Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चोरट्यांची टोळी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महामार्गावर वाहनधारकांची लुबाडणूक करणे, घरफोड्या आणि मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. गणेश रतन नवले (वय २५), संदीप चंद्रकांत सोनवणे (२८, दोघेही रा. पेठ वडगाव, ता. हातकणंगले), प्रशांत तानाजी ननवरे (२८, रा. निमशिरगाव), विकास काशीनाथ नाईक (२४, रा. नागाव) आणि अरुण रामू चव्हाण (२१, रा. शिरोली पुलाची) या पाच चोरट्यांनी कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटकातही चोऱ्या केल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील चार लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे सर्व पोलिस रेकॉर्डवरील सराईत चोरटे आहेत.

कागल येथे पुणे-बेंगळुरू महामार्गावर २६ सप्टेंबरला अज्ञात चोरट्यांनी शहावीर दिलीप गायकवाड या ट्रकचालकास अडवून मारहाण करीत त्यांच्याजवळचा मोबाइल आणि किमती ऐवज लांबवला होता. त्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सराईत चोरट्यांच्या टोळीची माहिती मिळाली होती. पोलिसांनी संशयितांवर पाळत ठेवून शहरातील गुजरी येथे प्रशांत ननवरे आणि गणेश नवले या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो चोरीतील सोन्याचे दागिने विकायला आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर आणखी तिघांची नावे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी संदीप सोनवणे, विकास नाईक आणि अरुण चव्हाण या तिघांना पेठवडगाव येथून अटक केली. यांनी ट्रकचालकाची लूटमार केल्याची कबुली दिली. या टोळीचा म्होरक्या गणेश नवले असून, त्याच्यावर चेन स्नेचिंगचे १९, घरफोडी आणि ट्रक चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. इतरांवर चेन स्नेचिंगसह घरफोडीचेही गुन्हे दाखल आहेत. या टोळीने कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि निपाणी परिसरात चोऱ्या केल्या होत्या. पोलिसांनी चोरट्यांकडून चार मोटारसायकली, १० तोळे सोन्याचे दागिने, चार मोबाइल हॅण्डसेट आणि रोख दोन हजार रुपये हस्तगत केले. या टोळीने आणखी काही चोऱ्या केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेशनचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या पथकाने चोरट्यांची टोळी जेरबंद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूर पर्यटनासाठी विशेष पॅकेज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्यटकांचा कोल्हापुरातील ओघ वाढावा, यासाठी विशेष पॅकेज देण्यात येणार आहे. हॉटेल निवास आणि भोजन शुल्कात पन्नास टक्के सवलत देण्याबरोबरच पर्यटनस्थळी फिरण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था असे किमान तीन दिवसांचे हे पॅकेज असेल. आगामी तीन वर्षांसाठी जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूर टूर ऑर्गनायझर्स असोसिएशनच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

१४ ते १६ ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत जगभरातील टूर ऑपरेटर्सनी कोल्हापूरला भेट दिली. जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी चर्चा झाल्याचे सांगून पाटील म्हणाले की, पर्यटनांच्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचा विचार आहे. येत्या २५ डिसेंबर ते १५ जानेवारीदरम्यान पर्यटन महोत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांचा कोल्हापूरकडील ओघ वाढावा, यासाठी विविध सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर्स असोसिएशनच्या मदतीतून पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. हॉटेल निवास आणि भोजनात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. पर्यटनस्थळी टूर्स असोसिएशनकडून मोफत वाहन व्यवस्था केली जाईल. कोल्हापूरच्या वस्तू जगभर जाव्यात यासाठी २० ते ५० टक्के सवलत दिली जाईल. गूळ, चप्पल, दागिने आणि अन्य वस्तूंवर ही सवलत असेल. शिवाय पर्यटकांना भेट वस्तूचे कूपन दिले जाणार आहे. त्यांच्यासाठी लकी ड्रॉ देण्यात येईल. या माध्यमातून पर्यटकांचा ओघ निश्चित वाढेल.’

असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर पाटील म्हणाले, ‘लवकरच टुरिझम बोर्डची स्थापना करण्यात येणार आहे. त्यात स्थानिकांना अधिक प्राधान्य दिले जाईल. जिल्ह्यातील पर्यटनासाठीची ठिकाणेही लवकरच निश्चित केली जातील.’ जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखोंचा मोर्चा, कोटींची उलाढाल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने शहरातील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल व्यवसायिक, झेंडे आणि टी - शर्ट विक्रेते, खासगी वाहतूक व्यवसायिक, चहा विक्रेते, कोल्ड्रिंक्स विक्रेत्यांची चांदी झाली. मोर्चासाठी इतर समाज बांधवांनी मोफत खाद्यपदार्थ आणि पाण्याचे वाटप मोठ्या प्रमाणावर केले. त्यासाठीही पैसे उभारण्यात आले होते. तसेच प्रचंड मोठ्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर आल्याने हॉटेल मालकांसह इतर व्यवसायिकांची चांदी झाली.

मोर्चाच्या तयारीला कोल्हापूरकरांना सर्वाधिक वेळ मिळाला. त्यामुळे गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून त्याची तयारी सुरू होती. तेथूनच शहरातील आर्थिक उलाढालीला सुरुवात झाली. त्यात मोर्चाच्या शेवटच्या दोन दिवसांत आणि मोर्चाच्या दिवशी सर्वाधिक उलाढाल झाली. मोर्चाची सांगता झाल्यानंतर खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर गर्दी दिसत होती. काही हॉटेल व्यवसायिकांनी मोर्चाच्या निमित्ताने व्यवसाय बंद ठेवले होते. मात्र, चहा गाडीवाले, स्टँड परिसरातील फेरीवाले आणि काही निवडक हॉटेल व्यवसायिकांनी आपले व्यवसाय सुरू ठेवल्याने त्यांचा फायदा झाला. यातील बहुतांश विक्रेत्यांनी माफक दरात खाद्यपदार्थ विक्री केली.

नेहमी १५ रुपयांना मिळणारे पोहे, मोर्चानिमित्त दहा रुपयांना विकले जात होते. वडा पावही काही ठिकाणी दहा रुपयांना होता. मोर्चाच्या मार्गावर शेंगदाणे आणि खारीडाळ विक्रेत्यांची संख्या जास्त दिसत होती. पाच-दहा रुपयांत शेंगदाणे, फुटाणे आणि खारीडाळीची पाकिटे विकली जात होती.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर टी-शर्टची विक्री सुरू होती. शर्टच्या कापडावर त्याची किंमत ठरत होती. मोर्चाच्या दोन दिवस आधी मोर्चाचा लोगो असलेल्या टी-शर्टची प्रचंड मागणी होती. त्यामुळे शहरातील ठिक ठिकाणी मोर्चाच्या टी-शर्टची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. शंभर रुपयांपासून तीनशे रुपयांपर्यंतचे टी-शर्ट होते. त्याचबरोबर टॅटू काढून घेण्यालाही तरुण-तरुणींनी पसंती दिली होती. पन्नास रुपयांपासून या टॅटूंची किंमत होती. यात छावा, मराठा, मराठा क्रांती मोर्चा, जगदंब असे टॅटू काढून घेण्यात आले. अनेकांनी केवळ दोन-तीन दिवस टिकणारे किंवा आठ दिवस टिकणारे टॅटू काढून घेतले. तर, काहींनी मोर्च्याच्या निमित्ताने पर्मनंट टॅटू काढून घेतले.

