Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आमचे हातात, तुमचे मात्र पेटीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निवडणुकीच्या वर्तुळात मतांच्या गणितांवरून जयपराजयाच्या चर्चेत आलेल्या आणि आरोप-प्रत्यारोपांची संधी शोधणाऱ्या खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती आणि धनंजय महाडिक यांनी शनिवारी शाब्दिक कोपरखळ्यांनी एकमेकांची मिश्किल फिरकी घेतली. मस्करीची खसखस पेरत परस्परांवर शब्दांची फुले उधळणाऱ्या या द्वयींनी जेम्स अँड ज्वेलरी प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभाच्या व्यासपीठावर 'तुमचं आमचं' या रंजक संवादाला चकाकी आणली.

छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या भाषणात शाहूकालीन दागिन्यांच्या परंपरेचा उल्लेख करताना दागिन्यांच्या मोलाबाबत भाष्य केले. जुन्या काळातील दागिने परंपरेने आले आहेत. मात्र, माझ्याकडे काही धनंजय महाडिक यांच्याइतके पैसे नाहीत, त्यामुळे मी नवीन पद्धतीचे दा​गिने खरेदी करत नाही असे म्हणत संभाजीराजे यांनी महाडिक यांच्याकडे टाकलेल्या कटाक्षाला महाडिक यांनी हसत तिरकस नजर दिली. अस्सल दागिने खरेदी करत नसल्याने माझ्या अंगावर फारसे दागिनेही दिसत नाहीत. वीस वर्षांपूर्वी माझ्या विवाहासाठी काही दागिन्यांना पॉलिश आणि दुरुस्ती करायची होती तेव्हा संस्थानकालीन शाही दागिन्यांची दुरुस्ती करायला कोणीही कारागीर धाडसाने पुढे आला नाही. त्यामुळे बंगालहून कारागीर बोलावून जुन्या दा​​गिन्यांची दुरुस्ती करून घेतली. शिवाय मोत्यांमध्ये दर्जेदार मानला जाणाऱ्या बसरा मोतीच्या तोडीचे काम कोल्हापुरात होत असल्याची माहितीही संभाजीराजे यांनी दिली.

संभाजीराजेंचे शब्द काळजीपूर्वक ऐकणाऱ्या धनंजय महाडिक यांनीही तितक्याच मार्मिकपणे दागिन्यांच्या विषयाला कोपरखळ्यांनीच प्रतिसाद दिला. राजेंकडे पैसे नाहीत म्हणून ते दागिने खरेदी करत नाहीत, हा धागा पकडून महाडिक ​जेव्हा म्हणाले की, राजेंच्या अंगावर दागिने दिसत नसले तरी त्यांच्या पेट्यांमध्ये दा​गिने आहेत. आमच्या गळ्यात चेन दिसते, हातात कडं दिसते हे जरी खरे असले तरी राजेंच्या पेटीतील दागिने दिसतच नाहीत. ​आम्हाला दागिना घडवायचा म्हटले तर विचार करावा लागतो. मात्र, राजेंना त्यांच्याकडील दागिन्यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची चिंता सतावते. राजवाड्यातील दागिन्यांना पॉलिश करण्यासाठी ते बंगालमधून कारागीर मागवतात असे म्हणताच संभाजीराजेंनही महाडिकांना हास्याची पावती दिली.


तुमचे फूल, माझी पाकळी

संग्रहातील दागिन्यांवरून मुद्दा खासदारकीच्या क्रमांकावर गेला. 'टॉप थ्री' खासदार असा उल्लेख करत संभाजीराजे यांनी महाडिक यांचे अभिनंदन केले. त्यावर तितक्याच शिताफीने उत्तर देत महाडिक म्हणाले की मला टॉप थ्रीमध्ये स्थान देणारी संस्था देशातीलच आहे. पण थेट राष्ट्रपतींच्या कोट्यातून संसदेत माझे सहकारी खासदार म्हणून आलेल्या संभाजीराजेंच्या कार्याला मानांकन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थाच हवी, असे म्हणत महाडिक यांनी तुमचे फूल तर माझी पाकळी, अशा आविर्भावात उत्तर देताच सभागृहात हास्याचे कारंजे फुलले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारकडून जनतेचा विश्वासघात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,इचलकरंजी

आश्वासने देऊन सत्ता काबीज केलेल्या भाजप सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. मात्र जनता सूज्ञ आहे. ती दिशाभूल करणाऱ्यांची सुटी केल्याशिवाय राहणार नाही. गोरगरीबांच्या मूळावर उठलेल्या भाजपाला आता हद्दपार करा, असे आवाहन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.

इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली विविध न्याय मागण्यांसाठी शनिवारी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महात्मा गांधी पुतळा येथून सुरू झालेला मोर्चा प्रमुख मार्गावरुन प्रांत कार्यालयावर आला असता तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

आवाडे पुढे म्हणाले, 'सातत्याने गाऱ्हाणी मांडूनही सरकारला जाग येत नसल्याने जनतेच्या भावना मांडण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. लाभदायक योजना बंद करून भाजप सरकार गोरगरीबांच्या जीवावर उठले आहे. त्यांना केवळ राजकारण करायचे असून जनतेशी काहीही देणे-घेणे नाही. ज्यांनी भीष्मप्रतिज्ञा केल्या ते विसरले असले तरी जनता त्यांना विसरणार नाही. वस्त्रोद्योग संकटात असताना आमदार केवळ वल्गना करीत असून कृती मात्र शून्यच आहे. एकीकडे विकासाच्या नावाखाली योजना मंजूर करुन आणायच्या आणि दुसरीकडे आपणच त्याला मोडता घालायचा उद्योग सुरू आहे, अशी टीका आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव न घेता त्यांनी केले.

यावेळी आवाडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार वैशाली राजमाने यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यावेळी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असलेल्या शासकीय योजना ताबडतोब सुरू झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी शामराव कुलकर्णी, अहमद मुजावर, शशांक बावचकर आदींची भाषणे झाली. आंदोलनात सतीश डाळ्या, विलास गाताडे, बाबासाहेब चौगुले, उपनगराध्यक्ष महावीर जैन, अशोकराव आरगे, शेखर शहा, नरसिंह पारीक, रत्नप्रभा भागवत, शकुंतला मुळीक, सुजाता भोंगाळे, सुरेखा इंगवले, जेवरबानू दुंडगे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

इच्छुकांचे शक्त‌िप्रदर्शन

आगामी नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसच्या इच्छुकांनी आज संधी साधली. मोर्चामधील आपला सहभाग नजरेत भरण्यासाठी स्वतंत्रपणे आपल्या प्रभागातून सवाद्य मिरवणुका काढून मोर्चात सहभागी झाले. काही इच्छुकांनी फटाक्याची आतषबाजी तर काहींनी टोप्यांवर आपले नाव कोरुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

विरोधकांची गद्दारांशी हातमिळ‌वणी

केवळ सत्तेसाठी काहींनी विरोधकांशी हातमिळवणी करून गद्दारी केली. तर विरोधकांनी गद्दारांना हाताशी धरून नगरपालिकेची सत्ता हाती घेतली, अशी टीका आवडे यांनी यावेळी केली. गद्दारांच्या या कारभारामुळे यातून जनहिताचे काहीच निष्पन्न झाले नाही. खड्डेमय रस्ते, निकृष्ठ दर्जाची भुयारी गटर योजना, कचरा उठावाचा उडालेला बोजावारा हे जनतेच्या पदरात पडले आहे. या सर्वांचा पंचनामा आगामी नगरपालिका निवडणुकीत केला जाईल, असेही आवाडे यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागासवर्गीय औद्योगिक संस्थेत ८९ लाखांचा अपहार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सरकारकडून मागासवर्गीय सहकारी संस्थेसाठी घेतलेल्या अनुदानाच्या ८८ लाख ५७ हजार ६४३ रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अमर नानासाहेब पारडे, लक्ष्मण अर्जुन काळे व जे. एम. लाइट हाऊस चालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद व्यंकटेश भीमराव कुलकर्णी (वय ४६, रा. गडहिंग्लज) यांनी दिली आहे. या घटनेने सामाजिक न्याय विभागात खळबळ उडाली आहे.

