Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कर्जाच्या अमिषाने महिलांची फसवणूक

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

भारत विकास सर्व्ह‌िसेस प्रायव्हेट लि. हावेरी या संस्थेकडून ५० हजार रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून शहर व परिसरातील सुमारे २०० महिलांची दोन लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी रेश्मा बाळासो नदाफ या महिलेच्या विरोधात सना युनूस सनदी यांनी बचत गटाच्यावतीने शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रेश्मा नदाफ हिने चार महिन्यापूर्वी भारत विकास सर्व्ह‌िसेस प्रा. लि. या संस्थेतर्फे बचत गटाला ५० हजार रुपयापर्यंत कर्ज मिळवून देण्याचे सांगत बचत गटाच्या महिलांकडून सभासद होण्यासाठी १०५० रुपयाप्रमाणे २१ हजार रुपये घेतले. त्यावेळी कंपनीच्या छापील अर्जावर माहिती भरून घेऊन आवश्यक कागदपत्रेही घेतली होती. दिवाळी काळात पहिल्यांदा ५० हजार रुपये कर्ज देऊन प्रतिमहा १५०० रुपये हप्ता भरुन त्याची परतफेड करण्याची असल्याची माहिती दिली. त्यानंतर आठवड्यानंतर रेश्मा नदाफ व अन्य चार लोकांनी येऊन सभासद झालेल्या महिलांच्या घरांची पाहणी करून लक्ष्मी पूजन दिवशी कर्ज वाटप केले जाईल असे सांगत व्हाउचरवर सह्या घेतल्या. त्यानंतर लक्ष्मी पूजनाच्या दोन दिवस अगोदर गल्लीत राहणाऱ्या सफुरा शेख या महिलेने नदाफ आल्या असून तुम्हीपण या असा निरोप देत सर्वांना बोलवून घेतले. त्यावेळी सफुराने आमच्या संस्थेसाठी १४ बचत गट मिळवून दिल्याचे रेश्माने सांगत दोन दिवसांत कर्ज दिले जाईल, असे सांगून ती निघून गेली. त्यानंतर दोन दिवसांचा कालावधी लोटूनही पैसे मिळत नसल्याने बचत गटातील महिलांनी रेश्माचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ती मिळून आली नाही. तसेच तिने दिलेल्या कंपनीच्या कोल्हापुरातील पत्त्यावर चौकशी करता त्याठिकाणी कंपनीचे कार्यालय नसल्याचे समजले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने महिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन हजारच्या सुट्यांसाठी धावपळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने आज, शनिवारी दिवसभर बँकांच्या एटीएमबाहेर रांगा दिसत होत्या. दैनंदिन किरकोळ व्यवहारांसाठी पैसे लागणार असल्याने एटीएममधून दोन हजारांची नोट येत असली, तरी ती घेऊन त्यांचे सुटे करून घेण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होती. एसबीआय वगळता इतर बहुतांश बँकांची एटीएम सेंटर दिवसभर बंद राहिल्याने अनेकांच्या पदरी निराशा पडली.

चलनातून पाचशे आणि हजारच्या नोटा रद्दच्या घेतलेल्या निर्णयाचे पडसाद सलग सुट्यांमुळे आज, शनिवारी सर्वाधिक जाणवले. शहरात एटीएम सेंटरवर सकाळपासूनच गर्दी होती. मात्र, काही बँकांच्या सेंटरवर नोटा मर्यादित पैसे असल्याने दुपारपर्यंत तेथील सुविधा बंद झाली. शहरातील एसबीआयच्या एटीएम सेंटवर मात्र, सर्वत्र मोठ्या रांगा होत्या. दसरा चौक, आदित्य कॉर्नर, राजारामपुरी, पार्वती थिएटरसमोरील पेट्रोलपंप, उमा टॉकीजसमोरील पेट्रोलपंप, लक्ष्मीपुरीतील एसबीआयच्या सेंटरवर रांगा होत्या. आदित्य कॉर्नरसह काही एटीएम दुपारीनंतर बंद असल्याचे दिसले. पण, दसरा चौक, खानविलकर पेट्रोलपंप येथील एटीएमवर सायंकाळीही नागरिकांची रांग दिसत होती. एसबीआय वगळता इतरत्र बँकांच्या वेंडर कंपन्यांकडून एटीएमवर कॅशच उपलब्ध न झाल्यामुळे शहरातील त्यांच्या सर्व एटीएमवर खडखडाट होता. दुपारनंतर जवळपास शहरातील ९० टक्के एटीएम बंद होती. सायंकाळी लक्ष्मीपुरीत दोन खासगी बँकांच्या एटीएमवर किरकोळ गर्दी होती.

शहरात सुरू असलेल्या एटीएमवर दोन हजार रुपयांची एकच नोट मिळत असल्याने तीन मिळाल्यानंतर त्याचे सुटे करून घेण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागत होती. काहींनी पेट्रोलपंपांवर पेट्रोल भरून किंवा केमिस्ट आणि इतर दुकानांमध्ये किरकोळ आवश्यक साहित्याची खरेदी करून पैसे सुटे करून घेतले. पेट्रोलपंपांवरही पैसे सुटे मिळूपर्यंत अनेकांना थांबावे लागले.

00000000000

एटीएम आज सुरू राहणार

एसबीआयसह काही खासगी बँकांनी उद्या (रविवार, ११ डिसेंबर) एटीएम सेंटर सुरू ठेवण्याची तयारी केल्याची माहिती बँकांच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे उद्या सकाळच्या टप्प्यात काही एटीएम सेंटर सुरू राहणार आहे. पण, कॅश संपल्यानंतर मात्र, ती पुन्हा बंद राहण्याची शक्यता आहे.

0000000000000000000000

मंगळवारीच पुन्हा व्यवहार

महिन्यातील दुसरा शनिवार, रविवारीच साप्ताहिक सुटी आणि त्याला जोडून आलेल्या इद-ए-मिलादच्या सार्वजनिक सुटीमुळे तीन दिवस बँका बंद आहेत. त्यामुळे सामान्यांसाठी एटीएम सेंटर हाच एकमेव आधार होता. आता मंगळवार (१३ डिसेंबर) बँका सुरू झाल्यानंतरच व्यवहार पुन्हा हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत ज्या एटीएममध्ये पैसे तेथे रांगा, असे अजून दोन दिवस दिसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाबार्डकडून झाडाझडतीसांगली जिल्हा बँकेची कसून तपासणी

0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

पाचशे, हजारच्या नोटबंदीनंतर आर्थिक निर्बंधांना सामोर जाताना कोंडीत सापडलेल्या जिल्हा बँकांची नाबार्डच्या विशेष पथकांकडून तपासणी सुरू झाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात विविध शाखांमधील नाणेवारीची नोंद घेतल्यानंतर सहा शाखांमध्ये महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक रकमेचा भरणा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तपासणी पथकाने या सहा शाखांची स्वतंत्रपणे तपासणी सुरू केली असून, रविवारी तासगाव, शिराळा आणि सावळज या शाखांची तपासणी सुरू होती.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत शनिवारी नाबार्ड अधिकारी पथकाने अचानक हजेरी लावून तपासणी सुरू केली. नाणेवारी, कोअर बॅँकिंग, केवायसी यासह विविध मुद्यांवरील आकडेवारीचे संकलन संबधित पथकाने केले. रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातल्याने बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यातच चलन पुरवठा करणाऱ्या बँकांकडून पुरेसा चलन पुरवठा होत नाही. त्यामुळे आगोदरच अर्थिक कोंडीत सापडेली जिल्हा बँकेची नाबार्डकडून तपासणी सुरू झाल्याने बँकेच्या अडचणीत भर पडली आहे.

