Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दहा हजार नवे खातेदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोटाबंदीनंतर रोख चलनाऐवजी जास्तीत जास्त व्यवहार बँकांमार्फत करण्यासाठी जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मोहिमेतून जिल्ह्यात बँकांपासून दूर असलेल्या १० हजार, ८४२ नागरिकांना बँक व्यवहाराच्या प्रवाहात आणले आहे. या नागरिकांचे केवळ खाते उघडण्यात आले नसून त्यांना तत्काळ रुपे कार्ड देण्यात आली आहेत. यामुळे या दहा हजारावर खातेदारांचे व्यवहार आता बँकांमधून सुरू झाले असून कॅशलेस गाव करण्याच्या मोहिमेलाही बळ मिळाले आहे.

सरकारने जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर नोव्हेंबरमध्ये प्रचंड चलन तुटवडा निर्माण झाला होता. केवळ १००, ५० रुपयांच्या नोटांवर व्यवहार चालवावे लागले असल्याने सामान्य नागरिकांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत मोठा त्रास सहन करावा लागत होता. बँकांमध्ये खाते असलेल्या नोकरदारांना मोठा त्रास होत नव्हता. पण ज्यांनी आतापर्यंत बँकांची पायरी चढली नव्हती व सर्व व्यवहार रोख रकमेवर केले जायचे, त्यांना मात्र मोठा फटका बसला. त्यांना एकतर उधारी करावी लागली किंवा रोख रक्कमेची प्रतिक्षा करावी लागत होती. यामधून सामान्य, तेही असंघटित क्षेत्रातील कामगारांना धावाधाव करावी लागली. यासाठी सरकारने रोजंदारीवर काम करणारे मजूर, बांधकाम, वाहतूक व्यवसायातील चालक, रस्त्यावर बसणारे विक्रेते अशा असंघटित क्षेत्रातील कामगारांना बँक व्यवहारात आणण्याचे धोरण राबवले होते. डिसेंबरपासून त्यावर मोठ्या प्रमाणावर काम सुरू करण्यात आले.

जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण अशा मिळून ३१ बँका आहेत. त्या प्रत्येक बँकेला अशा असंघटित क्षेत्रातील कामगारांचे खाते उघडण्यास सांगितले होते. त्यानुसार अनेक बँकांनी अगदी गावपातळीवर जाऊन खाते उघडण्याची मोहीम आखली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांबराच्या शिंगांची तस्करी, सांगलीत चौघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सुमारे चार लाख रुपये किमतीचे सांबराचे शिंग विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांना सांगली शहर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री सांगलीवाडीनजिक पकडले. पोलिसांना कारच्या डिक्कीत सांबराचे शिंग सापडले. याप्रकरणी कृष्णा शिवाजी मोहिते (वय २६, कसबे डिग्रज), अतुल बाबासाहेब कल्याणी (वय ३६, रुकडी), महेश मोहन राव (वय २६, सांगली) आणि चंद्रकांत बाबासो कांबळे (वय २५, नेज) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.

सांगली शहर पोलिस ठाण्याकडील उपनिरीक्षक युवराज कामटे यांना सांगलीवाडी नजिकच्या यश ढाब्याजवळ कसबे डिग्रजचा कृष्णा मोहिते हा सांबराचे शिंग विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर कामटे यांनी निरीक्षक अनिल गुजर यांच्या माध्यमातून पोलिस अधीक्षक दतात्रय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याशी संपर्क साधून कारवाईबाबत मार्गदर्शन घेतले. गुरुवारी मध्यरात्री यश ढाब्याजवळ सापळा लावला. त्यावेळी संशयित मारुती सियाज (एमएच०९डीएक्स ०३०२) ही गाडी आली. त्यात चौघे संशयित सापडले. अधिक तपास केला असता गाडीच्या डिकीत सांबराचे ‌शिंग सापडले. त्यानंतर चौघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे तेरा लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित गाडी अतुल कल्याणी याच्या मालकीची असून त्याच्या गाडीवर राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ, महाराष्ट्र राज्य. संस्थापक अध्यक्ष असा मजकूर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली शल्यचिकित्सक बोल्डेंचे निलंबन

$
0
0

सांगली : शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हिंगोली येथे असताना पदाचा गैरवापर करुन खोट्या नोंदीच्या आधारे १ लाख ७१ हजारांचा प्रवास आणि वाहन भत्ता घेतल्याप्रकरणी त्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर बीडमध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे त्यांची सांगलीला बदली करण्यात आली होती. सांगलीत आल्यानंतरही त्यांनी महिला डॉक्टरला अपमानास्पद वागणूक देऊन तेथील बांधकामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत स्थानिक आमदारांनी त्यांच्याबाबत मंत्र्यांकडे तक्रार केली होती.

हिंगोलीत जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत असताना डॉ. बोल्डे यांनी सोलापूर येथे न्यायालयीन कामकाजासाठी जाण्यासाठी खासगी वाहनाचा वापर केल्याचे दाखविले होते. चौकशीत त्यांनी खोट्या नोंदी करुन धनादेशाव्दारे शासकीय रक्कम उचलल्याचे स्पष्ट झाल्याने २ सप्टेंबर रोजी त्यांच्याविरुध्द हिंगोली शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमध्ये एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी चार महिन्यांपूर्वी डॉ. बोल्डे यांची सांगलीला बदली करण्यात आली. सांगलीत आल्यानंतर त्यांना या ठिकाणचे हॉस्पिटल हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिपत्याखाली असल्याचे समजले. त्यानंतर बैठक व्यवस्थेच्या जागेवरुन वाद घालायला सुरुवात केली. यासंदर्भात संबधित डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे तक्रार केली. गाडगीळ यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांपर्यंत हा विषय नेल्यानंतर डॉ. बोल्डेंना सुधारण्याची संधी दिली होती. परंतु त्यांच्यात सुधारणा होत नसल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉ. बोल्डे सध्या रजेवर असून त्यांचा पदभार डॉ. संजय साळुंखे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर डॉ. बोल्डे यांना सातारा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिपत्याखाली कार्यरत राहण्याचा आदेश आरोग्य खात्याने दिल्याचेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्योत्स्ना शिंदेंवरील कारवाई अहवाल दहा दिवसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील गैरकारभार आणि शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले. केलेल्या तक्रारीच्या वीस मुद्द्यांवर चौकशी करून दहा दिवसांत अहवाल पाठविला जाणार आहे. सीइओ डॉ. कुणाल खेमनार हा अहवाल पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठविणार आहेत. दरम्यान, शिक्षण विभागातील तीन कर्मचाऱ्यांची तडफातडफी बदली झाली. सीईओ खेमणार यांनी आणखी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी तयार केली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई रोखण्यासाठी एका माजी शिक्षक आमदाराने सीइओंची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली.

विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी या प्रकरणाचा अहवाल देण्याचे आदेश दिले. शिक्षणाधिकारी शिंदेंवर वीसवर तक्रारीचा ठपका ठेवून चौकशी सुरू केली आहे. चौकशी समितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे अधीक्षक एस. डी. माने, विजय मगदूम यांची नियुक्ती केली आहे. माध्यमिकच्या कारभाराच्या चौकशीची मागणी जिल्हा परिषद सीइओ, शिक्षण उपसंचालक आणि विभागीय आयुक्तांकडे काही शिक्षकांनी केली. शिक्षणाधिकारी शिंदे यांच्याविरोधात शंभरावर तक्रारी आहेत. माध्यमिक शिक्षण विभागातील संजय पाटील यांची ग्रामपंचायत विभाग आणि विजय टिपुगडे, नेताजी यमगेकर यांची सामान्य प्रशासन विभागात बदली झाली. दरम्यान, शिक्षण विभागातील लाच घेणारी टोळी शुक्रवारी माध्यमिक शिक्षण विभागातून गायब झाली. माध्यमिक शिक्षक संघटनेचे नेते, शाहूंच्या नावाचे टीम कलेक्टर, माध्यमिक शिक्षकांचे दादा, शिक्षणतज्ज्ञांच्या शाळेतील सहायक शिक्षक आणि संघटनेचा पदाधिकारी गायब झाले.

०००

वाद पुन्हा पेटणार

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात लिपिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांत वाद झाले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी केली. या विभागातील अधिकाऱ्यांना राजकीय वरदहस्त आहे. नेत्यांसोबतचे फोटो फेसबुकवर टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याची चर्चा शिक्षण विभागात सुरू होती.

०००

काय आहेत तक्रारी?

नियमित वेतनश्रेणी मान्यता, निवड श्रेणी, वरिष्ठ वेतन श्रेणी, मुख्याध्यापक पदोन्नती, पेन्शन प्रकरणे, वैद्यकीय बिले, फरकाची बिले मंजूर करण्यासाठी २० हजारांपासून एक लाखांपर्यंतत पैसे घेतले. ३५ वैयक्तिक मान्यता देण्यासाठी प्रत्येकी पाच लाख रूपये घेतले आहेत. तर एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांकडे प्रत्येकी एक लाख रूपये मागितल्याच्या तक्रारी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाधिकाऱ्यांवरील आरोपांची दखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योस्त्ना शिंदे यांच्यावर आर्थिक व्यवहार करून चुकीच्या मान्यता दिल्याच्या तसेच अनेक प्रकरणात भ्रष्टाचार केल्याबद्दल सातत्याने झालेल्या तक्रारींची दखल अखेर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने घेतली. याची चौकशी करण्यासाठी इंद्रजित देशमुख यांच्या नियुक्तीचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे.‌ ही चौकशी हस्तक्षेपाविना होण्याची गरज आहे.

शिक्षण विभागात दोन वर्षापूर्वी शिंदे रूजू झाल्या. त्या विभागात पारदर्शकता आणतील अशी अपेक्षा सर्वांची होती. मात्र उलट अनुभव आला. शिंदे यांच्या‌ विरोधात विभागातील कर्मचाऱ्यांनी २१ नोव्हेंबर २०१६ रोजी सीईओंकडे तक्रार केली. तत्पूर्वी २९ ऑगस्ट २०१७ रोजी संदीप माने, नरेंद्र मुळीक, शिवपार्वती शिक्षण प्रसारक मंडळ (वेतवडे), बाळासाहेब खोपकर हायस्कूल, श्री साई प्रसाद शिक्षण प्रसारक मंडळ (सावरवाडी), जयकुमार कोले, कबनूर एज्युकेशन सोसायटी, सुशांत बोरगे, युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क व संरक्षण संघटना, रिप‌‌ब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कागल) आदींनी गंभीर तक्रारी केल्या. शिक्षक नियुक्ती, मान्यतेसंबंधी उच्च न्यायालयाचा आदेश डावलणे, शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणे, वारंवार हेलपाटे मारूनही कामे न करणे असे तक्रारींचे स्वरूप आहे. त्यामुळे शिंदे यांच्या विरोधातील या तक्रारीची दखल सीईओ डॉ. खेमनार यांनी घेतली. ३० ‌डिसेंबर २०१५ रोजी शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. त्या नोटीशीला त्यांनी उत्तर नाही.

पैसे दिल्याची तक्रार

माध्यमिक विभागातील गलथानपणाची चौकशी आणि दोषींवरील कारवाईची प्र​क्रिया सुरू असतानाही सातत्याने जिल्हा प‌रिषदेकडे तक्रारी येत राहिल्या. ‘मी दहा लाख रूपये दिले आहेत, तरी माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी माझे काम केलेले नाही. पैसे दिल्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत’, अशी तक्रार गेल्या आठवड्यातच प्रशासनाकडे अाली.


तक्रारीची रीघ

शिक्षणाधिकारी शिंदे यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी देशमुख यांची नियुक्ती केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसिध्द झाले. त्यानंतर शुक्रवारी दिवसभर देशमुख यांची भेट घेऊल तक्रार देण्यासाठी रीघ लागली होती. सावरवाडी (ता. करवीर ) येथील खोपकर हायस्कूलमधील दोन शिक्षकांचे वेतन देण्यासंबंधी शिक्षण ‌उपसंचालकांनी आदेश काढले आहेत. पण हा आदेश शिंदे मानत नसल्याची तक्रार शिक्षक संजय तळेकर यांनी शुक्रवारी देशमुख यांच्याकडे केली.


शिक्षण‌म‌हर्षीकडून ‘जावईशोध’

माध्यमिक शिक्षण विभागातील खाबुगिरीबद्दल दोन वर्षापासून प्रचंड तक्रारी आहेत. या विभागातील तीन कर्मचारी लाच घेताना सापडले आहेत. त्यामुळे खाबुगिरीचा वाटा शिंदे यांच्यापर्यंत जातो असा उघड आरोप होत राहिला. असे असताना आठवड्यापुर्वी एक शिक्षणमहर्षी व शहरातील नामांकित शिक्षण संस्थेचा एका संचालकाने सीईओंची भेट घेतली. शिक्षणाधिकारी शिंदेंचा कारभार गंगेइतका शुध्द, प‌वित्र आहे, असा त्यांनी जावाईशोध सीईओंसमोर लावला. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी कोणत्या पातळीवर तडजोडी सुरू आहेत, हे स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध सिलिंडर साठ्यात स्फोट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोठ्या गॅस सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटात पिता-पुत्रासह तिघे जखमी झाले. या घटनेनंतर पोलिसांनी कारंडे मळा येथील शशीराम तोलाराम अहुजा (वय ५३) याला अटक केली. अहुजा याच्या घरातून अवैध सिलिंडरचा मोठा साठा जप्त केला. गॅस स्फोटात शशीराम अहुजा यांच्यासह त्यांचा मुलगा सनी (वय २६, दोघेही रा. अहुजा अपार्टमेंट, कारंडे मळा) आणि कामगार दत्ता बापू गुरव (२२, रा. बहिरेश्वर, ता. राधानगरी) हे तिघे जखमी झाले आहेत. शाहूपुरी पलिसांनी ८५ सिलिंडरसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कारंडे मळा येथे एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर शशीराम अहुजा यांच्या अहुजा अपार्टमेंटमध्ये स्फोट झाल्याचे उघडकीस आले. अधिक चौकशीत अवैधरित्या सिलिंडर भरण्याचे काम सुरू असताना स्फोट झाल्याची माहिती मिळाली. या घटनेत शशीराम अहुजा, सनी अहुजा आणि दत्ता गुरव हे तिघे जखमी झाले आहे. जखमींमधील गुरव याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अहुजा याच्या घरातून ८५ सिलिंडर, ट्रक, कार आणि जळालेली रिक्षा असा सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वेळीच आग विझवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र या प्रकाराने शहरातील गॅसचा काळाबाजार उघडकीस आला आहे. पोलिसांनी शशीराम अहुजा, सनी अहुजा आणि दत्ता गुरव या तिघांवर शाहूपुरी ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, शशीराम अहुजा याला अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरवस्तीत गॅस सिलिंडरचा अवैध साठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शशीराम अहुजा याचे बिंदू चौकात शिवाजी रोडवर अहुजा नावाने गॅस सिलिंडर विक्रीचे दुकान आहे. तेथील सिलिंडरसाठीची गॅसची अदलाबदली कारंडे मळ्यासारख्या शांत आणि उच्चभ्रू वस्तीमध्ये केली जायची. आजच्या स्फोटानंतरच हा प्रकार पोलिसांच्या नजरेस आला.

शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कारंडे मळा परिसरात शुक्रवारी (ता. १०) सकाळी अकराच्या सुमारास एका गॅस सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना स्फोट झाला. या घटनेत फ्लॅटमालक शशीराम तोलाराम अहुजा (वय ५३) यांच्यासह सनी शशीराम अहुजा (२६, दोघेही रा. कारंडे मळा) आणि दत्ता बापू गुरव (रा. बहिरेश्वर, ता. राधानगरी) हे तिघे गंभीर जखमी झाले.

दुकानात विक्रीसाठीच्या छोट्या सिलिंडरसाछी अहुजा महामार्गावरील एका गॅस पंपावरून मोठ्या सिलिंडरमधून गॅस आणायचा. स्वयंपाकासह वाहनांसाठीही गॅसची विक्री केली जाते. अपार्टमेंटच्या मागे भिंतीला लागूनच रिक्षा उभी करून गॅस भरला जायचा. भरलेले आणि रिकामे सिलिंडरही घरातच ठेवले होते. अहुजा अपार्टमेंटमध्ये चार कुटुंबे राहतात. स्फोट झालेल्या ठिकणीच शशीराम अहुजा याचेही कुटुंब राहते. येथे मोठ्या स्फोटाची भीती होती. कुटुंबीयांनी धोका पत्करून आग विझवली. भरलेले अर्धवट जळालेले सिलिंडरही खोलीबाहेर काढले. यावेळी स्फोट झाला असता तर, संपूर्ण परिसर हादरला असता. जीवितहानीही झाली असती. सुदैवाने अनर्थ टळला.

कारंडे मळा येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चौगुले यांना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास मिळाली. चौगुले यांनी कारंडे मळ्यात जाऊन पाहणी केली असता, स्वयंपाकाच्या गॅस लिकेजने किरकोळ आग लागल्याची माहिती अहुजा अपार्टमेंटमधील शशीराम अहुजा यांनी दिली. परिसरात गॅसच्या उग्र वासाने शंका बळावल्यामुळे चौगुले यांनी चौकशी सुरू केली. अपार्टमेंटच्या मागे तळमजल्यावर स्फोटाने मोठे नुकसान झाले होते. रिकाम्या जागेतील कोपऱ्यात झाकून ठेवलेले वाहनही पोलिसांना दिसले. अर्धवट जळालेली रिक्षा मिळाल्याने पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. पोलिसी खाक्या दाखवताच अहुजा याने गॅसचा स्फोट झाल्याचे कबूल केले. सकाळी अकराच्या सुमारास एका रिक्षात मोठ्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना अचानक स्फोट झाला. स्फोटात आगीचा भडका उडाल्याने शशीराम अहुजा, सनी अहुजा आणि कामगार दत्ता गुरव हे तिघे जखमी झाले.

आगीत रिक्षा जळाली असून, फ्लॅटच्या खिडकीचे लाकडी दरवाजेही जळाले. विशेष म्हणजे याच ठिकाणी भरलेले २० सिलिंडर होते. तेही अर्धवट जळाले. सुदैवाने या सिलिंडरचा स्फोट झाला नाही. पोलिसांनी परिसराची झडती घेऊन लहान-मोठे ८५ सिलिंडर जप्त केले. यातील ५० हून अधिक सिलिंडर भरलेले आहेत. सिलिंडरची अवैध वाहतूक करणारा ट्रक (आरजे १४ जीई ७४४३), रिक्षा (एम एच ०९ ९३६८) आणि एक महागडी कार (एमएच ०२ एक्यू ३४१०) असा सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सहायक निरीक्षक विद्या जाधव यांनी पंचनामा करून अहुजाला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरासाठी हव्यात वाहतूक सुविधा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील वाहतुकीचे प्रमाण कमी करण्यासाठी भोवताली रिंगरोडचे नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर शहर व परिसरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी रिंगरोडच्या परिसराला अतिक्रमणमुक्त ठेवण्याबरोबरच शहरासाठी विविध सुविधांची पायाभरणीही आत्ताच होण्याची आवश्यकता आहे. ८८ किलोमीटर लांबीच्या रिंगरोडचा वापर पूर्ण क्षमतेने होण्यासाठी अतिक्रमण रोखण्यासाठी त्या मार्गावर ठिकठिकाणी बाजार तसेच महत्त्वाच्या ठिकाणांच्या जागांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. शहराबाहेर अवजड वाहनांना वाहनतळ, वाहतूक सुविधा प्रकल्प, वाहतूक विकास प्रकल्प, केएमटीची शटल बस सर्व्हिस, जुळ्या कोल्हापूरसाठी जमीन सर्व्हेक्षण या बाबींचा अग्रक्रमाने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहराची हद्दवाढ होत नसल्याने व अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतुकीमुळे कोंडी कमी करण्यासाठी सरकारने नुकताच रिंगरोड प्रस्तावित केला. या रिंगरोडमध्ये सभोवतालच्या ग्रामीण, इतर जिल्हा, विशेष जिल्हा तसेच राज्य मार्गांचा समावेश आहे. या रस्त्यावरुन शहरात नाइलाजाने जाणारी वाहने या रस्त्यांची साखळी करुन शहराबाहेरुन पाठवण्याचे नियोजन केले आहे. पण, जोडल्या जाणाऱ्या या सर्व रस्त्यांवर भविष्यात येणारा ताण आत्ताच लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने प्रादेशिक आराखड्यातील दळणवळण अभ्यास गट समितीचे सदस्य विनायक रेवणकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे पूर्वीच काही महत्त्वाच्या शि​फारशी​ केल्या आहेत. रिंगरोडचा वापर व्यवस्थित व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी खास लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा त्या रस्त्यावर ‘बायपास’ मिळण्याऐवजी जर वाहने रखडत चालली तर त्याचा वापर कमी होऊन पुन्हा शहरातील वाहतूक वाढण्याचा धोका असतो.

त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक वाढल्याने आपोआपच तेथील विविध व्यवसायाला चालना मिळून मोठी व्यावसायिक स्पर्धा होण्याची शक्यता आहे. त्यातून आपोआपच अतिक्रमणाला चालना मिळण्याची शक्यता असते. हे थांबवण्यासाठी या रस्त्यावरील महत्त्वाच्या गावांच्या ठिकाणी बाजारपेठांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे इतरत्र व्यवसाय वाढण्यापेक्षा नियोजित ठिकाणी चालना मिळेल व वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे रेवणकर यांनी शिफारशीमधून सुचवले आहे. याबरोबरच जिल्ह्यातील महामार्गाशी संलग्न ५० किलोमीटरच्या आवारातील प्रमुख गावांची वाढ होण्यासाठी पडीक जमीन टाऊनशीपसाठी प्रस्तावित करणे, दहा हजारावर लोकसंख्या असेल तर तिथे गरजेनुसार रस्ते प्रस्तावित करणे, भविष्यातील गरजांच्यादृष्टीने सर्व्हेक्षण करण्याची आवश्यकताही व्यक्त केली आहे.