कुलकर्णी हे सरकारच्या सहकार विभागाकडे लेखापरीक्षक म्हणून काम पाहतात. त्यांची नेमणूक गडहिंग्लज विभागात आहे. अमर पारडे हे चेअरमन असलेल्या शुभम मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेने राज्य सरकारकडे अॅल्युमिनयम खिडकी उत्पादनासाठी सहा कोटी ८० लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. सरकारने संस्थेला ५० लाख रुपये सरकारी भागभांडवल व ५० लाख दीर्घ मुदतीचे कर्ज अशी एक कोटी रुपये अदा केले आहेत. सरकारकडून रक्कम मिळाल्यानंतर पारडे यांनी ७९ लाख रुपये येथील सन्मती बँकेत ठेव ठेवली. या ठेवीवर पारडे व काळे यांनी ३२ लाख ३० हजार रुपयांचे ठेवतारण कर्ज काढले. या कर्जाची रक्कम संस्थेत जमा न करता स्वत:साठी वापरली. त्या कर्जाची व्याजासह रक्कम ४९ लाख ९५ हजार ६४३ इतकी झाली आहे. त्यानंतर ३८ लाख ६२ हजार रुपये पारडे व काळे यांनी जे. एम. लाईट हाऊस यांना कामापोटी संस्थेचे बांधकाम अपुऱ्या स्थितीत असताना देऊन गैरव्यवहार केला. लेखापरीक्षण विभागाने केलेल्या तपासणीत हा गैरव्यवहार उघडकीस आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोमॅटो गडगडले, भाज्यांचे दर निम्म्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या आठवड्यात भाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्यावर आले आहेत. तसेच टोमॅटोचे दर प्रचंड गडगडले असून पाच रुपये किलोपर्यंत दर खाली आहेत. तर महाग असणारा हिरवा वाटाणाही ४० रुपये किलो इतका स्वस्त झाला आहे. तूरडाळीचेही दर उतरत असून १४० रुपयांवर असलेली प्रेसिडेंट तूरडाळ ११० रुपयांवर आली आहे.

पाऊस कमी झाल्यानंतर दोन आठवड्यांपासून भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. सध्या टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून चांगल्या प्रतीचे टोमॅटो पाच रुपयांपासून आठ रुपयांपर्यंत मिळत आहेत. ही आवक अशीच राहणार असून दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी पालेभाजीचे दर चढे होते. पण त्याचीही आवक व्यवस्थित झाल्याने आता दहा रुपयांना पेंडी झाली आहे. कोथंबिरीची पेंडीही पाच रुपयांना झाली आहे. इतर भाज्यांचे दर गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात निम्म्यावर आले आहेत. मेथीची पेंडी १० रुपयांना तर पालकची पेंडी १० रुपयापर्यंत आहे.

इतर भाज्यांमध्ये मागणी असलेली ३० रुपये किलो रुपयांना मिळणारी वांगी १५ रुपयांवर तर ४० रुपये किलो असणारी सिमला मिरची २० रुपये किलो झाली. मिरचीचीही आवक मोठया प्रमाणात झाल्याने ३५ रुपये असणारी मिरची आता १२ ते १५ रुपयांपर्यंत मिळत आहे. हिरवा वाटाणा या दिवसांत थोडा महाग मिळतो. १००, ८० रुपये असा दर होत या आठवड्यात तो चक्क ४० रुपये किलोवर घसरला आहे. कोबीचाही दर निम्म्यावर आला असून २० रुपये किलोने मिळत आहे. कांदा व बटाट्याचा दर मात्र थोडासा वधारला आहे. चांगल्या प्रतीचा कांदा २० ते २५ रुपयांपर्यंत मिळत आहे. तर बटाटे ३० रुपये किलो आहेत. फळांचीही आवक सुरू असून आता सीताफळे येत आहेत.

किराणा बाजारात दर एक ते दोन रुपये दर खाली वर होत आहेत. तूरडाळीचे दर मात्र खाली आले आहेत. १०० रुपयापांसून ११० रुपयांपर्यंत तूरडाळ उपलब्ध आहे.

भाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने हे दर घसरले आहेत. कर्नाटक तसेच सांगली परिसरातून येत असलेल्या भाजीच्या तुलनेत मागणी मोठी नसल्याने या महिन्यात या दरात फार बदल होण्याची शक्यता नाही.

फिरोज बागवान, घाऊक व्यापारी

वांगी : १५ रु.

टोमॅटो : ८ रु.

भेंडी : ४० रु.

दोडका : १० रु.

ढबू मिरची : २० रु.

कोबी : २० रु. किलो

श्रावण घेवडा : १० रु. किलो

वाटाणा : ४० रु. किलो

लसून : १५० रु. किलो

कांदा : ३० किलो

बटाटा : ३० रु. किलो

फ्लॉवर : १० रु. नग

गवार : २० रु.

मेथी : १० रु. पेंडी

कोथिंबीर : ५रु. पेंडी

आले १६ रु. कि.

मुळा ८ रु. किलो

शेवगा ६० रुपये किलो

काकडी ३० रु. किलो

कारली २० रुपये किलो

बासमती तांदूळ : २८ ते ६० रु. किलो

गहू : २६ ते २८ रु. किलो

साखर : ३९ रु. किलो

पोहे : ३८ रु. किलो

रवा : २८ रु. किलो

शेंगदाणा : ११० रु. किलो

शाबू : ५५० रु. किलो

आटा : २७ रु. किलो

डाळी

तूरडाळ : ११० रु.

मूगडाळ : ८५ रु.

उडीद डाळ : १८० रु.

हरभरा डाळ : ११० रु.

मूग : ८० रु.

मसूर डाळ ८५ रु. किलो

सरकी तेल: ७८ रु. किलो

खोबरे :११० रु. किलो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे हत्येत डॉ. तावडे दुसरा संशयित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी म्हणून हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता डॉ. वीरेंद्र तावडेला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. पानसरे हत्येत डॉ. तावडेच्या सहभागाचा तपास करण्यासाठी त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर शनिवरी उभे करण्यात आले. त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आदेश देण्यात आला आहे. दरम्यान, डॉ. तावडे याने पोलिसांनी बुटाने मारहाण केल्याचा आरोप केला; मात्र वैद्यकीय अहवालानंतर कोर्टाने तो फेटाळला.

डॉ. तावडे याला सीबीआयने दाभोलकर हत्या प्रकरणात दहा जून रोजी अटक केली होती. पानसरे, दाभोलकर व कुलबुर्गी हत्येत साम्य असल्याने पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीने २० जूनला डॉ. तावडे याचा ताबा कोर्टाकडे मागितला होता; पण तब्बल ७५ दिवसानंतर पुण्यातील कोर्टाच्या परवानगी घेऊन डॉ. तावडेला कोल्हापूर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर पानसरे हत्येच्या गुन्ह्यात संशयित म्हणून तावडेला रात्री अटक केली. त्याला शनिवारी दुपारी कोर्टात हजर केले.

तावडे याने पोलिसांनी आपल्याला बूट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार कोर्टात केली. त्यावर कोर्टाने तावडेला वैद्यकीय तपासणीसाठी पुन्हा सीपीआरमध्ये पाठवले. दोन तासाच्या तपासणीनंतर त्याला मारहाण झाली नसल्याचा अहवाल दिल्यानंतर कोर्टाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली. तत्पूर्वी तपास अधिकारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा आणि सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी सरकारी पक्षाकडून युक्तिवाद केला.

डॉ. तावडे हा हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी असून सनातन संस्थेचा पूर्ण वेळ साधक आहे. कोल्हापुरात २००१ ते २००६ या कालावधीत हिंदुत्ववादी कार्यक्रमात सहभागी होऊन त्याने दाभोलकर व पानसरे यांच्या पुरोगामी विचारसरणीस उघड विरोध केला होता. २००९ मध्ये गोवा बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी रुद्र पाटील, सारंग अकोळकर, प्रवीण लिमकर, जयप्रकाश हेगडे, विनय पवार यांच्या तो संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. दाभोलकर हत्येतील साक्षीदार संजय साडविलकर यांच्या जबाबात तावडेने साडविलकरांची २०१३ मध्ये भेट घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. तावडेने साडविलकर यांना दोन रिव्हॉल्व्हर तयार करून देण्यास सांगितले होते. दोन व्यक्तींना एक रिव्हॉल्व्हर व एक पिस्तूल घेऊन साडविलकर यांच्याकडे पाठवले होते. दोन व्यक्तीकडे जी रिव्हॉल्व्हर व पिस्तूल होती तशी हत्यारे बनवायला सांगितले होते. तावडेने २००९पासून पानसरे हत्येचा कट रचायला सुरूवात केली असावा अशा संशय आहे. डॉ. तावडेने पानसरे हत्येचा कट कुठे रचला. साथीदार कोण होते? रिव्हॉल्व्हर चालवण्याचे प्रशिक्षण कोठे व कोणी दिले? गुन्ह्याचा कट केल्यापासून कोठे गेला होता? कोणत्या वाहनांचा वापर केला? प्रत्यक्ष गोळीबारात कोण सहभागी झाले होते? साडविलकर यांच्याकडे रिव्हॉल्व्हर तयार करण्यासाठी साथीदार कोण पाठवले आहेत, या बाबींचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडसेंची लवकरच मंत्रिमंडळात 'वापसी'?

