Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आजी-माजी आयुक्तांसह २० अधिकाऱ्यांची चौकशी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अतिक्रमण काढण्याची जबाबदारी महापालिकेची असताना, बांधकाम व्यावसायिकाने अतिक्रमण काढले नाही म्हणून ले-आऊट नामंजूर केल्याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तत्कालिन आणि सध्याच्या आयुक्तांसह संबंधित २० अधिकाऱ्यांची पोलिस चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे बांधकाम व्यावसायिक भूषण गांधी आणि महंम्मद इकबाल जमादार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अतिक्रमणांबाबत महापालिका प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे भविष्यात अन्य नागरिकांना, व्यावसायिकांना त्रास होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेण्याची तयारी केल्याचेही त्यांनी सांगितले.

तत्कालिन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, विद्यमान आयुक्त पी. ​शिवशंकर, उपायुक्त विजय खोराटे, उपशहर अभियंता संजीव देशपांडे, उपशहर अभियंता शंकर माने, तत्कालिन सहाय्यक संचालक मारुती राठोड, सहाय्यक संचालक धनंजय खोत, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यासह २० जणांविरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात गांधी व जमादार यांनी फौजदारी दावा दाखल करण्यात आला होता. त्याबाबत सुनावणी होऊन २०२ अंतर्गत पोलिसांनी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश असल्याचे गांधी व जमादार यांनी सांगितले.

गांधी म्हणाले, ‘जवाहरनगर येथील आमच्या जागेवर बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी बांधकाम परवाना मागितला होता. आमच्या जागेबाहेर असलेल्या डीपी रोडवरील अतिक्रमण काढण्याची अट घालून ले आऊटला मंजुरी देण्यात आली. ते अतिक्रमण काढले नाही म्हणून ले आऊट नामंजूर करण्यात आला. आयुक्तांनी हा नामंजूर करताना अतिक्रमण काढावे, असेही सांगितले आहे. पण केवळ ले आऊट नामंजूर केला असून महापालिकेचे अधिकारी अतिक्रमण काढत नसल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमण काढण्याची जबाबदारी महापालिकेची असताना बांधकाम व्यावसायिकांकडून अपेक्षा ठेवण्याचा प्रकार चुकीचा आहे. यामुळे अनाधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळून पर्यायी जागा मिळवून देण्याचा चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता आहे. एका तत्कालिन पदाधिकाऱ्याने अधिकाराचा गैरवापर करत आयुक्तांवर दबाव आणला होता. त्या दबावाखाली आयुक्तांनी बेकायदेशीर कृत्याला पाठबळ दिल्याचे दिसत आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा विचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकऱ्यांना अनेकदा कर्जमाफी मिळूनही त्यांची अवस्था काही बदलली नाही. शेतकऱ्यांना कायमचे कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. राज्य सरकारही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत सकारात्मक विचार करत आहे, अशी माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे दिली.

डीजीधन मेळाव्याच्या उद्‌घाटन समारंभानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्जवसुलीसाठी बॅंका शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावत आहे. पण, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठाम आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असेही राज्यमंत्री खोत यांनी स्पष्ट केले.

राज्यमंत्री खोत म्हणाले, ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास शासन कटिबद्ध आहे. पण, कर्जमुक्ती देऊन प्रश्न सुटणार नाही. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही, याची दखल घेतली पाहिजे. शेतकऱ्यांना डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात कर्जमाफी दिली होती. त्याआधी ए. आर. अंतुले यांच्या कारकिर्दीतही राज्यात माफक प्रमाणात कर्जमाफी दिली होती. त्यानंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळातही कर्जमाफीचा निर्णय झाला. आता जवळपास नऊ वर्षांनंतर पुन्हा शेतकरी कर्जात बुडाला आहे.’ त्यामुळे एकीकडे कर्जमुक्ती देत असताना दुसरीकडे तो शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत सापडणार नाही, याचीही काळजी शासन घेईल, असे खोत यांनी स्पष्ट केले.

कर्जमाफीची घोषणा करताना शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा द्याव्या लागतील तसेच शेतकऱ्यांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत, त्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागेल, असे मत राज्यमंत्री खोत यांनी व्यक्त केले. यावेळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाहीर मोहिमेमुळे डॉक्टर सावध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

म्हैसाळच्या घटनेनंतर कोल्हापुरातही लिंगनिदान होत असल्याची चर्चा सुरू झाल्याने प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व दवाखान्यांच्या तपासणीची धडक मोहिम आजपासून सुरु केली आहे. मात्र, जाहीर करून धाड टाकण्यास सुरुवात केल्यामुळे या मोहिमेचा उद्देश असफल ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी गडहिंग्लज आणि कागल तालुक्यात मोहीम राबविण्यात आली. त्यातून काहीच निषपन्न झालेले नाही.

मुलींचे घटते प्रमाण चिंताजनक असल्याचे प्रशासन सांगत मुलींच्या स्वागतासाठी अनेक योजना राबवित आहे. मात्र जेथे अवैध गर्भलिंग निदान केले जाते, त्यासाठी जाहीर धडक मोहीम राबविल्यास काय हाती काय लागणार आहे का? मोहिमेत जिल्ह्यातील रुग्णालयांची नोंदणी, डॉक्टरांची मान्यता, तिथे कार्यरत नर्सिंग स्टाफची विश्वासार्हता तपासण्यात येणार आहे. मात्र मोहीम जाहीर केल्यामुळे असे कृत्य करत असलेली यंत्रणाच सावध होत आहे. मुलींना वाचविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने स्टींग ऑपरेशन करुन लिंगनिदान करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ही मोहीम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सहअध्यक्ष असून महापालिका आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता हे सदस्य आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवेलगतच्या दारू दुकानांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोर्टाच्या आदेशानुसार हायवेजवळील ५०० मीटर अंतरावरील दारू दुकाने बंद करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही दुकाने बंद करण्यासाठी धडक मोहिम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष पोलिस पथकांची नियुक्ती केली आहे. ही मोहीम लवकरच सुरू होईल, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी मंगळवारी एका बैठकीत दिली.

राष्ट्रीय महामार्गावर (हायवे) दिवसेंदिवस अपघात वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हायवेपासून ५०० मीटर अंतरावरील दारू दुकाने बंदचा निर्णय कोर्टाच्या आदेशानंतर झाला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क प्रशासनच्या मदतीने पहिल्या टप्प्यात ४५० दुकानांची यादी तयार केली आहे. पुणे-बेंगळुरूसह, कोल्हापूर-रत्नागिरी, सांगली-कोल्हापूर, कोल्हापूर-गारगोटी, आजरा-आंबोली या मार्गाशेजारील दुकाने नव्या आदेशाच्या कक्षेत आहेत. मात्र सरकारने आदेश काढल्यानंतरही ही दुकाने राजरोस सुरू आहेत. त्यामुळे बंद करण्यासाठी पोलिस प्रशासन धडक मोहीम राबवण्याची तयारी केली आहे.


जिल्हातील दुकाने अशी

वाईन शॉप-४५

परमीट रूम व बिअर बार- ६८०

‌‌बिअर शॉपी -३५५

देशी दारू दुकाने- २८५

एकूण - १३६५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीच्या विनयभंगप्रकरणी पाच वर्षाची सक्त मुजरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अल्पवयीन मतीमंद मुलीच्या विनयभंगप्रकरणी बिहारच्या तरूणास पाच वर्षे सक्तमजुरी आणि ३००० रुपये अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली. सोनू जयप्रकाश ठाकूर (वय २३, रा. बिहार) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक दोन) सौ. व्ही. व्ही. जोशी यांनी ही शिक्षा सुनावली.

