Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

भक्तीरसाला पावसाच्या सरींची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वरुणराजाच्या हलक्या सरी झेलत देखावे पाहण्यांसाठी अबालवृद्धांनी बुध‍वारी अखेरच्या दिवशी मोठी गर्दी केली होती. गुरुवारी होणाऱ्या विसर्जनाच्या पूर्वसंध्येला भाविकांनी भव्य आणि वैविध्यपूर्ण मूर्ती, आकर्षक विद्युत रोषणाई, तांत्रिक देखावे पाहण्यासाठी गर्दी केली. शिवाजी पेठ, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी, कसबा बावडा, जुना बुध‍वार पेठ येथील रस्ते गर्दीने खचाखच भरले होते. 'गणपती बाप्पा मोरया...'च्या अखंड गजर करत उत्साही युवक गटागटाने देखाव्यांचा आनंद घेत होते.

मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाल्याने भाविकांनी सायंकाळी सातपासूनच देखावे पाहण्याला सुरुवात केली. शहरातील प्रमुख मंडळांच्या मूर्ती दर्शनानंतर देखाव्यांसाठी प्रसिद्ध ठिकाणांकडे भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. बहुतांशी मंडळांनी गर्दी खेचण्यासाठी अनोख्या संकल्पना राबवल्या. अनेकांनी ज्वलंत प्रश्नांवर भर देत देखावे सादर केले होते. ऐतिहासिक व्यक्तीरेखा, स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या विनोदी नाटकांमुळे गर्दी एकाचठिकाणी थांबत होती. या गर्दीला अटकाव करण्यासाठी कार्यकर्ते भाविकांना मार्गदर्शन करताना दिसत होते. तरीही वाहतुकीची कोंडी होत होती.

राजारामपुरीतील शिवाजी तरुण मंडळाने तयार केलेला आकर्षक गणेश महाल पाहण्यासाठी चांगली गर्दी झाली होती. परिसरातील राजारामपुरी स्पोटर्सचे शिवमंदिर, जयशिवराय फ्रेंड्स सर्कलचा आकर्षक गाभारा, तर हिंदवी स्वराज्य तरुण मंडळाचा 'राजे तुम्ही फक्त लढ म्हणा' सजीव देखावा युवकांमध्ये स्फुल्लींग फुलवीत होता. तर इंद्रप्रस्थ तरुण मंडळाचा ड्रॅगन व उद्यमनगरातील मदनलाल धिंग्रा तरुण मंडळाचा पोकेमॅन बालचमूच्या उत्साहामध्ये अधिक भर टाकत होता.

मंगळवार पेठ, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, जुना बुध‍वार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, कसबा बावडा भाविकांनी चांगली गर्दी केली. जिल्ह्यातील भाविकांचीही गर्दी दिसत होती. ग्रामीण भागातील भाविक चारचाकी वाहनांतून आले होते. या वाहनधारकांचा बराच वेळ पार्किंगची जागा शोधण्यामध्ये जात होता. पावसाने ऐनवेळी हजेरी लावल्याने भाविक छत्री, रेनकोटसह देखावा पाहण्यात गुंग होते. मात्र भाविकांची गर्दी लक्षात घेवून आगाऊ तयारी केलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलधारकांना पावसाचा चांगलाच फटका बसला.

प्रसादामुळे भाविक तृप्त

गेल्या काही दिवसांपासून देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन केले जात आहे. मोठ्या मंडळाबरोबर ठिकठिकाणच्या छोट्या मंडळांनीही प्रसादाचे आयोजन केले होते. पुलाव, मसाले भात, गव्हाची खीर, बुंदी, मसाले दूध, मोदक, केळी वाटपामुळे भाविक तृप्त होऊन जात होते. प्रसादाबरोबरच भाविकांनी खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर प्रचंड गर्दी केली होती.

दरवर्षी गणेशोत्सवामध्ये राजारामपुरी, शिवाजी पेठ, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, मंगळवार पेठेतील देखावे भाविकांना आकर्षित करत असतात. गेल्या काही वर्षामध्ये ही गर्दी ऐतिहासिक देखाव्यांमुळे कसबा बावड्याकडे आकर्षित होऊ लागली आहे. यावर्षी जुना बुधवार पेठ, शनिवार पेठ व शुक्रवार पेठेतील मंडळांनी भाविकांचे लक्ष वेधण्यात यश मिळवले. तांत्रिक व ऐतिहासिक देखाव्यांसोबत समाजप्रबोधन करणारे, विनोदी देखाव्यांमुळे भाविकांची तुडूंब गर्दी झाली होती.

वाहतूक कोंडी नित्याचीच

गुरुवारी गणरायचे विसर्जन होणार असल्याने अखेरच्या दिवशी देखावे पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पावसाची रिपरिप सुरू असतानाच काहीजण चारचाकी वाहनातून, मोटारसायकलवरून देखावे पाहत होते. कार्यकर्त्यांच्या 'पुढे चला'चा आवाहनाला कोणताच प्रतिसाद न देता वाहनधारक थांबून राहत असल्याने कोंडी होत होती. त्याचा सर्वाधीक फटका पादचाऱ्यांना होत होता.

ओशाळली माणुसकी

जुना बुध‍वार पेठ येथील शिपुगडे तालीम मंडळाने सादर केलेल्या 'इथे ओशाळली माणुसकी' या तांत्रिक देखाव्यांने चांगलीच गर्दी खेचली होती. डांगे गल्लीतील वाहतूक कोंडी दाखवणारा आणि वीर बाजीप्रभू तरुण मंडळाने वृक्ष संवर्धनाचे संदेश देणारा समाजप्रबोधनपर देखाव्यांमुळे येथे चांगली गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिलांवरील अत्याचार थांबवाःआ. डॉ. गोऱ्हे

$
0
0

मिरज

सांगली जिल्ह्यात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना नेत्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. गोऱ्हे यांनी पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना या बाबत निवेदन दिले. निवेदनात त्यांनी जिल्ह्यातील गावोगावी ग्रामरक्षक व महिला दक्षता समित्यांची स्थापना करण्यासह विविध मागण्या केल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाने समन्वयातून काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीच्या उद्घाटनासाठी गोऱ्हे मिरजेत आल्या होत्या. या वेळी त्यांनी पोलिस अधीक्षकांना जिल्ह्यातील महिलांवर होणारे अत्याचारासंबंधी निवेदन दिले. या बाबत त्यांनी मिरजेत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी शिवसेनेचे नेते पृथ्वीराज पवार, माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, तानाजी सातपूते, विशाल रजपूत, मिरज शहर शिवसेनेचे विवेक शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत महिलांवरील अत्याचारांच्याया घटनांत वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याचे गोऱ्हे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात गावोगावी ग्रामरक्षक दलाची स्थापना करावी व लोकांचा सहभाग वाढवून छेडछाड, अत्याचार अशा घटनांना आळा घालावा. कुंडल येथील घटना लक्षात घेता मुले व मुलींमध्ये आरोग्य विषयक जागृती वाढविण्यात यावी. पोलिस ठाणे व रेल्वे पोलिस ठाणे अशा विविध ठिकाणी असलेल्या दक्षता समित्यांचे एकत्रिकरण करावे व त्यात महिला प्रवाशांचा समावेश करण्याबाबत सूचना कराव्यात. सीसीटीव्ही फुटेज सहा महिन्यांनी डिलीट न करता साठवून ठेवावेत. शाळांमध्ये समुपदेशक व त्यांच्यासह एनजीओंच्या कार्यकर्त्यांची नेमणूक करावी. स्कूल बसमध्ये महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याबाबत शाळांना सूचना द्याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीचशे ग्रंथालये मान्यतेच्या प्रतीक्षेत

$
0
0

sachin.yadav@timesgroup.com

Tweet : @sachinyadavMT

कोल्हापूर : राज्य सरकारने नवीन ग्रंथालयांना मान्यता बंद केली असली तरी जिल्ह्यातील अडीचशे ग्रंथालये मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या चार वर्षात या सार्वजनिक ग्रंथालयांची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे केली आहे. आज ना उद्या मान्यता मिळून अनुदानाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी जिल्ह्यातील ग्रंथालय चालकांची धडपड सुरू आहे. पुणे विभागीय ग्रंथालय संघ नवीन मान्यतेसाठी ग्रंथालय संचनालयाला साकडे घालणार आहे.

