Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

एटीएममध्ये खडखडाट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बँक बंद असल्याने एकमेव आधार असलेल्या एटीएममध्येही पुरेसे पैसे नसल्याने सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही दिवसभर सर्व एटीएममध्ये खडखडाट होता. ज्या एटीएममध्ये पैसे होते, तोपर्यंत तिथे मोठ्या रांगा लागल्या होत्या. पैसे काढण्याबरोबरच पैसे भरण्याच्या मशीन्सवरही गर्दी वाढली. मंगळवारपासून बँक व्यवहार सुरू होणार असून दोन दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या शंभरच्या नवीन नोटाही सोमवारी जिल्ह्यात दाखल झाल्या. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात २०० कोटींच्या आसपास नवीन नोटा येणार असून त्या रविवारी मध्यरात्रीपासून टप्प्याटप्प्याने येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मंगळवारपासून एटीएम सुरु होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सुरू असलेल्या एटीएममधून केवळ दोन हजार रुपयेच मिळत होते. त्यात शंभरच्या नोटा मिळत असल्याने वारंवार पैसे संपत होते. सुटी असूनही काही बँकांनी पैशांचा भरणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुपारी एकनंतर एटीएममधील पैसे संपले. बँकेतील व्यवहार सोमवारी बंद असले तरी मंगळवारी ठिकठिकाणी नोटा पाठवायच्या व्यवस्थेसाठी अधिकारी नियोजनात व्यग्र होते.

रविवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात नवीन नोटा येण्यास सुरुवात झाली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी शाखेत जमा झालेल्या नोटा सोमवारी सकाळी बंदोबस्तात विविध शाखांत पाठवण्यात आल्या. विविध बँकांनाही सोमवारी सायंकाळनंतर नवीन नोटा येण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यातील पाचशेहून अधिक शाखांना त्यांच्या मुख्य शाखांमार्फत नोटा पाठवण्याचे नियोजन केले आहे. या सर्वांना नवीन नोटा वितरित करण्यासाठी जिल्ह्यात नऊ करन्सी चेस्ट आहेत. त्यामार्फतच वितरण केले जाणार असून प्रत्येक चेस्टकडे पहिल्या टप्प्यात सरासरी २० कोटींच्या नोटा पाठवण्यात येत असल्याचे समजते. यानुसार २०० कोटींच्या नोटा दोन दिवसात येतील, असे सांगण्यात येत आहे. या नोटांमध्ये बहुतांश शंभरच्याच नोटांचा समावेश असल्याचेही समजते. त्यामुळे मंगळवारपासून एटीएम सुरू होतील, असे काही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहकारमंत्र्यांच्या बँकेसमोर एफआरपीसाठी आंदोलन

0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

उसाच्या एफआरपीची रक्‍कम शेतकऱ्यांना न देणाऱ्या कारखान्‍यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्‍या लोकमंगल बँकेसमोर जनहित शेतकरी संघटनेने ऊस हातात घेऊन आंदोलन केले. जनहितचे नेते प्रभाकर उर्फ भैया देशमुख यांच्‍या नेतृत्‍वाखाली हे आंदोलन करण्‍यात आले.

दोन दिवसांपूर्वी प्रभाकर देशमुख यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. पण, त्‍यांनतर यावर कोणताच निर्णय न झाल्‍याने जनहित शेतकरी संघटनेने सेवा सदन प्रशालेसमोरील मंत्री देशमुख यांच्‍या संपर्क कार्यालयावर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी हातात ऊस घेतले होते. आंदोलक आक्रमक झाल्‍याने पोलिस व आंदोलकांमध्‍ये खडाजंगी झाली. या आंदोलनामुळे शहरातील वातावरण तणावाचे बनले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांगेतील नागरिकांना दिला ‘झंडू बाम’

0
0



सोलापूर

सोलापुरातील बँकांसमोर नोटा बदलण्यासाठी शेकडो नागरिक तासंतास उभे आहेत. रांगेत उभे असलेल्या नागरिकांचे पाय आणि कंबर दुखत आहेत. या दुखण्यावर शिवसेनेने ‘झंडू बाम’चा नामी उपाय शोधून नागरिकांना ‘झंडू बाम’ वाटप करून नोटा रद्दच्या निर्णयाची खिल्ली उडविली आहे.

शिवसेनेचे शहर प्रमुख प्रताप चव्हाण आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक महेश धाराशिवकर आणि माजी प्रसिद्धी प्रमुख विजय पुकाळे यांनी लकी चौकातील बँक ऑफ इंडियासमोर नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे असलेल्या ग्राहकांना झंडु बामचे वाटप केले. नोटा चलनातून अचानक रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. इतकेच नव्हे तर नोटा बदलून घेताना खूप वेळ जात आहे. कोणतेही नियोजन न करता मोदी सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. निर्णय चांगला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी नीट होत नाही. नागरिकांना रांगेत उभे राहून पाय, कंबर आणि पाठदुखीला सामोरे जावे लागत आहे. म्हणून प्रतिकात्मक आंदोलन करून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रताप चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडमध्ये दहा लाखांची रक्कम जप्त

0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील पंकज हॉटेलजवळ पुण्याहून इस्लामपूरकडे जाणाऱ्या होंडा सिटी कारमध्ये दहा लाखांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. विधान परिषद, नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक भरारी पथकाने केलेल्या तपासणीत ही रक्कम आढळून आली. दरम्यान, सदर रक्कम पुणे येथील सराफ व्यापाऱ्याची असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ही रक्कम व्यापाऱ्याच्या व्यवसायातील व शेती उत्पन्नातील असल्याचा दावाही संबधित व्यापाऱ्याने केला आहे. मात्र, याची सत्यता पडताळण्याचे काम सुरू असून, रक्कम बेहिशोबी असल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुणे गोविंद हलवाई चौकात तानाजी तुळशीराम बाबर यांचे सराफ व्यवसायाचे दुकान आहे. तानाजी बाबर हे उरूण-इस्लामपूर येथील मूळचे रहिवाशी आहेत. मंगळवारी सायंकाळी ते पुण्याहून उरुण-इस्लामपूरला निघाले होते. याच दरम्यान, येथील पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेचे भरारी पथक येथील राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची तपासणी करीत होते. याचवेळी पोलिसांना एका वाहनात मोठी रोख रक्कम असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलिस वाहनांची कडक तपासणी करीत असतानाच पुण्याच्या बाजूकडून होंडा सिटी कार क्र. एमएच १२ केटी ९९७० आली. पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये तब्बल दहा लाखांची रोख रक्कम आढळून आली. सदर रकमेत एक हजारांच्या नोटांची ८ लाख तर उर्वरीत २ लाखांची रक्कम १०० व ५०च्या नोटांमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रद्द नोटा शंकानिरसनासाठी टोल फ्री हेल्पलाइन १०७७

0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटांचा व्यवहारातील वापर थांबविल्याने उद्भवलेल्या परिस्थितीविषयी केंद्र व राज्य सरकारने वेळोवळी काही निर्णय घेतलेले आहेत. या निर्णयाची माहिती मिळावी व सर्वसामान्य नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन व्हावे या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग येथे १०७७ या टोल फ्री क्रमांकाची हेल्पलाइन कार्यरत केली आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

जिल्ह्यातील अग्रणी बँकेच्या अनुभवी अधिकाऱ्याची जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षामध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी सहापर्यंत ते आपत्ती निवारण कक्षात उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी १०७७ टोल फ्री क्रमांकावर कॉल करून शंकानिरसन करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांना नोटांबाबत सक्ती नको

ग्राहकांनी वृत्तपत्र​ विक्रेत्यांना बिलाचे पैसे देताना पाचशे अथवा हजार रुपयाच्या नोटा स्वीकारण्याची सक्ती करू नये, असे आवाहन वृत्तपत्र संघटनेने केले आहे. पेपर विक्रेता महिनाभर पेपर देतो व एक महिन्यानंतर देयकाची रक्कम वसूल करतो. त्यामुळे पुढच्या महिन्याला बिल घेऊन जा, अशी सबबही ग्राहकांनी देऊ नये. पेपर विक्रेता बातम्या सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. त्यांना सहकार्य करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच लाख वाहने, पोलिस साठच

0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : शहरात वाहनांची संख्या पाच लाखांवर पोहोचली असताना वाहतुकीचे नियंत्रण करणारे पोलिस अवघे साठच आहेत. विभागाकडे दहा वर्षांपूर्वीचीच कर्मचारी संख्या मंजूर आहे. यातही मंजूरपैकी चाळीस टक्के पदे रिक्त आहेत. अवघ्या साठ कर्मचाऱ्यांवर वाहतूक शिस्त, नियंत्रणाची जबाबदारी असल्याने त्याचा परिणाम कोंडीवर होत आहे.