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

जमीन गैरव्यवहाराच्या आरोपांवरून राजीनामा दिलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंची लवकरच मंत्रिमंडळात 'वापसी' होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी याबाबत तसे सुतोवाच केले आहेत. 'दोन आरोपात खडसे निष्कलंक ठरले आहेत. तिसऱ्या आरोपाची चौकशी सुरू आहे. त्यातही खडसे निर्दोष सुटतील असे वाटते. यामुळे खडसे पुन्हा मंत्रिमंडळात येतील', असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. सोलापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सोलापुरातील लिंगशेट्टी मंगल कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पाडली. सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर व उस्मानाबाद या जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. तसंच पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुखही यावेळी होते. आगामी महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यात मुख्यमंत्र्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

खडसेंचे मंत्रिमंडळात परतण्याबरोबर दानवेंनी महामंडळांवरील रखडलेल्या नियुक्त्याही लवकरच मार्गी लावणार असल्याचं सांगितलं. स्थानिक पातळीवरील समित्यांची नियुक्ती ही त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री लवकरच करतील. याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती दानवे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुशीलकुमारांचे जीवन म्हणजे संघर्षगाथा-राष्ट्रपती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'सुशीलकुमार शिंदे यांनी जीवनातील समस्यांवर मात करीत त्यांनी स्वत:चे नेतृत्व सिद्ध केले. त्यांचे जीवन ही संघर्षगाथा आहे,' असे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले. अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सत्कार करण्यात आला. त्या वेळी राष्ट्रपती बोलत होते.

शाल, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन शिंदे यांना गौरविण्यात आले. राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले, 'शिंदे माझे सहकारी आहेत. ते चांगले मित्र आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शिंदे हे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात काम करीत आहेत. नानाविध महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत. मुख्यमंत्री, राज्यपाल आणि गृहमंत्री ही महत्त्वाची पदे त्यांनी संघर्षातून मिळविली. त्यामुळे त्यांची ही गोष्ट त्यांच्यापुरती न राहता संघर्षाची गोष्ट बनली पाहिजे.'

शिंदे यांनी शंभरावा वाढदिवस साजरा करावा, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. राज्यपाल सी. विद्यासागर राव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिंदे यांचा गौरव केला. या वेळी शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे, कन्या आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. देशभरातून सर्वपक्षीय नेतेमंडळी शिंदे यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी या निमित्ताने सोलापुरात जमली होती. बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी या सोहळ्याचे आयोजन केले.
रंगलेली जुगलबंदी

अमृतमहोत्सव सोहळ्यासाठी इंदिरा गांधी स्टेडियमवर जमलेल्या हजारो नागरिकांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यातील राजकीय जुगलबंदीचा आनंद लुटला. मुख्यमंत्र्यांनी पवारांना चिमटा काढला तर पवार कोणाचीही चड्डी सहज ओढू शकतात, असे सांगत शिंदे यांनी आपले गुरू पवार यांचे पत्ते ओपन केले.

जपून वागलं पाहिजे

पवार आपल्या भाषणात म्हणाले, 'शिंदेसाहेब आता पंचाहत्तरी आली, आता आपण दोघांनी जपून वागलं पाहिजे. जुने दिवस संपले. इकडे तिकडे दोघांनीही बघायचे नाही. आपला आता निकाल झाला. तुमच्या रुपाने नव्या पिढीसमोर आदर्श आहे.'

पवार कोणाचीही चड्डी ओढू शकतात

सुशीलकुमार शिंदेनींही गुरू शरद पवार यांची फिरकी घेतली, शरदचंद्र पवार आपल्याला माहितच आहेत, ते विद्वान आणि स्टॅट्रेजिक आहेत. कोणाची चड्डी ओढायची म्हटली तर पवार ती सहज ओढू शकतात. त्यांच्या सहवासात मला रहायला मिळाले व त्यांच्याकडून आपल्याला बरेच काही शिकता आले, असे सांगताच एकच हशा पिकला.

शिंदे यांनीही पुन्हा मैदानात यावे

'शिंदे साहेब अमृतमहोत्सवी सत्कार हा थांबण्यासाठी नसतो, तर तो नवीन प्रेरणा घेऊन नवीन काम करण्यासाठी असतो. तसेही तुमच्याकडे पाहून कोणी तुम्हाला ७५ वर्षांचे म्हणूच शकत नाही. शरद पवार यांचा सुद्धा अमृतमहोत्सव साजरा केला. त्यानंतर पवारसाहेब दुप्पट वेगाने मैदानामध्ये आले. प्रत्येक जिल्ह्याचा ते दौरा करीत आहेत. ते आमच्यासाठी तसे अ‍ॅडव्हायजेबल नाही. तरी आमची इच्छा आहे, शिंदे साहेबांनी देखील या सत्कारानंतर नवीन ऊर्जा घेऊन मार्गदर्शनासाठी बाहेर पडावे,' असे मुख्यमंत्र्‍यांनी शरद पवार यांच्याकडे बघून सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

शिंदे गहिवरले

पी. व्ही. नरसिंहराव यांनी दिल्लीत कामाची संधी मिळाली. महाराष्ट्रातून मला दिल्लीत बोलावून घेण्यात आले. पडणार होतो, हे माहित असताना देखील पक्षाचा आदेश असल्यामुळे आपण उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविली. त्यानंतर तीनच महिन्यात महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून मला पाठविण्यात आले. प्रणव मुखर्जी यांनी मला महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसविले. पावणे दोन वर्षांचा कारभार केला. महाराष्ट्रात सत्ता आणूनही मला राज्यपाल केले तरी ही मी काही बोललो नाही. नेतृत्वाचा आदेश मान्य करावा, या मताचा मी आहे. त्यानंतर राज्यपाल झालो. त्यानंतर थेट केंद्रीय ऊर्जामंत्री पद बहाल करण्यात आले आणि त्यानंतर देशाचे सर्वात महत्वाचे असलेले गृहमंत्रिपदही मिळाले. हा इतिहास सांगताना शिंदे यांना गहीवरुन तर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघातील खदखद बाहेर : शरद पवार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एकसंघ भारत, एकसंघ समाज आणि एकसंघ विचार मांडला, त्या संघात पहिल्यांदाच तट पडलेला दिसत आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मतभिन्नतेला आणि अस्वस्थतेला उघडपणे बाहेर आणण्याचे धाडस गोवा प्रकरणात काही लोकांनी केल्याने त्यांचे खरे स्वरूप लोकांसमोर येऊ लागले आहे,' असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. पवार रविवारी कन्या सुप्रिया आणि जावई सदानंद सुळे यांच्यासह विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते.

गोवा प्रकरणात दिसत असलेला असंतोष अनेक ठिकाणी आहे. ही खदखद बाहेर आल्यानंतरही मतभेद, संघर्ष वाढून संघाचे विभाजन होईल, असे आज तरी वाटत नाही, असेही पवार म्हणाले.


शिवसेनालाच हवाय अॅट्रॉसिटीबाबत अधिवेशन

'आपण गेली ५० वर्षे सार्वजानिक राजकारणात असून, परिवर्तनाच्या प्रश्नावर आपण कोणतीच तडजोड केली नाही. नामांतर असो अथवा ओबीसींचा प्रश्न त्यासाठी वेळोवेळी किंमत मोजली आहे. आम्ही आमची विचारधारा कधीच सोडली नाही, असे असताना मला अॅट्रॉसिटीबाबतचा प्रश्न विचारायचा अधिकार त्यांना कसा मिळतो,' असा सवाल करीत पवारांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे ते घटक असल्याने अॅट्रॉसिटीसाठी विशेष अधिवेशन बोलावयचा त्यांचा विचार दिसतोय, असेही पवार म्हणाले.

