Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘स्थायी’तील संघर्ष शिगेला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीवरुन सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि विरोधी भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीतील संघर्ष चिघळला आहे. काँग्रेसच्या नगरसेविका रिना कांबळे यांना भाजप, ताराराणी आघाडीने आपल्या गटात सामील करुन घेत फोडाफोडी सुरु केली. त्यानंतर काँग्रेस आघाडीने ताराराणी आघाडीचे नगरसेवक नीलेश देसाई यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. देसाई यांचा जातीचा दाखला अवैधप्रकरणी हायकोर्टाने कारवाईस दिलेल्या स्थगितीची मुदत संपली असून त्यांना निवडणूक प्रक्रियेत सामील करण्यास मनाई करावी, अशी मागणीही केली. त्याला भाजप, ताराराणी आघाडीसह नगरसेवक देसाई यांनी जोरदार आक्षेप घेत हायकोर्टाने पडताळणी समितीच्या निर्णयाला दिलेली स्थगिती १५ जून २०१७ पर्यंत असल्याचे म्हणणे आयुक्तांपुढे मांडले. त्यामुळे देसाई यांच्या पदावरुन गुंता कायम राहिला. दोन्ही आघाड्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविल्याने महापालिकेतील राजकारण जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचले. जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांच्या पातळीवर कायदेशीर बाबीविषयक खल सुरु होता.

जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी व आयुक्त पी. शिवशंकर यांच्यात दिवसभरात दोनदा चर्चा झाली. सायंकाळी जिल्हाधिकारी ​व आयुक्तांत दोन तासाहून अधिक काळ चर्चा झाली. आयुक्तांनी नगरसेवक देसाई यांच्या जात दाखल्याप्रश्नी महापालिकेचे वकील अभिजीत आडगुळे यांच्याकडून पद रद्दबाबत हायकोर्टाने निर्णय दिला आहे का व निवडणूक प्रक्रिया सुरु असताना नगरसेवकपद रद्दची कारवाई करता येऊ शकते का? या संदर्भात स्पष्ट अभिप्राय देण्यास सांगितले आहे. त्यानंतर कार्यवाहीचा निर्णय घेण्यात येईल. काँग्रेसे नगरसेवक अॅड. आडगुळे यांनी पाठविलेल्या मेलचा दाखला देत देसाईंचे पद तत्काळ रद्द करावे यावर आग्रही राहिले.

स्थायी सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (ता.३१) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी डॉ. सैनी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. काँग्रेसचे डॉ. संदीप नेजदार व भाजपचे आशिष ढवळे यांच्यात थेट निवडणूक होणार आहे. काँग्रेसच्या जयश्री चव्हाण यांचा डमी अर्ज भरला आहे. सभापतिपद दोन्ही आघाड्यांनी प्रतिष्ठेचे बनविले आहे. स्थायीवर सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस व ताराराणी आघाडी वाटेल ती किंमत मोजण्याच्या तयारीत असल्यामुळे मोठ्या आर्थिक उलाढाली होत आहेत. सोळा सदस्यीय समितीत काँग्रेसचे आठ तर भाजप, ताराराणी आघाडीचे सात व शिवसेनेचा एक सदस्य आहे. भाजप, ताराराणी आघाडीने काँग्रेसच्या नगरसेविका कांबळे यांना आपल्या गोटात सामील करुन घेतल्याने महापालिकेतील संघर्ष आणखी चिघळला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप, स्वाभिमानीची पहिली यादी जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप, जनसुराज्य शक्ती, ताराराणी आघाडी आणि युवक क्रांती आघाडीची पहिली २२ जणांची उमेदवारी यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. शिवसेना दोन दिवसांत यादी जाहीर करणार आहे. काँग्रेस इच्छुकांचीही यादी तयार झाली असून प्रदेश कार्यकारिणी बैठकीत चर्चा होऊन दोन दिवसांत उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल. राष्ट्रवादीची सुमारे ३५ जणांची पहिली यादी आज, मंगळवारी जाहीर होणार आहे. स्वाभिमानी शेतकारी संघटनेने जि.प.साठी सात आणि पंचायत समितीसाठी तीन उमेदवाराची नावे घोषित केली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आघाडीची यादी जाहीर केली. ६७ जिल्हा परिषद आणि १३४ पंचायत समितीत एकत्रितत लढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्हा परिषदेत भाजपने १५ उमेदवार, जनसुराज्यचे ५, युवक क्रांती आघाडीचा १ आणि ताराराणी आघाडीचा १ असे एकूण २२ उमेदवार घोषित करण्यात आले. भाजपच्या यादीत हातकणंगले तालुक्यात आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक, राष्ट्रवादीतून प्रवेश केलेले अरूण इंगवले, उद्योगपती महावीर गाट, स्मिता शेंडुरे, प्रसाद खोबरे, शिरोळ तालुक्यातून विजय भोजे, राधानगरीतून शुभांगी आरडे, संदीप पवार, भुदरगडमधून राष्ट्रवादीतून प्रवेश केलेले देवराज बारदेस्कर, गडहिंग्लजमधून हेमंत कोलेकर, संजय बटकडली, पन्हाळ्यातून कल्पना चौगुले, गगनबावड्यातून पी. जी. शिंदे, करवीरमधून शुभांगी जत्राटे यांचा समावेश आहे.

जनसुराज्यकडून पन्हाळ्यातून शिवाजी मोरे, समृद्धी पाटील, शंकर पाटील, शाहूवाडीतून डी. वाय. कदम, हातकणंगलेतून अमोल गावडे यांचा समावेश आहे. ताराराणी आघाडीने आजरा तालुक्यातून अशोक चराटी आणि युवक क्रांती आघाडीने हातकणंगले तालुक्यातून स्मिता नाझरे यांचे नाव घोषित केले. स्वाभिमानी पक्षाने जिल्हा परिषदेसाठी उदगावमधून दीपाली ठोमके, नांदणीतून सागर संभूशेटे, सातवेतून बंडा पाटील, घुणकीतून वैभव कांबळे, परितेतून जर्नादन पाटील, शिंगणापूर रूपाली देवाळकर, करंजफेणमधून कमल पाटील आणि पंचायत समितीसाठी वाघवेतून विक्रम पाटील, बाजार भोगावांतून बळी पाटील आणि पोर्ले तर्फ ठाणे येथून रामराव चेचर यांची उमेदवारी जाहीर केली.


चंद्रकांत पाटील, राजू शेट्टीची बंद खोलीत चर्चा

भाजपप्रणित आघाडीत स्वाभिमानी पक्षाच्या समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यासाठी स्वाभिमानीने प्रस्तावही दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यात स्वाभिमानी पक्ष भाजपसोबत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत स्वाभिमानी पक्ष भाजपसोबत आहे का, असे विचारले असता पालकमंत्री पाटील यांनी स्वाभिमानी पक्षसोबत नसल्याचे दुःख वाटते, असे सांगितले. त्यानंतर थोड्याच वेळात पालकमंत्री पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात बंद खोलीत सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. मात्र सायंकाळी शेट्टी यांनीही दहा उमेदवारांची यादी जाहीर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खादी ग्रामोद्योग संघात आत्मक्लेश

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघ, जिल्हा सर्वोदय मंडळ, जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटना, वारस संघटना, खादीधारी व गांधीवादी कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी सोमवारी येथील रविवार पेठेतील खादी ग्रामोद्योग संघासमोर आत्मक्लेश उपोषण केले. सायंकाळी पाच वाजता उपोषणाची सांगता झाली.

यंदाच्या खादी आयोगाच्या कॅलेंडर आणि डायऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापले आहे. महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवल्याबद्दल देशभर असंतोष पसरला आहे. खादी उद्योगासाठी सरकारने अनुदानही दिलेले नाही. परिणामी खादीवर अवलंबून असलेल्या कारागिरांचे रोजगार धोक्यात आले आहेत. या सर्व बाबींचा विचार करुन खादीला प्रोत्साहन द्यावे, याकडे लक्ष वेधण्यासाठी आत्मक्लेश उपोषण करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकाप्पा भोसले, सुरेश शिपूरकर, दादासाहेब जगताप, सुंदर देसाई, व्ही. डी. माने, सदाशिव मनुगडे, बी. एस. शिंगे, एस. एस. तुपद, बाबुराव पाटील, कलगोंडा पाटील, भरत लाटकर, मीरासाहेब मगदूम, गणपतराव भोई, सुजय देसाई आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रॉपर्टी एजंटवर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ताराबाई पार्क येथील पितळी गणपती चौकात अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे संतोष आण्णासो कोळी (वय ३६) आणि त्यांचा मुलगा ओम (वय १२, रा. साईनाथ कॉलनी, लाइन बाजार, कसबा बावडा) हे दोघे जखमी झाले. सोमवारी (ता. ३०) दुपारी दीडच्या सुमारास शाहूपुरीचे निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्यासमोर हा प्रकार घडला. पोलिसांनी हल्लेखोरांचा पाठलाग केला, मात्र हल्लेखोर पळून गेले. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले, तर कोळी यांच्या कारचेही मोठे नुकसान झाले आहे.

