Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

काँग्रेस-राष्ट्रवादीत खडाजंगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील कारभारी नगरसेवकांचा कामकाजातील हस्तक्षेप, इतर नगरसेवकांना निर्णय प्रक्रियेत सामावून न घेणे यामुळे गेले काही दिवस सत्ताधाऱ्यांत सुरु असलेला संघर्ष पार्टी मिटींगमध्यफे उफाळला. नगरोत्थान योजना व महापालिका निधीतून २२ कोटी रुपयांची विकास कामे कारभाऱ्यांच्या प्रभागात मंजूर केल्याचा आरोप पार्टी मिटींगमध्ये झाला.

ठराविक नगरसेवकांनी निधी पळवून नेण्याच्या प्रकाराने वैतागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने काँग्रेस पक्षामधील कारभारी नगरसेवकाला याप्रश्नी जाब विचारला. काँग्रेसचे पदा​धिकारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सामावून घेत नाहीत असा आरोपच यावेळी झाला. दोन्ही पक्षातील कारभारी नगरसेवकावर थेट आरोप झाल्यामुळे सभेत तणावपूर्ण वातावरण होते. थेट आरोप झाल्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसचे कारभारी नगरसेवक व राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकात जोरदार वादावादी झाली. शाब्दिक वाद वाढत गेल्याने प्रकरण हमरीतुमरीपर्यंत गेले. पार्टी मिटींगमध्ये अन्य एका सदस्यांनी गेल्या वर्षभरात दोन्ही काँग्रेसच्या व विरोधी पक्षाच्या प्रमुख नगरसेवकांनी स्वतच्या प्रभागात इतरांचा निधी कसा पळविला याचा पाढाच वाचला. निधी वाटपात पक्षपात करणाऱ्या दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नगरसेवकांची नावेच वाचून दाखवली. यामुळे पार्टी मिटींगमधील वाद चांगलाच वाढला. अखेर उपलब्ध २२ कोटी निधीचे समान वाटप करण्याचे ठरले.

स्थायीसाठी जोरदार फिल्डिंग

महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता.१९) होत आहे. या सभेत स्थायी समितीत रिक्त झालेल्या आठ जागेसाठी नव्याने नियुक्ती होणार आहेत. चारही आघाडीतून स्थायीवर वर्णी लागावी याकरिता नगरसेवकांचे प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेसकडे सभापतिपद असल्याने मोठी रस्सीखेच आहे. काँग्रेसकडून डॉ संदीप नेजदार, राहुल माने, प्रताप जाधव, भूपाल शेटे, संजय मोहिते हे सभापतिपदासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून सचिन पाटील, संदीप कवाळ यांना तर भाजप, ताराराणी आघाडीकडून राजू दिंडोर्ले, भाग्यश्री शेटके, ईश्वर परमार, विलास वास्कर, पूजा नाईकनवरे यांच्या नावाची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेरीवाल्यांचे फेरसर्वेक्षण होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासंदर्भात हायकोर्टाच्या आदेशानुसार राज्य सरकारने ९ जानेवारी रोजी नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर हरकती मागविल्या जातील. सर्वेक्षणातून खरे फेरीवाले कोण आहेत हे सामोरे येईल. त्यानंतर वीस सदस्यीय शहर फेरीवाला समितीवर फेरीवाल्यांतून आठ सदस्यांची निवडणूक होणार आहे. दरम्यान, ज्या फेरीवाल्याकडे बायामेट्रिक कार्ड, पावती व अर्ज आहे त्यांच्यावर कारवाई होणार नाही. मात्र, ज्यांच्याकडे या संदर्भातील कसलीही कागदपत्रे नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केले. महापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासंदर्भात बैठक झाली.

बैठकीत फेरीवाले संघटनाच्या प्रतिनिधींनी प्रशासन फेरीवाल्यांवर आकसाने कारवाई करत असल्यावरून टीकेची झोड उठविली. महावीर गार्डन परिसर, पर्ल हॉटेल परिसरातील फेरीवाल्यांना हटविण्याच्या कारवाईचे बैठकीत पडसाद उमटले. सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीचे निमत्रंक आर. के. पोवार यांनी फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरातील दहा हजार लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. प्रशासन कारवाई करताना फेरीवाला समितीला समावून घेत नाही. अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली व्यवसाय उद्धवस्त करण्याचा प्रकार गैर आहे. वाहनधारकांना त्रास होतो म्हणून फेरीवाल्यांना हटविणे हे कितपत योग्य आहे? अशी विचारणा केली.

सुभाष वोरा यांनी ‘पदाधिकारी बदलले, आयुक्त बदलले. पण फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न जैसे थे आहे. फेरीवाले बायामेट्रिक कार्ड काढण्यासाठी कार्यालयात गेल्यावर त्यांना महापालिकेचे अधिकारी तहसिलदार कार्यालयात पाठवितात. प्रशासकीय पातळीवर फेरीवाल्यांच्या धोरणाबाबत गोंधळ आहे. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी मुदत घ्या. संयुक्त बैठक बोलवा’ अशी मागणी केली.

पर्यायी व्यवस्था न करता कारवाई

‘नऊ जानेवारीच्या निर्णयानुसार नव्या योजनेची अंमलबजावणी करताना फेरीवाल्यांना विश्वासात घ्या असे सांगितले आहे. मात्र प्रशासन फेरीवाल्यांचे पुनर्वसन, पर्यायी व्यवस्था न करता कारवाई करते हा प्रकार चुकीचा आहे’ असे माजी महापौर नंदकुमार वळंजू म्हणाले. नगरसेविका सूरमंजिरी लाटकर, माजी नगरसेवक आदिल फरास, कृती समितीचे पदाधिकारी दिलीप पवार, महंमदशरीफ शेख, प्र. द. गणपुले, सुरेश जरग यांनी चर्चेत भाग घेतला. समीर नदाफ यांनी आभार मानले. बैठकीला अशोक भंडारे, रमाकांत उरसाल, रघू कांबळे, राजेंद्र महाडिक, विजय नागावकर, सुमन घोसे, सुरेंद्र शहा, बजरंग शेलार, नजीर देसाई आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सयाजीनं लावलेल्या झाडांची कत्तल करणारा जेरबंद

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

दुष्काळावर मात करण्यासाठी अभिनेता सयाजी शिंदे यांनी लावलेल्या झाडांची बेदरकारपणे कत्तल करणाऱ्या आप्पा मदने या इसमाला अखेर अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला आप्पा मदने पांढरवाडीतलाच रहिवाशी आहे.

माण तालुक्यातील पांढरवाडी येथे सयाजी शिंदे यांनी २५ हजाराहून अधिक झाडे लावली होती. सयाजीनं नवीन वर्षाचं स्वागतच या झाडांना पाणी घालून केलं होतं. सहा महिन्यापासून या झाडांना नियमित पाणी घालून जगवलं जात होतं. ही झाडं वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांसह अख्ख गाव मेहनत करत होतं. पण आप्पा मदने यांनी अचानक या झाडांवर कुऱ्हाड चालविली. त्यानं सुमारे १०० झाडे तोडल्याचं सांगितल्या जातं.

