Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सतेज पाटील यांचे महाडिकांवर जोरदार टीकास्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'रामायणकाळात रावणाचा जीव जसा बेंबीमध्ये अडकल्याचे सांगितले जात होते तसा आता काहीजणांचा जीव हा गोकुळ दूध संघात दडला आहे. मात्र गोकुळमधील लोण्यालाच मी हात घातल्याने काहीजण तडफडत आहेत,' असा सणसणीत टोला आमदार सतेज पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना लगाविला. आमदार पाटील यांनी महाडिक यांचा नामोल्लेख टाळत त्यांचा खरपूस समाचार घेतला. 'आईवडिलांनी लाडाने देवाचे नाव ठेवले म्हणून कुणाला देवत्व येत नाही. कुणी देव बनत नाही. मात्र महाडिक हे स्वतःचे स्तोम माजविण्यासाठी स्वतःची तुलना देवाशी करत आहेत, यासारखे दुर्दैव नाही,' अशा शब्दांत त्यांनी महाडिकांवर टीकास्र सोडले.

शिवाजी पेठेतील नाथा गोळे तालीम मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री गणेश महाल या देखाव्याचे उद्‍घाटन शनिवारी रात्री झाले. या देखाव्याच्या उद्‍घाटन सोहळ्यानंतर आमदार पाटील यांनी महाडिक यांच्यावर कडाडून टीका केली. खासदार संभाजीराजे यांनीही यावेळी नेत्यांमुळेच जिल्ह्याचे नुकसान झाल्याची टीका केली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या हस्ते खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा सत्कार करण्यात आला. संभाजीराजे यांचा सत्कार झाल्यानंतर पी. एन. पाटील कार्यक्रमस्थळातून बाहेर पडले. महापौर अश्विनी रामाणे, आमदार राजेश क्षीरसागर यावेळी प्रमुख उपस्थित होते.

शिवाजी चौक येथील २१ फुटी गणेशमूर्तीच्या उद्‍घाटन सोहळ्यात माजी आमदार महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. महाडिक काका-पुतण्यांच्या टीकेला पाटील काय उत्तर देणार? याकडे लक्ष लागले होते. आमदार पाटील यांनी त्यांच्यावरील आरोपाला यावेळी प्रत्युत्तर दिले. शिवाजी चौकातील कार्यक्रमात महाडिक यांनी सतेज पाटील यांना उद्देशून साडेतीन फुटाच्या माणसाने महादेवाची उंची मोजण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला लगाविला होता. त्याचा समाचार घेताना आमदार पाटील म्हणाले, 'गणेशोत्सवात बाप्पाकडे जिल्ह्यावरील विघ्ने दूर व्हावीत यासाठी साकडे घालण्याऐवजी महाडिक मला नावे ठेवत आहेत. स्वतःची तुलना देवाशी करतात. मात्र आईवडिलांनी लाडाने देवाचे नाव ठेवले म्हणून कुणी देव होत नाही, याचे भानही त्यांना नाही.'

====

'गोकुळ'मधील लोणी खाऊनही काही मंडळी लोणी खाल्लेच नाही, अशा वल्गना करत आहेत. मात्र कोल्हापूरची जनता परजिल्ह्यातील लोकांची दादागिरी सहन करणार नाही. कोल्हापुरावर आलेले हे परजिल्ह्याचे विघ्न दूर करणारच.

सतेज पाटील, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मला लॉकअपमध्ये भीती वाटतेय : डॉ. तावडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत असलेला संशयित हिंदू जनजागृती समितीचा डॉ. वीरेंद्र तावडेला अन्य संशयित गुन्हेगारांबरोबर राहताना भीती वाटत आहे. लॉकअपमध्ये आपल्यावर घातपात होईल, अशी भीतीही त्याने आपले वकील अॅड. पटवर्धन यांच्याकडे व्यक्त केली. दरम्यान, पनवेल आश्रमातून ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांकडे चौकशी केली जात आहे.

डॉ. तावडेला कोर्टाने आठ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार त्याला राजारामपुरी पोलिस कोठडीत ठेवले आहे. कोर्टाने वकिलांना भेटण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार डॉ. तावडेची त्याचे वकील समीर पटवर्धन यांनी कोठडीत भेट घेतली. यावेळी तावडेने कोठडीची भीती वाटत असल्याचे वकिलांना सांगितले. तावडेसोबत पोलिस कोठडीत विविध गुन्ह्यांतील नऊ संशयित गुन्हेगार आहेत. त्यांच्यासोबत राहताना त्याला भीती वाटते. पानसरे यांची हत्या राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाली आहे. त्यामुळे कोठडीत अन्य एखादा संशयित पानसरेसमर्थक असला तर माझ्यावर हल्ला होऊ शकतो, असे त्याने वकिलांना सांगितले. पानसरे हत्येतील पहिला आरोपी समीर गायकवाडला राजारामपुरी पोलिस कोठडीत न ठेवता पोलिस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत ठेवले होते, पण तावडेला राजारामपुरीत ठेवले आहे याकडेही अॅड. पटवर्धन यांनी लक्ष वेधले. तावडेला रोज जेवण मिळते, पण चहा मिळत नसल्याची तक्रार केली. तसेच अन्य संशयितांसोबत फाटक्या चटईबरोबर झोपायला लागते. तावडेला लॉकअपमध्ये सुविधा मिळत नसल्याबद्दल अॅड पटवर्धन यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील यांना माहिती दिली. डॉ. तावडेच्या जीवाला धोका आहे. त्यांना चादर मिळत नाही. तसेच डॉक्टर असताना त्यांना अन्य संशयितांबरोबर लॉकअपमध्ये ठेवता. लॉकअपमधील शौचालयाला दरवाजा नाही. प्रचंड दुर्गंधी आहे. डास आहेत अशी तक्रारही अॅड. पटवर्धन यांनी केली. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी व कोर्टाला लॉकअपमधील स्थितीची माहिती देणार असल्याचे पटवर्धन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान अॅड. पटवर्धन यांनी समीर गायकवाडची कळंबा मध्यवर्ती कारागृहात भेट घेतली. यावेळी त्याने तावडे व फरार विनय पवार यांना ओळखत नसल्याचे पटवर्धन यांना सांगितले.

तावडेच्या औषधांची तपासणी

डॉ. तावडे जी औषधे घेत आहे त्या औषधांची पोलिसांनी सीपीआरमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली. डॉ. तावडे रक्तदाब, मधुमेहावरील औषधे नियमित घेत आहे. या औषधांमध्ये चेतासंस्थेवर परिणाम करणाऱ्या औषधांचे अंश आहेत का? नियमित घेणाऱ्या औषधांमुळे तपासास असहकार्य करत आहे का? याकडे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

आणखी दोघांची चौकशी

पनवेल आश्रमातील दोघा साधकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. एसआयटीच्या तीन पथकांच्या अधिकाऱ्यांनी डॉ. तावडे, समीर गायकवाड यांच्यासंबधी प्रश्नांची सरबत्ती संशयितांकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा क्रांती महामोर्चाची नियोजन बैठक

0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

मराठा क्रांती महामोर्चाच्या नियोजन व मायक्रो प्लॅनिंगसाठी रविवारी साताऱ्यातील स्वराज मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सातारा शहरात तीन ऑक्टोंबर रोजी भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोर्चामध्ये सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील सर्व मराठा समाजाला आपल्या मुलाबाळांसह सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे.

