Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

निपाणीत शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर बलात्कार

$
0
0

निपाणी : आपल्या घरी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनीच्या असहायतेचा फायदा घेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी निपाणीत शिक्षकाला त्याच्या पत्नीसह अटक करण्यात आली. अन्वरहुसेन हजरतअली नदाफ (वय ३२) आणि त्याची पत्नी रुखसाना (वय २८, दोघे सध्या रा. अष्टविनायकनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

नदाफ दाम्पत्य मूळचे नरगुंद (ता. गोकाक) येथील आहे. अन्वरहुसेन सध्या निपाणी शहराबाहेरील रामपूर रस्त्यावरील इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेत शिक्षक आहे. पीडित मुलगी मुडलगीजवळील ढवळेश्वर गावातील आहे. तिच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे तिची आई माहेरी राहाते. आपल्या वडिलांच्या ओळखीने आईने पीडित मुलीला अन्वरहुसेनच्या घरी सहा महिन्यांपासून ठेवले होते. त्या पोटी पीडितेची आई त्याला वार्षिक ३० हजार रुपये देणार होती. नदाफ दाम्पत्य या मुलीकडून घरकाम करवून घेत होते. तसेच, अन्वरहुसनने आपल्यावर अनेकदा बलात्कार केला. त्यासाठी त्याने पत्नीवरही दबाव आणला, असे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे.

चार दिवसांपूर्वी पीडित मुलगी या अत्याचाराला कंटाळून आजोबाच्या गावी गेली. आई व आजोबांनी पुन्हा शिक्षणासाठी संबंधित शिक्षणसंस्थेच्या चालकांच्या घरी मुलीला आणून सोडले. एक दिवस तेथे थांबून मुलीने नदाफने केलेल्या अत्याचाराची माहिती संस्थाचालकांना दिली. त्यानंतर बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. नदाफ दाम्पत्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भिलवडी सुन्न

$
0
0

सांगली : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ भिलवडी (ता. पलूस) पंचक्रोशीत शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामस्थांनी मोर्चा काढून भावना व्यक्त केल्या तसेच सायंकाळी महिलांनी कँडल मार्चही काढण्यात आला. या अमानवी घटनेमुळे भिलवडी शनिवारी सुन्न होती.

या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या चारही संशयितांच्या चौकशीत पोलिसांच्या हाती अजून तरी काही लागलेले नाही. तपासासाठी पोलिसांची पाच पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे भिलवडीत तळ ठोकून आहेत. शनिवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनीही भिलवडीत येऊन पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली.

या घटनेनंतर शनिवारी अनेक सामाजिक, राजकीय संघटनांचे कार्यकर्ते भिलवडीत पोहोचले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, माजी मंत्री आमदार पतंगराव कदम, राष्ट्रवादीच्या युवा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील, शिवसेनेच्या सुनीता मोरे आदींनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली. शुक्रवारी रात्री तणावपूर्ण वातावरणात भिलवडीतील कृष्णानदीकाठी पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्मशानशांतता असलेल्या भिलवडीत सकाळी साडेनऊच्या सुमारास मोठी निषेध फेरी काढण्यात आली. पाच युवतींनी पलूसचे तहसीलदार आणि पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुन्हेगारांचा शोध त्वरित घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. भिलवडीसह माळवाडी, धनगाव, अंकलखोप, औदुंबर आदी गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. सायंकाळी पुन्हा महिला आणि युवतींनी उत्स्फूर्तपणे कँडल मार्च काढून शाळकरी मुलीवर अत्याचाराचा निषेध केला.

नवीन कपडे घालण्यावरून वाद

पीडित मुलगी आणि तिची आई यांच्यामध्ये नवीन कपडे घातल्याच्या कारणावरून गुरुवारी रात्री वाद झाल्याची माहिती शनिवारी समोर आली. काही दिवसांपूर्वी पीडितेची छेड काढल्याच्या कारणावरून तिच्या चुलत भावाने काही जणांना जाब विचारला होता. एकतर्फी प्रेमप्रकरणाचा काही पदर या प्रकरणाला असावा, अशी चर्चा गावात होती.

या प्रकरणाचा तपास स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक शिंदे करीत आहेत. अफवावंर विश्वास न ठेवता जनतेने पोलिसांना सहकार्य करावे.

विश्वास नांगरे-पाटील

विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

----------

या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली असून, त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. या खटल्याचा तपास जलद गतीने व्हावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

सदाभाऊ खोत

कृषी राज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

Tweet : @gurubalmaliMT

कोल्हापूर: प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव खर्चिक आहे. यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने देशातील प्रमुख ६५० टपाल कार्यालयांची मदत घेण्यात येणार आहे. पासपोर्ट प्रत्येक जिल्ह्यातच आणि तेही तातडीने मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी टपाल कार्यालयांना लागणाऱ्या सुविधा तातडीने पुरवण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेला उपक्रम यशस्वी झाल्यानंतर सहा महिन्यात देशभर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

अलिकडे परदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शिक्षण, नोकरी याबरोबरच पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने पासपोर्ट काढण्यासाठी सततच गर्दी असते. पण देशात पासपोर्ट कार्यालयांची संख्या फार कमी असल्याने लोकांची मोठी गैरसोय होते. पासपोर्ट काढण्यासाठी तीनशे ते चारशे किलोमीटर लांब जावे लागते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पासपोर्ट काढणे सहज शक्य व्हावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला. पण हे फार खर्चिक आहे. प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय, कर्मचारी, सुविधा देण्यासाठी मोठा खर्च येणार असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी टपाल कार्यालयांची मदत घेण्याचे ठरले आहे.

देशात ६५० प्रमुख टपाल कार्यालये आहेत, या कार्यालयात पासपोर्टासाठी येणाऱ्या अर्जांची स्वीकारणे, छाननी, कागदपत्रांची पडताळणी या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. देशातील काही राज्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबादचा समावेश आहे. या कार्यालयात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर देशातील सर्व प्रमुख टपाल कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पासपोर्ट काढताना सुरक्षिता अतिशय महत्त्वाची आहे, यामुळे टपाल कार्यालयांना सुविधा देताना अधिक काळजी घेण्यात येणार आहे. कमी खर्चात ही सुविधा टपाल कार्यालयात उपलब्ध करून देणे शक्य आहे, यामुळे टपाल कार्यालयावरील जबाबदारी वाढवण्यात येणार आहे.

कोल्हापूरसाठी मुळेंचा प्रयत्न

कोल्हापूरात पासपोर्ट कार्यालय होणे आवश्यक आहे. त्यासाठी येथील टपाल कार्यालयाच्या अधिकाऱ्यां​शी आपण चर्चा करणार असल्याचे सांगून मुळे म्हणाले, कोल्हापुरात लवकरात लवकर हे कार्यालय सुरू होण्यासाठी लक्ष घालणार आहे. कोल्हापुरातच प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबवता येतो का याची देखील चाचपणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या सुविधा पुरवणे आवश्यक आहे, त्या तातडीने पुरवण्याची सुचना करण्यात येणार आहेत.

देशात पासपोर्ट कार्यालयांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवीन कार्यालये सुरू करणे खर्चिक असल्याने देशातील प्रमुख टपाल कार्यालयात ही सुविधा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी ते सुरू करण्यात आले असून येत्या सहा महिन्यात बहूतांशी टपाल कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे - ज्ञानेश्वर मुळे, सचिव, परराष्ट्र मंत्रालय भारत सरकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर पोलिसांना हेल्मेट सक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘पुण्याप्रमाणे कोल्हापुरात पोलिसांना हेल्मेट सक्ती करण्याचा विचार सुरू आहे’, अशी माहिती नूतन पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. तांबडे यांनी बदली झालेले पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याकडून शनिवारी पदभार स्वीकारला. ‘कोल्हापूर जिल्ह्यात गुन्ह्याचा आलेख कमी असला तरी ज्या गुन्हांचा तपास लागलेला नाही त्यावर भर दिला जाईल,’ असे तांबडे यांनी सांगितले.