मराठा मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला नाही

मराठा समाजाचे सध्या मोर्चे निघत आहेत. या मोर्चेकऱ्यांशी आपण संवाद साधला नाही. मात्र, शेती, शिक्षण, सेवा आदी क्षेत्रांत संधी नसल्याने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. इतर जातींमधील तरुणांमध्ये देखील अशीच अस्वस्थता दिसते, त्यामुळे त्यांचा एकत्रित विचार राज्य आणि केंद्र सरकारला करावा लागेल, असेही पवार म्हणाले.

आमचा दृष्टिकोन व्यापक

मागील ६० वर्षे मराठा समाजाच्या नेत्यांच्या हातात सत्ता असली तरी त्यांनी आपल्या जातीची सत्ता, अशा पद्धतीने कधी बघितले नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आजपर्यंत सत्ता सांभाळताना आमचा व्यापक दृष्टिकोन होता, तो आजही आहे. मात्र, असे करताना कोणत्याही घटकाचे एखादे दुखणे असेल तर ते दुर्लक्षित करून चालणार नाही. आरक्षणाची आजही तेवढीच गरज आहे. मराठा, धनगर, जाट, पटेल अशा विविध आरक्षण मागणाऱ्या समाजाचे मूलभूत प्रश्न सोडविल्यास हा असंतोष कमी होईल. त्यामुळे त्यात अधिक लक्ष घालायची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली. गुजरातमधील दलित अत्याचाराबाबत पंतप्रधानांनी जाहीर भूमिका मांडली, त्यातून योग्य संदेश गेला, असेही पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खून झालेली सलमा शेख अनाथ

$
0
0



सातारा

धोम (ता. वाई) येथील संतोष पोळ व त्याची सहकारी ज्योती मांढरे यांची वाई पोलिसांनी कसून चौकशी केली. खून झालेली सलमा शेख ही अनाथ असल्याचे समोर आले असून, तिच्या मृतदेहाचा डीएनए रिपोर्ट राखून ठेवण्यात आला आहे.

सलमा हिने बारामती येथे आपले शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी तिची ओळख वाईतील मुलीशी झाली होती. त्याचा उपयोग करून घेत तिने दत्तनगर, वाई येथे घरमालकाच्या अटीनुसार बोगस पती दाखवून घर भाड्याने घेतले होते. सलमाचा विवाह झाला नसून, संबंधित पठाण या व्यक्तीने तिला घर भाड्याने मिळावे यासाठी मदत केली होती. पोळ हा सध्या पोलिसांची दिशाभूल करीत असून, चौकशीला योग्य प्रतिसाद देत नाही. पोळचे वाई बाजारपेठेत अनेक घाणवट ठेवणाऱ्या मारवाड्याशी संबंध होते. तो नथमल भंडारींमुळे या परिसरात येत जात असत, असेही माहिती पुढे आली आहे.

सलमा शेख हिच्या संपर्कात असणाऱ्या व दवाखान्यात एकत्र काम करणाऱ्या तिच्या मैत्रिणींनी सध्या धास्ती घेतली आहे. खून प्रकरणामुळे त्या घाबरल्या आहेत. सलमाचा तथाकथित पती पठाण हा अत्यंत दयाळू स्वभावाचा असून, त्याची केवळ सलमाला मदत करण्याची भावना होती. त्याची चौकशी करून त्याला सोडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेठरेत सडलेल्या खांबांचा धोका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

रेठरे-वारणा (ता. शाहूवाडी) येथील अंतर्गत रस्त्यांलगतचे सर्व विद्युत खांब सडलेले आहेत. त्यापैकी काहींवरून खाली जमिनीपर्यंत सडलेल्या विद्युत खांबांना पर्यायी खांब उभे करून दोन वर्षांचा काळ लोटत आला तरी या पर्यायी खांबांना प्रवाहित राहणाऱ्या वीज वाहिन्या जोडण्यात आलेल्या नाहीत. परिणामी हे पूर्णपणे सडलेले विद्युत खांब वाहिन्यांच्या आधारावर लोंबकळत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अनर्थ टाळण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांसह गावातील तरुण मंडळाने हे धोकादायक स्थितीतील खांब त्वरित हटविण्यासाठी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. तर वीज वाहिन्यांच्या जोडणीचा संभाव्य खर्च कोण करणार, असा सवाल उपस्थित करून वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या कामाच्या पूर्ततेबाबत असमर्थता दर्शविली आहे.

रेठरे-वारणा हे शाहूवाडी तालुक्याच्या उत्तरटोकाला असणारे गाव. येथील मुख्य पाटील गल्लीसह अन्य गल्लीतील सर्व विद्युत खांब सडलेले आहेत. ग्रामस्थांच्या तागाद्यानंतर दोन वर्षांपूर्वी वीज कंपनीने टेंडर प्रोसेस राबवून पाटील गल्लीतील देवळापर्यंतच्या पूर्ण सडलेल्या चार विद्युत खांबांना पर्यायी खांब उभे केले आहेत. त्याचवेळी या पर्यायी खांबांवरून वीज वाहिन्यांची जोडणी व्हायला हवी असताना ही जोडणी अद्याप झालेली नाही. परिणामी हे पूर्णपणे सडलेले विद्युत खांब केवळ वाहिन्यांच्या आधारावर लोंबकळत आहेत. एकमेकाला 'लिंक' असलेले हे खांब लगतच्या घरांवर कधीही कोसळू शकतात. तसेच या धोकादायक स्थितीतील एका-एका खांबांवरून वीसहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा केला आहे. या पूर्ण सडलेल्या खांबांपैकी एक खांब जरी कोसळला तरी सलगतेमुळे हे सर्व खांब कोसळणार आहेत. वीज प्रवाह सुरु असताना ही घटना घडली तर होणाऱ्या नुकसानीमुळे हाहाकार माजू शकतो. इतकी भयानक आणि धोकादायक परिस्थिती असताना आजपर्यंत संबंधितांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.

याबाबत भेडसगांव वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता परीट यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका ओळखून हे प्रलंबित काम पूर्णत्वाच्या दृष्टीने हालचाल सुरु केली आहे. त्यासाठी आवश्यक साहित्यही खरेदी केले आहे. पर्यायी खांबावरून वीजवाहिन्यांच्या जोडणीसाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवाला सामाजिक किनार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सामाजिक उपक्रम राबवित गरजूंना मदतीचा हात देत, काही मंडळांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी यंदाच्या गणेशोत्सवाला सामाजिक टच देण्याचे ठरवले आहे. लाखो रुपये खर्च करण्याच्या नव्या परंपरेला फाटा देत काही मंडळे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत आहेत.

रिक्षाचालकांची आज मोफत सेवा

यंदाही गणेश भक्त रिक्षा मित्र मंडळाच्यावतीने आरिफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली १० रिक्षाचालक गणेशमूर्ती रिक्षातून पोहोचविण्याची सेवा करणार आहेत. गणेशोत्सवात गणेशमूर्ती घरोघरी नेल्या जातात. त्यामध्ये आबालवृद्धांचा समावेश असतो. गंगावेश, शाहूपुरी, पापाची तिकटी या परिसरातून गणेशमूर्ती घरापर्यंत मोफत नेऊन सोडण्याची सुविधा हे मंडळ करते. मूर्ती घरी घेऊन जाणाऱ्या भा‌विकांना घरी सोडल्यानंतर भाविकास ११ रुपये दक्षिणाही रिक्षाचालक देतात. सोमवारी (ता.५) सकाळी साडेसात वाजता या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. यामध्ये पठाण यांच्याबरोबर दीपक पोवार, प्रकाश पोवार, जहाँगीर नाकाडे, प्रदीप जाधव, फिरोज शेख, राजकुमार ढवळे, राजाराम पाटील, अल्ताफ मुल्लाणी, अमजद नाकाडे, बबलू धाडणकर, विकी देसाई, सुहास रोटे, सुरेश करळे, सचिन केळुस्कर, दिपक माने, सतीश सावतकर, जयंत जाधव हे रिक्षाचालक सहभागी होत आहेत.