सयाजी शिंदे यांनी लावलेली झाडं आपल्या हद्दीत असल्याचा दावा करतानाच ही झाडे लावताना मला कोणतीही विचारणा करण्यात आली नव्हती, असं आप्पानं म्हटलं आहे. दरम्यान पांढरवाडीतील झाडे तोडणाऱ्याला अटक करण्याच्या मागणीसाठी सयाजी शिंदे आणि मित्र परिवारानं आज मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलनेही केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपूर बसस्थानकावरूनलाखांचे दागिने लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

एसटीमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन सांगलीच्या महिलेकडे असणाऱ्या एक लाख आठ हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. जयसिंगपूर बसस्थानकावर गुरूवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत विद्या लक्ष्मण सटाले (वय ३२, रा. जुना कुपवाड रोड, लक्ष्मीनगर, सांगली) यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद नोंदविली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विद्या सटाले या जयसिंगपूर बसस्थानकावर नांदणी मार्गे इचलकरंजीकडे जाणाऱ्या एसटीमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्याकडील एक तोळ्याची सोन्याची सरमाळ, सोन्याचे गंठण, लक्ष्मीहार असे एक लाख आठ हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. सटाले यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सापडलेले चेकबुक पोलिसाकडून परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पद्मा चौकात रस्त्यात पडलेले तीन चेकबूक लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत अशोक पाथरे यांना सापडले होते. पाथरे यांनी चेकबूकवरील मोबाइल नंबरवरून राहुल चंद्रकांत नरके (वय २४, मूळ रा. नंदगाव, सध्या रा. इचलकरंजी) यांचा शोध घेऊन चेकबूक परत केले. विशेष म्हणजे यात १ लाख ९० हजार रुपयांचा सही केलेला चेकही होता.

राहुल नरके यांचा इचलकरंजी येथे यंत्रमाग व्यवसाय आहे. सोमवारी संध्याकाळी ते कामानिमित्त कोल्हापूर शहरात आले होते. रात्री उशिरा ते इचलकरंजीला परत गेले. दरम्यान, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत पाथरे आणि नामदेव पोरे हे दोघे गस्तीसाठी जाताना त्यांना पद्मा चौकात फेडरल बँकेचे तीन चेकबुक सापडले. यात १ लाख ९० हजार रुपयांचा सही केलेला सेल्फ चेक होता. पाथरे यांनी चेकबुकवरील मोबाइल नंबरवरून नरके यांच्याशी संपर्क साधला. गुरूवारी लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या हस्ते दिलीप नरके यांच्याकडे चेकबुक सोपवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीत २६ जागांसाठी १३७ इच्छुक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

​जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखतींना गुरुवारपासून प्रारंभ केला. सहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २६ जागांसाठी १३७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या असून पंचायत समितीच्या ५२ जागांसाठी १८५ इच्छुकांनी मुलाखत दिली. यामध्ये विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संजीवनी गुरव सुनिता देसाई यांच्यासह युवराज पाटील, जयवंत ​शिंपी, राजेंद्र प्रताप माने, मनोज गणपतराव फराकटे, वसंतराव धुरे, संजय कलिकते, सुर्यकांत रघुनाथ पाटील यांच्यासह काही विद्यमान सदस्यांच्या कुटुंबियांचा समावेश होता.

कागल, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, गडहिंग्लज या सहा तालुक्यातील विविध मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी झाल्या. मुलाखतीसाठी तालुक्यातून मोठया प्रमाणावर इच्छुक व त्यांचे समर्थक आले होते. निरीक्षक दिलीप पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, महिला जिल्हाध्यक्ष संगिता खाडे, ​अनिल साळोखे यांच्यासमोर मुलाखती झाल्या.

तालुकानिहाय व मतदार संघनिहाय इच्छुकांना बोलवण्यात येत होते. या तालुक्यांमध्ये कागलमधील इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यापाठोपाठ राधानगरी व गडहिंग्लजमधील इच्छुकांची संख्या होती.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांपैकी संजीवनी गुरव, सुनिता देसाई या पुन्हा उमेदवारीसाठी मुलाखत देण्यासाठी आल्या होत्या. शुक्रवारी उर्वरित सहा तालुक्यांमधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी सभापतिपदाचीही विभागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. गुरुवारच्या सभेत नवीन आठ सदस्यांची नियुक्ती झाली. महापालिकेतील सत्तारूढ आघाडीतील फॉर्म्युलानुसार स्थायी सभापतिपद काँग्रेसकडे आहे. या पदासाठी प्रबळ दावेदार समजले जाणारे नगरसेवक डॉ. संदीप नेजदार, राहुल माने या दोघांची सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. काँग्रेसकडे वर्षासाठी पद असून हा कालावधी या दोघांत सहा-सहा महिने विभागण्याचा निर्णय झाल्याचे समजते. भाजप, ताराराणी आघाडीने स्थायीची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. संख्याबळानुसार सत्तारूढ गटाचे पारडे जड आहे.

सोळा सदस्यीय स्थायी समितीत काँग्रेस, राष्ट्रवादीचे आठ तर भाजप, ताराराणी आघाडीचे सात सदस्य आहेत. शिवसेनेचा एक सदस्य असून गेल्यावेळी त्यांनी सत्तारूढ दोन्ही काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. स्थायीची निवडणूक होणार असल्याने सदस्यांचे मोल वाढणार आहे.

दरम्यान काँग्रेसकडून वर्षभराच्या कालावधीत नेजदार व माने यांना संधी दिली जाणार आहे. पहिल्यांदा डॉ. नेजदार आणि उर्वरित सहा महिन्यासाठी माने असा फॉर्म्यला ठरला असल्याचे वृत्त आहे.

निवडीचा कार्यक्रम दोन दिवसांत

दोन दिवसांत स्थायीच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल. स्थायीतील रिक्त आठ जागांसाठी गटनेत्यांनी महापौर हसीना फरास यांच्याकडे नावे सादर केली. त्यात काँग्रेसकडून नेजदार व माने, राष्ट्रवादीकडून शिक्षण सभापती अजिंक्य चव्हाण, प्रभाग सभापती अफजल पिरजादे, नगरसेविका मेघा पाटील यांची नियुक्ती झाली. भाजपकडून आशीष ढवळे यांची स्थायी सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. ताराराणीकडून नगरसेविका सुनंदा मोहिते आणि कविता माने यांची नियुक्ती झाली आहे.

...............

महिला बालकल्याण राष्ट्रवादीकडे

महिला व बाल कल्याण समितीवर नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यात काँग्रेसकडून प्रभाग सभापती छाया पोवार, माधुरी लाड, दीपा मगदूम यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून सूरमंजिरी लाटकर, विद्यमान उपसभापती वहिदा सौदागर यांची नियुक्ती झाली. भाजपकडून सविता भालकर, गीता गुरव तर ताराराणीकडून सीमा कदम, अर्चना पागर यांची नियुक्ती झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनी पोवार खून खटल्याचा निकाल २७ जानेवारीला

$
0
0

कोल्हापूर ः पेठवडगाव येथील जगदीश उर्फ सनी प्रकाश पोवार (वय २२) या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत कोठडीतच झालेल्या मृत्यूप्रकरणी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संजीव पाटील यांच्यासह चौघांवर ठपका ठेवण्यात आला होता. या खटल्यातील दोन्ही बाजुंचा युक्तीवाद गुरूवारी (ता. १९) झालेल्या सुनावणीत पूर्ण झाला आहे. अंतिम निकाल शुक्रवारी (ता. २७) अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या कोर्टात होणार आहे.

