Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मोहन ऑटो, मेनन अॅन्ड मेनन आघाडीवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील मोहन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड आणि मेनन अॅन्ड मेनन या कंपन्यांनी कोल्हापूर विभागीय पातळीवर सर्वाधिक विक्रीकर भरून अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील टाटा मिन्स लिमिटेड ही कंपनी पहिल्या क्रमांकावर राहिली. कोल्हापुरातील विभागीय विक्रीकर कार्यालयाकडून या कंपन्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

विक्री कराच्या बाबतीत अनेकदा वेळेवर कर भरणाऱ्यांपेक्षा कर थकविणाऱ्यांचीच यादी मोठी असते. मात्र, प्रामाणिकपणे वेळच्यावेळी कर भरणारे उद्योजक, व्यापारी अनेकदा दुर्लक्षित राहतात. यंदा सरकरने वेळेवर कर भरणाऱ्या उद्योजकांच्या पाठिवर कौतुकाची थाप दिली आहे. विक्रीकर दिनादिवशी राज्यात विभागीय पातळीवर वेळेवर विक्रीकर भरणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे मुळच्या घाटगे-पाटील उद्योग समूहातून वेगळ्या झालेल्या तीन कंपन्या विक्रीकर भरणाऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत. घाटगे-पाटील उद्योग समूह १९९०च्या सुमारास पाटील आणि घाटगे कुटुंबांमध्ये वेगळा झाला. त्यानंतर माल वाहतूक, प्रवासी वाहतूक आणि कुरिअर सेवा हे उद्योग घाटगे कुटुंबाकडे आहे. त्याला ह्युंदाई, टीव्हीएस, टाटा कमर्शिअल, भारत बेन्झ यांसारख्या गाड्यांची डिलरशीप घेऊन घाटगे कुटुंबाने उद्योग विस्तार केला. यातील घाटगे कुटुंबाच्या मोहन ऑटो आणि के. जी. पी. या कंपन्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे.

त्याचबरोबर पाटील कुटुंबाकडे असलेल्या घाटगे-पाटील इंडस्ट्रीज या कंपनीलाही विक्रीकर खात्याने गौरविले आहे. मेनन कुटुंबियांमधील मेनन अॅन्ड मेनन लिमिटेड कंपनीलाही यात विभागीय पातळीवर तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले आहे. सरकारकडून उद्योजक व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेचे उद्योग क्षेत्रातून स्वागत होत आहे.

सरकारची कोणतिही देणी कोणत्याही परिस्थितीत थकणार नाहीत, याकडे आमचा कटाक्ष असतो. त्यासाठी एक चार्ट तयार केला असून, त्यानुसार प्रत्येक महिन्यात कोणता कर भरण्याची कोणती शेवटी तारीख आहे, याची नोंद ठेवलेली असते. त्यानुसार अनेकदा शेवटच्या तारखे पूर्वीच आम्ही कर भरलेला असतो.

- जयंत कुलकर्णी, फायनान्स कंट्रोलर, घाटगे-पाटील इंडस्ट्रिज्

यंदा पहिल्यांदाच जिल्हा पातळीवर आणि विभागीय पातळीवर सर्वाधिक कर देणारे, नियमित भरणा करणारे, अचूक व वेळेवर भरणा करणारे आणि इतर कायदेशीर पूर्तता करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

- विलास इंदलकर, विक्रीकर सहआयुक्त, कोल्हापूर विभाग

सर्व प्रकारचे कर वेळेत भरण्याचे कंपनीचे नियोजन असते. विक्री कर महिन्याला भरावा लागतो. कंपनीकडून प्रत्येक माहिन्यात वेळच्या वेळी कर भरला जाईल, याचे काटेकोर नियोजन असते.

- विजय मेनन, एमडी, मेनन अॅन्ड मेनन, प्रा. लि.

शो रुममधून होणाऱ्या गाड्यांच्या विक्रीवर नियमीतपणे टॅक्स भरण्याचे नियोजन होते. यामध्ये प्रत्येक महिन्याचा टॅक्स, पुढील महिन्याच्या २० तारखेच्या आत भरावा लागतो. आम्ही या नियमानुसार १०० टक्के वेळच्या वेळी टॅक्स भरला आहे.

- तेज घाटगे, सीईओ, मोहन ऑटो इंडस्ट्रिज्

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विविध संघटनांचा मराठा मोर्चाला पाठिंबा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सकल मराठा समाजाच्यावतीने कोल्हापुरात १५ ऑक्टोबर रोजी काढण्यात येत असलेल्या मूक मराठा क्रांती मोर्चाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

मनोयुवा ज्येष्ठ नागरीक संघ

मनोयुवा ज्येष्ठ नागरीक संघाचा १५ ऑक्टोंबरला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा देणार असल्याचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी पत्रकाद्वारे सांगितले. या मोर्चामध्ये ताराराणी चौकापासून शिरोली नाका, टेंबलाईवाडी, बापट कॅम्प, कदमवाडी, भोसलेवाडी, कारंडे मळा, ताराबाई पार्क, सर्कीट हाऊस परिसर, शिवराज कॉलनी, घाटगे कॉलनी या सर्व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत.

मंगल कार्यायल संघटना

कोल्हापूर जिल्हा मंगल कार्यालय संघटनेने मोर्चाला पा​ठिंबा दिला आहे. संघटनेतील संचालकांनी आपले कार्यालय मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सुप्रभामंच, पार्वती गार्डन, इंदिरासागर, रघुनंदन हॉल, स्वामी समर्थ मंगल कार्यालय, खत्री लॉन, लोळगे लॉन, महालक्ष्मी हॉल कावळा नाका, ओम गणेश मंगल कार्यालय, कल्याणी हॉल, गंगा भाग्योदय, ज्ञानदिप मंगल कार्यालय, त्र्यंबोली लॉन, शिंदे लॉन यांचा समावेश आहे. या कार्यालयाच्या मालकांनी ५०० लोकांच्या चहा, नाष्ट्याची सोय केली आहे.

पदयात्रा

मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिरच्यावतीने मिरजकर तिकटी येथ फलक उभारण्यात आला आहे. सायंकाळी सहा वाजता मंदिर ते मिरजकर तिकटी स्तंभापर्यंत पदयात्रा काढून या फलकाचे उदघाटन करण्यात येणार आहे. तसेच रंगीत बॅचही वितरण करण्यात येणार आहे.

शिक्षण प्रसारक मंडळाचा पाठिंबा

गोखले कॉलेजमध्ये शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने पेट्रन कौन्सिल सदस्य दौलत देसाई यांनी मराठा क्रांती मोर्चाला सक्रिया पाठिंबा जाहीर केला. यावेळी सर्वांनी शांतता व संयमपूर्वक मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही केले. याप्रसंगी प्रा. पी. के. पाटील यांनी स्वागत केले. जी. एस. सिद्धेश पोवार, एन. सी. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. जे. बी. पिष्टे, लक्ष्मण डेळेकर, रोहन पोवार, निलेश देवणे, अक्षय सोनवणे, प्रा. भगतसिंग पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समारोपास ताराराणी चौकास प्राधान्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा क्रांती मोर्चाचा समारोप करण्यासाठी ताराराणी चौकाला पोलिस प्रशासनाचे प्राधान्य मिळत आहे. शुक्रवारी दुपारी पोलिस अधिकाऱ्यांसह संयोजकांच्या कोअर टीमने मोर्चामार्ग आणि पार्किंग ठिकाणांची पहाणी केली. दसरा चौकापेक्षा ताराराणी चौक सोयीस्कर असल्याने याच ठिकाणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र, ताराराणी चौकात समारोप ठेवल्यास ही गर्दी पुणे-बेगुळूरू हायवे पर्यंत जाईल परिणामी हा मार्ग बंद झाल्यास अडचणी निर्माण होऊ शकते. आंदोलकांना शहरात येताच येणार नाही त्यामुळे याऐवजी दसरा चौकातच समारोप करावा अशी मागणी केली जात आहे.

