Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘माध्यमिक’चा लिपिक जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिक्षणाधिकाऱ्याकडून मुख्याध्यापक पदोन्नती प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी ३५ हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागात‌ील वरिष्ठ सहायक लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात सापडला. चंद्रकांत एकनाथ सावर्डेकर (वय-४५, रा. जुनी मोरे कॉलनी, संभाजीनगर) असे त्याचे नाव आहे. गजबजलेल्या दसरा चौकात सायंकाळी सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापुरातील शिवस्मारक शिक्षण मंडळातर्फे महाराणा प्रताप हायस्कूल (दुधाळी) चालवले जाते. त्याच हायस्कूलमधील मुख्याध्यापिका सय्यद सेवानिवृत्त झाल्याने त्याजागी पदोन्नतीने नाथाजी राजमाने यांची नियुक्ती झाली. त्यांच्या नियुक्तीस शासन मान्यतेचा प्रस्ताव नियमानुसार शिक्षण मंडळाने २ नोव्हेंबरला माध्यमिक शिक्षण विभागाकडे पाठवला. त्यासंबंधीची माहिती घेण्यासाठी हायस्कूलचे लिपिक व जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे शहर सचिव मनोहर वसंतराव जाधव ‘माध्यमिक’मध्ये ७ नोव्हेंबर रोजी गेले.

त्यावेळी सावर्डेकर यांना भेटून प्रस्तावाबाबतची विचारणा केली. त्यावेळी सावर्डेकरने प्रस्ताव मंजुरीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांची सही घेण्यासाठी टिप्पणी तयार केली आहे. मात्र सहीसह प्रस्ताव मंजुरीसाठी ४० हजारांच्या लाचेची मागणी सावर्डेकरने केली. पैसे घेऊन ९ तारखेला भेटायला सांगितले. यासंबंधीची तक्रार जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे केली. दरम्यान, जाधव यांनी ३५ हजारांवर तडजोड केली.

त्यानुसार जाधव नव्यानेच चलनात आलेल्या २ हजारांच्या १७ नोटा आणि १०० रूपयांच्या १० नोटा घेऊन दसरा चौकातील साधना कॅफेसमोर आले. तेथे सावर्डेकरला जाधव यांच्याकडून ३५ हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. पथकाने सावर्डेकर यांच्याकडून ३५ हजाराची रक्कमही जप्त केली.

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रसाद हसबनीस, उपअधीक्षक उदय आफळे, निरीक्षक प्रविण पाटील आदीच्या पथकाने पथकाने ही कारवाई केली.

............

वर्षात तिसरी कारवाई

माध्यमिक शिक्षण विभागातील दोन कर्मचारी सहा महिन्यांपूर्वी लाच घेताना सापडले होते. त्यानंतर पुन्हा सावर्डेकर रंगेहाथ सापडला. एक वर्षात तीन कर्मचारी सापडल्याने या विभागातील खाबूगिरी पुन्हा उघड झाली आहे.

..........................

नव्या नोटांची अट

सावर्डेकरने लाच म्हणून नव्या नोटाच देण्याची अट घातली होती. त्यासाठी जाधव यांनी नव्या नोटा मिळवून दिल्या. लाचेचा काळा पैसा व्हाइट करताना अडचण येऊ नये याचीही खबरदारी घेतल्याची चर्चा येथे होती.

..................

नव्या नोटा तरी...

१००० व ५०० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करताना भ्रष्टाचार कमी करणे हेही कारण सांगितले आहे. पण लाच म्हणून दोन हजारांच्याही नोटा घेता येता हे सावर्डेकर यांनी दाखवून दिले. ‘लाचलुपतने’ही नव्या नोटाचा पहिला बळी घेतला, अशा आशयाचे मेसेज शिक्षण क्षेत्रातील व्हॉटसअॅप ग्रुपवर फिरत राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेकडे चार कोटींवर जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारने ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर त्या करांच्या थकबाकीपोटी जमा करण्याची संधी दिल्यानंतर महापालिकेत तीन दिवसात तब्बल चार कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. घरफाळा व पाणीपट्टी भरण्यासाठी संधी असल्याचे पाहून अनेक थकबाकीदारांचे जुनी थकबाकी वसूल झाली असून सोमवारच्या सुटीच्या दिवशीही हा भरणा केला जाणार आहे.

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर थकबाकी जमा करण्यासाठी सरकारने शक्कल लढवली. स्थानिक स्वराज्य संस्थांची थकबाकी जमा करण्यासाठी या नोटा वापरण्याची मुभा दिली. त्याची मुदत पुन्हा वाढवून सोमवारपर्यंत ठेवली. यामुळे थकबाकीदार नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. तीन दिवसांपासून ही वसुली सुरू आहे. पाणीपट्टीची दीड कोटी थकबाकी आहे. एक लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची संख्या १२२ आहे. तीन दिवसांत ९० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे घरफाळ्यातील थकबाकीदारांची संख्याही मोठी आहे. १५ ते ५५ लाखापर्यंतची थकबाकी असलेल्या ५० थकबाकीदारांना विभागाने नोटीस काढल्या आहेत. त्यांच्यापैकी अनेकांनी थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे.

पहिल्या दिवशी दोन्ही विभागांची मिळून २ कोटी ८९ लाख, दुसऱ्या दिवशी ५२ लाख ६० हजार तर तिसऱ्या दिवशी रविवारी ६७ लाख रुपयांची थकबाकी जमा झाली आहे. रविवारी घरफाळ्यातील थकबाकीपोटी ४८ लाख ९३ हजार जमा झाले आहेत. सोमवारी सुटी असतानाही कर भरणा विभाग सुरू राहणार आहे. पाणीपट्टीतील निम्म्याहून अधिक थकबाकी वसूल झाली असून सोमवारच्या दिवसात पुर्ण होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकार सुधारणे हीच खरी श्रद्धांजलीमोठ्या दिमाखात जन्मशताब्दी सोहळ्याला प्रारंभ

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

‘नोटा रद्द करून काळा पैसा असा दूर होणार नाही, त्यासाठी सहकारी संस्थांमधील चुका दुरुस्त करून सहकार सुधारला पाहिजे. चारशे कोटी रुपयांचे सहकारी साखर कारखाने आपण तीस कोटींला विकू लागलो तर सहकारी संस्था टिकणार नाहीत. सहकाराच्या माध्यमातून वसंतदादांनी सर्वसामान्यांच्या जीवनाला दिलेली दिशा आणि त्यांचे विचार आपण विसरलो तर सर्वसामान्यांची कोंडी होऊन सत्य आणि प्रगतीजवळ पोहचणे कठीण आहे,’ असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केले.

स्वातंत्र्यसेनानी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ रविवारी सांगलीत झाला. कृष्णा नदीकाठावरील स्फूर्तीस्थळ या दादांच्या समाधीस्थळावर पुष्पांजली वाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिग्गज नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी गर्दी केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जन्मशताब्दी प्रारंभ सोहळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी, मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, माजी सभापती शिवाजीराव देशमुख, उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, नसीम खान, प्रकाश आवाडे, मधुकर चव्हाण, चारुलता टोकस, कमल व्यवहारे, माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह सर्व पक्षातील आजी-माजी आमदार, ज्येष्ठ नेते उपस्थित होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस यशवंत हप्पे यांनी प्रास्ताविकात दादांच्या आठवणी सांगितल्या. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील आणि प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजा पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

शिवराज पाटील म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कर्तृत्वाच्या विविध पैलूंनी आपले राज्य फुलविले. त्या प्रमाणेच स्वातंत्र्य चळवळीतील कष्टाची, शेतकऱ्यांच्या मेहनतीची जाणीव ठेवून दादांनी सहकारात, औद्योगिक, संशोधन, शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. त्यामुळे मोडकळीस निघालेली सहकार चळवळ सावरणे, हीच दादांना खरी आदरांजली ठरणार आहे. कोणालाही कमी न लेखणाऱ्या दादांनी धर्म, जात-पात आणि प्रांत असा भेद कधीच आपल्या कार्यात येऊ दिला नाही. ते कोणत्याही वर्गाला कधी परके वाटले नाहीत.’