जिल्हा बँकेने सुप्रीम कोर्टात रिझर्व्ह बँकेच्या धोरणांविरोधात याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी सुनावणीवेळी कोर्टाने जिल्हा बँकांवरील बंदीविषयी विचारणा केल्यानंतर अचानक नाबार्डकडून जिल्हा बँकांची तपासणी केली जात असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्री नाबार्डकडून सांगली जिल्हा बँकेस सूचना प्राप्त झाली. शनिवारी सकाळपर्यंत अनेक गोष्टींबाबतची माहिती उपलब्ध करून ठेवण्याचे आदेश येवून धडकले होते. त्यामुळे रात्रभर अधिकारी, कर्मचारी माहिती संकलित करीत होते. शनिवारी सकाळी नाबार्डचे अधिकारी बँकेत डेरेदाखल झाले. त्यांनी एकूण नाणेवारी, जुन्या नोटा रद्द केल्यापासूनची नाणेवारी तसेच कोअर बँकिंग, केवायसी पूर्तता याविषयीची माहिती घेतली.

काही शाखांची विशेष चौकशी

जिल्हा बँकेच्या मुख्यालयात आवश्यक ती माहिती घेतल्यानंतर शनिवारी तपासणी पथक परत गेल्याची चर्चा होती. परंतु रविवारी मिळालेल्या माहितीनुसार बँकेच्या एकूण शाखांपैकी सहा शाखांमध्ये महिन्याच्या, वर्षाच्या सरासरीपेक्षा अधिकची रक्कम जमा झाल्याचे समोर आले. यामध्ये इस्लापूर, कवठेमहांकाळ, सांगलीतील मार्केट यार्ड, शाखा, तासगाव, शिराळा आणि सावळज ( ता. तासगाव) या शाखांचा समावेश आहे. इस्लामपूर, कवठेमहांकाळ आणि मार्केटयार्ड शाखेची स्वतंत्रपणे शनिवारीच तपासणी करण्यात आली. रविवारी तासगाव, शिराळा आणि सावळज शाखांमधील व्यवहाराची तपासणी झाल्याचे सांगण्यात आले. तपासणीबाबत संबधित पथकाने कमालीची गुप्तता पाळली असून, पथकातील अधिकाèयांनी माहिती देण्यास नकार दिला आहे.


कारभार पारदर्शी असल्याने आम्ही निश्चिंत

ज्या जिल्हा बँकांचा व्यवहार योग्य आहे. त्या बँकांवरील अर्थिक निर्बंध उठवून या पूर्वी बँकेने स्वीकारलेल्या नोटा भरून घ्याव्यात आणि नवीन चलनाचा पुरेसा पुरवठा करावा, अशीच आमची मागणी आहे. त्यामुळे नाबार्डकडून होत तपासणी योग्यच आहे. सांगली बँकेचे सर्व व्यवहार चोख असल्याचे प्रमाणपत्र नाबार्डनेच यापूर्वी दिलेले आहे. ज्या शाखांमध्ये सरासरीपेक्षा अधिकची नाणेवारी दिसत आहे. त्या ठिकाणीही अडचण नाही. २१७ शाखा आहेत. १ लाख ४५ हजार खातेदार आहेत. त्यांनी केलेला भरणा हा नियमानुसारच आहे. काळजी करण्याचे कारण नाही. तपासणी वेळेत पूर्ण करावी. पाचशे, हजारच्या नोटांमध्ये बँकेत जमा असलेले ३१५ कोटी रुपये आरबीआयने स्वीकारावेत. कारण त्यावरच्या व्याजाचा भूर्दंड बँकेला बसत आहे. नवीन चलन पुरवठा करून ग्रामीण भागातील खातेदारांची अडचणीतून सुटका करण्यासाठी बँकेला सहकार्य करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोमाज हॉस्पिटलमध्ये तोडफोडडॉक्टरांच्या हलगर्जीमुळे पेशंट दगावल्याचा आरोप

0
0



म. टा. वृत्तसेवा, मिरज

शहरातील वंटमुरे कॉर्नरजवळ डॉ. जी. एन. भोमाज हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे पेशंट दगावल्याचा आरोप करून मयत पेशंटच्या नातेवाईकांना हॉस्पिटलची तोडफोड केली. दादासाहेब बाळकृष्ण जाधव (वय ५१ रा. इरळी ता. कवठेमहांकाळ) असे मयताचे नाव असून, रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. मयताच्या नातेवाईकांकडून महात्मा गांधी चौक पोलिसांत डॉक्टरांच्या विरोधात तक्रार देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील शेतकरी दादासाहेब जाधव रविवारी सकाळी शेतात ट्रॅक्टरवरून पडून जखमी झाले होते. त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने सकाळी साडेदहा वाजता उपचारासाठी मिरजेतील डॉ. मगदूम हॉस्पिटलमध्ये आणले होते. मात्र, डॉ. मगदूम यांनी अधिक उपचारासाठी पेशंटला डॉ. जे. एन. भोमाज हॉस्पिटलमध्ये पाठविले. रविवार असल्याने हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती. तरीही डॉ. भोमाज यांनी पेशंटला दाखल करून घेतले. मात्र, काही वेळात दादासाहेब जाधव यांचा मृत्यू झाला. अवघ्या अर्धा तासातच पेशंटचा मृत्यू झाल्याने जाधव यांचे नातेवाईक संतप्त झाले. डॉक्टरांनी वेळेवर ऑक्सिजनसह अन्य अतिदक्षता विभागाचे उपचार केले नसल्याने जाधव यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या काचा, कुंड्या फोडल्या. अचानक हा प्रकार घडल्याने पोलिसही घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी मयत जाधव यांच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी पोलिसांनी मयत शवविच्छेदनासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला.

डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच दादासाहेब जाधव यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टर भोमाज यांच्या विरोधात मयत जाधव यांचे भाचे सचिन शिवाजी चव्हाण (रा. सांगली) आणि इतर नातेवाईक महात्मा गांधी पोलिसांत तक्रार देण्यास गेले. रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलकापूर नगरपंचायत कॅशलेस

0
0

कराड : नोटाबंदीवर उपाय म्हणून मलकापूर नगरपंचायतीने (ता. कराड) कराड अर्बन बँकेच्या साह्याने करवसुलीसाठी स्वाइप मशिनचा वापर सुरू केला आहे. राज्यात स्वाइप मशिनने कर वसुली करणारी ही पहिलीच नगर पंचायत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या कॅशलेस कर प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला.
मलकापूरमधील आगाशिवनगर भागातील नूतन मराठी शाळेच्या आवारात आयोजित कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्याकडे स्वाइप मशिन सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी आमदार आनंदराव पाटील, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, नगराध्यक्षा कल्पना रैनाक, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बाळासाहेब कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सतेज पाटील म्हणाले, माजी आमदार भास्करराव शिंदे यांच्या प्रयत्नांतून मलकापूर नगरपंचायतीने नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. नगरपंचायतीने पहिल्यांदाच कॅशलेस कर प्रणालीचा उपक्रम सुरू केला आहे. याचा निश्चितपणे फायदा नागरिकांना होऊन नगरपंचायतीचेही उत्पन्न वाढेल.
जोशी म्हणाले, सध्या नोटाबंदीमुळे नागरिकांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी आग्रह केला जात आहे. हा प्रयत्न भविष्याचा कानोसा घेऊन केला जात असून, मलकापूर नगरपंचायतीने राबवलेला उपक्रम हे त्याचेच एक उदाहरण आहे.
आनंदराव पाटील, मनोहर शिंदे, अजित पाटील-चिखलीकर यांचीही भाषणे झाली. मुख्याध्यापक ए. व्ही. पाटील यांनी स्वागत केले. ज्ञानदेव साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार आनंदराव सुतार यांनी मानले.