१५ ऑक्टोबरला होणाऱ्या मराठा महामोर्चाचा समारोप करण्यासाठी सुरूवातीला दसरा चौक हा पर्याय मांडण्यात आला होता, मात्र दसरा चौकात येणारे रस्ते लहान आहेत. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना थांबण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने आयजी विश्वास नांगरे-पाटील यांनी ताराराणी चौकाचा पर्याय सुचवला होता. या अनुषंगाने शुक्रवारी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, शहर पोलिस उपाधीक्षक भारतकुमार राणे, वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ यांच्यासह कोअर कमिटीच्या सदस्यांनी ताराराणी चौकासह संभाव्य पार्किंग ठिकाणांची पाहणी केली.

दसरा चौकाला ऐतिहासिकत महत्त्व असले तरीही, कोपर्डी घटनेच्या पार्श्वभूमीवर ताराराणी चौकातच मोर्चाचा समारोप करणे औचित्यपूर्ण असल्याचे मत काही संयोजकांचे आहे. पोलिसांच्या दृष्टीनेही पार्किंग आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ताराराणी चौक महत्त्वाचा आहे. मोर्चा संपल्यानंतर मोर्चेकऱ्यांना बाहेर पडण्यासाठीही हे ठिकाण सोयीचे आहे. ताराराणी चौकाच्या पाहणीनंतर पोलिस अधिकाऱ्यांसह कोअर कमिटीने तावडे हॉटेल परिसराची पाहणी केली. मोर्चेकरी शहरात आल्यानंतर वाहने पार्क करण्याची ठिकाणे, मोर्चा मार्ग, वाहतूक सुरू ठेवण्याचे पर्यायी मार्ग यांची पाहणी करण्यात आली.

का नको ताराराणी चौक...

गांधी मैदान, प्रायव्हेट हायस्कूल, पेटाळा मैदान आणि अन्य लहान मोठ्या मैदानांमुळे शिवाजी पेठेत गर्दी सामावू शकते. तसेच तपोवन मैदान तब्बल ६६ एकरांचे आहे. त्यामुळे या दोन पर्यायांचा विचार करावा असे काही संयोजकांचे म्हणणे आहे. ताराराणी चौकात समारोप केल्यास गर्दी शिरोली आणि शिवाजी विद्यापीठ मार्ग पूर्ण बंद झाल्याने शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी आणि आजरा, चंदगड, गडहिंग्लज, कागल आणि सीमाभागातील नागरिकांना मोर्चात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे समारोप दसरा चौकातच करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

पार्किंगसाठी संभाव्य जागा

घाटगे पाटील इंडस्ट्रीज येथील पार्किंग जागा, कृषी महाविद्यालयातील मैदान, मुक्त विद्यापीठाच्या पाठीमागील रिकामी जागा, पॉलिटेक्निक कॉलेजे येथील रिकाम्या जागेचीही पाहणी केली. शांतीनिकेत येथील मैदान आणि शेंडापार्क मैदानावर वाहनांच्या पार्किंगसाठी मोठी जागा आहे. याशिवाय तपोवन मैदान, निर्माण चौक, बावड्यातील गोळीबार मैदानाचीही पाहणी यापूर्वीच केली आहे. पार्किंगच्या नियोजित ठिकाणांवर वाहने न लावता शहरात वाहने आल्यास शहराची कोंडी होणार आहे, त्यामुळेच पार्किंगच्या नियोजनावर भर दिला जात आहे.

मराठा महामोर्चासाठी शहरातील संभाव्य पार्किंगच्या जागा आणि समारोपासाठी दोन ठिकाणांची पाहणी करण्यात आली. ताराराणी चौक आणि दसरा चौक या दोन्ही ठिकाणी असलेल्या सुविधा, उपलब्ध जागा, पर्यायी मार्ग, पार्किंगची ठिकाणे यांची पाहणी करण्यात आली आहे. याचा अहवाल आयजींकडे पाठवला जाईल. तज्ज्ञ समितीशी चर्चा केल्यानंतर ठिकाणांची निश्चिती होईल.

प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधनिर्मिती खर्च कमी करण्याचे आव्हान

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘एक औषध बाजारात येईपर्यंत त्याच्या विविध चाचण्यांवर सुमारे एक अब्ज डॉलर इतका खर्च आणि सर्वसाधारण १५ वर्षाचा कालावधी लागतो. अथक संशोधनानंतर एक लाख रेणुंमधून हाती आलेल्या दहा हजार रेणुंच्या चाचण्या केल्यानंतर त्यातील दहा औषधांच्या निर्मितीसाठी पात्र ठरतात. त्यानंतर आणखी काटेकोर चाचण्यांमधून त्यातील एकाचे औषधामध्ये रुपांतर होते. सुमारे लाखभर चाचण्या पार केल्यानंतर एक औषध तयार होते. त्याच्यावर खर्चही मोठा होतो, हे चाचण्यांचे प्रमाण व त्यावरील खर्च कमी करण्याचे आव्हान संशोधकांसमोर आहे’ असे मत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले. राजर्षी शाहू सिनेट हॉल येथे ‘रिसर्ज कॉलोक्वियम’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

‘ड्रग डिस्कव्हरी’ या विषयावरील व्याख्यानात बोलताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘अत्याधुनिक साधनांच्या बळावर संशोधन करणे, ही तुलनेत सोपी बाब आहे. तथापी, संशोधकांनी उपलब्ध साधनसामुग्रीच्या सहाय्याने भरीव संशोधन करुन पुढे जाण्याची जीद्द बाळगून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.’

उदघाटन कार्यक्रमास बीसीयूडी डॉ. डी. आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, डॉ. एस. बी. सादळे उपस्थित होते. हा उपक्रम विद्यापीठात दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी राबविण्यात येणार असल्याचे सहसमन्वयक डॉ. एस. डी. डेळेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. डॉ. प्रल्हाद माने यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवक प्रकाश गवंडीना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांतील संघर्षांने शुक्रवारी टोक गाठत वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाच्या प्रभाग समितीच्या बैठकीत सहायक आयुक्त सचिन खाडे यांना दमदाटी व सभापतींच्या दालनात कोंडून घालून शिवीगाळ केल्याप्रकरणी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका माधवी गवंडी यांचे पती आणि माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. तर नगरसेविका गवंडी यांनी सहायक आयुक्त खाडे यांच्याविरोधात असभ्य वर्तनाची फिर्याद दिली. लक्ष्मीपुरी पोलीसांनी माजी नगरसेवक गवंडी यांना कोर्टासमोर उभे केले असता त्यांना जामीन मिळाला.

दरम्यान, आयुक्त पी. शिवशंकर यांनी, सदस्यांच्या नातेवाईकांकडून सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याबद्दल नगरसेविका माधवी गवंडी, अनुराधा खेडकर, सुनंदा मोहिते यांच्यावर अपात्रतेची कारवाई का करू नये? अशी नोटीस बजावली. माजी नगरसेवकांच्या विरोधात फिर्याद दाखल झाल्याचे पडसाद शुक्रवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभेत उमटले. नगरसेविका सूरमंजिरी लाटकर यांनी प्रभाग समिती बैठकीतील घटनेसंदर्भात सहायक आयुक्त खाडे यांच्याकडे विचारणा केली. खाडे यांनी घटनाक्रम सांगण्यास सुरूवात करताच स्थायी सभापती मुरलीधर जाधव यांनी, ‘सदस्यांनी केलेल्या सूचना तुम्हाला सहन होत नसतील तर बैठकीला बसू नका. पदाधिकारी व नगरसेवकांना कसलीही कल्पना न देता माजी सदस्याविरोधात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती. महिला सदस्यासोबत तुम्ही सभ्यतेने वागण्याची गरज होती. तुम्ही बैठकीतून बाहेर व्हा’ असे सांगितले. बैठकीत महिला सदस्याबाबत असभ्य वक्तव्य केल्याप्रकरणी सहायक आयुक्त खाडे व आयुक्तांचा निषेध करण्यात आला. परस्पर विरोधातील फिर्यादी, माजी नगरसेवक गवंडी यांच्यावरील अटकेच्या कारवाईमुळे प्रशासन आणि सत्तारुढ गटातील नगरसेवकांतील मतभेदाची दरी आणखी रुंदावली आहे.

