहुतांश ठिकाणी सिरप अथवा इसेन्स वापरतात. साखर, पाणी आणि सोड्याचा वापर करुन ही सरबते बनवली जातात. कोल्डिंक हाउसमध्ये ग्राहकांसमोर सरबत बनवली जात असल्याने सरबताच्या वासाचा फिल ग्राहकाला येतो. काही ठिकाणी अगोदर तयार सरबत करुन विक्री केली जातात. सध्या सरबत व ज्यूस विक्री करणाऱ्या मोबाइल व्हॅनही जागोजागी दिसू लागल्या आहेत. एकाच व्हॅनमध्ये इसेन्स आणि सोडा मिक्स करुन ते १० रुपयाला सरबत दिले जाते. उन्हाची तीव्रता वाढेल तशी घट्ट लस्सी, ताकालाही मागणी वाढू लागली आहे.

सरबतासाठी इसेन्स आणि सिरपची उलाढालही मोठी आहे. मोठमोठ्या कंपन्या इसेन्स व सिरपमध्ये उतरल्या आहेत. इसेन्सचा वापर कोल्ड्रिंक हाउसमध्ये केला जातो. साखर व सोड्याचे योग्य ते प्रमाण करुन ५०० मिलीलिटर इसेन्सच्या बाटलीत १० ते १५ हजार ग्लास सरबत तयार होतो. सिरप घट्ट असते. त्यात साखर व फळांचा रस असतो. घरात याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कोल्ड्रिंक हाउसमध्ये दुधाचा वापर करुन चिकू, अॅपल, मँगो, पायनापल, थंडाई, पिस्ता, स्ट्रॉबेरी, वेनिला हे शेक तयार केले जातात. शेकमध्ये तयार फळांचा वापर करण्याकडे कटाक्ष असतो. बड्या कंपन्यांचे पॅकबंद ज्यूसही बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तयार पेरु, अॅपल, आंबा, मिक्स फ्रूट ज्यूसही बाजारात आणले आहेत. बहुतांशी घरात फ्रीज असल्याने अशा पॅकबंद ज्यूसचा वापर करता येतो. एका लिटरमध्ये तीन ते पाच ग्लास ज्यूस मिळतो.

मँगो नव्हे पपईचा गर

उन्हाळा सुरू झाल्यावर रस्त्यांवर मँगो ज्यूसचे स्टॉल झळकू लागतात. मँगो ज्यूससाठी आंबा, दुधाचा वापर करावा लागतो. दूध ५० रुपये लिटर व आंबा ४०० रुपये डझन असल्यामुळे ओरिजनल आंब्याचा गर वापरण्याऐवजी मँगो पल्पचा वापर केला जातो. मँगो पल्प पपईच्या गरात इसेन्स घालून तयार केला जातो. दूध, पाणी मिसळून त्यात पपईपासून बनवलेला मँगो पल्प घालून केलेला हा ज्यूस दहा रुपयाला विकला जातो. ओरिजनल मँगो पल्पमध्ये जिभेला केसर जाणवते. ओरिजनल मँगो पल्पचा दर ४५० ते ५०० रुपये इतका आहे.


सरबत व ज्यूसचा व्यवसाय चार महिने चालतो. फळांबरोबर सिरप, इसेन्सचा वापर करुन सरबत व ज्यूस तयार केला जातो. शहरात कोल्डिंक्सची १०० हून अधिक दुकाने असून ग्राहकांच्या पसंतीनुसार सरबत, ज्यूस तयार करून दिले जातात. चार महिन्यांत या व्यवसायात मोठी आर्थिक उलाढाल होते.

साहील उदय शिंदे (गवळी), कोल्ड्रिंक व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाचे अंदाजपत्रक ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाने विद्यार्थी केंद्रीत, विद्यार्थी आणि शिक्षकांमधील संशोधनवृत्तीला चालना देणारा व विद्यापीठ कर्मचाऱ्यांना गृह कर्जासाठी भरीव तरतूद असलेले अंदाजपत्रक सादर केले. व्यवस्थापन परिषदेने सादर केलेल्या अंदाजपत्रकाला शुक्रवारी अधिसभेने मंजुरी दिली. २०१७ - १८ च्या अंदाजपत्रकामध्ये संशोधनवृत्ती वाढवण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार व बेटी बचाव अभियानासाठी अनुक्रमे ५० व तीन लाखांची तरतुद केली आहे. विद्यापीठाने प्रथमच ऑनलाइन पद्धतीने अंदाजपत्रकाचे सादरीकरण केले.