अशोक चव्हाण म्हणाले, ‘नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कोणी मदत द्यायला आले नाही, कर्जमाफी नाही. ही एक शोकांतिका आहे. दादांनी कल्पकतेने सहकारातून सामान्य माणूस उभा केला. सांगलीकरांनी सलग पंचवीस वर्षे त्यांना संधी दिल्यामुळेच दादांसारखा हिरा सर्वसामान्यांच्या सेवेत तळपत राहिला. त्यांच्या विचारातून फोफावलेली सहकार चळवळ आताचे सरकार राजकीय सुडबुद्धीने मोडू पहात आहे. संस्था बंद पडल्याने संचालकांचे नाहीतर सर्वसामान्यांचे नुकसान होणार आहे, याचे भान सरकारने ठेवले पाहिजे.’

जनार्दन द्विवेदी म्हणाले, ‘निमंत्रण पत्रिकेत नाव नसतानाही अनेक दिग्गज या कार्यक्रमास आलेत, हेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये आहे. दादांचा दरवाजा आणि मन सर्वासाठी सताड उघडे असायचे. अशा या कर्मपुरुषाचे योगदान संपूर्ण देश कधीच विसरणार नाही.’

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘अधिकारी आपले ऐकत नाहीत, अशी हतबलता व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी वसंतदादांची कारकिर्द अभ्यासली पाहिजे. मोठी पदे भोगली पण, त्यांनी सामान्यांची असलेली नाळ तुटू दिली नाही. ते एका पक्षाचे नाहीतर महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांची जन्मशताब्दी सरकारने साजरी करायला हवी होती.’

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘दादांनी ज्या-ज्या ठिकाणी पाऊल ठेवले तेथे क्रांती घडवून आणली. पुस्तकी नसले तरी सामान्य ज्ञानांचे भांडार त्यांच्याकडे अमाप होते.’

माणिकराव ठाकरे यांनी लोकमान्य नेता, अशी तर सुशिलकुमार शिंदे यांनी पंतप्रधानांनाही ठणकावून सांगून आपला निर्णय अंमलात आणणारा नेता, अशी दादांना उपमा दिली. डॉ. डी. वाय. पाटील यांनी अहंकाराचा मृत्यू झालेला नेता म्हणजे वसंतदादा पाटील असल्याचे नमूद केले. राणे यांनी विधायक महापुरुष, अशी उपमा देताना ताकारी, म्हैसाळ योजना दादांच्या नावानेच ओळखल्या जात असल्याचे सांगितले. कामांनी आणि कर्मानेही त्यांनी आपले दादापण सिद्ध केल्याचे सांगितले. यावेळी बोलताना डॉ. कदम यांनी छद्मी राजकारण सोडून देण्याचे आवाहन करताना सहकार चालविणाऱ्यानी आत्मचिंतन आणि मनन करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. माजी हर्षवर्धन पाटील यांचेही यावेळी भाषण झाले. आभार उदय पवार यांनी मानले.

स्वातंत्र्यसेनानी जयराम कुष्ठेंचा सन्मान

स्वातंत्र्यपूर्व काळात वसंतदादांनी सांगलीचा तुरुंग फोडून खंदकात उडी घेऊन इंग्रजांच्या गोळ्या झेलत कृष्णा नदीतून पलायन केले होते. त्यावेळी त्यांच्याबरोब जे तेरा स्वातंत्र्यसैनिक होते. त्यापैकी सध्या हयात असलेले जयराम कुष्ठे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उर्वरित स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी फोटो घेताना सर्व दिग्गज नेते खुर्चीवर बसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पाठीमागे उभे राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंडखोरी मागे घ्या;पाठिंबा जाहीर कराकॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे आदेश

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोरच पतंगराव कदम, डॉ. विश्वजित कदम आणि युवा नेते विशाल पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्यात रविवारी चांगलीच खडाजंगी झाल्याचे समजते. लोकसभा निवडणूक, महापालिकेतील राजकारण व पक्षीय पातळीवरील मान सन्मान या वरून एकमेकांची उणी-दुणी काढताना कोणीच मागे हटत नव्हते. अखेर चव्हाण यांनी हस्तक्षेप करीत वाद मिटवायचा आहे की नाही, असा खडा सवाल केला. नसेल तर आमच्या पद्धतीने करतो, माघार न घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. तुमचे मुद्दे योग्यही असतील मात्र, तत्काळ उमेदवारी मागे घेऊन पाठिंबा जाहीर करा, असे आदेश प्रदेशाध्यक्षांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

सांगली-सातारा विधान परिषद जागा काँग्रेसच्या दृष्टीने महत्वाची आहे. या जागेसाठीच आघाडी तुटली आहे. तुमची दुःखणी, समस्या कळाल्या मात्र ही वेळ नव्हे, निवडणूक झाल्यावर पुन्हा बसू सर्व मार्ग काढू मात्र, या निवडणुकीत काँग्रेसचे मोहनराव कदम विजयी झाले पाहिजेत, असेही चव्हाण यांनी बजावले. निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील पतंगराव कदम गट आणि वसंतदादा म्हणजे विशाल पाटील गटामधील वाद थंड होताना दिसत नाही. गेली काही दिवस हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, यश आले नाही. उमेदवारी माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणी माघार घेण्याचे मान्य करूनही अर्ज कायम ठेवण्यात आला. त्यामुळे मुळातच मतदारसंघात कमजोर असणारी काँग्रेस हतबल झाली आहे. अखेर वसंतदादांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा योग आला. जन्मशताब्दी कार्यक्रम झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये खास बैठक घेण्यात आली. अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस पतंगराव कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, गट नेते किशोर जामदार यावेळी उपस्थित होते. आम्हाला विश्वासात घेत नाहीत. पक्षाच्या कार्यक्रमात योग्य सन्मान, सहभाग देत नाहीत. या उमेदवारी बाबतही काही विचारले नाही. विश्वासात घेतले नाही. मागील दोन-तीन लोकसभा निवडणुकी वेळीही आम्हाला विरोध केला. चुकीच्या माणसांना ताकद दिली. महापालिका कारभारातही विचारात घेत नाहीत. आमच्या समर्थक नगरसेवकांना डावलतात यासह अनेक तक्रारी दोन्ही प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांनी मांडल्या.

डॉ. कदम यांनीही यावेळी बाजू मांडली. महापालिकेत विश्वासात घेत नाही हे चुकीचे आहे. सर्व नगरसेवकांचा विरोध पत्करून मी यांच्या गटाच्या विजय घाडगेंना उपमहापौर केले. वेळोवेळी प्रत्येक निवडणुकीत सहकार्य केले आहे. मात्र, यांनीही आम्हाला ठिकठिकाणी विरोधच केला आहे, असे डॉ. कदम यांनी सांगितले. मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती. त्या आधी मताधिक्य दिले आहे असे सांगितले. यावर आमच्याकडे सर्व रेकॉर्ड आहे, असा दावा विशाल पाटील यांनी केला. त्यावर तुमचा कारभार सुधारा त्याचे ही रेकॉर्ड आमच्याकडे असल्याचा इशारा विश्वजित कदम यांनी दिल्याचे समजते. उणी-दुणी आणि वाद वाढू लागल्याने अशोक चव्हाण यांनी हस्तक्षेप केला.