दोन्ही काँग्रेस पोलिस ठाण्यात

सहायक आयुक्त खाडे यांनी फिर्याद दाखल करू नये यासाठी गुरूवारी दुपारपासून प्रयत्न सुरू होते. रात्री उशिरापर्यंत तडजोडीचे प्रयत्न सुरू राहिले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारी नगरसेवकांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्नही केले. मात्र, गेल्या काही महिन्यात नगरसेवकांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सातत्याने अरेरावी केली जात असल्यामुळे आयुक्त कारवाईवर ठाम राहिले. त्यांनी खाडे यांना फिर्याद दाखल करण्याची सूचना केली. मध्यरात्री खाडे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर गवंडी यांच्यावर कारवाई होणार हे निश्चित झाले. कारवाई टाळण्यासाठी दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी, कारभारी नगरसेवक पोलिस ठाण्यात ठाण मांडून राहिले.

तीन सदस्यांना आयुक्तांची नोटीस

आयुक्त पी. शिवशंकर यांनी नगरसेविका माधवी गवंडी, अनुराधा खेडकर आणि सुनंदा मोहिते यांना महाराष्ट्र महापालिका अ​धिनियम कलम १३ मधील तरतुदीनुसार गैरवर्तणुकीबाबतचा अहवाल राज्य सरकारला पाठवून कायदेशीर कारवाई का करू नये? अशी नोटीस बजावली. या सदस्यांच्या नातेवाईकांनी प्रभाग समितीच्या कामकाजात अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. सरकारी कामात अडथळा आणला. सदस्यांनी नातेवाईकांच्या गैरवर्तनास हरकत घेतली नाही, ही बाब अतिशय गंभीर आहे. याप्रकरणी अपात्रतेची कारवाई का करू नये अशी नोटीस आयुक्तांनी पाठवली. तिन्ही नगरसेवकांकडून सात दिवसांत खुलासा आला नाही तर त्यांना काहीही म्हणावयाचे नाही असे समजून पुढील कार्यवाही करू असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाईला तिरुपतीचा शालू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तिरुमला तिरुपती देवस्थानच्यावतीने श्री अंबाबाईला अर्पण करण्यात येणारा मानाचा शालू शुक्रवारी कोल्हापुरात आला. देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी व्ही. दामोदरम् व प्रेमलता यांच्या हस्ते मानाचा शालू मिरवणुकीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला.

सकाळी १० वाजता शेतकरी संघापासून वाजत गाजत शालू आणला. या शालूबरोबरच देवीचे अलंकार, कुंकू असे साहित्यही होते. यावेळी देवस्थान व्यवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, व्यवस्थापक धनाजी जाधव, सदस्य प्रमोद पाटील उपस्थित होते. हा शालू गुलाबी रंगाचा असून जरीकाठ व मोराची नक्षी आहे.

शुक्रवारी पहाटेपासून अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मुखदर्शनासाठीही मोठी रांग होती. दिवसभरात सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले.

श्री अंबाबाईची त्रिपुरा महासुंदरी रुपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा संजीव मुनीश्वर, आशुतोष जोशी, सुशील कुलकर्णी यांनी बांधली. तुळजाभवानीची दीपपूजा रुपात बांधली होती. ही पूजा पुजारी बाळकृष्ण दादर्णे, अमर जुगर, सारंग दादर्णे, आदिनाथ ‌चिखलगर, चंद्रकांत जाधव, विजय बनकर यांनी बांधली.


सुवर्ण पालखी पुर्णत्वाकडे

करवीर निवासीनी महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीने सोन्याची पालखी तयार करण्यात येत आहे. पालखीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून अंबाबाई मंदिर आवारात शुक्रवारी ही सुवर्णपालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली. सर्व भक्तांनी यथाशक्ती सुवर्णपालखीसाठी हातभार लावावा, असे आवाहन ट्रस्टने केले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, भगीरथी महिला संस्थेच्या अरुंधती महाडिक, भारत ओसवाल, देवस्थान समितीचे प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.


मुंबई-पुण्याच्या निवडणूकामुळे भाविकांची संख्या अधिक

यंदा मुंबई, पुणे आणि पिंपरी -चिंचवाड महापालिकेच्या निवडणुका असल्यामुळे त्या परिसरातील इच्छुकांनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाचा लाभ मतदारांना दिल्याचे न दिसून येत आहे. खासगी बसेस भरुन मुंबई-पुण्याचे भाविक दाखल होत असल्याचे गेल्या काही दिवसापासून दिसत आहे. सलग सुट्यांमुळे या काळात ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे.


आजचे सांस्कृतिक कार्यक्रम

स्वरांजली भजनी मंडळ: स. ९

वारणानगर भजनी मंडळ : स.११

महालक्ष्मी महिला मंडळ :दु. १

हिरकणी भक्तिगीत मंडळ: दु. ३

स्वरसुमिनीतर्फे गीतगायन: सायं. ५

मीनाक्षी दुसाने यांचे गायन :सायं. ७


व्ही. आय. पी दर्शन सुरु

नवरात्रोत्सव काळात मंदिरातील गर्दी लक्षात घेऊन न्यायालयाने व्हीआयपी दर्शनाला बंदी घातली आहे. मात्र, पोलिसांकडूनच या आदेशाची पायमल्ली होत आहे. शुक्रवारी द‌िवसभर मंदिरातून बाहेर पडण्याच्या मार्गातून व्हीआयपींना प्रवेश दिला जात होता. एक महिला अधिकारी हे काम चोखपणे बजावत होती. सर्वसामान्य भाविक चार ते पाच तास उभे राहून दर्शन घेत असताना या व्हीआयपी भाविकांसाठी मात्र, पोलिस यंत्रणा राबत असल्याचे द‌िसून आले. ही बाब लक्षात आणून दिल्यावर मात्र, काही काळासाठी श्रीपूजकांनाही पोलिसांनी अटकाव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमदाटी चालणार नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका कायद्यानुसार नगरसेवकांच्या नातेवाईकांना महापालिकेच्या कामकाजात, प्रशासकीय बैठकीत सहभागी होता येत नाही. मात्र गेल्या काही महिन्यात सदस्यांच्या नातेवाईकांचा हस्पक्षेप वाढल्याचे निदर्शनास आले आहे. नगरसेवक व त्यांच्या नातेवाईकांकडून अधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे. यअधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुणी अरेरावी, दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर तो चालणार नाही असा आक्रमक पवित्रा आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतला आहे.

त्याचवेळी प्रशासन व नगरसेवकांतील वादाचे प्रसंग टाळण्यासाठी प्रयत्नशील आहे. पाणी पुरवठा, कचरा उठाव, बगिचामधील सुविधा यावरून वादाचे प्रसंग घडतात. वादाची कारणे शोधून उपाय योजना करता येतील याकरिता पदाधिकारी, गटनेते, नगरसेवक व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या प्रत्येक कार्यालयात आणि अधिकाऱ्यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

सात अ​धिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाच्या प्रभाग समिती बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाई का करू नये, अशी नोटीस काढली आहे. इस्टेट अधिकारी प्रमोद बराले, उद्यान विभागाचे सहायक अधीक्षक गणेश खाडे, पवडी विभागाचे अकाउंटंट अशोक यादव, घरफाळा विभागाचे सहायक अधीक्षक तानाजी मोरे, विद्युत विभागाचे प्रमोद दळवी, पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता बी. जी. कुराडे हे अधिकारी गैरहजर होते. वर्कशॉप विभागाचे रावसाहेब चव्हाण बैठकीला उशिरा आले. या अधिकाऱ्यांना कारवाई का करू नये, अशा नोटीसा काढल्या आहेत.


मग खुर्चीवर कशाला बसायचे ?

माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यास सहायक आयुक्त सचिन खाडे यांच्यावर कसलाही दबाव टाकला नाही. गवंडी यांनी अधिकाऱ्यांना ​शिवीगाळ, दमदाटी केल्याचे पुरावे असल्याने फिर्याद दाखल झाली आहे. पुरावे असतानाही कारवाई करायचे नसेल तर खुर्चीवर कशाला बसायचे? बेकायदेशीर कामे करू शकत नाही. कामकाज करताना अधिकाऱ्यांना मर्यादा पडतात. मात्र प्रत्येकवेळी अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जात असेल तर कारवाई करण्यावाचून पर्याय नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवेदन पालकमंत्र्यांना देणार नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोपर्डीतील बलात्काराच्या घटनेचा निषेध म्हणून १५ ऑक्टोबरला आयोजित मराठा क्रांती मोर्चा शिस्तबद्ध व गंभीरतेने काढण्यासाठी सकल मराठा समाजाने शुक्रवारी आचारसंहिता जाहीर केली. सामान्य मराठा हाच मोर्चाचा केंद्रबिंदू राहणार असून मोर्चा निघेपर्यंत कोणत्याच नेत्याचे नाव प्रसिद्ध केले जाणार नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यादिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात बसून निवेदन स्वीकारणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाईल. तेथे कोणतीही चर्चा केली जाणार नसल्याचे समाजाच्यावतीने निक्षून सांगण्यात आले.

आठ दिवसांवर आलेल्या मोर्चात सहभागासाठी कोल्हापूरसह परिसरातील जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.या मोर्चाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मोर्चाच्या नियोजनाला काही गालबोट लागू नये, मोर्चा ताकदीने परंतु शिस्तबद्ध, गांभीर्याने निघावा यासाठी आग्रह धरण्यात आला. मराठा समाजाने जाहीर केलेली आचारसंहिता तातडीने कृतीत आणण्याचे आवाहनही समाजाने केले आहे.

राज्यभरात सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली मोर्चे निघाले आहेत. सामान्य मराठा माणूस हाच त्याचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे आजपासून मोर्चा निघेपर्यंत समाजातील कोणत्याच नेत्याचे नाव वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणार नाही. जे संघटन, नियोजन असेल ते सकल मराठा म्हणूनच केले जाईल. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात बसून स्वीकारणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र सरकारला मराठा समाजाच्या मागण्या माहीत आहेत. त्यामुळे मोर्चाच्यावतीने प्रातिनिधीक स्वरूपात जिल्हाधिकऱ्यांना निवेदन दिले जाईल. तेथे कोणतीही चर्चा केली जाणार नाही असे समाजाच्यावतीने सांगण्यात आले.

मोर्चाच्या नियोजनासाठी काही जण, राजकीय नेते स्वत:हून मदत निधी देत आहेत. निधी दिल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. या गोष्टी तातडीने बंद करण्यात आल्या आहेत. ज्यांना समाजाबद्दल बांधिलकी आहे, त्यांनी जरूर मदत करावी. त्याची रितसर पावती दिली जाईल. पण त्याची कुठेही बातमी दिली जाणार नाही. ज्यांनी मदत दिली, त्यांनीही अशी बातमी परस्पर देवू नये. संवेदनशील प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढण्यात येत आहे. त्यामुळे मोर्चाचे स्वरूप उत्सवी होईल, असा पेहराव कुणीच करू नये. मोर्चा मूक असल्याने घोषणा देण्याचा प्रश्नच येणार नाही. मोर्चात एकच भगवा झेंडा सर्वत्र असेल. अन्य कोणताही झेंडा असणार नाही.

मोर्चाच्या नियोजनासाठी सध्या गावोगावी फेऱ्या निघत आहेत. मोटारसायकलच्या पुंगळ्या काढून जल्लोषी स्वरुपात फेऱ्या निघत आहेत. त्या तातडीने बंद केल्या जाव्यात. फेरी जरूर काढावी, परंतु त्यातून लोकांना त्रास होऊ नये, याची दक्षता सर्वांनी घेतली जावी, असे सांगण्यात आले. मोर्चाच्या तयारीसाठी जे डिजिटल फलक व प्रचाराचे साहित्य वापरले जात आहे. त्यावर कोणत्याही राजकीय नेत्याचे फोटो दिसता कामा नयेत. स्वत:हून छापून अशा साहित्यावरचा प्रचार करता येणार नाही. फलकावर छत्रपती शिवाजी महाराजांसह आरक्षणाच्या धोरणाचे जनक म्हणून शाहू महाराज यांचेही छायाचित्र आवर्जून वापरले पाहिजे. सर्व फलकांवर फक्त सकल मराठा समाज एवढाच उल्लेख असेल. त्यामध्ये अन्य कोणत्याही संस्था व संघटनांचे नाव असू नये.

प्रक्षोभक घोषणा नकोत

वाहने पळवणे, अनावश्यक स्पर्धा करून अपघाताला निमंत्रण देणारे वर्तन अजिबात होता कामा नये. काही डिजीटल फलकांवर ‘एकदाच दाखविणार..कायमचे वाकविणार...’ अशा प्रक्षोभक भाषेत घोषणा काहींनी लिहिल्या आहेत. मोर्चा कोणत्याच समाजाविरुध्द नाही. त्यामुळे अन्य समाज दुखावेल अशा स्वरुपाच्या घोषणा फलकांवर लिहू नयेत असेही आवाहन समाजाने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समाधाने वळतो प्रसादाचे लाडू

0
0

Janhavi.Sarate@timesgroup.com

Tweet : @ MTjanhavisarate

कोल्हापूर : नवरात्रोत्सवात साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचा लाडू बनविण्याची लगबग सध्या कळंबा कारागृहात सुरू आहे. कारागृहातील महिला आणि पुरुष कैद्यांकडून हा प्रसाद गेले काही दिवस बनवून घेतला जात असून सध्या नवरात्रीमुळे या लाडूंना प्रचंड मागणी वाढली आहे. गजाआडच्या जगात देवीच्या सेवेचा प्रत्यक्ष आनंद घेता येत नसला तरी प्रसादाचे लाडू बनविण्याचे काम आत्म‌िक समाधान मिळत असल्याची भावना कैद्यांनी व्यक्त केली.

नवरात्रोत्सवाची धावपळ जशी सर्वत्र असते तशाच प्रकारची धांदल खऱ्या अर्थाने कळंबा कारागृहात सुरू झालेली दिसून येते. कारागृहातील बंदीजनांना चार महिन्यांपूर्वी श्री अंबाबाईच्या प्रसादाचा लाडू बनविण्याचे काम देण्यात आले. आता या कामाची जणू काही परीक्षाच सुरू असल्याचे चित्र आहे. ३० सप्टेंबरपासून आवश्यक साधनसामग्री आणून प्रसादाचे लाडू वळण्याचे कैद्यांचे काम सुरू केले. सध्या तीन विभागात हे काम सुरू आहे.

कळंबा कारागृहात आत प्रवेश केल्यावर बेकरी विभागाच्या परिसरात जाताच बाहेर हरभरा डाळ वाळत ठेवलेली दिसते. प्रसादासाठी खास चार महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या विभागात चार कैदी बुंदी पाडण्याचे काम करताना दिसतात. तर एक कैदी तळलेल्या बुंदीतील जादा झालेले तेल काढण्याचे काम करत होते. तर याच विभागात दुसऱ्या बाजूला पॅकिंगवर लाडूचे वजन, तारीख लिहून लाडू पाकिटात बंद करण्याचे काम सुरू आहे. तर एक कैदी पाकात कळ्या, काजू, बेदाणे, वेलची टाकून लाडूची लज्जत वाढविण्याचे काम करत होता.

दुसरीकडे महिला विभागात गेल्यावर तेथील बेडवर लाडू वाळवण्यासाठी ठेवलेले दिसले. पाच महिला कैद्यांची टीम यासाठीची वेगवेगळी कामे करीत आहे. प्रत्येकी पाच महिलांच्या दोन टीम लाडू वळण्याचे काम करीत होत्या, तर दुसरीकडे दोन टीम वळलेल्या लाडूचे वजन करून, सर्व लाडू ५० ग्रॅम प्रमाणे ट्रेमध्ये ठेवण्याचे काम करत होत्या. लाडू वाळल्यानंतर रात्री त्याचे पॅकिंग करण्यात येते. कारागृहात नवरात्रोत्सवात एकूण १०० महिला व पुरुष कैद्यांची टीम करून दररोज २० ते २५ हजार लाडू बनविण्याचे काम अहोरात्र करत आहेत. नवरात्रोत्सवात अनेक महिला आणि पुरुष कैद्यांनी उपवासही केला आहे. देवीचा प्रसाद तयार करण्यासाठी अहोरात्र काम करूनही त्यांचा उत्साह मात्र कायम असल्याची माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.