विद्यापीठाचे वित्त व लेखा समितीने विविध विभागाने केलेल्या आर्थिक तरतुदी, त्यांच्याकडील वार्षिक जमा व खर्च याचा अंदाजपत्रक समितीने प्रत्यक्ष आढावा घेऊन २०१७-१८ चा अंदाजपत्रक मसुदा तयार केला. मसुदा समितीने व्यवस्थान परिषदेस सादर केल्यानंतर व्यवस्थापन परिषदेने अधिसभेच्या मान्यतेसाठी सादर केला. जमा ३४१ कोटी ५१ लाख आणि ३४४ कोटी २८ लाख अशी दोन कोटी ७७ लाख रुपयांच्या तुटीच्या अंदाजपत्रकाला मान्यता मिळाली. सदरची तूट विद्यापीठाच्या शिलक्क रकमेतून भरुन काढण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

देखभालीसाठी ७६ कोटी ३२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. विद्यापीठ विकासासाठी ३१ कोटी २२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर वेतनावर ७० कोटी ७६ लाखांची तरतूद केली आहे. अंदाजपत्रकामध्ये खर्चाची बाजू जास्त दिसत असली, तरी विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोग, केंद्र व राज्य सरकार निधी, डीएसटी व पंचवार्षिक योजनामधून येणाऱ्या निधीवर अवलंबून राहावे लागणार आहे. तरीही विद्यापीठाने विद्यार्थी व शिक्षकांमधील संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी भरीव तरतूद केली आहे. गोल्डन ज्युबिली स्कॉलरशीप व सुवर्ण महोत्सवी वर्षातील संशोधक विद्यार्थी व शिक्षकांसाठी सात लाखांची तरतूद केली आहे. यावर्षीपासून उत्कृष्ट संशोधक शिक्षक व विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून त्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. सर्वोत्कृष्ट विभाग योजनेतंर्गत विद्यापीठातील सायन्स व अभियांत्रिकी विभागासाठी वीस लाखांची अंदाजपत्रकात तरतूद केली असून विद्यापीठातील गृहकर्ज योजना मंजूर केली असून त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी अधिसभेस अंदाजपत्रक सादर केले. अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. डी. टी. शिर्के, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगले, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, अधिष्ठाता डॉ. वासंती रासम, डॉ. पी. डी. राउत, डॉ. ए. एम. गुरव, डॉ. पी. एस. पाटील, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, विद्यार्थी कल्याण मंडळाचे सचिव डॉ. आर. व्ही. गुरव यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते.

विभाग जमा रक्कम खर्च रक्कम

देखभाल ७६ कोटी ३२ लाख ९१ कोटी ८९ लाख

विकास ३१ कोटी २२ लाख ३१ कोटी २२ लाख

वेतन ७० कोटी ७६ लाख ७० कोटी ८९ लाख

एजन्सी स्कीम ५४ कोटी ७५ लाख ३२ कोटी ०१ लाख

निलंबन लेखे १०८ कोटी ४४ लाख ११८ कोटी २५ लाख

एकूण ३४१ कोटी ५१ लाख ३४४ कोटी २७ लाख


राज्यातील पहिलाच प्रयत्न

शिवाजी विद्यापीठाने प्रथमच ऑनलाइन अंदाजपत्रक सादर केले. ऑनलाइनअंदाजपत्रक सादर करणारे राज्यातील पहिले विद्यापीठ असल्याचा बहुमान शिवाजी विद्यापीठाला मिळाला आहे. ऑक्टोबरपासून यासाठी विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाचे काम सुरू होते. यासाठी विद्यापीठाच्या विविध विभागासह ८० जणांकडे लॉगइन दिले होते. त्यानुसार सर्व विभागानी ऑनलाइन अंदाजपत्रकातील तरतुदी दिल्या होत्या. यापुढे कोणत्याही विभागाने खर्चाचा तपशील ऑनलाइन पद्धतीने दिल्यानंतर त्याची नोंद होणार असल्याने यापुढे अंदाजपत्रक सादर करताना वित्त व लेखा विभागाला तीन ते चार महिने अगोदार तयारी करावी लागणार नाही.



सुधारित अंदाजपत्राकात ११ कोटी ११ लाख रुपयांची वाढ

१४ कोटी रुपयांची खर्चामध्ये वाढ केली.

