Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

एकतर्फी प्रेमातून आईवर चाकूहल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा

बीड बायपास परिसरात शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करीत चार महिन्यांपासून तिचा पाठलाग करणाऱ्याने मुलीच्या आईवर मंगळवारी दुपारी चाकूहल्ला केला. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून बुधवारी कोर्टात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बीड बायपास परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीचा मिनाज सिराज काजी हा चार महिन्यांपासून पाठलाग करत होता. तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत ती शाळेत जाताना व येताना तिचा नेहमीच पाठलाग करत होता. तो तिला माझ्याशी प्रेम कर, अशी धमकी देत होता. या मुलीने ही माहिती आईला सांगितली. या मुलीची आई परिसरात छोटेसे किराणा दुकान चालवते. खबरदारीचा उपाय म्हणून मुलीच्याआईने मुलीवर काही बंधने आणली. याचा मिनाजला राग आला. तो मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास तो अल्पवयीन मुलीच्या आईच्या किराणा दुकानात गेला. ‘तू मुलीवर फार बंधने आणली आहेत, असे का केले,’ अशी विचारणा करत मुलीच्या आईवर चाकू हल्ला केला. त्याने या महिलेचा चेहरा, पोट, शरिराच्या इतर भागावर चाकूचे वार केले व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीच्या आईवर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुशीला खरात या करीत आहेत.

मुलींची सुरक्षा धोक्यात

शाळा व महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींच्या संरक्षणासाठी दामिनी पथक नेमले असले तरी त्यांना त्रास देण्याच्या घटना या वारंवार होतात. या प्रकारच्या घटनेतूनच गेल्या आठवड्यात साताऱ्यातील एका विहिरीत युगलाने उडी मारली होती. बकऱ्या चारणाऱ्या गुराख्याने पाहिल्यामुळे त्याने आरडाओरडा करताच नागरिक जमा झाले होते. त्यातील एकाने मुलीस वाचवले होते. मंगळवारच्या घटनेत मुलीच्या आईवर चाकूहल्ला करण्यापर्यंत मजल गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुसऱ्या दिवशीही किरणे देवीच्या कंबरेपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या दुसऱ्या ​दिवशी बुधवारी मावळतीची सूर्यकिरणे मूर्तीच्या कंबरेपर्यंतच पोचली. दरम्यान, मंगळवारच्या तुलनेत आजच्या किरणांची तीव्रता कमी राहिली आणि ती कालच्या तुलनेत अधिक प्रमाणात मूर्तीच्या डावीकडे वळली. गुरूवारी किरणोत्सवाचा शेवटचा दिवस असून अडथळ्यांमुळे किरणे पुन्हा कंबरेपर्यंतच पोचतील आणि देवीला मुखस्पर्श होऊन किरणोत्सव सोहळा पूर्ण होईल याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

बुधवारी सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत किरणांनी गरूड मंडपात प्रवेश केला. त्यानंतर दोन मिनिटांनी पितळी उंबरा आणि सहा वाजून सोळा मिनिटांनी किरणांनी चरणस्पर्श केला. त्यानंतर दोन मिनिटे किरणे चरणापासून कंबरेपर्यंत स्थिरावली आणि सहा वाजून अठरा मिनिटांनी ती डावीकडे लुप्त झाली. किरणोत्सव समितीने आज विशिष्ट ठिकाणाहून किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांची छायाचित्रेही घेतली. यावेळी देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, समितीचे उदय गायकवाड, प्रा. डॉ. किशोर हिरासकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपूर-सांगलीच्या प्रेमीयुगुलाचे पलायन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होत असल्याने प्रेमीयुगुलाने सुमारे अडीच महिन्यांपूर्वी पलायन केले. यानंतर मुलीचे अपहरण केल्याचा आरोप करून मुलाचे वडील गुंडांकरवी धमक्या देत असल्याची कैफियत मुलीची आई गीता व वडील पीयूष राजेंद्र शहा यांनी पत्रकारांसमोर केली. माझ्या बेपत्ता मुलीचा शोध घेण्याऐवजी पोलिसांनी माझी पत्नी व मेहुणी यांनाच विविध गुन्ह्यांखाली अटक केल्याचे त्यांनी सांगितले.

जयसिंगपूर येथील कापड व्यापारी पीयूष राजेंद्र शहा व गीता शहा यांची मुलगी चैताली (वय २०) ११ नोव्हेंबर २०१६ रोजी पहाटे बेपत्ता झाली. आपण सांगली येथील यश राहुल शहा याच्या घरच्यांकडून लग्नाला विरोध होत असल्याने मी त्याच्यासोबत पळून जात असल्याची चिठ्ठी चैतालीने घरात ठेवली होती. यानंतर पीयूष शहा यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची वर्दी जयसिंगपूर पोलिसांत दिली होती, तर राहुल शहा यांनी मुलगा यश बेपत्ता झाल्याची वर्दी सांगली पोलिसांत दिली. यानंतर पलायन केलेल्या प्रेमीयुगुलाने अज्ञातस्थळी विवाह केला. तसेच विवाहाची छायाचित्रे नातेवाईक व पोलिसांना पाठविली.

माझ्या बेपत्ता मुलीचा शोध घेण्याऐवजी १९ डिसेंबरला रात्री अडीच वाजता सांगली पोलिस माझ्या घरी आले. यावेळी सोबत महिला पोलिस नसतानाही त्यांनी माझी चौकशी केल्याचे गीता शहा यांनी पत्रकारांना सांगितले. चैताली व यश यांना आम्हीच लपवून ठेवल्याचा आरोप होत आहे. पोलिसांकडून एकतर्फी चौकशी सुरू आहे. मुलाच्या कुटुंबीयांकडून गुंडांच्या माध्यमातून आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. १२ जानेवारीला सांगली पोलिसांनी व माझी बहीण सिद्धी विनायक जाधव यांना अटक केली. मात्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे गीता शहा यांनी सांगितले. मुलीचा तत्काळ शोध घ्यावा, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली असल्याचेही शहा दाम्पत्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३० तासांनी स्वीकारला जितेंद्र मुळेंचा मृतदेह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्ज वसुलीची नोटीस आल्याच्या धास्तीने विष पिऊन आत्महत्या केलेले शेतकरी जितेंद्र धोंडिराम मुळे (वय ४८, रा. जाधववाडी) यांचा मृतदेह नातेवाइकांनी तब्बल ३० तासांनी स्वीकारला. मुळे यांचे मेहुणे कृष्णात पाटील यांनी फसवणूक केल्याचा आरोप करीत दोन्ही कुटुंबीयांत वाद झाल्याने मंगळवारपासून मृतदेह सीपीआरमध्येच होता. अखेर मुळे यांच्या नातेवाईकांनी बुधवारी (ता. १) दुपारी मृतदेह स्वीकारला, मात्र कर्जाच्या रकमेवरून दोन्ही कुटुंबीयांमधील वाद कायम आहे.

जाधववाडीतील जितेंद्र मुळे यांचे मेहुणे कृष्णात आनंदा पाटील यांनी १२ वर्षांपूर्वी मुळे यांच्या शेतात म्हैशी पालनाचा प्रोजेक्ट सुरू केला होता. यासाठी त्यांनी मुळेंची जमीन तारण ठेवून साडेसात लाखांचे कर्ज घेतले होते. कर्ज वेळेत न फेडल्याने ही रक्कम वीस लाखांवर पोहोचली. जानेवारी महिन्यात मुळे यांना कर्जवसुलीची नोटीस आल्यानंतर ते अस्वस्थ होते. याच नैराश्यातून त्यांनी २७ जानेवारीला विष पिऊन आत्महत्या केल्याचा आरोप मुळेंच्या नातेवाईकांनी केला.