विशाल पाटील संपर्ककक्षेच्या बाहेर

अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अर्ज माघार घेण्याचे आदेश देण्यात आले. या बाबत तत्काळ निर्णय घेण्याची ग्वाही विशाल पाटील यांनी दिल्याचीही चर्चा आहे. मात्र, या बाबत पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या बैठकीतील निर्णय विशाल पाटील, प्रतीक पाटिल यांना मान्य आहे की नाही, या बाबत साशंकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार शेतकऱ्यांनाही प्राप्तिकर भरायला लावणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

‘नोटा रद्द करून सरकारने काय साधले, कळत नाही. काळ्या पैशाला आळा घालायचा होता तर मग दोन हजाराची नोट का चलनात आणली. तुमचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी गुजरातलाच कसा समजतो. असे असेल तर गेल्या सहा महिन्यांत कोणत्या उद्योगपतींनी, भांडवलदारांनी किती पैसे भरले हे जाहीर करावे. सरकारची निती येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांनाही प्राप्तिकर भरायला लावण्याची वेळ आणते की काय?, अशी शंका येण्यासारखी स्थिती आहे,’ अशी भीती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

सरकारने कोणताही निर्णय घेताना सर्वसामान्यांना त्याची झळ बसणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक होते. नोटा रद्दचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. पैशासाठी रांगेत उभे राहणे सहन होण्यापलिकडे गेल्याने दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. खात्यावर पैसे असूनही जनतेला वणवण करावी लागत आहे. हजाराची नोट रद्द करून दोन हजाराची नोट काढून काय साधणार आहेत, कोणाचे भले करणार आहेत, हे समजत नाही. राज्यातले सरकार सहकारी संस्थांना हरताळ फासत आहे. राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली जात असल्याने चांगल्या संस्थाही अडचणीत येत आहेत. साखरेचे दर पडले असतानाही कारखानदारी टिकविण्याचे जोखमीचे काम केले जात असताना सरकारच्या त्यात हस्तक्षेप वाढत आहे. ही चळवळ मोडीत निघाली तर सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत. त्यामुळे सहकार चळवळ जोपासणे हीच जन्मशताब्दीच्या निमित्ताने वसंतदांदांना आदरांजली ठरणार आहे. काँग्रेस एकसंघ असून, जनतेच्या प्रश्नांसाठी सतत झगडत असल्याचेही चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा सराफी व्यापाऱ्यांवर प्राप्त‌िकरचे छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने अघोषित करभरणा करण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतरही अनेकांनी कराची रक्कम भरणा केलेली नाही. अशा व्यापाऱ्यांवर प्राप्त‌िकर विभागाने छाप्यांचे सत्र पुन्हा सुरू केले होते. नोटा बंदीनंतर ही कारवाई तीव्र झाली आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्ली आणि मुंबई येथे टाकलेल्या छाप्यांनंतर रविवारी (ता. १३) कोल्हापुरातही काही सराफांवर छापे टाकून करवाई करण्यात आली. या कारवाईने शहरातील सराफांसह बड्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

५००, १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर प्राप्तीकर विभागाकडून धनदांडग्यांचे आर्थिक व्यवहार तपासणीचे सत्र सुरू झाले आहे. प्राप्तीकर विभागाने दोन दिवसांपूर्वी मुंबई आणि दिल्लीतील मोठ्या व्यावसायिकांवर छापेमारी करून देशभरात अशा प्रकारची कारवाई होऊ शकते, असे संकेत दिले होते. अवघ्या काही तासातच कोल्हापुरात याचा प्रत्यय आला.

प्राप्त‌िकर विभागाच्या एका पथकाने रविवारी सकाळी शहरातील दोन बड्या सराफांच्या पेढींवर छापे टाकून कारवाई केली. गुजरी आणि राजारामपुरीतील कारवाईत पथकाने दुकानातील व्यवहारांची तपासणी केली. दुकानांमध्ये प्रवेश करताच सर्व व्यवहार बंद ठेवण्यास सांगून अधिकाऱ्यांनी जमा-खर्चाची कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेतली. एकाचवेळी अनेक ठिकाणी ही कारवाई सरू झाल्याने काही क्षणात याची माहिती गुजरीसह संपूर्ण शहरात पसरली. या घटनेनंतर गुजरीतील अनेकांनी पेढ्या बंद ठेवणेच पसंत केले.

कारवाईत नेमके काय होते, याची उत्सुकता सराफांमध्येही होती, मात्र रात्री उशिरापर्यंत याची अधिकृत माहिती संबंधित सराफांसह प्राप्तीकरच्या अधिकाऱ्यांनीही दिली नाही. या कारवाईने इतर सराफ आणि मोठ्या व्यावसायिकांनीही धास्ती घेतली आहे.

गुजरीत बंदसदृश स्थिती

रविवारी सकाळीच प्राप्तीकरच्या छाप्यांची माहिती मिळाल्याने काही सराफांनी पेढ्या बंद ठेवणेच पसंत केले. ज्या सराफांनी पेढ्या उघडल्या होत्या त्यांनीही परिस्थितीचा अंदाज घेत पेढ्या बंद ठेवल्या. कारवाईची माहिती सोशल मीडियातून व्हायरल होताच काही बड्या सराफांनी मोबाइल बंद करून ठेवले होते. महिन्याभराच्या कालावधीत शहरात दुसऱ्यांदा प्राप्तीकर खात्याची कारवाई झाल्याने याचीच चर्चा गुजरीत सुरू होती. उलटसुलट चर्चेनंतर संध्याकाळी काही सराफांनी पेढ्या सुरू केल्या.

बडे व्यावसायिक धास्तावले

नोटा बंदीच्या निर्णयानंतर काही बडे व्यावसायिक जवळचा काळा पैसा सोन्यासह मोठ्या खरेदीमध्ये गुंतवण्याची शक्यता गृहीत धरून प्राप्तीकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. सराफ, बिल्डर, मोठे व्यापारी यांना लक्ष करून त्यांच्या व्यवहारांची तपासणी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू चरित्रग्रंथ आता चिनी भाषेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखी राजर्षी शाहू छत्रपतींचा शाहू चरित्रग्रंथ आता चिनी भाषेमध्ये अनुवादित होणार आहे. मूळच्या चीनच्या प्रा. ओ ताई ली हा अनुवाद करणार आहेत. त्याचबरोबर या ग्रंथाच्या रशियन भाषेतील अनुवादाचे काम पूर्णत्वास आले असून, लवकरच त्याचा प्रकाशन कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती आज महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीने पत्रकार परिषदेत दिली.

ग्रंथाच्या अनुवादासंदर्भात डॉ. पवार म्हणाले, ‘राजर्षी शाहूंचे चरित्र केवळ मराठी माणसापर्यंत मर्यादित राहू नये. राजर्षीचे समाजकार्य, त्यांचे समाजकार्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचावे, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी भारतातील १४ प्रादेशिक आणि १० विदेशी भाषांमध्ये त्याचा अनुवाद करण्याचे नियोजन आहे. त्यातील कन्नड, कोंकणी, उर्दू, तेलुगू, हिंदी या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा ग्रंथ पोहचविण्यासाठी वेगवेगळ्या विदेशी भाषांमध्ये हा ग्रंथ पोहविण्याचे नियोजन आहे. त्यातील इंग्रजी आणि जर्मन भाषेत हा ग्रंथ उपलब्ध आहे.’

शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागाच्या मेघा पानसरे व रशियन भाषा तज्ज्ञ प्रा. तत्याना बीकवा यांनी शाहू चरित्राचा रशियन अनुवाद केल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली. प्रा. बीकवा या मुळच्या रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथील असून, त्यांना हिंदी व मराठी दोन्ही भाषा अवगत असल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली. पत्रकार परिषदेस मेघा पानसरे यांच्यासह प्रबोधिनीचे सुरेश शिपूरकर, मंजुश्री पवार आदी उपस्थित होते.