संशोधक विद्यार्थ्यांसाठी सात लाखांची शिष्यवृत्ती

इ-लर्निंग अंतर्गत टॅबसाठी तीन लाख रुपये

संलग्न कॉलेजमधील संशोधक शिक्षकांसाठी सहा कोटी ५० लाख

पदवीस्तरावरील विद्यार्थ्यांसाठी पाच कोटी

नोंदणीकृत संशोधन विद्यार्थ्यांसाठी एक कोटी

छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कारांसाठी ५० लाख

उत्कृष्ट संशोधक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी एक लाखाचा पुरस्कार

विद्यापीठ कर्मचारी गृह कर्ज योजना एक कोटी रुपये


कोट

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास संशोधनवृत्तीला चालना देणारे विद्यापीठाचे अंदाजपत्रक आहे. विद्यार्थी वसतीगृह, शैक्षणिक सहल आणि विद्यार्थ्यांचे कौशल्य व क्षमता वाढवण्यावर अंदाजपत्रकामध्ये भर दिला आहे. पेपरलेस प्रशासनाच्यादृष्टीने ऑनलाइन कार्यप्रणालीवर भर देऊन जास्तीत-जास्त तंत्रज्ञानावर भर पुढील काळात देण्यात येणार आहे.

डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सव्वा वर्षात इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पासपोर्टमधील बनावटगिरी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सव्वा वर्षात इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट उपलब्ध होतील, अशी माहिती परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोस्ट ऑफ‌िसमध्ये सुरू होणारे राज्यातील पहिले पासपोर्ट कार्यालय शनिवारी (२५) कोल्हापुरात सुरु होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, ‘पासपोर्ट ही काळाची गरज बनली असून पासपोर्ट हे चैनीची वस्तू नसून प्रगतीचे महाद्वार आहे. शिक्षण, नोकरी, पर्यटन, नातेवाईकांची भेट, मनोरंजनासाठी भविष्यात पासपोर्ट आवश्यक आहे. पासपोर्टमध्ये तंतोतंतपणा आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करुन पुढील वर्षी इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट उपलब्ध केला जाणार आहे. या पासपोर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक चीप असणार आहे. पासपोर्टच्या प्रत्येक पानावर गुप्त अॅप्लिकेशन राहणार असल्याने पासपोर्टमधील बनवेगिरी बंद होणार आहे. नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये इलेक्ट्रॉनिक पासपोर्टसाठी लागणारी छपाई सुरू झाली आहे. पुढील सव्वा वर्षात पासपोर्ट उपलब्ध होणार आहेत.’

ते पुढे म्हणाले, ‘गेल्या ७० वर्षांत देशात पासपोर्ट काढणारी फक्त ९० कार्यालये होते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज्य व पोस्ट खात्याच्या सहयोगातून देशात आणखीन ९० पासपोर्ट कार्यालये वर्षात सुरु होणार आहेत. त्यातील १८ कार्यालये सुरू झाली आहेत. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात फक्त साडेसात कोटी लोकांच्याकडे पासपोर्ट आहे. सध्या वर्षाला सव्वा कोट पासपोर्ट आम्ही देऊ शकते. हा वेग लक्षात घेता देशातील सर्व नागरिकांना पासपोर्ट देण्यासाठी सव्वाशे वर्ष लागतील. म्हणून प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोल्हापुरातील पासपोर्ट कार्यालयासाठी खासदार धनंजय महाडिक, खासदार राजू शेट्टी, खासदार संभाजीराजे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. ​अमित सैनी, कोल्हापूर पोस्ट ऑफिस प्रवर अधीक्षक रमेश पाटील यांच्या प्रयत्नातून व सहकार्यातून पासपोर्ट ऑफ‌िस सुरू होत आहे. पोस्टात कार्यालये सुरू केल्याने मोठी बचत झाली आहे.कोल्हापुरात रोज ५० व्यक्तींना पासपोर्ट दिले जाणार असून पुढील सात दिवसातील पासपोर्ट काढणाऱ्यांना वेळा देण्यात आल्या आहेत. कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्टची काढण्याची संधी मिळणार आहे. पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या पाहता कोल्हापुरात रोज २०० व्यक्तींना पासपोर्ट देण्याची सोय करण्यात आली आहे.’

पत्रकार परिषदेला क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार उपस्थित होते.