केएमटी बसवर दगडफेक केल्याप्रकरणी पेठवडगाव पोलिसांनी सनी पोवार याला आंबेडकर चौकातून ताब्यात घेतले होते. सहायक फौजदार बबन शिंदे यांच्यासह अन्य पोलिसांनी त्याला कोठडीत बंद केल्यानंतर त्याच्या पोटात दुखू लागले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर पोलिसांच्या मारहाणीतच सनी पोवार याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संजीव पाटील, सहायक फौजदार बबन शिंदे, पोलिस नईक धनाजी पाटील यांच्यावर झालेल्या या आरोपानंतर संशयितांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज पूर्ण झाले. बचाव पक्षाच्या वतीने अॅड. हर्षद निंबाळकर आणि अशोक राणे यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षामार्फत अॅड. अशोक रणदिवे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळू उपसा लटकला

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

वाळू उपशाची ऑनलाइन लिलाव प्रक्रिया पूर्ण होऊनदेखील पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी राज्यभरातील वाळू उपसा सुरू होऊ शकला नाही. वाळूचा साठा करण्यावर निर्बंध असल्याने वाळूची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे, तर उपलब्ध वाळूच्या वाहतुकीवरही महसूल विभागाची करडी नजर असून, वाळू वाहतूकदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची घाईच सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाळू उपशाची परवानगी लटकण्याची शक्यता असल्याने बांधकाम व्यवसाय थंडावला आहे.

पर्यावरण विभागाकडून तांत्रिक परवानगी न मिळाल्याने गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक वाळू टंचाईची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. याचा परिणाम बांधकाम व्यवसायासह यावर अवलंबून असलेल्या मजुरांवरही झाला आहे. कोट्यवधींची रक्कम गुंतवूनही गेली दोन महिने वाळू उपसा सुरू न झाल्याने ठेकेदार हवालदिल झाले आहेत. कर्ज काढून आणि सोने-दागिने गहाण ठेवून ठेका घेताना भरलेल्या रकमांचे व्याज वाढत आहे. वाळू उपशाची साधने आणि मनुष्यबळही तयार आहे. मात्र सक्शन पंपासाठी आवश्यक असलेली परवानगी पर्यावरण विभागाने अजूनही दिली नसल्याने वाळू उपशाला सुरूवात होऊ शकली नाही. ठेकेदारांना वाळूचा साठा करण्याचीही परवानगी नाही. जे ठेकेदार साठे करतात, त्यांच्यावर महसूल विभागाकडून कारवाई केली जाते. उपशादरम्यान ज्या वाळूची विक्री होत नाही, अशी वाळू बाजूला ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. याशिवाय एकाच वेळी संपूर्ण वाळूची विक्री होणे शक्य नसते. त्यामुळे काही ब्रास वाळू काढून ठेवणे भाग असते. सरकारकडे रितसर कर, रॉयल्टी भरूनही काढलेली वाळू साठवून ठेवण्यावर निर्बंध असल्याने अन्याय होत असल्याची भावना ठेकेदारांकडून व्यक्त केली जाते.

तातडीच्या कामांसाठी उपलब्ध वाळूची वाहतूक करताना महसूल विभागाकडून कारवाई केली जात आहे. दोन ते तीन ब्रास वाळूची वाहतूक करताना वाहन सापडल्यास चोरटी वाहतूक ठरवून वाहनधारकांकडून एकाच वेळी तब्बल ८० हजारांचा दंड वसूल केला जातो. गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यात एक कोटीहून अधिक रक्कम केवळ दंडातून वसूल केली आहे. याशिवाय वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले जात आहे. पुन्हा अवैध वाहतूक केल्यास वाहतूक परवाना रद्द करण्याची धमकीच या कारवाईतून दिली जाते. त्यामुळे वाहनधारकही अस्वस्थ झाले आहेत. वाळू उपसा सुरू नसल्याने वाळूची उपलब्धताच नाही. याच संधीचा गैरफायदा घेऊन काही विक्रेते छुप्या पद्धतीने खराब दर्जाची वाळू मोठ्या दराने विकत आहेत. वाळूच्या टंचाईमुळे मोठ्या बांधकामांवर मर्यादा आल्याने मजुरांवरही काम शोधण्याची वेळ आली आहे. हीच स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास बांधकामांवरील मजूर अन्य ठिकाणी स्थलांतरीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.


सक्शन पंपाची परवानगी कधी?

वाळू उपशासाठी आवश्यक महसूल विभागाचे परवानग्यांचे सोपस्कार पूर्ण झाले आहेत, मात्र पर्यावरण विभागाची परवानगी अजूनही रखडली आहे. सक्शन पंपासाठी तातडीने परवानगी मिळावी यासाठी वाळू उपसा ठेकेदारांनी मंत्रालयातही धाव घेतली. पण, परवानगी मिळाली नाही. स्वतः महसूल विभागानेच पर्यावरण विभागाकडून सक्शन पंपाची परवानगी घेऊनच लिलाव प्रक्रिया का राबवली नाही? असा संतप्त सवाल ठेकेदार विचारत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सोयीप्रमाणे आघाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर ५० जागा लढवणार असून उर्वरित जागांसाठी कार्यकर्त्यांकडून सहमती घेतल्यानंतर काँग्रेस तसेच अन्य पक्षांशी आघाडी करण्यात येणार आहे. त्याबाबत लवकरच चित्र स्पष्ट केले जाईल, असे राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांना सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांनी मात्र दक्षिणमध्ये काँग्रेसविरोधात भाजप तसेच इतर सर्व पक्षांना एकटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. चंदगडमध्येही भाजप सोबत येण्याचे संकेत आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिले. मुश्रीफ यांच्यापेक्षा त्या त्या मतदारसंघातील नेत्यांकडे आता सूत्रे गेली असून त्यातून राष्ट्रवादी विविध पक्षांशी आघाडी करणार हे स्पष्ट झाले.

राष्ट्रवादीच्यावतीने गुरुवारपासून जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती इच्छुकांच्या मुलाखती सुरु झाल्या. त्यावेळी पक्ष कार्यालयात निवडणूक निरीक्षक दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाची दिशा स्पष्ट केली. प्रदेश पातळीवरुन एक दिशा व स्थानिक पातळीवर वेगळीच दिशा दिसत असल्याने त्याबाबत विचारले असता अजून चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

आमदार मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी ५० जागा लढवणार असून त्यातील ४० जागांवर लक्ष केंद्रीत केले जाईल. कार्यकर्ते सहमत असतील तिथेच राष्ट्रवादी आघाडी करेल. काँग्रेससोबतच्या आघाडीबाबतही कार्यकर्त्यांचे मत विचारात घेण्यात येणार आहे. त्यासाठी अजून चर्चा झालेली नाही. स्वबळावर लढवण्यात येणाऱ्या ठिकाणी जिथे एखादा उमेदवार इच्छूक असेल तिथे नाव तातडीने जाहीर केले जाईल.

राष्ट्रवादी भाजपसोबत आघाडीच्या प्रश्नावर मुश्रीफ यांनी मौन राखत खासदार महाडिक यांना उत्तर द्यायला सांगितले. त्यावेळी महाडिक म्हणाले, आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. स्थानिक आघाड्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसविरोधात भाजपसह सारे पक्ष एकत्र करण्याचा प्रयत्न आहे. पण राष्ट्रवादीचे उमेदवार येथे रिंगणात असतील. वरिष्ठ पातळीवरुन परवानगी घेऊनच भाजपबरोबर आघाडीचा निर्णय घेण्यात येणार आहे.