संतोष कोळी त्यांच्या कुटुंबासह लाइन बाजार येथील साईनाथ कॉलनीत राहतात. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांची दोन्ही मुले ताराबाई पार्क येथील न्यू मॉडेल स्कूलमध्ये शिक्षण घेतात. नेहमीप्रमाणे ते सोमवारी एक वाजता मुलांना घेण्यासाठी कारमधून (एम. एच. ०९ इजी. ३५६७) शाळेत गेले. परत येताना त्यांची मुले ओम आणि प्रेम यांच्यासह अभिषेक घाटगे हा मुलांचा मित्र कारमध्ये बसले. ते नाना-नानी पार्कमार्गे लाइन बाजारच्या दिशेने जात होते. रस्त्यावर वाहनांची गर्दी असल्याने ते नाना- नानी पार्कपर्यंत पोहोचली. याचवेळी ३ ते ४ अज्ञात हल्लेखोरांनी कारच्या डाव्या बाजूची काच फोडली. यानंतर दोघांनी मागील आणि उजव्या बाजूची काच फोडून संतोष कोळी यांना दंडुक्याने मारहाण सुरू केली. या घटनेत कोळी यांच्या उजव्या कोपराला गंभीर इजा झाली. मुलगा ओम याच्या उजव्या डोळ्याला कारच्या काचा लागल्या. याच दरम्यान, शाहूपुरीचे निरीक्षक एसपी ऑफिसकडे जात होते. हल्ल्याचा प्रकार लक्षात येताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांना पाहताच हल्लेखोरांनी दंडुके टाकून धैर्यप्रसाद हॉलच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला, मात्र हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागले नाहीत. हल्लेखोरांनी काही सेकंदातच नव्या कोऱ्या कारचे मोठे नुकसान केले.

ऐन गर्दीवेळी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पितळी गणपती चौकात दहशत पसरली. निरीक्षक चौगुले यांनी तातडीने कोळी यांना पोलिस बंदोबस्तात उपचारासाठी सीपीआरमध्ये पाठवले. पोलिसांनी वायरलेसवरून नाकाबंदी केली, पण हल्लेखोर सापडले नाहीत. जखमी कोळी आणि ओम या दोघांवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले असून, संतोष यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात फिर्याद दाखल केली.

व्यावसायिक वादातून हल्ला?

कसबा बावडा परिसरातील शासकीय कार्यालये आणि शिरोली एमआयडीसीत कामाला जाणाऱ्या लोकांना सोयीचा परिसर असल्याने बावड्यातील जमिनींना मोल आले आहे. जमीन खरेदी-विक्री आणि भाडे करारावर घर देण्याचा उद्योग वाढला आहे. बिनभांडवली व्यवसायातून हजारो रुपये कमिशन मिळत असल्याने अनेकांनी हा व्यवसाय सुरू केला. एकमेकांचे ग्राहक पळवणे, दर पाडणे, जणीवपूर्वक दर वाढवून अडवणूक करणे असे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धेतूनच हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

वेळीच पोलिससमोर हल्लेखोर फरार

कोळी यांच्या कारवर हल्ला झाला तेव्हा पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले काही अंतर पुढे होते. हल्ल्याचा प्रकार लक्षात येताच ते घटनास्थळी धावत आले. पोलिसांना पाहताच हल्लेखोर पळाले. चौगुले यांनी हल्लेखोरांचा पाठलागही केला. पण, गर्दीचा फायदा घेऊन हल्लेखोर पळाले. वेळीच पोलिस घटनास्थळी आल्याने पुढील अनर्थही टळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेच्या प‌ाठिंब्यावर काँग्रेसचा सभापती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे संदीप नेजदार यांनी बाजी मारली. शिवसेनेने नेजदार यांना पाठिंबा देत भाजपला औकात दाखवली. यानिमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे समीकरण जुळून आले.

प्रचंड चुरस आणि नाट्यपूर्ण घडामोडीने रंगलेल्या या निवडणुकीत नेजदार यांना आठ तर भाजप, ताराराणी आघाडीचे नगरसेवक उमेदवार आशीष ढवळे यांना सात मते मिळाली. भाजपच्या गोटात सामील झालेल्या काँग्रेसच्या नगरसेविका रिना कांबळे नाट्यमयरित्या अनुपस्थित राहिल्याने स्थायीत सत्तांतर घडविण्याचा भाजप, ताराराणी आघाडीचा बार फुसका ठरला. शिवसेनेच्या पाठिंब्यावरुन अर्थपूर्ण घडामोडी घडल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

दरम्यान, सभापतिपदाच्या निवडणुकीत सत्तारुढ काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी व विरोधी भाजप, ताराराणी आघाडीकडून घोडेबाजार झाल्याचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

काँग्रेसच्या ​कांबळे या भाजप, ताराराणी आघाडीच्या गोटात सामील झाल्याने काँग्रेसचे स्थायीतील बहुमत धोक्यात आले होते. काँग्रेसने त्यांना व्हीपही लागू केला होता. पक्षादेश डावलून विरोधी उमेदवाराला मतदान केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, म्हणून कांबळे या मतदान प्र​क्रियेत सहभागी झाल्या नाहीत. दुसरीकडे विरोधकांना शह देण्यासाठी काँग्रेसने ताराराणीचे नगरसेवक नीलेश देसाई यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी त्यासंबंधी निर्णय घेतला नसल्याने देसाई यांचे नगरसेवकपद शाबूत तर राहिले. त्यामुळे ते स्थायीच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले.

शिवसेनेचे मत निर्णायक

सोळा सदस्यीय स्थायी समितीत सत्तारूढ काँग्रेस आघाडी आणि विरोधी भाजप, ताराराणी आघाडीचे संख्याबळ प्रत्येकी सात झाल्याने निवडणुकीविषयी उत्कंठा वाढली होती. शिवसेनेच्या एकमेव सदस्या प्रतिज्ञा निल्ले व भाजप गोटात सामील काँग्रेसच्या कांबळे यांच्या मताला प्रचंड किंमत आली होती. निल्ले यांच्या पाठिंब्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु होते. प्रत्यक्ष निवडणुकीला कांबळे गैरहजर राहिल्याने व निल्ले काँग्रेस आघाडीसोबत सभागृहात दाखल झाल्याने सत्ताधाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पिठासन अधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. माघारीच्या १५ मिनिटांच्या कालावधीत काँग्रेसच्या नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी उमेदवारी मागे घेतली. पहिल्यांदा भाजपचे ढवळे यांच्यासाठी हात उंचावून मतदान झाले. त्यांना सात मते मिळाली. नेजदार यांना दोन्ही काँग्रेससह शिवसेनेच्या निल्ले यांनी मतदान केल्याने विजयाचा मार्ग सुकर झाला.

...........................

‘महिला-बालकल्याण’मध्ये वहिदा सौदागर, छाया पोवार

महिला व बालकल्याण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेविका व विद्यमान उपसभापती वहिदा सौदागर यांची सभापतिपदी तर उपसभापतिपदी काँग्रेसच्या छाया पोवार विजयी झाल्या. नऊ सदस्य संख्या असलेल्या समितीत काँग्रेस, राष्ट्रवादीचे संख्याबळ पाच तर भाजप, ताराराणी आघाडीचे चार सदस्य आहेत. सौदागर यांनी ताराराणीच्या अर्चना पागर यांच्यावर तर उपसभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पोवार यांनी भाजपच्या सविता भालकर यांच्यावर पाच विरुद्ध चार मतांनी विजय मिळवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इमर्जन्सीसाठी टर्न टेबल लॅडर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अकरा मजली व त्यापेक्षाही उंच असणाऱ्या इमारतींमध्ये आगीसारख्या आपत्तकालीन परिस्थितीत तोंड देण्यासाठी अग्निशमन विभागासाठी आवश्यक असलेल्या टर्न टेबल लॅडर वाहनाचा १२ कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेने सरकारला सादर केला आहे. या खर्चातील निम्मा वाटा महापालिकेने उचलावा असा नगरविकास विभागाच्या पातळीवरुन प्रयत्न आहेत. याबाबत महापालिकेच्याबाजूने सकारात्मकता असल्याने लवकरच ही कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत.