मोर्चात झेंड्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. त्याला मागणीही प्रचंड होती. अगदी चिमुकल्यांपासून महिला आणि वयोवृद्ध आजींपर्यंत प्रत्येकाच्या हातात झेंडे दिसत होते. त्यांच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. केवळ शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही कोल्हापुरातूनच झेंडे विक्रीस नेण्यात आले होते. दहा रुपयांपासून तीनशे-चारशे रुपयांपर्यंत झेंडे विकले जात होते. अर्थात मोठ्या झेंड्यांच्या किंमती जास्त होत्या. ते झेंडे मोटारसायकली आणि कारला लावण्यात येत होते. त्यासाठी तात्पुरते वेल्डिंग करून घ्यावे लागत होते. त्यामुळे वेल्डिंग करून देणाऱ्यांना व्यवसायाची संधी मिळाली.

000

पन्नास लाख लिटर पाणी

मोर्चाची वेळ उन्हात असल्याने पाण्याची सोय अतिशय महत्त्वाची होती. त्यासाठी मोर्चाचे संयोजक, इतर समाजातील मदत करणारे आणि विशेषतः मुस्लिम समाजाने पिण्याच्या पाण्याची सोय करण्याकडे लक्ष दिले होते. शहरात एकूण पन्नास लाख लिटर पाण्याची सोय करण्यात आली होती. यात पाण्याचे पाऊच, बाटल्या आणि टँकरचा समावेश होता. इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची सोय केल्याने मोर्चात सहभागी झालेल्यांचे उन्हात फारसे हाल झाले नाहीत. उन्हाची तीव्रता प्रचंड असल्याने अनेकांनी शितपेये आणि कुल्फी, आयस्क्रीम खाण्यावर भर दिला. तसेच काही कलिंगड विक्रेतेही मोर्चाच्या मार्गावर आणि दसरा चौक परिसरात दिसत होते.

कोल्हापुरातील मोर्चासाठी टॅटूंना मागणी होती. यापूर्वी सांगली आणि सातारा जिल्ह्यात मोर्चे निघाले आहेत. तेथील अनेक तरुण-तरुणी कोल्हापुरात येऊन टॅटू काढून गेले होते. कोल्हापुरातील तरुणांनी तात्पुरते टॅटू काढण्याकडे कल असला, तरी काहींनी पर्मनंट टॅटू काढले आहेत. टॅटू काढण्यासाठी तरुणींची संख्याही मोठी होती.

- विहार काशीद, टॅटू डिझायनर

गेल्या आठवड्यात अनेकांनी बाइकला झेंडे लावून घेतले. काही कार चालकांनीही तसा प्रयत्न केला. याला झेंड्याची किंमत धरून साधारण तीनशे ते साडेतीनशे रुपये खर्च येत होता. बाइकच्या पुढच्या चाकाला एक पट्टी लावून त्याला किरकोळ वेल्डिंग करून हे झेंडे बसविण्यात आले आहेत.

- प्रतिक चोपडे, बाइक मेकॅनिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी गँगच्या आठ गुंडांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सराईत गुन्हेगार स्वप्निल तहसीलदार याच्या टोळीवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत केलेल्या कारवाईला तहसीलदारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ती याचिका न्यायालयाने फेटाळल्याने राजारामपुरी पोलिसांनी या टोळीतील आठ गुंडांना पुन्हा अटक केली. अटकेतील गुंडांना सोमवारी (ता. १७) पुण्यातील मोक्का कोर्टात हजर केले जाणार आहे. टोळीचा म्होरक्या स्वप्निल तहसीलदार मात्र अजूनही फरार आहे. या कारवाईने तहसीलदार टोळीच्या मुसक्या आ‍वळण्यास सुरूवात झाली आहे.

साइराज दीपक जाधव (रा. ११ वी गल्ली, राजरामपुरी), अनिकेत आनंदराव सातपुते (सुभाषनगर), सनथ उर्फ सनी प्रताप देशपांडे (शात्रीनगर), विजय उर्फ रॉबर्ट रवींद्र खोडवे, ( दौलतनगर), प्रसन्न सूर्यकांत आवटे (६ वी गल्ली राजारामपुरी), विठ्ठल काशिनाथ सुतार ( विक्रमनगर), तुषार शिवाजी डवरी (विक्रमनगर), राकेश किरण कारंडे (शास्त्रीनगर) अशी अटक केलेल्या गुंडांची नावे आहेत.

राजारामपुरीतील गुंड स्वप्निल तहसीलदार याच्या टोळीवर राजारामपुरी पोलिसांनी तीन महिन्यांपूर्वी मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. १२ गुंडांवर कारवाईचा बडगा उगारताच स्वप्निल तहसीलदार याने या कारवईला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी एसटी गँगमधील गुंडांना अटक करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. १२ पैकी आठ गुंडांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे तर टोळीचा म्होरक्या स्वप्निल तहसीलदार मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

मोक्का कारवाई संदर्भातील प्रस्ताव राजरामपुरी पोलिसांनी १० मे २०१६ रोजी विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवला होता. टोळीचा म्होरक्या तहसीलदार याच्यावर गंभीर स्वरुपाचे २५ गुन्हे नोंद आहेत. अवधूत माळवी खून प्रकरणातही याचा समावेश होता. तहसीलदार व त्याच्या साथीदारांमुळे शहरात अनेकदा कायदा व सुरव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच्या या कारवायांना लगाम घालण्यासाठी राजारामपुरी पोलिसांनी हे कारवाईचे पाऊल उचलले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विजय शुगर्स’कडे कोट्यवधींची देणी थकलीपाच शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांची मालकी असलेल्या करकंब येथील विजय शुगर्स या साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे २६ कोटींची देणी थकवली आहेत. त्यामुळे हतबल झालेल्या पाच शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. सभोवती असलेल्या लोकांनी आरडाओरड केल्याने मोठा अनर्थ टळला. यात एका महिलेचा समावेश आहे. संबधित शेतकरी माढा तालुक्यातील उंदरगाव येथील आहेत. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली.

रविवारी दुपारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले माढा तालुक्यातील उंदरगावचे शेतकरी अमर नागनाथ मस्के, विजया चंद्रकांत लवटे, दिनकर नामदेव चव्हाण आणि औदुंबर तुकाराम चव्हाण व अन्य एका शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात आले. शेतकऱ्यांनी आपल्या सोबत एका मोठ्या कॅरीबॅगमध्ये रॉकेलने भरलेला कॅन आणला होता. कोणाला काही माहित होण्याच्या आतच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभे राहून कॅनमधील रॉकेल शेतकऱ्यांनी अंगावर ओतून घेतले. सर्व चार शेतकरी अंगावर रॉकेल ओतल्यामुळे भिजले होते. तसेच विजय शुगर्सच्या विरोधात घोषणा देत होते. आजूबाजूच्या लोकांनी शेतकऱ्यांच्या हातातील रॉकेलचा कॅन आणि पेटवून घेण्यासाठी आणलेली काडीपेटी काढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला. जमिनीवर व कट्ट्यावर सर्वत्र रॉकेल सांडले होते. रॉकेल ओतून घेणारे शेतकरी तेथेच थांबून होते. नेमका काय प्रकार आहे, हे सुरुवातीला कोणालाही कळाले नाही. मात्र, या घटनेची माहिती सदर बझार पोलिस ठाण्याला कळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशीकांत दसुरकर दाखल झाले. त्यांनी दीपक भोसले यांच्यासह आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तीन शेतकरी आणि एका महिलेला ताब्यात घेऊन गाडीत बसविले. एक जण तेथून पसार झाला. दीपक भोसले यांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेताना पोलिसांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना जुमानले नाही. मस्के, दोन शेतकऱ्यांसह विजया लवटे या चौघांना ताब्यात घेऊन त्यांना सदर बझारला नेण्यात आले. त्यांच्यावर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