गेल्या आठ वर्षात शहरातील वाहनांची संख्या साधारणतः दुपट्ट झाली. जिल्ह्यातील वाहनांची संख्याही त्याच गतीने वाढली. शहराबाहेरून येणारे पर्यटक, कोकणासह गोव्याकडे जाणारी वाहनेही वाढली आहेत. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे मनुष्यबळ जसे दहा वर्षांपूर्वी होते तसेच आजही आहे. दहा वर्षांपूर्वी वाहतूक नियंत्रण शाखेला १६१ कर्मचारी पदे मंजूर होती. मात्र ही पदे पूर्ण क्षमतेने कधीच भरली गेली नाहीत. आजवर विभागाला १०० पेक्षा अधिक कर्मचारी मिळालेच नाहीत. विभागात आज कागदोपत्री ९९ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी ८ ते १० कर्मचारी दररोज साप्ताहिक सुटीवर असतात. साधारणतः ८ ते १० कर्मचारी रजेवर आणि ८ कर्मचारी स्पोर्टसमध्ये आहेत. तर ६ कर्मचारी क्रेनच्या ड्युटीवर अडकतात. आणि ८ कर्मचारी कार्यालयीन कामकाजात अडकतात.

उपलब्ध ९९ कर्मचाऱ्यांपैकी उरतात केवळ ६० कर्मचारी. वाढलेल्या वाहनांच्या संखेच्या तुलनेत वाहतूक पोलिसांची ही संख्या अगदीच अपुरी आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्यात अडचणी उद्भवत आहेत. वाहनांची संख्या वाढली असली तरी रस्ते अरूंद आहेत. रस्ते विकास प्रकल्पासह नगरोत्थान योजनेतून तयार केलेल्या रस्त्याकडेला फूटपाथ बांधले आहेत. फुटपाथच्या बाहेर दुचाकी आणि चारचाकी पार्किंग सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजुला बेशिस्त पार्किंग सुरू असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. ट्रॅफिक सिग्नलवर पांढरे पट्टे मारणे, आवश्यक तेथे स्पीडब्रेकर तयार करणे, सिग्नल यंत्रणा सुसज्ज ठेवणे ही जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिकेकडून अत्यावश्यक सुविधा मिळत नाहीत, अशी तक्रार वाहतूक नियंत्रण शाखेची आहे.

अपुऱ्या मनुष्यबळामुळे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात अडथळे येत आहेत. महत्त्वाच्या चौकातच पोलिस तैनात असतात. अन्य ठिकाणी सुरू असलेली वाहतूक अक्षरशः रामभरोसे असते. यातच बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारताच लोकप्रतिनिधी फोन करून कारावाई टाळण्यासाठी दबाव टाकतात. असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतुकीसह पोलिसांचीही कोंडी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलसंपदा’तून मिळवली ‘अपसंपदा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाणी साठवणे आणि जिरवण्याचे काम करताना जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी बेहिशोबी पैसे जिरवण्याचेही काम केले. डोळे दीपतील असे ऐश्वर्य दाखवणारे बंगले, कोट्यवधींच्या शेतजमिनी आणि तितक्याच किंमतीचे दागिने अधिकाऱ्यांकडे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर अधिकाऱ्यांकडील घबाड उघडकीस येत असल्याने जलसंपदा विभागातील घोटाळ्याचे हीमनग लोकांसमोर येत आहे. या कारवाईत कोल्हापुरातील दुसरा अधिकारी सापडल्याने ‘जलसंपदे’च्या ‘अपसंपदे’ची चर्चा वाढली आहे.

कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस सरकारच्या कार्यकालात राज्यात जलसंपदा विभागामार्फत अनेक छोट्या-मोठ्या प्रकल्पांचे काम सुरू झाले. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधकांनी केला होता. हा मुद्दा विधानसभेच्या निवडणुकीतही प्रचाराचा केंद्रबिंदू होता. राज्यात सत्ता बदलताच या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांचे घबाड उघडकीस येऊ लागले आहे.

गेल्या वर्षभरात झालेल्या कारवायांमध्ये जलसंपदा विभागातील कोल्हापुरातील दोन निवृत्त अधिकारी भ्रष्ट असल्याचे स्पष्ट झाले. बाळगंगा धरण घोटाळ्यात कार्यकारी अभियंता बाळासाहेब पाटील यांनी कोट्यवधींची माया जमवली होती. ‘लाचलुचपत’च्या कारवाईत त्यांनी जमवलेली ६ कोटींची बेहिशोबी मालमत्ता पुढे आली होती. या रक्कमेने अनेकांवर तोंडात बोटे घालण्याची वेळ आली होती. रायगड येथील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बाळासाहेब पाटील हे सध्या कारागृहात असून, त्यांच्या संपत्तीची चौकशी सुरूच आहे. केवळ एका अधिकाऱ्याकडे ६ कोटींची बेहिशोबी मालमत्ता असेल तर, विभागात किती मोठी रक्कम मुरली असेल याचा अंदाज येतो असे सांगण्यात येते.

बाळासाहेब पाटील यांच्या कारनाम्यानंतर सुरेश लक्ष्मण पाटील या आणखी एका अधिकाऱ्याची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली. सुरेश पाटील हे मुख्य अभियंता आणि सहसचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. ३३ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा ६८.११ टक्के अधिक संपत्ती जमवली आहे. अर्थात ही संपत्ती केवळ पोलिसांच्या चौकशीत पुढे आली. अनेक हॉटेल्समध्ये असलेली भागीदारी आणि मुलाच्या बांधकाम व्यवसायातही त्यांनी कोट्यवधींची रक्कम गुंतवल्याची शक्यता आहे. नातेवाईक किंवा पै-पाहुण्यांच्या नावांवर जलसंपदामधील बांधकामांचे ठेके घेऊन कोट्यवधींची कमाई केल्याची चर्चा आहे. याची चौकशी झाल्यास आणखी मोठी अपसंपदा उजेडात येण्याची शक्यता आहे. या अधिकाऱ्यांनी कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर परिसरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे मोठ्या रोख रकमाही सापडत आहेत.