शहरात अकरा मजली इमारतींना मंजुरी आहे. त्यानुसार विविध प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. दरम्यानच्या काळात डी क्लास नियमावली लागू करण्यात आली. त्यानंतर अकरा मजलीपेक्षाही उंच इमारती उभी राहण्याचा मार्ग खुला झाला आहे. एकीकडे उंच इमारती उभ्या राहणार असताना दुसरीकडे या उंच इमारतींमध्ये पोहचण्यासाठीची साधने अग्निशमन यंत्रणेकडे नाहीत. अकरा मजली इमारतीमध्येही आगीसारखी आपत्त्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अकराव्या मजल्यापर्यंत पोहचण्याचे साधन नाही. त्यामुळे तेथील रहिवाशांच्या सोडवणुकीचा प्रश्न सतावत आहे. त्यापेक्षाही उंच इमारती उभ्या राहिल्या तर अग्निशमन दल सक्षम होणे आवश्यक असल्याने महापालिकेच्यावतीने गेल्या वर्षीपासून त्यादृष्टीने तयारी चालवली आहे.

पूर्वी महापालिकेने टेबल लॅडरचा प्रस्ताव दिला आहे. त्यामध्ये १२ कोटी रुपयांचा खर्च सरकारकडून मिळावा, अशी मागणी केली आहे. सरकारकडून मात्र पूर्ण निधी देण्याऐवजी महापालिकेने काही वाटा उचलावा असा प्रस्ताव देण्यास सांगितले होते. नगरविकास विभागाकडे त्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. महापालिकेने ५० टक्के खर्च उचलावा, असे नगरविकास विभागाला अपेक्षित आहे. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चाही झाली आहे. मात्र महापालिकेकडून त्यानुसार सकारात्मकता दाखवण्यात आली नव्हती. त्यामुळे हा प्रस्ताव सरकारकडेच पडून होता.

गेल्या महिन्यात महापालिकेकडून पुन्हा ५५ मीटर उंचीपर्यंत जाणाऱ्या टर्न टेबल लॅडरचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यामध्ये पूर्ण खर्च सरकारकडून मिळावा, अशी मागणी केली असली तरी शहराची गरज पाहता महापालिका निम्मा खर्च उचलण्यास राजी आहे. त्यामुळे सरकारच्या मतानुसार महापालिकेने होकार कळवल्यास या प्रस्तावावर तातडीने निर्णय होऊन कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. याबाबत सरकारकडून निर्णय व्हावा, यासाठी महापालिकेच्यावतीने पाठपुरावा केला जात आहे.

....

टर्न टेबल लॅडर काय आहे?

उंच इमारतीमध्ये आग लागल्यानंतर लिफ्टचा वापर करता येत नाही. तसेच इमारतीच्या मधील टप्प्यावर आग लागली असल्यास जिन्यांद्वारे शेवटच्या मजल्यापर्यंत पोहचणे शक्य होत नाही. यासाठी टर्न टेबल लॅडरच्या शिडीचा वापर करुन त्याच्या उंचीप्रमाणे थेट शेवटच्या मजल्यापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांना पोहचता येते. तसेच त्यातून ​रहिवाशांची सुटका करुन खाली आणता येते. टेबल लॅडरमध्ये ३६० अंशामध्ये गोलाकार फिरण्याची क्षमता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माघी गणेश जयंती उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील गणेश मंदिरांमध्ये मंगळवारी माघी गणेश जयंती सोहळा धार्मिक वातावरणात आणि मंगलमय विधींनी साजरा करण्यात आला. दुपारी बारा वाजून ४७ मिनिटांनी गणेश जन्मकाळ साजरा करण्यात आला. सकाळपासूनच गणेश दर्शनासाठी भाविकांनी मंदिरामध्ये गर्दी केली. शहरातील ओढ्यावरील सिद्धीविनायक, जाऊळाचा गणपती, बिनखांबी गणेश मंदिर, चंबुखडी, अंबाबाई मंदिरातील गारेचा गणपती, स्वयंभू गणेश या मंदिरांमध्ये गणेश जयंतीनिमित्त रोषणाई करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत भाविकांनी गणेश मंदिर परिसर फुलून गेला.

भाविकांच्यादृष्टीने महत्त्वाचा धार्मिक सोहळा म्हणून माघी गणेश जयंती उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त गणेश मंदिर व्यवस्थापनानेही मंगळवारी उत्सवाची तयारी केली होती. ​ओढ्यावरील सिद्धीविनायक मंदिरातील बैठ्या गणेशमूर्तीची सालंकृत पूजा बांधण्यात आली. छत्रपती मधुरिमाराजे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. रात्री शब्दसुरांच्या झुल्यावर या भावगीत मैफलीने उत्सवाची सांगता झाली.

स्वयंभू गणेश मंदिर येथे सकाळी अभिषेक करण्यात आला. जाऊळाचा बालगणेश मंदिरात मंगळवारी दिवसभर धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चंबुखडी येथे गणेश जयंतीनिमित्त गणेशमूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. यानिमित्त मंदिराची सजावट करण्यात आली होती. अंबाबाई मंदिरातील जोशीराव गणपतीच्या दर्शनाला भाविकांनी अलोट गर्दी केली. जास्वंदीची फुले, दुर्वांचे हार अर्पण करून गणेशमूर्तींची आकर्षक पूजा हे आजच्या गणेश जयंतीचे वै​शिष्ट्य ठरले. सर्व मंदिरात दुपारी गणेश जन्मकाळ सोहळ्यावेळी पाळणागीत म्हणण्यात आला. शहरातील वि​विध सार्वजनिक मंडळांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगण्यानेही छळले होते...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वृद्धापकाळात घरच्या लोकांनीच घराबाहेर काढून रस्त्यात सोडल्याने मानसिक धक्का बसलेले सामलिंग गवळी (वय ६८, रा. दुंडगे) यांचा अखेर सोमवारी (ता. ३१) सावली केअर सेंटरमध्ये मृत्यू झाला. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर स्वकीयांनीच घाराबाहेरचा रस्ता दाखवल्याने हताश झालेल्या गवळींची मरणाने सुटका केली, पण त्यांच्या मरणानंतर पोलिसांनी हद्दीवरून घातलेल्या वादात मृतदेहाची हेळसांड झाली. केवळ मृतदेहाच्या पंचनाम्यासाठी टाळाटाळ करून पोलिसांनी निर्ढावलेल्या मानसिकतेचा प्रत्यय दिला.

सोमवारी (ता. २३) शाहू नाका येथे अज्ञातांनी सामलिंग गवळी यांना सोडले. जवळच्या लोकांनीच केवळ अंगावरील कपड्यांनिशी मरणाच्या दारात सोडल्याने सामलिंग यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. विमनस्क स्थितीत रस्त्याकडेला बसलेल्या वृद्धाची केविलवाणी अवस्था पाहून त्याच परिसरातील एका नागरिकाने नगरसेवक भूपाल शेटे यांना घटनेची माहिती दिली. शेटे यांनी सावली केअर सेंटरला माहिती देऊन वृद्धाला सावली सेंटरमध्ये घेऊन जाण्याची विनंती केली. सावलीचे कर्मचारी तातडीने गवळींना सेंटरमध्ये घेऊन गेले. त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण मानसिक धक्क्यातील गवळींची जीवनेच्छाच संपली होती. अन्नावरील वासना उडाली होती. अधूनमधून एखादा शब्द बोलणारे गवळी शून्य नजरेत एकटक पाहत कुठल्यातरी विचारात गढून जात होते. सावलीमधील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले, मात्र धक्क्यातून ते बाहेर आलेच नाहीत. अखेर सोमवारी (ता. ३०) दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. आयुष्याच्या संध्याकाळी घर सुटलेल्या गवळींची शोकांतिका येवढ्यावरच थांबली नाही. मरणाने दुःखांपासून त्यांची सुटका केली, पण मरणानंतर मृतदेहाचीही हेटाळणी त्यांच्या नशिबी होती.