दिवाळीची पहिली अंघोळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर

करकंबच्या विजय शुगर्सकडून शेतकऱ्यांची थकीत देणी देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. गेल्या अकरा महिन्यांपासून शेतकरी थकीत देणी मागत आहेत. त्यांना देण्यात आलेले धनादेशही वठत नाहीत. शेतकरी हतबल झाला आहे, रविवारी आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला असला तरी शेतकरी दिवाळीची पहिली आंघोळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करतील, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले यांनी बोलताना दिला आहे. देणी देण्यात अपयशी असलेले खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

दिवाळी नव्हे, दिवाळे निघाले

विजय शुगरला ऊस घातल्यानंतर त्यांनी आमची देणी वेळेत देणे आवश्यक होते. मात्र, गेल्या अकरा महिन्यांपासून आम्ही थकीत देणी मागत आहोत. मात्र, ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. कारखान्याने दिलेला एक लाखाचा धनादेशही वठला नाही. या पूर्वीच जिल्हाधिकारी यांच्याकडे देणी देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यांनीही दुर्लक्ष केले. खासदार मोहिते-पाटील यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी करीत आहेत. आता आमच्या नरड्याला आल्यामुळेच आत्मदहनाचा मार्ग स्वीकारावा लागला, अशी संतप्त प्रतिक्रिया अमर मस्के यांनी दिली. आम्हा शेतकऱ्यांची दिवाळी नव्हे, तर दिवाळे निघाले असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणपतराव देशमुखांना खंडणीसाठी धमकीसांगोल्यात कडकडीत बंद; मूक मोर्चा काढून निषेध

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांना गेल्या सहा महिन्यांपासून पत्रांद्वारे दहा कोटींच्या खंडणीसाठी धमकावविले जात आहे. या प्रकारच्या निषेधार्थ रविवारी सांगोला शहर आणि तालुक्यात कडकडीत बंद पाळून हजारो नागरिकांनी मूक निषेध मोर्चा काढला.

या प्रकाराने पोलिस खाते आणि सरकारच्या विरोधात सांगोला परिसरात संतापाची लाट उसळली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते असताना एक माथेफिरू दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी चार एप्रिलपासून सतत निनावी पत्राद्वारे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे गणपतराव देशमुख १९४८पासून महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आहेत. आजवर १२ वेळा निवडणुकीत विजयी झालेले देशमुख आज ९० वर्षांचे असून, प्रत्येक निवडणूक जनतेच्या लोकवर्गणीतून विजयी होणाऱ्या गणपतरावांना थेट १० कोटी रुपयाची खंडणी मागण्याचे कृत्य हास्यास्पद असल्यानेच देशमुख यांनी स्वतः हा प्रकार गांभीर्याने घेतला नव्हता. धमकी देणारा माथेफिरू मराठी आणि हिंदी भाषेत पत्रे पाठवीत असून, पंढरपूर-यशवंतपूर या रेल्वेच्या शेवटच्या डब्यात १० कोटी रुपये ठेवण्याबाबत मागणी करीत आहे. या बाबत पोलिसांनी त्या ठिकाणी बॅगा ठेवून त्याचा माग घेण्याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र, आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. या नंतर प्रसिद्धी माध्यमांनी हे धमकी प्रकरण बाहेर काढल्यानंतर शनिवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत देशमुख म्हणाले, मी आजवर कोणाला कधीही दुखावले नाही. मला या बाबत काहीच बोलायचे नाही. मी मरणाला घाबरत नाही.


धमकीची नऊ पत्रे

देशमुख यांना एप्रिलपासून आजवर नऊ पत्रे येऊनही पोलिस खात्याला कोणताच सुगावा मिळू शकलेला नाही. देशमुख यांनी पोलिस सुरक्षा नाकारली होती. मात्र, शेवटचे पत्र देशमुखांसह त्यांच्या दोन्ही मुलांना आल्याने ही बाब गंभीर बनली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बंद पळून भव्य मोर्चा काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिली उचल जाहीर कराखासदार राजू शेट्टींची मागणी

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

‘यंदाच्या हंगामाचे ऊस गाळप सुरू होण्यापूर्वी, कारखान्यांनी पहिली उच्चल जाहीर करावी, अन्यथा उसाच कांड सुद्धा देणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची धार अद्याप गेलेली नाही, हे सरकारला कळेल,’ असा इशारा स्वभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. एफआरपी म्हणजे अंतिम दर नव्हे. त्यामुळे २५ आक्टोबरला होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत पहिली उचल किती, हे आम्ही जाहीर करू असेही खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केले.

२५ ऑक्टोबर रोजी जयसिंपूर येथे होणाऱ्या ऊस परिषद व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी या विषयावर सांगलीतील कार्यकर्त्यांची बैठक खासदार शेट्टी यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

शेट्टी म्हणाले, ‘सरकारने डिसेंबरला ऊस गाळप सुरू करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा होता. तो आम्ही चर्चा करून नोव्हेंबरला सुरू करण्याच्या सूचना केल्या. यंदा नैसर्गिक परिस्थितीमुळे जितकी गरज आहे, तितकीच साखर तयार होणार आहे. मात्र, साखर आयात होण्याची शक्यता कमी आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही साखर कारखाने अडचणीत आहेत म्हणून सरकारचे ऐकले, आता शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळण्याची संधी आहे. त्यामुळे सरकारने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आमच्या सोबत राहावे, अन्यथा स्वभिमानीची धार त्यांनाही कळेल.’

यंदा उसाला सोन्याचा भाव

जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेत आम्ही, पहिली उचल किती द्यायची हे जाहीर करणार आहोत. यंदा उसाच्या कांड्याला सोन्याचा भाव आलेला आहे. तो आम्ही मिळवणारच, सरकारमध्ये असलो तरी या मुद्यावर आम्ही शेतकऱ्यांसोबतच राहण्याचा निर्णय घेतलेला आहे.

ऊस तोडणीखर्चाद्वारे साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर खर्च दाखवत होते, याची तक्रार केल्यावर सरकारने ऊस तोडणी खर्च निश्चित करण्यासाठी एका समितीची नेमणूक केलेली आहे. या समितीचा अहवाल आलेला आहे. यामध्ये कारखानदार शेती खर्चाच्या नावाखाली गोलमाल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. तोडणी खर्चामध्ये तोडणी, वाहतूक खर्च आणि चिठ्ठया घेणाऱ्या क्लार्क व्यतिरिक्त खर्च लावता येणार नाही. हा अहवाल सादर होताच ऊस तोडणी खर्च निश्चित होणार आहे.

दरम्यान, गत हंगामातील एफआरपी न देणाऱ्या आणि उसबिले न देणाऱ्या कारखान्यांना यंदा ऊस गाळप परवाना देऊ नयेत, अशी मागणीही यावेळी खासदार शेट्टी यांनी केली.