एक मराठा...लाख मराठा, जय भवानी...जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषनांचा नारा देण्यात आला. बैठकीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात संपूर्ण राज्यात मराठा क्रांती मोर्चाने रान उठवले आहे. लाखोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. साताऱ्यातही असाच मोठा मोर्चा काढण्याचे नियोजन आहे.

बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना प्रा. नितीन बानगुडे पाटील म्हणाले, 'जेव्हा जेव्हा मराठा एकवटला तेव्हा इतिहास घडला आहे. मराठा एकवटला तेव्हा दिल्लीचे तख्तही काबीज केले आहे. मराठ्यांचा जन्म हा संघर्षातून झाला आहे, ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वानी एकत्र यावे पुन्हा एकदा नव स्वराज्य निर्माण करूया. आता ती वेळ आली आहे. मराठ्यांनी मराठ्यांच्या लढ्यात उभे रहायला हवे.'

असे आहे नियोजन

साताऱ्यात हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी साताऱ्यातील गांधी मैदान येथे एकत्र येतील. जावली, महाबळेश्वरमधील लोक भू-विकास बँकेजवळील हुतात्मा स्मारकाजवळ जमतील. माण, खटाव वरून आलेले लोक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जमतील. वाई, खंडाळा, फलटण येथील लोक शाहू स्टेडियम येथे जमतील. मोर्चाचे मायक्रोप्लॅनिंग करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर १४ कमिट्या नेमण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रचार, प्रसार व साहित्य कमिटी, स्वयंसेवक कमिटी, विविध क्षेत्रात जनसंपर्क कमिटी, मीडिया कमिटी, अर्थ कमिटी, प्रशासन कमिटी, स्वच्छता कमिटी, व्हिडिओ, फोटो कमिटी, महिला व्यवस्था कमिटी, स्टेज मॅनेजमेंट कमिटी, भोजन व्यवस्था कमिटी, पार्किंग कमिटी, साऊंड कमिटी व वैद्यकीय सुविधा कमिटी नेमण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हावासिय मराठा बांधवांनी बहुसंख्येने या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा क्रांतीमोर्चाबाबत बैठक

0
0



कराड :

दैदिप्यमान इतिहास असलेल्या मराठा समाजावर हक्कांसाठी लढण्याची वाइट वेळ आली आहे. त्यामुळे आता राजकीय पक्ष, संघटना यांचे जोडे बाजूला ठेवून एकदा जातीसाठी लढण्यासाठी सातारा व कराड येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चांमध्ये कराडसह परिसरातून हजारो, लाखोंच्या संख्येने सहभागी होणार असल्याचा निर्धार येथील मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

सोनाई मंगल कार्यालयात सातारा येथील नियोजित मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना अनेक वक्त्यांनी आम्ही हजारोंच्या संख्येने मोर्चासाठी येणार असल्याची ग्वाही दिली. बैठकीला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, तालुकाध्यक्ष नितीन काशिद, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यसचिव अॅड. दीपक थोरात, मलकापूर नगरपंचायतीचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे आदी उपस्थिती होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रान्सफॉर्मर चोरीची घटना टळली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील महावितरणच्या तिळवणी मायनर ३३ केव्ही वीज उपकेंद्रात ३.१५ एमव्हीए क्षमतेच्या पावर ट्रान्सफॉर्मर चोरीला जाण्याची घटना वीज कर्मचारी व पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली. यात एका चोरट्याला पकडण्यात यश आले असून, दोन चोरटे फरार आहेत. मात्र, चोरट्याला पकडल्याने फरार आरोपींची नावे पोलिसांना समजली आहेत. गेल्या सहा महिन्यांत या भागातील चंदूर, साजणी, रुई,

माणगाव व यड्राव येथे रोहित्रातील तांब्याची कॉईल चोरीला गेलेल्या घटना सतत घडत होत्या.

या घटनेची अधिक माहिती अशी, तिळवणी मायनर उपकेंद्रात विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ३.१५ एमव्हीए क्षमतेचा पावर ट्रान्सफॉर्मर काढून त्या जागी १० एमव्हीए क्षमतेचा पावर ट्रान्सफार्मर बसविण्यात आला. त्यामुळे उपकेंद्रात मागील काही महिन्यांपासून ३.१५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर एका बाजूला ठेवण्यात आला. मात्र, दोन दिवसांपूर्वी ड्यूटीवरील यंत्रचालक मनोदय डोईजड यांना संबंधित रोहित्रातील ऑईल काही प्रमाणात सांडल्याचे आढळले. तर दुसऱ्या दिवशी सर्वच ऑईल रोहित्रातून मुद्दाम कोणीतरी बाहेर टाकून दिल्याचा संशय आला. तसेच रोहित्राचे नट-बोल्ट ढिले करून ठेवल्याचे दिसून आले. डोईजड यांनी ही बाब साजणी शाखेचे अभियंता अन्सार मुल्ला यांच्या निदर्शनास आणून दिली. इचलकरंजी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता डी.पी. भणगे व मुल्ला यांनी तातडीने पाहणी केली असता हा प्रकार चोरीसाठी केला असल्याचा अंदाज त्यांना आला. त्यांनी तातडीने हातकणंगले पोलिसांशी संपर्क साधून पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील

तांब्याची कॉईल चोरण्यासाठी चोरटे पुन्हा येऊ शकतात याची कल्पना पोलिसांना दिली.

पोलिस व उपकेंद्रातील सर्व वीज कर्मचारी कंट्रोल रुममध्ये चोरट्यांवर पाळत ठेवून बसले होते. चोरटे रोहित्रातील तांब्याची कॉइल काढण्याच्या प्रयत्नात होते. दबा धरून बसलेल्या कर्मचाऱ्यांनी अचानक धावा करुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता १ चोरटा हाती लागला. तर दोन फरार झाले. पकडलेल्या चोरट्याने फरार चोरांची नावे पोलिसांना सांगितली. या प्रकरणात महावितरणचे २ लाख, ९७ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद मुल्ला यांनी दिली. तर वडगाव, शहापूर ठाण्याच्या पोलीस अधिकऱ्यांनीही या प्रकरणी चोरट्याची चौकशी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरातील दोघे ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी निघालेल्या कोल्हापुरातील युवकांच्या कारला अतित (ता. कराड) नजीक शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले. राकेश मोहन निगवे (वय २८, रा. ८ नं. शाळेनजीक शिवाजी पेठ ) आणि श्रीपाद पेटकर (वय २८, रा. तेली गल्ली, शनिवार पेठ, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींवर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऐन गणेशोत्सवामध्ये झालेल्या अपघाताच्या वृत्ताने शनिवार पेठ परिसरात शोककळा पसरली होती.