गवळींच्या मृत्यूनंतर सावलीचे किशोर देशपांडे यांनी मृतदेहाच्या पंचनाम्यासाठी जुना राजवाडा पोलिस ठाण्याला कळवले. शाहू नाक्याला गवळी सापडले होते, त्यामुळे जुना राजवाडा पोलिसांनी सावलीच्या कर्मचाऱ्यांना राजारामपुरी पोलिस ठाण्यात पाठवले. राजारामपुरी पोलिसांनी घटनेची माहिती घेण्याऐवजी आलेल्या कर्मचाऱ्याचीच उलट तपासणी सुरू केली. पंचनाम्याचे काम सुरू करण्यापेक्षा गवळी जिथे सापडले ती जागा दुसऱ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीची कशी येते हेच समजून सांगण्याचा प्रयत्न राजारामपुरीच्या ठाणे अंमलदारांनी केला. ही जबाबदारी त्यांनी गोकुळ शिरगाव पोलिसांवर ढकलली. याशस्वीपणे काम टाळल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. यानंतर सावलीचे किशोर देशपांडे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन निरीक्षक अनिल देशमुख यांची भेट घेतली. अखेर गवळींच्या मृत्यूनंतर ८ तासांनी रात्री ९ वाजता मृतदेह पंचनाम्यासाठी पाठवला, तोपर्यंत मृतदेह सावली केअर सेंटरमध्येच ठेवावा लागला. सावलीच्या पदाधिकाऱ्यांनी गवळी यांच्या पुतण्याचा शोध घेऊन मंगळवारी मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला. मरणानंतर २० तासांनी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. या सर्व प्रकारात पोलिसांनी केवळ पंचनामा करण्याची जबाबदारी झटकण्यासाठी अक्षरशः माणुसकी गहाण ठेवली.

शुटिंगसाठी पोलिस ठाण्यातील कामकाज ठप्प

सोमवारी संध्याकाळी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात एका चित्रपटाचे शुटिंग सुरू होते. शुटिंगचा सेट लागल्याने पोलिस ठाण्यात सर्वत्र कलाकार आणि तंत्रज्ञांचाच वावर होता. नेहमीचे काम ठप्प असल्याने तक्रारदारांचे ऐकूण घेण्यासाठीही कोणी नव्हते. मृतदेहाचा पंचनामा करण्याचे पत्र देण्यासाठी सावलीच्या कर्मचाऱ्यांना दोन तास वेटिंग करावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षा बंदमुळे नागरिकांचे हाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आरटीओकडून केलेल्या शुल्क वाढीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व रिक्षा व काळी-पिवळी टॅक्सीचालक संघटनांनी पुकारलेला बंद शंभर टक्के यशस्वी ठरला. या बंदमुळे केएमटी बस आणि एसटीला तुटुंब गर्दी झाल्याने नागरिकांचे हाल झाले. विशेषतः कोल्हापुरात बाहेरून आलेले प्रवासी, पर्यटकांना सर्वाधिक गैरसोयीचा सामना करावा लागला. बंद शंभरटक्के यशस्वी ठरल्याचा दावा रिक्षा चालक संघटनांच्या प्रतिनिधींनी केला आहे.

केंद्र सरकारने आरटीओच्या विविध शुल्क आणि करात पाचपट वाढ केली. २९ डिसेंबरपासून ही दरवाढ लागू केली आहे. या शुल्कवाढीचा फटका रिक्षाचालकांना बसणार असल्याने त्यांनी त्याविरोधात यापूर्वी निवेदने देऊन वाढीला विरोध केला होता. मात्र, कोणत्याही पातळीवर दखल न घेतल्याने रिक्षा चालकांना, बंदचे अस्त्र उगारले. सोमवारी रात्री बारा ते मंगळवारी सायंकाळी पाच या वेळेत रिक्षा चालकांनी बंद पुकारून दरवाढीला विरोध दर्शविला.

मध्यवर्ती बस स्थानकासमोरील स्टँड स्टॉपवर रात्री बाराच्या सुमारास रिक्षा चालकांनी जोरदार निदर्शने केली. रात्रीपासूनच शहरातील रिक्षा बंद राहिल्याने पहाटे मुंबई-पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली. अनेकांना रिक्षाचालकांच्या बंदची कल्पना नव्हती. त्यामुळे ऐनवेळी नातेवाइक, मित्रांना स्टँडवर बोलवून घेऊनच त्यांना घर गाठावे लागले. यात लहान मुले आणि महिलांचे खूप हाल झाले. सकाळीही स्टँड परिसरात तिच स्थिती होती. पण, केएमटीच्या बसेस सहाच्यासुमारास सुरु झाल्यानंतर किमान जवळच्या एखाद्या मुख्य ठिकाणापर्यंत जाता येईल, या हेतून अनेकांनी केएमटीला पसंती दिली. रिक्षा बंद असल्याने स्टँड परिसरात असणाऱ्या एक-दोन टांगा चालकांना त्याचा फायदा झाला. नेहमी हौसेखातर टांग्याला पसंती दिली जाते. आज, मात्र पर्यायी वाहतूक म्हणून टांग्याला पसंती मिळाली होती.

स्थानिक रहिवाशांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या प्रमाणावर रिक्षांचा वापर करतात. त्यांना रिक्षांच्या बंदमुळे सकाळच्या टप्प्यातील कामे सायंकाळी किंवा उद्यावर ढकलावी लागली. त्याचबरोबर विद्यार्थी वाहतूक रिक्षा बंद असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. त्यातच महिना अखेरचा दिवस असल्याने शाळांना अर्धी सुटी असते. अनेक मुले आज नाईलाजाने शाळेत गैरहजर होती.

काळी पिवळी टॅक्सीचे सीबीएस, दसरा चौक, कोंडा ओळ, सरस्वती टॉकिज, संभाजीनगर, गोखले कॉलेज परिसर स्टॉप, चिमासाहेब महाराज चौक, रंकाळा स्टॅण्ड या ठिकाणाचे स्टॉप बंद होते. त्यामुळे येथून मुरगूड, गारगोटी, कळे, पन्हाळा अशा ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना एसटीचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे एसटीही हाऊसफुल होत्या. शहरातील वर्दळीच्या आणि केएमटीचे मोठे बस स्टॉप असलेल्या बिंदू चौक, शाहू मैदान, शिवाजी चौक, दाभोळकर कॉर्नर आणि मध्यवर्ती बस स्थानकाबाहेरील बस स्टॉपवर दिवसभर प्रवाशांची गर्दी दिसत होती. सायंकाळी पाचनंतर रिक्षा रस्त्यांवर पुन्हा आल्यानंतर ही गर्दी हळू हळू ओसरल्या दिसले.



व्यापारी असल्याने सिधुदूर्ग जिल्ह्यातून मंगळवारी खरेदीसाठी कोल्हापुरात आलो होतो. कामे झाल्यानंतर रिक्षा नसल्याने बाजारपेठेतून मुख्य बसस्थानकपर्यंत येण्यास उशीर झाला. त्यामुळे आमची गाडी चुकली. आता रंकाळा स्टँडवर जाऊन बस मिळवण्यासाठी वाहन शोधतोय.

- मुबारक जेट्टी, प्रवासी सिंधुदूर्ग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाच्या तगाद्याने शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

म्हैस पालनाच्या प्रोजेक्टसाठी मेहुण्याने घेतलेले कर्ज न फेडल्याने विष प्राशन केलेल्या जितेंद्र धोडिराम मुळे (वय ४८ रा. जाधववाडी) या शेतकऱ्याचा मंगळवारी मृत्यू झाला. कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने मुळे यांना नोटीस दिली होती. २० लाखांच्या कर्जासाठी शेती जाणार या भीतीने जितेंद्र यांनी शुक्रवारी (ता. २७) विषप्राशन केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर मेहुणे कृष्णात आनंदा पाटील (रा. कसबा बावडा) यांनीच कर्ज भागवावे, असा आग्रह मुळे कुटुंबीयांनी धरल्याने सीपीआर रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या वादातून मुळे यांचा मृतदेह सीपीआरमध्येच ठेवावा लागला.