आनेवाडी टोलनाक्यावर
मशिनद्वारे टोलवसुली

पुणे-बेंगळुरू महामार्गावर आनेवाडी टोल नाक्यावर सर्वच बूथवर स्वाइप मशिन ठेवण्यात आल्या आहेत. याद्वारे डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे टोल देण्याची सुविधा असून, त्यासोबतच पेटीएम अॅपद्वारेदेखील टोल घेण्यात येत आहे. या टोलनाक्यावरून दिवसाला साधारणत: सात ते आठ हजार वाहने ये-जा करतात. सुमारे एक हजार वाहनधारकांकडून कॅशलेस सुविधेचा वापर करीत आहेत.
यातून वेळेची बचतही होत आहे. तसेच सुट्या पैशांवरून सतत होणारे वादही कमी झाले आहेत. या सुविधेमुळे सुट्या पैशांची चणचणही थांबली आहे. या सुविधेची माहिती अधिकाधिक वाहनचालकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया टोल नाक्याचे व्यवस्थापन अधिकारी अविनाश फरांदे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजा संघटनेचा कराडजवळ रास्ता रोको

0
0



कराड : नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना बसलेल्या फटक्याकडे लक्ष वेधण्यासाठी बळीराजा संघटनेच्या वतीने सोमवारी दुपारी मलकापूर येथे ढेबेवाडी फाट्यावर केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मोफत भाजीपाला वाटून निषेध व्यक्त करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अघोषित आर्थिक आणीबाणी लागू केली आहे. सर्वसामान्य जनता व शेतकरी, शेतमजूर वेठीस धरला जात असून, सरकारने यावर तातडीने योग्य तो निर्णय न घेतल्यास बळीराजा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा पाटील यांनी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांसमोर बोलताना दिला. शहर पोलिसांनी १२ आंदोलकांना अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले.
आंदोलनस्थळावर शेतकऱ्यांसमोर बोलताना पंजाबराव पाटील म्हणाले, नोटाबंदीमुळे शेतमालाचे बाजारभाव पूर्ण ढासळले आहेत. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारने घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान भरून द्यावे व शेतीसाठी घेतलेले कर्ज संपूर्ण माफ करावे. सरकारने शेतीमाल योग्य किमतीला खरेदी करावा, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत, असे पंजाबराव पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी रास्ता रोको करीत महामार्गाजवळ परिसरातील नागरिकांना मोफत भाजीपाला वाटप केले. या आंदोलनामुळे कराड-ढेबेवाडी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. चंद्रकांत यादव, विश्वासराव जाधव, साजिद मुल्ला, विक्रम थोरात, दीपक पाटील आदी आंदोलनात सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालनाट्य स्पर्धेत दुस‍ऱ्या दिवशी रंगत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचलनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतंर्गत दुसऱ्या दिवशी रविवारी सादर झालेल्या नाटकांना रसिकांनी दिलखुलास दाद दिली. शाहू स्मारक भवन येथे आज दिवसभरात दोन नाट्यप्रयोग सादर झाले.

आजच्या दिवसाची सुरूवात ‘बीज पेरूया अंगात’ (नाट्यविद्यामंदिर, सांगली) या नाटकाने झाली. सध्याच्या परीक्षा आणि शिक्षण पद्धती यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्या मनावरील ताणाचा परिणाम मुलांच्या आत्महत्या करण्यापर्यंत कसा होतो हा विषय या नाटकातून मांडण्यात आला आहे. निवेदन आणि सादरीकरण यातून हे नाटक उलगडत जाते. सव्वा अकरा वाजता ‘जाईच्या कळ्या’ (अक्षरसिंधू साहित्य कलामंच, तुलमठ) या नाटकाचा प्रयोग झाला.


आजचे नाट्यप्रयोग

सकाळी १०.०० डम डबोला (अण्णा भाऊ साठे स्कूल, आजरा)
सकाळी १०.०० डम डबोला (अण्णा भाऊ साठे स्कूल, आजरा)
सकाळी ११.१५ म्या बी शंकर हाय (बाबा वर्दम थिएटर, कुडाळ)
दुपारी १२.३० खेळता खेळता (बहुरूपी कलामंच, कोल्हापूर)
दुपारी १.४५ मोल क्षणांचे (बापूसाहेब खवाटे हायस्कूल, अंकली)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकटात सापडलेल्या मुलांसाठी हेल्पलाइन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संकटात सापडलेल्या मुलांच्या मदतीसाठी १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्या, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी केले. महिला व बाल विकास क्षेत्रात कार्यरत चाइल्डलाईन सल्लागार समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर म्हणाले, आतापर्यंत ५९७ मुलांना संकटातून बाहेर काढून पुनर्वसन केले आहे. बालहक्कासंदर्भात स्वयंसेवी संस्थाना मदत केली जाईल. बालहक्कासंदर्भात सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून मुलांच्या समस्यांचे तात्काळ निराकरणात पुढाकार घ्यावा. अनाथ, निराधार, भरकटलेले ,शारिरीक, लैंगिंक शोषणास बळी पडलेले बालक, कौटुंबिक कलहात सापडलेले बालक, बालमजूर, बालभिक्षेकरी, बालविवाहाची माहिती मिळाल्यास त्वरीत चाईल्डलाईनशी त्वरीत संपर्क साधावा. सरकारने बालविवाह रोखण्यासाठी गावपातळीवर प्रभावी यंत्रणा उभी करण्यासाठी ग्रामसेवकांनाही बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. समन्वयक अनुजा खुरंदळ उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी महिला व बालविकास विभागाचे परिविक्षा अधिकारी बी. जी. काटकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख, बालविकास प्रकल्पाधिकारी वैभव कांबळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक वैष्णवी पाटील, रेल्वेचे प्रबंधक सुग्रीव मीना आदी उपस्थित होते. चाइल्डलाइन सेवेचे संचालक फादर रोशन यांनी यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वातंत्र्यलढ्यात उषा मेहतांचे योगदान मोलाचे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘इंग्रजी राजवटीविरुद्ध जनमत संघटित करण्याच्या कामी उषा मेहता यांनी मोलाचे योगदान दिले. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यात विद्यार्थी आणि महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, अशा भूमिकेतून या घटकांना स्वातंत्र्य चळवळीत उतरण्यास प्रेरित करण्यास त्यांनी प्राधान्य दिले,’ असे प्रतिपादन मुंबईच्या मणी भवन येथील प्रा. उषा ठक्कर यांनी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि राज्यशास्त्र अधिविभाग यांच्या वतीने आयोजित उषा मेहता स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत पहिल्या व्याख्यानात '१९४२ची चळवळ आणि उषा मेहता' या विषयावर प्रा. ठक्कर बोलत होत्या. विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील नीलांबरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा.अशोक चौसाळकर होते.

प्रा. ठक्कर म्हणाल्या, ‘स्थानिक भाषेबरोबरच इंग्रजी भाषा आत्मसात केल्यास जगाचे ज्ञान आपल्या कवेत घेणे शक्य होईल, असे उषा मेहता यांचे म्हणणे होते. १९४२मध्ये मुंबईमधील विविध ठिकाणाहून काँग्रेस रेडिओच्या न्यूज बुलेटीनद्वारे देशबांधवांमध्ये इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुध्द जनजागृती करण्यामध्ये त्यांनी मोठे योगदान दिले. स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींची माहिती या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत असत. न्यूज बुलेटीन सादर करण्यासाठी अनेक अडथळे पार करताना इंग्रजींच्या वक्रदृष्टीपासून लांब राहण्यासाठी न्यूज बुलेटीन केंद्र अनेक वेळेस त्यांना बदलावे लागले.’