‘चार महिन्यांपूर्वी कारागृहातील महिलांना श्री अंबाबाईच्या प्रसादाचा लाडू बनविण्याचे काम देताना सामाजातून विरोध झाला. त्यामुळे सर्वानांच वाईट वाटलं, पण समाजाबरोबर देवीच्या दारी आलेल्या भाविकांनाही हा लाडू स्वीकारल्यामुळे खूप आनंद होत आहे. तिथं जाऊन प्रत्यक्ष देवीची सेवा करता येत नसली, तरी देवीचा प्रसाद करण्यात खूप आनंद व समाधान मिळते’ असे महिला कैदी शिल्पा इंगळे सांगतात.

तर संगीता कमते म्हणतात, ‘नवरात्रोत्सव काळातील बाहेरचं वातावरण आम्हाला पाहता येत नाही. पण जो आनंद देवीचे दर्शन घेतल्यानंतर मिळतो, तोच आनंद हा लाडूचा प्रसाद तयार करताना मिळत आहे. आयुष्यातील आत्मिक समाधान देऊन जाणारे हे काम आहे. हे काम असंच कायमस्वरुपी मिळावे.’

...............

नवरात्रोत्सवाच्या काळात श्री अंबाबाई मंदिरातून दोन लाख लाडू बनविण्याची ऑर्डर आहे. आतापर्यंत त्यापैकी एक लाख लाडूची विक्री झाली आहे. नवरात्रोत्सव काळात दररोज २० ते २५ हजार लाडू बनविण्यासाठी दोन शिफ्टमध्ये काम सुरु असून कैद्यांमध्येही उत्साह आहे.

- शरद शेळके, अधीक्षक, कळंबा कारागृह

........................

असे सुरु आहे काम

- दोन शिफ्टमध्ये दिवस-रात्र लाडू वळण्याचे काम

- नवरात्रोत्सवासाठी जादा लाडूचे काम ३० ऑक्टोबरपासून

-नवरात्रोत्सवात १०० कैदी करत आहेत काम

-तीन विभागात सुरू आहे काम

- लाडूचीही प्रयोगशाळेत तपासणी

- दररोज २० ते २५ हजार लाडू तयार

- सकाळी लाडू बनविण्याचे काम तर रात्री पॅकिंगचे काम

प्रसादाच्या लाडू विभागासाठी झाले प्रयत्न

कळंबा कारागृहातील कैद्यांना लाडूचे काम देण्यास सुरुवातीला विरोध झाला. मात्र जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती सचिव विजय पोवार, सदस्य संगीता खाडे यांच्या प्रयत्नामुळे कारागृहात प्रत्यक्षात लाडू बनविण्याचे काम सुरु झाले. गेल्या चार महिन्यांपासून हा विभाग चांगल्या पद्धतीने सुरु राहण्यासाठी उपमहानिरीक्षक स्वाती साठे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी सी. एस. आवळे, कारखाना व्यवस्थापक पी. पी. परदेशी, ए. जे. गायकवाड, एस. पी. आघाव, एस. बी. देवळेकर, एस. व्ही.यादव, एम. के.आमानावर, ए. डी. निगडे, बी. एस. पोटे, एस. बी. पाटील व कैद्यांनी प्रयत्न केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीताफळांने वाढली गोडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवरात्रोत्सवाच्या कालावधीत फळांची मागणी वाढलेली असते. त्यामध्येच सीताफळांची आवक सुरू झाली असली तरी त्याचे भाव मात्र चढेच आहेत. भाजीपाल्याची आवक थोडी कमी झाल्याने दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळी सण तोंडावर असल्याने हरभरा डाळीचा दर वाढण्याची शक्यता आहे. दसऱ्यामुळे खारीक, खजूर, सुक्या खोबऱ्यांना प्रचंड मागणी आहे.

फळांच्या मार्केटमध्ये सीताफळाची आवक दिसू लागली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत केवळ सफरचंद दिसणाऱ्या हातगाड्यांवरही सीताफळाचे ढीग दिसत आहेत. सध्या १४० रुपये किलो असा दर आहे. पुढील आठवड्यात आवक वाढल्यास हा दर कमी होण्याची शक्यता आहे. पितृपंधरवड्यापासून भाजीपाला मार्केट शांतच होते. अगदी गेल्या आठवड्यापर्यंत आवक मोठी व मागणी कमी असल्याने दर कमीच होते. या आठवड्यात मात्र भाजीचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. वांगी, भेंडी, कारली, ढबू, वरणा यांचे दर ४० ते ६० रुपये किलोपर्यंतच्या दरम्यान आहेत. गवारीचा दर मात्र वधारलेलाच आहे. गवार ८० रुपये किलो आहे. गेल्या महिनाभरापासून दहा रुपयाच्या आत असलेल्या टोमॅटोचा दर थोडा वाढला आहे. चांगल्या प्रतीच्या टोमॅटोचा दर १५ रुपये किलो झाला आहे.

तूरडाळ व हरभरा डाळीचा दर १३० रुपयांवर आहे. दिवाळी तोंडावर असल्याने हरभरा डाळीच्या दरात आणखी थोडी वाढ होण्याची शक्यता व्यापारी विनोद हडदरे यांनी व्यक्त केली. नवरात्रोत्सवामुळे खजूर, खारीक, वरीबरोबरच फळांची मागणी वाढली आहे. मैदा, आट्याची मागणी वाढली आहे. फुलांचे दरही चढेच असून या आठवड्यात येत असलेल्या खंडेनवमी व दसऱ्यामुळे झेंडूचा पाव किलोचा दर ४० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. निशिगंध फुलांचा दर १५० रुपयांपर्यंत पोहचला आहे. तेलांच्या दरात मात्र स्थिरता आहे.

भाज्यांचे दर (किलो)

वांगी : ६० रु.

टोमॅटो : १५ रु.

कारली : ४० रु.

ढबू मिरची : ४० रु.

कोबी : २० प्रतिनग

फ्लॉवर : ३० रु.

गवार : ८० रु.

मेथी : १० रु. पेंडी

कोथिंबीर : १० रु. पेंडी

ओली मिरची : ३० रु. कि.

कांदा : १५ रु.

बटाटा : २० रु.

लसूण : १२० रु.

वरणा : ६० रु.

आले : ४० रु.

....

खाद्यतेल

सरकी : ८० रु.

सूर्यफूल : ९० रु.

शेंगतेल : १४० रु.

फळांचे दर (किलो)

डाळिंब : १०० रु.

सफरचंद : ९० रु.

विदेशी सफरचंद : १८० रु.

सीताफळ : १४० रु.

केळी : ३० रुपये डझन

...

फुलांचे दर (किलो)

निशिगंध : १५० रु.

झेंडू : ११० रु.

गलाटा : ११० रु.

डाळींचे दर (किलो)

तूरडाळ : १३० रु.

मूगडाळ : ९० रु.

उडीद डाळ : १४० रु.

हरभरा डाळ : १४० रु.

मूग ८० रु.

मसूर डाळ ८० रु.

किराणा दर (किलो)

पोहे : ४० रु.

साखर : ३८ रु.

मैदा : २८ रु.

रवा : ३० रु.

शाबू : ६० रु.

आटा : २८ रु.

वरी : ८० रु.

खारीक : ३५० रु.

खजूर : ८० ते २४० रु.

राजगिरा लाडू : २० रु. पॅकेट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोलीत गोडावूनला आग

0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

शिरोली (ता. हातकणंगले) येथील कोल्हापूर-सांगली महामार्गावरील सोनल ट्रेडिंग कंपनीच्या गोडाऊनला शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत अंदाजे सव्वा कोटीचे नुकसान झाले. या भीषण आगीमध्ये कंपनीमधील सौंदर्य प्रसाधने, खाद्य पदार्थासह अनेक वस्तू भस्मसात झाल्या.

कोल्हापूर- सांगली महामार्गावर नवीनच बांधण्यात आलेल्या सोनल ट्रेडिंग कंपनी गोडाऊनला आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या आग लागली. या आगीमध्ये सोनल ट्रेडिंग कंपनीच्या गोडाऊनमधील सुमारे एक कोटीचा माल आगीत जळून खाक झाला. तर ही आग पसरत जाऊन शेजारी असणाऱ्या श्री पार्श्व लॅमिटेट्स प्लायवूड या गोडाऊनमधील साहित्यांना लागली. त्यात अंदाजे २५ लाख रुपयांचे प्लायवूड जळून नुकसान झाले.