रिंगरोडबाबतच्या दक्षतेसह शहरांतर्गत वाहतूक सुरळीत राहण्यासाठीही काही महत्त्वाचे मुद्दे रेवणकर यांनी मांडले आहेत. औद्योगिक वसाहतीकडे ये-जा करण्याचे प्रमाण मोठे असल्याने वसाहतीजवळच नागरी वसाहत उभारणीकरिता जमिनीची उपलब्धता करुन देणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरातील ही वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे, असे त्यांचे मत आहे. तीर्थक्षेत्रासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यांची सर्व वाहने शहरात येण्याऐवजी पर्यटकांना ने आण करण्यासाठी केएमटीची शटल सर्व्हिस सुरू करण्यात यावी, अवजड वाहनांसाठी वाहनतळ उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. पर्यटक वाहने व अवजड वाहनांबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनांचाही त्यांनी विचार केला आहे. शहराच्या प्रवेशद्वार व महामार्गाजवळ वाहतूक केंद्र स्थान निर्मिती केली पाहिजे, असे रेवणकर यांनी सुचवले आहे. यामध्ये खासगी प्रवाशी बस स्टँड, एसटी महामंडळ, बसस्टँड, रेल्वे स्टेशन, ट्रक टर्मिनल यांचा समावेश करण्यात यावा, असे त्यांचे मत आहे. प्रादेशिक आराखडा निश्चित करताना या बाबींचा विचार करण्यात यावा, याबाबतचे पत्र जिल्हा प्रशासनाकडे तसेच प्रादेशिक योजनेच्या नगररचना कार्यालयास देण्यात आले आहे.

....

शहराच्या तसेच जिल्ह्याच्या वाहतूकविषयक सुविधांसाठी २२ शिफारशी केल्या आहेत. शहरासाठी रिंगरोडबरोबरच अवजड वाहनांसाठी वाहनतळ आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश अवजड वाहतुकीचा प्रश्न संपुष्टात येऊन अंतर्गत वाहतूक सुरक्षित होईल. त्याबरोबरच स्टँड, रेल्वे स्टेशन, केएमटी टर्मिनल विविध ठिकाणी विखुरण्यापेक्षा एकाच ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला तर नागरिकांसाठी सोईस्कर होईल. त्यातून शहरातील अन्य रस्त्यांवर येणारा ताण कमी होईल.

विनायक रेवणकर, सदस्य, दळणवळण अभ्यास गट समिती, प्रादेशिक आराखडा

....

आणखी काही शिफारशी

गारगोटी, शिवडाव, आश्रमशाळा मार्ग गरजेचा

तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची १० किलोमीटरने रुंदी करावी

जुळे कोल्हापूरसाठी जमीन उपलब्ध करुन देण्यात यावी

गगनबावडा मार्गाचे चौपदरीकरण

गडहिंग्लज ते वेंगुर्ला मार्ग राष्ट्रीय महामार्ग करावा

करुळ घाटात दरी पूल मार्गाचे सर्व्हेक्षण करावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहन उद्योगातील ‘तेज’ वाटचाल

$
0
0

rahul.jadhav

@timesgroup.com

Tweet : @rahuljadhavMT

कोल्हापूर ः पश्चिम महाराष्ट्रातील घाटगे ग्रुप ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतिक समजला जातो. आजपर्यंतच्या त्यांच्या कार्यपद्धतीला केलेला तो एक सलामच म्हटला पाहिजे. घाटगे घराण्याची तिसरी पिढीही उद्योगात सक्रीय झाली असून त्यांनी घराण्याचा वारसा केवळ जपलेलाच नाही तर, आपल्या कर्तृत्वाने अधिक उंचावला आहे. या पिढीचे प्रतिनिधी म्हणून आता तेज सतीश घाटगे आपल्या ग्रुपच्या माई हुंडाई, रेनॉल्ट रोहर्ष मोटर्स, चेतन मोटर्स आण माई टीव्हीस या कंपन्यांचे संचालक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. तेज यांचे वडील सतीश हे ग्रुपचे मॅनेंजिंग डायरेक्टर आहेत तर आई साधना या ‘तेज कुरिअर’ च्या एमडी म्हणून काम पाहतात. बंधू तुषार हे ट्रान्सपोर्टचा परंपरागत व्यवसाय सांभाळतात. एकूणच हे ‘कुटुंब रंगलंय उद्योगात’ असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

तेज यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण शाहू विद्यालयात झाले. तर ११ वी साठी त्यांनी थेट ऑस्ट्रेलिया गाठले. तिथे त्यांनी ११ वी, १२ वी करून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. ऑस्ट्रेलियातील वास्तव्यात स्वयंपूर्णता आणि स्वयंशिस्तीचे महत्त्व अंगी बाणवता आल्याचे तेज आवर्जून सांगतात. भारतात परतल्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठातून पदवी शिक्षण घेतले. या काळात म्हणजेच २००२ पासून त्यांनी टाटा मोटर्स युनिटमध्ये ट्रेनी म्हणून काम करण्यास सुरूवात केली. कॉलेज संपल्यानतर रोज दुपारी चार ते पाच तास थांबून त्यांनी कामाचा अनुभव घेतला. २००४ मध्ये त्यांनी चेतन मोटर्स या युनिटची सूत्रे स्वीकारली. स्वतंत्रपणे काम करताना त्यांनी या युनिटचा टर्नओव्हर दोन वर्षांत दुप्पट केला. २००६ मध्ये त्यांनी माई हुंडाई, माई टीव्हएस या युनिटची सूत्रे स्वीकारली. आज घाटगे ग्रुपतर्फे हुंडाईची कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणची डिलरशीप असून ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी आउटलेट सुरू केली आहेत. तेज यांनी सूत्रे स्वीकारली त्यावेळी टीव्हीएसच्या महिन्याला ५० गाड्यांची विक्री होत असे. आजमितीला महिन्याला ५५० ते ६०० गाड्यांची विक्री होते .‘सर्व्हिस इज ट्रॅडिशन’ हे ब्रीद जपणाऱ्या घाटगे ग्रुपने ग्राहक हाच केंद्रबिंदू मानून दमदार वाटचाल सुरू ठेवली आहे. ग्राहकांच्या समाधानाला सर्वोच्च प्राधान्य देणारा घाटगे ग्रुप म्हणूनच दरवर्षी वाहन कंपन्यांच्या सन्मानास पात्र ठरतो आहे. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या पाठबळावरच आजपर्यंतची वाटचाल यशस्वी झाल्याचे तेज घाटगे आवर्जून नमूद करतात. तेज आपले संपूर्ण कामकाज व्यावसायिक पद्धतीने हाताळतात. ग्रुपमध्ये प्रत्येक विभागासाठी एका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक केली असून त्यांना निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. कामकाजासाठी एक रोडमॅप तयार केला असून त्यानुसारच काम केले जाते. सातत्याने होणारे बदल आणि नवनवीन तंत्रज्ञानाला सामोरे जाण्यासाठी कर्मचारी टेक्नोसॅव्ही व्हावेत यासाठी प्रोत्साहन दिले जाते. कर्मचारी उत्साही, प्रसन्न आणि समाधानी असेल तरच तो ग्राहकाला उत्तम सेवा देऊ शकेल हे जाणून त्यांच्यासाठी विविध ट्रेनिंग्ज, सहली आयोजित केल्या जातात. जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. ग्रुपच्या सोसायटीच्या माध्यमातून ७.५ ते आठ टक्के दराने दीड लाखापर्यंत कर्ज दिले जाते. कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी आणि मार्गदर्शनासाठी तेज यांच्या केबिनचा दरवाजा सदैव उघडा असतो. प्रत्येक कर्मचाऱ्याचा विमा उतरविण्यात आला असून एक कुटुंब म्हणूनच ग्रुपकडे पाहिले जाते.