हीमनगाचे टोक

बाळासाहेब पाटील आणि सुरेश पाटील यांच्याकडील संपत्ती हा जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराच्या हीमनगाचे टोक आहे. इतर अधिकारी आणि या विभागाच्या माजी मंत्र्यांचीही चौकशी पूर्ण झाल्यानंतर धक्कादायक माहिती उघडकीस येऊ शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘जलसंपदा’च्या कामांमधून पाणी किती अडवले आणि जिरवले हा प्रश्न वादाचा असला तरी अधिकाऱ्यांच्या तिजोऱ्या मात्र भरल्याचे लाचलुचपतच्या कारवायांवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे अपसंपदेची चर्चा वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त सहसचिवाच्या मालमत्तांवर छापे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याच्या संशयावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरेश लक्ष्मण पाटील (वय ६२, रा. सरलष्कर पार्क, प्लॉट नं. १, ताराबाई पार्क, कोल्हापूर) या सेवानिवृत्त सहसचिवाच्या (जलसंपदा विभाग) घरांवर छापे टाकले. या कारवाईत सुरेश पाटील यांच्याकडे ४ कोटी १४ लाख २० हजाराची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पाटील यांच्यासह त्यांची पत्नी विद्या आणि मुलगा विक्रांत या तिघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाटील यांच्या घरांची झडती घेण्याचे काम गुरूवारी (ता. १७) रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पाटील १९८० मध्ये जलसंपदा विभागात उपअभियंता पदावर रुजू झाले. सातारा, नागपूर, ठाणे, रत्नागिरी आणि मुंबई येथे त्यांनी काम केले. २०१२ मध्ये ते मुख्य अभियंता व सहसचिव पदावरून मंत्रालयातून निवृत्त झाले. पाटील यांच्याकडील बेहिशेबी मालमत्तेच्या संशयावरून लाचलुचपत प्रतिबंधकने २०१३ पासून त्यांची चौकशी सुरू केली होती. पाटील यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती असल्याची खात्री होताच गुरूवारी सकाळी सातपासूनच पाटील यांचे कोल्हापुरातील घर, पुण्यातील दोन फ्लॅट आणि सोलापुरातील फ्लॅटवर एकाच वेळी छापे टाकून कारवाई करण्यात आली. दिवसभराच्या चौकशीत पाटील यांच्याकडे ४ कोटी १४ लाख २० हजार ७९९ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी पाटील यांच्यासह त्यांची पत्नी विद्या आणि मुलगा विक्रांत यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत. रात्री उशिरापर्यंत घरांची झडती सुरू होती. यात १ लाख ७५ हजाराच्या जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा, सोन्या, चांदीचे दागिने, शेअर्स, फिक्स डिपॉझिट पावत्या आणि स्थावर मालमत्ता खरेदीची कागदपत्रे मिळाली. सुरेश पाटील यांची कोल्हापुरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये भागीदारी आहे. त्याचबरोबर मुलाचीही काही हॉटेल्समध्ये भागीदारी असून, तो बांधकाम व्यावसायिक आहे. चौकशीअंती पाटील यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. लाचलुचपतचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे स्वतः कारवाईसाठी कोल्हापुरात दाखल झाले होते. या कारवाईने जलसंपदामधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


अशी आहे मालमत्ता

कोल्हापूर – २ बंगले, ६ शेतजमिनी, १ लाख ७५ हजारांची रोकड

सोलापूर – १ घर, ४ शेतजमिनी

पुणे – २ फ्लॅट

सांगली –२ फ्लॅट

फिक्स डिपॉझिटच्या पावत्या

सोन्या, चांदीच्या दागिन्यांची मोजदाद सुरू आहे.



शेअर्समध्ये काळा पैसा

पाटील यांच्या घरांत घेतलेल्या झडतीत विविध कंपन्यांचे शेअर्सही सापडले आहेत. ३३ वर्षांच्या कार्यकालात पाटील यांनी मिळवलेली बेहिशेबी मालमत्ता शेअर्समध्ये गुंतवल्याचा पोलिसांना संशय आहे. शेअर्समधील गुंतवणुकीची माहिती घेण्याचे काम सुरूच आहे. चौकशीअंती गुंतवलेल्या रकमेची माहिती मिळणार आहे. ही रक्कम मोठ्या प्रमाणात असल्याचा पोलिसांना संशय आहे.



कारवाईसाठी सहा पथके

पोलिस अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी सुरेश पाटील यांच्यावरील कारवाईसाठी सहा पथके स्थापन केली होती. यासाठी ५ पोलिस उपाधीक्षक, ८ पोलिस निरीक्षक आणि ५० कर्मचारी तैनात होते. कोल्हापुरात ६ पथके, पुण्यात २, तसेच सांगली आणि सोलापूर येथे प्रत्येकी १ अशा एकूण १० पथकांनी गुरूवारी दिवसभर चौकशी आणि झडतीचे काम केले.


सुरेश पाटील यांच्यावरील अपसंपदेच्या संशयावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतःहून कारवाई केली आहे. २०१३ पासून चौकशी सुरू होती. त्यांच्याकडील संपत्तीची मोजदाद अजूनही सुरूच आहे. चौकशी आणि घरझडती पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल, असे ​ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे म्हणाले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा बँकेतील ४०० कोटींची उलाढाल ठप्प

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा बँकेच्या १९१ शाखांमधील लाखो शेतकऱ्यांसाठी रोज सरासरी ४० कोटींची गरज असताना केवळ काही लाखांचा पुरवठा होत असल्याने गेल्या दहा दिवसांत बँकेच्या माध्यमातून होणारी जवळपास ४०० कोटींची उलाढाल थांबली आहे. गोकुळ दूध संघ तसेच इतर संघ व खासगी दूध संस्थांकडून जमा होणाऱ्या दूध बिलाची जवळपास ६० कोटींची रक्कम बँकेत अडकली आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत बँकांना व्यवस्थित नोटांचा पुरवठा झाला नाही तर पुढील ६० कोटीचेही बिल थकण्याची शक्यता आहे.

शेतकरी व इतर सभासद रोज जिल्हा बँकेच्या शाखांमधून ४० कोटींच्या आसपास पैसे काढतात. ८ नोव्हेंबरला व्यवहार बंद झाल्यानंतर आजतागायत बँकेला त्यांच्या रोजच्या खर्चाच्या तुलनेत नाममात्र रक्कम मिळाली आहे. बुधवारी पाच कोटी रुपये मिळाले आहेत. अन्य दिवसात मिळालेली रक्कम पाहता दहा दिवसांच्या तुलनेत केवळ दहा कोटीच्या आसपास ​रक्कम मिळाली. रोज ४० कोटी रुपयांनुसार दहा दिवसांत केवळ जिल्हा बँकेच्या शाखांमधून ४०० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. बँकेकडे विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा होते. त्यात दूध, ऊस बिले, शिक्षक पगार, निराधार योजना पेन्शन, बचत गटांचे उत्पन्न, पीक कर्जाची रक्कम असते. गेल्या दहा दिवसांत यातील ऊस बिल वगळता इतर रकमा जमा होत आहेत. पण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नसल्याने ४०० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.

दूध बिलाचे ४० कोटी थकले

सध्या जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे गोकुळकडून मिळणारे दुसऱ्या आठवड्यातील बिल बँकेत जमा झाले आहे. एका बिलाची रक्कम ४० कोटीच्या आसपास असते. ही रक्कम जिल्हा बँकेतील खात्यात जमा होते. गोकुळशिवाय इतर सहकारी दूध संघ तसेच खासगी दूध संघ, संस्थांची बिलेही जिल्हा बँकेबरोबर इतर बँकांतील खात्यावर जमा होतात. त्यांची रक्कम १५ ते २० कोटीपर्यंत जाते. जिल्हा बँकांबरोबरच इतर बँकांनाही व्यवस्थित नोटांचा पुरवठा होत नसल्याने दुधाची ही रक्कम बँकांमध्ये अडकली आहे. काही दूध संस्था त्यांच्या पातळीवर दूध उत्पादकांना खर्चासाठी काही रक्कम देत आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यातील खर्च काटकसरीने निघण्याची शक्यता आहे, पण २४ तारखेपर्यंत सुरळीत न झाल्यास पुढील बिलही अडकण्याची शक्यता आहे. त्यातून ग्रामीण भागातील व्यवहार थांबणार आहेत.

पाचशे रुपयांची नोट दोन दिवसांत

सध्या कोल्हापूरमध्ये शंभर रुपये व दोन हजार रुपयांची नोट चलनात आहे. पाचशे रुपयांची नोट चलनात आल्याशिवाय एटीएममध्ये पुरेशी रक्कम साठणार नाही व नागरिकांचीही सोय होणार नाही. दोन दिवसात ही नोट चलनात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर एटीएम व बँकेतून नोट मिळू लागल्यानंतर चलनावरील ताण कमी होऊन व्यवहार सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवहार थंडावले, बाजार गडगडला

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बँक, एटीएम तसेच बदलून घेण्यासाठीची मिळून आठवड्यात २४ हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहाराची मर्यादा, बोटाला शाई लावण्याच्या प्रकाराची धास्ती, जास्त रक्कम जमा करणाऱ्यांची माहिती घेत असल्याच्या धाकामुळे जवळपास आठवडाभराने म्हणजे आठव्या दिवशी बँकांमधील गर्दी थोडी कमी झाल्याचे जाणवले. मात्र, अनेक एटीएम बंदच आहेत. एटीएममधून पैसे काढण्यासाठी रांगा कायम होत्या. बाजारातील दररोजचे व्यवहार थंडावले असून, अत्यावश्यक असलेलेच व्यवहार होत असल्याने दहा ते वीस टक्केच व्यवहार होत आहे. काही खासगी बँकांमधील चलन संपल्याने काही काळ नोटा बदलून देण्याबरोबरच व्यवहारही थांबवले आहेत. काही बँकांनी साडेचार हजारांऐवजी दोन हजार रुपयेच बदलून दिले. जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या हालचालींवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने आता नजर ठेवली जात आहे.