रोहन विजय सांगावकर (वय ३२), पौरस पद्मकुमार भिवटे (वय २८), साईप्रसाद अनिल डोईफोडे (वय २९), दिनेश उर्फ पप्पू महावीर कानेट्टी (वय २६, सर्व रा. शाहूपुरी पाचवी गल्ली) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

शहरातील शनिवार पेठ येथील एका तरुण मंडळाचे सदस्य राकेश निगवे, श्रीपाद पेटकर, रोहन सांगावकर, पौरस भिवटे, साईप्रसाद डोईफोडे, दिनेश कानेट्टी यांनी शनिवारी(ता. १०) रात्री रोहन सांगावकर यांच्या कारमधून पुणे येथे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाण्याचा बेत आखला होता. गेल्या दहा वर्षापासून ते गणेशोत्सवामध्ये नियमित दगडूशेठच्या दर्शनासाठी जातात. यानुसार शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सर्वजण पुण्यास जाण्यासाठी निघाले. रात्री साडेबाराच्या सुमारास ते पुणे-बेंगळुरू महामार्गावरील अतित गावानजीक पोहोचले. यावेळी चालकास महामार्गावरील वळणाचा अंदाज आला नाही. त्याचबरोबर रस्त्यावरील एका पादचाऱ्यास चुकवताना चालकाचा ताबा सुटला. भरधाव कार रस्त्याकडेला असलेल्या २० ते २५ फूट खोल नाल्यात कोसळली. यामध्ये राकेश निगवे हे जागीच ठार झाले, तर श्रीपादसह अन्य सहाजण गंभीर जखमी झाले.

कराड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान श्रीपाद पेटकर याचा मृत्यू झाला. अतित येथील नागरिकांनी सर्व जखमींना उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर दोघांचे मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. जखमींवर कराडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद कराड पोलिस ठाण्यात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडगावमध्ये शेततळ्यातबुडून दोन मुलींचा मृत्यू

0
0

गडहिंग्लज

कडगाव (ता.गडहिंग्लज) येथे दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. धनश्री पांडुरंग सागर (वय ९) व सविता परशुराम विभूते (वय ११, मूळगाव शिरगाव ता.चिक्कोडी) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, धनश्री ही इयत्ता तिसरीत शिकत होती, शिक्षणासाठी ती आजोळी मामाकडे जरळी (ता.गडहिंग्लज) येथे असते. सध्या सुटीसाठी ती गावी आली होती. सविता हिचे आई-वडील कामानिमित्त कडगाव येथे वास्तव्यास असून ती इयत्ता सहावीत शिकते. धनश्री व सविता दोघी खेळत होत्या. खेळता-खेळता त्या दोघी माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब मंचेकर यांच्या शेतातील शेततळ्याजवळ आल्या. हे शेततळे चारही बाजूनी बंदिस्त असून चारीही बाजूने त्याला जाळीचे कुंपण व एका बाजूला गेट आहे. मात्र पाण्यात खेळण्याचा मोह झाल्याने धनश्री व सविता यांनी गेट उघडून आत प्रवेश केला. खेळता-खेळता तोल गेल्याने दोघीही पाण्यात पडल्या व बुडाल्या. कामगारांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी दोघींना पाण्यातून बाहेर काढले व तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दोघीनाही दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. धनश्री ही आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तर सविता हिला एक भाऊ आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमध्ये प्रवेशासाठी रांगा

0
0

गडहिंग्लज

'भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशासाठी गर्दी होत आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण देणारा प्रवेशाचा कार्यक्रम येथे होत असून येत्या आठवड्यात संपूर्ण जिल्हा आश्चर्यचकित होईल, अशा मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य मावळ्यांच्या सोबतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आम्ही त्यांचेच वंशज असून औषधासाठी नसलेल्या भाजपमध्ये आज प्रवेशासाठी रांगा लागत आहेत. केवळ सत्तेवर आहे म्हणून नव्हे तर मनापासून लोक भाजपमध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहेत. आगामी निवडणुकीत तुमच्या सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यात साम्राज्य उभे करू,' असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

येथील म.दु.श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित भव्य मेळाव्यात ते बोलत होते. इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर, बेळगावचे आमदार संजय पाटील, गोडसाखर संचालक डॉ. प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. शहापूरकर व चव्हाण यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'गेल्या दोन वर्षात अनके योजना राबविण्यात आल्या. सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये सामान्य माणसाला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. विचारांची बैठक असणारे डॉ. प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाण यांनी सर्व लवाजम्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. ज्या विश्वासाने व ताकदीने आमच्यावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला त्याच विश्वासाने आम्ही त्यांची काळजी घेऊ. देशाचा विकास हीच भाजपची संस्कृती असून सर्वांचा विकास व्हावा यासाठी नगरपालिका, जिल्हा परिषद सगळ्या ठिकाणी भाजपचे पारदर्शक उमेदवार निवडून आल्यास देशाचा कायापालट होईल.' डॉ. शहापूरकर व चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशाने पक्षाला बळकटी मिळेल व त्याचे प्रत्यंतर विजयात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केली.

आमदार सुरेश हळवणकर म्हणाले, 'राज्य सरकार मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा गंभीरपणे विचार करीत आहे. या विभागातील भूमिपुत्र या नात्याने येथील भूमीपुत्रांना न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ४०० कोटी, टोलसाठी ४५० कोटी, कोल्हापूरच्या महालक्ष्मी आराखड्यास मान्यता, कन्यागत महापर्वकाळत नृसिंहवाडीचा विकास चंद्रकात पाटील यांच्या पुढाकाराने झाला. काळभैरी डोंगराचा विकाससुद्धा पर्यटनाच्या माध्यमातून पालकमंत्रीच करतील.' गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील एमआयडीसीमध्ये सर्वाधिक उद्योगाचे जाळे यावे यासाठी प्रयत्नशील असू, असे आश्वासनही त्यांनी दिले. डॉ. शहापूरकर व चव्हाण यांच्यासोबत चारही संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास कारखान्याचे विस्तारीकरण करू. तसेच जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्पही पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

डॉ. प्रकाश शहापूरकर म्हणाले, 'दोन पिढ्यांच्या इतिहासात शहापूरकर घराण्यातील हा पहिला पक्षप्रवेश आहे. आजपर्यंत कोणत्याच पक्षाची बांधिलकी स्वीकारली नाही. पण भारतीय जनता पक्षाला मी स्वतःला समर्पित करीत आहे. गडहिंग्लज तालुक्याच्या इतिहासातील पहिले सर्वात मोठे राजकीय स्थित्यंतर असून गडहिंग्लजकर वैचारिक परिवर्तनाची वाट पाहत होते. ते आज पूर्ण झाले असे मी मानतो. गडहिंग्लज शहराचा विकास हे वैयक्तिक काम समजून पालकमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन त्याची पूर्तता करावी. '

प्रकाश चव्हाण म्हणाले, 'तालुक्याच्या नेतृत्वाने आजपर्यंत फक्त विश्वासघाताने फसविण्याचे काम केले. जनतेने त्यांना आता ओळखले आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. येत्या पाच वर्षात कारखान्यात खूप मोठे बदल दिसून येतील, फक्त आशीर्वाद द्या. दहा वर्षात मतदारसंघात पोकळी भरून काढण्यासाठी मतदार संघ दत्तक घ्या आणि परिसराच्या विकासकामांना चालना द्या. तालुक्यात कोणताही उद्योग नाही. तरूण पिढीच्या हाताला काम देण्यासाठी मोठा प्रकल्प उभारला गेला पाहिजे. ग्रेमक्सच्या नावावर दोन निवडणुका झाल्या. मात्र प्रकल्प काही सुरु झालेला नाही.'