अध्यक्षीय भाषणात प्रा. चौसाळकर म्हणाले, ‘शिवाजी विद्यापीठात गांधी अभ्यास केंद्र सुरु करण्यामध्ये युजीसी समिती सदस्य म्हणून उषा मेहता यांचा महत्त्वाचा वाटा आहे. उषा मेहता यांनी लिहून ठेवलेले प्रबंध अद्यापही प्रकाशित झालेले नाहीत. तो प्रबंध प्रकाशित होऊन त्यामधील बाबींचा ऊहापोह होणे आवश्यक आहे. तुरुंगवासाच्या काळात त्यांची पचनशक्ती नष्ट झाली. आयुष्याची ८० वर्षे त्या सातत्याने कार्य करीत होत्या. समाजातील सर्व प्रकारच्या प्रश्नांवर त्या तळमळीने चर्चा करीत असत. मुंबई विद्यापीठात पीएच.डी.च्या मार्गदर्शक असताना एक-एक शब्दासाठी त्या दहा-दहा मिनिटे विचार करीत असत.’

गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूर्यकांत गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रवींद्र भणगे यांनी आभार मानले. यावेळी राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. अरुणा पेंडसे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायगडावरील तलवारीचे काम पूर्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रायगडावरील मेघडंबरीमध्ये बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामधील अर्धी तलवार गायब झाल्यानंतर रविवारी तातडीने हुबेहूब तलवार करण्यात आली. कोल्हापुरातील शिल्पकार सतिश घारगे यांच्या घरी पोलिस बंदोबस्तात हे काम पुर्ण करण्यात आले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे कार्यकर्ते तलवार घेऊन सायंकाळी रायगडला रवाना झाले. सोमवारी (ता. १२ डिसेंबर) सूर्योदयावेळी ही नवी तलवार बसवण्यात येणार आहे.

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य‌ाभिषेक सोहळा झाला. त्याच ठिकाणी २००९ साली शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बसवला. तो पुतळा येथील शिल्पकार सतिश घारगे यांनीच केला आहे. तो पंचधातूचा असून त्याचे वजन ८५० किलो आहे. त्यामध्ये तलवारीची लांबी ५० इंच लांब आणि वजन ३५ किलो इतके होते. या तलवारीचा सुमारे सात इंचाचा भाग गायब झाला आहे. पुतळ्याचे काम घारगे यांनी केल्याने नवीन तलवारी बसविण्यासाठी तातडीने त्यांनाच सांगण्यास सां​गितले.

खासदार संभाजीराजे छत्रपती रविवारी तातडीने रायगडावर पोहचले. पाचगावमधील शांतीनगर येथील घारगे या शिल्पकाराच्या घरी शनिवारी रात्री तीनपासून तलवार तयार करण्याचे काम सुरू झाले. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता तलवारीचे काम पुर्ण झाले. त्यानंतर ती नवीन तलवार घेऊन पोलिसांसोबत स्वत‍ः घारगे, फत्तेसिंह सावंत व अन्य कार्यकर्ते रायगडला रवाना झाले. तलवारीचे काम सुरू असताना शिल्पकार घारगे यांच्या घरात रायगड येथील दहा पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. कुणालाही शिल्पकाराला भेटू दिले नाही. हे काम ‌इतक्या पोलिस बंदोबस्तात ‌आणि गोपनियरित्या का केले जात आहे याचीच चर्चा त्या परिसरात होती.

दरम्यान, पूर्वी पुतळा बनविण्याच्या कामात असलेले इतिहास संशोधक, इंद्रजित सावंत हे रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घारगे यांच्या घरी गेले. मात्र तलवारचे काम पाहण्यासाठी घारगे यांच्या घरात जाण्यास त्यांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे त्यांची वादावादी झाली. याबाबत सावंत यांनी, ‘इतकी गोपनियता कशासाठी? इतका बंदोबस्त रायगडावर ठेवला असता तर तलवार गायबच झाली नसती’, अशा शब्दात पोलिसांना सुनावले. दरम्यान, सकाळी भाजप व युवा मोर्चाच्यावतीने शिवाजी चौकामधील ​छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिषेक घालण्यात आला.


पंचधातूपासून पुतळा बनवण्यात आला आहे. तलवारीचा भाग पुतळ्यापासून थोडा बाहेर होता. पुतळ्याला हार घालण्यासाठी अनेकजण जात असतात. त्यांच्याकडून वारंवार पडणाऱ्या दाबामुळे कदाचित हा प्रकार झाला असण्याची शक्यता आहे. या प्रकाराचे गांभीर्य जाणून मी स्वत‍ः रायगडावर पोहचलो. दिवसभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन संपर्क साधून पुतळ्याच्या परिसरात लाइट, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबरोबरच पुर्णवेळ सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहे. नवीन तलवार घेऊन कार्यकर्ते कोल्हापुरातून निघाले आहेत. सोमवारी सकाळी नवीन तलवार बसवण्यात येणार आहे.

संभाजीराजे छत्रपती, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संविधानासाठी बहुजनांचा हुंकार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संविधानाच्या सन्मानार्थ आणि अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने आज, रविवारी कोल्हापुरात संविधान सन्मान महामोर्चा काढण्यात आला. अनुसूचित, जाती, जमातींसह, भटक्या विमुक्त जाती, बौद्ध तसेच ओबीसी, मुस्लीम आणि धनगर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात सुमारे चार ते पाच लाख नागरिक सहभागी झाल्याचा दावा संयोजकांनी केला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मूक मोर्चाची सांगता जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर झाली.

संविधान सन्मान महामोर्चाची सुरुवात दसरा चौकातून करण्यात आली. सकाळपासून चौकात मोर्चासाठी तरुण कार्यकर्ते, महिला आणि तरुणींची गर्दी होत होती. दुपारी साडे बाराच्या सुमारास क्रांती कांबळे या तरुणीच्या हस्ते चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाले. सौ. अस्मिता दिघे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. त्यानंतर उषा कांबळे, सायली शिंगे, काजल कांबळे, उज्ज्वला कांबळे, प्रणाली रानगे, ज्योती बुद्ध्याळकर यांनी मनोगत व्यक्त केले. संविधानाचा सन्मान करावा, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, अशा आशयाचे विचार त्यांनी मनोगतामध्ये मांडले.

तरुणींच्या मनोगतानंतर मूक मोर्चाला सुरूवात झाली. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ओबीसींची जात निहाय जनगणना व्हावी, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, या मागण्यांचे फलक घेऊन कार्यकर्ते, तरुणी मोर्चात सहभागी झाले होते. दसरा चौकातून व्हिनस कॉर्नर, बसंत बहार टॉकीज मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आला.

मोर्चात सहभागी झालेले सर्वजण प्रवेशद्वारावर थांबले. दसरा चौकात मनोगत व्यक्त केलेल्या मुलींसह इतर काही मुलींनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. मोर्चातील मागण्यांचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. सरकारकडे मागण्या पाठवाव्यात अशी मागणी मुलींनी केल्यानंतर जिल्हाधिकारी काटकर यांनी तातडीने मागण्या सरकारकडे देण्याची ग्वाही दिली. निवेदन दिलेल्यामुली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारवर आल्यानंतर राष्ट्रगित झाले आणि मोर्चाची सांगता झाली.