नोव्हेंबरमध्ये तोडणी हीताची

नोव्हेबर हीच तारीख ऊस हंगाम सुरू करण्यासाठी योग्य आहे. कर्नाटकात उभ्या पिकावर उचल दिली जात आहे. ऊस पळविण्याची भिती आहे. राज्यातील उसाचे सर्वाधिक प्रमाण सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात आहे. त्यामुळे या ठिकाणी भिती अधिक आहे. यंदा सरासरी उसामध्ये खोडवा ऊस अधिक आहे. खोडवा पिकाला आता सोळा ते सतरा महिने झालेले आहेत. हंगाम लांबला तर पुढील हंगामाच्या पिकावर परिणाम होणार आहे, असेही शेट्टी म्हणाले.

सर्वोदय बिनविरोध करा

सभासदांच्या मालकीचा कारखाना, सभासदांना वाऱ्यावर सोडून हडप करण्याची सहकारातील पहिलीच घटना सर्वोदय बाबत घडली आहे. त्यामुळे सभासदांनी कारखाना त्यांच्याच मालकीचा ठेवण्यासाठी संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध करून, आपला हक्क मिळवायला हवा. त्या कारखान्याच्या सभासदांसोबत राहण्याची भूमिका ठेवणार आहे, असेही शेट्टी म्हणाले.

काटामारीवर नजर, अवैद्य साखर शोधणार

कारखान्यांकडून अनेक वेळा काटामारी, उतारा लपविण्याचे प्रकार होतात. याला आळा घालण्यासाठी वजन-मापनच्या अधिकाऱ्यांसोबत स्वाभिमानीचे कार्यकर्ते कारखान्यांवर धाडी टाकतील. अनेक ठिकाणी अवैद्य साखर मोठ्या प्रमाणात असते. यासाठी अशी साखरही स्वाभिमानी शोधून काढेल, असाही इशाराही शेट्टी यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५०० रुपयांची पहिली उचल द्यारघुनाथ पाटील यांची मागणी

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

‘मागील हंगामात एआरपीचे तुकडे पाडून कायदा मोडण्यात आला, त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आगामी गळीत हंगामात प्रतिटन ३५०० रुपयांची पहिली उचल हवी, अन्यथा उसाच्या कांड्यालाही हात लावू देणार नाही,’ असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.

नांद्रे येथे उसदर व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ऊस दराबाबत निर्णय घेण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. उसाला पहिली उचल ३५०० रुपये प्रतीटन मिळावी, अशी एकमुखी मागणी या वेळी करण्यात आली.

या वेळी बोलताना बाळासाहेब कुलकर्णी म्हणाले, ‘सरकारने उसाच्या दरात हस्तक्षेप करू नये. उसाची बिले वेळेवर नाहीत. ठेवीही तिकडेच. व्याजही नाही. अशाप्रकारे शेतकरी चारी बाजुनी आर्थिक आरिष्टात सापडला आहे.’

रावसाहेब ऐतवडे म्हणाले, यंदा ऊस कमी आहे. ऊसदर चांगला मिळणार आहे. यामुळे एकत्र येऊन सर्व शेतकरी संघटनांनी चांगल्या ऊस दरासाठी पाठपुरावा करावा. प्रदीप पाटील म्हणाले, ऊसदर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सर्वांनी हेवेदावे विसरून एकत्र येण्याची गरज आहे. एकीने संघर्ष केला तरच उसाला चांगला दर मिळेल. शेतकऱ्यांच्या कर्जांचे पुनर्गठण करावे. पुढील पाच वर्षे कर्ज वसुली करू नये. सर्व प्रकारच्या शेतीमालास हमी भाव देण्यात यावा. ठिबकचा शंभर टक्के खर्च सरकारने उचलावा असे ठरावही यावेळी मंजूर करण्यात आले. औद्योगिक कारणासाठी साखरेचा दर व घरगुती साखरेचा दर वेगळा ठेवण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवजड वाहने शहरातूनच

$
0
0


राजेंद्र पाटील, इचलकरंजी

राज्य सरकार नगरपालिकेला रस्ते विकासासह त्यांच्या मजबुतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देत असतानाही त्याचा योग्य विनियोग केला जात नाही. टक्केवारीसाठी हा निधी अन्यत्र वळविला जातो. परिणामी रस्त्यांचा विकासच होत नाही. शहरांतर्गत धोकादायक वाहतूक रोखण्यासाठी रिंग रोड पर्याय असतानाही आजही या मार्गाचा वापर केला जात नाही. रिंग रोडसाठी खासगी जमिनी नगरपालिकेस विकत घ्याव्या लागल्या याचाही विसर लोकप्रतिधींना पडला आहे. आज रिंग रोडची परिस्थिती 'असून अडचण नसून खोळंबा' अशीच झाली आहे.

वस्त्रोद्योग व्यवसायामुळे इचलकरंजीत परराज्यांतून येणारी व येथून अन्यत्र जाणारी अवजड वाहतूक मोठी आहे. शहरांतर्गत रस्ते वर्षानुवर्षे तसेच असल्याने वाहतुकीची गंभीर समस्या ‘आ’वासून उभी ठाकली आहे. मुख्य मार्गावरूनच धोकादायक वाहतूक खुलेआम सुरू असते. या रस्त्यांना पर्याय म्हणून सांगली रोडपासून थोरात चौक, आंबेडकर पुतळा अशा रिंग रोडची निर्मिती झाली, सांगली-मिरजहून हातकणंगले, कोल्हापूरकडे रिंग रोडवरून वाहने मार्गक्रमण करतील असा प्रयत्न होता; परंतु या रोडची दुरवस्था वर्षानुवर्षे कायम आहे. नियोजनबद्ध आराखडा नसल्यानेच या मार्गाकडे आजही धोक्याची घंटा म्हणूनच पाहिले जाते.

रिंग रोडवरून ड्रेनेज नलिका टाकण्यात आली आहे. यासाठी रस्त्यांच्या मध्यभागीच ड्रेनेजसाठी चेंबर बनविला आहे. हा धोकादायक चेंबरने अनेक वाहनधारकांना जायबंदी केले असतानाही यावर कोणतीच उपाययोजना होत नाही. कर्नाटक राज्यातून कोल्हापूर, हातकणंगलेकडे जाण्यासाठी नदी नाका, संभाजी चौक, कलानगर, पंचवटी चित्रमंदिर असा रिंग रोड आहे. याचाही वापर होत नाही. मुळातच रिंग रोडवर कोणतीच सुविधा नसल्याने या मार्गाचा वापर वाहनधारकांकडून टाळला जातो. ऊस हंगामात ट्रक, ट्रॉलीची वाहतूक रिंग रोडने वळविली जाते, परंतु त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नाही. वाहतूक शाखा हप्तेबाजीच्या विळख्यात गुंतल्याने धोकादायक ऊस वाहतूक शहरातून सर्रासपणे नजरेस पडते.

भविष्यातील उपाययोजना म्हणून रिंग रोडची उभारणी केली आहे. या रस्त्यासाठी खासगी जमिनी घेण्यात आल्या, पण हा रस्ता असून अडचण नसून खोळंबा असा बनला आहे. अवजड वाहनांसह एसटी वाहतूक या मार्गावरून वळविल्यास मुख्य मार्गावरील वाहतुकीचा बराचसा ताण यातून हलका होऊ शकतो, परंतु नगरपालिका, वाहतूक शाखा यांच्यातील समन्वयाचा अभाव रिंग रोडला अडथळा ठरत आहे़.