१० तारखेपासून बँकांमध्ये ओसंडून वाहणाऱ्या गर्दीची तीव्रता गुरुवारी आठवडाभरानंतर कमी झाली. या गर्दीमध्ये पैसे भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कायम होती. तुलनेने नोटा काढणाऱ्यांची संख्या कमी होती. यापेक्षा नोटा बदलण्यासाठी फॉर्म भरून रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांची संख्या आठवडाभर कायम होती. प्रत्येक बँकेत नागरिकांची संख्या जास्त असल्याने बँकेत मोठी वर्दळ जाणवत होती. मात्र, बुधवारपासून नोटा बदलणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या बोटाला शाई लावण्यास सुरुवात केली. यातून एकदा नोट बदललेल्या व्यक्तीला दुसरीकडे नोटा बदलून घेता येणार नाहीत. हा भविष्यातील चौकशीचा तसेच गंभीर प्रकार होण्याची शक्यता बँकांमधून सांगण्यात आली. तसेच यापूर्वी अनेकांना एटीएम, नोटा बदलणे व बँकेतून पैसे काढण्याचे वेगवेगळे व्यवहार पकडले जातील, असे वाटत होते. पण सर्वांची मिळून आठवडाभरात २४ हजार रुपयांची मर्यादा असल्याने अनेकांनी बँकेकडे जाण्याचे टाळले. ५० हजार रुपयांची रक्कम खात्यावर जमा करणाऱ्यांचीही चौकशी होऊ शकत असल्यानेही त्याचाही परिणाम झाला. गुरुवारी अनेक बँकांमध्ये नोटा बदलण्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या कमालीची घटल्याचे जाणवले. मात्र, नोटा जमा करण्यास येणाऱ्यांची संख्या कायम होती.

एकीकडे नोटा बदलण्याचा प्रकार कमी होत असताना बँकेत पाचशे व हजार रुपयांच्या नोटांव्यतिरिक्त शंभर रुपयांच्या नोटांचा भरणाच होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बँकांकडे चलन परत येत नसल्याने उपलब्ध नोटाच देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून अनेक खासगी बँकांपुढे आता नोटांचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. काही बँकांनी तर बुधवारपासूनच नोटा बदलून देण्यास नकार दिला. काही खासगी बँकांनी गुरुवारी दुपारी व्यवहार नोटा येईपर्यंत थांबवले. नवीन नोटांचा पुरवठा जर झाला नाही, तर आणखी काही बँकांचे व्यवहार ठप्प होतील, अशी भीती बँकांमधून व्यक्त केली जात आहे. यासाठी अनेक खासगी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोटांची मागणी करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडे धाव घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत काही पैसे मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. पण राष्ट्रीयीकृत बँकांकडून मर्यादित पैसे दिले जात आहेत.

बाजारात अत्यावश्यकच खरेदी

बँकांमधून शंभर रुपयांबरोबर दोन हजार रुपयांच्या नोटा दिल्या जात आहेत. दोन हजाराची नोट बाजारात अनेकजण स्वीकारत नाहीत. त्यामुळे प्रत्येकजण शंभर व छोट्या नोटांची साठवणूक करत आहे. यातून बाजारात नेहमीप्रमाणे शंभर रुपयांचे चलन फिरताना दिसत नाही. परिणामी व्यवहार थंडावले आहेत. आवश्यक असलेल्या बाजाराचीच खरेदी केली जात आहे. त्यामुळे बाजारात दुकाने उघडली असली तरी तेथे ग्राहकच दिसत नाहीत. घराच्या परिसरात असलेल्या किराणा दुकानांमध्येच व्यवहार होत असून मोठ्या दुकानांमध्ये होलसेल व्यवहार होत नाहीत.


दहा रुपयांना चार पेंड्या

भाजी मार्केटवरही गेल्या तीन दिवसांपासून मोठा परिणाम होऊ लागला आहे. होलसेल बाजारात व्यापारी पैसे देत नसल्याने शेतकरी ठिकठिकाणी बसून भाज्यांची विक्री करत आहेत. छोट्या वाहनांमधून भाज्या घेऊन जात आहेत. यामुळे गुरुवारी सकाळच्या बाजारात दहा रुपयांना पालेभाजीच्या चार पेंड्या दिल्या जात होत्या. वांग्यांचा दरही पंधरा रुपये किलोवर घसरला आहे. कोबी, फ्लॉवरचा एक नग दहा रुपयांना मिळत आहे. टोमॅटोचे दर कमी झाले असून, कुणी ग्राहक आल्यास आठ रुपयांच्याही खालील दरांना टोमॅटो विकला जात आहे.

सरकारच्या निर्णयापूर्वी नियमित असलेल्या व्यवहारांच्या तुलनेत सध्या केवळ २० टक्केच व्यवहार होत आहेत. त्यामध्येही दररोजच्या गरजेच्या वस्तूंची म्हणजे साखर, दूध, चहा, डाळी, धान्य यांचीच खरेदी केली जात आहे. नागरिकांकडे पैशाची उपलब्धता मोठी नसल्याने इतर वस्तूंची खरेदी केली जात नसल्याचे दिसून येते. सुट्या पैशाची समस्या कमी होईल, त्यावेळी बाजारात थोडा उत्साह येईल.

विनोद हडदरे, दुकानदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना फटका

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

नोटांचा परिणाम दररोजच्या व्यवहारांवर जसा झाला, तसा भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपासून खरेदीदार व्यापारी व विक्रेत्यांवरही झाला आहे. भाजीपाला नाशवंत असल्याने शेतात पिकलेला माल कोणत्याही परिस्थितीत विकण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर असून त्यांची ही ​गरज पाहून खरेदीदार व्यापाऱ्यांनी उधारीवर माल घेण्याचा सपाटा चालवला आहे. भाजीपाल्याचे दर घसरले असल्याने आवक कमी झाली आहे. शेतकऱ्यांची अवस्था दरही नाही आणि घसरलेल्या दराचे पैसेही हातात नाहीत, अशी झाली आहे. आठवड्याला मिळणारी पट्टी आता किती दिवसानंतर मिळेल याची शाश्वती राहिलेली नाही.

बाजारात विक्री करण्यास आलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्यास व्यापाऱ्यांकडे पैसे नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सध्या शिरोळ तालुक्याबरोबरच हातकणंगले तालुक्यातून भाजीची मोठी आवक सुरू आहे. त्यात टोमॅटो, ढब्बू, कोबी, फ्लॉवर अशा भाजीपाल्याचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. टोमॅटोचे दर दिवाळीपासून गडगडले आहेत. आता तर त्या गडगडलेल्या दराचेही पैसे मिळतील की नाही, अशी शंका आहे. शेतात ठेवून माल खराब करण्यापेक्षा शेतकरी बाजार समित्यांमध्ये माल घेऊन येत आहेत. बाजार समितीत आल्यानंतर मालाला उठाव नाही म्हणून व्यापारी आधीच दर पाडतात. त्यानंतर पाडलेल्या दरात खरेदी करुन त्याचे पैसे भागवण्यावेळी इतके पैसे सुटे नाहीत असे सांगून नंतर मिळतील, असे सांगत आहेत. यामुळे खर्च करुन शेतातून बाजार समितीपर्यंत आणलेल्या मालाचा दर हातात पडत नाही.