चंदगडमध्येही भाजपसोबत आघाडी करणार का या प्रश्नावर मुश्रीफांनी आमदार कुपेकरांनाच भाजपबरोबर आघाडी करण्याची परवानगी मिळाली का हे सांगा असे म्हणत त्यांच्या हातात माईक दिला. त्यावर कुपेकर म्हणाल्या, ‘मुलाखतीनंतर आघाडीबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे. पक्षाच्या उमेदवारांचा विजय सुकर होण्यासाठी आवश्यकता वाटल्यास तसेच सोईसाठी आघाडी केली जाईल.

जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, महिला जिल्हाध्यक्षा संगिता खाडे, सरचिटणीस अनिल साळोखे, बाबूराव हजारे, प्रताप माने, एस. डी. पाटील आदी उपस्थित होते.

क्षमता असलेलेच उमेदवार

मुलाखती सुरू होण्यापूर्वी निरीक्षक दिलीप पाटील म्हणाले, ‘निवडणुकीत भाजप सत्ता व पैशाचा वापर जोरात करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी आता सत्तेत नाही. पक्षाची आर्थिक ताकद नाही. त्यामुळे ज्या उमेदवारांची क्षमता आहे, त्यांनाच उमेदवारी दिली जाईल.’ निरीक्षकांच्या या भूमिकेमुळे मुलाखतीसाठी उत्साहाने आलेल्या अनेकांच्या इच्छांवर पाणी फिरल्याची चर्चा होती.


कुणाशी आघाडी नाही, एकटाच शेर

राष्ट्रवादी काँग्रेस विविध मतदार संघात वेगवेगळ्या पक्षांबरोबर आघाडी करणार असल्याच्या चर्चेप्रमाणे दक्षिण व चंदगड मतदारसंघाची विचारणा मुश्रीफांकडे केली. त्यानंतर कागलमध्ये कुणाशी आघाडी करणार असे विचारल्यानंतर ‘आमच्या विरोधात सारे एकत्र येत आहेत. अशावेळी आमची कुणाशी आघाडी होण्यापेक्षा एकटाच शेर निवडणूक लढवणार, ’ असे मुश्रीफ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस हजेरीवर कारवाई होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बायोमेट्रिक मशिनमधील दोषामुळे कर्मचाऱ्यांची हजेरी मांडली जात नाही. महिनाभर काम करुनही १५ ते २० दिवसाचे वेतन कपात होत आहे. एचसीएल कंपनीच्य दोषामुळे कर्मचाऱ्यांना फटका बसत असल्याचे नगरसेवक संतोष गायकवाड, उमा इंगळे, सविता भालकर, स्मिता माने यांनी सभेत सांगितले. यावेळी आयुक्तांनी मशिनमध्ये तांत्रिक दोष असतील तर दूर करु, पण बोगस हजेरी मांडणाऱ्यावर कारवाई केली जाईल असे ठणकावून सांगितले. ज्या बायोमेट्रिक मशिनविषयी तक्रारी आहेत, त्या दाखवून द्या. स्वतः तपासणी करतो असे आव्हानही त्यांनी दिले. सभेत पंचगंगा स्मशानभूमीतील अपुऱ्या सुविधावरुन नगरसेवकांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले.

नगरसेवक सत्यजित कदम, सभापती मुरलीधर जाधव यांनी बोगस हजेरीवरुन कारवाई करा, पण मशिनमधील दोषामुळे कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नका असे सुचविले. अजित ठाणेकर यांनी एचसीएल कंपनीचा कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत कंपनीकडून कागदपत्रांची उपलब्धता होत नाही असे सांगितले.

कंपनीची मशिनरी बोगस असल्याची टीका झाली. नगरसेविका अनुराधा खेडकर यांनी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आवश्यक लाकूड व शेणी अपुरे असल्याचे सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून नागरिकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणले.

उपमहापौर अर्जुन माने, किरण शिराळे, प्रवीण केसरकर, राजसिंह शेळके, किरण शिराळे, कमलाकार भोपळे, रुपाराणी निकम, मेहजबीन सुभेदार, अशोक जाधव आदींनी स्मशानभूमीतील गैरसोयी दूर कराव्यात अशा सूचना केल्या. डॉ. विजय पाटील यांनी पुरेसा लाकूड व शेणीचा साठा असून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल असे उत्तर दिले.

तब्बल १५३५ गाळे भाड्याविना

दुकानगाळ्यांना भाडेआकारणीवरुन प्रशासन आततायीपणा करत आहे. भाडेवाढ करुन गोरगरीबांचा व्यवसाय हिसकावून घेण्याचा प्रकार असल्याची टीका नगरसेविका उमा बनछोडे, सूरमंजिरी लाटकर यांनी केली. अन्य नगरसेवकांनी गाळेधारकांना रेडीरेकनरप्रमाणे भाडे आकारणी परवडणार नाही. भाडेवाढीसंदर्भात सुवर्णमध्य काढावा असे सुचविले. आयुक्तांनी नियमानुसार भाडे आकारणी केली जात आहे. महापौर फरास यांनी, आठ दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढू असे सभागृहाला सां​गितल्यानंतर वादावर पडदा पडला. दरम्यान गाळेधारक व महापालिकेतील वाद कोर्टात असल्यामुळे २०१२ पासून १५३५ दुकानगाळ्यांना भाडे आकारणी केली नाही. विनाभाडे गाळे सुरु असल्याचे समोरे आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५८ पुलांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

$
0
0

Satish.Ghatage@timesgroup.com

Tweet : @satishgMT

कोल्हापूर : महाडच्या सवित्री नदीवरील पूल पडल्यानंतर राज्यातील सर्व पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, या घटनेनंतर राज्य सरकारला सहा महिन्यांनी मुहूर्त मिळाला आहे. आता कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ५८ ब्रिटीशकालीन पुलांसह नव्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सुरु झाले आहे.

महाडमधील दुर्घटनेनंतर ब्रिटीशकालीन पुलांच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. राज्यात अनेक ब्रिटीशकालीन पुलावरुन आजही दैनंदिन वाहतूक सुरू आहे. या पुलांचे आयुर्मान संपले असल्याने महाडसारखी घटना पुन्हा घडू नये म्हणून राज्य सरकारने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. पुलांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ४२१ छोटे मोठे पूल आहेत. त्यामध्ये प्रमुख राज्यमार्गावर १५, राज्यमार्गावर २४८ तर प्रमुख जिल्हा मार्गांवर १५८ पूल आहेत. या पुलापैकी ब्रिटीशकालीन तसेच जुन्या-नव्या पुलांचे ऑडिट करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ आणि सांगली जिल्ह्यातील २४ पुलाचे ऑडिट करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्यांना पाठवला. या प्रस्तावाला मंजूरी मिळाली असून बांधकाम विभागाने यासाठी टेंडर काढून कंपन्यांना काम दिले आहे. स्ट्रक्चरल ऑडिटसाठी बांधकाम विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६३ लाख ९३ हजार रुपये तर सांगली जिल्ह्यांसाठी ७८ लाख २० हजार रुपयांची निविदा काढली आहे. निविदेनुसार शास्त्रीय पद्धतीने ऑडिट करणाऱ्या संस्थाना काम देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २३ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट तर ११ पुलांचे अंडरवॉटर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम सुरू आहे. टेंडर मंजूर झालेल्या कंपन्यांच्या युनिट्सनी नॉर्मप्रमाणे काम सुरू केले आहे. ब्रिटीशकालीन, आरसीसी, लोखंडी पुलांबाबतचे निकष वेगवेगळे आहेत असे एका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एक ते दोन महिन्यांत रिपोर्ट सार्वा​जनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ संघाच्या अध्यक्षपदी भरत ओसवाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सराफ व्यापारी संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालक मंडळाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी भरत ओसवाल यांची निवड झाली. एकतर्फी झालेल्या निवडणुकीमध्ये ओसवाल (३७६) यांनी संघाचे माजी अध्यक्ष व नगरसेवक रणज‌ित परमार (१८४) यांचा १९२ मतांनी पराभव केला. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुलदीप गायकवाड (१५०) यांनी सुहास जाधव (१३२) यांचा १८ मतांनी पराभव केला. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाच्या उधळणीत जल्लोष साजरा केला.