निराधारांना हात व गरजूंना साथ

शिवाजी विद्यापीठ रोड, दौलतनगर येथील जय शिवराय मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकी म्हणून एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार मंडळ समाजहिताचे व प्रबोधनाचे उपक्रम राबवित आहेत. मंडळातर्फे यंदा 'एक विद्यार्थी एक वही-एक पेन' हा उपक्रम राबविला जाणार असून, मंडळाच्यावतीने जिल्ह्यातील ८५ गावांमध्ये मराठी शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना दोन हजार वह्या व दोन हजार पेनचे वाटप केले जाणार आहे. या वर्षापासून मंडळ दत्तक योजना राबविणार आहे. तसेच नागरिक जसे गणपतीला हार, पेढे, दागिने अर्पण करतात, तसेच त्यांनी एक वही व एक पेन अर्पण करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वस्त्रनगरी नव्हे खड्डेनगरी

$
0
0

राजेंद्र पाटील, इचलकरंजी

वर्षाला दहा कोटींहून अधिक निधी रस्ते कामासाठी खर्च होत असतानाही इचलकरंजी शहरातील प्रत्येक रस्त्याला खड्डयांचे ग्रहण लागले आहे. गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि टक्केवारीने बदनाम झालेल्या इचलकरंजी नगरपालिकेचा कारभार खड्डयांमुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गणरायाचे आगमन वस्त्रनगरीत खड्डयांतूनच होत असल्याने 'बाप्पा खड्डयांतून सांभाळा' असे​ म्हणण्याची वेळ आली आहे.

लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या गलथान कारभारामुळे वस्त्रनगरीची ओळख खड्डेनगरी अशी बनली आहे. देशात वस्त्रोद्योगामुळे या नगरीची ओळख गडद होत असताना अलिकडच्या काळात विकासकामात कुरघोड्यांचे राजकारण सर्वांनाच अडचणीचे ठरत आहे. वर्षाला दहा कोटींहून अधिक रक्कम रस्ते कामांवर खर्च केले जात आहे. शहरांतर्गत साडेतीनशे किलोमीटरचे रस्ते करण्यासाठी दरवर्षी पालिका इतकी रक्कम खर्च करत असताना, नागरिकांना खड्डयांतूनच मार्गक्रमण करावे लागणे, दुर्देवी आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर खड्डयांनी भ्रष्ट यंत्रणेचा पोलखोल केला. यातूनच सर्वसामान्यांचे कर रुपातून जमविलेले कोट्यवधी रुपये खड्डयातच गेले. प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे सर्वसामान्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे. खड्डयांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला, तर व्याधींनी त्रस्त झालेल्यांची संख्याही वेगाने वाढत आहे. रस्त्यांवरील खड्डयांच्या दुरुस्तीसाठी सामान्य नागरीकांसह अनेकांनी अनोखे आंदोलन करुन लोकप्रतिनिंधीसह प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, टक्केवारीत अडकलेल्या प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले. डांबरी रस्त्यांवर मुरुम टाकून खड्डे मुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला, पण त्यालाही यश आले नाही. आंदोलनानंतरही मुख्य रस्त्यांसह उपनगरातील खड्डे जसेच्या तसे आहेत.

खड्डयांवरुन नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला. सत्ताधारी व विरोधक या प्रश्नावर एकवटले. पण, टक्केवारीत साथ-साथ असल्याने केवळ गोंधळ घालून हा प्रश्न चर्चेत आणण्याचा प्रयत्न झाला.प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांनी निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यात येईल, असे उत्तर देवून वेळ मारुन नेली. प्रसारमाध्यमांनी खड्ड्यांवर फोकस केल्यानंतर काही ठेकेदारांना नोटीसा बजावून खड्डे मुजविण्याचा आदेश दिला गेला. या आदेशालाही ठेकेदारांनी केराची टोपली दाखविली. रस्त्यांवरील खड्डे बुजविल्याशिवाय बिले अदा केली जाणार नाहीत, हे माहित असतानाही ठेकेदारांचा मग्रूरपणा सर्व काही सांगून जातो. ठेकेदार, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची 'मिलीभगत' इचलकरंजीला अक्षरश: खड्डयात गाडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपक्रम‌शीलतेतून ज्ञानदान

$
0
0


माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने चहुबाजूंनी माहितीची प्रचंड स्फोट होत आहे. त्यामुळे नवा इतिहास घडत आहे. भौगोलिक बदलाबरोबरच वैज्ञानक शोध लागत आहेत. त्यामुळे त्याची माहिती शिक्षकांना असणे आवश्यक आहे. पूर्वीचे विद्यार्थी आणि आजचे विद्यार्थी यांच्यात मूलभूत फरक असल्याने शिक्षक सांगेल तेच खरे ज्ञान ही संकल्. डविण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा काही प्रातिनिधीक शिक्षकांवर टाकलेला प्रकाशझोत.


वाचन संस्कृतीला बळ
महापालिकेच्या शाळांची पटसंख्येवरून सातत्याने ओरड होत असताना जाधववाडी येथील प्रिन्स शिवाजी विद्या मंदिरच्या मयूर जाधव यांनी आपल्या सहकारी शिक्षकांच्या मदतीने उभारी दिली आहे. दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन करत त्यांनी शाळेचे रूपच पालटले असून ९००१:२०१५ 'आयएसओ' मानांकनाची केवळ औपचारिक घोषणा राहिली आहे. शाळेच्या पटसंख्येत घसरण झाल्यानंतर जाधव यांनी कराड येथील नगरपालिका शाळेने केलेला उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. शाळेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी व जिव्हाळा निर्माण करण्यासाठी वाढदिवसादिवशी चॉकलेट न देता साहस कथा, बोधकथा, स्वातंत्र्यसेनानींचे आत्मचरित्र, आदी पुस्तके देण्याची विनंती केली. वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे आज शाळेत तब्बल ३५० पुस्तकांचा संचय झाला आहे. केवळ पुस्तकांचा संचय न करता दुपारच्या सुटीमध्ये वाचन करुन विद्यार्थ्यांकडून त्यांची देखभाल केली जात आहे. पुस्तकांच्या वाचनामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता आणि वैचारिक अधिष्ठान प्राप्त करुन देण्यास जाधव यांचा वाटा महत्त्वाचा आहे.

ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देताना यूट्युबवरील अनेक व्हिडीओ विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले जात आहेत. यासाठी जाधव विशेष प्रयत्न करत आहेत. शाळेने स्वतःच्या बळावर सेमी इंग्लिश वर्ग सुरू करुन विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासाठी आकर्षित केले आहे. सामाजिक उत्तरदायित्वमधून व इतर समाजातील घटकांकडून मिळालेल्या मदतीतून शाळेचे रुप पालटले असून शाळेचे आयएसओ मानांकनासाठी नोंदणी व ऑडिट पूर्ण झाले आहे. आयएसओ मानांकनाची केवळ औपचारिकता शिल्लक असून लवकरच असे मानांकन मिळवणारी महापालिकेची एकमेव शाळा ठरणार आहे. शाळेच्या या प्रगतीमध्ये जाधव यांचे कार्य इतर शिक्षकांना प्रेरणादायी असेचं ठरणार आहे.


गरीब विद्यार्थ्यांना वह्यावाटप
अध्ययन आणि अध्यापनाच्या पलीकडे जाऊन शुक्रवार पेठेतील अवधूत विद्यालयातील फारूक सय्यद यांनी सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि शालेय साहित्याचे वाटप गेली १५ वर्षापासून सुरू आहे. त्यासाठी स्वतःच्या वेतनातून विद्यार्थ्यांचा खर्च देतात. काही गरीब विद्यार्थ्यांना औषधोपचारासाठी मदत केली आहे. स्वतःच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मदतीसह अन्य शाळेतील विद्यार्थ्यांना अविरतपणे मदत केली आहे. विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागण्यासाठी त्यांचे बँकेत खाते काढले आहे. माजी विद्यार्थ्यांसह अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी मदत केली आहे. विवेकानंद कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याला शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैसे नव्हते. सय्यद यांनी पुढाकार घेऊन त्या विद्यार्थ्याचे शुल्क भरले. गणेश विसर्जनावेळी पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे. भाविकांनी निर्माल्य नदीत टाकू नये. ते कुंडात टाकावे, यासाठी ते दरवर्षी नदी घाटावर कार्यरत असतात. अवधूत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही पर्यावरण आवड निर्माण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यास रोपे लावण्यास सांगितले जाते. त्यासह विसर्जनाच्या वेळीही पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांची टीम कार्यरत ठेवली जाते.