मेळाव्यास जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, मारुती राक्षे, तालुकाध्यक्ष अॅड.हेमंत कोलेकर, शहराध्यक्ष रमेश रिंगणे, गडहिंग्लज युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रीतम कापसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट

गडहिंग्लज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष वसंतराव यमगेकर यांचे चिरंजीव तुषार यमगेकर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. कदाचित राष्ट्रवादीच्या नाराज गटाची ही 'लिटमस टेस्ट' असू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीची मोठी फळी याप्रसंगी जरी प्रवेशित झाली नसली तरी भविष्यात ती भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा मेळाव्याच्या ठिकाणी सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मेक इन कोल्हापूर’साठी उद्योजक सरसावले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने आयोजित मेक इन कोल्हापूर या विषयांवर 'मटा कॉन्क्लेव'च्या माध्यमातून कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्रात निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणात शहरातील उद्योजक 'मेक इन कोल्हापूर'साठी सरसावले आहेत. 'मटा कॉन्क्लेव'मध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील उद्योजक संघटनांची येत्या आठवड्यात व्यापक बैठक होणार असून, त्यात कोल्हापूरचे औद्योगिक प्रश्न मांडण्याविषयी चर्चा होणार आहे.

कोल्हापूरच्या उद्योग विकासाच्या मंदावलेल्या गाडीला वेगाचे इंजिन जोडले जावे, यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील उद्योगक्षेत्राचे रखडलेले प्रश्न मार्गी लागावेत आणि विकासाचा अजेंडा निश्चित व्हावा, या हेतूने 'महाराष्ट्र टाइम्स'ने चौथ्या वर्धापनदिनानिमित्त २६ ऑगस्ट रोजी 'मटा कॉन्क्लेव' आयोजित केला होता. हॉटेल सयाजी येथे झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूरचे उद्योग आणि आयटी हे प्रमुख विषय घेऊन हा कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आला होता.

उद्यमशीलतेसाठी अतिशय पूरक वातावरण असलेल्या कोल्हापूरला संधी असूनही उद्योग विकासात मर्यादा येत आहेत. गोवा, कोकण आणि कर्नाटकशी जोडणारे राष्ट्रीय महामार्ग ही कोल्हापूरची जमेची बाजू आहे. मात्र, तरीही मुंबई-बेंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये कोल्हापूरचा समावेश करण्यात आलेला नाही. सर्वाधिक महसूल देणाऱ्या शहरांमध्ये समावेश असूनही शहराच्या विकासाशी संबंधित अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. या प्रश्नांना कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून वाचा फोडण्यात आली होती. उद्योग जगतातील प्रतिनिधी आणि 'महाराष्ट्र टाइम्स'ने मांडलेल्या प्रश्नांनंतर उद्योगमंत्री देसाई यांनी त्यांच्या भाषणात कोल्हापूरच्या औद्योगिक प्रश्नांसंदर्भात मुंबईत बैठक घेण्याची ग्वाही दिली होती. या बैठकीच्या तयारीसाठी आता कोल्हापुरातील उद्योजक संघटना पुढे आल्या असून, बैठकीत मांडण्यात येणाऱ्या संभाव्या विषयांसंदर्भात सर्व संघटनांची येत्या आठवड्यात बैठक होणार आहे. यात 'स्मॅक', 'गोशिमा', 'मॅक', कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन व फाउंड्री क्लस्टर या औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

याबाबत 'इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा सर्वांत मोठा प्रश्न कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रापुढे आहे. हा विषय आमच्याही अजेंड्यावर आहेत. त्यामुळे उद्योगमंत्र्यांपुढे मुंबईच्या बैठकीत हा विषय प्रामुख्याने मांडण्याची तयारी आम्ही करत आहोत, अशी माहिती 'स्मॅक'चे अध्यक्ष सुरेंद्र जैनी यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

मेक इन कोल्हापूर या विषयावरील मटा कॉन्क्लेवमध्ये उद्योगमंत्र्यांनी कोल्हापूरच्या प्रश्नांसंदर्भात बैठक घेण्याची ग्वाही दिली आहे. आता आपली जबाबदारी वाढली असून, त्यांना भेटण्यापूर्वीचे नियोजन आणि मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही येत्या आठवड्यात एक व्यापक बैठक घेणार आहोत.

- सुरेंद्र जैन, अध्यक्ष, स्मॅक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉल्बी चालकांसह सातजणांवर गुन्हा

0
0

इचलकरंजी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करुन ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी डॉल्बीचालकासह सातजणांवर गांवभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामध्ये इचलकरंजी साऊंड सिस्टिम असोसिएशनचा अध्यक्ष अविनाश नेजे याचा समावेश आहे.

अविनाश नेजे (रा.महाराणा प्रताप चौक), जनार्दन केसरकर (रा. गणेशनगर), सुभाष बुचडे (रा.वेताळ पेठ), प्रविण रावळ (रा.सुतार मळा) हे चौघे साऊंड सिस्टिम असोसिएशनचे पदाधिकारी तर साऊंड सिस्टिम चालक राहुल धुमाळ( रा. भोने माळ) व चोकाक येथील विशाल डेकोरेटर्सचे मालक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

अविनाश नेजे यांनी शनिवारी घरगुती गणेश विसर्जनासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीवर स्पिकर लावण्यासाठी गांवभाव पोलिसांकडे अर्ज केला होता. पोलिसांनी आवाजाची मर्यादा घालून परवानगी दिली होती. मात्र, जनता चौक ते गांधी पुतळा या रोडवर मिरवणूक आली असताना ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन करीत डॉल्बीचा दणदणाट सुरु होता. डॉल्बीच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होऊ लागला. मिरवणुकीत ट्रॅक्टर ट्रॉलीवर डॉल्बी सिस्टिम लावण्यात आली होती.

विशेष म्हणजे अविनाश नेजे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन पोलिसांविरुध्द तक्रार केली होती. त्यानंतर न्यायालयाने आवाजाची मर्यादा राखण्याची लेखी हमी देवूनच पोलीसांकडून परवानगी घ्यावी ,असे आदेश दिले होते. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही त्यांनी भंग केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मशानभूमीसाठी विनामोबदला जागा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा स्मशानभूमी विस्तारीकरणासाठी आमच्या मालकीची आवश्यक तेवढी जमी विना मोबदला दिली जाईल, असे आश्वासन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी रविवारी दिले. छत्रपती कुटुंबिय नेहमी कोल्हापूरच्या विकासाच्या पाठीशी राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

मालोजीराजेंच्या मालकीची अडीच एकर जमीन पंचगंगा स्मशानभूमीच्या ‌विस्तारीकरणासाठी मिळावी, अशी सर्वपक्षीय कृती समितीची मागणी आहे. त्यासाठी शिष्टमंडळाने न्यू पॅलेसमधील कार्यालयात मालो‌जीराजेंची भेट घेतली. त्यावेळी बैठकीत त्यांनी आश्वासन दिले.