वाहतूक आराखडा कागदावरच

इचलकरंजी शहराचा वाहतूक आराखडा केवळ कागदावरच दिसून येतो. वर्षानुवर्षे यावर कोणत्याही उपाययोजना अगर सूचना केल्या जात नाहीत. शहराचा विस्तार वाढत असतानाही रस्ते विकासाकडे होणारे दुर्लक्ष निश्चित विकासाला अडथळा ठरू शकतो. सरकारचा कोट्यवधीचा निधी अन्यत्र वळवून टक्केवारीची वाटणी करणाऱ्या लोकप्रतिनिधींसह सरकारी अधिकाऱ्यांनी रिंग रोडची खऱ्या अर्थाने मजबुतीकरण करून शहरातील वाहतूक या मार्गावरून वळविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे; अन्यथा रस्ते विकासावर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही त्यातून काहीच साध्य होणार नाही.

(उत्तरार्ध)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भोगावती’चा बिगुल कधी?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

भोगावती साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर होणार की अगोदर, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. कारखान्यावर सध्या शासकीय प्रशासक मंडळ असल्याने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे. कारखाना निवडणुकीविषयी कोणता निर्णय घ्यावा, या पार्श्वभूमीवर बैठका सुरू झाल्या आहेत.

भोगावती साखर कारखान्यावर गेल्या सात महिन्यांपासून त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ कार्यरत आहे. पंचवार्षिक निवडणूक जून २००५ मध्ये होणार होती, परंतु वाढीव सभासदप्रकरणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत न्यायालयीन लढाई सुरू केल्याने निवडणूक लांबत गेली. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी, शेकाप मंडळींना त्याचा फायदा झाला, परंतु प्रशासक मंडळ नियुक्त केल्याने सर्वांचीच कोंडी झाली आहे. कारखाना निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. प्रशासक मंडळ आणखी किती दिवस कारखान्याच्या सत्तेवर थांबणार, याविषयी भोगावती परिसरात तर्कवितर्क लढवले जात आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत. या निवडणुकीत कोणाशी संधान बंधावयाचे, या संभ्रमात कार्यकर्ते आहेत. यातच सहकार निवडणूक प्राधिकरणाने मतदारयादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश प्रशासक मंडळास केले आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत भोगावती कारखाना मतदार यादी जाहीर करण्याची तयारी सुरू झाली असल्याचे सांगितले जात आहे.

कारखान्याची निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर झाल्यास भोगावती परिसरात राजकीय संदर्भ बदलणार आहेत. सध्या भोगावती निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अशा दोन निवडणुका समोर असल्याने राजकीय नेते व कार्यकर्त्यांची बोळवण करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगणक लॅबवरून हमरीतुमरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल नगरपालिकेची सर्वसाधारण सभा संगणक लॅबच्या विषयावरून वादळी ठरली. या विषयावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकेरीवर येत हमरीतुमरी झाली. दहा-बारा दिवसांवर आलेला दिवाळी सण आणि गहिनीनाथांचा ऊरूस याचा विचार करून शहरात युद्धपातळीवर दिवाबत्ती व पाणी यांची चोख व्यवस्था करावी. प्रोत्साहनपर शौचालय बांधकाम अनुदान, अत्याधुनिक डस्टबीन ठेका देणे, आदी तेहतीस विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.

नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये पालिकेची ही अखेरची सभा होती. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गाडेकर होत्या. यावेळी मुख्याधिकारी टिना गवळी प्रमुख उपस्थित होत्या.

सभेच्या सुरुवातीचे पाच विषय झाल्यानंतर विरोधी नगरसेवक धैर्यशील इंगळे यांनी पालिकेतील संगणक लॅबचा विषय काढला. याबाबत त्यांनी दोन सदस्यांवर गंभीर आरोप केले. त्यामुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ झाला. दोन्ही बाजूंकडून आरोप करण्यात आले. संगणकाबाबत केलेल्या आरोपांचा सत्ताधाऱ्यांनी इन्कार केला. विरोधक बिनबुडाचे गंभीर आरोप करीत त्यांनी लोकशाही व सभागृहाचा अवमान केला आहे. याबाबत त्यांनी आपले आरोप मागे घ्यावेत आणि दिलगिरी व्यक्त करावी, असा सज्जड दम सत्ताधाऱ्यांकडून दिला. त्यावर विरोधी नगरसेक धैर्यशील इंगळे यांनी केलेल्या आरोपावर ते ठाम राहिले. शहरात होऊ घातलेला उरूस व दिवाळी सण या काळामध्ये दिवाबत्ती व पाणीपुरवठा याबाबत कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. पालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. नागरिकांतून कोणत्याही तक्रारी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी; अन्यथा कामात कुचराई झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे नगरसेवक प्रवीण गुरव यांनी सांगितले. शहरात पाणीपुरवठ्याच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे.

याअंतर्गत अनेक ठिकाणी नवीन पाइप टाकण्यासाठी रस्ते खुदाई केली आहे. मातीचे ढिगारे हलविण्यात येऊन शहर स्वच्छतेची काळजी घ्यावी. शहरातील कचरा गोळा करण्यासाठी वाहन खरेदीबाबत विरोधी नगरसेवक संजय कदम व भैय्या इंगळे यांनी घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या ठेकेदाराचे हे काम आहे. मग वाहन खरेदीचा बोजा पालिकेवर का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर पक्षप्रतोद रमेश माळी यांनी कचरा उठाव करणे हे पालिकेचे काम आहे. यासाठी वाहने खरेदी करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावेळी सार्वजनिक शौचालय दुरुस्ती, ऊरुसानिमित्त रंगरंगोटी, रस्ते खडीकरण, नवीन पाण्याच्या टाकी बांधणे आदींसह तेहत्तीस विषय चर्चा करून सभागृहात मंजूर करण्यात आले. नगराध्यक्षा संगीता गाडेकर यांनी शहरातील सर्व पुतळ्यांचे सुशोभिकरण करण्याची सूचना ऐनवेळच्या विषयात केली. या सभेत नम्रता कुलकर्णी, सुमन कुराडे, सन्मती चौगुले, रंजना सणगर, आशाकाकी माने, संजय चितारी यांनी चर्चेत सहभाग घेतला. उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपूर नगराध्यक्षपदी अनुराधा आडकेंची निवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

जयसिंगपूरच्या नगराध्यक्षपदी सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या अनुराधा राजेंद्र आडके यांच्या निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किरण काकडे यांनी केली. या निवडीनंतर आडकेसमर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.

राजर्षी शाहू आघाडीने दिलेली मुदत संपल्याने रेखा देशमुख यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे नूतन नगराध्यक्ष निवडीसाठी सोमवारी पालिकेच्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात विशेष सभा झाली. नगराध्यक्षपदासाठी शाहू आघाडीने आडके यांचे नाव निश्चित केले होते. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत आडके यांचेच दोन अर्ज दाखल झाले होते. छाननीत हे दोन्ही अर्ज वैध ठरल्याने निवडणूक निर्णय अधिकारी काकडे यांनी नगराध्यक्षपदी आडके यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा

केली.