काही ग्रंथालयचालकांनी घरात, दुकानात ग्रंथालये सुरू केली होती. धर्मादाय आयुक्ताकडे रितसर नोंदणीचे प्रमाणपत्र आणि वेळेवर हिशोबाची तयारी काही ग्रंथालय चालकांनी दाखविली. खाबूगिरी करणाऱ्या बोगस ग्रंथालयाच्या यादीतून राज्यातून ५ हजार ५७ ग्रंथालयाची मान्यता रद्द केली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना पक्षासोबत संलग्न असलेल्या ग्रंथालयाचे सेल काढले. काही ग्रंथालय चालकांचे वाचन चळवळीसाठी मोठे योगदान दिले. राज्य सरकारने बोगस ग्रंथालय मोहिमेत कागदावर पूर्ण आणि प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या ग्रंथालयाना फटका दिला. त्यामुळे २०१३ पासून नवीन ग्रंथालयाची मान्यता बंद झाली. आज ना उद्या ग्रंथालयांना अनुदान मिळेल, या आशेवर शहर आणि ग्रामीण भागात काही ग्रंथालय चालकांनी सार्वजनिक ग्रंथालयाची नोंदणी केली आहे. ग्रंथालयाच्या अ, ब, क आणि ड या वर्गवारीनुसार अनुदान दिले जाते. किमान अनुदानाचा पहिला टप्पा म्हणून ड वर्गात येण्यासाठी जिल्ह्यातील ग्रंथालय चालकांची धडपड सुरू झाली आहे.

अनुदानाच्या प्रवाहात येण्यासाठी धडपड

ग्रंथालय म्हणजे सर्व प्रकारची सर्वसाधारणपणे छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रीतपणे ठेवण्याची जागा मानली जाते. सध्या काही सार्जनिक ग्रंथालये हायटेक झाली आहेत. दुर्मिळ कागदपत्रांचे डिजिटायझेशन,दुर्मिळ हस्तलिखितांचे जतन केले जात आहे. त्याचा चांगला फायदा संशोधकांना होत आहे. यामध्ये काही मान्यताप्राप्त सार्वजनिक ग्रंथालये आघाडीवर आहेत. इंटरनेट लॅब, स्मार्ट कार्ड, वेब कॅफे मॅनेजमेंट, सीडी- डीव्हीडी मिरर सर्व्हर, सीडी- डीव्हीडी स्टोअरेज मॅनेजमेंट, सोल स्वॉफ्टवेअर, वर्ल्ड ई-बुक लायब्ररी, रिमोट अॅक्सेस, आदी प्रणालीसह पुस्तकांना बारकोडिंग व मॅग्नेटिक टायटल टेप बसविले आहेत. अनेक ग्रंथालयांची स्वतःची संकेतस्थळे असून जगभरातील माहिती आणि वाचकांची नाळ जुळली आहे.

नवीन ग्रंथालयांना मान्यता मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. राज्य सरकारने नवीन ग्रंथालयाच्या मान्यतेवर बंदी घातली आहे. वाचन चळवळ जोपासण्यासाठी नवीन ग्रंथालयाची गरज आहे.

- तानाजीराव मगदूम, कार्यवाह, पुणे विभागीय ग्रंथालय संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवा बॉम्बस्फोट : तावडेच्या ट्रॅक्सचे कनेक्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्येच्या गुन्ह्यातील अन्य संशयित, हिंदू जनजागृतीचे समितीचे डॉ. विरेंद्रसिंह तावडे याचे गोवा बॉम्बस्फोटाशी कनेक्शन असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली जात आहे. एसआयटीने जप्त केलेली डॉ. तावडेच्या ट्रॅक्सचा उल्लेख गोवा बॉम्बस्फोटासंदर्भात एनआयने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये आहे. २००९ पासून एनआयएला तावडेची ट्रॅक्सच्या शोध घेत होती. मात्र, एसआयटीने ट्रॅक्स जप्त करून महत्वाचा पुरावा मिळवला आहे. तावडेने संशयितांना रिव्हॉल्व्हर व पिस्तूलाचे प्रशिक्षण देण्यासाठी कशी मदत केली या तपासावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात सांगितले की, २००९ मध्ये गोवा मडगावमध्ये स्कूटरच्या डिकीत बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात सनातनचे साधक योगेश नाईक व मलगोंडा पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्यावेळी सनातनचे प्रमुख जयंत आठवले यांच्याकडे चौकशी केली होती. या स्फोटानंतर या गुन्ह्यातील संशयित सारंग अकोलकर, रुद्र पाटील फरारी आहेत. बॉम्बस्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयएन) केला होता. गोवा बॉम्बस्फोटाचे आरोपपत्र एनआयने कोर्टात दाखल केले आहे. बॉम्बस्फोटातील संशयितांना प्रवास करण्यासाठी ट्रॅक्स वापरली होती असा उल्लेख एनआयने आरोपपत्रात केला आहे.

एनआयए गुन्ह्यातील ट्रॅक्सचा शोध घेत होती. पानसरे हत्येचा तपास करताना डॉ. विरेंद्र तावडेला ताब्यात घेतल्यावर एसआयटीने यवतमाळमधून डॉ. तावडेने विकलेली ट्रॅक्स ताब्यात घेतली आहे. ट्रॅक्सचा वापर तावडेने कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, जत या भागात केला होता. पानसरे, दाभोळकर हत्येतील संशयितांनी रिव्हॉल्व्हर व पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण जत (जि. सांगली) घेतले होते. जतला जाण्यासाठी संशयित तावडेचा ट्रॅक्सचा वापर करत होते. त्यामुळे पानसरे व दाभोळकर हत्येच्या तपासात ट्रॅक्स हा महत्वपूर्ण पुरावा सापडला आहे. या ट्रॅक्सचे धागेदोरे गोवा बॉम्बस्फोटापर्यंत जात असल्याने तावडेचे गोवा बॉम्बस्फोटांशी काही संबध आहे का याचाही तपास केला जात आहे. तावडे हा पानसरे, दाभोळकर व कलबुर्गी यांच्या हत्येतील मास्टर माईंड आहे का याचाही तपास सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगिचले.

दोन महिलांकडे चौकशी

तावडे याच्याशी संबधित सनातन दोन महिला साधकांकडे पोलिस चौकशी करत आहेत. तावडेला गुरुवारी संकेश्वर (जि. बेळगाव) येथे तपासासाठी नेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणखी सात ते आठ साधकांकडे चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शुक्रवारी तावडेला येरवड्याला नेणार

तावडेची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपणार आहे. शुक्रवारी त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर कोर्टाकडून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश होऊ शकतो. या आदेशानांतर पोलिस बंदोबस्तात तावडेला येरवडा (पुणे) कारागृहात ठेवण्याची शक्यता आहे असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कोसळून ४० प्रवासी जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-अणुस्करा मार्गावरील पोर्ले तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) गावात पाटपन्हाळा पुलावरून बस नाल्यात कोसळून ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले. बुधवारी दोनच्या सुमारास अपघात झाला. जखमींना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. अपघातप्रकरणी चालक अनिल धोंडीराम काळे (वय ३६, रा. नावली. ता. पन्हाळा) यांनी फिर्याद दिली आहे.

बुझवारी दुपारी दीड वाजता रंकाळा बसस्थानकातून कोल्हापूर ते चौकेवाडी बस सुटली. बसमध्ये ४७ प्रवासी होते. सव्वा दोनच्या सुमारास पार्ले तर्फे बोरगाव गावाजवळ पाटपन्हाळा पुलाजवळ बसच्या समोर अचानक म्हैस आडवी आली. यावेळी चालक काळे यांनी ब्रेक दाबल्याने बस पलटी होऊन दहा फूट खोल नाल्यात कोसळली. यावेळी बसमधील प्रवासी एकमेकांवर आदळले. बसमधील प्रवासी किंचाळू लागल्यावर परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. बसमधून बाहेर पडताना प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली. परिसरातील नागरिकांनी जखमींना बाहेर काढून १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले.