संविधान मोर्चातील मागण्या

अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी
खैरलांजी, कोपर्डी बलात्कारित गुन्हेगारांना त्वरीत फाशी द्या
मराठा, मुस्लिम, धनगर जातींना लोकसंख्या प्रमाणात आरक्षण
खासगी क्षेत्राला आरक्षण लागू करा
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती द्या
महिलांवरील अत्याचारास पायबंद घालण्यासाठी ठोस उपाययोजना करा
रेनके आयोगाची अंमलबजावणी करा
राखीव ऐवजी मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करा
ओबीसीची जातनिहाय जनगणना करा
मंडल व सच्चर आयोगाची अंमलबजावणी करा
जमिनीचे राष्ट्रीयीकरण करुन समान वाटप करा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडाप जोरात, एसटी गाळात

0
0

अवैध प्रवासी वाहतुकीचे जाळे घट्ट, एसटीला रोज लाखाचा तोटा

कोल्हापूर ः जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकीचे जाळे दिवसेंदिवस घट्टच होत चालले आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या एसटीला बसत आहे. अवैध वाहतुकीवर कारवाईचा दिखाऊपणा दोनच दिवसांचा असतो. पुन्हा या ठिकाणाहून अवैध प्रवासी वाहतूक सुरू होते. त्यामुळे आरटीओचे वायूवेग पथक आणि एसटीच्या भरारी पथकाची कार्यक्षमता संशयाच्याच भोवऱ्यात आहे.

मध्यवर्ती बसस्थानकाच्या सुमारे २०० मीटर परिसरात वाहने उभी करू नये, या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात एसटी प्रशासन आणि खासगी ट्रॅव्हल्स मालकांत सध्या वाद सुरू आहे. या वादातच एसटीचा आयता प्रवासी पळ‍विण्यात खासगी वाहतूकदारांनी टॉप गिअर टाकला आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांनी एसटीच्या पुढे एक पाऊल टाकले आहे. या अवैध वाहतुकीमुळे जिल्हा आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीचा प्रवासी एसटीकडून खेचला जात आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसत आहे. एसटीला त्यामुळे सरासरी एक लाखाचा फटका रोज बसतो. एसटी स्थानकाच्या बाहेर रोजच अवैध प्रवासी वाहतुकीतील वाहने मोठय़ा प्रमाणावर थांबतात. अनेकदा या प्रवासी वाहतुकीतील मंडळी एजंट थेट एसटी बसस्थानकात जातात. कमी किमतीत प्रवास भाड्याचे आमिष दाख‍विले जाते. कोल्हापूर-पुणे, मुंबईसाठी असलेल्या एसटी तिकीट दरापेक्षा तीस ते चाळीस टक्के सवलत दिली जाते. अनेकदा बसस्थानकात जात असलेल्या प्रवाशांना रस्त्यातच अडवून आणि कमी प्रवास भाड्याचे आमिष दाखवून या वाहतुकीकडे ओढले जाते.

परवाना नसतानाही...

अवैध प्रवासी वाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांकडे कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना नसतो. सर्वच वाहने खासगी परवान्याचची असल्याने प्रवाशांची वाहतूक धोकादायक ठरू शकते. पुणे-मुंबई महामार्ग व द्रुतगती मार्गावर अनेकदा या वाहनांचे अपघात झाले आहेत. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला तर काही गंभीर जखमी झाले. प्रवासी वाहतुकीसाठी अवैध असल्याने खासगी प्रवासी वाहनांना अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना विमा किंवा इतर कोणत्याही प्रकारची भरपाई मिळत नाही.

०००

चंदगड, कागलच का?

आरटीओकडे अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी वायूवेग पथक ( फ्लाइंग स्कॉड) आहे. मात्र अनेकदा हे पथक अवजड वाहनांवर कारवाई करण्यातच धन्यता मानते. काही मोटार वाहननिरीक्षकांचा ताफा कायम चंदगड आणि कागल चेकपोस्टवरच असतो. त्यामुळे शहरातील अवैध वाहनांवर कारवाईकडे दुर्लंक्ष केले जाते. अवैध वाहतुकीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि एसटी पथकाकडून कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई तोकडी आहे. केवळ कागदावर कारवाई केल्याचे चित्र दाख‍विले जाते. पुन्हा दोन दिवसांनी ठरलेल्या ठिकाणाहून अवैध वाहतूक सुरूवात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहनशिलतेचा कडेलोट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बँक बंद आणि एटीएमही बंद असल्याने दोन दिवसांपासून पैसे मिळवण्यासाठी नागरिकांना होत असलेल्या त्रासाचा सोमवारी कहरच झाला. जवळपास सर्वच एटीएम बंद असल्याने सुरू असलेल्या एटीएमचा शोध नागरिक घेत होते. दिवसभर स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम सुरू असल्याने तिथे मोठ्या रांगा होत्या. दरम्यान, तीन दिवसानंतर मंगळवारी बँकेचे व्यवहार सुरू होणार असल्याने प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच या आठवड्यात नवीन नोटा येण्याची शक्यता बँकेच्या सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

महिनाभरापासून पैसे मिळवण्यासाठी बँकेतील रांगेत किंवा एटीएमच्या रांगेत उभे रहावे लागत होते. दिवसभर उन्हाची, मध्यरात्री थंडीची पर्वा न करता महिलांसह नागरिक या रांगेत उभे राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून मात्र ​चित्र आणखीच वाईट झाले. बँकांमधील पैसे संपल्याने अगदी कमी पैसे दिले जाऊ लागले. त्यासाठी दोन, तीनदा हेलपाटे मारावे लागले. दुसऱ्या शनिवारची सुटी, रविवार व सोमवारी ईदची सुटी जोडून आल्याने व्यवहार बंद राहिले. त्याचा ताण साहजिकच एटीएमवर येणार होता. त्याप्रमाणे शनिवारी रात्रीच अनेक एटीएम पैसे नसल्याने बंद पडली. स्टेट बँक ऑफ इंडियाची वेगवेगळ्या भागातील अगदी पाचच्या आसपास एटीएम सुरू होती. रविवारी काही खासगी बँकांचे एखादे एटीएम सुरू झाले, पण काही वेळातच ते बंद पडले ते अजूनपर्यंत सुरू झालेले नाही.

रविवारी रात्री स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्वच एटीएम बंद झाली. यामुळे सोमवारी दिवसभर पैसे मिळणार नाहीत अशीच शक्यता होती, पण सोमवारी सकाळी शहरातील पाचच्या आसपास एटीएममध्ये पैसे भरण्यात आले. त्यामुळे नागरिकांची सोय झाली. दिवसभर ठिकठिकाणी जाऊन नागरिक एटीएम सुरू आहे की नाही हे पाहत होते. त्यामुळे ज्या ठिकाणी सुरु होते, तिथे मोठी रांग दिसत होती. अनेकजण पैसे संपले तरी बँकेची यंत्रणा पैसे भरेल या आशेने अनेक नागरिक तिथेच थांबून रहात होते.