निवृत्तीनंतरही शुद्धलेखनाचे धडे
विद्यार्थी असोत वा पालक. विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांचा अभ्यास कसा काटेकोर होईल यावर त्यांचे जास्त लक्ष असते. त्यातून मराठी आपली राजभाषा असूनही दुर्लक्ष होते. ही दुखरी नस ओळखून एक शिक्षक निवृत्तीनंतरही जिल्ह्यातील शाळांमध्ये फिरून विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण व शुद्धलेखनाचे धडे देत आहेत. वसंत गोपाळ पाठक असे ध्यास घेतलेल्या या शिक्षकांचे नाव असून, वयाच्या ७६ व्या वर्षीही त्यांचे हे काम अविरत सुरू आहे.

पाठक सर म्हणून ओळख असलेले वसंत पाठक आंतरभारती ​शिक्षण संस्थेच्या कोरगावकर हायस्कूलमधून १९९८ साली निवृत्त झाले. मराठी हा त्यांचा विषय. नोकरीमध्ये असतानाही जी मुले दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवत, त्यांच्या घरचा पत्ता शोधून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यास ते जात. अजूनही अशा विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या यशाचे कौतुक करण्यास पाठक सर पाठीमागे नाहीत.

मराठी हा त्यांचा विषय, पण अनेकदा मुले मराठीकडे काणाडोळा करतात. नजीकच्या दिवसात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार असल्याने त्या भाषेचा कणा असलेला व्याकरण व लेखन सुधारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची मराठी सुधारण्याची गरज आहे.

शहराबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन किमान दोन तास व्याकरण व लेखनाचे तास ते घेतात. स्वतःची व्याकरण, लेखनाची पुस्तके घेऊन जातात. त्यासाठी कोणतेही मानधन स्वीकारत नाहीत ही खास बाब आहे.


ध्यास घेतलाय सुसंस्कारित पिढी घडविण्याचा

एक सुसंस्कारित पिढी निर्माण करण्याच्या ध्यासाने प्रेरित होऊन या कार्याला वाहून घेणारे धडाडीचे कार्यकर्ते म्हणजे गणपतराव बाजीराव पाटोळे. कधी मुलांमध्ये मूल होणारे, तर कधी अन्यायाविरोधात तेवढ्याच ताकदीने उभारणारे पाटोळे सर हे आज लहान मुलांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

पाटोळे केवळ शिक्षकच नाहीत, किंबहुना ते गडहिंग्लज येथील साधना व्होकेशनल विभागात प्रशासकीय कर्मचारी म्हणून काम करतात. गेली अठरा वर्षे राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून एक सुसंस्कारित पिढी घडविण्याचे कार्य ते करीत आहेत. गेली अठरा वर्षे ते राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून झांज-पथक, लेझीम, बरची, ऐरोबिक, समूह गीत, गोष्टी, व्याख्यान, गटचर्चा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. या कार्यक्रमांतर्गत मनोरंजन आणि मनोरंजनाच्या माध्यमातून शिक्षण असा सहज आणि सुंदर संकल्पना मांडत आहेत. आजअखेर त्यांनी गडहिंग्लज उपविभागासह शिरोळ व कोल्हापूर येथे अनेक शिबिरे घेतली तीसुद्धा कोणतीही आर्थिक मदत न घेता. केवळ राष्ट्र सेवा दल नव्हे तर देहदान चळवळ, नेत्रदान चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, समाजवादी प्रबोधिनी या आणि अशा अनेक संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. आजरा तालुक्यातील आवंडी धनगरवाड्यावरील वंचित मुलांना पेंटिंग, क्राफ्ट, मैदानी खेळ, ढोल-ताशा, लेझीम असे कौशल्य शिक्षण देण्याच्या त्यांनी विडा उचलला आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सक्षम होणे सर्वच विद्यार्थ्यांचे ध्येय असते. त्यासाठी अनेकांना स्पर्धा परीक्षा हे जवळचे माध्यम वाटते. अशा परीक्षेची तयारी करत असताना मूलभूत मार्गदर्शनाची आवश्यकता असते. असे मार्गदर्शन प्राथमिक शिक्षणापासून मिळाल्यास विद्यार्थी अधिक सक्षमपणे स्पर्धेला सामोरे जाईल या संकल्पनेतून नेहरू नगर विद्यामंदिरच्या विनोदकुमार भोंग यांनी 'समग्र शिष्यवृत्ती' या नावाने अॅप तयार केला आहे. अॅपच्या माध्यमातून पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा एका क्लिकवर आणली आहे. अशा कृतिशील शिक्षकांच्या प्रयोगामुळे कोल्हापूर महापालिकेचे प्राथमिक शिक्षण मंडळाने राज्यात नावलौकिक मिळवला आहे. अॅपमध्ये या दोन्ही परीक्षांचे अभ्यासक्रम, महत्त्वाच्या पीडीएफ आणि त्याचबरोबर ऑडिओचा समावेश आहे.

'समग्र शिष्यवृत्ती अॅप'

अॅपच्या माध्यमातून दर रविवारी ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. परीक्षेनंतर त्वरित निकाल जाहीर होत असल्याने दर रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी पाच हजार विद्यार्थी सामोरे जातात. यातून विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेची चांगली तयारी होत आहे. अॅपबरोबरच २०११ पासून सातत्याने चिल्ड्रन फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले जात आहे. भोंगे यांच्या वैज्ञानिक कल्पकतेतून साकारलेल्या प्रयोगांनी शहर आणि जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. भोंग यांच्या कृतिशील शिक्षण पद्धतीमुळे महापालिकेची शाळा असूनही प्रकाशझोतात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राधिकरण मान्य, आरक्षणे नकोत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हद्दवाढप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधिकरणाचा पर्याय दिला. 'ड' वर्ग महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्राधिकरणाचा राज्यातील हा पाहिलाच निर्णय आहे. शहरालगतच्या गावांच्या विकासासाठी प्राधिकरणाला आम्ही मान्यता दिली आहे. त्यात शहराचा समावेश झाला तरी आमचा आक्षेप नाही. मात्र, हद्दवाढीला आणि शेत जमिनींवरील आरक्षणांना आमचा विरोध कायम आहे', अशी भूमिका रविवारी हद्दवाढ विरोधी कृती समितीने मांडली. सर्किट हाउसवर याबाबत बैठक झाली. आमदार चंद्रदीप नरके यांनी, 'महापालिका पदाधिकारी, नगरसेवकांवर टीका करू नये', अशी विनंती केली. त्यानुसार बैठकीत टीका टाळण्यात आली.

माजी आमदार संपत पवार म्हणाले, 'प्राधिकरणाचा प्रस्ताव ठेवून मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढप्रश्नी निर्माण झालेली कोंडी फोडली. त्यांचे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आम्ही अभिनंदन करतो. ग्रामीण जनतेच्या भावना, हित सरकारपर्यंत पोहोचविण्यात लोकप्रति‌निधीनी चांगला पाठपुरावा केला. प्राधिकरणाबाबत पंधरा दिवसांत १८ गावांनी सूचना द्याव्यात. त्यानंतर प्राधिकरणाचा अभ्यास असलेल्या आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चासत्र आयोजित केले जाईल. ग्रामपंचायतीचे हक्क, कर्तव्य अबाधीत ठेवत, शेतजमिनींवर आरक्षणे न टाकता विकास करणारे प्र‌ाधिकरण असावे यासाठी आग्रही राहू. प्राधिकरणाची रचना करताना ग्रामीण जनतेच्या विरोधातील अटी, नियम असणार नाहीत, याकडे लक्ष देणार आहे.'

आमदार अमल महाडिक म्हणाले, 'राज्यातील विद्यमान प्राधिकरणे आणि कोल्हापूरसाठी सुचविलेले प्राधिकरण यात मोठा फरक आहे. येथील प्राधिकरणाचे ‌नियम, अटी, कार्यकक्षा वेगळ्या असतील. त्यामुळेच १८ गावांसह, दोन एमआयडीसींना पूरकच अटी, नियम असतील हे पाहिले जाईल. ग्रामस्थांच्या सूचना, लोकप्रतिनिधींचा विचार करूनच नियमावली करण्यात येणार आहे. प्राधिकरणात शहराचा समावेश होणार असेल तर आमचा आक्षेप नाही.'

आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, 'हद्दवाढीला आणि शेत जमिनींवर आरक्षणे टाकण्यास विरोध कायम आहे. शहरांचा अतिरिक्त भारही लगतच्या गावांवर पडतो ही वस्तूस्थिती आहे. शहराजवळील गावांचा विकास सक्षमपणे होण्यासाठी प्राधिकरणाला आम्ही मान्यता दिली आहे.'