सोनल ट्रेडिंग कंपनीचे गोडाऊन हे प्लायवूड गोडाऊनच्या मागील बाजूस आहे. या गोडाऊन मध्ये सौंदर्य प्रसाधने व खाद्य पदार्थ यांचा दसरा, दिवाळी निमित्त मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आला होता. आगीमुळे खाद्य पदार्थावरील प्लास्टिकमुळे उशिरापर्यंत आग धूमसत राहिली. सौंदर्य प्रसाधनांमध्ये बॉडीस्प्रेमधील रासायनिक वायूमुळे आग आटोक्यात येत नव्हती. या आगीत स्प्रेच्या बाटल्या जोरजोरात फुटत होत्या. त्यामुळे फुटून बाटलीतील रासायनिक पदार्थ आगीत मिसळून आग वाढतच चालली होती. पुढील त्यामुळे बाजूस असणाऱ्या प्लायवूड गोडाऊनलाही बघता बघता आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी कोल्हापूर महापालिकेचा अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

ही आग विझवताना कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशामक बंबाचे पाणी संपले तरी आग आटोक्यात येत नसल्याने दुसरा बंब बोलावण्यात आला पण हा बंब येण्यास अर्धा तास उशीरा झाला. त्यामुळे दोन्ही गोडाऊनमधील आगीने गोंधळ उडाला. प्रचंड प्रमाणात आग पसरल्याने विझवण्यासाठी तीन अग्निशामक बंबाचा वापर करून ही आग आटोक्यात येत नसल्याने तसेच अग्निबंबातील पाणी संपताच शेजारील बाबासो तिरपणे याच्या विहिरीतील पाणी अग्नी बंबात सोडून बंबाच्या सहाय्याने पाण्याला प्रेशर देऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीपासून एक महिना राज्यातील सूतगिरण्या बंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

राज्यातील सहकारी क्षेत्रातील सूत गिरण्या दिवाळीपासून एक महिना बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला. तमदलगे (ता. शिरोळ) येथील शिरोळ तालुका मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीच्या कार्यस्थळी चार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी होते.

कापसाचे भडकलेले भाव, वाढते वीज दर आणि सूत दरातील चढउतार यामुळे सूत गिरण्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यातील सहकारी सूत गिरण्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातील सहकारी सूत गिरण्यांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र सरकारने तीन रुपये प्रतियुनिट दराने वीज दराची सवलत आणि प्रतिचात्यामागे तीन हजार रुपये कर्ज अनुदान देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र त्याला विलंब होत आहे परिणामी सूत गिरण्या दिवसेंदिवस नुकसानीत चालविणे अत्यंत अडचणीचे झाले आहे. यावर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली त्यानंतर सूतगिरणी बंदचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष स्वामी यांनी दिली.

सूतगिरणी चालकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सद्यस्थितीत चालू किंवा अंशत: चालू असलेल्या राज्यातील ६३ सूत गिरण्यांचे उत्पादन पूर्णत: बंद राहणार आहे. परिणामी साठ हजार कामगार बेकार होणार आहेत. तसेच सूताची टंचाई निर्माण होऊन लाखो यंत्रमाग बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

बैठकीस पृथ्वीराज देशमुख, अशोक चराटी, अनिल कांबळे, अशोकराव माने यांचेसह चार जिल्ह्यातील सूतगिरणीचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक उपस्थित होते.

दरम्यान, सूत गिरणी व्यवस्थापनाने यापूर्वी याप्रश्नी सरकारशी चर्चा करूनही निर्णय होत नसल्याने नाविलाजास्तव बेमुदत बंद ठेवणे भाग पडत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा मोर्चा मार्गावर शि‌क्कामोर्तब

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरात १५ ऑक्टोबरला आयोजित केलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या ठिकाणाची शनिवारी निश्चिती करण्यात आली. गांधी मैदान आणि ताराराणी चौक अशा दोन ठिकाणावरून या मूक मोर्चाचा प्रारंभ होणार आहे. दसरा चौकात मोर्चाचा समारोप होईल. पोलिस प्रशासन आणि मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत मोर्चा मार्गावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मोर्चात १० ते १५ लाखापेक्षा जास्त नागरिक सहभागी होण्याची शक्यता पोलिस प्रशासनाने यावेळी वर्तवली. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.

मोर्चाची सुरूवात गांधी मैदान येथून सुरू होणार असल्याची घोषणा यापूर्वी संयोजकांनी केली होती. मात्र, मोर्चात १५ लाख लोक सहभागी होणार असल्याचे संयोजकांनी जाहीर केल्याने गांधी मैदानाऐवजी तपोवन‌किंवा शेंडा पार्क येथून मोर्चाचा प्रारंभ करण्याबाबत चर्चा सुरू होती. पोलिस प्रशासनाने मोर्चात सहभागी होणाऱ्यांची संख्या, महिला, मुले आणि वृद्धाची उपस्थिती, पार्किंग व्यवस्था याचा विचार करून ताराराणी चौकात मोर्चाची सांगता व्हावी, यादृष्टीने नियोजन केले होते. तर मोर्चाची सुरूवात गांधी मैदानातून करुन दसरा चौकात समारोप करण्यात यावा, याबाबत संयोजकांचा आग्रह होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी पोलिस मुख्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संयुक्त बैठक झाली.

विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील व पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी मोर्चाची सांगता ताराराणी चौकात करण्याबाबतचे विवेचन केले. पण, मोर्चाच्या संयोजकांनी गांधी मैदानातून महात्मा गांधी यांना अभिवादन करून मोर्चाची सुरूवात करावी, तसेच आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या दसरा चौकातील पुतळ्याजवळ मोर्चाची सांगता करावी, असा आग्रह धरला. पूर्व भागातून कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या मोर्चाची सुरूवात ताराराणी चौकातून करावी व सांगता दसरा चौकात करावी यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

पाचशे मीटर परिसर महिलांसाठी

मोर्चाच्या सुरुवातीला फक्त महिला व युवतींना प्रवेश देण्याचे ठरले. दसरा चौकाच्या चारही बाजूला असलेल्या रस्त्यांवर सुरुवातीचा ५०० मीटरचा परिसर फक्त महिलांसाठी ठेवण्यावरही एकमत झाले. मोर्चाचे सूक्ष्म नियोजन पोलिस प्रशासन जाहीर करणार आहे. पोलिसांनी पार्किंगची ठिकाणेही निश्चित केली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाईच्या दर्शनाला अलोट गर्दी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शारदीय नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी, रविवार हा सुटीचा दिवस असल्याने श्री अंबाबाईच्या दर्शनाला अलोट गर्दी झाली. पहाटे साडेचार वाजल्यापासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या. आंध्रप्रदेश-कर्नाटकातील भाविकांसह मुंबई, पुण्याच्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. परिसरातील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली.

रविवारची सुटी असल्याने नोकरदारांनी योग साधत दर्शनाचा लाभ घेतला. शहरातील अनेक हॉटेल्स, यात्री निवास हाउसफुल्ल झाल्याचे दिसून आले. दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याने शहरातील महत्त्वाचे मार्गही बंद झाल्याची स्थिती होती. तर पार्किंग तळांवर वाहने लावण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. रेल्वे, खासगी बसने येणाऱ्या भाविक पर्यटकांनी हॉटेल्समार्फत काही खासगी गाड्यांचे बुकिंग केले. रविवारी दुपारी १२ वाजता महिला भाविकांची रांग भवानी मंडपापर्यंत पोहोचली. पुरुष भाविकांची रांग भाऊसिंगजी रोडवर गेली होती. दिवसभरात अंदाजे साडेतीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. नऊ दिवसातील ही सर्वाधिक गर्दी होती.