पोलिस अधीक्षक महादेव तांबडे म्हणले, ‘कायद्याने प्रत्येक वाहनधारकाने हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रत्येक वाहनधारकाने हेल्मेट घातलेच पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहातही वाहतूक सुरक्षेत हेल्मेट वापरण्याबाबत वाहनधारकांचे प्रबोधन केले जाणार आहे.’ यावेळी पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांची नोंद सेवापुस्तकात (​सर्व्हिस रेकॉर्ड) केली जाईल असे आदेश दिले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही पोलिसांना हेल्मेटसक्ती करणार का? असा प्रश्न केला असता, ‘हेल्मेट प्रत्येक वाहनधारकाला आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांनाही वेगळा न्याय देता येणार नाही. कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट वापरलेच पाहिजे. हेल्मेटची सक्ती करण्याचा प्रयत्न असेल,’ असे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या गुन्ह्यांविषयी पोलिस अधीक्षक तांबडे म्हणाले, ‘जिल्ह्यात पाच खुनांच्या घटनेचा अद्याप छडा लागलेला नाही. त्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. पोलिसांना आठ तास ड्यूटी असावी अशी मागणी आहे. त्याबाबत राज्य सरकार जे आदेश देईल ते पाहून आणि अन्य शहरांमध्ये त्याचे नियोजन कोणत्या पद्धतीने केले जात आहे, याची माहिती घेऊन कार्यवाही करू. पोलिस उपायुक्त प्रदीप देशपांडे यांनी कामाची जी चौकट आखून दिली आहे, त्याच मार्गाने पुढे पोलिस दलाचे काम राहील. यापूर्वी सुरू झालेल्या योजना तशाच सुरू राहतील. यावेळी पुणे पोलिस उपायुक्त प्रदीप देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, दिनेश बारी, गृह पोलिस उपाधीक्षक सतीश माने यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ जानेवारीपासून पर्यटन महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा प्रशासनाकडून नियोजित असलेला कोल्हापूर पर्यटन महोत्सव जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कोल्हापूर हॉटेल मालक संघाकडून आयोजित करण्यात येत आहे. १५ दिवसांचा हा महोत्सव येत्या १५ जानेवारीपासून सुरू होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने चार पॅकेज जाहीर करण्यात आल्याची माहिती हॉटेल मालक संघाने पत्रकार परिषदेत दिली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोल्हापूर पर्यटन महोत्सवाची घोषणा केली होती. ऑक्टोबरमध्ये अपेक्षित असणारा हा महोत्सव काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला. पण, कोल्हापूर हॉटेल मालक संघाने यात पुढाकार घेतला असून, याला जिल्हा प्रशासन पाठिंबा देत आहेत. या संदर्भात संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर म्हणाले, ‘जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्या सहकार्याने महोत्सव होत आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पुढचे तीन ते चार दिवस कोल्हापुरीत इतर पर्यटनस्थळांच्या निमित्ताने कोल्हापुरात थांबवून घेणे, हा महोत्सवाचा उद्देश आहे. यामध्ये क्लास आणि मास दोन्ही प्रकारच्या पर्यटकांचा विचार करून पॅकेज तयार करण्यात आली आहेत.’ महोत्सवात लोकल टूर ऑपरेटर्स, ट्रान्सपोर्टर्स, सहभागी होणार असून, महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

http://www.kolhapurtourism.org. या वेबसाइटवर महोत्सवाची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या वेळी संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, उपाध्यक्ष उमेश राऊत, सचिव सिद्धार्थ लाटकर, सहसचिव सचिन शानबाग, खजानीस मोहन पाटील, जनसंपर्क प्रमुख अरुण भोसले, माजी अध्यक्ष आनंद माने, शिवराज जगदाळे आदी उपस्थित होते.

एमटीडीसीमार्फत प्रमोशन

महाराष्ट पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) कोल्हापूर पर्यटन महोत्सवाचे प्रमोशन करत आहेत. यात महामंडळाच्या वेबसाइटवर महोत्सवाची माहिती देण्यात येत आहे. तसेच एमटीडीसीच्या प्रत्येक रिसॉर्ट आणि काउंटरवर या महोत्सवाची माहिती देण्यात येत आहे. महोत्सवाच्या निमित्ताने जास्तीत जास्त पर्यटक कोल्हापूरकडे खेचण्याचा प्रयत्न आहे.

काय आहे महोत्सवात?

- दोन ते चार दिवसांच्या पॅकेज टूरचा समावेश

- पॅकेजच्या माध्यमातून निवासव्यवस्थेवर पन्नास टक्के सवलत

- पॅकेज धारकांना चौदा आणि सतरा सिटर गाडीची व्यवस्था

- अंबाबाई मंदिरापासून अॅडव्हेंचर स्पोर्टसपर्यंत पर्यटनाची संधी

- साहित्यवारीतून साहित्यिकांच्या गावी जाण्याची संधी

- गूळ, चप्पल आणि हुपरीचे चांदीचे दागिने डिस्काउंटमध्ये उपलब्ध

- सिंगापूर, बँकॉकच्या धर्तीवर सिटी टूर बस चालविणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केडीसीसीचे रुपे कार्ड मार्चपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा बँकेचा ग्राहक वर्ग अन्य कुठल्याही बँकेकडे जाणार नाही, याची दक्षता घ्या. स्पर्धात्मक युगात ग्राहक जोडून ठेवण्यासाठी हायटेक प्रणालाची गरज आहे. जगभरात कुठेही चालणारे रुपे कार्ड येत्या एक मार्चपर्यंत शंभर टक्के ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाईल. केडीसीसी बँक ग्राहकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने एमपीओएस मशीन सुविधा शुभारंभ वितरण सोहळा आणि एक्साईड लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या उत्कृष्ट विमा व्यवसाय शाखांचा पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक भवनात कार्यक्रम झाला.

अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या नोटबंदीच्या झटक्यामुळे अजूनही केडीसीसी बँका आणि सर्वसामान्य ग्राहक सावरलेले नाहीत. चलन आणि पीओएस मशीन्सची व्यवस्था केलेली नाही. केवळ कॅशलेसची स्वप्न पाहिली जात आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर केडीसीसी बँकांसमोर मोठे संकट उभे आहे. राष्ट्रीयीकृत बँक ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी केडीसीसीच्या शाखा आहेत. या शाखांतून ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केडीसीसीला नवीन चलन देण्याचा आदेश दिला होता. त्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती. मात्र अजूनही केडीसीसीला नवे चलन मिळालेले नाही. केडीसीसीचा ग्राहक वर्ग दुसरीकडे जाणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे. त्यासाठी एमपीओएस मशीन्स उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे ऑनलाइन व्यवहाराला मोठी चालना मिळणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. चव्हाण यांनी केडीसीसी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. येत्या काही वर्षात केडीसीसीचे सर्व व्यवहार डिजिटल असतील. नॉन बँकिंग बिझनेसमधूनही ३५ लाखांचा नफा झाला आहे. चार लाखांवर विमा व्यवसाय केलेल्या शाखाधिकारी, बँकेचे विकास अधिकाऱ्यांचा सत्कार झाला. स्वप्न‌िल जामसांडेकर यांनी डिजिटल बँकिंग अवेअरनेस विषयावर मार्गदर्शन केले. एक्साईड लाइफचे बिजॉय डे, पी. जी. शिंदे, प्रा. संजय मंडलिक, उदयानी साळुंखे, प्रताप माने, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते. एक्साईड लाईफ इन्शुरन्स कंपनीचे हेमल कोठारी यांनी स्वागत केले. जी. एम. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. गजानन मुळीक यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ता गेल्यावर त्यांना शोधावे लागेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘भाजपला सत्ता मिळविण्यासाठी कोणीही चालते. हातकणंगलेत राष्ट्रवादी संपली असे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. मात्र, त्यांना हे माहीत नाही की, सत्ता गेल्यावर एक हजार वॅटचा सर्चलाइट घेऊन त्यांना घेऊन शोधावे लागेल,’ अशी टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी संपल्याचे विधान केले होते. त्याचे खंडन करून आमदार मुश्रीफ यांनी पलटवार केला. भविष्यात स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप एकत्र आल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये, असे भाकितही त्यांनी केले.

आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक माणूस गेल्याने राष्ट्रवादी संपत नाही. पंचवीस ते तीस वर्षांच्या राजकारणात अनेक जीवाभावाची माणसे, कार्यकर्ते आणि तळागाळातील प्रत्येक माणसांपर्यत पोहोचली आहे. हीच माणसे माझे नाव पैलतीरी लावतील. चंद्रकांत पाटील यांची सत्ता गेली तर त्यांना एक हजार वॅटचा दिवा घेऊन त्यांना शोधावे लागेल. इंगवले गेली २५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेससोबत होते. इंगवले भाजपमध्ये गेल्याचे दुःख आहे. काळजाला चटकाही लागला आहे. मात्र काही माणसे स्वत:च्या भल्यासाठी आणि स्वार्थासाठी अन्य पक्षात जात असतील, तर त्यांना कायमस्वरुपी शुभेच्छा आहेत. त्यांचे भले होणार असेल तर त्यांना अडविण्याची गरजही भासली नाही. इंगवले यांच्या पक्षांतरामुळे रात्रभर झोपही लागली आहे, हे खरे आहे. गेली अनेक वर्षे एकत्रित काम केले आहे. त्याची खंत मनात कायम राहील. भाजपला सत्ता आणण्यासाठी कोणीही चालते. कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्यास तत्पर राहते.’

ते पुढे म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील केडीसीसीच्या विरोधात भूमिका घेत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने शाखा काढू नयेत. मार्गदर्शक बँक, जिल्हा बँक, विकास संस्था अशी त्रिसूत्री आहे. मात्र त्यासाठी नवीन शाखा काढू नयेत, अशी विनंती राज्य बँकेला करणार आहे. त्यामुळेच या बँकेच्या उद‍्घाटनाला गेलो नाही. त्यावेळी झालेल्या सभेत शेतकऱ्यांनी थेट पीककर्ज देणार असल्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत आहे. कारण ४०० कोटी रुपयांचा संचित तोटा कमी होऊ शकेल. नवे निर्णय निवडणुकीनंतरच राबविण्यात यावेत. राज्य बँकेच्या शाखा २१ पेक्षा अधिक नकोत, असा निर्णय आहे. त्या निर्णयाच्या विरोधात नागपूर खंडपीठापुढे याचिका आहे. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती मिळू शकते. त्यामुळे राज्य बँकेने कोणतेही धोरण किंवा निर्णय निवडणुकीनंतर घ्यावेत. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता आल्यास शाखाही बंद होऊ शकते. अन्यथा फेरबदल होऊ शकतो. निवडणुकीनंतर शाखांचे विस्तारीकरण करावे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माळकर चौकात मारामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माळकर चौकात दुकानांसमोर वडापच्या रिक्षा लावण्याच्या कारणातून नगरसेवक किरण शिराळे यांचे पुत्र विशाल शिराळे आणि रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. यादरम्यान धक्काबुक्की झाल्याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या महाराणा प्रताप चौकातील दोघांना दुकान मालकांसह कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. मारहाणीच्या घटनेमुळे महाराणा प्रताप चौकातील मोठा जमाव माळकर चौकात जमा झाल्याने सुमारे दीड तास तणाव निर्माण झाला होता, त्याचबरोबर वाहतूकही खोळंबली.

माळकर चौकात वडापच्या रिक्षा लावण्यावरून वारंवार दुकानमालक आणि रिक्षाचालकांमध्ये किरकोळ वाद होतात. रविवारी (ता. ८) दुपारी तीनच्या सुमारास दोन रिक्षा चालकांनी लक्ष्मीनारायण स्वीट मार्टसमोर रिक्षा उभी केली होती. यावेळी दुकान मालक विशाल शिराळे यांनी रिक्षाचालकांना रिक्षा हटवण्यास सांगितले. यातून रिक्षाचालक आणि विशाल शिराळे यांचा वाद सुरू झाला. यादरम्यान महाराणा प्रताप चौकातील रणजित बाबासाहेब पोवार (वय ३०) आणि सागर विष्णू साळोखे हे दोघे दुकानांसमोर उभे होते. वाद सुरू असताना विशाल शिराळे यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचे सांगत या दोघांनीही शिराळे यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी शिराळे यांच्यासह दुकानातील कर्मचारी आणि काही नागरिकांनी या दोघांनाही मारहाण केली.

मारहाणीची घटना महाराणा प्रताप चौकात समजताच मोठ्या प्रमाणात जमाव माळकर चौकात जमला. परस्परांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडल्याने या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. याच जमावाने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात जाऊन मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्याचा आग्रह धरला. पोलिस ठाण्यातून पुन्हा जमाव माळकर चौकात आल्याने पोलिसांनाही घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही बाजुकडील तरुणांची जमजूत काढावी लागली. अखेर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर संतप्त जमाव शांत झाला. विरोधी पक्षनेते किरण शिराळे यांच्यासह दोन्ही बाजुच्या ज्येष्ठ नागरिकांनी मध्यस्थी करून जमावाला शांत केले. या प्रकाराने परिसरात सुमारे दीड तास वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनाही वाद मिटवण्यासह वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केबिन्स, बेशिस्त पार्किंगचा विळखा

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet : @sachinyadavMT

कोल्हापूर: वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या आरटीओ कार्यालयाबाहेरच बेशिस्त पद्धतीने लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे आणि दिवसेंदिवस भर पडत असलेल्या केबिन्समुळे आरटीओ कार्यालयासमोर वाहतुकीची नेहमीच कोंडी होत आहे. वाहनांच्या पार्किंगबाबत किंचितही फरक पडत नसल्याने कार्यालयात प्रवेशासाठी जीव मुठीत घेऊन प्रवेश करावा लागतो. दुचाकी, चारचाकी पार्किगची कोणतीही ठोस व्यवस्था केलेली नाही. याशिवाय कामानिमित्त येणाऱ्यांना अस्वच्छतेचा विळखा आणि दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

बेशिस्त वाहनांतून आरटीओ कार्यालयात प्रवेश करावा लागतो. एमएसईबीचे कार्यालय ते पितळी गणपतीकडे जाणाऱ्या रोडवर वाहतुकीची कोंडी आहे. आरटीओ कार्यालयसमोर एजंटाच्या सुमारे ६०हून अधिक केबिन्स आहेत. या दोन महिन्यांत नव्याने दहा केबिन्स झाल्या आहेत. आरटीओ प्रवेशद्वारावरच दोन्ही बाजूला केबिन्स आहेत. प्रवेशद्वारातून ट्रक जाताना कोडी होते. प्रवेश केल्यानंतर दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकाला पार्किगसाठी जागा मिळत नाही. कार्यालयात प्रवेश केल्यानंतर चारचाकी पार्किंगच्या ठिकाणी दुचाकी पार्किग केल्या आहे. या चारचाकी पार्किगमध्ये सहा एजंटाची चारचाकी वाहने कायमस्वरुपी पार्किग केलेली आहेत. कर्मचाऱ्यांच्या पार्किग जागेतही अस्वच्छता आहे. लर्निग आणि परमंट लायसन्सला टेस्ट देण्यासाठी येणाऱ्या वाहनांना पार्किगची शिस्त नाही. आराम बस, ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉली, जीप, डंपरसह अवजड वाहनेही या ठिकाणीच पार्किग करतात. आरटीओ अधिकाऱ्यांची चारचाकी वाहनांना शिस्त नाही. कार्यालय परिसरात कुठेही वाहने पार्किग केली जातात. वायूवेग पथकाच्या वाहनांच्या पार्किंगचीही तीच अवस्था आहे.