जखमींची नावे अशी, अनुबाई कारंडे (रा. इनुली), नारायण गुरव (रा. कुंभवडे), विघ्नेश पाटील ( रा. हासूर, ता. शाहूवाडी), सखाराम खराडे (रा. हासूर), सखाराम करणे (रा. मांजरेवाडी), तुकाराम कांबळे ( रा. कुमठे), बारकू कांबळे (उजवली), मनिषा कांबळे (रा. मरळे, ता. शाहूवाडी), दिनकर कुराडे ( रा. आसुर्ले), अनिल काळे (रा. नावली), धोडीराम कांबळे (मरळे), कृष्णात मेहतर (रा. कानरे, ता. शाहूवाडी), लक्ष्मण कांबळे (उमावडे, ता. शाहूवाडी), सुमन कांबळे (रा. परकाळे), गणपत कांबळे (रा. कानरे), बारकू कांबळे (रा. उजळाईवाडी), आळोबा कात्रट (रा. कात्रट), योगेश चव्हाण (रा. सावरी), राजेंद्र चौगुले (रा. हेरले), काशिनथ परांडेकर (रा. गौरवाड), ऋतुराज पाटील (रा. कोपार्डे), सुवर्णा पाटील (रा. कोपार्डे), सखुबाई करडे (रा. बोळवाडी), अनुसुया लटके (रा. एरके), सरदार उजोळे (रा. गोळवाडा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात संस्कृती-परंपरांचे दर्शन

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या.., एक दोन तीन चार... गणपतीचा जय जयकार.., गणपती गेले गावाला...चैन पडेना आम्हाला.., अशी साद घालत आणि जयघोष करीत लेझीम व ढोल पथकांच्या दणदणाटात निघालेल्या मिरवणुकीने लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. श्रद्धानंद समाजाचे आराध्य दैवत असलेल्या आजोबा गणपतीचे पहाटे पाच वाजता सिद्धेश्वर तलाव परिसरातील विष्णू घाटावर विसर्जन करण्यात आले. तर पणजोबा गणपतीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने रात्री बारा वाजता संपली. एकूण गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली.

सोलापुरातील सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मंडळ, विडी घरकुल, निलम नगर, विजापूर रोड, हैदराबाद रोड, लष्कर विभाग आणि पूर्व विभाग या आठही मध्यवर्ती मंडळाच्या मिरवणुका पार पडल्या. सिद्धेश्वर तलावावरील गणपती घाट व विष्णू घाट तसेच विजापूर रस्त्यावरील धर्मवीर संभाजी तलाव, हिप्परगा तलाव तसेच सार्वजनिक विहिरींमध्ये लहान-मोठ्या हजारो गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. पावसाची रिपरिप सुरू असतानासुद्धा गणेश भक्तांचा उत्साह कमी झालेला नव्हता. जोशी समाजाच्या वस्ताद गणपतीचे सायंकाळी साडेसात वाजता गणपती घाटावर क्रेनच्या मदतीने विसर्जन करण्यात आले. तत्पुर्वी दुपारी बारा वाजता सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या पत्रा तालीम येथील पणजोबा गणपतीची पूजा पालकमंत्री विजयकुमार देशमुख, देशमुख वाड्यातून आलेल्या मानाच्या पालखीची पूजा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करून मिरवुणकीला प्रारंभ झाला. आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार भारत भालके, महापौर प्रा. सुशीला आबुटे, मनपा विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

समर्थ, मंगळवेढा तालीम, पत्रा तालीम, सरस्वती, पाणीवेस तालीम, सहस्त्रार्जुन, क्रांती तालीम, गवळी वस्ती तालीम संघ आदींच्या लेझीम ताफ्यांसह निघालेल्या मिरवणुकांनी लक्ष वेधून घेतले. संबळ वाद्याने अनेक गणेश भक्तांना ठेका धरायला लावला. आजोबा गणपतीची मिरवणूकही लक्षवेधी ठरली. पूर्व भागातून निघालेल्या मिरवणुकीत डॉल्बीच्या निनादात तेलगू चित्रपटातील गीतांवर तरुणाई थिरकली. तसेच लष्कर विभाग मध्यवर्तीमधील मिरवुणकीत शक्तीच्या प्रयोगांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. एकूणच गुरुवारी पावसाच्या सरी झेलत लाखो गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. मिरवणुका निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी लावलेल्या बंदोबस्तामुळे कुठेही वादाचा प्रकार घडला नाही. नेहमीप्रमाणे खाटीक मशीद आणि पंजाब तालीम या ठिकाणी बराच वेळ लेझीमचा खेळ दाखविण्यासाठी मंडळांमध्ये चढाओढ लागली होती.

मुक मोर्चाचा मिरवुणकीत प्रभाव

बुधवारी, २१ सप्टेंबर रोजी कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात मराठा क्रांती मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात बांधवांनी सहभागी व्हावे, अशी साद घालणारी डीजिटल विविध मंडळांनी आपल्या वाहनाच्या समोर लावली होती.

सुशीलकुमारांनीही केले गणेश विसर्जन

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विजापूर रस्त्यावरील टाकळी येथील जाई-जुई फार्म हाउस येथे दर वर्षी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. यंदाही प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणरायाचे विसर्जन सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या पत्नी उज्वलाताई शिंदे तसेच तीन कन्या जावई आणि नातवांच्या उपस्थितीत करण्यात आले.

गणेश भक्तांचे धरणे आंदोलन

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची निवडणूक सोन्या मारुती जवळील खाटीक मशीद परिसरातून जात असताना या ठिकाणी काही गणेश भक्तांनी फटाके उडविण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना रोखले त्यामुळे संतप्त झालेल्या गणेश भक्तांनी काहीवेळ या ठिकाणी धरणे आंदोलन केल्यामुळे वातावरण तणावाचे बनले होते. मात्र, वरिष्ठांनी समजूत काढल्यानंतर कार्यकर्ते मार्गस्थ झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात डॉल्बीमुक्ती, इको-फ्रेंडली विसर्जन

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

साताऱ्यातील मानाच्या सर्व सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीमला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्सव मूर्तींचे विसर्जन केले. पोलिसांनी केलेल्या डॉल्बीमुक्तीच्या आवाहनाला मंडळांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ढोल व बेंजो, सनईच्या मंगलमय स्वरात विसर्जन मिरवणूक पार पडली. अनेक मंडळांनी गुलाल उधळण्यास फाटा दिला. अनेक घरगुती मूर्तींचे घरातच टब, बादलीत विसर्जन करण्यात आले.

शहरातील प्रमुख पंचमुखी, महागणपती सम्राट, मोतीचौकातील प्रतापसिंह, गुरुवार तालीम आदी प्रमुख मंडळांनी विविध ढोल पथकांना सुपारी देत या ढोल पथकांच्या दणदणाटात विसर्जन मिरवणुका काढत आदर्श घालून दिला. अनेक मंडळांनी नाशिकचा ढेल बाजा, ब्रास बँड आदींना बोलवत डॉल्बीचा हिसका लक्षात घेत नको रे बाबा डॉल्बी म्हणत विना गुलालाचीही मिरवणूक काढली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ती दखल घेतली जात होती. पोलिसांचे व्यवस्थापन व सतर्कता पाहून सर्व कार्यकर्त्यांनी तसेच गणेश भक्तांनी जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांचे कौतुक केले.

तीन हजार मंडळांच्या श्रींचे विसर्जन

सातारा शहर व परिसरातील शेकडो सार्वजनिक मंडळांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी...पुढल्या वर्षी लवकर या...च्या जयघोषात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. जिल्ह्यात शुक्रवारी नोंद झालेल्या ३ हजार ३०६ मंडळांचे आणि ८९ हजार ७११ घरगुती गणपती विसर्जित करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीला गुरुवारी सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली, शुक्रवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास मानाच्या शंकर पार्वती गणपतीच्या विसर्जनाने मिरवणुकीची सांगता झाली. शुक्रवारी ५१ सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये कराड शहर १९, सातारा शहर दोन, सातारा तालुका ५ आणि ढेबेवाडीत ६ मंडळांचे विसर्जन शुक्रवारी सायंकाळपर्यंत करण्यात आले.

सदाशिव पेठेतील मानाच्या सम्राट महागणपती मंडळाची विसर्जन मिरवणुकीची सुरुवात महाआरतीने झाली. त्यानंतर शहरातील मानाचे व मोठे असणारे मोती चौकातील प्रतापसिंह मंडळ, पंचमुखी मंडळ, मयूर सोशल क्लब आदींच्या गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या.

सायंकाळी पाच वाजता मुख्य अशा सातारा नगर परिषदेच्या मानाच्या मध्यवर्ती गणेश मंडळाची मिरवणूक आमदार शिवेंद्रराजे भोसले, प्रांताधिकारी देशमुख, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, मुख्याधिकारी शंकर गोरे, नगराध्यक्ष विजय बडेकर व उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, उद्योजक नारायणशेठ जोशी, हरेश दोशी, मदन दोशी आदी मान्यवरांचे हस्ते महाआरतीने झाली. मिरवणुकीत फुलांच्या आकर्षक सजावटीने सुशोभीत केलेल्या ट्रॉलीवर मध्यवर्ती मंडळाच्या गणेशाची फायबरची इको फ्रेंडली मूर्ती मिरवणुकीच्या अग्रभागी ढोलपथक व फटाक्यांची आतषबाजी, असे हे चित्र सर्वाचे आकर्षण ठरत होते.