सामाजिक कार्यातही सहभाग

साधेपणा जपणाऱ्या तेज यांना क्रिकेट आणि दुचाकी गाड्यांची खूप आवड आहे. ऑस्ट्रलियातही ते स्टेट लेव्हल क्रिकेट खेळले आहेत. तेज यांचा दिवस सकाळी साडेसातला सुरू होतो. बरोबर नऊ वाजता ते ऑफिस पोहाचतात. आठवड्यातील चार दिवस कोल्हापूर तर ऊर्वरित दोन दिवस अन्य शहरातील युनिटना वेळ देतात. आपला व्यवसाय सांभाळत असतानाच समाजाप्रती असलेले आपले कर्तव्यही ते विसरत नाहीत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी लवकरच ग्रुपतर्फे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ मोहीम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना ते सांगतात की, ‘उद्योग करायचा असेल तर तसा माईंडसेटही हवा. शिवाय कठोर परिश्रामाला पर्याय नाहीच.’

...

नेव्हर गिव्हअप

आपल्या आदर्शाबाबत बोलताना तेज म्हणाले,‘ माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेमधील ‘फाइटिंग स्पीरिट’ मला खूप भावते. त्याची ‘नेव्हर गिव्हअप’ची वृत्ती मला कायम प्रेरणा देते. शांत चित्ताने आणि टीमसाठी समर्पण भावनेने झटण्याची त्याची वृत्ती मी कायम डोळ्यासमोर ठेवतो.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांच्या सभेला परवानगी नाकारली!

$
0
0

सोलापूर । सूर्यकांत आसबे

वाहतुकीला होणारा अडथळा आणि सुरक्षेच्या कारणावरून सोलापूर पोलिसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता आयोजकांना पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.

सोलापूरच्या बाळीवेस येथील चौकात मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा घेण्याचा भाजप प्रयत्न होता. या चौकात सभा आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत त्या-त्या उमेदवारांना विजयी करण्यात महत्वाच्या ठरल्या आहेत. या चौकात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा झाल्या असून सातत्याने उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे या चौकाला विजयी चौक असे नाव पडले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा घेण्यासाठी या विजयी चौकाची परवानगी पोलिसांकडे मागण्यात आली होती. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारून दणका दिला आहे. रस्त्याला अडथळा होईल अशा सभांना परवानगी न देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा असून त्यामुळे त्यानुसार या चौकात सुरक्षा देताना मोठी अडचण येणार आहे. शिवाय, रहदारीला अडथळा होण्याची शक्यता ओळखून फडणवीस यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे. मंगळवार १४ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांची सभा होणार असून आता नवीन जागा सुचवावी असे संयोजकांना सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस डॉक्टरला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल तालुक्यातील पिराचीवाडी येथे गर्भलिंग निदान करणाऱ्या साताप्पा उर्फ पिंटू विष्णू रोडे (वय ३५) याला कागल पोलिसांनी अटक केली. सोनाळी येथे ही कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर या प्रकरणात एजंट म्हणून काम करणाऱ्या एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणातील काही एजंट कागल पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिस निरीक्षक संजय भांबुरे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस पथकाने ही कारवाई केली.

सीपीआर व कागल ग्रामीण रूग्णालयाने संयुक्तरित्या टाकलेल्या छाप्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या रोडेचा पर्दाफाश करण्यात आला होता. मात्र कारवाईवेळी रोडे पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. पोलिसांना तो सतत हुलकावण्या देत होता. रोडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर

वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात यापूर्वी दाखल आहेत. त्याचे शिक्षण दहावी नापास आहे. तरीही तो गर्भलिंग करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माघारीसाठी फिल्डिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवारी (ता.१३) माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विजयाचा मार्ग सुकर होण्यासाठी प्रस्थापित उमेदवार माघारीसाठी जोरदार फि‌‌ल्डिंग लावत आहेत. साम, दाम, दंड, भेदनीती वापर सुरू झाला आहे. आतापर्यंत झालेला खर्च देतो, शिवाय आणखी काय अपेक्षा असेल तर सांगा, पण माझ्यासाठी माघार घ्या, अशी आर्जवे केली जात आहेत. परिणामी या उमेदवारांचा भाव वधारला आहे.

जिल्हा परिषदेच्या ६७ जागांसाठी ८८५, तर पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी १५२३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सर्वच मतदारसंघांत उमेदवारांची गर्दी झाली आहे. खुल्या प्रवर्गात तुल्यबळ उमेदवार आहेत. भाजप, सेनेने जिल्हा परिषद आणि अधिकाधिक पंचायत समित्यांवर सत्ता मिळवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. याउलट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची अस्तित्वाची लढाई आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसमोर ताकद कायम राखण्याचे आव्हान आहे. सर्वच जिल्हा परिषद मतदारसंघांतील लढत चुरशीने होणार असल्याचे संकेत आहेत.

मतांची विभागणी टाळण्यासाठी अपक्ष, पक्षातील नाराजांचा उमेदवारी अर्ज माघारीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विरोधी तगडा उमेदवार नसला तरी बिनविरोध येण्यासाठी लाखांत ऑफर दिली जात आहे. दबावतंत्राचा वापर केला जात आहे. त्यासाठी जिल्हा, तालुका नेत्यांचे जवळचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

………

चौकट...

नेत्यांच्या मुलांच्या मतदारसंघात

नेत्यांची मुले रिंगणात असलेल्या मतदारसंघात प्रत्येक मताला किंमत येणार आहे. तेथे उमेदवारांची संख्या कमी व्हावी म्हणून दबावतंत्र सुरू आहे. घटक पक्ष, स्थानिक आघाडीचा उमेदवारी माघार घेण्यासाठी गळ घातली जात आहे.

००००००००००००००

पुढील प्रक्रिया अशी ः

अपील नसल्यास अर्ज माघारी – १३ फेब्रुवारी

अपील असल्यास अर्ज माघारी – १५ फेब्रुवारी

मतदान – २१ फेब्रुवारी

मतमोजणी - २३ फेब्रुवारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकअदालतीत साडेपंधरा कोटींवर तडजोड रक्कम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

न्यायसंकुलात शनिवारी आयोजित केलेल्या लोकअदालतीला मोठा प्रतिसाद मिळाला. दाखल झालेल्या १९ हजार ९४७ प्रकरणांपैकी १२५१ प्रकरणांत यशस्वी तडजोड झाली. या तडजोडीतून १५ कोटी ४१ लाख ६२ हजार रुपये रक्कम फिर्यादिंना मिळणार आहेत. मोटार वाहन अपघातातील ३५७ प्रकरणांत तीन कोटी ९६ लाख ७१ हजार रुपये रक्कम तक्रारदारांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा व विधी सेवा प्राधिकारणाच्यावतीने आयोजित या लोकअदालतीचे उदघाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी.अवचट यांच्याहस्ते झाले. अदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी (तडजोडपात्र गुन्हे), भूसंपादन नुकसान भरपाई, बँक आणि अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान आणि वसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद, मोटार अपघात नुकसान भरपाई, महसूल, कामगार वाद, वन कायदा अशा प्रकरणांचा समावेश होता.