या खटल्याची माहिती अशी, कागल येथे फिर्यादी पत्नी, दोन मुली, एका मुलासह राहतात. ते गवंडीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ‌‌‌फिर्यादीचा मेहूणा सेट्रिंग कामाचा ठेकेदार आहे. तोही फिर्यादीच्या घरीच कुटुंबासह राहतो. त्याच्याकडे आरोपी सोनू चार वर्षापासून कामगार होता. तोही त्यांच्या घरीच राहत होता. २० एप्रिल २०१५ रोजी रात्री आठ वाजता सोनूने फिर्यादीच्या मतीमंद मुलीस चॉकलेटचे अमिष दाखवून जवळ असलेल्या किल्ल्यात घेऊन गेला. तेथे त्याने विनयभंगाचा प्रयत्न केला. फिर्यादी व मेहूण्याने सोनूस पकडून कागल पोलिसात फिर्याद‌ दिली.

या खटल्याची सुनावणी झाली. ९ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील प्रतिभा जाधव यांनी केलेला युक्तीवाद व सबळ पुराव्यांमुळे आरोपी सोनूस विविध कलमांखाली शिक्षा झाली. भारतीय दंड संविधान ३६३ कलमाखाली पाच वर्षे सक्त मजुरी, कलम ३६६ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी, कलम ३५४ अन्वये २ वर्षे सक्त मजुरी, बाललैंगिक अत्याचार कलम ९ आणि १० अन्वये ५ वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा झाली. या सर्व शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांतील कंत्राटी पद्धत बंद करावी, थकीत पगार द्यावेत, रोजंदारी कर्मचारी म्हणून समाविष्ट करून घ्यावे, या आणि विविध मागण्यांसाठी आज कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी कोल्हापुरात धरणे आंदोलन केले. संपूर्ण राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले असून, मागण्यांसाठी येत्या २२ मार्चपासून मुंबईत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला.

ताराबाई पार्कातील महावितरणच्या विभागीय कार्यालयासमोर सकाळी दहा वाजल्यापासूनच कंत्राटी कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती. सुमारे तीनशे जणांन एकत्र येत कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. कंत्राटी पद्धत बंद झालीच पाहिजे, सर्वोच्च न्यायालाच्या समान वेतन समान काम आदेशाचे पालन करा, आवाज दो हम एक है, अशा घोषणा देण्यात येत होत्या. या संदर्भात भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंत्राटी कामगारांसाठी प्रशासनानेच काढलेल्या वेतनविषय परीपत्रकाचे अनुपालन प्रशासन करत नाही. काही अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही स्थिती ओढवली आहे. कामागांरांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत आहे. अनेकांना वेतन वेळच्या वेळी न मिळणे, भविष्य निर्वाहनिधीची पूर्ण रक्कम खात्यात जमा न करणे, पूर्ण बोनस न मिळणे, अॅडव्हानस घेतला नसला तरी पगार पत्रकात ती रक्कम दाखवणे असे प्रकार सुरू आहे. यांना विरोध करणाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाते. या सर्व प्रकारांविरोधात येत्या २२पासून वीज वितरण कंपनीचे मुंबईतील मुख्यालय प्रकाशगड येते बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

नोव्हेंबरपासून पगार नाही

जीव धोक्यात विद्यूत वाहिन्यांचे दुरुस्ती करायची, मार्च एन्डसाठी थकीत बिलांची वसुली करायची, पण गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने घर कसे चालवायचे, असा प्रश्न अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांपुढे आहे. कंत्राटदारांकडून कापून घेण्यात येत असलेल्या भविष्य निर्वाह निधीतही मोठा गैरव्यवहार आहे. या संदर्भात भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडे धाव घेण्यात आली असून, या संदर्भात येत्या १७ मार्च रोजी सुनावणी असल्याचे कामगारांनी सांगितले.

प्रमुख मागण्या अशा

- कंत्राटी कामगारांना रोजंदारी पद्धतीने समाविष्ठ करून घ्यावे

- सुप्रीम कोर्टाच्या समान काम समान वेतन आदेशाची अंमलबजावणी व्हावी

- वेतन परिपत्रकाचे अनुपालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅशलेस व्यवहार काळाची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशात आजही ८० टक्के व्यवहार रोखीने होतात. त्यामुळे भ्रष्टाचाराला आणि काळ्यापैशांना मोठा वाव मिळतो. हे सर्व टाळून पारदर्शी प्रशासन आणि काळ्या पैशाला वेसण घालण्यासाठी आता सर्वांनीच कॅशलेस पध्दतीचा अवलंब करावा, असे आवाहनही संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. कॅशलेस व्यवहाराबाबत जागरुकता व डिजीटल पध्दतीने आर्थिक व्यवहार करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित केलेल्या डिजीधन मेळाव्याचे उदघाटन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, महापौर हसिना फरास, जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, निती आयोगाचे संचालक अनिलकुमार शर्मा, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक एम. जी. मुज्जाहीन, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचे व्हाईस प्रेसिडेंट महेंद्र जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. भामरे म्हणाले, ‘केंद्राने नोटा बंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारास प्राधान्य दिले असून, त्यादृष्टीने सुविधाही उपलब्ध करुन दिल्या आहेत. देशातील जनतेला या पध्दतीची माहिती व्हावी यासाठी केंद्र शासनाने देशातील १०० जिल्ह्यांत डिजीधन मेळावे होत आहेत. आयटी क्षेत्रामुळे जगात झपाट्याने मोठे बदल होत आहेत. बदलत्या परिस्थितीत जगाच्या बरोबरीने चालण्यासाठी भारतालाही बदलावे लागत आहे. त्यामुळेच कॅशलेस व्यवहार सर्व पातळीवर होणे गरजेचे बनले आहे.’

मेळाव्याला जिल्ह्यातील व्यापारी, व्यवसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील विविध बँका, पेट्रोलियम कंपन्या, गॅस कंपन्या, स्वस्त धान्य दुकाने, महा-ईसेवा केंद्र, बचत गट, आधार लिंक प्रोग्रॅम, कृषी निविष्ठा धारक यांचे १०० स्टॉल्स उभारण्यात आले होते. सकाळपासूनच ग्राहक तसेच व्यवसायिकांनी गर्दी केली होती. बहुतांशी लोकांनी कॅशलेस व्यवहार करुन डिजीटल पेमेंट सिस्टीमचा अवलंब केल्याचे दिसून आले. तसेच कॅशलेस व्यवहाराबाबतची पध्दती लोकांना समजावून सांगितली. मेळाव्यात कॅशलेस बरोबरच मुद्रा बँक योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ, महा अवयवदान अशा प्राधान्य क्रमाच्या योजनांची माहितीही देण्यात आली असून विविध फ्लेक्स, बॅनर्स, स्टँडी याद्वारेही मुद्रा योजनेची जागृती करण्यात आली. दरम्यान, कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय बुध्दीबळपटू ऋचा पुजारी, नेमबाजपटू राधिका बराले, जितेंद्र विभुते आणि अनुष्का पाटील उपस्थित होते त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

या मेळाव्यास अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र खाडे, जिल्हा अग्रणी बँक‍अधिकारी एस.जी.किणिंगे यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


महिनाभरात रेशन डिजिटल

अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘महिन्याभरात राज्यातील सर्व रास्तभाव दुकाने POS मशिनच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत. जोपर्यंत ग्राहक आपल्या अंगठ्याचा ठसा देणार नाहीत तो पर्यंत रेशनिंगवरील वस्तुंचे त्यांना वितरण होणार नाही. या पध्दतीमुळे सुमारे ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपव्यय टळणार आहे.’


जिल्ह्यात ७.५० लाख जनधन बँक खाती आहेत. त्यापैकी ६ लाख खाती आधार लिंक करून त्यांना रुपेकार्ड देण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायत लेसकॅश झाल्या असून येत्या १५ दिवसांत आणखी ३५ ग्रामपंचायत लेसकॅश होतील.

- डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी


कॅशलेस इंडिया ही संपूर्ण देशव्यापी मोहीम झाली पाहिजे. आम्ही ८० रुपयांचे ताकही स्वाइप मशीनवर पेमेंट करून घेतो. अशाच प्रकारे आता मोठे सगळे व्यवहार अशाच प्रकारे झाले पाहिजेत. यामुळे आपसूकच काळ्यापैशांना आळा बसेल आणि अशा प्रकारच्या मेळाव्यांमुळे जनजागृती होईल.

- अभिजित पवार, नागरिक


सरकारनेही डिजिटल इंडिया कॅम्पेन अतिशय गांभीर्याने राबविण्याची गरज आहे. यात डिजिधन मेळावा ही एक चांगली संकल्पना आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत पारदर्शकता येण्यासाठी भविष्यात ऑनलाइन पेमेंट्स अतिशय गरजेची आहेत. नव्या जमाऩ्याची गुंतवणूक म्हणून आता नागरिकांनी म्युचिअल फंड्सकडेही वळावे, असे वाटते.

- दीपक पलंगे, व्यवसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पद्मावती’ चा सेट जाळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

राणी पद्मावतीच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘द लिजंड ऑफ पद्मावती,’ या सिनेमाच्या चित्रीकरणाचे साहित्य असलेला बेसकँप मंगळवारी रात्री अज्ञातांनी पेटवला. पन्हाळ्याजवळील मसाई पठारावर या सिनेमाचे शूटिंग सुरू होते. यावेळी वाहने आणि साहित्याचीही मोडतोड करण्यात आली. या आगीत चित्रीकरणासाठी उभारलेला बेस कॅम्प आणि संपूर्ण कपडेपट खाक झाला. सुमारे ५० अज्ञातांनी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पेट्रोल बॉम्ब टाकून ही आग लावली. अचानक घडलेल्या या प्रकारामळे कामगार भांबावून गेले. कामगारांना मारहाण करण्यात आली. जाळपोळीत अंदाजे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, मंगळवारी रात्री दोन वाजता काही अज्ञात तोंडाला रुमाल बांधून चित्रीकरणाच्या ठिकाणी आले. त्यांनी सुरुवातीला पेट्रोल बॉम्ब टाकून तेथील किमती कपडे, चित्रीकरणाचे साहित्य, ऐतिहासिक वेशभूषा आणि त्या पद्धतीचे साहित्य, मौल्यवान वस्तूंची जाळपोळ केली. त्यानंतर त्याठिकाणी उभ्या असलेल्या टाटा सुमो गाडीच्या काचा फोडल्या, तसेच ट्रकवर हल्ला करून चालक महादेव केराप्पा साळे (रा.सांगोला) याला बेदम मारहाण केली. चालकाने ओरडून सहकाऱ्यांना जागे केले. तोपर्यंत चित्रीकरणासाठी वापरले जाणारे कपडे, मंडप, लोखंडी पेटीत ठेवलेले साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दरम्यान, घोडे बांधलेल्या मांडवाला आग लावण्याचा प्रयत्न झाला. त्यात दोन घोडे जखमी झाली. जाळपोळीचा हा प्रकार समजल्यानंतर पन्हाळा व कोडोली पोलिसांना मसाई पठाराच्या सर्व बाजूंनी पोलिस तैनात केले. कोल्हापूरहून आलेल्या अग्निशामक दलाच्या गाडीने आग आटोक्यात आणली. त्यांना म्हाळुंगे गावच्या लोकांनी मदत केली.

पोलिसांनी चित्रीकरण सुरू असलेल्या ठिकाणाच्या उत्तरेकडील पायवाटेकडे शोध घेतला असता जिवंत पेट्रोल बॉम्ब सापडले. रात्री झालेल्या या प्रकारात एका अज्ञाताचा शर्ट व जॅकेट चित्रीकरणस्थळी सापडल्याने पोलिसांनी या कपड्यांचा श्वान पथकामार्फत तपास गतिमान केला. हे सर्व अज्ञात वेखंडवाडीतून वाहनातून गेल्याचे प्रथमदर्शनी तपासात स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधिक्षक महादेव तांबडे, उपअधिक्षक सूरज गुरव, उपविभागीय अधिकारी अजय पवार, तहसीलदार राम चौबे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

...................
दहा दिवसांनी पुन्हा शूटिंग

बेसकॅम्पवर ठेवलेले किमती कपडे आणि लाकडी सेटचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील किमान दहा दिवस शूटिंग थांबवण्यात येणार आहे. तथापि, कोल्हापुरातील शूटिंग पूर्ण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. चित्रिकरणासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांनी दिली आहे. दरम्यान, जाळपोळीच्या घटनेबाबतची फिर्याद असोसिएट प्रोड्युसर चेतन देवळेकर यांनी पन्हाळा पोलिसांत दिली आहे.

सिनेमात कोणतेही आक्षेपार्ह दृश्य किंवा संदर्भ नाही हे राजस्थानात झालेल्या हल्ल्यावेळी आम्ही स्पष्ट केले आहे. मसाई पठारावरील चित्रीकरण स्थळावर ज्या अज्ञातांनी बेसकँप जाळला त्यामागे नेमके कोणते कारण आहे हे पोलिस तपासात कळेल. प्रॉडक्शन टीमतर्फे तक्रार दाखल केली आहे. सध्या सिनेमा चित्रीकरणाच्या टप्प्यावर असल्यामुळे त्यातील संदर्भ किंवा दृश्याबाबत आक्षेप असलेल्या नागरिकांशी चर्चा करण्याची तयारी आहे.

शोभा संत, मुख्य कार्यकारी अधिकारी, संजय लीला भन्साळी प्रॉडक्शन
काय आहे वाद?

राजस्थानमधील एका कथेवर संजय लीला भन्साळी ‘लिजंड ऑफ पद्मावती’ हा सिनेमा बनवत आहेत. राणी पद्मावती आ​णि अलाऊद्दीन खिलजी यांच्या आयुष्यावर हा​ सिनेमा बेतला आहे. जयपूर येथे दोन महिन्यांपूर्वी कर्णी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सेटवर हल्ला केला होता. यावेळी भन्साळी यांनाही मारहाण झाली. राणी पद्मावतीच्या जीवनावर असलेल्या या सिनेमात भन्साळी इतिहासाची छेडछाड करत वेगळीच कहाणी पडद्यावर मांडत असल्याचा आरोप राजपूत समाजाने केला आहे. त्यातून या सिनेमाला विरोध होत आहे. राणी पद्मावती आणि खिलजीमध्ये कोणत्याही प्रकारचे रोमॅण्टिक सीन नसतील, अशी ग्वाही कर्नी सेनेच्या नेत्यांना संजय लीला भन्साळींच्या प्रॉडक्शनच्या सीईओ शोभा संत यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी हवे मुरायला

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMT

पाण्याचा सर्वांत मोठा स्रोत असलेल्या पावसाचे पाणी योग्यप्रकारे साठवले तर वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा घरच्याघरी तयार होऊ शकतो. भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होण्यासाठी छतावरचे पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया गरजेची आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपक्रमांसाठी प्रशासनपातळीवर प्रबोधनाचा जागर उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच झाला तर पावसाळ्याच्या चार महिन्यात पाऊस ‘वाहून’ जाणार नाही. महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन अशा पाऊसपाणी बचतीच्या संकल्पना यंदाच्या पावसाळ्यात फळाफुलाला आणण्यासाठी संयोजनाचे बिगुल वाजवण्याच्या तयारीत आहे.