रिमांड होममधील मुलांनी केलेले मिरवणुकीत झांज पथकाचे बहारदार खेळ सातारकरांचे आकर्षण ठरले. राजवाडा परिसरात मिरवणूक मार्गावर दोन मंडळांमध्ये मोठे अंतर पडल्याने सायंकाळी साडेसहा मिरवणूक पहाण्यास आलेल्या गणेशभक्तांची मोठी कुचंबणा झाली. रात्री उशिरापर्यंत मंडळाचे कार्यकर्ते ढोल झांजाच्या ठेक्यावर बेभान होऊन नाचत होते.

अजिंक्य गणेश मंडळाचा अलंकारांनी सजविलेल्या फुलांच्या रथातील गणपती, राजमुद्रा मंडळ, अजिंक्य मंडळाचे महाकाय गणपती तसेच मारवाडी भुवन मंडळाचा अनोख्या ऐतिहासिक मखरातील गणपती मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मयुर सोशल क्लबच्या बाल हनुमान मंडळाचा ढोलाचा नाद उत्साह वाढवणारा होता. प्रतापसिंह मंडळापुढील नाशिक ढोलबाजा पथक, गुरुवार पेठेतील गुरुवार तालीम मंडळापुढील भारतमाता ढोल पथक, बोगद्याचा राजा, वीर शैव ककैय्या मंडळाचा अधांतरी पाण्याच्या प्रवाहावर नाचणारा गणपती, गोल्डन मंडळ, ओमकार मंडळ आदी १५७ मंडळांची ही मिरवणूक लक्षवेधक ठरत होती.

मंगळवार तळे समुहाच्या मिरवणुकीतील बाल कलाकारांचे लेझीम पथक व ढोल वादन लक्षवेधक ठरले होते. मानाच्या सम्राट मंडळापुढे ऐतिहासिक पोषाख केलेले शिंग तुताऱ्या वादक आणि अजिंक्य तारा गणेश मंडळच्या मिरवणुकीत नऊ महिलांनी केलले ढोल वादन लक्ष वेधून घेत होते.

फुटका तलाव मंडळाने डॉल्बीला फाटा देत मोठ्या ट्रकवर बँडचा वाद्यवृंद सादर करीत मिरवणुकीत एकाहून एक अशी सादर केलेली लोकप्रिय गाण्यामुळे पहाणारेही ताल व ठेका धरत होते.

सर्व मंडळांचे स्वागत करण्यासाठी राजपथावर कन्याशाळेनजीक विशेष मंडप उभारला होता. त्यात मान्यवर तसेच नगराध्यक्ष व पालिका अधिकाऱ्यांनी मंडळांचे पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

कृत्रिम तळ्यांत झाले विसर्जन

शहरातील मंगळवार तळे, मोती तळे व फुटका तलाव येथे सार्वजनिक मंडळांच्या विसर्जनासाठी प्रशासनाने हायकोर्टाच्या आदेशाने बंदी घातल्याने राधिका रोडवर तयार केलेल्या कृत्रिम तळ्यात हे गणपती विसर्जित होत होते. येथे विशेष मचाण व्यवस्था केली होती. शहरात हुतात्मा स्मारक, सदर बझार येथील दगडी शाळा, गोडोली बाग येथे ही अशी कृत्रिम तळी बनवण्यात आली होती. यंदा राधिका रोडवर विसर्जन करण्याची सुविधा केल्याने मिरवणूक मार्गावर मंडळांना मार्गदर्शन केले जात होते. दरम्यान,

विसर्जनासाठी तलावावर असणारी क्रेन वारंवार बंद पडत असल्याने काहीकाळ खोळंबा झाला.

अशी रंगली मिरवणूक

नियोजनाचा अभाव असल्यामुळे मिरवणुकीत विस्कळितपणा

अनेक मंडळांनी मिरवणुकीत सहभागी न होता थेट विसर्जन केले

सायंकाळी उशिरापर्यंत रस्त्यावरचे दिवेस विशेष लाईटची सुविधा नव्हती

शिवशाही, शिवगर्जना, गंधतारा, तांडव, भारतमाता ढोल पथकांच्या वादनाला प्रेक्षकांची पसंती

घरगुती गणेश मूर्ती अनेकांनी केल्या घरीच बादली, टबमध्ये विसर्जित

अनेक मंडळांनी गुलाला फाटा देत फुग्यांची आकर्षंक सजावट केली

......................

शाडूच्या शेकडो मूर्तींचे टोपलीत विसर्जन

पाचवड (ता. वाई) येथील रयतच्या महात्मा गांधी विद्यालयात पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करण्यात आले. पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने तयार केलेल्या शाडूच्या दोनशे मूर्तींचे विद्यालयात पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. मूर्तींचे शाळेत पाण्याने भरलेल्या टपात विसर्जन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.


'२०१४च्या डॉल्बी बळी'तून घेतला धडा

साताऱ्यात २०१४मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शंभर वर्षांपूर्वीची जुनी धोकादायक इमारत कोसळून तीन जण ठार झाले होते. ही दुर्दैवी घटना डॉल्बीच्या दणदणाटानेच घडली होती. एकाच वेळी तीन मंडळांच्या डॉल्बीच्या आवाजाच्या मोठ्या हादऱ्याने इमारतीच्या भिंती थरथरुन एक भिंत त्याच परिसरात उभ्या असलेल्या जमावाच्या अंगावर कोसळली होती. या घटनेत वडापाव विकणारे चंद्रकांत भिवा बोले आणि मिरवणुकीचा आनंद लुटायसाठी आलेले गजानन श्रीरंग कदम, उमाकांत गजानन कुलकर्णी हे दोन सातारकर कोसळलेल्या भिंतीच्या राडारोड्यात गाडले जाऊन ठार झाले. ही घटना सातारकरांसाठी मोठी वेदनादायी होती. या घटनेतून धडा घेत सातारकरांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला अन् विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टिम हद्दपार झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांच्या हल्ल्यातदोन पोलिस जखमी

$
0
0



कराड :

शहरातील दत्त चौकातील दुकाने फोडून पलायन करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. मात्र, चोरट्यांना पकडल्यानंतर चोरट्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. पोलिसांच्या डोक्यात लोखंडी गज मारल्याने दोन पोलिस जखमी झाले आहेत. जखमी अवस्थेतही पोलिसांनी त्यांना पकडून त्यांच्याकडून रोख रकमेसह कटावणी, गज, चाकू आणि प्राणघातक शस्त्रे हस्तगत केली आहेत. दोन्ही चोरटे परप्रांतीय आहेत.

नवल भुरया (३५, रा. नावेल, ता. कुकशी, जि. धार, मध्य प्रदेश) व रायचंद वसुनिया( २२, रा. मंगरदार, ता. कुकशी, जि. धार, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. चोरट्यांनी तानाजी रतन शिंदे व प्रफुल्ल हिंदुराव गाडे या दोन पोलिसांवर हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केले आहे.

शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार प्रफुल्ल गाडे व आशिष साळुंखे शुक्रवारी रात्री दीड वाजता गस्त घालत असताना त्यांनी दत्त चौकात दोन संशयित हातामध्ये लोखंडी गज घेऊन पाटील हेरीटेज इमारतीमध्ये जात असताना पाहिले. त्यानंतर गाडे व साळुंखे यांनी दुचाकी थांबवून इमारतीमध्ये गेलेल्या संशयितांवर लक्ष ठेवून शहर पोलिस ठाण्यात माहिती देत अधिक पोलिस मदतीची मागणी केली. दरम्यानच्या चोरट्यांनी इमारतीमधील दुकाने, बॅँकांची शटर तोडली. मात्र, नागरिक जागे झाल्याने चोरटे जिन्यावरून खाली पळाले. पळणाऱ्या चोरट्यांना अटकवा करताच त्यांनी पोलिसांच्या डोक्यात लोखंडी गज घालून गंभीर जखमी केले. तानाजी शिंदे यांच्या हातावर एकाने चाकूने वार केला. चोरट्यांनी हल्ला करुनही जखमी झालेल्या तीन पोलिसांनी चोरट्यांना पकडून ठेवले. तोपर्यंत सहायक निरीक्षक संतोष चौधरी व कॉन्स्टेबल देवा खाडे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी चोरट्यांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवार रात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी शनिवारी कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे चार फुटांनी उचलून धरणातून चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात आला. मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने सातारा व सांगली जिल्ह्यातील कोयना व कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शनिवारी दिवसभरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगर येथे १६ (एकूण ४३०३), नवजा ४५ (५४१९), महाबळेश्वर येथे १०५ (४८१२) मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. १०५ टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. शनिवारी सकाळीच धरणातील पाणीपातळी २१६३.७ फूट झाल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी पावणे अकरा वाजता धरणाचे सहाही दरवाजे चार इंचांनी उचलण्यात आले. त्यानंतर दुपारी पावणेदोन वाजता दीड फुटांनी, तर दुपारी पावणे चार वाजता अडीच फुटांनी आणि साडेसात वाजता चार फुटांनी वक्र दरवाजे उचलून ३८ हजार क्युसेक व पायथा वीज गृहातून २ हजार २११ क्युसेक असे एकूण सुमारे ४० हजार २११ क्युसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडले जात आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे कोयना व कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शनिवारी दिवसभर कोयना, नवजा, हेळवाक व महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. कोयना धरणातून पाणी सोडल्याने सातारा जिल्ह्यातील कराडपर्यंत कोयना व सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रताप मानेंची तहसीलदारांना धमकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेतील पेन्शनचे पैसे वाटपावरून सुरू असलेला वाद आता हातघाईवर आला असून कागल येथील राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने यांनी तहसीलदारांना 'बघून घेतो' अशी धमकी दिली. तर कार्यकर्त्यांनी तहसीलदार ‌किशोर घाडगे आणि निवासी नायब तहसीलदार शिवाजी गवळी यांना एकेरी भाषा वापरली. यावेळी एका कर्मचाऱ्यालाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माने यांच्यासह २२ जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

याप्रकरणी माने यांच्यासह नगरसेवक प्रवीण गुरव, गणेश सोनुले, महेश दावणे, सतीश गाडीवड्डर, प्रवीण काळबर, विवेक लोटे, सुनील माळी, संग्राम सणगर, युवराज माळी, राहुल गाडेकर, प्रवीण सोनुले, अनिल शिंगाडे, प्रशांत हेगडे, पप्पू कुंभार, राजेश वाघमारे, प्रशांत जाधव, सचिन सोनुले, सुनील कदम, योगेश चौगुले, बच्चन सोनुले, प्रवीण दावणे आदींवर गुन्हा नोंद केला आहे.

कागल येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदारांची तलाठ्यांसोबत बैठक सुरू होती. यावेळी प्रताप माने पेन्शन योजनेबाबत चर्चा करण्यासाठी कार्यालयात आले. यावेळी त्यांना काही वेळ थांबण्यास सांगितले. मात्र, ते आपल्या २२ कार्यकर्त्यांसह दालनात घुसले. त्यांनी महिला तलाठ्यांना उठून बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी त्यांनी 'राष्ट्रवादी काय आहे ते दाखवतोच' असे म्हणत अर्वाच्य भाषा वापरली. यावेळी तहसीलदार घाडगे यांनी माने यांना बैठक सुरू असल्याचे सांगितले. यावर माने यांनी तहसीलदारांना अरेरावी केली. यावेळी तहसीलदार लोकांना शांत करण्यासाठी उभे राहिले तेव्हा नगरसेवक प्रवीण गुरव यांनी तहसिलदार घाडगे यांच्याशी एकेरी भाषेत बोलत ' ए तू खाली बस' अशी भाषा वापरत हुज्जत घातली. तसेच 'मी तुला बघून घेतो' अशी धमकी दिली. त्याचबरोबर 'फिनो'कंपनीचा कागल मधील सीएसपी(कस्टमर सर्व्हिस पर्सन) रुपेश बागणे यांना पकडून चेंबरमध्ये आणले मारहाण केली. तसेच नायब तहसीलदार शिवाजी गवळी यांना 'तुला बघून घेतो. ते पैसे वाटत आहेत तु त्याकडे लक्ष दे नाहीतर तुझे काही खरे नाही, राष्ट्रवादी पक्ष काय आहे. हे मी तुला दाखवतो' अशी धमकी देत निघून गेले.

कायद्याला न जुमानणारी ही प्रवृत्ती आहे. माग‌ी‌ल वेळी असा प्रकार घडला होता. त्यावेळी मी सामंज्यस्यांची भूमिका घेतली होती. हा प्रकार पुन्हा घडल्याने सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे देऊन गुन्हे नोंद केले आहेत.

किशोर घाडगे, तहसीलदार, कागल

संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सरकारी जागेतच वाटावे, ते घरोघरी वाटू नये असे निवेदन याआधी आम्ही तहसीलदार यांना दिले होते. तरीही शनिवारी घरोघरी पैसे वाटप सुरू असल्याचे कळाले. आम्ही तहसीलदारांना साडेदहा वाजता याची कल्पना दिली. तासाभरांनी चर्चा करू मिटींग सुरू आहे असे तहसीलदार यांच्याकडून सांगण्यात आले. त्यानुसार आम्ही तहसीलदारांच्या दालनात गेलो. सोबतचे कार्यकर्ते प्रक्षुब्ध झाले होते. त्यामुळे बाचाबाची झाली.

प्रताप माने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावर मृत डुक्कर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

वारंवार तक्रारी करूनही भागातील कचरा उठाव केला नसल्याने गणेशनगर भागातील नगरसेविका मंगल मुसळे यांचे पती बंडा मुसळे यांनी शनिवारी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात मृत डुक्करे आणून टाकली. या प्रकारामुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या आंदोलनाचा निषेध नोंदवत पालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. तर गणेशनगर भागातील नागरिकांनीही घोषणाबाजी सुरू केल्याने आंदोलन-प्रतिआंदोलनामुळे पालिकेतील वातावरण तणावपूर्व बनले होते.

दरम्यान, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी बंडा मुसळे यांच्यासह १५ जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा व शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे. तर बंडा मुसळे यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्या वादग्रस्त कामाची चौकशी करण्याबाबतचा तक्रार अर्ज दिला आहे. हा गोंधळ सुमारे पाच तासाहून अधिक काळ सुरू होता. अनेक मान्यवरांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.

दत्तनगरभागातील स्वच्छतेबाबत नगरसेविका मंगल कोदले-मुसळे आणि त्यांचे पती बंडा मुसळे हे तीन महिन्यांपासून नगरपालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. परंतु सुस्त प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्षच केले गेले. ऐन गणेशोत्सवातही भागात मेलेली डुक्करे उचलली गेली नसल्याने नागरिकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना तोंड द्यावे लागले. त्यामुळे संतप्त झालेले बंडा मुसळे आणि भागातील कार्यकर्त्यांनी मेलेली तीन डुक्करे आणि कचरा थेट नगरपालिकेत आणला. प्रथम पालिकेच्या प्रवेशद्वारात आणलेला कचरा टाकला. त्यानंतर एक डुक्कर आरोग्याधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्या कार्यालयाच्या दारात टाकले. त्यानंतर आंदोलकांनी मुख्याधिकाऱ्यांचे दालन गाठत एक डुक्कर कार्यालयात तर दुसरे डुक्कर मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावरच ठेवले. या प्रकाराबद्दल मुख्याधिकारी रसाळ यांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाची ही पद्धत चुकीचे असल्याचे सांगितले. त्यावर मुसळे व मुख्याधिकाऱ्यांत जोरदार शाब्दिक वाद झडला. आंदोलकांनी प्रश्नांचा भडिमार करत मुख्याधिकाऱ्यांना भंडावून सोडले.

या आंदोलनाची माहिती मिळताच नगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्र आले व त्यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवत कामबंद आंदोलन सुरू केले. पालिकेच्या प्रवेशद्वारात सर्वच संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी एकत्र येऊन त्यांनी नगरपालिकेचे प्रवेशद्वार बंद केले. सुमारे दोन तास हा गोंधळ सुरु होता. यावेळी कर्मचारी संघटनांनी या आंदोलनाच्या विरोध करीत नगरपालिका बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला. त्यामुळे कार्यालयात टाकलेली डुक्करे उचलण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दर्शविल्याने डुक्करे मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच पडून होती. दुर्गंधीमुळे अनेकांना उलटीचा त्रास होत होता. तर कर्मचाऱ्यांसह सर्वजण तोंडाला रुमाल बांधून वावरत होते.

या गोंधळामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर त्यांनी मुसळे यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले. तर मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्यासह नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलिस उपअधिक्षक विनायक नरळे यांची भेट घेऊन आंदोलकांवर कारवाईची मागणी केली. दरम्यान, आंदोलकांना ताब्यात घेतल्याने संतप्त नगरसेविका मंगल मुसळे यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्याच्या आवारात जमले. त्यांनी नगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई मागणी केली. यावेळी माजी आमदार अशोकराव जांभळे, सागर चाळके, बांधकाम सभापती लतिफ गैबान, भाऊसो आवळे, प्रकाश मोरबाळे आदींनी समेट घडवत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्याधिकारी रसाळ हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर सायंकाळी सरकारी कामात अडथळा आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी बंडा मुसळे यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डुक्करे कोणी उचलयाची?

संयमाचा बांध सुटलेल्या बंडोपंत मुसळे व संतप्त कार्यकर्त्यांनी तीन मृत डुक्करे आणून मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणून टाकली. तीन दिवसांपूर्वी मृत झालेल्या डुक्करांमुळे मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयासह पालिकेत दुर्गंधी पसरली होती. आंदोलनाच्या या पध्दतीचा निषेध नोंदवत नगरपालिका अधिकारी व कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन छेडले. आंदोलकांनी डुक्करे आणून टाकली असून ती त्यांनीच उचलून न्यावीत, आम्ही ती हलवणार नाही अशी भूमिका घेतल्याने सायंकाळ उशीरापर्यंत डुक्करे कार्यालयातच पडून होती.

आंदोलन कशासाठी.....?

नगरपालिकेच्या असेसमेंट विभागातील लिपिक शशिकांत बागी हा चारच दिवसांपूर्वी लाच घेताना रंगेहात सापडला. या घटनेचा व प्रवृत्तीचा निषेध नोंदविण्यासाठी एकही कर्मचारी संघटना अथवा अधिकारी पुढे आला नव्हता. परंतु संयमाचा बांध सुटलेल्या नागरिकांचे आंदोलन सुरू असताना कामगार संघटनांनी कामबंद आंदोलन छेडल्याने कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाबाबत नागरिकांतून उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत होती. तक्रारीची गांभीर्याने दखल घेत जर वेळीच स्वच्छता केली असती तर नागरिकांवर अशा प्रकारचे आंदोलन करण्याची वेळच आली नसती, अशी चर्चा सोशल मीड‌ियावरुन व्हायरल होत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठिकपुर्लीत विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

$
0
0

राधानगरी: ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथील दूधगंगा कॅनॉलजवळ वीजजोडणीचे काम करत असताना अर्थिंग वायरवर मुख्य वाहिनी चिकटल्याने नितीन विश्वास कांबळे (वय २८) या तरुणाचा जाग्यावरच मृत्यू झाला. याबाबत राधानगरी पो‌लिस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नितीन हा निगवे (ता.करवीर) येथील एका खासगी कंपनीकडे कंत्राटी पद्धतीने काम करत होता. आज सकाळी तो नेहमीप्रमाणे तारळे खुर्द या आपल्या गावातुन कामासाठी बाहेर पडला. कंपनीच्यावतीने ठिकपुर्लीच्या माळावरील दूधगंगा कॅनॉलजवळील शेतकऱ्यांना वीजजोडणीचे काम सुरू होते. मुख्य वीज प्रवाह बंद करून पोलभोवती कंपाउंड वायर गुडाळली जात होती इतक्यात दुसऱ्या वीजवाहिनीवर पक्षी बसल्याने ती अर्थिंगला चिकटली. त्यावेळी नितीनच्याभोवती असणाऱ्या कंपाऊड वायरमध्ये प्रवाह उतरल्याने नितीनचा जागीच मृत्यू झाला. त्याला उपचारासाठी राशिवडे आरोग्य केद्रामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी सम्राट शिंदे यांनी नितीनची तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. नितीनच्या पश्चात पत्नी, एक वर्षाचा मुलगा, वडील, भाऊ असा परिवार आहे.

माझा नितीन कायमचा गेला...

एका इंग्लीश मीडियम स्कूलमध्ये काम करत असलेला नितीन नोकरी सोडून तेा सध्या कंत्राटी पद्धतीने खासगी कंपनीकडे वीजजोडणीचे काम करत होता. आज सकाळी कामावर जाणार नव्हता पण अचानक बेत बदलून तो कामावर गेला. 'माझा नितीन कामावर जाणार नव्हता तरीही तो 'जातो' असे सांगून कायमचाच गेला' असे सांगुन वडील विश्वास यांनी राशिवडे केंद्रामध्ये फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉल्बीचा दणका १६ मंडळांना बसणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या १६ मंडळांना चांगलाच दणका बसणार आहे. त्यांनी लावलेली डॉल्बी सिस्टिम, ट्रॅक्टर आणि जनरेटरही जप्त करण्यात येणार आहेत. आहेत. यासंबंधीचा खटला कोर्टात जलदगतीने चालवण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती शनिवारी शहर पोलिस उप अधीक्षक भारतकुमार राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राणे म्हणाले, 'विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा पाळणार असल्याचे सांगूनही १६ मंडळांनी मर्यादा ओलांडली. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. मंडळ, तालमीचे अध्यक्ष व उत्सव समितीचे अध्यक्ष व कार्यकारिणीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांना अटक करून कोर्टापुढे हजर केले जाणार आहे. ध्वनी प्रदूषण कायद्याचा भंग केल्याने जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी व राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा अहवाल मागवून घेण्यात येणार आहे. गुन्हे दाखल केल्यानंतर पदाधिकाऱ्यांना अटक करून डॉल्बी, ट्रॅक्टर व जनरेटर जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कोर्टात आरोपपत्र लवकर दाखल केले जाणार आहेत. आरोपपत्रात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी ध्वनीमापन यंत्राचे अहवाल, शिवाजी विद्यापीठ व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अहवाल कोर्टात सादर केले जाणार आहेत.'

माजी नगरसेवक इंगवले यांच्यावरही गुन्हा दाखल होणार

फिरंगाई तालीम मंडळाचे माजी नगरसेवक रवीकिरण इंगवले यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे राणे यांनी सांगितले. फिरंगाई तालमीच्या मिरवणुकीवेळी साउंड मशिनचा मिक्सर जप्त केला होता. मिरवणुकीत आवजाची मर्यादा पाळली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. पण त्यांनी आश्वासन पाळले नाही, त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. डॉल्बी लावण्यासाठी शिष्टाई करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची माहिती घेतली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

मिरवणुकीत तीन मंडळांनी नृत्य पथके आणली होती. या मंडळांच्या नृत्य पथकाचे व्हिडिओ पोलिस उपलब्ध करत आहेत. नृत्यामध्ये अश्लील हावभाव आढळल्यास त्या मंडळांवर व कलाकारांवर कारवाई केली जाणार आहे.

या मंडळांवर होणार कारवाई

फिरंगाई तालीम मंडळ, बागल चौक मित्र मंडळ, राजे संभाजी तरूण मंडळ, पिंटू मिसाळ बॉईज, पाटाकडील तालीम मंडळ, बीजीएम स्पोर्टस्, बाबूजमाल तालीम मंडळ, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, आझाद हिंद तरूण मंडळ दयावान ग्रुप, हिंदवी स्पोर्टस्, कै. उमेश कांदेकर युवा मंच, क्रांती बॉइज, रंकाळा वेस तालीम मंडळ, गणेश तरूण मंडळ, सुबराव गवळी तालीम मंडळ, प्रॅक्टिस क्लब, नंगीवली तालीम मंडळ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉरिडॉरसंदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेंगळुरू-मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये (बीएसईसी) कोल्हापूरचा समावेश व्हावा, या आग्रही भूमिकेसाठी जिल्ह्यातील उद्योजक आक्रमक झाले असून, या संदर्भात उद्या (१८ सप्टेंबर) उद्योजक आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची तातडीची बैठक होणार आहे. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील स्मॅक भवन येथे दुपारी तीन वाजता ही बैठक होणार असून, बैठकीस जिल्ह्यातील आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. कॉरिडॉरमध्ये कोल्हापूरचा समावेश व्हावा, ही मागणी सरकारकडे करण्यासंदर्भातील व्यूहरचना बैठकीत ठरणार आहे. मुंबईत या संदर्भात उद्योगमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याबाबत बैठकीत निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

बेंगळुरू-मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये (बीएसईसी) सुरुवातीला कोल्हापूरचा समावेश होता. कॉरिडॉरमुळे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला यामुळे बूस्ट मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, राज्य सरकारने ऐनवेळेला कॉरिडॉरचा फायदा सांगली जिल्ह्यातील पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्याला देण्याचे कारण दाखवत कोल्हापूरला यातून वगळले. या संदर्भातील घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. असा निर्णय होऊनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या संदर्भात आवाज उठविला नाही. त्यामुळे कोल्हापूरच्या औद्योगिक विकासावर मर्यादा आणणाऱ्या या निर्णयाचे गांभीर्य लोकप्रतिनिधींनी पटवून देण्यासाठी उद्योजकांनी उद्याची बैठक आयोजित केली आहे.