आरटीओच्या मुख्य इमारतीत दुर्गंधी आहे. अनेकदा तोंडाला रुमाल लावून प्रवेश करावा लागतो. परिसरात असलेल्या गटारी अनेक वर्षे स्वच्छ केलेल्या नाहीत. परिसरातील झाडांच्या पानांचे ढीग आहेत. ठिकठिकाणी कागद, बाटली आणि प्लास्टिक कचरा साचलेला आहे. गेली कित्येक वर्षे आरटीओने जप्त केलेली वाहने आवारातच धूळखात पडली आहेत. खराब झालेल्या टायर्स या ठिकाणी आहेत. या टायर्समध्ये पाणी साचून डासांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे सायंकाळी चार नंतर डासांचे साम्राज्य कार्यालयात आहे. कार्यालयाचा सुमारे दहा एकरचा परिसर आहे. मात्र कोणतेही ठोस नियोजन नसल्याने चार शहराचा कार्यभार पाहणाऱ्या मुख्य कार्यालयात दूरवस्था आहे.

०००

धोकादायक टेस्टिंग ट्रॅक

दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लायसन्ससाठी वाहन तपासणीचा टेस्टिंग ट्रॅकची दूरवस्था झाली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. चाचणी देताना वाहनधारकाला अपघात झाल्यास प्रथमोचाराची सोय नाही. काही महिन्यापूर्वीच या ठिकाणी चाचणी देताना वाहनाचा अपघात झाला होता. ट्रॅकवर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. चाचणी पाहण्यासाठी दररोज नियुक्ती केलेला मोटार वाहन निरीक्षक केबिन बाहेर येत नाही. केबिनबाहेर एजंटाच्या हातातच फाईल्स आहेत.

पिण्याचे पाण्याचे नळ फुटलेले

सध्या आरटीओ कार्यालयात असलेल्या पाण्याची टाकीजवळ नळ फुटले आहेत. त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. पानाच्या पिचकाऱ्या आणि प्लास्टिकचे कागद पडलेल आहेत.

कोण आहेत जबाबदार अधिकारी

डॉ. डी. टी. पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

राजेंद्र वर्मा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

०००

काय करता येईल

माहिती कक्ष

दुचाकी पार्किंगची स्वतंत्र लाइन

कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पार्किग

चारचाकी पार्किंगची स्वतंत्र सोय

ड्रायव्ह‌िंग टेस्टसाठी शिस्तबद्ध नियोजन

भंगार वाहनांचा बंदोबस्त

स्वच्छतागृहाची सोय

स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

कामानिमित्त येणाऱ्यांना टोकन

बैठक व्यवस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भोगावती’चा हजारो लिटर ऊसरस गटारीत

$
0
0

म.टा.वृत्तसेवा, राधानगरी

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या काही कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे साखरमिश्रित उसाचा रस गटारीने वाहून जाण्याचा प्रकार रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी उघडकीस आणला . हा प्रकार गेले चार दिवस सुरु होता. त्यामुळे कारखान्याचे सुमारे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. संबधितांवर तत्काळ कारवाई न केल्यास आंदोलनकरण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे भोगावती परिसर अध्यक्ष जनार्दन पाटील,आण्णापा चौगले,रावसो डोंगळे यांनी दिला आहे .

भोगावती साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सुरू आहे. यावर्षी उसाची कमतरता आणि उत्पादनातील घट यामुळे एकूण गाळप कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून सध्या गाळपास आलेल्या उसाचे नियोजन केले गेलेले नाही, असेच या प्रकारावरून उघडकीस आले आहे. कारखान्यातील ऊस गाळप झाल्यानंतर रसावर प्रक्रिया ज्या मार्गावरून जाते त्या मार्गात असणाऱ्या पाईपमधून रस गटारीत वाहून जात होता. मागील चार दिवस हा प्रकार सुरु असूनही कर्मचारी ,कार्यकारी संचालक ,प्रशासकीय अधिकारी यांनी याकडे गांभीयाने पाहिले नाही. ही बाब रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रूपाने उघडकीस आली. त्यानंतर तत्काळ प्रशासकीय अधिकारी संभाजी निकम ,कार्यकारी संचालक एम एस तिकोडे यांच्याशी संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती देऊन जाब विचारला आणि संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, कारखान्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ऊस रस फोमिंग होण्याचे प्रकार काहीवेळा होतात. ही बाब जाणीवपूर्वक झालेली नसल्याचे सांगण्यात आले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काम बघा, मगच मतदान करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,कागल

‘आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी भावनेच्या भरात नव्हे, तर गेल्या वीस वर्षाच्या माझ्या कामाचा ताळेबंद तपासून मतदान करावे,’ असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. सेनापती कापशी येथे सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घघाटन व दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी युवराज पाटील होते. कार्यक्रमाचे संयोजन पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यांनी केले.

आमदार मुश्रीफ म्हणाले,‘ खोत यांनी गावचा चेहरा बदलणारे काम केले. येथे होणाऱ्या नळयोजनेला पाण्याच्या मीटरसाठी एक कोटीचा निधी मिळवून देणार आहे. एमआयडीसीद्वारे बेरोजगारीचा प्रश्न सोडविला. सरकारी नोकऱ्यांसाठी मोफत प्रशिक्षण केंद्र सुरु केले. २१ हजार गरजूंना पेन्शन मिळवून दिली, कायद्यात बदल करुन गरिबांना अशक्य वाटणाऱ्या शस्त्रक्रीया मोफत करुन दिल्या, त्यांना जीवदान दिले. ज्यांना गरिबांचे देणे-घेणे नाही. ते सत्तेवर आले. परंतु जोपर्यंत सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत विरोधक चारीमुंड्या चित होतच राहतील.’

शशिकांत खोत म्हणाले,‘मुश्रीफ यांच्या विरोधात विकासाला विरोध करणारी मंडळी एक होत आहेत. त्यामुळे मुश्रीफ यांच्याबद्दल सहानभूतीची लाट येईल. येणारी निवडणूक विकासाच्या मुद्दयावर लढवावी. ’

यावेळी भैया माने, प्रवीण नाईकवाडे, यांनी मनोगत व्यक्त केले. नविद मुश्रीफ, गणपतराव फराकटे, सरपंच छाया लुगडे, उपसरपंच राजू माळी, विकास पाटील, गिरीश कुलकर्णी, अंकुश पाटील, सूर्याजी घोरपडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सतिश घोरपडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडलेल्या काळवीटास जीवदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

वेसर्डे (ता.भुदरगड) येथे विहिरीत पडलेल्या काळवीटाला वनविभागाच्या अथक प्रयत्नाने वाचविण्यात यश आले. वैद्यकीय उपचारानंतर त्याला पाटगाव येथील जंगलात सुस्थितीत सोडण्यात आले.