शहराच्या मुख्य वसाहतीत असलेल्या गल्लीबोळांतील घरांच्या परिसरात पाऊसपाणी बचतीची संकल्पना कार्यान्वित होणे सध्या शक्य नसले तरी हा प्रयोग उपनगरातील घरांच्या आवारात होऊ शकतो. छतावरचे पावसाचे पाणी साठवण्यासाठी असलेल्या विविध पद्धती घरगुती पातळीवर वापरल्यास त्यातून वर्षभराची पाण्याची साठवणूक केल्यास सार्वजनिक जलसाठ्यांवर येणारा ताण कमी होण्यास मदत मिळेल.

नव्या घरबांधणीत हार्वेस्टिंगचा नियम

नव्या घरबांधणीला परवानगी देताना छतावरील पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्याची यंत्रणा असावी, असा राज्य सरकारचा नियम आहे. महापालिकेच्यावतीने हा नियम बांधकाम परवानगी आणि पूर्णत्वाच्यावेळी बंधनकारक केला आहे. उपनगरातील अनेक घरांसाठी या नियमानुसार रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा केल्याचे दाखवण्यात येते. काही प्रमाणात पर्यावरणाच्यादृष्टीने सजग असलेल्या नागरिकांकडून हा प्रयोग राबवला जातो. मात्र घर बांधून झाले आणि महापालिका प्रशासनाकडून रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी क्लीनचीट मिळाली की काही दिवसांनंतर घराच्या आवारात पेव्हिंग ब्लॉक घालून छतावरील पावसाचे पाणी साठवण्याऐवजी ते वाहून जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला जातो.

४७ गावे टँकरग्रस्त

पाण्याची श्रीमंती कधीही आटणार नाही अशा पाणीयोजनांनी तुडुंब भरलेल्या कोल्हापुरातील ४७ गावे गेल्या वर्षी टँकरग्रस्त होती. या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. तर शहरातील पाचगाव, जरगनगर, फुलेवाडी, सानेगुरूजी वसाहत यांसारख्या उपनगरांपासून ते शहराच्या मध्यवसाहतीतही टँकर मागवण्यात आले होते. मुळात टँकरने पाण्याचा पुरवठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी करावा, असा नियम आहे. मात्र टंचाईच्या झळांमुळे खर्चासाठी लागणारे पाणीही टँकरने पुरवण्यात आले. रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे गावे आणि शहरातील उपनगरांचा बहुतांशी भाग टँकरमुक्त होण्यासाठी मदत मिळणार आहे.

पाण्याचे पुनर्भरण थांबले

पावसाचे पाणी जसे साठवण्याची गरज आहे तसेच छतावरील वाहून जाणारे पाणी थेट गटारी आणि नाल्यांमध्ये न मिसळता ते जमिनीत मुरण्याचीही गरज आहे. घरगुती स्तरावर हा प्रयोग होण्यात आवारात घातल्या जाणाऱ्या पेव्हिंग ब्लॉकचा अडसर येतो. तर शहरातील रस्त्यांवरही अनेकठिकाणी ​सिमेंटचे काँक्रिटीकरण व काही प्रभागातील छोट्या गल्ल्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक घातल्यामुळे पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया जवळपास बंद झाली आहे. यामुळे भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण थांबले आहे. शहरातील आठशे बोअरना पाण्याचा पुरवठा करणारी जमिनीअंतर्गत असलेली प्रक्रिया थांबण्याचा धोका निर्माण झाला आहे.



रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि भूगर्भात पाणी मुरवणे या गोष्टी घरगुती व सार्वजनिक पातळीवर होण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाच्या बांधकाम, नगरविकास आणि उद्यान विभागाच्यावतीने प्रबोधन केले जाते. यावर्षीही मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

नेत्रदीप सरनोबत, शहरविकास अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळजी घेतो, चिंता करू नका !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाल्यानंतर बदललेली परिस्थिती... भारतीय इंजिनीअरवर झालेला हल्ला...भा रतीयांनाच नव्हे, तर नॉन अमेरिकन्सला सार्वजनिक ठिकाणी होत असलेला विरोध... यामुळे अमेरिकेत स्थायिक असलेल्या किंवा तेथे शिकण्यासाठी गेलेल्यांच्या नातेवाइकांच्या चिंतेत थोडी भर पडली आहे. पण, या मुलांकडूनच आपल्या आई-वडिलांना भावंडांना ‘हो मी काळजी घेतो, तुम्ही चिंता करू नका!’, असा धीर दिला जात आहे.

वृत्तवाहिन्यांवर विशेषतः इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर अमेरिकेतील घडामोडींविषयी सातत्याने बातम्या येत असतात. अमेरिकेच्या कन्सास शहरामध्ये श्रीनिवास कुचिभोत या भारतीय अभियंत्याची गोळी झाडून खून झाली. पाठोपाठ भारतीयवंशाच्या हर्निश पटेल या व्यावसायिक तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे अमेरिकेतील भारतीयांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. प्रत्यक्ष अमेरिकेत फारशी घाबरण्याची परिस्थिती नसली, तरी तेथे राहणाऱ्यांच्या नातेवाइकांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. एरवी, आठवड्यातून एक-दोनदा होणारा फोन आता रोजच्या रोज होऊ लागला आहे. व्हॉट्सअॅपवर सततचे मेजेज सुरू आहेतच. पण, तरीही काळजीपोटी मुलांची जास्त चौकशी केली जात आहे.

अर्थात, प्रत्यक्षात परिस्थिती थोडी वेगळी आहे. नॉन अमेरिकन्ससाठी थोडे चिंतेचे वातावरण असले, तरी तेथील भारतीय सध्या एकमेकांना सांभाळून राहत आहेत. तेथील काही भारतीयांशी संवाद साधला असता, त्यांना नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर माहिती दिली. ते म्हणाले, ‘क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा देश आहे आणि या देशातील प्रत्येक शहरात वेगवेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे कोण्या एकाच्या सांगण्यावरून संपूर्ण देशातील स्थितीचा अंदाज घेता येणे शक्य नाही. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. व्हिसाशी संबंधित काही प्रॉब्लेम असले, तरी तुम्ही या देशात काम करण्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. तुमचे टॅलेंट इतरांपेक्षा किती वेगळे आहे. त्यावर बरेच अवलंबून असते.’ एकूणच परिस्थिती आधीच्या तुलनेत वेगळी असली, तरी सध्या ‘काळजी घ्या’ आणि ‘चिंता करू नका’, असे एकेमकांना सांगूनच संभाषण संपते.

सेव्ह अमेरिकन्स जॉब

नॉन अमेरिकन्सविरोधात सध्या अमेरिकेत द्वेष पसरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तेथील एका समूहाने

http://saveamericanitjobs.org नावाची वेबसाइट सुरू केली आहे. त्यावर एका गार्डनमध्ये खेळणाऱ्या भारतीय कुटुंबाचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यावरून द्वेष भावना पसरवली जात आहे. ही वेबसाइट भारतात ओपन होत नाही. केवळ अमेरिकेतच ती ओपन होते. त्याचबरोबर भारतीयांची लक्षणीय संख्या असलेल्या न्यूजर्सी शहरात भारतीयांविरोधात पत्रकबाजी केली जाते. वृत्तपत्रातून, गाड्यांवर अशी पत्रके चिकटवली जातात. पण, भारतीय संख्येने जास्त असल्याने त्यांच्या आंदोलनाची तीव्रता फार कमी असते.


माझ्या दोन्ही मुली लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक आहेत. मोठी मुलगी जवळपास दहा वर्षांहून अधिक वर्षे तेथे आहे. तर धाकट्या मुलीलाही पाच वर्षे झाली आहेत. इतकी वर्षे तेथे राहिल्याने त्यांच्या कुटुबांना परिस्थितीचा पूर्ण अंदाज आलेला आहे. पण, सध्याच्या स्थितीत शिक्षण किंवा जॉबसाठी नव्याने तेथे जाणाऱ्यांसाठी थोडे चिंतेचे वातावरण असू शकते.