०००

राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याविषयी वाचून अत्यंत प्रभावित झाले आहे. शिक्षण, रोजगार याबाबत त्यांनी राबविलेल्या धोरणांचा आजही अनेकांना फायदा होत आहे. गेल्या दोन दिवसांत शाहू जन्मस्थळ आणि कोल्हापुरातील इतर संग्रहालयांना भेट देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेत आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीचा चरित्रग्रंथ अनुवादी करणे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे.

- प्रा. ओ ताई ली, चिनी भाषातज्ज्ञ

भाषा तज्ज्ञांना भाषा शिकविण्याबरोबरच साहित्य लेखन, अनुवाद याचेही काम देण्यात येते. सुरुवातीला आम्ही रशियन साहित्य मराठीत अनुवादीत केली आहेत. आता आपल्याकडील साहित्य रशियन भाषेत अनुवादित करत आहोत. शाहूंचे कार्य कॉ. पानसरे यांच्याकडून अनेकवेळा ऐकले होते. रशियन भाषेत शाहूचरित्राचा अनुवाद करताना तो रशियन शैलीत व्हावा, असा प्रयत्न होता. त्यासाठी प्रा. तत्याना बीकवा यांची खूप मदत झाली.

- प्रा. मेघा पानसरे, रशियन भाषातज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनाला २० कोटी रुपयांचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोटा रद्द करण्याच्या निर्णयाने कोल्हापूरच्या पर्यटन क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. गेल्या चार दिवसांत जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायाला तब्बल २० कोटी रुपयांहून अधिक फटका बसला आहे. रुम बुकिंगबरोबर जेवण, नाष्ट्याच्या हॉटेलवर परिणाम झाला असून अनेक पर्यटकांनी जिल्ह्यातील पर्यटनाचा बेतही रद्द केल्याने त्याचाही फटका बसला आहे.

नोटा रद्दच्या निर्णयाने साऱ्या क्षेत्रांना व्यापले आहे. त्यामध्ये सामान्य नागरिक ते विविध व्यावसायिक पिचले जात आहेत. अनेकांना काय करावे सुचत नाही. तर व्यावसायिकांकडून दररोज व्यवसाय सुरू केला जातो, पण कुणी फिरकतच नसल्याने सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. हीच परिस्थिती पर्यटन क्षेत्रातही आहे. पंतप्रधानांनी निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक पर्यटकांनी कोल्हापूरला येण्याचे टाळले आहे. चार दिवसांत जिल्ह्यातील हॉटेलमधील रुमचे बुकिंग झालेले नाही, असे हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर यांनी सांगितले. त्याचबरोबर ज्या पर्यटकांनी आगाऊ बुकिंग केले होते, त्यांनीही बुकिंग रद्द केले आहे.

या रुम बुकिंगबरोबर जे पर्यटक कोल्हापुरात आले आहेत. त्यांच्याकडेही पैशांची नीट उपलब्धता नसल्याने ते खर्च करु शकत नसल्याने जेवण, नाष्ट्याची हॉटेल तसेच चप्पल ओळीमध्येही खरेदीवर परिणाम झाला आहे. या पर्यटकांकडून वाहने भाड्याने घेतली जातात. त्यांच्यावरही परिणाम जाणवत असून पर्यटनावर आधारित साऱ्या उद्योगाला मोठा फटका बसला आहे. जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत पर्यटक येणार नाहीत हे स्पष्ट आहे. अनेक छोट्या हॉटेलचा व्यवसायही थंडावला आहे. या हॉटेल मालकांकडे सुटे पैसे नसल्याने मोठी अडचण होत आहे. दोन दिवसात शाळा सुरू होणार असल्याने शेवटच्या टप्प्यातील पर्यटनाच्या उत्पन्नावर व्यावसायिकांना पाणी सोडावे लागले आहे.

रविवारचा बाजार शांत

रविवारी आठवडा बाजार रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना मोठा आधार असतो. शनिवारी झालेल्या पगारानंतर रविवारच्या बाजारात येऊन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाते. मात्र अनेकांचे पगार शनिवारी होऊ शकले नाहीत. ज्यांचे पगार झाले, त्यांना पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा मिळाल्या आहेत. ते नवीन पैसे घेण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे रविवारच्या आठवडा बाजारावर परिणाम जाणवत होता. नेहमीप्रमाणे गर्दी नव्हती, व्यवहारही फार मोठे झाले नसल्याचे विक्रेत्यांचे मत होते.

काँग्रेसचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अच्छे दिन’ या प्रचाराची काँग्रेसच्यावतीने रविवारी खिल्ली उडवली. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ठिकठिकाणी बँकांच्या दारात पाणी वाटप करुन केंद्र सरकारच्या निर्णयाचा आगळ्या पद्धतीने निषेध केला. नागरिकांना स्वतःच्या पैशासाठी बँकांच्या दारात ताटकळत उभे राहण्याला ‘हेच का अच्छे दिन?’ असे लिहिलेल्या टोप्या घालून निषेध केला. यामध्ये पदाधिकारी तसेच नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात निषेध व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँका आज बंद राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोजकीच एटीएम काही काळ उघडी व बहुतांशवेळ बंद, बँकेत गेल्यास पैसे संपलेले, त्यासाठी विविध बँकांमध्ये मारले जाणारे हेलपाटे, तेथील भल्या मोठ्या रांगा यामुळे सामान्य नागरिकांच्या संयमाची सलग चौथ्या दिवशी परीक्षाच घेतली. तशातच एका व्यक्तीला प्रति दिवस एका बँकेमध्ये एकदाच व्यवहार करता येईल, अशी जाचक अट घातल्याने अडवणुकीत आणखी वाढच झाली आहे. बाजारात सुट्या पैशांची वानवा आहे. अशाचत बहुतांश बँकांमधून दोन हजार रुपयांच्या नोटा देण्यात येत असल्याने त्यांचा वापर करण्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागत आहे. एकंदरीतच नागरिकांना स्वतःचे पैसे मिळवण्यापासून ते खर्च करण्यासाठीही आटापिटा करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, सोमवारी बँका बंद राहणार असल्याने या त्रासामध्ये आणखीनच भर पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपेक्षा रविवारचा दिवस आणखीनच त्रासदायक होता. सरकारी कार्यालयांना सुटी असल्याने नोकरदारांनी सकाळी नऊ वाजल्यापासून बँकांच्या दारात रांग लावली होती. आयसीआयसीआय, आयडीबीआय, एचडीएफसी, एसबीआय या बँकांची एटीएम सकाळी सुरू होती. एटीएम मोजकीच सुरू असल्याने त्यांच्यासमोर प्रचंड रांगा होत्या.

‘महावितरण’कडे ५ कोटी ९८ जमा

महावितरणकडे १२ नोव्हेंबर रोजी दिवसभरात पाच कोटी ९८ लाख रुपये जमा झाले. दरम्यान, उद्या (१४ नोव्हेंबर) रात्री बारा वाजेपर्यंत बिल भरणा केंद्रांवर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकार विकास पुरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजचे इन्सुलीन होईल हद्दपार

$
0
0

Janhavi.Sarate@timesgroup.com

Tweet : @MTjanhavisarate

कोल्हापूर : सध्याच्या धावपळीच्या जगात मधुमेह ही सर्वांत मोठी समस्या होऊन बसली आहे. बदलत्या जीवनशैलीने आलेली खाद्यसंस्कृती, कामाचा ताण, व्यायामाचा अभाव अशी अनेक कारणे यामागे आहेत असे वैद्यकशास्त्र सांगते. मधुमेहाशी दोन हात करताना अनेकांना रोज नाईलाजाने इन्सुलीनचे डोस घ्यावे लागतात. मात्र, लवकरच या रोजच्या कटकटीतून मधुमेही व्यक्तींना काहीसा दिलासा मिळणार आहे. एक आठवडा ते एक महिना मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या इन्सुलीनविषयीचे संशोधन सध्या सुरू आहे. आगामी एक वर्षात बाजारत येणार असे इन्सुलीन रुग्णांसाठी उपलब्ध असेल.