भाजपचे बाबा देसाई, राजू माने यांनी भाषणात प्राधिकरणाचा पर्याय ठेवल्याबद्दल मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ‌ठराव मांडला. राजेंद्र पाटील यांनी सूचना मांडली. विरोधी कृती समितीचे निमंत्रक नाथाजीराव पोवार यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजारामपुरीतील डॉल्बीवर पोलिसांची नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणरायाच्या आगमनालाच राजारामपुरीत डॉल्बीच्या भिंती रचून दणदणाट केला जातो. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार फोफावला आहे. यंदा मात्र गणपतीच्या आगमनाला राजारामपुरीत डॉल्बी वाजणार नाही, याची खबरदारी पोलिस प्रशासनाकडून घेतली जात आहे. यासाठी राजारामपुरीत पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, डॉल्बी लावणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. यातूनही डॉल्बी लावलाच तर जागेवरच कारवाई करण्यात येणार आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत जसा बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी परिसरात डॉल्बीचा दणदणाट असतो तसाच दणदणाट राजारामपुरीत असतो. बाप्पांच्या आगमन मिरवणुकीच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत काही मंडळांचा धिंगाना सुरू असतो. रस्ते अडवून नाचगाणे करणारी मंडळे सुरूवातीलाच कायदा मोडून इतर मंडळांचा आत्मविश्वास वाढवतात. लोकप्रतिनिधींच्या छुप्या पाठिंब्यामुळे डॉल्बीचा आवाज वाढतो. यंदा असा प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राजारामपुरीत मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडे ध्वनिमापक यंत्रेही दिली आहेत. दोन बेस आणि दोन बॉक्सपेक्षा जास्त यंत्रणा वापरणाऱ्या साऊंड सिस्टिम चालकांसह मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवरही स्वतः पोलिस गुन्हे दाखल करणार आहेत. हिटलिस्टवरील मंडळांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून, गुप्त माहितीदारांकडू मंडळांची माहिती मिळवली जात आहे. मंडळे डॉल्बी लावणार असल्याचे समजताच त्यांच्यावर नजर ठेवून डॉल्बी जोडतानाही जप्तीची कारवाई होऊ शकते. ६५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज असेल तर, याची नोंद करून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले जाईल. आवाज तपासणीच्या नोंदीही ठेवल्या जाणार आहेत. यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचीही मदत घेतली जात आहे.

शहरासह जिल्ह्यातील साऊंड सिस्टिम चालक आणि मालकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या नो डॉल्बी आवाहनाला प्रतिसाद देत प्रतिज्ञापत्रे लिहून दिली आहेत. पोलिसांनी अशा सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना आणि साऊंड सिस्टिम मालकांना मोबाइलवरून नो डॉल्बीचे मेसेज पाठवले आहेत. सोशल मीडियातूनही याबाबत उद्बोधन सुरू आहे.

ध्वन‌िप्रदूषण कायद्याची माहिती देऊन डॉल्बीचे दुष्परिणामही समजावून सांगण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. यापुढे जाऊन जी मंडळे डॉल्बीचा दणदणाट करतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करणार आहे.

प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक

पुरेशी ध्वन‌िमापक यंत्रे

पोलिस प्रशासनाने नवीन २६ ध्वन‌िमापक यंत्रे मागवली आहेत. ही यंत्रे दोन दिवसात उपलब्ध होणार आहेत. तत्पुर्वी गृह खात्याकडून दहा यंत्रे उपलब्ध झाली आहेत. गणपतीच्या आगमनाला ज्या ठिकाणी ध्वन‌िप्रदूषण होते त्या सर्व ठिकाणी पोलिसांकडे ध्वन‌िमापक यंत्रे दिली जाणार आहेत. आवाजाचे मापन कशा पद्धतीने करायचे आणि त्याच्या नोंदी कशा ठेवायच्या याचेही प्रशिक्षण पोलिसांना देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावत्र आईच्या हल्ल्यात तरुण गंभीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सावत्र मुलाने घर सोडून निघून जावे यासाठी आईने मुलीच्या मदतीने सावत्र मुलावर फिनेल टाकून कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. ४) सकाळी राजारामपुरीतील तिसऱ्या गल्लीत घडली. नीलेश सुधीर कोळेकर (वय २८, रा. महेंद्र ज्वेलर्स जवळ, तिसरी गल्ली, राजारामपुरी) असे जखमी तरुणाचे नाव असून, सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. राजारामपुरी पोलिसांनी शोभा सुधीर कोळेकर (वय ४५) आणि टीना (वय २०) या हल्लेखोर मायकेलींना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंय गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.

नीलेश कोळेकर याचे राजारामपुरीतील तिसऱ्या गल्लीत वडिलोपार्जित घर आहे. छोट्याशा घरात पार्टिशन करून तो एका बाजुला राहतो, तर त्याची सावत्र आई, बहीण टीना आणि भाऊ विकी हे दुसऱ्या बाजुला राहतात. सावत्र आईने नीलेशला घर सोडून जाण्याबाबत तगादा लावला होता. यावर ५० हजार रुपये द्या, मी घर सोडतो, अन्यथा मी ५० हजार रुपये देतो. तुम्ही घर सोडा, असे नीलेशने सावत्र आईला सांगितले होते. यावरून घरात वारंवार वाद होत होते. रविवारी सकाळी सातच्या सुमारास आई शोभा आणि बहीण टीना या दोघींनी नीलेशच्या घरात जाऊन त्याच्या तोंडावर फिनेल टाकून कोयत्याने हल्ला चढवला. डोक्यात गंभीर जखमा झाल्याने नीलेश ओरडू लागला. नीलेशचा सावत्र भाऊ विकी याने नीलेशची सुटका केली. परिसरातील नागरिकांची गर्दी जमल्यानंतर विकीने नागरिकांच्या मदतीने नीलेशला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमांमुळे प्राथमिक उपचारानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी नीलेशचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा राजारामपुरी पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोर मायलेकीला ताब्यात घेतले असून, या दोघींची चौकशी सुरू आहे. कौटुंबिक वादातून आईनेच मुलावर जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धनुष्यबाणा’ वरच निवडणूक लढणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

'आगामी गडहिंग्लज नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक फक्त आणि फक्त धनुष्यबाण या चिन्हावर लढायची आहे. आले तर सोबत अन्यथा त्यांच्याशिवाय निवडणूक लढवायची आहे. तेव्हा तयारीला लागा, संघटीत व्हा, शिवसेनेची भूमिका लोकांना समजावून सांगा,' असे आवाहन कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांनी केले.

येथील नगरपालिकेच्या शाहू सभागृहात आयोजित शिवसेना मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सभासद नोंदणी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात आमदार प्रकाश अबिटकर, जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पोवार, चंदगड विधानसभा सहसंपर्क प्रमुख सुनील शिंत्रे, संघटक संग्राम कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

दुधवाडकर म्हणाले, 'गडहिंग्लज नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शिवसैनिकाने तयारीला लागले पाहिजे. घरोघरी जावून शिवसेनेची भूमिका समजावून सांगावी लागेल. घर तिथे शिवसैनिक सत्यात उतरविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचे आहेत. शिवसेना आहे म्हणून आपण आहोत ही भावना ठेवून कामाला लागा. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असणाऱ्या शिवाजी बँकेत घोटाळा करणारे काही संचालक आज उंदरासारखे सैरावैरा पळत आहेत, स्वतःला वाचविण्यासाठी पक्षात प्रवेश करून पळवाटा शोधत आहेत. त्यामुळे आपण माझी बँक आहे हे लक्षात घेऊन आंदोलन करा. अन्याय दिसेल तिथे लढा.'