जाधववाडी येथील जितेंद्र मुळे यांचे मेहुणे कृष्णात यांने मुळे यांच्या शेतात म्हैसपालन प्रोजेक्ट सुरू केला होता. यासाठी त्यांनी १२ वर्षांपूर्वी मुळे यांची शेतजमीन तारण ठेवून बँकेकडून साडेसात लाखांचे कर्ज घेतले होते. पुढे म्हैस पालनात यश आले नाही, त्यामुळे कर्जफेड होऊ शकली नाही. कालांतराने कर्जाची रक्कम वाढत गेली. २० लाखांच्या कर्जफेडीसाठी मुळे यांना बँकेच्या नोटिसा येत असल्याने ते अस्वस्थ होते. कर्जापोटी जमीन जाणार याची भीती त्यांना होती. यातूनच त्यांनी शुक्रवारी राहत्या घरी विषप्राशन केले. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी मुळे यांचा मृत्यू झाला. यानंतर मुळे आणि पाटील कुटुंबात वाद उफाळून आला असून, मेहुणे पाटील यांनी कर्ज घेऊन मुळे यांची फसवणूक केली. यातूनच मुळे यांनी आत्महत्या केल्याने पाटील यांनी कर्जाची रक्कम भागवल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा मुळे कुटुंबीयांनी घेतला आहे. कृष्णात पाटील आणि सांगली येथे असलेले त्यांचे पोलिस अधिकारी भाऊ या दोघांनी मिळून फसवणूक केल्याचा आरोप मुळे कुटुंबीयांनी केला आहे. मुळे कुटुंबीयांसह सुमारे १०० हून अधिक लोक सीपीआरमध्ये दाखल झाले होते. जोपर्यंत कर्जाची रक्कम दिली जात नाही, तोपर्यंत मृतदेह न स्वीकारण्याची भूमिका घेतल्याने सीपीआरमध्ये ताणावपूर्ण वातावरण बनले होते.

या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस सीपीआरमध्ये दाखल झाले. पोलिसांनी मुळे कुटुंबीयांची समजूत घालून मृतदेह स्वीकारण्याची विनंती केली, मात्र नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला नाही. मेहुणे पाटील यांनी मोठी फसवणूक केली आहे. त्यांच्यामुळेच जितेंद्र मुळे यांनी आत्महत्या केली. आता त्यांच्या मुलांवरही कर्जाचा बोजा राहणार, त्यामुळे पाटील यांनी कर्ज भागवल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे सांगून मुळे कुटुंबीय सीपीआरमधून निघून गेले. परिणामी रात्री उशिरापर्यंत मृतदेह सीपीआरमधील फ्रिजरमधे ठेवावा लागला. दरम्यान, सीपीआर परिसरात दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली नव्हती. जितेंद्र मुळे यांच्या पश्ताच पत्नी, दोन मुले, चार भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीच्या खूनप्रकरणी पत्नीला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पतीचा गळा चिरून खून केल्याप्रकरणी वासंती वसंत निकम (वय ४२, रा. कोदे, ता. गगनबावडा) या महिलेला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी मंगळवारी (ता. ३१) पाच वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पती वसंत याने १४ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याने वासंती हिने पती वसंत निकम याचा गळा चिरून खून केला होता.

कोदे (ता. गगनबावडा) येथील सहदेव कृष्णा कांबळे यांच्या शेतात वसंत निकम हा त्याची पत्नी, सहा मुली आणि पाच मुलांसह राहत होता. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वसंतला दारुचे व्यसन होते. त्याचा मोठा मुलगा कोकणातील एका नातेवाईकाच्या खुनाची शिक्षा भोगत आहे. दोन मुलींचे लग्न झाले आहे. वसंत हा मद्याच्य नशेत १४ वर्षाच्या मुलीवर वारंवार अतिप्रसंग करीत होता. या रागातून पत्नी वासंती हिने १७ ऑगस्ट, २०१५ रोजी मध्यरात्री कोयत्याने पती वसंतचा गळा चिरून खून केला. यानंतर ती रात्रीच्या अंधारात सात मुलांना घेऊन रात्रीच्या अंधारात सहदेव कांबळे यांच्या घरी पोहोचली. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन चोरट्यांनी पतीचा खून केल्याचा तिने बनाव केला होता. पोलिसांनी या खुनाचे गूढ उकलून वासंतीला अटक करून तिच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. सहायक सरकारी वकील ए. एम. पिरजादे यांनी तेरा साक्षीदार तपासले. न्यायाधीश साळुंखे यांनी साक्षी, पुरावे तपासून वासंती हिला पाच वर्षे सक्त मजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निल्लेंनी आदेश धुडकावणे गंभीर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेच्या नगरसेवकांना तटस्थ राहण्याचा आदेश होता. मात्र निल्ले यांनी काँग्रेसला मतदान केली. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे पक्षप्रमुखांचा आदेश नाकारल्याच्या प्रकरणाचा अहवाल दोन दिवसात पक्षप्रमुख ठाकरेंना देणार आहे,’ असे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. मंगळवारी झालेल्या प्रकारामुळे शिवसेनेच्या सतत बदलत असलेल्या भूमिकेबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.

शिवसेनेने मदत केल्यामुळे काँग्रेसचा स्थायी सभापती होण्याचा मार्ग प्रशस्त झाला. ही मदत करण्यापाठीमागे ‘अर्थ’ कारण दडले असल्याची चर्चा होती. यातून शिवसेनेच्या भूमिकेबाबत संदिग्धता तयार झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी दिलेल्या माहितीवरुन नगरसेवक, पदाधिकाऱ्यांकडून पक्षादेश धुडकावला असल्याचे स्पष्ट झाले.

आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीबाबतची कल्पना दिली होती. काँग्रेस आघाडीचे सात व भाजप आघाडीचे सात सदस्य उपस्थित राहणार असल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले होते. ही माहिती घेतल्यानंतर ठाकरे यांनी नगरसेवकांना कुणालाही मदत करण्याऐवजी तटस्थ राहण्यास सांगितले होते. त्याबाबतचा निरोप नगरसेवक प्रतिज्ञा निल्ले यांच्या पतींना दिला होता. मात्र या निरोपानंतरही निल्ले यांनी निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने मतदान केले. ही बाब गंभीर आहे. त्याबाबतचा अहवाल दोन दिवसात पक्षप्रमुखांकडे पाठवणार आहे.’ दुधवडकर यांनीही आदेश दिल्याची बाब क्षीरसागर यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर ते म्हणाले, ‘दुधवडकर पक्षप्रमुख नाहीत. महापालिकेचे कार्यक्षेत्र माझ्या मतदार संघात येते. त्यामुळे तिथे निर्णय घेण्याचा अधिकार माझा आहे. त्यामुळेच ठाकरे यांच्याशी मी चर्चा केली.’

शिवसेनेने महापालिकेच्या राजकारणात सातत्याने भूमिका बदलली आहे. कधी तटस्थता, कधी काहींना पाठिंबा तर काहींना विरोध केला असल्याने शिवसेनेबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. स्थायी सभापतीच्या निवडीतही पक्षांतर्गतच दोन मतप्रवाह आढळून आल्याने शिवसेनेतील गटांचे राजकारण आगामी दिवसात पुन्हा उफाळून येणार असल्याची चिन्हे आहेत. त्यातून अनेकांच्या पदांना फटका बसण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोडेबाजारावरुन एकमेकांवर चिखलफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी घोडेबाजार झाल्याची टीका करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व विरोधी भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीने एकमेकावर चिखलफेक केली. विकासात्मक राजकारण नव्हे तर, घोडेबाजार हेच ताराराणी आघाडीचे प्रमुख हत्यार आहे. जुने, गंजलेले हे हत्यार पुन्हा वापरुन स्थायीची सत्ता मिळवण्याचा त्यांच्या खटाटोपाला भाजपाची अप्रत्यक्षरित्या साथ लाभल्याची खरमरीत टीका महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे नेते प्रा. जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. भाजप, ताराराणी आघाडीचे नेते सुनील कदम, गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी यांनी काँग्रेसनेच शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्याठी घोडेबाजार घडवून आणला. शिवसेनेला शहराच्या विकासाशी देणेघेणे नाही, असा प्रतिटोला लगाविला.