- श्रीकांत हेर्लेकर, नातेवाईक


माझी मुलगी जॉबच्या निमित्ताने न्यू जर्सी येथे राहते. तर, मुलगा ह्युस्टन येथे शिकण्यासाठी आहे. दोघांशीही रोजचा संपर्क असतो. तेथील परिस्थितीवर साहजिकच तिंता आहे. ती नाकारता येत नाही. पण, त्यांनाही काळजी घेण्याचा सल्ला आम्ही देत असतो. त्यांनीही तेथील भारतीय ग्रुपमध्ये एकमेकांना धरून राहण्यास सुरुवात केली आहे, तरी पालक म्हणून आम्हाला थोडी चिंता वाटतेच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना सदस्य फोडण्याचा प्रयत्न

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही काँग्रेस आणि भाजपकडून शिवसेनेचे सदस्य फोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेचा बाण आपल्याच भात्यात ठेवण्यासाठी जोरदार व्यूहरचना केली जात आहे. शिवसेनेतील अंतर्गत धुसफुसीचा फायदा दोन्ही काँग्रेस आणि भाजपकडून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पाठिंबा देताना सेनेत फूट पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अध्यक्षपदासाठी शौमिका महाडिक व राहुल पाटील यांच्यात थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. अशी लढत झाल्यास या निवडीत मोठी चुरस होणार आहे.

दोन्ही काँग्रेस आणि भाजपकडून जिल्हा परिषदेत अध्यक्ष आमचाच होणार असल्याचा दावा केला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दोन्ही काँग्रेससोबत चर्चा करण्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर सेनेत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. पाठिंबा देण्यावरून सेना नेत्यांचे अद्याप तळ्यातमळ्यात आहेत. स्थानिक राजकारण आड येत असल्याने पाठिंबा देण्यात अडचणी येत आहेत. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे दहा सदस्य आहेत. पैकी पाच सदस्यांनी काँग्रेससोबत जायला स्पष्ट नकार दिल्याचे समजते. अन्य पाचजणांचा भाजपला विरोध आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना किंगमेकर ठरत असल्याने शिवसेनेचे सदस्य फोडाफोडीला वेग आला आहे. काँग्रेसचे १४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ असे दोन्ही काँग्रेस मिळून २५ संख्याबळ आहे. शिवसेनेच्या दहा सदस्यांनी पाठिंबा दिल्यास ३५ पर्यंत संख्याबळ जाऊन बहुमताने सत्ता स्थापन करणे शक्य होणार आहे.

पाठिंब्यावरून शिवसेनेच्या गटात अंतर्गत वाद सुरू आहेत. या वादातून काही सदस्य दोन्ही काँग्रेस आणि भाजपला विरोध करण्याची शक्यता आहे. शिवसेना सदस्यांत फूट पडल्यास भाजपसोबत आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, संजय घाटगे, आमदार सुजित मिणचेकर यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले पाच सदस्य भाजपसोबत राहण्याची शक्यता आहे. तर काँग्रेससोबत प्रा. संजय मंडलिक, आमदार उल्हास पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकर गटाचे सदस्य जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड २१ मार्च रोजी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिका गंभीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एसएससी बोर्डाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या वर्षानगरमध्ये भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाली आहे. पूर्वा (वय ३ वर्षे) असे तिचे नाव आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वर्षानगरमधील रो-बंगल्यात डॉक्टर कुटुंब राहते. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडे आलेले नातेवाइक जाण्यासाठी निघाले. नातेवाइक‌ांच्या कारमध्ये साहित्य भरत असताना फटकातून पूर्वा खेळत बाहेर गेली. त्यावेळी अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला करत ओढत जवळच्या रिकाम्या जागेत नेले. तिथे इतर भटक्या कुत्र्यांनीही तिचे लचके तोडण्यास सुरूवात केले. ती जोरात ओरडल्यानंतर आजूबाजूचे लोक आले. त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून पुर्वाची सुटका करून घेतली. हल्ल्यावेळी कुत्र्यांनी मानेवर, पायावर, डोक्यात चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. तातडीने तिला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरने सांगितले.

आठवड्यात चौथी घटना

शहर, उपनगरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. गेल्या आठवड्यात तिघांवर त्यांनी हल्ला केला. ‌बुधवारची हल्ल्याची घटना चौथी आहे. त्यामुळे महानगरपालिकेने त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी पाऊस: राज्यसरकारची ४ लाखांची मदत

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना चार लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली. अवकाळी पावसात दगावलेली व्यक्ती शेतकरी असेल तर त्यांच्या कुटुंबियांना 'गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने'अंतर्गत दोन लाख रूपयांची मदत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी पंढरपूरमधील गारपीटग्रस्त भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढाव घेतला. यावेळी अवकाळी पावसात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना चार लाखांची मदत केली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. राज्यातील ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांना बसला आहे. सोलापूरमध्येही पंढरपूरसह मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमध्ये पावसासह गारपीटीने झोडपले आहे. यात द्राक्ष बागांसह ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील पाच जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. तर लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानकपणे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.

द्राक्ष बागांमध्ये तयार झालेली द्राक्षे काढली जात असताना अचानक झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा द्राक्ष बागांना फटका बसला आहे. या पावसामुळे सामान्य शेतकऱ्यांसह द्राक्ष बागायतदारांची झोप उडाली आहे. काही ठिकाणी आंब्याचा मोहोर गळाल्यानेही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टीसह अन्य सेवाकरांचा बोजा वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या उत्पन्नावरील मर्यादा, एलबीटीच्या अुनदानासाठी सरकारवरील अवलंबित्व, अपुऱ्या निधीमुळे विकासकामांवर होणारा परिणाम यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने घरफाळा, पाणीपट्टीत वाढीचा प्रस्ताव ठेवला. मात्र, सभागृहाचा घरफाळावाढीला विरोध असल्याने यंदा पाणीपट्टीसह अन्य सेवा करांवरच प्रशासनाची भिस्त असेल. घरफाळावाढीला नगरसेवक, नागरिकांचा होणारा विरोध विचारात घेऊन प्रशासनाने आणखी दोन पर्यायांवर विचार चालविला आहे. त्यमुळे अन्य करवाढ होणार असली तरी घरफाळावाढीचा भार नसेल असे संकेत आहेत.

महापालिकेने भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीनुसार घरफाळ्यात ६ ते २० टक्के दरवाढीचा प्रस्ताव सभागृहासमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. सध्या घरफाळ्यातून वार्षिक उत्पन्नाचे उद्दिष्ट ५२ कोटी रुपये आहे. वाढीनंतर त्यात आणखी १२ कोटींची भर पडण्याची अपेक्षा आहे. मात्र, घरफाळावाढीला सर्वच पक्षांच्या नगरसेवकांचा विरोध असल्याने घरफाळावाढीचा प्रस्ताव मंजूर होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशासन घरफाळावाढीसंदर्भातील फेरप्रस्ताव करत आहे. त्यामध्ये मालक वापर आणि भाडेकरू वापर असलेल्या मिळकतींना समान घरफाळा आकारणी आणि वाणिज्य, औद्योगिक मिळकतींच्या घरफाळ्यात वाढ अशा दोन पर्यायांवर चर्चा सुरु आहे. या प्रस्तावानुसार रहिवासी मिळकतीच्या घरफाळ्यात वाढ होणार नाही. मालक वापर आणि भाडेकरू वापर मिळकतींना समान घरफाळा लागू करताना काहीअंशी वाढ होऊ शकते. घरफाळावाढीत सवलत देताना पाणीपट्टीत वाढ अपेक्षित आहे. पाणीपुरवठा विभागाने तीस टक्क्यांपर्यंतचा पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्या माध्यमातून आठ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. पाणीपट्टीत तीस टक्के की त्यापेक्षा कमी वाढ करायची याचा निर्णय सभागृह घेणार आहे.