मधुमेह झालेल्या व्यक्ती त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. मात्र मधुमेह झाला की, नाष्टा किंवा जेवणाआधी इन्सुलीन घ्यावे लागते. जेवणानंतर नियंत्रणासाठीची औषधे घ्यावी लागतात. सध्याच्या धावपळीच्या युगात वेळेत जेवण, औषधे घेणे कठीण आहे. रोजच्या इन्सुलीनच्या वापराचा कालावधी वाढवता येईल का याबाबत वैद्यकीय क्षेत्रात संशोधन सुरू आहे. किमान एक आठवडा ते एक महिना अशा कालावधीत इन्सुलीनच्या माध्यमातून नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत सध्या संशोधन सुरू असल्याचे नुकतेच दिल्ली येथे झालेल्या एका वैद्यकीय परिषदेमध्ये सांगण्यात आले होते.

तपासणी आवश्यकच

मधुमेहाच्या पडताळणीसाठी सध्या Hb1Ac ही टेस्ट उपलब्ध आहे, त्यातून ग्लायसेटेड हिमोग्लोबीचे प्रमाण मोजले जाते. यामध्ये तीन महिन्यांची सरासरी मोजली जाते. हे प्रमाण ६.५ ते ७ टक्क्यांच्या पुढे जावू नये. लोकांनी मधुमेह नियंत्रणासाठी Hb1Ac ही टेस्ट करणे आवश्यक आहे.

नवी दिल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या वैद्यकीय परिषदेत मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्सुलीनच्या निर्मितीत नवे संशोधन सुरू असल्याची माहिती देण्यात आली. इन्सुलीन दररोज घेण्याऐवजी आठवड्यातून ‌किंवा महिन्यातून एकदा घ्यावे लागेल अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचा मधुमेही रुग्णांना फायदा होईल.

- डॉ. प्रल्हाद केळवकर, मधुमेह तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिसाला रिक्षाचालकाची मारहाण

$
0
0



सोलापूर

अवैध प्रवासी वाहतुकीला विरोध करणाऱ्या वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकाने दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना सोमवारी गुरुनानक चौकात घडली. अमरसिंग शिवसिंगवाले असे जखमी पोलिसांचे नाव आहे.
बिलाल महंमद हा आपल्या एम एच १३ व्ही १६८८ या रिक्षामधून अवैध प्रवासी वाहतूक करीत असताना दिसून आला असता गांधी नगर परिसरातील गुरुनानक येथे ड्युटीवर असलेले पोलीस शिपाई अमरसिंग यांनी त्याला अडविले आणि पुढे पोलिस आयुक्तांचे घर आहे, असे प्रवासी घेऊन जाऊ नको असे सांगितले. मात्र, बिलाल याने ऐकून न घेता त्याने पोलिसाला तुम को क्या करने का करो, अशी दमबाजी करून हुज्जत घातली. यावर तो थांबला नाही तर त्याने पोलिसांच्या अंगावर जाऊन वर्दीला हात घातला शिवाय तेथीलच दगड उचलून त्याने पोलिसाला मारहाण केली. ही मारहाण एका इसमाने मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग करून घेतली. हा प्रकार समजल्यानंतर काही पोलिस सहकारी गुरुनानक चौकात आले आणि त्यांनी बिलालला रिक्षासह ताब्यात घेतले. सादर बाजार पोलिस ठाण्यात बिलालवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर जिल्हा बँकेची कोंडी, १३७ कोटी घेण्यास एबीआयचा नकार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांची मोठी कोंडी होऊन बसली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचीही मोठी कोंडी झाली आहे. बँकेकडे जमा असलेली सुमारे १३७ कोटींची रक्कम स्वीकारण्यास स्टेट बँक ट्रेझरी शाखेने नकार दिल्यामुळे ही सर्व रक्कम बँकेतच अडकून पडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका सहकारी बँकांना बसल्याचे बोलले जात आहे. सोलापूर जिल्हा बँकेकडे १३७ कोटी तर नागरी बँकांकडे जमा झालेले १२३ कोटी ज्यामध्ये ५०० आणि १००० च्या नोटांचा समावेश असून, ही रक्कम स्वीकारण्यास बँकेने नकार दिल्यामुळे डीसीसी आणि नागरी बँकेची कोंडी झाली आहे. विविध बँकांकडे जमा झालेली रक्कम स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. सूचना येताच रक्कम स्वीकारण्याबाबत कार्यवाही सुरू केली जाईल, असे एसबीआयचे व्यवस्थापक सुहास गांधी यांनी सांगितले. दरम्यान, रिझर्व बँकेने सोलापूरसाठी पाठविलेल्या २०० कोटी रकमेपैकी बहुतांश रक्कम संपत आल्याने मंगळवारी बँकांमध्ये ग्राहकांच्या मोठ्या रंगा लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकेला मनाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोटा बदलून न देण्याच्या निर्णयापाठोपाठ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने सोमवारी मनाई केली. यामुळे बँकेच्या कोणत्याही शाखेत मंगळवारपासून बचत खाते, कर्ज खाते, ठेवी, वीज बिल, टेलिफोन, ग्रामपंचायतीचा भरणा अशा कोणत्याही खात्यावर या नोटा भरुन घेतल्या जाणार नाहीत. परिणामी बँकांचे व्यवहारच ठप्प होण्याची भीती आहे. जिल्ह्यातील ८० टक्के ग्रामीण जनता या बँकांच्या शाखेमधून बँकिंग व्यवहार करत असून मंगळवारपासून या सर्वांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत जिल्हा बँकांच्यावतीने बुधवारी राज्याच्या सहकार आयुक्तांकडे गाऱ्हाणे मांडण्यात येणार असून त्यानंतर रिझर्व्ह बँकेसमोरही अडचणी मांडण्यात येणार आहेत.

पाचशे व हजारच्या नोटा रद्द केल्यानंतर त्या नोटा स्वीकारा, पण बदलून देता येणार नाही अशी अट आरबीआयने घातली होती. त्यानुसार बँकेने रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्यास सुरुवात केली. यानुसार रविवारपर्यंत विविध खात्यांवर तब्बल ३०० कोटींच्या नोटा जमा झाल्या आहेत. मात्र सोमवारी दुपारी चारच्या सुमारास या नोटा स्वीकारण्यासही मनाई करणारा आदेश देशभरातील जिल्हा बँकांना देण्यात आला. आरबीआयचे चीफ जनरल मॅनेजर पी. विजया कुमार यांच्या आदेशामुळे सुटी असूनही जिल्हा बँकांत खळबळ उडाली. हा आदेश येताच केडीसीसीने तातडीने साऱ्या शाखांना त्याबाबतचे नवीन परिपत्रक पाठवले. कोणत्याही परिस्थितीत पाचशे व हजारची नोट स्वीकारता कामा नये, असा आरबीआयचा आदेश असल्याचे फलक प्रत्येक शाखेच्या दरवाजावर लावण्यास सांगण्यात आले आहेत. त्याबाबतची सक्त सूचना शाखा व्यवस्थापकांना दिली आहे.

जिल्हा बँकेला रोज जवळपास ३० कोटींची रक्कम लागते. गेल्या तीन दिवसात कधी ५० लाख, कधी १ कोटी १२ लाख तर कधी ३ कोटी इतकी तुटपुंजी रक्कम बँकेला मिळाली आहे. त्यामुळे शाखांमध्ये उपलब्ध रक्कम काटकसरीने नागरिकांना दिली जात आहे. परिणामी अनेक ठिकाणी खात्यांमध्ये कित्येक हजार रुपये असूनही पाचशे रुपयेच हातात पडत आहेत. मंगळवारपासून पाचशे, हजार रुपयेच स्वीकारण्यात येणार नसल्याने ग्रामीण भागातील जनतेचा संताप उफाळून येण्याची शक्यता आहे. अनेक गावांत केडीसीसीच्या शाखा आहेत. पण तिथे पैसे स्वीकारले जाणार नसल्याने आता राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते काढून तिथे पैसे भरावे लागणार आहेत. या उलट्या प्रकारामुळे प्रचंड असंतोष निर्माण होण्याची शक्यता असून ग्रामीण भागातील जनतेचे अर्थव्यवहारच कोलमडण्याची भीती आहे.