शनिवारी रात्री वाट चुकून आलेले काळवीट ठाकूर यांच्या गावाशेजारी असणाऱ्या शेतातील विहिरीत पडले. रविवारी सकाळी काळवीट विहिरीत पडल्याचे दत्तात्रय गुरव, प्रकाश गुरव यांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती त्यांनी वनविभागाला दिली. सकाळी नऊ वाजता वनक्षेत्रपाल एम.पी.इनामदार यांच्यासह वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विहीर मोठी असल्याने काळवीट बाहेर काढण्याचे मोठे आव्हान होते. वनविभागाचे वनरक्षक जॉन्सन डिसोझा, किरण पाटील, संजय चोगले, रणजित पाटील यांच्यासह ग्रामस्थ जयराम कांबळे, सरपंच शिवाजी वेळू, प्रभाकर शिंदे, दत्ता पाटील, रमेश पंदारे, रसूल शेख, बचाराम डाकरे, बबन कांबळे, अशोक कोटकर विहिरीत उतरले. अथक प्रयत्नांनी काळवीटाचे पाय बांधण्यात आले. त्यानंतर वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने त्यास बाहेर काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी समितीमुळे निधीचे ‘एक्स्टेंशन’

$
0
0

Raviraj.gaikwad
@timesgroup.com

कोल्हापूर : राजारामपुरी एक्स्टेंशन हा प्रभाग स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांचा. स्थायी समितीची धुरा असल्याने प्रभागातील कामे करून घेण्यासाठी लागणार निधी मिळविण्यात त्यांना फायदा झाला आहे. आपल्याच प्रभागात जास्त निधी वापरल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला आहे. पण, ओपन स्पेसची जास्त संख्या असलेल्या या प्रभागात नवी आधुनिक उद्याने तसेच विरंगुळा केंद्र होण्याला सर्वांत मोठी संधी आहे. येत्या चार वर्षांत ही कामे होतील, अशी अपेक्षा येथील नागरिकांना आहे.

राजारामपुरी एक्स्टेंशन हा प्रभाग उच्चभ्रू वस्तीचा. अपार्टमेंट्स आलीशान बंगले यामुळे शहरातील निवडक उच्चभ्रू प्रभागांमध्ये या प्रभागाचा समावेश होतो. प्रभागात एकही झोपडपट्टी नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने येणारे प्रश्न या प्रभागात नाहीत. उद्योजक, राजकारणी यांचे बंगले येथे मोठ्या प्रमाणात असल्याने एखाद्या समस्येसाठी कोणी नगरसेवेकाचे दार ठोठावत नाही. त्यामुळे इतर प्रभागांसाठी या प्रभागाची स्थिती नाही. त्यातच नगरसेवक मुरलीधर जाधव यांना पहिल्याच वर्षी स्थायी समिती सभापतिपद मिळाले. त्याचा या प्रभागाला फायदा झालेला दिसतो. शहरातील हायक्लास परिसरात वॉटर गटर मीटरच्या पलिकडे सुविधांची मागणी असते. तेथे मॉर्निंग वॉकसाठी एखादे गार्डन हवे असते. स्वीमिंग पूल हवा असतो. त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, तरुणांसाठी बॅडमिंटन कोर्ट, अशा मागण्या असतात. यातील जवळपास सर्व गरज किंवा मागण्या या प्रभागात पूर्णत्वास येत आहेत.

राजर्षी शाहू जलरण तलावाशेजारी असलेल्या अडीच एकर जागेत एक आयडीयल उद्यान उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी ८० ते ९० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, पालिकेकडून तीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने एक कोटी रुपये निधी दिलेल्या बॅटमिंटन कोर्टचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तलावाशेजारील नियोजित उद्यानाच्या समोरच हे कोर्ट होत असून, त्याला पालिकेकडून २० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करून घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत त्याचे उदघाटन होईल.

प्रभागात पालिकेची व्यायामशाळा नाही. एकूण तीन उद्याने असून, त्यातील १५व्या गल्लीतील उद्यान सुस्थितीत आहे. आठव्या गल्लीतील उद्यानाचे काम सुरू असून, दहाव्या गल्लीतील उद्यानासाठी निधीची प्रतीक्षा आहे. ही तिन्ही उद्याने चांगली झाल्यास हा प्रभाग चांगल्या उद्यानांचा प्रभाग म्हणून ओळखला जाण्याची शक्यता आहे.

रस्त्यांची कामे नेमकी कोणाची?

नगरसेवक आणि पालिकेच्या स्थायी सभापती मुरलीधर जाधव यांनी रस्ते गटर आणि विजेचे दिवे यांसाठी पालिकेतून एक कोटी रुपयांची निधी मिळविल्याची माहिती दिली. जाधव यांनी आपल्याच प्रभागात सर्वाधिक निधी खेचल्याचा आरोप पालिकेत झाला होता. त्याचवेळी प्रभागातील भाजपचे पराभूत उमेदवार विजय जाधव यांनी रस्त्यांची कामे निवडणुकीपूर्वीच सत्तेत नसताना चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून करून घेतल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा रस्ते नेमके केले कोणी? याचे श्रेय नेमके कोणाला?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बस, आठवडा बाजार सुरू

राजारामपुरीचा विस्तारीत परिसरत असला तरी, एक्स्टेंशन परिसरातून केएमटीची एकही बस जात नसल्याने गैरसोय होत होती. बससाठी नागरिकांना राजारामपुरीत एक दीड किलोमीटर चालत विजय बेकरी किंवा माऊली पुतळ्याजवळ यावे लागत होते. अन्यथा रिक्षासाठी पैसे खर्च करावे लागत होते. ही गैरसोय लक्षात घेऊन या परिसरातून बसस्टॉपसह एक नवीन रूट सुरू करण्यात आला आहे. त्याला प्रतिसादही मिळत आहे. त्याचबरोबर परिसरात मंडई नसल्याने महिलांची गैरसोय होत होती. त्यापार्श्वभूमी प्रभागात आठवडीबाजार सुरू करण्यात आला आहे. दर शनिवारी दुपारी चार ते रात्री आठ हा बाजार भरतो. शेतकऱ्यांकडून थेट माल मिळत असल्याने ग्राहकही खूष आहेत.

प्रभागातील रस्ते, गटर, विजेचे दिवे ही कामे गेल्या वर्षभरात मार्गी लावली आहेत. सध्या प्रभागातील दोन उद्यानांचा विकास करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. जलतरण तलावाशेजारी उद्यान कोल्हापुरातील सर्वांत चांगले उद्यान होईल, याची खात्री आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत बॅडमिंटन कोर्टचे उदघाटन होणार आहे. त्यामुळे हौशी आणि व्यवसायिक बॅडमिंटनपटूंची तेथे सोय होणार आहे.

- मुरलीधर जाधव, नगरसेवक


परिसरात गेली अनेक वर्षे रस्ता नव्हता. रस्त्यांना साइड कॉँक्रिट पट्ट्याही केल्या आहेत. त्यामुळे रस्ता झाल्याने आम्ही समाधानी आहोत. त्याचबरोबर घंटागाडी रेग्युलर झाली आहे. भागात काही ठराविक दिवसांनंतर धूर फवारणीही होते. आम्हा महिलांसाठी मंडईचा प्रश्न होता. पण, आठवडा बाजारामुळे तोही आता मिटला आहे.