मंगळवारी बँक सुरू होणार असल्याने तीन दिवसांपासून थांबलेल्या व्यवहारांसाठी नागरिक मोठी गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही बँकांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात रिझर्व्ह बँकेकडून नवीन नोटा येण्याची शक्यता आहे. त्यानंतर थोडा फरक पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, दूध उत्पादकांना बिलांचे पैसे देण्यासाठी गोकुळने रोख रक्कम देण्याची व्यवस्था केली आहे. त्यातून रोज ४५ लाखांचे वितरण केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायगडावरील शिवपुतळ्याची तलवार नव्याने

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीतील पुतळ्याची तलवार सोमवारी बदलण्यात आली. या पुतळ्याची तलवार गेल्या शनिवारी मोडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. शिल्पकार सतीश घारगे यांनी या तलवारीसारखीच नवीन तलवार तयार केली. शनिवारी रात्री आणि रविवारीही हे काम सुरू होते. रविवारी संध्याकाळी तलवार घेऊन येथील कार्यकर्ते रायगडाकडे रवाना झाले. सोमवारी सूर्योदयापूर्वी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पुतळ्याच्या ठिकाणी नवी तलवार बसविण्यात आली.

रायगडावरील शिवरायांच्या पुतळ्यावरील तलवारीचा काही भाग गायब झाल्याचे शनिवारी उघड झाले होते. त्याचदिवशी रात्री शिल्पकार घारगे यांच्या कार्यशाळेत तलवार तयारीचे काम अत्यंत गोपनीय आणि पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, उदय घोरपडे, विनायक फाळके, राहुल शिंदे, सागर दळवी, अमर पाटील, आदी शिवभक्त महाड पोलिसांच्या बंदोबस्तात ही तलवार घेऊन रायगडाकडे रवाना झाले. पहाटे चार वाजता हे सर्वजण रायगडावर पोहोचले. शिल्पकार घारगे यांनी आधीची तलवार बदलली. त्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास खासदार संभाजीराजे यांच्याहस्ते नव्याने तयार केलेली तलवार बसविण्यात आली. कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्यासह पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तातडीने संपर्क साधून गडावरील सुरक्षेसंबंधी चर्चा केली. तेथे दोन सीसीटीव्हीही बसविण्यात आले. लाइटची सोय करण्यात आली. गडावरील महत्त्वाच्या ठिकाणी कायमस्वरूपी आणखी सीसीटीव्ही आणि दिवे बसवावेत, अशी मागणी यावेळी शिवभक्तांनी खासदार संभाजीराजे यांच्याकडे केली. यासंबंधी पाठपुरावा करण्याची ग्वाही संभाजीराजे यांनी दिली.

……………..

कोट

सकाळी सहा वाजता खासदार संभाजीराजे यांच्याहस्ते ‌शिवपुतळ्याची तलवार बसविण्यात आली. सुरक्षेसाठी तेथे दोन सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. ही तलवार मोडण्याचा कुणी खोडसाळपणा केला असल्यास त्याचाही पोलिसांनी शोध घ्यावा, अशी आमची मागणी आहे.

फत्तेसिंह सावंत, अध्यक्ष, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती

………

सरकारकडून गोपनीयता

शिल्पकार सतीश घारगे यांच्या पाचगावमधील कार्यशाळेत नवी तलवार तयार करण्यात आली. त्यावेळी तेथे कुणालाही जाऊ देण्यात आले नाही. तलवार करतानाची प्रक्रिया उघड केली नाही. त्यांच्या मोबाइलवरही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. ही गोपनीयता सरकारच्या आदेशानुसारच ठेवण्यात आल्याचे सोमवारी स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशांसाठी धावाधावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन दिवसांपासून बंद असलेल्या बँकांमुळे एटीएममधूनच पैसे काढले गेल्याने शहरातील जवळपास सर्वच एटीएम सोमवारी बंद होती. केवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची पाच एटीएम दिवसभर सुरू होती. त्यामुळे या एटीएमसमोर दिवसभर मोठ्या रांगा होत्या. एटीएमच्या शोधात शहरभर वणवण अशीच परिस्थिती नागरिकांची झाली होती.

नोटाबंदीनंतर बँकांमधून व्यवहारांवर ताण पडल्याने अनेकांनी एटीएमचा मार्ग अवलंबला. पण तिथेही शंभर रुपये व दोन हजार रुपयांच्या नोटा दिल्या जात होत्या. त्या नोटांमधील शंभरच्या नोटा लवकर संपत असल्याने दोन हजार रुपयांच्याच नोटा मिळत होत्या. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून नागरिकांची ओढाताण सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यापासून तर शहरातील बहुतांश एटीएम बंद पडली होती. काही ठराविकच एटीएम सुरू असत. सलग तीन दिवस बँकेला असलेल्या सुट्यांमुळे एटीएमवर ताण येणार होता. त्यानुसार शनिवारी पहिल्याच दिवशी सायंकाळी नियमित सुरू असणारी मोजकी एटीएम पैसे संपल्याने बंद पडली. त्यातील काही एटीएममध्ये रविवारी पैशांचा भरणा करण्यात आला. पण ती मंगळवारी सकाळपर्यंत तग धरतील याची शक्यता कमी होती. रविवारी रात्री स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मोजक्या सुरू असलेल्या एटीएमसह अनेक बँकांची एटीएम रिकामी झाली. अनेकांची शटर रात्री बंद करण्यात आली होती.

सोमवारी सकाळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या एजन्सी कंपनीमार्फत काही ठराविक एटीएममध्ये पैशांचा भरणा करण्यात आला. त्यामध्ये ट्रेझरी शाखा, दसरा चौक, ताराबाई पार्क, राजारामपुरी, आदित्य कॉर्नर या पाच एटीएमचा समावेश होता. या एटीएममध्ये दोन हजार रुपयेच मिळत असले तरी त्यासाठी बराच वेळ घालवावा लागत होता. त्यामुळे भली मोठी रांग या एटीएमसमोर लागल्याचे चित्र होते. अनेक नागरिक तर कोणते एटीएम सुरू आहे हे पाहण्यासाठी शहरभर फिरत होते. त्यामुळे जिथे एटीएम सुरू दिसेल, तिथे थांबत होते. त्या दरम्यान जरी पैसे संपले तरी नागरिक रांगेतून बाजूला जात नव्हते. यामुळे शटर ओढलेले दिसत असले तरी बाहेर नागरिकांची रांग पाहायला मिळत होती. रात्री त्यातीलही काही एटीएममधील पैसे संपले. त्यामुळे अनेकांना मंगळवारी बँकेचे व्यवहार सुरु होण्याची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय राहिले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोटाबदलीसाठी एजंटांचा सुळसुळाट

0
0

satish.ghatage

@timesgroup.com

Tweet : @satisgMT

कोल्हापूर : नोटा बदलून घेण्यासाठी अवघे १८ दिवस शिल्लक राहिल्याने काळा पैसेवाल्यांची धावाधाव सुरू झाली आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी काळा पैसेवाले सरसावले आहेत. बँक अधिकारी, पोलिस व एजंट अशा त्रिकुटांच्या संगनमताने नोटाबंदीचे सोपस्कार पार पडत असल्याची चर्चा दबक्या आवाजात ग्रामीण भागात सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र नोटा बदलीसाठी एजंटांचा सुळसुळाट सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरला पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्यानंतर काळा पैसा असलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहे. ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांनी खासगी संस्थांचे नोकर, शिक्षक, प्राध्यापकांचे एक वर्षाचे पगार देऊन मिरविले. काहींनी नातेवाइक व त्यांच्या मुलांच्या नावावरही बँकेत नोटा भरल्या आहेत. गुजरीत सोने खरेदीसाठी झुंबड उडाली होती. या घाईत काहींनी हात धुऊन घेतले. नोटा बदलून देणाऱ्या एजंटांचा सुळसुळाट नऊ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. ३० ते ४० टक्के कमिशन घेऊन एजंटांनी नोटा बदलल्या, तर काहींनी पोस्टाच्या रांगेत उभा राहून पाचशे व हजार रुपयांच्या बदलून देईल त्यांना साधारण अडीच हजार रुपयांसाठी २०० ते २५० रुपये कमिशन दिले होते. नगरपालिका निवडणुकीत सर्व पक्षाच्या नेत्यांनी ५०० व १००० च्या नोटा वाटून मतदारांना खूश करून दानशूरपणाचा आव आणला.