या संदर्भात शुक्रवारी (१६ सप्टेंबर) स्मॅक भवन येथे उद्योजकांची बैठक झाली होती. स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळले गेल्याच्या नामुष्कीवर चर्चा झाली होती. हा विषय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सरकार दरबारी पोहचविण्यावर उद्योजकांची एकमत झाले होते. त्या पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

कोण उपस्थित राहणार?

बैठकीस औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसह खासदार संभाजीराजे छत्रपती, धनंजय महाडिक यांच्यासह आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, प्रकाश आबीटकर, डॉ. सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर, राजेश क्षीरसागर, अमल महाडिक उपस्थित राहणार आहेत. खासदार राजू शेट्टी एका बैठकीच्या निमित्ताने दिल्लीत असल्याने ते बैठकीस उपस्थित राहणार नाहीत. मात्र, त्यांनी कॉरिडॉर संदर्भात उद्योजकांना संपूर्ण पाठिंबा कळविल्याची माहिती स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली.

'मटा कॉन्क्लेव'मुळे चालना

जिल्ह्यातील उद्योगांचा विकास व्हावा, यासाठी महाराष्ट्र टाइम्सने पुढाकार घेत गेल्या २६ ऑगस्टला मेक इन कोल्हापूर या विषयावर मटा कॉन्क्लेवचे आयोजन केले होते. कॉन्क्लेवचे प्रमुख पाहुणे असलेल्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापूरच्या औद्योगिक प्रश्नांसंदर्भात बैठक घेण्याची ग्वाही उद्योजकांना दिली होती. या 'मटा कॉन्क्लेव'मुळे कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रापुढील समस्यांना वाचा फुटली असून, कॉरिडॉरमधील समावेशासाठी उद्योजकांनीच पुढाकार घेतला आहे. आता लोकप्रतिनिधींच्या मदतीने हा प्रश्न सरकार दरबारी लावून धरला जाणार आहे.

===

कॉरिडॉरचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. त्यासाठी उद्याच्या बैठकीत व्यापक स्वरूपात चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातही जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी जिल्ह्यातील सर्व नेते राजकीय पक्ष सोडून एकत्र येणे अपेक्षित आहे.

- सुरेंद्र जैन, अध्यक्ष, स्मॅक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोगावतीवरील शिरगाव बंधारा खचला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

शिरगाव-आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) गावांच्या दरम्यान भोगावती नदीवरील बंधाऱ्याचे पिलर ढासळले असून बंधारा दोन ठिकाणी खचला आहे. बंधाऱ्यांची धोकादायक स्थिती पाहून पाटबंधारे विभागाने हा बंधारा वाहतुकीसाठी बंद केला आहे. वाहतूक बंद केल्याने १५ गावच्या नागरिकांना पर्यायी राशिवडे पुलावरून प्रवास करावा लागत आहे.

राधानगरी तालुक्यात भोगावती नदीवर शिरगाव-आमजाई व्हरवडे गावाच्या दरम्यान शिरगाव बंधारा आहे. या बंधाऱ्यामुळे कोल्हापूर भोगावती, आवळी परिसरातून शिरगाव आणि धामोड गावाकडे वाहतूक सुरू असते. सुमारे १५ ते २० गावाच्या नागरिकांना वाहतुकीसाठी सुलभ मार्ग म्हणजे शिरगाव बंधारा असे समीकरण निर्माण झाले आहे. याशिवाय उन्हाळ्यामध्ये शेती सिंचनासाठी पाणी अडवण्यासाठी या बंधाऱ्याचा महत्त्वाचा उपयोग होतो. या बंधाऱ्यांची स्थिती धोकादायक आहे. बंधाऱ्यावरून एसटी बसेस व अन्य अवजड वाहनांची वाहतूक सतत सुरू असते. चार दिवसांपूर्वी शिरगाव ग्रामस्थांनी बंधारा ढासळत आहे, अशी तक्रार पाटबंधारे विभागाकडे केली होती. शनिवारी सकाळी बंधारा दोन ठिकाणी खचल्याचे लक्षात आले.त्यानंतर पटबंधारे विभागाला काळताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी तातडीने दाखल झाले. तसेच राधानगरी तहसीलदार सचिन लागोठे यांनी बंधाऱ्यांची पाहणी केली व पूल वाहतुकीस बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शिरगाव, आवळी, कांबळवाडी, धामोड मार्गाकडे जाण्यासाठी पर्यायी तारळे किंवा राशिवडे बंधाऱ्यावरून वाहतूक सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरसेवकांचे महिन्याचे मानधन मराठा मोर्चाला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सांगलीत निघणाऱ्या २७ सप्टेंबर रोजीच्या मराठा क्रांती मोर्चाकरीता सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेतील मराठा सामाजाच्या नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन शनिवारी संयोजन समितीला दिले. महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार यांनी मोर्चातील जनतेच्या सोयी-सुविधांसाठी आणि स्वच्छतेसाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार असल्याचेही यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील, विरोधीपक्ष नेते दिग्विजय सूर्यवंशी, माजी उपमहापौर युवराज बावडेकर, पृथ्वीराज पवार, विक्रम सावर्डेकर, दिगंबर जाधव, महेश खराडे, संजय पाटील यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

जामदार म्हणाले, 'मराठा क्रांती मोर्चा हा पक्षविरहीत आहे. यामध्ये सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बाजूला ठेऊन सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर विविध समाजांच्या संघटनांकडूनही या मोर्चाला भरभरून पाठिंबा देण्यात येत आहे. मोर्चा सांगलीमध्ये होणार असल्यामुळे स्थानिक नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग होण्यासाठी सोमवारी सर्व पक्षातील मराठासह इतर समाजातील आजी माजी नगरसेवक, त्याचबरोबर १९८५पासून जे उमेदवार पालिका निवडणुकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते. अशा सर्वांची बैठक घेण्यात येणार आहे.'

सूर्यवंशी यांनी मोर्चाला येणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. त्यांना सर्व सोयी-सुविधा मिळतील यासाठी महापालिका यंत्रणा कामाला लागणार आहे. पालिकेच्या वतीने मोर्चाच्या मार्गावरील स्वच्छता, महिला व पुरुषांसाठी फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सांगली पालिकेकडे किती आहेत याची माहिती घेऊन, नजीकच्या विटा-इस्लामपूर, कोल्हापूर या ठिकाणांहून ती उपलब्ध केली जाणार आहेत.

शिवसेनेचे पृथ्वीराज पवार म्हणाले, 'या मोर्चाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. जैन, धनगर, लिंगायत, कोळी यांच्यासह इतर समाजांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. या मोर्चामध्ये सर्व आजी माजी नगरसेवकांना सहभागी केल्यास त्यांच्या संघटनाचा व अनुभवाचा या मोर्चासाठी फायदा होणार आहे.

हणमंत पवार म्हणाले, तब्बल चाळीस वर्षांनंतर मराठा समाज एकत्र आलेला आहे. औरंगाबादपासून परभणीपर्यंत सर्व मोर्चांमध्ये संख्या वाढतच गेली आहे. सांगलीत देखील हा मोर्चा त्यापेक्षा जास्त ताकदीने निघणार आहे. आपण स्थानिक असल्याने आपली जबाबदारी अधिक आहे. येणाऱ्या नागरिकांची सोय करण्यासाठी विविध समाज आणि सेवाभावी संघटनांनी देखील या मोर्चात सहभागी होण्यासाठी वॉर्डनिहाय बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

वीरशैव लिंगायत समाजाचा पाठिंबा

मराठा क्रांती मोर्चाला लिंगायत समाजाचा पाठिंबा असल्याची घोषणा श्री मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डींगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने यांनी शनिवारी केली. आपण सर्वच जण मराठे आहोत. अ‍ॅट्रासिटीचा कायदा रद्द करून दलित बांधवांवर अन्याय करण्याची कोणाचीच भूमिका नाही. परंतु, त्या कायद्याचा गैरवापर होणार नाही, अशी उपायोजना होणे आवश्यक आहे. राज्यकर्तेच असल्याने मराठा समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्षच झाले आहे. लिंगायत समाजाला काही प्रमाणात आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयना, चांदोली धरणांतून विसर्ग