मालोजीराजे म्हणाले, 'संपुर्ण राज्यात केवळ कोल्हापूरातच पंचगंगा स्मशानभूमीत दहन ‌व विधीसाठीचे साहित्य मोफत दिले जाते. मात्र वाढलेल्या लोकसंख्येनुसार स्मशानभूमीची जागा अपुरी पडत आहे. परिणामी सेवा, सुविधा देण्यात मर्यादा येत आहेत. मी आमदार असताना स्मशानभूमीच्या जागेचे सपाटीकरण करून घेतले. पेव्हिंग बॉक्स बसवून घेतले. त्याचवेळी विस्तारीकरणासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडले. पण यावेळी स्मशानभूमीसाठी जेवढी जमीन गरजेची आहे, तेवढी आम्ही विनामोबदला देण्यास तयार आहोत. कोल्हापूरच्या विकासात नेहमीच छत्रपती घराण्याचे योगदान राहिले आहे. स्मशानभूमीसाठी लागणारी आमची जमीन कुळ खाडे यांच्या ताब्यात आहे. त्यांनाही जमीन सोडण्याची सर्वजण विनंती करू.'

कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, पंचगंगा स्मशानभूमीत सध्या मृतदेह दहनासाठी ३८ बेड आहेत. ती अपुरी पडत आहेत. दीडशे बेडची गरज आहे. इतके बेड बसवण्यासाठी आणि अन्य सुविधांसाठी स्मशानभूमीचे विस्तारीकरणाची आवश्यकता आहे.' भाजपचे महेश जाधव, जयकुमार शिंदे यांचे भाषण झाले. बाबा पार्टे, गजानन देसाई, लाला गायकवाड, सुनील पाटील, ‌फिरोज सरगुर आदी उपस्थित होते.

संभाजीराजेंची मान्यता

आमच्या मालकीची जमीन देण्यास श्रीमंत शाहू महाराज, खासदार संभाजीराजे यांच्याशीही चर्चा केली आहे. त्यांनी मान्यता दिली आहे. ‌जमीन देवून विस्तारीकरणासाठी आवश्यक असल्यास निधीही देईन, असेही संभाजीराजेंनी सांगितल्याचे मालोजीराजे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्ल्सचे गुंतवणूकदार वाऱ्यावर

0
0

satish.ghatage@timesgroup.com,

tweet@satishgMT

कोल्हापूर : पर्ल्समधील फसवणूक लक्षात घेऊन सेबीने पावणेदोन वर्षांपूर्वी देवघेवीचे व्यवहार बंद केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अंदाजे ५५ हजार गुंतवणूक वाऱ्यावर सोडण्यात आले. या गुंतवणूकदारांचे अंदाजे ६०० कोटी रुपये अडकले आहेत.

दामदुप्पट रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या पर्ल्सवर सेबीने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. सेबीने (भांडवल बाजार नियंत्रण सेक्युरिटीज अॅड एक्स्चेंज बोर्ड) पर्ल्समधील गुंतवणूकदारांची फसवणूक लक्षात व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पर्ल्समध्ये देशभरातील पाच ते सहा कोटी गुंतवणूकदार आहेत. सेबीकडून परवाना न घेता सामूहिक गुंतवणूक योजना राबवून तब्बल ४९ हजार कोटी रूपये गुंतवणूकदारांकडून जमा केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अंदाजे ५५ हजार कोटी गुंतवणूकदारांनी शेकडो कोटीची गुंतवणूक केली आहे. मुदत पूर्ण झालेल्या ठेवींची रक्कम ६०० कोटी इतकी आहे.

पैसे दामदुप्पट होणार म्हणून कुणी निवृत्ती वेतनातील रक्कम पर्ल्समध्ये गुंतवली. मुलीच्या लग्नात पाचपट रक्कम मिळणार म्हणून विम्याचे पैसे थेट पर्ल्समध्ये गुंतवले. दुप्पट रक्कम होईल या अमिषाने गुंतवणूकधारकांची संख्या मोठी आहे. मुदत पूर्ण झालेल्या ठेवी मिळवण्यासाठी जिल्ह्यातील ग्राहक स्टेशन रोड परिसरातील कार्यालयात खेटे मारतात, पण त्यांना रक्कम मिळत नाही. सेबीने व्यवहारावर बंदी आणली आहेत, असे उत्तर मिळत आहे.

सेबीने ठेवी देण्यास बंदी आणल्याने अनेक गुंतवणूकधारकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. गुंतवणूकधारकांनी पर्ल्सच्या एंजटाकडे धाव घेतली असली तरी त्यांनीही हात वर केले आहेत. पर्ल्स गुंतवणूक करणाऱ्यांनी एजंटावर विश्वास ठेवला होता. बहुतांशी एजंट हे गुंतवणूकदारांचे जवळचे नातेवाईक व मित्र आहेत. त्यांच्या अमिषाला व त्यांनी विश्वास दाखवल्याने गुंतवणूक केली आहे. एजंटांना गडगंज कमिशन मिळाले असले तरी गुंतवणूकदारांना मात्र सध्या हात हालवत बसावे लागले आहे.

गुंतवणूकधारकांना पैसे मिळत नसल्याने मोठे हाल होत आहेत. कार्यालयात कोणी दाद देत नाही. शिवसेनेने आंदोलन करून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. पण सेबीचे कारण सांगून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर व्यक्तीरिक्त जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी विधानसभा व लोकसभेत पर्ल्सच्या गुंतवणुकीवर वाचा फोडलेली नाही. त्यामुळे पर्ल्सचे गुंतवणूकदार आता रस्त्यांवर उतरण्याचा विचार करू लागले आहेत.

पर्ल्सच्या संचालकांच्या संपत्तीवर टाच

सेबीने पर्ल्सच्या प्रवर्तक व संचालकाच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मुंबईतील पर्ल्सचे गुंतवणूकदार एकवटले आहेत. गतवर्षी त्यांनी आझाद मैदानावर कंपनीच्याविरूद्ध धरणे आंदोलन केल्यानंतर सेबीला जाग आली. त्यानंतर सेबीने प्रवर्तक व संचालकांच्या संपत्तीवर टाच आणली. सर्व गुंतवणूकदार एकत्र आले तर सरकारला गुंतवणूकदारांची रक्कम देण्यासाठी कार्यवाही करावी लागेल.

एजंटांचे हाल

काही प्रामाणिक एजंटांचे मात्र हाल होऊ लागले आहेत. त्यांच्या दाराचे उंबरे गुंतवणूकदार झिजवत आहेत. तुमच्यावर भरवसा ठेऊन आम्ही गुंतवणूक केली. पण तुम्ही केसाने गळा कापला असे शब्द ऐकावे लागत आहेत. काही एजंटांनी घरातून बाहेर पडणे बंद केले आहे. महिला एजंटांना पै पाहुण्यांच्यात टोमणे खावे लागत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तावडेसाठी स्वतंत्र कोठडीची व्यवस्था

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने अटक केलेला दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याने कोठडीत जीविताला धोका असल्याच्या केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याची राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत स्वतंत्र व्यवस्था केली आहे. या कोठडीत तावडेला एकट्यालाच ठेवले आहे. दरम्यान, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात मिळालेली संशयास्पद औषधे तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनच्या मुंबईतील कार्यालयात पाठविण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

एसआयटीकडून वीरेंद्र तावडेची चौकशी सुरू आहे. दिवसभर चौकशीनंतर तावडे याला रात्री राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवले जाते. या कोठडीत अन्य आरोपीही असतात. मात्र आरोपींसोबत रहावे लागत असल्याने जीवितास धोका असल्याची तक्रार तावडेने वकिलांमार्फत पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी रविवारी तातडीने त्यासाठी स्वतंत्र कोठडीची व्यवस्था केली. त्यासाठी राजारामपुरीतील तीन आरोपींना करवीर पोलिस ठाण्याच्या कोठडीत हलविण्यात आले. याशिवाय तावडेवर नजर ठेवण्यासाठी बंदोबस्तही वाढवला आहे. कोठडीत डास खूप असल्याने आणि पुरेसे अंथरूण, पांघरूण नसल्याने झोप लागत नसल्याची तक्रारही तावडेच्या वकिलांनी कोर्टात केली होती.