यावेळी तहसीलदार किरण काकडे, मुख्याधिकारी हेमंत निकम, पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर यांनी नूतन नगराध्यक्षा आडके यांचा सत्कार केला. सभेला माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर, उपनगराध्यक्षा स्वाती पडूळकर, सुनील पाटील, शिवाजी कुंभार, संभाजी मोरे, असलम फरास, राहुल बल्लाळ, अनिता कोळेकर, सुनीता खामकर, अलका खाडे, संगीता पाटील-कोथळीकर, राणी धनवडे, रेखा देशमुख, आदी उपस्थित

होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यान निमंत्रण पत्रिकेवरून गदारोळ

$
0
0

उद्यान निमंत्रण पत्रिकेवरून गदारोळ
वादावादीवरून उपनगराध्यक्षा कावेरी चौगुलेंचा सभात्याग

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

पंचवार्षिक निवडणुकीपूर्वीची शेवटची विशेष सभा गवळीवाडा येथील उद्यानाच्या निमंत्रण पत्रिकेवरून गाजली, तर योगभवनच्या सुधारित प्रस्तावाबाबत झालेल्या चर्चेदरम्यान उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले व जनता दलाचे नगरसेवक बसवराज खणगावे यांच्यात झालेल्या वादविवादामुळे उपनगराध्यक्षा चौगुले सभा अर्ध्यावर सोडून निघून गेल्या. मात्र, अन्य सदस्यानी सभा पुढे चालू ठेवत सर्व विषय मंजूर केले. तसेच पालिकेच्यावतीने चिमणी हा नगरपक्षी म्हणून घोषित करण्यात आला. नगराध्यक्ष राजेश बोरगावे अध्यक्षस्थानी होते.

नगरसेविका अरुणा शिंदे यांनी गवळीवाडा येथील उद्यान व स्टेज बांधकाम लोकार्पण सोहळ्याच्या आमंत्रण पत्रिकेवर आक्षेप घेतला. आमंत्रण पत्रिकेवर फौजदारी दाखल असलेल्या व्यक्तींची नाव सन्माननीय म्हणून छापली जातात. मात्र, त्या विकासकामासाठी योगदान देणाऱ्यांचा उल्लेख होत नाही अशी खंत सभागृहात व्यक्त केली. मोजक्याच नगरसेवकांच्या उपस्थित कार्यक्रमाला मंजुरी घेता. पालिकेत एकूण किती नगरसेवक आहेत हे एकदा स्पष्ट करावे, असे त्या म्हणाल्या. त्याला नगरसेवक किरण कदम व रामदास कुराडे यांनी दुजोरा दिला.

यावर बोलताना नगराध्यक्ष बोरगावे यांनी काळ्या यादीत असणाऱ्यांचे नाव सिद्ध करून दाखवा, असे आव्हान दिले. गटनेते कुराडे यांनी याबाबत कोर्टात केस सुरू असून, जबाबदारीने बोला, असे सांगितले. यावर काही काळ सभागृहात तणाव निर्माण झाला. अध्यक्षांनी पुढचा विषय घेण्याची सूचना दिली. मात्र, अरुणा शिंदे या आपल्या मतावर ठाम राहिल्या व मला बोलण्याची संधी मिळालीच पाहिजे, असे स्पष्ट केले. यावर नगराध्यक्ष बोरगावे यांनी विरोधक चागल्या कामाकडे नेहमी पाठ फिरवतात. तुमच्या काळात तुम्ही काय केले तेच परत मिळणार असे सांगत सर्वप्रथम विषय मंजूर करून घेऊ अशी सूचना मांडली, तर नरेंद्र भद्रापूर यांनी प्रभागाचा कळवळा असणाऱ्यांनी सर्वप्रथम प्रभागात किती वेळा फेरफटका मारला ते सांगावे असे सांगितले.

पत्रिकेतील नावापेक्षा विषयपत्रिकेवरील विषय महत्त्वाचे असून, सर्वप्रथम विषय मंजूर करू, या गटनेत्या स्वाती कोरी यांच्या आवाहनावर पुन्हा सभेचे कामकाज सुरू झाले. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत प्राप्तनिधीतून कामाबाबत बोलत असताना कोरी यांनी गवळीवाडा व अयोध्यानगर येथे पेव्हिंग बॉल्क व विजेची व्यवस्था करण्याची मागणी केली.

दरम्यान, योग भवन सुधारित प्रस्ताव परत का आला, असा सवाल किरण कदम यांनी केला. यावर बोरगावे यांनी तुम्हाला प्रस्तावसुद्धा बरोबर करता येत नाही मात्र सभेत वाद घालत राहता असा टोला लगावला. यावर कदम यांनी प्रस्ताव करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, प्रस्ताव मंजूर नव्हता तर नारळ फोडायला का गेलाल असा सवाल उपस्थित केला. या दरम्यान उपनगराध्यक्षा चौगुले व खणगावे यांच्यात या विषयावरून वाद रंगला. ज्याचे रूपांतर एकमेकांवर वैयक्तिक आरोपात झाले. चौगुले यांनी सभात्याग केला.

यावेळी सरकारच्या नव्या जीआरनुसार पालिकेतील आठ सफाई कामगारांची घरे त्यांच्या नावावर मालकी हक्काने करावीत व कृष्णात पर्यावरणचे अध्यक्ष अनंत पाटील यांच्या प्रयत्नांना हातभार म्हणून चिमणी ही नगरपक्षी करावी या मागणीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. पंचवार्षिक नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची पालिका सभा ही शेवटची होती. सत्ताधारी गटाच्या स्वाती कोरी व विरोधक किरण कदम यांनी गेल्या पाच वर्षात अवधानाने चुकीचा शब्द गेल्यास माफी मागून व आभार मानून केली. यानंतर अन्य सदस्यांच्या उपस्थिती सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली. मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरीत बडोलेंच्या पुतळ्याचे दहन

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात वादग्रस्त विधान करणारे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा सोमवारी हुपरी (ता. हातकणंगले) येथे सकल मराठा समाजाच्यावतीने तीव्र निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या पुतळ्याचे दहन गावभागातील चौकात केले.

महाराष्ट्रात सर्वत्र मराठा समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरुन शिस्तबद्ध पद्धतीने आरक्षणाची मागणी करत असताना महत्त्वाच्या मंत्रिपदावर कार्यरत असलेले सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आरक्षणाच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानाने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे हुपरीमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने मंत्री बडोलेंचा निषेध करुन त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी मोहन वाईंगडे, प्रतापसिंह देसाई, नेताजी निकम, पृथ्वीराज गायकवाड, उमाजी गायकवाड, अमित नरके, सचिन शिंदे, आदीउपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणलोट घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन योजनेतील (वसुंधरा पाणलोट) कामात झालेल्या घोटाळ्यातील दोषींवर केलेल्या कारवाईबाबतचा पाठपुरावा उच्चस्तरावरून सुरू झाला आहे. कृषी आयुक्त पातळीवरूनच हा पाठपुरावा सुरू आहे. या प्रकरणातील अहवालात दोषी ठरलेल्या अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केलेले येथील ‌वरिष्ठ अधिकारी कामाला लागले आहेत. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी आर्थिक तडजोड केल्याच्या प्रकाराचेही बिंग फुटणार आहे. पाणलोट कामातील घोटाळ्याबाबतचा चौकशी अहवाल बासनात गुंडाळून ठेवला होता. याकडे लक्ष वेधणारी विशेष वृत्तमालिका महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर यंत्रणा जागी झाली आहे.

गेल्यावर्षी हिवाळी अधिवेशात जिल्ह्यातील पाणलोटच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. त्यानंतर स्वतंत्र समिती नेमून तक्रार झालेल्या कामांची चौकशी झाली. अहवालात ५५ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र हा अहवाल गोपनीयतेच्या नावाखाली येथील कृषी आणि जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने दाबून ठेवला. दोषींवरील कारवाईची फाइलही बंद केली.