काही मंडळी मात्र ३० डिसेंबरला मुदतवाढ मिळेल म्हणून वाट पाहत होते, पण रिझर्व्ह बँकेच्या रोज निघणाऱ्या आदेशामुळे नोटा बदलण्यासाठी काळ्या पैसेवाल्यांची धावाधाव सुरू झाली. ज्यांच्याकडे नोटा आहेत त्यांनी एजंट नेमले आहेत. एजंट मंडळी व्यापारी, उद्योगपती व काळ्या धंद्यातील लोकांना गाठून नोटा बदलून देत आहेत. १० ते ३० टक्के कमिशनचा धंदा जोरात फोफावला आहे. त्यामध्ये गांधीनगर, इचलकरंजी, कऱ्हाड, बेळगाव, कागल, राधानगरी, निपाणी, गोवा, कोकण परिसरातील एजंट सक्रिय झाले आहेत. त्यासाठी मोबाइलवर व्यवहार सुरू आहेत.

नोटा बदलून घेण्यासाठी एक ठिकाण निश्चित न करताना ठिकाणे सातत्याने बदलण्याची खबरदारी घेतली जात आहे. असे व्यवहार करण्यासाठी काही पोलिस कर्मचारी व त्यांचे नातेवाइक टीप्स देत असल्यानेच मोठे व्यवहार होत असल्याची चर्चा सुरू

आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत्यूनंतरही तिने दिले नवजीवन

0
0

Janhavi.Sarate@

timesgroup.com

Tweet : @MTjanhavisarate

कोल्हापूर ः जन्मदात्या आईचा ब्रेन डेड झाला. मोठ्या दुःखातून ते सर्वजण सावरले. मात्र काही वेळाने दुःखातिरेक सहन करून नातेवाईकांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. अवयव दान करून या कुटुंबाने पाचजणांना जीवनदान दिले. आज याच पाचजणांमध्ये ते आपल्या आईच्या मायेचा उबदारपणा अनुभवत आहेत. ही कहाणी आहे शाहूवाडीतील कमल कांबळे यांच्या कुटुंबाची.

ऑक्टोबरमध्ये ६५ वर्षीय कमल कांबळे-सरुडकर यांना ब्रेन स्ट्रोक होऊन रक्तस्राव झाला होता. मुलगा डॉ. संतोष कांबळे यांनी नातेवाईकांशी सल्लामसलत करून त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र तरीही तब्येतीत सुधारणा झाली नाही. ब्रेनडेड झाल्यानंतर डॉ. संतोष यांचे भाऊ रणजीत यांनी त्यांचे अवयवदान करण्याचे सूचविले. सर्वच नातेवाईकांनी त्यांना होकार दिला. निर्णय डॉक्टरांना सांगितल्यानंतर सर्व त्या प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या.

पुण्यातील एका हॉस्पिटलची टीम दाखल झाली. त्यांनी कांबळे यांचे सर्व अवयव प्रत्यारोपणासाठी सुस्थितीत असल्याचा अहवाल दिला. हॉस्पिटलमधील ब्रेन स्टेम डेथ डिक्लेरेशन कमिटीने रात्री निर्णय घेतल्यानंतर अवयव काढण्यात आले. त्यानंतर अवघ्या काही तासांत पुण्यातील पाच रुग्णांवर अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया करण्यात यश आले.

झेडटीसीसी कमिटीकडे पुणे झोनमध्ये ज्या रुग्णांना अवयवची गरज आहेत, त्यांची वेटिंग लिस्ट असते. त्यानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे परिसरातील रुग्णांच्या नंबरप्रमाणे अवयव प्रत्यारोपण केले जाते. कांबळे यांचे अवयव काढल्यानंतर पुण्यातील पाच रुग्णांवर यशस्वी प्रत्यारोपण केल्याचे डॉ. कोराणे यांनी सांगितले.

.............


गरजू रुग्णांना लवकर अवयव मिळण्यासाठी ब्रेन डेडनंतर किंवा अपघाती मृत्यूनंतर अवयवदानासाठी नातेवाईकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कांबळे कुटुंबीयांना मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कोल्हापुरात पहिल्यांदाच अवयवदान करुन पाच लोकांना नवसंजीवनी देण्याचे पाऊल पडले आहे.

डॉ. अभिजित कोराणे, न्यूरॉलॉजिस्ट, कोल्हापूर

...........

आमच्या निर्णयामुळे पाच लोकांना किडनी, लिव्हर आणि डोळे मिळाले. त्यांना नवे आयुष्य मिळाले. हीच आमच्या आईला श्रद्धांजली समजतो. इतरांनीही अवयवदान चळवळीत सहभागी होण्याची गरज आहे.

डॉ.संतोष कांबळे-सरुडकर,

कमल कांबळे यांचा मुलगा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंतदादांच्या जन्मशताब्दीवर्ष समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री

0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली

थोर स्वातंत्र्यसेनानी, माजी मुख्यमंत्री, माजी राज्यपाल वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी आणि बिगरसरकारी सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती १२ नोव्हेंबर २०१७ पर्यंतच्या वर्षभरातील विविध कार्यक्रमांची रुपरेषा निश्चित करेल, अशी घोषणा सरकारने पाच डिसेंबर रोजीच्या अध्यादेशाद्वारे केली आहे. सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव रा. मा. जाधव यांच्या स्वाक्षरीने अध्यादेश काढण्यात आला आहे.

ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध वसंतदादांनी दिलेला लढा, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्रामध्ये सहकाराच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम, राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री म्हणून कृषी, सहकार व शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेले बहुमूल्य काम विचारात घेऊन त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार आहे. वर्षभरातील प्रस्तावित कार्यक्रमांची रुपरेषा निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संजय पाटील, खासदार राजू शेट्टी, गटनेते जयंत पाटील, माजी सभापती शिवाजीराव देशमुख, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, ज्येष्ठ नेते पतंगराव कदम आदींचा सरकारी सदस्य म्हणून तर अशासकीय सदस्य म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, कुस्तीगीर परिषदेचे नामदेवराव मोहिते आदींची निवड करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर सचिव हे समितीचे सचिव म्हणून काम पहाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाबार्डकडून तपासणी पूर्णअहवाल रिझर्व्ह बँकेला सादर होणार

0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

पाचशे, हजारच्या नोटा बंदीनंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरणा करण्यात आलेल्या नोटांच्या नाणेवारीची नाबार्डकडून सुरी झालेली तपासणी सोमवारी पूर्ण झाली. बँकेच्या मुख्यालयासह पाच शाखांमध्ये दोन लाखांपेक्षा अधिकची रक्कम भरलेला एकही खातेदार आढळलेला नसल्याचे समोर येत आहे. जो काही अधिकचा भरणा झालेला आहे तो दुधसंस्था, पतसंस्था अशा संस्थाच्या पातळीवर असल्याची माहिती पुढे येत आहे. हा तपासणी अहवाल रिझर्व्ह बँकेला सादर केला जाणार आहे.