मुळे यांचे मंगळवारी उपाचारांदरम्यान निधन झाल्यानंतर मुळे आणि पाटील कुटुंबीयांमधील वाद उफाळून आला. त्यातून मुळे कुटुंबीयांनी जितेंद्र यांचा मृतदेह स्वीकारला नव्हता. तीस तास मृतदेह सीपीआरच्या फ्रिजरमध्ये ठेवावा लागला. अखेर बुधवारी मुळे कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. कर्जाची रक्कम भरण्यासाठी कृष्णात पाटील यांना मुळे कुटुंबीयांनी दोन दिवासांची मुदत दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेसाठी पाठपुरावा हवाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खुद्द रेल्वेमंत्र्यांनी दिलेले कोल्हापूर ते मुंबई दरम्यान नवीन एक्सप्रेस रेल्वेचे आश्वासन, गेल्या बजेटमध्ये कोल्हापूर वैभववाडी नवीन रेल्वे मार्गाच्या मिळालेल्या मंजुरीनंतर आर्थिक तरतुदींची प्रतिक्षा, कोल्हापूर ते पुणे दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाच्या कामाला वेग येण्यासाठी या बजेटमध्ये करण्यात आलेल्या तरतुदीतून कोल्हापूरसाठी निधी खेचून आणावा लागणार आहे. तीर्थस्थळांसाठी विशेष रेल्वे सुरू करण्याच्या धोरणाप्रमाणे येथील अंबाबाईच्या प्रसिद्ध तीर्थस्थळापर्यंत नवीन रेल्वे सुरू करण्याची संधी चालून आली आहे. येथील मंजूर असलेल्या प्रकल्पांसाठी मंत्री व खासदारांनी वजन वापरुन निधी आणला तरच कामांना सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.

​कोल्हापूर रेल्वेच्या विकासासाठी तीस वर्षांपासून सातत्याने विविध मागण्या केल्या जात आहेत. येथील रेल्वे स्टेशनच्या इमारतीचा विकास करण्यापासून ते येथे नवीन रेल्वे सुरू करण्यापर्यंतच्या अनेक मागण्यांना सातत्याने वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या होत्या. वैभववाडी मार्गे कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडण्याच्या मागणीनुसार केवळ सर्व्हेचे काम होत होते. पण त्यापुढे काही हालचाल होत नव्हती. कोकणातील असलेले सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाल्यानंतर वैभववाडीला कोल्हापूर रेल्वेने जोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची आशा निर्माण झाली होती. त्यानुसार त्यांनी गेल्या रेल्वे बजेटमध्ये १३७५ कोटी रुपयांच्या वैभववाडी रेल्वे मार्गाला मंजुरी दिली. त्यासाठी तात्पुरती एक लाख रुपयांची तरतूद बजेटमध्ये केली होती. त्यानंतर हा मार्ग तयार करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्यावतीने नवीन कंपनी करण्याला मंजुरी ​झाली आहे. कामकाज सुरू करण्याची सारी तयारी झाली असल्याने या रेल्वे बजेटमधून या कामासाठी मोठ्या तरतुदीची अपेक्षा आहे. रेल्वेसाठी एक लाख ३१ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून वैभववाडी मार्गासाठी मोठी तरतूद अपेक्षित आहे. त्यामुळेच पुढील कामाला वेग येणार आहे.

कोल्हापूरसाठी नवी दिल्ली, अहमदाबाद, तिरुपती, बेंगलुरु, धनबाद अशा रेल्वे सुरू झाल्या. त्यातील तिरुपती व बेंगलुरु सोडल्यास इतर रेल्वे आठवड्यातून एकदा सोडल्या जातात. मुंबईसाठी तीन रेल्वे असल्या तरी एका वेगवान रेल्वेची आवश्यकता आहे. त्यासाठी खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अशी रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. पण आजतागायत त्यावर काही निर्णय झालेला नाही. या बजेटमध्ये तीर्थस्थळांसाठी नवीन विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचा लाभ घेत अंबाबाईसारख्या प्रसिद्ध तीर्थस्थळापर्यंत विशेष रेल्वे सुरू करण्याची संधी आहे. मुंबईसाठीची रेल्वे होऊ शकली नाही. त्यामुळे या विशेष रेल्वेची

मागणी करुन ती आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. उत्तर भारताकडून व मुंबईतून येणाऱ्या, जाणाऱ्या रेल्वेंना केवळ पुणे ते कोल्हापूर दरम्यानची सिंगल लाइन व डिझेल इंजिनचा वापर यामुळे विलंब होतो. त्यासाठी गेल्या बजेटमध्ये दुहेरीकरणाबरोबरच विद्युतीकरणालाही मंजुरी मिळाली आहे. त्यातील विद्युतीकरणाला ५१३ कोटी रुपयांची तत्वता मान्यता मिळाली आहे. ही दोन्ही कामे गतीने पूर्ण झाल्यास येथील रेल्वे दळणवळणाला गती येऊ शकते. त्यासाठी या बजेटमध्ये मोठी तरतूद झाली तर काम सुरू होईल. या सर्व प्रकल्पांसाठी स्थानिक मंत्र्यांबरोबरच खासदारांनी जोरदार प्रयत्न करण्याची गरज आहे. रेल्वेमंत्री प्रभू असतानाच या प्रकल्पांसाठी निधीची भरीव तरतूद करुन ठेवल्यास भविष्यात हे प्रकल्प तातडीने मार्गी लागतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवरील हल्ल्यातील चौघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ताराबाई पार्क येथील पितळी गणपती चौकात प्रॉपर्टी एजंटच्या कारवर झालेल्या हल्ल्यातील चौघांना शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी (ता. २) अटक केली. वैभव बाबासो कांबळे (वय २२, रा. पाडळी बुद्रुक, ता. करवीर), किरण बबन भालकर (२२, रा. कळंबा, कात्यायनी कॉम्पलेक्स), अजय सुनील माने (२०) आणि श्रीधर सुरेश जाधव (२१, दोघेही रा. जवाहरनगर) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाल्याची माहिती पोलिस चौकशीतून पुढे आली आहे.

सोमवारी (ता. ३०) दुपारी दीडच्या सुमारास संतोष आण्णासो कोळी (वय ३६, रा. लाइन बाजार, कसबा बावडा) यांच्या कारवर चौघांनी हल्ला केला होता. या घटनेत कोळी यांच्यासह त्यांचा मुलगा ओम (१२) हे दोघे जखमी झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच हल्लेखोर पळाले होते. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे समोर आले होते. याप्रकरणी वैभव कांबळे, किरण भालकर,अजय माने आणि श्रीधर जाधव या चौघांना पोलिसांनी गुरूवारी अटक केली. पंधरा दिवसांपूर्वी महावीर कॉलेजजवळ संतोष कोळी यांनी दुचाकीच्या आडवी कार घातल्याने हे चौघे चिडले होते. तेव्हा कोळी यांच्यासोबत संशयितांचा किरकोळ वादही झाला होता. तोच राग मनात धरून कारवर हल्ला केल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली आहे.

अटकेतील चौघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे आहेत, त्यामुळे हल्ल्याचे त्यांनी सांगितलेल्या कारणाबाबत पोलिसांना संशय आहे. यामागे व्यावसायिक वाद किंवा आर्थिक देण्या-घेण्याचे कारण आहे काय? या अनुषंगाने चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छोट्या टोळ्यांची दहशत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात कोपऱ्यावर उभे राहून ‘भाई’ गिरी करण्याच्या प्रकाराने प्रत्येक भागात छोट्या छोट्या गटांनी टोळ्या तयार करुन दहशत निर्माण करण्याचा प्रकार चालवला आहे. त्यामध्ये कारण कशाचेही मिळाले तरी एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन मारहाण करण्यापासून शस्त्रांचा सर्रास वापर करुन एकमेकांवर दहशत गाजवण्याचा प्रकार सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी दुचाकीच्या आडवी चारचाकी आल्याच्या किरकोळ कारणातून पाच ते सहा जणांनी कसबा बावड्यातील एकाची चारचाकी फोडली व मारहाण केली. तर बुधवारी सानेगुरुजी वसाहतीत कॉलेजमधील वादातून घरात घुसून गोळीबार करण्यापर्यंत मजल गेली आहे. काहीही झाले तरी राजकारणी मदतीला येणार हे माहीत असल्याने या टोळक्यांचे मनोबल वाढत आहे.