अष्टमीनिमित्त आज अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपात पूजा बांधली. भवानी मंडपातील छत्रपती संस्थानच्या मंदिरात तुळजाभवानीची विड्याच्या पानातील पूजा बांधली होती. बाळकृष्ण दादर्णे, अमर जुगर, सारंग दादर्णे, आदिनाथ चिखलगर, चंद्रकांत जाधव, विजय बनकर यांनी ही पूजा बांधली.

शहरात वाहतुकीची कोंडी

सलग सुटीमुळे रविवारी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला होता. आज बहुतांश रस्त्यांवर वाहनांची कोंडी झाली. पोलिस ठिकठिकाणी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते. शनिवारी जोतिबाचा जागर झाल्याने श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयघोषात अंबाबाईची नगरप्रदक्षिणा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘अंबा माता की जय...’ चा जयघोष... फुलांच्या पायघड्या व रांगोळ्यांनी सजलेला मार्ग, विद्युत रोषणाईने उजळून गेलेला परिसर, भालदार चोपदारांचा लवाजमा, फुलांनी सजलेली पालखीत आरुढ अंबाबाईच्या उत्सवमूर्तीवर भाविकांकडून केला जाणारा फुलांचा वर्षाव अशा मंगलमय वातावरणात रविवारी रात्री अंबाबाईची नगरप्रदक्षिणा झाली. यावेळी दर्शन घेण्यासाठी प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची अलोट गर्दी झाली होती.

नवरात्रोत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे जागरादिवशी नगरप्रदक्षिणा होते. त्यासाठी फुलांनी सजवलेल्या पालखीत श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती ठेवण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून गुजरीत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दुपारनंतर तर महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडप, मिरजकर तिकटीचा परिसर वाहतुकीसाठी बंदच झाला. या मार्गावर महाद्वार परिसरातील फुल विक्रेत्यांकडून विविध फुलांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. अनेक हौशी कलाकारांबरोबरच भाविकांनी या मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. साडेनऊनंतर उद्योगपती राजू जाधव याच्या हस्ते पालखीचे पूजन झाले.

तोफेच्या सलामीनंतर महाद्वारातून पालखी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. मार्गावर दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच ठिकठिकाणी एलईडीची रंगीबेरंगी रोषणाई तसेच प्रखर प्रकाशझोताने मार्ग उजळून निघाला होता. अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी मार्गावर दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. त्यामध्ये महिलांची संख्या प्रचंड होती. पालखी महाद्वार रोडवरुन गुजरी, भाऊसिंगजी रोडमार्गे भवानी मंडपात आला. यावेळी मार्गावर विविध संस्था तसेच भाविकांच्यावतीने ठिकठिकाणी प्रसादाचे आयोजन केले होते. न्यू गुजरी मित्र मंडळाने अंबाबाईची भव्य प्रतिकृती साकारली होती. भवानी मंडपातून नंतर मिरजकर तिकटीमार्गे बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोडवरून महाद्वार चौकात पालखी आली. रात्री उशिरापर्यंत मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहायक आयुक्तांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माजी नगरसेवक प्रकाश गवंडी आणि महापालिकेचे सहायक आयुक्त प्रकाश गवंडी यांच्या वादानंतर पोलिसांनी तातडीने गवंडी यांना अटक केली, मात्र नगरसेविका माधवी गवंडी यांच्या फिर्यादीनंतर खाडे यांना अटकेबाबत पोलिसांनी तत्परता दाखवली नसल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे. याबाबत रविवारी संध्याकाळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन खाडे यांना अटकेची मागणी केली. कारवाईस टाळाटाळ झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे.

माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांना अटक करण्यात पोलिसांनी जी तत्परता दाखवली, तशीच तत्परता खाडे यांच्या बाबतीतही दाखवावी, अशी मागणी गुन्हा दाखल झालेल्या दिवशी सर्व पक्षीय नगरसेवकांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्याकडे केली होती. मात्र अजूनही खाडे यांच्यावर कारवाई झाली नसल्याने रविवारी संध्याकाळी आजी-माजी नगरसेवकांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत उपस्थित नसल्याने त्यांनी तपास अधिकारी सुशांत चव्हाण यांची भेट घेऊन खाडेंच्या अटकेची मागणी केली. या बाबत खाडे यांच्याशी संपर्क साधला असून, ते कार्यालयीन कामासाठी बाहेर असल्याने उद्या चौकशी साठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती चव्हाण यांनी नगरसेवकांना दिली. खाडे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महिला नगरसेविकांनी दिला. यावेळी उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव, शारंगधर देशमुख, राजू लाटकर, सचिन खेडेकर यांच्यासह सर्व पक्षाचे नगरसेवक उपस्थिती होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरधाव ट्रकच्या धडकेतमहिला जागीच ठार

0
0

म.टा.वृत्तसेवा,इचलकरंजी -

भरधाव ट्रकने मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली. आयेशा गुलाब फकीर (वय ३०, रा. सह्याद्रीनगर, कुपवाड रोड सांगली) असे महिलेचे नाव असून पती गुलाब फकीर (वय ३५) हे जखमी झाले आहेत. इचलकरंजी-सांगली रस्त्यावरील काळ्या ओढ्यानजीक दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेची नोंद गावभाग पोलिसात झाली आहे. दरम्यान, ट्रकसह पलायन करणाऱ्या मद्यधुंद चालकास नागरिकांनी पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

सांगली येथील गुलाब फकीर हे पत्नी आयेशा यांच्यासोबत मोटारसायकलवरून येथील नातेवाईकांकडे आले होते. सांगली रस्त्यावरील काळ्या ओढ्यानजीक पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेने पाठीमागे बसलेल्या आयेशा या उडून रस्त्यावर पडल्या आणि ट्रकची चाके डोक्यावरुन गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर गुलाब हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघतानंतर ट्रकचालक विकास जाधव याने न थांबता ट्रक तसाच पुढे नेत घटनास्थळावरुन पलायन केले. परंतु नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करत नदीवेस नाका येथे ट्रक अडविला. संतप्त नागरीकांनी जाधव याला बेदम चोप दिला. त्यावेळी तो मद्यधुंद असल्याचे निदर्शनास आले. चोप देत नागरिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी गुलाब यांना उपचारासाठी पालिकेच्या आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन ट्रकचालक जाधव याला ट्रकसह ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा सावधपणे आतषबाजी

0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

कवठेएकंद (ता. तासगाव) येथे दसऱ्या दिवशी होणाऱ्या शोभेच्या दारुच्या आतषबाजीला काही गंभीर घटनांमुळे काहीसा ब्रेक लागला आहे. मे महिन्यातील स्फोटाने तब्बल तेरा जणांचा बळी घेऊन जबरदस्त हादरा दिल्यानंतर यंदा ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करीत आतषबाजीची परंपरा जोपासण्याचा निर्णय घेतला आहे. जोखमीच्या फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी मर्यादीत जागा निश्चित करण्यात आली असून, त्याच्याबाहेर कोणाला जाता येणार नाही. ही सवलत केवळ दसऱ्या दिवशीच असून इतर कोणत्याही दिवशी स्फोटके हाताळण्यावर कडक निर्बंध घातले आहेत.