महाडिकांचे घाणेरडे राजकारण

स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीने आव्हान उभे केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जोरदार टीका करण्यात आली. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख म्हणाले, ‘खासदार धनंजय महाडिक यांचा नेमका पक्ष कुठला आहे ? काँग्रेसच्या नगरसेविका रिना कांबळे यांना खासदार महाडिक यांच्या पंढरपूर येथील कारखान्याच्या गेस्टवर ठेवले आहे. महाडिक हे जिल्ह्याच्या विकासाऐवजी घाणेरडे राजकारण करत आहेत. आयुक्त पी. शिवशंकर हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दबावाखाली काम करत आहेत. विरोधी गटात सामील झालेल्या नगरसेविका कांबळे यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.’

प्रा. जयंत पाटील म्हणाले, ‘नगरसेवक देसाई यांच्या जातीच्या दाखल्याप्रकरणी हायकोर्टाने दिलेली स्थगिती ऑक्टोबर महिन्यात उठली आहे. देसाई यांच्या विरोधी उमेदवाराच्या वकीलांने दोन महिन्यापूर्वी निवेदन देऊनही आयुक्तांनी कार्यवाही झाली नाही. महापालिकेचे हायकोर्टातील वकील अभिजीत आडगुळे यांनी नगरसेवक देसाई यांच्या दाखल्यासंदर्भात स्थगिती नसल्याचा स्पष्ट अभिप्राय देवूनही आयुक्तांनी कारवाई केली नाही. या प्रकरणी आयुक्तांवर कोर्टाचा अवमान केला म्हणून फौजदारी दाखल करण्यात येईल. आयुक्त हे नियमानुसार कामकाज करत असल्याचा केवळ आव आणतात. त्यांना त्या पदावर काम करण्याचा अधिकार नाही. दोन्ही काँग्रेसच्या नेते मंडळीशी चर्चा करुन त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय होईल.’ पत्रकार परिषदेला उपमहापौर अर्जुन माने, सभागृह नेते प्रवीण केसरकर, मुरलीधर जाधव, प्रताप जाधव, आदिल फरास, सचिन चव्हाण, गणी आजरेकर, शिवानंद बनछोडे आदी उपस्थित होते.

शिवसेनेसाठी काँग्रेसकडून घोडेबाजार

ताराराणी आघाडीने घोडेबाजार केला नाही तर काँग्रेस आघाडीने शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी घोडेबाजार घडवून आणला असा प्रतिटोला भाजप, ताराराणी आघाडीचे नेते सुनील कदम यांनी लगाविला. ज्या नेत्यांनी शहरातील जागा हडपल्या, आयआरबी प्रकल्प, थेट पाइपलाइन योजना, एसटीपी प्रकल्पावरुन ज्यांच्यावर आरोप झाले अशा नेते मंडळींना पाठिंबा देऊन शिवसेनेने आपला खरा चेहरा दाखवून दिला आहे. सभागृहात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खाली आवाजात बोला, असे म्हणणाऱ्या माजी महापौर अश्विनी रामाणे यांना वर्षभरातच जातीच्या दाखल्यावरुन महापालिकेबाहेर पडावे लागल्याचा टोलाही त्यांनी लगाविला.

रीना कांबळे गगनबावड्याच्या कारखाना स्थळावर

सत्यजित कदम म्हणाले, ‘काँग्रेसच्या नगरसेविका रीना कांबळे यांच्याशी भाजप, ताराराणी आघाडीचा काही संबंध नाही. काँग्रेस आघाडी अंतर्गत प्रचंड धुसफूस, अस्वस्थता आहे. नगरसेविका कांबळे या स्थायी समितीत काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात मतदान करतील या भीतीपोटीच काँग्रेसने त्यांना गायब केले आहे. नगरसेविका कांबळे या गगनबावडा येथील साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर ठेवण्यात आले आहे.’

विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेत नजीकच्या काळात सत्ता परिवर्तन अटळ आहे. मात्र शिवसेनेची भूमिका ही शहर विकासाच्या विरोधात असल्याचे सामोरे आले.’ नगरसेवक आशिष ढवळे यांनी स्थायीतील पराभवाचे दुख नाही. सत्ताधारी काँग्रेसचा घोडेबाजार यशस्वी झाला असा टोला त्यांनी मारला. पत्रकार परिषदेला किरण शिराळे, राजसिंह शेळके, अजित ठाणेकर, शेखर कुसाळे, विजय खाडे आदी उपस्थित होते.

भाजपला औकात दाखविली

शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांनी घोडेबाजाराचा आरोप फेटाळून लावला. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मातोश्री आणि वरिष्ठ नेत्यांच्या तसा स्पष्ट आदेश होता. संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर यांचा भाजपच्या विरोधात मतदान करा असा मेसेज आला असल्याचे लिंग्रस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्थायीच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा देऊन भाजपला ‘औकात’ दाखवल्याचे त्यांनी सांगितले. स्थायी सदस्या प्रतिज्ञा निल्ले यांनी शिवसेनेचा स्वाभिमान दाखविला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला. घोडेबाजार झाला नाही. गटनेते नियाज खान यांनी घोडेबाजाराचे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक अभिज‌ित चव्हाण उपस्थित होते.

काँग्रेस नगरसेवकांची आयुक्तांसोबत खडाजंगी

जात पडताळणी समितीच्या नगरसेवक निलेश देसाई यांच्या जातीच्या दाखला अवैध ठरविण्याच्या निर्णयाला हायकोर्टाने दिलेली स्थगिती ऑक्टोबर महिन्यात संपली आहे. तसा स्पष्ट अभिप्राय महापालिकेचे वकील अभिज‌ित आडगुळे यांनी आयुक्तांना रात्री दोन वाजता दिला, मात्र त्यानंतर आयुक्तांनी देसाई यांचे पद रद्द केले नाही आयुक्त पक्षपाती वागत आहेत असा आरोप उपमहापौर अर्जुन माने, गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक सचिन चव्हाण आदींनी केला. आयुक्तांनी कारवाईचे पत्र द्यावे यासाठी रात्री दोन वाजेपर्यंत काँग्रेसचे नगरसेवक महापालिकेत व आयुक्त बंगला परिसरात थांबून होते. मंगळवारी सकाळी पत्र मिळवण्यासाठी त्यांनी पुन्हा आयुक्तांचा बंगला गाठला. देसाई यांच्यावरील कारवाईवरुन काँग्रेसचे पदाधिकारी व आयुक्तांत खडाजंगी झाली. आयुक्तांनी देसाई यांच्या दाखल्याच्या स्थगितीप्रश्नी हायकोर्टाचे रजिस्टार यांच्याकडे पुन्हा अभिप्राय मागविला असल्याचे स्पष्ट केले. त्याला काँग्रेसने आक्षेप घेत त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भोगावती’ची आज सुनावणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भातील याचिकेवरील सुनावणी बुधवारी उच्च न्यायालयात झाली नाही. आता ही सुनावणी गुरुवारी (ता.२) होणार आहे. न्यायालयाने निवडणूक ठरलेल्या कर्यक्रमानुसार जाहीर केल्यास सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गोची होणार आहे.

सहकार विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात सहकारी संस्थांची निवडणूक नसावी, या विनंतीस अनुसरून भोगावती कारखान्याची निवडणूक आहे त्या टप्प्यावरून दोन महिने लांबणीवर करण्याचा आदेश दिला आहे. त्याला आव्हान देणारी याचिका राष्ट्रवादीचे बाबूराव पाटील, शरद पाटील, शिवाजी पाटील यांनी दाखल केली आहे. त्याची सुनावणी बुधवार होणार होती, पण बुधवारची सुनावणी गुरुवारी होणार आहे. नियोजित कार्यक्रमानुसार दोन फेब्रुवारीला कारखान्यासाठी उमेदवारी माघार घेण्याची मुदत आहे. जर न्यायालयाने नियोजित कार्यक्रमानुसार निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यास सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची त्रेधातिरपीट होणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे भोगावती परिसरातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठवगावला उद्यापासून कल्याणी महोत्सव

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील कल्याणी सखी मंच व विजयसिंह यादव प्रतिष्ठान यांच्यामार्फत दरवर्षी आयोजित केला जाणारा कल्याणी महिला महोत्सव ३ ते ५ फेब्रुवारी या काळात श्री विजयसिंह यादव महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहे. महोत्सवात मराठी सिने कलाकारांसह विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष विद्याताई गुलाबराव पोळ यांनी दिली.