सराफ व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या कोल्हापूर जिल्हा सराफ व्यापीर संघाची द्वैवार्षिक अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारी संचलाकपदासाठी शुक्रवारी मतदान झाले. १४ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात होते. सराफ संघाच्या कार्यालयात सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत चुरशीने ८६.८९ टक्के मतदान झाले. निवडणुकीसाठी ६५२ सभासदांपैकी ५६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी मतदान झाल्यानंतर सायंकाळी चार वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या अध्यक्षपदासाठी ओसवाल व परमार रिंगणात होते. मतांचे कौल ओसवाल यांच्या बाजूने देत त्यांना तब्बल १९२ मतांनी विजयी केले. यामुळे तीनवेळा संघाचे अध्यक्षपद भुषवलेल्या परमार यांना पराभव स्वीकारावा लागला. अध्यक्षपदासाठी एकास-एक लढत झाली असली, तरी उपाध्यक्षपदासाठी मात्र पाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते. माजी अध्यक्ष गायकवाड यांचे चिरंजीव कुलदीप गायकवाड यांना सुहास जाधव यांनी निकाराची लढत दिली. गायकवाड यांनी जाधव यांचा केवळ १८ मतांनी पराभव केला.

१२ कार्यकारी संचालकपदासाठी १५ उमेदवार रिंगणात होते. या गटात निलेश ओसवाल यांनी सर्वात युवा संचालक म्हणून संघात प्रवेश केला. तर नरेंद्र बासणा यांना केवळ चार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. शिवाजी पाटील यांना ३४९ तर बासणा यांना ३४५ मते पडली. या गटात मानिक जैन (४३६) सर्वाध‌िक मतांनी विजयी झाले.

निवडणूक अधिकारी म्हणून कांतीलाल ओसवाल, जवाहर गांधी, अशोक झाड, कांतीलाल असलाजी, उमेश जामसांडेकर, हेमंत पावसकर, विजय वशीकर, अशोक ओसवाल यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ मीटरपेक्षा मोठे रस्ते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या भविष्याचा विचार करून विकास नियमावलीची डायनॅमिक पद्धतीने अंमलबजावणी आवश्यक आहे. भविष्यात शहरांचा विचार करता नवीन विकास आराखड्यात नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांना रेखांकनात मान्यता देणे बंद केले असून अधिक रुंदीचे रस्ते गरजेचे आहेत. त्याचे नियोजन महानगरपालिकांनी करावे, असे आवाहन नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी केले.

साइड मार्जिन व एफएसआयमध्ये गुंतून न राहता बांधकाम प्रकल्पाचा सुनियोजित आराखडा व सार्वजनिक सुविधांचे योग्य नियोजन आवश्यक आहे. याकरिता स​मितीची स्थापना केली असल्याची माहितीही करीर यांनी दिली.

कोल्हापूर महापालिका, क्रेडाई आणि आर्किटेक्ट अँड इंजिनीअरिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ड वर्ग महापालिका विकास नियंत्रण नियमावलीसंदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. नगररचना विभागाचे (पुणे) उपसंचालक सुनील मरळे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त र​वींद्र खेबूडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे कार्यशाळा झाला. क्रेडाईचे अध्यक्ष महेश यादव, राज्य उपाध्यक्ष राजीव परीख, आर्किटेक्ट अँड इंजिनीअरींग असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर राऊत यांच्या हस्ते करीर व मरळे यांचा सत्कार झाला. दरम्यान या कार्यशाळेला कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट, इंजिनीअर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी विकास नियंत्रण नियमावलीचे स्लाईड शोद्वारे सादरीकरण केले. पुणे विभागाचे उपसंचालक मरळे यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

आयुक्त पी.शिवशंकर म्हणाले, ‘ विकास नियत्रंक नियमावली योग्यपणे सर्वांना समजणे गरजेचे आहे. जुन्या नियमावलीत बदल झाले असून यामध्ये प्रामुख्याने रस्त्याची रुंदी, पार्किंग, टीडीआर धोरण इन्सेट‌िव्ह देण्याची तरतूद आहे. टीडीआरकरिता पाच वर्षामध्ये वीस, पंधरा, दहा व पाच टक्के अशी वाढ देण्याची तरतूद केलेली आहे. खासगी सहभागातून करावयाचे समावेशक आरक्षण विकास धोरण सर्वांना माहिती व्हावे व त्यातून विकास योजनेची अंमलबजावणी सुलभ व्हावी, यासाठी कामाकाजातील सूसूत्रता ठेवण्यासाठी कार्यशाळा घेतल्याचे सांगितले. निखील अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले. उपायुक्त विजयकुमार खोराटे यांनी आभार मानले. क्रेडाई सांगलीचे अध्यक्ष विकास लागू, सुयज होसमणी, विद्यानंद बेडेकर, चेतन वसा, राजेंद्र सावंत, प्रा. जयंत पाटील आदी उपस्थित होते.

अहवाल पाहून प्राधिकरणचा निर्णय

कोल्हापूरसाठी प्राधिकरण स्थापण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात प्राधिकरणात ४२ गावांचा समावेश आहे. या संदर्भात विचारले असता करीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल पाहून राज्य सरकार पुढील निर्णय घेईल. जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल तपासणार असल्याचे त्यांनी सांगितले.


पर्यावरण समतोल राखण्यासंदर्भात सूचना करू

प्रादे​शिक विकास आराखड्यात उद्यान आणि पर्यावरण समतोल राखण्यासाठी आरक्षित जागा उठविण्याचा घाट घातल्याची तक्रारी आहेत. नागरिकांनी या संदर्भात हरकती घेतल्या आहेत. यावर करीर म्हणाले, प्रादेशिक विकास आराखड्यासंदर्भात सध्या हरकती आणि सूचना देण्याची प्रक्रिया सुरु आहे. पर्यावरण समतोल, उद्यानासाठी आरक्षित जागह ठेवण्यासंदर्भात संबंधित विभागाला तशा सूचना करू.
विकासाला चालना देण्यासाठी नियमावली

ड वर्ग महापालिकेसाठी मंजूर केलेल्या विकास नियंत्रण नियमावली संदर्भात अनेकांच्या शंका आहेत. शंकेचे निरसन झाले नाही तर त्याचा विपरीत परिणाम कामावर होतो. म्हणून त्या शंकांचे निरसन करणे गरजेचे होते. याकरिता कार्यशाळा उपयुक्त माध्यम ठरल्याचे सांगून करीर म्हणाले, विकासाला चालना देण्यासाठी नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे. नवे नियम लागू करताना त्रास होतो, अडचणी उद्भवतात पण त्याचा बाऊ न करता ​विकासाची वाटचाल करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्ह्यांचे प्रमाण घटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर परिक्षेत्रातील गतवर्षीच्या तुलनेत एकूण गुन्ह्यांमध्ये १ हजार ८०८ गुन्ह्यांची घट झाली आहे, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर परिक्षेत्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यांचा आढावा घेऊन त्यांनी माहिती दिली

गतवर्षीच्या तुलनेत खुनाच्या संख्येत २० ने घटली आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात ७५ ने दरोड्याचे ६६ गुन्हे कमी झाले आहेत. जबरी चोरी, घरफोडी चोरी, गर्दी मारामारी, बलात्कार, विनयभंग, दुखापत या गुन्ह्यात घट झाल्याचा दावा त्यांनी केला.