बँकेचे सभासद १२ हजार

ठेवीदार २० लाख

ठेवींची संख्या ३२५२ कोटी

दररोज लागणारी रक्कम ३० कोटी

दररोजची उलाढाल ४० कोटी

ऊस बिले, दूध बिले भागवता येणार नाहीत

शिक्षकांना पगारही मिळणार नाही

पेन्शनधारकांना पहावी लागणार वाट

निराधार योजनेतील निराधारांचा आधार हरवणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाद्वार रोडवरून चाकू खरेदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देवकर पाणंद येथील दर्शन रोहित शहा (वय १०) या शालेय मुलाचे अपहरण आणि खूनप्रकरणी सोमवारी (ता. १४) झालेल्या सुनावणीत एका साक्षीदारासह पंचाची साक्ष झाली. कवीराज हेमंत नाईक (वय ३०, रा. नारायणी बंगला, देवकर पाणंद) आणि सुशांत दामुगडे (३५, रा. लोहिया हायस्कूलसमोर, कोल्हापूर) या दोघांच्या साक्षीदरम्यान त्यांनी संशयित आरोपी योगेश उर्फ चारू आनंदा चांदणे (वय २४, रा. देवकर पाणंद) याने महाद्वार रोडवरील एका दुकानातून चाकू खरेदी केल्याची माहिती कोर्टात सांगितली.

देवकर पाणंद येथील दर्शन शहा या शालेय मुलाचे २५ डिसेंबर, २०१२ रोजी अपहरण झाले होते. यानंतर त्याचा मृतदेह कॉलनीपासून जवळच असलेल्या एका विहिरत सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी योगेश उर्फ चारू आनंदा चांदणे याला अटक केली आहे. या खून खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असून, सोमवारी झालेल्या सुनावणीत मयत दर्शन याच्या गल्लीतील कविराज नाईक या साक्षीदाराची साक्ष झाली. नाईक यांनी दर्शनच्या घरातून पळालेल्या काळ्या कपड्यातील व्यक्तीबाबत कोर्टासमोर माहिती सांगितली. पोलिसांच्या पंचनाम्यादरम्यान उपस्थित असलेले पंच सुशांत दामुगडे यांनी चारू चांदणे याने अंबाबाई मंदिराजवळील चायना बिग बजारमधून चाकू खरेदी केल्याची माहिती दिली. याबाबत उलट तपासणी घेताना आरोपीचे वकील अॅड. पीटर बारदेस्कर यांनी पंचनामा आणि साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. सरकार पक्षामार्फत अॅड. उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले. मंगळवारी आणि बुधवारी सलग दोन दिवस सुनावणी सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाइपलाइन ‘थेट’ निराधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरवासियांच्या जिव्हाळ्याच्या आणि शुद्ध पाणी मिळण्यासाठी उपयुक्त असलेला तब्बल ४८८ कोटी रुपयांच्या थेट पाइपलाइन योजना राजकीय अनास्थेमुळे अडचणीत सापडली आहे. प्रशासनाच्या पाठपुराव्याचा अभाव आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे योजनेच्या कामावर परिणाम झाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शहरातील चारही आमदारांनी याकडे पुर्ण दुर्लक्ष केल्याने ही योजना रखडली आहे.

काळम्मावाडी धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाइपलाइन योजनेसाठी कोल्हापूरकरांनी ४० वर्षे लढा दिला. मोर्चे, आंदोलन काढले. काँग्रेस सरकारच्या कालावधी योजनेला मंजुरी मिळाली. त्यावेळी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत आमदार सतेज पाटील यांनी ‘जर ही योजना झाली नाही तर आमदारकी लढवणार नाही’ अशी भीष्मप्रतीज्ञा केली होती. त्यानुसार योजेनेला मंजुरी मिळाली. त्यानंतर शहराची २०४५ मधील लोकसंख्या विचारात घेऊन पाइपलाइन योजना आखण्यात आली. योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर सर्वच पक्षाच्या आमदारांनी, कार्यकर्त्यांनी ‘आमच्यामुळेच पाइपलाइन योजना मंजूर’ झाल्याची फलकबाजी केली. विधानसभा आ​णि महापालिका निवडणुकीतही पाइपलाइन योजना मुख्य मुद्दा ठरली. सध्या महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला काठावरचे बहुमत आहे. तर कधी नव्हे इतका प्रबळ विरोधक असल्याने विरोधाचे राजकारणही प्रचंड आहे. नेत्यांच्या आणि महापालिकेतील कारभाऱ्यांच्या अहंकाराचे पदोपदी दर्शन होत आहे. महापालिकेच्या सत्ता राजकारणात साऱ्याच पक्षाच्या नेत्यांचा आणि आमदारांचा इंटरेस्ट असल्याने जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मागे पडत आहेत.

श्रेयवादात पुढे, पाठपुराव्यात मागे

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर आणि अमल महाडिक महापालिका राजकारणात वेगवेगळ्या पक्षाचे नेतृत्व करतात. या नेत्यांचा महापालिका राजकारण, शहर विकासाच्या योजनांशी संबंध येतो. योजना मंजूर झाल्यानंतर सगळ्यानी श्रेयवादाचे राजकारण केले. महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ हे सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व करतात. मात्र त्या दोघांनीही गेल्या वर्षभरात पाइपलाइन योजनेसाठी यंत्रणा गतिमान केली, असे चित्र पाहावयास मिळाले नाही. भाजप, ताराराणी आघाडीला महापालिकेत सत्ता काबीज करावयाची आहे. सत्ताधारी आणि विरोधकांत सातत्याने शह, काटशहाचे राजकारण सुरू असते. मात्र शहरांतील जनतेच्या मूलभूत सुविधेशी निगडीत महत्त्वाच्या पाइपलाइन योजनेचे काम रडतखडत सुरू असताना पालकमंत्री पाटील, आमदार अमल महाडिक हे सुद्ध योजनेपासून चार हात दूर आहेत. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सर्किट हाऊस येथील एका बैठकीचा अपवाद वगळता दुसरे काही केल्यांचे निदर्शनास आले नाही. योजना मुदतीत पूर्ण व्हावी याकरिता मंत्र्यापासून आमदारापर्यंत कुठल्याच पातळीवर पाठपुरावा होताना दिसत नाही. सगळेच श्रेयवादासाढी पुढे होते, पण योजना मुदतीत पूर्ण होण्यासाठी तो धडाका कायम ठेवला नाही.