शुक्रवारी (ता.३) कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सतीश माथुर व मंजू माथुर यांच्या हस्ते होणार आहे. या दिवशी अभिनेत्री क्रांती रेडकर महोत्सवास भेट देऊन महिलांशी संवाद साधणार आहेत. या दिवशी शाकाहारी व मांसाहारी पाककला स्पर्धा व महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन केले आहे. सायंकाळी सहा वाजता सारेगमप विजेता विश्वजित बोरवणकर व लावणीसम्राज्ञी सायली पराडकर यांचा सुमधुर गाणी, बहारदार नृत्य आणि मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.

शनिवारी (ता.४) सकाळच्या सत्रात चित्रपट कलाकार रवी काळे, माधवी जुवेकर, दिगंबर नाईक, बालकलाकार मछिंद्र गडकर यांचा थेट संवाद व बंपर लॉटरी निकाल आयोजित केला आहे. दुपारी रेणुका देशकर, प्रल्हाद जाधव, मिलिंद वेदांते यांचा आई-माता-जननी यांची महती सांगणारा संगीतमय व हृदयस्पर्शी कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी गाणी, लावणी आणि लोकनृत्याचा ‘रंग मराठी ढंग मराठी’ कार्यक्रम होणार आहे.

रविवारी (ता.५) सकाळी मॅजिक आणि मिमिक्री शो होणार आहे, तर सांयकाळी पाच वाजता चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर, अश्विनी भावे व चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण होणार आहे. तसेच संदीप पंचवाटकर यांचा ‘जीवन के यादगार लम्हे’ हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाचा वडगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्याताई पोळ यांनी केले आहे. पत्रकार परिषदेस कांचन चिंगळे, डॉ. सचिन पवार, अभिजित गायकवाड, आप्पासाहेब पाटील, आदींसह विजयसिंह यादव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, कल्याणी सखी मंच सदस्या उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जयसिंगपूर-सांगलीच्या प्रेमीयुगुलाचे पलायन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होत असल्याने प्रेमीयुगुलाने सुमारे अडीच महिन्यांपूर्वी पलायन केले. यानंतर मुलाचे अपहरण केल्याचा आरोप करून मुलाचे वडील गुंडांकरवी धमक्या देत असल्याची कैफियत मुलीची आई गीता व वडील पीयूष राजेंद्र शहा यांनी पत्रकारांसमोर मांडली. माझ्या बेपत्ता मुलीचा शोध घेण्याऐवजी पोलिसांनी माझी पत्नी व मेहुणी यांनाच विविध गुन्ह्यांखाली अटक केल्याचे त्यांनी सांगितले.

जयसिंगपूर येथील कापड व्यापारी पीयूष राजेंद्र शहा व गीता शहा यांची मुलगी चैताली (वय २०) ११ नोव्हेंबर २०१६ रोजी पहाटे बेपत्ता झाली. आपण सांगली येथील यश राहुल शहा याच्या घरच्यांकडून लग्नाला विरोध होत असल्याने मी त्याच्यासोबत पळून जात असल्याची चिठ्ठी चैतालीने घरात ठेवली होती. यानंतर पीयूष शहा यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची वर्दी जयसिंगपूर पोलिसांत दिली होती, तर राहुल शहा यांनी मुलगा यश बेपत्ता झाल्याची वर्दी सांगली पोलिसांत दिली. यानंतर पलायन केलेल्या प्रेमीयुगुलाने अज्ञातस्थळी विवाह केला. तसेच विवाहाची छायाचित्रे नातेवाईक व पोलिसांना पाठविली.

माझ्या बेपत्ता मुलीचा शोध घेण्याऐवजी १९ डिसेंबरला रात्री अडीच वाजता सांगली पोलिस माझ्या घरी आले. यावेळी सोबत महिला पोलिस नसतानाही त्यांनी माझी चौकशी केल्याचे गीता शहा यांनी पत्रकारांना सांगितले. चैताली व यश यांना आम्हीच लपवून ठेवल्याचा आरोप होत आहे. पोलिसांकडून एकतर्फी चौकशी सुरू आहे. मुलाच्या कुटुंबीयांकडून गुंडांच्या माध्यमातून आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. १२ जानेवारीला सांगली पोलिसांनी व माझी बहीण सिद्धी विनायक जाधव यांना अटक केली. मात्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे गीता शहा यांनी सांगितले. रात्री-बेरात्री येणाऱ्या गुंडांच्या धमक्यांमुळे आमच्या व मुलीच्या जिवास धोका आहे. त्यामुळे मुलीचा तत्काळ शोध घ्यावा, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली असल्याचेही शहा दाम्पत्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोणत्याही क्षणी पाणीबाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेकडून थकीत असलेल्या १७ कोटी ८४ लाख रुपयांच्या पाणीपट्टीच्या वसुलीसाठी शहराचा पाणीपुरवठा कोणत्याही क्षणी खंडीत होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर पाटबंधारे (उत्तर) विभागाची पाणीपट्टी महापालिकेने भरली नाही. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला यासंदर्भात वारंवार नोटिसा देऊनही पैसे भरले न गेल्याने पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. दरम्यान, आता पाणीपुरवठा विभागाच्या हालचाली सुरू झाल्या असून उपायुक्त, मुख्य लेखापालांशी चर्चा करून पाणीपट्टी भरण्याचे नियोजन सुरू आहे.

दरम्यान पाणीपट्टी आकारणीच्या दरावरुन पाटबंधारे विभाग व महापालिकेत एकवाक्यता नाही. त्यामुळे पाणीपट्टीची थकबाकी वाढली आहे. कोल्हापूर शहराला दररोज १२० एमएलडी पाणीउपसा होतो. शिंगणापूर बंधारा येथून उपसा करुन पाणी शहरभर वितरीत केले जाते. पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टी दर जादा असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. पाटबंधारे विभागाकडून प्रति दहाहजार लिटरला ४ रुपये २० पैस दराने आकारणी केली जाते. महापालिकेकडून प्रति दहाहजार लिटरला ७० पैसे आकारणी करावी असा प्रस्ताव आहे. महापालिकेने थकीत पाणीपट्टी भरावी यासाठी पाटबंधारे विभागाने नोटिसा काढल्या आहेत. डिसेंबर २०१६ आणि जानेवारी २०१७ मध्ये पाटबंधारे विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीतही पाण्याच्या दरावर एकमत झाले नाही.

वीज खंडीत करण्याच्या सूचना

पाटबंधारे खात्याची महापालिकेकडे वार्षिक पाणीपट्टी सुमारे पाच कोटी रुपये होते असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने ऑक्टोबर २०१६ पर्यंतची १६ कोटी ५७ लाख १५ हजार रुपयांहून अधिक पाणीपट्टी भरली नाही. १४ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर जानेवारी २०१६ या कालावधीतील एक कोटी २७ लाख ३६ हजार रुपये मिळून महापालिकेकडे १७ कोटी ८४ लाख ५१ हजार ८९१ इतकी रक्कम थकीत आहे. पाटबंधारे विभागाने महापालिकेला नोटीस पाठवून ३० जानेवारीपर्यंत रक्कम भरण्याची सूचना केली होती. महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने पाटबंधारे विभागाने पाणीपुरवठा बंद करण्याची नोटीस काढली आहे. पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला पाणीपुरवठ्यासाठीचा विद्युत पुरवठ खंडीत करण्याविषयी कळवू असा इशाराही दिला आहे. शहराचे पाणी खंडीत झाले तर पाटबंधारे विभाग व विद्युत वितरण कंपनीस जबाबदार धरु नये असेही त्यांनी महापालिकेला कळविले आहे. महापालिका दरवर्षी पाटबंधारे विभागाकडे दोन कोटी रुपये पाणीपट्टी भरते.

पाटबंधारे विभागाची थकबाकी भरण्याचे नियोजन सुरू आहे. महापालिकेचे उपायुक्त, मुख्य लेखापाल यांच्याशी चर्चा करुन रक्कम भरण्याचा निर्णय होईल. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा होणार आहे. शहराचा पाणीपुरवठा खंडीत होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सुरेश कुलकर्णी, जलअभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजपचे माजी उपाध्यक्ष संजय सीताराम सावंत (वय ५२, रा. सानेगुरूजी वसाहत, पोस्ट कार्यालयाजवळ) यांच्या घरावर बुधवारी (ता. १) रात्री आठच्या सुमारास १० ते १२ जणांनी पूर्ववैमनस्यातून हल्ला केला. दगडफेक करून सावंत यांच्या घरातील साहित्याची मोडतोड करण्यात आली. याच दरम्यान गोळीबार झाला असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, नेमका कोणी गोळीबार केला याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकाराला परिसरातील दोन राजकीय गटांमधील वाद कारणीभूत असल्याची चर्चा सुरू आहे.