- दीपालक्ष्मी पाटील, नागरिक


राजारामपुरी एक्स्टेंशन हा प्रभाग असा आहे, की जेथे सर्वाधिक ओपन स्पेस आहेत. त्यामुळे तेथे शहरातील सर्वांत मोठी डेव्हलपमेंट होणे अपेक्षित होते. गेल्या वर्षभरात तसे काही झाले आहे असे मला वाटत नाही. मुळात निवडणुकी पूर्वी सत्तेत नसतानाही आम्ही रस्त्यांची कामे करून घेतली होती. त्या निवडून आलेल्या नगरसेवकांना करण्यासाठी म्हणून फार थोडी कामे राहिली. बॅडमिंटन हॉलचे काम पूर्वी मंजूर झाले आहे. निवडणुकीपूर्वीच प्रभागात ३१ लाखांची कामे करून घेतली होती. सत्तेत नसलो तरीही आगामी काळात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निधी आणि केएसबीपीच्या माध्यमातून प्रभागात काही कामे करून घेण्याचे माझे नियोजन सुरू आहे.

- विजय जाधव, पराभूत उमेदवार


प्रभागात उल्लेखनीय असे काही काम झाले आहे असे मला वाटत नाही. मुळात परिसरातील बरीच कामे निवडणुकीपूर्वी चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून झाली होती. हा प्रभाग उतरणीचा असल्याने पावसाळ्यात सायबर परिसरातून येणाऱ्या पाण्याचा निचरा नीट होणे गरजेचे आहे. त्यासाठी नाल्यांची स्वच्छता आणि बांधीव गटर व्हायला हवीत. स्विमिंग टँक शेजारील बागेत मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होणे अपेक्षित होते. तसे झालेले नाही. प्रभागात स्वच्छता आणि धूर फवारणी वेळच्या वेळी होत आहे.

- प्रसाद अथणे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅड. राणेंच्या नियुक्तीची माहिती द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात सरकार पक्षामार्फत कामकाज पाहण्यासाठी तपास अधिकारी सुहेल शर्मा यांनी अॅड. शिवाजीराव राणे यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबाबत मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांनी माहिती मागवली आहे, मात्र गोपनीयतेचे कारण पुढे करून पोलिसांनी ही माहिती देणे टाळले आहे. सोमवारी (ता. ९) झालेल्या सुनावणीदरम्यानही अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मूळ तक्रारकर्ते उपस्थित नसल्याने पुढील तारखेला सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पानसरे कुटुंबीयांच्या मागणीनुसार राज्य सरकारने विशेष सरकारी वकीलपदी अॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती केली आहे. याच दरम्यान जिल्हा सत्र न्यायालयातील कामकाजासाठी अॅड. चंद्रकांत बुधले यांची सहायकपदी नियुक्ती केली होती. काही महिन्यांपासून तपास अधिकारी सुहेल शर्मा यांनी जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणीसाठी सरकार पक्षातर्फे अॅड. शिवाजीराव राणे यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबाबत मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. ही माहिती गोपनीय स्वरुपाची असल्याने देऊ शकत नाही, असे उत्तर जनमाहिती अधिकारी तथा पोलिस उपाधीक्षक सतीश माने यांनी पत्राद्वारे कळवली होती. यावर विक्रम भावे यांनी पुन्हा अप‌ील केल्याने सोमवारी अपील‌िय अधिकारी सुहेल शर्मा यांच्यासमोर सुनावणी होती. भावे यांच्यावतीने अॅड. समीर पटवर्धन यांनी सुहेल शर्मा यांच्यासमोर बाजू मांडली, मात्र प्रत्यक्ष तक्रारकर्ते उपस्थित नसल्याने पुढील तारखेला सुनावणी घेण्याचे शर्मा यानी स्पष्ट केले.

पानसरे हत्या खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी अॅड. राणे यांची नियुक्ती कोणाच्या मागणीवरून केली? याचा मेहनताना किती दिला जातो? माहिती देण्यास टाळाटाळ का केली जाते? असे प्रश्न तक्रारदार भावे यांच्यावतीने अॅड. पटवर्धन यांनी उपस्थित केले आहेत. यापूर्वी १७ जानेवारी, २०१६ रोजी पानसरे कुटुंबीयांनी केलेल्या मागणीनुसार सरकारने विशेष सरकारी वकीलपदी अॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती केली होती. याबाबत अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी माहिती मागितली असता, गृहविभागाने संपूर्ण माहिती दिली. गृह विभागाने जी माहिती दिली, तशीच माहिती कोल्हापूर पोलिसांना देण्यास नेमकी काय अडचण आहे? असा सवाल अॅड. पटवर्धन यांनी उपस्थित केला आहे. पुढील सुनावणीची तारीख तक्रारदारांच्या सोयीने निश्चित करण्याचे अपीलिय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठ कृती समितीची शुक्रवारी बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ (सर्किट बेंच) कोल्हापूर येथे स्थापन व्हावे, या मागणीसाठी गेल्या ४० दिवसांपासून खंडपीठ कृती समितीचे साखळी उपोषण सुरू असून, आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी (ता. १३) सहा जिल्ह्यातील वकिलांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी (ता. ९) कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांची भेट घेऊन खंडपीठप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली.

कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे, या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीच्यावतीने साखळी उपोषण सुरू आहे. आंदोलनास समाजातील विविध स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. सामाजिक संघटना, राजकीय नेते आंदोलनस्थळी भेट देत आहेत. सहा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी खंडपीठाचा प्रश्न नागपूर अधिवेशनादरम्यानही उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन संयुक्त बैठक घेण्याची विनंतीही केली. यानंतरही सरकारकडून आंदोलन बेदखल करण्याचाच प्रयत्न झाला आहे. खंडपीठ कृती समितीने तसा जाहीर आरोपदेखील केला असून, मुख्यमंत्र्यांनी संयुक्त बैठक घ्यावी, अशी विनंती केली आहे. या आंदोलनाची दखल सरकारने घ्यावी, यासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी खंडपीठ कृती समितीची शुक्रवारी कोल्हापुरात बैठक होणार आहे. या बैठकीला कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांची भेट घेऊन खंडपीठप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन डॉ. पाटील यांनी बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले.

आंदोलनाच्या ४० व्या दिवशी अँटिकरप्शन अ‍ॅड क्राइम कंट्रोल कमिटीचे पदाधिकारी, नृत्यचंद्रिका संयोगीता पाटील, जितेंद्र कळंत्रे, सतीश नवले, कृष्णात कळंत्रे, महेश आळवेकर, संदीप पाटील, संतोष पाटील, स्वप्नाली संचेती, तबस्सूम पठाण, अ‍ॅड. सुनील धुमाळ यांनी उपोषण केले. सायंकाळी चारच्या सुमारास उपोषणकर्त्यांना नगरसेवक अशोक जाधव यांच्या हस्ते सरबत देऊन ४० व्या दिवसाच्या उपोषणाची सांगता करण्यात आली. आंदोलनाच्या ४१ व्या दिवशी जयसिंगपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद पाटील, उपाध्यक्ष हिदायत नदाफ, खजानीस शशिकांत कडोले, सचीव अमित माने, शहाजी जगदाळे, ए. एम. कुलकर्णी, डी. जे. जगदाळे यांच्यासह पदाधिकारी उपोषणास बसणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादीने रोखला हायवे