केंद्र सरकारने आठ नोव्हेंबरला हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द ठरविल्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेसह अन्य राष्ट्रीयकृत व नागरी बॅकामध्ये ग्राहकांनी हजार व पाचशे रुपयांच्या मोठ्या स्वरूपात जमा केले आहेत. मात्र महिन्याभरात जिल्ह्यात केवळ दोनशे कोटी रुपयांचेच चलन उपलब्ध होऊ शकले. त्यामुळे तब्बल एका महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वच बँकांचे काम ठप्प झाले आहे. ग्रामीण भागात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वाधिक २१७ शाखा आहेत. गावातील शेतकरी आणि मजूर या बँकांशी जोडला गेला आहे. गावातील लोकांची उलाढाल या बँकेवर अवलंबून आहे. जिल्हा बँकेमध्ये सुमारे ३१५ कोटी रुपयांच्या पाचशे आणि हजाराच्या नोटा जमा करण्यात आल्या आहेत. जिल्हा बँकेकडे जमा झालेल्या झालेल्या नोटांची नाणेवारी दररोज रिझर्व्ह बँक आणि नाबार्डला यापूर्वीच कळविण्यात आली आहे. नाबार्डकडून पाचशे आणि हजाराच्या सर्वाधिक रक्कम जमा करण्यात आलेल्या शाखांची माहिती मागविण्यात आली होती. बँकेने जादा नाणेवारी असलेल्या वीस शाखा निवडल्या होत्या. त्यापैकी प्रधान कार्यालयासह पाच शाखांची तपासणी दोन दिवस सुरू होती. इस्लापूर शाखेत केवळ एका जनधन खात्यावर अवघे वीस हजार जमा झाले आहेत. शिराळ्यातील शाखेमध्ये भरण्यात आलेल्या ग्राहकांची खाती तपासली. तेथील पन्नास जनधन खात्यांमध्ये अवघे दहा ते तेरा हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा झाली आहे. कवठेमहांकाळ, मार्केट यार्ड तासगाव, सावळज शाखेतील नाणेवारी तपासण्यात आली. खातेदारांचे पॅन कार्ड होते का, तसेच के.वाय.सी पूर्ण आहे, या बाबतची माहिती घेण्यात आली आहे. बँकेच्या एकाही शाखेमध्ये दोन लाखापेक्षा जादा रक्कम बचत खात्यांवर वर्ग झाली असल्याचे तपासणीत आढळलेले नसल्याचे समोर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निखिलच्या अॅपला ‘एफबीस्टार्ट’

0
0

Raviraj.gaikwad@timesgroup.com

Twitter: @rg_ravirajMT

कोल्हापूरचा तरुण नेहमी हटके काहीतरी करत असतो. मग, तो शेती व्यवसाय असेल, किंवा फाउंड्री उद्योग असेल, क्रीडा क्षेत्र असेल किंवा मग टेक्नॉलॉजी. स्मॉल टाऊन बॉइज म्हणून ओळखले जाणारे आम्ही कोठेही कमी पडत नाही, हे निखिल शंकर दुल्हानी या तरुणाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जगभरातील ट्रॅव्हलर्ससाठी अतिशय युझर फ्रेंडली आणि माहितीचा प्रचंड खजिना असलेले ‘ट्रिपोर्ब’ हे अॅप या तरुणाने तयार केले असून, फेसबुकने त्याची दखल घेतली आहे. फेसबुकच्या नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या फेसबुकच्या एफबीस्टार्ट फंड्समधून त्याला पुढील अॅप डेव्हलपमेंटसाठई ४० हजार डॉलरचा (२७ लाख) निधी मिळाला आहे. अॅप डेव्हलपमेंटसाठी फ्री टुल्स आणि सर्व्हिसेसच्या माध्यमातून ही निधी वापरला जाणार आहे.

कोल्हापुरातील हॉलिडे ड्रीमलँड प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ असलेल्या निखिल दुल्हानी यांना २०१५मध्ये हे अॅप सुरू करण्याची कल्पना सुचली. पर्यटनासाठी जाताना अनेक वेबसाइट्सवरून माहिती घ्यावी लागल्याने. सामान्यांसाठी पर्यटनाची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, अशी वेबसाइट किंवा अॅप सुरू करावे, असे निखिल यांना वाटले. त्यानंतर जवळपास दीड वर्षे रिसर्च करून डेटा गोळा करून त्यांनी ‘ट्रिपोर्ब’ अॅप नुकतेच लाँच केले हे आहे. सध्या बिटा व्हर्जन असलेल्या या अॅपला पंधरा दिवसांत ८०० हून अधिक डाऊनलोड्स मिळाले आहेत. त्यात भारतासह सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि अमेरिका येथून डाऊनलोड्स मिळत आहेत. युजर्ससाठी इझी टू हँडल आणि त्याला हवी ती माहिती मिळणे, याकडे अधिक लक्ष देण्यात आल्याचे निखिलने महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना सांगितले.

पर्यटन केलेल्यांसाठी आणि पर्यटन करू इच्छिणाऱ्यांसाठी दोघांसाठी हे अॅप अतिशय उपयुक्त असून, यूझर फ्रेंडली असल्याने त्याची पंधरा दिवसांतच लोकप्रियता वाढू लागले आहे. अॅपच्या टीमने सोशल मीडियाच्याच साह्याने याचा प्रचार, प्रसार केला आहे. त्याच्या डाउनलोड्सची वाढती संख्या लक्षात घेऊन. फेसबुकने निखील यांच्याशी संपर्कसाधत त्यांना ४० हजार डॉलर दिले आहेत. अॅपच्या भविष्यातील डेव्हलपमेंटसाठीच हा निधी वापरला जाणार आहे.

WWW.triporb.com या वेबसाइटवर अॅपची अधिक माहिती उपलब्ध आहे.

फेसबुकचे प्रोत्साहन

टेक्नॉलॉजी क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी फेसबुकने एफबीस्टार्ट बेनिफिट्स पोर्टल (वेबसाईट) सुरू केले आहे. एखादे तंत्रज्ञान विकसीत करून या पोर्टलद्वारे अर्ज केल्यास फेसबुक त्या तंत्रज्ञानाची दखल घेते. फेसबुककडून एखाद्याच्या कामाचे कौतुक होणे ही फार मोठी गोष्ट मानली जात असून, त्याचा संबंधित तंत्रज्ञानाच्या लोकप्रियतेसाठी मोठा फायदा होतो.

एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी आपण आपल्याला माहिती असणारेच ठिकाण निवडतो. पण ‘ट्रिपोर्ब’ हे अॅप तुम्हाला जगभरातील कोणत्याही पर्यटनस्थळाची माहिती, त्यासाठी जाण्याचा मार्ग, तेथील सुविधा, हॉटेल्स आणि तेथे प्रत्यक्ष पर्यटन केलेल्यांचे अनुभव एकाच अॅपवर देते. त्यामुळे पर्यटन करणाऱ्यांसाठी हे अॅप निश्चितच उपयोगी आहे.

निखील दुल्हानी, अॅप डेव्हलपर

काय आहे अॅपवर?

- जगातील कोणत्याही पर्यटनस्थळाची माहिती

- पर्यटनस्थळी कोठे काय पहाल याची सर्वंकष माहिती

- पर्यटनास गेलेल्यांनाही माहिती, अनुभव अपलोड करण्याची संधी

- पर्यटनस्थळी असणाऱ्या हॉटेल्सचे बुकिंग अॅपवरून शक्य

- जगभरातील जवळपास दीड लाख हॉटेल्सशी अॅप जोडले गेलेले

- जगातील सर्व पर्यटनस्थळी होणाऱ्या मुख्य फेस्टिवल्सची माहिती अपडेट्स

- पर्यटनास जाताना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून ग्रुप करण्याची सोय

- पर्यटनस्थळांविषयी लाइव्ह चर्चा करता येणार, इतरांना गाइड करता येणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images