सानेगुरुजी वसाहतीत आजी-माजी नगरसेवकांच्या वादांतून अनेकदा मोठ्या हाणामाऱ्या झाल्या असून त्यामुळे या शांत परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. ‘माझ्याकडे बघितले’ एवढेदेखील कारण हाणामारी करण्यास पुरेसे ठरत असल्याचेच हे उदाहरण आहे. साने गुरुजी वसाहत परिसरात झालेल्या दोन गटातील राड्यामागेही केवळ एकमेकांकडे बघण्याचे कारण असल्याचे तरुणांनी सांगितले. कॉलेजच्या पोरांचा वाद मंडळांमध्ये आला आणि मंडळांचा वाद दोन राजकीय गटांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. दगडफेक, वाहनांची मोडतोड आणि घरात घुसून धिंगाना घालण्यापर्यंत मजल गेल्यानंतरही दोन्ही गटांना घडलेल्या घटनेचे गांभीर्य नाही. गोळीबारासारखी गंभीर घटना लपवण्यासाठी जणू काही झालेच नाही, असा अविर्भाव तरुणांच्या चेहऱ्यावर दिसत होता. नंग्या तलवारी नाचवल्या, दारात दगडांचा खच पडला. गोळीबारात एखाद्याचा जीव गेला असता, तर किरकोळ बघण्याचा वाद केवढ्याला पडला असता? याचा पुसटसा तणावही राडा करणाऱ्या तरुणांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.

याच प्रकारच्या टोळ्यांची दहशत शहराने यापूर्वीही अनुभवली आहे. राजारामपुरीचा परिसर, जवाहरनगर, राजेंद्रनगर, सदर बाजार शाहूपुरी ही ठिकाणे केवळ प्रातिनिधीक आहेत. पण शहरातील प्रत्येक भागातील कोपऱ्यावर उभे राहून एकप्रकारची टोळीच तयार होत असते. कोपऱ्यावर जमलेल्या टोळक्यातूनच एखादा भाई तयार होतो व परिसरातील इतर टोळक्यांशी वाद घालण्यास ही टोळी तयार होते. कॉलेज परिसरात अशा टोळ्यांचा वावर प्रचंड होता. मध्यंतरी तिथे पोलिसांच्या आक्रमक पवित्र्याने कॉलेज परिसरात काहीसा चाप बसला आहे. पण इतर ठिकाणी अशा टोळ्यांना कुणी अडवणारेच नाही, अशी परिस्थिती आहे. या टोळ्या त्या परिसरातील स्थानिक राजकारण्यांशी जोडल्या जात असून त्यातून मतांच्या राजकारणासाठी एकमेकांवर खुन्नस काढण्याचा प्रकार सुरू आहे. काही ठिकाणी तर या टोळक्यांमध्ये अट्टल गुन्हेगार शिरल्याने त्यांच्याकडून शहरातच नव्हे तर इतर ठिकाणी जाऊनही गुन्हेगारी कारवाया झाल्याची उदाहरणे आहेत. यामुळे कोपऱ्यावर उभे राहून टवाळक्या करणाऱ्या टोळक्यांमधूनच छोट्या टोळ्या निर्माण होत असून पोलिसांकडून याच मुळावर घाव घालण्याची आवश्यकता आहे. अनेक चौकात पोलिसांचा बंदोबस्त असतो. पण इतर ठिकाणी साधे पेट्रोलिंगही होत नाही. हेच वातावरण पुढे टोळीयुद्ध घडण्यासाठी कारणीभूत ठरु शकते.

राजकीय पाठबळ

स्थानिक गट सांभाळण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून रसद पुरवली जाते. वादाचे प्रसंग घडल्यानंतर वेळीच कानउघडणी करण्याऐवजी त्यांची पाठराखण केली जाते. विशेष म्हणजे वादांमध्ये कॉलेजवयीन तरुणांचेच प्रमाण अधिक आहे. पाठराखण केल्याने आत्मविश्वास दुणावलेले हे तरुण गुन्हेगारीच्या वाटेवर जातात. राजकीय दबावामुळे पोलिसांसाठी हे नवे आव्हान निर्माण होत आहे, तर सामाजिक स्वास्थ्यालाही बाधा पोहोचत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खूनप्रकरणी मेंढपाळास जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दारू खरेदी करण्यासाठी पैसे देण्या-घेण्याच्या कारणातून बाबुराव सखाराम पाटील (वय ६०, रा. पाल, ता. भुदरगड) यांच्या खूनप्रकरणी आरोपी संदीप दादासो माळी (वय ३०, रा. नांदणी. ता. शिरोळ) याला जिल्हा सत्र व न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीने कोर्टातच गोंधळ घातल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. १४ ऑक्टोबर २०१५ मध्ये पाटील याचा खून झाला होता.

संदीप माळी हा पाल येथील बापू बिरू अणुसे यांच्याकडे मेंढपाळ म्हणून कामाला होता. १४ ऑक्टोबर, २०१५ रोजी त्याने घरी जाण्याचे कारण सांगून मालकाकडून पैसे घेतले. यानंतर संध्याकाळी तो दारू पिण्यासाठी पाल येथील वाजंत्र्याचा पट्टा या नावाच्या शेतातील युवराज तेलवे यांच्या जनावरांच्या शेडजवळ गेला. याचवेळी पालमधील बाबुराव पाटील हेदेखील दारू पिण्यासाठी तेवले यांच्या शेडजवळ पोहोचले होते. तेलवे यांनी दारू विक्री बंद असल्याचे सांगितल्यानंतर हे दोघे परिसरातच थांबले. दोघांनी बाहेरून दारू आणण्याचे ठरवल्यानंतर पैशांच्या देवाण-घेवाणीतून वाद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तेवले हे शेतात पोहोचल्यानंतर त्यांना बाबुराव पाटील यांचा मृतदेह आढळला. काशिनाथ सखाराम पाटील यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर भुदरगड पोलिसांनी संदीप माळी याला अटक केली. त्याच्यावर आरोपपत्र दाखल करून कोर्टात १५ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांच्या साक्षी आणि पोलिसांच्या तपासातील पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी आरोपी माळी याला जन्मठेप आणि पाच हजार रुपयांची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास भुदरगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. टी. बारवकर आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल एम. एस. घाटगे यांनी केला. सरकार पक्षातर्फे एस. एम. पाटील यांनी काम पाहिले. हा खटला केवळ सव्वा वर्षात निकाली निघाला आहे.

आरोपीचा कोर्टात गोंधळ

न्यायाधीशांनी शिक्षेबाबत विचारणा केल्यानंतर आरोपीने उद्धटपणे फाशी देण्याची मागणी केली. जन्मठेपेची शिक्षा सुनावताच त्याने आरोपीच्या पिंजऱ्यातून आरडाओरडा करीत कोर्टाच्या दिशेने धावून जाण्याचाही प्रयत्न केला. या प्रकारात कोर्टातील संगणकाचे नुकसान झाले. पोलिसांनी वेळीच आरोपीला जेरबंद केले. पोलिस व्हॅनमध्येदेखील आरोपीचा गोंधळ सुरूच होता, यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आवाडेंची बंडखोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

हातकणंगले तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागा कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यात येणार आहेत. आवाडे गट या जागा लढविणार असल्याने थेट बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आघाडीचे उमेदवर असलेल्या ठिकाणी काँग्रेसने उमेदवार देऊ नयेत, अशी विनंती आवाडे यांनी पक्षश्रेष्ठींना केली असून, या मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारी दिल्यास प्रसंगी विरोधात लढण्याची तयारीही केल्याचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनीच सांगितले.

जिल्हा काँग्रेसच्या उमेदवार निवड समितीत प्रकाश आवाडे यांना सहभागी करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न प्रदेश पातळीवरून केला. तरीही हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आवाडे गटाने जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा काँग्रेसकडून आवाडे गटाला काही मोजक्या जागा देण्याचा प्रयत्न झाला. परंतु ज्याठिकाणी आवाडे गटाचे वर्चस्व नाही अशा जागा घेण्यास नकार देत आवाडे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर आवाडे गटाने आघाडीतर्फे रेंदाळ, हुपरी, पट्टणकोडोली, कबनूर आणि कोरोची या पाच जिल्हा परिषदेच्या आणि चंदूर, तारदाळ, कोरोची, कबनूर पश्‍चिम, कबनूर उत्तर, रेंदाळ, पट्टणकोडोली, रुई, हुपरी दक्षिण व हुपरी उत्तर या दहा पंचायत समितीच्या जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे, तर हातकणंगले तालुक्यातीलच आणखीन दोन व शिरोळ तालुक्यातील चार जागा लढवाव्यात असा आग्रह धरण्यात येत आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य काही पक्ष, आघाड्यांशी चर्चा झाली आहे. दोन दिवसांत यासंदर्भात अंतिम निर्णय होणार आहे. आमच्यासोबत जे जे येतील, जे मदत करण्यास तयार होतील त्यांनाही मदतीचा हात देऊन त्यांच्यासोबत निवडणूक लढविण्यात येणार असल्याचेही आवाडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गुरुवारी आघाडीच्यावतीने रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून युवा नेते राहुल आवाडे यांचा आणि चंदूर पंचायत समिती मतदारसंघातून महेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रकाश मोरे, विलास गाताडे, शेखर शहा, बाबासाहेब चौगुले, विलास खानविलकर आदी उपस्थित होते.