तीन खासदारांच्या उपस्थितीत उद्‍घाटन

रमणमळा येथील प्रधान पोस्ट ऑफ‌िसच्या कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे, महापौर हसीना फरास, महाराष्ट्र गोवा जनरल पोस्ट मास्टर विनोदकुमार वर्मा यांच्या उपस्थितीत पासपोर्ट कार्यालयाचे उद्‍घाटन होणार आहे.

पोलिसांकडून पडताळणी होईना

पासपोर्ट नोंदणीनंतर पासपोर्ट काढणाऱ्या व्यक्तींना पडताळणी केली जाते. कोल्हापूर पोलिसांचे पासपोर्ट कागदपत्रांची पडताळणी अतिशय संथ असून त्यासंदर्भात पोलिस प्रशासनाला पत्र पाठवण्यात येणार आहे. तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यासमवेत चर्चा केली जाईल, असे मुळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांच्या सुरक्षेकडे कानाडोळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासगी कंपनीकडून शहरात सुरु असलेल्या मिळकतींच्या सर्व्हेत मोठ्या प्रमाणात तोडपाणी होत आहे. कंपनीचे कर्मचारी मिळकतधारकांकडे उघडपणे पैसे मागत मिळकतीच्या नोंदी सोयीनुसार करत आहेत. सर्व्हेच्या नावाखाली लूटमार होत असताना महापालिकेचे अधिकारी त्यांना पाठीशी घालण्यामागील गौडबंगाल काय? अशा फैरी झाडत नगरसेवकांनी सायबर टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवरील कारवाईसाठी आक्रमक बनले. नगरसेवक राहुल चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांकडून मिळकतधारकाकडे पैसे मागत असल्याचे रेकॉर्डिंग सभागृहाला ऐकवित संबंधित कर्मचाऱ्यावर तत्काळ कारवाईची आग्रही राहिले.

शहरातील मिळकतींचा सर्व्हे करणाऱ्या सायबर टेक कंपनीच्या कामकाजाविषयी नगरसेवकांच्या तक्रारीची दखल घेत आयुक्त पी. शिवशंकर यांनी या प्रकरणाची स्वत: चौकशी करुन कारवाईची ग्वाही सभागृहाला दिली. महापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. नगरसेवक राहुल चव्हाण यांनी प्रभागातील एका नागरिकाला मोबाइलवरुन संपर्क साधत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्व्हे दरम्यान किती पैसे मागितले हे सभागृहाला ऐकविले. संबंधित कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार? असा सवाल उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना केला. शिवसेनेचे गटनेते नियाज खान, अभिजित चव्हाण हे आक्रमक होत कारवाईवर ठाम राहिले.

ताराराणी आघाडीचे नगरसेवक सत्यजित कदम यांनी नागरिकांची लूट सुरू असताना वरिष्ठ गप्प का ? काम पूर्ण होण्याअगोदर कंपनीला ५० लाख रुपये देण्यावरुन अधिकाऱ्यांना जाब विचारला. नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी कंपनीला चौदा महिन्यात सर्व्हे पूर्ण करण्याची मुदत दिली होती. आतापर्यंत केवळ तीस टक्के काम झाले आहे. वॉटर ऑडिटचे काम थंडावल्याचा आरोप केला. चर्चेत नगरसेवक शेखर कुसाळे, सूरमंजिरी लाटकर, मोहन सालपे यांनी सहभाग घेतला. कर निर्धारक दिवाकर कारंडे यांनी आयुक्तांनी कंपनीला कामात सुधारणा करण्याची नोटीस दिली आहे. कंपनी​ने मुदतीत काम केले नाही तर प्रतिदिन एक हजार रुपये दंडाची कारवाई प्रस्तावित असल्याचे सांगितले.

........