कवठेएकंदमध्ये दसऱ्या दिवशी रात्रभर आसमत उजळून टाकणाऱ्या आतषबाजीची सर्वदूर प्रसिद्धी आहे. लाकडी शिंगाटे उडविण्याचा प्रकार तर एकदम धाडसाचाच असतो. ग्रामदैवत बिऱ्हाडसिद्ध देवस्थानला नवस म्हणून फटाक्यांची आतषबाजी करण्याची दीर्घकालीन परंपरा आहे. मात्र, अलिकडे परंपरेच्या आडून गावातील अनेकांना फटाक्यांचे उत्पादन सुरू केले होते. परंतु स्फोटकांची हाताळणे आणि सांभाळणे याचे ज्ञान नसल्याने अनेकवेळा स्फोट होऊ लागले. कोणी दसऱ्या दिवशी गंभीर भाजू लागले. पत्री बाणाने आगीचे प्रकार घडू लागले. स्फोटात घरेच्या घरे उध्वस्त होऊन जीवितहानीला सामोरे जावे लागत होते. तरीही देवाचा कोप झाला असेल असे समजून मानवनिर्मित दुर्घटनांकडे डोळेझाक होत होती. परंतु, एका वर्षापूर्वी फटाक्याच्या कारखान्यातील स्फोटाने संपूर्ण गावाला जबरदस्त हादरा दिला. स्फोटात तेरा जणांच्या देहाच्या चिंधड्या झाल्या. या घटनेने गावकऱ्यांसह अनेकांना गंभीरतेची आणि प्रशासनाला आपल्या जबाबदारीची जाणीव करुन दिली. तेव्हांपासून आतषबाजीच्या बाबतीत कडक नियमावली करण्यात आली आहे. त्याला ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

अशी होईल आतषबाजी

सध्या गावात कोणाकडेही शोभेच्या दारुच्या वस्तू उत्पादनाचा दीर्घ काळाचा परवाना नाही. केवळ सण म्हणून तात्पुरत्या स्वरुपाचा परवाना देण्यात आला आहे. तो एकाच दिवशीच्या आतषबाजीपुरता ग्राह्य मानला जाणार आहे. मंदिर परिसरात दोन भाग करण्यात आले असून, त्यामध्ये एकाबाजूला लाकडी शिंगाटे आणि दुसऱ्या बाजूला मोठा आवाज करुन हवेत उडणारे औट उडविण्यात येणार आहेत. असे फटाके गावात कुठेही उडविले जाणार नाहीत. कमी क्षमतेचे आणि रंगीबेरंगी आतषबाजीचा आनंद देणारे फटाकेच गावात वाजविण्यात येणार आहेत. कवठेएकंदमध्ये सध्या दसऱ्याची जोरदार तयारी सुरु असून गावामध्ये आकाशतारा मंडळाने स्वागतासाठी छत्रपती शिवरायांची मोठी आकर्षक कमान तयार केली आहे. आतषबाजीचा सोहळा सुखकर करण्यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून आखणी करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक दारू शोभा मंडळाना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. जबाबदार व कुशल मंडळीनीच दारुकाम करावे. धोकादायक व शीघ्र ज्वालाग्राही पदार्थ टाळावेत. राहते घर, लहान मुले यापासून दूरच दारूकाम बनवले जावे. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

उत्सव, परंपरेला विरोध नाही

कवठेएकंदमधील विजयादशमीच्या दिवशीची शोभेच्या दारुच्या आतषबाजीच्या उत्सवाला प्रशासासनाचा विरोध नाही. मात्र, स्फोटक पदार्थ हाताळताना योग्य ती खबरदारी प्रत्येकांनी घेतली पाहिजे. आतषबाजीचा इतरांना कोणाला त्रास होणार नाही, हे ही पाहिले पाहिजे, असा प्रशासनाचा आग्रह असल्याचे तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले यांनी सांगितले, पोलिस उपाअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनीही कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणासाठी आयोग नेमा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यघटनेच्या कलम १६ (४) प्रमाणे स्वतंत्र आयोग नेमून मराठा समाजाचा सखोल अभ्यास करून शैक्षणिक मागासलेपण मांडू शकतो. यापुर्वी नेमलेल्या आयोगाने अशी मांडणी करून ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करावा, अशी शिफारस केली होती. मात्र त्याला विरोध झाला. राणे समितीने दिलेला अहवाल परिपूर्ण नसल्याने घटनेच्या कलम १६ (४) प्रमाणे राज्य सरकारला शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण मिळू शकते. आरक्षण देण्यासाठी भाजप व काँग्रेस पक्षामध्ये राजकीय इच्छाशक्ती नसल्याने मराठा समाजातील युवकांनी प्रस्थापित पक्ष व नेतृत्व झुगारुन नवीन पक्ष काढावा, नवीन पक्षाच्या माध्यमातून इतर जातींना आपल्या पंखाखाली घेवून राज्यात नव्हे तर, दिल्लीवरही राज्य करू शकता असे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी पत्रकार बैठकीत मांडले.

न्यायमूर्ती कोळसे-पाटील म्हणाले, ‘संपूर्ण भारतात एका राज्यात मराठ्यांइतकी मोठी संख्या असणारी दुसरी जात नाही. पर्यायाने मराठा, हीच सत्ताधारी जात होऊ शकते. आपली जात सर्वसमावेशक असून, तिच्याकडे असणारे नेतृत्व गुण इतर कोणत्याही जातीत नाहीत. सर्व मराठा संघटित झाले तर जातीतील गरीब, विनासायास आपल्या बरोबर येतील. इतर कोणतीही जात आपल्या जातीच्या तुलनेत अल्पसंख्याक असल्याने, ती संघटित झाली, तरी सत्ताधारी होऊ शकत नाही. आपल्या जातीची संख्या हीच आपली खरी ताकद आहे. तन-मन-धनाने सत्याच्या नीतीच्या आधारे एकत्र आल्यास आपण महाराष्ट्रात शंभर टक्के सत्तेवर राहून दिल्ली देखील ताब्यात घेऊ शकतो. आपल्या जातीचा अजेंडा ठरवताना, इतर सर्व जातीधर्मातील लहान भांवडांना न दुखावता आपल्या पंखाखाली घ्यावेच लागेल. असे केले तरच तुम्ही ‘मराठा सकल मोर्चा’चे राजकीय पक्षात रुपांतर करून सत्तेवर येऊ शकता. हीच या देशाची क्रांतीची नांदी ठरु शकते.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्याय महाग होत चाललायमुंबई हायकोर्टाचे न्या. मोरे यांचे मत

0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

‘न्यायपालिकेवरील विश्वास उडाला तर अराजकता माजेल. त्यामुळे विश्वास टिकवणे ही न्यायव्यवस्थेची जबाबदारी आहे. सामान्य जनतेला कमी खर्चात दर्जात्मक न्याय दिला पाहिजे. परंतु अलिकडे न्याय महाग होत चालला आहे. त्यामुळे अन्याय झालेल्यांपैकी सुमारे ९५ टक्के सामान्य जनता न्यायालयापर्यंत पोहचतच नाही. एकेकाळी डॉक्टर आणि वकिलीकडे नोबेल प्रोफेशन म्हणून पाहिले जात होते. आता मात्र, आपण त्याला बिझनेस म्हणणार नाही, परंतु ती सर्व्हिस इंडस्ट्री झाली आहे,’ असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजित मोरे यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केले.

सांगलीत रविवारी डेक्कन मॅन्युफॅक्चरिंगच्या हॉलमध्ये अ‍ॅड. जे. जी. पाटील मेमोरियल फाउंडेशनतर्फे उद्यान पंडीत गणपतराव पाटील (शिरोळ) यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोरे यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील होते. यावेळी फाउंडेशनच्या जे. जी. दीपस्तंभ या स्मृतीग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले. सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पाटील, सचिव एच. वाय. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. दिलीप पटवर्धन यांची मुंबईतील जीवन विद्यामिशन संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

न्यायाधीश मोरे म्हणाले, ‘कायद्याच्या भाषेनुसार अ‍ॅड. जे. जी. पाटील यांच्या वीस वर्षांच्या कारर्किदीचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. आपल्या यशातला मोठा वाटा त्यांचाच आहे. उमेदीच्या काळात सांगलीने आपल्याला खूप मदत केली आहे. त्याचे मध्यस्थ जे. जी. हेच होते. आज कालच्या वातावरणात अशी निस्वार्थी माणसे मिळणे कठीण झाले आहे. आजचे समाजभूषण पुरस्काराचे मानकरी गणपतराव पाटील यांनी शेतीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केलेले प्रयोग हे एक उल्लेखनीय कार्य आहे. मातीविना शेती, शेती क्षेत्र कमी होत असताना एका हेक्टरमध्ये ऊसासह अन्य पिकांचे उच्चांकी उत्पादन त्यांनी घेऊन दाखवून एक धडा घालून दिला. त्यामुळे या पुरास्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केली आहे.’

यावेळी बोलताना न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी जे. जी. पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देताना त्यांच्या खादी प्रेमाचे कौतुक केले. प्रत्येकांनी किमान आपला रुमाल तरी खादीचा वापरावा, असे आवाहन त्यांनी केले. जे. जींच्या स्मृतीनिमित्त उत्कृष्ठ वकिलांनाही पुरस्कार देऊन प्रोत्साहन द्यावे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images