गटाच्या अस्तित्वासाठी लढा

जिल्हा काँग्रेसकडून मिळणाऱ्या सततच्या अपमानास्पद वागणुकीमुळे आवाडे गटाने यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसपासून चार हात दूर राहण्याचा निर्णय घेतला. जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील व माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्याशी आवाडे यांचे असलेले मतभेद उघड आहेत. काँग्रेसमधून आवाडे गटाला उमेदवारी मिळावी यासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रकाश आवाडे मुंबईत तळ ठोकून होते. पण, पक्षात त्यांना गॉडफादरच उरला नसल्याने राजकीय अस्तिवासाठी अखेरचा पर्याय म्हणून जिल्हा ताराराणी विकास आघाडीचा झेंडा त्यांना खांद्यावर घ्यावा लागला.

०००००००

हातकणंगले तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती मतदारसंघातून आवाडे गटाने आघाडीच्या चिन्हावर मित्रपक्षांसमवेत युती करून लढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीला आम्ही लेखी पत्र पाठवून या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार उभे करु नयेत, अशी विनंती केली आहे. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही.

माजी मंत्री, प्रकाश आवाडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६० कोटी आचारसंहितेच्या कचाट्यात

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : चौदाव्या वित्त आयोगाचे ४८ कोटी आणि प्रोत्साहनपर अनुदानापोटीचे १२ कोटी‌ असे एकूण ६० कोटी जिल्हा परिषद, पंचायत स‌मिती निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात सापडले आहेत. परिणामी गावातील नवीन विकासकामांना ब्रेक लागला आहे. आचारसंहितेनंतरच या निधीचे वितरण होणार आहे. त्यामुळे निधी मिळण्यासाठी आचारसंहिता संपण्याची प्रतीक्षा पदाधिकाऱ्यांना करावी लागणार आहे.

केंद्र सरकार प्रथमच चौदाव्या वित्त आयोगाचे पैसे ग्रामपंचायतींच्या खात्यावर थेट जमा करत आहे. २०११ च्या जणगनणेनुसार आणि क्षेत्रफळाच्या निकषावर ग्रामपंचायतींना निधी वाटप होत आहे. २०१५ ते २०२० पर्यंत चौदाव्या वित्त आयोगातून राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतींना १५ हजार कोटी ३५ लाख देण्यासाची तरतूद केंद्रानी केली आहे. याप्रमाणे गेली दोन वर्षे जिल्ह्यासाठी निधी येत आहे.

थेट खात्यावर जमा होत असल्यामुळे ग्रामपंचयतींना वेळेत निधी मिळत आहे. विकास कामांना गती ‌मिळाली आहे. ‌‘आमचा गाव आमचा विकास’ असा प्रत्येक ग्रामपंचायतीने आराखडता तयार केला आहे. आराखड्यानुसार निधी आल्यानंतर विकास कामे केली जात आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक सुरू असल्याने आचारसंहिता सुरू आहे. निधी वितरणाला प्रशासनाने ब्रेक लावला आहे. नव्या‌ विकास कामांना मंजुरी देणे बंद केले आहे. गावपातळीवरील विकास कामे ‌थांबली आहेत.

दरम्यान, २०१६-१७ या आर्थिक वर्षातील चौदाव्या वित्त आयोगातील ४६ कोटी जिल्हा परिषदेकडे जमा झाले आहेत. याशिवाय प्रत्येक वर्षाचे लेखा परीक्षण होणे, पारदर्शक कारभार, उत्पन्न वाढीसाठीचे विशेष प्रयत्न या निकषांवर प्रोत्साहनपर अनुदान संबंधित ग्रामपंचायतींना देण्यासाठी १२ कोटी रुपयांचे अनुदानही उपलब्ध झाले आहे. चौदावा वित्त आयोग, प्रोत्साहनपर अनुदान असे ६० कोटी सरकारकडून मिळाले आहेत. मात्र आचारसंहिता असल्याने वाटप थांबले आहे. निधी नियमित मिळणारा आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग होणे गरजेचे आहे, असे सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याउलट आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याची सूचना असल्याने निधी वाटता येणार नाही, अशी प्रशासनाने भूमिका आहे.


चौदाव्या वित्त आयोगाचा निधी जमा झाला आहे. पण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे वितरण केलेले नाही. आचारसंहिता संपल्यानंतर वितरीत केले जाईल.

एम. एस. घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)


ग्रामपंचायतींना फायदा

चौदावा वित्त आयोग, प्रोत्साहनपर अनुदान एकाचवेळी आचारसंहितेनंतर ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा होणार आहेत. परिणामी ज्या गावांची लोकसंख्या, क्षेत्रफळ अधिक त्या ग्रामपंचायतींना कोटींच्या घरात निधी मिळणार आहे. त्या ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत. पारदर्शकपणे सर्व निधी विकासकामांवरच खर्च झाल्यास गावचा ‘लूक’ बदलणार आहे.

जिल्हा परिषदेकडे आलेला चौदाव्या वित्त आयोगाचा निधी मिळाला असता तर विकास कामांना गती आली असती. नियमित अनुदान असल्याने आचारसंहितेमुळे वितरण थांबवायला नको होते.

दिग्विजय कुराडे, सरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा गर्भलिंग निदान केंद्रावर छापा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल तालुक्यातील पिराचीवाडी येथे बेकायदा गर्भलिंग निदान केले जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. रात्री उशिरा छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या गर्भलिंग निदान विरोधी पथकाने छापा टाकल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि कागल पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. पण, गर्भलिंग निदान करणारा मुख्य आरोपी पिंटू रोढे अंधाराचा फायदा घेत सोनोग्राफी मशीनसह पळून गेला.

पोलिसांनी रोढेच्या घरात तपास केला असता सोनोग्राफीसाठी लागणारे साहित्य, औषध आणि ग्राहकांकडून घेतलेली रक्कम सापडली. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त करुन रोढेला मदत करणाऱ्या एका महिलेला आणि सोनोग्राफीसाठी आलेल्या काही महिलांच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे.

पिराचीवाडीत रोढे हा बेकायदेशीर गर्भलिंग करत असल्याची माहिती गर्भलिंग निदान विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने कागल पोलिसांच्या मदतीने दोन डमी पेशंटना गर्भलिंग निदानासाठी पाठविले. यामध्ये आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी आणि कागल पोलिस स्टेशनच्या महिला आणि पुरुष कॉन्स्टेबलचा समावेश होता. या डमी पेशंटकडून या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर रोढे हा दहा-वीस हजार रुपये घेऊन गर्भलिंग निदान करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कागल पोलिस आणि आरोग्य विभागाने शहानिशा करुन रोढेच्या घरावर छापा टाकला.

या कारवाईची कुणकुण लागताच रोढेने अंधाराचा फायदा घेत मागच्या दरवाजातून मशिनसह पळ काढला. रोढेच्या घरात सोनोग्राफी केलेल्या महिलांच्या नावांची रिसीट आढळून आली आहेत. एक ग्राहकही रोढेच्या घरात होते.

कोणतीही पदवी नसताना...

सोनोग्राफी करणारा पिंटू किंवा ताब्यात घेतलेल्या महिलेकडे कसले वैद्यकीय ज्ञान नसल्याची बाब समोर आली आहे. तरीही दहा ते पंचवीस हजार रुपये देऊन अनेकांनी बेकायदा गर्भलिंग निदान करुन घेतल्याचे उघड झाले आहे.

==

गर्भलिंग निदान विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. कारवाईत संशयिताविरोधात ठोस पुरावे मिळाले आहेत. दोषींवर कडक कारवाई व्हावी,, यासाठी प्रयत्न केले जातील. या प्रकारात आणखी कुणी सहभागी आहेत काय,, याचाही शोध घेतला जात आहे.

डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातीचा विळखा आजही घट्टच

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

‘‘विकास आणि प्रगतीच्या गोष्टी अभिमानाने सांगितल्या जात असताना आणि तंत्रज्ञान हाताच्या मुठीत आल्यामुळे आधुनिक विचारांशी गाठ बांधली जात असल्याचे चित्र असतानाही जातीव्यवस्थेचा विळखा आजही घट्ट आहे,’ असे मत ज्येष्ठ विचारवंत आनंद तेलतुंबडे यांनी व्यक्त केले. राहुल कोसंबी लिखित ‘उभं आडवं,’ या ग्रंथाचे प्रकाशन तेलतुंबडे यांच्या हस्ते बुधवारी शाहू स्मारक भवन येथे झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस होते.

तेलतुंबडे म्हणाले, ‘दलित समाजाला समाज स्वीकारत नव्हता तेव्हा त्यांना समाजाच्या प्रवाहात सन्मानाने येता यावे यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद केली. त्यानंतर दलित समाज शिकला, चांगल्या पदापर्यंत पोहोचला. ती काळाची गरज होती. एखाद्या मागासलेल्या समाजाला प्रगतीच्या कक्षेत आणण्यासाठी जातनिहाय आरक्षणाचा आग्रह धरण्यात आला. मात्र आजच्या युगात जात आ​णि धर्माचा वापर काहीजण सोयीसाठी करत आहेत. राजकारणात जातीचा वापर मताचा गठ्ठा जमवण्यासाठी होत आहे. यामुळे समाजाचा विकास होण्याऐवजी एक दरी निर्माण होत आहे. विरोधविकासासाठी भौतिकवाद यातून माणसाने बाहेर पडले पाहिजे. जातीचं मूळ हे माणसाच्या मनातून जाणार नाही तोपर्यंत जातीभेदामुळे निर्माण होणाऱ्या समस्या नष्ट होणार नाहीत हे वास्तव आहे.’

डॉ. गवस म्हणाले, ‘समाजाला दिशा देणारे साहित्य ही फार मोठी देणगी आहे. आज अस्वस्थ होणारा लेखक दुर्मिळ झाला असताना कोसंबी यांच्या ‘उभं आडवं,’ या ग्रंथाने ही उणीव भरून काढली आहे. जातीभेदाचा विळखा, त्यातून वाढणारे माणसामाणसांतील अंतर यामुळे दिशाहीन होत असलेल्या समाजाला योग्य वळण देणारा नाका म्हणून या ग्रंथाचा नामोल्लेख करता येईल.’

यावेळी साहित्यिक हरिश्चंद्र थोरात, प्रकाशक येशू पाटील, अस्मिता ​दिघे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अनिल म्हमाने यांनी केले. राहुल कोसंबी यांनी मनोगतात ग्रंथ लेखनातील अनुभव मांडले. वैभव कांबळे आणि अमोल महापुरे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिक, आवाडे, इंगवलेंचे अर्ज दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी २०, तर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी २१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक सात अर्ज जिल्हा परिषदेसाठी, तर पंचायत समितीसाठी तीन अर्ज इच्छुक उमेदवारांनी भरले आहेत. जिल्हा परिषद सदस्या शौमिका महाडिक यानी पुलाची शिरोली, अरुण इंगवले यांनी हातकणंगले, राहुल आवाडे यांनी रेंदाळ, तर अशोक चराटी यांनी आजरा जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गगनबावडा, भुदरगड, चंदगड तालुक्यांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. करवीर तालुक्यात फक्त पंचायत समितीसाठी एकमेव अर्ज दाखल झाला. सोमवारी (ता.६) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

बुधवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी या पक्षांनी अद्याप उमेदवारी जाहीर केलेल्या नाहीत. भाजप, ताराराणी आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. उमेदवारी जाहीर झाली नसल्याने इच्छुकांनी ऑनलाइन अर्जात माहिती भरुन ठेवली आहे पण उमेदवारी अर्जाची प्रत सादर केलेली नाही. पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गती येणार आहे. जिल्हा परिषद सदस्य शौमिका महाडिक, अरुण इंगवले, माजी आमदार प्रकाश आवाडे यांचा मुलगा राहुल आवाडे, अशोक चराटी या प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

हातकणंगलेतून जि.प.साठी ७, पं.स.साठी ५ अर्ज

हातकणंगले ः हातकणंगले तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी सात, तर पंचायत समिती निवडणुकीसाठी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्यासाठी मातब्बर उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी अर्ज दाखल केले. यामध्ये राहुल आवाडे, अरुण इंगवले, संदीप कारंडे, अरविंद खोत, शौमिका महाडिक, आदींचा समावेश आहे. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

अर्ज दाखल करण्याचा आजचा दुसरा होता. सकाळी अकरा वाजता तहसीलदार कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. हातकणंगले जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने संदीप कारंडे यांचा अर्ज दाखल करताना युवा नेते राजूबाबा आवळे, पोपटराव इंगवले, तर भाजपच्यावतीने अरुण इंगवले यांच्यासोबत आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार राजीव आवळे, हिंदुराव शेळके, अजितमामा जाधव, शिवसेनेच्यावतीने अरविंद खोत यांच्यासोबत आमदार सुजित मिणचेकर, महेश चव्हाण, तर रेंदाळ जिल्हा परिषदेसाठी कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडीच्यावतीने राहुल आवाडे यांचा अर्ज दाखल करताना माजी मंत्री प्रकाश आवाडे, उत्तम आवाडे, प्रकाश मोरे, विलास गाताडे उपस्थित होत. पुलाची शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघासाठी ताराराणी आघाडीच्या शौमिका महाडिक, पट्टणकोडोली जिल्हा परिषदेसाठी वंदना मगदूम, टोप पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून संजय शिंदे, चंदूर पंचायत समितीसाठी ताराराणी आघाडीतून दरगोंडा पाटील, आदींसह सुधीर पाटील (नागाव) यांनी अपक्ष व भाजपच्यावतीने राजेंद्र यादव या सर्वांनी उमेदवारी अर्ज मोठे शक्तिप्रदर्शन करत दाखल केले. उद्या (शुक्रवार) अर्ज दाखल करण्याचा तिसरा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

००गडहिंग्लजला जि.प. साठी एक अर्ज दाखल

गडहिंग्लज ः गडहिंग्लज तालुक्यातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुरुवारी एकच अर्ज दाखल झाला, तर एकूण ६२ अर्जांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी संगीता चौगुले व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली. तालुक्यात पाच जिल्हा परिषद, तर दहा पंचायत समिती मतदारसंघ आहेत. आज ऐनापूरचे सरपंच अॅड. दिग्विजय कुराडे यांनी शक्तिप्रदर्शनाने जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल केला. दरम्यान, आज ऐनापूरचे सरपंच अॅ. दिग्विजय कुराडे यांनी गिजवणे गटातून शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला. शहरातील मुख्य मार्गावरून भव्य रॅलीद्वारे ते तहसील कार्यालयात कार्यकर्त्यांसह दाखल झाले. त्यानंतर त्यांनी गिजवणे गटातून अर्ज दाखल केला, तर अनेक इच्छुकांची अर्ज घेण्यासाठी कार्यकर्त्यांसह तहसील परिसरात गर्दी केली.
००
राधानगरीत पं. स.साठी दोन अर्ज दाखल

राधानगरी ः राधानगरी पंचायत समितीसाठी कौलव गणातून राविश पाटील-कौलवकर यांनी व युवराज पाटील यांचे अर्ज दाखल केले, तर जिल्हा परिषद गठासाठी अद्याप अर्ज दाखल झालेले नाहीत.

तालुक्यात पंचायत समितीसाठी दहा गण आहेत. कौलव गणातून काँग्रेसमार्फत राविश पाटील कौलवकर यांनी आपला अर्ज प्रांताधिकारी कुंभार, तहसीलदार सचिन लंगोटे यांच्याकडे दाखल केला. तालुक्यात गुरुवारी काँग्रेसमार्फत उमेदवार राविश पाटील यांच्या नावे दोन अर्ज दाखल झाले आहेत, तर युवराज पाटील यांच्या नावे दोन अर्ज असे निवडणूक कार्यालयात चार अर्ज दाखल झाले. यावेळी उदयसिंह पाटील-कौलवकर, रणजित पाटील भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील, माजी संचालक धीरज डोंगळे, प्रकाश हुजरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

००शिरोळमध्ये जि.प.साठी २, पं.स.साठी ३ अर्ज

जयसिंगपूर ः शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी पाच अर्ज दाखल झाले. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी दोन, तर पंचायत समितीसाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत.

दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून पंचायत समितीचे माजी सभापती हरिचंद्र खंडू पाटील यांनी काँग्रेस व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत. दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रिया महेश पाटील (अपक्ष), कोथळी पंचायत समिती मतदारसंघातून सन्मती रावसाहेब पाटील (अपक्ष), शिरढोण पंचायत समिती मतदारसंघातून सुनीता उदय झुटाळ (शिवसेना), अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघातून कविता भागवत चौगुले-कर्नाळे (शिवसेना) यांनी अर्ज दाखल केले. शिवसेनेच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह देशमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरणकुमार काकडे यांच्याकडे अर्ज दाखल केले.

००कागलमध्ये पाच अर्ज दाखल

कागल : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी कागल तालुक्यातून आज चार उमेदवारांचे पाच अर्ज दाखल झाले. यामध्ये एका महिलेचा काँग्रेमधून आणि चार अपक्षांचे अर्ज दाखल झाले. जिल्हा परिषदेसाठी बापूसाहेब रामचंद्र शेट्ये (रा. सांगाव), बाजीराव धोंडिराम पाटील (सिध्दनेर्ली) यांनी, तर पंचायत समितीसाठी वर्षा बाजीराव पाटील (म्हाकवे), कृष्णात दत्तात्रय कुंभार (यमगे) यांनी अपक्ष अर्ज दाखल केले. याशिवाय वर्षा पाटील यांनी काँग्रेस पक्षातून आपला अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उज्ज्वला गाडेकर, तर सहायक म्हणून तहसीलदार किशोर घाडगे काम पहात आहेत.

००शाहूवाडीतून दोन अर्ज

शाहूवाडी ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी प्रत्येकी एक-एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुचिता शिंदे व निवडणूक सहाय्यक तथा तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी दिली.

शाहूवाडी पंचायत समितीच्या पणुंद्रे या अनुसूचित जाती स्त्री राखीव गणासाठी विमल ज्ञानदेव कांबळे यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला, तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरूड जिल्हा परिषद मतदारसंघातून अक्षय अमरसिंह पाटील-चरणकर यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला. चरणकर यांच्यासोबत अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या सुमारे अडीचशेहून अधिक मोटारसायकलच्या ताफ्याने लक्ष वेधून घेतले होते.

आजऱ्यात एक अर्ज दाखल

आजरा ः पंचायत समिती व जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकच अर्ज दाखल झाला. आजऱ्यामध्ये महाआघाडीतून आजरा जिल्हा परिषद मतदारसंघातून अशोक चराटी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.

००पन्हाळ्यात आठ अर्ज दाखल

पन्हाळा ः पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुरुवारी दुसऱ्या दिवशी एकूण आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी चार व पंचायत समितीसाठी चार अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवाजीराव मोरे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षामधून एक आणि अपक्ष म्हणून एक असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. पोर्ले जिल्हा परिषद मतदारसंघातून समृद्धी सचिन पाटील यांनी जनसुराज्यमधून उमेदवारी अर्ज दाखल केला, तर यवलूज जिल्हा परिषद मतदारसंघातून संजीवनी भारत मोरे यांनी जनसुराज्यकडून उमेदवारी अर्ज दाखल केले. पंचायत समितीसाठी वाडी रत्नागिरी गणातून शिवाजीराव सांगळे यांनी राष्ट्रवादीतर्फे, तर सातवे गणातून जनसुराज्यकडून उज्ज्वला उत्तम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. वाघवे पंचायत समितीकडून भरत पांडुरंग मोरे यांनी अपक्ष म्हणून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. पन्हाळा तालुक्यात मोजक्यात जागांचा अपवाद वगळता उर्वरित उमेदवारांची निश्चिती अद्याप झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्न करावे धावून!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

जावली तालुक्यातील नवनाथ डिगे आणि पूनम चिकणे या धावपटूंनी शुक्रवारी साताऱ्यापर्यंत ३० किलोमीटर धावत विवाह केला. लग्न करावे पाहून असे म्हणतात, मात्र या धावपटू जोडप्याने लग्न करावे धावून, असा आगळावेगळा संदेश या निमित्ताने दिला. हा ‘मॅरेथॉन विवाह’ साऱ्यांच्याच चर्चेचा केंद्रबिंदू बनला होता.

जावली तालुक्यातील काळोशी गावचे नवनाथ डिगे दरवर्षी सातारा हिल मॅरेथॉनमध्ये भाग घेतात. आपण मॅरेथॉनमध्येच विवाह करायचा असा त्यांचा निर्धार होता. त्यांच्या या निर्धाराला पूनमच्या (रा. यिगाडेवाडी, ता. जावली) घरच्यांनी सक्रिय साथ दिली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी नवनाथ आणि पूनम यांनी ट्रॅक सूट, फेटा, मुंडवळ्या अशा वेशात गावातून साताऱ्याच्या दिशेने दौड सुरू केली. करवला आणि करवलीही त्यांच्या समवेत धावत होते. गावातील विद्यार्थी, प्रमुख मंडळींनी हजेरी लावत या आगळ्या वेगळ्या विवाहाचे कौतुक केले. मॅरथॉन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही काळ अंतर दोघांबरोबर धावत या जोडप्याला शुभेच्छा आणि पाठिंबा दिला. श्रीमंत वेदांतिकाराजे यादेखील काही अंतर दोघांबरोबर धावल्या.

या विवाहासाठी काळोशीचे उद्योजक विजय शेलार, सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनचे संस्थापक डॉ. संदीप काटे, डॉ. प्रतापराव गोळे, अध्यक्ष डॉ. शेखर घोरपडे आदी उपस्थित होते.

स्मृतिपदके घालून गौरव

धावत धावतच दोन्हीकडची वऱ्हाडी मंडळी साताऱ्यातील विवाह नोंदणी कार्यालयात पोहोचली. विवाह नोंदणी निबंधक एन. बी. गिरी यांनी नोंदणीचे उपचार पार पाडले. ऑनलाइन पद्धतीने विवाह नोंदणी झाल्यानंतर मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने या नवदाम्पत्याला स्मृतिपदके घालून गौरवण्यात आले. त्यानतंर नवदाम्पत्याने सेल्फी काढत आनंद साजरा केला. वऱ्हाडी मंडळी आणि क्रीडा संघटनांच्या कार्यकर्त्यांमुळे विवाह नोंदणी कार्यालय गजबजले होते. तेथे रांगोळ्या काढून परिसर सुशोभित करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ चिमुटभर गुटख्याने घेतला जीव

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

twitter:@satishgMT

कोल्हापूर : कामात मन रमावे, ताण कमी व्हावा यासाठी त्यांना तंबाखू खाण्याची सवय लागली. नंतर तंबाखूऐवजी त्यांना गुटखा आवडू लागला. कामाचा ताण वाढला की एक चिमुट गुटखा दाढेत धरायचा हे नेहमीचेच झाले. एक दिवस दाढ दुखायला लागली, म्हणून ते डॉक्टरकडे गेले. किडलेली दाढ काढली, पण त्याखाली छोटी गाठ होती. डॉक्टरांनी ती गाठ तपासायला पाठवली आणि कॅन्सरचे निदान झाले. बघता बघता कॅन्सर घशात पसरला आणि त्यांचा अंत झाला. ही कथा आहे कोल्हापूर पोलिस दलाताली एका कर्मचाऱ्याची. गुटखा आरोग्याला घातक म्हणून त्याच्यावर बंदी असतानाही तो सहजपणे उपलब्ध कसा होतो आणि आयुष्य कसं उध्वस्त करतो याची ही कहाणी.