$
0
0

शिराळा

चांदोली धरणातून शनिवारी दुपारी ४५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरण परिसरात गेल्या २४ तासांत ३२ मी.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अध्यापही पावसाची रिपरिप सुरू आहे. शिराळा तालुक्यातही रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. धरणात ३४.४० टीएमसी शंभर टक्के पाणीसाठा असल्यामुळे धरण व्यवस्थापनाने दुपारी धरणाच्या रिवर्स गेटमधून तीन क्युसेक प्रतिसेकंद तर वीज निर्मितीतून १५०० क्युसेक पाणी वारणा नदीत सोडले आहे. रविवारी वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. आज अखेर धरण परिसरात २३७३ मी. मी पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्य मापकावर झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसआयटीकडून सनातन साधकांचा छळ : अभय वर्तक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'एसआयटीकडून सनातनचा छळ सुरू असून, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपी सापडत नसल्याने समीर गायकवाड व डॉ. वीरेंद्र तावडे यांचा बळी देऊ नका, असे आवाहन करत खोटे पुरावे व कपोलकल्पित कहाण्या रचून विशेष पोलिस पथक (एसआयटी) सनातन संस्थेची बदनामी करत आहेत,' असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत केला. पोलिसांकडून होणाऱ्या बदनामीमुळे साधक सनातनपासून तुटतायेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

गणेश चतुर्थीच्यादिवशी डॉ. तावडे यांच्या घरावर एसआयटीने छापा टाकला. त्यात आक्षेपार्ह काही न सापडल्याने देवदच्या आश्रमातील दवाखान्यात अधिकृतपणे ठेवली जाणारी काही औषधे जप्त केली. ही औषधे सायकेट्रिक रुग्णांना देण्यासाठी असताना पोलिसांनी जाणीवपूर्वक नार्कोटिक ड्रग्ज असल्याची खोटी माहिती दिली आहे. आश्रमातील साधकांना तीर्थातून संमोहित करणारी औषधे दिली जात असल्याची खोटी माहिती कोर्टात दिली आहे. डॉ. तावडेंना पोलिस अधिकारी रवी पाटील व राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांनी पोलिस कोठडीत मारहाण केली. तावडेंचा ताबा घेण्यापासून प्रत्येक नियमबाह्य कृती करणाऱ्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. पत्रकार परिषदेला हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर, अॅड. समीर पटवर्धन, डॉ. मानसिंग शिंदे उपस्थित होते.

'मुख्यमंत्री सजग आहेत'

सनातनला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात सनातन संस्था गृहमंत्रिपद ताब्यात असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार का करत नाही, असा प्रश्न केला असतान डॉ. वर्तक यांनी मुख्यमंत्री सजग आहेत. वृत्तपत्रांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आम्ही सनातनच्या छळाबाबत सांगत आहोत. पत्रकार परिषदेस उपस्थित काही व्यक्तीही त्यांना निरोप पोहोचवतील असे डॉ. वर्तक यांनी सांगितले. आम्ही त्यांच्याकडे लेखी तक्रार देण्याचा प्रयत्न करू असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडलिक, दुसऱ्यांची मापे काढू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दुसऱ्याची मापे काढू नका. तुमच्या घरात २५ वर्षे खासदारकी होती. त्या कालावधीचा आलेख तपासा. त्यानंतरच माझा टॉप थ्रीमध्ये कसा नंबर आला ते विचारा,' असा उपरोधिक सवाल प्रा.संजय मंडलिक यांना खासदार धनंजय महाडिक यांनी विचारला.

येथील सायबर चौकात रस्यावरच मंडप उभारून द‌‌‌‌क्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांतर्फे रविवारी आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

खासदार महाडिक म्हणाले, 'पहिल्यादांच खासदार होवूनही अतिशय अभ्यासपूर्ण प्रश्न संसदेत मांडले. कोल्हापूरची अनेक विकासाची कामे मार्गी लावली. विकासनिधी आल्यानंतर सांगितले, असे असताना संजय मंडलिक माझ्या टॉप थ्रीवर प्रश्न विचारत आहेत. मंडलिक सकाळी कित‌ी वाजता उठतात, रात्री सहानंतर काय कार्यक्रम करतात हे साऱ्यांना माहित आहे. त्यामुळे माझ्यावर ‌टीका करताना विचार करावा. स्वच्छ भारत अभियानतर्गंत जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांनी चांगले काम करावे. राज्यात कोल्हापूर जिल्हा सधन असताना केवळ ‌तीन नगरपालिकाच हागणदारीमुक्त होणे भूषणावह नाही. कोल्हापूर महापालिकेसह सर्वच नगरपालिकांनी हागणदीरीमुक्तीसाठी प्रयत्न करून सरकारचे कोटींचे बक्षीस जिंकावे. '

प्रा. जयंत पाटील, आदिल फरास, एस. डी. पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली. यावेळी टॉप थ्रीमध्ये निवड झाल्याबद्दल खासदार महाडिक व पन्हाळा नगरपरिषद हागणदारीमुक्त झाल्याबद्दल नगराध्यक्ष असिफ मोकाशी यांचा सत्कार करण्यात आला. उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, फिरोज सौदागर, अनुरिमा माने, सरपंच रेश्मा शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शाजीदखान मेस्त्री यांनी स्वागत केले.

चौकट

मुश्रीफ सोडून निषेध

निमंत्रण पत्रिकेत आमदार हसन मुश्रीफ, ए.वाय. पाटील यांचे नाव होते. मात्र दोघेही कार्यक्रमाला गैरहजर राहिले. हा संदर्भ घेत संयोजक नितीन पाटील प्रास्ताविकात म्हणाले, 'आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत आहे. पण काहीजण आमच्यावर टीका करत आहेत. पक्षातील काहीजण जाणीवपूर्वक कार्यक्रमाला गैरहजर राहिले आहेत. आमदार मुश्रीफ सोडून अन्य लोकांचा ‌मी निषेध करतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवार हल्ल्यातील तिघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टाऊन हॉल बागेजवळ शनिवारी रात्री झालेल्या मारामारीतील तिघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. आसिफ शेख, शाहरुख शेख आणि मुनेर मुंगेरीलाल अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांसह आठ ते दहा जणांनी विशाल अनिल साळोखे (वय २२, रा. ट्रेझरी ऑफिसजवळ, कोल्हापूर) याच्यावर तलवार हल्ला केला होता. मारामारीनंतर दोन्ही गट आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता.

शनिवारी (ता. १७) रात्री दहाच्या सुमारास विशाल साळोखे हा त्याचा मित्र ओंकार शिंदे याच्यासह टाऊन हॉल बसस्टॉपजवळ विकास बोरकर याच्या पान टपरीसमोर उभा होता. यावेळी पानटपरीच्या मागे बसलेला आसिफ शेख याने येऊन विशाल साळोखे याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. 'मोहल्ल्यातील पोरांना त्रास देतोस काय?' अशी विचारणा करीत आसिफ शेख याच्यासह शाहरुख शेख, जुबेर महात, सागर कांब‍ळे, मुनेर मुंगेरीला यांच्यासह चार ते सहा तरुणांनी मारहाण केली. विशाल साळोखे आणि ओंकार शिंदे या दोघांना मारहाण केली. सनी कांबळे या तरुणाने साळोखे आणि शिंदे या दोघांनाही हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवले. यानंतर साडेअकराच्या सुमारास विशाल साळोखे आणि त्याचे सहा ते आठ मित्र मारामारीचा जाब विचारण्यासाठी आसिफ शेख याच्या राजेबागस्वार दर्ग्याज‍वळील घरी गेले. यावेळी शेख याच्यासह चार ते पाच जणांनी तलवार आणि काठीने मारहाण केल्याची तक्रार विशाल साळोखे याने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.

दरम्यान, हे दोन्ही गट आमने-सामने आल्याने राजेबागस्वार दर्गा परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावाची स्थिती होती. परिसरातील काही हातगाड्यांचीही तरुणांनी तोडफोड केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने दंगा घालणारे तरुण पळाले. शहर पोलिस अधीक्षक भारतकुमार राणे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली, त्याचबरोबर शनिवारी रात्रभर परिसरात पोलिस बंदोबस्तही तैनात केला होता. लक्ष्मीपुरी पोलिसांनी या प्रकरणी रविवारी तिघांना अटक केली. आसिफ शेख, शाहरूख शेख आणि मुनेर मुंगेरीलाल अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images