संजय सावंत हे भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आहेत. सध्या त्यांची पत्नी संगीता या भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत. सावंत यांचा मुलगा शिवतेज (वय १९) याचा चार दिवसांपूर्वी परिसरातील राधे ग्रुपच्या रणजित इंगवले याच्याशी वाद झाला होता. याच वादातून बुधवारी रात्री १० ते १२ तरुणांनी संजय सावंत याच्या घरावर हल्ला केला. हल्लेखोरांनी या ठिकणी जोरदार दगडफेक करून घराच्या हॉलमधील टीव्ही आणि खुर्च्यांची मोडतोड केली. यावेळी शिवतेज घरात एकटाच होता. हल्लेखोरांकडे लोखंडी रॉड, काठ्या आणि दोन तलवारी होत्या. त्यांनी धक्काबुक्की केल्याची माहिती शिवतेज याने दिली. काही वेळाने पुन्हा चार ते पाच तरुण येऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा हवेत गोळीबार झाला. गोळीबाराच्या आवाजाने तरुणांनी पळ काढल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. हल्लेखोरांमध्ये रणजित इंगवले, सुमित पवार, अक्षय दळवी, सूरज देशमुख हे तरुण होते, असे शिवतेज याने पोलिसांना सांगितले.

या घनटेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबार झाल्याची माहिती काही क्षणात शहरात पसरल्याने सावंत यांच्या घरासमोर बघ्यांची गर्दी झाली होती. परिसरातही तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. वादामागे राधे ग्रुप आणि तुळजाभवानी ग्रुप या दोन गटासह दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील वैमनस्याची पार्श्वभूमीदेखील असल्याचे बोलले जात आहे. रात्री नऊच्या सुमारास पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली, मात्र रात्री उशिरापर्यंत याची नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्यादिवशीही किरणे देवीच्या कमरेपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या दुसऱ्या ​दिवशी बुधवारी मावळतीची सूर्यकिरणे मूर्तीच्या कमरेपर्यंतच पोचली. दरम्यान, मंगळवारच्या तुलनेत आजच्या किरणांची तीव्रता कमी राहिली आणि ती कालच्या तुलनेत अधिक प्रमाणात मूर्तीच्या डावीकडे वळली. गुरूवारी किरणोत्सवाचा शेवटचा दिवस असून अडथळ्यांमुळे किरणे पुन्हा कमरेपर्यंतच पोचतील आणि देवीला मुखस्पर्श होऊन किरणोत्सव सोहळा पूर्ण होईल याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

बुधवारी सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत किरणांनी गरूड मंडपात प्रवेश केला. त्यानंतर दोन मिनिटांनी पितळी उंबरा आणि सहा वाजून सोळा मिनिटांनी किरणांनी चरणस्पर्श केला. त्यानंतर दोन मिनिटे किरणे चरणापासून कमरेपर्यंत स्थिरावली आणि सहा वाजून अठरा मिनिटांनी ती डावीकडे लुप्त झाली. किरणोत्सव समितीने आज विशिष्ट ठिकाणाहून किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांची छायाचित्रेही घेतली. त्यात स्पष्टपणे काही इमारती आडव्या येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, समितीचे उदय गायकवाड, प्रा. डॉ. किशोर हिरासकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिना कांबळे आऊट ऑफ कव्हरेज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत गैर हजर राहिलेल्या काँग्रेसच्या नगरसेविका रीना कांबळे या अद्यापही गायब आहेत. मंगळवारी त्यांचा मोबाइल लागला नाही. यामुळे त्या नेमक्या कुठे आहेत, अज्ञातवासात आहेत की गायब करण्यात आले, याविषयी गौडबंगाल कायम राहिले आहे. दरम्यान, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी नगरसेविका कांबळे या खासदार धनंजय महाडिक यांच्या पंढरपूर येथील कारखान्याच्या गेस्टहाऊसवर असल्याचा आरोप केला. देशमुख यांनी आरोप करुन चोवीस तास उलटण्याआधीच कांबळे यांचा एका गेट हाऊसवरील फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरुन मंगळवारी दिवसभर हा फोटो फिरत होता. मात्र हा फोटो फेक असल्याचे महाडिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, काँग्रेसने कांबळे यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे.

स्थायी समिती सभापतिपदासाठी २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. त्या दिवसापासून नगरसेविका कांबळे या गैरहजर आहेत. कांबळे या भाजप, ताराराणी आघाडीच्या गोटात सामील झाल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादीने केला आहे. स्थायीतील सत्ता मिळवण्यासाठी ताराराणी आघाडीने कांबळे यांना गायब केल्याचा आरोपही काँग्रेसने केला. सोमवारी सभापती निवड झाल्यानंतर काँग्रेसचे गटनेते देशमुख यांनी या प्रकरणी खासदार महाडिक यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर कांबळे यांना ठेवल्याचा आरोप केला. देशमुख यांचा आरोप ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी फेटाळून लावत कांबळे यांना काँग्रेसच्या नेत्यांनी गायब केल्याचा प्रति आरोप केला. यामुळे कांबळे नेमक्या कुठे आहेत याविषयी वेगवेगळे तर्क लढविले जात आहेत.

राजीनाम्याचा इशारा ते गैरहजेरी

फुलेवाडी रिंगरोड प्रभागातून रिना कांबळे या निवडून आल्या आहेत. महापालिकेत त्या पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांच्या विजयात त्यावेळी काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले कार्यकर्ते विजय देसाई यांचा मोठा वाटा आहे. देसाई हे मूळचे आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्ते. जवळपास बारा वर्षे पाटील यांचे कार्यकर्ते म्हणून काम केले. उपनगरात देसाई यांनी लहान सहान कामातून लोकांचा विश्वास संपादन केला. प्रभागात आरक्षण पडल्याने त्यांची निवडणूक लढण्याची संधी हुकली. महापालिका निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या विजयात मोलाचा वाटा असणाऱ्या देसाईंना स्वीकृत नगरसेवक पदाचा नेत्यांनी शब्द दिला होता असे सांगितले जाते. स्वीकृत नगरसेवक निवडीत देसाई यांना डावलण्यात आले. तेथून नाराजी नाट्य सुरु झाले. देसाई यांना स्वीकृतसाठी डावलल्यानंतर नगरसेविका कांबळे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी काँग्रेसच्या मंडळींनी त्यांची समजूत काढली. मात्र देसाई आणि काँग्रेस नेत्यांमधील अंतर वाढत गेले. काँग्रेसच्या मंडळीकडून महापालिकेत डावलण्यात येत असल्याची भावना कांबळे यांच्या नाराजीमध्ये भर घालणारी ठरली. दरम्यानच्या कालावधीत आमदार सतेज पाटील यांच्या गटाची ओळख असणाऱ्या देसाई यांनी आमदार अमल महाडिक यांच्या बाजूला गेले. महाडिक यांच्या उपस्थितीत प्रभागात विकास कामाचे नारळ फुटले. स्थायीच्या निवडणुकीत नगरसेविका कांबळे यांच्या माध्यमातून महाडिक गट व भाजपाने काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न केला. त्यातून कांबळे यांना भाजप, ताराराणी​ आघाडीच्या गोटात सामील करुन घेतले. मात्र काँग्रेसने व्हीप लागू केल्यामुळे पद रद्द होण्याच्या भीतीपोटी कांबळे या निवडणुकीपासून अलिप्त राहिल्या.

रिना कांबळे यांचा गेस्ट हाऊसवरील फोटो खोटा आहे. गरीब कुटुंबांतील नगरसेविकेला बदनाम करण्याचा हा डाव आहे. नगरसेविका कांबळे या दोन दिवसांत सत्य सर्वांसमोर मांडतील. कांबळे यांची तब्बेत ठीक नसल्याचे समजते.

- विजय देसाई ( कार्यकर्ता, फुलेवाडी रिंगरोड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images