महाराष्ट्र टाइम्सने चौकशी अहवाल मिळवून अहवालातील दोषी अधिकाऱ्यांच्या नावासह कामातील गैरकारभारावर प्रकाशझोत टाकला. सर्वच टप्प्यांवर दोषींचा बचाव कशा पद्धतीने सुरू आहे, यावरही प्रकाश टाकून कृषी विभागाचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला. त्याची कृषी आयुक्त कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली. पाणलोट घोटाळ्यातील मालिकेचा पहिला भाग प्रसिद्ध झाला त्याच दिवशी आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ कोल्हापुरात होते. शिवाय‌ जिल्हा, सनियंत्रण समितीची बैठक होती. बैठकीत खासदार राजू शेट्टी यांनी घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी कृषी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे एक वर्षापासून दोषींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाई करावी लागणार आहे. कारवाईचा अहवाल द्यावा लागणार आहे. पहिल्यांदा कातडी बचाव भूमिका घेणाऱ्या वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांना कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, असे सांगण्याची वेळ आली.

तकलादू खुलासा

पाणलोट घोटाळ्याची मालिका प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा अ‌धीक्षक कृषी कार्यालयाकडून सर्वच वृत्तपत्रांना खुलासा पाठवण्यात आला. पाणलोटच्या कामात प्रशासकीय त्रुटी, अनियमितता होती. त्या दूर केल्याचा तकलादू खुलासा करून प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न खुलाशातून केला. पण दोषींवरील कारवाईची माहिती देणे टाळले होते.

पाणलोट घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करावी, या मागणीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे. पत्रासोबत चौकशी अहवालावर महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे कात्रण जोडणार आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.

राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता ५० लाखांत नगरसेवक देखील फुटत नाही: पवार

$
0
0

सुनील दिवाण | पंढरपूर

पूर्वी आमदार ५० लाख रुपयात फुटायचे, पण आता तेवढ्यात साधा नगरसेवक देखील फुटत नाही; असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. करमाळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक तयारी मेळाव्यात ते बोलत होते. पवारांनी त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या टर्मचा अनुभव सांगताना हे उदाहरण दिले.

पहिल्यांदा निवडून आल्यावर विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आमदारांची फूट थांबविण्यासाठी त्यांना बेंगळुरूला न्यावे लागले होते. तेव्हा ५० लाखांत आमदार फुटत होते. त्यामुळे विलासरावांनी यापेक्षा नव्याने निवडणुकांना सामोरे जाऊ, असे म्हणाले होते. पण आता ५० लाखात नगरसेवक देखील फुटत नसल्याचे पवार यांनी सांगितले.

नरसिंहराव पंतप्रधान असताना खासदारही ५० लाखांत फुटत होते, अशी आठवण अजित पवार यांनी सांगितले. मात्र आता तिकिटे देताना न फुटणाऱ्या उमेदवारालाच द्या, असा आदेश पक्ष संघटनेतील नेत्यांना त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बळीराजा’ काढणारमोटार सायकल मोर्चा

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

मागील हंगामात (सन २०१५-१६) गाळर झालेल्या उसास दिवाळीसाठी प्रतिटन ५०० रुपये हप्ता मिळावा, या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेने येत्या २० ऑक्टोबर रोजी कराड तालुक्यात मोटार सायकल मोर्चाचे आयोजन केले आहे.

आंदोलनाच्या तयारीसाठी संघटनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी बैठका सुरू झाल्या आहेत. या बैठकांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कराड तालुक्यातील शेरे, दुशेरे, कोडोली येथे कोपरा सभा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.

साखर कारखानदारांनी एफआरपीनुसार बिले अदा केली असली तरी साखरेला मिळालेला ज्यादा दर व उपपदार्थातून मिळालेले उत्पादन याचा विचार करता शेतकऱ्यांना वाढीव बिले मिळणे अपेक्षित आहे. यासाठी दिवाळीसाठी प्रतिटन ५०० रुपये मिळालेच पाहिजेत तो शेतकऱ्यांचा हक्क आहे, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे.

असा असेल मोर्चा

२० ऑक्टोबर रोजी पाचवड (काले, ता. कराड) येथून सकाळी नऊ वाजता मोर्चाला प्रारंभ होणार आहे. कराड तालुक्यात निघणारा मोटार सायकल मोर्चा कृष्णा साखर कारखाना, राजारामबापू कारखाना, सह्याद्री कारखाना, जयवंत शुगर, रयत कारखाना, पाटणचा बाळासाहेब देसाई आदी कारखान्यांवर काढण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या घरांसाठी २९ कोटी ४७ लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस वसाहतींमधील ११५४ घरांसाठी राज्य सरकारने २९ कोटी ४७ लाख रुपये मंजूर केले आहेत. लवकरच घरांचे बांधकाम सुरू होणार असून, तीन वर्षांत पोलिसांना नवीन घरे मिळणार आहेत. शिवाय जुन्या घरांची डागडुजी करण्यासाठीही हुडकोकडून १० कोटींची तरतूद केली जाणार आहे. मंगळवारी (ता. १८) मंत्रालयात झालेल्या बैठकीत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली.

कोल्हापुरातील पोलिस वसाहतींमधील घरांच्या दुरवस्थेची वस्तुस्थिती महाराष्ट्र टाइम्सने मांडली होती. आमदार राजेश क्षीरसागर यांनीही अधिवेशनात लक्षवेधी आणि तारांकित प्रश्न उपस्थित करून पोलिसांसाठी नवीन घरांची मागणी केली होती. याबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करून पोलिसांच्या घरांचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी गृहराज्यमंत्री केसरकर यांच्याकडे केली होती. मंगळवारी केसरकर यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, ‘कोल्हापूर पोलिस प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाची पडताळणी करून कोल्हापूरसाठी ११५४ घरांना २९ कोटी ४७ लाखांचा निधी सरकारने मंजूर केला आहे. लवकरच घरांच्या बांधकामाला सुरूवात होईल. तीन वर्षात घरांचे काम पूर्ण करून पोलिसांना नवीन घरे उपलब्ध होतील.’ कोल्हापुरातील लाइन बाजार, कसबा बावडा, बुधवार पेठ आणि लक्ष्मीपुरी येथील वसाहतींमध्ये नवीन घरे बांधली जातील. ११५४ पैकी ३०० घरे इचलकरंजीमध्ये बांधण्यात येणार आहेत. या निर्णयानंतर पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पोलिसांच्या ८८६ घरांच्या डागडुजीसाठी १० कोटी रुपयांची गरज आहे. राज्य सरकारकडे चालू वर्षी हा निधी उपलब्ध नाही, त्यामुळे गृह खात्याने हुडकोशी चर्चा केली असून, हुडकोच्या अर्थसहायातून घरांच्या डागडुजीचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हुडकोच्या अधिकाऱ्यांनीही याला सहमती दर्शवली आहे. यासाठी आ‍वश्यक प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना गृहमंत्री केसरकर यांनी बैठकीत दिल्या. अर्थमंत्र्यासोबत पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत आवश्यक निधी प्रस्तावित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मंत्री केसरकर यांनी सांगितले. बैठकीसाठी आमदार राजेश क्षीरसागर, वित्त विभागाच्या प्रधान सचिव गीता राजीवलोचन, गृह विभागाचे प्रधान सचिव रजनीश शेठ, पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, कोल्हापूर मनपा आयुक्त पी. शिवशंकर, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, हुडकोचे नागेश्वर राव, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरांचे स्वप्न होणार साकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात राबविण्यात येणाऱ्या ‘सर्वांसाठी घर’या संकल्पनेतून तब्बल १९ हजार घरांची बांधणी होणार आहे. २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्याने प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे. महापालिका प्रशासनाने, सर्वांसाठी घर संदर्भातील कृती आराखडा तयार केला आहे. अनुदान, कर्ज स्वरुपात व खासगी बांधकाम व्यावसायिकासोबताच्या भागीदारीतून तब्बल १५०० कोटी रुपयांचा हा संपूर्ण प्रकल्प असेल. चार विविध घटकांना या योजनेचा लाभ होणार आहे.