नांगरे-पाटील म्हणाले, ‘कोपर्डी घटनेच्या अनुषंगाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आहे. गोपनीय पद्धतीने रोडरोमिओंना चाप लावला असून १० हजार ६१ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत ६५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चाकण व आळंदी पोलिस ठाण्याने दाखल केलेल्या गुन्ह्यात गुन्हेगारांना सहा महिन्याची शिक्षाही झाली आहे. रोडरोमिओगिरी करणाऱ्या ६६३१ युवकांचे समुपदेशन करण्यात आले आहे.

गुंडगिरीवरही चांगलाच चाप लावला असून मोका अंतर्गत २६ कारवाया करून १९६ आरोपीविरुद्ध कारवाई केली आहे. त्यामध्ये कोल्हापूरातील स्वप्निल तहसीलदारची एसटी गँग, अमोल अशोक माळी, राजवर्धन पाटील, सांगलीतील महमद नदाफ (एमडी), प्रशांत पवार, विजय शिंदे, मधुकर वाघमोडे, साताऱ्यातील योगेश अहिवळे, रॉयल सिक्वेरा गँग, पुणे ग्रामीणमधील मंगेश देशमुख, निलेश कुरळप, पप्पू राजापुरे, समीर कच्छी, जब्बार पठाण, यासिन शेख या गँगचा समावेश आहे. पुणे ग्रामीणमधील तळेगाव दाभाडे येथील सराईत गुन्हेगार शाम दाभाडे हा पोलिस चकमकीत मारला गेला. तसेच फरारी असलेले १५२ आरोपी व ४१३ आरोपींना पकडण्यात आले आहेत. पोलिसांनी यावेळी १२५ बंदुका जप्त केल्या आहेत. त्यामध्ये ५१ रिव्हॉल्व्हर, १० गावठी कट्टा, १० बंदूकासह पाच काडतुसांचा समावेश आहे. यावर्षी २३७३ अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच परिक्षेत्रातील १००८ ग्रामपंचायतीच्या मदतीने अवैध धंदे बंद केले आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ट्रॅफिक प्लॅन तयार करण्यात आला असून महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी पोलिस ठाण्यांकडून ६३ हायवे बीट तयार करण्यात येणार आहेत. दोषी वाहनचालकांकडून चार कोटी ३० लाख, ९१ हजार ५३५ रुपये दंड वसूल केला आहे.’ पत्रकार परिषदेला कोल्हापूर पोलिस अ​धीक्षक महादेव तांबडे, सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, सांगली पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, सातारा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पुणे ग्रामीण अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

पोलिस कल्याण कार्यक्रम

पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात पोलिस उद्यान, पुणे ग्रामीण मुख्यालयात सीबीएसई स्कूल, रोजगार उपलब्ध करण्यासाठी जॉब प्लेसमेंट सेंटर उभे करण्यात येणार आहे. तसेच पोलिस क्रीडा स्पर्धेत व अन्य क्रीडा प्रकारात यश मिळवलेल्या १३० खेळाडूंना दोन लाख ६२ हजार, ५०० रुपयांची बक्षिसे देण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकेरी पालकत्वही होतेय खंबीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आयुष्याचा जोडीदार कधी अपघातामुळे तर कधी घटस्फोटामुळे आयुष्यातून वजा होतो आणि त्यानंतर मुलांचा सांभाळ करण्याची वेळ एकट्या आई किंवा बाबांवर येते. घटस्फोटाने विभक्त झालेल्या पालकांची अज्ञान मुले बहुतांशी आईकडेच राहतात तर आईचे छत्र हरपलेल्या मुलांचे संगोपन करण्याची वेळ बाबांवर येते.

दुसऱ्या विवाहाचा विचार जितका पुरूषांच्या बाबतीत आजही सर्वमान्य आहे, तितका तुलनेने तो महिलांच्या बाबतीत होत नाही. तसा विचार झालाच तर अनेकदा महिलांकडून नकार दिला जातो. मात्र, आयुष्याच्या जोडीदाराची सोबत कोणत्याही कारणाने अर्ध्यावरती सुटली तर एकेरी पालकत्वाची जबाबदारी मात्र पेलावी लागते. कोल्हापुरात अशाप्रकारे एकेरी पालकत्व खंबीर असल्याचे दिसून येत आहे.

राजेंद्रनगर येथील दीपा कोटीभास्कर, फुलेवाडी येथील मनीषा सूपकर, लाइनबाजार येथील सुजाता भोसले यांची उदाहरणे एकेरी पालकत्व निभावण्यात कितीही अडचणी आल्या तरी त्याला धैर्याने सामोरे जाण्याचा अनुभव म्हणून सांगता येतील. शुक्रवार पेठेतील संजय खोपडे, शाहूपुरीतील भास्कर जोशी, शिवाजी पेठेतील दिगंबर सासने, देवकर पाणंद येथील सुनील मिरजे, दुधाळी येथील परशुराम निकम यांनीही आपल्या मुलांना एकेरी पालकत्वाची प्रत्येक जबाबदारी पेलत मोठं केलं आहे.

मनीषा सूपकर सांगतात, ‘मुलगी अडीच वर्षाची होती, तेव्हा पतींना वीजेचा धक्का लागला आणि त्यांचे निधन झाले. त्यावेळी मी २५ वर्षाची होते आणि शिक्षण फक्त बीएच्या पहिल्या वर्षापर्यंत झाले होते. सासरची परिस्थिती जेमतेमच होती. नोकरी करायची म्हटली तर पदवी नाही आणि बारावीच्या गुणपत्रिकेवर चांगली नोकरी मिळणे अवघड होते. त्यावेळी तीन वर्षाच्या मुलीला दिवसभर घरी सोडून हॉटेलमध्ये मदतनीस म्हणून काम स्वीकारले. दोन वर्षे ते काम करून नंतर फुलेवाडी परिसरात वडापाव विकायला सुरूवात केली. मिसळ, पोहे, उपीट अशी नाष्टा विक्री सुरू केली. मुलीला शिकवले. या प्रवासात खूप अडथळे आले. तशाच माझे पती एकुलते एक असल्यामुळे सासू, सासऱ्यांची जबाबदारी होतीच. त्यामुळे दुसऱ्या विवाहाचा तर विचार करणे शक्यच नव्हते. आज मुलगी २५ वर्षाची झाली आहे. पतीचा आधार नाही, सासू-सासरे वृद्ध, घरात तरुण मुलगी... अशा अनेक अडथळ्यांचे डोंगर पार करताना प्रसंगी मी वडीलही झाले.’