प्रशासकीय पातळीवरही सावळागोंधळ

शहरवासियांशी निगडीत पाइपलाइन योजनेबाबत प्रशासकीय पातळीवर सावळागोंधळ आहे. या योजनेसाठी स्वतंत्र अधिकारी नाही. महिनोन्‍महिने अधिकारी प्रकल्पस्थळी भेटी देत नाहीत. पाणी पुरवठा विभागाकडे पुरेसा अधिकारी नाहीत. सल्लागार कंपनी युनिटी कन्सल्टटंवर कामावर देखभालीची जबाबदारी आहे. त्यांच्या कामकाजाबाबतही आक्षेप आहेत. ठेकेदार जीकेसी कंपनीला आतापर्यंत १६४ कोटी रुपयांची बिले दिली आहेत. निधीचा गैरवापर होत असल्याचा स्थायी स​भेत आरोप झाला. महापालिकेचे अधिकारी नियमबाह्यरित्या कंपनीला बिलाची रक्कम देत असल्याचा आरोप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंकाळा खणीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नात्याने दीर-भावजय असलेल्या प्रेमीयुगुलाचे संबंध इतर नातेवाईकांना समजल्याने या दोघांनी रंकाळा येथील पतौडी खणीत आत्महत्या केली. विकास राजेंद्र राऊत (वय ३०, रा. यादवनगर, कोल्हापूर) आणि स्वाती सुनील सणगर (३५, रा. गणेशनगर, कागल) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी (ता. १४) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

विकास राऊत हा चांदी कारागीर होता. यादवनगर येथील घरातच तो कारागिरीचा व्यवसाय करत असे. कागल येथील मावसभावाची पत्नी स्वाती सणगर हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. गेल्या दोन, तीन वर्षांपासून हे प्रेमसंबंध सुरू होते. मात्र याची नातेवाईकांना कल्पना नव्हती. आठवड्यापूर्वी विकास उरुसानिमित्त कागलला गेला होता. त्याचे वडील राजेंद्र राऊत, भाऊ आणि इतर नातेवाईकही सोबत होते. सोमवारी (ता. ७) विकास आणि स्वातीचे प्रेमसंबंध उघडकीस आल्याने स्वातीचा पती सुनील आणि विकास या दोघांत जोरदार वाद झाला होता. यानंतर स्वाती आणि विकास हे दोघेही घराबाहेर पडले होते.

सोमवारी (ता. १४) सकाळी रंकाळ्याजवळील पतौडी खणीत दोन मृतदेह तरंगत असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह पाण्याबाहेर काढले. विकास आणि स्वाती या दोघांचे हात ओढणीने बांधलेल्या स्थितीत होते. मृताच्या खिशातील मतदार ओळखपत्रावरून ओळख पटली. पोलिसांनी विकासच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देऊन सीपीआरमध्ये बोलवून घेतले. नातेवाईकांनी मृतदेहांची ओळख पटवली. मृतदेहांची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नाकेवाईकांकडे सोपवले. विकास अविवाहित होता, तर स्वातीचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. तिला दोन मुले आहेत. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीप उजळले...

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मावळतीकडे निघालेला कार्तिक पोर्णिमेचा पूर्णाकृती चंद्र. त्याच्या साक्षीने पंचगंगा घाटावर पहाटेच्या चारच्या ठोक्याला पणत्या प्रज्ज्वलीत होऊ लागल्या. सरळ, आडवे, त्रिकोणी, चौकोनी असे आकार तयार होऊ लागले आणि बघता-बघता पंचगंगा घाट, समाधी मंदिर, ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंटसह पंचगंगा परिसर उजळून निघाला. दिवाळी सणातील त्रिपुरारी पौर्णिमेच्या दीपोत्सवाचा अत्युच्च क्षण डोळ्यात साठवण्यासाठी करवीरकर अबालवृद्धांनी पंचगंगेवर गर्दी केली होती. सुमारे दोन तासांहून जास्त काळ प्रकाशाचा हा खेळ पंचगंगा घाट परिसरात अनुभवयाला मिळाला.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या पहाटे गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ पंचगंगा घाटावर दीपोत्सव साजरा केला जातो. शिवमुद्रा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते गेले आठवडाभर दीपोत्सवाची तयारी करत होते. रविवारी रात्री दहापासून तयारी सुरू केली. मध्यरात्रीनंतर पंचगंगा घाट परिसरात ठिकठिकाणी पणत्या ठेवण्यात आल्या. ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंटवर लेसर लाइट लावण्यात आली होती. शिवाजी पुलावर पणतीच्या आकाराची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. एकीकडे दीपोत्सवाची तयारी सुरू असताना रांगोळी कलाकार, मंडळे, तालमीचे कार्यकर्तेही जमू लागले. संस्कार भारती रांगोळीसह सामाजिक विषयाला वाचा फोडणाऱ्या रांगोळ्या रेखाटण्यासाठी कलाकारांची बोटे फिरू लागली.

पहाटे साडेतीनच्या सुमारास कडाक्याच्या थंडीत करवीरकरांची पावले पंचगंगा नदीकडे वळू लागली. भाविकांनी पंचगंगेच्या थंड पाण्यात अभ्यंगस्थान करताना पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या ‘हर हर महादेव’ च्या गजराने पंचगंगा घाटाला जाग आली. महिलावर्ग द्रोणातून नदीला पणत्या अर्पण करत होता. चारच्या ठोक्याला कार्यकर्त्यांनी नेमून दिलेल्या जागेवरून पणत्या पेटवाययला सुरूवात केली. उपस्थित नागरिकांनी ‘ज्योत से ज्योत जगाते रहो’ या भावनेतून मदतीचा हात पुढे केला. एका ज्योतीतून अनेक ज्योती प्रज्ज्वलीत झाल्या आणि पंचगंगेवर तारांगण अवतरले.

ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंटवरून सोडलेल्या लेसर झोताने दीपोत्सवाला साज चढवला. नदी परिसरातील समाधी मंदिरांवर आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या.नयनरम्य आतषबाजीने आकाशही उजळून निघाले.

सेल्फी दीपोत्सव

दीपोत्सवाचा क्षण टिपण्यासाठी हौशी फोटोग्राफर्सची मोठी संख्या होती. त्याचबरोबर सेल्फी काढण्यासाठी तरूणाईंची घाईही सुरू होती. दीपोत्सवाचा क्षण टिपताना सहकुटुंब नी सेल्फीही काढण्यात आल्या. आकर्षक रांगोळ्यांचे फोटो काढण्यासाठी महिलांची झुंबड उडाली होती.

सैनिकांना अभिवादन, कोपर्डी घटनेवर रांगोळ्या

सीमेवर लढणाऱ्या जवानांना अभिवादन करताना ‘अमर जवान’ व लढणाऱ्या सैनिकांच्या रांगोळ्या काढल्या होत्या. हाय कमांडो फ्रेंडस् सर्कलची रांगोळी लक्ष वेधून घेत होती. लेक वाचवा विषयावरील रांगोळीबरोबर कोपर्डी घटनेचा निषेध करताना संशयितांना फाशीचा छोटासा देखावा मांडून युवती व महिलांवर वाईट नजरा ठेवू नका, असा इशारा देणारी रांगोळीही रेखाटण्यात आली होती. श्री प्रेमी तरूण मंडळाने काळा पैसा व सीमेवर लढणारा जवान या विषयावर रांगोळी काढली होती. करवीर नाद ढोल पथकाने ढोल वाजवणाऱ्या तरूणाची रांगोळी काढली होती. पाटील परिवाराने काळ्या पैशावर रांगोळी काढली होती. काळ्या पैशाने वेढलेल्या भारतावर मोदी पाणी मारताच हजार आणि पाचशेच्या नोटा पडत आहेत, अशा आशयाची रांगोळी लक्ष वेधून घेत होती. स्वच्छ भारत, मराठा आरक्षण या विषयांवरील रांगोळ्या काढल्या होत्या.

नदीपात्रात अंबाबाई

पंचगंगा नदीमध्ये सत्यनारायण तालमीने तराफ्यावर अंबाबाईची कमळातील मूर्तीचा देखावा केला होता. तसेच तराफ्यावर पणत्याही लावण्यात आल्या होत्या. तसेच रांगोळी काढण्यात आलेल्या ठिकाणावर सिंहासनारूढ शिवाजी महाराज, अमर ज्योत जवानांचे देखावे प्रेक्षणीय ठरले होते.