दरम्यान, तावडेचा चार पथकांकडून तपास सुरूच असून, त्याच्या माहितीत विसंगत माहिती मिळत आहे. त्याच्याशी संबंधित इतरांकडूनही माहितीची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी 'सनातन'च्या पनवेलच्या आश्रमातील एक डॉक्टर आणि एका ड्रायव्हरचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. संशयास्पद औषधे तपासणीसाठी मुंबई येथील अन्न व औषध प्रशासनच्या कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहेत.

गायब वाहनांचे गूढ कायम

तावडेच्या नावावरील बेपत्ता वाहनांचा गुंता वाढला आहे. वाहने स्क्रॅप केल्याचे तावडेने चौकशीत सांगितले. मात्र त्याने ज्या व्यक्तीला ही वाहने विकली होती, त्या व्यक्तीने ती स्क्रॅप केली नसल्याचे पोलिसांना सांगितले. वाहने स्क्रॅपसाठी का विकली याचेही समर्पक उत्तर तावडेकडून मिळालेले नाही. त्यामुळे गायब असलेल्या वाहनांचे गूढ वाढले आहे. विशेष म्हणजे यातील ट्रॅक्स तावडेने आश्रमासाठी अर्पण केली होती. ट्रॅक्सचा उल्लेख एनआयएच्या तपासातही आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुतात्मा शिंदेंच्याआईचे निधन

0
0

हुतात्मा शिंदेंच्या

आईचे निधन

सातारा

मुंबई येथे कर्तव्य बजावताना तरुणाच्या हल्ल्यात हुतात्मा झालेले वाहतूक शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा सोमवारी तेरावा होता. तेराव्याच्या विधीवेळी त्यांच्या आई कलावती यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. या घटनेने शिंदे यांच्या कुटुंबीयांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

खार पश्चिमेला पेट्रोल पंपावर कर्तव्य बजावताना अल्पवयीन मोटारसायकल चालकाला कॉन्स्टेबल विलास शिंदे यांनी अडवले. वाहनचालक लहान असल्याने त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला बोलवायला सांगितले होते. आपल्या भावाला परवाना विचारल्याचा राग आल्याने अहमद कुरेशी याने कॉन्स्टेबल शिंदेच्या डोक्यात दांड्याने फटका मारला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांच्यावर गेल्या नऊ दिवसांपासून लीलावती हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

विलास शिंदे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर डोंगर कोसळला होता. शिरगाव येथे शिंदे यांचा सोमवारी तेराव्याचा विधी सुरू होता. यावेळी आईला हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, सून, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१९३ हॉस्पिटलचे परवाने अडकले

0
0

Janhavi.Sarate@timesgroup.com

Tweet : @ MTjanhavisarate

कोल्हापूरः रहिवास वापरासाठी असलेल्या जागेत हॉस्पिटल उभारल्यानंतर त्याचा चेंज ऑफ युज करण्यासाठी पाठविण्यात आलेले १९३ हॉस्पिटल्सचे प्रस्ताव पडून आहेत. हॉस्पिटलला चेंज ऑफ युजची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी विकसन कर किंवा नव्या नियमानुसार आकारणी करावी याबाबत सरकारकडे मार्गदर्शनासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे १९३ हॉस्पिटलला परवाने मिळण्यासाठी किमान सहा महिन्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

व्यावसायिक परवान्यासाठी दरवर्षी डॉक्टरांनी अर्ज केला तर तो मंजूर होत नसल्याचा अनुभव डॉक्टरांना आहे. व्यावसायिक परवान्यासाठी अग्निशमन, बांधकाम, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी अनेक विभागांच्या 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' ची आवश्यकता लागते. यातील बांधकाम विभागाकडून हॉस्पिटलच्या चेंज ऑफ युजसाठी नो ऑब्जेशन दिली नसल्याने १९३ हॉस्पिटलचे प्रस्ताव परवान्यासाठी रखडले आहेत.

महापालिका कार्यक्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या हॉस्पिटलला दरवर्षी व्यावसायिक परवान्याचे नूतनीकरण यापूर्वी करावे लागत असे. अलीकडे मात्र तीन वर्षांतून एकदा नूतनीकरण करण्याचे बंधनकारक आहे. तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने अग्निशमन दल, बांधकाम, सॅनिटरी, आरोग्य आणि प्रदूषण नियंत्रन मंडळाचे 'नो ऑब्जेक्शन' सर्टिफिकेट सक्तीचे केले आहेत. या सर्वांच्या सर्टिफिकेटची पूर्तता झाल्याशिवाय परवाना नूतनीकरण होणार नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शहरात २६० हॉस्पिटल आहेत, त्यापैकी ६७ हॉस्पिटलला परवाने देण्यात आले असून उर्वरित १९३ हॉस्पिटलचे अग्निशमन दल, सॅनिटरी, आरोग्य आणि प्रदूषण नियंत्रन मंडळाचे नो ऑब्जेक्शन मिळाले असले तरी बांधकाम विभागाच्या नव्या चेंज ऑफ युज नियमामुळे हॉस्पिटलला विकसन कर लावायचा की, नव्या नियमानुसार शुल्क आकारणी करायची यासाठी हे परवाने अडकले आहेत. जर विकसन कर लावायचा झाल्यास हॉस्पिटलला एकदाच ५० हजार रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागेल तर नवीन नियमानुसार आकरणी केल्यास एका हॉस्पिटलला १० लाखांपासून ४० लाखांपर्यंत भरावे लागेल. नवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव वगळता जवळपास अनेक प्रस्ताव परवानगीच्या प्रतिक्षेत असल्यामुळे डॉक्टरांच्या वर्तुळातून नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे.

...........

शहरातील हॉस्पिटलच्या नूतनीकरणाचा प्रश्न नेहमीच येत असतो. बॉम्बे अॅक्ट पूर्वीचे अनेक हॉस्पिटल असल्यामुळे तिथे सरकारी नियमानुसार बदल करणे खूप कठीण आहे. त्यात चेंज ऑफ युजमध्ये बदल करण्यासाठी शहरातील हॉस्पिटलचे परवाने रखडले आहेत.

डॉ. प्रवीण हेंद्रे, अध्यक्ष, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन

............

शहरातील २६० पैकी १९३ हॉस्पिटलचा वापर चेंज ऑफ युज करण्यासाठी त्याला सरकारच्या नियमानुसार कोणत्या शुल्कची आकारणी करावी याबाबत सरकारचे मार्गदर्शन मागविले आहे. या प्रक्रियेसाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

डॉ. अरुण वाडेकर, आरोग्य अधिकारी, महापालिका

...............