संजय खोपडे यांचा मुलगा तर सात दिवसांचा होता, जेव्हा त्यांच्या पत्नी बाळंतपणातच जग सोडून गेल्या. आईच्या दुधालाही पारखा झालेला मुलगा आणि सोबत अख्खं आयुष्य संजय यांच्यासमोर आव्हान म्हणून उभं होतं. ते सांगतात, ‘पत्नीच्या निधनाला एक महिना झाला असतानाच, माझ्यावर दुसरा विवाह करण्याचा दबाव नातेवाईंकामधून आला. पण त्यावेळी माझे कुटूंबिय माझ्या मताशी सहमत राहिले आणि मुलाला मी एकट्याने वाढवण्याच्या माझ्या ​निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला. हा प्रवास खूप अवघड होता. कारण, ज्या वयात त्याला आईची गरज होती, तेव्हा ती त्याच्याजवळ नव्हती. आईची उणीव न भासू देण्यासाठी मी आईपण जगलो. आज माझा मुलगा ३३ वर्षाचा आहे आणि त्याच्या संगोपनात मी कमी पडलो नाही याचे समाधान आहे.’


एकेरी पालकत्वामध्ये नि​श्चितच आई-वडिलांची भूमिका एकालाच वठवावी लागते. एकटी आई सांभाळ करणार असेल तर समाजाची, कुटुंबाची साथ मिळणे आवश्यक असते. अनेकदा आर्थिक अडचणी येतात, त्यावर मात करण्याचे आव्हान आईपुढे असते. तर वडील एकेरी पालकत्व निभावत असतील तर मुलांच्या आयुष्यातील आईचे स्थान जागृत ठेवण्याची वेगळी जबाबदारी वडिलांवर येते. आज समाजात एकेरी पालकत्व मोठ्या संख्येने दिसत आहे. नोकरदार महिला शक्यतो दुसरा विवाह करण्यापेक्षा एकेरी पालकत्वाला पसंती देतात. कारण त्यांच्यामध्ये आर्थिक सक्षमता असते. मात्र, पूर्णवेळ गृहिणी असलेल्या महिलांना एकेरी पालकत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना कुटुंबाची साथ महत्त्वाची ठरते.

- डॉ. माधवी पाटील, समुपदेशक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांनी व्यापला रस्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात ठिकठिकाणच्या रस्त्यावर असलेली अतिक्रमणे महापालिका काढत असली तरी जवाहरनगरमधील नऊ मीटर रुंदी असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमणे महापालिकेला दोन वर्षापासून हटवता आलेली नाहीत. अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांनी सातत्याने प्रयत्न करुनही या प्रकरणाकडे लक्ष दिले जात नाही. विकास आराखड्यातील नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यानुसार परिसरात महापालिकेनेच बांधकाम मंजुरी दिली असल्याने अतिक्रमणे हटवून तो रस्ता नऊ मीटर करण्याची जबाबदारी महापालिकेवरच आली आहे.

सुभाषनगर पोलिस चौकीपासून रेड्याच्या टकरीच्या परिसरात जाणाऱ्या रस्त्यालगत हा रस्ता आहे. या रस्त्यावरुन जवाहरनगर चौकाकडे जाता येते. शेंडा पार्ककडून जवाहरनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या समांतर हा रस्ता असल्याने या परिसरातील नागरिकांच्या सोईचा रस्ता आहे. लिडकॉमच्या प्लॉटशेजारुन जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीलाच अतिक्रमणे असल्याची तक्रार या परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहेत. जवळपास तेरा झोपड्यांचे अतिक्रमण असून त्यामुळे नऊ मीटरपैकी जवळपास सहा मीटरचा रस्ता व्यापल्याची तक्रार आहे. या अतिक्रमणांमधून बाहेर पडणारे सांडपाणी रस्त्यावर येते. नऊ मीटर रस्त्याची रुंदी दाखवणारे वीजेचे खांब आहेत. या अतिक्रमणाच्या पिछाडीस हे खांब आहेत. हा रस्ता असल्यानेच महापालिकेने त्याची विकास आराखड्यातील रुंदी पाहूनच अपार्टमेंटला परवानगी दिली आहे. पण प्रत्यक्षात ही रुंदी अवघी तीन मीटरची राहिल्याने एक चारचाकीही नीट जाऊ शकत नाही. या रस्त्यावरुन दुचाकी चालवणेही अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे.

याबाबत जवाहरनगरमधील फोटॉन अपार्टमेंटमधील रहिवाशांनी दोन वर्षापासून पाठपुरावा सुरु केला आहे. जवळपास तेरा अतिक्रमणे आहेत. त्यांना हटवण्यासाठी आयुक्तांकडे पत्र, निवेदने देण्यात आली आहेत. त्यानंतरही या अतिक्रमणांमध्ये बांधकाम सुरु आहे. पण महापालिकेकडून त्याबाबत कोणतेही पाऊल उचलले गेलेले नसल्याची तक्रार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिराजवळ सापडली व‌ीरगळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाई मंदिराच्या परिसरातील जोतिबा रोडवर शुक्रवारी खोदकाम करताना सायंकाळी चार फुट उंचीचे व‌ीरगळ आणि दीड फुट उंचीचे नर्तकीची दुभंगलेले शिल्प शुक्रवारी सापडले. विरगळ सुमारे ११ ते १२ व्या शतकातील असल्याचे सांगण्यात आले असून हे शिल्प काळ्या पाषाणात कोरले आहेत. शनिवारी हे वीरगळ आणि शिल्प टाऊन हॉलमध्ये हलविण्यात येणार असल्याच‌ी माहिती प्रभारी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी दिली.

श्री अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या जोतिबा मंदिरालगत गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेच्यावतीने चॅनेलचे काम सुरू आहे. या कामासाठी गेल्या तीन दिवसांपासून हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. हे काम करत असताना ड्रेनेजची पाइपलाइन आडवी आल्यांने खोदकाम सुरू होते. कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर संतोष चव्हाण यांच्यासह कर्मचारी जेसीबीने खोदाई करत असताना सायंकाळी ४ वाजता प्रथम त्यांना दीड फुट उंचीची नर्तकीचे दुभंगलेले शिल्प सापडले. त्यानंतर सुमारे चार फुटांचा मोठा व जड दगड लागला. कर्मचाऱ्यांनी त्याची पाहणी केल्यानंतर जुने कोरीव काम असल्याचे आढळून आले. जेबीसीच्या सहाय्याने हे शिल्प जमिनीतून बाहेर काढल्यानंतर या शिल्पावर पहिल्या टप्प्यात घोड्यावर बसून युद्ध करणारा वीर असून मधल्या टप्प्यात शहीद वीराला देवलोकात घेऊन जाणाऱ्या अप्सरा दाखवल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात शंकराची पूजा करून वीर कैलासात सालोक्य पावला, असे चित्र कोरण्यात आले आहे, अशी माहिती प्रसन्न मालेकर यांनी दिली. हे शिल्प पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. सध्या हे शिल्प जोतिबा मंदिरजवळ ठेवण्यात आले असून शनिवारी हे टाऊन हॉलमध्ये हलविण्यात येणार आहे.

वीरगळ काय आहे?

११-१२ व्या शतकात युद्धात वीरमरण आलेल्या असंख्य अनाम वीरांच्या नावे घडवलेले असे शेकडो व‌िरगळ कोल्हापुरात सापडतात. व‌ीरगळ म्हणजे युद्धात धारातीर्थी पडलेल्या व‌ीराचे स्मृतीशिल्प आहे. कसबा बीड येथे नदीपात्रात असे वीरगळ घडवण्याचा कारखानाच होता. वीरगळीमध्ये हा वीराचा आणि सतीचा असे दोन प्रकारचे असतात. सापडलेला वीरगळ हा वीराचा असून त्याचे टप्पे खालून वर मोजतात. कोल्हापूरातील टाऊन हॉल, पंचगंगा नदी तसेच अनेक ठिकाणी या विरगळ पहावयास मिळतात, अशी माहिती मूर्ती अभ्यासक मालेकर यांनी दिली.