बुऱ्हानबाबा दर्ग्यावरही दीपोत्सव

ब्रह्मपुरी येथे बुऱ्हानबाबांचा दर्गा आहे. दीपोत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे नगरसेवक अफजल पिरजादे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दर्गा परिसरात पाच हजारहून अधिक पणत्या प्रज्ज्वलीत करून दीपोत्सव साजरा केला. दीपोत्सवाने दर्गा उजळून निघाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजुरांनी स्विकारला वस्तू विनिमयाचा पर्याय

$
0
0

मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागातील स्थिती

म. टा. वृत्तसेवा, मिरज

नोटा रद्दच्या निर्णयाचा फटका ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था असलेल्या शेती क्षेत्राला बसत आहे. चलनाअभावी ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. शेतीसाठीची अवजारे, औषधे, खते यांच्या खरेदी विक्रीसह शेतीपूरक जनावरांच्या बाजारातही मंदी आहे. शेतमजुरांचे वेतन देण्यासाठीही शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे शेतकरी आणि मजुरांचीही कोंडी होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांनी मजुरांच्या वेतनासाठी वस्तू विनिमयाचा (बैत्याचा) पर्याय निवडला आहे. मजुरांना त्यांच्या श्रमाच्या बदल्यात पैशांऐवजी धान्य, फळे व भाजीपाला देण्यात येत आहेत.

दरम्यान, वस्तू विनिमयाचा पर्याय शेतकरी आणि मजुरांनाही फायद्याचा ठरत आहे. दोघांचाही गरजा भागत आहेत. शिवाय बाजारात पाचशे व हजाराच्या नोटा चालत नसल्याने आणि नव्या नोटा हातात नसल्याने मजुरांनाही दैनदिन गरजा भागविण्यासाठी वस्तू विनिमय फायद्याचे ठरत आहे. शेतीची कामे सुरू रहिल्याने शेतकऱ्यांचाही अडचण दूर झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तावडेवर महिनाअखेरीस आरोपपत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी एसआयटीने अटक केलेला दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्यावर महिनाअखेरीस आरोपपत्र दाखल होणार आहे. एसआयटी प्रमुख संजीव कुमार यांनी याबाबत सोमवारी (ता. १४) पोलिस मुख्यालयात तपास अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आरोपपत्राच्या अनुषंगाने तपास अधिकाऱ्यांनी विशेष पूर्वतयारी करण्याच्या सूचनाही एसआयटीप्रमुखांनी या बैठकीत दिल्या आहेत.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने २ सप्टेंबरला संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला सीबीआयकडून ताब्यात घेतले होते. तावडे याचे कोल्हापुरातील प्रदीर्घ वास्तव्य, ई मेलवरून झालेला संशयास्पद पत्रव्यवहार, मोबाइलवरील संभाषण आणि साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार एसआयटीने तावडेला अटक केली होती. या अटकेनंतर एसआयटीने तावडे याचे पनवेल येथील घर आणि सनातन संस्थेच्या आश्रमाचीही झडती घेऊन काही संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. तावडेच्या तपासात महत्त्वाची माहिती हाती लागल्याचा पोलिसांचा दावा आहे, त्यामुळेच त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तावडेला अटक करून दोन महिने उलटले आहेत. ९० दिवसांच्या आत त्याच्यावर आरोपपत्र दाखल करणे बंधनकारक असल्याने नोव्हेंबर अखेरीस आरोपपत्र दाखल होणार आहे.

पानसरे खून प्रकरणाचा आजवरचा तपास आणि संशयित तावडे याच्यावरील आरोपपत्राच्या पूर्वतयारीसाठी एसआयटीप्रमुखांनी विशेष बैठक घेतली. या बैठकीत तपास अधिकारी सुहेल शर्मा, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, राजारामपुरी पोलिस ठाण्याच निरीक्षकत अमृत देशमुख उपस्थित होते. तपास अधिकाऱ्यांनी संशयित तावडे याच्या चौकशीतील तपशील एसआयटी प्रमुखांसमोर सादर केला. साक्षीदाराने दिलेली माहिती आणि तावडे याच्या घरासह सनातनच्या आश्रमातून मिळालेल्या माहितीतून तावडे याच्याविरोधात भक्कम आरोपपत्र दाखल होऊ शकते, अशी महिती शर्मा यांनी दिली. आरोपपत्रात कोणतीही उणीव राहू नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना एसआयटी प्रमुखांनी केल्या. कॉम्रेड पानसरे खूनप्रकरणी आरोपपत्र दाखल होणारा तावडे हा समीर गायकवाड याच्यानंतर दुसरा संशयित आरोपी असेल.

नोव्हेंबर अखेरीस आरोपपत्र

सीबीआच्या अटकेतील वीरेंद्र तावडे याला एसआयटीने २ सप्टेंबरला अटक केली होती. यानंतर मिळालेल्या पोलिस कोठडीदरम्यान त्याला पनवेलसह अन्य ठिकाणी फिरवून पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तावडेची जीपही मिळवली आहे, तर मोटारसायकलचा शोध अजूनही सुरूच आहे. अटकेनंतर ९० दिवसांचा कालावधी पूर्ण होण्यास अवघे १५ दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात तावडेवर आरोपपत्र दाखल होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाणलोट’ च्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील पाणलोट योजनेतील चौकशी अहवालात ठपका असलेल्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी नुकतेच दिले. परिणामी कारवाई टाळण्यासाठी अर्थपूर्ण वाटाघाटी केलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पाणलोटमधील भ्रष्ट्राचाराचा दडवलेला आणि दडपलेल्या अहवालाबाबतचे वृत्तांकन ‘महाराष्ट्र टाइम्स’ने केले होते. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आणले. त्याची दखल घेत खासदार शेट्टी यांनी ही मागणी केली आहे.

केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन योजनेतील (वसुंधरा पाणलोट) कामांत सुमारे ३० कोटींचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार विधानसभेत १८ जुलै २०१५ रोजी झाल्यानंतर त्याची चौकशी झाली. ५५ अधिकाऱ्यांवर कामांची जागेवर पाहणी व तपासणी न करणे, नियमबाह्य कामांची निवड, चुकीच्या ठिकाणी निकृष्ट बंधारे घेऊ नये याकडे लक्ष न देणे असा ठपका ठेवण्यात आला होता. एका वर्षानंतर या प्रकरणातील दोषींवर काहीही कारवाई झाली नाही. ज्यांनी हे प्रकरण विधानसभेपर्यंत पोहचवले तेही दोषींवर कारवाईसाठी पाठपुरावा करीत नाहीत, यामागचे गुपीत काय असा सवाल उपस्थित होत होत होता.

चौकशी अहवालातील सविस्तर तपशील, पैसे लाटण्यासाठी केलेली निकृष्ट दर्जाची कामे, दोषी अधिकाऱ्यांची नावे याबाबत २९ सप्टेंबरपासून चार दिवस महाराष्ट्र टाइम्सने मा‌लिका प्रसिध्द केली होती. त्याची दखल खासदार शेट्टी यांनी तातडीने घेतली. योजनेतील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न जिल्हा संनियंत्रण समितीच्या सभेत २९ रोजीच उप‌स्थित केला होता. त्यानंतरही जिल्हा पाणलोट कक्ष तथा ‌माहिती केंद्राचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दोषींवर कारवाईसंबंधी फारसे काही केले नाही. कृषी विभागाचे वाभाडे निघाले तरी कृषी सहसंचालक गंभीर नाहीत. अजूनही कारवाईची प्रक्रिया सुरूच आहे, असे बेजबाबदारपणाचे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे खासदार शेट्टी यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोट विकास योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. निकृष्ट दर्जाची कामे झालेली आहेत. या योजनेच्या चौकशीत ६९ अधिकारी दोषी आहेत. या दोषींवर त्वरित कारवाई करावी.

आता तरी ‌जिल्हाधिकारी व कृषी सहसंचालक दोंषीवर कारवाई करतात का, याकडे लक्ष लागले आहे.

===
महाराष्ट्र टाइम्सने पाणलोट घोटाळ्याची सविस्तर माहिती प्रसिध्द केली. त्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे दिले आहे. कारवाई होईपर्यंत पाठपुरावा कायम ठेवणार आहे.

राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images