प्रशासन, हा कृती आराखडा मान्यतेसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवणार आहे. महासभेच्या मान्यतेनंतर राज्य सरकारकडे सादर होईल. शहरातील ६३ झोपडपट्टयामध्ये १४ हजार कुटुंबे आहेत. झोपडपट्ट्यांसह अन्य तीन घटकांसाठी ही योजना आहे. झोपडपट्टीतील पात्र लाभार्थ्याना योजनेंतर्गत दोन लाख रुपयांचे अनुदान मिळार आहे. खासगी भागीदारातून घरांची उभारणी होणार आहे. ‘सर्वांसाठी घर’ योजनेतून घरकुलासाठी कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांचे १५ वर्षाचे व्याज सरकार भरणार आहे.

तिसऱ्या विभागात शहरातील बेघरांना हक्काचे घर उपलब्ध करण्यात येणार आहे. या घटकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध असणार आहेत. महापालिका आणि खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या भागीदारीतून लाभार्थ्यांना घरकुल दिली जाणार आहेत. लाभार्थ्यांनी दोन लाख पन्नास हजार रुपयांची उभारणी करायची आहे. चौथ्या विभागात स्वत:ची जागा आहे, त्यांना नव्याने घर बांधणी, दुरूस्तीसाठी अनुदान मिळणार आहे.

कृती आराखड्याचे महापालिकेत सादरीकरण

प्रशासनाने ‘सर्वांसाठी घर’कृती आराखडा तयार केला आहे. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्यासमोर आराखड्याचे सादरीकरण झाले. सामाजिक विकास अधिकारी प्रसाद संकपाळ आणि व्हीआरपी असोसिएशन या सल्लागार संस्थेच्या अध्यक्षा मेघा गवारे यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, सभापती मुरलीधर जाधव, वृषाली कदम, लाला भोसले, सभागृह नेता प्रवीण केसरकर, विरोधी पक्ष नेता संभाजी जाधव आदी उपस्थित होते.

कोल्हापूर आणि नागपूर ही शहरे प्रधानमंत्री आवास योजना अंमलबजावणीमध्ये अग्रेसर आहेत. कृती आराखडा सादर करणारी कोल्हापूर महापालिका पहिली आहे.

श्रीधर पाटणकर,अतिरिक्त आयुक्त, महापालिका

संपूर्ण शहर डोळ्यासमोर ठेवून सर्वांसाठी घर कृती आराखडा तयार केला आहे. २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. १९ हजार कुटुंबांना लाभ मिळणार आहे. सादरीकरणाच्या माध्यमातून शहरातील झोपडपट्टया, पक्क्या घरांची गरज, सार्वजनिक आ​णि खासगी क्षेत्राची भागिदारीविषयी माहिती दिली.

प्रसाद संकपाळ , सामाजिक विकास अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर​क्षणाचा प्रस्ताव मागे घ्या‍

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या तटबंदीलगतची रहिवासी विभागातील १५ एकर जागा ओपन जेलकरिता आरक्षित करण्याचा विषयावरून प्रशासन आणि पदाधिकारी सभागृह आमनेसामने उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खुद्द महापौर अश्विनी रामाणे यांनीच ओपन जेलसाठी जागा आरक्षित करण्याच्या विषयाला विरोध करत प्रशासनाने हा विषय मागे घ्यावा अन्यथा, नामंजूर करण्यात येईल, असे पत्रच आयुक्त पी. शिवशंकर यांना दिले आहे. तसेच बिंदू चौक येथील सब जेल कळंबा कारागृह येथे हलविण्यास अप्रत्यक्षरित्या विरोध केला आहे.

ओपन जेलसाठी जागा आरक्षित करण्यास विरोध करणाऱ्या १५०० नागरिकांच्या सह्यांचे निवेदनही आयुक्तांकडे दिल्याचे महापौरांनी सांगितले. महापालिकेची गुरूवारी सर्वसाधारण सभा आहे. प्रशासनाने, कळंबा कारागृहाच्या तटबंदी लगतची रहिवास विभागातील १५ एकर जागा ओपन जेलकरिता आरक्षित करण्याचा व विकास योजनेंतर्गत तीस मीटर रस्त्याच्या आखणीमधील फेरबदलास मंजुरी मिळण्याचा विषय सभेसमोर ठेवला आहे. प्रशासनाने, यापूर्वी वीस सप्टेंबर रोजी झालेल्या सभेत हा विषय मान्यतेसाठी ठेवला होता. तेव्हा सदस्यांनी यासंबंधीचा निर्णय पुढील मिटींगमध्ये घेण्याचे ठरविले होते.

महापौरांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘कळंबा जेलपासून १५० मीटर अंतरावर कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्याचबरोबर १५० मीटर बाहेर व ५०० मीटरच्या आत सर्वसामान्य कुटुंबीय राहत असून त्यांना छोटी घरे बांधणे सुद्धा अडचणीचे झालेले आहे. नवीन जेल झाल्यास संपूर्ण कळंबा, साळोखेनगर, एलआयसी कॉलनी, गणेश कॉलनी, कात्यायनी कॉम्प्लेक्स, राणे कॉलनी, जयहिंद कॉलनी, एनटी सरनाईक कॉलनी, सुनीता नरके कॉलनी, योगेश्वरी कॉलनी, मगदूम कॉलनी, बँक शिपाई कॉलनीसह आसपासच्या परिसरातील नागरिकांची घरे बाधित होणार आहेत. या भागात वीस हजाराच्या आसपास लोकवस्ती आहे. प्रशासनाने, जेलसाठी जागा आरक्षित होणाऱ्या विषयावर नागरिकांची मते आजमावून घ्यावीत. सभेसमोर मांडलेल्या विषयाचा फेर​ विचार करावा. अन्यथा नामंजूर करण्यात येईल. शहराच्या मंजूर विकास योजनेतील तीस मीटर रस्ता जेलशे​जारी वळविल्यामुळे स्थानिक नागरिकांची घरे बाधित होणार आहेत.’

सब जेल हलविण्यासही विरोध?

बिंदू चौक येथील सबजेल गावठाणमध्ये समाविष्ठ आहे. बिंदू चौक बुरूज आणि जुना तुरूंग बिंदू चौकाच्या तटासह हेरिटेज वास्तूत समाविष्ठ आहे. महापालिकेने या जेलची जागा घेतली तरी त्याचा कोणत्याही कारणासाठी वापर करता येणार नाही. या जेलमध्ये दोन तुरबत आहेत या बाबीचा विचार होणे गरजेचा असल्याचे महापौरांनी पत्रकात म्हटले आहे. वास्तविक शहरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी सब जेल कळंबा कारागृहात स्थलांतरित करावा, अशी नागरिकांसह प्रशासनाची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images