सेवाशुल्कात पाच टक्क्यांपर्यंत वाढ

महापालिकतर्फे शहरवासियांसाठी विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात. व्यवसाय परवाना, भाजी मार्केटमधील वसुली फी, महापालिकेच्या मालकीच्या सांस्कृतिक हॉल, मैदान, जिम्नॅशिय, बॅडमिंटन हॉल, सिनेमा थिएटर टॅक्स, केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदान, पेंढारकर कलादालन, रुग्णवाहिका, शववाहिकेच्या सेवेत पाच ते दहा टक्क्यांनी वाढ होणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने या सेवा शुल्क वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

बुधवारी किंवा गुरुवारी बजेट

घरफाळा, पाणीपट्टी वाढीचे प्रस्ताव मंजूर नसल्याने महापालिकेचे अंदाजपत्रकावरही लांबणीवर पडले आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. २०) होत आहे. सभेच्या निर्णयानंतर प्रशासन स्थायी समितीला आगामी वर्षाचे अंदाजपत्रक सादर करणार आहे. बुधवारी किंवा गुरुवारी प्रशासकीय बजेट सादर होण्याची शक्यता आहे.

चालू वर्षात ८० टक्के वसुली

महापालिकेने चालू आर्थिक वर्षात ३३५ कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत २७० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. घरफाळा आणि पाणीपट्टीच्या थकबाकीधारकांना नोटीसा पाठविल्या आहेत. विभागमुखांना वसुलीच्या सक्त सूचना केल्या आहेत असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. घरफाळा विभागाची वसुली ४५ कोटी तर पाणीपुरवठा विभागाची वसुली ३९ कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यसेवा परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सेवा परीक्षेमध्ये कोल्हापूरच्या युवकांनी पुन्हा एकदा झेंडा फडकावला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील सुरेश पाटील यांची पोलिस उपअधीक्षकपदी, त्याच तालुक्यातील हिटणी गावातील बाळकृष्ण खणदाळे यांची सहाय्यक विक्रीकर आयुक्तपदासाठी तर मंगळवार पेठेतील हर्षवर्धन शिंदे हे उत्पादन शुल्क विभागात उपअधीक्षकपदी निवड झाली आहे. याशिवाय कराडमधील संकेत गोसावी यांची पोलिस उपअधीक्षकपदावर निवड झाली आहे.

राज्यभरातील १३० राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पदांसाठीची यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी सायंकाळी जाहीर केली. याची पूर्वपरीक्षा १० एप्रिल २०१६ रोजी झाली होती. एक लाख ९१ हजार ५६३ विद्यार्थ्यांमधून १५७५ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुख्य परीक्षेमधून ४१८ जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. जानेवारी महिन्यात मुलाखती झाल्या होत्या. आता निकाल जाहीर झाल्याचे समजताच परीक्षार्थींकडून तसेच त्यांच्या मित्रांकडून किती मार्क मिळाले, कोणत्या पदावर निवड झाली याची उत्सुकता ताणली गेली होती. त्यामुळे तातडीने इंटरनेटवरून पाहून एकमेकांना निरोप दिले जात होते. अनेक उमेदवार यापूर्वीच्या परीक्षेतून झालेल्या निवडीतून विविध पदांवर कार्यरत होते. त्यातील काहींची आवडीप्रमाणे नवीन पदांवर निवड झाली तर काहींना निराश व्हावे लागले.

शहरातील विविध स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये औत्सुक्याने अनेक विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी जमले होते. स्टडी सर्कल व ए बी फाउंडेशनचे विद्यार्थी या परीक्षेमध्ये चमकले आहेत. सुरेश पाटील व बाळकृष्ण खणदाळे हे स्टडी सर्कलचे असून शिंदे व गोसावी यांनी ए बी फाउंडेशनमधून अभ्यास केला होता. सुरेश पाटील हे सध्या विक्रीकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पोलिस उपअधीक्षक पदावर निवड झाली आहे. सध्या महापालिकेत सहायक आयुक्त असलेले सचिन खाडे यांची तहसिलदारपदी निवड झाली आहे. त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी परीक्षेत यश मिळवले आहे. एप्रिल २०१६ मध्ये त्यांची मुख्याधिकारीपदी निवड झाली होती. खाडे हे माण तालुक्यातील पळशी येथील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामे नगण्य, नागरिकांच्या तक्रारीच जास्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

झोपडपट्टीपासून उच्चभ्रू अपार्टमेंट्स असा संमिश्र प्रभाग असलेल्या टाकाळा खण माळी कॉलनी परिसरात नगरसेवकांच्या कामांपेक्षा नागरिकांच्या तक्रारीच जास्त आहेत. कमी दाबाने पाणी पुरवठा, रस्त्यांची अर्धवट कामे, सार्वजनिक शौचालयांची दूरवस्था आणि तुंबलेल्या ड्रेनेज लाइन असा समस्यांचा डोंगर या प्रभागात आहे.

राजारामपुरी पाचव्या गल्लीपासून उत्तरेकडे, टाकाळ खण परिसर आणि टेंबलाई नाका वस्ती अशी टाकाळा खण प्रभागाची (क्रमांक ३८) रचना आहे. यात जवळपास सह हजार ५०० नागरिक टाकाळा आणि टेंबलाई नाका येथील झोपडपट्टीत राहतात. प्रभागातील इतर मतदार हे उच्चभ्रू आहेत. मोठ मोठी अपार्टमेंट्स आणि काही जुन्या इमारतींमध्ये नागरिक राहतात. यातील प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहे. टाकाळा मोहल्ला या बैठी घरे असलेल्या परिसरात कमी दाबाने येणारे पाणी ही सगळ्या मोठी ससम्या आहे. प्रभागात पालिकेची व्यायामशाळा नाही. काही ठिकाणी कचरा उठावासाठी रोजच्या रोज गाडी येते, तर काही ठिकाणी दोन-तीन दिवसांनी गाडी येत असल्याच्या तक्रारी आहेत.

टेंबलाई नाका वस्तीतून टाकाळ्यात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक वर्षांनंतर झालेले ड्रेनेज लाइनचे काम हेच काय ते सर्वांत मोठे काम असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. या लाइनमुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घरांमध्ये आता स्वतःची शौचालये उभारली जात आहे. येत्या पंधरा दिवसांत रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने रस्ता झाल्यानंतर तो उखडता येणार नाही. त्यामुळे या रस्त्यावरील नागरिक शौचालये बांधून घेत आहेत. यामुळे तेथील सार्वजनिक शौचलायवर येणारा ताण कमी होणार आहे, ही जमेची बाजू आहे.

माळी कॉलनी मेन रोडवर म्हसोबा देऊळ ते वैभव अपार्टमेंट रस्त्यावर ड्रेनेज लाइन सातत्याने चोकअप होते. या संदर्भात तक्रारी करूनही त्यावर कायमस्वरूपी इलाज झालेला नाही. सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्त्या झालेल्या नाहीत. त्यावरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

राजारामपुरीतील सेनापती बापट रोडचे काम नगरोथ्थानच्या निधीतून झाले आहे. पण, हे काम अर्धवट आहे. या रस्त्याचा बराचसा भाग या प्रभागात येतो रस्त्याचे आंदोलनेही झाली. शेवटी रस्ता झाला, त्याचे समाधान मात्र नाही. रस्त्याच्या बाजूला काही ठिकाणी एकच पाइल लाइन टाकून त्यावर काँक्रीट टाकण्यात आले आहे. चेंबर फुटलेली आहेत. टाकलेल्या पाइप न जोडल्यामुळे सांडपाणी व पावसाचे पाणी रस्त्यावर येण्याचा धोका आहे. या संदर्भात पालिका आयुक्तांकडे दाद मागूनही कामे पूर्ण झालेली नाहीत.