अनेक शेतकरी माल शेतात खराब होऊन जाण्यापेक्षा बाजारात गेला तरी चालेल व त्याचे पैसे कधी मिळतील त्यावेळी मिळतील अशी स्वतःची समजूत काढून उधारीवर माल देत आहेत. काही बाजार समितीमध्ये व्यापारी मालच स्वीकारत नाहीत. त्यामुळे माल खपवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची विविध शहरांमध्ये वणवण सुरू आहे. ही वणवण करुनही मालाला दर अपेक्षेप्रमाणे मिळेल याची शाश्वती नसल्याने सारा खर्च अंगावर पडण्याचेच सुरू आहे. त्यामुळे आणखी काही दिवस भाजीपाल्याची तोड पुढे ढकलता येते का हे पाहिले जात आहे. गेल्या चार दिवसांत बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मंदावली आहे.

खर्च अंगावरच

मालाला बाजार समितीमधून मागणी नसल्याने शेतकरी विवि​ध ठिकाणी जाऊन माल विकण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या तरी व्यापाऱ्यांकडून पुढे पैसे देऊ असे सांगितले जात असल्याने उधा​रीवर शेतीमाल देत आहोत. एक एकरासाठी किमान पाच ते सहा मजूर लागतात. महिला मजुरांना दिवसाला २०० रुपये व पुरुष मजुरांना ३०० रुपये पगार आहे. त्याशिवाय वाहतुकीचा खर्च पाहता सध्या शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे. मुंबई, पुण्यात भाजीचा उठाव नाही म्हणून येथील व्यापारी दर आणखी कमी करत असून त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

महावीर खोत, उदगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीमुळे विक्रेत्यांना चहासुद्धा कडूच

0
0


Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet:@bhimgondaMT

कोल्हापूर : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘माझा निर्णय कडक चहासारखा आहे’ अशी प्र‌तिक्रिया जाहीर भाषणातून नुकतीच दिली. त्यावर विरोधी काँग्रेस पक्षाकडून टीकाटिप्पणी होत आहे. दरम्यान, त्यांचा निर्णय शहरातील चहा व वडापाव विक्रेत्यांना कडू वाटत आहे. नोटाबंदीमुळे पूर्वीपेक्षा दिवसाचा व्यवसाय तीस टक्क्यांनी घटला आहे, असा दावा त्यांनी केला आहे. तोंडी उधारी वाढत आहे. अशाप्रकारे छोटे व्यवसायिक हवालदिल बनले आहेत.

पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याच्या निर्णयानंतर एक आठवडाभर विविध व्यवसायांवर परिणाम जाणवत आहे. सर्व एटीएम सुरू नसल्याने खात्यावर शिल्लत असूनही गरजेइतकेही पैसे लोकांकडे नाहीत. सुरू असलेल्या एटीएममधून एकाचवेळी केवळ दोन हजार रुपये निघत आहेत. चलनात केवळ दोन हजारांच्या नव्या नोटा आल्या आहेत. दोन हजारांची नोट देऊन पाचशे रुपयांपर्यंत खरेदी केली तरी सुटे पैसे नाहीत, असे उत्तर मिळत आहे.

हाफ चहा पिण्यासाठी कमीत कमी पाच रुपये लागतात. मात्र, इतके सुटे पैसे नसल्याने मोठी अडचण होत आहे. मध्यवर्ती ठिकाणी, रस्त्यांच्या कडेला असलेल्या गाड्यांवरील चहा विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसत आहे. चहा, नाष्टा केल्यानंतर शंभर रुपये दिले तरी विक्रेत्यांकडे परत देण्यासाठी सुटे पैसे नाहीत, अशी परिस्थिती आहे. नाइलाजास्तव नंतर आठवणीने पैसे द्या, असे ग्राहकांना ते सांगत आहे.

सुटे पैसे नसल्याने गाड्यावर चहा, नाष्टा करणे लोक टाळत आहेत. परिणामी चहा, वडापाव, नाष्टावाल्या गाडाधारकांचा व्यवसाय ३० टक्यांनी घटला आहे. पूर्वी दिवसाला होणारा हजार रुपयांचा व्यवसाय ७०० रुपयांनी घटला आहे. किरकोळ उधारी लिहून न ठेवल्याने संबंधित ग्राहकाने आठवणीने पैसे दिले तर मिळणार नाही तर बुडणार आहे. अशाप्रकारे मोदींच्या भाषणातील नोटाबंदीचा कडक चहासारखा निर्णय शहरातील चहावाल्यांनाही तोट्याचा झाला आहे. शहरात चहा आणि वडापाव विक्रीचे ४५० ते ५०० गाडे असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आली.

नोटाबंदीमुळे दैनंदिन व्यवसाय कमी झाला आहे. तोंडी उधारी वाढली आहे. चहा आणि नाष्ट्याचे पैसे देण्यासाठी ग्राहकांकडे सुटे नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.

सागर नलवडे, चहा विक्रेता, जिल्हा परिषद परिसर

नोटाबंदीचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. सुटे पैसे नसल्याने चहा, नाष्ट्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. जे येतात, त्यातील अनेकांकडे सुटे पैसे नसतात. हाप चहा घेतल्यास पाच रुपये सुटे पैसे नाहीत, असे सांगितल्यानंतर आम्ही पैसे मागण्याचे बंद केले आहे.

सुनील आवळेकर, मध्यवर्ती बसस्थानक परिसर

नोटाबंदीचा फटका पहिल्या दोन-तीन दिवसांत अधिक बसला. आता तो काही प्रमाणात कमी झाला आहे. तरीही सुटे पैसे नसल्याने पूर्वी इतके ग्राहक चहा, नाष्ट्यासाठी येत नाहीत. दिवसाचा व्यवसाय हजार रुपयांवरून ७०० रुपयांवर आला आहे.

प्रवीण गाड, मध्यवर्ती बसस्थानक परिसर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिरातील दानपेटीत ३५ लाखांची रक्कम

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाई देवीच्या मंदिरातील सात दानपेट्यांमधून ३५ लाखांवर रक्कम जमा झाली. ही रक्कम बँकेत भरण्यात आली आहे. बुधवारपासून मंदिरातील दानपेट्या उघडण्यात आल्या आहेत. गुरुवारअखेर सात पेट्यांमधील रकमेची मोजदाद करण्यात आली. त्यात ३५ लाख २३ हजार ६७९ अधिक रक्कम मिळाली. शनिवारपर्यंत उर्वरित नऊ पेट्यांची मोजदाद होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ३०६५ मंदिरे आहेत.

गुरुवारी सकाळी ९ पासून गरुड मंडप येथे गाभाऱ्यातील एक नबंरची पेटी उघडण्यात आली. यामध्ये २५ लाखाची रक्कम मिळाली. सायंकाळी सरस्वती देवी मंदिराजवळील हुंडी उघडण्यात आली. यामध्ये १ लाख ७० हजारांची रक्कम मिळाली. शुक्रवारी गाभाऱ्यातील दोन नंबरची दानपेटी उघडण्यात येणार आहे.

या दानपेट्यातील दान मोजण्यासाठी ५० कर्मचारी असून यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सहसचिव एस. एस. साळवी, व्यवस्थापक धनाजी जाधव, बँकेचे व्यवस्थापक नवीन कुमार, संजय जाधव, प्रशांत मिशरा, कुमारसिंग देसाई आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर डीसीसीहायकोर्टात जाणार

0
0




म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ग्रामीण भागातील शेतकरी ग्राहकांची पुरती अडचण होऊन बसली आहे. काहींनी डिसीसी बँकेत रकमा जमा केल्या मात्र, केंद्र सरकारने जिल्हा बँकांना अचानक नोटा स्वीकारण्यास मनाई केल्यामुळे आणि बँकेकडे जमा झालेल्या सुमारे १८९ कोटी रुपयांच्या मोबदल्यात नव्या चलनातील कोणतीही रक्कम मिळणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे खातेदारांची आर्थिक कोंडी होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जिल्हा बँकांवर घातलेली बंदी मागे घ्यावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय बँकेचे चेअरमन राजन पाटील यांनी घेतला आहे.

सोलापुरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी शाखेत जिल्हा बँकेचे केवळ १९ कोटी रुपये शिल्लक असून, या रकमेवरच नवे चलन देण्यात येत आहे. जिल्हा बँकेला नियमित व्यवहार करण्यासाठी किमान १० ते १५ कोटी रुपये लागतात. असे असताना २ ते ३ दिवसांतून एकदा डिसीसीसाठी २ ते ३ कोटी रुपयेच दिले जात आहेत. ही रक्कम जिल्ह्यातील शाखांना दिली जात आहे. मात्र, ती अपुरी पडत असल्यामुळे अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे राजन पाटील यांनी सांगितले. एकीकडे बँकेला जमा झालेल्या रकमेवर खातेदारांना ४ टक्के व्याज द्यावे लागत आहे आणि दुसरीकडे बँकेकडील सुमारे १८९ कोटी रुपये स्वीकारण्यास ट्रेझरी नकार देत आहे. केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे राज्य बँकेने सदरच्या रकमेवर नव्या चलनातील एक रुपयादेखील मिळणार नसल्याचे सांगून सदरची रक्कम चालू खात्यात बिनव्याजी ठेव म्हणून स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केल्याने डिसीसी बँकेला या रकमेवरील व्याजाचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे. दरम्यान केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सरकारचा तुघलकी कारभार समोर आला असून सहकार चळवळ मोडीत काढण्याच्या निर्णयाला विरोध म्हणून जनहित याचिका दाखल करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप, अपक्ष निर्णायक ठरणारकराड नगरपालिका, पाटण नगरपंचायत निवडणूक वार्तापत्र

0
0



राम जगताप, कराड

कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजप, शिवसेना व एमआयएमने आपल्या उमेदवारांना थेट पक्ष चिन्हावर निवडणुकीत उतरविले आहे. काही अपक्ष व आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी १२ तर शहरातील १४ प्रभागांतून २९ जागांवर १२१ उमेदवार आपले राजकीय नशीब आजमावित आहेत.

लोकशाही आघाडी, यशवंत-जनशक्ती-लोकसेवा आघाडी व शहर नागरी विकास आघाडी या तिन्हीही आघाड्यांतील कोणत्याच एका आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेतील आगामी सत्ता कोणा एका आघाडीकडे न राहता बहुमतातील आघाडीला अन्य आघाडीशी तडजोड केल्याशिवाय सत्ता मिळणार नाही, असे चित्र आहे. कोणत्या आघाडीला बहुमत मिळणार व कोण कोणाच्या गळ्यात-गळे घालणार हे निवडणूक निकालानंतरच शहरवासियांना पहावयास मिळणार आहे.

कराड नगरपालिकेच्या इतिहासात तब्बल ४३ वर्षे सलग नगराध्यक्ष पदावर विराजमान होत कराडकरांच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारे दिवंगत नेते पी. डी. पाटील यांच्या कारकिर्दीत कराड शहरात पी. डी. पाटील यांचा मोठा दरारा होता. जनतेतून थेट निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीमध्ये या पूर्वी पी. डी. पाटील व त्यानंतर जनशक्तीच्या शारदा जाधव यांनी बाजी मारली होती. पी. डी. पाटील यांचे कराड शहरात स्वत:चे राजकीय वलय होते, तेच आता त्यांचे पुत्र आमदार बाळासाहेब पाटील, सुभाष पाटील तर नातू सौरभ पाटील कायम राखून आहेत. या वलयाच्या बळावरच ते या निवडणूक रिंगणात उतरत जनतेचा कौल घेत आहेत. या प्रचार कामात आजतरी आमदार पाटील स्वत: शहरातील प्रत्येक प्रभागात फिरत मतदारांना सामोरे जात आहेत. त्यांच्यासह त्यांच्या आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारही नगरसेवक उमेदवारांच्या प्रत्येक प्रचारफेरीमध्ये सहभागी असल्याचे दिसून येते.

लोकशाहीला प्रमुख विरोधी आलेल्या जनशक्ती आघाडीच्या उमेदवारांना मात्र स्वत:च प्रभागात फिरून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करावे लागत आहे. जनशक्तीचे मार्गदर्शक नेते कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारपासून कोपरा सभांना सुरूवात करत प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्यामुळे जनशक्तीच्या उमेदवारांची मदार केवळ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या वलयांसह त्यांनी राबविलेल्या प्रचारयंत्रणेवर अवलंबून आहे.

केंद्रात व राज्यात सत्तेत असलेला भाजप या निवडणुकीत उतरला असला तरी शहरात भाजपाची राजकीय ताकद जुजबी आहे. प्रत्येक प्रभागामध्ये आवश्यक असणारी कार्यकर्त्यांची फळी या पक्षाकडे नाही व त्यांनी ते करण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. त्यामुळे त्यांना सर्वच्या सर्व जागांवर आपले उमेदवार उभे न करता आले नाहीत. त्यांनी जे उमेदवार उभे केले आहेत ते कोणताही फार्स न करता मतदारांना भेटून मतदानाची विनंती करीत आहेत. शिवसेनेलाही सर्व जागांवर उमेदवार उभे न करता आल्याने त्यांनी केवळ नगराध्यक्षपदाचा मुख्य उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवत पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे. एमआयएमने मुस्लिम समाजासह दलित उमेदवार देऊन दलित-मुस्लिम समाजाची मोठ बांधली आहे. शहरातील तब्बल १५ हजार एक गठ्ठा मतांवर त्यांची भिस्त आहे.

या निवडणूक रणधुमाळीत सर्व आघाड्या व उमेदवारांनी आपल्या निश्चित यशाचा दावा केलेला असला तरीही बहुमतातील सत्ता काबीज करण्यासाठी लागणारी १५ विजयी उमेदवरांची मॅजिक फिगर कोणाही आघाडीला अथवा अपक्षांना गाठता येईल, असे चित्र आज तरी दिसून येत नाही. निवडणूक रिंगणातील लोकशाही आघाडीने बहुमताचा दावा केला असला काही ठिकाणी भाजपासह एमआएम व जनशक्तीच्या तगड्या उमेदवारांचे मोठे आव्हान आहे. जनशक्तीलाही अपक्ष बंडखोरांसह लोकशाही आघाडी व कराड शहर नागरी विकास आघाडी यांच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे.

पाटणची पहिली निवडणूक रंगतदार

पाटण नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक रंगतदार होत आहे. पाटणमध्ये १६ जागांसाठी ६५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांपैकी अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या जागेवर पाटणकर गटाच्या संगीता राजाराम जाधव यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने पाटणकर गटाने विजयी सलामी दिली आहे. दरम्यान, ७५ वर्षांपासून अधिक काळ पाटण ग्रामपंचायतीवर पाटणकर गटाचीच निर्विवाद सत्ता कायम राहिली आहे. मात्र, ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलीच निवडणूक होत असल्याने पाटणकर गटासमोर या निवडणुकीत भाजप, शिवसेना व अपक्षांनी मोठे आव्हान उभे केले आहे. यामध्ये पाटणकर गटातील काही स्वकीयांचाही समावेश आहे. काही प्रभागांमध्ये दुरंगी, तिरंगी तर काही प्रभागात बहुरंगी लढती होत असून, या निवडणुकीकडे संपूर्ण पाटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे पाटण नगरपंचायतीची निवडणूक रंगतदार होणार हे मात्र निश्चित.