मूळ गाव सिध्दनेर्ली असलेल्या या पोलिसाची गडहिंग्लजवरून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात बदली झाली. हवालदार असल्याने सलग बारा ते चौदा तासांची ड्यूटी. मग दर दोन ते तीन तासांनी गुटखा दाढेखाली ठेवायची सवय जडली. एक दिवस दाढ दुखायला लागल्याने ते लक्ष्मीपुरीतील एका प्रसिद्ध डेंटिस्टकडे गेले. डेंटिस्टने किडलेली दाढ काढली. पण दाढ काढल्यावर त्यांना तेथे एक छोटी गाठ दिसली. गाठ कापून त्यांनी ती तपासणीला लॅबोरेटरीमध्ये पाठवली. लॅबो​रेटरीमधून ती कॅन्सरची गाठ असल्याचे निदान झाले. तातडीने ऑपरेशन करण्याचा निर्णय झाला. त्या पोलिसाचे कुटुंब हादरुन गेले. पोलिस कल्याण निधी, प्रॉव्हिडंट फंडातील रक्कम काढली. मित्र, परिवाराकडून उसने पैसे घेतले. मुंबईला टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि परत केमोथेरपी करण्यात आली. त्यानंतर ते पोलिस पुन्हा कामावर रुजू झाले. गालाखालचा डाग केमोथेरपीची आठवण करून देत होता. ‘ऑपरेशन चांगले झाले. आता काय त्रास नाही’ असे ते सांगत. पण ऑपरेशन, केमोथेरपी होऊनही कॅन्सरची मुळे घट्टच राहिली. बघता बघता कॅन्सर घशात पसरला आणि त्यातच त्यांचा अंत झाला.‘त्या’ पोलिसाच्या कुटुंबाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांत्वन केले. आज त्यांचे कुटुंब पेन्शनवर जगत आहे. दोन मुलांचे शिक्षण सुरू आहे. पण हे गुटख्याने उध्वस्त झालेले हे कुटुंब कसं जगतय हे पहायला कामाच्या व्यापात अधिकारी, कर्मचारी कोणालाच वेळ नाही.

अनेकांचे संसार उध्वस्त

गेल्या आठवड्यात आणखी एका तंबाखू खाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे पोट आणि हाडाच्या कॅन्सरने निधन झाले. दिवसेदिवस कॅन्सरचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. दोन आकडी पगार, सुखी कुंटब असलेल्या पोलिसाच्या कुटुंबाची घडी चिमुटभर तंबाखू आणि गुटख्याने विस्कटली. सहा वर्षापूर्वी एका सरकारी कर्मचारी पतसंस्थेतील क्लार्कला लिव्हर कॅन्सर झाला. नोकरी संपल्यानंतर कॅरम खेळताना मित्रांच्या संगतीमुळे गुटख्याचे व्यसन लागले. दहा वर्षाचा मुलगा आणि दोन वर्षाची मुलगी असताना त्यांचा मृत्यू झाला. नशिबाने पत्नीला सरकारी नोकरी असल्याने ती कुटुंबांचा गाडा ओढतेय. पण गुटख्याच्या पुडीने दोन मुलांचा पिता मात्र हरवला. अशा घटना जागोजागी पहायला मिळतात. मित्राला गुटख्याने कॅन्सरला झाला हे माहीत असूनही त्यांचे मित्र गुटखा-मावा तोंडात ठेवत असल्याची स्थिती भयावह आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिलिंडर दरवाढीने ‘भडका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अर्थसंकल्पामध्ये सिलिंडर दरवाढीचा कोणताही उल्लेख नसताना सिलिंडरच्या दरात तब्बल ७० रुपयांची वाढ केल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. १४ किलोचा ६३० रुपयांना मिळणाऱ्या सिलिंडरची किंमत ६९४. ५० झाल्याने ग्राहकांच्या सहनशीलतेचा भडका उडाला आहे. सिलिंडर खरेदी करताना वाढीव किंमतीची माहिती मिळत असल्याने गॅस वितरकांबरोबर वादवादी होत आहे. अनुदानित व विनाअनुदानित दोन्ही प्रकारच्या सिलिंडरच्या दरात एक फेब्रुवारीपासून वाढ करण्यात आली आहे.

प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सिलिंडरच्या दरात फरक पडत असतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील क्रूड ऑइलच्या दरावर ही दरवाढ ठरवण्यात येते. मात्र चार दिवसांपूर्वी झालेली वाढ वर्षातील दुसरी मोठी वाढ असल्याने ग्राहकांना चांगलाच भुर्दंड बसला आहे. जानेवारी महिन्यात १४ किलोच्या सिलिंडरसाठी ग्राहकांना ६३० रुपये द्यावे लागत होते. त्यातून सबसिडीपोटी परत ७० रुपये मिळत होते. त्यामुळे अनुदानित सिलिंडर ५६० रुपयांना मिळत होता. ज्या ग्राहकांनी आधार कार्ड बँकेशी जोडले आहे त्यांचे अनुदान खात्यात जमा होते.

अनुदानित सिलिंडरना सबसिडी देण्यास सुरुवात झाल्यापासून सातत्याने वाढ होत आहे. सबसिडी देऊनही मूळ किंमतीपेक्षा जादाचा दर द्यावा लागत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी असताना २०१६ नंतर पुन्हा मोठी वाढ झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अनुदानित किंवा विनाअनुदानित सिलिंडरबाबत कोणतीही तरतूद नसताना झालेल्या वाढीमुळे ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अर्थसंकल्पामध्ये कोणतीही तरतूद नसताना ग्राहकांच्या माथी दरवाढ मारली आहे. याबाबतची स्पष्टता कोणत्याही वितरकांकडून मिळत नाही. ग्राहकांना विश्वासात न घेता वाढ केली असून वर्षातील दुसरी सर्वात मोठी वाढ आहे.

संजय हुक्केरी, अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कोल्हापूर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दोन महिन्यापूर्वी क्रूड ऑइलच्या दरात वाढ झाली होती. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला दर ठरत असतो. त्यामुळे दोन महिन्यापूर्वी क्रूड ऑइलच्या दरात झालेली वाढ सिलिंडरच्या किंमतीवर झाल्याची शक्यता आहे. सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने सबसिडीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.

शेखर घोटणे, जिल्हाध्यक्ष गॅस वितरक असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानी’नी लढणार स्व-बळावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीबरोबर युती करण्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी धुकावून लावल्याने स्वबळावर लढण्याचे संकेत दिली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातही कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याचीच जोरदार मागणी केल्याने कार्यकर्त्यांचा सन्मान राखावा लागेल असे म्हटले आहे.

निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे सर्वच प्रमुख पक्षात उमेदवारी निश्चितीसाठी मुलाखती सुरू आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रयत्नशील होते. शुक्रवारी सकाळी खासदार शेट्टी आणि मंत्री पाटील यांच्यात चर्चा झाली. पण जागा वाटपात एकमत न झाल्याने युतीचा निर्णय झाला नाही. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देऊ आणि काही ठिकाणी युती करू असा, प्रस्ताव दिला होता. मात्र, शेट्टी यांनी तो अमान्य केला. त्यानंतर खासदार शेट्टी ताराबाई पार्कातील पक्षाच्या संपर्क कार्यालयात आले. त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी निवडणुकीत कुणाच्या मागे फरफटत न जाता स्वबळावर लढण्याची जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी केली.

कार्यालयात जिल्हा परिषदेच्या २४ आणि पंचायत समितीच्या ४८ जागा स्वबळावर लढवण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत मुलाखती घेतल्या. खासदार शेट्टी यांनी प्रत्येक इच्छुकांशी थेट संवाद साधून मुलाखत घेतली. गावातील राजकीय परिस्थिती, प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असतील, तयारी काय आहे याची माहिती घेतली. जिल्हा अध्यक्ष भगवान काटे, जालंदर पाटील, सावकर मादनाईक, महावीर अक्कोळे, श्रीवर्धन पाटील, मिलिंद साखरपे, आण्णासाहेब चौगुले आदी उपस्थित होते. इच्छुकांसोबत कार्यकर्त्यांनीही गर्दी केली होती.


आपली फरफट का करून घ्यायची?

युती करायची की स्वबळावर लढायचे यासंबंधी चर्चा करण्यासाठी रात्री उशिरा प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. खासदार शेट्टी यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.यावेळी सर्वांनी‌च स्वबळावर लढण्याची मागणी केली. कुणाच्या मागे फरफटत जाण्यापेक्षा आपली ताकत आजमावू अशा भावना व्यक्त केल्या.