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

नोटाबंदीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सोमवारी सुमारे तासभर हायवे रोखून नोटाबंदीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. तावडे हॉटेल येथे पंचगंगा पुलाजवळ हे आंदोलन करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, महापौर हसिना फरास यांच्यासह कार्यकर्ते दोन्ही बाजूच्या रस्त्यावर ठिय्या मारला.‌ परिणामी दोन्ही बाजूला सुमारे १५ ते २० ‌किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नोटाबंदीमुळे विस्कटलेली घडी आणि सरकारविरोधात खासदार महाडिक यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भजन करीत लक्ष वेधले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्यानंतर आजतागायत नवे चलन पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले नाही. निर्णयाच्या ५० दिवसानंतर परिस्थिती सुधारेल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. प्रत्यक्षात ५० दिवस होऊन गेले तरी परिस्थिती ‘जैसे थै’च आहे. यामुळे नोटा बंदीविरोधासाठी आणि पंतप्रधान मोदी, सरकारच्या ‌निषेधार्थ राष्ट्रवादीने राज्यस्तरीय रास्ता रोको आंदोलन पुकारले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी ११.३० वाजता जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते वाहनांनी तावडे हॉटेलजवळ आले. तेथून खासदार महाडिक, आमदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने हायवेवर बारा वाजता एकाचवेळी दोन्ही बाजूकडील हायवे रोखण्यात आला. एका बाजूच्या रस्त्यावर आमदार मुश्रीफ, महापौर फरास, माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह कार्यकर्ते तर दुसऱ्या बाजूला खासदार महाडिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजू लाटकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी ‌ठिय्या मारला. दोन्ही बाजूकडील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात सुरू केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणू लागला. वाहनांच्या रांगा वाढत गेल्या. शक्य त्या ठिकाणी पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहने वळवण्याचा प्रयत्न केला. तरीही कोल्हापुरात येणारे, जाणारे रस्ते, सांगली रोड, हायवेवरील वाहतूक ठप्प झाली.

शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी मुश्रीफ यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र मुश्रीफांनी ती धुडकावली. वारंवार राणे आंदोलन मागे घेण्याची विनंती करत राहिले. तरीही एक वाजेपर्यंत आम्ही उठणार नाही, असे मुश्रीफांनी ठामपणे सांगितले. दुसऱ्या बाजूला खासदार महाडिक, लाटकर, ए. वाय. पाटील यांनी सरकारविरोधात भजनाचा ठेका धरला. कार्यकर्ते टाळमृद्‍ंगात तल्लीन झाले. दुपारी एक वाजेपर्यंत असे चित्र राहिले. शेवटी पोलिसांनी मुश्रीफ, महाडिक, महापौर फरास यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन वाहनातून अंलकार हॉलकडे नेले. एक तासानंतर आंदोलनाची सांगता झाली. वाहतूक सुरळीत झाली.

आंदोलनात माजी आमदार के. पी. पाटील, नगरसेवक मुरलीधर जाधव, आदिल फरास, जयंत पाटील, सचिन पाटील, अनिल साळोखे, ज्येष्ठ कार्यकर्ते बी. एन. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

............

चौकट

तुम्हाला कोण देतंय का?

नोटाबंदीमुळे आमचे पैसे पुरेशा प्रमाणात आम्ही काढू शकत नाही. पोलिसांनाही याची झळ बसत आहे. त्यांनाही आपला पगार काढता येत नाही. यामुळे पोलिसांनो पैसे तुम्हाला कोणी देतय का? त्रास तुम्हालाही होत आहे, आमच्या आंदोलनाला तुम्हीही पाठिंबा द्या, असा मुश्रीफांनी सल्ला दिल्यानंतर एकच हंशा पिकला.


एटीएमसमोर म्हैशी

नोटाबंदीमुळे एटीएमसमोर रांगा लागत आहेत. रांगेत थांबूनही पुरेशा प्रमाणात पैसे मिळत नाहीत. त्याचा निषेध करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरीतील एटीएमसमोर काहीवेळ म्हैशी थांबवल्या. त्यामुळे तेथे बघ्याची गर्दी झाली.



लक्षवेधी फलक

‘मोदीने केला थाट, जनतेची लावली वाट’, ‘हेच का अच्छे दिन’, ‘पेटीएम म्हणजे पे टू मोदी’, ‘मोदीजी किती फेकणार अजून?, जनता मारेल एकेक फटका मोजून’, ‘अबकी बार, बस कर यार’, ‘केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र जनता झाली दरिद्र्य’, ‘नोटाबंदी करून बँका-एटीएम समोर रांगाच रांगा, हेच का अच्छे दिन तुम्हीच आता सांगा’, ‘अब की बार, झूठ मत बोल यार’ असे आशय लिहिलेले फलक घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सवलतीचा चेंडू आयुक्तांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरफाळ्याच्या थकीत बिलाच्या दंडात ५० टक्के सवलत मिळण्याच्या आशा पल्लव‌ीत झाल्या आहेत. महापालिका प्रशासनाने, नगरविकास विभागाकडून यासंदर्भात मार्गदर्शन मागविले होते. महापालिकेतील अधिनियमानुसार थकीत बिलाच्या दंडात सवलत देण्याचे अधिकार हे आयुक्तांना असून त्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे कळविले आहे. त्यानुसार आयुक्तांनी सवलत देण्याची अंमलबजावणी करावी, असा ठराव स्थायी समिती सभा करणार आहे. घरफाळयाच्या थकीत बिलाच्या दंडात सवलत देण्याचा निर्णय झाला तर शहरातील ४० हजार मिळकतधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. घरफाळ्याप्रमाणेच पाणीपट्टीच्या थकीत बिलाच्या दंडात सवलत मिळावी असा ठराव होणार आहे.

जवळपास पाच कोटी ५० लाख रुपये इतकी रक्कम सवलत म्हणून कमी होणार आहे. स्थायी समितीची सभा मंगळवारी होणार असून यामध्ये थकीत बिलाच्या दंडात सवलत योजनेची अंमलबजावणी तत्काळ करावी, असा ठराव मांडणार असल्याचे सदस्या जयश्री चव्हाण यांनी सांगितले. मिळकतधारकांनी ज्या त्या वर्षामध्ये घरफाळ्याची रक्कम जमा न केल्यास त्या रक्कमेवर १८ टक्के दंड आकारणीची तरतूद आहे. शहरातील मिळकतधारकांची संख्या एक लाख ३७ हजार इतकी आहे. यापैकी सुमारे ४० हजार मिळकतधारकांकडे घरफाळ्याची थकीत रक्कम १५ कोटी ३६ लाख रुपयापर्यंत आहे.

थकीत बिलावर आकारणी होणाऱ्या दंडाची रक्कम दहा कोटी ७५ लाख रुपये आहे. मिळकतधारकांना थकीत बिलाच्या दंडात सवलत मिळावी यासंदर्भात महापालिकेची सर्वसाधारण सभा, स्थायी सभेत चर्चा होऊन ठराव करण्यात आले. तत्कालिन स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांच्या कालावधीत २०१४ -१५ मध्ये असा ठराव झाला होता. यानंतर तत्कालिन महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखालील २० जुलै, २०१६ च्या सर्वसाधारण सभेने व स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी सभेत थकीत बिलाच्या दंडात ५० टक्के सवलत मिळावी असा ठराव मंजूर केला होता.

सभेच्या ठरावाचा अहवाल आयुक्त पी. शिवशंकर यांनी नगर विकास विभागाला कळवून मार्गदर्शन मागविले होते. नगरविकास विभागाने या संदर्भातील अधिकार आयुक्तांना असून महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी, असे प्रशासनाला कळविले आहे. सर्वसाधारण व स्थायी समितीच्या सभेच्या ठरावानंतर आमदार सतेज पाटील यांनी ही नगरविकास विभागाच्या सचिव, उपसचिवांची भेट घेऊन थकीत बिलाच्या दंडात सवलत देण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता.


महापालिका अधिनियमात दंड माफ करण्याची तरतूद आहे. आयुक्तांनी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. मिळकतधारकांना दंडात सवलत मिळावी यासाठी आमदार सतेज पाटील यांनी नगर विकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मंगळवारी होणाऱ्या स्थायी सभेत या योजनेची अंमलबजावणी करावी, असा ठराव करण्यात येणार आहे. तसेच पाणीपट्टीच्या थकीत बिलाच्या दंडातही सवलत द्यावी.