नगरसेविका उदासीन

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या प्रभाग फेरी सदरासाठी नगरसेविका सविता भालकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी आणि त्यांचे पती शशिकांत भालकर यांनीही प्रभागातील कामांची माहिती देण्यात औदासिन्य दाखवले. यासंदर्भात भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वारंवार कारणे देऊन भेट टाळली.

शौचालय बंद

टेंबलाई नाका वस्तीत उड्डाणपुलाकडून जाणाऱ्या मुख्या रस्त्यावर डाव्या हाताला महापालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे. पे अॅन्ड यूज तत्त्वावर हे शौचालय बांधण्यात आले असले तरी, अनेक महिन्यांपासून ते बंद स्थितीत आहे. या परिसरातील नागरिकांनी विशेषतः महिलांना शौचासाठी दुसऱ्या गल्लीत जावे लागते. तेथील व्यवस्था आपुरी पडत असल्याने त्या शौचालय परिसरातील महिलांकडून इतरांना विरोध होतो. त्यामुळे शौचाला जायचे कोठे? असा प्रश्न नागरिकांपुढे आहे. महापालिकेने तातडीने लक्ष देऊन पे अॅन्ड यूज शौचालय सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

ड्रेनेज वारंवार चोकअप

परिसरातील काही ड्रेनेज लाइन वीस वर्षांपूर्वीच्या आहेत. वस्ती वाढत गेल्याने लाइन मोठ्या करणे गरजेचे होते. त्याकडेही नगरसेवक आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांचे फारसे गंभीर लक्ष नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली. टाकाळा मोहल्ल्यात ड्रेनेज चोकअप होण्याची तक्रार वारंवार आहे. या संदर्भात नागरिकांना विचारले असता, ‘ड्रेनेज लाइन चोक अप होत असल्याने शौचालयेही चोक अप होत आहे. तक्रार केल्यानंतर पालिकेचे कर्मचारी येतात. पण, तात्पुरती दुरुस्ती होते. त्यासाठी पाणीही आमचेच वापरले जाते. रात्रीची वेळ असेल, तर त्यांना टॉर्चपण आम्हीच दाखवायची’, अशा तक्रारी तेथील नागरिकांनी केल्या.


टाकाळा मोहल्ला परिसरात गेल्या वर्षीपासून पाणी फार कमी दाबाने येत आहे. पूर्वी समस्या होतीच, पण पाण्याची एक पाइपलाइन स्वतंत्र टाकल्यापासून पाणी आणखीनच कमी दाबाने येऊ लागले आहे. घरातल्या महिलांनी पिण्याचे पाणी आणायचे कोठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- अमीन पठाण, नागरिक, टाकाळा मोहल्ला


वस्तीतील अंतर्गत गटारींचे काम झाले आहे. पण, गटारी स्वच्छ करण्यासाठी आठ दिवसांतून एकदाच कोणीतरी येते. त्यातही स्वच्छतेचे काम नीट होत नाही. यामुळे डासांचा प्रादुर्भाव आहे. गेल्या काही महिन्यांत पाणी पुरवठा अतिशय कमी दाबाने होत आहे. पहाटे पाच ते सहा यावेळेत पाणी येते. कमी दाबाने असल्याने त्यावेळेत पिण्याचे आणि खर्चाचे पाणी भरून होत नाही.

- महाबुबीन सय्यद, नागरिक, टेंबलाई नाका


परिसरात विशेषतः झोपडपट्ट्यांमधील शौचालयांची दुरुस्ती व्हायला हवी. रस्ते काही रस्त्यांची कामे अपुरी आहेत, ती पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. सध्या बजेटही मिळत आहे. त्यातून नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील जास्तीत जास्त कामे करून घेतली पाहिजेत. नागरिकांच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे आहे.

- अनिल कदम, माजी नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धारवाड विद्यापीठात शाहू अध्यासन केंद्र

$
0
0

Gurubal.Mali @timesgroup.com
Tweet : @gurubalmaliMT

कोल्हापूर : सर्वसामान्य जनतेचा कैवारी, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रसार करण्यासाठी कर्नाटक सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी धारवाड विद्यापीठात शाहू महाराजांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. त्यासाठी बजेटमध्ये पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शाहूंच्या विचाराचां हा गौरव आहे. उत्तर प्रदेशानंतर कर्नाटक सरकारने उचलेले हे पाऊल कोल्हापूरकरांना अभिमानास्पद आहे.

केवळ कोल्हापूरकरच नव्हे तर महाराष्ट्राला आदर्शवत आणि अभिमान वाटावा अशी कामगिरी राजर्षी शाहू महाराजांनी केली. प्राथमिक शिक्षणाची सक्ती आणि मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण देण्याचा त्यांचा निर्णय क्रांतिकारी होता. त्यामुळेच या लोकराजाची महती देशभर पसरली. त्यांचे चरित्र इंग्रजी, हिंदी याबरोबरच रशियन, जर्मन व इतर काही भाषांत अनुवादित करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी उत्तरप्रदेशात एका जिल्ह्याला त्यांचे नाव दिले. दिल्लीत संसेदेच्या आवारात त्यांचा पुतळा उभारण्यात आला. विविध माध्यमातून त्यांचे विचार व कार्य देशभरच नव्हे तर जगभर पोहचवण्यासाठी प्रयत्न आजही सुरूच आहेत. या प्रयत्नांना कर्नाटक सरकारच्या नव्या निर्णयाने बळ मिळाले आहे.

प्रा. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या शाहू चरित्र ग्रंथाचा, प्राचार्य चंद्रकांत पोकळे यांनी कन्नड भाषेत अनुवाद केला आहे. त्याचा प्रकाशन समारंभ धारवाड विद्यापीठात झाला. यावेळी विद्यापीठात शाहू अध्यासन केंद्र होण्याची गरज काहींनी व्यक्त केली होती. त्यानुसार विद्यापीठाने सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. प्रस्तावास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मान्यता देत पाच कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. यंदाच्या बजेटमध्ये या रक्कमेची तरतूदही करण्यात आली आहे.

सध्या धारवाड विद्यापीठात कन्नड, वेमन, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबडेकर अशी अध्यासन केंद्रे आहेत. आता शाहू महाराजांच्या नावाने नवे अध्यासन केंद्र सुरू होणार आहे. कर्नाटकातील जनतेला महाराजांच्या कार्याची व विचारांची माहिती मिळावी यासाठी या केंद्राच्यावतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. कर्नाटक आणि शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे नाते वेगळे होते. शहाजी महाराजांनी अनेक वर्षे बंगळुरूवर राज्य केले होते. शाहू महाराजांनी कर्नाटकातील अनेकांना मदत केली होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याने कोल्हापूरकरांच्या दृष्टी​ने ही विशेष आनंदाची बाब ठरणार आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा आंम्हाला अभिमान आहे. त्यांचे विचार आणि कार्य प्रेरणादायी असल्यानेच त्याच्या प्रसारासाठी अध्यासन सुरू होणे आवश्यक होते. तसा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आला होता, तो मंजूर झाल्याने आता या कामाला गती येणार आहे.
- एम. एन. जोशी, कुलसचिव, धारवाड विद्यापीठ