अदालतीच्या कामकाजाची पाहणी न्यायाधीश अवचट यांनी केली. न्यायाधीश सुधीर कुलकर्णी, सुनील वेदपाठक, सौ. ए. यू. कदम यांच्यासह अन्य न्यायाधीश, वकील, पॅनेल सदस्य, तसेच पक्षकार उपस्थित होते. लोकअदालतीच्या पॅनेलवर प्रथमच विशेष बाब म्हणून तृतीयपंथी प्रतिनिधी, वारांगना समाजसेविका यांची नियुक्ती करण्यात आली होती.

वाद ३२ वर्षांनी मिटला

मलकापूर-शाहूवाडी कोर्टात गंगाराम परशुराम भोसले विरुद्ध विष्णू हरी भोसले यांच्यात विशाळगड येथील जमीन वाटपाचा दावा १९८५ पासून प्रलंबित होता. दोन्ही पक्षकारांनी आपापसांत तडजोडीने हा दावा मिटवला. पॅनेलवरील वकील एल.व्ही. पाटील, वाय. ए. शेळके यांनी काम पाहिले. दत्ता पोवार व टी.एस. डोंगरे यांनी मध्यस्थी केली. मंदार परांजपे व जे. एस. काकडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा घाटाचे सौंदर्य बहरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा घाट संवर्धन, पुनर्बांधणी व सौंदर्यीकरणाला राज्य सरकारने चार कोटी २८ लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प २८ कोटी रुपयांचा असून, जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे दीड वर्षापूर्वी प्रकल्पाचे सादरीकरण केले आहे. या प्रकल्पामुळे कोल्हापूर शहराच्या पर्यटनस्थळात नवीन स्थळाची भर पडणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणे येथील मुख्य अभियंता प्रवीण किडे यांनी पंचगंगा नदी परिसराची नुकतीच पाहणी केली. महापालिकेने आपल्या ताब्यातील घाट परिसरातील जागेची एनओसी यापूर्वीच दिली आहे. तसेच छत्रपती ट्रस्टने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवली आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्या फार कमी असून पंचगंगा नदी प्रवाही असल्याने घाटांचे सौंदर्य चांगलेच खुलून दिसते. घाटाचे महत्त्व, परिसर, ब्रह्म्पुरी पिकनिक पॉइंट, पंचगंगा प्रदूषण या सर्व गोष्टींचा अभ्यास करून या प्रकल्पाचे डिझाइन तयार केले आहे. सध्या हनुमान मंदिराजवळील असलेल्या घाटापासून म्हशी जाण्याचा रस्ता, परीट घाट, ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंटचा खालील भाग, शिवाजी पूल, दशपिंड घाट, खवन घाटापर्यंत नवीन दगडी घाटाचे नियोजन केले आहे. ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंट व परीट घाटाच्या खालच्या भागात चांगला दगड असल्याने पायाची जरूरी भासत नाही. दगडी पायऱ्यांचे घाट व कमानीच्या दिवळ्या अशी रचना केली आहे. पुराचे पाणी दिवळ्यांमध्ये खेळून पुन्हा नदीत येणार असल्याने पुराचा धोकाही कमी होणार आहे. ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंटच्या खालील बाजूने एक नव्याने उद्यान विकसित करण्यात येणार आहे. ब्रह्म्पुरी पिकनिक पॉइंट, नवीन उद्यान, दिवळ्या व घाटाकडे जाण्यासाठी जिने व रस्ते तयार केले जाणार आहेत. सध्या ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंटवरून अधिक उंचीवरून सूर्यास्त पाहता यावा यासाठी ४० फूट उंचीच्या सनसेट पॉइंटची उभारणी करण्यात येणार आहे.

नऊ एकर जागेत ३५० ते ४५० रनिंग मीटरचा हा प्रशस्त घाट होणार आहे. रिटेनिंग वॉल, लॅन्डस्केपचा समावेश असणार नाही. या प्रकल्पात सध्या असलेल्या घाट, मंदिरांचा जीर्णोद्धारही करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. पहिल्या टप्प्यातील कामास चार कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. परीट घाटाकडे जाणाऱ्या मार्गापासून सुशोभिकरण काम सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. नवीन शिवाजी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होणार आहे.


पंचगंगा घाट परिसर सौंदर्यीकरण कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. अन्य विभागांकडून परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामास प्रारंभ होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे यांनी सूचना दिल्या आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर कोल्हापुरात आणखी एका पर्यटनस्थळाची नोंद होणार आहे.

आर. एस. पाटील,

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंडांच्या खूनप्रकरणीसाथीदाराला अटक

$
0
0

गुंडांच्या खूनप्रकरणी

साथीदाराला अटक

म. टा. वृत्तसेवा, कराड

चोऱ्या, दरोड्यातील पैशाच्या देवाणघेवाणीतून बनवडी (ता. कराड) येथील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन राहत असलेल्या लिंब (जि. सातारा) येथील सराईत गुन्हेगाराचा त्यांच्या साथीदारानेच धारदार कोयत्याने मानेवार वार करून निर्घृण खून केला. ही घटना शनिवारी उघडकीस आली असली. हल्लेखोर अमोल पोळ यास रविवारी पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने अटक केली.

नान्या उर्फ अभिजित तुळशीदास पवार (वय ३५, मूळ रा. लिंब, ता. सातारा) असे खून झालेल्या दरोडेखोराचे नाव आहे. त्याचा साथीदार अमोल बाबूराव पोळ (३०, सध्या रा. सातारा, मूळ रा. राऊतवाडी, ता. कोरेगाव) असे अटक केलेल्या संशयित हल्लेखोराचे नाव आहे. या प्रकरणी शनिवारी सायंकाळी येथील शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, शनिवारी नान्याने चोरी, दरोडे आदी गुन्ह्यांतून मिळविलेले पैसे साथीदार अमोल पोळ यास देण्यासाठी बोलाविले होते. दोघे दारू पिऊन पैशांच्या देवाणघेवाणीवर वाद घालत बसले होते. या वादाचे पर्यावसान दोघांच्या भांडणात होऊन अमोल पोळ याने नान्याच्या मानेवर सपासपा वार केल्याने तो जागीच ठार झाला. मात्र, नान्या बराच वेळ झाले घराबाहेर आला नाही म्हणून अपार्टमेंटचे वॉचमन रमेश पेठकर शनिवारी दुपारच्या सुमारास त्याच्या फ्लॅटमध्ये गेले असता फ्लॅटच्या बेडरूममध्ये नान्या पवार याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसले. पेटकर यांनी या बाबतची माहिती पोलिसांना कळविली.

नान्यावर ३६ गुन्हे

नान्या पवार पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल चोरटा होता. नान्यासह त्याचा साथीदार अमोल पोळ त्यांच्याविरूद्ध चोरी, जबरी चोरी, दरोडा, लुटमार, दुचाकी चोऱ्या, असे विविध प्रकारचे ३६ गुन्हे सातारा व सांगली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत नोंद आहेत. लग्नकार्यात पाहुणा म्हणून सहभागी होऊन कार्यालयातील गर्दीत महिलांच्या दागिन्यांची हातसफाई करण्यात ते तरबेज होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीभाजपच्या तगड्या आव्हानामुळे हा निर्णय

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कराड तालुक्यात अखेर राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचा झंझावात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असावा, असे कार्यकर्त्यांतून सांगितले जात आहे.

केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत असल्याने सत्तेकडील पक्ष प्रवेशासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडत असल्याने कार्यकर्त्यांचे आऊट गोईंग व पक्षांतर्गत वाढती बंडाळी या पासून बचाव करण्यासाठी अगदी शेवटी कराड तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपचा वाढता प्रभाव व कार्यकर्त्यांची वाढती नाराजी यामुळे भाजपचे तगडे आव्हान कोणा एकट्याला पेलता येणार नाही, याची खात्री झाल्यानेच या दोन्ही पक्षांना एकत्रित निवडणूक लढविण्याशिवाय पर्याय राहिला नाही. शिवाय पक्षांतर्गत बंडाळीचा भाजपला फायदा होऊ शकतो, त्यामुळे अखेरच्या टप्प्यात हे मनोमिलन झाले असल्याचे सांगितले जात आहे.

पृथ्वीराज चव्हाण गटाला खिंडार

कराड तालुक्यातील वारूंजी पंचायत समिती गणाच्या काँग्रेसच्या विद्यमान सदस्या अश्विनी रमेश लवटे यांनी आपले पती व मुंढे गावचे विद्यमान सरपंच रमेश पांडुरंग लवटे, ग्रामपंचायत सदस्या स्वाती रवींद्र चव्हाण, कल्पना भगवान डोंबाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी गावडे यांनी २०० कार्यकर्त्यांसह काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.

भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांची भेट घेऊन येत्या गुरुवारी १६ फेब्रुवारी रोजी येथे होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेत भाजपत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॉफ्ट स्किल्सविषयी आज कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अभ्यासक्रमातील तांत्रिक ज्ञानाबरोबरच सर्जनशील व्यक्तिमत्त्व, प्रभावी देहबोली आणि संघभावना अशा सॉफ्टस्कीलचे ज्ञान व्हावे, यासाठी फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्फॉफ्ट स्कील फॉर एम्प्लॉयबिलिटी’ विषयावर कार्यशाळा होणार आहे. शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेतंर्गत ही कार्यशाळा होणार आहे. राजारामपुरीतील व्ही. टी. पाटील सभागृहात सोमवार (ता. १३) सकाळी ९ वाजता प्रभारी कुलगुरू डॉ. डी. आर. मोरे यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याची माहिती अग्रणी महाविद्यालयाचे अध्यक्ष व भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

प्राचार्य डॉ. मोरे म्हणाले की, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व फार्मसी कॉलेजची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच वाढत्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सक्षमपणे टिकून राहण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी, संत गजानन कॉलेज ऑफ फार्मसी व अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी. फार्मसी यांच्या संयुक्ती विद्यमाने कार्यशाळा होत आहे. कार्यशाळेत ठाणे येथील गॅब कन्सलटंट संस्थेचे आनंद पाटील, संतोष इंगोले, विनय गोसावी मुलाखत तंत्र, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि रिझ्युम रायटिंग याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

समन्वयक व अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील म्हणाले, ‘स्पर्धेत टिकण्यासाठी अन्य कौशल्येही आत्मसात करणे आवश्यक आहे. यासाठी कार्यशाळा होणार आहे. विद्यापीठक्षेत्रात अनेक फार्मसी कॉलेज ग्रामीण भागात आहेत, ते‌थील विद्यार्थ्यांना कार्यशाळेचा फायदा होणार आहे.’

पत्रकार बैठकीस तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. जे. आय. डिसोझा, अग्रणी महाविद्यालयाचे सेक्रेटरी डॉ. एस. जी. किल्लेदार, डॉ. यू. एस. पाटील आदी उपस्थित होते.


- कार्यशाळेत १७ फार्मसी कॉलेजचा समावेश
- ५०० विद्यार्थी सहभागी होणार
- गॅब कन्सलटंटचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार
- उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सत्कार
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पर्वणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वयंघोषित नेतेगिरीला चाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील फेरीवाल्यांचे पुनर्वसन, फेरीवाले झोनची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार वीस जणांची समिती नेमण्यात येणार आहे. यामध्ये आठ सदस्य हे थेट फेरीवाल्यांतून मतदान घेऊन निवडण्यात येणार आहेत. समितीवर प्रतिनिधीत्व करणारे स्वत फेरीवाले असणे बंधनकारक आहे. येत्या सह महिन्यात समितीची स्थापना, फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण, निवडणूक आणि झोननुसार पुनर्वसन करावे लागणार आहे. महापाकिला त्रयस्थ यंत्रणेकडून फेरीवाल्यांचा सर्व्हे करणार आहे. फेरीवाले थेट निवडणुकीतून प्रतिनिधी निवडणार असल्याने फेरीवाल्यांच्या संघटनेच्या नावाखाली अनेकांच्या स्वयंघोषित नेतेगिरीला चाप बसणार आहे.

राज्य सरकारने फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासंदर्भात नऊ जानेवारी २०१७ रोजी नवीन नियमावली महापालिकेला कळविली आहे. याकरिता महापालिका स्तरावर वीस सदस्यीय समितीची स्थापना होणार आहे. यामधील आठ सदस्यांत आयुक्त, जिल्हा पोलिस अधिक्षक, आरोग्य अधिकारी, महापालिकेच्या अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. समाजातील विविध घटकातील चार सदस्यांना स्थान दिले जाणार आहे. ऑनलाइन अर्ज मागवून चौघांची

निवड होणार असून सध्या त्याची प्रक्रिया सुरु आहे. चार जागेसाठी आतापर्यंत एक अर्ज प्राप्त झाला आहे.

त्रयस्थ यंत्रणेकडून होणार शहरातील सर्व्हे

पहिल्या टप्प्यात बारा सदस्यांची समिती स्थापन झाल्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. समितीमधील फेरीवाल्यासाठी रिक्त आठ जागासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. फेरीवाल्यांतून निवडण्यात येणाऱ्या प्रतिनिधीसाठी संबंधित व्यक्तीचा स्टॉल असणे अत्यावश्यक आहे. फेरीवाला गटातून निवडणूक लढविणारा हा प्रत्यक्षात फेरीवाला असायला पाहिजे. त्या संदर्भातील कागदपत्रे त्यांनी प्रशासनाकडे सादर करावयाची आहेत. जे प्रत्यक्षात फेरीवाले नाहीत त्यांना निवडणक लढविण्यावर मर्यादा पडणार आहेत. दरम्यान फेरीवाल्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्याअगोदर शहरातील फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. महापालिका त्रयस्थ यंत्रणेकडून सर्व्हे करुन घेणार आहे. याकरिता दहा लाख रुपयांची तरतूद केली आहे.

चार वर्षात दुसऱ्यांदा सर्व्हे

महापालिकेने यापूर्वी २०१३ मध्ये शहरातील फेरीवाल्यांचा सर्व्हे केला होता. त्यावेळी शहरात ८४०० इतक्या फेरीवाल्यांची नोंद झाली होती. महापालिकेने फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा एक भाग म्हणून बायोमेट्रिक कार्ड पद्धत सुरु केली. २०१३ मध्य सर्व्हे झाल्यानंतर प्रशासनाने ५४०० बायोमेट्रिक कार्ड तयार केले. त्यापैकी ३५०० फेरीवाल्यांनी बायोमेट्रिक कार्ड नेले. शिल्लक कार्डे महापालिकेकडे पडून आहेत. आता राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरातील फेरीवाल्यांचा पुन्हा सर्व्हे होणार आहे.