आयुक्तांवर निष्क्रीयतेचा आरोप,

आकृतीबंधचा प्रस्ताव मागे

महापालिकेच्या अस्थापनावरील पदांचा आकृतीबंध सुधारित करण्याच्या प्रस्तावावरुन प्रशासन आणि नगरसेवकांत संघर्ष उडाला. आकृतीबंध हा महापालिका आणि सामान्य लोकांच्या हितापेक्षा अधिकाऱ्यांचा फायद्याचा असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. हा प्रस्ताव अमान्य असून प्रशासनाने फेर प्रस्ताव सादर करावा अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली. नगरसेवक सुनील कदम यांनी आयुक्तावर निष्क्रीयतेचा व मनमानीपणाचा आरोप केला. तुमच्या कालावधीत विकास कामे झाली नाहीत, तुम्ही कामेही करत नाही आणि निर्णयही होत नाहीत असा ठपका ठेवला. अजित ठाणेकर यांनी सहायक आयुक्तांच्या वेतनश्रेणीची विचारणा केली. विजय खाडे यांनी आकृतीबंधात क्रीडा अधिकाऱ्याच्या नेमणुकीची सूचना केली. प्रविण केसरकर, शेखर कुसाळे यांनी आकृतीबंधमध्ये त्रुटी असल्याचे सांगितले. राहुल माने, तौफिक मुल्लाणी यांनी आकृतीबंध म्हणजे काय हे सभागृहासमोर मांडण्याची सूचना केली. आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रस्ताव मागे घेता येणार नसल्याचे सांगताच सभागृहात पुन्हा गोंधळ उडाला. सभागृहाच्या भावना विचारात घेत आयुक्तांनी फेरप्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले. दरम्यान संजय भोसले यांनी महापालिकेत ४६७४ पदे मंजूर असून १३२५ पदे रिक्त असल्याची सांगितले. राज्य सरकारच्या गतवर्षीच्या आदेशानुसार आकृतीबंध निश्चित केला आहे. सभागृहाच्या मान्यतेनंतर तो राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याचे उत्तर दिले.

संजय भोसलेंची पदोन्नती बेकायदेशीर

नगरसेवक भूपाल शेटे यांनी केएमटीत क्लार्क म्हणून रुजू झालेल्या संजय भोसले यांच्याकडे चार विभागाचा कार्यभार कोणत्या नियमावलीच्या आधारे सोपविला. त्यांना दिलेली पदोन्नती बेकायदेशीर आहे. त्यांच्यापेक्षा जादा बुध्दिमत्तेचे कर्मचारी महापालिकेत असताना भोसले यांच्यावर वरिष्ठांची इतकी मेहेरनजर कशासाठी? अशी विचारणा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर लुडबूड करणाऱ्या व कायम त्यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्यांना पदोन्नती देण्यापेक्षा प्रशासनाने महापालिका अतंर्गत स्पर्धा परीक्षा घेऊन नेमणुका कराव्यात. आकृतीबंध करताना नगरसेवकांनी सुचविलेल्या सूचनांचा समावेश करावा असे प्रा. जयंत पाटील यांनी सुचविले.

‘कामाचा बट्ट्याबोळ’

सत्यजित कदम म्हणाले उपनगरांची संख्या वाढली असून प्रभागातील कामासाठी कर्मचारी नाहीत. महापालिकेत महिला सदस्यासाठी कक्ष नाही, स्वच्छतागृहे नाहीत. केवळ अधिकाऱ्यांच्या केबीन वाढल्या आहेत. नगरसेवक संतोष गायकवाड यांनी केएमटीमधील घोटाळे आणि गैरव्यवहार प्रकरणी जबाबदारी कुणावर निश्चित करायची ? अशी विचारणा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त पी. शिवशंकर यांची बदली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका कामकाजाला शिस्त आणि कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत वेगळी ओळख निर्माण केलेल्या आयुक्त पी. शिवशंकर यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी सायंकाळी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. आयुक्त शिवशंकर यांच्या कोल्हापुरातील कारकीर्दीला तीन वर्षे होण्याआधीच त्यांची बदली झाली आहे.

पी. शिवशंकर यांनी जानेवारी २०१५ मध्ये महापालिकेचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतली होती. नियमानुसार काम करण्याच्या वृत्तीमुळे गेल्या सव्वादोन वर्षांच्या कालावधीत त्यांचा सभागृह, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांशी सतत संघर्ष होत राहिला. त्यांनी महापालिकेच्या कामकाजाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी त्यांनी घरफाळा बिले पोस्टाने पाठविण्याचा निर्णय अंमलात आणला. महापालिकेतील बोगस हजेरी आणि कामचुकारांना चाप लावण्यासाठी बायोमेट्रिक पध्दत सुरु केली. अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या नोंदीसाठी गुगल कॅलेंडर सुरु केले. कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र त्यांच्या कालावधीत कोल्हापुरात मोठ्या प्रकल्पाची अंमलबजावणी झाली नसल्याचा नगरसेवकांचा आक्षेप राहिला आहे. त्यांच्या बदलीचा ठराव सभागृहाने एकदा केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोषींकडून रक्कम वसूल करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र पुरस्कृत एका‌‌‌त्मिक पाणलोट व्यवस्थापन योजनेतील (वसुंधरा पाणलोट) गैरव्यवहाराची रक्कम दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यासाठी ठोस पाठपुरावा करण्यात येईल, असे जिल्हा‌धिकारी डॉ. अमित सैनी यांनी स्पष्ट केले. जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीत खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना केली. त्यावेळी त्यांनी दोषींवर जबाबदारी निश्चित करून रक्कम वसुलीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