जिल्हाप्रमुख देवणे म्हणाले, 'गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोण कुणासोबत आहेत हेच कळत नाही. हीच परीस्थिती गोडसाखर आणि मार्केट कमिटीमध्येही होती. शिवसेनेचा पहिला उमेदवार कोण असेल तर ते सुनील शिंत्रे असतील. गडहिंग्लज शहराला भेडसावणारा हद्दवाढीबाबत मंत्री दीपक केसरकर यांनी लक्ष देण्याचे आश्वासन दिले. मात्र याबाबत गडहिंग्लज पालिकेकडून कोणताच प्रस्ताव आला नाही. घरफळावाढीसाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील असून त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडू. गडहिंग्लजमध्ये जैविक कचरा नियोजन, हद्दवाढ, सांडपाणी प्रक्रिया केंद्र अशा अनेक समस्या आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक असून शिवसेनेला एक हाती सत्ता द्या, आम्ही शंभर टक्के सांडपाणी प्रक्रिया केंद्र व कचरापासून वीज निर्मिती प्रकल्प राबवू.' तसेच गडहिंग्लज शहरात अद्यावत ग्रंथालय उभारण्यासह चळवळी केंद्र व नगरपालिकेच्या साधनसामुग्रीवर संशोधन केंद्र उभारू असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी आमदार प्रकाश अबिटकर, जिल्हा प्रमुख संजय पवार, उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, प्रा.सुनील शिंत्रे, महिला संघटक सुषमा चव्हाण, संघटक संग्राम कुपेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सदाशिव संतू जगताप (बेकनाळ) या ८२ वर्षाच्या वृद्धांच्या सभासद नोंदणी फॉर्म भरून नोंदणीला सुरवात करण्यात आली. यावेळी संभाजी पाटील, चंदगड तालुका प्रमुख अशोक मनवाडकर, महादेव गावडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. तालुकाप्रमुख दिलीप माने यांनी स्वागत केले. शहरप्रमुख सागर कुऱ्हाडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे हत्या: तावडेचे तपासात असहकार्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला दुसरा संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याकडे एसआयटी पथकाने रविवारी (ता. ४) दिवसभर चौकशी केली. चौकशीदरम्यान तावडेवर प्रश्नांचा भड‌िमार करण्यात आला, मात्र तो प्रश्नांना बगल देत तपासात असहकार्य करीत असल्याचे जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे यांनी सांगितले. दरम्यान, तावडेच्या चौकशीसाठी चार स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी तपास यंत्रणेने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याचा ताबा पुणे येथील येरवडा कारागृहातून घेतला होता. शनिवारी वीरेंद्र तावडे याला पानसरे हत्येप्रकरणी दुसरा संशयित म्हणून अटक करुन न्यायालयात हजर केले. यावेळी पानसरे यांच्या हत्येमध्ये तावडेचा सहभाग असल्याचा संशय तपासी अधिकारी तथा अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी न्यायालयात व्यक्त केला होता. संशयित तावडे याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्यानंतर एसआयटीने त्याची सलग चौकशी सुरू ठेवली.

शनिवारी रात्री तावडेला राजारामपुरी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी त्याला कडेकोट बंदोबस्तात पोलिस मुख्यालयात नेण्यात आले. मुख्यालयातील एका कक्षामध्ये तावडेला ठेवण्यात आले होते. तेथे त्याची दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. कॉम्रेड पानसरे हत्येच्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशीसाठी स्वतंत्र प्रश्नावली तयार केली आहे. तपासासाठी नेमलेल्या चार पथकांकडे स्वतंत्र प्रश्न आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या रणनीतीनुसार तपास पथकातील अधिकारी तावडेवर प्रश्नांचा भडीमार करीत आहेत. तपासातील माहिती आणि सीबीआयकडील माहितीच्या आधारे तावडेची चौकशी सुरू आहे. दरम्यान, चौकशीत तावडे पोलिसांच्या प्रश्नांना सोयीस्करपणे बगल देत आहे असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरला मागितली खंडणी;पत्रकारांसह चार जणांना अटक

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

पंढरपूर शहरातील एका डॉक्टरला पत्रकारितेच्या माध्यमातून बदनाम करण्याचे आणि जीवे मारण्याची धमकी देत पत्रकार प्रशांत कुलकर्णी आणि स्वयंघोषित मानवाधिकार संघटनेचा पदाधिकारी दीपक थोरात याने आपल्या टोळीसह वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीसांनी खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली आहे. दोघे जण फरार आहेत.

दरम्यान, या प्रकरणात वापरण्यात आलेली कार, शुटिंग कॅमेरा, डॉक्टरकडून घेतलेला पाच लाखांचा बेरर चेक आणि त्यांची ओळखपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. या टोळीचा तपास सुरू केला असून, अशा पद्धतीचे अनेक गुन्हे यातून उघड होण्याची शक्यता आहे.

पंढरपुरातील इसबावी परिसरात डॉक्टर अतुल हावळे याचे माऊली हॉस्पिटल आहे. रविवारी दुपारी पत्रकार प्रशांत कुलकर्णी, स्वयंघोषीत मानवाधिकार पदाधिकारी दीपक थोरात यांनी तीन महिन्यांपूर्वी मयत झालेल्या एका प्रकरणात तुमच्या निष्काळजीपणामुळे पेशंटचा मृत्यू झाला असून, या प्रकरणाची सर्व माहिती मीडियात उघड करून तुमची आणि हॉस्पिटलची बदनामी करू, जर हे प्रकरण मिटवायचे असेल तर तुम्ही आम्हाला २० लाख रुपये द्या. न दिल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली.

सहा जणाच्या टोळीने डॉक्टर हावळे ना मागितलेल्या वीस लाख रूपयांच्या खंडणीची तडजोड पाच लाख रुपयांमध्ये केली. डॉक्टरांकडून पाच लाख रुपयांचा आयसीआयसीआय बँकेचा चेक घेतला. पण, टोळीने डॉक्टरला आपल्याकडे असणाऱ्या कारमध्ये बसवून पंढरपुरातील काही ओळखीच्या सराफांकडून उसने एक लाख रूपये घेण्यासाठी दबाव आणला. मात्र, त्यांचा हा डाव फसला. डॉक्टरच्या पत्नीला हा सर्व प्रकार समजल्यानंतर त्यांनी पंढरपूर शहर पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी तत्काळ केलेल्या हालचालींमुळे ही सर्व टोळीला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले.

हावळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पत्रकार प्रशांत कुलकर्णी, मानवाधिकार संघटनेचा पदाधिकारी दीपक थोरात, सागर माने, सुनील बोराडे, बालाजी चव्हाणसह अल्पवयीन मंदार मंगसुळकरवर पंढरपूर शहर पोलिसांत आयपीसी ३४२, ३६५, ३८४, ३८६, ५०६ आदी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यामधील चौघांना अटक केली असून, अजून दोन जणांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा बाप्पामय

$
0
0



सातारा

गणपती बाप्पा मोरया..,च्या गजरात सार्वजनिक मंडळांसह घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन सोमवारी झाले. विघ्नहर्त्या गणरायाच्या अकरा दिवसांच्या उत्सवासाठी शाहूनगरी गणेशमय झाली आहे. रविवारी चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच साताऱ्यात काही सार्वजनिक गणेश मंडळांनी वाजतगाजत व जल्लोषात गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेल्या. जिल्ह्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सातारा शहरासह अवघा जिल्हा बाप्पामय होऊन गेला आहे.

गणेशोत्सवाला आज सोमवारपासून दिमाखदार सुरुवात झाली. गणेशभक्तीचा महिमा सांगणाऱ्या या उत्सवामुळे वातावरणात उत्साह संचारला आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या पंचमुखी गणेश मंडळाच्या शाडूच्या सहा फूट सुंदर गणेश मूर्तीची मिरवणूक सकाळी अदालत वाडा येथून ढोलपथकाच्या गजरात मिरवणूक निघाली. दरम्यान, विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांबरोबरच घरोघरी अबालवृद्धांनी उत्साह दाखवला. फुटका तलाव मंडळाने दर वर्षी प्रमाणे यंदाही फुटका तलावात तरंगत्या तराफ्यावर बालरुपातील शेंदरी रंगातील सुबक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी मंडळाचे अध्यक्ष रवी पवार आणि कार्यंकर्त्यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता केली. शहरातील शिवाजी सर्कल मंडळ, आयडीबीआय कर्मचारी मंडळाचा गणेश, मध्यवर्ती बँकेची गणेश मूर्ती. प्राथमिक शिक्षक सहकारी बॅकेंतील गणेश मूर्तींची सकाळी प्रतिष्ठापना करण्यात आली.

६०१ गावात एक गाव गणपती

सातारा जिल्ह्यात ४ हजार ५९७ सार्वजनिक मंडळांनी यंदा गणेशोत्सव साजरा केला आहे. सुमारे २ लाख ३ हजार ४९५ ठिकाणी घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील पोलिस ठाण्याअंतर्गत एक गाव एक गाव गणपती ही संकल्पना अंमलात आणली आहे. यंदा सातारा जिल्ह्यात ६०४ ठिकाणी एक गाव एक गणपती बसविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस दलाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images