महापालिका प्रशासनाने २०१४ मध्ये झालेल्या फेरीवाला संरक्षण विषयक कायद्याप्रमाणे व्यवहार केला पाहिजे. मात्र महापालिका नियमानुसार कामकाज करत नाही. हायकोर्टाने, मे २०१४ पूर्वीच्या फेरीवाल्यांवर कारवाई करु नका असा आदेश आहे. या आदेशात २०१४ नंतर सुरु झालेल्या फेरीवाला व्यवसायावर कारवाई करावी असे म्हटले नाही. यामुळे महापालिकेला कारवाईचा ​अधिकार पोहचत नाहीत. कायद्याने एकूण लोकसंख्येच्या अडीच टक्के इतके फेरीवाले निश्चित मानले आहे. निवडणुका कामगार अधिकाऱ्यांनी घेतले पाहिजेत. महापालिकेला अधिकार नाही.

- कॉम्रेड दिलीप पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांचन परुळेकर यांना कुसुम पुरस्कार प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘प्रत्येकाला आयुष्यात अनेक संकटे आणि अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत जर सकारात्मक दृष्टिकोन घेऊन तसेच वेगळ्या पद्धतीने विचार केल्यास जगण्याची नवी उमेद आणि ऊर्जा मिळते,’ असे प्रतिपादन माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले.

शाहू स्मारक भवन येथे आंतरभारती शिक्षण मंडळ व पाटगावकर कुटुंबीयांच्यावतीने आयोजित कुसुम पुरस्कार सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुचेता कोरगावकर होत्या. नीला सत्यनारायण यांच्या हस्ते कांचन परुळेकर यांना कुसुम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख २५ हजार रुपये आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘संवाद स्वतःशी’ कार्यक्रमात बोलताना सत्यनारायण म्हणाल्या, ‘प्रत्येक व्यक्तीने एखाद्या नकारात्मक गोष्टीतूनही सकारात्मक विचार घेऊन आयुष्याची वाटचाल केल्यास जीवनातील आनंदाचे क्षण मनसोक्त जगता येतात. माणसातील वैगुण्य न पाहता त्याच्यातील अंतरंग आणि चांगुलपणा पाहिल्यास अनेक गोष्टी सुंदर दिसतील.’

परुळेकर म्हणाल्या, ‘सध्याची राजकारणातील महिलांची निर्णयक्षमता पाहता त्यांना राजकीय साक्षर बनविण्याची गरज आहे. आजही राजकारणात असलेल्या अनेक महिलांचे निर्णय हे त्याचे पतीच घेत असल्याने महिलांचे अस्तित्व केवळ सहीपुरतेच या क्षेत्रात दिसून येते. स्वयंसिद्धाच्या माध्यमातून महिलांना चूल आणि मूल या चौकटीपलीकडे आर्थिक सक्षमीकरण केले. युवतींना स्वसंरक्षणाचे

प्रशिक्षण दिले तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केल्याने आज तीन हजार महिला उद्योजिका बनल्या आहेत.’

यावेळी कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर उपस्थित होत्या. तनुजा शिपूरकर यांनी प्रास्ताविक केले. इंद्रायणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सचिव एम. एस. पाटोळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​अल्प प्रतिसादामुळे शेट्टी संतापलेकवठेएंकद येथील सभेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

‘कवठेएकंद (ता. तासगाव) येथे शनिवारी सायंकाळी आयोजित केलेल्या प्रचार सभेला अगदीच अल्प प्रतिसाद मिळाल्याने स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी चांगलेच संतापले. आंदोलनाला गर्दी करता. लुटीची व्यवस्था संपली पाहिजे म्हणता. एकीकडे तुम्हाला आंदोलनातून न्याय मिळाला पाहिजे आणि दुसरीकडे माझ्या कार्यकर्त्यांसाठी मत मागायला आलो तर माझ्यातले आणि तुमच्यातले अंतर वाढलेले दिसते, असा दांभिक आणि ढोंगीपणा करणार असाल तर शेतकऱ्यांच्या हयातीत त्याला न्याय मिळणार नाही, बळीराजा तुमचे कल्याण करो,’ असे म्हणत शेट्टी कोपरापासून हात जोडून सभेच्या ठिकाणावरून निघून गेले.

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला स्वबळावरच निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे. स्वाभिमानीचे अवघे चार उमेदवार रिंगणात आहेत. चिंचणी जिल्हा परिषद मतदारसंघातून सचिन पाटील, मणेराजुरीतून जोतीराम जाधव, मांजर्डेतून शशिकांत माने आणि कुची पंचायत समितीमधून सुरज पाटील निवडणुक लढवत आहेत. या चौघांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याच्या निमित्ताने खासदार शेट्टी शनिवारी कवठेएकंद येथे आले होते. ऊसदराच्या आंदोलनात कवठेएंकद येथील शेतकऱ्यांनी शेट्टींना मोठी साथ दिली होती. शिवाय परिसरातील शेतकऱ्यांचे भूविकास बँकेचे कर्जमाफ व्हावे, यासाठी शेट्टी यांनी खूप धडपड केलेली आहे. काही दिवसांपूर्वी कवठेएकंदच्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने शेट्टी यांची भेट घेऊन कर्जमाफीचा विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर सभेला अल्प प्रतिसाद मिळाल्याने शेट्टींना संतापल्याची माहिती समोर येत आहे.

कवठेएकंद येथील सभेत बोलताना शेट्टी म्हणाले, ‘तुम्ही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होता. त्यातून तुम्हाला न्याय मिळतो. लुटीचा धंदा बंद झाला पाहिजे, अशी तुमची इच्छा आहे. मी जेव्हा जेंव्हा या गावात आलो, त्या-त्या वेळी लोक मोठ्या संख्येने आले. पण, आज मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी मत मागायला आलो तर लोकांमधले आणि माझ्यातले अंतर वाढल्याचे माझ्या लक्षात आले आहे, असे होणार असेल तर उभ्या हयातीत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. बळीराजा तुमचो कल्याण करो.’
ऐनवेळी नियोजन केल्याने

कमी गर्दी- खराडे

सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने खासदार शेट्टी यांच्या सभेचेही राज्यात अनेक ठिकाणी मागणी आहे. त्यांना भूम-परांडा या भागात सभेसाठी जायचे होते. त्या अगोदर थोडा वेळ असल्याने त्यांनी कवठेएकंद येथील सभा स्वीकारली होती. कार्यकर्त्यांना पाठबळ आणि प्रचाराचा शुभारंभ करण्याच्या हेतूने शेट्टीं यांनी सभा घेण्याचे ठरविले होते. अचानक सभा निश्चित झाल्याने कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. काही कार्यकर्ते परगावी होते. त्यामुळे उरल्यासुरल्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून गावात शेट्टींची सभा असल्याचे सांगायला सुरुवात केली होती. परंतु, कार्यकर्त्यांचा हा सांगावा अनेकांपर्यंत पोहचू शकला नाही. सभेला लोक होते, परंतु विखुरलेले होते, अशी माहिती खुलासा संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images