युतीसंबंधी पालकमंत्री पाटील यांच्याशी भेटून चर्चा केली. त्यावेळी काही जागांवर मैत्रीपुर्ण आणि काही जागांवर युती करून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव भाजपकडून आला. पण आम्हाला असा दाभिंकपणा जमणार नाही. त्यामुळे तो प्रस्ताव धुडकावला. लढायचे असेल तर सर्व ठिकाणी आघाडी करून, अन्यथा स्वबळावर लढू. आमचे कार्यकर्ते सरळ आहेत. त्यांच्या भावना स्वबळावर लढू, अशा आहेत. शेवटी मला कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करावा लागेल.

राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलेआम गुटखा विक्री सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॅन्सर होण्यास कारणीभूत असलेला गुटखा तयार करणे आणि विक्रीवर राज्य सरकारने २०१२ मध्ये बंदी घातली खरी, मात्र, हा निर्णय होऊन पाच वर्षे उलटली मात्र आजही राज्यात खुले आम गुटखा विकी सुरू आहे. सीमाभागात कर्नाटकच्या हद्दीत असलेले गुटखा निर्मितीचे कारखाने दररोज लाखो रुपयांचा गुटखा कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात पोहोचवतात. बंदीने गुटख्याचे दर वाढले, मात्र विक्रीवर कोणताच परिणाम झाला नाही. अगदी शाळा महाविद्यालयांसह खेडोपाडीदेखील राजरोस गुटखा मिळत आहे.

गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. २०१२ मध्ये काँग्रेस आघाडी सरकारने राज्यात गुटखा बंदीचा निर्णय जाहीर केला. गुटखा तयार करणे आणि विक्री करणे या दोन्हीवर बंदी घालण्यात आली. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूदही केली. हा निर्णय घेण्याचे धाडस सरकारने दाखवले खरे, पण याच्या अंमलबजावणीसाठी फारसे गांभीर्य दिसत नाही. गुटखाबंदीच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत गुटख्याची विक्री कधीच बंद झाली नाही. गुटखा निर्मितीची ठिकाणे बदलली एवढाच काय तो बदल झाला. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेला लागून कर्नाटकची सीमा आहे. कर्नाटकात गुटखाबंदी नसल्याने राज्यातील गुटखा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी सीमाभागात बस्तान बसवले. दररोज लाखो रुपयांचा गुटखा कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात पोहोचवला जात आहे ही वस्तुस्थिती आहे.

गुटखाबंदीच्या यशस्वीतेसाठी कडक धोरण राबवणे गरजेचे होते. अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनी छुप्या विक्रीवर अंकुश ठेवला नाही. शहरासह खेडोपाडी पान टपऱ्यांमध्ये गुटखा पोहोच करणारी मोठी यंत्रणा कार्यरत आहे. सुरुवातीला कागदांमध्ये दडवून छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरू होती. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आता राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विक्रीमुळे कॅन्सरच्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

शाळा, महाविद्यालयांच्या आसपास विक्री

शहरात शाळा आणि महाविद्यालयांच्या आसपास मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होते. परिसरात पुड्यांचे कागद पडतात, पण पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हे कागद दिसत नाहीत. गुटख्याला माव्याचाही पर्याय उपलब्ध आहे, त्यामुळे गटख्यासह माव्याचीही राजरोस विक्री सुरू आहे.

वर्षात केवळ ४८ कारवाया

अन्न व औषध प्रशासनाने २०१६ या वर्षात जिल्ह्यात ४८ ठिकाणी गुटखा विक्रीवर कारवाई केली. यात ४९ लाख ७० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून, ३० संशयितांना अटक केली. जप्त केलेला गुटखा जाळून त्याची विल्लेवाट लावण्यात आली, मात्र गुटखा येणाऱ्या ठिकाणांपर्यंत यंत्रणा का पोहोचत नाही? असा प्रश्न उपस्थित होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोर समजून मजुरास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फुलेवाडी नाका परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास चोर समजून एका मजुराला बेदम मारहाण केली. मारहाण करीतच त्याला जमावाने लक्ष्मीपुरी पोलिसांकडे सोपवले. जखमी अवस्थेतील मजुराला पोलिसांनी तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करून उपचार केले. अधिक चौकशी केली असता नागरिकांनी गैरसमजातून मजुराला चोप दिल्याचे स्पष्ट झाले, मात्र या प्रकाराने दीड वर्षांपूर्वी फुलेवाडी नाक्यावरच नागिरकांच्या मारहाणीत फिरस्त्याचा मृत्यू झाला होता.

बाळू शिवाजी यादव (वय ५५, रा. साळवण, ता. गगनबावडा) हे शहरात मजुरीच्या कामासाठी येतात. गेली आठवडाभर ते दररोज सकाळी ९ ते १० च्या सुमारास फुलेवाडी नाक्यावर येऊन मिळेल तिथे बांधकामावर मजुरीसाठी जात होते. परिसरातील नागरिकांना ते चोरटे असल्याचा संशय होता. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास यादव फुलेवाडी नाक्यावर पोहोचले. यावेळी आठ ते दहा जणांनी त्यांना मारहाण सुरू केली. त्यांचे ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हते. बेदम चोप देत नागरिकांनी त्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाणीत त्यांच्या डोक्याला जखम झाली आहे, तर छातीत आणि पोटातही मार लागला आहे. पोलिसांनी त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल करून उपचार केले. अधिक चौकशीत यादव हे चोरटे नसून मजूर असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्यांची सुटका केली. या घटनेने नागरिकांना दीड वर्षांपूर्वीही अतिउत्साही नागरिकांनी फिरस्त्याला मारहाण केली होती. त्यातच त्याचा मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीडपट दंडाची आकारणी चुकीची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थकीत पाणीपट्टीच्या कारणावरून कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा खंड‌ित करू नये, यासाठी महापालिकेचे अधिकारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. नदी प्रदूषणास महापालिकेला कारणीभूत ठरवून दीडपट दंड आकारणे चुकीचे असल्याचे महापालिकेचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सांडपाण्यावर एसटीपीमध्ये प्रक्रिया करून नदीत सोडण्यात येत असल्याने नियमित दराने पाणीपट्टीची आकारणी करावी, यासाठी महापालिका आग्रही आहे. अधिकाऱ्यांच्या बैठकीत या बाबी निदर्शनास आणल्या जातील.

पाटबंधारे विभागाची १७ कोटी ८४ लाख रुपयांची पाणीपट्टीची रक्कम महापालिकेकडे थकीत आहे. ३० जानेवारीपर्यंत रक्कम भरण्याची मुदत होती. महापालिकेडून रकमेचा भरणा झाला नसल्याने पाटबंधारे विभागाने पाणी पुरवठा खंड‌ित करण्याची नोटीस दिली आहे. उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती संदीप नेजदार यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन शहराचा पाणी पुरवठा खंड‌ित होणार नाही, या संदर्भात दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.

जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी पाटबंधारे विभागाकडून जादा दराने ब‌िल आकारणी होत असल्याचे सांगितले. नदी प्रदूषणाच्या कारणाखाली दिडपट दंड आकाराला जातो. वास्तविक महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडते. महापालिकेला मंजूर पाणी कोट्यावर बिलाची आकारणी केली जाते. त्याऐवजी महापलिका जेवढे पाणी उपसते त्यावरच बिलाची आकारणी करण्यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. आयुक्तांनी याप्रश्नी उपायुक्त विजय खोराटे यांना थक‌ित पाणीपट्टीप्रश्नी व पाणी पुरवठा कायम सुरळीत राहावा, यासाठी अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेण्याच्या सूचना केल्या. यावेळी परिवहन समिती सभापती लाला भोसले, सभागृह नेता प्रवीण केसरकर, नगरसेवक राहुल माने, मुरलीधर जाधव, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले आदी उपस्थित होते.

व्हॉल्व खराब झाल्याने साळोखेनगर परिसरात पाणी पुरवठ्याला फटका

साळोखेनगर पाण्याची टाकी परिसरातील व्हॉल्व खराब झाल्याने त्याचा फटका या परिसरातील पाणी पुरवठ्यावर झाला. साळोखेनगर, तपोवन, सुर्वेनगर परिसरात पाणी पुरवठा झाला नाही. या तीनही परिसरात टँकरने पाणी पुरवठा झाला. पाणी पुरवठा विभागाकडून व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरू आहे. शनिवारपर्यंत काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images