पाटणकर गटाच्या उमेदवारांबरोबरच पाटणकर गटाच्या नाराज उमेदवारांसह शिवसेना, भाजप, मनसेसह अन्य अपक्ष यांचा समावेश आहे. उमेदवारांची निवड स्थानिक मतदारांवर सोपवणाऱ्या पाटणकर गटाने सहमतीची परंपरा कायम ठेवली असली तरी काही प्रभागामध्ये पाटणकर गटाच्या सहमतीला डावलत इच्छुकांनी केलेल्या मनमानीमुळे उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे तेथे बहुरंगी लढती होत आहेत. नगराध्यक्षपद हे इतर मागास महिला प्रवर्गासाठी (ओबीसी महिला) राखीव असल्याने या आरक्षणासाठी राखीव असणाऱ्या प्रभाग क्र. दोन आणि सतरा येथे सरळ लढत तर प्रभाग पाचमध्ये तिरंगी लढत होत आहे. नगराध्यक्षपद डोळ्यांसमोर ठेवून सर्वसाधारण महिला राखीव प्रभाग क्र. चार, सहा आणि सात या तीन प्रभागात ओबीसी महिलांनी अर्ज दाखल केल्याने सर्वसाधारण जागेवर घुसखोरी झालेली पहावयास मिळत आहे. बहुतेक प्रभागांमध्ये पाटणकर गटाच्या सहमतीला इच्छुकांनी डावलल्यामुळे पाटणकर गटाचे उमेदवार परस्परांविरोधात उभे ठाकले आहेत. या शिवाय भाजपच्या वतीने ७, शिवसेनेच्या वतीने १४ तर मनसेच्या वतीने एक उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एक्स्चेंजचे पैसे परस्पर दुसऱ्याच कर्मचाऱ्यांना

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पैसे बदलून घेण्यासाठी अर्ज केलेल्या १६० कर्मचाऱ्यांचे पैसे वित्त विभागातील काहींनी परस्पर दुसऱ्यांना दिल्याचा प्रकार जिल्हा परिषदेत घडला. वित्त विभागाकडून पैसे देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने अनेकांनी संबंधित बँकेत धाव घेतली. बँकेने अर्ज दिलेल्या ग्राहकांना पैसे दिल्याचे सांगितल्यानंतर जिल्हा परिषदेचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. ४० पैकी केवळ १५ कर्मचाऱ्यांचे पैसे बदलून देण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडून जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी १६० जणांचे अर्ज भरून घेण्यात आले. त्यासाठी त्यांचे पॅनकार्डही घेण्यात आले. त्याची यादीही संबंधित बँकेला देण्यात आली. या यादीतून पहिल्या ४० कर्मचाऱ्यांना पैसे बदलून देण्यात आले. बँकेने बदलून दिलेले पैसे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडे देण्यात आले. या विभागाकडून अर्ज भरून दिलेल्या कर्मचाऱ्यांना पैसे न देता जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील कर्मचारी आणि कुटुंबीयांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना पैसे बदलून दिलेले नाहीत. अर्ज भरून दिलेल्या काही कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी चौकशी केली. त्यावेळी त्यांना दोन दिवस थांबा, तुमचे पैसे देतो, अशी उत्तरे मिळाली. त्यावेळी काहींनी संबंधित बँकेकडे चौकशी केली. त्यावेळी बँकेकडून वस्तुस्थिती कळाल्यानंतर अनेक कर्मचारी हवालदिल झाले. पैसे बदलून घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. यामध्ये एका अधिकाऱ्याने चाळीस हजार रुपये बदलण्यासाठी दिले होते. दरम्यान, हा प्रकार घडला असल्यास गंभीर आहे. त्यांची गांभीर्याने चौकशी केली जाईल, असे सीईओ कुणाल खेमनार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परीट समाजाची एकता महत्त्वाची’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘विखुरलेल्या परीट समाजाला एकत्र आणण्याचे काम ओमसाई वधूवर केंद्राचे यांचे कार्य उल्लेखनीय आहे’ असे गौरवोद्वागार मधुरिमाराजे छत्रपती यांनी काढले. २२ व्या राज्यव्यापी परीट वधू वर सूचक मेळाव्यात त्या बोलत होत्या. मंगळवार पेठेतील चौंडेश्वरी सभागृहात मेळावा झाला. अध्यक्षस्थानी परीट समाजाचे प्रदेशाध्यक्ष एकनाथ बोरसे होते.

प्रदेशाध्यक्षक बोरसे म्हणाले, ‘परीट बांधवासाठी ओमसाई वधू वर केंद्र हा आधारवड आहे. बाळासाहेब शिंदे यांनी यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. परीट समाजाच्या अनेक मागण्यांसाठी येत्या काही दिवसांत संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी समाजबांधवानी एकत्र येण्याची गरज आहे.’

विजय मांडोळे यांनी मार्गदर्शन केले. नेहा शिंदे,आशा परीट, गौरी शेणोलीकर, धनश्री शिंदे, ज्ञानेश्वरी देवगांवकर, यशोदा कुरणे, कीर्ती शिंदे, पद्मवंदन देवगांवकर, प्रदीप यादव, अभि यादव, अमित शिंदे, प्रथमेश शिंदे आदींनी संयोजन केले. मेळाव्यास मुंबई, पुणे, कोकण आणि कर्नाटकातून परीट समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी स्वागत केले. शरद तांबट यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकृष्ण लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार जागृती अभियान गतिमान करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नगरपरिषदा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात मतदार जागृती अभियान गतिमान करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नऊ नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत अभियानासंदर्भात सूचना केल्या.

जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, ‘मतदार जनजागृती अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याबरोबरच बहुसदस्यीय प्रभाग पध्दती, इथिकल व्होटिंग आदीबाबत प्रभावी जनजागृती व्हावी. यासाठी पारंपारिक व कल्पक योजना, नवीन तंत्रज्ञान, सोशल मिडिया यांचाही अवलंब करावा. शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून नगरपालिका क्षेत्रामध्ये मतदान जागृतीच्या अनुषंगाने बहुसदस्यीय प्रभाग पध्दती, इथिकल व्होटिंग तसेच मतदानाची टक्केवारी वाढविणे यावरच अधिक भर द्यावा.’

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने जिल्हयातील नगरपरिषद क्षेत्रात मतदार जागृती अभियानाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती शिवाजी विद्यापीठाचे नोडल ऑफिसर प्रा. माने यांनी दिली. प्रारंभी जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई यांनी बैठकीची माहिती दिली.

बैठकीस इचलकरंजी निवडणूक अधिकारी समीर शिंगटे, जयसिंगपूरचे निवडणूक अधिकारी विजयसिंह देशमुख, कागलच्या निवडणूक अधिकारी मनीषा कुंभार, वडगावचे निवडणूक अधिकारी सचिन इथापे, गडहिंग्लजच्या निवडणूक अधिकारी संगीता चौगुले, कुरुंदवाडच्या निवडणूक अधिकारी डॉ. रेखा सोळंके, मुरगुडच्या निवडणूक अधिकारी किर्ती नलवडे, मलकापूरचे निवडणूक अधिकारी शैलेंद्र सूर्यवंशी आणि पन्हाळ्याच्या निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांच्यासह सहायक निवडणूक अधिकारी, तहसिलदार तसेच सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजाचे प्रश्न विज्ञानाद्वारे सोडविणार

0
0

मारुती पाटील

Maruti.Patil @timesgroup.com

Tweet :@ MarutipatilMT

संविधानिक दर्जा प्राप्त असलेल्या महाराष्ट्राच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या सदस्यपदाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न विज्ञानाच्या माध्यमातून सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या समाजोपयोगी संशोधनाला आर्थिक निधी मिळविण्याबरोबरच नवतंत्रज्ञान निर्माण करण्यावर भर राहील. ‘नॅक’च्या मूल्यांकनामध्ये बदल झालेला असला तरी, येथील शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी सक्षम असल्याने ‘नॅक’चे मूल्यांकन टिकवण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी विद्यापीठांतर्गत गुणवत्ता व्यवस्था महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सदस्य व कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स’शी संवाद साधला.

००००

आयोगाच्या सदस्यपदी निवडीकडे कसे पाहता ?

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या सदस्यपदी निवड होणे ही मुळात शिवाजी विद्यापीठासाठी भूषणावह बाब आहे. महाराष्ट्रात संविधानिक प्राप्त आयोगाची निर्मिती केली असून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रश्न सोडविण्यावर भर दिला जातो. यामध्ये अकरा लोकांचा समावेश असून आयोगाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर काम पाहणार आहेत. समाजात बदल घडवून विकास साध्य करण्यावर भर दिला जाणार असून, विद्यापीठास्तरावरील संशोधनाचा वापर करून घेण्यात येणार आहे. स्वयंप्रेरित आणि कृतिशील आयोगाच्या माध्यमातून समाजाला पुढे नेण्यास याचा फायदा होणार आहे.

आयोगाचे महत्त्व काय ?

आयोगाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण उपक्रमाचा शोध घेणे आणि तंत्रज्ञानातील गॅपचा मागोवा घेऊन इतर उद्योगांसाठी साह्यभूत संशोधनासाठी वापर करून घेण्यात येणार आहे. आयोगातील सदस्यांमध्ये मुख्य, अर्थ, प्लॅनिंग कमिशनर यांचा समावेश आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी आयोग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कृषी, कॉटन, हॉर्टिकल्चर, लघु खनिजांमधील संशोधनाला चालना देण्यात येणार आहे. गैर पारंपरिक ऊर्जा क्षेत्रात काम करून ऊर्जा क्षेत्रावरील खर्च कमी करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

निवडीमुळे विद्यापीठातील संशोधनाला चालना मिळेल?

सदस्यपदी निवड होण्यापूर्वीच विद्यापीठातील संशोधनवृद्धीला चालना मिळण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. सेमिनार, प्रोजेक्टच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भर दिला जात आहे. विज्ञान उपक्रमामध्ये आर्थिक मदत करणे, सायन्स इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी आणि विज्ञान लोकप्रिय करणे याची सुरुवात वारणा येथीस सेंटरद्वारे केली आहे. अशा सेंटरमध्ये आयोगाच्या माध्यमातून आणखी सेंटरची निर्मिती करून संशोधकांना प्लॅटफार्म मिळेल. यासाठी सहा प्रकल्पांना मदत केली आहे.

बदललेल्या स्वरूपानुसार ‘नॅक’ची तयारी कशी कराल?

‘नॅक’च्या गुणांकनामध्ये बदल झाल्यानंतर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दोन महाविद्यालयांना नॅक ++ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे बदललेल्या गुणांकनासाठी विद्यापीठ सक्षम आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता व्यवस्था विभागाने राज्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याद्वारे बदललेल्या गुणांकनासाठी तयार केली आहे. कोणतेही बदल विद्यापीठातील सर्व घटक त्वरित स्वीकारत असल्याने ‘नॅक’ची अशी स्वतंत्र तयारी करण्याची आवश्यकता वाटत नाही.

सुवर्णमहोत्सवी निधीसाठी कोणते विशेष प्रयत्न केले?

विद्यापीठाच्या विकासासाठी निधीची घोषणा होऊन तो मंजूरही झाला आहे. निधी लवकरात लवकर मिळण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील सकारात्मक आहेत. त्यामुळे त्वरित निधी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जाहीर झालेला निधी एकाचवेळी प्राप्त होण्यापेक्षा तो टप्प्याटप्प्याने घेऊन विद्यापीठातील प्रकल्प मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात गुटखा खुलेआम

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet:@bhimgondaMT

कोल्हापूर : राज्यभरात गुटखा विक्रीला बंदी असताना शहर आणि जिल्ह्यात त्याची खुलेआमपणे विक्री सुरू आहे. प्रातिनिधिक स्वरुपात काही पान टपऱ्यांना भेट देऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. अनेक टपऱ्यांमध्ये सुगंधी सुपारीच्या गोंडस नावाखाली गुटखा विक्री होत आहे. कठोर कारवाईची शक्यता नसल्याने जादा दराने गुटखा सहज उपलब्ध होत आहे. ‌या गुटखा विक्रीकडे पोल‌िस, अन्न व औषध प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

गुटखा व तंबाखूजन्य पदार्थामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. या व्यसनांच्या आहारी सर्वच वयोगटातील लोक जात आहेत. सिगारेट ओढणे व गुटखा खाणे ही महाविद्यालयीन युवकांमध्ये एक प्रकारे फॅशनच असते. त्याला आळा घालण्यासाठी सरकारने २०१२ मध्ये राज्यात गुटखाबंदीचा निर्णय घेतला. गुटखा उत्पाधित कारखानदारांनी वेगळीच शक्कल लढवली. सुपारीच्या नावाखाली गुटख्याचे उत्पादन सुरू झाले. सीमेलगतचे काही गुटखा निर्मितीचे कारखाने जवळच्या कर्नाटकात स्थलांत‌रित झाले आहेत. तेथे उत्पादन करून महाराष्ट्रात गुटख्याची विक्री केली जात आहे.

कर्नाटकमध्ये गुटखा बंदी नाही. त्यामुळे तेथून महाराष्ट्रात गुटखा आणला जातो. सांगली जिल्ह्यातील मिरज, जत, चिक्कोडी, अथणी, बोरगाव हे कोल्हापूर जिल्ह्यात गुटखा आणण्याचे मार्ग आहेत. गुटख्याची तस्करी करणारे रॅकटचे कार्यरत आहे. आणलेला गुटखा चौकाचौकांतील पानपट्टी, छोट्या टपऱ्यांसह काही दुकानांतून विकला जातो.

दुपारी सव्वा बारा वाजता शहरातील निवृत्ती चौक, उमा टॉकीज परिसरातील काही पान टपऱ्यांना महाराष्ट्र टाइम्सच्या प्रतिनिधींनी भेट दिली. त्यावेळी सर्वच पान टपऱ्यांवर गुटखा, तंबाखू, मावा खरेदीसाठी गर्दी दिसली. गुटखा विक्री खुलेआमपणे सुरू असल्याचे दिसले. बंदी आहे, कारवाई होईल, अशा भीतीचा लवलेशही विक्रेत्यांच्या चेहऱ्यांवर दिसला नाही. ग्राहकही आपल्याला हव्या त्या ब्रॅडचा गुटखा सहजपणे विचारत होते. विक्रेते उपलब्ध असलेला गुटखा सांगत होता. अशाप्रकारे गुटखा विक्री शहरात सर्व ठिकाणी सुरू आहेत.

ग्राहक नेहमीचे

विक्रेत्यांना रोजचे गुटख्याचे ग्राहक कोण, हे माहीत असते. संबंधित ग्राहक समोर आल्यानंतर केवळ इशारा करतात. त्यानंतर त्याच्या हातावर गुटख्याचे पाकिट ठेवले जाते. शेजारील ग्राहकालाही कळू नये, अशी दुकानदार, गुटखा खाणारा ग्राहक याच्यांतील देवाण-घेवाण असते, असे व्हीनस कॉर्नरवरील एका पानटपरीत दिसून आले.

देशातील तिसरे राज्य

केरळ, बिहारनंतर गुटखाबंदी करणारे महाराष्ट्र हे तिसरे राज्य आहे. कोट्यवधी रुपयांचा कर ‌बुडाला तरी चालेल, मात्र कॅन्सरचे प्रमाण कमी व्हावे, या हेतून तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने हा निर्णय घेतला. पण बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा, तालुका पातळीवर सक्षम यंत्रणा नाही. परिणामी बंदी कागदावरच राहत आहे.

दहा ते ९० रूपये

गुटखाचे दर कमीत कमी १० ते ९० रूपयांपर्यंत आहे. बंदीच्या नावाखाली मूळ किंमतीपेक्षा दुप्पट, तिप्पटीने गुटखा ग्राहकांना विकला जात आहे. चटक लागल्याने गुटख्याचे व्यसनी लोक कितीही पैसे सांगितले तरी विकत घेताना दिसत होती. त्यामध्ये नियमितना वेगळा आणि नव्याने आलेल्या ग्राहकांकडून मनमानी पैसे घेते असल्याचे दिसले.

गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास कारवाई केली जाते. महिन्याला सरासरी एक मोठी कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न असतो. मात्र, अनेकदा माहिती दडवली जाते. गुटखाविक्री केली जाते असे ठिकाण, दुकान, पानटपरीची माहिती नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे द्यावी. माहिती, तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. निदर्शनास आल्यास त्वरित कारवाई केली जाते.

मोहन केंबळकर, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

गुटख्याची तस्कारी जोरात सुरू आहे. शहरातील बहुतांशी पान टपऱ्यांवर त्याची खुलेआम विक्री होते. माहिती द्या, आम्ही कारवाई करतो, असे अन्न व औषध प्रशासन सांगते. मग त्यांचे कार्यालय असलेल्या परिसरातच सर्वाधिक गुटखा कसा विकला जातो? हे त्यांना दिसत नाही का? असा प्रश्न आहे. व्यापक कारवाई करण्याचे अन्न व औषध प्रशासन टाळत असल्याचे यातून स्पष्ट होते.

दीपक देवलापूरकर, अध्यक्ष, जनस्वास्थ दक्षता समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images