जयश्री चव्हाण ,सदस्या, स्थायी समिती सभा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्त न मिळाल्याने बालकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कावीळ झाल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या अवघ्या पाच दिवसांच्या बालकाचा रक्तपेढीतून रक्त न मिळाल्याने मृत्यू झाला. २४ तास सेवा उपलब्ध असल्याचे फलक लावून रात्री अपरात्री गरजू नागरिकांची अडवणूक करणाऱ्या रक्त पेढ्यांचा मनमानी कारभार यामुळे उघडकीस आला आहे. रक्तदाते उपलब्ध होऊनही केवळ ब्लड बँकेच्या निष्क्रियतेमुळे बालकाला जीव गमवावा लागल्याने नातेवाईकांसह नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी कामकाज बंद ठेवणाऱ्या रक्त पेढ्यांवर कारवाई करण्याची मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सानेगुरुजी वसाहत येथील शिवगंगा कॉलनीतील नवीन कारेकर आणि श्रद्धा कारेकर या दाम्पत्याला सोमवारी (ता. २) पंचगंगा हॉस्पिटल येथे मुलगा झाला. तिसऱ्या दिवशी प्रकृती खालावल्याने बालकाला उपचारासाठी कदमवाडीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. बालरोगतज्ज्ञांकडून तातडीने उपचार सुरू झाले. त्यानंतर बाळाला रक्ताची गरज असल्याचे संगण्यात आले. त्याचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह होता, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने ओ निगेटिव्ह रक्त चढवायचे होते. कारेकर कुटुंबीयांनी गुरुवारी दुपारी ४ वाजल्यापासून शहरातील सर्वच ब्लड बँकांमध्ये ओ निगेटिव्ह रक्ताची मागणी केली, पण रक्त उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर नीलेश औटी, प्रशांत कारेकर, शैलेश टाकळीकर यांनी ओ निगेटिव्ह रक्त मिळवण्यासाठी सोशल मीडियात मेसेज टाकले. यावर २५ ते ३० जणांनी रक्त देण्याची तयारी दर्शवली.

गुरुवारी रात्री दोन वाजता ४ ते ५ रक्तदाते ब्लड बँकेत गेल्यावर तेथील कर्मचाऱ्याने तांत्रिक अडचण सांगत, तातडीने रक्त घेता येणार नसल्याचे सांगितले. यानंतर पहाटे साडेसहाच्या सुमारास रक्तदात्यांकडून रक्त घेतले. त्यावर प्रक्रिया करणारे कर्मचारी सकाळी १० वाजता रक्तपेढीत पोहोचले. जादा पैसे देण्याचे आमिष दाखवल्यानंतरच कर्मचाऱ्यांनी तप्तरता दाखवली. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास रक्त मिळाले, पण साडेबाराच्या सुमारास बालकाचा मृत्यू झाला. २४ तास कार्यरत असल्याच्या जहिराती करणाऱ्या रक्तपेढ्यांच्या निष्क्रियतेमुळेच बाळ दगावल्याची संतप्त भावना कारेकर कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. अशा रक्तपेढ्यांचे कामकाज २४ तास सतर्कतेने आणि प्रामाणिकपणे सुरू राहावे, यासाठी कारेकर कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून, या मागणीचे निवेदनही दिले आहे. रात्रीच्या वेळी बंद असणाऱ्या रक्तपेढ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. रक्तपेढ्यांच्या निष्क्रीय कारभाराबद्दल नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध साग वाहतुकीवरशाहूवाडी वनविभागाची कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

येलूरपैकी शेळकेवाडी (ता. शाहूवाडी) येथे विनापरवाना साग जातीच्या लाकडाची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ट्रेलर शाहूवाडी वनविभागाच्या भरारी पथकाने पकडून सुमारे सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चालकांना ताब्यात घेवून चौकशी सुरु केल्याने वनविभागाच्या या कारवाईने तालुक्यातील अवैध लाकूड व्यवसायात गुंतलेल्या व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.

वनविभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शाहूवाडी वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी विजय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत भरारी पथक नेहमीप्रमाणे मलकापूर, आंबा, विशाळगड परिसरातील जंगलव्याप्त भागात गस्त घालत असताना रविवारी (ता.८) रात्री ११ वाजता येलूरपैकी शेळकेवाडी (ता. शाहूवाडी) येथे रस्त्यातून दोन ट्रॅक्टर (क्र. एम. एच. ०९ – सी. जे. ०८३०, दुसरा ट्रॅक्टर विना नंबरप्लेट) ट्रेलरमधून साग वृक्ष जातीच्या लाकडाची विनापरवाना वाहतूक करताना पथकाच्या निदर्शनास आले. दोन्ही ट्रेलरमध्ये सागवान लाकडाचे एकूण ९७ नग आढळले आहेत. वनविभागाच्या मतानुसार या पकडलेल्या ४.८६७ घनमीटर मौल्यवान लाकडाची किंमत अंदाजे ५५,७०० रुपये असून अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ट्रेलरही (अंदाजे किंमत पंधरा लाख रुपये ) या कारवाईत जप्त करण्यात आले आहेत. ट्रॅक्टरचालक लक्ष्मण पांडुरंग बसरे, उदय पंडित थोरवत (दोघेही रा. येलूर, ता. शाहूवाडी) यांना वानाविभाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरु आहे. या चौकशीत अवैध लाकूड व्यवसायात गुंतलेल्या सराईतांची साखळी उजेडात येण्याची शक्यताही वनविभागाने व्यक्त केली आहे. वनविभागाच्या चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागणार असल्याने अवैध लाकूड व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

वनपरिक्षेत्राधिकारी विजय गोसावी, वनपाल आर. एस. तिवडे, वनरक्षक अरुण सोळंकी, पी. एन. खुपसे, जालिंदर कांबळे, देवेश्वर रावलेवाड, दिनकर पाटील, जयसिंग पाटील, बाजीराव माईंगडे, सर्जेराव पोवार आदींच्या भरारी पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएमच्या दारात म्हशींची रांग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

मोदी सरकारने नोटीबंदी करुन सर्वसामान्यांना वेठीस धरल्याच्या निषेधार्थ इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील चांदणी चौकातील स्टेट बँकेच्या एटीएमसमोर चक्क ५० म्हशी उभ्या करुन अनोख्या पध्दतीने आंदोलन केले.

केंद्र सरकारने अचानकपणे ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. ज्या कारणांसाठी हे पाऊल उचलले ते मात्र चुकले अन् हा निर्णय फसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० दिवसांत चलन व्यवस्था सुरळीत होईल, अशी ग्वाही दिली होती. मात्र आज साठ दिवसांचा कालावधी लोटला तरी परिस्थिती जैसे थे आहे. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आणि दुध उत्पादक शेतकऱ्याना आपले हक्काचे पैसेदेखील मिळेनासे झाले आहे. तर आजही पैसे काढण्यासाठी बँकांच्यासमोर रांगा लागत आहेत. सरकारच्या या फसलेल्या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले. नदीवेस नाका येथून ५० म्हैशी वाजत-गाजत चांदणी चौकातील स्टेट बँकेच्या एटीएमसमोर आणून उभ्या करत सरकारच्या निर्णयाचा निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात प्रदेश सचिव मदन कारंडे, शहराध्यक्ष प्रकाश पाटील, नगसेवक उदयसिंग पाटील, सुनिल मुधोळकर, संजय बेडक्याळे, सचिन हुक्किरे, अविनाश वासुदेव यांमयासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images