ताराराणी सभागृहात बैठक झाली. कृषी विभागाने दडवलेल्या पाणलोट घोटाळा चौकशी अहवालावर महाराष्ट्र टाइम्सने सप्टेंबरमध्ये वृतमालिका प्रसिध्द केली होती. त्याची दखल घेऊन खासदार शेट्टी यांनी गेल्या सनियंत्रणच्या बैठकीत दोषींवरील कारवाईचे काय झाले, अशी विचारणा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन लक्ष वेधले होते. शनिवारच्या बैठकीत पुन्हा खासदार शेट्टी यांनी कारवाईचा मुद्दा उपस्थित केला.

त्यावर जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, दोषींकडून रक्कम वसूल करण्यासंबंधीचा अहवाल कृषी विभागच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. त्याबाबत लवकरच कारवाई होईल.


काय आहे घोटाळा ?

जिल्ह्यातील पाणलोट कामांत सुमारे ३० कोटींचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार १८ जुलै २०१५ रोजी झाली होती. त्यानंतर समितीतर्फे चौकशी झाली. चौकशीत ५५ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आहे. जागेवर जाऊन कामांची पाहणी व तपासणी न करणे, नियमबाह्य कामांची निवड, निकृष्ट बंधारे होऊ नयेत यासाठी लक्ष न देणे, असे आक्षेप ठेवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासपोर्ट सेवा केंद्राचा शानदार उद्‍घाटन सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारताची लोकसंख्या १२५ कोटी असली तरी केवळ ७ कोटी ५० लाख नागरिकांकडे पासपोर्ट आहे. पासपोर्टही आता अत्यावश्यक बाब बनली आहे. मागणी

करणाऱ्या प्रत्येकाला पासपोर्ट मिळावा, यासाठी भारतातील प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय उघडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन विदेश मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले. कोल्हापुरात सेवा केंद्र सुरू झाल्याने वर्षाकाठी कोल्हापूरकरांचे दहा ते पंधरा कोटी वाचणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

येथील मुख्य पोस्ट ऑफिस कार्यालयात महाराष्ट्रातील पहिल्या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्‍घाटन छत्रपती शाहू महाराज यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. मुळे बोलत होते.

ते म्हणाले की, एखाद्या विकासकामासाठी लोकप्रतिनिधी एकत्र आल्यास उत्कृष्ट काम होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून पासपोर्ट सेवा केंद्राचे नाव घेता येईल. रोज ५० नागरिकांना पहिल्या टप्प्यात पासपोर्ट वितरणाची सुविधा मिळणार असून भविष्यात हा विस्तार वाढवण्यात येणार आहे.

डॉ. मुळे म्हणाले, ‘पोलिस पडताळणीबाबत महाराष्ट्र राज्य तेलंगणा आणि आंध्र प्रदेशपेक्षा मागे असून तेथे पोलिस पडताळणीला लागणारा कालावधी तीन दिवसांचा असतो. महाराष्ट्रात हा कालावधी २१ दिवसापेक्षा जास्त असतो. पासपोर्टची प्रक्रिया सोपी करण्यासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. आता काही मोजकीच कागदपत्रे स्वसाक्षांकीत करुन घेतली जातात. बदलत्या सामाजिक वास्तवाचे भान राखत पाल्याच्या पासपोर्टवर दोन्ही पालकांची नावे आवश्यक नसल्याबाबतचा बदलही करण्यात आल्याचे तसेच अनाथ अश्रमातील मुलांना पासपोर्ट मिळण्याबाबतही आवश्यक बदल करण्यात आले आहेत.’

व्हीसा प्रक्रियाही सोपी

भारतातील व्हीसा प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. १५५ देशांतील नागरिकांना ऑनलाइन व्हीसा सुविधा प्रक्रिया निर्माण करुन देण्यात आली आहे. पासपोर्ट, हायकोर्ट आणि एअरपोर्ट या तीन बाबी पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास कुणीही रोखू शकत नाही,असेही मुळे यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images