वीरगळीवर अभिषेक

वीरगळ सापडल्याची माहिती मिळताच अनेक अतिउत्साही नागरिकांनी त्यावर दुधाचा अभिषेक केला. तसेच घोषणाबाजी केली. अनेकदा अशा प्राचीन ‌शिल्पांवर अभिषेक केल्याने त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया होऊन त्यावर परिणाम होतो असे पुढे येऊनही अतिउत्साही‌ नागरिकांनी अभिषेक केल्याने अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम परवाने मार्चपासून ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बांधकाम परवानगी अधिक सुटसुटीत व स्पष्ट करण्यासाठी नगरविकास विभागाने पावले टाकली आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून बांधकाम परवाने ऑनलाइन देण्याचा प्रस्ताव असून कोल्हापुरात मार्च महिन्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल. कोल्हापूर महापालिकेतील हा पायलट प्रोजेक्ट आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर महापालिकांतही अशी सुविधा कार्यान्वित होईल’ असे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी कोल्हापुरात स्पष्ट केले.

‘ड’वर्ग महानगरपालिका मंजूर विकास नियंत्रण नियमावलीसंदर्भात शुक्रवारी कोल्हापुरात आयोजित कार्यशाळेत त्यांनी ऑनलाइन बांधकाम परवान्याची रुपरेषा स्पष्ट करत नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांना दिलासा दिला. ते म्हणाले, ‘बांधकाम परवाना हा सध्या अतिशय किचकट प्रक्रिया बनली आहे. अधिकाऱ्यांचा बहुतांश वेळ हा एफएसआय प्रक्रिया, त्या संदर्भातील कागदपत्रांची छाननीत वाया जात आहे. बांधकामांच्या प्रत्यक्ष परवानगीत प्रक्रियेत अधिक वेळ खर्ची पडत आहे. प्रत्यक्ष परवानगी प्रक्रियेत वेळ जाऊ नये यासाठी नियोजन सुरू असून पुढील सहा महिन्यात आवश्यक यंत्रणा उभी केली जाईल. बांधकाम परवान्यांसह इतर सर्व परवानेही ऑनलाइन असावीत असा सरकारचा विचार आहे. याकरिता ऑनलाइन सर्व्हिस बेस सिस्टीम कार्यान्वित केली जाईल. सरकारला सॉफ्टवेअरसाठी खर्च येत नाही. त्यासाठी आवश्यक इनपुट पुरविणार आहे. सध्या राज्यातील तीन नगरपालिकेत ऑनलाइन परवाना प्रक्रिया सुरू आहे. अ, ब व क वर्गातील नगरपालिकांचे ऑनलाईन बांधकाम परवानगी देणेचे सॉफटवेअर पूर्ण झाले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून सर्व नगरपालिकेत ऑनलाइन बांधकाम परवाना प्र​क्रियेला सुरुवात होईल.

पायलट प्रोजेक्टच्या यशस्वीतेनंतर...

महापालिकेतही बांधकाम परवाने ऑनलाइन उपलब्ध करण्यात येणार आहे. ड वर्ग महानगरपालिकेसाठी नगरपालिकेसाठी तयार केलेल्या त्या सॉफटवेअरमध्ये आवश्यक तो बदल करुन वापर केला जाईल. कोल्हापूर महानगरपालिकेत प्रायोगिक तत्वावर (पायलट प्रोजेक्ट) मार्चमध्ये त्याचा वापर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोल्हापूर महापालिकेत तशी तयारी सुरु आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी चर्चा झाली आहे कोल्हापुरात पायलट प्रोजेक्टच्या यशस्वीतेनंतर अन्य ठिकाणी त्याची अंमलबजावणी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दक्षिण’मध्ये काँग्रेससोबत आघाडी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘समविचारी पक्षांशी आघाडी करण्याच्या राष्ट्रवादीच्या धोरणाप्रमाणे ‘दक्षिण’ मध्ये काँग्रेसशी आघाडी करणार आहे. तेथील राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहे. खासदार धनंजय महाडिकांनी कोणाची परवानगी घेतली हे मला माहिती नाही’, असे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ असे सांगत खासदार महाडिक यांनी गुरुवारी केलेल्या घोषणेला छेद दिला. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी आलेले निरीक्षक दिलीप पाटील यांनीही, ‘खासदारांनी पक्षाकडून अथवा नेत्यांकडून परवानगी आणल्याचे आम्हाला माहिती नाही. त्याबाबत चर्चाही केलेली नाही, असे सांगितल्याने खासदार आणि पक्षाच्या स्थानिक नेतृत्वातील दरी स्पष्ट झाली.

गुरुवारी इच्छुकांच्या मुलाखतीवेळी खासदार धनंजय महाडिक यांनी मुश्रीफ यांच्या उपस्थितीतच ‘दक्षिण’ मतदारसंघात काँग्रेसविरोधात सर्व पक्षांची आघाडी करणार असल्याचे आणि त्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकार मिळाल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेमध्ये खासदार महाडिक यांचे विधान खोडून काढले. आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘कार्यकर्त्यांचा गोंधळ उडू नये म्हणून मी पक्षाची भूमिका मांडत आहे. इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रीया पूर्ण झाल्यावर करवीर, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ तसेच ‘दक्षिण’मध्येही समविचारी पक्षांशी आघाडी करावी लागणार आहे. समविचारी पक्षांत काँग्रेससह शेकाप, जनता दल यांचा समावेश आहे. आघाडी कशा पद्धतीने करायची हे नेते ठरतील. हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील निर्णय अनुक्रमे धैर्यशील माने व राजेंद्र पाटील-यड्रावकर घेतील. खासदार महाडिक यांनी काल अचानक ‘दक्षिण’मध्ये काँग्रेसविरोधात आघाडी करणार असल्याचे सांगितले. त्यांनी कोणाची परवानगी घेतली हे आम्हाला माहीत नाही. समविचारी पक्षांशी आघाडी करावी, असे पक्षाचे धोरण आहे. त्याप्रमाणे ‘दक्षिण’मध्ये काँग्रेसशी आघाडी केली जाईल. या आघाडीतील राष्ट्रवादींच्या उमेदवारांचा प्रचाराला मी जाणार आहे.’

याबाबत निरीक्षक दिलीप पाटील यांनीही, खासदारांनी आमच्याशी चर्चा केलेली नाही असे सांगितले. पाटील म्हणाले, ‘समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचे राष्ट्रवादीचे धोरण आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसविरोधात लढण्याची परवानगी कोणाची आणली हे माहिती नाही. कदा​चित दक्षिण मतदारसंघासाठी त्यांनी ‘स्पेशल’ परवानगी आणली असेल.’

धैर्यशील माने यांचा
भाजप प्रवेश नाही

हातकणंगलेमधील धैर्यशील माने भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. दोन दिवसांपासून हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे, असे समजत होते. त्याबाबत माने म्हणाले, ‘मध्यंतरी पक्षनेतृत्वावर जाहीर नाराजी व्यक्त केल्याने अशी चर्चा झाली असेल. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे भाजप प्रवेश वगैरे नाही. मात्र आवाडे यांच्याविरोधात स्थानिक पातळीवर स्वतंत्र आघाडी करणार आहे. त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडून इतरांशी चर्चा सुरू आहे. लवकरच अंतिम निर्णय होईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images