शहरातील रुग्णालये :२६०

सुपर स्पेशालिस्ट:१२

परवाना नूतनीकरणाचे प्रस्ताव: १९३

मंजूर प्रस्ताव :६७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉल्बीचा बसणार दणका

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिस प्रशासनाने गणेश विसर्जन मिरवणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे आगमन केल्यानंतर सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे विसर्जन डॉल्बीमुक्तीत व्हावे, यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. डॉल्बी लावणाऱ्या मंडळांचे डॉल्बी तत्काळ जप्त केले जातील, त्याचबरोबर संबंधित दोषींना पाच वर्षे कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंडही होऊ शकतो, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. शिवाय विसर्जन मिरवणुकीत अंमली पदार्थांच्या गैरवापरावरही पोलिसांची नजर राहणार आहे.

पोलिसांनी गेल्या महिन्याभरापासून गणेश मंडळांसह डॉल्बी मालक आणि चालकांचेही डॉल्बीमुक्तीसाठी प्रबोधन केले. वेळोवेळी बैठका घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आ‍वाहन केले. प्रसंगी आवाज मर्यादेचा भंग करणाऱ्या मंडळांवर कारवाईचा बडगाही उगारला. त्यामुळे गणेशाचे आगमन आवाज मर्यादेत आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात झाले. दरवर्षी राजारामपुरीत गणपतीच्या आगमनालाच डॉल्बीचा दणदणाट होतो. यंदा मात्र पोलिसांच्या खबरदारीने आणि लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे आवाज मर्यादित राहिला. गणेश आगमनाची संधी हुकल्याची भावना बोलून दाखवणारी काही मंडळे विसर्जन मिरवणुकीत ऐनवेळी डॉल्बीचा दणदणाट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनीही डॉल्बी वाजवून आवाज मर्यादेचा भंग करणाऱ्या मंडळांना कायदेशीर कारवाईचा स्पष्ट इशारा दिला आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावर मंडळांनी डॉल्बी लावू नये, यासाठी बारा तास आधीच विसर्जन मार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे. दोन बेस आणि दोन बॉक्सपेक्षा अधिक यंत्रणा उभारणाऱ्या मंडळांवर तत्काळ जप्तीची कारवाई होईल. शिवाय दोन बेस आणि दोन बॉक्स वापरूनही आवाज मर्यादेच भंग करणाऱ्या मंडळांना ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून आवाजाची पावती मिळणार आहे.

पोलिसांकडे २९ ध्वनीमापक यंत्रे आहेत. या यंत्रांचा वापर करणाऱ्या पोलिसांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. आवाज मर्यादेचे उल्लंघन करणारी साउंड सिस्टिम तातडीने जप्त करण्यासह डॉल्बी चालक आणि संबंधित मंडळांवर कारवाई होणार आहे. ध्वनी प्रदूषण कायदा उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल केले जातील. या गुन्ह्याअंतर्गत दोषींना प्रत्येकी पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो, त्यामुळे मंडळांनी आवाज मर्यादेचा नियम पाळावा, असे आवाहन जिल्हा पोलिस प्रशासनाने केले आहे.

काही मंडळांसह डॉल्बी चालकांकडून सोशल मीडियाद्वारे डॉल्बी लावण्याचे आवाहन केले जात आहे. पोलिसांनी डॉल्बीसाठी सूट दिल्याचा अपप्रचारही केला जात आहे. पोलिसांनी सायबर सेलद्वारे अशा मंडळांवर नजर ठेवली आहे. काही मंडळांनी राजकीय नेत्यांच्या हस्तेच डॉल्बीच्या उद्‍घाटनाचे बेत आखले आहेत. हे मनसुबे उधळून लावण्यासाठी पोलिसांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही डॉल्बीविरोधी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सोशल मीडियात अपप्रचार

डॉल्बीबाबत काही लोकांकडून सोशल मीडियात जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. पोलिसांनी चार बेस आणि चार बॉक्स लावण्यास परवानगी दिल्याची अफवा पसरवली जात आहे. २००८ मध्ये मिरवणुकीत झालेल्या राड्यानंतर शिवाजी पेठेतील दोन मंडळांवर मिरवणुकीत सहभागी होण्यास बंदी घातली होती. ती मंडळे पुन्हा एकदा मिरवणुकीत सहभागी होऊन राडा घालण्याची तयारी करीत आहेत. या मंडळांकडून डॉल्बीसाठी प्रयत्न सुरू असल्याचीही जोरदार चर्चा आहे. या मंडळांवर पोलिसांना विशेष नजर ठेवावी लागणार आहे.

अंमली पदार्थांवर पोलिसांची नजर

विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांचे कार्यकर्ते अंमली पदार्थांचे सेवन करून सहभागी होतात. या काळात शहरात मद्यासह गांजा आणि इतर अंमली पदार्थांचीही छुपी विक्री सुरू असते. यातूनच मिरवणुकीत वादाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे अंमली पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे. गुरूवारी जिल्ह्यातील मद्यविक्रीही बंद राहणार आहे.

सध्याचा पोलिस बंदोबस्त

पोलिस निरीक्षक - ८

एपीआय, पीएसआय - २६

पोलिस कर्मचारी - ४५१

राखीव पोलिस दल - २६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलावर अत्याचार

0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

पलूस तालुक्यातील कुंडल येथे नऊ वर्षे वयाच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. चिड आणणारी घटना समोर येताच गावकऱ्यांनी गाव बंदची हाक देऊन संशयित सचिन पाटोळे याचे घर गाठून त्याच्या घराची मोडतोड केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करताना पाटोळे याला अटक करून तासगावला हलविले.

तीन दिवसांपूर्वी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कुंडलमधील नऊ वर्षे वयाचा मुलगा दुर्वा आणण्यासाठी खंडोबा देवळाच्या पाठीमागे गेला होता. त्यावेळी कोणी नसल्याचे पाहून संशयित सचिन पाटोळे (वय ३०) याने त्या मुलाला ऊसाच्या शेतात नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्या मुलाला वेदना होऊ लागल्याने आईने त्याला कारण विचारल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्याच्या आईने त्वरीत कुंडल पोलिसात जावून संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समजताच संपूर्ण गाव संतप्त झाला. संशयिताच्या घराची मोडतोड करून कुंडल फाट्यावर येऊन कराडकडे जाणारा रस्ता रोखून धरला. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी त्वरीत गावात येऊन संशयिताला अटक करून तासगावला नेल्यानंतर गावातील वातावरण निवळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवाज मर्यादा वाढली;आठ जणांवर गुन्हे दाखल

0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

गणेश विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी दोन डॉल्बी आणि दोन बॉँजो पथकांच्या मालकांसह चार मंडळाच्या अध्यक्षांवर सांगली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सांगलीत दोन तर कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडीत रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. आरेवाडीत दोन्ही मंडळासमोर वाजणारी सुमारे आठ लाख रुपयांची डॉल्बी यंत्रणा पोलिसांनी जप्त केली आहे.

डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करताना उत्सवात विधायक कार्याची अपेक्षा करीत जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने मेहनत घेऊन जनजागृती केली होती. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १३६९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बी लावणार नसल्याचे लेखी दिले होते. अनेक मंडळांनी डॉल्बीला दूर करीत पारंपरिक वाद्यांना जवळ करीत उत्सवाचा आनंद लुटला. परंतु कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील मारुती मंदिर चौकात दोन मंडळांचे डॉल्बी एकाच ठिकाणी, एकाचवेळी दणाणू लागल्याने गावाला हादरे बसू लागले. या बाबत माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी तेथे धाव घेऊन दोन्ही मंडळांसमोरील डॉल्बीसंच, ट्रॅक्टर जप्त केले. या प्रकरणी गणराज मंडळाचा अध्यक्ष समाधान कोळेकर, डॉल्बी मालक दीपक लांडगे, चालक सुनील सखदे तर हत्यार ग्रुप मंडळाचा अध्यक्ष अनिल कोळेकर, डॉल्बीमालक इजाज पैंगबर फकीर, संतोष सोपान कोळेकर आदींच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

सांगलीतही सातव्या दिवशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी नाही वाजला पण बँजोला डॉल्बीचे स्पीकर लावून मोठा आवाज करण्याचा प्रकार घडला. हा प्रकार एकाच भागातील गजानन मित्र बालगणेशोत्सव मंडळ आणि बाल हनुमान गणेशोत्सव मंडळानी केला. शहरातील तानाजी चौकात आवाजाची मर्यादा ओलांडली जात असल्याची कल्पना पोलिसांनी त्या मंडळांना दिली. परंतु, आरेरावीची भाषा करीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची सूचना धुडकावून लावली. त्यानंतर मात्र पोलिसांनी कायद्याची भाषा सांगत स्पीकरसह अन्य साहित्य जप्त केले. या प्रकरणी सागर अशोक घनवे, सागर वाघमारे, सोमनाथ भोसले, सुरेश दताप्पा कलगुटगी, बबलू हणमंत कांबळे आदींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी धडकेत प्रेमी युगुल जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पन्हाळा येथे फिरण्यासाठी गेलेल्या प्रेमी युगुलाच्या दुचाकीला कोल्हापुरात परत येताना बाघबीळ जवळ घाटातील वळणावर अपघात झाला. भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक बसून प्रेमी युगुल जखमी झाले. या दोघांनाही उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा करवीर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली.

सोमवारी(ता. १२) सकाळी शिवाजी पेठेतील प्रेमी युगुल पन्हाळा येथे फिरण्यासाठी गेले होते. मित्राची दुचाकी घेऊन गेलेले हे दोघे पन्हाळा परिसरात फिरले. परत येताना दुपारी तीनच्या सुमारास वाघबीळ येथील घाटात शिवतेज वॉटर पार्कजवळील तीव्र वळणावर तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. समोरून आलेल्या टेम्पोला दुचाकीची धडक बसल्याने तरुणाच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली, तर तरुणीच्या मानेला दुखापत झाल्याने तरुणी बेशुद्ध झाली होती. प्रवाशांनी बोरपाडळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात फोन करून अॅम्ब्युलन्स मागवली. जखमी दोघांनाही उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती प्रेमी युगुलाच्या नातेवाईकांना मिळताच दोघांच्याही नातेवाईकांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. उपचारानंतर दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री उशिरा करवीर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच नवीन एमआयडीसीचा प्रस्ताव

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरचा विकास दृष्ट‌िक्षेपात ठेवून तयार करण्यात येत असलेल्या प्रादेशिक आराखड्यात नवीन पाच एमआयडीसी सुरू करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आराखड्यातील दळणवळण, प्रादेशिक उद्यान, नागरी संकुले या बाबीवर चर्चा झाली.

जिल्ह्याचा पुढील २० वर्षांच्या विकासाचा विचार करुन विविध आठ अभ्यास गटांनी सादर केलेल्या अहवालांवर चर्चा करण्यात आली. १९७८ मध्ये कोल्हापूर इचलकरंजी असा पहिला प्रादेशिक आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी या शहरांचा समावेश होता. २३ फेब्रुवारी २१११ ला कोल्हापूर प्रादेशिक नियोजन मंडळ निर्माण करण्यात आले. या मंडळासमोर मंगळवारी सादर करण्यात आला. यामध्ये २०३६ मध्ये जिल्ह्याची प्रस्तावित लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून दळणवळण, प्रादेशिक उद्यान, औद्योगिक विकासासाठी नवीन प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्र, लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने नागरी संकुलांचा विकास, ब्ल्यू लाईन, रेड लाईन सर्व्हे या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

वाहतूक, परिवहन व दळणवळण या विषयामध्ये कोल्हापूर विमानतळ परिसरातील बफर झोन आणि टनेल यांची माहिती देण्यात आली, जिल्ह्यात दोन रेल्वे लाईन प्रस्तावित असून कराड-बेळगाव आणि कोल्हापूर-वैभववाडी (११० कि.मी.) यांचा समावेश आहे. पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी प्रादेशिक उद्यान आवश्यक असून एमआरसॅक च्या माध्यमातून सॅटेलाईट इमेजवरुन नकाशे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये १९.५ पेक्षा जास्त चढ-उतार असलेल्या जमिनींवर प्रादेशिक उद्यान प्रस्तावित करण्यात आले आहे. औद्योगिक विकास ही महत्त्वाचा असून त्या दृष्टीने जिल्ह्यात सध्या सहा एमआयडीसी क्षेत्रे आहेत. आणखी पाच ठिकाणी नव्याने एमआयडीसी क्षेत्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. नागरी विकास ज्या ठिकाणी वेगाने आहे अशा १४ ठिकाणांचा सूक्ष्म विकास आराखडा तयार करण्यात आला असून सर्व्हे नंबर निहाय यलो झोन निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल आणि गडहिंग्लज या ठिकाणी नागरी संकुल प्रस्तावित करण्यात आले आहे. तर हुपरी, कोडोली, हातकणंगले याठिकाणी ग्रामीण विकास संकुले प्रस्तावित करण्यात आली आहे. शाहूवाडी, गगनबावडा, गारगोटी, आजरा, राधानगरी, चंदगड याठिकाणी नगरी विकास केंद्रे, बांबवडे, कंभोज, भादोले, अब्दुललाट, दानोळी, उत्तूर या ठिकाणी नागरी विकास केंद्रे प्रस्तावित आहेत. पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावठाणपासून ७५० मीटर तर पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावठाणांनांपासून १५०० मीटर आणि इकोसेन्सिटीव झोनपासून २०० मीटर निवासी घरांसाठी मान्यता प्रस्तावित करण्यात आली आहे. जलसंपदा विभागामार्फत ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन निश्चित करण्याचे काम सुरु असून येत्या चार महिन्यात हा सर्व्हे पूर्ण होईल असेही यावेळी सांगण्यात आले. कोल्हापूर प्रादेशिक आराखडा बनविण्याची मुदत येत्या २२ सप्टेंबरला संपत असून आराखडा हरकती व सूचनांसाठी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

बैठकीला महापौर अश्विनी रामाणे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, चंद्रदीप नरके, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, नगर रचना विभागाचे पुणे येथील सहसंचालक प्र. ग. भुगते, पन्हाळा नगराध्यक्ष असिफ मोकाशी, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा शुभांगी बिरांजे, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष राजेश बोरगावे, मुख्य वनसंरक्षक एम.के.राव, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता सुधीर साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे, नगररचना विभागाचे उपसंचालक मो. र. खान, चेंबर ऑफ कॉमर्सचे अनंत माने, विनायक रेवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images