धारवाड विद्यापीठातील अध्यासनामुळे शाहू महाराजां कार्य आणि विचार महाराष्ट्राबाहेर पोहोचणार आहेत. यापेक्षा आनंद आणि अभिमानाची दुसरी गोष्ट नाही. केवळ निधीअभावी राज्यात शाहू महाराजांच्या नावाने सुरू असलेले प्रकल्प रखडले आहेत. महाराष्ट्र सरकारने याबाबत कर्नाटकचा आदर्श घेण्याची गरज आहे.
- प्रा. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक


शहाजीराजांच्या समाधीसाठी दोन कोटी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचे पिता शहाजी राजे यांची कर्नाटकातील होदुगिरी येथे समाधीस्थळ आहे. २३ जानेवारी १६६४ रोजी घनदाट जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या अश्वाचा वेलीमध्ये पाय अडकून झालेल्या अपघातात महाराजांचा दुर्देवी मृत्यू झाला. होदुगिरीतील समाधीस्थळाकडे कर्नाटक सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत होता. त्याची दखल घेत समाधीस्थळाच्या सुशोभिकरणासाठी दोन कोटीचा निधी जाहीर केला आहे. त्याची तरतूद बजेटमध्ये केल्याने लवकरच या कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषद सदस्य सहलीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या सदस्यांतील फूट टाळण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपप्रणित आघाडीतील काही सदस्य सहलीवर गेले आहेत. मंगळवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद निवडीदिवशीच सदस्यांना सभागृहात आणले जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ सदस्य सहलीवर गेले आहेत. काँग्रेसच्या १४पैकी काही सदस्य सहलीवर गेले आहे. शनिवारी राजर्षी शाहू पुरस्कार स्वीकारून उर्वरित सदस्य रवाना होणार आहेत. भाजपचे काही सदस्य सहलीवर असून उर्वरित सदस्य शनिवारी सहलीवर जातील. शिवसेनेचे १० सदस्य आहेत. हे सदस्य आमदारांसोबत मुंबईला गेला आहेत.

आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार प्रकाश आबिटकर यांचे सदस्य त्यांच्यासोबत असल्याचे समजते. शिवसेनेचे सदस्य सोमवारी कोल्हापुरात येतील. स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवक क्रांती आघाडीच्या सदस्यांनाही सहलीवर पाठविण्याचे नियोजन सुरू आहे. शिवसेनेच्या सदस्यांनी अद्याप प्रशासनाकडे गटनोंदणी केलेली नाही. नोंदणी झाली नसल्यास सदस्यांना मतदानासाठी वैयक्तिक स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेत पडलेल्या दोन गटांचा फायदा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. या फुटीर सदस्यांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट पाइपलाइनमधील अडथळे दूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काळम्मावाडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात जॅकवेल, पंप हाउस उभारणी आणि दूधगंगा नदीच्या कॅनॉलच्या बाजूने टाकण्यात येणाऱ्या बारा किलोमीटर लांबीच्या पाइपलाइन मार्गाला मुंबईतील नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. परवानगीचे अडथळे दूर झाल्याने थेट पाइपलाइन योजनेला गती येणार आहे.

पाटबंधारे विभागाने कॅनॉलच्या बाजूने टाकण्यात येणाऱ्या मार्गासाठी वार्षिक दोन कोटी रुपये भाडे आकारणीचा प्रस्ताव दिला होता. मात्र ही योजना सार्वजनिक हितासाठी असल्याने नाममात्र भाडे आकारणीसाठी महापालिकेचा पाठपुरावा सुरु होता. आता त्यासाठी वार्षिक एक रुपया नाममात्र भाडे असेल. त्यामुळे महापालिकेची वर्षाला दोन कोटींची बचत होणार आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. आमदार अमल महाडिक, आयुक्त पी. शिवशंकर, भाजप, ताराराणी आघाडीचे गटनेते विजय सुर्यवंशी, सत्यजित कदम, नगरसेवक शेखर कुसाळे, आशीष ढवळे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली.

कोल्हापूरला थेट पाइपलाइनव्दारे पाणी पुरवठा करण्यासाठी ५२ किलोमीटर लांबीचा पाइपलाइन मार्ग प्रस्तावित आहे. दूधगंगा नदीपासून एरिगेशन कॉलनी मार्गे काळम्मावाडी गाव ते सोळांकूर कॅनॉलपर्यंतचा बारा किलोमीटरचा मार्ग पाटबंधारेच्या मालकीचा आहे. विभागाने प्रचलित दरानुसार वर्षाला दोन कोटी भाडे लागू केले होते. यामुळे योजनेचे काम रखडले होते. मंत्रालयातील बैठकीत महापालिकेची आर्थिक स्थिती निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच पाइपलाइन योजना सार्वजनिक हितासाठी असून नाममात्र भाडे आकारुन मार्गाला मान्यता मिळावी, अशी बाजू मांडण्यात आली. त्याला मंजुरी देण्यात आली.

बैठकीला प्रभारी जल अभियंता सुरेश कुलकर्णी, शाखा अभियंता हेमंत गोंगाणे उपस्थित होते.

………..

जॅकवेल, पंपहाउसच्या कामाला मान्यता

काळम्मावाडीच्या बुडीत क्षेत्रात जॅकवेल बांधणी, पंप हाउस व इनटेक वॉल प्रस्तावित आहे. या कामालाही परवानगी नव्हती. बैठकीत कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक घोटे यांनी पाटबंधारे अधिकारी साळुंखे यांना या संदर्भात सूचना करुन जॅकवेलसह अन्य कामांना मान्यता देण्याची सूचना केली. महापालिकेने गतवर्षी जॅकवेलसाठी बारा मीटर खोदाई केली होती. पाटबंधारेच्या मान्यतेनंतर आता महापालिकेला वन खात्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. वनखात्याने योजनेच्या दोन टक्के दराने साडेआठ कोटी रुपये भरण्याच्या सूचना केल्या आहेत. महापालिकेने या भागात ४१ कोटी ३० लाख रुपयांचे बांधकाम होणार असून त्यावर दोन टक्के दराने ८२ लाख रुपये भरण्याची तयारी दर्शविली आहे. प्रस्तावासंदर्भात वन विभागाने, अप्पर वन संरक्षक नागपूर कार्यालयाकडून अभिप्राय मागविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चटणीसाठी बाजारात लगबग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाचा तडाखा वाढत असताना घरांमध्ये चटणी करण्याची लगबग सुरु असून बाजारात मिरच्या तसेच त्यासाठी लागणारा मसाला खरेदीसाठी गर्दी होत आहे. ब्याडगी व लवंगी, संकेश्वरी मिरची खरेदीकडे जास्त ओढा आहे. मसाल्यांच्या दरातही गेल्यावर्षीच्या तुलनेत फारसा मोठा फरक पडलेला नसल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.

यंदा मिरच्यांचे उत्पादन चांगले असून लक्ष्मीपुरी बाजाराबरोबरच शहरातील विविध भागातही मिरची विक्रेते बसलेले दिसून येत आहेत. तावडे हॉटेल चौकातही ठिकठिकाणच्या मिरची ​विक्रेत्यांनी एकत्रित मिरची विक्री चालवलेली असल्याने तिथे शहराच्या उपनगरातील तसेच आजूबाजूच्या गावातील लोक खरेदीसाठी येत आहेत.

व्यापारी सुरेश भोसले म्हणाले, लाल रंग येण्यासाठी ब्याडगी मिरचीचा जास्त वापर केला जातो. तर तिखटाचे प्रमाण व रंगही टिकावा यासाठी लवंगी मिरचीला मागणी आहे. चवीसाठी संकेश्वरी मिरचीची मागणी असते. यंदा गेल्यावर्षीपेक्षा फारच कमी दरात चांगली मिरची मिळत आहे. या महिन्यात मिरची तसेच मसाला खरेदी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मसाल्याच्या दरात गेल्यावर्षीच्या फार बदल झालेला नाही. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images